महाबळेश्वर/शेतांतील पिकें.
महाबळेश्वर व मालकमपेठच्या माथ्याच्या पठारावर ज्या खुल्या जागेंत जिवंत पाणी वहात असतें, त्या जागीं पाऊसकाळामध्यें डोंगराखालीं होणारीं भात, नागली ( नाचणी ), काठळी, वरी, सावे वगैरें धान्यें होत नाहींत. परंतु पाऊसकाळानंतर खालीं होणाऱ्या पिकांपैकीं गहूं, सातू, वगैरे धान्याचीं पीकें त्या पाण्यावर येथें होऊं शकतात, याचें कारण असें आहे कीं, या डोंगराखालील खोऱ्यांत सपाटीच्या सुपीक जमिनीवर जितका पाऊस पडत असतो त्यापेक्षां या डोंगरावर अतोनात पडतो. ह्यणजे डोंगरमाथ्यावर सुमारें ३५० इंच पडतो, पण डोंगराखालों मैल किंवा दोन मैल गेलें ह्मणजे लागलींच पावसाचें मान १५० इंचाचें आंत येतें. असा प्रकार कां होतो याचें ’हवा’ या विषयाचे विवेचनांत दिग्दर्शन केलेंच आहे.
पांच मैलाचे त्रिज्येपलीकडे व अलीकडे, डोंगरांतील घसरणीच्या जमिनींत नाचणी, वरी, सावा, हीं
मुख्य कोंकणी पिकें करितात. हीं करण्याच्या जागा इतक्या उताराच्या असतात की, त्यांपैकीं कांहीं ठिकाणीं तर बैलाची मदत घेण्याचेंही फार दुरापास्त असतें. ह्मणून येथें अशा जमिनींत सर्व काम माणसेंच करतात. व अशा जागीं पीकही सपाठीच्या जमिनीवरील पिकापेक्षां बहुतकरून चांगलें येते. या डोंगराच्या पायथ्याशीं जीं गावे आहेत तीं- कृष्णाखोऱ्यांत जोर, गोळेवाडी, धयाट, परतवडी; कोयना खोऱ्यांत बिरवाडी, पार, घोणसपूर, चतुरबेट वगैरे; वेण्या खोऱ्यांत दानवली, माचूतर वगैरे:- त्यांतील लोक डोंगरांतून वाहत येणा-या झ-याच्या पाण्याचे पाट बांधून काढून तें पाणी डोंगराच्या पायथ्यास केलेल्या टप्पेवजा भातखाचरांत सोडितात. आणि त्या पाण्यावर भाताचें पीक करितात, हे पाणी बरेच दिवस टिकण्यासारखे असल्यास भात काढून घेऊन त्याच ठिकाणीं गहूं व सातू करितात. कांहीं खेड्यांना नदीच्या पाटानें किंवा दुस-या रीतीनें पाण्याचा भरपुर पुरवठा होत असल्यास तेथें उसाचेंही पीक करितात. भात, नाचणी, वरी हीं पिकें करावयाची कृति कशी आहे याबद्दलची थोडी माहिती पुढें देतो. ती शहरवासी लोकांस मौजेची वाटेल.
नाचणी, वरी, यांचें पीक करण्यास प्रथमत: त्यांचीं रोपें ज्यांच्या त्यांच्या लागवडीच्या जागेत करावीं लागतात. प्रथम रानांतील राब ( जंगलांतील झाडें, झुंडपें, पाला) आणून रोप करण्याच्या जागीं पसरून ठेवितात. पुढें मार्च किंवा एप्रिल महिन्यांत ती राब चांगली वाळली ह्मणजे तिला आग लावून खालील जमीन भाजतात. या तयार केलेल्या जमिनीस तरवा ह्मणतात. या भाजलेल्या जमीनीवर पाऊस प्रथम पडला ह्मणजे त्यांत हीं धान्यें जून महिन्यांत पेरतात. महिना पंधरा दिवसांत या धान्यांचीं रोपें होऊन त्यांची गांठ बसण्यासारखीं तीं मोठी झालीं ह्मणजे माणसांकडून उपटून काढून स्वच्छ धुतात व लागणीकरितां राखून ठेविलेल्या ठिकाणी त्यांचा ढीग घालून ठेवितात. वर जमीन भाजावी लागते ह्मणून सांगितले आहे ती अशाकरितां कीं, त्यांतील तयार झालेलें रोप काढून लागणीचें ठिकाणीं नेण्याचे वेळीं तें तुटूं नये.
