लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान/अमेरिकन लोकसत्ता आणि दण्डसत्तेचें आव्हान



प्रकरण : २

अमेरिकन लोकसत्ता आणि दण्डसत्तेचें आव्हान



 युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या लोकायत्त राष्ट्राने, या लोकसत्तेने सोव्हिएट रशिया व नवचीन या दण्डसत्तांचे आव्हान कसें स्वीकारलें तें आता पाहावयाचें आहे. या बाबतींतली मुख्य समस्या कोणती तें मागे सांगितलेच आहे. व्यक्तिस्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिष्ठा, मानवता, न्याय, सत्य, विश्वशांति, या श्रेष्ठ तत्त्वांची उपासना हा लोकायत्त समाजाचा आत्मा होय. या उदात्त मूल्यांचे रक्षण करून, त्यांना किंचितहि मुरड न घालतां दण्डसत्तांच्या बरोबरीने जड, पाशवी, लष्करी सामर्थ्याची जोपासना कशी करावयाची, अशी ही समस्या आहे. असा पेच नसता तर या दण्डसत्तांचें आव्हान स्वीकारणे हा अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला पोरखेळ वाटला असता. त्याची औद्योगिक प्रगति, शास्त्रज्ञान, शस्त्रास्त्रनिर्मिति हे इतकें अपरिमित आहे की, आज जगांतल्या इतर सर्व सत्ता एकवटल्या तरी त्याची बरोबरी करणें त्यांना शक्य नाही. मग अमेरिकेवर मात करणें दूरच राहो; पण उच्च मूल्यांचें संरक्षण करून, तें ब्रीद संभाळून युद्धसामर्थ्याची जोपासना करता येईल की नाही, असा प्रश्न असल्यामुळे जरा गंभीर विचार करणें हे लोकसत्तांना अवश्य झालें आहे.
 असे का व्हावे याचा आधी थोडा विचार करूं आणि मग अमेरिकेने या दृष्टीने काय योजना केली आहे तें पाहूं.
 उच्च मूल्ये, उदात्त कल्पना, थोर सात्त्विक विचार, विशाल ध्येयवाद यांचा समाजाने स्वीकार केला की, बारा वाटांनी दौर्बल्य त्याच्या अंतरांत शिरतें. त्याचें लढाऊ सामर्थ्य, जीवनकलहांत टिकून राहण्याचे सामर्थ्य अनेक कारणांनी कमी होते असा इतिहासाचा सिद्धान्त आहे. अमेरिकेचेच उदाहरण पाहा. उद्या सोव्हिएट रशियाशी या राष्ट्राचे युद्ध जुंपलें तर अमेरिकेतील कम्युनिस्ट निश्चित स्वदेशाविरुद्ध प्रचार करणार, ते युद्ध साम्राज्यवादी म्हणून शिक्का मारून ते भेद माजविणार, पण मतस्वातंत्र्य, मुद्रणस्वातंत्र्य या उदात्त मूल्यांमुळे अमेरिका हा प्रचार बंद करूं शकणार नाही. अमेरिकेतील कम्युनिस्ट राष्ट्रद्रोही कारस्थानेंहि करणार, रशियाला गुप्त वार्ता पुरविणार ! आता याला शिक्षा आहे. पण तो गुन्हा न्यायालयांत सिद्ध झाला पाहिजे. त्यावांचून शिक्षा करणें हा रानटीपणा होय. अमेरिका तो करणार नाही. म्हणजे पुन्हा डोळ्यांदेखत दौर्बल्य आले. रशियांत हा प्रश्नच नाही. मतस्वातंत्र्य, व्यक्तिस्वातंत्र्य हीं खुळें तेथे नाहीत. न्यायालयांत गुन्हा सिद्ध झाला पाहिजे असा वेडगळ (!) आग्रहहि तेथे नाही. संशय आला की पुरे. मनुष्य यमसदनास धाडून देण्यास तेथे कसलाच प्रत्यवाय नाही. म्हणजे भेद होण्याचा तेथे संभवच नाही. म्हणजे दौर्बल्य नाही. सामर्थ्य अभंग आहे. हें कशामुळे तर रानटी मूल्यें स्वीकारल्यामुळे ! कम्युनिस्टच लढाईला विरोध करतात असे नाही. शांततावादी, अगदी प्रामाणिक शांततावादी लोकहि युद्धविरोधी असतात. त्यांचा विवेक त्यांना स्वस्थ बसू देत नाही. पहिल्या महायुद्धाच्या वेळीं ब्रिटनमध्ये अशा युद्धविरोधी सभा भरत, भाषणें होत, आणि विवेकस्वातंत्र्य हें उच्च मूल्य ब्रिटनने स्वीकारले असल्यामुळे अशा सभांना तेथे पूर्ण मुभा असे. रशिया, चीन, पूर्वजर्मनी येथे अशा सभा होणें शक्य नाही, म्हणजे भेदसंभव नाही.
 व्यक्तिस्वातंत्र्य, मुद्रणस्वातंत्र्य, याप्रमाणेच संघस्वातंत्र्य हेहि लोकशाहीचें एक मूलतत्त्व आहे; त्यामुळे लोकायत्त देशांत वाटेल तितके पक्ष स्थापतां येतात, कामगारांना संघटना करतां येतात, आणि वाटेल त्या वेळी संपहि करता येतो. ऐन युद्धकाळांत कामगारांचा संप लोकायत देशांत पूर्ण शक्य आहे. गिरण्या, कारखाने, रेल्वे, येथील कामगारांनी युद्धकाळी संप केला तर दुसऱ्याच दिवशी युद्ध बंद पडेल आणि राष्ट्राचा पराभव होईल. १९१७ साली रशियांत क्रांति झाली. त्या वेळी अनेक भांडवली लोकायत्त राष्ट्रांनी रशियावर आक्रमण केलें. तें अयशस्वी होण्याचें एक कारण असें की, त्या वेळी ब्रिटन, अमेरिका या देशांतील कामगारांनी संप करून उत्पादन बंद पाडण्याची धमकी दिली. लोकशाहीचीं उच्च मूल्यें स्वीकारलेल्या या देशांना त्या वेळी माघार घ्यावी लागली. हें उदात्त तत्त्वांमुळे आलेले दौर्बल्य होय. अत्यंत जहाल व आक्रमक राष्ट्रवादाचा प्रचार करून नागरिकांचीं मनें परकीयांच्या द्वेषावर सतत पोशीत राहणें, त्यांना सतत युद्धोन्मुख करून ठेवणें, ही गोष्ट कोणत्याच दृष्टीने श्रेयस्कर नाही. पूर्वपरंपरेचा अभिमान नित्य जागृत ठेवणें, प्राचीन थोर विभूतींची सतत पूजा करीत राहणें हें युक्त व इष्ट आहे. पण माणसें खरी धुंद व पिसाट होतात तीं या अभिमानाला द्वेषाची जोड मिळेल तेव्हा ! तसें करणें हें संस्कृतीच्या वरच्या पातळीवर गेलेल्यांना फारसें शक्य होत नाही. पण मग माणसें व्हावी तितकी अविवेकी, बेहोष, धुंद व पिसाट, म्हणजेच युद्धोन्मुख होत नाहीत; आणि जो पिसाट नाही तो बहुधा बलहीन असतो. दण्डायत्त कम्युनिस्ट देशांत अशा उच्च संस्कृतीचा प्रश्नच नाही. त्यांनी अहोरात्र युद्धपिपासा जागृत ठेवण्याचेंच धोरण ठेविलें आहे. मार्क्सवादाचें मूलतत्त्वच संग्राम, द्वंद्व हे आहे. क्षणकाल सोव्हिएट नेते, युद्ध नको म्हणत असले, शांततावादाचा पुरस्कार करीत असले तरी तो एक राजकारणांतला डावच होय. एरवी परक्यांचा द्वेष, युद्ध या कल्पना हीच त्यांची प्रकृति आहे.
 पराकाष्ठेची अंध विभूतिपूजा हें एक सामर्थ्यकारण आहे. सोव्हिएट नेत्यांनी ती कोणत्या थराला नेलेली आहे हें वर सांगितलेच आहे. व्यक्तिस्वातंत्र्य संपन्न, लोकायत्त देशांत अशी पूजा कालत्रयीं शक्य नाही. बुद्धिवाद हें अत्यंत मोठे मूल्य तेथे समाजरचनेला पायाभूत झालेलें असतें. अंध व्यक्तिपूजेचा तेथे नुसता वास आला तरी शास्त्रज्ञ, ग्रंथकार, तत्ववेत्ते हे उसळून उठतीलच. पण ब्रिटन-अमेरिकेत सामान्य जनताहि संतापून उठेल. याचाहि अर्थ हाच की अप्रगत, अज्ञ, रानटी समाजांतील एक बलसाधन उच्च मूल्यांच्या स्वीकारामुळे सुसंस्कृत समाजाच्या हातांतून नाहीसें झालेलें असतें. सत्य, प्रखर शास्त्रीय सत्य, हे सुसंस्कृत समाजाचे ध्येय असतें. सत्यापलाप त्याला चालत नाही. १९४५ साली अमेरिकेने ६ ऑगस्टला हिरोशिमावर ॲटमबाँब टाकले. रशियाने जपानशीं युद्ध पुकारलें तें ८ ऑगस्टला. म्हणजे त्यापूर्वीच जपानचे प्रतिकारसामर्थ्य नष्ट झालें होतें. असे असून आज सोव्हिएट रशियाचे अधिकृत इतिहासकार सांगतात की, रशियाने जपान आधीच जिंकून जमीनदोस्त केला होता. ॲटमबॉब टाकण्याची जरुरी नव्हती. रशियाच्या हातचें यश लाटण्याच्या हेतूनेच अमेरिकेने हे बाँब टाकले. आता हा सत्यापलाप ब्रिटन-अमेरिकेत क्षणभरहि टिकणार नाही. तेथील राजकारणी लोक एखादे वेळी असा अपलाप करण्याचा प्रयत्न करतील, पण तेथील इतिहासकार व तत्त्ववेत्ते त्यांचे वाभाडे काढल्यावांचून राहणार नाहीत. मागल्या काळांत व्यक्तिस्वातंत्र्य पूर्णतेस गेलें नव्हतें त्या वेळी सुद्धा बर्कने वारन् हेस्टिग्जला नको जीव करून टाकले. मग आज तर काय होईल याची कल्पनाच केलेली बरी. पण रशियांत हें विधान जनतेने पूर्ण श्रद्धेने स्वीकारलेले आहे. स्वीकारणें तिला भागच आहे. यावर तिच्या अहंकाराचा पोष होतो. आपण जपानचा पराभव केला या विश्वासाने तिचें सामर्थ्य वाढतें हें उच्चमूल्याश्रयी लोकायत्त राष्ट्रांना कसे शक्य आहे ! १८५७ चें बंड हें स्वातंत्र्ययुद्ध होतें, या विधानाची टवाळी हिंदी विद्वान् करू शकतात. हे रशियांत शक्य नाही. यावरूनहि हैं स्पष्ट होईल की, अंधश्रद्धेने, असत्याने अहंकार पोसणें हें सुसंस्कृत देशांत शक्य नाही. म्हणजे आणखी एक बलसाधन गेलें.
 उच्च संस्कृतीचें रक्षण व त्याबरोबरच संरक्षणसामर्थ्याची जोपासना हे कसें साधावें हा प्रश्न आज लोकायत्त राष्ट्रांपुढे नव्यानेच आला आहे असें नाही. मानवसमाजांत संस्कृतीचा उदय झाला तेव्हापासूनच ही समस्या त्याच्यापुढे येऊन पडलेली आहे. संस्कृतीच्या वरच्या पायरीवर गेलेल्या समाजांचा रानटी टोळ्यांनी नाश केल्याची कितीतरी उदाहरणें मागल्या इतिहासांत आहेत. याचेंहि कारण हेंच आहे. उच्च मूल्यांचा स्वीकार केल्याबरोबर समाजाचें लढाऊ सामर्थ्य निश्चित कमी होते; आणि ही उणीव अन्य उपायांनी भरून काढण्याची सावधगिरी जे समाज घेत नाहीत त्यांचा नाश होतो. सुधारणेची पहिली पायरी म्हणजे कृषि व पशुधन यांनी प्राप्त होणारें स्थिर जीवन ही होय. पण हें येतांच माणूस घरांत राहू लागतो. थोडे बरे कपडे करतो, थोडा मृदु मनाचा होतो. जनावरावरहि त्याची माया जडते. कुटुंबप्रेम हें तर त्याच्या सर्व संस्कृतीचें सार असतें. उलट भटक्या स्थितीत राहणारे लोक नित्य थंडी, वारा, पाऊस, ऊन सोशीत असतात. साहजिकच ते जास्त काटक, बळकट व टणक असतात. त्यांच्या तुलनेने स्थिरजीवनांत प्रवेश करणारे शेतकरी शरीरबळांत कमीच पडणार. दुसरें असें की, शेती, घरदार, प्रपंच करून स्थिर जीवनांत राहणाऱ्या समाजाला त्या जीवनांत कांही भावबंध निर्माण झालेले असतात. कांही आशाबंध, कांही लभ्य, कांही संरक्षणीय निर्माण झालेलें असतें. म्हणून त्यांतील व्यक्तींच्या प्राणांची किंमत वाढलेली असते. भटक्या जीवनांत यांतलें कांहीच नसतें. शेतकीची चांगली मशागत करून ती जिंदगी आपल्या मुलाला ठेवावी अशी किंवा या तऱ्हेची ओढ भटक्यांना मुळीच नसते. त्याचें घरदार सर्व बरोबरच. अपत्यांना वाढविणे, त्यांना शिक्षण देणें व मिळविलेल्या धनाचा व संस्कृतीचा वारसा त्यांना ठेवणें हा स्थिर जीवनांतला प्रकार त्यांना माहीतच नसतो. शाश्वत लभ्य, संरक्षणीय असें त्यांना कांहीच नसतें. त्यामुळे ते किसानवृत्ति मनुष्यापेक्षा प्राणावर जास्त उदार असतात; आणि जो प्राणावर उदार तो जास्त शूर हा तर युद्धशास्त्रांतला पहिला सिद्धान्त आहे. संस्कृति आली की, प्राणाची किंमत वाढते व त्यांतूनच दौर्बल्य निर्माण होतें. महाभारतांत म्हटल्याप्रमाणे जे 'जीवितेषु निराश' ते खरे बलसंपन्न, ते पराक्रमी. त्यांच्यापुढे लढाईंत कोणीच टिकत नाही.
