जनावरें.
---------------

 मोठया हिंसक श्वापदांपैकी पट्टे असलेले डाहाणे वाघ, बिबेवाघ, चित्तेवाघ किंवा दिवटी, आणि लहान जनावरांपैकींं तरस, खोकड, सांबर, डुकर, भेकर, सायाळ, ससे, खार, मुंगुस, कोल्हा, भालु, पिशारा, कोळिसरा, रानमांजर, भाट, यांचे येथील जंगलांत अगदी माहेरघर आहे. इतक्या सर्व प्रकारची जनावरें एके ठिकाणी राहण्यास, देशावर असे ठिकाण बहुतकरून नाहींंच. या जनावरांना येथे राहण्यास, हवा थंड, झाडी गर्द असून मनसोक्त, शिकारी किंवा पारधी लोकांचा मुळींच सुळसुळाट नाही; अशी स्थिति असल्यामुळे येथेंं त्यांस येथेच्छ क्रीडा करण्यास सांपडतेंं. ही जनावरे असतात, त्या ठिकाणी सूर्यदर्शनसुद्धा होणेंं कठीण इतकी झाडी असल्यामुळे रात्र व दिवस हींं यांना सारखीच वाटतात. म्हणून दिवसास सुद्धांं वाटेल तेव्हां वाटेल तिकडे भडक्या मारीत हींं फिरत अस तात. फारच भूक लागली म्हणजे कांहीं भक्ष्य मिळविण्याकरितां हीं माणसाच्या वस्तीजवळ येतात. त्या वेळीं ग्राम्य जनावरांना वाघाचा वगैरे लांबून वास येऊन त्यांची अगदीं गाळण होऊन जाते. वाघ वगैरे हिंसक जनावरांना लांबून माणसाची चाहूल लागली, म्हणजे तींही भिऊन जवळ येत नाहींत. याकरितां येथील कोंकणे व धावड वगैरे जंगलांत जाण्यायेण्याचा प्रसंग पडणारे लोकांजवळ मोठमोठया काठया असून त्यांवर लोखंडी लहान लहान तुकडे कोयंड्यांत बसविलेलें असतात. या काठया नुसत्या हालविल्या तरी त्यांपासून आवाज होतो. तसा आवाज करीत वाटेनें चाललें, किंवा मोठयानें बोलत चाललें म्हणजे ह्या जनावरांची जवळ येण्याची भीती राहत नाही.

 परंतु एकटें दुकटें अगदीं सकाळी किंवा सायंकाळी जर झाडीतून मुकाटयानें चाललें, तर वाघोबांची मुलाखत होण्याची फार भिति असते ! या स्वारींचा सामना झाल्यास असलेल्या जागेवरून हलता येत नाहीं, व त्यांचा अपमान करून कोणी आपली मार्ग सुधारला, तर त्याबद्दल त्याला हे शीघ्रकोपी जम दग्नी काय दंड करतील हेंही सांगतां येत नाहीं. तेव्हां अशा गृहस्थाचें दर्शनसुद्धां नको असेल तर सूर्योदयापूर्वी व सूर्यास्तानंतर यांचे वस्तीच्या जवळ जाण्याचे धाडस करूं नये हेंच चांगले.

 रात्रीचा सापळा लावून ठेविला, म्हणजे घुशीप्रमाणें वाघ पिंजऱ्यांंत आडकून सांपडतो. असे जिवंत वाघ धरण्याचे येथील कांहीं बंगल्यावर सांपळेही आहेत. गेले आक्टोबर सन १९०१ इसवी महिन्यांत असा जिवंत सांपडलेला वाघ भावनगरचे महाराजांनीं आपले मुलखांत पाठवून दिला आहे. असे भटक्या मारीत फिरणारे वाघ किंवा इतर श्वापदे येथें रात्रीस कधीं कधीं अगदीं गांवाजवळ येतात.

 येथें इतकीं जनावरें आहेत तथापि मोठी शिकार सांपडेल असा शिकारी लोकांना भरंसा नसतो. सुमारें १० वर्षीपूर्वी येथें बरेच वाघ मारण्यांत आले होते. यामुळे पूर्वीपेक्षां आतां यांची जात कमी झाल्याकारणाने शिकारी लोकांना शिकारीकरितां एल्फिन्स्टन पाइंटाकडे मडिमहालांत किंवा पारूत म्हणून दाट झाडीचे ठिकाणींं रेडा किंवा बकरें बांधून ठेवून उमेदवारी  करावी लागते. म्हणजे कोठे २|३ दिवसांनीं त्याला एखादे सावज मिळालें तर मिळतें. हीं जनावरें ह्या आमिषाचा एकदम स्वाहा करीत नाहीत, यामुळे एकदां येऊन यांनीं याचा मासला पाहिला असें समजतांच आसपास लपून बसून हीं पुनः त्यांस खाण्यास येतांच त्यांचा शिकारीलोक मोक्ष करतात.

