वेड्यांचा बाजार (मराठी नाटक)/अंक पहिला
नमन अतुल तव कृति भ्रमवि मति ईश्वरा ! ॥धृ०॥ वर्षती मेघजल, शांतविति भ्रमितल, सलिल मग त्ययुनि मल जात सुरमंदिरा ॥ गोविंद पूर्व-पद-अग्रज स्मरुनि पद, दबळि निज हृत्सखद शब्द नाकरा ! [गोविंदाग्रज]
अंक पहिला
संपादनप्रवेश पहिला
संपादन[मधुकर व वसंत, स्थ्ळः-रस्ता]
- मधुकर : वेडयांचा बाजार आहे आमचें घर म्हणजे! वसंतराव, एकेकाचा प्रकाराऐकलात तर अक्कल गुंग होऊन जाईल तुमची! नाहींतर उगीतर उगीच वेणूताईचें लग्न इटकें लांबणीवर पडलें असतें का! जा कांहीं नाहीं तरी सोळावें वर्ष असेल तिला! पण आमचे तात्या पडले ज्योतिप्याच्या नांदात ! अण्णासहेबांना सगळा वैद्यकाचा व्यापार आणि आईला देवधर्म पुरतात! बरें दादाविषयी म्हणाल तर त्यानें संन्यासदीक्षा घ्यावयाची फक्त बाकी ठेविली आहे!
- वसंत : खरेंच, माधवरावांच्या डोक्यांत हें वेड कसें काय आलें ?
- मधुकर : लग्न झालें तोंपर्यंत सर्व ठीक होतें; पुढें त्यांना कळलें कीं, बहिनीला लिहितां वाचताम येत नाहीं म्हणून; आणि हे म्हणजे पक्के सुधारनावादी! केला निश्चय कीं, पुन्हां म्हणून बायकोचें तोंड पहावयाचें नाही, आणि त्य सुमारास विवेकानंद, स्वाभी रामतीर्थ, हंसस्वरूप या मंडळींच्या व्याख्यानांचा प्रसार सुरू झाला होता, त्या वैतागांत आमच्या दादासाहेबांनींही परमाथीची कास धरिली! इकडे बिचारी रमावहिनी महिरीं चांगले लिहायला वाचायला शिकली, पण उपयोग काय? इतक्या अवकाशांत दादासाहेब पूर्ण विरक्त बनले! वहिनींना घरीं आणावयाचें नांव काढलें कीं हे घर सोडण्याच्या प्रतिज्ञा करायला लागतात!
- वसंत : पण, मधुकर, मला वाटतें कीं माधवरावाचं हें वैराग्य फार दिवस टिकणार नाहीं! हें दोन दिवसांचें वारें दिसतें सगळें! कांहीं प्रयत्न केला तर माधवराव अजून ठिकाणावर येतील!
- मधुकर : येतील तेव्हां खरें! पण आज तर घरांत एका वेडयाची भर पडली आणि बाकीच्यांच्या वेडांना उठाव्णी मिळाली! तात्या म्हणतात त्याला साडेसाती आहे सध्यां; अण्णा म्हणतात, अभ्यासानें आणि जाग्रणानें त्याचें डोकें फिरलें आहे आणि आई म्हणते कुणी तरी जादुटोणा केला आहे!
- वसंत : आणि तिघांचेही आपापल्या परीनें सारखे उपाय चालू असतीत,
- मधुकर : तें कांहीं विचारूं नका, त्यांच्या पत्रिकेचीं वर्षफळें काढण्यांत तात्या वर्षेंच्या वर्षें घालवितात; अण्णांच्या औषधांनी आणि काढयांनीं त्याची अन्नपाण्याची सुद्धां गरज भागविली आहे आणि आईनें तर अंगार्याधुपार्यांनीं त्याला शुद्ध बैरागी बनविला आहे!
- वसंत : काय विलक्षण मंडळी! हा प्रकार पाहून तुम्हाला अगदीं वेडयासारखें होत असेल!
- मधुकर : अहो, इतक्यानें कुठें आटोपतें आहे सारें? दादाच्या लग्नांत आपण चुकलों असें प्रत्येकाला वाटतें आहे आणि वेणूताईच्या लग्नाबद्दल फाजील सावधगिरी घेऊन मागच्या चुकीचा वचपा भरून काढप्याची तिघांनींही आपापल्या मनाशीं गांठ बांधून ठेविली आहे!
- वसंत : आमची यमुताई मोठी भाग्याची म्हणून निर्विघ्नपणें तुमच्या पदरांत पडली म्हणायची!
- मधुकर : त्यावेळीं आमच्या मंडळींत इतकी जागृति झाली नव्हती, नाहींतर माझ्या लग्नाचा प्रकारसुद्धां वेणुताईच्या लग्नासारखाच झाला असता. हल्लीं मात्र खरा तमाशा चालला आहे घरांत ! वेणुताई आणि दादा यांच्या कल्याणासाठीं तिहेरी उपायांचा सारखा मारा सुरू आहे.
- वसंत : यमुताई कधींकधीं या गोष्टी सांगते, पण इतका प्रकार असेल असें नव्हतें आम्हांला वाटत ! मग कदाचित् ती मुद्दाम सांगत नसेला!