 पण संस्कृतीमुळे, उच्च तत्त्वामुळे येणारें हें जें दौर्बल्य, शौर्य साहसांत त्यामुळे येणारी जी उणीव, ती भरून काढण्याची साधनें सुदैवाने संस्कृतीतूनच हाती लागतात. घरदार, शेती, प्रपंच, अपत्यें यांचा पाश नसल्यामुळे रानटी मनुष्य जास्त शूर होतो हें खरें पण या प्रपंचावरचें मनुष्याचें प्रेम अत्यंत उत्कट झाले, प्राणार्पण करूनहि त्याचें रक्षण केलें पाहिजे अशा कोटीला हे प्रेम, ही भक्ति गेली तर त्या भक्तीमुळेच मनुष्य रानटी माणसा- इतका किंवा त्याच्यापेक्षाहि जास्त शूर होतो. धर्म, नीति यांच्या संस्काराभावी रानटी मनुष्य स्वभावतःच क्रूर असतो व अचाट साहसी कर्माला तो नेहमीच सिद्ध असतो. पण सुसंस्कृत समाजांत धर्मनिष्ठाच इतकी प्रबल करतां येते की, त्या धर्मरक्षणासाठी रानट्यांपेक्षा दसपट साहसी कर्मे करण्यास मनुष्य सिद्ध होतो. व्यक्तिस्वातंत्र्य, संघस्वातंत्र्य या उच्च मूल्यांचे असेंच आहे. यांनी भेद बळावण्याचा संभव आहे हें खरें; पण यांतूनच जी बुद्धिनिष्ठा, विवेकनिष्ठा निर्माण होते ती पुरेशी प्रबल झाली तर व्यक्तिस्वातंत्र्यामुळे समाज छिन्नभिन्न होत नाही. ब्रिटनमध्ये युद्धकाळांतहि युद्धविरोधी प्रचारास मुभा होती. पण असा प्रचार कितीहि झाला तरी सर्व राष्ट्राने तसा विचार निश्चित करून पार्लमेंटमध्ये तसा ठराव करीपर्यंत एकहि ब्रिटिश नागरिक रणांगण किंवा युद्धकार्य सोडणार नाही ही ब्रिटिश अधिकाऱ्यांना खात्री असते. म्हणूनच त्यांना इतरांप्रमाणे व्यक्तिस्वातंत्र्याची भीति वाटत नाही. ब्रिटिश लोकांच्या या विवेकनिष्ठेमुळेच, उच्च मूल्यांमुळे येणारी दौर्बल्यें त्या समाजांत शिरत नाहीत. स्थिरजीवनांतून संस्कृति जोपासली जाते व त्यांतूनच बुद्धीची वाढ होते. ही बुद्धि मनुष्याला मुत्सद्देगिरी, रणपांडित्य, विज्ञान व तज्जन्य श्रेष्ठ मारक हत्यार प्राप्त करून देते; आणि रानट्यांच्या उपजत शौर्यधैर्यावर सुसंस्कृत मनुष्याला बुद्धिबळाने सहज मात करतां येते. यावरून असें दिसतें की, उच्च मूल्यांमुळे येणारें दौर्बल्य नष्ट करण्याचे उपाय उच्च संस्कृतींतून, उच्च मूल्यांतूनच साध्य होत असतात. जे समाज सावध राहून त्यांचा अवलंब करतात त्यांना हीनमूल्य रानटी समाजाची भीति बाळगण्याचें कांहीच कारण नसतें. पण हिंदूंसारखे जे समाज व्यक्तिस्वातंत्र्याबरोबर विवेकनिष्ठा, नीतिमत्ता यांची जोपासना करीत नाहीत, संस्कृतीमुळे येणाऱ्या शरीर- दौर्बल्याची, श्रेष्ठ मारक हत्यार, श्रेष्ठ संहारक शक्ति शोधून, जे समाज भरपाई करीत नाहीत, विभूतिपूजा, अंधनिष्ठा यांचा त्याग करतात, पण त्यामुळे गेलेलें सामर्थ्य बुद्धिनिष्ठ धर्मतत्त्वांचा अवलंब करून परत प्राप्त करून घेण्याची व्यवस्था जे समाज करीत नाहीत, अहिंसा, भूतदया मानवता यामुळे येणारी मृदुता व तज्जन्य प्रतिकारशक्तींची कमतरता श्रेष्ठ संघनीतीने जे नाहीशी करीत नाहीत ते समाज हीनमूल्य रानटी समाजाच्या आक्रमणाला सहज बळी पडतात. संस्कृतीमुळे धनैश्वर्य वाढत जातें, पण त्याच वेळी संयम, जितेंद्रियवृत्ति, निग्रह हे थोर गुण बाणवण्याची काळजी घेतली नाही तर समाज नाश पावतो. या सगळ्याचा अर्थ असा की, उच्च मूल्यांमुळे, श्रेष्ठ संस्कृतीमुळे लढाऊ लष्करी सामर्थ्यात उणीव निर्माण होते हे जाणून त्या श्रेष्ठ संस्कृतींतूनच निर्माण होणारे धर्मनिष्ठा, नीतिनिष्ठा, संघविद्या, विवेकबल हे गुण व संस्कृतींतूनच प्राप्त होणाऱ्या बुद्धिसामर्थ्याच्या जोरावर प्राप्त होणारें शास्त्रज्ञान, औद्योगिक धन व तज्जन्य श्रेष्ठ संहारसामर्थ्य यांची जोपासना जो समाज करतो त्यालाच रानटी शक्तीचे आव्हान स्वीकारतां येतें. तिच्यावर मात करतां येते. या दृष्टीने अमेरिकेच्या एकंदर सामाजिक राष्ट्रीय सामर्थ्याचा आता आपणांस विचार करावयाचा आहे.
 २१ मे १९५६ या दिवशी पहाटे अमेरिकेने पॅसिफिक महासागरांत एच्. बाँब प्रक्षेपणाचा प्रयोग केला. विल्यम लॉरेन्स या शास्त्रज्ञाने त्याचें प्रत्यक्ष पाहून केलेले वर्णन 'तिसरे महायुद्ध घडणें अशक्य आहे' या आपल्या लेखांत दिले आहे. त्यांत नेमका हाच विचार पुलिट्झर पारितोषिक मिळविणाऱ्या या शास्त्रज्ञाने मांडला आहे. हा अग्निगोल म्हणजे अमेरिकेची व एकंदर लोकायत जगाची संरक्षक ढाल आहे, असें तो म्हणतो. याचे कारण असें की, या अग्निगोलाच्या ठायीं प्रलयंकर संहारसामर्थ्य आहे. कांही शास्त्रीय हिशेब देऊन त्याने असें दाखविलें आहे की, दुसऱ्या महायुद्धांत प्रारंभापासून अखेरपर्यंत जेवढे अग्निगोल टाकले गेले त्याच्या पांचपट संहारशक्ति या एच्. बाँबची आहे. नागासाकीवर टाकलेले ॲटमबाँब या अग्निगोलापुढे केवळ ठिणग्या होत. या गोलाच्या ठायीं असें प्रलयसामर्थ्य असल्यामुळेच जगाला प्रलयाचे आता भय नाही असें हा लेखक म्हणतो. कोणाहि आक्रमकाला अमेरिकेवर आक्रमण म्हणजे केवळ आत्मघात आहे हें यावरून सहज ध्यानांत येईल; आणि यामुळेच जगाचें संरक्षण करण्यास, युद्धकल्पना अशक्य करून टाकण्यास हा अग्निगोल समर्थ आहे असें विल्यम लॉरेन्स याचें मत आहे.
 अमेरिकेतल्या इतर अनेक लेखकांनी अशाच तऱ्हेचे विचार प्रकट केले आहेत. त्यावरून हें ध्यानांत येईल की, उच्च सांस्कृतिक मूल्ये स्वतःच आत्मरक्षणाला समर्थ असतात, असला भ्रम अमेरिकेला नाही. भारताला असा भ्रम नित्य होत असतो. किंबहुना भारताची ही एक कायमचीच व्याधि आहे व तिच्यामुळेच तो कायमचा जर्जर व पंगु होऊन बसलेला आहे. रस्त्याने चाललेल्या अबलेची कोणीहि टवाळी करावी, कोणीहि तिचा पदर ओढावा, कोणीहि तिच्यावर अत्याचार करावा अशी गेलीं हजार वर्षे भारताची स्थिति आहे. अरब, अफगाण, मोंगल, तार्तर, पोर्तुगीज, डच, फ्रेंच, इंग्रज यांनी आतापर्यंत हेच केलें आहे; आणि आता पाकिस्तानी, चिनी यांनी तोच प्रकार आरंभिला आहे. पण आम्हीं स्वीकारलेली सत्य, अहिंसा, मानवता, शांतता, अप्रतिकार, पंचशील, व्यक्तिस्वातंत्र्य, समता, बंधुता, जगत्कल्याण हीं उच्च मूल्येच आमचें रक्षण करतील अशी आमची श्रद्धा आहे. (पंडितजी, विनोबाजी, जयप्रकाशजी यांची भाषणे पाहा.) त्यामुळे आपण प्रस्थापिलेल्या लोकसत्तेला कोणी आव्हान देईल, तिला कशाची भीति आहे, असें आपल्याला वाटतच नाही. अमेरिकन शास्त्रज्ञ, तत्त्ववेत्ते, इतिहास पंडित, मुत्सद्दी यांचें मत निराळें आहे. श्रेष्ठ मूल्यांचे संरक्षण श्रेष्ठ संहारशक्तीने होतें असें त्यांना वाटतें.
 जेम्स मिचनेर या विख्यात अमेरिकन लेखकाने (व्हाइल अदर्स स्लीप) 'या निशा सर्वभूतानाम्' या आपल्या लेखांत अमेरिकेच्या स्ट्रॅटेजिक एअर कमांड (एस. ए. सी.) चें याच दृष्टीने वर्णन केलें आहे (रीडर्स डायजेस्ट जाने. '५८) सोव्हिएट रशिया लोकायत्त जगावर आक्रमण करील ही अमेरिकेला नित्य भीति वाटते. कारण आज रशियन नेते शांततेचीं भाषणे करीत असले तरी आक्रमक युद्ध, विश्वविजय, हे त्यांच्या जीवनाचें तत्त्वज्ञानच आहे. म्हणून या शत्रूची क्षणभरहि उपेक्षा करता कामा नये असें पाश्चात्त्य जगाचें निश्चित धोरण आहे. त्यासाठीच अमेरिकेने चार भिन्न ठिकाणी लष्करी तळ ठेवून तेथे बी ४७ जेट बॉबर विमानें, त्यांचे वैमानिक आणि प्रलयंकर अग्निगोल अहोरात्र, चोवीस तास सन्नद्ध स्थितींत ठेवलेले आहेत. अध्यक्षांची आज्ञा येतांच वीस मिनिटांत ही संहारदेवता आपले प्रलयनृत्य सुरू करील. इंधनासाठी मध्ये न उतरतां, एका दमांत पृथ्वीप्रदक्षिणा करतां येईल अशी या विमानांत व्यवस्था आहे. ताशी ५०० मैल वेगाने हीं धावतात; आणि दुसऱ्या महायुद्धांतल्या सर्व संहारशक्तींपेक्षा जास्त घातक शक्ति या एकेका विमानांत असते. अशी शंभर विमानें अमेरिकेने एकेक तळावर ठेविली आहेत. सोव्हिएट रशियाने हें सामर्थ्य जाणावें, त्याला याची संपूर्ण माहिती व्हावी अशीच अमेरिकेची इच्छा आहे. कारण यामुळेच या महाशक्तीचा उपयोग करण्याची वेळ येणार नाही व जगांत युद्ध अशक्य होईल अशी अमेरिकेची खात्री आहे. हीं अणुशस्त्रे कोणीच वापरू नयेत असा सोव्हिएट रशियाने प्रचार चालविला आहे; आणि आपण शांततावादी आहों, असें तो भासवीत आहे. पण असें केल्यास, या परमोदार तत्त्वाला अमेरिका बळी पडल्यास. जगाचा निश्चित नाश ओढवेल असें तेथील नेत्यांचे मत आहे. लोकायत्त देशांतील श्रेष्ठ मूल्यांचे रक्षण करण्यास दुसरे कोणतेंहि साधन सध्यातरी आपल्याजवळ नाही, असें लेखाच्या शेवटी मिचनेरने बजावलें आहे.
 पॉल पामर या लेखकाने अमेरिका व रशिया यांच्या बलाविषयी अमेरिकेच्या तीन मोठ्या लष्करी अधिकाऱ्यांची मुलाखत घेतली. अमेरिकेच्या नौदलाचे प्रमुख ॲडमिरल बर्क, विमानदलाचे उपसेनापति जनरल ली मे व ॲटॉमिक एनर्जी कमिशनचे अध्यक्ष लेविस स्ट्रास हे ते अधिकारी होत. तिघांच्याहि मतांचा इत्वर्थ असा की, सोव्हिएट रशियाशी नजीकच्या भविष्यकाळांत युद्ध उद्भवण्याचा संभव नाही; कारण आपले लष्करी सामर्थ्य कोणत्याहि आपत्तीला तोंड देण्यास पूर्ण सिद्ध आहे. तें क्षीण झालें तर मात्र युद्ध अटळ आहे. रशियाची प्रगति कौतुकास्पद आहे हें खरें. शास्त्रांत, औद्योगिक उत्पादनांत, व कांही प्रक्षेपणास्त्रांत त्याने अलीकडे खूपच भरारी मारली आहे; पण आपली बरोबरी करण्यास त्याला अजून फार काळ लागेल. मात्र आपण नित्य डोळयांत तेल घालून जागे राहिलें पाहिजे; कारण लोकशाही जगाशी रशियाचें उभें हाडवैर आहे. तें त्याने बोलून दाखविलें आहे; आणि आपल्या जनतेला कायमचे युद्धोन्मुख करून ठेवणें हें त्याचें धोरण आहे, म्हणून आपल्याला लढाई गृहीत धरून सन्नद्ध, सुसज्ज राहिलें पाहिजे.
 लष्करी सामर्थ्य, संहारशक्ति यांचा विचार झाल्यावर पामरने दुसरा प्रश्न या अधिकाऱ्यांना विचारला. नेहमी सन्नद्ध व सुसज्ज राहावयाचें तर त्या दृष्टीने अमेरिकन जनतेला आपल्या जीवनांत कांही बदल करावा लागेल काय ? रशिया सर्व शक्ति लष्करी निर्मितीवर केंद्रित करतो, जीवनधन पुरेसें निर्माण करीत नाही. त्यामुळेच त्याला कांही क्षेत्रांत आघाडी मारता आली असें आपण म्हणतां मग आपल्यालाहि तोच मार्ग अनुसरावा लागेल काय ? आपल्याला अर्वाचीन स्पार्टा व्हावें लागेल काय ? आपले जीवन आज सुखी व समृद्ध आहे, आणि व्यक्तिस्वातंत्र्याचें वैभवहि आपल्याजवळ आहे. अफाट लष्करी खर्च पेलण्यासाठी आणि इतर दृष्टींनी आपल्याला या पातळीवरून खाली येणें अवश्य आहे काय ?
 तीनहि अधिकाऱ्यांनी याला नाही असे उत्तर दिले आहे. व्यक्तिस्वातंत्र्य कमी करण्याचा तर प्रश्नच नाही. समृद्धीचा थोडा प्रश्न आहे. त्यांतहि आज काटछाट करण्याची जरुरी नाही. वेळ आली तर आपल्या स्वातंत्र्यासाठी वाटेल तो त्याग करण्यास अमेरिकन जनता सदैव सिद्ध असते. त्यामुळे आज कसलाहि बदल करण्याची जरुरी नाही. आपण सध्या २०००० कोटी डॉलर्स दरसाल लष्करावर खर्च करतोंच आहों. हा त्याग कांही कमी नाही. यांतून पुरेसें लष्करी सामर्थ्य आज निर्माण होत आहे. हा त्याग करण्याची सिद्धता ठेवली म्हणजे झालें. मग आपल्याला आक्रमणाचें भय नाही.
