माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो.../निमंत्रण औरंगाबाद अधिवेशनाचे
मी तुमच्याकडे का आलो आहे हे तुम्हाला माहीत आहे. २८ सप्टेंबरपासून मी मराठवाड्याचा दौरा करतो आहे. जिल्ह्याजिल्ह्यात जाऊन मराठवाड्यातील शेतकऱ्यांना निमंत्रण देतो आहे.८, ९ आणि १० नोव्हेंबर २००८ ला औरंगाबाद येथे शेतकरी संघटनेचे ११ वे अधिवेशन होत आहे आणि त्याला तुम्ही यावे अशी विनंती करण्याकरिता आणि तसे निमंत्रण देण्याकरिता मी आलो आहे; पण हे अधिवेशन इतके महत्त्वाचे आहे की हे निमंत्रण देताना शेतकरी संघटनेचा, एवढेच नव्हे तर सबंध शेतीचा इतिहास सांगायला सुरुवात मी करणार आहे. परभणी जिल्हा इतका महत्त्वाचा आहे आणि अलीकडे कापसाच्या उत्पादनामुळे, कापसाच्या व्यापारामुळे आणि कारखानदारीमुळे मानवत भागामध्ये जी काही आर्थिक उलाढाल झाली आहे ती पाहता मी जे काही मांडणार आहे ते समजण्याइतपत तुमचा गृहपाठ निश्चितच झालेला आहे.
पहिल्यांदा दोन महिलांनी गाणी म्हटली आणि त्यांच्या गाण्यांतून मांडलेला विषय हाच होता की शेती ही पहिल्यांदा पुरुषांची नव्हतीच, शेती ही पहिल्यांदा महिलांची होती. हे माझ्या पुस्तकातून तुम्ही वाचलेले आहे. ज्या वेळी पुरुष हे जंगलात जाऊन शिकार करायचे किंवा जंगलातून फळेमुळे तोडून आणायचे त्यावेळी बायका शेती करीत होत्या. पुरुषांनी शिकार करून आणली म्हणजे ती बायकांच्या हाती द्यायची आणि ती दिल्यानंतर कुटुंबातल्या, टोळीतल्या सगळ्या लोकांना सारखी वाटून द्यायची हे काम बायांकडे आले आणि साहजिकच, सध्या जसे आपल्याकडे होते तसेच त्याही वेळी व्हायचे की काही वेळा सगळ्यांना वाटून झाल्यावर बायांना तोंडात घालायला काहीच राहात नसे आणि असे आजही बरेचदा होते. सगळ्यांना जेवायला घातल्यानंतर बाईला खायला काहीच नसेल तर ती काय करते? एखादा तुकडा राहिला असला तर तोंडात घालते, नाहीतर तसेच तांब्याभर पाणी पिते आणि झोपी जाते. त्याही वेळी तसेच होत असणार. एकदा एका कोण्यातरी हुशार बाईच्या लक्षात आले असेल, 'अरे, असे आपल्याला फाके पडू लागले, भूक लागू लागली तर निव्वळ पाणी पिऊन झोपण्यापेक्षा आपल्या झोपडीच्या किंवा गुहेच्या आजूबाजूला जे गवत उगवते त्या गवतावरचे छोटे छोटे दाणे असतात, ते दाणे म्हणजे धान्य, ते दाणे आपण तोडून पोटात टाकावे. म्हणजे थोडी तरी भूक भागते.' पहिल्यांदा त्यांनी आपल्या आजूबाजूच्या गवतामधून धान्य गोळा करायला सुरुवात केली असेल आणि त्यांच्या नंतर असे लक्षात आले असेल की हेच दाणे जमिनीत पडले तर त्यांच्यापासून पुन्हा गवत उगवते आणि त्याला पुन्हा दाणे येतात.
सृष्टीचा हा अजब चमत्कार प्रथम पाहिला तो पुरुषांनी नाही, तर बायकांनी पहिल्यांदा पाहिला. पहिली शेती जी चालू झाली ती साधी शेती. त्याला आपण अगदी पहिली शेती म्हणजे ज्यात तंत्रज्ञान नाही म्हणून 'तंत्रज्ञानविहीन' शेती म्हणू. म्हणजे, बायकांनी त्यांच्या हाती लहान काठी घेतली, त्या काठीने जमीन फक्त उकरायची आणि त्याच्यामध्ये जे काही दाणे मिळाले असतील ते दाणे टाकायचे; रोपे आली आणि त्यांवर दाणे आले म्हणजे ते दाणे वेचून घ्यायचे; पाहिजे तर थोडे कुटायचे, थोडे भिजवायचे. अशा तऱ्हेने पहिली शेती ही स्त्रियांची चालू झाली.
त्या वेळी कोणतेही तंत्रज्ञान नव्हते. मग, तंत्रज्ञानाची सुरुवात केव्हा झाली? जेव्हा शेतकरी पुरुषांना जंगलामध्ये एक बैल सापडला आणि त्यांच्या लक्षात आले की हा बैल मोठा उपयोगी प्राणी आहे, तो काही दंगाधोपा करणारा प्राणी नाही, त्याला वेसण घातली म्हणजे तो आपले ओढण्याचे काम चांगले करतो. असे दिसल्यावर मग पुरुषांनी बायांकडली शेती लगेच काढली आणि आपल्या हाती घेतली. बाई काठीने नुसती जमीन उकरायची आणि त्यात बियाणे टाकायची. त्याऐवजी आता बैलाला नांगराला जुंपायचे, जमीन चांगली खोल नांगरायची आणि मग त्याच्यामध्ये बियाणे टाकले की भरघोस पीक येऊ लागले. शेतकऱ्यांनी बैलाला नांगराला जुंपून जी बैलाची शेती करायला सुरुवात केली ते शेतीमधील पहिले तंत्रज्ञान.
मी तुम्हाला तेव्हापासून ते आताच्या बीटी कॉटनपर्यंतचा आणि त्याहीनंतरचा इतिहास थोडक्यात सांगणार आहे; म्हणजे तुम्हाला औरंगाबादच्या अधिवेशनाचे महत्त्व समजेल.
आजही बायकांना पुरुषांनी आपल्या हातून शेती काढून घेतली याचा राग आहे. ऋषिपंचमीच्या दिवशी बायका बैलाच्या श्रमाचे काही खात नाहीत. एका तऱ्हेने त्या निषेधच व्यक्त करतात - हा बैल आला आणि आमच्या हातातून शेतीची मालकी गेली म्हणून.
