माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो.../बळिराजाचा पुनरुत्थानाचा कार्यक्रम



बळिराजाचा पुनरुत्थानाचा कार्यक्रम


 मा झ्या शेतकरी भावांनो माय बहिणींनो,
 आता तुम्हाला, येथून गेल्यानंतर आजपासून निदान तीन महिन्यांचा कार्यक्रम मी समजावून सांगणार आहे. कारण मला एक धोका दिसतो. त्याची कारणं मी खुल्या अधिवेशनात देत नाही. प्रतिनिधी संमेलनात मी दिली आहेत. निवडणुका झाल्या तर मे महिन्यामध्ये होतील, नाही झाल्या तर डिसेंबरमध्ये होतील. आपण पहिल्यांदा तयारी मे महिन्याची करू. या निवडणुकीची तयारी कशाकरता करायची?
 कर्जमुक्तीच्या आंदोलनामध्ये आपण ठरवलं. कोर्टामध्ये अर्ज टाकायचे. वसली स्थगित करायची आणि वसली स्थगित केल्यानंतर कर्जदार शेतकऱ्यांच्या संख्येच्या ताकदीवरती अशी परिस्थिती तयार करायची की, नवा पंतप्रधान कर्जमुक्ती मानणारा आणि शेतीमालाला रास्त भाव देणाराच असला पाहिजे. हे आपलं धोरण आहे. ही आपली रणनीती आहे. नांदेडला येताना आपण हसत आलो. का तर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला होता की, यापुढे शेतकरी संघटनेचा एस्.एस्. हा शिक्का असलेला फॉर्म ज्या ज्या शेतकऱ्यांनी भरला असेल आणि कोर्टात दिला असेल, त्याच्यावर नंबर जरी पडला नसला तरी चालेल, त्या शेतकऱ्याकडनं कोणत्याही प्रकारची वसुली करण्याचा अधिकार कोणत्याही बँकेला नाही. हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आम्ही घेऊन आलो. केवढा मोठा भाग्याचा दिवस.
 आमचे पणजोबा कर्जात मेले किंबहुना खापरपणजोबासुद्धा कर्जात जन्मले आणि कर्जात मेले. बळिराजा जमिनीत गाडला गेल्यापासून शेतकऱ्याच्या हातात एवढं मोठं हत्यार कधी आलं नव्हतं. वामनाने तीन टांगा टाकून बळीला गाडलं म्हणतात. शेतकऱ्यांचं हे एकच पाऊल इतकं मोठं झालं की काळ्या इंग्रजाला जमिनीत गाडण्याकरता ते पुरेसं आहे. कोणत्याही बंदकीची गरज नाही, हत्याराची गरज नाही. सगळ्या कर्जाच्या बाजातून एक कागद कोर्टाकडे टाकला की शेतकरी मोकळा होतो. शेतकऱ्यांच्या हाती ॲटमबॉम्ब आला आहे.
 तर मग ९० सालच्या आधी तयारी काय कराची ते महत्त्वाचं आहे. यंदा मी तुम्हाला दिवाळीनंतर गावं रंगवायला सांगितली नव्हती. पण आपली जुनी पद्धत आहे. गावामधल्या सगळ्या भिंती शेतकरी संघटनेच्या घोषणांनी रंगवून टाका. हे फार महत्त्वाचं आहे. दिवाळीच्या आधी आपण रंगसफेदी करतो कारण शुभदिवस यायचा आहे. तर बळिराजाच्या आगमनाकरिता सगळं गाव शेतकरी संघटनेच्या आणि बळिराजाच्या विजयाच्या घोषणांनी रंगवून टाका.
 दसरी गोष्ट, गावाबाहेर शेतकरी संघटनेचा मोठा बिल्ला लावा. प्रत्येक गावामध्ये एक लहानशी का होईना पण पाटी लावून टाका. आपण पूर्वी पाटी काय लावायचो? कर्जवसुली अधिकाऱ्यांना आणि पुढाऱ्यांना गावात यायची परवानगी नाही. आता पुढाऱ्यांची चिंता करू नका व कर्जवुसली अधिकाऱ्यांना सुप्रीम कोर्टानेच टांगून ठेवलं आहे. आता नवी पाटी लावा.. 'जातीयवाद्यांना या गावात प्रवेश नाही.' जातीच्या आधाराने धर्माच्या आधाराने माणसामाणसामध्ये झगडे लावणाऱ्यांना या गावात प्रवेश नाही.