 अमेरिकेच्या या लष्करी शस्त्रास्त्रामागे केवढे शास्त्रज्ञान व केवढे औद्योगिक धन उभे आहे हे सर्वांना माहीतच आहे. त्याचें विवरण करण्याची आवश्यकता नाही. कांही थोडे आंकडे दिले की, हें चित्र सहज उभ राहील. अमेरिकेचे राष्ट्रीय उत्पन्न दरसाल दीड लक्ष कोटि रु. आहे. तेथील लोकसंख्या अठरा कोटि आहे. ब्रिटनचे राष्ट्रीय उत्पन्न वीस हजार कोटी रु. असून लोकसंख्या पांच कोटि आहे. भारताचे राष्ट्रीय उत्पन्न सध्या ११००० कोटि रु. आहे आणि पांचव्या पंचवार्षिक योजनेच्या अखेरीस तें २७००० कोटींपर्यंत वाढवावे अशी आपली आकांक्षा आहे. आपली लोकसंख्या ४२ कोटि आहे. या हिशेबाने अमेरिकेचें दरसाल दर माणशी उत्पन्न दहा हजार रु. आहे, तर ब्रिटनचे ८००० रुपये, पाकिस्तानचे ३५० रु. आणि भारताचे ३०० रु. आहे. अमेरिका दरसाल १० कोटि मेट्रिक टन पोलाद निर्माण करते. रशिया ४५ कोटिटन, पश्चिम जर्मनी २४ कोटि टन, ब्रिटन २ कोटि टन, चीन २९ लक्ष टन, हिंदुस्थान १७ लक्ष टन व पाकिस्तान ११ लक्ष टन पोलाद निर्माण करते. एका पोलादाच्या निर्मितीवरून बाकीच्या औद्योगिक धनाची कल्पना येईल. एकंदर जगांत जे रेडिओ आहेत त्यांतील शे. ४८ अमेरिकेत आहेत. जगांतील टेलिफोनपैकी शे. ५७ टेलिफोन व मोटरींपैकी शे. ७६ मोटरी अमेरिका वापरते. जगांतल्या एकंदर तेलापैकी शे. ६० व पोलादापैकी शेकडा ४७ अमेरिका निर्माण करते. १८५० साली अमेरिकेतील कामगाराला आठवडयांतून ७२ तास काम करावे लागे. आज तेथे ४० तासांचा आठवडा आहे. चीन, रशिया येथील कोंडवाड्यांतून रोज वीसवीस तास कामगाराकडून काम करून घेतात.
 अमेरिकेचें शस्त्रास्त्रबल, औद्योगीकरण व त्या राष्ट्राचे ऐहिक ऐश्वर्य यांचा विचार केला. पण मागे एके ठिकाणी सांगितल्याप्रमाणे लष्करी सामर्थ्यं एवढ्यावरच अवलंबून नाही. अत्यंत संघटित असें राष्ट्र हें लष्करी सामर्थ्याचें खरें लक्षण होय. त्याचा आता विचार केला पाहिजे. सामान्यतः आर्थिक, सामाजिक, धार्मिक इ. अनेक भेदांनी अनेक देशांत समाज छिन्नभिन्न झालेला असतो आणि राष्ट्रसंघटनेच्या आड हे भेद किंवा ही विषमता प्रामुख्याने येत असते. त्यांतील आर्थिक विषमता हें सर्वांत घातक असें जें भेदकारण त्याचा विचार आपण प्रथम करूं. दण्डायत्त देशांत ही विषमता असतेच. ती पराकोटीला पोचलेली असते. पण यमदण्डाच्या जोरावर तेथील नेते दरिद्री जनतेला नियंत्रणात ठेवून संघटना टिकवून धरीत असतात. अंधविभूतिपूजा हा त्यांचा दुसरा एक प्रभावी मार्ग असतो हे वर सांगितलेच आहे. लोकसत्तेला यांतल्या कोठल्याच उपायाचा अवलंब करता येत नाही. एकारलेल्या संपत्तीचा निचरा करणें, विषमता नष्ट करणें हा एकच उपाय येथे शक्य आहे. अमेरिकेने त्याचा अवलंब कसा केला तें पाहू.
 शंभर वर्षांपूर्वी मार्क्सने भविष्य करून ठेविलें होतें की, यापुढे भांडवलदारांची, धनिकांची श्रीमंती वाढत जाईल आणि कामकरी, शेतकरी हा जास्त दीन, दरिद्री होत जाईल आणि शेवटी या दोन वर्गांत कमालीची विषमता निर्माण होऊन त्यांतून भयंकर वर्गविग्रह निर्माण होईल. मार्क्सचें हें भविष्य खरें झालें असतें, तर आज जगांत कोठेहि लोकसत्ता दृष्टीस पडली नसती.
 असल्या विषमतेंत लोकसत्ता कधीच टिकत नसते. अमेरिकेत गेल्या शतकाच्या अखेरीस तशी परिस्थिति निर्माण झाली होती; पण अमेरिकन भांडवलदार, अमेरिकन मुत्सद्दी व नेते हे शहाणे आहेत. त्यांनी हळूहळ एकारलेल्या संपत्तीचा निचरा करून वर्गविग्रहाचा पायाच नष्ट करून टाकला. आज अमेरिकेत भांडवलदार वर्गाइतकेच मध्यम वर्ग व कामगार वर्ग प्रभावी आहेत. राष्ट्रीय जीवनावर, संस्कृतीवर, राजकारणावर तेहि धनिकांइतकेच वर्चस्व गाजवू शकतात. शिक्षणाचा प्रसार हें त्याचें एक कारण आहे, पण त्या शिक्षणामुळेच त्यांना प्राप्त झालेले धननियंत्रणाचें सामर्थ्य हेहि एक प्रभावी कारण आहे. हॉरवर्ड विद्यापीठांतील अर्थशास्त्राचे प्राध्यापक समनर स्लीचर यांनी अमेरिकेतील या शांततामय क्रांतीचे चांगलें विवेचन केलें आहे. इंजिनीयर, डॉक्टर, वकील, प्राध्यापक, तंत्रज्ञ, लेखक, संपादक, हिशेबनीस, व्यवस्थापक हा फार मोठा मध्यमवर्ग गेल्या ७५ वर्षांत निर्माण झाला आहे. या वर्गातील स्त्रियाहि आता व्यवसायांत उतरल्या आहेत. त्यामुळे सध्या या वर्गातील अनेक कुटुंबांचें मासिक उत्पन्न २५०० ते ५००० रु. पर्यंत असतें. १९३५ ते १९५० या पंधरा वर्षांत अगदी तळाशी असलेल्या लोकांपैकी अनेक लोकांची क्रयशक्ति शे. ७८ पर्यंत वाढली, तर शिखराशी असलेल्या धनिकांची क्रयशक्ति शे. १७ वाढली. अशा स्थितीत वर्गविग्रहाच्या धारा बोथट होऊन गेल्यास नवल नाही. शिक्षण हें सार्वत्रिक व मोफत झाल्यामुळे पूर्वीच्या कष्टकरी वर्गांतील अनेक लोक आता उच्चपदीं जाऊं शकतात. बहुतेक कांहीना कांही व्यवसाय वा तंत्र ते शिकतात. त्यामुळे केवळ हमाली करणारा वर्ग अमेरिकेतून नाहीसा होत आहे; आणि जो थोडा आहे तो अगदी दुर्मिळ झाल्यामुळे त्याला भरमसाट पैसे मिळतात. अमेरिकेत चांगल्या सधन कुटुंबालाहि हल्ली गडी वा मोलकरीण परवडत नाही, इतका त्यांचा पगार भारी झाला आहे. याच वर्गांत ९० टक्के लोक येऊन पडतील असें मार्क्सचें भविष्य होते. त्यांत सध्या शे. १० सुद्धा नाहीत.
 कामगारांची तर अमेरिकेत इतकी सुस्थिति आहे की अमेरिकेतील अत्यंत मोठ्या कामगार संघटनांचे एक अध्यक्ष वाल्टर सेनेरॅझो यांनी कंपनीच्या कारखान्याच्या हिताहिताची आपण काळजी वाहिली पाहिजे, पगारवाढ मागतांना कारखान्याला इतकी पगारवाढ परवडेल का नाही, याचाहि विचार आपण केला पाहिजे असा आपल्या अनुयायांना उपदेश केला आहे. याचे कारण काय ? अमेरिकेत अनेक कारखानदार सध्या कामगारांच्यापुढे हिशेब मांडून त्यांच्या सहकार्यानेच काम चालविण्याचें धोरण आखीत आहेत. भांडवलदार, व्यवस्थापक व कामगार हे कारखान्याचे तीन समबल घटक असून या पद्धतीला सहकारी भांडवलशाही म्हणावें असे सेनेरॅझो म्हणतात. जेव्हा जेव्हा पगारवाढ मागावयाची तेव्हा कामगारांनी आपली उत्पादनशक्ति आपण वाढविली आहे काय, याचा विचार आधी केला पाहिजे. कंपनीचें उत्पन्न वाढले नसतांना पगारवाढ मागणें हें अंतीं कामगारांनाच घातक ठरतें; कारण तितक्या वस्तूंच्या किंमती वाढून बसतात, आणि न वाढल्या तर कंपनीचा तोटा होतो असा विचार अमेरिकेंतील कामगार नेते करूं शकतात. याला फार मोठा अर्थ आहे. कंपनीच्या कारखान्याच्या नफातोट्यांत त्यांचें हिताहित असावें इतकें या अर्थव्यवस्थेवर त्यांचे नियंत्रण सध्या आहे, हें स्पष्ट आहे. यामुळे सरकारी नियंत्रणास, सरकारी हस्तक्षेपास कामगारांचा अमेरिकेत विरोध आहे. ही खरी लोकशाही होय. कायद्याने केलेलें अर्थ नियोजन, म्हणजेच समाजवादी अर्थव्यवस्था अमेरिकेंत कामगारांनाहि नको आहे. याचा अर्थ असा की, कायद्याच्या दण्डावाचून भांडवलदारवर्ग संपत्तीची वाटणी करण्यास आपण होऊन तयार आहे. 'वर्गविग्रह समूळ नष्ट करण्याचा मार्ग' हेंच सेनेरॅझो यांच्या लेखाचें नांव आहे. (हाऊ टु किल क्लास स्ट्रगल - रीडर्स डायजेस्ट, सप्टें. १९४२) अमेरिकेत बहुसंख्य कामगारांच्या घरीं रेडिओ असतो, अनेकांना स्वतःची मोटर असते आणि या वर्गातील मनुष्य आता मंत्रिपदापर्यंत जाऊ शकतो हें आपण अनेक ठिकाणीं वाचतो. 'स्वतःच्या देशाचा पराभव घडवून आणणें हें कामगारांचे पहिले कर्तव्य होय' हा मार्क्सवादी कम्युनिस्ट नेत्यांचा उपदेश अमेरिकन कामगार कितपत मानतील हे यावरून दिसून येईल. वर्गविग्रहामुळे निर्माण होणारे भेद, विषमतेमुळे राष्ट्रसंघटनेस निर्माण होणारा धोका, कम्युनिस्टांच्या प्रचारामुळे समाजांत निर्माण होणारी बेदिली व यांतून निर्माण होणारें दौर्बल्य नष्ट करण्याचा अमेरिकेचा हा मार्ग आहे.
 'दि चॅलेंज टु डिमॉक्रसी' या नांवाच्या ग्रंथांत लेखक थिओडोर स्लेच व जोसेफ बॉब गार्टनर यांनी 'अमेरिकन कॅपिटॅलिझम मीट्स् दि चॅलेंज' या एका स्वतंत्र प्रकरणांत अमेरिकन भांडवलशाहीने लोकसत्तेचें हे आव्हान संपत्तीचा निचरा करून, कामगारांना सुस्थितीची राहणी देऊन कसें स्वीकारले याचें वर्णन केलें आहे. कामाच्या वेळाच्या हिशेबांत त्यांनी वस्तूंच्या किमती दिल्या आहेत त्या उद्बोधक आहेत. ३८ मिनिटांच्या कामांतून जो पैसा मिळतो त्यांतून कामगाराला १ पौंड मांस मिळू शकते. ३४ मिनिटाला एक डझन अंडी मिळतात, २३ मिनिटाला १ पौंड कॉफी मिळते. एका आठवड्यांत कामगार ४० तास म्हणजे २४०० मिनिटें याप्रमाणे काम करतो. यावरून तेथील जीवनमानाची कल्पना येईल. अजून पुष्कळशी सुधारणा व्हावयास पाहिजे असें सांगतांना लेखक म्हणतात की, अजून अमेरिकेत शे. १३ कुटुंबांचें वार्षिक उत्पन्न ५००० रु. पेक्षा कमी आहे, ही चिंतनीय गोष्ट आहे. यावरून शे. ८७ कुटुंबांचे उत्पन्न ५००० रु. च्या वर आहे एवढे निश्चित झालें. दुसऱ्या महायुद्धाच्या आधीच अमेरिकन कामगारांची शक्ति ब्रिटिश कामगारांच्या दुप्पट, जर्मनांच्या तिप्पट व इटालियनांच्या चौपट होती. त्यानंतर गेल्या बारा वर्षांत अमेरिकेचें राष्ट्रीय उत्पन्नच तिपटीने वाढले आहे. त्यांतील सर्व धन कामगारांना मिळत नसले तरी तेथील कारखानदारीवर सरकारने जीं नियंत्रणें घातलों आहेत आणि संपत्तीच्या वांटणीचे जे कायदे केले आहेत ते पाहतां अमेरिकेत लोकशाहीला विघातक अशी आर्थिक विषमता यापुढे कधीच निर्माण होऊ शकणार नाही यांत शंका नाही.
 वर्णविषमता हाहि अमेरिकेत आर्थिक विषमतेइतकाच बिकट प्रश्न होता. अमेरिकेत १८ कोटि लोकसंख्येपैकी जवळ जवळ दोन कोटि लोक निग्रो आहेत. या जातीचा गेल्या शतकांत केवढा भयंकर छळ होत असे हे जगजाहीर आहे; आणि काळ्या व गोऱ्या समाजांतील हें हाडवैर असेंच तीव्र स्वरूपांत आजपर्यंत राहिलें असतें तर अमेरिकन समाज दुभंगण्याचा बराच संभव निर्माण झाला असता. मध्यंतरी झालेल्या लिट्ल रॉक येथील शाळेच्या प्रकरणावरून हें वर्णवैषम्य अमेरिकेत तसेंच कायम आहे असा सर्व जगाचा समज झाला होता. अमेरिकेच्या हितशत्रूंनी पराचा कावळा करून त्या देशाची शक्य तितकी बदनामी करण्याचाहि प्रयत्न केला होता. पण याच सुमारास अमेरिकेचे कामगारमंत्री जेम्स मिचेल यांनी एक लेख लिहून या वर्ण विषमतेच्या क्षेत्रांतहि शांतपणे केवढी क्रांति झाली आहे, होत आहे याची माहिती दिली आहे. त्यावरून हीहि विकट समस्या अमेरिकन समाज लवकरच सोडवील असें दिसतें. आज अमेरिकेत ७ ते १३ वयाच्या शे. ९८ निग्रो मुलांमुलींना गोऱ्या लोकांप्रमाणेच शिक्षण मोफत मिळते. ४८ पैकी ३२ संस्थानांत विभक्त शाळा मुळीच नाहीत, आणि तेथे कधी बखेडेहि माजले नाहीत. १९३० साली २७ हजार निग्रो तरुण विद्यार्थी कॉलेजचें शिक्षण घेत होते. आज ही संख्या दोन लाखांच्या आसपास गेली आहे; आणि या शिकलेल्या विद्यार्थ्यांना पुढे व्यवसाय मिळवून देण्याची सोयहि सरकारने केली आहे. अमेरिकन सरकार दरसाल अब्जावधी रुपयांची कंत्राटें ठेकेदारांना देतें. तीं देतांना वर्णभेद पाळला जाणार नाही अशी अट घातलेली असते, आणि ती अट पाळली जाईल अशी दक्षता घेतली जाते. अमेरिकन सनदी नोकरींत आज शेकडा २४ नोकर निग्रो असून अध्यक्ष आयसेन होअर यांच्या कारभारांत वरच्या जबाबदारीच्या जागी आज तीनशें निग्रो आहेत. निरनिराळ्या उद्योगधंद्यांत व बौद्धिक व्यवसायांतहि निग्रोंचे प्रमाण वाढत असून ते तेथे गोऱ्या लोकांइतकेच यशस्वी होत आहेत. निग्रोंच्या २०० विमाकंपन्या आहेत, १४ पेढया आहेत, ३० सहकारी संस्था आहेत. यांत कोट्यवधि रुपयांची उलाढाल होत असून अनेक गोरे लोकहि त्यांत भागीदार आहेत. वृत्तपत्रे, कामगार संघटना, विमाव्यवसाय, शास्त्रसंशोधन, सरकारी समित्या, कारखाने अशा अनेक व्यवसायांत आज उच्चपदावर, ववचित् मुख्यपदावरहि निग्रो जाऊं शकतात आणि त्यांच्या हाताखाली शेकडो गोरे लोक काम करीत असतात. अमरिकेच्या लष्करांत कसल्याहि प्रकारचें वर्णवैषम्य नाही, आणि लिट्ल रॉक येथे पाठविलेले सैन्य अगदी पूर्ण मिश्र स्वरूपाचे होते ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. एवढ्यावरूनच आज निग्रोजातीयतेचा प्रश्न संपूर्ण सुटला आहे असे जरी म्हणतां येत नाही,- श्री. मिचेल तसें म्हणतहि नाहीत- तरी समाजसंघटनेला तडा जाईल, राष्ट्रीय सामर्थ्यांत वैगुण्य निर्माण होईल असें त्याचें रूप निश्चितच राहिलेले नाही. अमेरिकन नागरिकांच्या राष्ट्रीय दृष्टीचा हा मोठाच विजय आहे.