'तंत्रज्ञानविहीन' शेतीच्या जागी भरघोस पीक देणारी 'बैलाची शेती व्हायला लागली आणि शेतीमध्ये दसपट, वीसपट पीक यायला लागले. ते पीक लुटायला लुटारू, दरोडेखोर यायला लागले. ही गोष्टही मी तुम्हाला अनेकवेळा सांगितली आहे. शेतकऱ्यांनी बैलांनी शेती केली आणि घोड्यावरून लुटारू, दरोडेखोर आले आणि शेतकऱ्यांनी पिकवलेले धान्य घेऊन जाऊ लागले हाही भाग मी पूर्वी अनेकदा सांगितलेला आहे. अशा तऱ्हेने धान्याचे पीक वाढत गेले आणि सगळ्या लोकांना पुरेसे खाद्यान्न मिळायला लागले; एवढेच नव्हे तर, त्यांच्या खळ्यावर धान्य शिल्लक राहू लागले. हे मी परभणीला १९८४ मध्ये बोललो आहे आणि २००४च्या परभणी रौप्यमहोत्सवी मेळव्यातही बोललो आहे.
आता मी एकदम उडी मारतो आणि प्राचीन काळापासून ते चारशे वर्षापूर्वीच्या कालखंडात येतो, जेव्हा सगळीकडे अन्नधान्य भरपूर होते. त्या वेळी इंग्लंड देशामध्ये माल्थस नावाच्या एका मोठ्या विचारवंत माणसाने एक प्रश्न उभा केला. माल्थसने म्हटले, शेतीमधील बायकांच्या हातची काठी काढून तिथे बैल लावला आणि खूप पिकायला लागले म्हणजे कायमच मनुष्यजातीला पाहिजे तितके अन्नधान्य पिकेल ही चुकीची समजूत आहे. माणसांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. एक जोडपे असेल तर त्यांना दोन मुले होतात, दोनाची चार मुले होतात, चाराची आठ होतात, आठाची सोळा होतात, सोळाची बत्तीस अशा तहेने माणसांची संख्या प्रचंड वेगाने वाढते आहे आणि जमिनीवर तुम्ही बैल जरी लावला तरीसुद्धा इतक्या प्रचंड वेगाने वाढणाऱ्या मनुष्यजातीला खायला घालणे अशक्य होईल. कारण, जमीन वाढत नाही.' तेव्हा, माल्थस या विचारवंताने पहिल्यांदा भाकीत केले की, मनुष्य जात सदा भरपेट खाऊन राहील ही अशक्य गोष्ट आहे; जोपर्यंत जमीन कमी आहे तोपर्यंत उपासमार होणार आहे, माणसे दुबळी होणार आहेत, त्यामुळे रोगराई होणार आहे आणि अन्नधान्य नाही म्हणून लोकांच्या लढाया होणार आहेत. थोडक्यात, मनुष्य जातीचा अंत हा काही सुखान्त नाही, शोकान्त आहे असे माल्थसचे म्हणणे होते.
तसे झाले का? तसे झाले असते तर आज तुम्ही आम्ही इथे नसतो. आपण इथे आहोत याचा अर्थ असा की मनुष्यजातीचा, माल्थसच्या सिद्धांताप्रमाणे, दुखान्त झाला नाही. का नाही झाला?
माणसामध्ये एक विशेष गोष्ट आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माणूस आणि इतर कोणतेही जनावर यात महत्त्वाचा फरक आहे. जनावरांना पुष्कळ गोष्टी अशा येतात, की ज्या मनुष्याला येत नाहीत. माणसाला जनावरांच्या गतीने धावता येत नाही, माणूस पक्ष्यासारखे उडू शकत नाही, माशासारखे पोहू शकत नाही. पण माणसामध्ये एक गोष्ट अशी आहे की जी जगामधल्या कोणत्याही प्राण्यामध्ये नाही आणि पक्ष्यामध्ये नाही; ती म्हणजे बुद्धी आहे. माणसाचे हत्यार बुद्धी आहे.
जमीन वाढत नाही, माणसांची संख्या वाढते. माणसाने जगावे कसे याचे उत्तर माणसाने आपल्या बुद्धीच्या सामर्थ्यावर शोधून काढले आणि ते जे तंत्रज्ञान चारशे वर्षापूर्वी शोधले गेले, दुर्दैवाने ते हिंदुस्थानात यायला चारशे वर्षे लागली. ज्याला आपण आज 'हरितक्रांती' तंत्रज्ञान म्हणतो, म्हणजे सुधारलेले बियाणे घेणे, रासायनिक औषधे वापरणे, रासायनिक खते वापरणे आणि योग्य तितके पाणी देणे हे हरितक्रांतीचे जे तंत्रज्ञान आहे. ते जगामध्ये चारशे वर्षापूर्वी आले. हिंदुस्थानात राज्यकर्त्यांनी हे तंत्रज्ञान येऊ दिले नाही. 'आले तर मग छोट्या शेतकऱ्यांचे वाटोळे होईल, मोठे शेतकरीच त्याचा फायदा खाऊन जातील' अशी नेहमीची सरकारी क्लुप्ती. आजच्या कर्जमाफीच्या योजनेत जसे छोटे मोठे असे भांडण लावले तसे नेहरूंच्या जमान्यापासून छोट्या मोठ्या शेतकऱ्यांमध्ये भांडण लावायचे आणि शेतकऱ्यांना अडकवून ठेवायचे हा कार्यक्रम चालू आहे. हरित क्रांतीने हिंदुस्थानात पीक वाढले, चारशे वर्षांनी का होईना आणि जनतेची अन्नाची गरज देशातल्या देशात भागू लागली; अमेरिकेतून अन्नधान्याची जहाजे येण्याची आवश्यकता राहिली नाही.