 दुसरं काय काम करायचं आहे आपल्याला पाडव्याच्या मुहूर्तावर? ६ एप्रिल हा दिवस असा की, त्या दिवशी निपाणीला २३ दिवस सत्याग्रह झाल्यानंतर पोलिसांनी गोळीबार करून तेरा शेतकऱ्यांना ठार केलं. महत्त्वाचा पवित्र दिवस आहे. त्या दिवसांपासून नवीन काम सुरू करायचं. नोकरशाहीवर वचक आणण्याकरिता, भ्रष्टाचार संपविण्याकरिता. नांदेड जवळच्या अहमदपूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी हा कार्यक्रम केला. पंजाबातील बहाद्दर शेतकऱ्यांनी हा कार्यक्रम यशस्वी केला. काय कार्यक्रम यशस्वी केला?
 आपल्याला जागोजाग लाच द्यावी लागते. ७/१२ चा उतारा तुम्हाला पैसे दिल्याखेरीज कधी मिळालाय का? नाही. फॉरेस्ट खात्यात जाऊन एखादा कागद मिळवायचा आहे. पैसे दिल्याखेरीज मिळालाय का? कधीही नाही. विजेचे कनेक्शन मिळवायचं, नवीन स्टार्टर बसवायचं आहे; शेतकऱ्याचं कोणतही काम कुठंतरी वजन ठेवल्याखेरीज, कणाचे तरी हात ओले केल्याखेरीज होतच नाही, ही फार जुनी पद्धत आहे. शेतकऱ्याने शहरात कणाला भेटायला यायचं झालं तर त्या शहरातल्या माणसांकरिता काहीतरी बांधून आणायचं. निदान दोन किलो ज्वारी तरी बांधून आणायची आणि शहरातला मनुष्य खेड्यात आलातर मग शहरातला मनुष्य काही शहरातनं एखादी गोष्ट बांधून नाही आणत. तो खेड्यात आल्यानंतर शेतकऱ्यालाच विचारतो, 'काही हुरडा-बिरडा आहे की नाही शेतावरती?' म्हणजे शेतकरी भेटायला गेला तरी त्यानेच घेऊन जायचं आणि कोणी त्याला भेटायला आलं तरी त्यानेच त्याची उठबस करायची. ही फार जुनी पद्धत आहे.
 जोतिबा फुल्यांनी याचं मोठं वर्णन केलं आहे. आता बळिराजा उठला आहे. हा भ्रष्टाचार आता संपणार आहे. फार जुन्या केसेस सोडून देऊ या; पण गेल्या सहा महिन्यांमध्ये ज्या ज्या शेतकऱ्याला एखादं काम करून घेण्याकरिता लाच द्यायला लागली असेल, त्यांनी शेतकरी संघटनेच्या ऑफिसमध्ये यायचं, कार्यकर्त्याला सांगायचं, पाच रुपयाच्या स्टँप पेपरवर लिहून द्यायचं की, "अमक्या अमक्या अधिकाऱ्याने माझ्याकडून काम केलं वा केलं नाही, तरी माझ्याकडनं इतके पैसे घेतले." मात्र प्रामाणिकपणानं लिहून द्या आणि खोटे कागद करू नका, त्याच्यात धोका आहे. कुणावरती सूड उगवायचा म्हणून खोटा कागद कराल तर बळिराजाच्या गळ्याला फास बसेल! सर्व कार्य करायचं इमानानं आणि शेतकरी संघटेनच्या कार्यकर्त्याकडे जायचं. मग कार्यकर्ते काय करतात? त्या अधिकाऱ्याकडे जाऊन ऑफिसात भेटतात आणि त्याला म्हणतात, "हे बघ तू लाच घेतली हे आम्हाला माहीत आहे, तू काही 'नाही' म्हणायचा प्रयत्न करू नको. चुकी झाली, तुझं नाव बाहेर फोडणार नाही. तुझी नोकरी जावी अशी आमची इच्छा नाही. पण हे पैसे तुला परत द्यायला लागतील. पैसे परत दिले, सध्या भांडण मिटलं" आणि अशा पाच-दहा केसेस झाल्या की, मग एक मोठी शेतकऱ्यांची सभा बोलवायची आणि त्या शेतकऱ्यांना बोलवायचं आणि जाहीर करायचं, 'अमुक तमुक गावचे अमुक अमुक शेतकरी यांनी म.रा.वि. मंडळाच्या अधिकाऱ्याला (नाव नाही सांगायचं) अडीच हजार रुपय उसने दिले होते त्या त्या अधिकाऱ्यांनी परत केले. ते आम्ही परत करतोत.'