 आर्थरसीटच्या आसपास हिंवाळ्यांत व उन्हाळ्यांत सांबर सांपडतात. येथें कारवी वगैरेची झुडपांची खुरटी झाडी दाट असल्यामुळे त्यांना हुसकून माऱ्यांंत आणण्यास फार त्रास पडतो. येथें ससे भेंकरें वगैरे इतर जनावरेंही पुष्कळ आहेत; ती विशेषेंंकरून वाहत्या पाण्याचे नजिकच्या झुडपाळ रानांत असतात. हीं जनावरे फार जागरूक व सावध असतात. या डोंगरावरील रानडुकरें व सायाळ फक्त रात्रीस येऊन बटाटे लावलेल्या शेताची धूळधाणी करतात. मार्च व एप्रिल महिन्यांत पांचगणीरस्ता लिंगमळा व वेण्यावॉटरफाल् यांचे आसपास लावी पक्षी असतात त्यांची शिकार करण्यात लोक फार जातात. 

पक्षी.

 साधारणपणे दिवसा आपण एखाद्या गांवाजवळ आलों ह्मणजे कावळ्याचें कांव कांव ओरडणें व रात्रींचे कुत्र्यांचें भुंंकणें ऐकू येतांच गांव जवळ आलें असें समजतें. परंतु या महाबळेश्वरीं कावळे व कुत्रे असून त्यांचा शब्द पर्जन्य काळांत व हिंवाळ्यांत ऐकूच येत नाहीं; यावरून येथील थंड हवेनें त्यांची पांचावर धारण बसली कीं काय अशी शंका येते. पांखरें नेहमीं देशावर सर्वत्र झाडांवरून दिसतात व तेथें झाडे कमी असल्यामुळे एकेका झाडावर थव्याचे थवे किलकिलाट करीत असतात. याचें कारण त्यांस बसण्यास झाडे पुरत नाहींत असें दिसतें, परंतु येथें त्याचे उलट स्थिति आहे. ह्मणजे झाडे पुष्कळ असून पक्षी फार कमी, असें कां होते ? त्यांस येथें डोंगरावर पिक नसल्यामुळे खाण्यास मिळत नाहीं ह्मणून, किंवा येथें धुकें व पाऊस असह्य ह्मणून कीं काय हें ठरविलें पाहिजे. चिमण्या तर कसल्या त्या येथें मुळींच नाहींत. यावरून या ठिकाणचा हिंवाळा पावसाळा त्यांचे पंचप्राण गोळा करणारा आहे असें वाटतें. परंतु हमेशा डोंगराखालीं  तळखोऱ्यांत बुलबुलपक्षी उर्फ भुलगड, सुतारपक्षी, गिधाड, रानकोंबडा, मोर, साळुंंखी, हुलगुड, घारी, ल्हावा, पाकोळी, पिंगळा, डोळा, झाप, काळोटी, चिचारी, गोगी, पारवा, पोट्यारा, वाघूळ, गोचर, गोमा, केकाटी, खंड्या, कुकुडकुंबा, बगळा, परटीण, मालगाजी, बहिरीससाणा व इतर जंगली पांखरेंं रानांत दृष्टीस पडतात. म्हणून येथे डोंगरावर जर जोंधळा बाजरीचेंं पिक कोणी केलेंं असतेंं तर त्याला माळा घालून पांखरेंं राखण्यास जावयाचेंं कारण पडले नसतेंं!

सर्प.

 महाबळेश्वरची थंड हवा उष्ण प्रकृतीला फार मानवते म्हणूनच येथे कोकणाप्रमाणेंं बहुतेक विषारी जिवाणूंचा भरणा झाला आहे की काय, हे निश्चितपणेंं सांगतां येत नाहींं. नाग, अधेल्या साप, धामणी, मण्यारी, फुरसें, राती, चापडा, महांडोळ किंवा अजगर, जोगेटा, रुखाडा, येरंड्या, फरड, चितई, कांडोर, विंचू, इंगळी, विसांबर ( पालीप्रमाणेंं ) वगैरे जातींची जिवाणेंं येथेंं आहेत त्याबद्दल थोडाफार विचार करूं.   नाग- या जातीचा सर्प फार चलाख असतो. हा पिंवळा धमक असून अस्सल जातीचा असला म्हणजे याची खोडी केल्यावांचून हा सहसा कोणाच्या वाटेस जात नाहीं. परंतु मुद्दाम किंवा आकस्मिक त्यास कांहीं धक्का लागला, तर तो मग कोणाची भीड न ठेवितां एकदम चाल करून अंगावर जातो. अशावेळीं त्याचा निरुपाय झाल्यास, तो आपल्या जिवाचा बचाव करण्यास वाट सांपडेल तेथें जाऊन दडी देतो, आणि पुनः आपला वाद्या सांपडेल तेव्हां त्याच्या शब्दज्ञानानें त्याला ओळखून त्याचा सूड घेतो !

