अंक दुसरा

संपादन

प्रवेश पहिला

संपादन

[भिंतीवरून उडी मारून बाळाभाऊ येतात.]

  • बाळा: काल मधुकरानें वेणूला पाहायला येण्यासाठीं मला बोलाविलें: पण अशा राजरोस रीतीनें येण्यांत काय अर्थ ? कुठल्याही कादंबरींत, नाटकांत नायकनायिकेला त्यांच्या भावांचें किंवा बापाचें साह्य किंवा संमति मिळाली आहे का ? असें साह्य मिळतें तर कित्येक कादंबर्‍यांचा पहिल्या प्रकरणांतच शेवट झाला असता आणि बहुतेक नाटकें नाटकांतल्या पांच अंकांऐवजीं उजळणींतल्या पांच अंकांतच आटोपलीं असतीं ! प्रेमाची खरी लज्जत चोरटेपणांतच आहे; पण या अरसिकांना त्याची काय किंमत ? तिच्या-नाहीं, माझ्या प्रियेच्या बापाची, भावाची निदान आईची जरी आमच्या विवाहाला आडकाठी असती तर आमच्या या प्रीतिविवाहाला नाटकाचें किती सुरेख स्वरूप आलें असतें. तरी माझ्याकडून मी किती सावधगिरी ठेविली आहे. मोहनतारेंतल्या मोहनाप्रमाणें, पियेची बागेंत चोरून भेट घेण्यासाठीं या भिंताडावरून उडी मारून मी आंत आलों. किती त्रास पडला मला. माझा ढोपर फूटून पाय अगदीं जायबंदी झाला. मोहनचा कांहीं ढोपर फुटला नाहीं. नाटकांतले नायक भाग्यवान् खरे ! उडया मारतांना त्यांचे ढोपर फुटत नाहींत. कित्येक जखमा लागल्या तरी त्यांना दुःख होत नाहीं. जेवणाखाण्याची त्यांना ददात नाहीं ! नाहीं तर हल्लींचें नीरस जीवित ! लोखणी करतांना चाकूनें हात कापला तरी असह्म वेदना होतात. उडी मारतांना ढोपरं फुटतात. पण नाहीं, असें भिऊन उपयोग नाहीं. प्रेमांत संकटें तर यायचींच. (पाहून) अरे, पण माझ्या येण्याचें सार्थक झालेंसें वाटतें. कारण

ही सुरसुंदरी जणुं खालीं । उतरोनी भूवीर आली ॥
ती ही गगनिंची रंमा उर्वशिकीं ।
पण, ही सुंदरी केर टाकण्याकरितां येत आहे, त्या अर्थीं ही ती नसावी. कुठल्याही नाटकांत, काव्यांत, कादंवरींत, नायिका केर वगैरे टाकितांना द्दष्टीस पडली नाहीं. ही तिची एखादी मोलकरीण, चुकलों, मोलकरणींना काव्यांत जागाच नाही-तिची एखादी दासी किंवा निदान सखी असावी ! (निरखून पाहून) पण, छे, माझी शंका निराधार आहे ! हीच ती माझी प्रिया. कारण
सुवर्ण केतकी परि जो दिसतो वर्ण नव्हे तो दुसरीचा ॥
सडपातळ हा नाजुक बांधा खचित त्याच मृदुदेहाचा ॥ वगैरे

अरेरे, कोण भयंकर हाल हे ! कोणत्याही सुंदर स्त्रीवर असा दुर्धर प्रसंग आला नसेल. ही सुंदरी केर टाकणार ! परमेश्वरा, हें पाहण्यापेक्षां मी अंध का नाहीं झालों? हें काय पहायाचें नशिबीं आलें ! प्रभु विचित्र किती तव चरित्र तर्क न कोणाचा चाले ॥ कोमल शकुंतलेला झाडांना पाणी घालायला लावणार्‍या त्या थेरडया कण्वापेक्षां हिचा थेरडा फारच अविचारी असला पाहिजे. करूं का सूड घ्यायची प्रतिज्ञा ? लाडके, सुकुमार वेणू, टाक, टाक तो केर खालीं; पण हें काय ? या केराकडेच माझी नजर इतकी कां बरें लागत आहे ? हं, मोहनतारेंत तारेच्या हातांतल्या घागरीप्रमाणें आपणही फुंकलों गेलों असतों तर फार बरें झालें असतें असें मोहनला वाटलें तसेंच मलाही वाटत असलें पाहिजे. अहाहा, मी जर असा केर होऊन झाडलों गेलों असतों तर आणखी काय पाहिजे होतें ? बा केरा, धन्य आहेस तूं, हा केर ज्या उकिरडयावर पडेल तो उकिरडा धन्य, त्याच्यावर लोळणारा गाढव सुद्धां धन्य धन्य ! त्रिवार धन्य ! त्या केरांतला कागदाचा फाटका तुकडा मला प्रणयपत्रिकेसारखा वाटतो; त्यांतली धूळ हीच अंगारा. (तिच्याकडे पाहात राहतो.)

  • वेणू: (स्वगत) जरा कुणाचें पाऊल वाजलें कीं कोणीं मला पहायला येत आहे असें मला वाटतें. वहिनीनें मला इतका धीर दिला खरा, पण तिचें बापडीचें तरी काय चालणार ? असो, नशीब आपलें, जें व्हायचें असेल तें होईल. आतां देवासाठीं चार कळ्या ती काढून ठेवाव्या.

(राग-पिलु. ताल-त्रिवट.)
वेणू: कलिका करिती केलि का गणिति न नाशास कां ? ॥धृ०॥
आत्मार्पण करुनी ईशा मजही सूचवीति कां ? ॥१॥

(फुलें काढूं लागते.)

  • बाळाः (स्वगत) आतां पुढें कसें व्हावें ? अशांत हिच्यावर एखादें संकट येईल तर काय बहार होणार आहे; पण संकट तरी कोणतें येणार ? सौभद्राप्रमाणें घटोत्कचासारखे राक्षस या कलियुगांत नसल्यामुळें तशीं संकटें येण्याचे मार्गच बंद झाले आहेत. निदान वीरतनयंतल्या शालिनीप्रमाणें एखादा वाघ येईल म्हणावें तर त्याचाही कांहीं संभव नाहीं. या घराजवळच्या बागांतून अरण्यांतल्या सिंहवाघांबद्दलची भूक कुत्र्यामांजरांवरच भागविली पाहिजे. हां ! निदान शाकुंतलासारखा एखादा भ्रमर मात्र या बागेंत असेल कुठें तरी; पण त्याला या आतांच्या पोरी भितात तरी कुठें ? त्याच्या गुंजारवानें आतांशा कोणी गुंगतही नाहीं. प्रेमाच्या बाजारांतल्या सार्‍याच पदार्थांचा भाव उतरल्यासारखा दिसतो. प्रणयीजनांच्या या गैरसोई परमेश्वर कधीं दूर करील तो सुदिन ! (पाहून) आहा, ती एक माशी तिच्या तोंडापुढें येत आहे. माशी का असेना ? बुदत्याला काडीचा आधार. व्हावेंच आतां पुढें (पुढें होऊन माशी हाकलतो. वेणृ दचकते.) सुंदरी, भिऊं नकोस. काय ही तुझी स्थिति ? सुंदरि,

घेउनि पंकजपत्राचा पंखा घालूं का शीत वारा ॥ वगैरे

  • वेणूः आहे काय हा गोंधळ ? आणि तुम्ही इथें आलां कसे ?
  • बाळाः कसा आलों हें भगवान् कामदेवाला ठाऊक !
  • वेणूः म्हणजे ?
  • बाळाः त्या पडक्या भिंताडावरून. येतांना माझ्यावर काय काय संकटें आलीं याची तुला कल्पनाही नसेल. काय सांगूं सूंदरी, माझा सदारा फाटला, धोतराला आखूट भरला, हा पहा माझा ढोपरही पुटला आहे; पण त्याचें काय आहे. प्रणयीजनांनीं संकटें हीं सोसलींच पाहियेत !
  • वेणूः इतके सायास घ्यायचें कारण ?
  • बाळा: कारण ? कारण तूंच. तुझ्याखेरीज दुसरें कोण ?
  • वेणू: काय मी ? मीं काय केलें यांत ?
  • बाळा: काय केलेंस ? तूंच पहा बरें, सुंदरी !