 अमेरिकेचे शास्त्रज्ञान, तेथलें औद्योगीकरण, त्यामुळे निर्माण झालेली अपार संपत्ति, भांडवलदारांनी विवेक जागृत ठेवून राष्ट्रहितदृष्टीने संपत्तीची थोडी न्याय्य वांटणी करण्याचे धोरण पत्करल्यामुळे तेथे प्रस्थापित होत चाललेली आर्थिक समता, त्याचप्रमाणे वर्णविद्वेष लुप्त करून अमेरिकन जनतेने मान्य केलेली वर्णसमता हें सर्व त्या राष्ट्राचें मोठें वैभव आहे यांत शंका नाही; आणि यामुळेच अमेरिकेला सर्व जगांत अग्रपूजेचा मान मिळत आहे. पण अलीकडे गेल्या ३०|४० वर्षांत या वैभवाला एक कीड लागत चाललेली आहे. एक फार मोठा रोग या वैभवाला ग्रासीत चालला आहे. त्या रोगाचें नांव राजकारण. या शब्दाचा अशा अर्थाने उपयोग व्हावा हें मोठे दुर्दैव होय; पण आज जगांत बहुतेक सर्व लोकायत्त देशांत राजकारण या शब्दाला असाच अर्थ प्राप्त झाला आहे. डॉ. जॉन्सन याने आपल्या कोशांतच पॉलिटिक्स या शब्दाचा अर्थ 'मवाल्यांचा धंदा' असा देऊन ठेवला आहे. दुर्दैवाने आज तो अर्थ अक्षरशः खरा होत आहे. लोकसत्ताक जगावर हें मोठें भयानक संकट आहे. राजकीय क्षेत्रांत न्याय्य मार्गाने सत्ता काबीज करणें व ती प्राप्त झाल्यानंतर समाजाचें उत्तम शासन करणें हा या शब्दाचा मूळ अर्थ; पण जगभर राजकारणी लोकांनी स्वार्थलंपट होऊन जे उद्योग चालविले आहेत त्यामुळे त्याला बरोबर उलट व विपरीत अर्थ प्राप्त झाला आहे. सूक्तासूक्त न पाहतां गुंडगिरी करून कोणत्याहि मार्गाने सत्ता काबीज करणें आणि ती हाती येतांच आपले इष्टमित्र, सगे- सोयरे, संबंधी यांच्या तुंबड्या भरण्यासाठी त्या सत्तेचा जास्तीत जास्त उपयोग करणें, नागरिकांची लूट करणें, आणि या स्वार्थाच्या आड येणाऱ्यांचा कांटा काढणे या अर्थी हल्ली राजकारण हा शब्द वापरला जातो. त्यामुळे अमेरिकेत पॉलिटिक्स, पॉलिटिशिअन हे शब्द शिवीसारखेच वापरण्यात येतात. अमेरिकेला या रोगाने किती ग्रासले आहे त्याची यावरून कल्पना येईल. पुढे आपल्याला भारतीय लोकसत्तेचा विचार करावयाचा आहे. ती दृष्टि ठेवून येथे जरा जास्त विस्ताराने अमेरिकेच्या या सामाजिक व्याधीचा विचार केला आहे.
 १९४६ सालची ही गोष्ट आहे. त्या वेळी जॉन विल्यम्स् हे एक सिनेटर होते. सारा भरण्यासाठी म्हणून त्यांनी विल्मिंटन- डेलावेअर येथील इंटर्नल रेव्हिन्यू खात्याच्या कचेरीत चेक पाठविला, तरी कांही दिवसांनी त्यांना सारा थकल्याची नोटीस आली. तेव्हा त्यांनी या प्रकरणी लक्ष घातलें, आणि मग प्रकरणांतून प्रकरण निघून सर्व अमेरिकेचें हें महसूल खातें किती भ्रष्ट आहे, कोट्यवधि रुपयांची अफरातफर तेथे कशी चालते, ही अफरातफर करणाऱ्यांच्या मागे अमेरिकेच्या ॲटर्नी जनरलपर्यंतचे अधिकारी कसे असतात आणि त्यांना सिनेटर, गव्हर्नर या राजकारणपटु लोकांचा पाठिंबा कसा असतो हे सर्व जॉन विल्यम्स यांना दिसून आलें. त्यांनी मग ही मोहीमच हातीं घेतली. विल्मिंटन ऑफिसमधील एक अधिकारी ५०० लोकांनी भरलेला सारा दरसाल असा गिळंकृत करीत असे. तेथील एका स्त्री- कारकुनाने पुराव्यासह हें कलेक्टरपुढे मांडलें. पण तेथे तें प्रकरण दडपलें गेलें आणि त्या स्त्रीलाच ठपका मिळाला. जॉन विल्यम्स् यांनी त्यावर चौकशी समिति नेमली. तरी हा अधिकारी अगदी प्रामाणिक आहे असा कलेक्टर निर्वाळा देऊ लागले. प्रकरण आणखी पुढे गेलें तेव्हा तो पैसे भरण्यास तयार झाला, पण त्याला पाठिंबा देणाऱ्या वरच्या अधिकाऱ्याला शिक्षा तर नाहीच झाली, उलट बढती मिळाली! यानंतर न्यूयॉर्क, मिसूरी येथील महसूल खात्यांकडे विल्यम्स् वळले; आणि शेवटपर्यंत चिकाटी धरून त्या खात्यांतील घाणीचा त्यांनी उपसा केला. यांत ॲसि. ॲटर्नी जनरल बडतर्फ झाले, महसूल खात्याचे मुख्य कमिशनर यांनी राजीनामा दिला व तीस-चाळीस कमिशनरांना शिक्षा झाल्या. वॉशिंग्टनला असली प्रकरणें नित्य धाडली जातात; पण तेथेहि तीं दडपली जात असत. जॉन विल्यम्स् यांच्या या शुद्धीकरणानंतर त्याला कांहीसा आळा बसला. या प्रकरणांतील आपला अनुभव सांगतांना जॉन विल्यम्स् म्हणतात, "मला केवळ गुन्हेगार, भामटे, यांच्याशीच मुकाबला करावा लागला असें नाही, तर त्यांच्या मागले मोठे सरकारी अधिकारी व राजकारणी यांच्याशींहि लढा करावा लागला. ही सर्व भ्रष्टता, ही हीनता, हा अधमपणा, हा अपहार, ही लूट यांच्यावर पांघरूण घालण्याचा ते प्रयत्न करतात; आणि गुन्हेगाराला ते पाठीशी घालतात. प्रत्यक्ष भ्रष्टतेपेक्षा हें राजकारण जास्त घातक आहे." जॉन विल्यम्स् यांनी या प्रकरणी अपार कष्ट केले व सर्व घाण धुऊन काढली म्हणून त्यांचा अमेरिकेत मोठा गौरव झाला, पण त्यांना पदच्युत करण्याची मोहीमहि राजकारणी लोकांनी त्याच वेळी सुरू केली.
 १९३५- ३६ साली झालेलें अमेरिकेतील पेन्शन प्रकरण याच प्रकारचें आहे. किंबहुना जीवनाच्या सर्व क्षेत्रांतली सर्व प्रकरणें अशींच व याच प्रकारची आहेत. सरकारने किंवा कोणत्याहि संस्थेने कोणत्याहि सत्कार्यासाठी जो पैसा मंजूर केला असेल त्याचा ओघ आपल्या खिशाकडे वळविणें हा या राजकारणी लोकांचा धंदा. मग तें कार्य म्हणजे सर्वोदय असो, की सर्वनाश (युद्ध) असो. बालकाच्यासाठी दिलेला निधि असो, दुष्काळनिधि असो किंवा निराश्रित विधवांचें धन असो. राजकारण यांत भेदाभेद करीत नाही. त्या त्या निधीच्या नियंत्रण समितीवर आपली माणसें निवडून आणणे, नेमून घेणें व मग तेथे अधिराज्य चालवून लूट करणें हें प्राप्तव्य ! यांत जे साह्य करतील त्यांना पैसा, प्रतिष्ठा, पदव्या व मद्यादि इतर सुखविलास मिळवून देणें व जे विरोध करतील त्यांना बदली, बडतर्फी, धमक्या, घरादाराला आग लावणे इ. मार्गांनी नमविणें आणि इतकेंहि करून तें न जमल्यास त्यांचा खून करणें असें हैं राजकारणतंत्र आहे. लोकशाहीत याला कसें तोंड द्यावयाचें हा फार मोठा प्रश्न असतो; कारण रस्त्यावरचा शिपाई, पोलीस, अधिकारी, कलेक्टर येथपासून ॲटर्नी जनरलपर्यंत सरकारचे अधिकारी यांत सामील असतात. गुंड, दरोडेखोर, खुनी यांच्या सेना त्याच्या आश्रयाला असतात. राजकीय पक्षांतून सेनेट, हाऊस यांवर निवडून आलेले देशाचे कायदे करणारे राजकारणी लोक हे वास्तविक लोकशाहीचे आधार; पण तेच आज अशा रीतीने लोकशाहीचे व अंतीं राष्ट्राचे काळ ठरतात.
 १९३५- ३६ च्या सुमारास ७० वर्षांवरच्या निराश्रित गरीब वृद्धांना पेन्शन द्यावयाचें असें सरकारने ठरविलें, आणि राजकारणी लोकांना चरायला एक नवीन कुरण मिळालें. एकाएकी प्रत्येक स्टेटमधील अशा लोकांची संख्या वाढू लागली. कॅनसासमध्ये दर शंभर वृद्धामागे असे चाळीस लोक निघाले तर ओक्साहोमामध्ये साठ ! न्यूयार्कमध्ये अधिकारी प्रामाणिक होते, तेथे असे निराश्रित पेन्शनयोग्य वृद्ध शंभरी १३ च सापडले. सेट लुईमध्ये डॉ. केन हे अध्यक्ष होते. त्यांनी अशा वृद्धांची गणना करण्यासाठी कारकून नेमण्याचें ठरविलें. त्या वेळीं खुद्द गव्हर्नरांनी सहा कारकून पाठविले. त्यांतील एक नुकताच तुरुंगांतूनच सुटून आला होता. दुसरा दारुड्या होता. त्याला नुकतेच नोकरीवरून काढले होते. तिसरा अगदी अनाडी होता. डॉक्टर केन यांनी या सर्वांना हाकलून दिले आणि हें वृत्त वर्तमानपत्रांत दिलें. त्यानंतर त्यांना जरा बरी माणसे मिळाली, पण एकंदरीत प्रत्येक प्रांतांत पेन्शनयोग्य वृद्धांची संख्या भरमसाट वाढली. एका सरकारी अधिकाऱ्याला दरमहा २५०० रु. पगार होता. त्याच्या मातापित्यांचीं नांवेंहि वरील निराश्रितांच्या यादीत सापडली. तेव्हा मग चौकशी सुरू झाली, आणि एकेका स्टेटमध्ये दोन दोन हजार लोकांचीं नांवें यादीतून काढावी लागली; कारण त्यांची सुस्थिति होती. एच. जे. डेंटन या अधिकाऱ्याने हे यादीशुद्धीचें काम मोठ्या धैर्याने केलें. पुष्कळ वेळा खोट्या याद्यांच्या बाजूने गव्हर्नरासारखे उच्च पदावरचे अधिकारीहि उभे असल्याचे त्याला आढळून आलें.
 शिकागोच्या एज्युकेशन बोर्डात १९३४ साली असाच राजकारणी प्रकार घडला. त्याचें वर्णन करणारा लेखक फ्रँक एस्. मीड (रीडर्स डायजेक्ट नो. '४७) यानेहि ही प्रत्येक गांवाचीच कहाणी आहे असें प्रारंभींच म्हटले आहे. तो नागरिकांना उद्देशून म्हणतो, "तुम्ही शिक्षणाचा कर भरणें व मुलांची फी देणें यापलीकडे या क्षेत्रांत लक्ष घालीत नाही. जागरूक राहात नाही. त्यामुळे हा कारभार राजकारणी लोकांच्या हाती जातो." शिकागो एज्युकेशन बोर्डाचा कारभार असाच दोन राजकारण्यांनी हाताखाली घातला होता. हा कारभार म्हणजे ४० कोटींचा मामला होता. बोर्डाच्या नियंत्रणाखाली ४०० शाळा, साडेतीन लक्ष विद्यार्थी व १३००० शिक्षक होते. एडवर्ड केली हा शिकागोंतील राजकीय यंत्रणेचा दादा होता. तो स्वतः महापौर म्हणून निवडून आला. लगेच त्याने आपला मित्र मकॉहे याला एज्युकेशन बोर्डाचा अध्यक्ष केला, आणि त्याने आपला मित्र विल्यम जॉनसन याला सुपरिटेंडेंट ऑफ् स्कूल्स म्हणून निवडून आणलें, आणि मग यांनी अक्षरशः नंगा नाच घालण्यास सुरुवात केली. परीक्षक मंडळ त्यांनी ताब्यांत घेतलें आणि आपल्याला हवे तेच लोक पास होतील अशी व्यवस्था केली. त्यांनी पास केलेल्या लोकांतील शे. ८१ लोक लेखी परीक्षेत नापास झाले होते, पण तोंडी परीक्षेमध्ये मार्कांची खैरात करून यांनी त्यांना पास केलें. जॉनसन याचा एक क्लास असे. त्यांत नांव घालतील व अन्य तऱ्हेने निवडणुकांत साह्य करतील तेच लोक फक्त पास व्हावयाचे हें आता ठरून गेलें. बदली, बडतर्फी, यांचे त्यानंतर असें कांही सत्र सुरू झालें की, शिक्षक व नागरिक हैराण होऊन गेले. शिक्षणाला कांही रयाच राहिली नाही. कारण कालचे शिक्षक आज नाहीत, आजचे प्राचार्य उद्या नाहीत, असें नित्य होऊं लागलें. जॉनसन यांनी आपली व आपल्या संबंधितांची वीस पाठ्यपुस्तकें मंजूर करून घेतली. इतरांची सर्व काढून टाकली. अमेरिकेतल्या एका विख्यात नगरीतल्या साडेतीन लक्ष विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा या तीन राजकारणी मवाल्यांनी असा खेळखंडोबा करून टाकला. अर्थात् शेवटीं नागरिक जागे झाले. त्यांनी एक चौकशी समिति नेमली आणि हे सर्व प्रकार बाहेर येतांच त्या तिघांना बडतर्फ केले. आता तेथील शिक्षणव्यवस्था उत्तम आहे. पण मवाल्यांचा तो नंगा नाच चार वर्षे चालू होता.