- मधुकर : ती सांगणार किती तुम्हांला! अण्णांनीं या दोघांसाठीं औषधांचा असा सांठा करून ठेविला आहे घरांत कीं तो पाहून मुर्डी आंजर्ल्याच्या वैद्यांनासुद्धां लाज वाटावी! आईनें दोघांच्या हातापायांत गंडेताईतांची इतकीं गर्दी केली आहे कीं दोघांनींही ताबूतांत फकिरी घेतली आहे असा भास होतो. आणि तात्यांनीं तर या दोघांचीं वर्षफळें, पत्रिका यांच्या नकला करण्यासाठीं आणि ठिपणें करण्यासाठीं वीस रुपये दरमहाचा एक स्वतंत्र कारकून ठेवून दिला आहे!
- वसंत : आणि माधवराव हें सारें मुकाटयानें सोशीत असतात वाटतें!
- मधुकर : तो इकडे लक्षच देत नाहीं! भोंवतीं बैराग्यांचा एक तांडा असला म्हणजे झालें! त्यानें तर घराला धर्मशाळेची कळा आणून ठेवली आहे.
- वसंत : अशा घोटाळ्यांत सारी जबाबदारी तुम्हांलाच संभाळावी लागते हें स्वाभाविकच आहे. मधुकर, मीं वेणूच्या लग्नाचा विषय आज मुद्दामच काढिला आहे हें तुमच्या लक्षांत आलेंच असेल.
- मधुकर : तुम्हीं न बोलतां तुमचा हेतु माझ्या डोळ्यांसमोर नेहमीं उभा असतो; पण ज्या गोष्टीचा इलाज आपल्या हातीं नाहीं तिचा नुसता उच्चार करण्यांत काय हांशील आहे या विचारानें मी नेहमीं स्वस्थ बसतों.
- वसंत : तर काय आमच्या प्रीतिविवाहाची भाशा मीं सोडून द्यावी म्हणतां? मधुकर, आमचा प्रीतिविवाह म्हणजे एखाद्या नाटकांतली नाहीं तर कादंबरींतील बडबड समजूं नक! तुमच्या लग्नांत वेणू मला देण्याबद्दल जी सारखी थट्टा चालली तिचा आमच्या दोघांच्याही मनावर अगदीं तात्पुरताच परिणाम झाला नाहीं, लग्नानंतर यमुताईबरोबर मी तुमच्या खेडेगांवीं एक महिनाभर होतों त्यावेळीं एकमेकांच्या अधिक परिचयानें तो परिणाम द्दढ झाला. तुमच्या लग्नांतल्या थट्टेला आम्हीं लग्नापेक्षां जास्त महत्त्व देऊं लागलों, पुढें, तुम्हांला माहीतच आहे, मी जरी त्यानंतर कधीं तुमच्या घरीं आलो नाहीं तरी या तीन चार वर्षीत आमच्या यमुताईबरोबर वेणू आमच्या घरीं दोन चार वेळां महिना महिना राहिली होती. या अवकाशांत आमच्या एकमेकांच्या गुणांची आम्हांला पारख पटून तुमच्या लग्नांतल्या थट्टेला आमच्या लग्नानें खरेपणाचें स्वरूप देण्याचा निश्चय केला आणि या कामांत माझी सारी भिस्त, मधुकर, एकटया तुमच्यावरच आहे, आमच्या लग्नाला तुमची आडकाठी नाहीं ना?
- वसंत :
(राग-यमन. ताल-दादरा.)
वैवाहिक दीक्षा जधि प्राप्त हो तुला ॥
प्रेमोत्सव होई कीं तेंवि मला ॥धृ०॥
आप्तवर्ग बांधिति ती सूत्र-बंधनें ॥
तींच करिति सुद्दष सुनव प्रेम-बंधनें ।
अंकूस्ति प्रेमांकुर होइ त्या पळा ॥१॥
- मधुकर : असल्या अनुरूप विवाहाला दुदैंवाखेरीज दुसर्या कोणाची आडकाठी असणारा? मी मागेंच एक दोन वेळां तुमच्याबद्दल गोष्ट काढिली होती; पण तात्या म्हणतात तुमचें टिपण जमत नाहीं, आई म्हणते परतवेल होते आणि अण्णा तर वैद्याच्या मुलाखेरीज कोणाचें नांव सुद्धां काढूं देत नाहींत. यंदा तात्यांनीं पुढल्या महिन्यांत वेणूचे ग्रह साधारण बरे आहेत तेव्हां तेवढघांत लग्न करून घ्यायला हरक्त नाहीं म्हणून लग्नाला कशीतरी परवानगी दिली आहे एकदांची! तेव्हां आतां लोकांचीं तोडें बंद करण्यासाठीं निदान त्या बाळाभाऊशीं का होईना पण एकदांचें घेणूचें लग्न करण्याचा मी विचार केला आहे.
- वसंत : बाळाभाऊ कोण हा!
- मधुकर : अहो तो आमच्या गांवच्या वैद्यवुवांचा मुलगा! वैद्यवुवांनीं अण्णांच्यावर आपल्या वैद्यकाचे चांगलेंच जाळें पसरलें होतें. अण्णा त्यांच्या अगदीं अर्ध्या वचनांत वागत असत. वैद्यवुवांच्या अतंकाळीं अण्णांनीं त्यांना वचन दिलें कीं वेणू बाळाभाऊला देईन म्हणून, आतां बाळाभाऊतें स्वतां नकार दिल्याखेरीज अण्णा म्हणतात मी कांहीं माझ्या वचनाला बाघ आणणार नाहीं.
- वसंत : बरें; निदान मुलगा तरां बरा आहे का?
- मधुकर : कसला बरा? जाणून बुजून पोरांला विहिरींत लोटायची! घरच्या माणसांनीं शिकण्यासाठीं इथं ठेवला आणि मुलानें नाटकाचा छंद धरिला! उठतां बसतां नाटकाखेरीज बोलणें नाहीं! नेहमीं नाटकवाल्यांत पडलेला!