हें काय बरें त्वां केलें ॥ मऋणालसममुक्तालतिकेतें । दावुनि जैसें हंस वरातें । तैसें मम मानसजन्म्यातें ॥ बहु दूर विलोभुनि नेलें ॥१॥

  • वेणू: मोठाच चमत्कार म्हणायचा ! बरें, तुम्हांला यायचेंच होतें तर इतर रस्ते का थोडे पडले होते ? घरांत यायचें होतें नीट !
  • बाळाः घरांत ! छेः प्रणयीजनांची पहिली भेट अरण्यांत निदान एखाद्या बागेंत तरी पडावी असा सिद्धांतच आहे ! अर्जुन सुमद्रेला भेटला तो अरण्यांत ! मोहनाने पारेला पाहिलें तेंही बागेंत ! दुष्यंत-शकुंतलेची भेट पहा. अरण्यांतच ! कामसेन रसिकेला भेटला बागेंतच ! एवढी जहांवाज त्राटिका; पण प्रतापरावाला बागेंतच भेटली ! फार कशाला, मतिविकार अगदीं आजकालचें नाटक ना? त्यांत सुद्धां चकोर-चंद्रिकेची भेट तुळशीवृंदावनांत होते !
  • वेणूः अस्सें; पण अशा रीतीनें येतांना तुम्हीं सारासार विचार पहायाचा होता थोडा ? लोक काय म्हणतील तुम्हांला
  • बाळा: सुंदरी, प्रेमवेडयाला लोकांची भीति कधीं असते का ? सारासार विचार पहावयाला किंवा लोकांची बोलणीं ऐकायला मला अवकाश नाहीं. कारण

प्रणय तरंगांसचें । विवश वाहतों जवें । जलवें पाहवे गतिमुळें न ऐकवे ॥ योगबलें जणुं यति । ब्राह्मउपाधींप्रती । प्रणयीजन निवरती । खेद मुळिं न त्यां शिवे ॥१॥

  • वेणूः इतकें प्रेम आहे तुमचें माझ्यावर ? मला नव्हतें हें माहीत !
  • बाळा: इतकेंच काय ! यापेक्षांही जास्त ! वेणू, सुंदरीं

तुजविण वृथा गमे संसार । संसार सौख्य कुठचें ॥ध्वनि॥

  • वेणूः बरें, पण इतके दिवस हा तुमच्या प्रेमाचा उमाळा असाच राहिला आणि आजच त्याला असा पूर कशाअनें आला ?

बाळा: इतके दिवसांची गोष्ट निराळी ! आतां तरुणपणाची गोष्ट निराळी ! बाळपणींचा काळ निघून गेला तो ! त्या वेळीं “ जें ब्रह्म काय तें मायबाप ही जोडी ॥ खेळांत काय गोडी ॥” पण आतां ते खेळ नकोत, त्या आटयापाटया नकोत. ते बैदूल नकोत, ती लंगडी घालणें नको असें झालें झालें आहे ! आणि तें कां म्हणशील तर-आलि कालिं या मज तरुण दशा ॥ निःशंकपणें रमणें गेले प्रणयकेलि मज सुचती ऐशा ॥ धात्रीपूर्वीं निधि वाटे तो सांप्रत गणती तरुणी प्रयशा.

  • वेणूः बरीच मनोरंजक आहे तुमची कहाणी ! बरें, झालेंना तुमचें पहाणें ? जातें मी आतां.
  • बाळा: (तिला अडवून) वाः हें काय । चाललीस कुंठ अशा तूं ? तुला जाऊं देणार नाहीं. नुसता तुला पहावयास मी आलो हा तुजा संशय खोटा आहे. सुंदरी. भूमिजल तेज नम...! पाणि तुझा सखे ॥ (तिचा हात धरतो. ती रागानें दूर जाऊन उभी राहते.)
  • वेणू: हं; खबरदार ! अंगाला हात लावाल तर !
  • बाळा: (स्वगत,) विस्मयाने) मला वाटलें होतें कीं माझे श्रम जाणून ही आतां मला आलिंगन देऊन सुभद्रेप्रमाणें ॥ बहुत छळियलें ॥ पद म्हणणार ! पण ही तर संतापून दूर उभी राहिली ! नाटकांतल्या मुख्य मुख्य खुब्या हिला ठाऊक नाहींत असें दिसतें ! आमच्याकडे स्त्रीशिक्षण नाहीं त्याचें त्याचे हे दुष्पारिणाम ! आतां हिचें समाधान केलें पाहिजे. (प्रकट) सुंदरी, अशी रागावूं नकोस ! अशा वेळीं रागावणें म्हणजे अगदीं अरसिकपणा आहे १ एकसुद्धां नाटक पाहिलें नाहींस वाटतें तूं ? तरीच. म्हणून म्हणतों-नच सुंदरि करुं कोपा । मजवरि करि अनुकंपा ॥ (वगैरे) काय, अजून तुला माझी दया येत नाहीं ?
  • वेणूः (स्वगत) काय म्हणावें आतां या मूर्खपणाला ? (प्र.) तुमच्याकडे पाहील त्याला तुमची दया येणारच म्हणा
  • बाळाः (आनंदानें) झालें तर मग; कर टाकि सखे ग या कंठीं ॥ फिरविन हनुवटी । शिणविन तनुकटी ॥ (वगैरे)
  • वेणूः (स्वगत) या स्वारीला वेतानेंच जायला लाविलें पाहिजें. (प्र.) हें पहा. तुमच्या आवडत्या नाटकांतलाच मी तुम्हांला एक प्रभ विचारतें ! आतांच तुम्हीं म्हटलें ना कीं मीं एकही नाटक पाहिलें नाहीं म्हणून तें पुष्कळसें खरें आहे आणि तुम्ही तर असे रसिक ! मग तुमची शारदा म्हणते त्याप्रमाणें रेशमाच्या शेल्याला सुताच्या दशीप्रमाणें मी तुम्हांला शोभलें तर पाहिजे ना ? तेव्हां हा नाद तुम्ही सोडून द्या ! तुमच्यासारखी एखादी रसिक मुलगी पाहून तिच्याशीं लग्न करा !
  • बाळा: ठीक विचारलेंस ! असेंच शालिनीनें शूरसेनाला विचारिलें तेव्हांचें त्याचेंच उत्तर तुला देतों ! वेडे.

अशि ही सगुणखनि देइ त्यजोनी । जगिं या दिसोनी न येईल कुणी । शरश्वंद्र अतिनिर्मल जैसा शोभवि तारागार ॥ विमल देहीं शुद्ध आत्मा तेविं करित सुविहार ॥ निरखोनी, विदेही मुनिही मतिहीन होई ॥१॥ असा मूर्ख-अंध-वेडा; पुढे शालिनीचें वाक्य आहे ! दुसरी रसिक मुलगी आतां पाहणें म्हणजे प्रेमाला हरताळ लावण्यासारखेंच आहे ! पुष्कळदां नायिकेपेक्षां दासींचीं सोंगें सुरेख दिसतात; परंतु कोणत्याही नाटकांतला नायक तिकडे ढुंकून पाहायचा नाहीं आणि प्रियेचे दोष त्याला गुणासारखेव वाटतात. कारण अनिवार मनुज करि अंतरीं ज्या वस्तुवरी प्रीति (वौरे) म्हणून म्हणतों. लाडके, आतां अंत पाहूं नकोस ! ये अशी, बैस मजसरशी ! नाहीं कुणीं दूसरें ॥ कां शंका धरिशी बिंबाधरे ॥

  • वेणूः (स्व०) छे: हें वाढतच चाललें ! आतां आटपतें घेतलेंच पाहिजे. (प्र.) मी मघापासून पाहतें आहें; लाज नाहीं वाटत तुम्हांला असें भलभलतें बोलायला ! जनलज्जा, मनलज्जा कांहीं वाटूं द्या थोडी !
  • बाळाः सुंदरी, कां रागावतेस आतां उगाच ? रागावण्याचा काळ गेला.

जें जें तूं बोलसी तें मजला का श्रुत नसे ॥ परि त्याचें काय आतां मज भरलें स्मरपिसें ॥ म्हणून आतां मी तुझें मुळींच ऐकणार नाहीं ! माडिवरि चल ग गडे जाऊं झडकरी ! नाहीं तर हा अस्सा मी सोडीत नाहीं !

  • वेणूः चला, व्हा दूर ! शरम नाहीं वाटत तुम्हांला ! एवढें वय वाढलें त्याची कांहींच का लज नाहीं ?
  • बाळाः आतां मलाही राग आवरत नाहीं ! फार वेळ तुझें बोलणें ऐकून घेतलें मी ! तुझ्या बापानेंच मला इथें बोलाविलें आहे ! पाहूं बरें आतां काय करतेस ती-वेणू-अजवरि हेका । धरूनि अनेका ॥(वगैरे.) (तिचें चुंबन घ्यावयास जातो.)
  • वेणू: (घाबरून) धांवा हो धांवा ! दादा, अहो अण्णा !
  • बाळा: बोलाव, कोणालाही बोलाव ! मी सुद्धां आतां कीचकासारखा बेफाम झालों आहें ! येऊं देत, तुझे दादा येऊं देत; अण्णा येऊं देत; भीम येऊं देत; अर्जुन येऊं देत !