 राजकारणी लोकांची ही प्रतिष्ठित दरोडेखोरी फार जुनी आहे. लोकशाहीच्या जन्माबरोबरच ती जन्मली आहे. पण तिला गेल्या ३०-४० वर्षांत अत्यंत उग्र, हिडीस व घोर रूप प्राप्त झाले. त्याचें कारण असे की, या काळांत पहिल्या जातीला, तसल्याच प्रतिष्ठित दरोडेखोरांची दुसरी एक जात येऊन मिळाली आहे, आणि ज्योतिषांत दोन पापग्रहांची युति झाली म्हणजे त्यांची फलितें जशी जास्त घातक होतात त्याचप्रमाणे अमेरिकेच्या सामाजिक जीवनांतील या दोन पापग्रहांची युति झाल्यामुळे अमेरिकन लोकशाहीला ती जास्तच घातक झाली आहे. हा दुसरा पापग्रह, प्रतिष्ठित दरोडेखोरांची ही दुसरी जात अमेरिकेतील दारूबंदीच्या काळांत आणि त्यातहि १९९८ ते १९३२ या काळांत उदयास आलेली आहे. बेकायदा दारू पुरविणाऱ्या लोकांच्या त्या वेळी टोळ्यांच्या टोळ्या निर्माण झाल्या आणि मारामाऱ्या रक्तपात, खून हे त्या वेळी नित्याचे प्रकार झाले. या टोळयांच्या नाइकांना त्या वेळी इतका अमाप पैसा मिळाला की, भांडवलदारांनी पूर्वीच्या काळांत मिळविलेला पैसा त्याच्या तुलनेने कांहीच नव्हे. अलकॅपोन हा त्या वेळी चोरट्या दारूचा बादशहा होता. त्याचें महिन्याचे उत्पन्न १२ कोटि रुपयांचें असे. हें धन पेरून तो साध्या शिपायापासून ॲटर्नी जनरलपर्यंत सर्वांना मिंधे करून टाकीत असे. अमेरिकन जीवनाला महारोग जडूं लागला तो या दारूबंदीच्या काळांत. कारण पुढे दारूबंदी उठली तरी या दरोडेखोरांच्या टोळ्या वरखास्त झाल्या नाहीत. त्यांनी आपला मोहरा सर्व व्यवसायांकडे वळविला. कापड, भांडी, किराणा, भुसार यांचे व्यापारी, हॉटेलवाले, परीट, न्हावी, अशा प्रत्येक व्यवसायाचें एक मंडळ (असोसिएशन) असतें, त्याचप्रमाणे अमेरिकेत या प्रत्येक धंद्याच्या लोकांकडून दहशतीने दरमहा बांधून पैसा वसूल करणारें एक दरोडेखोरांचे मंडळ असतें. दरमहा ठरलेले १००, २००, ५०० डॉलर्स दिले नाहीत तर कापडाच्या दुकानाला आग लागेल, हॉटेलच्या अन्नांत विष सापडूं लागेल, व्यापाऱ्यांचे ट्रक्स इष्टस्थळी पोचणार नाहीत. स्वातंत्र्याच्या, धैर्याच्या गप्पा मारणारे अमेरिकन लोक निमूटपणें आज कोट्यवधि, अब्जावधि रुपयांचा हा कर खालच्या मानेने भरीत आहेत, अपमान सोशीत आहेत.
 या प्रकाराला अमेरिकेत रॅकेटिअरिंग असें म्हणतात. त्याची स्पष्ट कल्पना येण्यासाठी एक उदाहरण देतों. डच शूल्ट हा दारूबंदीच्या काळांत अलकॅपोनप्रमाणेच उदयास आलेला, तसल्याच एका टोळीचा नाईक होता. दारूबंदी उठणार व आपला धंदा बसणार हे पाहून १९३१ साली त्याने न्यूयार्क नगरीतील हॉटेलांच्या 'संरक्षणाची' योजना आखली. लवकरच त्याला दरसाल एक कोटि रु. मिळू लागले. त्याच वेळीं पुढे न्यूयार्कचे गव्हर्नर म्हणून विख्यात झालेले थॉमस ड्यूई हे डिस्ट्रिक्ट ॲटर्नी म्हणून नेमले गेले होते. अत्यंत निःस्पृह, बेडर व चलाख म्हणून त्यांची कीर्ति झाली होती. हा माणूस आपल्या मुळावर येणार हें जाणून डच शूल्ट याने त्यांचा खून करण्याचे ठरविलें. पण या काळांत या दरोडेखोरांनी सिडिकेट्स्, बोर्डस, असोसिएशन्स् स्थापन करून आपल्या धंद्याला भांडवली व्यवसायाप्रमाणे व्यवस्थित रूप दिलें होतें. डच शूल्ट याच्या सिंडिकेटने हा खून नामंजूर केला. कां ? सभासद म्हणाले की, "आपण साक्षीदारांना मारण्याचे धोरण ठेवू. त्यांना नाहीसें केलें की, गुन्हा शाबीत होण्याची भीति नाही. उलट ॲटर्नीला मारलें तर गवगवा फार होईल. लोक संतापून उठतील. फेडरल पोलीसहि यांत लक्ष घालतील. मग आपली पाळेंमुळे खणून निघतील. आपलें फार नुकसान होईल. आपला हा धंदा सर्वं राष्ट्रभर पसरलेला आहे. त्याचा विचार केला पाहिजे. या खुनामुळे आपल्या सगळ्याच रॅकेटसना धोका पोचेल. तेव्हा डच शूल्टला आम्ही मना करतो." पण डच शूल्ट हा फारच आडदांड होता. त्याने हें ऐकलें नाही. त्याने सिंडिकेटची अवज्ञा करून थॉमस ड्यूई यांचा खून करण्याचे ठरविले; पण सिंडिकेटची आज्ञा म्हणजे कांही फेडरल कोर्टाची आज्ञा नव्हे की जी कोणीहि मोडावी ! या अवज्ञेबद्दल शिक्षा म्हणून सिंडिकेटने शूल्टला ठार केले व आपल्या राष्ट्रव्यापी रॅकेटचें रक्षण केले. थॉमस ड्यूई वाचले. दैवयोग असा की, त्यांनीच पुढे वरील सिंडिकेटमधील लुसीॲनो, लेपके या दुसऱ्या नाइकांना शिक्षा ठोठावल्या. जॉन विल्यम्सप्रमाणेच त्यांचीहि अमेरिकेत या कार्यासाठी फार कीर्ति झालेली आहे.
थॉमस ड्यूई यांचे परमंमित्र ली थॉमसन स्मिथ यांचे या क्षेत्रांतलें कार्य फार मोठे आहे. स्मिथ हे एक सामान्य व्यापारी होते. एक दिवस केस कापण्यासाठी ते सलूनमध्ये गेले असतांना तेथे दोन सभ्य रॅकेटिअर आले. त्या नापिताला त्यांनी सांगितले की, 'नापितसंरक्षण संस्थेकडून आम्ही आलों आहों. तुम्ही केस कापण्याचा दर २५ सेंटचा ५० सेंट करा व संस्थेचें सभासद व्हा. प्रवेश फी १०० डॉलर्स आणि महिन्याची वर्गणी ४० डॉलर्स ही आत्ता द्या...' नापिताने मागणी नाकारली तेव्हा स्मितपूर्वक त्यांनी दोनचार गोष्टी सांगितल्या. 'अमक्याच्या दुकानाला आग लागली, तमक्याचा मुलगा नाहीसा झाला, हें होऊं नये म्हणून तर संरक्षणसंस्था आहे.' हे ऐकून स्मिथ अतिशय संतापले आणि त्या दोघांना त्यांनी बजावले की, 'अशी दमदाटी केलीत तर तुम्हांला तुरुंगांत घालीन, ते x x x मोठे पुढारी आहेत. त्यांचा माझा स्नेह आहे. ते तुमची गय करणार नाहीत.' यावर त्या सभ्य गृहस्थांनी स्मितपूर्वक सांगितलें की, 'त्यांच्याशी आम्ही कधीच समझौता केला आहे.' हें ऐकून स्मिथ थक्क झाले, आणि मग या प्रकरणी त्यांनी लक्ष घातलें तें काम त्यांना जन्मभर पुरलें. कारण या प्रतिष्ठित गुन्हेगारीचें जाळे सर्व राष्ट्रभर पसरलें आहे, असे त्यांच्या ध्यानांत आले; त्याच सुमारास ग्रँड ज्यूरीचे चेअरमन म्हणून त्यांची नेमणूक झाली. या ज्यूरीला फार मोठे अधिकार असतात. पण विल्यम डॉज, डिक्सन डेव्ही हे ॲटर्नी या दरोडेखोरांविरुद्ध काम चालवायला तयार होईनात. स्मिथ यांना रोज खुनाच्या धमक्या येऊ लागल्या; तरुण स्त्रियांना त्यांच्याकडे रात्रीं धाडून त्यांना बदनाम करण्याचे प्रयत्न झाले. तरी याचीहि त्यांनी पर्वा केली नाही. पण गुन्हेगारांच्याविरुद्ध कोणी साक्षीलाच उभे राहीनात. खाजगी रीतीने स्मिथ यांच्यापाशी वाटेल तें सांगण्यास लोक तयार असत, पण आम्ही साक्ष देणार नाही असें ते सांगत. कारण जीवाची भीति ! म्हणजे पैसा आणि दहशत असें दुधारी शस्त्र हे डाकू वापरीत. यानंतर एक पत्रक काढून स्मिथ यांनी लोकजागृति करण्यास आरंभ केला. पत्रकांत ते म्हणतात, "रॅकेटस ही प्रतिष्ठित डाकूगिरी अखिल राष्ट्राला ग्रासून राहिली आहे. या डाकूंना कोणाचीहि कसलीह भीति नाही. आपले कोणी कांही करूं शकणार नाही अशी त्यांची खात्री असते. याचें कारण असें की, राजकारणी नेत्यांकडून त्यांना अभय मिळालेलें असतें. स्मिथ यांच्या प्रयत्नामुळे हळूहळू लोकमत जागृत झालें आणि त्याचा परिणाम होऊन स्मिथ यांनी जवळजवळ ७० रॅकेट्सचा- प्रतिष्ठित डाकूंच्या टोळ्यांचा निःपात केला आणि १००- १५० नाइकांना तुरुंगात डांबले.
 अमेरिकेत दारूबंदीच्या काळांत सुरू झालेली ही डाकूगिरी- व्हाईट कॉलर क्राइम- थॉमस ड्यूई, ली स्मिथ यांसारख्या साहसी, निर्भय लोकसेवकांच्या प्रयत्नांमुळे तात्पुरती काय थंडावली तेवढीच, पण खरें पाहतां तिला तसा आळा पडलेला नाही. १९५० साली सीनेटने सीनेटर केफाव्हर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीचा अहवाल पाहतां हे स्पष्ट दिसून येतें. अजूनहि न्यूयार्क, शिकागो अशा मोठ्या शहरांत त्याच प्रमाणांत या डाकूंचीं सिंडिकेटस् आहेत. राजकारणी लोकांची व या दरोडेखोरांची युति अजून तशीच कायम आहे; आणि अमेरिकेतील कांही समाजशास्त्रज्ञांचें तर असें मत आहे की, आपली अर्थव्यवस्था व आपल्या सामाजिक संस्था अशाच आहेत तोपर्यंत अमेरिकन जीवनाच्या मोटर, बेसबॉल, ड्रगस्टोअर या कायमच्या लक्षणाप्रमाणेच ही सभ्य डाकूगिरी हेहि एक आपल्या जीवनाचें दुर्निवार असे लक्षण होऊन बसणार आहे. (यासंबंधीचें विवेचन 'सोसायटी इन् ट्रॅन्झिशन'- हॅरी बार्नेस, 'ब्रासचेक'- अप्टन सिंक्लेअर, 'दि चॅलेंज टु डेमॉक्रसी'- थिओडोर ब्लेच व जोसेफ बॉम गार्टनर, 'मॉडर्न अमेरिकन सोसायटी'- किंग्जले डेव्हिस इ. ग्रंथांत सापडेल. १९५८ च्या 'वसंत' दिवाळी अंकांत 'आपल्या लोकशाहीवरील नवे संकट' या लेखांत अमेरिकेतल्या या गुन्हेगारीचें बऱ्याच तपशिलाने मीं वर्णन दिले आहे. प्रस्तुत प्रकरणांतील सामान्य माहिती वरील ग्रंथांतून घेतली आहे. उदाहरणें 'रीडर्स डायजेस्ट' या सुप्रसिद्ध मासिकांतून घेतली आहेत.) थिओडोर ब्लेच यांनी तर ही गुन्हेगारी म्हणजे अमेरिकन लोकसत्तेला कायमचें आव्हान आहे, असें म्हटलें आहे. क्लाइड बेडेल या लेखकाने 'लुक ब्रदर, युअर हाऊस इज् ऑन् फायर' या नांवाची एक पुस्तिका काढून 'आपली लोकशाही रसातळाला चालली आहे' असा अमेरिकनांना इषारा दिला आहे. त्यांत त्याने असें दाखवून दिलें आहे की, अमेरिकन जीवनाचा प्रत्येक धागान् धागा अनीति, भ्रष्टता, दहशत, अरेरावी, यांनी कुजून गेला आहे, कामगार संघटित झाले आहेत. आता ते जेमतेम ३०|३२ तास काम करतात. पगार मात्र भरपूर घेतात. तेंच शिक्षकांचें, तेंच व्यापाऱ्यांचें, तेंच सर्वांचें. लोकशाही ही आपोआप व्यवस्थित टिकून राहण्याची कोणतीहि युक्ति परमेश्वराने सांगितलेली नाही. ज्यांची लोकशाहीवर निष्ठा नाही, जे तिच्यासाठी, लोकशाहीच्या तत्त्वासाठी वाटेल तो त्याग करण्यास सिद्ध नाहीत, त्यांची लोकशाही कधी टिकणार नाही. माणसें भ्रष्ट, अधम, उन्मार्गी झाल्यावर लोकशाही किती तग धरणार ? आपण अमेरिकन आपल्या हातांनीच आपल्या पूर्वजांनी प्रस्थापिलेल्या लोकसत्तेचा नाश करीत आहोंत- इत्यादि विवेचन करून शेवटीं शील, चारित्र्य, न्याय, स्वार्थत्याग, नीतिनिष्ठा हे लोकशाहीचे मूलाधार होत असें या लेखकाने सांगितले आहे.
