माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो.../नुसता नवा जोम नव्हे, नवी रणनीती हवी



नुसता नवा जोम नव्हे, नवी रणनीती हवी

 वाज उठत नाही - कारण गेल्या वर्षभराचा आजार. दुसरं कारण काल दिल्लीहून येताना माझा आवाज अचानक बंद झाला, तुमचं प्रेम पाहून थोडे तरी शब्द बाहेर येताहेत आणि तिसरी गोष्ट, हा जो कार्यक्रम तुम्ही केला त्यानं माझं मन खरोखर इतकं भरून आलं आहे की, तोंडातून निघत नाही.
 अण्णासाहेबांच्या स्मृतिनदिनानिमित्त मी श्रीरामपूरला यायचं कबूल केलं - त्यांची आणि आमची मतं सगळीच काही जमतात असं नाही, कुणाचीच जमत नाहीत; पण अण्णासाहेबांची थोरवी आपल्या सगळ्यांना मान्य आहे. त्यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने शेतकरी जोतिबा फुल्यांच्या काळापासून निघाला कोठे; चालला आहे कुठे आणि आज आहे कुठं याच सिंहावलोकन करण्याची संधी मिळते म्हणून मी इथं आलो आणि ही जिल्ह्याची बैठक घेतलीत, फुलांनी स्वागत केलं.
 मी प्रामाणिकपणे सांगतो की ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांना आग्र्याहून सुटका झाल्यानंतर आपले मावळे सगळे महाराष्ट्रात शिल्लक असतील किंवा नाही अशी चिंता वाटत होती, त्याचप्रमाणे या आजारपणातून उठून आल्यानंतर माझ्याही मनाची काहीशी अशीच अवस्था होती. श्रीरामपूर वगैरे भागामध्ये शेतकरी संघटनेच्या सुरुवातीच्या काळात केवढ्या प्रचंड सभा झाल्या, कशी भाषणे झाली, किती कार्यकर्ते तयार झाले; पण आता ओहोटीची लाट येऊन वाळूचे किल्ले सगळे वाहून जावे अशी परिस्थिती झाली असावी काय अशा काहीशा चिंतेत मी असताना तुम्ही सगळे जुने कार्यकर्ते एवढ्या मोठ्या संख्येने जमा झालात यामुळे माझ्या मनाला फार मोठा आधार वाटला. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही आग्रहाआग्रहाने बोललात. मी किती वेळ बोलू शकेन हे महत्त्वाचे नाही; पण तुम्ही प्रत्येकाने बोलताना आजही, इतक्या कठीण परिस्थितीत शेतकरी संघटनेविषयी ज्या विश्वासाने अपेक्षा व्यक्त केल्या त्यामुळे खरंच माझं मन भरून आलं आहे.
 वीस वर्षांपूर्वी शेतकरी संघटनेची सुरुवात झाली. 'देशात गरिबाचे कारण शेतकऱ्यांची गरिबी, शेतकऱ्यांच्या गरिबाचे कारण शेतीमालाला भाव नाही आणि शेतीमालाला भाव नाही याचे कारण गोऱ्या इंग्रजांच्या जागी काळा इंग्रज आला.' एवढे साधे अर्थकारण हा शेतकरी संघटनेचा पाया आहे. कांद्याचा लढा झाला, उसाचा लढा झाला, कापसाचा लढा झाला, कर्जमुक्तीचा लढा झाला. कशाचीही फिकीर न करता आम्ही रानोमाळ फिरलो. दुसऱ्या कोणत्या गोष्टीचे नाही तरी एका गोष्टीचे श्रेय मी अवश्य घेईन. महाराष्ट्रात जोतिबा फुल्यांसारखे महान द्रष्टे नेते झाले; पण महाराष्ट्राच्या बाहेर, काही प्रागतिक चळवळी मंडळी सोडली तर इतरांना 'जोतिबा फुले म्हणजे कोण' हे सांगावे लागते. उत्तरेत सर छोटूराम यांच्यासारखा किसान अग्रणी झाला पण तोसुद्धा पंजाब-हरियाणाच्या बाहेर पडूच शकला नाही. शेतकरी संघटनेने याबाबतीत मोठी कर्तबगारी दाखविली. शेतकरी संघटना जिल्ह्यापुरती किंवा महाराष्ट्रापुरती मर्यादित ठेवली नाही; तर शेतकरी संघटनेचा नेता गुजरातच्या शेतकऱ्यांच्या मदतीकरिता जातो, नर्मदा धरणावरील कारसेवेचे आंदोलन जाहीर करतो, त्या आंदोलनात महाराष्ट्रातून हजारो स्त्रीपुरुष शेतकरी सत्याग्रही जातात, त्यांच्याबरोबर पंजाबातील शीख शेतकरीही हजारांच्या संख्येने येतात, हरियाणातले येतात, इतर राज्यातलेही येतात. हे पूर्वी कधीही न घडलेले नवल शेतकरी संघटनेने घडवून आणले.
 शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखालील शेतकरी चळवळ फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता ती देशभरच्या शेतकऱ्यांची झाली. असे असले तरी दम सुटावा, निराशा वाटावी अशा अनेक गोष्टीही आहेत.
 आपल्या शेतकरी चळवळीची सुरुवात कांद्याच्या भावाने झाली. आज वीस वर्षांनंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांची तीच स्थिती आहे. त्यावेळी आपण कांद्याला क्विंटलला अठरा रुपयेच भाव येतो म्हणून रडत होतो. आज दीडशे ते एकशे ऐंशीच्यावर जात नाही म्हणून रडतो. कारण, आजच्या रुपयाची किंमत जुन्या दहा रुपयांइतकीही राहिली नाही. साखरेच्या आयातीमुळे उद्योगावर संकट आले आहे. ऊसउत्पादक शेतकऱ्यांवर संकट आले आहे. कापसाच्या आयातीमुळे कापसाचा भाव इतका पडू लागला आहे की गुजरात, पंजाब, हरियाण मधील शेतकरी कापसाच्या भावाचे आंदोलन करायला उभे राहिले आहेत.
 १९८० मध्ये आपण काय मांडले? समाजवादाच्या नावाखाली शेतकऱ्यांना लुटण्याचे षड्यंत्र रचले जात आहे, कारस्थान रचले जात आहे. हा समाजवाद टिकू शकत नाही, खुली व्यवस्था येणे अपरिहार्य आहे. कारण, कोणाही एका माणसानं दिल्लीत किंवा मॉस्कोत बसून यंत्रणा चालवायची म्हटले तर ती चालू शकत नाही. शेतकऱ्यांनी स्वतःच्या हिताच्या दृष्टीने घेतलेले निर्णय हेच, अंततोगत्वा, सर्व देशाच्या हिताचे निर्णय असतात. ही समाजवादी व्यवस्था टिकू शकणार नाही हे आपण पहिल्यांदा सांगितले. ज्यावेळी समाजवादी व्यवस्थेचा बोलबाला होता, डॉ. मनमोहनसिंगांसारखे अर्थशास्त्रीसुद्धा ज्यावेळी समाजवादाची भाषा बोलत होते तेव्हा, समाजवादाचे अध:पतन निश्चित आहे हे भाकीत आपण केले आणि त्याप्रमाणे जगभर समाजवादाचा पाडाव झाला. आज कोणताही पक्ष समाजवादाची भाषा बोलत नाही. सत्तेच्या खुर्चीवर बसण्याआधी सगळेच म्हणतात की खुली व्यवस्था वाईट आहे, धोक्याची आहे, तिच्यामुळे काय होईल कोणास ठाऊक? पण खुर्चीवर चढले की एका दिवसातच ते खुल्या व्यवस्थेच्या बाजूने बोलू लागतात. म्हणजे, 'नाही नाही' म्हणत खुल्या व्यवस्थेचा सर्वांनीच स्वीकार केला आहे. पण मग, समाजवाद संपून खुली व्यवस्था आली तरी कांद्याच्या शेतकऱ्यांचे, उसाच्या शेतकऱ्याचे, कापसाच्या शेतकऱ्याचे दैन्य का संपले नाही? कर्ज वाढायचे का थांबले नाही? या महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर आज सगळे शेतकरी शोधताहेत.
