माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो.../अंगाराने कार्य केले आता ज्योत हवी
अंगाराने कार्य केले आता ज्योत हवी
पण मागं वळून पाहता मला असं वाटतं, की गेल्या तेरा चौदा वर्षांमध्ये मी फार भाग्यशाली राहिलो आहे. व्यक्तिगत पातळीवर खासगी आयुष्यात तसेच संघटनेच्या आंदोलनामध्ये अनेक दुःखदायक गोष्टी घडल्या आहेत, कित्येक सहकारी रागावले, कित्येक नाराज झाले आणि त्याच्या उलट गोळीबारामध्ये ज्यांच्या घरची कर्ती माणसंसुद्धा निघून गेली. त्या घरच्या माणसांनीसुद्धा एका शब्दानं कुठं राग, दुःख व्यक्त न करता प्रेम आणि सहानुभूती व्यक्त केली. असे चित्रविचित्र अनुभव गेल्या या तेरा चौदा वर्षांत मला आलेले आहेत; पण माझा जो काही 'खर्च झाला तो केव्हाच, पहिल्या दोन वर्षांतच भरून निघाला.
आंदोलन सुरू झाल्यानंतर दोन वर्षांनी मला कुणीतरी विचारलं होतं की आता या पुढचा तुमचा कार्यक्रम काय? त्यावेळी मी म्हटलं होतं की, "हे आंदोलन किंवा ही संघटना चालू होताना मला असं करण्याकरता दहाएक वर्ष लागतील; पण दोनएक वर्षांमध्येच महाराष्ट्रामध्ये संघटना तयार झाली. गावोगाव संघटना गेली नसेल, सगळ्या तालुक्यांत गेली नसेल; पण संघटनेचा विचार महाराष्ट्रभर गेला; मला या प्रयोगातून आयुष्यात जे काही मिळवायचं होते ते मिळून गेलं. आता याच्यापुढे जे काही मिळवायचं आहे ते केवळ 'बोनस' म्हणून मिळणार आहे. माझा जो काही 'खर्च झाला होता तो केव्हाच, दोन वर्षातच 'भरून' निघाला."
त्याही पलीकडे जाऊन मला एका गोष्टीची फार धन्यता वाटते. १९८० मध्ये शेतकरी आंदोलनाचं वातावरण तयार झालं होतं. ही गोष्ट खरी. उत्पादन वाढवल्यानंसुद्धा तोटाच होतो. अशी परिस्थिती त्यावेळी निर्माण झाली. शेतकरी उठावाची अशी आर्थिक व राजकीय परिस्थिती देशात तयार झाली होती. या परिस्थितीत शेतकऱ्यांचं नेतृत्व कुणाकडं जाईल, संभाव्य शेतकरी आंदोलनाचं नेतृत्व कुणाकडे जाईल, असा जर प्रश्न विचारला गेला असता तर अशा व्यक्तीच्या अंगी असाव्या लागणाऱ्या गुणांची यादी कशी झाली असती? शेतकरी पाहिजे, शेतकऱ्याचा मुलगा पाहिजे, शेतीचा अनुभव पाहिजे, चांगलं मराठी बोलणारा पाहिजे, अमक्या जातीचा पाहिजे..., अशी जी यादी झाली असती त्या यादीत जे जे काही गुण घातले गेले असते त्यातला एकही गुण नसलेला मी. त्या माझ्या डोक्यावर ही जबाबदारी आली आणि ती निभावत असता शेतकऱ्यांनी मला अफाट प्रेम दिलं याबद्दल मला धन्यता वाटते.
त्याहूनही जास्त धन्य धन्य जर मला कधी वाटत असेल तर हा विचार करताना की शेतकऱ्यांचं तर आंदोलन उभं राहिलं, संघटना राहिली; पण त्याचबरोबर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या स्त्रियांमध्ये जी काही जागृती शेतकरी संघटनेच्या निमित्ताने आज घडून आली त्याला माझाही थोडाफार हातभार लागला.