- वसंत : आणि अशा माकडाच्या पदरीं तुम्हीं असलें रत्न बांधणार? मधुकर, यापेक्षां वेणूला खरोखरीच एखाद्या---
- मधुकर : वसंतराव, मला कांहींच कळत नाहीं असें समजूं नका! पण हा लोकापवाद मोठा कठीण आहे! चवाठयावरचीं कुत्रीं भाकरीच्या तुकडयानें तरी भुंकायचीं थांबतात; कावळा व्रण असेल तिथें तरी चोंच मारितो, विंचवाला छेडलें तरच तो नांगी चालवितो; पण लोकांच्या कुटाळकीची तर्हा या सर्वांच्या विरहित असतें. तेव्हां असा देखतां डोळ्यांनीं आगींत पाय घालायला तयार झालों आहें, बरें दुर्दैवानें त्याचें टिपणही तात्यांच्या पसंतीस उतरलें आहे! आज आतां तेवढयासाठींच निघालों आहें. कुठुन तरी त्याला हुडकून अढून एकदां मुलगी समक्ष पहा म्हणजे शास्त्रोक्त झालें म्हणून सांगतो.
- वसंत : धिक्कार असो आमच्या समाजाला! विचारी मनुप्याला असा अविचार करणें भाग पडतें आणि त्याबद्दल त्याला कोणी दोष देत नाहीं! अरेरे असे प्रकार पहात बसण्यापेक्षां संन्यास घेऊन वनवास पत्करलेला बरा!
- मधुकर : वसंतराव असं अगदीं निराश होऊं नका! चल आज त्या बाळाभाऊला बोलावूं, त्याला दोन गोष्टी सांगून पाहूं! मी ही आज रात्रीं पुन्हां तुमच्याबद्दल गोष्ट काढून पाहतों! पाहूं, प्रयत्नांतीं परमेश्वर! नाहींतर होणाराला पाठ दिलीच पाहिजे, चला, त्या बाळाभाऊचा तपास काढूं.
- वसंत : काशीच्या नव्या पाठशाळेंतून शिक्षण संपवून परीक्षा दिल्यानंतरसुद्धां तेथेंच राहिलों असतों आणि संन्यास घेतला असता---
- मधुकर : मग दादाला हंसायला कुठें जागा उरली? चला अहो, हातपाय गाळूं नका. चला.
- मधुकर :
(राग-बिहाग, ताल-त्रिवट.)
सजुनि तुम्हा संन्यासी होतां नुरत तिळहि हंसण्या बारण इतरां कां तुम्ही हंसती ॥धृ०॥
हा विषाद द्या त्यजुनि तुम्ही प्रयत्न करुनि वरा नव यथ ॥१॥ (जातात.)
प्रवेश दुसरा
संपादन- वेणू : [यादहरावा भाई याहो,]
- भीमवबाळा ती वेव्हाळा टाकुनि गोपाळा ॥
- निश्चय केला बंधुवरानें द्यावी शिशुपाळा ॥
- विवाहकाळीं खळ तो आला तंव राजस बाळा ॥
- शोकमरानें विव्हळ झाली दोष लावि माळा ॥
- अजुनि तरी या दासीसाठीं याहो गोपाळा ॥
- जवळी आली काळवेळ ही संकट हें टाळा ॥
- ऐन समायि कां निष्टुर झालां? काय असें केलें ॥
- दीनावरिचें प्रेम सदाचें आज कुठें गेलें ॥
- कधिं वाहिन ही काया माझी देवा तव पायां ॥
- कधिं पाहिनसें झालें मजला सांवळि ती काया ॥
- कधीं सांठविन रूप मनोहर या नयनीं देवा ॥
- मिळेल केव्हां अमागिनीला प्रेमाचा ठेवा ॥
- नका करूं छळ याहुनि माझा अजुनी घननीळा ॥
- वाट बघु किति घेउनि हातीं अश्रूंची माळा ॥
- किती आळवूं परोपरीनें कंठ किं हो सकला ॥
- तरिहि यावया अजुनी माझा माधव कां चुकला ॥
- सर्वसाक्षि भगवंता आतां अंत नका पाहूं ॥
- कीं विषयानीं प्राण तरी हा पदकमला वाहूं ॥
- मीच अमागी, म्हणुनी आपण अनुनी नच आलां ॥
- ब्रह्म सगुण जें दुर्लभ सकलां मिळे कसें मजला ॥
- रडतां यापरि अश्रुजलानें पद भिजुनि जाई ॥
- ऊर भरुनि ये, शब्द न चाले...
- यमुना : हें हू काय वन्सं? गाणें म्हणतां म्हणतां तुमची सुद्धां अगदीं तुमच्या गाण्यांतल्या भीमकबाळेसारखी स्थिति झाली!
- वेणू : बहिनी, तुझें आपलें भलतेंच! भीमकबाळेसारखी स्थिति व्हायला मला ग काय झालें आहे! एकादें गाणें म्हणतांना मनुष्प तसें तद्रूप नाहीं का होत?
- यमुना : वेणू बन्सं! पुरे झाली ही बतावणी: तुमच्यासारखी शिकलेली नसेन म्हणून काय झालें! इतकें का मला कळत नसेल? सांगा पाहूं तुमच्या मनांत काय असेल तें, वा: गडे, माझ्याजवळ सुद्धां आडपडदा?