 याबद्दलची सैद्धांतिक मांडणी आपण आजवर सातत्याने करीत आलो आहोत.
 खुली व्यवस्था आली म्हणतात तरी परिस्थितीत काहीच बदल नाही यावर उपाय काढण्यासाठी शेतकरी संघटनेचा पुढचा कार्यक्रम काय?
 २१ जानेवारीला शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीची बैठक आहे. त्यात कार्यक्रमासंबंधी निर्णय घेतला जाईल; पण आपण मोठ्या कठीण अवस्थेत आहोत हे नाकारण्यात काही अर्थ नाही. मला तुमच्या मनामध्ये निराशा आणायची आहे म्हणून मी असे बोलतो असे नाही; पण आपला राजकीय पराभव झाला आहे ही गोष्ट सत्य आहे. शेतकऱ्याला 'शेतकरी' म्हणून स्वाभिमान असावा, सन्मानाने जगण्याची इच्छा असावी हे आम्ही मांडले; पण माधवराव मोऱ्यांच्या भाषेत सांगायचे तर 'मांजराला कितीही मिठाई खाऊ घातली तरी उंदीर पाहिल्याबरोबर ते उंदराच्याच मागे जाते, मिठाई सोडून देते.' तसंच, शेतकरी म्हणून सन्मान मानण्याऐवजी, कुणी रामाचं नाव घेतलं, कुणी शिवाजीचं नाव घेतलं तर आम्ही आमचा सन्मान सोडून त्यांच्या पाठीमागे गेलो. शेतकरी संघटेचा राजकीय पराभव झाला ही गोष्ट खरी आहे.
 अर्थकारणामध्ये आपण जे जे मांडले ते ते तसे घडले ही गोष्ट खरी आहे; पण हा विचार शेतकरी संघटनेने मांडला, शरद जोशींनी मांडला असे काही श्रेय कुणी दिले नाही. आपण दस्तऐवज भले केले पण आपली त्यावर सही काही उमटली नाही. परदेशात कोणाला विचाराल की खुली व्यवस्था हिंदुस्थानात कुणी आणली तर डॉ. मनमोहन सिंग, पी.व्ही. नरसिंहराव यांची नावे घेतली जातात. याचे कारण आपण जे काही शिल्प कोरले त्यावर आपण आपले नाव घातले नाही.
 आजच्या परिस्थितीमध्ये काय होते आहे? ५ जानेवारीला दिल्लीला वित्तमंत्र्यासमोर झालेल्या अंदाजपत्रकपूर्व चर्चेमध्ये मी एक मुद्दा मांडला. हिंदुस्थानात १९६५ मध्ये हरित क्रांती झाली. वरखते आणि औषधे वापरली म्हणजे पिके वाढतात हे काही नवीन ज्ञान नव्हते; पण पंडित, नेहरूंपासून देशातील सगळेच नेते म्हणत की, "अशा प्रकारची सुधारित शेती नको. सुधारित शेतीचे काय भयानक परिणाम होतील हे सांगता येत नाही. गावातील श्रीमंत शेतकरी आणि गरीब शेतकरी यांच्यातील दरी वाढेल." अखेरी, एक लालबहादुर शास्त्री निघाले, एक सी. सुब्रह्मण्यम् निघाले आणि एक अण्णासहेब शिंदे निघाले की ज्यांनी हरित क्रांती प्रत्यक्षात इथे जमिनीवर आणून दाखवली.
 आणि आजसुद्धा नेमके असे घडते आहे की, शेतीमधील एका नव्या क्रांतीला सुरुवात होते आहे. हरित क्रांतीला इंग्रजीत ग्रीन रिव्होल्यूशन (Green Revolution) म्हणतात. या नव्या क्रांतीला मी जीन रिव्होल्यूशन (Gene Revolution) म्हणेन. आता शेतीतील उत्पादकता वाढणार आहे ती बियाण्यांच्या स्वरूपातच बदल करून, बीजाचं अंतरंगच बदलून; पण ६५ सालच्या हरित क्रांतीच्या आगमनाबाबत आपण जितके बेसावध होतो तितकेच आज या नवीन क्रांतीबाबात बेसावध आहोत. हा बेसावधपणा दूर करून जगाशी टक्कर देण्याच्या तयारीने आपण उभे राहिलो तर भारतीय शेतीला भवितव्य आहे.
