लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान/सोव्हिएट रशिया व नवचीन यांनी दिलेल्या आव्हानाचें स्वरूप
प्रकरण : १
सोव्हिएट रशिया व नवचीन
यांनी दिलेल्या आव्हानाचें स्वरूप
रशियामध्ये दण्डसत्ता स्थापन झाल्याला आता चाळीस वर्षे होऊन गेली. अगदी प्रारंभीं साम्यवादाचा म्हणजेच मानवजातीच्या प्रगतीचा एक नवा प्रयोग म्हणून जग तिच्याकडे कुतूहलाने व बऱ्याचशा औत्सुक्याने पाहात होतें. हा नवा प्रयोग चिरडून टाकण्याचा प्रयत्न प्रारंभी भांडवली राष्ट्रांनी केला होता. तरीसुद्धा त्या संकटाला तोंड देऊन रशियाने मार्गक्रमण केले म्हणून या भांडवली राष्ट्रांतले कर्तबगार लोकहि त्याचें कांहीसें कौतुक करूं लागले होते. पण पुढे लेनिन मृत्यु पावला व स्टॅलिनच्या हाती सत्ता गेली, आणि त्यानंतर या साम्यवादाच्या प्रयोगाला जें ओंगळ स्वरूप येऊ लागलें त्याने जगांतील विचारवंतांची मनें विटून गेली. हा साम्यवादाचा प्रयोग नसून ही एक नवी आसुरी साम्राज्यशाही आहे, झारशाहीपेक्षाहि ती शतपट क्रूर, हिंस्र व हिडीस आहे अशी टीका रशियन शासनावर होऊ लागली. सर्व बाजूंनी त्याची निर्भर्त्सना होऊं लागली. त्याच्यावर निंदेचा भडिमार होऊ लागला आणि हा साम्यवाद म्हणजे जगाची प्रगति नसून हिंस्र, नरभक्षक रानटीपणाचा तो अवतार आहे असें पाश्चात्त्य उदारमतवादी जगाने आपले मत त्याविषयी नमूद करून ठेविलें.
स्पुटनिकपूर्वी
पण इतके झाले तरी सोव्हिएट रशियांत स्थापित झालेल्या या साम्यवादी सत्तेची पाश्चात्य राष्ट्रांना अजून भीति वाटली नव्हती. अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी या बलाढ्य राष्ट्रांना आपल्या प्रबल सत्तांना ही साम्यवादी सत्ता म्हणजे एक आव्हान आहे असे कधी वाटलें नव्हतें. आव्हानाचा अंतिम अर्थ एकच असतो. लष्करी सामर्थ्यात आम्ही तुमची चितपट करू हाच तो अर्थ होय. तेव्हा आपल्यापेक्षा श्रेष्ठ लष्करी सामर्थ्य किंवा निदान तुल्यबल तरी लष्करी सामर्थ्य सोव्हिएट रशिया निर्माण करूं शकेल असें पाश्चात्य लोकसत्तांच्या मनांतहि कधी आलें नव्हतें. याचे कारण अगदी उघड होतें. लष्करी सामर्थ्य, युद्धसामर्थ्य याचा अर्थ पूर्वपिक्षा हल्ली फार निराळा होतो. रणांगणांतील शौर्यधैर्य, कांही लष्करी डावपेच, निष्ठावंत सैनिक एवढे मागे रणांगणांतील विजयांना पुरेसें असे. हल्ली तसें नाही. हल्ली लष्करी सामर्थ्य याचा अर्थ फार व्यापक असा झालेला आहे. सध्या युद्धाला पहिली अवश्य गोष्ट म्हणजे तोफा, विमानें, रणगाडे, अणुबाँब, प्रक्षेपणास्त्रे इ. अगदी अद्ययावत् शस्त्रसंभार आणि त्याने समृद्ध अशी यंत्रचलित सेना; पण हा शस्त्रसंभार सिद्ध करावयाचा म्हणजे राष्ट्राचे प्रचंड प्रमाणांत औद्योगीकरण झालेले असणें अवश्य असतें. पोलाद, कोळसा, पेट्रोल, वीज, तांबें, रबर इ. अनंत पदार्थ, नाना रसायनें, नाना उपकरणें व हें सर्व निर्माण करणारी महायंत्र हे औद्योगीकरणावांचून प्राप्त होणें अशक्य आहे. हे अनंत पदार्थ, ही रसायनें विज्ञानावांचून, शास्त्रज्ञानावांचून कशी प्राप्त होणार ? म्हणजे या औद्योगीकरणासाठी रसायन, पदार्थविज्ञान, गणित, भूगोल, खगोल, प्राणिशास्त्र इ. सर्व अर्वाचीन शास्त्रांचें अद्ययावत् ज्ञान असलेले विज्ञानवेत्ते राष्ट्राजवळ असले पाहिजेत. हें विज्ञानबळ सिद्ध व्हायचे तर त्या त्या शास्त्राच्या अध्ययन-अध्यापनाची उत्कृष्ट व्यवस्था असलेली, कार्यक्षम विद्यापीठें उभारली पाहिजेत. आइन्स्टाइन् किंवा एडवर्ड टेलरसारखा एखादा नामांकित शास्त्रज्ञ शिखरावर यायचा म्हणजे त्याच्या हाताखाली त्या शास्त्राचें ज्ञान असलेले हजारो दुय्यम शास्त्रज्ञ, अध्यापक व विद्यार्थी असणें अवश्य आहे. ते सर्व या विद्यापीठांतून तयार व्हावयाचे असतात. म्हणून विज्ञानाच्या अध्ययनाची उत्तम व्यवस्था युद्धसामर्थ्याला औद्योगीकरणाइतकीच आवश्यक असते. हा झाला प्रत्यक्ष साधनसामग्रीचा विचार पण या साधनसामग्रीमागे सुसंघटित असें अखिल राष्ट्र उभें पाहिजे. अर्वाचीन युद्ध हें सर्वगामी, सर्वव्यापी युद्ध असतें. राष्ट्रीय प्रपंचाचें एकहि अंग त्यांतून सुटू शकत नाही. राष्ट्रांतला प्रत्येक नागरिक स्त्रीपुरुष- बाल, तरुण, वृद्ध, सर्व- हा जणू युद्धांतला सैनिक असतो. तेव्हा राजकीय दृष्टीने प्रबुद्ध व राष्ट्रनिष्ठेने प्रेरित झालेला असा अखिल समाज या साधनसंभाराच्या मागे उभा असला तरच रणांगणांत विजय प्राप्त होण्याची शक्यता असते; आणि तो साधनसंभार व हा प्रबुद्ध समाज यांच्यामागे सर्व क्षेत्रांतले प्रभावी नेते ही अंतिम आवश्यकता असते. तत्त्ववेत्ते, राजकारणी, मुत्सद्दी, रणपंडित, अर्थवेत्ते, इतिहासपंडित, नियोजक, संघटक असे सर्व प्रकारचे सर्व क्षेत्रांतले कर्ते पुरुष हेच या सर्व सामर्थ्यांचा उत्कृष्ट विनियोग करून राष्ट्राला विजय प्राप्त करून देत असतात. हल्लीच्या युद्धांतले यश हे इतक्या विविध प्रकारच्या बलावर, या सर्वांगीण संपन्नतेवर अवलंबून असतें. सोव्हिएट रशिया किवा नवचीन यांसारख्या मानवी व्यक्तित्वाचे निर्दाळण करण्यांतच भूषण मानणाऱ्या, यमदण्डाने राज्य करणाऱ्या, अघोरी, जुलमी सत्तांना हीं विविध बलें, ही सर्वांगीण संपन्नता निर्माण करता येईल अशी पाश्चात्त्य लोकसत्तांना कल्पना नव्हती. कारण या सर्व संपन्नतेचें मूळ कारण व्यक्तिस्वातंत्र्य हें आहे; सर्व बंधनांतून मुक्त होऊन वाटेल त्या विषयांत अनिर्बंधपणें संचार करणाऱ्या मनालाच सृष्टीची गूढ उकलतात, अशी अकुठित बुद्धिच विज्ञान रहस्य आकळू शकते असा त्यांचा बुद्धिनिश्चय होता; आणि तें व्यक्तिस्वातंत्र्य सोव्हिएट रशियांत केवळ अभावानेच असल्यामुळे वर सांगितलेली षडंग बलें तेथे निर्माण होऊ शकतील असें कोणालाच वाटत नव्हतें.
दुसऱ्या महायुद्धांत सोव्हिएट रशियाचा जय झाला तरी वरील मतांत फारसा बदल करण्याचें कारण नाही असेंच पश्चिमेचें मत कायम होतें. एक तर ज्या जर्मनीवर रशियाने विजय मिळविला तो अनेक राष्ट्रांशी एकदम लढत होता. तेव्हा त्याचा पराभव झाला यांत कसलेच नवल नव्हतें. उलट त्याने इतकी वर्षे जगाची दमछाट केली हीच नवलाची गोष्ट होती. आणि दुसरें म्हणजे सोव्हिएट रशियाला विजय मिळाला तो पाश्यात्य राष्ट्रांनी त्याला जें अपरिमित साह्य केलें त्यामुळे मिळाला हे जगजाहीर होतें. अफाट शस्त्रसामग्री, विमानें, तोफा, रणगाडे, त्याचप्रमाणे प्रत्येक क्षेत्रांतले शास्त्रज्ञ व तंत्रज्ञ अमेरिकेने रशियाला पुरविले होते. आपल्या घरचें कुबेराचें भांडार खुलें करून अन्नधान्य, कपडालत्ता, वैद्यकीय उपकरणें, औषधे इ. अनेक प्रकारचें साहित्य अमेरिकेने रशियाकडून लुटविलें होतें. त्यामुळे जर्मनीवर त्याने विजय मिळविला हे त्याच्या सामर्थ्याचे द्योतक असें केव्हाच मानणें शक्य नव्हते आणि म्हणूनच ही दण्डसत्ता म्हणजे आपल्या लोकसत्तेला एक आव्हान आहे, तिच्याविषयी आपण चिंता बाळगली पाहिजे असें पश्चिमेकडच्या भांडवली राष्ट्रांना कधीच वाटले नाही. जर्मनीविषयी जो धसका त्यांच्या मनांत त्या काळांत होता, जी भीति होती आणि त्या राष्ट्रांतील मुत्सद्दयांच्या भाषणांतून हिटलरच्या अंमलाखाली जर्मनीच्या लष्करी बळाचा होत चाललेला विकास पाहून जी चिंता त्या वेळी व्यक्त होत असे तशा तऱ्हेची चिंता रशियाविषयी त्यांना कधी वाटली नव्हती. जर्मनी हा जरी दण्डांकित होता तरी आधीच्या शंभर वर्षांत तेथे हिटलरसारखी सर्वगामी दण्डसत्ता नव्हती. एक राजकरण सोडले तर इतर क्षेत्रांत तेथे व्यक्तीला संपूर्ण स्वातंत्र्य होते. त्यामुळे तेथे अद्ययावत् शस्त्रास्त्रे, औद्योगीकरण, शास्त्रज्ञान, शिक्षण, संघटित समाज व कर्ते नेतृत्व हे षडंग बल सुसज्ज होणे सहज आहे हे पाश्चात्य लोकसत्तांना दिसत होते; पण तसा संभव सोव्हिएट रशियांत नसल्यामुळे त्या त्याच्याविषयी निश्चिंत होत्या.