- वेणू : बहिनी, रागावू नकोस अशी. बायकांच्या मनाला कुठें तोंड असतें का? इतंक दिवस तुल मी माझें दुःख मुद्दाम सांगितलें नाहीं. तं तरी काय करणार बापडी! रमाबहिनीचें दुःख आपल्याला पुष्कळ माहीत आहे. पण काय उपाय होतो आपल्या हातून तिथें तरीं? तीच माझी गत. एरवीं आडपडदा कशाचा? फार झालें तर डोळे निपटीत बसाचें हेंच बायकांचें समाधान.
- यमुना : (पदरानें तिचे डोळे पुसून) नका रडूं, वन्सं. शपथ आहे तुम्हांला माझ्या गळ्याची. आजच तुम्हाला इतकें वाईट वाटायला काय झालें? सांगा पाहूं मला?
- वेणू : सांगतें, पण वहिनी, ऐकून घेटल्यावर तूं माझी थट्टा नाहीं ना करणार?
- यमुना : काय बोलतां वन्सं! चला. तुमचें बोलणें तुम्हांलच शोभतें. हीच का माझी परीक्षा केलीत आजवर? आम्हीं नांवाच्या नणंद-भावजयी; पण सख्या बहिणीप्रमाणें आतांपयेंत वागत आलों आणि तुमचें हें बोलणें? मग काय बोलायचें माणसानें पुढें!
- यमुना :
- (राग-देस, ताल-झापताल)
- असुनी भगिनि-भाव, कां हा दुजां भाव ? मळवा न तें नांव ॥धृ०॥
- कथुनि कारण मला, करूं नका शोक हा, मी देत वचनाला ॥
- ठेवा न त्या नांव कां हा दुजा भाव ? ॥
- मळवा न तें नांव ॥१॥
- वेणू : रागावलीस पुन्हां! तसें नव्हे वहिनी, पण सुखांतल्या माणसाला दुःखी माणसाच्या दुःखाची चांगलीशी कल्पनाच करितां येत नाहीं. म्हणून मी तसें बोललें; तुला लावून बोलण्यासाठीं नव्हे! वितीच्या यातना वितीलाच माहीत; दुसर्यांना तिचें दुःख हलकेंच आहे असेंच वाटायचें!
- यमुना : बरें, तसें का होईना? मी मुळींच बोलत नाहीं आतां! आधीं मला सांगा आणि मग पहा. मी थट्टा करतें का काय तें? हातच्या कांकणाला आरसा कशाला हवा? सांगा पाहूं तुम्हांला का वाईट वाटलें मघाशीं.
- वेणू : सांगायलाच कशाला हवें? तुंच सांग बरें वहिनी, माझी स्थितिसुद्धां त्या भीमकबाळेसारखीच नाहीं का ?
- यमुना : ती कशी काय?
- वेणू : नीट आठवण कर म्हणजे तुझ्यासुद्धां तेव्हांच लक्षांत येईल.
- यमुना :(थोडा वेळ विचार करून) माझ्या नाहीं बाई कांहीं लक्षांत येत.
- वेणू : असें वेड पांधरलेंतर कुठून येणार लक्षांत!
- यमुना : वेड नव्हे वन्सं, खरेंच नाहीं आठवत मला कांहीं.
- वेणू : बरें, तुझ्या लग्नांतली तरी तुला चांगली आठवण आहे ना?
- यमुना : अगदीं चांगली आठवण आहे! पण तिच्यावरून काय सरजायचें इथें!
- वेणू : बोहल्यावर तू आणि मधुदादा होता? मागें मी मुहूर्ताचा कर्हा घेऊन उभी होतें, आठवतें का तुला?
- यमुना : हो, न आठवायला काय झालें? डोल्यांदेखतच्या गोष्टी! त्यावेळीं जाऊबाईंनीं तुमच्या नी आमच्या वसंतदादाच्या पदराला गांठ मारली, मुलींनीं तुम्हांला वसंतदादाचें नांव घ्यायचा आग्रह केला, अखेर तुम्ही लाजून अगदीं रडकुंडीला आलां तेव्हां मींच ती गांठ सोडली, तेव्हांचीच गोष्ट ना?
- वेणू : तेव्हांचीच कशाला, तीच गोष्ट! आतां तरी आलें ना सारें लक्षांत?
- यमुना : अस्सं! अस्सं! आतां लक्षांत ना यायला वेळी का आहें मी!
- वेणू : वहिनी, कां बरें इतकी घाई केलीस, त्यावेळीं ती गांठ सोडायची?
- यमुना : हें काय वन्सं? (तिच डोळे पुसते) या गोष्टी कुणाच्या हातच्या का असतात! झालीं, पांच वर्षें होऊन गेलीं त्या गोष्टीला !
- वेणू : पांच वर्षें झालीं का ग वहिनी तुझ्या लग्नाल?
- यमुना : हो यंदाच्या श्रावणांतली माझी पांचती मंगळागौर ना? वर्षोंना काय लागतें व्हायला! आलीं-गेलीं वर्षें.
- वेणू : मला ही गोष्ट अगदीं काल झाल्यासारखी वाटते. वहिनी, त्या दिवसापासून मला एवढया एकाच गोष्टीचा सारखा निदिघ्यास लागला आहे. वहिनी, पुन्हां येईल का ग तशी वेळ कवीं?
- यमुना : हो, देवाच्या मनांत आलें तर तसें सूद्धां घडून येईल.
- वेणू : मला तुझे असे भोवम आशीवदि नकोत. तूं घेशील का मनावर माझें एवढें काम? तुझी अगदीं जन्माची उतराई होईन.