 पहिल्यांदा असे घडले आहे की, हिंदुस्थानातील कापसाची किंमत जागतिक बाजारपेठेतील किंमतीपेक्षा जास्त आहे. हे पहिले वर्ष असे आहे, की गव्हाची जागतिक बाजारपेठेतील किंमत हिंदुस्थानातील गव्हाच्या किमतीपेक्षा कमी आहे. कांद्याला निर्यातीचा परवाना मिळाला असला तरी हातात बाजारपेठ नाही; कारण कांद्याची बाहेरची किंमत आपल्या कांद्यापेक्षा कमी झाली आहे. बाहेरच्या देशांनी तंत्रज्ञानामध्ये जी प्रगती केली आहे त्या प्रगतीकडे जाण्याची शक्यता हिंदुस्थानातील शेतकऱ्याला मिळणे आवश्यक आहे. हिंदुस्थानातल्या शेतकऱ्याला आपला माल विकण्यासाठी बाजारपेठेत पाहिजे तिथे जाता आले पाहिजे; पाहिजे तिथे खते. औषधे निविष्टांची खरेदी करता आली पाहिजे हे आपण मांडले; पण यापुढे जागतिक तंत्रज्ञान जिथे असेल तिथून आणून त्याचा प्रयोग करण्याचा अधिकार हा भारतातील शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. बोंडअळीला प्रतिकार करण्याचा अंगभूत गुणधर्म असलेल्या कपाशीच्या बियाण्याचे चाचणीप्रयोगसुद्धा करण्याची परवानगी हिंदुस्थान शासन शेतकऱ्यांना देत नाही. आधुनिक तंत्रज्ञानापासून वंचित राहिल्याने आपण दर एकरी उत्पादनात इतर देशांच्या तुलनेने खूपच मागे पडतो. उदाहरणार्थ, बहुतेक देशांतील कापूसउत्पादक शेतकरी विदर्भातील कापूस उत्पादकांच्या चाळीसपट जास्त कापूस एकरी घेतात.
 हे नवीन तंत्रज्ञान हाती कसे घ्यायचे? त्याकरिता नवे मार्ग काय? यासंबंधी आपल्याला फार तपशीलवार ऊहापोह करावा लागेल.
 गेल्या महिन्यात मी लासलगावला गेलो होतो. कांद्यांचे भाव पार पडले होते. लासलगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे जवळजवळ सर्व पदाधिकारी हे शेतकरी संघटनेचे जुने कार्यकर्ते आहेत. ते मला सांगू लागले. आम्ही पंतप्रधान वाजपेयी यांना भेटायला गेलो तर ते आम्हाला विनम्रपणे नमस्कार करून म्हणाले, "तुम्ही कांदाउत्पादक शेतकरी का? तुम्ही फारच जबरदस्त आहात. तुमच्यामुळं आम्ही दोन राज्यांतील निवडणुका हरलो आणि आता ग्राहकांचा विचार करा; केवळ शेतकऱ्यांचा करू नका," असा त्यांनी आम्हाला सल्ला दिला.
 लासलगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यकर्त्या संचालकांना मी म्हटलो, "एक काळ असा होता की तुम्ही जर रस्त्यावर बसलात, रेल रोको केलं तर सरकारचं लक्ष जात होतं. आता सरकार मोठं निगरगट्ट बनलं आहे. काश्मिरात जे चाललं आहे, आसामात जे चाललं आहे, अयोध्येला जे चाललं आहे ते पाहता हजार दहा हजार शेतकरी रस्त्यावर बसले आणि अटकेत गेले तर सरकारच्या वागण्यात काही फरक पडणार नाही."