कोण येतो तो पाहतों मजसि माराया । प्राण त्याचा प्रथम घेतों कोप शमवाया युवतिकुंकुमतिलक पुसुनी पुसुनि नंतर या ।(तिचें कुंकू पुसतो) शुद्धबीजांकुर नर हा सिद्ध झाला या ॥ (एकदम थबकून) अरेरे, काय अविचार करीत होतों मी ? कोणत्याही नायकानें अजून असा अत्याचार केला नाहीं ! प्रणयिनीनें धिक्कार केला तर फार झालें तर मूर्छित पडायचें ! नायिकेला त्रास प्रतिनायकानें द्यायचा ! जा वेणू, जा. नाटकाच्या नियमाबरहुकूम मला आतां मूर्छितच पडलें पाहिजे. (ती जाते) हाय ॥ गेली प्रिया गेलि गेली प्रिया गेलि गेली ॥ हर हर ! शेवटची साकी सुद्धां मला उंच सुरांत म्हणवत नाहीं. पाषाणापरि मस्तक झालें स्पष्ट दिसे ना कांहीं ॥ भ्रम पडलासे वाटे मतिला अंगहि हालत नाहीं ॥ जिव्हा जड पडली प्रिये ये ॥ (मूर्छित पडतो) [पडदा पडतो.]

प्रवेश दुसरा

संपादन

[यमुना, मधु व वसंत]

  • यमुनाः मग काय ? हो म्हणायचें ना ? वसंतदादाचा विचार कांहीं वावगा नाहीं !
  • मधुः वावगा नाहीं खरा; पण जर बाजू अंगावर आली तर मात्र फजीतीला पारावार नाहीं ! बाळाभाऊची नाटकी तर्‍हाच ही ! चोंहीकडे हसें होईल फसगत झाली तर !
  • वसंतः समजलें ! प्रलत्न करून पाहायचा, बोलूनचालून वेडयांचा बाजार हा ! साधलें नाटक; नाहीं तर प्रहसन आहेच पुढें !
  • मधुः साधला तर ठीक आहे प्रयत्न; पण
  • यमुना: पण नको नी बीण नको ! घरोतल्या माणसांनाच काय हंसायचें ? इकडे सुद्धां संशयाचें वेडच आहे, नाहीं तर काय?
  • वसंत: पहा, एका कामांत दोन कामें होत आहेत ! जबाबदारी सारी माझ्यावर !
  • मधुः तो नाटकांतला तात्या इतकें सारें करणार कसा ? त्याला असा मुलगा कोण मिळणार ?
  • वसंत: तें तर मी हां हां म्हणतां जमवून आणीन. पंचाईत आहे जरा या दुसर्‍या कामाची. रमाबाई गांवीं येणार कशा ?
  • यमुनाः दादा, त्याची नको तुला काळजी ! तें माझ्याकडे लागलें जाऊबाईंना मी सांगेन सारें समजावून आपलें कल्याण होतें आहे तिथें अडथळा कोण करणा ?
  • मधुः मग काय ? करायचें म्हणतां असें ?
  • वसंतः अगदीं कांहीं हरकत नाहीं, पिलंभटाला पैशानें सहज विकत घेतां येईल.
  • मधुः पण मी त्याला नाहीं विचारणार. एखादे वेळीं तो कबूल न होतां, रहस्य उघडकीस आणूं लागला तर तोंड दाखवायची पंचाईत पडेत मला ! तो पुरा आपलासा होईपर्यंत या गोष्टींत माझें अंग आहेसें त्याला कळतां कामा नये.

(राग-बागेश्री. ताल-एकताल)
सहजची तो भेद करील, मार्ग हा बरवा ॥धृ०॥
अतिलोभी भिक्षुक तो पाडिल फशिं मजला ॥१॥

  • यमुनाः मग काय रे दादा, कसें करायचें ? इकडचा स्वभावच असा पडला.
  • वसंत: मी विचारतों त्याला; मग तर झालें ना ? त्याच्याकडे कामें दोन, एक ही घरांत उंदीर मेल्याची बातमी पसरवावायाची आणि दुसरें रमाबाईंना घेऊन गुपचिप तुमच्या गांवीं जायचें. हो, आणखी मी बैरागीवेषानें तुमच्या गांवीं आलों म्हणजे माधवरावांजवळ, अण्णासाहेबांजवळ माझी निरनिराळी स्तुति करायची.
  • मधुः तुमच्या या घरगुती सौभद्रांतला गर्गमुनिच म्हणावयाचा ! त्या बाळाभाऊला हसतां हसतां तुम्ही सुद्धां त्याच वळणावर जात चाललां हळूहळू !
  • वसंत: खरें म्हणाल तर सौभद्रावरूनच मला ही युक्ति सुचली. त्यांतल्या त्यांत म्हटलें माधवरावही ताळ्यावा आले तर पाहूं. रमाबाईची आणि माधवरावांची एकदां गांठ पडली म्हणजे माधवरावांचें वैराग्य खात्रीनें लटपटणार.
  • यमुना: खात्रीनें. बायकांचें बळच असें आहे.

(राग-हमीर. ताल-एकताल.)
अबला आम्हीं प्रबला, चकुनि भ्रमुनि अलि येतां,
कमलिनि बद्धचि करि त्याला ॥धृ०॥
प्रेम-पाशबंधन-कर गळां पडतो, सुटका कधीं न कुणाला ॥१॥
पुरुष एकदां का हातीं सांपडले म्हणजे सुटावयाची आशाच नको.

  • वसंत: मधुकरांना तर त्याचा अनुभव आहेच म्हणा !
  • यमुनाः आणि तुला कुठें नाहीं ? वन्संसाठींच ना तुझी सारी खटपट ? इकडे
  • मधु: बरें, ठरलें ना सारें ?
  • वसंत: ठरलें, पण घरांत उंदीर पडल्याबरोबर अण्णासाहेब गांवीं जायला निघतील ना ?
  • मधु: अगदीं सहकुटुंब सहपरिवारें पहिपाहुण्यासुद्धां. घरांत पाणीसुद्धां पिऊं देणार नाहींत मग ते कोणाला. तडक गांवचा रस्ता धरतील.
  • वसंतः आणि गांवीं पोचतांच तुम्हीं तें औषध खुबीनें त्यांच्या पायाला लावायचें म्हणजे आपोआप वळंधा येईल.
  • मधु: काय काय होतें बधूं या आतां ! घोडामैदान जवळच आहे.
  • वसंतः आपल्याला एखादा चाबकाचा फटका खाण्याची पाळी न येवो म्हणजे झालें. बरें जातों मी आणि करतों सारी व्यवस्था.
  • मधु: ठीक आहे. मला कळवा मात्र ताबडतोब.

[जातात.]

प्रवेश तिसरा

संपादन

[पिलंभट प्रवेश करतो.]