आणि त्यावेळी हे लक्षात आले की हे तंत्रज्ञान चांगले आहे; पण रासायनिक औषधे वापरली, वरखते वापरली तर जमिनीचा कस कमी होतो. एवढेच नाही तर, जो काही भाजीपाला आपण पिकवतो त्याचासुद्धा गोडवा कमी होतो. अन्नधान्यात, भाजीपाल्यात, दूधदुभत्यात आणि फळफळावळीत त्यातील काही अंश शिल्लक राहतात. चांगले झाले, एका वेळी हरित क्रांतीमुळे आमची पोटे भरू लागली; पण हे तंत्रज्ञान काही पूर्णपणे निर्दोष तंत्रज्ञान नाही. त्यातील दोषांचे परिणाम कालांतराने दिसू लागताच, या तंत्रज्ञानाने आपल्या हातातील भिकेचा कटोरा घालवला हे विसरून काही महाराज, संत, बाबा, गांधीवादी म्हणू लागले नैसर्गिक शेती करा म्हणजे खताच्या ऐवजी फक्त गाईम्हशींचे शेण वापरा, औषधांच्या ऐवजी कडूनिंब, गोमूत्र वापरा; पण फक्त गाईम्हशींचे शेण आणि पालापाचोळा वापरून जर का आपण शेती पिकवली तर हिंदुस्थानातली निम्मी प्रजा भुकेने मरून जाईल. १९६० सालाच्या आधी आपल्यावर तशीच वेळ आली होती. त्यावर हरित क्रांतीचे तंत्रज्ञान सापडले म्हणून आपण वाचलो. आता पुन्हा त्या जुन्या वाटेला जाऊन लोकांची पोटे कशी भरणार? कोणतेही तंत्रज्ञान पूर्णतः निर्दोष असूच शकत नाही. एखाद्या तंत्रज्ञानाचे तोटे त्याच्यापेक्षा प्रगत तंत्रज्ञानानेच कमी करता येतात, आधीच्या तंत्रज्ञानाकडे माघारी जाऊन नाही.
हरित क्रांतीच्या तंत्रज्ञानानंतर आणखी एक तंत्रज्ञान पुढे आले. ज्या तंत्रज्ञानाचा फायदा कापूस उत्पादक शेतकरी घेत आहेत. बीटी कॉटन हे नाव आता सर्वांना माहीत आहे. बीटी कॉटनमुळे सबंध कापूस उत्पादक भागाचा उद्धार झाला. हे तंत्रज्ञान काय आहे?
हरित क्रांतीचे तंत्रज्ञान म्हणजे चांगल्या वाणाचे बियाणे घेतले, त्याला योग्य त्या प्रमाणात खते, औषधे दिली, पुरेसे पाणी दिले म्हणजे पीक वाढते; पण पूर्वीच्या काळापासून शेतकऱ्यांची बी निवडायची पद्धत अशी होती की, आपल्या पिकात जे काही बी निघेल त्यांच्यातले चांगले चांगले टपोरे, दाणेदार निरोगी दिसते असे बियाणे निवडून काढायचे आणि ते पुढच्या वर्षी शेतात पेरण्याकरिता ठेवायचे. हरित क्रांतीच्या येण्यामुळे पूर्वीचे साधे बियाणे गेले, त्याच्याऐवजी संकरित बियाणे आले. हरीतक्रांतीच्या तंत्रज्ञानामध्ये माणसाने डोके चालवून नवीन तंत्रज्ञान काढले की एखादे चांगले बियाणे आपल्याला तयार करायचे असेल तर स्थानिक वाणाबरोबर आपल्याला हव्या असलेल्या गुणधर्माच्या वाणाचा काही पिढ्यांत संकर करीत राहाणे. उदाहरणार्थ, समजा आपला गहू सध्या लहान आहे. तो गहू आपल्याला लांब करायचा असेल तर लांब जातीचे गव्हाचे बियाणे निवडून त्याचा संकर जर आपण नेहमीच्या जातीच्या गव्हाबरोबर केला तर पुढच्या पिढीतला गहू लांबट होऊ शकतो. या लांबी वाढलेल्या नवीन गव्हाबरोबर लांब जातीच्या बियाण्याचा संकर केला म्हणजे त्याहून अधिक लांबीचा गहू मिळेल. असे लांबता लांबता तांत्रिकदृष्ट्या गहू शेवयाच्या आकाराचाही होऊ शकतो. आपल्याला तो करायचा नाही, कारण शेवायाच्या आकाराचा गहू घेऊन करायचे काय?
या तऱ्हेने संकरित वाण तयार झाले. त्यानंतरसुद्धा मनुष्यजातीने बुद्धी चालवली आणि त्याने विचार केला की, एका बियाण्याचे वाण घ्यायचे, दुसऱ्या बियाण्याचे वाण घ्यायचे, त्यांच्या फुलामधील स्त्रीकेसर, पुंकेसर एकत्र करायचे आणि पिढ्यान्पिढ्या वाट पाहायची ही फार वेळ खाणारी गोष्ट आहे. त्याच्यापेक्षा लवकर होणारी काही गोष्ट नाही का?
तेव्हा नवीन तंत्रज्ञान काढले गेले - बायोटेक्नोलॉजी म्हणजे जैविक तंत्रज्ञान. लांबडा गहू आपल्याला करायचा तर लांबड्या गव्हात असा कोणता 'गुण (Gene)' आहे जो गव्हाला लांबडा करतो? तो जर का गुण काढून आपल्या गव्हात टाकला तर तुम्हाला पाहिजे त्या प्रकारचे नवीन वाण तयार करता येते. असे म्हटले जाते यात थोडी अतिशयोक्ती असली, कारण आपण अजून तेवढी प्रगती
केली नाही, तरी येत्या १००-२०० वर्षामध्ये आईबाप लग्न झाल्यानंतर म्हणू लागले की आम्हाला अमिताभ बच्चनसारखा दिसणारा आणि सचिन तेंडुलकरसारखा क्रिकेट खेळणारा मुलगा पाहिजे तर अशा मुलाचेसुद्धा वाण करायचे तंत्रज्ञान विकसित झालेले असेल! त्या तंत्रज्ञानातून जे बीटी कपाशीचे बियाणे तयार झाले त्या बीटीच्या उत्पादनाने व्यापार वाढला, कापसाचा उद्योग धंदा वाढला.