आव्हान
१९५० नंतर पाश्चात्य राष्ट्रांच्या या मनाला हळूहळू धक्का बसूं लागला; आणि १९९३ साली रशियाने आकाशांत बालचंद्र सोडण्यांत यश मिळविले तेव्हा मात्र पाश्चात्य देशा खडबडून जागे झाले, व सोव्हिएट रशिया व नवोदित चीन या सत्तांची दखल आपण घेतली पाहिजे, या सत्ता म्हणजे जगांतल्या लोकशाहीवर मोठे संकट आहे, यांची आपण उपेक्षा केली तर हळूहळू साम्यवादी तत्त्वज्ञान व तज्जन्य रानटी संस्कृति ही जगभर पसरेल व समता, बंधुता, स्वातंत्र्य या थोर तत्त्वांचा जगांतून लोप होईल हा विचार, ही चिंता लोकसत्तांच्या मनांत बळावू लागली. आज त्या देशांतील कर्त्या पुरुषांच्या ध्यानी मनीं स्वप्नी हा एकच विचार घुमत राहिलेला आपणांस दिसतो. या देशांतील विचारवंत, शास्त्रज्ञ, मुत्सद्दी, तत्त्ववेत्ते यांचे लेख, त्यांची भाषणे, त्यांचे उद्योग हे पाहिले तर या चिंतेची कृष्णछाया पाश्चात्य जीवनावर पडून ते झाकोळून गेलें आहे हें पदोपदीं प्रत्ययास येतें.
आज अमेरिका सर्व दृष्टींनी अत्यंत संपन्न व म्हणूनच अत्यंत बलाढ्य असे राष्ट्र आहे. तेथील धनपति, उद्योगपति, कारखानदार, तेथील शास्त्रज्ञ, तत्त्ववेत्ते, ग्रंथकार, इतिहासकार, तेथील राजकारणी, मुत्सद्दी, सेनानी, प्रशासक, संघटक हे जगांत निस्तुळ असे आहेत. त्यांनी विद्या, शास्त्र, कला, धन, पराक्रम, त्याग, धैर्य यांच्या थोर परंपरा निर्माण करून स्वदेशाचे सामर्थ्यं इतकें वाढविलें आहे की, त्याला जगांत तुलना नाही. अशा या राष्ट्राला सोव्हिएट रशियासारख्या चाळीस वर्षांपूर्वी अत्यंत दरिद्री, अप्रगत असलेल्या, सुलतानी सत्तेखाली भरडलेल्या, अर्ध रानटी अशा देशाच्या आक्रमणाची चिंता वाटावी याचा अर्थ काय ? हाच अर्थ आपल्याला येथे पाहावयाचा आहे आणि त्याची मीमांसा करावयाची आहे. या मीमांसेला फार महत्त्व आहे. रशियाच्या दण्डसत्तेने केवळ अमेरिकेला किंवा पाश्चात्त्य राष्ट्रांना आव्हान दिले आहे असें नाही. तें आव्हान सर्व लोकसत्तांना आहे. आपण भारतांत लोकसत्ता प्रस्थापित केलेली आहे. ती यशस्वी व्हावी अशी आपली मनीषा आहे. तेव्हा त्या आव्हानाचा आपण विचार केलाच पाहिजे. त्या दृष्टीने या अभ्यासाला फार महत्त्व आहे. पण त्या आधी सोव्हिएट रशियाच्या या आव्हानाचें स्वरूप काय आहे, त्याचा अर्थ काय, त्याच्यामागे कोणतें सामर्थ्य आहे याचा विचार करणें अवश्य आहे. म्हणून तें विवेचन प्रथम करूं.
सोव्हिएट रशियांतील आजची सत्ता ही रानटी आहे, क्रूर आहे, मानवता, सौजन्य, सहृदयता, समता, बंधुता, व्यक्तिस्वातंत्र्य या सुसंस्कृत मूल्यांचा तिला स्पर्शहि झालेला नाही अशी टीका नित्य केली जाते. त्या टीकेला अर्थ आहे यांत शंका नाही. तरी पण हा रानटीपणा कोणत्या स्वरूपाचा आहे याचा शोध आपण घेतला पाहिजे. नाहीतर आपली फसगत होईल. ॲटिल्ला, अलेरिक, तयमूर, चंगीझ हे कत्तलखान इतिहासांत प्रसिद्ध आहेत. स्टॅलिन व माओ यांनी त्यांच्यासारख्याच नरहत्या केल्या आहेत. कदाचित् त्या हिंस्र सुलतानांपेक्षा दसपट हत्या यांनी केल्या असतील; पण या हत्या त्यांनी कोणत्या हेतूने केल्या आणि कोणत्या सामर्थ्याने केल्या हें पाहिलें पाहिजे. तयमूर, चंगीझ, यांच्याप्रमाणे स्टॅलिन, माओ यांचे सामर्थ्य आडदांड व रानटी असतें तर अमेरिकेने त्याचा निमिषार्धात धुरळा करून टाकला असता. नव्या विज्ञानाने संपन्न असलेल्या देशांचे लष्करी सामर्थ्य व त्यांची संहारशक्ति एवढी प्रचंड आहे की, वरील सर्व कत्तलखान व त्यांचे अफाट सेनासागर एकत्र होऊन जरी अंगावर कोळसले तरी नव्यापैकी कोणताहि देश त्यांचा सहज निःपात करूं शकेल. पण सोव्हिएट रशिया वा नवचीन यांचें सामर्थ्यं तशा प्रकारचें नाही. त्यांनी नव्या मूल्यांची उपासना केली नसली तरी नव्या शक्तीची उपासना निश्चित केली आहे; आणि म्हणूनच जगाला त्यांची भीति वाटत आहे.
औद्योगीकरण
'रशिया इतका बलशाली कसा झाला' या लेखांत जोसेफ व स्टीवर्ट ॲलसॉप या अमेरिकन लेखकांनी रशियाच्या वाढत्या सामर्थ्याचें वर्णन केलें आहे. त्यांनी असे दाखवून दिले आहे की, गेली चाळीस वर्षे रशियाने आपले सर्व बळ औद्योगीकरणावरच खर्च केलें आहे. अन्नधान्य, कपडालत्ता, घरें, पादत्राणें, वाहनें इ. समाजाच्या जीवनाला आवश्यक असें जें धन त्याची वाढ करण्याकडे रशियाने संपूर्ण दुर्लक्ष केले आणि पोलाद, पेट्रोल, कोळसा, वीज, अणुशक्ति, विमानें, तोफा, बाँब, रणगाडे हें जें औद्योगिक व लष्करी धन त्याची वाढ करावयाची असा कृतनिश्चय त्याने केला आणि अजूनहि त्याचे तेच धोरण चालू आहे. सुधारलेल्या देशाचें सर्व सामर्थ्य औद्योगीकरणांत आहे. युद्धाला लागणारे सर्व धन, शस्त्रास्त्रे, अवजारें आणि सर्व प्रकारचे साहित्य औद्योगीकरणांतूनच निर्माण होतें हें जाणून तो एक ध्यास रशियन सत्ताधाऱ्यांनी घेतला आणि त्यासाठी लोकशाही मूल्यांचा, मानवी मूल्यांचा, पूर्ण बळी द्यावा लागला तरी द्यावयाचा असा निर्धार त्यांनी केला; व यमाच्याहिपेक्षा जास्त निर्दयपणा करून तो अंमलांत आणला. रशियन जनता अत्यंत दरिद्री असतांना रशियाला औद्योगिक प्रगति कशी करता आली असें कोणी विचारतात. त्यावर ॲलसॉप म्हणतात की, रशियन जनता दारिद्र्यांत आहे म्हणूनच रशियाला ही प्रगति करता आली. कामगारांना पुरेसे अन्नवस्त्र आहे की नाही, राहायला जागा आहे की नाही, याचा विचारहि तेथील सताधीश करीत नाहीत. त्यामुळे इतर देशांत निर्माण होणारा प्रचंड भांडवलाचा प्रश्न तेथे निर्माण होतच नाही. मजुरी तेथे अत्यंत स्वस्त आहे. अन्नवस्त्र आहे आहे, नाही नाही, अशी कामगारांची प्रारंभी स्थिति होती. त्या वेळी परदेशी भांडवल आणणे अवश्य होते, पण त्यासाठी ऐनजिनसी माल परदेशी पाठवावा लागे. तो माल सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांपासून बंदुकीच्या धाकाने लुटून घेतला. अन्नधान्य, लोणी, कोंबड्या, डुकरें यांनी भरलेल्या गाड्या परदेशाला जात आहेत व सभोवतालच्या परिसरांत हजारो शेतकरी अन्नान्न करीत मरत आहेत असें त्या वेळी नेहमीचें दृश्य होतें (मॉरिस हिंडस 'मदर रशिया'). आज यांत थोडा तरी बदल झाला आहे, पण जेमतेम अन्नवस्त्रापलीकडे कामगारांना तेथे जास्त कांहीच मिळत नाही. जास्त सुखसोयीसाठी ते संप करतील तर तेंहि शक्य नाही. संप म्हणजे जनताद्रोह ! तो सर्वांत मोठा गुन्हा. त्याला देहान्त शिक्षा; त्यामुळे इतर राष्ट्रांत नित्य संपामुळे उत्पादनांत घट होते ती रशियांत होत नाही. कामगाराला एका कारखान्यांतून दुसरीकडे जाण्याचा किंवा नोकरीचा राजीनामा देण्याचाहि हक्क नाही. तसें त्याने केल्यास तो जगांतून नाहीसा होईल. असें सर्व बाजूंनी कराल नियंत्रण ठेवून सोव्हिएट रशियाने गेली चाळीस वर्षे चोवीस तास यंत्रे चालवून व कामगार राबवून लष्करी धन निर्माण केलें आणि त्यामुळेच त्याची संहारशक्ति फार मोठ्या प्रमाणांत वाढली आहे. रशियांत १९२८ सालीं जें पोलाद निघत असे त्याच्या दसपट आज निघते. कोळसाहि दहापट निघतो. पेट्रोल ५ पट व वीज ३४ पट निघते. उलट कापड, पादत्राणें हें जीवनधनदुप्पट व चौपट इतकेंच वाढले आहे. १९५७ सालीं ६ नोव्हेंबरला क्रुश्चेव्ह याने सुप्रीम सोव्हिएटपुढे केलेल्या भाषणांत पुढील १५ वर्षांतील उत्पादनाचा अंदाज सांगितला आहे. त्यांतहि जीवनधनाची वाढ अल्प असून औद्योगिक धनाच्या वाढीवरच सर्व भर दिलेला स्पष्ट दिसतो. या औद्योगिक धनाच्या बाबतींत अमेरिकेला मागे टाकण्याची रशियाची महत्त्वाकांक्षा आहे. हें कितपत शक्य होईल याविषयी शंका आहे. पण आजचा रशियाचा वेग अमेरिकेपेक्षा तिपटीने जास्त आहे हें अमेरिकन लेखकांना मान्य आहे. १९५०-१९५५ या पांच वर्षांत अमेरिकेचें औद्योगिक उत्पादन शे. २५ वाढलें, तर रशियाचें शे. ७० वाढले आहे. ब्रिटनच्या 'आयर्न अँड स्टील बोर्डा'चे एक सभासद रॉबर्ट शोन यांनी रशियाला जाऊन तेथील पोलाद कारखान्यांची पाहणी केली व ब्रिटिश कारखान्यांपेक्षा सोव्हिएट कारखान्यांची कार्यक्षमता जास्त आहे असें मत दिलें. त्याचप्रमाणे या बाबतीत ब्रिटिशांशीं स्पर्धा करून सोव्हिएट सरकार बिटिशांपेक्षा स्वस्त भावांत पोलाद निर्यात करूं शकेल हि त्यांनी मान्य केलें, याचें कारण म्हणजे ब्रिटनपेक्षा सोव्हिएट मजुरीचे दर फार स्वस्त आहेत हे होय. नेव्हिन बीन या अमेरिकन इंजिनियरानेहि सोव्हिएट कारखानदारीविषयी असेंच मत दिलें आहे, आणि म्हणून त्याचा आपण गंभीरपणे विचार केला पाहिजे असें स्वबांधवांना सांगितलें आहे.