- यमुना : हात्तिच्या, त्याला एवढी काकळूत कशाला करायला पाहिजे, मला नको का आहे असें झालें तर, एकदां मीं गोष्ट काढली सुद्धां होती जवळ! आज पुन्हां काढीन.
- वेणू : "पुन्हां काढीन" नाहीं! एवढयाणें नाहीं व्हायचें माझें समाधान, उन्हाच्या धापेंत उडत्या पांखराच्या सावलीनें काय विसांवा मिळणार? तूं मधुदादाला अगदीं गळ घाल आणखी,
- यमुना : आणखी वसंतदादाला सुद्धां ना?
- वेणू : हो, दोहींकडे अगदीं आळ घेऊन बैस, कांहीं म्ह्टल्या कांहीं आपला हट्ट सोडूं नकोत. नाहीतर पहा, बाबा कांहीं करोत, माझ्या मनासारखं नाहीं झालें तर मी कांहीं माझ्या जिवाचे...
- वेणू :
- (राग-यमन, ताल-त्रिवट)
- सोसुनि दुःखा यापरि, ऐशी ॥
- होऊं भार कां या जगतासी? ॥धृ०॥
- प्रिय गोष्टींचा त्याग वरोनि, अप्रिय तेही प्रिय मानोनि. घालूं माळा कां दुःखासी? ॥१॥
- यमुना : पुरे मेलें हें बोलणें. वन्सं, तुम्ही अगदीं बिनघोर रहा. मी काय पाहिजे तें करीन. पण तुमच्या मनासारखें घडवून आणीन, आतां तर झालें ना!
- वेणू : तुझ्या तोंडांत साखर पडो म्हणजे झालें.
- यमुना : बरें, पण वन्सं, आजच तुम्हांला इतकें वाईट वाटून घ्यायला काय झालें?
- वेणू : आज दुपारीं जेवणावर बाबा काय म्हणाले तें सांगितलें नाहीं वाटतें मधुदादानें तुला?
- यमुना : कुठून सांगणें होणार, तुमचें तरी काय विचारणें.
- वेणू : हो. खरेंच, राजाराणीची गांठ पडायची ती मंचकावरच! झालें. मुरडलेंस नाक! पोर व्हायची वेळ आली तरी आमच्या वहिनींचें पोरपण कांहीं गेलें नाहीं अजून.
- यमुना : बरें, काय म्हणत होते मामंजी?
- वेणू : बाबांनीं मधुदादाला सांगितलें कीं ते-ते हे आहेतना त्यांना म्हणावें उद्यां येऊन मुलीला शास्त्रोक्त पाहून जा एकदां म्हणून! म्हणजे उद्यांच्या वैशाखांत घेऊं उरकून कार्य झालें!
- यमुना : कुणाला, आपल्या वैद्यबुवांच्या बाळाभाऊंना वाटतें?
- वेणू : हो.
- यमुना : मग त्यांच्या नांवाची लाज वाटायला लागली वाटतें इतक्यांत!
- वेणू : बघ केलीस खरी भलतीच थट्टा, अग अग लाज कशाची? जें नांव ऐकायलासुद्धां नको तें कशाला तोंडावाटें काढूं उगीच?
- यमुना : आणि उद्यांच बाळाभाऊ तुम्हाला पहायला येणार वाटतें?
- वेणू : हो. अन् हें ऐकल्यापासून माझा जीव कसा खालींवर होत आहे सारखा! सांगशील ना तू मधूदादाला आजच?
- यमुना : सांगेन, सांगेन; अगदीं खचित सांगेन, तुम्ही कांहीं काळजी करूं नका.
(सदाशिव येतो.)
- वेणू : या सदुभाऊ, इतक्या उन्हाचे कुणिकडे?
- सदाशिव : ताईनें तुम्हांला बोलविलें आहे घरीं!
- वेणू :कुणी! रमावहिनीनें का?
- सदाशिव : हो, तिला करमत नाहीं म्हणून तुम्हांला बोलविलें आहे घटकाभर बसायला.
- वेणू : खरेंच, किती दिवसांत रमावहिनीकडे गेलें नाहीं. शनवार शनवार आठ, आदितवार नऊ आणि आजचा सोमवार दहा. चल वहिनी तूं पण.
- यमुना : अशा उन्हाच्या; अंमळशानें.
- वेणू : गाडी आणिवतें हवी तर, मग तर झालें ना?
- सदाशिव : आणावयाला नकोच. मी आणलीच आहे आमची गाडी.
- वेणू : झालें तर मग. गाडींत नाहींना झोंप लागणार उन्हाची आमच्या दादाच्या नाजुक राणीला? चल.
- यमुना : दमा जरा. सदुभाऊ, चहा करतें आणि मग.
- सदाशिव : नको, आतां तुमच्या घरीं करा चहा. चला लौकर. यमू-बरें चला. (जातात.)
प्रवेश तिसरा
संपादन[वलवंत प्रासादिक नाटकमंडळीचा दिवाणखाना. तालमीचा देखावा. कांहीं मंडळी जमली आहेत, कांहीं येताहेत, एकजण मध्येंच निजले आहेत.]
- काका : चलरे; कृष्णा, दे घंटा आणि हाक मार वडया मंडळीला; ददा, पांडू, भाऊराव (दोन तीन मुलें जातात.) हें कोण निजलें आहे. देसपांडे का? उठीव त्यांना!
- कृष्णा : देशपांडे, अहो देशपांडे, उठा कीं.
- देशपांडे : अरे कां त्रास देतोस मर्दा; आहे काय गडबड!