वीस वर्षापूर्वी मी पहिल्यांदा सांगितले की तंत्रज्ञानाचा राग करून, रासायनिक खताचा राग करून तुम्ही जर नैसर्गिक शेतीकडे गेला तर प्रगती होणार नाही. मागे जाऊन कधी प्रगती होत नाही, प्रगती पुढे गेल्याने होते. रासायनिक औषधे वापरून जर जमीन खराब होत असेल तर रसायने कमी वापरा; जैविक बियाणे वापरा ज्याच्यामध्ये बोंडअळी नष्ट होऊन जाते म्हणजे मग औषध फवारायचे काम राहत नाही. तेव्हा, प्रगती पुढे जाऊन होते हा सिद्धांत महत्त्वाचा. तंत्रज्ञान जसजसे पुढे जाईल तसे तसे आपण पुढे जाऊ. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सगळ्या शेतकऱ्यांची पीछेहाट झाली, शेतकरी सारे कर्जबाजारी झाले. सध्या बऱ्यापैकी पोटभर खातोय हे खरे; पण आपण पोटभर खातो याचे श्रेय नेहरूंना नाही, कोणत्याही सरकारला नाही; हे श्रेय ज्यांनी गव्हाचे संकरित बियाणे शोधून काढले त्या तंत्रज्ञानाला, ज्यांनी हे तंत्रज्ञान शोधून काढले त्यांना आहे. जर तुम्हाला कोणी देव मानायचे असेल तर तंत्रज्ञानाला देव माना आणि तंत्रज्ञानाची पूजा करा.
मी शाळेत होतो तेव्हा १९४७ साली, एखादा माणूस ५०-५५ वर्षाच्या भेटला की लोक म्हणायचे, 'झाले, याचे दिवस संपत आले बरे का?' आता वयाची ७५ वर्षे झाली, ८० वर्षे झाली तरी लोक काही लगेच मरतील असे काही दिसत नाही. सरकारने प्राथमिक आरोग्य केंद्रे काढली म्हणून माणसे अधिक काळ जगतात असे नाही, शास्त्रज्ञांनी अँटिबायोटीकचे तंत्रज्ञान शोधून काढल्यामुळे ते झाले आणि त्या अँटिबायोटीकच्या इंजेक्शननंतर कुठे प्लेग झाला, कॉलरा झाला, देवी आल्या, टायफाईड झाला असे ऐकू येत नाही. पूर्वी चागंली चागंली माणसे ३०-३५ व्या वर्षी टायफाईड होऊन मरून जायची. तंत्रज्ञानाच्या कृपेमुळे आज तुम्ही आम्ही ७५-८० वर्षे जगतो.
औरंगाबाद अधिवेशनाचा मुख्य विषय हा हरित क्रांतीच्या तंत्रज्ञानाचे आणि जैविक तंत्रज्ञानाचे फायदे दिसू लागल्यानंतर आपल्या समोर जे प्रश्न उभे राहू
काल मराठवाड्यात पाऊस पडला. सगळे हैराण झाले की कोठून आला हा? पाऊस पडला चांगले झाले. आता पेरणी चालू झाली; पण ही काही पाऊस यायची वेळ नाही. पाऊस लहरीपणा दाखवू लागला आहे. 'नेमेचि येतो मग पावसाळा' ही ओळ आता जुनी झाली आहे. पूर्वी जून महिन्यात मृग नक्षत्राचा पाऊस झाला की चार महिने तो पडायचा आणि शांत व्हायचा.
हा पावसाळा आता फार लहरी झाला आहे. मुंबईला हल्ली पडायला लागला की एकदाच बदाबदा पडतो, रस्तेबिस्ते गच्च करून टाकतो. उन्हाळा सुरू झाला म्हणजे सूर्यबाबाही तसाच तापायला लागला. तुम्हाला मराठवाड्यामध्ये सगळ्यांना ४० अंश, ४२ अंश तापमानाची सवय आहे; पण जर का उष्णतामान ४८ नाहीतर ५० अंशापर्यंत जाऊ लागले, माणसाला चालता चालता भोवळ येऊ लागली तर तुम्ही कसे जगायचे आणि पीक कसे वाचवायचे? अशा एक एक नवीन समस्या तयार होताहेत. त्याला उत्तर काय? एअरकंडीशनर लावावा, पंखा लावावा तर वीज नाही.
वीज नाही म्हणून आपण पिकांना पाणी देण्याकरिता डिझेल वापरून डिझेलवर चालणारा पंप वापरू म्हटले तर डिझेल नाही. कारण, डिझेल दुर्मिळ, अत्यंत महाग झाले आहे.
असा चारही बाजूंनी शेतकरी कोंडला जात आहे. त्याच्यामध्ये आणखी एक विचित्र घटना सर्वदूर घडते आहे - म्हटले तर फायद्याची, म्हटले तर तोट्याची. उदाहरणार्थ, जालन्याजवळ ज्या जमिनीचा भाव एकरी पाच ते दहा हजार रुपये होता ती जमीन आज ७० लाख रुपये भावाने जात आहे. शेतकरी विचार करणार की हे काय होऊन राहिले आहे? एका बाजूला वरुणबाबा रागावला, पाऊस येत नाही; सूर्यबाबा रागावला, तापमान वाढायला लागले. मग, शेती करायची कशी? आधीच जे शेतकरी आत्महत्या करायला लागले आहेत त्याची ही मनःस्थिती. नियोजन मंडळाचा एक अभ्यास असे सांगतो की, भारतातील ४० टक्के शेतकरी म्हणताहेत की, शेती करायची आता आमची इच्छा नाही. बापजाद्यांनी ठेवली म्हणून आम्ही हे ओझे चालवले. 'सौ के साठ करना और बाप का नाम चलाना।' असा हा धंदा. बापाचे नाव चालविण्याकरिता दरवर्षी तोट्यात जायचे असली ही शेती आता आमच्याने झेपत नाही. आम्ही करीत राहिलो तरी आमची पोरेबाळे करणार नाहीत' आणि त्यांचा अनुभव असे सांगतो की, ज्यांनी शेती सोडली आणि दुसरे काही केले त्यांचे वाटोळे झाले असे एकही उदाहरण हिंदुस्थानात सापडणार नाही. ज्यांनी धाडस केले आणि शेती सोडली त्यांचे भलेच झाले.