यातून हाती काय आलं? शेतीमालाला भाव आला? नाही. शेतीमालाचा भाव म्हणजे काही घरी यायचा मिठाईचा डबा नाही! उद्या समजा शेतीमालाचा भाव घरी आला तरी तो विनासायास कायमचाच आपल्याला मिळत राहील अशी परिस्थिती कधीही येणार नाही. डोळ्यात तेल घालून सतत जागरुक राहाणं ही स्वातंत्र्याची किमत आहे. ETERNAL VIGILENCE IS THE PRICE OF FREEDOM. जर तुम्ही असं म्हणालात की आता मी स्वतंत्र झालो, आता थोडा आराम करतो तर दुसऱ्या क्षणाला तुमच्या हातातलं स्वातंत्र्य निघून जाईल. शेतीमालाचा भाव ही काही फक्त एकदाच साध्य करायची गोष्ट नाही. शेतीमालाचा भाव हा शेतकरी स्वतंत्र असल्याचा फक्त झेंडा आहे. तो झेंडा तुम्हाला सांभाळायचा असेल तर आज शेतीमालाचा भाव मिळाला म्हणून जर तुम्ही झोपी गेलात तर तो दुसऱ्या क्षणाला तुमच्या हातून गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सतत जागरुकता ठेवणं हे आवश्यक आहे.
शेतीमालाला रास्त भाव मिळाला तरी शेतकरी आंदोलनामुळे शेतकऱ्यांच्या खिशात किती रुपये जास्त आले याचा हिशोब होईल तेव्हा होवो; पण केवळ कर्जमुक्तीच्या निमित्तानेसुद्धा, आपण कितीही म्हटलं की ही कर्जमुक्ती अपुरी आहे, ज्यांना फायदा मिळाला पाहिजे होता त्यांना मिळाला नाही तरी सगळ्या देशातील शेतकऱ्यांकरिता जवळजवळ ४,००० कोटी रुपयांची कर्जमुक्ती जाहीर करण्यात आली, ही सत्यस्थिती आहे आणि एवढी मोठी मागणी मान्य झाल्याचं, जगातील हे पहिलं उदाहरण असावं; पण किती हजार कोटी रुपये मिळाले याचा हिशोब करून या चळवळीचं मोजमाप होणार नाही. शेतकऱ्यांची एक संघटना तयार झाली आणि त्या संघटनेमुळे शेतकऱ्यांना आपल्या विशिष्ट दुखण्याची जाणीव झाली. आपलं दुःखं कशातून उद्भवतात यासंबंधी काही अंदाज आला एवढंच नव्हे तर जाती, धर्म अशा सर्व हीन कल्पना, क्षुद्र कल्पना बाजूला टाकून शेतकऱ्यांची मुलं एकत्र येऊ लागली ही माझ्या दृष्टीनं हजारो कोटी रुपयांहून फार मोठी गोष्ट आहे; उदाहरणार्थ, या प्रशिक्षण शिबिरातसुद्धा तुम्ही काय शिकलात, तुम्हाला काय समजलं, काय नाही यापेक्षाही वेगवेगळ्या तालुक्या-जिल्ह्यातली माणसं केवळ शेतकऱ्यांच्या कामाकरता एकत्र येतात, एकत्र बसतात ही गोष्टच मुळामध्ये फार मोठी गोष्ट आहे; पूर्वी कधी घडली नाही अशी आहे. केवळ शेतकरी संघटनेने घडवून आणलेली ही गोष्ट आहे.
