हॉटेलें. ( HOTELS)
------------


 महाबळेश्वरक्लबाखेरीज येथे युरोपियन किंवा पारशी लोकाकरितां तीन हॉटेले ( खाण्याराहण्याची सोय असलेल्या संस्था ) आहेत. (१) रिपन हाटेल येथील तार आफिसालगत आहे. त्यांत राहण्याची जागा, फर्निचर वगेरे उत्तम प्रकारचे असून सभोवारची झाडी सूर्याच्या प्रखर तेजाचा तर मुळीच आंत शिरकाव होऊ देत नाही. यामुळे ही हाटेल फारच सुखकर झाली आहे. तसेच ही हाटेल अगदी मध्य वस्तीत असून फ्रिअर हाल, जिमखाना, पोस्ट व तारआफिस याच्या निकट आहे. (२) फाउंटन हाटेल दक्षिण बाजूस सासून पाइंटाच्या रस्त्यावर आहे. ह्या हाटेलला फार रमणीय ह्यू आहे. ( ३ ) हाटेल पूर्व भागास या शैलशिखराच्या शेंवटास रेसव्ह्यू नांवाच्या इमारतींत आहे. येथून वेण्णा सरोवराचा व त्याच्या आसमं ताच्या झाडीचा चमत्कार व जिमखान्यांतलि खेळांची धुमश्चर्की पाहण्यास छानदार सांपडतें. ह्या तिन्ही ठिकाणीं रोजचा आकार ४ रु० पासून ७ रु. पर्यंत मिजासीचे मानानें द्यावा लागतो.

 यहुदी आणि पारशी लोकांच्याकरितां येथें विश्रामालये आहेत तीं- रे व्हिला, रायल फॅमिली व महाबळेश्वर क्लब. या संस्थांच्या व्यवस्थितपणाचा अनुभव घेतलेल्या एका प्रवाशानें असें लिहून ठेविलें आहें कीं जे कोणी लोक यास उदार आश्रय देतात त्यांस त्यांचे चालक चांगली बरदास्त ठेवून खूष करितील. या विश्रामालयांत येऊ इच्छिणाऱ्या प्रवासी जनांनी त्यांचे चालकांस त्याप्रमाणें सूचना मात्र आगाऊ लिहून दिली पाहिजे.

 महाबळेश्वरीं सर्व कांहीं चांगलें आहे पण एक मात्र चांगलें नाहीं;तें काय म्हणाल, तर राहण्याची सोय. पण ही गोष्ट अंमलवाल्या, पैसेवाल्या इंग्रज लोकांस आणि फक्त पैसेवाल्या हिंदु, पारशी व मुसलमान लोकांस लागं नाही. पंचाईत पडते ती कायती गरीब लोकांची ! अगोदर भीक, त्यांतून रोजगार मिळाला तर बायका  पोरें व इतर नातलग पोसावयाचे असल्यामुळे सदोदित हातातोंडाशी गांठ असते. तेव्हां येथें येऊन राहण्यास अद्वातद्वा खर्च कोठून करणार! शिवाय परतंत्रता विघ्नसंतोषीपणा करण्यास तर एका पायावरच तयार असते. आतां जे लोक धंदाउदयोग, शेतकी वगैरे करून दोन पैसे मिळवितात, व संचय करितात त्यांना ऐपत असते. परंतु त्यांना येथें जाण्यापासूनचे फायदे कळत नाहींत. सारांश महाबळेश्वर आपलें असून तेथील सुख आपलें दैवीं नाहीं. पण गरीब लोकांनीं असें म्हणून पोटांत काय घालावयाचें आहे ? यांच्या खेरीज अंमलदारांचा आणि श्रीमंत लोकांचा निभाव कसा लागावा ? साहेबाला शिरस्तेदार पाहिजे, कारकून पाहिजेत, पटेवाले पाहिजेत. सारांश, बहुतेक त्यांचें हापिस पाहिजे. संस्थानिकांना त्यांचे कारभारी, त्यांचे शिक्षक, त्यांचे कारकून, त्यांचे चारदोन स्नेही, हुजरे, पाणके, आचारी, वगैरे लोक पाहिजेत. या लोकांची मात्र व्यवस्था नीट रीतीनें लागत नाहीं. संस्थानिकांच्या आश्रितांची स्थिति थोडी बरी असते. कारण, हे  आपल्या मालकाच्या बंगल्यांत कोठे तरी पडून राहतात.