मी मागे एक उदाहरण दिले होते तेच आता पुन्हा सांगतो. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश चंद्रचूड हे माझ्या खेड तालुक्यातील, मूळचे शेतकरी होते. निवृत्त व्हायच्या वेळी ते तालुक्यात आले, माझ्याकडे आले आणि म्हणाले, चला माझी शेती, गाव दाखवतो आणि मी गेलो. एका टेकडीवरून त्यांनी असाऽ हात करून सांगितले, 'ही जी सगळी जमीन आहे ना ती सगळी जमीन माझ्या बापजाद्यांची होती, कूळकायद्यात गेली' आणि त्यांनी थोडे अभिमानाने सांगितले की, 'कूळकायद्यानुसार या सगळ्यांकडून काही पैसे घ्यायचे होते; कुणाकडून दहा हजार, कुणाकडून वीस हजार. आम्ही ठरवले, जाऊ दे. आम्ही उदार अंत:करणाने हे कूळकर्ज माफ केले आणि आम्ही दिल्लीला गेलो.' मी म्हणालो की, 'चंद्रचूड साहेब, तुम्ही दिल्लीला गेला; जाताना मोठे औदार्य दाखवले आणि त्यांचे कूळकायद्यातील कर्ज माफ केले. तुम्ही दिल्लीला गेला आणि सरन्यायाधीश झालात. ज्यांच्यावर तुम्ही मेहरबानी केली असे तुम्हाला वाटते आहे ते हे सगळे शेतकरी कर्जाखाली दबून आज आत्महत्या करायला निघालेत.' ते म्हणाले, 'शेती सोडून जे जातात ते सगळे काही सर न्यायाधीश होतात अशी परीस्थिती नाही.' मी म्हणालो, 'शेती सोडून दिल्लीला गेल्यानंतर वकील व्हायच्या ऐवजी तुम्ही पानाची गादी लावून पाने जरी विकली असती तरी तुमची परिस्थिती या शेतकऱ्यापेक्षा चांगली असती हे लक्षात ठेवा.'
मुळशी धरणाच्या वेळी सेनापती बापटांनी आंदोलन केले. आम्ही याचा अभ्यास केला. धरणग्रस्त म्हणून जे शेतकरी तेथून उठून मुंबईला गेले ते सांताक्रूझ, विलेपार्ले भागात राहतात. त्यांची सगळ्यांची स्थिती चांगली आहे. मुळशी धरण झाल्यावर आपल्याला पाणी मिळेल, आपण हिरवीगार शेती करू आणि लक्ष्मी आपल्या घरात पाणी भरेल अशी ज्यांची कल्पना होती ते सगळे कर्जबाजारी झाले; त्यांना कर्जमाफीचासुद्धा फायदा मिळाला नाही हे सत्य आहे.
तुम्हीतरी कसली शेती करता? मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यांत मी फिरलो, सगळीकडे लोक म्हणू लागले आहेत, 'साहेब, ते शेतीमालाच्या भावाचे राहू द्या; आधी पिकवायला खूप कष्ट करायला लागतात, मग त्याचा भाव मिळायचा. त्याच्यापेक्षा या मोबाईल टेलीफोनच्या कंपन्या आहेत त्यांना आमच्या शेतात टॉवर उभा करायला सांगा. म्हणजे मग आम्हाला त्याचे भाडे मिळेल. तेवढे मिळाले म्हणजे मग काही करायची गरज पडणार नाही.'
शेतकऱ्याची सर्वदूर अशी स्थिती आहे. अशा परिस्थितीत तुमच्या सगळ्यापुढे हा प्रश्न पडला आहे की, ही शेती करावी का नाही? मनामध्ये एक प्रश्न येतो की, शेती नाही पिकवली तर लोकांना खाऊ काय घालणार? शेतकरी आता शहाणे झालेत. त्यांना पटले आहे की, शरद पवार परदेशातून गहू आणून लोकांना खाऊ घालतात तर आपल्याला त्याची चिंता करण्याचे काही कारण नाही. शरद पवारांना आपली चिंता नाही तर त्यांच्या माणसांना खाऊ घालण्याची चिंता आपण कशाला करायची? तुमच्या समोर जो अत्यंत कठीण निर्णय आहे तो हा की याच्या पुढे शेती करायची किंवा नाही?
विशेष आर्थिक विकास क्षेत्रासाठी (एस् ई झेड) तुमची जमीन जात असेल तर सरकारला ती घेऊ द्यायची का? शेतकरी संघटनेने या विषयावर भूमिका आधीच मांडलेली आहे; तो काही अधिवेशनाचा विषय नाही. ज्यांना शेती करायची आहे त्यांच्या शेतीला सरकारने बोटसुद्धा लावता कामा नये, संपादन करण्याचा प्रश्नच येत नाही. ज्या शेतकऱ्याला आता शेती करण्याची इच्छा नाही त्याला त्याची जमीन सरकार म्हणते म्हणून पाचपन्नास हजारांत दिली पाहिजे हेही जमणार नाही. बाजारात त्याची किंमत ७० लाख असेल तर सत्तर लाखाने विकण्याचे स्वातंत्र्य शेतकऱ्याला असले पाहिजे.
प्रश्न असा आहे की या परिस्थितीत तुम्ही पुढे शेती कशी काय करणार आहात? जे शेती सोडून जाऊ इच्छितात त्यांनी शेती विकली, त्यांचे सोडून द्या; पण जे शेती करू इच्छितात त्यांनी शेती कशी करावी यावर औरंगाबाद अधिवेशनात आपण तपशीलवार चर्चा करणार आहोत. यापुढे सूर्य असा तापणार असेल आणि मेघ बाबा असा वेड्यासारखा बरसणार असेल तर आकाशाखालची शेती ही जवळजवळ अशक्य गोष्ट आहे. तुम्ही गेली काही वर्षे ऐकता की इस्रायलमध्ये आता आकाशाखालची उघडीबोडकी शेती होत नाही. याच्या पुढे तुमची शेती आता मांडवाखालची शेती, आच्छादित शेती झाली तरच जगू शकते, नाही तर जगूच शकत नाही. मांडवाखालची, सावलीतली शेती करताना आपल्याला हवामान ठरवता येते, उष्णतामान ठरवता येते, पाणी ठरवता येते. अशा तऱ्हेची जर शेती केली तरच तुम्हाला शेतीमालाला भाव मिळेल. यापुढे आकाशाखालची उघडीबोडकी शेती करीत राहिलात तर तुम्ही बुडून जाल, अधिकाधिक कर्जबाजारी व्हाल आणि अजूनही मोठ्या संख्येने आत्महत्या करायला हे सरकार तुम्हाला भाग पाडेल
तुम्हाला वाटत होते की आम्ही कशीही शेती केली आणि आपण आंदोलने केली म्हणजे सरकार शेतीमालाला भाव देईल. ३० वर्षांच्या आंदोलनानंतर आपल्याला काय दिसते? आजही सरकार शेतीमालाला भाव देत नाही, उलट, महागाई झाली म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या सर्व सरकारांनी जे केले तेच आजचे सरकार करीत आहे. मनमोहनसिंगांच्या सरकारने तर देशाच्या बाहेरून तेलाची आयात केली आणि देशातील तेलाचे, तेलबियांचे भाव पाडले; तांदळाच्या निर्यातीवर बंदी आणली आणि तांदळाचे भाव पाडले; मक्याचे भाव पाडले, दुधाचे भाव पाडले एवढेच नव्हे तर,शेतकऱ्यांना भावाची हमी देऊ शकणाऱ्या वायदेबाजाराची पद्धतशीरपणे गळचेपी केली. सोयाबीनच्या शेतकऱ्यांना मी सांगतो ते उदाहरण पटेल. ज्या वायदे बाजारामुळे सोयाबीनची किंमत २३०० रुपये होती तो वायदे बाजार बंद केल्यामुळे झटक्यात १२०० ते १३०० रुपये इतकी खाली पडली आहे. मनमोहन सिंगाचे हे तथाकथित खुलीकरणवादी सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत नेहरूंच्या समाजवादी सरकारइतकेच दुष्ट आणि क्रूर आहे. 'चला, तुमची कर्जे माफ केली' अशा कितीही लालची त्यांनी दाखवल्या तरी ते शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळू देणे शक्य नाही.