ही सर्व माहिती देऊन लेखक श्री. ॲलसॉप म्हणतात की, सोव्हिएट रशियाची ही प्रगति नैतिक दृष्टीने अगदी हिडीस अशी आहे. व्यक्तिस्वातंत्र्य व व्यक्तिसुख या दृष्टीने आपण उद्योग करतों तर लष्करी बळाची वाढ हे एकच उद्दिष्ट रशियापुढे आहे. अमेरिकेचें भांडवल बव्हंशी जीवनोपयोगी वस्तूंवर, सुखसोयींच्या वस्तूंवर खर्च होतें, तर रशियाचें भांडवल बव्हंशीं औद्योगिक व लष्करी उत्पादनावर खर्च होतें. पण नैतिक-अनैतिक हा प्रश्न बाजूला ठेवून त्यांतील कठोर सत्याला तोंड देण्याची सिद्धता आपण केली पाहिजे असें त्यांनी शेवटीं बजावलें आहे (रीडर्स डायजेस्ट-सप्टें. १९५६).
विज्ञान - शिक्षण
औद्योगिक धन व लष्करी साहित्य याच्या निर्मितीसाठी शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, इंजिनिअर, यांची किती गरज असते हें सांगण्याची आवश्यकता नाही. आरंभी रशियाला परकी तज्ज्ञांच्या साहाय्यावर अवलंबून राहावें लागत असे. पण तेव्हापासूनच सर्व जगामध्ये आपलें युद्धसामर्थ्य श्रेष्ठ ठरलें पाहिजे हें उद्दिष्ट रशियन प्रशासकांच्या डोळयांपुढे होतें, आणि त्या दृष्टीने त्यांनी रशियन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची योजना आखली होती.
जॉन गुंथूर यांनी रशियांतील शास्त्रीय शिक्षणाविषयी आपल्या ग्रंथांत ('इन्साइड् रशिया टुडे') सविस्तर माहिती दिली आहे. ती देतांना त्यांनी रशियांतील शिक्षण म्हणजे पश्चिमेला एक आव्हानच आहे असें म्हटले आहे. सध्या या विषयावर लिहिणारे बहुतेक सर्व पाश्चात्त्य लेखक विल्यम लॉरेन्स, जेम्स मिचेनेर, अलेक्झँडर, सेव्हरस्की, पॉल पामर- आव्हान, रशियाचें पश्चिमेला आव्हान- हीच भाषा वापरतात. कारण लष्करी सामर्थ्याची वाढ, संहारशक्तीचें वर्धन हेंच उद्दिष्ट डोळयांपुढे ठेवून सोव्हिएट रशियाने शिक्षणाची योजना आखली आहे. 'सायन्स अँड टेक्नॉलजी इन् मॉडर्न वॉरफेअर' या आपल्या ग्रंथांत पोक्राव्हस्की याने म्हटलें आहे की, 'अर्वाचीन युद्धशास्त्राचा विज्ञान हा पाया आहे. निसर्गशास्त्रे व समाजशास्त्र यांच्या ज्ञानानेच भावी युद्धाची तरतूद करतां येईल.' आणि या दृष्टीनेच रशियांतील तरुणांना शिक्षण दिलें जातें. तेथे शाळा-कॉलेजांतून जास्त भर शास्त्रीय विषयांवर व तंत्रविद्येवर असतो. शे. ६५ टक्के विद्यार्थी शास्त्र- शाखेकडे जातात. शालेय अभ्यासक्रमांत १० वर्ष गणित, ४ वर्षे रसायन, ५ वर्षे पदार्थविज्ञान व ६ वर्षे जीवनशास्त्र यांचा अभ्यास विद्यार्थ्यांना करावा लागतो. शाळा २१३ दिवस भरतात. आठवड्यांतून ६ दिवस रोज सहा तास शाळा असते. शेवटचीं चार वर्षे शाळेशिवाय घरी रोज ४ तास अभ्यास करावा लागतो. १९५८ सालच्या हिशेबाप्रमाणे रशियांत ७६७ उच्च शिक्षणसंस्था आहेत व त्यांत वीस लक्ष विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यांतील १९३ संस्था इंजिनिअर तयार करतात. तेथे या विषयाच्या भिन्न भिन्न २०० शाखांचें अध्यापन केलें जातें. १९५० सालापर्यंत दरसाल ३६००० इंजिनिअर तयार होत. १९५७ सालीं ७७००० इंजिनियर तयार झाले. यांशिवाय लष्करी विद्यालयांतून तयार झालेले इंजिनियर ते निराळेच. एका मास्को विद्यापीठाच्या वर्णनावरून तेथील शिक्षणाविषयी आपल्याला कल्पना येऊ शकेल. ३६० कोटी रुपये खर्च करून हें विद्यापीठ १९५३ साली बांधण्यांत आलें. त्यांत १६००० विद्यार्थी आहेत. त्यांपैकी निम्म्या विद्यार्थिनी आहेत. विद्यापीठांत १७०० प्रयोगशाळा आहेत. १५००० वर्ग आहेत. २४०० प्राध्यापक आहेत. अभ्यासक्रम पांच वर्षांचा असून सायन्स विभागाकडे शे. ६५ विद्यार्थी असतात. पण त्यांनाहि अर्थशास्त्र व तत्त्वज्ञान हे विषय घ्यावे लागतात.
रशियांत सर्व शिक्षण मोफत आहे. शिवाय कॉलेजमधील विद्यार्थ्यांना दरमहा ३६० ते ६०० रु. पर्यंत शिष्यवृत्ति मिळते. आता प्रत्येक विद्यार्थ्याने दोन वर्षे कारखान्यांत काम केल्यावांचून त्याला पदवी मिळावयाची नाही असा नवा नियम झाला आहे. विद्यार्थी पोषाखी होत आहेत, शरीरश्रमाचा कंटाळा करीत आहेत अशी शंका आल्यामुळे अधिकान्यांनी हा नियम केला आहे. अशा या कॉलेजांतून प्रवेश मिळणे ही रशियांत महद्भाग्याची गोष्ट समजली जाते. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या जीवनाची सर्व कक्षाच बदलून जाते. समाजाच्या वरच्या श्रेणींत त्यांना निश्चित स्थान मिळते. त्यांचे भवितव्य उज्ज्वल होऊन जाते. त्यामुळे घरांतील मुलांना विद्यापीठांत प्रवेश मिळाल्याचें कळतांच त्या घरांत मोठा आनंदोत्सव होतो.
रशियामध्ये निरक्षरता जवळजवळ नष्ट झालेली आहे. आज तेथे एकंदर दोन लक्ष तेरा हजार शाळा असून एकंदर आठ भाषांत शिक्षण चालतें. ताझिकिस्तानमध्ये १९१९ साली सात शाळा असून विद्यार्थी १२४ होते. आज तेथे २५०० शाळा व साडेतीन लक्ष विद्यार्थी आहेत. उझबेकिस्तानमध्ये ४० वर्षांपूर्वी शे. २ लोक साक्षर होते. आज तेथील पदवीधरांचें प्रमाण फ्रान्सच्या दुप्पट आहे.