 पण साहेब लोकांच्या हपिसांतील नोकरांची फार त्रेधा उडून जाते ? सरकारांतून कितीही मोठे भाडे मिळालें तरी तेवढ्यानें उन्हाळ्यांत येथें राहण्यास चांगलें घर मिळत नाहीं. महिन्या दीड महिन्यासाठी, पंचवीस तीस किंवा चाळीस रुपये देऊन कोणाला एखाद्या वाण्याच्या अंधाऱ्या भाजघरांत, कोणाला एखाद्या ब्राम्हणाच्या धुरकट स्वयंपाक घरांत, कोणाला एखाद्या कुणबटाच्या खोपटयांत गुजारा करावा लागतो! तसेच येथे पाण्याचीही मोठी सक्त मेहनत आहे. पाणी लांब असून खोल असल्यामुळे विहिरींतून एक घागर किंवा हंडा वर काढून घरीं आणून टाकी तोंपर्यंत हातापायास आणि पाठीच्या कण्यास चांगलाच व्यायाम होऊन जातो ! कोणी विशेष वातबद्ध स्त्री असेल तर तिच्याकडून येथील विहिरीच्या दहा बारा घागरी रोज आणावाव्या, ह्यणजे एका पंधरवड्यांत तिचा बहुतेक वात झडून  जाईल असें आम्हास वाटतें ! अशा अडचणीमुळे स्वयंपाक करण्यास ज्यांस फार ताप होत असेल किंवा भांडींकुंडीं व शिधासामुग्री यांची जुळवाजुळव करण्यास कपाळास पित्त येत असेल त्याला येथें ब्राह्मणाच्या एका व शुद्राच्या बऱ्याचशा खाणावळींत स्वस्थ बसून जठराग्नी शमन करण्याची सोय आहे. त्याबद्दल ब्राह्मणाचे खाणावळींस दरमाहा रुपये ८ पासून १० पर्यंत व शूद्रांच्या खाणावळींत कमी प्रतीचे खाणें खाल्ल्यास दरमाहा रु० ९ पर्यंत आकार पडतो.

 कोणी एकादा गरीब मनुष्य येथें येऊन आपली झोळी सजवीन म्हणेल तर तेवढी मात्र सोय नाहीं. कारण येथें कोणत्याही जातीचें एकसुद्धां भिकार कोठेही दृष्टीस पडत नाही. परंतु जर कदाचित् कोठे दृष्टीस पडलें तर त्यास पोलिस धरून हाकून लावितात. येथें गरीब भिकारी लोकांकरितां एक फंडाची रकम वर्गणी करून जमविलेली आहे, त्यांतून त्यांस पैसा वाटितात. हा पट्टी जमविण्याकरितां वर्गणीचें बूक सर्वांकडे घेऊन जाऊन त्यांच्या मजींप्रमाणे त्यांजवर आंकडा घालून लागलींच धर्मखात्याचा पैसा त्याप्रमाणें देऊन टाकितात.

 तात्पर्य, जाग्याचे इतके हाल सोसून देखील येथें महिना दीड महिना काढणें फायदेशीर आहे. ज्या प्रमाणें तरूण स्त्रीला सासुसासऱ्याचा, नणंदाजावांचा किंवा दुसऱ्या कोणाचा कितीही जाच असला तरी जर तीवर नवऱ्याचें पूर्ण प्रेम असेल, तर त्याची तिला फिकीर वाटत नाही; उलट माहेरापेक्षांही सासरच अधिक सुखावह वाटतें. त्याप्रमाणें अवांतर गोष्टींपासून कितीही त्रास झाला तरी एका हवेच्या सुंदरपणामुळे बाकीच्या सर्व संकटांअडचणींची कोणास कांहीं दिक्कत वाटत नाहीं.