भाताची जमीन-ही नांगरानें कोरडेपणी व ओलेपणी मोखर करावी लागते; नंतर तींत पाणी सोडून गरगरीत चिखल तयार झाल्यावर तें पाणी बंद ठेवून त्यावर पाठाळ (लेव्हल) फिरवून साफ करितात. मग पुरुष, बायका, मुलें चिखलानें रबरबीत झालेल्या जमिनीत शिरून व रोपांच्या ढिगांतून गांठीं मारलेल्या गुंडाळ्या घेऊन एका हारींने रोपें खोंवीत जातात. तीं इतक्या बिनचूक रीतानें जलद खोंवीत जातात की, त्यांच्या रांगामध्यें दोरी धरल्याप्रमाणें समांतर जागा राहते. एक खंडीचे बारोली पीक होण्यास सुमारें ९० पायली भाताचीं रोपें तयार करावीं लागतात. पुढें उन्हाची साधारण ताप पडली ह्मणजे एकदां भातशेत बेणून किंवा भांगलून घेतात. ही बेणणी झाली ह्मणजे रोपांच्या वाढीस जास्त जोर लागून पीक लौकर तयार होतें आणि भाताच्या पिकाचे जून दांडे भाताच्या लोंबांतील किंवा कणसांतील तांदुळाच्या जडत्वामुळे जमीनीवर आडवे पडतात. तेव्हां शेत पिंवळे रंगाचें दिसू लागतें. याप्रमाणें साळी (भात) चें पीक तयार झाल्यावर सारवलेल्या जाग्यांत तें झोडून भात काढून
घेतात. एका खंडीचें पिकास राब गोळा करण्यास, खत टाकण्यास, रोप करण्यास, रोप लावण्यास, बेणण्यास, व झोडण्यास वगैरे सर्व कामांस प्रत्येकी सरासरी वीस माणसांप्रमाणें १२० माणसांना कष्ट करावे लागतात.
नाचणी, वरी- हीं धान्यें पिकविण्यास वरीलप्रमाणेंच तरवा करून रोपें तयार करतात; आणि डोंगराच्या घसरणीवरील जमीन नांगरून व पुनः पर्जन्य पडल्यानतर नांगराने तिची लागण न होणेसारखा भाग काढून दोहारणी करतात ह्मणजे दोन वेळ ती नांगरतात आणि मग तींत वर सांगितले रीतीप्रमाणें रोप खोंवीत जातात. पुढें हीं रोपें मोठी होऊन पोटरीत (कोंबांतील कणीस बाहेर) पडण्याचे वेळेला त्या जमीनांतील गवत भांगलून काढितात; यामुळे पीक जलद पदरांत पडतें. पुढें बैल लावून खळ्यावर (रानांत सारवून केलेल्या जाग्यावर) ह्यांची मळणी करतात. हेंच नाचणीचें पीक सपाटीवर केल्यास , त्यांत पावट्याची मोगण करतात; ह्मणजे मधून मधून विरळ पेरितात. सावा व काठळी- ही धान्येंही नाचणीचे शेतांतच एकेक वर्षाआड करितात. जमीन नांगरून उन्हाच्या तापींतच यांची पेरणी करतात. नंतर पाऊस पडल्यावर हीं उगवून वर येतात, तेव्हां यांची भांगलणी मात्र चांगली काळजीनें करावी लागते. कारण, यांत पेरणी केलेनंतर पाऊस पडून पीक व दुसरें पिकांस अपाय करणारें गवत हीं दोन्ही सारखी वाढतात, तेणेंकरून पिकाचा जोम कमी होतो. पुढें दोन अडीच महिन्यांनीं तें पीक तयार झाल्यावर काढून घेतात. या साव्याचें पिकांत तुरीची मोगण करतात.
रायभोग, काळीसाळ, वरंगळ, लव्हेसाळ, मांजरवेल, जिरेसाळ या जातींच्या भाताचें पीक मालकमपेठच्या पांच मैलाच्या त्रिज्येचे हद्दींत करतात. ह्यांच्या वर दिलेल्या अनुक्रमानेंच ही एकापेक्षां एक उंच प्रतीचीं आहेत. यांपैकी पहिल्या दोन प्रतींला पाणी खाचरांत चांगलें तुंबवून राखावें लागतें. तीं तयार होण्यास रोप लागण झाल्यानंतर सुमारे साडेतीन महिने लागतात, परंतु याशिवाय बाकीच्या प्रकारचें भात यापेक्षां आठपंधरा दिवस अगोदर तयार होऊन काढणीस येतें. या कोंकण भागाला शेतकीच्या कामास कोणीही विहिरी करून हें शेत काम चालवीत नाहींत.
नाचणी, वरी, सावा, हीं धान्येंही दोन प्रकारचीं आहेत. ते “ हाळवे ” व “ महान ” असे होत. यांत इतकाच फरक आहे कीं, हाळवे जातीचें धान्य महानपेक्षां पंधरावीस दिवस अगोदर पूर्णत्वास येऊन गरीब शेतकरी लोकांना उपजीविकेस चांगलें उपयोगीं पडते.
हिंवाळ्यांत भातखाचरांतून गहूं, खपला व सातू हीं पिके करितात. ऊंस असेल तेथें बारा महिने शेतकऱ्यांस शेतांत खपावें लागतें. याप्रमाणें एप्रिल महिना अखेर शेतकरी शेतपिकें काढून घेऊन दुसरीं कामें करण्यास निखालस मोकळा होतो. इतकी मेहनत करूनही येथें पिकणारे धान्य त्यांना चांगलें भरपूर होत नाही. यामुळे शेतकरी लोकांना हरहुन्नर करून पोट भरावें लागतें.
