बाजार.

येथील बाजार अगदीं भरवस्तींत आहे. बाजार बसला आहे त्या जागेला डोंगराचा उतार ( slope) आहे, परंतु त्यांत टपे टपे ठेऊन थोडथोडी सपाट जमीन काढली आहे आणि त्यांत दुकानें घातलीं आहेत. लांबून ख्रिस्ती देवळाची उंच इमारत दिसते, त्याचे दक्षिणेस हा बाजार आहे. या मालकमपेठच्या वस्तीला, पूर्वपश्चिम दुतर्फा घरें असलेल्या तीन सडका आहेत. यांपैकीं दोन सडकाच्या बाजूंनीं दुकानें बांधलेलीं असून नेहमीं त्यांत वस्ती असते. ख्रिस्ती देवळालगतच्या बाजूला सुमारें ४|५ घरे आहेत. येथें राहणारे सर्व लोक व्यापारी व नौकर आहेत. येथें इनामदार किंवा भिक्षुकी करून सुखवस्तु राहणारे लोक नाहींत. या बाजारानें २३ एकर १,०७० यार्ड जागा भरून काढली आहे.  पेठेचे मध्यभागीं सर्व दुकानें आहेत, या भागालाच मुख्यतः मालकमपेठ असें म्हणतात. दुकानाच्या मागील दारी या दुकानदाराची कुटुंबें राहतात.

ब्राह्मण मराठे वाणीपंचम
पारशी मुसलमान(काजी) धावड
धनगर कोमटी मारवाडी
गुजर जैन मारवाडी शिंपी
रोटीवाले भोरी मुसलमान
मेमन मुसलमान चांभार बुरुड

इत्यादिकांची वस्ती आहे. यांपैकीं बहुतेक जातीच्या लोकांचीं दुकानें आहेत. त्यांत सर्व प्रकाचा माल मिळतो. परंतु तो सातारा वांईकडून येत असल्यामुळे महाग विकतो.

 कोणते जातीचे लोक काय व्यापार करितात तें खाली देतों:-

 ब्राह्मणलोक-सराफी, अडाणी लोकांचीं पत्रे वगैरे लिहिणेंं आणि देवघेवीचे व गाहणापाणाचे व्यापार हे धंदे मुख्यत्वें करून करितात. त्यांचीं दुकानें आहेत.  पारशेी-मेल कंत्राटदार व इतर लोकांस टांगे, फैटणी भाडयानें देणें, युरोपस्थ लोकांस लागणारे दारु वगैरे पदार्थ, आगाऊ सूचना दिली म्हणजे फिश आणून देणें, बर्फ, सोडावाटर वगैरेचीं दुकानें या लोकांचीं आहेत.

 मुसलमान --यांची चावडीनजिक म्युनिसिपालिटीनें बांधलेलीं भाजीपाला व फळफळावळीचीं दुकाने आहेत. त्यांत हंगामाचे दिवसांत बटाटे, कोबी, फुलावर, नवलकोल, बीट, वाटाणे, या इंग्रजी भाज्या; कांदे,लसूण व इतर सर्व एतद्देशीय फळभाज्या व पालेभाज्या; स्ट्राबेरी, राजबेरी, गूजबेरी हीं इंग्रजी फळे; नागपूर कडील फळे; वसईची लाल केळींं; रत्नागिरी व गोमांतकचे हापूस पायरीचे आंबे; पुण्याकडील संत्रे, सफरचंद, अंजीर, द्राक्षे, चकोत्री, पेरू, आननस, सोनकेळीं, करवंदे, जांबळे, लिंंबें, आलें, तोरणें, अंबोळकी वगैरे एद्देशीय फळे कालमानाप्रमाणें मिळतात. इंग्रजी फळे व भाज्यांखेरीज सर्व माल वांई, सातारा वगैरेकडील असतो. इंग्रजी तऱ्हेचा माल मात्र येथें करितात.  मराठे, धनगर, कुणबी- येथेंं मराठे धनगरलोक गाई ह्मशी आणि शेरड्या बाळगून दूध व लोणी यांचा व्यापार करितात, हेंं वर सांगितलेच आहे. शिवाय सीझनमध्येंं वांईचे गवळीलोक आपली दुभती जनावरे घेऊन येऊन येथे राहतात. जवळपासच्या खेड्यांतील लोकहीं लोणी सांठवून येथे विक्रीस आणतात. येथे डेरी ( लोणीखाना ) नाही. पांचगणी येथील डेरीचे व मुंबईचे लोणी येथे विक्रीस येते, ते पारशी व साहेबलोक मात्र घेतात.

 मारवाडी-कापडाचा व भुसार माल ( बाजरी, जोंधळे, तांदुळ, दाळ, मीठ.) वगैरेंचा व्यापार करितात.

 शिंपी-शिंप्यांची दुकाने येथे बरीच आहेत. काहीं कापडाचा व्यापार करून शिवण्याचाही धंदा करितात. काही नुसते शिलाईचेंं काम करणारे आहेत. पावसाळ्यांत काम नसलेमुळे बहुतेक निघून जातात.

 वाणी, पंचमवाणी, तिराळे, गुजर व कोमटी- यांची किरकोळीने वाणजिन्नस व भुसार माल विकण्याची दुकानेंं आहेत. तेथे सर्व प्रकारचे धान्य, गोडेंं तेल, खो बरेल, तूप, स्टेशनरी, वगैरे सामान मिळतें. बाजरीचें पीठ, मैदा, रवा, वगैरेही मिळतात.