  • पिलंभट: (स्वगत) एकदां कुठें पार्वती रावणाच्या हवालीं केली म्हणून शंकराला लोक भोळा शंकर म्हणतात; पण त्यांत काहीं अर्थ नाहीं. स्त्रीदान्त खरीं भोळीं दैवतें दोन. एक विष्णु आणि दुसरें गणपती. एकानें लक्ष्मी आणि दुसर्‍यानें सरस्वती सार्‍या जगाची मालमत्ता म्हणून मोकळ्या सोडल्या आहेत. चोरापोरांच्या सुद्धां हातांत त्या सांपडावयाच्या ! माझीच गोष्ट पाहा ना, आज इतकीं वर्षें या इनामदारांच्या घरच्या लक्ष्मीशीं खुशाल हवी तशी धिंगामस्ती करतों आहें. पैसा, पैसा म्हणजे बिशाद काय ? आणखी चार वर्षांत सोन्याचीं कवलें घालीन घरावर. नाहीं तर आमच्या वडिलांची कारकीर्द. घराला सोन्याचांदीचा विटाळ नाहीं. आम्ही दोन सोन्यासारखीं मुलें, तो शिंगमोडका सोन्य बैल आणि तो परसदारांतला सोनचाफ्याचा खुंट याखेरीज सोनें द्दष्टीस पडायचें तें दसर्‍याच्या दिवशीं आपटयाच्या पानाचें. याउपर सोन्याचें नांव नाहीं घरांत. नाहीं म्हणायला आमची आजी वारली तेव्हां मात्र कोणी कोणी म्हणालें कीं, “ तिचें काया वाईट झालें ? सोनें झालें तिचें. ” मग का ती सोनामुखी फार खात होती म्हणून म्हणाले कुणास ठाऊक. आम्ही लहान; गेलों तिसरे दिवशीं रक्षा उपासायला. पाहातों तों भट्टींत हीणकसच फार ! मूठभर अस्थि मात्र सापडल्या. त्या नेऊन बाईस पोंचविण्याच्या भानगडींत, आटलेलें सोनें सांपडण्याऐवजीं खर्चाच्या पेचानें चांगली चांदी मात्र आटली ! ही बाबांच्या संसाराची कहाणी ! तेंच आतां पाहा ! ज्योतिष, वैद्यक, देव खेळविणें; होय आहे, नाहीं आहे, निरनिराळ्या मार्गांनीं इनामदारांच्या घरांतून पैसा येतो आहे ! समुद्राला जसे चहूंकडून नद्यांचे ओघ मिळायचे तसा संपत्तीचा ओघ निरनिराळ्या मार्गांनीं आमच्या घराकडे वाहतो आहे. येवढयानें इनामदारांच्या मनमुराद उत्पन्नाला तरी काय धक्का बसणार ? कांहीं नाहीं; दर्यामें खसखस ! भरल्या गाडयाला सुपाचा काय भार ? आतां या वेणूताईच्या लग्नांत बरेंच चावपडायला सांपडेलसें वाटतें. त्या वसंतरावाचें टिपणामुळें फिसकटलें-अरे वा ! नांव काढल्याबरोबर स्वारी हजर [वसंतराव येतो] या वसंतराव !
  • वसंतः पिलंभटजी, तुमच्याकडेच आलों आहें. थोडें काम आहे माझें.
  • पिलं: हं हं ? काम आहे ? मग आंधळ्यापांगळ्यांना बोलवा ! दानधर्माला आंधळेपांगळे आणि कामाधामाला मात्र पिलंभटजी ! असें रे कां बाबा ? अरे, तुम्हां शिकलेल्या लोकांना लाजा नाहींत लाजा !~ साहेबलोकांच्या नादानें पूर्व विसरलांत ! आतां काय काम अडलें आहे भटाभिक्षुकांशीं ? जा, आतां जा साहेबांकडे, तेच तुमच्या पांचवीला पुजलेले.
  • वसंतः केलें आहे काय असें त्या साहेबांनीं तुमचें ?
  • पिलं: काय केलें आहे ? अरे पोथ्या नेल्या, पुस्तकें नेलीं, तुमच्या शेंडया नेल्या, आणखी काय करायचें राहिलें आहे त्यांनीं ? नाहीं म्हणायला तेवढा जानव्यांचा कारखाना कांहीं काढला नाहीं अजून ! आतांशा तर म्हणतात, पापडलोणचीं सुद्धां येतात विलायतेचीं डब्यांतून होते ! तेव्हां आतां कुठें तुमचें डोळे उघडतोहत ! आतां भटजीची आठवण होते ! म्हणे भटजी, माझें थोडेंसें काम आहे ! लाज नाहीं वाटत तुम्हां लोकांना ! बेशरम कुठले ! तुम्हा शिकलेल्या लोकांना पाहिलें म्हणजे असें वाटतें कीं एक कोरडा घेऊन मारावा फडाफड. (वसंत कांहीं रुपये देऊं लागतो.) तुमच्याबद्दल नाहीं म्हणत मी, या हुच्च शिकलेल्या लोकांची एक गोष्ट सांगितली ! सारेच तसे नसतात ! तुम्हीं झालां, आमचा मधु झाला, तुमची गोष्ट निराळी ! तुमच्यासारखे धर्माचे आधार नसते तर ब्राह्मणत्व कधींच गेलें असतें रसातळाला ! (पैसे घेतो.)
  • वसंत: हा आपला नुसता विसार दिला तुम्हांला ! देणगी अजून पुढेंच आहे ! आतां होईल ना माझें काम ?
  • पिलं: हें काय विचारणें ? झालेंच पाहिजे काम. नाहीं तर तुम्ही यजमान कशाचे आणि आम्ही आश्रित कशाचे ? आपल्या जिवावर आमच्या सार्‍या उडया. गरीबांचे वाली आपण; आंधळ्यापांगळ्यांनाही पैपैसा दिला पाहिजे. आमच्या. सारख्यांचाही हात भिजला पाहिजे. काम काय तें सांगा म्हणजे झालें. केलेंच म्हणून समजा.
  • वसंत: सांगतों, पण अगोदार यांतलें एक अक्षर कोठें बोलणार नाहीं अशी शपथ घ्या पाहूं !
  • पिलं: घेतों शपथ-पण-पण
  • वसंतः कां घुटमळतां कां असे ? काम वाईटपैकीं असेल वाटलें कीं काय ?
  • पिलं: भलतेंच, वाईट काम आणि आपल्या हातून, असें कुठें झालें आहे ? तुम्हां शिकलेल्या लोंकांच्या हातून वाईट कामें होणें नाहींत साहेबलोकांच्या विद्येचा हा तर मोठा गुण. साहेबलोकांसारके लोक मिळायचे नाहींत कुठें
  • वसंत: मग काय अडचण आहे आतां ?
  • पिलं: अडचण एवढीच, बाकी अडचण कसली ती म्हणा ? आपण तेव्हांच तिचा निकाल कराल ! इतकेंच म्हणत होतों आतां ही जी कृपाद्दष्टि केली आणि पुढच्या देणगीबद्दल जो कांहीं मनांत संकल्प केला असेल, हो, आपण कुठले रहायला ? आणि तो संकल्यसुद्धां अव्वाच्या सव्वा असायचा हं, तर हें सारें काम करण्याबद्दल झालें ! आतां तें पुन्हां गुप्त ठेवण्याची जबाबदारी,भिक्षुकाची जीभ अंमळ लवचीकच ! काम करणें आमच्या मतें सोपें; पण तें गुप्त ठेवणें मोठें कठीण ! तेव्हां म्हटलें या दुसर्‍या अवघड कामगिरिबद्दल ?
  • वसंत: हं समजलों ! गुमचें तोंड बंद करण्यासाठीं पिशवीचें तोंड मोकळें करावें लागणार. (पैसे देत) बरें हें घ्या ! आतां झालें ना !
  • पिलं भ ट: आतां ही यज्ञोपवीताचीच शपथ ! या कानाचा शब्द या कानालासुद्धां कळणार नाही. कुणीं माझी जीभ तोडली तरी शब्द नाहीं निघायचा एक, सांगा खुशाल आपलें काम !
  • वसंत: करा कान इकडे, आजच्या आज घरांत एक मेलेला उंदीर ठाकून याबद्दल बभ्रा करायचा ! आणखी दुसरें, एक दोन दिवसांत रमाबाईंना घेऊन करंजगांवीं जायचें. त्यांना अगदीं गुप्तपणें तुमच्याच इथें ठेवावयाच्या. (भट तोंड वाईट करतो.) खर्चाचा योग्य बंदोबस्त आम्हीं करूं. (सुरसन्न होतो.) पुढें लौकरच मी संन्याशाच्या वेशानें तुमच्या घरीं येईन. तेव्हां काय करावयाचें तें मधुकर, तुम्ही आम्ही मिळून ठरवूं.
  • पिलं: मधुकर आहेत ना या बाबतींत ?
  • वसंत: तर, तुम्हीं वाईटपणाबद्दल शंकासुद्धां आणूं नका मनांत ! इनामदारांच्या हितासाठींच ही खटपट आहे सारी. हं, मेलेल्या उंदराला शिवल्याबद्दल हें घ्या प्रायश्चित्तादाखल ! (रुपये देतो.)

किती वैराग्य तुमचें ! व्यर्थचि निंदा केली ॥धृ०॥
नच सौजन्यासि या तिळहि सीमा उरलि,
जगिं जन्मा-मृत्युसि जो ठेवी भेदा न मुळीं ॥१॥

  • पिलं: [घेत घेत] आतां काय बुवा नाहीं कसें म्हणावें-शब्द कसा मोडावा ?
  • वसंत: हं, लागा आपल्या कामाला ! या गोष्टीची वाच्यता मात्र अगदीं बंद !
  • पिलं: हें पहा घातलें तोंडाला कुलूप !
  • वसंत: आतां तें चांदीच्या किल्लीनेंही उघडणार नाहीं ना ! नाहीं तर कराल सारा घोटाळा, चला आतां लागा कामाला ! (जातात. पडदा. पडदा पडतो.)