एकदा प्रश्न समजला की त्याचं उत्तर मिळवणं फारसं कठीण नसतं. प्रश्नच समजला नाही तर काय उत्तर द्यायचं. या गोंधळात काहीतरी गिचमिड लिहिलं जातं. "हिंदुस्थानला स्वातंत्र्य पाहिजे." ही कल्पना केव्हा मान्य झाली? १९३० सालापर्यंत ब्रिटिश साम्राज्यातच राहून बादशहाच्या अंमलाखालीच 'स्वसत्ताक स्थान' (DOMINIAN STATUS) मिळवावं अशी कल्पना होती. संपूर्ण स्वातंत्र्याची कल्पना १९३० मध्ये मान्य झाली आणि त्यानंतर अवघ्या १७ वर्षांत स्वातंत्र्य मिळालं. त्याचप्रमाणं १० वर्षांपूर्वी शेतकऱ्यांचा एक विषय आपण मांडला, ज्यावेळे आधी त्या विषयाला मान्यता नव्हती त्यावेळी मांडला आणि आज दहा वर्षांनंतर त्या विषयाला आणि त्या अनुषंगाने मांडलेल्या विचारसरणीला देशभर मान्यता मिळाली ही काही लहानसहान गोष्ट नाही; पण म्हणून, दहा वर्षांमध्ये यशस्वी झालेल्या या कार्यक्रमाबद्दल निर्माण झालेल्या श्रद्धेमुळे यापुढेसुद्धा तोच कार्यक्रम एखाद्या रूढीप्रमाणे आपण पाळत जायचं आहे असं म्हटलं तर 'शेतकरी संघटने'ला मोठा घोका निर्माण होतो. महात्मा गांधीइतका कार्यक्रमात क्रांतिकारी असलेला दुसरा कुणी मनुष्य नाही; पण स्वातंत्र्य आल्यानंतर गांधीवादाचा नवा अर्थ काय हे समजण्याची कुवत नसलेले शिष्य मिळाल्यामुळे त्यांचे ते शिष्य पंचा नेसण्यामध्ये आणि चरखा फिरवण्यामध्येच धन्यता मानू लागले आणि तिथंच महात्माजींचा पराभव झाला.
आपण प्रत्येकवेळी स्वच्छ, नवा, ताजा टवटवीत विचार केला हे शेतकरी संघटनेचे आजपर्यंतचे वैशिष्ट्य आहे, वैभव आहे. परवा असं असं केलं होतं. म्हणून आजही आपण तसंच केलं पहिजे. असं आपण कधी मानलं नाही. प्रशिक्षण असो, शेतकरी संघटक असो, कार्यक्रम असोत ही सगळी साधनं आहेत; मुळातली उद्दिष्टं वेगळी आहेत. आता काय करावं समजत नाही म्हणून जर का आपण कालपरवाप्रमाणेच "चरखे फिरवत सूत कातत" राहिलो तर त्यामुळे संघटनेच्या दहा वर्षांच्या कीर्तीलासुद्धा धक्का लागण्याची शक्यता आहे.
सतत जागृती, सतत सतर्कता हा शेतकरी संघटनेच्या कार्यपद्धतीमधील आत्मा आहे. संघटनेच्या सटाणा अधिवेशनात आंदोलन पुढं कसं जातं हे स्पष्ट करण्यासाठी मी एक उदाहरण दिलं होतं. डोंगराचा एखादा कडा किंवा कपार चढताना दोन हात आणि दोन पाय या चार अवयवांपैकी तीन पक्के रोवून ठेवायचे आणि चौथ्या अवयवाने, मग तो हात असो, पाय असो, थोडं अजून पुढं जाता येईल अशी एखादी जागा पकडायला मिळते आहे का हे शोधत राहावे लागते. अशी जागा सापडली म्हणजे तेवढंच वर चढून जायचं. पुन्हा दोन हात, दोन पाय यापैकी तीन गोष्टी पक्क्या रोवून चौथ्या अवयवाने आणखी वर जाता येईल अशा जागेचा शोध घेत राहायचे. आंदोलनाची पद्धतीही तशीच असायला हवी अशी मांडणी मी त्यावेळी केली आणि अशी कपार चढत चढत गेल्या दहा वर्षांत आपण बरंच वर चढून आलो आहोत.