 धामण-ही काळसर रंगाची असून हिचें तोंड व शेंपूट सारखेच जाड असतें. हिचा असा चमत्कार आहे की म्हशीची व हिची नजरानजर झाल्यास ह्मैस नम्र होऊन तिच्यापुढें शेवटचें लोटांगण घालते, आणि ती पुनः कधीही उठत नाही. ही मनुष्यास चावली असतां वेळेवर औषध पोहोचल्यास मनुष्य मरत नाहीं.

 मण्यार-या जनावराच्या अंगावर पांढरे ठिपके असून ही जात्या फार चलाख असते. हिचें विष इतकें  जालीम असतें की, ज्याच्यावर हिचा अनुग्रह होईल तो जगण्याची कोणी आशाच करावयास नको.

 फुरसें-हें जीवाणूंं वीत-दीडवीत, पराकाष्ठा हात भर लांब असून मधल्या बोटाइतके जाड असतेंं. याचा रंग कांहीं काळ हिरवा व पिवळा अशा मिश्रणाचा असतो.हे मोठे असल्यास याचे अंगावर केंसही असतात. याचें विष जलाल असल्यानें हें डंसलें असतां मनुष्य जगत नाहीं. याचे विष उतरून मनुष्य बरा होण्यासाठीं इकडील लोक ज्या ठिकाणीं याचा दंश झाला असेल त्या ठिकाणी कोंबडयाचें गुदस्थान लावितात, असे केल्यानें कोंबडें विष शोषून घेऊन लागलीच मरतें. याप्रमाणें बारा पंधरा कोंबडी मेल्यानंतर पुढें कोंबडी मरेनाशी झाल्यावर तो मनुष्य दगावत नहीं. हा उपाय तें डंसतांच केला तर गुण येतो, नाहीं तर ते करण्यांत मुळींच अर्थ नसतो.

 विंचु-हा विषारी प्राणी आहे, परंतु याचें विष घातुक होत नाहीं. विंचवांत इंगळी ह्मणोन जी जात असते, ती डंसली तर मात्र फार प्राणांतिक वेदना होतात.

 कांट किंवा कानिट-हे जीव पावसाळाभर  जिकडे तिकडे दाट अरण्यांत सर्वत्र दिसतात. हे सरासरी दोन इंच लांब असून बारीक वातीप्रमाणेंं सूक्ष्म असतात. हे मनुष्य किंवा जनावरें जाण्यायेण्याच्या वाटेवर आपली मान वर करून बसलेले असतात, आणि वाटेनें जाणाऱ्याच्या पायाला डंसतात. हा जीव जळूप्रमाणें रक्त शोषून घेऊन मग आपोआप खालीं पडतो व नंतर डंसल्या जागेतून थोडा रक्तश्राव होऊन थांबतो. यामुळे मनुष्य अजिबात जायबंदी होण्याची भीति नसते.

 बाकीचीं सर्व जनावरें फारच भयंकर आहेत त्यांच्या तडाक्यांत आल्यावर, तीं यमसदनास नेल्यावांचून सोडणारीं नाहींत.

 हे सर्व विषारी प्राणी पावसाच्या दिवसांत दगडांखालीं मोठमोठींं बिळे असतात त्यांत निवाऱ्याच्या ठिकाणीं जाऊन बसतात. पुढें पावसाळा खलास होऊन उन्हाची ताप पडू लागली, ह्मणजे बाहेर निघून जंगलांतील लहान झाडांवर किंवा खडकावर हे ऊन खात खुशाल पडतात, तेव्हां इकडील लोकांस ते संवयीनें चट्कन् दृष्टी पडतात. नवीन परकीय मनुष्याला यांची ओळख एकदम न पटल्यामुळे कदाचित् त्याजवर भयंकर प्रसंग गुदरण्याचा संभव असतो. हीं जनावरें मोठमोठया रहदारीच्या रस्त्यावर सहसा येऊन पडत नाहींत, परंतु लांब लांब ठिकाणीं जंगलांतून पाईंटांचें पायरस्ते, घोडयावरून जाण्याचे रस्ते व लहान गाडी रस्ते, यांवर पडणें यांस निर्धास्त वाटतें. सर्वांत फुरशाचा प्रताप जास्त आहे. तीं दरसाल दहापांच बळी घेतल्यावांचून सोडीत नाहींत.