प्रवेश चवथा

संपादन

[नाटक मंडळीच्या घरासमोरील रस्ता. तात्या व रघुनाथ.]

  • तात्या: हे मधुकर म्हणायचे, ते त्या मुलीचे भाऊ आणि ते वसंतराव म्हणायचे, त्यांच्याशीं तिचें लग्न व्हायचें आहे ! मुलगी आहे नक्षत्रासारखी आणि तिच्या बापानें तर बालाभाऊला वचन दिलें आहे; तो “नाहीं” म्हणेल तेव्हां पुढची गोष्ट ! आणि तो तर असा वेडापीर ! म्हणून ही सारी खटपट करायची. नाहीं तर फुकट पोर बुडते बघ !
  • रघु: पण तात्या, हें मालकांना पसंत पडेल का ? नाहीं तर म्हणतील तुला कोणी ही पंचाईत सांगितली होती म्हणून !
  • तात्याः अरे वेडाच आहेस ! ते कशाला नको म्हणतात ! यांत कांहीं वाईट का आहे ? उलट परोपकार ! आतां सोंग घेतल्यावर त्यांच्याशीं कसें काय बोलायचें हें सारें तुला सांगेन मग !
  • रघु: पण असें कसें बोलायचें बुवा भलतेंच !
  • तात्याः अरे लेका, रोज सोंगें नाहीं का घेत तुम्ही ? त्यांतलेंच हें एक सोंग. बरें ! जा तर आतां ! तो पाहा बाळाभाऊच येत आहे ! तर सोंगाची तयारी करून ठेव जा.

[तो जातो व बाळाभाऊ येतो. तात्याला न पाहतां बाळाभाऊ विचार करतो.]

  • बाळा: जगायचें कीं मरायचें ? हा एवढाच प्रश्न आहे ! जगणें-मरणें हीं दोन्ही सारखींच ! अखेर तिनें मला केराप्रमाणें झाडून लोटून दिला ना ? प्रियेनें माझा धिक्कार केल्यानंतर हें काळें तोंड कुठें दाखवूं ? कांचनगडच्या मोहनेंतल्या हंबीररावाप्रमाणें माझी दुर्दशा झाली आहे ! अरेरे, सुंदर वस्तूंची लयलूट कां बरें असूं नये ? नाहीं तर दुसर्‍या एखाद्या-काय हा पाणी विचार ! हा अधम बाळाभाऊ आतां दुस‍र्‍या स्त्रीवर प्रेंम करणार ! धिक्, धिक्, काय करूं रे ? मला कोणी प्रतिस्पर्धीही नाहीं ! याही बाबतींत मी पुरा दुर्दैवी आहें ! परमेश्वरा, सूह घेण्याचें समाधानसुद्धां तूं मला देत नाहींस ! \
  • तात्याः बाळाभाऊ !
  • बाळा: (दचक्‌न, पण गंभीर आवाजानें) कोणी हाक मारिली मला ? बोला, तुम्ही वेणू आहांत का ? (पाहून) कोण तात्या, माझा प्रिय मित्र मित्र तात्या ! (त्याच्या गळ्याला मिळी मारतो. !) मित्रा, प्रियमित्रा तात्या, इतका वेळ कुठें रे होतास ? माझ्या कपिंजला ! या बाळाभाऊला-तुझ्या मित्र पुंडरीकाला विरहावस्थेंत टाकून तूं कुठें रे गेला होतास ? तात्या, प्राणमित्र तात्या ! अरे !

कोण जगीं या तुजविण दुसरा मज विश्वासाचा ॥ मित्र जिवाचा कोण तुझ्याविण आश्रय शोधूं अन्य कुणाचा ॥ घालुनि पोटीं अपराधातें कोण करिल मज बोध हिताचा ॥

  • तात्याः बाळाभाऊ, काय हें ! धीर धर ! धीर धरा गुरू, हें काय ?
  • बाळाः तात्या, आतां कशाचा गुरू, तात्या, तुमचा तो आनंदी, रंगेल बाळाभाऊ आतां कुठें आहे ? आतां मी गुरू नाहीं. कोणी नाहीं ! आतां धीर धरणार कशाच्या जीवावर ? शून्यचि भासे हें जग सारें नच उत्साह कसा तो ॥(वगैरे)
  • तात्याः या बोलण्यांत काय अर्थ आहे ? उठा ! हें शोभतें का तुम्हांला ?
  • बाळाः न शोभेना ! मला आतां त्याच्याशीं काय करायचें आहे ? मी आतां कोठेंतरी जाऊन आत्मघात करणार !
  • तात्याः काय आत्मघात ? महत्पाप, महत्पाप. महत्पाप !
  • बाळा: भगवान् नारदमुने-नाहीं. नाहीं प्रियमित्रा तात्या, आत्महत्या करूं नको तर काय करूं ? ठेवूनि प्राण करूं मी काय ! ऐसा हतभागी ॥
  • तात्याः पण काय झालें काय तें सांगा आधीं. माझ्यासारख्या मित्राजवळ सुद्धां सांगायचें नाहीं मग कुणाजवळ सांगणार ?
  • बाळाः ऐक तर मग ! मुधकर कालपरवां मला बोलविष्यासाठीं आला हें माहींत आहे ना ?
  • तात्याः हो, त्याच्या बहिणीला पाहण्यासाठीं तुम्हांला बोलावलें होतें ना त्यानें ?
  • बाळाः हो. पण मी तिला भेटतों तो निराळाच प्रकार ! मी तिचें पाणिग्रहण करतांच ती संतापली, तिनें माझा धिक्कार केला, मला दुरुत्तरें दुरुत्तरें बोलली, माझ्या पवित्र पेमाला पायाखालीं तुडविलें !
  • तात्याः म्हणजे लाथ मारली कीं काय तुम्हांला ?
  • बाळाः नाहीं. माझा फार अपमान केला तिनें. अखेर मी मूर्छित पडलों हें पाहून ती राक्षसी बिनदिक्कत मनानें निघून गेली.
  • तात्याः अरेरे ! काय क्रूरपणा हा ! आणि तुम्ही ?
  • बाळाः मी तिथेंच मूर्च्छित पडून राहिलों ! त्या वेळीं मला तिथें वारा घालून सावध कोण करणार ? पुष्कळ वेळ वाट पाहिली कीं कोणी येऊन माझ्या हताश मनाचें समाधान करील म्हणून ! पण त्या भयाण वेळीं आणि भयाण अरण्यांत
  • तात्याः अरण्यांत ?
  • बाळाः म्हणजे त्यांच्या त्या बागेंत कोण येणार ? मित्रा, तूं सुद्धां त्या वेळीं तिथें नव्हतास !
  • तात्याः पण अखेरीस उठलां कीं नाहीं ?
  • बाळाः अर्थात्‌: नाहीं तर इथें कसा आलों असतों ? उठलों खरा, पण तो कसा ? त्यांच्या माळ्यानें येऊन मला हांकलून दिलें बरें ! तेव्हांपासून एक तासभर असा भटकत फिरतों आहें !

(तात्या डोळे पुसतात व रडतात.)