 रोटीवाले- येथें रोटी चांगली मिळते, परंतु ती २० वर्षांपूर्वी मिळत होती तशी मिळत नाहीं, याचे कारण असें सांगतात कीं, ताडीवर जकात फार बसल्यामुळे ताडी येथें आणण्याचें परवडत नाही. ह्मणून बटाटे व दुसऱ्या वनस्पतींच्या दारूचा यांत उपयोग करावा लागत असल्यामुळे ताडीनें होत होत्या तशा रोटया हल्ली उत्तम होत नाहीत.

 बोहरी व मेमन- यांच्या दुकानांत कांचेचे दिवे, त्यावरील चिमण्या, चिनी बशा पेले, स्क्रू, खिळे वगैरे व दुसरें पुष्कळ नकली सामान असून तूप, मेण मुंबईस, पाठविणें वगैरेचाही हे व्यापार करितात.

 धावड- हे मजुरीची कामें, गवंडी काम , शेतकी व बागाईताचें काम करितात, व जंगलातून निरनिराळ्या प्रकारच्या काठ्या आणून विकतात, व कोणी हेलकऱ्याचीही कामें करितात.   चांभार- हे लोक उत्तम प्रकारचे बूट, स्लिपर व चढाव बांधितात. याशिवाय इतर घाटाचे जोडे करणारे चांभार येथें फार कमी असतात.

 बुरूड- बुरूड लोक वेताचे करंडे, खुर्च्या, वगैरेचीं विणकर कामें करितात. शिवाय बांबूचे तट्टे, पारसले पाठविण्याचे करंडे, आणि दुसरे सुपें वगैरे हर तऱ्हेचे जिन्नस करितात.

 खाटीक- भाजी मंडईचेनजिक मटन मारकेट आहे तेथें बकऱ्याचें व मेंढ्याचें मांस, कोंबडीं व कोंबडयाचीं अंडीं मिळतात. याच पलीकडे बीफ ( गोमांस ) विकण्याचा बाजार आहे. या व्यापाराला सरकारांनीं मर्यादित केल्यास डोंगरमाथ्यावर पुढे गुरांचा तोटा पडण्याची भीति राहणार नाही,

 याशिवाय गाडय़ा नीट करणारे घिसाडी, टिनच डबे, कंदील करणारे टिनमन व फर्निचर भाडयानें देणारे हौउस एजंटही येथें आहेत. दवाखान्याजवळ ट्रेचर कंपनीचें औषधाचें व दुसरे साहेब लोकांचे खान्याच्या सामानाचें दुकान आहे.   लांकूड फाटी व कोळसा येथे स्वस्त मिळतो, तो धावड कुणबी लोक जंगलांतून आणून विकतात. येथें गवत विकावयास पुष्कळ येतें, व तितकें सर्व खपून लागलींच लोक परत घरी जातात. बटाटे, मध व मेण या मालाची येथें उतारपेठ आहे. कोळी लोक जंगलांतील हजारों रुपयांचा मध आणून बाजारांत विकतात. तसेच इमारतीचें जंगली कांपीव लांकूडही बाजारांत आड्डयावर विकावयास बरेंच येतें. कोंकणे तांदुळ, देशी तांदुळ वगेरे धान्यही येतें. कडबा, कोळंब, तावीट, कारवी, सागाचीं पानें, सापडया, वासे वगैरे माल सकाळीं विक्रीस येतों.

 मार्च महिन्यापासून येथें लोक येण्यास सुरुवात होते, तेव्हां दिल्ली वगैरेकडील जवाहीर विकणारे, काश्मीरकडील लोकरी कपडे विकणारे, दिल्ली आग्र्याकडील सतरंज्या विकणारे, फळफळावळ विकणारे यांची येथें गर्दी होऊन जाऊन बंगलोंबंगलीँ विक्री करण्याकरितां ते फिरत असतात.

 पेठेत पश्चिम अंगांस रोमन कॅथलिक चर्च आहे, व त्याच्या पलीकडे नवीन बांधलेली लायब्ररीची टोलेजंग इमारत आहे. तेथून नजीक दवाखाना आहे. पूर्वबाजूस पेठेंत अमेरिकनचर्च आहे; व त्याचे मागील अंगास मराठी शिकण्याची रे स्कूलची इमारत आहे. येथें एक धर्मशाळा चांगली बांधलेली आहे. नजीक फॉरेस्ट आफिसची सरकारी इमारत आहे. रे स्कूलच्या मागील अंगास सार्वजनिक पायखाने असून खाटीक लोकांना गुरें, बकरी कापण्याची जागा केलेली आहे. व येथेच महार व मांग लोकांच्या झोंपडया आहेत. या मैदानाला बॉनी व्हू असें नांव आहे. ही घाण या मैदानांतून काढून दुसरीकडे नेली ह्मणजे सॅॅडल बॅककडे तोंड करून घरे बांधण्यास फार चांगली जागा आहे.

 प्रत्येक महिन्याचे पहिले तारखेस बाजारभावाची निरखपट्टी चावडीवर व फ्रिअरहालमध्यें लावितात. परंतु त्यांतील दराप्रमाणें विकण्यास कोणी बांधले जात नाहींत. तथापि त्यांत विशेष फरक होत नाहीं.

--------------