ही सर्व माहिती देऊन जॉन गुंथूर यांनी एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे. ते म्हणतात, 'या सर्व शिक्षणाचा उपयोग काय ? हे विद्यार्थी म्हणजे केवळ आज्ञाधारक यंत्रच नव्हत काय ? त्यांच्या विषयाबाहेर विद्यार्थ्यांना कसलेंहि ज्ञान नसतें. ते मिळविण्याची त्यांना परवानगीच नाही. बाह्य जगाची अत्यंत विपर्यस्त व असत्य माहिती त्यांना पुरविली जाते. ती त्यांना निमूटपणें स्वीकारावी लागते. विरोध करण्याचा, स्वतंत्र विचार करण्याचा प्राथमिक हक्कहि त्यांना नाही. मग या शिक्षणाचा उपयोग काय,' असा प्रश्न उद्भवतो. तो प्रश्न मांडून गुंथूर यांनीच त्याचें उत्तर दिले आहे. ते म्हणतात की 'एवढ्यामुळे सोव्हिएट रशियांतील शिक्षणाचे महत्त्व कमी लेखणें युक्त नाही. आज विज्ञानाचे शिक्षण घेतलेला एक मोठा वर्ग तयार होत आहे. शास्त्रीय रीतीने विचार करण्याचें शिक्षण त्याला दिले जात आहे. हा वर्ग पुढील काळीं स्वतंत्र विचारशक्ति प्राप्त करून घेईल यांत शंका नाही. वेंडेल विल्की यांची स्टॅलिनशीं मुलाखत झाली त्या वेळीं स्टॅलिनने त्यांना रशियांतील शिक्षणाची माहिती दिली. त्या वेळी विल्की म्हणाले, "स्टॅलिनसाहेब, जरा जपूनच असा. या शिक्षणप्रसारामुळेच एखादे दिवशी आपण पदच्युत होण्याचा संभव आहे." पंडित जवाहरलाल नेहरू यांनीसुद्धा सोव्हिएट शिक्षणपद्धतीला फार मोठें प्रशस्तिपत्र दिले आहे. जगांतील सर्वोत्कृष्ट पद्धत असा तिचा गौरव त्यांनी केला आहे. या पद्धतींत व्यक्तित्व मुरगळून टाकलें जातें हे त्यांना मान्य आहे; पण शिक्षणाचा प्रसार ही एक शृंखलाछेदक शक्ति आहे आणि अंती ती व्यक्तित्वावरची बंधनें नष्ट केल्याखेरीज राहणार नाही असा अभिप्राय त्यांनी प्रकट केला आहे. (टाइम्स २५- ८- ५८).
अमेरिकेचा पराभव
भविष्यकाळी काय होईल हें सांगणे कठीण म्हणून सोडून दिलें तरी आजचें रशियाचें सामर्थ्य कशांत आहे याचा अवगम वरील माहितीवरून आपणांस निश्चित होईल. औद्योगीकरण आणि शास्त्रीय ज्ञान हेंच त्याच्या सामर्थ्याचें रहस्य आहे. म्हणजे पाश्चात्य जगाने सामर्थ्यासाठी ज्या देवतांची उपासना केली त्यांचीच रशियाने केली आहे. तो रानटी असला तरी तो या क्षेत्रांत नव्हे. या क्षेत्रांत त्याने अगदी अद्ययावत् शास्त्रीय ज्ञानात पाश्चात्यांची बरोबरी केली आहे इतकेंच नव्हे, तर त्यांच्यावर मात केली आहे हें त्याच्या यशस्वी स्पुटनिक- भ्रमणावरून दिसून येईल. अमेरिकन पदार्थविज्ञानशास्त्रज्ञ, हैड्रोजन बाँबचा जनक एडवर्ड टेलर याने, रशियाने आकाशांत बालचंद्र सोडल्यानंतर असे उद्गार काढले की, "विज्ञानक्षेत्रांत रशियाने अमेरिकेचा केलेला पराभव पर्ल हार्बरपेक्षाहि जास्त घातक आहे, आणि अमेरिकेला सोव्हिएट रशियाची बरोबरी करावयास किती काळ लागेल हें सांगणे कठीण आहे." १९५७ च्या डिसेंबरांत नाटोची जी परिषद् झाली तीमध्ये लोकांच्या मनांत हीच चिंता व्यक्त झाली. हरप्रयत्न करून या बाबतींत आपण अंतर काटले पाहिजे असा ठराव त्या वेळी परिषदेने संमत केला.
विज्ञान परपुष्ट नाही
सोव्हिएट शास्त्रज्ञांनी पाश्चात्त्य व विशेषतः अमेरिकन शास्त्रज्ञांवर मात केली हें पाहून व्यक्तिस्वातंत्र्यवादी लोकायत पाश्चात्त्य समाजाला धक्काच बसला. शास्त्राची प्रगति लोकसत्ताक समाजांतच होते, जेथे स्वतंत्र चिंतनाला अवसर नाही, जेथे व्यक्तित्व मारलें जातें तेथे विज्ञानांतील गूढ सत्याचें संशोधन होणे शक्य नाही असा त्यांचा बुद्धिनिश्चय होता. तो सोव्हिएट
रशियाच्या या प्रगतीमुळे डळमळू लागला. त्या वेळी पाश्चात्य जगांतील पंडितांनी याविषयीच्या निरनिराळ्या उपपत्ति मांडल्या; त्यांतली प्रमुख अशी की, जर्मनीचा पराभव झाल्यानंतर रशियाला जर्मनींत जर्मन शास्त्रज्ञांचे संशोधनाचे सर्व कागदपत्र सापडले; ते त्याने पळविले आणि त्या बरोबरच अनेक नामांकित जर्मन शास्त्रज्ञांनाहि त्याने पळवून नेलें; रशियाने विज्ञानक्षेत्रांत जी प्रगति केली तिचे श्रेय अशा रीतीने जर्मन शास्त्रज्ञांना आहे, सोव्हिएट शास्त्रज्ञांना नाही. हा समज अत्यंत भ्रामक व हास्यास्पद असा आहे. समाजाची पातळी उंचावलेली नसतांना, विज्ञानाचे वातावरण निर्माण झाले नसतांना, असे उसने शास्त्रज्ञ आणून एवढी अभूतपूर्वं प्रगति एखाद्या देशाला करतां येईल हे सर्वथा अशक्य आहे. याविषयी निकोलाय गॉले या लेखकाने फार चांगले विवेचन करून या भ्रमाचा निरास केला आहे. ['इन्स्टिट्यूट फॉर दि स्टडी ऑफ दि यू. एस्. एस्. आर.' या नांवाची म्युनिच (जर्मनी) येथे एक संस्था आहे. सोव्हिएट रशियांतून निर्वासित झालेले शास्त्रज्ञ व पंडित यांनी ही स्थापिली आहे. कोणीहि निर्वासित तिचा सभासद होऊं शकतो. मात्र तो कम्युनिस्ट वा कम्युनिस्टमित्र असतां कामा नये असा संस्थेचा नियम आहे. सोव्हिएट रशियाचा सर्वांगीण अभ्यास हेंच तिचे उद्दिष्ट असून दरमहा ती सुमारें ४८ पानांची एक पुस्तिका प्रसिद्ध करते. या पुस्तिकांतून येथे बरीच माहिती घेतलेली आहे.] 'लोकायत्त समाज व दण्डायत्त समाज यांतील विज्ञानाची प्रगति' हा निकोलाय गॉले याचा लेख नोव्हेंबर १९५७ च्या पुस्तिकेंत आहे. गॉले म्हणतो की, 'जर्मन शास्त्रज्ञांचे संशोधनाचे कागद रशियाने नेले हें खरें. पण एवढयावरून स्पुटनिकचें, रॉकेटचें व नव्या लांब पल्ल्याच्या अस्त्रांचे श्रेय जर्मनांना देता येईल असे नाही. तसें म्हटलें तर जर्मन शास्त्रज्ञ अमेरिकेतहि गेले आहेत, आणि अमेरिकेत गेलेले ब्राऊन, बर्जर व डॉ. ले हेच या शास्त्रांतले प्रमुख संशोधक होते. रशियांत गेले ते यांचे दुय्यम लोक होत. दुसरी गोष्ट अशी की, या विषयांचे संशोधन रशियांत १९१७ पूर्वीच झारशाहींत चालू झाले असून पहिल्या महायुद्धांत जर्मनांनी मेशखेरस्की, चॅपलिगीन व झिऑलव्होस्की या रशियन शास्त्रज्ञांचे सिद्धान्तच वापरले होते. रशियाची या बाबतींतली क्रान्तीपूर्वीची परंपरा मोठी उज्ज्वल आहे. १९१२ साली जर्मनींतील क्रप कारखान्याचा शतवर्षाचा उत्सव झाला. त्या वेळी काढलेल्या स्मारक ग्रंथांत 'रशियन तज्ज्ञांच्या नेतृत्वाखालीच क्रपच्या शास्त्रज्ञांनी संशोधन केलें' असें म्हणून रशियाचें ऋण मान्य केलेले आहे. क्रान्तीनंतर रशियनांनी या बाबतींत अखंड परिश्रम करून संशोधन चालू ठेवलें होतें. १९४६ सालीं 'ॲकॅडमी ऑफ आर्टिलरी सायन्सेस' स्थापन झाली. तेथील संशोधक प्रोफेसर ब्लागोनरॉव्हॅव्ह व टिखोन् रॉव्हॅव्ह यांना या प्रगतीचें बव्हंशी श्रेय आहे. हेरगिरीने मिळविलेलें, किंवा परकी शास्त्रज्ञांनी आणलेलें ज्ञान एखाद्या राष्ट्राला विज्ञानशास्त्रांत अग्रेसरत्व प्राप्त करून देईल हें खरें नाही. इतर अनेक शास्त्रज्ञांनीहि हेंच मत दिलें आहे. सोव्हिएट रशियाची वैज्ञानिक प्रगति ही रशियन शास्त्रज्ञांनीच घडविलेली आहे. उसन्या आणलेल्या परक्या शास्त्रज्ञांना तिचे श्रेय देतां येत नाही हें त्यांना मान्य आहे, आणि तसे आहे म्हणूनच त्यांना रशियाच्या आक्रमक लष्करी सामर्थ्याविषयी अहोरात्र चिंता वाटत आहे.