  • बाळा: पण तात्या, हें काय ? अरे बोलतां बोलतां-द्दष्टि भरे जलभारें । का रे अनिवारे । सुहृदा रे ॥ वद कारण मजला सारें ॥
  • तात्याः हरहर ! इतका वेळ माझें लक्षच गेलें नाहीं ! काय दशा झाली आहे ही तुमची ! पंजर झाला अस्थींचा या सुरग्य देहाचा ॥
  • बाळा: (स्वगत) तर काय, मी रोडसुद्धां झालों आहें ! विरहावस्थेचीं सारीं वर्णनें अक्षरश: खरीं आहेत तर मग ! (प्रकट) काय म्हणतां मी रोड झालों आहे?
  • तात्याः रोड ! अहो तुमच्या अंगांतून तुमचा सदरा कसा गळून पडला नाहीं याचेंच मला नवल वाटतें ! कोदंड दोन तीन दिवसांत रोड झाला, शूरसेनाची “ काय ही दशा ” व्यायला एक दिवस लागला आणि पुंडरिकाचा वाळून कोळ व्हायला आठ प्रहर लागले: पण या सृष्टचमत्कारांवर तुमची ताण आहे ! तुम्हीं एका तासांतच वाळून कोळ झालां ! फिक्के तर इतके पडलां आहां कीं हे सारे नायक फिक्के पडतील तुमच्या दारुण विरहावस्थेपुढें. पण गुरु, तुमची टोपी कुठें आहे?
  • बाळाः मल माझ्या देहाचीही पर्वा नाहीं. मग टोपीची काय कथा ? आतां मला टोपी काय करायची आहे ?
  • तात्याः खरेंच ! ती ठेवायची तरी कुठें ? डोकें असेल तर ना ठिकाणावर ? (स्वगत) डोकें मुळींच नाहीं, मग त्याचें ठिकाण कसें मिळणार ?
  • बाळाः (स्वगत) टोपी मुद्दाम टाकून दिली तिचें सार्थक झालें ! विरहावस्थेंत नायक नेहमीं बोडकाच असावयाचा ! (प्रकट) तात्या, झालेल्या दुदैंवी प्रकरणांत त्या माळयानें मल हांकलून दिलें याचें मल अफार वाईट वाटतें ! गुप्तमंजूघांत विलासाला नंदिनीचा बाप मेघनाथ स्वतः हांकलून देतो; अर्जुनाला हांकलणारा बलराम सुभद्रेचा वडिल भाऊ तरी होता ! पण माझ्या वांटयाला तो भिकारडा माळी, वेणूच्या घरचा गडी यावा ना !
  • तात्याः मला वाटतें तिनेंव तुमचा अपमान करण्यासाठीं त्याला मुद्दाम पाठविलें असावें !
  • बाळाः असें तुम्हांलाही वाटतं ना ? मलाही थोडासा असा संशय येतोच !
  • तात्याः संशय नकोच ! एरवीं त्याची काय छाती होती तुम्हांला धक्के देण्याची !
  • बाळाः खरें आहे तुमचें म्हणणें ? (एकदम आवेशानें) आतां असें करणार.
  • तात्याः कसें ?
  • बाळा:

अंगिकार करुनि हिचा गर्व खंडितों ॥
अबलेचा पाड काय सहज जिंकितों ॥
श्रेष्ठ नरावीण यास काय भूषण ॥
कुशब्द बोलुनि मलाच लावि दूषण ॥
तिच्या बापानें तर आमच्या लग्नाबद्दल वचन दिलेलें आहे ना ?

  • तात्याः (स्वगत) अरेच्या ! हें भलतेंच होऊं पाहत आहे. (प्र.) नाहीं गुरू, या रीतीनें जाण्यांत मजा नाहीं, माझ्या मतें अशा उन्मत्त स्त्रीचा सूड दुसर्‍या एखाद्या स्त्रीवर प्रेम करून घ्यावा ! मानिनी स्त्रियांना यासारखें दुसरें मरण नाहीं !
  • बाळाः छे छे ! दुसर्‍या स्त्रीवर प्रेम कधी कोणीं केलें आहे का ? अनुरक्त पुरुषाला त्याच्या प्रणयिनीखेरीज गत्यंतरच नाहीं !
  • तात्याः तें कां ? सत्यविजयांत नाहीं का सत्यविजयानें पहिली स्त्री टाकून दुसरी केली ती ! वाः गुरु, विसरूं नक असे !
  • बाळाः हो हो ठीक आहे; पण हें जमणर कसें ? अशी दुसरी स्त्री कोण मिळणार ? वेणूसारखी योग्य ?
  • तात्याः भय्या, हा तात्या बोलतो आहे म्हटलें ! अर्धवट गोष्टी नाहींत आपल्याजवळ ! तुमच्या योग्य अशी एक सुंदर तरुणी पाहून सुद्धां ठेविली आहे ! उगीच नाहीं ! अगदीं त्या वेणूपेक्षां सरस !
  • बाळाः कोण, कोण हो ती ?
  • तात्याः आपला रघुनाथ आहे ना ? त्याची हुबेहूब प्रतिभा ! रूपानें, गुणानें, वयानें, उंचीनें अगदीं तशी !
  • बाळाः खरें ? का थाप आहे झालें !
  • तात्याः थाप ? दिली आहे का थाप कधीं तुम्हांला ? शिवाय तुमच्यासारखाच नाटकाचा नाद आहे तिला ! सारीं नाटकें पाठ !
  • बाळाः काय म्हणतां ? सारें खरें हें ?
  • तात्याः अक्षरशः खरें ! आणि म्हणूनच तर ती एका संकटांत आहे.
  • बाळा: काय संकटांतसुद्धां आहे ! मग तीच खरी नायिका !
  • तात्याः संकटांत आहेत तर ! तिच्या बापानें एका मनुष्याशीं तिचें लग्न ठरविलें; पण तिचें त्याच्यावर प्रेम नाहीं ! म्हणून ही लग्नाला कबूल नाहीं । येवढयासाठीं तिच्या बापानें तिला एका खोलींत कोंडून ठेविली आहे ! कोणाला तिकडे जाऊं देत नाहीं, कोणाशीं तिला बोलूं देत नाही !
  • बाळाः अरेरे, कोण भयंकर हाल हे !
  • तात्याः आणखी सांगितलें तर तुम्हांला खोटें वाटेल, तिचें तुमच्यावर थोडेंसें प्रेमाही आहे !
  • बाळाः हँट् ! थाप आहे सारी !
  • तात्याः आतां काय सांगावें तुम्हांला ? माझा तिचा स्नेह आहे ! तुम्हांला माझ्याबरोबर बरेच वेळां फिरतांना पाहून तिनें तुमची सर्व हकीकत मला विचारली ! पण तिकडे जाणें मोठें कठिण आहे ! मार्गांत शत्रू फार ! एक उपाय आहे फक्त !
  • बाळाः बोला, कोणता तो. मला संकटाची मुळींच पर्वा नाहीं. हा मम तदर्थ त्यजीन प्राण ॥(वगैरे)
  • तात्याः वच्या घरीं जायचें तें रात्रीं वेषांतर करून, एक पेटार्‍यांत बसून जावें लागेल ! म्हणजे पेटारा तिच्या खोलींत पोंचविष्याची मी व्यवस्था करीन ! आहे कबूल ?
  • बाळा: कबूल ! कबूल ! पेटारा मात्र बुरुडी करा म्हणजे झाले !
  • तात्याः हो, म्हणजे वारा खेळता राहील म्हणतां !
  • बाळाः हो, म्हणजे वारा खेळता राहील म्हणतां !
  • बाळाः शिवाय शिवाजीमहाराजांचें अल्प अनुकरण केल्यासारखें होईल त्यांत. छत्रपति दिल्लीहून पळाले ते बुरुडी पेटार्‍यांतूनच !
  • तात्याः उत्तम ! करूं तर मग सारी व्यवस्था ?
  • बाळाः अगदीं खुशाल ! पण तिचें नांव नाहीं सांगितलेंत तुम्ही !
  • तात्याः सरोजिनी !
  • बाळाः वाहवा ! नांवांत सुद्धां प्रणय आहे ! सरोजिनी !
  • तात्याः सरोजिनी !
  • बाळाः वाहवा ! नांवांत सुद्धां प्रणय आहे ! सरोजिनी !
  • तात्याः जातों तर मग मी ! दोनचार दिवसांत तुम्ही मला भेटा !
  • बाळाः बरें !

( तात्या जातो.)

  • बाळाः आतांच ती रात्र असती तर किती बरें झालें असतें ! प्रत्येक क्षण मला युगासारख वाटत आहे ! प्रिया संकटांत, माझ्यावर तिचें प्रेम, मी रात्रीं तिला चोरून भेटणार ! मी वेशांतर करणार ! अहाहा, नाटकांत यापेक्षां काय जास्त असतें ! नांव तरी किती गोड ? सरोजिनी ! काव्यमय, प्रेममय, सरोजिनी, नाहीं तर हीं गांवदळ नांवें; यमी, बगडी, गोदी, वेणू ! शी: ! त्या वेणूचें तर नांव सुद्धां नको ! आतां एक सरोजिनी आणि बाळाभाऊ ! बाळाभाऊ हें नांव जरासें बावळटच आहे, हरक्त नाहीं ! आपण तर नांव सुद्धां बदलणार ! निक्रांत हेंच नांव सांगणार ! झालें माझ्या भाग्याला तर पार नाहीं ! हे छत्रपति शिवाजीराजा, मी आज तुझ्यासारखा बुरुडी पेटार्‍यांत बसून जाणार, तर या कार्योंव यश दे ! बोल शिवाजीमहाराजकी जय !

(उडी मारून निघून जातो. पडदा पडतो.)

प्रवेश पांचवा

संपादन

[ अण्णासाहेब व यशोदाबाई.]