- कृष्णा : अहो तालीम.
- देशपांडे : तालीम नाहीं आखाडा.
- कृष्णा : काय कोठयांचा नाद हा.
- देशपांडे : नाद नाहीं आवाज.
- काका : अहो, बस करा कीं; उठा, (देशपांडे उठून बसतात. मुलें येतात.)
- गोपाळ : काका, अण्णासाहेब गेले आहेत बाहेर. पंत म्हणतात माझी आहे पाठ नक्कल; आणि गणपतराव म्हणतात तुम्ही सुरू करा मी आलोंच. रघुनाथ, भाऊराव म्हणतात मी भांग काढून येतों केंसांना?
- देशपांडे : भांग का गांजा? (दोघे तिघे जण येतात.)
- पांडू : का काका, आम्हांला जरा उशीर झाला कीं कायदे आणि कलमें काढिलीं, आताम करा कीं दंड?
- देशपांडे : दंड का हात?
- काका : आम्ही कशाला बसतों कुणाला दंड करीत; मालक जाणे अन् तो दंड जाणे! तो मालकांचा मान!
- देशपांडे : मान का कंबर!
- पांडू : हं, तें ठीकच आहे; मोठयांना कोण ठेवणार नांवं?
- देशपांडे : नांव नाहीं होडी.
- तात्या : गप्य बैस कसा, पांडू; अरे, ती वडील मंडळी, आपण त्यांना असें बोंलू नये. त्यांनीं कांहीं केलें तरी आपल्याला तीं पूज्यच!
- देशपांडे : पूज्य का शून्य.
- काका : बस करा आपला फाजीलपणा, देशापांडे, नक्कल आहे का उद्यांची पाठ?
- देशपांडे : (हळूच एकीकडे) पाठ का पोट?
- काका : बरें भाऊराव येईपर्यंत तेवढें "जाऊं कामाला" घ्या बसवून! पांडू, सूर धर काळ्या पांचव्याचा मध्यम.
- देशपांडे : (एकीकडे) मध्यम का उत्तम. (कांहीं मुलें पुढें येतात.)
- मुले : जाऊं कामाला! चला ग दिवस किती आला!
- काका : ए विन्या, नीट म्हण कीं लेका जा-ऊं.
- विन्या : जाऊं [त्याचा सूर चुकतो]
- काका : अरे लेका, जा-आ-आ ऊं.
- विन्या : जा-आ-आ ऊं. [सूर पुन्हां चुकतो.]
- काका : जा-आ-आ आ.
- विन्या : जा-आ-आ-आ-आ.
- काका : चार कशाला आकार घेतोस? जा-आ-आ-आ. प, ध, प, सा.
- विन्या : प, ध, प, सा.
- देशपांडे : पसा कां मूठ?
- काका : आ-आ-आ-आ-प, ध, प, सा. (काका व विन्या म्हणतात.)
- गणू : [एकीकडे] तात्या हे कावळ्याची "सारीगम" करण्यापैकीच हं. खालेरीस आपला मुक्काम होता; तेव्हां एकदां सकाळीं कावळा ओरडत होता.
- एक : काका पडले गाष्यांतले दरदी; केली सुरुवात त्याच्या ओरडण्याची सुरावट करायला. त्यांतलाच हा अव्यापारेपु व्यापार. या मूठभर पोराला काय कळणार यांचा ‘पधपसा’ नि’निसधप’!
- काका : जा, लेका, म्हण कसें तरी. [मुलें पद म्हणतात.]
- शंकर : उपवन तरुवेलींना जल अमी घालाया जातें ॥ जल मी घालाया जातें.
- हरि : हरिण-शिशूंना कोमल पल्लव-काका, हरिण-शिशृंना म्हणजे काय?
- काका : यांत काय अवघड आहे; अरे वेटया, हरिण म्हणजे हरणें आणि शिशू म्हणजे असे! हरिण शिशूंना म्हणजे ससे नी विश्व म्हणजे विशवे.
- हरि : हरिण-शिशूंना कोमल पल्लव चाराया जातें । पल्लव चाराया जातें ॥
- गोपाळ : कादंबरीची कुसुम कंचुकी गुंफाया जातें । कंचुकी गुंफाया जातें ॥
- काका : जरा चेहर्यांत मजा आणा कीं थोडी! रडतोस कां असा.
- दामू : पंजर शुकसारिकेस गायन शिकवाया जातें । सगायन शिकवाया ॥
- काका : अरे खुळ्या सगायन काय? आणि तूं काय गायन शिकविणार! मांजर खाल्ल्यासाखा ओरडतो आहेस नुसता! नाहीं आवाजांत प्रेम कीं नाहीं गाण्यांत ढंग! आणि म्हणे गायन शिकवाया जातें.
- दामू : काका, भाऊराव आले? [भाऊराव येतात.]
- काका : हं मग घ्या मुलींचा प्रवेश शारदेंतला!
- रघु : काका, मी करूं वल्लरीची नक्कल?
- काका : लेका, आवाजाचें झालें आहे मडकें आणि वल्लरीची नक्कल कशाला? बसत जा आजपासून आंतल्या पेटीवर!
- शंकर : तात्या तुमचे बाळाभाऊ आले! [बाळाभाऊ दोघांशीं बोलत बोलत येतात.]
- काका : तात्या, हं, आज होऊन जाऊंदे याची गम्मत.
- तात्या : ओ हो हो हो, बाळाभाऊ? या, गुरु.
- बाळा : गुरू! कोण आम्ही का तुम्ही? वा: भय्या!