 येथील सुखाची काय प्रौढी वर्णावी? बर्फ न घालतां गार व गोड पाणी; कोठेही पडलें तरी गार व स्वच्छ हवा; गोठ्यांत पडा कीं पडवींत पडा, जमिनीस आंग लागल्याबरोबर निद्रेची मेिठी, अतिशय भिकार जागेंत देखील एक ढेकूण, डांस किंवा पिसू दिसण्याची मारामार; कितीही श्रम झालें तरी सदरा कादून टाकून जरासें हुश्श हुश्श  केलें, पाण्याची एखादी चूळ भरून टाकली, पानसुपारीचा एखादा बार भरला, किंवा चिलमीचे ( साध्या चिलमीचे ) व विडीचे चार दोन झुरके घेतले, कीं पुनः आपले पहिल्यासारखे हुशार ! कांहीं खाल्ले तरी साफ पचावयाचें- आणि कितीही खाल्ले तरी आधिकच खावेंसें वाटावयाचें अशी जेथील हवा, अशा ठिकाणीं जागेच्या अडचणीपासून होणाऱ्या त्रासाकडे कोणी फारसें लक्ष्य देत नाहीं. या कारणास्तव महाबळेश्वरीं जाण्याचें जरी फुकाचें नाहीं तरी ज्यांना नोकरीचा धोशा पाठीमागें नाहीं असे लोकही येथें येतात. परंतु त्यांची संख्या फार थोडी असते, व पैसा खर्च केल्याचें पूर्ण फळ त्यांना मिळतें, इतकेंच नाहीं तर द्विगुणितही मिळतें.

 अशी जागेची चणचण आहे तर मुंबईचे किंवा पुण्याचे सावकार लहान लहान घरें किंवा चाळी येथें येणाऱ्या कोणा सामान्य स्थितीच्या लोकांकरितां कां बांधून ठेवित नाहींत, अशी कोणी शंका घेईल; पण पैसेवाले लोक आपल्या रकमा येथे चाळींत वगैरे गुंतवून ठेवण्यास कां धजत नाहींत याचें  उत्तर असें आहे कीं,-उभ्या वर्षाचें भाडें येथें एप्रिल व मे या दोन महिन्यांत उभे करावें लागतें. म्हणजे बारा महिन्याचें भाडें या दोन महिन्यांच्या सीझनवर किंवा ऋतूवर लादावें लागतें ! व त्यामुळे दिसण्यांत त्या भाडयाची रकम फार जबर दिसते. पण वास्तविक पाहतां इतकें भाडे घेऊन घरांच्या मृालकांस म्हणण्यासारखा फायदा होत नाहीं. बाकीच्या गांवोगांव घरांत कोणी रहात नसल्यास कुलूप घालून जातां येतें, परंतु येथें त्यास निदान पावसाळ्यांत कुलूप लावून ठेऊन चालत नाहीं. कारण पर्जन्यातिशयामुळे पावसाळ्यांत घराचा बचाव करण्यास गवताचा वगैरे बराच खर्च लागतो; व त्यावर नेहमीं नजर ठेवावी लागते; तथापेि ज्याप्रमाणे बाजारांत येणारा माल आणि तो घेणाऱ्या ग्राहकांची संख्या यांचा एकमेकांवर परिणाम घडतो, त्याप्रमाणें येथें जसजशी अधिक अधिक सोईचीं घरे मिळू लागतील तसतशी आरामासाठीं येणाऱ्या लोकांची संख्या वाढत जाईल असा आमच्या स्वतःच्या घरांवरून आम्हास अनुभव आला आहे.


-----------------