मला वाटतं शेतकऱ्यांच्या समस्येबाबत ज्याला चमत्कार म्हणावं असं काम करण्यात आपण यशस्वी झालो आहोत; पण चमत्कार करून दाखवला आहे असे म्हणून जर का आपण पुढच्या प्रश्नांकडे स्वच्छ, ताजा टवटवीत विचार न करता, गेली दहा वर्षे चांगलं चाललं म्हणून पुढेही दहा वर्षे तोच कार्यक्रम आखून घेतला तर या कड्यावरून कोसळण्याचा फार मोठा धोका आहे. हल्ली शिबिरांमध्ये मी फार कमी वेळ बोलतो, बोललो, तरी फक्त प्रश्नच उभे करतो.
तेरा वर्षांपूर्वी याच जागी, याच अंगारमळ्यामध्ये अशाच तहेच्या परिस्थितीमध्ये एक पहाड चढून आल्यानंतर दुसरा पहाड चढण्यापूर्वी नकाशा करण्याच्या कामाची मी सुरुवात केली होती. त्यावेळी जमेची एक चांगली गोष्ट होती, की स्वित्झर्लंडमधलं माझं जे काही काम होतं त्याचे सगळे पूल तोडून, त्याच्याशी काहीही संबंध न ठेवता अगदी मोकळेपणाने, स्वतंत्रपणाने इथल्या प्रयोगाला मी सुरुवात केली. त्यावेळी चिंता एकच होती. ती म्हणजे ग्रामीण भागचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न आपल्याला समजले आहेत असं म्हणणारी जी काही हजार दोन हजार माणसं या देशात फिरत होती त्यांच्यापासून स्वतःचं संरक्षण करणे आणि आंबेठाणच्या अंगारमळ्यात जो काही प्रथमपुरुषी अनुभव येईल त्याच अनुभवापासून शिकणे. दुसऱ्यांच्या अनुभवांच्या आणि विचारांच्या काजळीने आपला विचार मलिन होऊ नये याची काळजी मला घ्यायची होती. ग्रामीण भागाचा प्रश्न आपल्याला संपूर्ण समजला अशी खात्री असलेली बरीच माणसं इतर शहराप्रमाणे पुण्यातही बरीच होती. त्यांच्यापासून दूर राहाणे एवढीच मुख्य काळजी त्यावेळी मला घ्यावी लागत होती.
यावेळी परिस्थिती बरीच वेगळी आहे. यावेळी शेतकरी संघटना आणि तिचं गेल्या दहा वर्षांचं आंदोलन, तिचं दहा वर्षांचं यश यांचं गाठोडं घेऊन पुढची कपार, पुढचा पहाड मी चढायला निघालो आहे. शेतकरी संघटना पूर्णपणे बाजूला ठेवणे तर शक्य नाही. एकीकडे संघटनेची फौज वेगवेगळ्या संकटामधून, जातीवाद्यांच्या हल्ल्यामधून शक्य तितकी सांभाळून ठेवायची आहे. आज आपण जातीयवाद्यांचा हल्ला परतवून लावू शकलो म्हणून जर त्याच जागी बसून राहिलो तर उद्या, परवा, त्यानंतरच्या एका दिवशी कोणत्या ना कोणत्या हल्ल्यात संघटना नामशेष होईल यात काही शंका नाही. कारण संघटना काय किंवा माणूस काय चालता फक्त भला.' जोपर्यंत तुम्ही पुढे जाता तोपर्यंत तुम्ही टिकून राहू शकता. एका जागीच उभं राहून जे काही पूर्वी करत होतो तेच करत राहिलो तर संपून जाऊ. थांबला तो संपला.