अर्वाचीन लष्करी सामर्थ्याच्या अभिवृद्धीला लागणारें जें षडंग बल तें सोव्हिएट रशिया, चीन इत्यादि दण्डसत्तांनी कसें प्राप्त करून घेतलें याचा विचार आपण करीत आहों. अत्यंत बलाढ्य अशा पाश्चात्त्य लोकसत्तांना त्यांच्या आक्रमणाची भीति वाटावी असें युद्धसामर्थ्य या दण्डसत्तांनी जोपासलेलें आहे. तें त्यांनी कसें जोपासलें हें पाहणे भारताच्या दृष्टीनेह महत्त्वाचे आहे. कारण आपल्यालाहि त्या आक्रमणाची सदैव भीति आहे. षड्विध बलसाधनापैकी शस्त्रास्त्रे, औद्योगीकरण, शिक्षण व शास्त्रज्ञान यांचा विचार आपण केला. आता त्यांनी समाजसंघटना कशी केली याचा विचार करावयाचा आहे. वर सांगितलेल्या चतुरंग बलामागे संघटित असें राष्ट्र नसेल तर त्याचा कांही उपयोग नाही. उलट भस्मासुरासारखें तें बल स्वसमाजाच्या नाशाला कारण होतें हें अनेक देशांच्या उदाहरणांवरून दिसून येते. राष्ट्रांत यादवी माजली, समाज दुभंगला, त्याच्या अनेक चिरफळ्या झाल्या की, वरील जड शस्त्रास्त्रं त्याचा किती संहार करतील तें सांगावयास पाहिजे असें नाही. पण या दण्डसत्तांनी अगदी दुर्भेद्य अशा संघटना निर्माण करून ही आपत्ति टाळण्यांत मोठे यश मिळविले आहे.
राष्ट्रसंघटना
रशिया किंवा चीन या देशांत अखिल राष्ट्र संघटित करण्यांत नेत्यांना एवढें अभूतपूर्व यश यावें हा सकृद्दर्शनी मोठा चमत्कार वाटतो. आता क्रान्ति होऊन चाळीस वर्षे झाली. पण सोव्हिएट रशियाच्या संघटनेला तडा सुद्धा गेलेला नाही. या अवधीत संघटना भंगावी, दुफळी होऊन दौर्बल्य निर्माण व्हावें, मध्यवर्ती शासन दुबळें होऊन अराजक माजावें, असे अनेक प्रकार घडले आहेत. स्टॅलिनने आपल्या सर्व सहकाऱ्यांना, लेनिनच्या वेळी कर्तबगार ठरलेल्या प्रभावी नेत्यांना, वाटेल ते आरोप ठेवून गोळ्या घातल्या आहेत. मध्यंतरी जे शुद्धीकरण झाले त्यांत सैन्यांतल्या मोठमोठ्या अधिकाऱ्यांनाहि त्याने परलोकाची वाट दाखविली आहे. सामुदायिक शेतीच्या प्रयोगांत त्याने लक्षावधि शेतकऱ्यांच्या रक्ताचे पाट वाहविले आहेत; आणि दशलक्षावधि कामगार- शेतकऱ्यांना सैबेरियांतील यमपुरीत धाडून दिले आहे. सुशिक्षित विद्याजीवी वर्गाशी तर त्याचा उभा दावा. योजनांच्या प्रारंभीच्या काळांत हजारो मध्यमवर्गीय सुशिक्षितांची त्याने हत्या केली. त्यांची कुटुंबेंच्या कुटुंबे उद्ध्वस्त करून टाकली. त्याने डॉक्टर म्हटला नाही, वकील म्हटला नाही, लेखक नाही, कवि नाही.
नवचीनमध्येहि समाज असाच संघटित आहे. तेथेहि समाज दुभंगावा, यादवी माजावी अशा घटना नित्य घडत आहेत. १९४९ सालीं तेथील कम्युनिस्ट पक्षाच्या हाती सत्ता आली. त्यानंतर पुढील दोन वर्षांत या ना त्या निमित्ताने तेथील नेत्यांनी जवळ जवळ वीस लाख लोकांची कतल केली आहे. अत्यंत समर्थ अशा, अगदी श्रेष्ठ अशा, मालिकेतील नेत्यांनाहि माओ, चौ एन् लाय यांच्याविरुद्ध गेल्याबरोबर देहान्त प्रायश्चित देण्यास चीनचे हे नेते कचरत नाहीत. मध्यंतरी मतस्वातंत्र्याचा सर्वांना हक्क द्यावा अशी एक लहर माओट्सी टुंग याला आली. त्याबरोबर नवचीनच्या राज्यकारभारावर अनेक प्रकारांनी कडक टीका होऊं लागली. कोणी तर रशियावर व कोणी मार्क्सवादावरहि टीका केली. त्याबरोबर माओचा सुलतानी दण्ड पुन्हा फिरू लागला व त्याने अनेकांचे बळी घेतले. शिक्षणखात्याचे उपमंत्री त्सेन चीलून, नॅशनल डिफेन्स कौन्सिलचे उपाध्यक्ष जनरल लुंग, वाहतूक मंत्री चंग चो चून, अन्नखात्यांतील अधिकारी चंगने, लाकूडखात्यातील अधिकारी लो चिंग ची, अशा मोठमोठ्या पदांवरच्या अधिकाऱ्यांना एका क्षणांत माओ धुळीला मिळवतो, त्यांचा पाणउतारा करतो. त्यांना जाहीरपणे आपल्या पापाची कबुली देऊन माफी मागावी लागते. नाही तर इहलोक सोडावा लागतो. पण असे असूनहि चीनमध्ये कोठे दुफळी झालेली नाही किंवा मध्यवर्ती सत्ता दुबळी झाल्याचें कसलेंहि लक्षण तेथे दिसत नाही.
राजकीय प्रबुद्धता
याचें प्रमुख कारण म्हणजे नवचीनने चिनी जनतेच्या ठायीं निर्माण केलेली राष्ट्रनिष्ठा हे होय. आज चीनमध्ये ६५ कोटि लोक जागृत झाले आहेत म्हणजेच राजकीय दृष्टीने प्रबुद्ध झाले आहेत. चीन व रशिया येथे मार्क्सच्या तत्त्वान्वयें क्रान्ति घडली व त्याच्या सिद्धान्तानुसारच पुढील काळात आपण समाजरचना केली असें तेथील नेते सांगतात. पण आपण एक गोष्ट ध्यानांत ठेवली पाहिजे की, या देशांतील प्रगतीचा मार्क्सवादाशी अर्थाअर्थी कसलाही संबंध नाही. आज मार्क्स रशियांत अवतरला तर त्याला गोळीच घातली जाईल असें ट्रॉट्स्की मागे म्हणाला होता, तें आजहि खरें आहे. सर्व जगाचा इतिहास हा वर्गविग्रहाचा इतिहास आहे असे मार्क्सचे मत आहे. 'पण रशियाचा इतिहास हा वर्गविग्रहाचा इतिहास नाही,' असें रशियांत सध्या प्रचलित असलेल्या शालेय इतिहासांत पहिलेच वाक्य आहे. तेंच राष्ट्रनिष्ठेविषयी. मार्क्सने राष्ट्रवादाला अत्यंत तुच्छ लेखिलें आहे. त्याच्या मतें कामगारांना मातृभूमि नाही, पितृभूमि नाही. धर्माभिमान, राष्ट्राभिमान, वंशाभिमान या त्याच्या मतें सर्व अफूच्या गोळ्या आहेत. पण या दण्डसत्तांकित देशांतील कम्युनिस्ट नेत्यांनी लवकरच हें जाणलें की, जनतेला धुंद, बेहोश करून टाकण्यास, खरी प्रेरणा देण्यास, यातली कोणती तरी गोळी अवश्य आहे. रशियन नेत्यांनी प्रारंभी थोडी आंतरराष्ट्रीयतेची उपासना चालविली होती; पण माओच्या कम्युनिस्ट पक्षाने हा भ्रम कधीच अंगीकारला नाही. प्रारंभापासूनच तत्त्वज्ञानपूर्वक त्याने जागतिक कामगार संघटनेचें उच्च तत्त्व वाऱ्यावर सोडून दिले आणि राष्ट्रभक्तीच्या भावनेला आवाहन करून चिनी जनतेला संघटित केलें.
रागद्वेषांना चेतना
स्वराष्ट्राचा गौरव म्हणजे इतर राष्ट्रांचा, निदान पक्षीं शत्रुराष्ट्रांचा द्वेष हें समीकरण ठरलेलें आहे. अज्ञानी, दरिद्री, दैववादी, पुराणयुगांत मनाने राहणाऱ्या असंख्य जनतेला विश्वशांति, विश्वव्यापक संघटना, अखिल मानव्य या कल्पनांनी कसलीहि प्रेरणा निर्माण होत नाही. रागद्वेषादि भावनामात्र तिच्या चित्तांत प्रबळ असतात, आणि याच रागद्वेषांना जास्त उन्नत रूप देऊन राष्ट्रांतील कर्तबगार, कुशल नेते त्या जनतेच्या ठायीं राष्ट्राच्या शत्रूविषयी द्वेष निर्माण करून त्यांतून मोठी शक्ति निर्माण करतात. विश्वैक्याचा उदात्त विचार करणाऱ्या लोकांना राष्ट्रनिष्ठा आणि त्यांतहि परक्यांचा द्वेष, शत्रूविषयी चीड या भावना संकुचित वाटतात.
आज अनेक पंडित राष्ट्रनिष्ठेचा जोराने निषेध करतांना दिसतात तें याच कारणासाठी. पण हे सर्व सुखासीन पंडित होत. खेड्यामध्ये आज अज्ञान, दारिद्र्य यांत खितपत पडलेल्या जनतेच्या दृष्टीने राष्ट्रभक्ति हे फार विशाल तत्त्वज्ञान आहे. लहानशा जमिनीच्या तुकड्यावरून, क्षुद्र मानापमानाच्या कल्पनांवरून भडकून जाऊन पिसाट होऊन ते लोक एकमेकांचे खून करण्यास प्रवृत्त होतात. लहानशा ग्रामीण जीवनापलीकडे त्यांची दृष्टि कधीच गेलेली नसते. अखिल समाजाच्या उत्कर्षापकर्षाची जबाबदारी आपल्यावर आहे या विचाराचा स्पर्शहि त्यांना झालेला नसतो. अशा जनतेला राष्ट्रभक्ति शिकविणें म्हणजे तिची मनें संकुचित करणें नसून तिला उदात्त ध्येयवादाची शिकवण देणेंच होय. परक्यांच्या द्वेषावर जरी ही राष्ट्रनिष्ठा उभारली असली तरी क्षुद्र परिसरांतल्या क्षुद्र प्रश्नांची विवंचना करण्यांत ज्यांचा जन्म जावयाचा त्यांना अमेरिकन साम्राज्यशाहीचें आक्रमण, त्यापासून आपल्या मातृभूमीचे, अखिल चिनी राष्ट्राचें रक्षण या विवंचना शिकविणें आणि त्या प्रेरणेने ६५ कोटि लोकांच्या ठायीं अहोरात्र कार्यमग्न होण्यांत भूषण वाटावे अशी वृत्ति निर्माण करणें ही समाजाची निश्चित प्रगति आहे. अज्ञानग्रस्त, दैवहत अशा मनुष्याच्या चित्तांत अखिल राष्ट्राच्या प्रश्नांचा विचार करण्याची प्रवृत्ति निर्माण झाली, समाजाच्या उत्कर्षाची मी चिंता वाहतों हा अहंकार, ही अस्मिता त्याच्या मनांत उद्भवली तर त्याच्या व्यक्तित्वाचा तो निश्चित विकास आहे; आणि सामान्य मानव हा जास्तीकरून भाववश, रागद्वेषवश असल्यामुळे कोठला तरी शत्रु समोर आहे, त्याच्याशी लढा करावयाचा आहे, अशी भावना असल्यावांचून त्याचें रक्त चेतत नाही. तो उद्योगोन्मुख होत नाही. म्हणूनच राष्ट्रांतील चतुर व्यवहारनिपुण नेते देशाच्या उत्कर्षासाठी परक्याच्या द्वेषावर ही भावना उभारून तिचा कुशलतेने उपयोग करून घेतात. स्वतःच्या राष्ट्राविषयीची भक्ति व शत्रुराष्ट्राचा द्वेष या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असें म्हटलें तरी चालेल.