 गुजराततध्ये नर्मदा धरण कारसेवेसाठी इतकी मंडळी जमली होती पण गुजरात सरकारने त्या सगळ्यांना गावागावात अडकून ठेवले आणि वर्तमानपत्रांना आंदोलनाचा फज्जा उडाला अशा बातम्या द्यायला लावल्या.
 आता यापुढे, सरकारला जी भाषा समजते तीच भाषा वापरावी लागेल. कांद्याचा भाव ६० रुपये किलो झाला तर सरकार घाबरत असेल तर आता रस्त्यावर जाण्यापेक्षा कांदा ६० रुपये किलो कसा करता येईल याची व्यवस्था आपल्याला जाणीवपूर्वक करायला लागेल. म्हणजे मगच राजकारणासाठी लागणारी भाषा आपण बोलू शकू.
 अशा तऱ्हेची साधने, अशा तऱ्हेचे मार्ग. सत्याग्रहाच्या पद्धती आपल्याला शोधून काढाव्या लागतील. पण याचा अर्थ कार्यकर्त्यांनी स्थानिक पातळीवर आंदोलने करायचीच नाहीत असा नाही.
 वाईट वाटणाऱ्या गोष्टी ऐकल्या, तशा चांगले वाटणाऱ्या गोष्टी मागील वर्षात घडल्या आहेत. लसलगावला कांद्याची कोंडी होताच शेतकऱ्यांनी आपणहून आंदोलन चालू केले. कोल्हापूर, सांगली भागात शामराव देसाईच्या नेतृत्त्वाखाली आजही साखर कारखानदारांच्या मोटारगाड्यांना काळे फासायचे आंदोलन चालू आहे. तेव्हा कोणीही, शरद जोशीची परवानगी मिळाली नाही म्हणून आम्ही आंदोलन केले नाही असली सबब सांगायचे कारण नाही. ज्याच्यात हिम्मत नाही तोच परवानगीची सबब सांगतो. माधवराव मोरे विचारायचे, "आपली आई आजारी पडली तर तिच्या उपचारासाठी आपण काही ग्रामपंचायतीचा ठराव घेत नाही! तिच्याकरिता औषध आणायला धावतोच ना?" तसे, जिथे जिथे अन्याय वाटेल तिथे तिथे तुम्ही आंदोलन करायला उभे राहा, त्यात तुमच्या हातून चुका झाल्यातरी मी तुमच्या पाठीशी उभा राहीन.
 मी गांधीवादी आहे का नाही? असाही एक प्रश्न उभा केला जातो. गांधीचा माझ्यावर मोठा प्रभाव आहे, हे खरं आहे. पण गांधीचे अहिंसा तत्त्व आचरायला माहात्म्य लागते. आपण महात्मे नाही, उगीच भलत्या माणसाशी तुलना करू नये; पण "शरद जोशींची परवानगी नाही म्हणून आम्ही स्वस्थ बसलो, नाहीतर काय उत्पात घडवले असते!" ही भाषा काही खरी नाही.
 समाजवादाचा पाडाव होणार असे आपण वीस वर्षांपूर्वी ठासून सांगितले पण तसा पाडाव झाला तेव्हा माझे किंवा तुमचे नाव कोणी घेतले नाही. त्याला तसेच कारण आहे. नागपूरच्या अधिवेशनात शेतकरी संघटनेने आदेश दिला की नेहरू घराण्याने सबंध देशाचा जो अधःपात केला आहे त्याचा निषेध करण्याकरिता, जसे मॉस्कोमध्ये स्टॅलिनचे आणि लेनिनचे पुतळे तेथील जनतेने पाडले, त्याप्रमाणे या घराण्याचे गावोगाव जे पुतळे आहेत ते पाडून टाका. त्यावेळी आपण जर हे पुतळे पाडले असते तर जगभर बातमी झाली असती की हिंदुस्थानातील खुल्या अर्थव्यवस्थेची जननी शेतकरी संघटना आहे. त्यावेळी आपण हिम्मत केली नाही. हा उल्लेख मी कशासाठी करतो आहे? "शिवसेनेचे लोक तोडफोड करतात, गुंडगिरी करतात म्हणून त्यांना सरकार मिळाले आणि आपण गुंडगिरी करीत नाही कारण शरद जोशी आपल्याला परवानगी देत नाही." असे काही कार्यकर्ते म्हणतात. हे घाबरटांचे तत्त्वज्ञान झाले.