आम्ही कर्जमाफी मागितलेली नव्हती; माफी मागायला आम्ही काही गुन्हेगार नाही. आम्ही कर्जमुक्ती मागितलेली होती. का मागितली कर्जमुक्ती? शेतकऱ्यांची सगळी कर्जे ही बेकायदेशीर आहेत म्हणून, अनैतिक आहेत म्हणून आम्ही कर्जमुक्ती मागितली होती, कोणाची मेहेरबानी म्हणून मागितली नव्हती. भाकरीचे दोनचार तुकडे कुत्र्यांच्या गर्दीमध्ये टाकले म्हणजे त्या चार तुकड्यांसाठी कुत्र्यांची मारामारी लागते आणि मग थोडा वेळ करमणूक होते; कुत्र्यांचे लक्ष नाही या खात्रीने हवा तर डल्लाही मारणे सोपे जाते या भावनेनेच मनमोहन सिंग सरकारने ही कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. 'तू छोटा शेतकरी, तुला देतो, तू मोठा शेतकरी तुला देत नाही; तू सावकाराकडून कर्ज घेतले तुला देत नाही, तू बँकेकडून घेतले तुला देतो; तू बँकेत, सहकारात कोणी पदाधिकारी आहेस, चेअरमन आहेस, तुझे सगळे कर्ज माफ; तुम्ही भाऊभाऊ वेगळे राहता तुम्हाला माफ, तुम्ही भाऊभाऊ एकत्र राहून म्हाताराम्हातारीचा सांभाळ करता तुम्हाला नाही' अशा भांडणे लावण्याच्या यांच्या एक ना अनेक क्लृप्त्या.
सरकारचा हा दुष्टपणा पुढे चालूच राहणार असेल तर शेतकऱ्यांना या लोकांवर अवलंबून राहून चालणार नाही. शेतकऱ्यांना अशा तऱ्हेने, वेगळ्या पद्धतीने शेती करावी लागणार आहे की जिथे सरकार असो किंवा नसो, थोडी हिम्मत दाखवली, थोडे वेगळे वागलात, अगदी निवडणुकीच्या वेळेस आपल्या जातीच्या उमेदवाराला मत देण्याचे जरी बंद केले आणि शेतकरी संघटनेच्या उमेदवारांना आमदार आणि खासदार म्हणून मते मिळवून दिली तरच तुम्हाला शेती चालवता येईल; दुसऱ्या कोणालाही मते दिली तर तुमची शेती टिकू शकत नाही.
मग, आता काय करायला पाहिजे? हरिक्रांतीचे तंत्रज्ञान मी सांगितले, बायोटेक्नोलॉजीचे तंत्रज्ञान मी सांगितले. आपण ती तंत्रज्ञाने सध्या बाजूला ठेवू. औरंगाबादच्या अधिवेशनात आपण त्याच्या पुढच्या तीनचार तंत्रज्ञानांचा विचार करणार आहोत.ही जी तंत्रज्ञाने आहेत त्यांची माहिती औरंगाबादच्या अधिवेशनात सर्व शेतकऱ्यांना दिली जाईल आणि एवढेच नाही तर, त्या तंत्रज्ञानाचे प्रात्याक्षिक, त्या तंत्रज्ञानाची यंत्रसामग्री तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्या तंत्रज्ञानाचा ज्यांनी यशस्वी प्रयोग केलेला आहे त्यांची भाषणेसुद्धा ऐकायला मिळणार आहेत.
पहिले तंत्रज्ञान - याचे नाव इंग्रजीत एरोपोनिक्स् – पण आपण याला सध्या 'A' तंत्रज्ञान म्हणू. दिल्लीला माझ्या घरी जेवणाच्या टेबलावर मावेल एवढे एक खोके आहे. त्या एका खोक्यामधून माझ्या संपूर्ण घराला पुरेल एवढी भाजी, त्याशिवाय, माझ्या त्या इमारतीमध्ये राहणाऱ्या सर्वांना पुरेल इतकी ताजी भाजी काढू शकतो. हे नवे तंत्रज्ञान हरितक्रांतीच्याही पुढे गेलेल्या बायोटेक्नॉलॉजीच्या पुढे गेलेले तंत्रज्ञान आहे. बायोटेक्नोलॉजीचा अनुभव बीटी कॉटनच्या रूपाने तुम्ही घेतला आहे. तुम्हाला जर का हवामान बदलत आहे, वरुणराज कोपतो आहे, सूर्यदेव रागावतो आहे याच्यावर उपाय काढायचा आहे तर 'जुनी बियाणी वापरा, तीच चागंली होती; जुन्या बियाण्याच्या गव्हाला जी काय चव होती ना ती चव नव्या जातीच्या बियाण्याला नाही वगैरे' हा वाह्यातपणा सोडून द्या. आज शास्त्रज्ञ असे नवीन बियाणे तयार करायला लागले आहेत की दुष्काळ पडला तरी ते उगवायला लागते, तापमान ५० अंशांच्या वर गेले तरीसुद्धा पिकते, एवढेच नाही तर, ते तापमान कमी होत होत एक अंशावर जरी आले तरी पिकत राहील. साधारणपणे कोणत्याही बियाण्याला पिकण्यासाठी अमुक ते अमुक असे उष्णतामान पाहिजे असते. पण उष्णतामान कितीही वाढो, कितीही कमी होवो तरी ते पीक येईल अशा तऱ्हेची बियाणी तयार होत आहेत. या तंत्रज्ञानाचे नाव आहे 'B' बायोटेक्नोलॉजी. बीटीतून त्याचा तुम्ही अनुभव घेतला आहे.