  • अण्णाः तुला सत्रा वेळा सांगितलें तरी तुझ्या कांही घ्यानांत राहात नाहीं ! औषधाची आबाळ करून माझा प्राण का घेणारआहांत तुम्ही ? पहांटेस झोंप येत नाहीं म्हणून तें औषध शास्त्रीबुवांनीं मुद्दास दिलें ! तें कांहीं पहांटेस द्यायची आठवण राहिली नाहीं !
  • यशोदाः द्यायचें तरीं कसें ? पहांटेस आपल्याला लागली होती झोंप ! म्हटलें चांगली झोंप लागली आहे ती कशाला मोडावी ?
  • अण्णाः शिकस्त झाली आतां ! झोंप येत नाहीं म्हणून मी औषधें आणितों आणि तुझें म्हणणें मला झोंप लागली होती ! काय म्हणावें तुम्हांला आतां ?
  • यशोदा: खरेंच झोप लागली होती ! खोटें कशाला सांगूं मी ?
  • अण्णा: भलतेंत ! झोंप नाहीं ती ! ग्लानि असेल ! औषधावांचून आजार्‍याला झोंप येणारकशी ? आली तरी ती खरी झोंप नाहीं. पुन्हा मल अशी झोंप लागली तरजागें करून औषध देत जा म्हणजे मी पुन्हां शास्त्रोक्त निजत जाईन ! मला असली वेडीवांकडी झोंप नको
  • यशोदाः बरें, आतां नाहीं विसरायची !
  • अण्णाः बरं, आतां आण !
  • यशोदाः आतां कशाला अवेळीं ?
  • अण्णाः अवेळ कशाची ? औषध केव्हांही घ्यावें आणि कितीही घ्यावें. जा, आण लौकर! जा ! जा ! लौकर! (यशोदाबाई जातात.)
  • अण्णा: (स्व). काय कटकट करावी लागते पहा ! ही पुडी घ्यावी आतां ! (पुडी उलगडून पाहतो.) पुरती चिमुट चिमुट सुद्धा नाहीं. वैद्यलोक आतांशा पैशाकडे फारबारकाईनें पाहूं लागले; अगदीं सोन्यामोत्याच्या भावानें औषधें देतात ! (पुडींतील औषध तोंडांत टाकतो.) बाकी शास्त्रीबुवांचीं औषधें रामबाण खरीं ! त्यांनीं म्हटल्याप्रमाणें खरेंच हुशारी आल्यासारकें वाटूं लागतें ! माल वाटतें दुसरी पुडी घेतली तरदुप्पट हुशारी येईल ! पाहतोंच प्रचीति ! (दुसरी पुडी घेतो.) अरेच्या हुशारी ! बाहवा रे औषध ! शाबास ! रात्रीं खावें तूप आणि सकाळीं पहावें रूप ! आपण तिसरीही पुडी घेणार! )तिसरी पुडी घेतो.) वाहवा, वाहवा, नवीन जन्मघेतल्यासारखें वाटतें ! मला वाटतें चोवीस तास या पुडयांचाच खुराक चालू ठेवावा ! पण पुडया कुठें आहेत जास्त आतां ? (फडकें झाडतो. कांहीं पुडया पडतात.) अरेच्या ! या पुडया कसल्या ? (पडीवरील अक्षरें वाचतो.) अरें, हुशारीच्या पुडया तरया ! मग मी घेतल्या त्या कोणत्या आणि त्यांनीं हुशारी आली कशी ! हां, आलें लक्षांत ! पहांटेस खरी झोप न येतां झोपेचा भास झाला ! तशीच आतां हुशारी आल्याचा सुद्धां हा भासच असावा ! मला वाटतें माझा रोग फारबळावत चालला ! त्यानें असे विलक्षण भास होतांत ! आतां खरें तरी कोणतें आणि भास तरी कोणता? सध्यां जे कांहीं दिसतें. त्यावरविश्वास ठेवतां कामा नये ! बरें पण मीं खाल्या त्या पुडया तरी कशाच्या ? (त्या पुडयांवरील अक्षरें वाचतो. घाबरून) अरे बाप रे, या तात्यांच्या नेत्रानंदकज्जलाच्या पुडया ! आणि त्यांत विष असेल तर! हो डोळ्यांच्या औषधाम्त विष असावयाचेंच ! छे: आहेच ! हें, माझें डोकें सुद्धां फिरूं लागलें ! हें जिकडे तिकडे हिरवेंचारदिसूं लागलें ! आतां कसें करावें ? ( मोठयानें ओरडून) अहो पिलंभट ! धांवा ! धांवा ! पिलंभट ! अहो घात ! घात !

[पिलंभट धांवत घाबर्‍या घाबर्‍या येतो.]

  • पिलं: (स्व.) उंदीरमेल्याची थाप टोकावी आतां. (प्र.) घात. अणासाहेब, घात ! अहो घात, घात !
  • अण्णाः अहो घात, भयंकरघात, घात !
  • पिलं: घात ! भयंकर! घात.
  • अण्णाः अहो केवढा घात ?
  • पिलं: अगदीं आपण म्हणतों येवढा घात. घात.
  • अण्णाः आतां कसें करावें ?
  • पिलं: आतां कसें करावें ? घात ! अहो ! घात !
  • अण्णाः अहो घात ! घात ! पण करायचें कसें आतां ?
  • पिलं: करायचें काय दुसरें ?आतांच्या आतां पळालें पाहिजे इथून !
  • अण्णा: पळून काय होणार? यमापुढें किती पळणार?
  • पिलं: मग दुसरा काय उपाय करणारइथें ?
  • अण्णाः यावरकांहीं औषध नाहीं ?
  • पिलं: कांहीं औषध नाहीं ! घटकेचा उशीरकेला तरनिकाल लागायचा !
  • अण्णाः (खालीं बसतो) माझे हातपायच मोडलें ! आतां पळणारतरी कुठें ? घात ! औषध नाहीं ना कांहीं उपयोगी ?
  • पि लां: नाहीं ! पण आपल्याला कसें कळलें हें ?
  • अण्णाः अहो माझें मला क्सें कळणारनाहीं ?
  • पिलं: म्हणजे ? ही गोष्ट प्रथमपाहिली मीं !
  • अण्णाः पण केळी मीं ना ! या पहा पुडया हुशारीच्या ! अन् या मी खाल्लेल्या नेत्रानंदकज्जलाच्या ! भिनलें त्याचें विष !
  • पिलं: अहो हें निराळेंच ! मी म्हणतों तें निराळें ! अहो, आपल्या घरांत मेलेला उंदीर!
  • अण्णाः ( ताडकन उठून) मेलेला उंदीर! अहो, कुठें ? पिलंभट कुठें ?
  • पिलं: अहो आपल्या माजघरांत, घात: माजघरांत !
  • अण्णाः माजघरांत; अहो घात ! मघाच्याहून मोठा घात !
  • पिलं: म्हणून तरमी आपल्यापेक्षा मोठयानें ओरडत होतों !
  • अण्णाः तुम्ही पाहिलात स्वतः ?
  • पिलं: अगदीं या डोळ्यांनीं पाहिला. तो पहा तिथें आहे, चला.
  • अण्णा: अहो, नको, मी नाहीं यायचा त्याच्या जवळ. धांवा, मधूला बोलवा; माधवाला बोलवा; आतांच्या आतां करंजगांवीं चला सारे ! धांवा; अहो धांवा म्हणतों ना ? करा तयारी निघण्याची ! (पिलंभट धांवट जातो.) अरे मधू, माधवा, उठा ! बांधा पेटया; चला, गाडया आणा, निघा पळा. [यशोदाबाई येतात.] उठा ! बांधा पेटया; चला, गाडया आणा, पळा. (इकडून तिकडे धांवतो.)
  • यशोदाः (घाबरून) अग बाई ? असें काय करायचें हें ? हें काय बोलायचें असें?
  • अप्णा; अग धांव, पेटया बांध ! ऊठ पळ. अरे, धांबा, पळा; गाडया आणा.
  • यशोदा: (मोठयानें) अग बाई आतां काय करूं ? इतक्यांत कुणी कौटाळ केलें वाटतें ! अहो पिलंभट धांवा हो धांवा ! घात: अंगारा आणा. अहो पिलंभट, धांवा; अंगारा ! अग बाई ! आतां काय करूं ?
  • अण्णा: (स्व.) तिकडूनच आली ही वाटतें ? झाला घाट ! ताप वायु सुद्धां झाला वाटतें ! झाली-बडबड सुद्धां करायला लागली ! आतां काय करावें ? (प्र.)

अहो पिलंभट ! धांवा ! घात. ह तिकडून आली. हिला ताप भरून वायुसुद्धां झाला ! अहो धांवा घात ! डागण्या आणा ! घात ! अरे, डागण्या आणा !