 शिवसेनेचे सैनिक दंगा करतात, पण ते दंगा करतात म्हणून त्यांना राज्य मिळाले हे काही खरे नाही. ज्या माणसाला वर्तमानकाळात सांगायला पुरुषार्थ राहत नाही, अभिमान सांगायला राहत नाही तो नेहमी वाडवडिलांच्या कथा सांगतो, आपल्याकडे स्वतःचे काही सांगण्यासारखे नाही तर मी किती मोठ्या कुळातला, माझी जात किती श्रेष्ठ वगैरे गोष्टी तो बोलायला लागतो, तसेच, समाजवादाच्या काळामध्ये हिंदुस्थानचा अधःपात झाला, दक्षिण कोरियासारखे छोटे छोटे देश आपल्यापुढे निघून गेले. स्वाभिमान सांगायला काही उरले नाही. मग, इतिहासातून ज्यांच्याबद्दल अभिमान वाटावा अशा विभूती शोधून काढल्या. महाराष्ट्राच्या दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराज आणि देशभराच्या दृष्टीने प्रभू रामचंद्र! आणि म्हणून लोक त्यांच्याबाजूने वळले. शिवसैनिक दंगे करतात म्हणून नव्हे. आमच्याजवळ वर्तमानकाळात अभिमान बाळगण्यासारखे काहीच उरले नव्हते - या कारणाने जातीयवाद्यांचे राज्य आले.
 मी तुम्हाला गुंडगिरी करायला सांगत नाही; पण माझी परवानगी नसल्यामुळे तुम्ही गुंडगिरी केली नाही हे भेकडाचे तत्त्वज्ञान मला सांगू नका. शेतकऱ्याचा सन्मान राखण्यासाठी जिथे आवश्यक तिथे स्थानिक पातळीवर दहा माणसे जरी जमा झाली तरी चालेल; काय जमेल ते करून दाखवा. जमले तर कोर्टात जाऊन, जमले तर जिल्हा कचेरीत जाऊन, जमले तर मंत्र्याकडे जाऊन आणि जमले तर तुम्हाला जे 'हत्यार' योग्य वाटेल ते वापरून अशी प्रतिमा तयार करा की भारतातला शेतकरी हा नागासारखा आहे; त्याच्या वाटेला कुणी गेले तर फुस्स करून फडा काढतो. एवढी भीती जरी तुम्ही लोकांच्या मनात तयार केली, मग त्यासाठी तुम्ही कोणतीही साधनं वापरा, मी तुमच्यामागे उभा राहीन.
 आजारपणात, माझ्या मनात निराशेचा विचार येत असे. आपण लोकांना पुढे केले, आपल्या शब्दासाठी किती लोकांनी काय काय सोसले, आपल्या खिशातले पैसे काढून संघटनेचे कार्यक्रम केले, घरामध्ये अशांती आणली, सतत घराबाहेर राहिल्याने घरची लक्ष्मी नाराज झाली. एवढे करूनही शरद जोशीपुढे जायला मिळाले नाही, आपले नाव त्यांच्या कानी पडले नाही म्हणून निरुत्साही न होता कामे करीत राहिले. माझ्या मनात प्रश्न येत असे आपण यांचे उतराई कसे होणार आहोत? मग मीच माझी मला उत्तरे दिली.
 पहिले उत्तर - शेतकरी संघटनेच्या असंख्य कार्यकर्त्यांनी आजवर जो त्याग केला, जी किंमत मोजली त्याची अपेक्षा करण्याचा मला अधिकार होता, कारण इतर कोणाही इतकीच माझा प्रपंच उधळून देण्याची तयारी मीही दाखविली आणि जिथे जिथे आवश्यक होते तिथे तिथे माझा जीव धोक्यात घातला; शेतकऱ्याचा मुलगा नसताना घातला, ब्राह्मण असून घातला.