- तात्या : [हसत] भले! आम्ही गुरू वाटतें! आमची काय आहे योग्यता गुरू व्हायची!
- देशपांडे : [एकीकडे] गुरू का जनावर!
- बाळा : बनवा, बनवा बुवा आम्हांला!
- तात्या : हें बनवणें वाटतें! आतां मात्र हात जोडले; माफ करा. बाळाभाऊ; तुमची काय गोष्ट; आज तुम्ही नाटकांत नाहीं, नाहींतर झुलवून सोडलें असतें लोकांना.
- काका : काय, तात्या, बाळाभाऊ गातात वाटतें!
- तात्या : गातात! तुम्हीं ऐकलें नाहींत कधी! किर्लोस्करांच्या भाऊरावामार्गें एवढा एकच प्राणी आहे आज! आपल्या इथें नेहमीं येतात तर खरें! तान तयारी भलतीकडे, गळा फिरता, आवाजांत झार अशी आहे अगदीं किनरीसारखी! आतां गंधर्वाचा पाडा शिल्लक नाहीं, नाहींतर हे सव्वा, दीड, अडीच गंधर्वापेक्षांही बालगंधर्व व्हावयाचे.
- भाऊ : मग, तात्या, होऊंद्या आतां कांहीं!
- काका : हो खरेंच, ऐकवा कांहीं आम्हांला!
- तात्या : बाळाभाऊ, या पुढें! भय्या एकच चीज, पण ऐशी झाली पाहिजे कीं अगदीं भलतीकडे ! काका, सुरलपणाबद्दल तर शिकरत आहे! रहिमतखां झक मारतो, यांच्यापुढें!
- बाळा : ए, तात्या! काय हें! आम्ही आपलें उगीच आ करणारे.
- तात्या : आ करणारे! लोकांना आश्चर्यानें “आ” करायला लावाल! काका हें सारें उगीच वरवर बरें का ? गृहस्थाच्या अंगांत इतके गुण आहेत पण कोणी स्तुति केली कीं बिघडलें बस्तान!
- गण : हं, मग, तात्या, आतां उशीर कां.
- तात्या : बाळाभाऊ करा सुरुवात. कृष्णा घे तबला.
- बाळा : (गंभीर आवाजानें तात्याच्या कानाशीं लागून पण सर्वांस ऐकूं येत जाईल अश रीतीनें) वडी मंडळी? जाऊं द्या! तुम्ही एकदां चढयां सुरांत दोन ताना फेंका कीं चिमणीसारखें तोंड होईल एकेकाचें! बडी मंडळी! देखनेमें ढबू और चलनेमें शिवराई! (उघड) म्हणा, आपल्याला थोडाच रंग मारायचा आहे?
- बाळा : पण-पण बुवा.
- देशपांडे :(मध्येंच) पण कां पैज?
- बाळा : तात्या, वेळ जातो आहे उगीच!
- तात्या : बाळाभाऊ, हं, पांडू, धर सूर! [पांडू पेटीचा सूर धरतो.]
- बाळा : (निरनिराळे सूर बदलून) आ-आ-आ-आ. हं ठीक आहे. नाहींतर एक सूर चढा घ्या अजून, [पांडू तसें करितो.]
- बाळा : मग काय, म्हणायचें तात्या! [बाळाभाऊ पुढील ठुंबरी वेडया वांकडया सुरांत ओरडतात; तात्या बढजाव भय्या म्हणून म्हणतात; मंडळी तोंडाला पद लावून हंसतात व मधून “वाहवा” देतात. बाळाभाऊ क्रमाक्रमानें आवाज चढवीत शेवटीं किंकाळ्या मारितात व ताल प्रथम सावकाश (लय) नंतर फार जल्द (दुगण) व एकदम अगदीं सावकाश (ठाय) असा बदलून मधून मधून भरपूर ताना मारितात. मंडळी माना डोलावितात.]
(चीज)
- बाळा : जो तूं गुण समजत सुन हमरी ॥
- काका : वाहवाः बाळाभाऊ, वाहवा तात्या खूप मजा केली.
- भाऊरव: शिकले कुठें हें इतकें?
- बाळा : शिकण्यासारखें आहे काय त्यांत, उगीच आपुलें वडें वांकुडें गाईन परी तुझा म्हणवीन.
- तात्या : अहो खर्या हिर्याला उसनी चमक हवी कशाला? हें सारें ऐकून ऐकून झालें आहे नुसतें.
- (मुलें बाळाभाऊस मधून मधून ताना घ्यावयाला सांगतात, बाळाभाऊ, वेडयावांकडया ताना मारितात, तात्या बोटानें गिरक्या घेऊन त्यांना सूचना देतात.)
- रघु :बाळाभाऊ आतां जिन्याची तान,
- शंकर : भले, आतां जिन्याची तान,
- रघु : आतां चक्री तान,
- तात्या : बाळाभाऊ, आतां लावणी "नका टाकून जाऊं,"
- काका : तात्या आतां जरा यंत्र थांबवा. हा ग्रामगीताचा प्रकार नको.
- तात्या : यंत्र थांबवा कशाला, आतांशा गाणार्या यंत्रातून चांगले मोठे प्रतिष्ठित लोक सुद्धां ही लावणी बरोबर बिनदिक्कत ऐकत बसतात. मग आमच्या या यंत्रानेंच काय पाप केलें आहे, तें कांहीं नाहीं चलदेव. बाळाभाऊ अगदी हावभाव सुद्धां,
- (तात्या शिकवितात बाळाभाऊ हावभावासकट वरील लावणी म्हणतात.)