इतिहासाने तर याहिपुढे जाऊन एक सिद्धान्त सांगितला आहे. दीर्घकालीन युद्धांतून, म्हणजे सर्वांना समान असलेल्या शत्रूच्या द्वेषांतूनच पुष्कळ वेळा राष्ट्रनिष्ठा निर्माण झाली आहे. इंग्लंड आणि फ्रान्स या दोन देशांत चौदाव्या शतकांत शतवार्षिक युद्ध चालू होतें. त्यांतूनच या देशांत राष्ट्रभावना निर्माण झाली. १८७० साली तर बिस्मार्कने फ्रान्सशी मुद्दाम युद्ध घडवून आणून स्वतःच्या राष्ट्राची संघटना केली. तुर्की जनतेंत इंग्रजांविषयी जो द्वेष भडकला होता त्याच्याच साह्याने केमालपाशाने तुर्कराष्ट्राची संघटना केली. भारतीय राष्ट्राच्या ऐक्याची जोपासना इंग्रजांशीं आपण जो लढा दिला, जुलमी राज्यकर्त्यांविषयी जो जळजळीत द्वेष चित्तांत बाळगला त्यावर झाली आहे. हिटलरने पहिल्या महायुद्धांत जर्मनीला पराभूत करणाऱ्या राष्ट्रांविषयी जर्मन जनतेंत पराकाष्ठेचा संताप व द्वेष प्रसृत करूनच तिची संघटना केली व तिच्या ठायीं अपार, अपार सामर्थ्य निर्माण केलें. रशिया व चीन यांनी आज त्याच मार्गाने सामर्थ्याची उपासना चालविली आहे. जॉन स्ट्रॉम हे एक अमेरिकन वृत्तपत्रकार आहेत. नुकताच चीनमध्ये साडेसात हजार मैलांचा प्रवास करून ते आले. ते म्हणतात की, आज चिनी मनाचें पोषण अमेरिका द्वेषावर होत आहे. तेथील अर्धपोटी, अर्धनग्न जनता आज अपार कष्ट करीत आहे, औद्योगीकरण करण्यासाठी, उत्पादन वाढविण्यासाठी हाडें पिचून टाकणारे कष्ट करीत आहे. तिच्यामागे प्रेरणा कोणती आहे ? अमेरिकाद्वेष ! "एक शेर गहू अधिक पिकविलात तर एक बंदुकीची गोळी जास्त विकत घेतां येईल, आणि आक्रमक साम्राज्यवादी अमेरिकन शिपायाशी तुम्ही मुकाबला करू शकाल. पोलाद जितके जास्त निर्माण कराल तितक्या तोफा जास्त तयार होतील, मग आपल्याला अमेरिकन आक्रमणाला तोंड देतां येईल. हें न केलें तर ! आक्रमण, पारतंत्र्य, गुलामगिरी, सर्वनाश !" असा प्रचार तेथे चालतो; आणि त्याने भारून जाऊन तेथील जनता हिमालय कष्ट उपशीत आहे. (रीडर्स डायजेस्ट- एप्रिल १९५९). जॉन गुंथूर यांनी रशिया याच अमेरिका द्वेषावर पोसला जात आहे हें आपल्या ग्रंथांत दाखविलें आहे.
परक्यांचा द्वेष ही एक बाजू झाली. तिच्याहून शतपटीने जास्त महत्त्व पूर्वपरंपरेचा अभिमान हा जो राष्ट्रनिष्ठेचा आत्मा, त्याला आहे. मार्क्स- मताने हा अभिमान प्रतिक्रिप्रात्मक, पराभूतवृत्तीचा द्योतक व सर्वथा त्याज्य होय. सोव्हिएट नेत्यांना आरंभी याच भ्रांतीने पछाडलें होतें. पण सामर्थ्य वाढविण्याचे धोरण ठरतांच त्यांनी मार्क्सवाद उधळून दिला; आणि परंपरेची पूजा अत्यंत भक्तीने सुरू केली. अलेक्झँडर नेव्हस्की, पीटर दी ग्रेट, कुटुसाफ, टॉलस्टॉय यांची प्रारंभी हेटाळणी होत असे. आता हे सर्व पुण्यश्लोक आहेत. रशियाला १९१७ च्या आधी इतिहासच नाही असें प्रारंभी शिकविलें जाई. आता तो इतिहास, झारशाहीने सैबेरियांत जीं आक्रमणें केलीं त्यांच्या वृत्तान्तासकट अत्यंत उज्ज्वल म्हणून गौरविला जातो, शिकविला जातो, पढविला जातो.
असा मातृभूमीच्या गौरवाचा व परकीयांच्या द्वेषाचा प्रचार अहोरात्र चालू असल्यामुळे वीस कोट रशियन जनता व पासष्ट कोट चिनो जनता आज राजकीय दृष्ट्या प्रबुद्ध झाली आहे आणि कम्युनिस्ट दण्डसत्तांचें हें फार मोठें बळ आहे. मागल्या काळीं या अफाट देशांत ही जनता अंधारयुगांत, अज्ञानांत हताश होऊन, दैववादी बनून राजकारणाविषयी, देशाच्या भवि तव्याविषयी पूर्ण उदासीन होऊन, अर्धनिद्रेत घोरत पडलेली असे. सतराव्या अठराव्या शतकांत पश्चिम युरोपांत राष्ट्रनिष्ठा निर्माण होऊन तेथली सर्व जनता प्रबुद्ध झाली. देशाच्या भवितव्यांची जबाबदारी स्वतःच्या शिरावर आहे, असें मानूं लागली, म्हणून तीं राष्ट्र समर्थ झाली. (हिंदुस्थानांतील जनता अशीच अप्रबुद्ध व उदासीन होती. पण त्यासाठीच तिचा गौरव करण्याची सध्या चाल आहे ! या देशांत वेडेपणा किती पिकावा याला कांही मर्यादाच नाही का ?) तीच राजकीय प्रबुद्धता दण्डसत्तांकित देशांतं आता निर्माण झाली आहे आणि अशा या प्रबुद्ध जनतेची संख्या पाश्चात्य लोकसत्तांच्या तुलनेने पाहतां अमर्याद आहे, अपर्याप्त आहे. एवढी जनता पिसाळून उठली तर काय होईल या विचाराने लोकायत्त देशांतील नागरिक अहोरात्र चिताग्रस्त झाले तर त्यांत नवल नाही.
विभूतिपूजा
केवळ दण्डसत्तेने जिवंत राष्ट्रनिष्ठा निर्माण करतां येईल काय अशी शंका या ठिकाणी आपल्याला येईल, आणि तशी येणें अगदी साहजिक आहे; पण केवळ दण्डसत्तेने हे कार्य साधलेले नाही. तिच्या जोडीला विभूतिपूजा व अंधश्रद्धा या वृत्तींचाहि दण्डायत्त देशांचे नेते उपयोग करीत असतात. स्टॅलिनविषयी सोव्हिएट जनतेच्या मनांत कोणत्या श्रद्धा रशियन प्रचारकांनी रुजविल्या होत्या हे आपण पाहिले तर वरील कोडें आपल्याला सहज उलगडेल. रशियांत प्रत्येक समारंभाच्या आदि-अंती स्टॅलिनला नमन केलें जाई. स्टॅलिन म्हणजे मानवजातीच्या आशेची ज्योत, मानवाच्या सुखाचा विधाता, पृथ्वीचे चिरतारुण्य, सूर्याची प्रतिभा अशी त्याची नित्य स्तुति केली जाई. स्टलिन हा सूर्यचंद्रांचा शास्ता, अनंताची मूर्ति असे त्याचे नित्य स्तोत्र गाइलें जाई. रोगी त्याच्या कृपेनेच बरे होतात, युद्धांत विजय त्याच्यामुळेच मिळतो, जगांतल्या सर्व भावी पिढ्यांचा तो गुरु आहे अशी श्रद्धा रशियन जनतेत नित्य जोपासली जाई; आणि या स्तवनांत शास्त्रज्ञ, तत्त्वदेत्ते, इतिहासकार, राजकारणी, मुत्सद्दी, कवि व सेनापति सर्वं सूर धरीत. चीनमध्ये माओविषयी असाच प्रचार चालतो. जर्मनीसारख्या ज्ञानविज्ञानांत प्रगतीच्या अग्रभागी असलेल्या देशांत हिटलरला अंधविभूतिपूजेची वृत्ति जोपासतां आली. मग रशिया, चीन यांसारख्या देशांतील अंधजनतेत तें दसपटीने जास्त शक्य झाले असल्यास नवल काय ? मागल्या काळांत लोकांच्या अंधश्रद्धेमुळे पोपच्या पीठाला जें सामर्थ्य प्राप्त झालें होतें तेच अर्वाचीन काळांत स्टलिनच्या व माओच्या पीठाने प्राप्त करून घेतले आहे. नेत्यांवरील या अंधश्रद्धेमुळेच त्यांनी जरी घोर अत्याचार केले तरी जनतेच्या मनांत विद्रोही वृत्ति निर्माण होत नाहीत व समाजसंघटना भंगत नाही. १९३३ च्या जूनमध्ये जर्मनीत हिटलरने एका रात्री शेकडो, हजारो लोकांची हत्या केली; पण जर्मन जनतेची त्याच्यावरची व जर्मन राष्ट्रावरची निष्ठा चळली नाही. 'फ्यूहररनी केलें तें न्याय्यच असले पाहिजे' असेच ती म्हणाली. दण्डायत्त देशांत राष्ट्रनिष्ठा अशी व्यक्तिनिष्ठ, विभूति- निष्ठ असते, पण म्हणूनच ती जास्त अंध व जास्त समर्थ होते.
