रुणझुणत्या पाखरा/जणू देखणी कविताच ती... नेहमी मनात फिरणारी!

 चीनच्या जमिनीवर पाय ठेवले नि आमच्या आवाजातला जोश वाढला. घोषणांची नारेबाजी घुमवीत आम्ही चीनच्या शिस्तीत वाढलेल्या चौकटबंद विमानतळालाही गोड धक्का दिला. पिवळट गोऱ्या, मुखवटेवजा चेहऱ्यांच्या डोळ्यातून उत्सुकता... हसरेपणा... डोकावू लागला.
 'इंडो?...इंडू? तुम्ही भारतातल्या का? ते हसरे डोळे विचारीत. चीनमधली जणू अख्खी तरूणाई आमचं स्वागत करायला सज्ज झाली होते. दीड तासाचा बसप्रवास करून आम्ही हुॲरोच्या स्वागतकक्षाजवळ उतरलो. संध्याकाळची वेळ. भव्य रस्ते. हिरव्यागार उंचच उंच झाडांनी आणि मंदप्रकाशी दिव्यांनी स्वागत करणारे. जिकडे तिकडे रंगी बेरंगी झुळझुळते थवे. गोरे... पिवळे... सावळे... काळे गुलाबी रंग एकमेकात मिसळणारे. अप्रतिम निवासव्यवस्थेची सुनिश्चिती यांची कागदपत्रे होतीच. नोंदणी क्रमांकाचा शेवटचा आकडा पाहून त्या त्या नोंदणी कक्षापुढच्या ओळीत उभे राहण्याची सूचना दिली जात होते. आणि अक्षरश: अवघ्या काही मिनिटात आमची व्यवस्था केलेल्या ठिकाणचा पत्ता, आमचे नोंदणी 'मंगळसूत्र' जे आम्ही लगेच गळ्यात अडकवले आणि मार्गदर्शक सूचना पत्रके इत्यादींनी भरलेली सुरेख पिशवी घेऊन इमारतीच्या बाहेर पडलो. खिशाला परवडेल अशा सर्वात स्वस्तातल्या जागेत राहण्याचे आम्ही ठरवले होते. तिथेही आश्चर्याचा सुखद धक्का. तिथे डॉ. रूपा शहा आधीच पोचली होती. चक्क तळमजल्यावरचा ब्लॉक हातात घेऊन टाकला होता. मी आपली सहामजले चढण्याची तयारी पूर्णपणे करून आल्याने टुणकन उडीच मारली. प्रत्येकीला नेमकेपणाने तयार केलेली साधी कॉट, स्वच्छ अंथरूण, पांघरूण. एक टॉवेल, सपाता टुथब्रश... छोटा टॉवेल यांची सुरेखशी भेट. चार खोल्यात आम्ही पाचजणी. चोवीस तास गरम नि गार पाण्याचा फवारा. सर्वात स्वस्तातली म्हणजे बारा दिवसांचे ८५० युआन... सुमारे साडेतीनहजार रुपये... अशी 'पंचतारांकित'सोय झाली होती. आमचं रहाण्याचे ठिकाण परिषदेच्या इमारतीपासून सुमारे मैलभर दूर असेल. ३० ऑगस्टला बीजिंगच्या अवाढव्य क्रीडासंकुलात परिषदेचा उद्घाटन समारंभ होता. २९ चा दिवस इकडे तिकडे भटकण्यासाठी आमच्या हातात होता.