आतां देशापेक्षां कोंकणी रानाला पावसाची धार सारखी असते ही गोष्ट खरी आहे. परंतु येथेंही शेत कामाची दुसऱ्या कांहीं कारणांनीं हलाखीच आहे. ती अशी कीं, या कोंकणी जमिनीला दरसाल होरपळून काढल्यावांचून पीकच होण्याची आशा नसते. गुरांच्या शेणखतापेक्षां ह्या भाजून काढण्यानें झालेल्या खताचा शेतकामास फार उपयोग होतो. हें पाहिजे तितके मिळालें नाहीं, ह्मणजे जमिनीला कितीही मेहनत करून पीक केले तरी तींत उत्पन्न चांगलें होत नाहीं, ही निर्विवाद गोष्ट आहे. अशी जमीन भाजून काढण्याची वहिवाट फार दिवसांची असून त्याकरितां सर्व प्रकारचा राब (झाडझाडोरा व पाला) जंगलांतून आणण्याचाही प्रचार पुरातनचाच आहे. परंतु महाबळेश्वर हें हवाशीर ठिकाण ठरविल्यामुळे, याच्या आसपासच्या जंगलासंबंधानें केलेले नियम येथील शेतकरी लोकांना बरेच नडविणारे झाले आहेत. या नियमांप्रमाणें शेतकर्यांना फक्त सात प्रकारच्या झुडपांचा राब घेण्याची वहिवाट मर्यादित झाल्यामुळे दिवसेंदिवस शेतकामास राब पुरेशी मिळण्याची फार मुष्कील होत चालली आहे. कारण, सर्व लोकांनीं आदले वर्षी या जंगलांतून विवक्षित प्रकारची राब नेल्यावर पुढले वर्षी
लागलींच नेलेले प्रकारची व त्याच नमुन्याची राब तयार होऊं शकत नाहीं. अशी स्थिति एकसारखी बरेच दिवस चालत आल्यामुळे आतां राब मिळण्याचा तर भरंसा नसल्यामुळे फार कठीण दिवस येऊन गुदरले आहेत. आणि त्यांचा परिणाम असा होऊ लागला आहे कीं, जेथें पांच मण धान्य उत्पन्न होण्याचें शेत आहे तेथें दोन तीन मण धान्य घेऊन तोंडांत मारल्यासारखे गप्प बसावें लागत आहे. अशी शेतकऱ्यांची स्थिति असल्यामुळे त्यांना सदा भीक झाली आहे, आणि यामुळे ऐन पावसाळ्यांत त्यांना सावकारांच्या हातीपायीं पडून कशीतरी महिन्या- दोन महेिन्यांनीं पुढलें पीक येईपर्यंत जगण्याची तरतूद करावी लागते. यासाठी सरकारांनीं यांजवर मेहरबानी करून यांस जास्त सवलत दिली असतां गोरगरीबांवर अनिर्वचनीय उपकार होणार आहेत. ती अशी कीं सरकारच्या महत्वाच्या उत्पन्नाचीं जंगली झाडे शिवाय करून बाकीच्या कोणत्याही झाडांचा पाचोळा, वाळलेल्या फांद्या वगैरे जंगलांतून शेतकरी लोकांस थोडथोडया नेण्याची मोकळीक झाली ह्मणजे त्यांच्या शेतकामात चांगलें
उत्तेजन येऊन त्यांच्या मेहनतीचें चीज होईल असें झाले पाहिजे.
प्रथम पुण्याचे व ठाण्याचे तुरुंगांत चिनी व मलायी लोक अटकेंत ठेविले होते, परंतु तेथें त्यांना ती हवा मानेना; म्हणून हें हवाशीर स्थान कायम झाल्यानंतर तीन वर्षांनीं येथें तुरुंग बांधून, त्यांत त्यांना आणून ठेविलें. हा तुरुंग फक्त १२० लोकांच्या बेताचा केला होता. त्याचें वर्णन १८३० सालों वुइंचेस्टर साहेबानें लिहून ठेविलें आहे तें असें:-
हा तुरुंग चौसोपी असून त्याचे चौकांत फरशी केलेली होती. त्याच्या दरवाज्याच्या देवडीवर रखवालदारांना राहण्यास व त्यांचे वरिष्ट अंमलदारांच्या आफिसास कोठडया केलेल्या होत्या. कैदी आजारी झाल्यावर जेव्हां इस्पितळांत सुद्धां जाण्याची मारामार होई,तेव्हां तुरुंगांतच पडून औषधपाणी घेण्यास त्यास आणखी दोन खोल्या त्यांत बांधून ठेविल्या होत्या. याप्रमाणें एक सोपा रुंधावला; आणि बाकीच्या तीन सोप्यांत लांब, उंच व हवाशीर अशा खोल्या कैदी
लोकांना राहण्याकरितां बांधिल्या होत्या. त्यांना त्या खोल्यांत जाण्यास त्याच अंगणांतून वाट केली होती. या तीन बाजूंपैकी फक्त दोन बाजू केवळ कैदी लोक राहण्यास लागत व तिसरी कारखान्याकडे आडून जात असे. हल्ली इंजिनियर खात्याचा बंगला ज्या जागेंत आहे, त्याच जागीं हा तुरुंग बांधलेला होता.