वरील वर्णनावरून एक गोष्ट स्पष्ट होईल की, दण्डायत्त देशांतील नेत्यांनी जनतेंत कोणत्याहि उपायाने का होईना आपल्या मातृभूमीविषयी पराकाष्ठेची भक्ति, स्वदेशाचा प्रबल अभिमान निश्चित निर्माण केला आहे. तेथे प्रारंभी भयंकर कत्तली झाल्या, अजूनहि क्वचित् होतात. तिथे कसलेंहि व्यक्तिस्वातंत्र्य नाही आणि सर्वांत मोठी व्यथा म्हणजे अन्नवस्त्राची तेथे फार मोठी वाण आहे. असे असूनहि रशिया किंवा चीन येथील जनता स्वदेशाच्या अभिमानाने प्रेरित होऊन आपल्या नेत्यांच्या मागोमाग जाण्यास सिद्ध झाली आहे. यांत सक्तीचा, जुलमाचा, दण्डसत्तेचा भाग फार मोठा असला तरी खऱ्या निष्ठेचा, जिवंत भक्तीचाहि भाग अगदी उपेक्षणीय आहे असे म्हणता येणार नाही. त्या देशांत जाऊन आलेले शत्रुपक्षीय लोकहि तेथील जनता कांही विलक्षण उत्साहाने, चैतन्याने कांही नव्या ध्येयवादाने प्रेरित झालेली आहे असा निर्वाळा देतात. यांत एकशतांश जरी सत्य असले तरी त्याला फार मोठा अर्थ आहे; आणि यांतच त्या दण्डासत्तांचें सामर्थ्य आहे.
रशिया, चीन या दण्डसत्तांनी षडंग बल कसें प्राप्त करून घेतले आहे याचा येथवर विचार केला. त्यावरून या दण्डसत्तांनी लोकसत्तांना आव्हान दिलें आहे असें कां म्हणतात आणि त्या आव्हानांत कितपत अर्थ आहे हें ध्यानी येईल. पण या आव्हानाची चिकित्सा करीत असतांना औद्योगीकरण, शास्त्रज्ञान, राष्ट्रभक्ति यांचें जें वर्णन केलें त्यावरून या षडंग बलांत आक्षेपार्ह असें काय आहे असा एक प्रश्न निर्माण होतो. आरंभी सांगितले आहे की, पाश्चात्त्य लोकसत्ता या दण्डसत्तांना आसुरी, रानटी, हिंस्र असें म्हणतात. त्यांनी केलेली प्रगति मान्य करूनहि ती नैतिक दृष्ट्या अत्यंत हिडीस आहे, जगाला मानवतेला ते लांछन आहे, काळिमा आहे असें म्हणतात. या टीकेचा अर्थ समजावून घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आज अमेरिका जपान, जर्मनी या युद्धकाळांतल्या शत्रुराष्ट्रांना त्यांच्या उत्कर्षासाठी वाटेल तें साह्य करण्यास सिद्ध आहे. जर्मनीला युद्ध समाप्ती- नंतरच्या ७-८ वर्षांच्या काळांत अमेरिकेने १८०० कोट रुपयांचे साह्य केले आहे. हिंदुस्थान हें विस्ताराने व लोकसंख्येने फार मोठें व उदयोन्मुख असे राष्ट्र आहे. पण त्याची उदयोन्मुख सत्ता हें आपल्याला एक आव्हान आहे असे तर अमेरिका मानीत नाहीच; उलट त्याच्या उत्कर्षासाठी हरप्रकारें साह्य करावे अशीच तिची भूमिका आहे. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, कम्युनिस्ट दण्डसत्ता या उत्कर्षपथावर आहेत एवढ्यासाठीच पाश्चात्त्य सत्तांनी त्यांच्याशी दावा धरला आहे असें नाही. हा संग्राम वस्तुतः दोन राष्ट्रांमधला नसून समाजरचनेच्या दोन मूल तत्त्वांमधला आहे, आणि दण्डसत्तांनी जीं तत्त्वें स्वीकारली आहेत ती अत्यंत निंद्य व अधोगामी असल्यामुळे पाश्चात्य लोकसत्ता त्यांना रानटी, हिंस्र, सैतानी म्हणतात. हा रानटीपणा नेमका कशांत आहे तें आता आपणांस पाहावयाचे आहे. वरील विवेचन करतांना मधून मधून त्याची कांहीशी चिकित्सा केलेलीच आहे. पण कांहीशा विस्ताराने त्याचें वर्णन केलें म्हणजे एकमेकीला आव्हान देऊन रणांगणांत उतरूं इच्छिणाऱ्या या दोन शक्तींचे स्वरूप आपणांस यथार्थपणे आकळतां येईल.
रानटीपणा
औद्योगीकरण, शास्त्रज्ञान, यंत्रज्ञान, यांची अहोरात्र उपासना करणाऱ्या देशाला, आपल्या देशांतील प्रत्येक नागरिकास साक्षर करण्याची प्रतिज्ञा करून ती अल्पावधीत पार पाडणाऱ्या नेत्यांना, ज्ञानाच्या क्षेत्रांत अवघ्या चाळीस वर्षात पाश्चात्त्य राष्ट्रांवर मात करणाऱ्या सोव्हिएट रशियासारख्या राष्ट्राला 'रानटी' ही पदवी कां दिली जाते, तिचा अर्थ काय, ती कितपत सयुक्तिक आहे याचा विचार आपण करीत आहों. या रानटीपणाचें मुख्य लक्षण म्हणजे मानवतेचा, मानवी मूल्यांचा संपूर्ण अभाव हें होय. मानवी मूल्यांचा सोव्हिएट रशियांत पूर्ण लोप झाला आहे हें स्टॅलिनच्या मरणानंतर क्रुश्चेव्हने त्याच्या पापांचा व आसुरी, रानटी कृत्यांचा जो पाढा वाचला त्यावरून स्पष्ट होईल. त्या पुराव्याची गरज होती असें नाही. सर्व जगाला स्टॅलिनच्या त्या हिंस्र कृत्यांची माहिती झालेलीच होती; पण आता ती अगदी अधिकृत रीतीने मिळाली म्हणून तिचें महत्त्व रशिया म्हणजे त्या वेळी रौरव नरक होता, यमपुरीसहि बरी म्हणवीत होता, असें क्रुश्चेव्हच्या भाषणावरून दिसतें. मानवी जीवन म्हणजे सोव्हिएट सत्ताधाऱ्यांना कःपदार्थ वाटतें, किडामुंगीपेक्षा त्याला त्यांच्या लेखीं जास्त महत्त्व नाही; म्हणूनच आपल्या मताला किंवा ठरविलेल्या कार्यक्रमाला विरोध करणाऱ्या लक्षावधि लोकांना त्यांनी कंठस्नान घातले आणि ज्यांना असा मृत्युदण्ड दिला नाही त्यांना रौरव नरकापेक्षाहि भयानक अशा कॉन्सेन्ट्रेशन कँपमध्ये- गुलामांच्या कोंडवाड्यांत- वर्षानुवर्षे पिचत ठेविलें. रानटीपणा म्हणजे याहून निराळें काय असते ? आणि हें सर्व तत्त्वज्ञानपूर्वक केलें जातें. व्यक्तीला व्यक्ति म्हणून महत्त्व असतांच कामा नये, तिला स्वतंत्र अस्तित्व नाहीच, ती समाजासाठी आहे, तिने आपल्या स्वार्थाचा त्याग तर समाजासाठी केलाच पाहिजे पण याहिपेक्षा भयंकर म्हणजे आपल्या मतांचा, विचारांचा, तत्त्वांचाहि त्याग केला पाहिजे, त्यांची निंदा निर्भर्त्सनाहि केली पाहिजे व समाजाविरुद्ध म्हणजेच सत्ताधाऱ्यांविरुद्ध मत दिल्याबद्दल सर्व स्वाभिमान गिळून माफी मागितली पाहिजे, शरणागति पत्करली पाहिजे, असें सोव्हिएट रशियाचें मार्क्सवादी तत्वज्ञान आहे. तेथला समाजवाद तो हाच. एखाद्या प्रचंड यंत्रांत स्क्रू किंवा खिळा असतो तसा समाजांत मानव आहे. तो वस्तु आहे, व्यक्ति नाही. मानव हे अंतिम मूल्य नाही, तें एक साधनभूत व म्हणूनच गौण, क्षुद्र मूल्य आहे; समाज हे अंतिम मूल्य होय असा सोव्हिएट रशियाचा सिद्धान्त आहे. व्यक्तित्ववादी पाश्चात्त्य तत्त्ववेत्ते याच समाजवादी सिद्धान्ताला 'रानटी' असें म्हणतात.
हा सिद्धान्त म्हणजे केवळ तात्त्विक मतभेद नाही. त्याचा आधार घेऊन नीतीच्या शाश्वत तत्त्वांची सोव्हिएट रशियांत नित्य होळी केली जाते. घरांतला कर्ता पुरुष रशियाबाहेर पळून गेला तर त्याच्या कुटुंबीयांचा त्यांत कसलाहि अपराध नसला तरी त्यांचा अनन्वित छळ केला जातो. त्यांतून ते केव्हा मुक्त होतील ? तर पुत्राने वा कन्येने पित्याची जाहीर निंदा केली, त्याचा निषेध केला तर! पत्नीने पतीची जाहीर मानखंडना केली तर ! अशी निंदा रशियांत सक्तीने करावयाला लावतात. कुटुंबापेक्षा समाज श्रेष्ठ असल्यामुळे असें करणें तेथे युक्तच आहे. स्टॅलिन मृत्यु पावला त्या वेळी १४ डॉक्टरांच्यावर खटले भरले होते, त्यांनी पाश्चात्य साम्राज्यशाहीला वश होऊन अनेक सोव्हिएट अधिकाऱ्यांना विषाचीं इंजेक्शनें दिली व आणखी असेच अनेक घातपात केले असे त्यांच्यावर आरोप होते. त्यांनी तसे कबुलीजबाबहि लिहून दिले होते; पण त्यांच्या नशिबाने स्टॅलिन तेवढ्यांत मृत्यु पावला, आणि मागून आलेल्या सत्ताधान्याने ते सर्व खटले काढून घेऊन त्यांना निर्दोषी ठरविलें. त्यांचे कबुलीजबाब कसे असतील याची यावरून सहज कल्पना येईल. न्यायाची, सत्याची ही पराकाष्ठेची विटंबना होय. पण स्टॅलिनच्या राजवटीचें हें नित्याचेच लक्षण होतें. ती प्रकृतिच होती. सोव्हिएट सत्ताधाऱ्यांच्या हिंस्र अत्याचारांचे वर्णन करण्याचें हें स्थळ नव्हे. युरोपीय लेखकांनी ग्रंथच्या ग्रंथ भरून त्यांची वर्णने केली आहेत. त्यांच्या रानटीपणाची कल्पना यावी म्हणून एक दोन प्रकार सांगितले, इतकेंच. आजच्या रशियांतहि या दृष्टीने फारसा फरक झालेला नाही.