 भ्रष्टाचाराच्या विरुद्धचे आंदोलन म्हणजे राजीव गांधीच्या बोफोर्सविरुद्ध नाही. उलट राजीव गांधींनी साठ कोटी रुपये खाल्ले असं म्हटलं तर, शहरातील पुष्कळ माणसं काय म्हणतात माहिताय, "खायचाच की हो, अहो, सबइन्स्पेक्टर जर महिन्याला दोन लाख खातो, तर प्रायमिनिस्टरने साठ कोटी नको खायला?" उलट लोकांना त्याविषयी सहानुभूती वाटते. हे आपल्याला भ्रष्टाचाराचे भूत खालपासून गाडून टाकायचं आहे आणि यामुळे नोकरशाहीला धक्का लागणार आहे.
 तुम्ही समजून घ्या, जातीयवादाचं भूत पसरविणाऱ्या लोकांना भ्रष्टाचार निपटून काढाल तर जगता येणार नाही. जे राजकारणी आपल्यावर अत्याचार करतात, भ्रष्टाचार त्यांचं खाद्य आहे. तुम्ही महाराष्ट्रामध्ये असं वातावरण तयार करून दाखवा की एकाही सरकारी नोकराला शेतकऱ्याकडनं लाच मागायची भीती वाटते. सगळ्या शेतकऱ्याकडून असं वातावरण तर होऊ द्या, काय फरक पडेल हो? आज जिथं जिथं जावं, ज्या ज्या कार्यालयात जावं तिथं शेतकरी वाकून वाकून आत जातो. हे आंदालन सहा एप्रिलला चालू झालं की, या गुढीपाडव्यापासून कोणत्याही कचेरीत जाताना प्रत्येक शेतकरी छातीवर बिल्लाआणि मान ताठ असा चालायला लागेल. बळिराजा निम्मा वर आलाच म्हणून समजा.
 त्याच्यानंतर दुसरा एक कार्यक्रम घ्यायचा महत्त्वाचा. याचा सगळा अर्थ तुम्ही समजून घ्या.
 जातीयवाद्यांविरुद्ध लढा द्यायचा आहे. पण हे जातीयवादी कठं असतात हो? साप जसं स्वतःची बिळं करीत नाही, उंदराच्या बिळात घुसतो तसंच जातीयवाद्यांचं आहे. मंदिरात ते तसे क्वचितच सापडतात. जातीयवादी जास्त वेळा दारूच्या अड्ड्यावर आणि मटक्याच्या रक्षणार्थ सापडतात.
 अनेक शेतकरी महिलांनी मला सांगितलं की, "दारूने अनेक शेतकरी परिवार उजाड केले, काही करा; पण गावातील दारू बंद झाली पाहिजे."
 गावागावामध्ये दारूचे अड्डे, महिलांनी निरोधने करून बंद पाडावीत. हे लक्षात घ्या, दारू पिणे न पिणे याकरिता हा कार्यक्रम नाही. कणाची कदाचित चुकीची समजूत होईल. मग कशाकरिता करायचे? हे दारूचे अड्डे, दारूचे अड्डे नाहीत. ते पुढाऱ्यांचे आणि गुंडांचे, जातीयवाद्यांचे अड्डे आहेत. म्हणून त्यांना पहिल्यांदा बंद पाडायचं. आज बहुतेक आमदार विधानसभेमध्ये कशाकरिता भांडतात? तर बॅरिस्टर अंतुल्यांपासून सगळ्या मुख्यमंत्र्यांनी एक एक आमदाराच्या मागे दोन दोन, चार-चार गुत्ते काढून दिले. त्या गुत्त्याच्या पैशावर आमदार मिजास मारून राहिले. त्यांच्या गळ्याला हात घालायचा असेल तर तो गुत्ता उठता बसता बंद करा.
 दहा एप्रिलपासून मी स्वतः महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात जाणार आहे. आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिलांची आधिवेशने घेणार आहे. विद्यार्थ्यांची अधिवेशन घेणार आहे आणि शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहे. कशाकरिता? मे महिन्याची तयारी, आपली तयारी जय्यत पाहिजे. फौजेची तयारी जय्यत पाहिजे.