शेतकरी आंदोलनाची पुढील वाटचाल सुरू करायची तर नवीन मार्ग कोणता असावा हा प्रश्न सोडवायला घेताना मला असं वाटतं की तेरा चौदा वर्षांनंतर पुन्हा एकदा मी 'अंगारमळ्याच्या अवस्थेत आलो आहे. गेल्या तेरा चौदा वर्षांत सर्वांना सांगितलेली, व्याख्यानांत मांडलेली, पुस्तकांत लिहिलेली अशी कोणतीच उत्तरं मी मानत नाही. त्या सगळ्या पुस्तकांवर, विचारांवर काट मारून दहा वर्षांनंतर बदललेल्या परिस्थितीत त्यांची आणखी व्यापक उत्तरं शोधण्याच्या प्रयत्नात मी आहे. अंगारमळ्याचा प्रयोग सुरू करताना त्याकाळी जसं मी ग्रामीण भागाच्या तज्ज्ञांना भेटलो नाही तसंच नवीन विचारांचा मार्ग तयार करताना जुन्या विचारांच्या पठडीशी एका ठराविक मर्यादेपलीकडे संबंध ठेवणे शक्य नाही. एक मोठं शिल्प तयार करायचं आहे, पुनः पुन्हा जर का छोट्या छोट्या शाडूच्या मूर्तीना हात लावू लागलो तर त्या महाशिल्पामध्येसुद्धा या छोट्या छोट्या मूर्तीच्या ठराविकच रेखा यायला लागतील. हा धोका टाळण्याची आवश्यकता आहे.
नवीन प्रश्न काय आहे? आजपर्यंत आपण स्वतःला अर्थवादी आंदोलन म्हटलं; पण अर्थवादी आंदोलनाचं ध्येय आणि अर्थवादी आंदोलनाची साधनं यांच्यामध्ये एक संघर्ष होता. आपण म्हटलं अर्थवादी आंदोलनन पण आमच्या कार्यकर्त्यांनी मात्र केवळ निःस्वार्थ भावनेने घरादारावर निखारे ठेवून बाहेर पडावं आणि केवळ त्यागातून शेतकरी संघटना तयार करावी असा अर्थवादाशी विसंगत असलेला कार्यक्रम आपण घेतला. जे अर्थवादी नव्हते ते काम उभं राहण्याकरता कार्यकर्त्याला मूठभर धान्याची गरज असते हे मानत होते आणि त्या कार्यकर्त्यांची सोय करत होते. आम्ही अन्नमूलाधाराचं तत्त्वज्ञान मांडत होतो; पण कार्यकर्त्यांनी मात्र अन्नमूलाधारसुद्धा न ठेवता संघटनेच्या कामाला लागावं अशी काहीतरी एक अपेक्षा ठेवली होती. हा संघर्ष कशा तऱ्हेने सोडवता येईल हे मला आज स्पष्ट दिसत आहे.सोडवणं आवश्यक आहे. आजचा नवीन प्रश्न हा आहे.
गेली दहा वर्षे हा संघर्ष आवश्यक होता हेही मी मानतो. पहिली ठिणगी पाडायची असेल तर गारगोटीच्या घासण्याची आवश्यकता असतेच. एक नवीन विचार मांडायचा होता तेव्हा गारगोटीच्या घासण्याची अशी आवश्यकता होतीच; पण गारगोटीच्या घासण्यातूनच कायमची अशी एक ज्योत तयार होईल अशी अपेक्षा ठेवणंसुद्धा चुकीचं आहे. ठिणगी पाडायचं काम झालं आता वातीचं आणि तेलाचं काम आवश्यक झालेलं आहे. यावेळी पुन्हा गारगोट्या घासून भागायचं नाही. त्याकरिता आता नवीन दिवा तयार करण्याची आवश्यकता आहे आणि तो कसा बनवायचा हा आपल्यापुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे.
निराशा माझीही झाली आहे. चारपाच वर्षे क्षुद्रवाद विरुद्ध अर्थवाद ही भूमिका मांडत असताना आपण जातीयवादाचा प्रतिकार, त्याला विरोध प्रखरपणे करू शकलो असतो असं वाटत होतं; पण ते शक्य झालं नाही; पण गेल्या ५५ वर्षांच्या आयुष्यात मी आणखी एक गोष्ट शिकलो की जेव्हा आपली निराशा होते, जेव्हा जेव्हा आपण हरतो आणि आपल्याला अपयश येतं तेव्हा तेव्हा तेच अपयश, ती निराशा त्याच्या पुढच्या फार मोठ्या यशाची पायरी ठरते. हे काही केवळ भाषालंकार म्हणून वापरायचं विधान नाही. ज्याला, अपयश का मिळालं याची परीक्षा करून बघण्याची ताकद आहे त्या माणसाच्या बाबतीत अपयश हे त्याला मिळालेलं वरदान आहे.