 २९ च्या सकाळी रात्री बसमधून अंदाजलेल्या रस्त्यावरून मुख्य स्थळाकडे चालत निघालो. मध्यात मोटारींचा रस्ता. दोन-तीन गाड्या समोरासमोरून ऐसपैस जाऊ शकतील एवढा. कॅनडा, अमेरिका किंवा जर्मनीमधले मोटारीचे रस्ते प्रचंड. एका दिशेने चार नि उलट्या दिशेने चार अशा मोटारी ऐसपैस धावतील तेवढेच मोठे रस्ते सायकलवाल्यांसाठी होते. त्यांच्या पलीकडे चालणाऱ्यांसाठीचा निरूंद रस्ता. हे सगळे रस्ते गुलाब फुलांच्या झुडपांनी आणि सूचिपर्णी जातीच्या वृक्षांनी आखलेले. आम्ही चौघी सायकलरस्ता अडवून गप्पाटप्पा मारीत चाललेलो. समोरून येणाऱ्या सायकलवाल्यांची काहीशी रूखी...रूखी नजर आधी लक्षात नाही आली नि मग एकदम दिवा लागला की आम्ही सायकलरस्त्यावर आक्रमण केलंय. दुसऱ्याक्षणी चीनच्या शिस्तीत फुटपाथवरून जायला लागलो. रस्त्याचे अंदाज बऱ्याचदा हुकतात, आम्ही पण चुकलो. नको तिथे वळलो. मग विचारणं...अजिजीकरणं आलं. पण इथे तीही पंचाईत. भाषा हे संवादाचं माध्यम असते. ते हरवले तर आपण चक्क हरवतो. याचा पहिला अनुभव. सामान्य चिनी माणूस इंग्रजीतला अ की ठ जाणत नाही. मग उपयोगी पडते ती खुणेची भाषा. पण तीही कुणाला समजेना. गळ्यातले परिषदेचे मंगळसुत्र काढून दाखवले तेही कोणाला समजेना. मग मात्र वैतागलो. इथल्या सुटाबुटातल्या दुकानातल्या माणसालाही या परिषदेचा पत्ता असू नये? आता मात्र चीनची भिंत दिसायला लागली. इतक्यात एका हॉस्पिटल सारख्या इमारतीच्या दरवाजातून बाहेर पडलेल्या काही विशिष्ट पोषाखातल्या स्त्रिया दिसल्या. मग तिथे धावलो. त्यातल्या एकीला चुटपुटू इंग्रजी येत होते. चायनी इंग्रजीच्या जंगलातून वाट काढीत चार पावले पुढे जाता आले. पण पुन्हा तिथंही अडकलो. तेवढयात दोन साऊथ अफ्रिकेच्या चुकलेल्या अवाढव्य बायका आम्हाला पाहून धावत आल्या. चारच्या आम्ही सहा झालो. मग पुन्हा पुढे पुढे चालत राहणे आणि अचानक समोरच्या दिशेने बायकांची धावती गर्दी दिसली. कळशी काखेतच होती. आम्ही स्वागत कक्षाच्या अंगणात पोहचलो होतो.
 ३० तारखेपासून प्रत्येक निवास्थानापासून दर दहा मिनिटांनी येण्या-जाण्यासाठी बसची सोय केली होती. ह्युॲरो ते बीजिंगपर्यंत १५ दिवस येण्याजाण्यासाठी एक खास सवलत देणारे १० डॉलरचे तिकीट आम्ही खरीदले होते.
 या चौथ्या जागतिक महिला परिषदेसाठी १९० देशातून तेहतीस हजार बायका, मोजके पुरूष प्रतिनिधी म्हणून आले होते. नैराबी परिषदेपेक्षा सहा पटीनं मोठा समुदाय जमला होता. ३० तारखेच्या सायंकाळी बीजिंगच्या अवाढव्य क्रीडा संकुलाच्या प्रांगणात उद्घाटन समारंभ होता. प्रत्येकीच्या नावाची वेगळी निमंत्रण पत्रिका. तिच्यावर तुम्ही कोणत्या दरवाज्यातून आत जायचे त्याचीही सूचना दिलेली. कोणत्या क्रमांकाच्या बसने जायचे नि यायचे त्याची खास सूचना दिलेली. १५ क्रमांकाच्या दरवाजातून मला आत जायचे होते. त्यापूर्वी क्ष-किरणांकीत तपासणी झालीच. साठ हजार प्रेक्षक बसण्याची सोय असलेले ते लंबगोलाकृती सभागृह विविध राष्ट्रीय पोषाखातील स्त्रियांनी आकंठ भरले होते. मणिपूरच्या छोबीदेवीनं प्रेमानं गळ्यात घातलेल्या मणीपुरी पोषाखात मीही कधीतरी अनुभवता येणार आगळा अनुभव घ्यायला उत्सुक होते.