 अमेरिकेच्या या अधोगामी प्रवृत्तीची अनेकांनी अनेक प्रकारें मीमांसा केली आहे. त्या सगळ्यांचा सारार्थ पाहिला तर एकच दिसेल की, लोकशाहीला जी श्रेष्ठ नीति आवश्यक असते, जी विवेकनिष्ठा आवश्यक असते तिचा त्या समाजांतून लोप होत चालला आहे. व्यक्तिस्वातंत्र्य हे अमोल धन असें समजतात. पण स्वतःच्या व्यक्तिस्वातंत्र्याइतकेंच दुसऱ्याचेंहि व्यक्तिस्वातंत्र्य महत्त्वाचें आहे हें जाणणें व त्याला तितकाच मान देणें याची जाणीव ज्यांना नाही, हा विवेक ज्यांना नाही त्या राजकारणी अमेरिकनांना व्यक्तिस्वातंत्र्याचे महत्त्व कळतें असें कसें म्हणावें? लोकशाहींत लोकहितबुद्धि हें प्रत्येक नागरिकाचे पहिले लक्षण असले पाहिजे. पण सामान्य शिपायापासून, सिनेटर, ॲटर्नी जनरल, न्यायाधीश येथपर्यंतचे लोक द्रव्यलोभाने किंवा भीतीने किंवा उदासीनतेने जेव्हा जनतेच्या हितावर निखारा ठेवतात आणि दरोडेखोरांचें राज्य चालूं देतात तेव्हा त्यांना लोकहितबुद्धि आहे असें कसें म्हणतां येईल ? विवेकाशिवाय व्यक्तिस्वातंत्र्य म्हणजे गुंडांनाच फक्त व्यक्तिस्वातंत्र्य, त्यांनाच सर्वाधिकार असा अर्थ होतो, आणि अमेरिकेची तीच स्थिति होत चालली आहे. बाहेरून दिसायला तेथे पूर्ण व्यक्तिस्वातंत्र्य आहे. अध्यक्ष, न्यायाधीश, सेनापति यांच्यावर तेथे कोणीहि टीका करूं शकतो. पण डोळ्यांदेखत तेथे अन्याय, दरोडेखोरी, अपहार, लूटमार चालूं आहे आणि त्यांवर तेथे कोणीहि टीका करूं शकत नाही. कोणी स्वार्थामुळे, कोणी भीतीमुळे, कोणी हितसंबंधामुळे, कोणी औदासीन्यामुळे ! याचा अर्थ असा की, श्रेष्ठ संस्कृतीमध्ये दौर्बल्य आणणारी जीं मूल्ये त्यांचा अमेरिकेने स्वीकार केला आहे. पण त्या संस्कृतींतली विवेकनिष्ठा, धर्मश्रद्धा, नीतिमत्ता, समाजहितबुद्धि हीं जीं सामर्थ्यदायक मूल्ये त्यांचा मात्र त्या समाजांतून हळूहळू लोप होत आहे.
 या अधःपाताचे आणखी एक कारण शास्त्रज्ञ सांगतात, तें म्हणजे विवाह- विच्छेद! अमेरिकेत विवाहसंस्था उद्ध्वस्त होत चालली आहे, आणि यामुळे अनेक अनर्थ घडून येत आहेत. पांच विवाहांपैकी दोन तेथे मोडतात, आणि त्यामुळे मानवी जीवनाच्या विकासाला, धर्मभावना, नीतिनिष्ठा यांच्या वाढीला अवश्य तें स्थैर्य अमेरिकेतून नष्ट झालें आहे. ज्यांचा विवाह भंगला त्या व्यक्ति व त्यांची मुलें यांच्या मनःस्थितीचा आपण विचार केला तर चोरी, डाकूगिरी, मनोविकृति, दौर्बल्य यांची अमेरिकेत झपाट्याने वाढ कां होत आहे हें सहज कळून येईल. पुरुषाची पत्नी दुसऱ्याकडे निघून गेलेली, मुलें वाऱ्यावर सोडलेली, त्यांना आई आहे तर बाप नाही, बाप आहे तर आई नाही, पुरुष गेल्यामुळे स्त्रीचा आधार गेलेला, अशा स्थितीत तेथले निम्मे अधिक नागरिक आहेत. द्वेष, मत्सर, निराशा, संताप यांनी ते नेहमीच ग्रस्त झालेले असणार. अशा स्थितीत दारू, जुगार, डाकू गिरी, व्यभिचार यांकडे त्यांची अधिकाधिक प्रवृत्ति होत गेली तर त्यांत नवल कसले ? विवाहसंस्था व कुटुंबसंस्था भंगल्यामुळे हे अनर्थ घडत आहेत यांत शंकाच नाही; आणि याचाच हा परिणाम आहे असे दिसून येईल. जरा कांही खुट्ट झालें की, अमेरिकन स्त्रीपुरुषांना घटस्फोटाला कारण पुरतें. कारण व्यक्तित्वाच्या अत्यंत विपरीत कल्पना आम्हीं शास्त्रज्ञांनीच अमेरिकन स्त्रीपुरुषांच्या मनांत भरवून दिल्या आहेत. त्याचीं फळें आम्ही आता भोगीत आहोत. वास्तविक मनुष्याने स्वतः होऊन आपणावर बंधनें घालणें याला स्वातंत्र्य म्हणतात. दुसऱ्याने बंधने घालणें हे पारतंत्र्य; पण बंधनेंच नसणें म्हणजे स्वातंत्र्य अशा विपरीत कल्पना समाजांत शिरल्या म्हणजे समाजाचा नाश होतो, आणि मग व्यक्तिस्वातंत्र्यहि जातें आणि समाजाचेंहि स्वातंत्र्य जातें. अमेरिकन नागरिकांच्या मनांत अशा विपरीत कल्पना दृढमूल होऊन बसल्यामुळेच त्यांची कुटुंबसंस्था कोसळत आहे. आपण विवाह केला की, एक सामाजिक जबाबदारी आपल्यावर येऊन पडते, अपत्यांची जवाबदारी आपल्यावर आहे, दोन कुटुंबांतल्या अनेक व्यक्तींचें सुखदुःख यावर अवलंबून आहे, ही व्यापक सामाजिक जबाबदारीची जाणीवच अमेरिकन स्त्रीपुरुषांच्या मनांतून लोपत चालली आहे. विवाह करतांनाच आज अनेकांची अशी वृत्ति असते की, 'नाही जमलें तर घटस्फोट आहेच!' म्हणजे बाजारांतून वस्तु विकत आणणें आणि विवाह करणें तेथे एकच झालें आहे. नाही पटली तर परत केली ! दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक जर्मन कुटुंबें अमेरिकेत आली. त्या कुटुंबांतील तरुण मुली अमेरिकन तरुणांना फार पसंत पडूं लागल्या; कारण असे की त्या मुली पति, संसार, मुलेबाळें यांत जास्त रमत, त्यांची त्यांना ओढ जास्त असे; आणि पुरुषाला बायको अशीच हवी असते, पण अमेरिकन तरुण स्त्रीला यांत आपल्या व्यक्तित्वाचा संकोच आहे असें वाटतें. यामुळे पुरुषाला ती तितकी प्रिय होत नाही. अशा गोष्टी अर्थातच फार थोड्या घडलेल्या असणार; पण तेथील कुटुंबसंस्थेला कीड कोणती लागली आहे हे यावरून धानी येईल. कुटुंबाला अवश्य त्या निष्ठाच अमेरिकेतून नष्ट होत चालल्या आहेत आणि, निष्ठा नाही म्हणजे कोणतीहि संस्था टिकत नाही.
 व्यक्तिस्वातंत्र्य, मुद्रणस्वातंत्र्य, संघस्वातंत्र्य, हक्काने मिळणारे अन्नवस्त्र, न्यायालयांत काटेतोलपणें मिळणारा न्याय हे सर्व लोकशाहीने मान्य केलेले मूलभूत हक्क आहेत; पण त्यावरोवरच विवेकनिष्ठा, समाजहितबुद्धि, अन्यायाचा प्रतिकार करण्याची वृत्ति, त्याग, धैर्य, दुसऱ्यांच्याहि हक्कांची जपणूक करण्याची दक्षता, शील, चारित्र्य ही थोर संपदा लोकशाहीने आवश्यक म्हणून सांगितली आहे. या परंपरेच्या अभावी पहिले हक्क जर एखाद्या समाजाने घेऊं म्हटलें तर ते अनर्थाला कारण झाल्यावांचून राहणार नाहीत. अमेरिकेत हेंच घडत आहे. तेथील सभ्य डाकू गिरी, तेथील राजकारण, तेथील भग्न कुटुंबसंस्था यांचा विचार आपण केला, तेथील बालगुन्हेगारीचा विचार केला तर हेच दिसून येईल.
 या बालगुन्हेगारीमुळे तर अमेरिकेतील समाजशास्त्रज्ञ, तत्त्ववेत्ते, शिक्षण- शास्त्रज्ञ अगदी हादरून गेले आहेत. कारण ही अत्यंत भयावह आपत्ति आहे. १९५१ साली १६ ते २४ वयाच्या अडीच लक्ष मुलांना चोरी, घरफोडी, आग, वाहनाच्या व इतर कायद्यांचा भंग यासाठी पोलिसांनी कैद केलें होतें, आणि ही संख्या उत्तरोत्तर वाढतच आहे. दोन तरुण मुलांनी पेट्रोलचे डबेच रुळावरून घसरवून दिले. त्यामुळे आग लागून सहा लाखांचें नुकसान झालें. एका नऊ वर्षांच्या मुलाने एका कारखान्यास गंमतीने आग लावली. त्यामुळे १ कोटीची मालमता जळाली. या मुलांना पकडून समजुतीच्या गोष्टी सांगू लागलें तर ती उत्तर देतात की, आमचें जीवन चाहेल त्या पद्धतीने जगण्याचा आम्हांला हक्क आहे. या वाढत्या गुन्हेगारीचें कुटुंबसंस्थेचा नाश हे एक प्रधान कारण आहे, हें वर सांगितलेंच आहे; पण आणखीहि अनेक कारणें आहेत. ती म्हणजे सिनेमा, टेलिव्हिजन व हॉरर कॉमिक्स् हीं मासिकें. सिनेमा, रेडिओ, टेलिव्हिजन यांवर चांगल्या गोष्टींबरोबरच दरोडेखोरांच्या टोळ्या, त्यांचे नाईक, त्यांची धाडसी कृत्यें, खून, मारामाऱ्या, रक्तपात, लूटमार, अनाचार, हिडीस शृंगार, सूड यांनी भरलेल्या गोष्टी अलीकडे जास्त दाखवितात. त्यामुळे मुलांची मनें विकृत, विदीर्ण, भग्न होऊन जातात. शास्त्रज्ञ म्हणतात यामुळे मुलांची झोप नाहीशी झालेली आहे, मनें भीतीने ग्रस्त झालेलीं आहेत. कोणी दुबळी झाली आहेत, कोणी बेफाम झाली भाहेत. म्हणजे मूळ प्रकृति सर्वांचीच नष्ट झाली आहे. गुन्हेगारीचीं बीजें यांतच आहेत. हॉरर कॉमिक्स हा प्रकार सर्वात भयंकर आहे. 'माझ्या गांवांत महारोग आला तरी चालेल, पण हीं मासिकेँ नकोत' असें एका अमेरिकेतील नगरीच्या मेयरने म्हटले आहे. या मासिकांतून अगदी अनन्वित, अनर्थकारक गोष्टी असतात. एक दारुड्या एका तरुण मुलीला नग्न करून तिला चाबकाने फोडून काढीत आहे, अशी गोष्ट त्यांत चित्रासह देतात. एका स्त्रीच्या प्रेतावर तरुण अत्याचार करीत आहेत असें वर्णन सचित्र दिलेले आहे. अमेरिकेतल्या एका गांवच्या दहा मुलांनी आपल्यापैकीच एकाला रानात नेऊन प्रत्यक्ष फासावर चढविलें, आणि पोलिसांनी विचारल्यावर 'मासिकांतली गंमत आम्हीं करून पाहिली' असें सांगितलें. दुसऱ्या अशाच आठदहा मुलांनी शाळेतल्या तीन मुलींना रानांत नेऊन त्यांच्यावर वाटेल ते अत्याचार केले आणि पकडल्यावर तसेंच उत्तर दिलें. अमेरिकेत या मासिकांचा खप दरसाल अडीच कोटींचा आहे. हीं छापण्यास बंदी घातली तर ? मुद्रण- स्वातंत्र्य !
 ब्रिटन हे राष्ट्र सर्वात जास्त शाहणे आहे. तेथील लोक विवेकी आहेत. त्यांना व्यक्तिस्वातंत्र्याचे महत्त्वहि कळतें आणि मर्यादाहि कळतात. त्यांनी १९५५ साली कायदा करून हॉरर कॉमिक्स बंद करून टाकलों; आणि असले स्वातंत्र्य अनर्थकारक आहे असे सांगून हें केलें. या कॉमिक्स विरुद्ध चळवळ चालू होती त्या वेळी ऑक्टोबर १९५४ मध्ये डेली एक्सप्रेस ने लिहिले होते की, 'मुद्रणस्वातंत्र्याचे आम्ही कट्टे पुरस्कर्ते आहों. पण आज त्यावर मर्यादा घालण्याचे आम्ही समर्थन करतों, त्याचें कारण हीं कॉमिक्स.' हॉरर कॉमिक्सच्या विरुद्ध जी ब्रिटनमध्ये चळवळ झाली ती सर्व प्रामुख्याने शिक्षकांनी केली. प्रकाशकांनी त्यांना नानाप्रकारें विरोध केला, पण शेवटों विवेकाचा जय झाला. स्वातंत्र्य व स्वैरता यांतील भेद त्या राष्ट्राला उमगला व त्याने बालकांचा हा महारोग नष्ट केला. ब्रिटनमध्ये विवेकबुद्धि अशी प्रबल आहे म्हणूनच तेथील लोकशाही निर्भय आहे. अमेरिकेतील शास्त्रज्ञांनीच तुलना करून हें दाखवून दिले आहे. फिलाडेल्फिया नगरींत १९५१ मध्ये १०० खून झाले. शिकागो नगरीत २०० झाले. त्याच साली लंडनमध्ये फक्त २१ झाले. हें सांगून थिओडोर ब्लेच म्हणतात, गेलीं २५ वर्षे लंडनची सरासरी हीच आहे, याचें कारण इंग्लिश न्यायपद्धति. तेथे गुन्ह्याला शिक्षा इतकी निश्चित आहे की, २१ पैकी ११ गुन्हेगारांनी आत्महत्या केली, ६ जणांना शिक्षा झाली, ३ वेड्यांच्या इस्पितळांत गेले व एक निर्दोष सुटला. (चॅलेंज टु डेमॉक्रसी, पृ. ५५८). एका अमेरिकनाने अप्रत्यक्षपणे स्वतःच्या देशावर ही केवढी विदारक टीका केली आहे. वार्नेस यांनी आपल्या ग्रंथांत इंग्लंडची अशीच प्रशंसा केली आहे. अमेरिकन बँका धडाधड कोसळतात, त्यांची दिवाळी निघतात. इंग्लंडमध्ये कित्येक दशकांत एकाहि बँकेचें दिवाळे निघालेले नाही. याचें कारण असें की, 'तेथले लोक कायद्याचे निष्ठेने पालन करतात. तेथे लोकमत जास्त प्रभावी आहे. सट्टेबाजीचा मोह तेथे इतका नाही' (सोसायटी इन् ट्रॅन्झिशन, पृ. ७४०). ब्रिटनमध्ये धनलोभ नाही असें नाही, राजकारण नाही असें नाही. सर्व विकार, सर्व विकृति आहेत. पण समाजहितासाठी त्यांना मर्यादा घालणें अवश्य आहे, संयम, निग्रह यानेच समाज जगतो, हा विवेक तेथे जागरूक आहे. अमेरिकेत ही विवेकशक्ति कमी होत चालली आहे. म्हणूनच तेथल्या लोकशाहीला ही गुन्हेगारी म्हणजे मोठे आव्हान आहे असेंच तेथील शास्त्रज्ञ म्हणत आहेत.