 दुसरे उत्तर - मी तर बाहेरचा, उपरा; मी काही शेतकऱ्याघरचा नाही; पण महात्मा जोतिबा फुले हे तर शेतकऱ्याघरचे? त्यांच्या आयुष्यामध्ये जे जे काही घडले ते पाहिले तर हिंदुस्थानातल्या लोकांनी माझ्यापेक्षा त्यांची फारच वाईट अवस्था केली हे लक्षात येईल. म्युनिसिपालिटीच्या एका निवडणुकीत त्यांच्या वॉर्डात त्यांना फक्त दोन मते मिळाली, दुसऱ्या वॉर्डात एकही नाही. त्यांच्या पत्नीवर चिखलफेक झाली. त्यांची चळवळ तीन जिल्ह्यांच्यावर पसरू शकली नाही. जोतिबांच्या आयुष्यामध्ये त्यांना मान मिळाला नसेल, त्यांची हेटाळणी झाली असेल, इतिहास त्याची भरपाई करतो. व्हॉईसरॉयच्या दरबारामध्ये खांद्यावर घोंगडे टाकून ते गेले होते. आज कोणालाही कोणत्या व्हॉईसरॉयच्या दरबारात जोतिबा फुले घोंगडे खांद्यावर टाकून गेले त्या व्हॉईसरॉयचे नाव माहिती नाही, जोतिबा फुल्यांचेच नाव माहिती आहे. इतिहास घटनेचे यथार्थ मूल्यांकन करतो हा विश्वास ठेवा.
 माझी चळवळ शेतकऱ्याची आहे का? आहे. पण मी काही शेतकरी नाही. शेतकरी नसूनही मी शेतकऱ्याकरिता सगळा संसार का उधळून टाकला? कारण, मी जो लढा देतो आहे तो स्वातंत्र्याचा लढा आहे. प्रत्येक व्यक्तीला आपापल्या बुद्धीप्रमाणे, आपापल्या कुवतीप्रमाणे आपापल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे. मी हा लढा सुरू केला तेव्हा, या स्वातंत्र्यामध्ये सगळ्यात मोठा अडथळा येतो तो शेतकऱ्यांच्याबाबतीत अशी खात्री पटल्यामुळे मी शेतकरी संघटनेला सुरुवात केली.
 इतिहास पडताळून पाहिला तर असे दिसते की इतिहास हा जास्तीत जास्त स्वातंत्र्याकडे जातो. इतिहासाच्या सुरुवातीला अनेक भिंती होत्या. भाषेच्या भिंती होत्या. जातीच्या भिंती होत्या, धर्माच्या भिंती होत्या, भूगोलाच्या भिंती होत्या आणि गेल्या हजारो वर्षांच्या इतिहासात काय घडले ते एका वाक्यात सांगायचे तर या सगळ्या कृत्रिम भिंती, महापुरामध्ये भिंती तडातडा फुटून वाहून जाव्यात, तशा फुटत आल्या आहेत. इतिहासामध्ये विजय प्रत्येकवेळी स्वातंत्र्याचा झाला आणि ज्यांनी ज्यांनी धर्माच्या नावाखाली, अर्थकारणाच्या नावाखाली स्वातंत्र्यावर बंधने घालण्याचा प्रयत्न केला, "सामान्य माणसाला समजत नाही, मी सांगतो तुमचं कशानं कल्याण होणार आहे ते." असं ज्यांनी ज्यांनी म्हटले त्यांना त्यांना इतिहासाने धुळीस लोळवले आहे. स्वातंत्र्य हा इतिहासाचा संदेश आहे आणि अलीकडच्या इतिहासामध्ये शेतकरी संघटना ही हिंदुस्थाना मध्येतरी स्वातंत्र्याचा झेंडा घेऊन पुढे जाणारी सर्वांत मोठी संघटना आहे. इतिहास तुमचा आहे, भविष्य तुमचे आहे.