या तुरुंगांत खून, चांचेपणा, रस्तेलूट असले मोठमोठे गुन्हे करणारे लोक आणून ठेवलेले असत तरी ते अगदीं ठोंबे नसून शिक्षण देण्यालायक असत, असें सुपरिंटेंडंटसाहेब यांजकडून वेळेवेळीं आलेल्या रिपोर्टावरून दिसतें. यापैकी प्रत्येकाला रोज दीड आणा भत्ता मिळे. सकाळचे आठपासून सायंकाळचे चारपावेतो त्यांना कामास सारखे जुंपलेलें असे. बहुतेक नित्य त्यांस सायंकाळचे सहा वाजले कीं कोंडवाडयाप्रमाणे कोंडून घालीत. तथापि रात्री सरासरी आठ किंवा नऊ वाजेपर्यंत त्यास दिवा मिळत असे. ह्या निवांत वेळीं त्यांपैकीं बहुतेक जण कांहींना कांहींतरी काम करीत बसत असत. दिवसा जेवणाकरितां सुटी झाल्यापासून पुन्हा जुंपी होईपर्यंतचे वेळांत
सवड करून बाजारांतून आपली पोटगी घेऊन येण्याची त्यांस मोकळीक असे. परंतु हे लोक हा वेळ जवळच्या शेतांत बटाटा किंवा दुसऱ्या इंग्रजी भाज्या करण्यांत घालवीत. ह्या भाज्यांना पाणी देण्याचें कामही फार आयासाचें होतें. ह्या भाज्या तयार झाल्यावर त्यांच्या विक्रीचा पैसा त्यांनीं खिशांत टाकला असतां त्याची कोणी पंचाईत करीत नसत. इकडच्या कामाला कोणी बदली घेऊन कांहीं इमानी कैदी लोकांना बटाटयाच्या राखणीकरितां शेतांत जाऊन निजण्यास सोडीत असत. त्यांनीही इमानाचें बेमान केलें नाहीं. येथील सर्व फिरण्याचे रस्ते ह्याच कैदींकडून करून घेतले आहेत. लष्करी खात्याकरितां जंगलांतील वनस्पतींपासून त्यांच्या कडून अरारोट काढून घेत असत. वर्षास ३५००० पौंड अरारोट त्यांजकडून तयार होत असे. आज येथें होत असलेल्या भाज्या वगैरेच्या बागाइताची चिनी लोकांकडून पुष्कळच सुधारणा झाली आहे, आणि पुष्कळ अंशीं बटाटा वगैरे इंग्रजी भाज्यांची वाढती कळा येण्याचें श्रेयही त्यांनाच आहे. येथील राहणारे अडाणी लोकांस वेताचे करंडे व खुर्च्या करण्यासही त्यांनींच प्रथम धडा घालून दिला होता. इ.स. १८४८ मध्यें जेव्हां हा तुरुंग बंद केला तेव्हां पुष्कळ कैद्यांना परवाने देऊन निखालस खुलें करण्यांत आलें होतें. कांहींना मात्र सुपरिंटेंडेंटसाहेबांच्या आफिसांत दर महिन्याचे पहिले तारखेस हजीरी देऊन येथें राहण्यास परवानगी मिळाली होती. परंतु पुनः गुन्ह्यांत सांपडल्यास पुण्याच्या तुरुंगांत तुह्मांस आडकावू अशी त्यांस इशारत दिली होती. प्रस्तुतकाळीं चिनी मनुष्य औषधालासुद्धां येथें राहिला नाही, परंतु त्यांच्या बागांचें काम मात्र पूर्वीप्रमाणें धावड व कुणबी लोकांनी अद्यापि चालविलें आहे.
वेण्णा सरोवरापासून निघणारा पाण्याचा प्रवाह कड्याखालीं उडी घालीपर्यंत त्याच्या किना-यावर ज्या मोखर जमिनी आहेत त्याच चिनी लोकांपासून धावड व कुणबी लोकांच्या हातीं आल्या आहेत. सर्व पावसाळाभर किनाऱ्याच्या जमिनी या नदीला पूर येऊन तिच्या पाण्यांत बुडून गेल्यामुळे त्यांवरील बांध, पाट, सऱ्या यांचा तर अगदीं नायनाट होऊन ज्ञातो. पुढें आक्टोबर महिन्याची सुरुवात झाल्याबरोबर
पाऊस बहुतेक दडी देऊन राहतो तेव्हां ही वेण्णाबाई थोडी शुद्धीवर येऊन मर्यादशील रीतीने वागू लागते. असे झाले ह्मणजे तिच्या सान्निध्याच्या जमीनीची जेथील तेथे सर्व बंदोबस्ती करून त्यांत विलायती वाटाण्याचे वेल लावितात. हे वेल सुमारे सहा फूट पर्यंतच्या उंचीवर कारवीच्या दोन दोन काठ्या एके ठिकाणी बांधून केलेल्या दुबेळक्यावरून चढविलेले असतात. लांबून पाहणारास सर्व शेतांत त्यांची फार मजा दिसते. या वाटाण्याच्या निदान पांच सहा तोडी होतातच. येथील वाटाण्याच्या गोडीची सर दुसऱ्या कोणत्याही ठिकाणच्या वाटाण्याला येत नाही हे अनुभवसिद्ध आहे. या पिकाचा बहर नवंबर व डिसेंबर महिन्यांत असतो. पुढे या बागांत स्ट्राबेरी, रोजबेरी गूजबेरी, कोबी, टर्निप, नवलकोंद आणि फ्रेंचबीन वगैरे इंग्रजी भाज्या व फळफळावळ यांचीही लागण होते. ह्याही पुढे एप्रिल व मे महिन्यांत अगदी सुरेख तयार होतात; व त्यांचा साहेब लोकांत फार चांगला खप होतो. ह्या वेळी थोडाबहुत वाटाणाही होतो, परंतु तो हिवाळ्यांतील वाटाण्यासारखा गोड नसून कमी
असतो; तथापि याचा शीतोपचारादाखल उपयोग होत असल्यामुळे यावर फार उडया पडतात.