आणि तसं मांडलं तर शेवटच्या क्रांत्या, शेवटचा बदल, शेतीमालाला भाव मिळवून घेणे, शेतकरी मनुष्य म्हणून जगू शकणं, त्याला स्वातंत्र्य मिळणं इतका मोठा बदल ज्या उत्पातांतून घडून आला ते उत्पात कोणीही ठरविलेल्या आराखड्यांप्रमाणे कधीही झाले नाहीत. भांडवलशाहीवरचा हल्ला हा ज्या देशांत भांडवलशाही प्रगत झाली होती. त्या देशात म्हणजे जर्मनी किंवा इंग्लंडमध्ये होईल अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मार्क्सवादी म्हणवली गेलेली क्रांती झाली रशियामध्ये आणि तीही काही, कामगारांनी उठून केली असं नाही. पहिल्या महायुद्धात रशियाला माघार घ्यावी लागली, पगारसुद्धा दिले न गेल्याने रशियन सैन्याची परिस्थिती अतिशय वाईट झाली असे पगारसुद्धा न मिळालेले सैनिक जेव्हा मॉस्कोमध्ये आले तेव्हा त्यांनी केलेल्या उठावातून तथाकथित मार्क्सवादी क्रांतीचा उगम झाला. सन् यत् सेन नंतर चीनमध्ये कम्युनिस्ट पक्षाने अनेक वर्षे क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न केला; पण जेव्हा जपानने चीनवर हल्ला केला त्यावेळी सगळी कम्युनिस्ट चळवळ थांबवून माओत्सेतुंगने राष्ट्रीय मध्यप्रवाहाबरोबर राहून जपान्यांविरुद्ध लढण्याची भूमिका घेतली. जपान्यांनी केलेल्या या हल्ल्यातून चिनी क्रांतीचा पाया घातला गेला.
क्रांती ही काही सरळ येत नाही. ती आकाशातून पडणाऱ्या विजेसारखी लवलवत वेड्यावाकड्या मार्गाने येत असते. आज देशामध्ये काश्मीरमध्ये काय घडते आहे, पंजाबमध्ये काय होते आहे याची आपल्याला विवंचना लागलेली आहे; देशातल्या देशात जातीजातींमध्ये जी काही भांडणं लागली आहेत त्यामुळे देश फुटतो का तुटतो अशी चिंता लागून राहिली आहे. अशा या अत्यंत निराशेच्या क्षणी एक शक्यता आहे, की शेतकरीक्रांतीची सगळ्यात मोठी संधी आपल्यापुढे येईल. ही संधी कोणत्या मार्गाने येईल, आजच्या या उत्पातांतून येईल की आणखी काही दुसरे उत्पात आपल्याला सहन करावे लागतील. कितीवेळा निराशा सहन करावी लागेल आणि किती वेळा अडचणींतून मार्ग काढून पुढे जावे लागेल हे काही सांगता येणार नाही.
पण जेव्हा उत्पादकांकडून त्यांनी तयार केलेल्या बचती हिरावून घेतल्या जाणार नाहीत आणि निसर्गामधला विकासाचा जो काही क्रम आहे तो उलटवला न जाता त्या निसर्गक्रमाप्रमाणे माणसाला माणूस म्हणून जगता येईल तेव्हाच इतिहासामध्ये जीवनशास्त्रीय उत्क्रांतीचा आणि सामाजिक उत्क्रांतीचा थोपवला गेलेला प्रवाह पुन्हा मोकळेपणाने चालू होईल. या कामात आपला सगळ्यांचा हातभार लागलेला असेल आणि हा प्रवाह मोकळा होईल तेव्हा आपण सगळे कार्यकर्ते हजर असू अशी आशा करूया.
(कृषी अर्थप्रबोधिनी प्रशिक्षण शिबीर ३ सप्टेंबर १९९०)
(शेतकरी संघटक २१ सप्टेंबर १९९०)
◼◼