 हीं दंश करणारीं जनावरें, अंधार पडल्यावर आपण बाहेर फिरावयास गेल्यास, केव्हां केव्हां तरी भेटल्याशिवाय रहावयाचीं नाहींत. ज्यांना त्यांचें सप्रेम भेटणें नको असेल त्यांनीं जिकड़े तिकडे स्वच्छ उजेड पडल्यावर बाहेर निघालें पाहिजे. तात्पर्य, महाबळेश्र्वरीं सकाळीं सहापूर्वीं एकटया दुकटयानें बाहेर पडणे व संध्याकाळीं साताचे पुढे अनवाणी व बरोबर दिवा घेतल्याशिवाय बाहेर जाणें फार धाडसाचें काम आहे. विशेषेंकरून अंधाऱ्या रात्रीं अशा रीतीनें बाहेर पडणें किंवा बाहेर राहणें फारच वेडेपणाचें आहे. एकंदरींत पायी जाणाऱ्यांनींं नमून खालीं मान घालून चाललें पाहिजे.  कारण दिवसासुद्धां हीं फुरशीं रस्त्यावर येऊन माती खात स्वस्थ पडतात. या फुरश्यांचे दंशावर पाचगणीस जान चेस साहेब म्हणून कोणी असे तो दंश होतांच इलाज करून मनुष्य सहसा दगावू देत नसे. त्याची अशी पद्धत असे कीं, डंसलेल्या ठिकाणाच्या वरच्या बाजूस घट्ट बांधून तो डंसल्या जागीं चिरण्याचे शस्त्रानें फासण्या मारी आणि असें करून त्या जखमेतून यथास्थित रक्त वाहून गेल्यावर त्या ठिकाणीं तो कास्टिक लावीत असे. हा प्रयोग चालतांना दर १५ मिनिटांनीं तो अमोनियाचा अमल देऊन गुंगी आणी. अखेरीस त्या मनुष्याला झोंप येई ती तो घेऊं देत नसे.

 हे विषारी जीव नाहीसे व्हावे म्हणून हे मारणारे लोकांना बक्षिसाची लालूच दाखवून परिक्षिति राजाचा मुलगा जन्मेजयाच्यासारखेंं सर्पसत्र करण्याचा आव सरकारानें फंंड जमवून घातला होता. त्याचा दर अस्सल नागांस प्रत्येकीं दोन आणे व इतर प्रकारच्यांस एक आणा याप्रमाणें होता. त्याप्रमाणें संहारोपक्रम येथील धावड जातीच्या लोकांनीं विलक्षण प्रकारचा चालविला होता. परंतु पुढेंं ह्या बक्षिसाच्या  कामांत सरकारानें हात आखडता घेतल्यामुळे सर्पसत्र अर्धवटच राहिलें, त्यायोगानें हल्लीं फार भिऊन रहावे लागते.

 जन्मेजयाच्या सर्पसत्रानें त्या जातीला चांगलाच नरमपणा आणून सोडला आहे तसा आधुनिक खटपटीचा परिणाम झाला नाहीं. पूर्वीच्या सर्पसत्राचा वचक बसून गेला आहे त्याचें अद्याप पावेतो प्रत्यंतर येतें, तें असें: रात्रीं बेरात्रीं घराच्या आसपास किंवा घरांतील अडचणीचे भागांत यांचा कोणी जातवाला येऊन ओरडूं लागला ह्मणजे पुढील श्लोक त्याला ऐकू येई इतक्या मोठ्यानें ह्मणूं लागलें असतां त्याला पूर्वीची स्मृति होऊन तो निघून जातो किंवा त्याचें कच कच ओरडणें बंद होतें. याचा आवाज उंंदरासारखाच आहे परंतु थोडा कर्कश आहे. तो श्लोक असा:-

  आस्तीकवचनं श्रुत्वा यः सर्पो

  न निवर्तति। शतधा भिद्यते

  मूघ्नि शं शं तस्य फलं यथा ॥


---------------


 येथपर्यंत “ महाबळेश्वर " हें ठिकाण सर्व मुंबई इलाख्यांत पहिले प्रतीचे सॅॅनिटेरियम (आरोग्यवर्धनीय स्थान ) ठरविण्यास येथें कोणत्या नैसर्गिक गोष्टींची कशा प्रकारची अनुकूलता किंवा स्थिति आहे, हें दिलें आहे. आतां याचे पुढील भागांत मनुष्ये आपल्या सोईस किंवा संवईस अनुसरून कोणत्या कृत्रिम व्यवस्था करून घेऊन या सृष्ट पदार्थाचा कोणत्या प्रकारें फायदा करून घेत आहेत, हें थोडक्यांत पण सुरस रीतीनें सांगितलें आहे.

----------------