आणखी एका तंत्रज्ञानाची तुम्हाला माहिती झाली पाहिजे. डिझेल महाग झाले, पेट्रोल महाग झाले. पेट्रोलची किंमत ५६ रुपये लिटर झाली आहे. डिझेलही तसेच महाग झाले आहे. दरवर्षी बलिप्रतिपदेच्या दिवशी शेतकरी मायमाऊल्या 'ईडा पिडा टळू दे, बळिचे राज्य येऊ दे' अशी प्रार्थना करतात. आपणही शेतकरी संघटनेच्या ध्येयवाक्यात धरले आहे की बळिराज्य येणार आहे. ते बळिराज्य खरोखरच येते आहे; बळिराजाने आपला दूत आधीच पाठवला आहे. त्रेतायुगात वामनाने बळिराजाला पाताळात गाडले त्या गाडलेल्या जमिनीतून आणि पाताळातून बळिराजाने आपल्या लाडक्या लेकरांकरता - तुम्हा सगळ्या शेतकरी भावाबहिणींकरिता लक्ष्मी पाठवून दिली आहे. तंत्रज्ञान असे सांगते की तुमच्या शेतामध्ये पिकणारा ऊस असो ज्वारी असो, बटाटा असो का मका असो, अगदी साधी हिरवळ, कोणतेही तण, साधी हरळीसुद्धा या तंत्रज्ञानामुळे पेट्रोल होऊ शकते. तुम्ही आता साधे कुणबी राहिले नाही, मध्यपूर्वेतील अरबशेखांकडे जशी तेलाची खाण लागते तशी तेलाची खाण तुमच्या शेतात लागली आहे. ही बळिराजाने पाठवलेली कृपा आहे.पेट्रोलला पर्याय देणारे हे 'शेततेल' बनविण्याचे यंत्र औरंगाबाद अधिवेशनात पाहायला मिळणार आहे. एकेका शेतकऱ्याला दररोज १०० ते १५० लिटर 'शेततेल (इथेनॉल)' तयार करता येईल. हे तिसरे तंत्रज्ञान आहे 'E' म्हणजे इथेनॉल निर्मितीचे.
माणसाची आणि शेतीची प्रगती तंत्रज्ञानामुळे आहे झाली आहे हे मी तुम्हाला पटवून सांगितले आहे, शेतीचा इतिहास सांगितला आहे. ही शेतीला स्वातंत्र्य मिळविण्याची मोहीम चालू आहे पण एक नेहमीचीच अडचण आहे. कार्यकर्ते म्हणतात सणासुदीच्या दिवसात प्रचार कसा होणार आणि अधिवेशनाला लोक कसे येणार. तुम्हाला बळिराजाचा वर मिळाला, तुमच्या शेतामध्ये लक्ष्मी प्रगटू पाहाते आहे. आम्ही कार्यकर्त्यांशी चर्चा करून औरंगाबाद अधिवेशनाचे घोषवाक्य ठरवले - 'लक्ष्मी प्रगटते आहे आपल्या शेतात' दिवाळीचे लक्ष्मीपूजन सगळे जग ऑक्टोबरच्या शेवटी करणार आहे. पण शेतकऱ्यांचे खरे लक्ष्मीपूजन ८,९ आणि १० नोव्हेंबरला औरंगाबाद येथे होत आहे.
या अधिवेशनाच्या विषयपत्रिकेचे आकलन करण्याची कुवत नसलेले लोक - शेतकरीहिताचे विरोधक पुढारी, पक्ष कार्यकर्ते, पत्रकार - तुम्हाला अधिवेशनाला येण्यापासून रोखण्यासाठी कदाचित म्हणतील की, 'शरद जोशी आता म्हातारे झाले आहेत; पहिल्यांदा आंदोलनाची भाषा करायचे, रस्त्यावर उतरायची भाषा करायचे, तुरुंगात जायची भाषा करायचे; आता तंत्रज्ञानाची भाषा करायला लागले, बिचारे दमले बर का!' मी म्हातारा झालो हे खरे आहे पण, मी दमलो नाही, मी तुमच्यात आलो आहे, काळाशी सुसंगत ताजा विचार घेऊन आलो आहे आणि तुम्हाला सावधही करायला आलो आहे.
शेतीतील दारिद्र्यातून सुटण्याची चालून आलेली ही संधीही सरकार शेतकऱ्यांच्या हातून हिसकवून घेऊ पाहत आहे. 'शेततेल' तयार करण्याची परवानगी देणे सरकारच्या हाती, पेट्रोलमध्ये ते किती प्रमाणात मिसळायचे तेही सरकारच ठरवणार, ते वापरणारे गाडीवाले नाहीत आणि वर त्याची किंमत ठरविण्याचा अधिकारही इतर शेतीमालांप्रमाणेच शेतकऱ्यांच्या हाती नाही, तर शेततेल पेट्रोलमध्ये मिसळून पेट्रोलच्या भावात विकण्याची मुभा असलेल्या पेट्रोलियम कंपन्यांच्या हाती. तेलाचा तुटवडा असतानाही केंद्र सरकारने देशातील तेलाच्या साठ्यांचा शोध लावण्याचे खास प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे या पेट्रोलियम कंपन्यांना आणि केंद्रातील सत्तेच्या वर्तुळातील काही हितसंबंधियांना अरब राष्ट्रांतून खनिज तेलाची आयात होत राहण्यात स्वारस्य असावे अशी शंका येते. अगदीच प्रयत्न होत नाहीत असे कोणी म्हणून नये म्हणून एका सरकारी कंपनीमार्फत कृष्णागोदावरीच्या खोऱ्यांत खनिज तेलाचा शोध घेतला गेला. या खोऱ्यांत अजिबात तेल नाही असे त्या कंपनीने सांगितले; पण एका खासगी कंपनीच्या पाहणीनुसार या खोऱ्यांत संपूर्ण देशाला दहा वर्षे पुरेल इतका साठा आहे. सरकारच्या परवानगीशिवाय तो कोणालाही जमिनीबाहेर काढता येणार नाही. देशात उपलब्ध तेल न शोधणे, अरब राष्ट्रांतून महागड्या तेलाची आयात करणे, मतांवर डोळा ठेवून पेट्रोल कंपन्यांना अनुदाने देऊन लोकांना स्वस्त दरात पेट्रोल व डिझेल पुरविणे आणि प्रदूषण न करणाऱ्या 'शेततेला'चे उत्पादन आणि वापर यांना अटकाव करणे हे सरळ सरळ देशद्रोही कृत्य आहे.