या ठिकाणी तांबडे बटाटे व हिमालयावर असणाऱ्या जातीचे बटाटे पुष्कळ पिकतात, त्यांची लावणी नोवेंबर महिन्यांत केल्यावर ते चार महिन्यांनी तयार होतात. येथील चांगल्या बटाट्यांपैकी चांगला पोसलेला एक बटाटा एक शेर वजन भरतो. पुणे मुंबईस या महाबळेश्वरी बटाट्यांची फार चहा आहे. येथे पराकाष्टेचा पाऊस असल्यामुळे यूरोपांतील जरी काही फळझाडे झाली तरी सर्वच फळझाडे होतात असे ह्मणतां येत नाहीत.
येथून पांच मैलावर अवकळी गांवीं शेट सोराबजी दादाभाई यांचा फार उत्तम बाग आहे. त्यांत हजारों रुपये खर्चुन चहाकाफीची लागण चालविली आहे.
वस्तू कितीही कष्टसाध्य असली तरी लोकांना तिची जरूरी असल्यास ती बाजारांत विकावयास आल्यावांचून रहात नाही. हे पुढील हकीगतीवरून सहज कळून येईल:
येथे मैदानांत असणाऱ्या निरुपद्रवी माशा फारशा दिसत नाहीत. जेथे घाण असेल तेथेसुद्धा माशा घों घों करित बसलेल्या बहुतेक कोठेही विशेष पाहण्यांत येत नाहीत. यावरून त्यांना येथील सर्व ऋतूंची हवा सारखी मानवत नसल्यामुळे, मनुष्याप्रमाणे यांचीही मिजास आहे; तशी गोष्ट मधमाशांची नाही. त्यांचा उद्योग नेहमी चाललेला असतो व तो चालण्यास परमेश्वराने त्यांस येथे विपुल साहित्य करून ठेविले आहे.
ज्या दिवसांत येथील जंगलांतील व नजिकच्या शेतांतील ज्या झाडाला फुले येतात त्या दिवसांत या मधमाशांची त्या झाडांच्या फुलांतील मधावर धाड पडते. मग त्या मधाने आपण आपला तळिराम गार केल्यावर, त्या आपण घातलेल्या अंड्यांतील होणाऱ्या संततीची तरतूद करितात. हे पाहून या क्षुद्र प्राण्याला परमेश्वराने आपल्या पिलांचे रक्षण करण्याचे उपजत ज्ञान किती दिले आहे ह्याचे कोणालाही नवल वाटल्या वांचून कधीही रहात नाही.या भावी संततीकरिता हे प्राणी डोंगराचे धारेसारखे व तुटलेले कड्यांत, झाडाचे
ढोलीत किंवा इमारतीचे गैर राबत्याचे बाजूस आपले निर्भय असे घरटे किंवा पोळी तयार करितात. तेथे जाऊन ती काढणे ह्यणजे मूर्तिमंत मृत्यूच्या दाढांत सापडल्यापेक्षांसुद्धां ज्यास्त भयंकर असते. जेथें मनुष्याचा, जनावरांचा किंवा पाखरांचासुद्धा प्रवेश होणार नाही, अशी भयंकर जागा शोधून काढण्याची किती विलक्षण विचारशक्ति या माशांना आहे हे पाहून तोंडांत बोटच घालून रहावे लागते.
या मधमाशा सहा प्रकारच्या आहेत--१ आग्या, २ काळ्या माशा, ३ हारदड माशा, ४ आटया माशा, ५ पोयए माशा व ६ अंजिन माशा. - या सहा प्रकारच्या माशांची अंडी घालण्याची वेळ अगदी निरनिराराळ्या ऋतूंत असते.