 ...सारे नजरेचे आणि कानांचे पांग फेडणारे. आयरिन सॅटिॲगो यांनी उद्घाटन समारोहाची सुरूवात स्वागताने केली. त्या चौथ्या महिला परिषद : बीजिंग ९५ एन.जी.ओ. फोरमच्या कार्यकारी व्यवस्थापिका होत्या. स्वागत गीत शेकडो जणींच्या सुरील्या आवाजात... शेकडो वाद्यांच्या स्वरसंगमात न्हाऊन निघाले-
 Godess of joy is holy and pure
 And the good earth is bathed
 In the brilliance of sun
हे देवी आनंदिनी,
अससी निरंतर
पवित्र आणि केवळ निर्मल
निष्कलंकिनी
धरा नाहते
रविकिरणांच्या प्रज्ञाकिरणी...
आज या क्षणी!!
हात उभारून दोन्ही
आम्ही स्वागत करतो
भावस्वरांनी
कुंभ घेऊनी
दहा दिशातुन आल्या येथे
संवादी मैत्रिणी...
 स्वागताचे गीत, मग समूह नृत्य. त्यानंतर पीपल्स रिपब्लिक ऑफ चीनच्या स्टॅडींग कमिटी व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा आणि चीनच्या महिला फेडरेशनच्या अध्यक्षा चेन महुआ हिने सर्व महिलांचे स्वागत केले. त्यानंतर या परिषदेची सचिव गुर्टुड मोंगेला, दुसऱ्या परिषदेची सचिव ल्यूसी मेऊर, ८५ नैराबी परिषदेची संयोजिका डेमनिता बॅरो या पूर्व परिषदांच्या संयोजकांनी या परिषदेला हार्दिक शुभेच्छा दिल्या. बीजिंग, ९५ च्या कनव्हेनर... संयोजिका खोनसिंग सुपात्रा मसदिन हिने सर्वांचे स्वागत करून या परिषदेची भूमिका सांगून नांदीभाष्य केले आणि शांतीज्योत स्विकारली. त्यानंतर पॅट हॅम्फ्रीजने रचलेले
पुढे चला पुढे चला
न थांबता
न हुमसता
शांतीच्या दिशेने
चालत रहा चालत रहा...
 किप ऑन मुव्हिंग फॉरवर्ड हे गीत गायले गेले. हजारोंनी आपला स्वर त्यात मिसळला. एक प्रचंड फुगा... हेलीकॉप्टर, ज्यावर समता...प्रगती...शांती हे घोषशब्द झगमगत होते, अवकाशात फिरू लागले. विविध देशांतल्या...विविध धर्माच्या...विविध रंगांच्या...विविध वंशाच्या स्त्रिया. पण साऱ्याच स्त्रीत्वाने जोडलेल्या, साऱ्या जणींचे पाय जमिनीवर पण झेप मात्र मुक्त अवकाशाकडे. जागतिक समा... समृद्धी आणि शांतीकडे. याचं प्रतीक असलेली खूण जणू एक उत्फुल्ल विश्वकुसुम. प्रत्येकी पाकळी म्हणजे आकाशदिशेने झेपावणारी स्त्री. पण प्रत्येकीचा केन्द्रबिंदू स्त्रीत्वाचा. या प्रतीकाचा प्रचंड पडदा अनेकींनी नृत्य करीत प्रांगणात आणला आणि क्षणार्धात तो अवकाशात झेपावू लागला. टाळ्याच्या कडकडात उद्घाटन झालं. हजारो चिनी कलाकारांनी... तरूण, बाल, स्त्री, पुरूष कलाकारांनी, चिनी लोककलेवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमाचे नाव होते 'एनजीओज इन बीजिंग : ए चायनीज कल्चरल एक्स्ट्रॉ व्हॅगंझा' एनजीओ परिषदेला समर्पित केलेली डोळ्यांना विलक्षण आनंद देणारी, कल्पनारम्य, देखणी कविताच ती जणू! नेहमीच आठवणारी.