 मग, सध्याची जी परिस्थिती आहे तिची कशाशी तुलना करता येईल. या परिस्थितीची तुलना 'शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका झाल्यानंतरच्या परिस्थितीशीच करता येईल. मी शिवाजी महाराज नाही होऊ शकणार, पण शेतकरी संघटनेचे काम हे शिवाजी महाराजांच्या कामाच्या तुलनेचे आहे. शहाजी राजांनी, मालोजी राजांनी बादशाहीपासून स्वातंत्र्य मिळविण्याचा प्रयत्न देशमुखांना एकत्र करून केला; शिवाजी महाराजांनी मावळे एकत्र केले. शेतकरी संघटनेने आपले काम चालू असताना साखर कारखान्याचे संचालक, अध्यक्ष गोळा केले नाहीत तर तळागाळातील, शेतीमध्ये घाम गाळणारा शेतकरी उभा केला. म्हणून मी म्हणतो की शेतकरी संघटना कामाच्या बाबतीत शिवाजी महाराजांच्या तुलनेची आहे. आता आग्र्याहून सुटली आहे आणि राज्यभिषेक जो व्हायचा आहे तो काही फार दूर नाही; शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेनंतर पाचसहा वर्षांतच राज्यभिषेकाचा शुभदिवस आला.शेतकरी संघटनेचाही तो दिवस येणारा याची खात्री बाळगा.
 माझ्या हातून चुका झाल्या असतील. कित्येक कार्यकर्त्यांच्या भावना माझ्याकडून दुखावल्या गेल्या असतील, कारसेवा आंदोलनाच्या काळामध्ये महाराष्ट्रात काही अप्रिय घटना घडल्या असे मी ऐकतो आहे. मला मुलगा नाही पण अनेक कार्यकर्त्यांना मी मुलासारखं मानलं, त्यांनीसुद्धा बाप जरा दुबळा झाल्यासारखा वाटल्यानंतर घरातली मुलं जशी गडबड करतात, तशी गडबड केलेली पाहिली. मनाला क्लेश झाले; पण हे सगळं झालं तरी आपली सगळ्यात मोठी ताकद म्हणजे आपण सत्य मार्गाचे यात्रिक आहोत, महात्मा जोतिबा फुल्यांनी दिलेल्या मार्गाने चालतो आहोत. आपला विजय निश्चित आहे हे लक्षात ठेवून आपण सर्वजण काम करीत राहिलो तर सध्याचा अंध:कार दूर व्हायला पाचसहा वर्षांपेक्षा काही जास्त काळ लागणार नाही असा मला विश्वास आहे.
 जागतिक शेतकरी मंचावर माझी नेमणूक झाल्याचे सर्वांनाच ठाऊक आहे. या मंचाची हिंदुस्थानातील पहिली परिषद दिल्ली येथे १०, ११, १२ एप्रिल २००० रोजी होणार आहे. या परिषदेचे उद्घाटन हिंदुस्थानचे राष्ट्रपती करणार असून, त्यात अत्यंत महत्त्वाचे भाषण स्वतः पंतप्रधान करणार आहे. वित्तमंत्री परिषदेला सर्वकाळ हजर राहणार आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना येण्याचे निमंत्रण आहे. यावेळी आगगाडीने फुकट प्रवास करण्याची गरज नाही; कारण या कार्यक्रमाला येणाऱ्या सर्वांना रेल्वेच्या प्रवासाचे तिकीट दिले जाणार आहे.
 खुल्या व्यवस्थेमध्ये सरकार अन्याय करू लागले तर त्याला विरोध करण्याचा मार्ग रास्ता रोको नाही ते समाजवादाच्या काळातले हत्यार होते. आता हत्यारे वेगळी आहेत, व्यापारी हत्यारे आहेत. आवश्यक तर कांद्याचा भाव ६० रुपये किलो करून दाखविण्याची हत्यारे हाती घ्यायची आहेत. त्याकरिता वेगळ्या बांधणीला सुरुवात झालेली आहे. तुम्ही, मनामध्ये जी काही निराशा आली असेल, अंध:कार दाटला असेल तो दूर करून शेतकरी संघटनेवरील श्रद्धा कायम ठेवावी.

(१२ जानेवारी २०००, जिल्हा कार्यकारणी बैठक श्रीरामपूर.)
(शेतकरी संघटक २१ जानेवारी २०००)

◼◼