पावसाळ्यांत, हिवाळ्यांत, व उन्हाळ्यांत या सर्व जातींच्या माशा आपली अंडी घालतात व त्याकरितां पोळे किंवा घरटे बांधून अंड्यांतून उत्पन्न होणारे संततीच्या पोषणार्थ जवळच मधसंचय करून ठेवितात. पावसाळ्याचे व हिवाळ्यांचे दिवसांत धायटी, गेळा, फापटी व भोमा वगैरे दीपनकारक वनस्पती
च्या झाडांस मात्र येथे फुले येतात. तेव्हां या वेळी त्यांतील मध नेऊन या माशा त्याचे पृथक्करण करितात, आणि त्यापासून दोन पदार्थ काढितात. एक मेण व दुसरा मध. या घरटयांत ( पोळीत ) कपाटाच्या खणाप्रमाणे खण पाडलेले असतात. ते इतके लहान असतात की त्यांत आपले करंगळीचे शेवट घातले असता त्यामध्ये ते दोन खण सांपडतील. त्या मेणाचे असे शेकडो खण करून त्यांत अंडी व मध घालून भरून टाकितात, व ते घरटे फार अवघड ठिकाणी घट्ट चिकटवितात. ते चिकटविल्यानंतर सोईसोईने त्याचा आकार वाढवून मोठी पोळी बनवितात. कारण त्यांत हजारों माशांची लाखों अंडी राहण्याची सोय व्हावी लागते. अशी यांच्यामध्ये मोठी एकी असते. यांतील कांहीं माशा मध आणण्याचे काम करितात व कांही पोळ्याच्या रखवालीचे काम करितात. असे करितां करितां अश्विन कार्तिक मासांत यांची पोळी मोठमोठी होऊन पूर्णतेस येतात. या पोळ्याला आग्या मोहळ असे ह्मणतात. या माशांच्या तडाक्यांत सांपडल्यास मनुष्य
जगणे कठिण असते. या माशांच्या पोळ्यांतील मध तांबडा असून फार उष्ण असतो. हा औषधोपयोगी कामास फार चांगला आहे. एकेक पोळ्यांत सुमारे हांडा हांडापर्यंत मध निघतो. परंतु तो काढून आणण्यास फार त्रास पडत असल्यामुळे लोक आणीत नाहीत, म्हणून महाग व कमी मिळतो.
हिवाळ्यामध्ये मुंग्यासारख्या लहान मोठया जातीच्या माशा जमीनीजवळही आड संधीची जागा असेल तेथें किंवा जमिनीवरील एखादे घळीत किंवा घराचे वळचणीस निवांत जागा पाहून आपली पोळी करितात आणि त्यांत आपली अंडी घालतात; व त्यांचे पोषणार्थ मधुसंचयही करितात. यांच्या पोळ्यांची रचना वरील जातींच्या माशांच्या पोळ्यांप्रमाणेच केलेली असते. या माशा बुरुंबी, पांगळी, गेळा, गहू, जोंधळा, सातु, वगैरे पिकांच्या पांढरे फुलांतील मध जमवितात. यांची पोळी मार्गशीर्ष व पौष महिन्यांत चांगली मोठी होतात तेव्हां ती काढतात. हा मध पांढरा असतो. या मधाचे अंगी ऊष्णपणा कमी असल्यामुळे औषधि कामांस हा मध लागी
नसतो. हा नुसता चैनीने खाण्यास मात्र फार नामी आहे. कारण तो खाल्यापासून अपाय होणेचा संभव कमी असतो.
उन्हाळ्यामध्ये साधारण माशा अंडी घालितात त्यांच्या अंड्यांची पोळी अवघड ठिकाणी असत नाहीत. याचा आकार व मधाचा सांठा, वगैरे करण्याची रीति पूर्वी दिले प्रकारचीच आहे. या दिवसांत जांभळीच्या झाडाला फुलांचा अगदी बहर असतो; व येथे जांभळांचा भरणा फार असलेमुळे, हा मध बहुतेक याच फुलांपासून बनतो. वैशाखमास अखेर ह्या माशांची पोळी चांगली तयार होतात; यांतही मध पुष्कळ मिळतो; पण तो कडवट असतो. हाही मध औषधी आहे. परंतु आग्या माशांच्या मधाची यास सर नसल्यामुळे याचा नंबर दुसरा येईल.