 तुम्हाला काय काय कामं सांगितली? घरी जायचं. गावं रंगवून घ्यायची. गावाच्या बाहेर बिल्ला लावायचा. पाटी लावून टाकायची 'जातीयवाद्यांना गावात प्रवेश नाही'. सहा एप्रिलपासून, पाडव्याच्या दिवसापासून भ्रष्टाचारविरोधी मोहीम चालू करा. एक मे पासून गावामध्ये, बाजारपेठेतल्या या गुत्त्यांना इतक्यात हात लावू नका, आपण थोडं नंतर बघू ते; पण बाजारपेठ नसलेली गावे आहेत. त्यांच्यातले गुत्ते आपल्याला पहिल्यांदा काढून टाकायचे आहेत आणि इथनं गेल्यानंतर एक गोष्ट महत्त्वाची करायची आहे, कर्जमुक्तीचे अर्ज भरा म्हणून मी सांगितलं 'तुम्ही भरले' पण पाच लाख भरले, मी दहा लाखाचा आकडा सांगितला होता. हे फार महत्त्वाचं आहे.
 महाराष्ट्र हे शेतकरी आंदोलनांचे अग्रेसर राज्य आहे. तसं कुठलं एखादं छोटं राज्य, बिहार ओरिसासारखं आकड्यामध्ये कमी पडलं तर चालेल, पण महाराष्ट्रातच आकड्यात कमी पडलं तर कसं काय भागल हो? मीठाचा मिठपणा कमी झाला तर त्याला कशानं खारट करायचं? महाराष्ट्राचा दहा लाख आकडा दिला तर त्याच्यावरून एकसुद्धा कमी होता कामा नये. झालेच तर पंधरा लाख झाले तरी चालतील. काम काही कठीण नाही. पाच लाख लोकांनी अर्ज भरले. दहा लाख अर्ज भरल्याखेरीज तुम्हाला यश मिळवून देण्याची गॅरंटी मी दिलेली नाही. हे लक्षात ठेवा!
 आपल्या घरी काही वेळा कार्ड येतात की नाही? वर लिहिलेलं असतं. जय संतोषी माँ प्रसन्न! वगैरे. आणि खाली लिहिलेलं असतं. हे कार्ड पोचताच आणखी सात लोकांना किंवा दहा लोकांना अशीच कार्ड लिहून पाठवा. नाहीतर तुमच्या पोराला काही आजार होईल. असं असतं की नाही कार्ड? तसंच आज तमच्या घरी कार्ड आलं आहे असं समजा. की निदान दोन माणसांचे कर्जमुक्ती अर्ज त्याला पटवून भरून घेतले नाही तर तुमची कर्जातून मुक्तता होण्याची शक्यता नाही. ताबडतोब कामाला लागा, एक मेच्या आधी महाराष्ट्रातील कर्जमुक्तीच्या अर्जाची संख्या दहा लाख झाली पाहिजे.
 आणि मग एवढी तयारी झाल्यानंतर आपण बळिराजाच्या पुनरुत्थानाच्या अखेरच्या लढाई करिता तयार होऊ. निवडणुकीत एक गोष्ट महत्त्वाची आहे. खरं म्हणजे मला खूपच आनंद झाला. अधिवेशनामध्ये एकामागोमाग एका कार्यकर्त्यानं काय सांगितले? या राजकारणाच्या चिखलामध्ये आम्हाला फार लडबडायला लावू नका. राज्यकर्ते! कशाला त्यांच्या स्तुत्या करायच्या? गेली बेचाळीस वर्षे यांनी शेतकऱ्यांना लुटलं आणि विरोधी पक्ष? असे कोणते शहाणे लागून गेले? असा कोणता विरोधी पक्ष आहे की ज्याने शेतकरी संघटनेला दुगाण्या झाडल्या नाहीत. असा कोणातच नाही. भारतीय जनता पार्टी शेतकरी संघटनेची कॉपी करून शेतकरी आंदोलनात फूट पाडायला पाहते. राजाराम बापूपासून ते पी.के.अण्णा पाटलापर्यंत आणि मृणाल गोऱ्यांपर्यंत सगळ्यांनी शेतकरी आंदोलनाला कधीना कधी विरोध केलेला आहे. शेतकरी कामगार पक्ष तर जाणून बुजून शेतकरी संघटनेला शत्रू नंबर एक म्हणतो. अधिवेशनातील कार्यकर्त्यांनी म्हटलं, "शरदराव, कृपा करा आणि आम्हाला विरोधी पक्षांचा प्रचार करण्याकरिता थकवू नका, दुसरं काही सांगा." ठीक आहे म्हटलं. शक्यतो तुम्हाला थकवणार नाही, कारण मला असं दिसतंय १९८९-९० ची लढाई कोणी जिंको कोणी हरो शेतकरी संघटनेने ही लढाई आधीच जिंकलेली आहे.