तुमच्या शेतामध्ये शेततेलाच्या रूपाने लक्ष्मी सापडली म्हणून त्याला आपसुक भाव मिळणार आहे असे धरू नका. शेतीमालाला भाव मिळवायचा असेल तर तो कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडत्याकडून मिळणे काही शक्य नाही. आजच्या युगात ते मिळायची शक्यता तंत्रज्ञानानेच शोधलेली आहे. असे तंत्रज्ञान आज उपलब्ध आहे. तुम्ही पेरणी करण्याच्या वेळी कोणाकडे कॉम्प्युटर असला तर त्याच्याकडे जाऊन बघा. तुम्ही तूर, कापूस जे काही पेरणार असाल त्याला हंगामाच्या वेळी काय भाव मिळणार आहे हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. एवढेच नाही तर, तो भाव तुम्हाला मिळायचा करार (कॉन्ट्रक्ट) हंगाम यायच्या आधीही करता येईल; पीक निघाल्यानंतर तुम्ही ठरवले की आता विकायचे, ठीक आहे; मला आता नाही विकायचे नाही तर नाही; पण चार महिन्यांनी जेव्हा भाव चढतील तेव्हा विकायचे आहे तर तुम्हाला चार महिन्यांनंतरचा भाव देणारे तंत्रज्ञान तयार आहे. तुम्ही म्हटले माझ्या भाजीला इथे परभणीत भाव नाही, मुंबईला भाव आहे तर या तंत्रज्ञानाने तुम्हाला मुंबईचा भावसुद्धा मिळू शकेल. काळाचे बंधन नाही, स्थळाचे बंधन नाही; शेतकऱ्याला पाहिजे तो भाव देणारे तंत्रज्ञान निघाले आहे. ते म्हणजे I, माहिती तंत्रज्ञान. त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःचा काँप्युटर बाळगण्याची आवश्यकता नाही. आज कित्येक शेतकऱ्यांच्या तरुण पोराकडे मोबाईल आहे, ही माहिती तुम्हाला मोबाईल फोनवर मिळू शकते. फक्त, तुम्हा शेतकऱ्यांना याचा फायदा घेता येऊ नये, शेतकऱ्याला योग्य तो भाव मिळू नये याकीरता सरकार वायदाबाजारावर बंदी आणत आहे, त्याने ती आणली आहे.
शेतीचे उत्पादन वाढवण्याकरिता माणसाने माल्थसपासून नवीन नवीन तंत्रज्ञान आणले. आज एवढ्याशा जागेत पाहिजे तितके पिकते, जमिनीचीसुद्धा गरज नाही. जैविक तंत्रज्ञानामुळे पाहिजे तसे वाण तयार होऊ शकते. तुमच्या शेतातील अगदी हिरवळीपासून इंधन तयार होऊ शकते. तुमच्या मोबाईलवरसुद्धा शेतीमालाला भाव मिळवण्याची जादूची कांडी आहे.
तर, शेती कशी करावी हे तुम्हाला औरंगाबादला शिकायला मिळेल. चारच शब्द लक्षात ठेवायचे - A, B, E, I - A म्हणजे ऐरोपोनिक्स, A म्हणजे बायोटेक्नोलॉजी, E म्हणजे इथेनॉल टेक्नोलॉजी आणि I म्हणजे इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी. ही चार तंत्रज्ञाने तुम्ही शिकलात तर आपल्या मायबहिणींची बळीच्या राज्याची पिढ्यान्पिढ्यांची इच्छा पुरी व्हायला वेळ लागणार नाही आणि तंत्रज्ञानची झेप इतकी मोठी आहे की आपण येथून औरंगाबादला पोचतो, की आणखी एखादे पाचवे तंत्रज्ञान उदयाला आलेले असेल कदाचित. या सगळ्या तंत्रज्ञानाची माहिती, त्यांचा वापर आणि ज्याला आवश्यक असेल त्याला, विकत घेण्याची संधीसुद्धा औरंगाबादला अधिवेशनात मिळणार आहे.
शेतकरी संघटनेचे अधिवेशन, गावची जत्रा जशी दर वर्षी भरते तसे काही दरवर्षी भरत नाही. जेव्हा काही असे संकट येते, असा कठीण प्रसंग येतो आणि अध्यक्षांना वाटते की हा निर्णय आपल्याला किंवा कार्यकारिणीलाही करणे कठीण आहे; आपण एकट्याने निर्णय घ्यायचा धोका घेऊ नये, सगळ्या शेतकऱ्यांना बोलवावे, सगळे शेतकरी भाऊबहिणी मिळून विचारविनिमय करून या अंधारातून रस्ता कसा काढायचा ते ठरवू तेव्हा शेतकरी संघटना अधिवेशन भरवते. आतापर्यंत शेतकरी संघटनेची १० अधिवेशने होऊन गेली, हे ११ वे अधिवेशन महत्त्वाचे आहे. तुम्ही लांबचे असा की जवळचे, तुम्हाला सगळ्यांना मी विनंती करतो की या ऐतिहासिक अधिवेशनाला तुम्ही काहीही झाले तरी येणे चुकवू नका. नाही तर, तुमची नातवंडे तुम्हाला हसतील आणि विचारतील, 'अरे, ते औरंगाबादचे अधिवेशन होते आणि तुम्ही गेले नव्हते?'
(६ ऑक्टोबर २००८ - मानवत. जि. परभणी)
(शेतकरी संघटक २१ ऑक्टोबर २००८)
◼◼