लोकसंख्या
सोव्हिएट रशिया व नवचीन या सत्ता मानवी मूल्यांची कदर करीत नाहीत हे आणखी एका गोष्टीवरून दिसून येतें. ती गोष्ट म्हणजे त्यांचे लोकसंख्येविषयीचें धोरण. आज सोव्हिएट रशियाची लोकसंख्या २० कोटि आहे, आणि चीनची ६५ कोटि आहे. एवढचा अफाट संख्येला जगण्यापुरतें अन्नवस्त्र देण्यास या दोन्ही सत्ता असमर्थ आहेत. सामुदायिक शेतीचे रशियाचे प्रयोग कितपत यशस्वी झाले हैं स्टॅलिननंतर आलेल्या मेलेंकाव्हने जो कबुलीजबाब दिला त्यावरून स्पष्ट होते आणि प्रारंभी सांगितल्याप्रमाणे अन्नवस्त्राच्या उत्पादनावर शक्ति फारशी खर्च नाहीच करावयाची असें रशियाचें धोरण आहे. जी जीवनधने निर्माण होतात ती वरिष्ठवर्ग, सत्ताधारी वर्ग, नवा नोकरशाहीचा वर्ग आणि शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ यांचा वर्ग यांच्यासाठी असतात. रोज बारापंधरा तास कष्ट करणारा जो शेतकरी- कामकरी वर्ग त्याला जेमतेम जगण्यापुरतें अन्नवस्त्र मिळते. पूर्वी तेंहि नव्हतें. असे असूनहि लोकसंख्येचे नियंत्रण करणे दूरच राहो, ती वाढविण्याचेंच या सत्ताधाऱ्यांचे धोरण आहे. हिंदुस्थानांतील लोकसंख्येच्या प्रश्नाचा विचार करणारे लोक सांगतात की, आपण संततिनियमन केले नाही तर आपल्या पंचवार्षिक योजना कितीहि यशस्वी झाल्या तरी कांही उपयोग होणार नाही. कारण अनियंत्रितपणे वाढणाऱ्या लोकसंख्येला पुरेसें अन्नवस्त्र आपण कधीहि निर्माण करू शकणार नाही. म्हणून सध्या आपलें सरकार कुटुंबनियोजनाचा प्रचार करीत आहे. ज्यूलियन हक्सले या विख्यात शास्त्रज्ञाने पुढील पन्नास वर्षांचा विचार करून संततिनियमन केले नाही तर मानवी संस्कृतीची पिछेहाट होऊन आपण पुन्हा जंगली अवस्थेला जाऊं असें निक्षून सांगितले आहे. असे असतांना ६५ कोटि संख्या असलेला चीन नियंत्रणाचा विचारहि करीत नाही, याचा अर्थ काय ? युद्ध, लढाई ! हीं दोन्ही राष्ट्रें युद्धकल्पनेवर जगत आहेत, आणि त्यासाठी त्यांना माणूसबळ पाहिजे आहे. माओ एकदा म्हणाला की, फक्त चीनलाच युद्धांत यश मिळणे शक्य आहे, कारण ६५ कोटींपैकी ३५ कोटि लोक मेले तरी आपल्याजवळ तीस कोटि शिल्लक राहतीलच !
मानवी जीवनाकडे पाहण्याची कम्युनिस्ट दण्डसत्तांची ही दृष्टि आहे. विपुल लोकसंख्या हे युद्धाचेंच एक साधन आहे. तोफा, बंदुका, बंदुकीच्या गोळया, तशींच माणसें ! युद्धसाहित्याचा तो एक भाग आहे. रशियांतील मजुरांच्या कोंडवाड्यांत माणसांचे इतके हाल करतात की, तेथे पांच सहा वर्षांवर माणूस जगतच नाही. पण त्यांत कांही बिघडलें असें सत्ताधीशांना वाटत नाही. पांचसहा वर्षे अठरा अठरा तास, शून्याखालच्या थंडीत काम करून, उत्पादन वाढवून माणूस मरून गेला तर त्यांत कांहीच वाईट नाही. वीज, कोळसा खपून जातो तसा माणूसहि खपून गेला तर त्यांत तोटा नाही. आपल्याजवळ अफाट लोकसंख्या आहे. कमी झाली तर आणखी निर्माण होत आहे. औद्योगिक धन, लष्करी साहित्य निर्माण करण्यासाठी तेल, वीज, कोळसा जसा वापरावयाचा तशीच माणसांची श्रमशक्ति वापरावयाची ! रशियाला, चीनला माणसांची श्रमशक्ति हवी आहे, माणूस नको आहे. आता ही श्रमशक्ति कोणत्या माणसांची ? याचें उत्तर अगदी उघड आहे. सत्ता, विद्या, धन, यांमुळे कमालीची विषमता या दोन्ही देशांत आहे. या धनांनी संपन्न असा जो वर्ग त्याची ही श्रमशक्ति नव्हे. तर राहिलेल्या शेकडा ७०-८० लोकांची ही श्रमशक्ति आहे. तेल, कोळसा यांच्याप्रमाणेच या शक्तीचा वापर हा सत्ताधारी वर्ग आपल्या सुखासाठी करीत असतो आणि म्हणून कोळसा, तेल यांचें उत्पादन, जितकें वाढेल तितकें, जसें त्याला हवें असतें, त्याचप्रमाणे मानवाची श्रमशक्ति म्हणजेच लोकसंख्या जेवढी वाढेल तितकी त्याला हवी असते. लोकसंख्येच्या वाढीची चिंता कोणाला ? ज्यांना मानवी मूल्यांचा मान राखावयाचा आहे त्यांना. प्रत्येकाला अन्न, वस्त्र, घर, शिक्षण हें हक्काने मिळाले पाहिजे, प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वाचा मान राखला राहिजे, त्याचा विकास झाला पाहिजे, हें मूलतत्त्व ज्यांना मान्य आहे त्यांना ! मानवत्व हे अंतिम मूल्य आहे हें ज्यांना मान्य आहे त्यांना लोकसंख्यावाढीचें भय. पण लोकसंख्या हा एक युद्ध साहित्याचाच प्रकार आहे असें ज्यांचे मत आहे त्यांना तिची वाढ ही चिंता नसून त्यांचें तें एक बलसाधनच आहे.
सोव्हिएट रशिया व चीन यांनी व्यक्तिस्वातंत्र्य, समता, बंधुत्व, अन्य मतांविषयी आदर, प्रातिनिधिक शासन इत्यादि लोकशाही मूल्यांचीच फक्त अवज्ञा केली आहे असें नाही. मानवाने आतापर्यंत संबंधित केलेल्या अत्यंत श्रेष्ठ नीतितत्त्वांचीहि अवहेलना ते देश करीत आहेत. मातृभक्ति, पितृभक्ति, पतिपत्नीचें प्रेम, कौटुंबिक भावना, धर्मनिष्ठा या श्रेष्ठ भावना ते नित्य पायदळी तुडवितात; आणि अत्यंत खेदाची गोष्ट ही की, तसें त्यांचे तत्त्वज्ञान आहे. इतर देशांत या श्रेष्ठ तत्त्वांची अवज्ञा अधोगामी लोक करीतच असतात; पण तेथे तें आचरण निंद्य गणले जाते. त्या लोकांची तेथे निर्भर्त्सना होते. वरील कम्युनिस्ट देशांत ही अवज्ञा तत्त्वज्ञानपूर्वक होत असते. या भावनांना बूर्झ्वा ही शिवी दिली जाते. या दण्डसत्ता रानटी आहेत, हिंस्र व पाशवी आहेत असें म्हणण्याचें हें कारण आहे. अशा स्थितीत त्या देशांत विज्ञानाचे उत्तम अध्यापन होतें, शास्त्रसंशोधन होलें, जनतेंत शिस्त निर्माण झालेली आहे, हें पाहून लोकवादी पंडितांना यांतूनच पुढे त्या देशांत लोकशाही मूल्यें निर्माण होतील अशी आशा वाटते हे वर एके ठिकाणी सांगितलेच आहे. पण तसे जेव्हा होईल तेव्हा सध्याचे समाजरचनेचे तत्त्वज्ञान त्या वेळच्या क्रांतिकारकांना समूळ उच्छिन्न करावें लागेल आणि तें न झाले तर लोकसत्तेचीं तत्त्वें तेथे जगू शकणार नाहीत. पण वर सांगितल्याप्रमाणे त्यांचे लष्करी सामर्थ्य मात्र वाढतच राहणार आणि लोकायत जगाला भीति आहे ती ही आहे. उच्च मूल्यें, उदात्त तत्त्वें, श्रेष्ठ संस्कृति न येतां लष्करी सामर्थ्य वाढत गेलें तर या सत्ता केवळ आसुरी होतील, आजच झाल्या आहेत. म्हणूनच लोकायत्त जगाला हा आपल्या सत्तांना आणि एकंदर मानवी संस्कृतीला मोठा शह आहे, मोठे आव्हान आहे असे वाटते; आणि आपण स्वीकारलेली, शतकानुशतकें जोपासलेलीं लोकशाही मूल्ये कायम टिकवून लष्करी सामर्थ्यातहि या रानटी सत्तांवर मात कशी करावयाची ही त्यांच्यापुढे मोठी समस्या आहे. आजच्या सर्व लोकसत्तांत प्रधान सत्ता म्हणजे अमेरिका. तिने ही समस्या कशी सोडविली तें आता पुढील प्रकरणांत पाहू.
+ + +