 डेव्हिड लिलिएथल हे अमेरिकेतील मोठे विचारवंत गृहस्थ आहेत. 'टेनेसी व्हॅली ऑथॉरटी'चे ते अध्यक्ष होते. त्यानंतर ॲटॉमिक एनर्जी कमिशनचे ते अध्यक्ष झाले. त्या पदावर असतांना मिचिगन स्टेट कॉलेजमध्ये त्यांचे 'अमेरिकेच्या सामर्थ्याचं रहस्य' या विषयावर व्याख्यान झालें. त्या वेळी त्यांनी सांगितलें की, "आपल्या समाजाची नीतिनिष्ठा हा आपल्या लोकसत्तेचा खरा पाया आहे. आपली विवेकबुद्धि, आपल्या श्रद्धा हे आपलें खरें सामर्थ्य आहे. आपण अणुअस्त्रे तयार केली आहेत. त्याच खात्याचा प्रमुख म्हणून मी त्याचे महत्त्वहि जाणतों. पण केवळ संहार-सामर्थ्यालाच आपण आपलें खरें बळ मानूं लागलों तर तो भ्रम आहे. आपल्या समाजांत प्रत्येक नागरिकाची दुसऱ्याच्या सद्बुद्धीवर श्रद्धा आहे. ती जर ढळली तर शस्त्रास्त्रे कितीहि असली तरी आपण दुबळे होऊं. आपण दृढ बुद्धिवादी लोक आहों; ज्ञानाचे उपासक आहोंत. ही उपासना मंदावली तर आपली सुरक्षा ढासळेल. आपली विचारस्वातंत्र्यावर निष्ठा आहे, परमेश्वरावर श्रद्धा आहे. या आपल्या निष्ठा, या श्रद्धा लुप्त झाल्या तर आपला नाश ओढवेल. शस्त्रास्त्रे कितीहि असली तरी त्यांचा कांही उपयोग होणार नाही. मरण अटळ होऊन बसेल."
 एडवर्ड गिबन आणि विल ड्युरंट या दोन थोर पंडितांनी रोमन साम्राज्याच्या विनाशाची चिकित्सा केली आहे. 'डिक्लाइन अँड फॉल ऑफ दि रोमन एंपायर' हा गिबनचा ग्रंथ व 'सीझर अँड ख्राइस्ट' हा ड्युरँटचा ग्रंथ. दोघांनीहि अनीति, भ्रष्टता, समाजहितबुद्धीचा लोप, कमालीची विषमता, बेजबाबदारवृत्ति, स्वैराचार, श्रद्धाहीनता हेंच विनाशाचें प्रधान कारण दिले आहे. या साम्राज्याचा नाश रानटी टोळयांनी केला. गॉथ, व्हँडाल, हूण हे रानटी लोक आणि अलेरिक, अटिल्ला हे राक्षस त्यांचे सेनापति; या धाडी रोमवर कोसळल्यामुळे त्या प्रचंड साम्राज्याचा नाश झाला हें खरें; पण हें केवळ बाह्य कारण आहे. ड्युरँट म्हणतो, "रोमन लोकांनीच रोमन साम्राज्याचा नाश केला. अनीति, यादवी, अरेरावी, अधिकाऱ्यांची उर्मट बेजबाबदार वृत्ति, स्त्रियांची स्वैरता, व्यभिचार, हे दुर्गुणच रोमनांच्या नाशाला कारण झाले. इतर अनेक कारणे आहेत, पण ती गौण आहेत. विघटना आधीच झाली होती. नैतिक, आर्थिक, राजकीय कारणांनी साम्राज्य आधीच जर्जर झालें होतें. वैफल्य, निराशा, क्षुद्रता यांनी समाज आधीच ग्रासला होता. या दुगुणांमुळे दौर्बल्य येऊन साम्राज्याच्या तटबंदीला आधीच भगदाडें पडली होतीं. रानटी टोळ्या तेथूनच आंत घुसल्या; त्यांनी प्रलयकाळ जवळ आणला येवढंच." शेवटीं ड्युरँट याने इतिहासांतला एक फार मोठा सिद्धान्त मांडला आहे. "कोणतीहि थोर संस्कृति तिच्या अभ्यंतरांत विनाशबीजें निर्माण झाल्यावांचून केवळ बाह्य कारणांनी विनाश पावत नसते." (सीझर अँड ख्राइस्ट, पृष्ठ ६६५- ६६९)
 अमेरिकन समाजांत अशा तऱ्हेचीं विषबीजें आज स्पष्टपणे दिसत आहेत. आणि दुर्दैव असे की, व्यक्तिस्वातंत्र्य, व्यक्तिविकास या थोर तत्त्वांच्या पुण्याईखाली तीं अंकुरत आहेत. मागल्या शतकांत भांडवलशाहीने व्यक्तिस्वातंत्र्य, अनिर्बंध व्यवसायस्वातंत्र्य या नांवाखाली नंगानाच घातला होता. त्या वेळी आर्थिक क्षेत्रांत व्यक्तिस्वातंत्र्यावर बंधने घालावीं लागलीं, तशींच बंधने आता सामाजिक क्षेत्रांत घालणें अवश्य आहे, असें दिसूं लागले आहे. खरें म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्यावर बंधने घालणें अवश्य आहे, असें म्हणणें युक्त ठरणार नाही. गुंड, मवाली, डाकू यांनी तीं आधीच घातली आहेत. सभ्य, प्रामाणिक माणसाला त्यांच्या गुंडगिरीविषयीचें मत प्रकट करण्यास स्वातंत्र्य नाही. न्यायालयांत खरी हकीकत सांगण्याचें स्वातंत्र्य नाही. विधिमंडळांत कायदा करण्याचें स्वातंत्र्य नाही. आपल्या मुलांच्या मनांत हॉरर कॉमिक्समधील जंतु टोचावे की न टोचावे हें आईबाप ठरवू शकत नाहीत. म्हणजे मुलांना कसें वाढवावें हें ठरविण्याचें स्वातंत्र्य त्यांना नाही. गुंड मवाल्यांना, राजकारणी लोकांना मात्र वाटेल तें स्वातंत्र्य आहे. विवेकनिष्ठा समाजांतून गेली की, व्यक्तिस्वातंत्र्य हे गुंड मवाल्यांचें व्यक्तिस्वातंत्र्य आणि सज्जनांच्या स्वातंत्र्याचा अपहार असा अर्थ होतो. तो अर्थ अमेरिकेत कसा रूढ होत आहे तें वर दाखविलें. अशी समाजाची आंतून पोखरण झालेली असतांना दण्डसत्तांचे आव्हान लोकसत्ता स्वीकारूं शकतील काय, कशी शंका मनांत येणें साहजिक आहे.
 ही शंका अत्यंत तीव्र स्वरूपांत पुढे उभी राहण्याचे आणखी एक कारण आहे. दण्डसत्तांनी लोकसत्तांचीं जीं बलसाधनें शास्त्रज्ञान, औद्योगीकरण, अद्ययावत् शस्त्रास्त्रे, समाजशिक्षण, राष्ट्रनिष्ठा, त्यांचीच उपासना केल्यामुळे त्यांना अत्यंत बलाढ्य लोकसत्तांनाहि आव्हान देण्याचें सामर्थ्य प्राप्त झालें आहे असें वर सांगितलें आहे. याहून विशेष गोष्ट अशी की, सोव्हिएट रशियाच्या व नवचीनच्या नेत्यांनी दण्डबलाच्याच साह्याने समाजाची पोखरण करणारी अनीति, भ्रष्टता, अनाचार, स्वैरवर्तन हीं पापबीजेंहि दग्ध करून टाकण्यांत यश मिळविलें आहे. जॉन स्ट्रॉम हे अमेरिकन पत्रपंडित आहेत. चीनमध्ये ४ महिने त्यांनी अनिर्बंध प्रवास केला. अमेरिकेविरुद्ध तेथे अत्यंत जहरी प्रचार चाललेला त्यांनी डोळयांनी पाहिला, कानांनी ऐकला. या द्वेषावरच नव्या पिढीच्या मनाचें पोषण होत आहे असें त्यांनी लिहिल्याचें मागे सांगितलेंच आहे. अर्थात् त्यांचें चीनविषयी अत्यंत प्रतिकूल मत आहे. असे असूनहि त्यांनी नवचीनमधील नीतिनिष्ठेविषयी प्रसंशोद्गारच काढले माहेत (रीडर्स डायजेस्ट, एप्रिल १९५९). ते म्हणतात की, "१९३७ साली मी चीनला गेलों होतों. तेव्हा भुरट्या चोऱ्यामाऱ्या ही गोष्ट तेथे नित्याचीच होती. आता चोऱ्या अजिबात नाहीशा झाल्या आहेत. मी चार महिने चीनमध्ये होतों, पण हॉटेलच्या खोलीला एकदाहि कुलूप लावले नाही. तरी कधी एक वस्तु इकडची तिकडे झाली नाही." त्याचप्रमाणे नवचीनमध्ये इतर देशांत सर्वव्यापी होऊन बसलेली, बक्षिसी, पोस्त ही पद्धत नांवालाहि दिसत नाही. एका चांभाराच्या मुलाने त्यांच्या बुटाला पॉलिश केलें आणि तीन पेन्स मजुरी सांगितली. स्ट्रॉम यांनी त्याला सहा पेन्स दिले. पण त्या पोराने तीन पेन्स परत दिले व तीन पेन्सची पावती दिली. शिवाय वर तो म्हणाला की, 'बक्षीस घेणें म्हणजे नवचीनचा अपमान आहे.' श्री. स्ट्रॉम यांना हाच अनुभव सर्वत्र आला. पौंडापर्यंतची बक्षिशीहि नाकारण्यांत आली. आपल्या नियोजन मंडळातर्फे चीनला गेलेले. श्री. रा. कृ. पाटील यांनी आपला असाच अनुभव सांगितला आहे. त्यांनी नवचीनमधील श्रेष्ठ नीतिमत्तेचें एक फारच उत्कृष्ट गमक सांगितलें आहे. कम्युनिस्ट दण्डसत्ता येण्यापूर्वी शांघायच्या रस्त्यांतून तरुण स्त्रीला संध्याकाळी हिंडणे कठीण होतें. आता अगदी मध्यरात्रीसुद्धा एकटी दुकटी स्त्री तेथे निर्भयपणे हिंडूं शकते. 'भारत आणि चीन' या आपल्या पुस्तकांत उत्तर भागांत त्यांनी आपली दैनंदिनी दिली आहे. नवचीनच्या सीमा सोडून पुन्हा ब्रिटिश अंमलाखालच्या हाँगकाँगच्या हद्दींत ते आले. त्या वेळीं नवचीनचें जीवन व हाँगकाँगमधले जीवन यांत सभ्यता, संस्कृति, नीतिमत्ता या दृष्टींनी कसा जमीनअस्मानाचा फरक पडला आहे तें त्यांना जास्तच स्पष्ट दिसून आलें. हाँगकाँगमध्ये रात्रीचें जीवन- (नाइट लाइफ) त्याचा उन्माद, विलास, जुगार, दारू, नाच सर्व चालू आहे. रिक्षावाले चांगली मुलगी गांठून देतो, म्हणून गर्दी करीत आहेत. ऐश्वर्य, भपका, चैन, विलास! सर्वत्र हेच वातावरण. नवचीनमध्ये याचा मागमूसही दिसला नाही. तेथे गरिबी, दारिद्र्य आहे; पण सर्वत्र निग्रह, संयम, सभ्यता यांचें वातावरण आहे आणि हाँगकाँगमध्ये हें असें. तें पाहून त्यांच्या मनांत विचार आला, 'चारित्र्य आणि समृद्धि यांची अशी फारकतच राहावी काय?' डॉ. एस्. चंद्रशेखर हे भारत सरकारतर्फे चीनच्या लोकसंख्येच्या प्रश्नाचा अभ्यास करण्यास नवचीनला गेले होते. तेथे दण्डसत्ता आहे, व्यक्तिस्वातंत्र्य नाही, मानवी जीवनाला कसलीहि किंमत नाही, असे दिसल्यामुळे त्यांचें मत नवचीनबद्दल फारच प्रतिकूल झालें. तेथील शांतता म्हणजे स्मशान- शांतता आहे असें ते म्हणतात. पण चीनच्या नीतिमत्तेविषयी त्यांनीहि प्रशंसोद्गार काढले आहेत. खिसेकापू, डाकू, ठग, वेश्या तुम्हांला चीनमध्ये दिसणार नाहीत. चिनी जनता अत्यंत प्रामाणिक झाली आहे. वृत्तपत्रांचा गठ्ठा व शेजारीं पैशासाठी पेटी ठेवून विकणाऱ्याने दुसऱ्या कामास जाणे ही इंग्लंडच्या लौकिकाची गोष्ट चीनमध्ये शहरोशहरी दृष्टीस पडते. त्या पैशाला कोणी हात लावणार नाही. कोणी पत्र फुकट घेणार नाही. चिनी दुकानांत मोड मोजून घ्यावी लागत नाही, कारण तेथे कमी जास्त काही होणार नाही ही परक्यांचीसुद्धा खात्री झाली आहे (इलस्ट्रेटेड वीकली २५ जानेवारी ते १९ एप्रिल १९५९).
 चीनमधील श्रेष्ठ नीतिमत्तेचें सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे हें की, तेथे ६५ कोटि लोक आपल्या अन्नवस्त्रासाठी, उपजीविकेसाठी कष्ट करतात. चीनच्या कम्युनिस्ट नेत्यांनी ६५ कोटि लोकांना रोज ८-१० तास कष्ट करायला लावलें ही मानवी जीवनांतली अगदी अभूतपूर्व क्रान्ति होय. अमेरिकेत संघटित बलाचा फायदा घेऊन कामगार आठवडयांत ठरलेले ४० तासहि काम करण्याचें टाळू लागले आहेत. हेन्री फोर्ड एकदा म्हणाला होता की, केल्या कामाचे दाम मोजणें, दर कितीहि महाग असला तरी परवडतें, त्यांत अंतीं फायदाच होतो. पण टिवल्याबावल्या करणें, उशीरा येणें, लवकर जाणें, आणि फोरमनला धाक दाखवून हजेरी पूर्ण दाखविणें, असल्या कामाचा पैसा द्यावा लागला तर कारखानदारांचे दिवाळें निघाल्याखेरीज राहणार नाही. मुद्दाम टाळाटाळ करून पगार भरपूर घेणें ही नवी अनीति आहे. पण चीन, भारत, इंडोनेशिया, इत्यादि पौर्वात्य राष्ट्रांत आळस, सुस्ती, दैववाद, हीन आकांक्षा यांमुळे काम न करतां सुस्तपणें पडून राहणे ही युगायुगांची अनीति आहे. या जनतेला पोटाला न मिळाले तरी चिंता वाटतच नाही. फार तर आजच्या भाकरीची ते विवंचना करतील. तेवढे कष्ट करतील. पण चार दिवसांच्या भाकरीची निश्चिति झाली की, त्यांनी कुदळ खाली ठेवलीच. थोड्या श्रेष्ठ जीवनाची आकांक्षा, जास्त सुखाची अभिरुचि, संस्कृतीची गोडी, हा भागच त्यांच्या जीवनांत नाही. त्यांना उद्या, परवा हे माहीतच नाहीत. ते फक्त आज जाणतात. त्यामुळे ही कोटिकोटि संख्येची जनता कष्टविन्मुख आहे. उत्साह, प्रयत्नशीलता, उदयोन्मुखवृत्ति, जिगीषा या वृत्ति त्यांना अज्ञात आहेत. निवृत्तीचें, निराशेचें, दैववादाचें तत्त्वज्ञान त्यांच्या हाडींमांशी खिळले आहे. त्यामुळे वर्षभर रोज ८-१० तास कष्ट हे त्यांना पाश्चात्त्य संस्कृतीच्या आगमनापूर्वी माहीतच नव्हते. चिनी नेत्यांनी यमदण्डाच्या साह्याने का होईना पण ६५ कोटि लोकांना कामाला लावलें ही त्यांची फार मोठी बहादुरी आहे. कष्ट करावे आणि खावें ही खरोखर श्रेष्ठ नीतिमत्ता होय.