या प्राण्यांनी इतके झटून आपल्या अंड्यांचा जो सर्व प्रकारे बंदोबस्त केला असतो, तो त्यांच्या मते अगदी निर्भय झाला असतो. वास्तविक पोळ्याचे ठिकाणी कोणा साधारण मनुष्याची जाण्याची छातीसुद्धा होणार नाही इतकें
दुर्गम ठिकाण या माशा हुडकून काढितात. आणखी कड्यांतून अशी कांही ठिकाणे असतात की, तिकडे मनुष्याची नजरसुद्धा जाणेचा संभव नसतो, व मधाची पोळी माशांचा मागच काढीत गेले म्हणजे मात्र सांपडते. अशा जागच्या पुष्कळ पोळ्यांतील मध काढून आणतात. अशा अस्मान तुटलेल्या कड्यांवरून नुसते खाली वाकून पाहिले असतां डोके भ्रमल्यासारखे होतें, काळीज धडधड उडू लागतें, सर्व अंगास कांपरें सुटतें, आणि सारे शरीर घामाने डबडबून जाऊन डोळे मिटून गप्प बसावेसे वाटतें; व कड्याखाली मध काढण्यास उतरल्यावर जर निसटून पडलो, तर हजारों फूट खोलीच्या दरीच्या तळाशी जाऊन पडूं व त्या ठिकाणी चूर्ण होऊन पडलेल्या माझ्या अस्थि गोळा करण्यास माझे आप्त किंवा मित्र काही केलें तरी येऊं शकणार नाहीत, असा विचार मनांत आल्यावांचून राहत नाही ! अशी भयंकर व दुर्घट ठिकाणे जरी या माशांनी पाहिली तरी त्यांनां शत्रू आहेतच. या जगांतील क्रमच असा आहे की परमे श्वराने एकाला एक शत्रु करून ठेविले आहेत. तसे नसतें, तर कोणी कोणाचे भय न बाळगता व मर्यादा न राखिता सर्वत्र अनर्थच झाला असता. सर्वांत मनुष्याचे ज्ञान व कल्पना ही फारच श्रेष्ठ आहेत. त्याचे योगानें हा काय पाहिजे ते करू शकतो. आणि म्हणूनच ह्या माशांच्या पोळ्यांवर हल्ला करून त्यानें या माशांचा कडेकोट बंदोबस्त तुच्छ करून टाकला आहे, आणि त्यापासून आपला उपयोग करून घेतला आहे. हे पोळेंं काढण्याचे धाडसी काम करण्यासाठी येथील कोळी लोक कड्यावरून दोरांची शिडी करून खालींं सोडतात आणि त्यावरून खालींं जेथे पोळींं असेल तेथपर्यंत येतात. नंतर आडवे झोंंके घेत घेत गवताच्या लांब केलेल्या पेंडीने किंवा चुडीने पोळीला आग लावितात व त्याचे योगानेंं त्यावरील माशा उठवितात. आणि मग ती पोळी काढून वर आणितात. नंतर त्यांतील मध पिळून काढून चोथा राहील त्यापासून मेण तयार करितात. हे काम रात्रीचे करावे लागते, कारण या वेळी माशांना दिसत नसल्यामुळेंं त्यांचे पासून इजा होण्याचेंं भय नसतेंं खरेंं; पण तरीसुद्धा कपड्यानेंं सर्व अंग गच्च झांकून टाकावे लागतेंं. ह्मणजे अंधारांत चुकूनही त्या खवळलेल्या माशा डंसण्याचे मुळीच भय राहत नाही. दिवसास त्या पोवळ्याजवळ जाण्याचा कोणाचा हिय्या होत नाही. येथील पुष्कळ कोळी लोक हेंं जिवावरचे काम करून उदरनिर्वाह करीत आहेत,
येथेंं दरसाल १,००० पासून १,५०० रुपये किंमतीपर्यंतचा मध बाजारांत विक्रीस येतो. मग हा मध बाजारांत आणल्यावर दुकानदार लोक तो कांचेच्या बाटल्यांत भरून विक्रीस ठेवितात. असा बाटलीत ठेविलेला मध ताज्या मधापेक्षां फार चांगला असतो. कारण, बाटलीतील मधावर काही दिवसांनी बाटलीचे तोंडाशींं दुधाच्या साईप्रमाणे पांढरा पदार्थ जमतो, त्यास पिठा असें ह्मणतात. तो काढून टाकून मग त्याच्या खालील मध घेण्यास योग्य होतो. हा पिठाही कांंही विशेष कामास उपयोगी पडतो.
या महाबळेश्वरच्या शिखरावर जंगल राखल्यामुळेंं जंगलखात्यास बरेंंच उत्पन्न होऊन हवा फार सुखकारक झाली आहे, असेंं जरी आहे, तरी त्याचेंं वाईट परिणाम शेतकरी व दुसरे गरीब वर्गातील लोक यांस भोगावे लागत आहेत, हेंं उघडपणे दिसून येईल.
जंगलाचेंं उत्पन्न हिरडा, शिककाई, गवत, जळाऊं लांकडेंं, चिंवे व दगड वगैरे पासून सुमारे ६००० रू० येते, व खर्चाची रकम सुमारेंं ३००० लागते. ही वजा जातां सरकारच्या पदरांत सुमारे ३००० रु० निवळ फायदा पडतो. हे उत्पन्न दिवसेंदिवस वाढत जाऊन आज इतक्या स्थितीवर आलेंं आहे.