  • यशोदाः घात ! सर्वस्वी घात ! अहो पिलंभट इकडे बाहेरघात झाला इतक्यांत ! काय ही बडबड ! अहो धांवा ! आंगरा आणा ! घात: (अण्णासाहेब “वायू, घात, डागण्या” असें ओरडतात व यशोदाबाई “बाहेरवा, घात, अंगारा,” असें ओरडतात; मधू, माधव व पिलंभट येतात.)
  • पिलं: अण्णा, बाई, असें घाबरूं नका ! कोणाला कांहीं झालें नाहीं अजून !
  • अण्णाः अहो नाहीं झालें कसें ? मग ही ओरडते कां अशी ?
  • यशोदाः आपण ओरडायचें म्हणून !
  • अण्णाः अग, घरांत उदीरपडल्यावरकोण नाहीं ओरडणार?
  • यशोदाः असें ! मला वाटलें आपल्याला बाहेरवा झाला म्हणून मी भिऊन हांका मारल्या पिलंभटांना,
  • अण्णा: मला वाटलें माजघरांतून तूं आलीस तेव्हां तुला ताप भरून वायु झाला. हं पिलंभट. पहा कुणाला झाला आहे का ताप आणि करा बांधाबांध लौकर.
  • मधु: अण्णा, अहो आहे काय हें ? एकादा उंदीरमेला म्हणून झालें काय ?
  • अण्णाः अरे बावा, घात, या काळांत जीवंत सिंहापेक्षां मेलेल्या उंदरालाच जास्त भ्यावें लागतें. समजलास !
  • माधवः रास्त आहे. आत्मा म्हटला म्हणजे सर्वांचा सारखाच. सर्वत्रएकच ब्रह्मपसरलें आहे. मूळ ब्रह्म, तिथून पुढें ओंकारध्वनि निधून पुढें माया
  • अण्णा: अरे, पुरे, बाबा तें राहुं दे आतां. पिलंभट उठा लवकर, धांवा, तांगे आणा, पहिलीच गाडी सांपडली पाहिजे, जा. मधु, पळ.
  • मधुः पण अण्णा
  • अण्णाः सांगितलें ना आतां वेळ घालवूं नका म्हणून. गाडया, बग्या, छकडे, तांगे, दमण्या, बंडया, खटारे, एकके, फैठणी, जें सांपडेल तें घेऊन या !
  • माधव: त्यांत भेद तो काय पहावयाचा ! हा तांगा, हा छकडा, ही बंडी, हा सारा स्थूल द्दष्टीस भ्रमआहे. अंतर्द्दष्टीला एकाकारानें एकाची शून्यांत आणि
  • अण्णाः याला; मला वाटतें झालें आहे कांहीं तरी
  • माधवः व्हावयाचें आहे काय ? या सार्‍या उपाधि
  • अण्णा: खरी उपाधि आहे बुवा तुझी ! पिलंभट पळा; उगीच वेळ घालवूं नका !
  • पिलंभट: बरें, पण आपण त्या पुडया खाल्लया त्यांचें काय ?
  • अण्णाः अहो, त्याचें काय ! मला तरविषसुद्धां चढेनासें झालें आहे. प्रकृति अगदीं अदशी, होऊन बसली आहे ! नसताभास होतो आहे !
  • माधव: अहाहा ! हीच उन्मनी अवस्था. मुमुक्षेची तृष्णा लागण्यापूर्वीं मुमुक्षु जनाची हीच अवस्था होते. इथून पुढें तळमल-पुढें पिपासा-पुढें साक्षात्कार-पुढें मुक्ति ! अण्णा, धन्य, धन्य तुमची ! तुर्यावस्था सपून तिच्या पुढची अवस्था तुम्हांला प्राप्त होणार! ज्ञानदेव, तुकाराम, एकनाथ, विसोबा खेचर
  • अण्णाः म्हसोबा गाढव-पुरे करही यादी ! आणखी कांहीं वेळ असा घोळ घालून बसलास तररोगानें माझी खरोखरीच पढची अवस्था होणार! धन्य आहे तुझी ! पिलंभट, उठा ! मधु पळ ! हे पहा तात्या आलेच ! [तात्या येतात.]
  • अण्णाः तात्या, चला, घरांत उंदीरपडला ! आतां इथें राहून उपयोगी नाहीं.
  • तात्या: नाहीं खरें; पण चालायचें कसें ! घरांतून बाहेरपडायचें म्हटलें तरपूर्वाभिमुख गमन करावें लागेल आणि हा मुहूर्त तरपूर्वाभिमुख गमनाला विरोधी आहे ! या वेळीं उत्तराभिमुख गमन लाभेल काय तें !
  • अण्णाः अहो, आतां मुहूर्त पाहावयाला तरी अवकाश कुठें आहे ? हातघाईच्या वेळीं सारे मुहूर्त सारखेच !
  • माधवः हेंच खरें ! हरीचिया दासा ॥ शुभकाळ अवघ्या दिशा ॥
  • अण्णाः माझी आई, तुला दहा दिशा मोकळ्या आहेत; पण आतां जीभ मोकळी सोंडू नकोम! काय तकलीफ आहे पहा ! हं, तात्या, आतां निघालेंच पाहिजे !
  • तात्याः अरे काय म्हणणें हें, अण्णा ? हें पहा, (पंचांग दाखवितात.) संकट होय, क्लेश उपजे; सुखनाश; मुहूतें चालेल तो सुख पावेल. गोरक्ष पुसे; मत्स्येंद्रसांगे; हा केवल मुहूर्तराज होय ! सहदेव म्हने भाडळीशीं
  • अण्णाः आपली मति हरली बुवा आता! हा प्राण जाण्याचा मुहुर्त दिसतो; मग तात्या, आतां करायचें तरी कसें ?
  • तात्याः करायचें काय त्यांत ? त्या उत्तरेकडच्या खिखकींतून सारे बाहेरपडा म्हणजे झालें !
  • यशोदा: त्यापक्षीं, मी म्हणतें, तेवढें परस्थान
  • अण्णाः आतां पायांवरडोकें फोडून घेऊं का एकेकाच्या ! आतां परस्थान नको, संस्थान नको; पिलंभत
  • यशोदाः असें काय म्हणायचें भलतेंच ? परस्थान ठेविल्यावांचून का कुठें निघणें म्हटलें आहे ?
  • पिलंभट: आतां असें करूं द्या. परस्थान घेऊन मी त्या उत्तरेकडच्या खिडकीवाटे बाहेरपडतों आणि मग मंडळी येऊं द्या पुढल्या दारानें ! म्हणजे सार्‍या अडचणी भागतील !
  • अण्णाः शाबास. असेंच करा. चला, तात्या, पिलंभट, त्या विषाच्या पुडया खाल्लया त्यांच्यावरउतारा पण आणा बरें का ? मला भलभलताभास होऊं लागला आतां !
  • पिलंभट: (स्वतःशीं) न होईल तरमग माझी करामत कुठें राहिली ? सार्‍या पुडया इथून तिथून एक. घरचा वैद्य.
  • अण्णाः हां, निघा आतां.
  • पिलं: जातों. तांगे आणतों आणि आपल्यासाठीं उतार्‍याचें औषधहि आणतों.
  • अण्णा: औषध आणाच; तें घेईन आगगाडींत बसल्यावर! आधीं तांगे आणा ! तांगे कांहीं आगगाडींत बसल्यावरमग यपयोगी पडायचे नाहींत. तेव्हां आधीं तांगे आणा. चला, एकएक क्ष म्हणजे वर्ष आहे आतां !
  • यशोदा: अंगारा तरी लावूं का कुळस्वामिणीचा सगळ्यांना ?
  • अण्णा: नको. अंगारा आणायला सुद्धां तिकडे जाऊं नकोस, चला. काय बांधाबांध करायची ती करून घ्या लौकर! मी जाऊन बसतों सडफेवर. (जाऊं लागतात.)
  • तात्या: अरे, पण त्या मुहूर्ताच्या खिडकींतून
  • यशोदाः तेवढें तें परस्थान आधीं
  • माधवः कशाला ? अण्णा, तुम्हींच जा म्हणजे झालें. अग, परस्थान आणि अण्णा यांच्यांत काय भेद आहे ? आणि या खिडकींत आणि त्या दारांत तरी काय भेद आहे ?
  • अण्णा: वेडयांच बाजार, खरा वेडयांचा बाजारहा ! चला. (सर्व जातात.)
  • मधुः (जातां जांता) शाबास, पिलंभट ! संपला हा प्रवेश; आतां चला, पुढच्या कामाला लागा.

(जातात. पडदा पडतो.)


  हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.