 दण्डसत्तांनी आपल्या बहुजनांत प्रस्थापित केलेल्या या श्रेष्ठ मूल्यांमुळे त्यांनी लोकसत्तांना दिलेल्या आव्हानाला फार मोठा अर्थ प्राप्त होतो. नीतिमत्तेमुळे कोणत्याहि समाजाचें सामर्थ्य वाढत असतें, आणि पूर्वी सांगितलेल्या षडंगबलांनी संपन्न असलेल्या दण्डायत्त समाजांत याहि बलसाधनांची भर पडल्यामुळे त्यांचें सामर्थ्यं द्विगुणित किंवा दशगुणित होईल यांत शंका नाही. लोकसत्तांच्या नेत्यांनी याचा फारच गंभीरपणे विचार केला पाहिजे.
 अमेरिकेने कम्युनिस्ट दण्डसत्तांचे आव्हान कसें स्वीकारलें, तें स्वीकारण्याचें व त्याला प्रत्युत्तर देण्याचें सामर्थ्य त्या जगाच्या अग्रभागी असलेल्या लोकसत्तेच्या ठायीं कितपत आहे याचा येथवर आपण विचार केला. केवळ आजचा विचार केला तर हे आव्हान अमेरिका अगदी लीलया स्वीकारू शकेल हें आपल्याला प्रारंभींच्या विवेचनावरून दिसून येईल. दण्डसत्तांची कितीहि प्रगति झालेली असली, तरी अमेरिकेच्या आजच्या सामर्थ्याच्या तुलनेने त्यांचें सामर्थ्य फार तोकडें आहे. अमेरिकेच्या आजच्या सामर्थ्याशीं मुकाबला करूं शकेल अशी एकहि सत्ता जगांत नाही. तेव्हा आजचे आव्हान ही इतर लोकसत्तांना बिकट समस्या असली तरी अमेरिकेला ती समस्याच नाही. प्रश्न आहे तो उद्याचा, परवाचा, पंचवीस तीस वर्षांनंतरचा.
 हा प्रश्न का निर्माण झाला याची कारणें वर सांगितली आहेत. राजकारण, संघटित सभ्य डाकूगिरी, विवाहसंस्थेचा ऱ्हास, बालगुन्हेगारी, यांमुळे अमेरिकन समाजाची नीतिमत्ता, त्याची धर्मनिष्ठा, पार ढासळून गेली आहे. त्यामुळे लोकशाही मूल्ये नष्ट होत आहेत, आणि या कारणाने भावी काळाविषयी चिंता निर्माण झाली आहे; पण याविषयी निराश होऊन आजच निर्णय करावा असें कांही घडलें आहे असे मानण्याचें कारण नाही. अमेरिकन समाजाच्या धन व ऋण या दोन्ही बाजू विचारात घेतल्या तर धन ही ऋणावर मात करील असें वाटण्याजोगी अनेक लक्षणें, अनेक बलस्थानें आजहि दिसून येतात. त्यांचा विचार करून या प्रकरणाचा समारोप करूं.
 अमेरिकेत सभ्य डाकूगिरी व राजकारणी पेंढारशाही अगदी शिगेला पोचली असली तरी जॉन विल्यम्स, थॉमस स्मिथ, थॉमस ड्यूई यांसारखे धर्मनिष्ठ, चारित्र्यसंपन्न झुंजार वीर तेथे सारखे निर्माण होत असतात. धनलोभ, सत्तालोभ यांना बळी न पडतां, प्राण नित्य धोक्यांत असले तरी त्याचीहि पर्वा न करता, लोककल्याणार्थ नित्य संग्रामास सिद्ध असलेले ध्येयवादी शूर वीर ज्या समाजांत निर्माण होतात त्या समाजाला ढासळलेली नीतिमत्ता सावरण्यास फार वेळ लागेल असें वाटत नाही. अमेरिकन बहुजन हे पुष्कळच जागरूक व विवेकसंपन्न आहेत. ध्येयवादी नेतृत्व प्राप्त होतांच आपल्या संघटित सामर्थ्यानिशी त्याच्या मागे उभे राहण्याची बुद्धि त्यांना आहे. म्हणूनच नीति-अनीतीच्या लढ्यांत नीति पुनः पुन्हा विजयी होऊं शकते. या अनीतीवर, राज्यकारभारांतील भ्रष्टतेवर अखंड पाहरा ठेवण्यासाठी अमेरिकन लोकसभेने काँग्रेसने एक कायमची समितिच नेमलेली आहे. या सर्वाधिकार समितीची स्थापना १७९१ सालीच झालेली आहे; आणि गेल्या दीडशे वर्षांत तिने अशीं एक हजार प्रकरणें धसास लावली आहेत. विशेष म्हणजे ही समिति कोणाचाहि मुलाहिजा ठेवीत नाही. १९३३ साली तिने स्टॉक मार्केटचें शोधन केलें. त्या वेळी मॉर्गन व्हिटने, आटोखान मिचेल अशा मोठमोठ्या भांडवलाधीशांना साक्षीदाराच्या पिंजऱ्यांत उभे करून समितीने त्यांची सर्व कारस्थानें जनतेपुढे उघडी करून मांडली. त्यामुळे स्टॉक मार्केटच्या कायद्यांत फार मोठ्या सुधारणा करतां आल्या. ही समिति मंत्र्यांनाहि तुरुंगांत टाकण्याइतकी निःस्पृह आहे. अल्बर्ट फॉल हा अध्यक्ष हार्डिंग याचा गृहमंत्री. त्याने आपला एक मित्र एडवर्ड डोहने याला सरकारी तेलाच्या खाणीचा मक्ता, कायद्याप्रमाणे टेंडरें मागवावयाचीं तीं न भागवितां आपल्या अधिकारांत तसाच देऊन टाकला. उलट डोहने याने फॉल याला ५ लाख रु. कर्ज (?) म्हणून दिले. हे प्रकरण उजेडांत आलें तेव्हा एवढा गदारोळ झाला, जनतेच्या संतापाचा एवढा वडवानल पेटला की, त्यांत अल्बर्ट फॉलची तर आहुति पडलीच पण अध्यक्ष हार्डिंग, त्याचें मंत्रिमंडळ आणि त्याचा रिपब्लिकन पक्ष यांचाहि ध्रुव्वा उडाला.
 दुसऱ्या महायुद्धाच्या काळांत काँग्रेसच्या ट्रुमन् कमिटीने संरक्षणखात्यांतील भ्रष्टता, अपहार, लूट, लाच इत्यादि गुन्हेगारी उघडकीस आणून जनतेचे ७५०० कोटि रुपये वांचविले, आणि त्यांतील कुविख्यात डाकूंना तुरुंगांत धाडलें. कामगार संघटनांत अशीच ठग पेंढारशाही चालते. सीनेटर मॅक क्लेलन यांच्या अध्यक्षतेखाली सध्या तिचें शोधन चालू आहे.
 गुन्हेगार, चोर, डाकू यांच्या दण्डनाविषयी हें झालें. पण समाजांतल्या या दुष्प्रवृत्ति मुळांतच नष्ट व्हाव्या म्हणून बाल-तरुण विद्यार्थ्यांच्या शिक्षणांत व बालपणच्या संस्कारांत आमूलाग्र क्रान्ति घडवून आणणारे ध्येयवादी शिक्षक व कार्यकर्ते हेहि अमेरिकेत सारखे निर्माण होत असतात. अमेरिकेत 'ज्यूनियर डेप्युटी शेरीफ लीग' या नांवाची संस्था १९४७ च्या सुमारास स्थापन झाली आहे. १० ते २० या वयाच्या मुलांना या लीगचे सभासद होतां येतें. लोगन काउंटीचे शेरीफ ग्रोव्हर कोंब यांचे या बाबतींतले अनुभव सांगतों. ८०००० वस्तीचा हा जिल्हा असून तेथील शेकडा ८५ कुटुंबे कोळशाच्या खाणींत काम करतात. त्यांच्या मुलांमध्ये गुन्हेगारीचें प्रमाण फार मोठें होतें. चोरी, सुरामारी हे नित्याचे प्रकार असत. शेरीफ कोंब यांनी या मुलांच्यांत प्रचार करून त्यांना वरील लीगचे सभासद करून घेतले आणि अनेक कामे जबाबदारीने त्यांच्यावर सोपविली. गांवांतील चोऱ्यामाऱ्या हुडकून काढणे, गावांतील स्वच्छतेकडे लक्ष ठेवणें, खेळांचीं मैदानें तयार करणें, आपापल्या शाळेत बागा तयार करणें, दुरुस्त्या करणें आणि इतरहि अनेक प्रकारची जनसेवा करणे हीं कामें तीं मुलें हौसेने करूं लागलीं आणि गुन्हेगारीचे प्रमाण झपाट्याने कमी झालें. तें इतके की, रिमांड होमचे व्यवस्थापक जेसी रिले यांनी लोगन काउंटीत निराळा प्रकार काय घडला आहे याची मुद्दाम चौकशी केली. कारण तेथून बाल गुन्हेगार मुळीच येईनासे झाले. या लीगचा प्रसार आता सर्व ४८ राज्यांत झाला असून सुमारें १० लाख मुलें 'ज्युनिअर डेप्युटी शेरीफ' झालेली आहेत. तरुण मुलांच्या अंगच्या उसळत्या रक्ताला कांहीतरी लोककल्याणाच्या, समाजसेवेच्या कार्याला लावणें, त्यांच्यावर जबाबदारी टाकणें हें यांतलें मुख्य सूत्र आहे. यांतून त्यांच्यावर फार उत्तम संस्कार होतात आणि वाममार्गानी जाणारी शक्ति सन्मार्गाला लागते. डॉ. ग्लेन यांनी अलबामा राज्यांतील बर्मिंगहॅम या गावी शाळा काढून ती याच धोरणाने चालविली आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासाखेरीज समाजसेवेचीं कामें करावयास लावणें, त्यांच्यावर जबाबदारी टाकणें, आपणांस मोठेपणा मिळावा, मान मिळावा ही त्यांची भूक या रीतीने तृप्त करणें आणि अशा रीतीने त्यांची अस्मिता संतुष्ट करून त्यांचे कर्तृत्व उदयास आणणें हें यांतील मुख्य तत्व आहे. तात्पर्यार्थ असा की, चीन- रशियामध्ये जें दण्डसतेने साधतात तेंच अमेरिकेत लोकशाही मार्गांनी शिक्षणाने, संस्काराने साधावें असा हा प्रयत्न आहे. त्याला यशहि भरघोस येत आहे असें दिसतें. यावरून अमेरिकेतील जनता अंतरांत चांगलीच जागरूक झाली आहे हें प्रत्ययास येतें. कारण या दोन्ही प्रकारच्या उपक्रमांना नागरिकांनी तनमनधन खर्चून साहय केलें आहे.
 ही जागरूक जनता हेंच अमेरिकेचें खरें बळ आहे. आज अमेरिकेतील ग्रंथकार, तत्त्ववेत्ते, समाजशास्त्रज्ञ, शिक्षक, धर्मगुरु आपल्या देशांतील अनीति, गुन्हेगारी, भ्रष्टता, अधर्म यांची फार गंभीरपणें चर्चा करीत आहेत, हें त्याचेंच लक्षण आहे. शेकडो, हजारो, ध्येयवादी लोक निरनिराळया योजना आखून त्या कार्यवाहीत आणून तेथील अनीतीला पायबंद घालण्यासाठी जीवाचें रान करीत आहेत. याचेच नांव विवेकशक्ति. या विवेकशक्तीच्या उपासनेमुळेच अमेरिकेने गेली शंभर वर्षे भांडवलशाहीशीं झगडून तिच्यावर मात केली आहे. हा विजय फार मोठा आहे. राष्ट्रहितासाठी धनलोभाचा त्याग करावा ही सद्बुद्धि अमेरिकन भांडवलदारांत जागृत आहे असा याचा अर्थ होतो. मागे सांगितल्याप्रमाणे निग्रोंचा प्रश्नहि बराचसा अमेरिकन जनतेने सोडवीत आणला हें तर त्यांच्या मनःसंयमाचें, विवेकाचें फार मोठे लक्षण आहे. या सर्वांचे कारण माझ्या मतें एक आहे. अमेरिकेची व्यक्तिस्वातंत्र्यावरची भक्ति ! परमेश्वराचा एकनिष्ठ भक्त ज्याप्रमाणे, 'देह जावो अथवा राहो' या भावनेने, देवासाठी सर्वस्वाचा त्याग करण्यास सिद्ध होतो त्याचप्रमाणे अमेरिकन लोक व्यक्तिस्वातंत्र्याच्या रक्षणासाठी वाटेल तो होम करण्यास सिद्ध होतील. 'व्यक्तिस्वातंत्र्य किंवा मृत्यु' असाच त्यांचा बाणा आहे; व्यक्तिस्वातंत्र्याची ही भक्ति अमेरिकेतील सामान्यांतल्या सामान्य मनुष्याच्या रक्तांत भिनलेली आहे. त्यामुळे क्षणकाळ जरी तेथील समाजाच्या मनाला मालिन्य आलें असले तरी लवकरच त्या मनांतील विवेकज्योत पुन्हा पाजळेल, काजळी निघून जाईल आणि लोकशाही व अमेरिकन संस्कृति यांच्या रक्षणासाठी अमेरिकन नागरिक प्राणांचे मोल देण्यास सिद्ध होऊन संग्रामांत उभा ठाकेल याविषयी कोणालाहि संदेह नाही. म्हणून, 'कम्युनिस्ट दण्डसत्तांनी दिलेलें आव्हान, आपली लोकशाही मूल्ये पूर्णपणें अबाधित ठेवून, त्यांना तिळमात्रहि धक्का न लावतां, त्यांना अणुमात्रहि मुरड न घालतां, आम्ही सहज स्वीकारू शकूं' असे अमेरिकेतील कर्त्या पुरुषांनी, नेत्यांनी व रणपंडितांनी जगाला जें आश्वासन दिले आहे ते अगदी यथार्थ आहे, सारगर्भ आहे असें मानण्यास कसलाच प्रत्यवाय नाही.

+ + +