हिमालयांत औषधी वनस्पति जशा विपुल आहेत तशाच या महाबळेश्वरच्या थंड हवेंंतही कांंही कमी नाहींंत. यामुळे जंगलांतील सर्व झाडांचे नामकरण दुबार होऊंं नये म्हणून वनस्पतीवर्गात दिले आहे; तिकडे पहावेंं. चिंव्यांच्या जातीही " झाडी" या सदराखालींं देऊन कोणात्या काय कामास येतात हेंंही सविस्तर सांगितलेंं आहे. या जंगलांत गवतेंही बऱ्याच प्रकारची सांपडतात त्यांची नांवें:
१ हरळी.* | १३ ल्हावरा. | २५ नहिवळ व- |
२ कराड. | १४ शेडा, | दित (नाग- |
३ कंदोर. | १५ ढेकणी. | रमोथे. |
४ तांबीट. | १६ चोपाळी. | २६ ल्हवा. |
५ पुत्याण. | १७ पिशेर. | २७ मोळ. |
६ बारी* | १८ भोपळी. | २८ कोलाडा. |
७ कोळंब. | १९ काचळी. | २९ तिखी. |
८ तुरडा* | २० घाणेरा. | ३० चिकना* |
९ गोंदड.* | २१ गाजरी. | ३१ कुसळ. |
१० कशेड. | २२ मारवेल.* | ३२ कौला.* |
११ भसा. | २३ कुंदा. | ३३ बाडपाण. |
१२ घोणा. | २४ चिरका.* | ३४ बारीफ. |
या सर्व प्रकारची गवतेंं गुरांस ओलेपणी खाण्यास चांगली आहेत परंतु वाळल्यावर फुली केलेल्या जातीच्या गवतावर गुरांची मोठी आवड असते. फार उंच म्हणजे सहा फुटापेक्षांं जास्त उंच गवत वाढत नाही. इतकें उंच गवत इतर ठिकाणी पाहण्यासही मिळणार नाही हेंं खचित आहे. या मावळांतील गाई, म्हशी वगैरे दुभत्या गुरांना गवत किंवा त्या जातीचेंं भात, नाचणीचेंं काड वगैरे खाल्लयावांचून गत्यंतरच नसतेंं. कारण, कडबा, सरकी वगैरे जिवट पदार्थ येथेंं दुर्लभ आहेत. यामुळेंं देशावरील जनावरेंं मावळांत आणून बाळगलींं तर या खाण्यानेंं फार दिवस जगत नाहींंत. परंतु इकडील कोंकणी गुरांना त्याचेंं काहींं वाटत नाही. तथापि हींं कोकणींं जनावरेंं गवतावर अवलंबून असल्यामुळेंं वाटेनेंं चालतांना पाहिलींं तर मलूल झालेलींं दिसतात, आणि देशावरच्या गुरांप्रमाणे सतेज व खोडकर अशींं नसतात. तसेच यांच्या दुधातुपांतही सत्वस्थपणा फार कमी असतो.
१००० हिरड्याचेंं उत्पन्न सुमारेंं.
१२०० शिककाईचेंं उत्पन्न ( अजमासेंं )
१५० गवताचेंं उत्पन्न ( अजमासें )
८०० (सपाटीवरील ) जळाऊ लांकडेंं सर-
कारी तोड होऊन विक्रीचेंं.
१६० चिवे (लोकांनी फी देऊन नेणेंंबद्दल )
५० दगड (गाडीभर नेल्यास एक आणा
फीप्रमाणेंं )
------ या शिवाय झाडांच्या सावटीनेंं येणारे गवत गुरास चारल्यास शेतकरी लोकांस दरसाल गुरामागेंं २ फी, व इतर लोकांस दरसाल म्हशीस १ रु० व गाईस ८ फी, कुळकर्ण्यांकडे भरून त्याचा दाखला जवळ बाळगावा लागतो. अशी सरकारची कदर बारीक मोठया जिनसावर सारखीच आहे. ती अशा किरकोळ गोष्टीत थोडी ढिली असल्यानेंं, म्हणण्यासारखा तोटा न होतां गरीब रयतेवर मोठे उपकार होतील.
तसेंंच या पांच मैलांतील काही गांवांवर कोंडवाडा फी शेतकऱ्यास वाजवी फीचे द्विगुणित आहे. जंगलांतील मोठेंं वठलेलेंं झाड हातानेंं किंवा कुऱ्हाडीनेंं तोडून आणण्याची सरकारची सक्त मनाई आहे. फक्त आपोआप गळून पडलेलींं किंवा हातानेंं मोडून निघणारी जळाऊं लांकडेंं गरीब लोकांना फुकट गोळा करून आणण्याची व तींं विकण्याची सरकारानेंं त्यांस सवलत दिली आहे. यामुळे लांंकूड आणणारे पोटार्थी धावड वगैरे लोकांस लांकूड मिळविण्यास फार पंचाईत पडते.
येथून सुमारे सहा मैलावर गुरेघर ह्मणून गांव आहे तेथे आंबा, फणस, ग्रेव्हिलिया, रोपस्टा, क्याश रिना, युक्यालिया वगैरे झाडांचीं रोपें तयार करण्याची नर्सरी आहे, त्यांत तीं तयार करून बंदीच्या फॉरेस्टांत लावण्याची जारीनें मेहनत चाललेली आहे. यांपैकीं विलायती झाडें पांचगणीच्या सुरूच्या झाडासारखी असल्यामुळे, तीं मोठी झाल्यावर एकंदर झाडीला फार शोभाप्रद होतील यांत संशय नाही. आंबा, फणस हीं झाडें उत्पन्नाचीं असून छायाही भरपूर पाडणारीं आहेत.
१८६५ पासून १८७५ पावेतों निलगिरीप्रमाणें येथें कोयनेलचीं झाडे तयार करण्याचा कारखाना चालला होता. त्यास सरकारचे ६४,००० रू० खर्च झाले॰ परंतु यश आलें नाही, यामुळे सरकारास तो नाद अजिबाद सोडून द्यावा लागला. येथून जवळच लिंगमळा बाग आहे त्यांत सरकारांनीं वेण्येच्या पाण्यावर हा कारखाना काढून चालविला होता त्यावेळीं तेथें बांधलेला बंगला हल्लींं त्यांनीं जंगलखात्याकडे दिला आहे.