 सगळी वर्तमानपत्रं म्हणतात की, बहुतेक लोकसभेच्या जागा २८०-२६० अशा वाटल्या जातील. २८०-२६० म्हणजे काय हो? मग आता आपण सुरक्षित झालो. एकाच्या हाती चारशे जागा गेल्या, तर मग आपण धोक्यात आहोत. २८०-२६० वाटपात सामान्य, सज्जन, चांगला प्रामाणिक मनुष्य जगू शकतो. तेव्हा आपण जिंकलेलोच आहोत. पण लढायचं झालं तर काय करायचं? मलाही असं वाटतं, या विरोधी पक्ष आणि त्यांची ती रोजची भांडणं! आणि दिल्लीवरनं कोण काय बोलतो? आणि मद्रासमधनं कोण काय बोलतो? यांच्याकरिता धावायला खरंच माझंसुद्धा-मी लाऊडस्पिकर समोर उभा राहिलो तरीसुद्धा माझ्यातोंडातनं त्यांच्याकरिता भाषण करायला शब्द फटायचा नाही.
 त्यांच्यापेक्षा कार्यकर्त्यांनी सुचवलं ते असं. आपण जिल्हा परिषदेला ठरवलंच होतं की नाही, की महिला आघाडींनी आपलं शंभर टक्के महिलांचे पॅनेल उभं करावं आणि ते काम किती कठीण होतं? जवळपास दोन हजार उमेदवार शोधून काढायचे होते. हे काम तर फार सोपं. या अधिवेशनानं महिला आघाडीला विनंती केली की, तुम्ही काहीतरी करा. या विरोधकांकरिता धावण्यापेक्षा आमच्या आया-बहिणींनी जर ठरवलं तर, निरक्षर असू द्या, अंगठे बहाद्दर असू द्या पण निदान डांबरट तर नाही ना त्या? तुम्ही ज्या कोणत्या माय-बहिणीला उभं कराल त्यांच्याकरिता धावायचं म्हटलं तर आम्हाला निदान वाईट तर वाटणार नाही. समग्र महिला आघाडीला शेतकरी संघटनेने, विनंती केली, की तुम्ही ग्रामीण भागातल्या तेहतीस जागा लढवता का पाहा? त्यांनी जर का हो म्हटलं तर, मी आजच तुमच्या सगळ्यांच्या वतीने समग्र महिला आघाडीला शब्द देतो, की त्यांनी जर असा निर्णय घेतला तर, शेतकरी संघटनेचा प्रत्येक कार्यकर्ता महिला आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याकरिता जिवाचे रान करेल!
 बस. अधिवेशनाचे हे निर्णय आहेत. ही लढाई आहे. या लढाईतली एक एक चाल तुम्हाला मी सांगितली. गावावर बिल्ला आणि जातीयवाद्याला दर ठेवणं आणि पाटी लावणं, ही महत्त्वाची गोष्ट आहे. भ्रष्टाचारविरोधी आंदोलन पाडव्याला चालू करणं महत्त्वाची गोष्ट आहे. पुढाऱ्याला आणि जातीयवाद्याला चिमटा लावणारे हातभट्टी किंवा दारूचा गुत्ता आणि मटक्याचा अड्डा बंद करणे हे महत्त्वाचे काम आहे आणि त्याच्यानंतर निवडणूक धोरणाबाबत शेतकरी संघटनेचा जो काही आदेश येईल त्याचे पालन करणे. तो आदेश मी काही देणार नाही. तो आदेश देण्याकरिता रामचंद्र बापू पाटील, भास्करराव बोरावके आणि विजय जावंधिया यांची समिती नेमली आहे. यांना आम्ही सांगितले की पुन्हा आम्हाला घाणीमध्ये पाठवू नका. काहीतरी जे काम करताना आनंद वाटेल असं करा. हे या अधिवेशनाचे निर्णय आहेत.

शेतकरी संघटना तिसरे अधिवेशन नांदेड १२ मार्च १९८९.

(शेतकरी संघटक २१ मार्च १९८९)

◼◼