- काका : भेल, बाळाभाऊ, खूप आहे! हावभावाची तर शिकस्त आहे!
- तात्या : नाटकांत येणार आहेत आपल्या! चालेल का नाहीं?
- पंत : चालेल म्हणजे? किर्लोस्करांतल्या बालगंधर्वावर आहे कडी!
- देशपांडे : कडी का कुलूप?
- पंत : घाला कीं तुमच्या तोंडाला कुलूप एकदां!
- काका : बरें तात्या, आणखी कांहीं सुनवा कीं?
- तात्या : बाळाभाऊ, होऊन जाऊं द्या एकदां अखेरचें! काय पाहिजे मंडळी, "नच सुंदरी करूं कोपा" कीं "अरसिक किती हा शेला"?
- रघू : "अरसिक किती हा" च होऊं द्या!
- कृष्णा : आणखी, तात्या, परवां रंगपटांत झालें तशा थाटानें!
- तात्या : हरकत नाहीं, का बाळाभाऊ?
- बाळा' : म्हणजे पदर घेऊन? माफ करा भय्या! बनवितां वाटतें आम्हांला?
- तात्या : बनवितों? तुम्हांला वाटतें कां तसें खरोखरीच ? मग काय, राहिलें आमचें म्हणणें! बाकी, बाळाभाऊ, आम्ही तुम्हांला मंडळींतले समजतों आणि तुम्हीं मात्र फटकून असतां बरें का?
- काका : बरें, बुवा गाणें आपलें असें तसें असतें तर मग भाग निराळा,
- पंत : हो, पण आवाज जसा गळी: म्हणणें ढंगदार! मग बनविणार कसें इथें?
- तात्या : आणि मी तुम्हांला वनवीन? आपल्या मंडळीला बनविलें म्हणजे झालेंच कीं मग? तुम्हांला वाटलें का खरेंच तुमचा आवाज वाईट आहे आणि ही सारी थट्टा म्हणून?
- बाळा : नाहीं, पण उगीच बाहेरची मंडळी आली म्हणजे पंचाईत.
- तात्या : बाहेरचें कोण येणार? येवढी आपलीच मंडळी! मी करतों सारी यवस्था.
- पंत : नाहींटर त्यांना आवडत नसेल तर राहूं दे तात्या? उगीच कशाला इतका खल!
- देशपांडे : खल का बत्ता!
- तात्या : नाहीं; नाहीं; म्हणावयाचें ना गुरु?
- बाळा : म्हणूं कीं? पण बाहेरचें कुणि---
- तात्या : मी तें करितों सारें ठीक! अरे, कोणी तरी बसा आणि कुणी दारांत आलें तर एकदन कळवा पाहूं? कोण बसेल बरं, कृष्णा?
- गणू : कृष्णा कशाला, मीच बसतों कीं; उगीच पोरासोरीं काम नको.
- तात्या : बस, सत्रा आणे काम! (गणू जाऊं लागतो.)
- बाळा : गणपतराव, भय्या तसदी पडते आहे? माफ करायची हं.
- गणू : अरे दोस्त, तुमच्यासाठीं जान कुरबान आहे. (एका टोंकाला जाऊन बसतो.)
- तात्या : ठीक आतां उठा भय्य; रघु, जा त्यांना पदर दे पाहूं; हें घे माझें उपरणें.
- बाळा : तात्या पदरच कशाला पण नुसतें म्हणतों कीं.
- तात्या : हं एकदां भाषा झाल्यावर बदलायचें नाहीं गुरु. जारे रघु; कर सोंग तयार. या उपरण्याचा पदर दे. सदर्याच्या बाह्या चोळीवजा सरकीव म्हणजे झालें. टोपबीप नको आज.
- रघु : पण तात्या चोळीला कापूस नाहींना इथें.
- तात्या : अरे नसूं दे लेका कापूस. ते धाकटे रंगाचे रिकामे पेले आहेत ना कोनाडयांत तेच घे लौकर जा.
- पंत : ठीक रंग आहे. तात्या.
- (बाळाभाऊ. रघु व एकदोन मुलें जातात.)
- काका : खूप बनविला आहेंस बुवा !
- [वसंत व मधुकर येतात.]
- मणू : ओहोहो! कोण मधुकर आणि वसंतराव! या बसा! कोणिकडे आज वाट चुकालं?
- मधु : आमचे ते बाळाभाऊ वैद्य; त्यांना बोलवावयाला आलों.
- गणू : होय का? या मूर्तीशीं काय काम निघालें तुमचें?
- मधु : थोडेंच काम होतें; आहेतु का ते?
- गणू : आहेत: पण जरा बाजूला उभे राहून थोडी मजा पाहा त्यांची, पुढें माच येऊं नका इतक्यांत; नाहींतर त्यांचा फिक्का पडेल.
- (मधुकर व वसंत थोडे बाजूला सरतात. नंतर धोतराचा पद घेतलेले स्त्रीवेषधारी बाळाभाऊ येतात.)
- काका : तात्या सोंगांतसुद्धा प्रेम आहे, चालण्यांतुसुद्धां लकब आहे थोडी.
- पंत : हं हं बाळाभाऊ, खूप आहे बरें; चालूं द्या आतां.
- [एका उपरण्याचा शेला घेऊन बाळाभाऊ वेडयावांकडया अभिनयांत “अरसिक किती हा शेला” हें पद म्हणतात. मंडळीचा गोंधळ चालूच आहे.]
- काका : शाबास गबृ! अगदीं सही भाऊराव कोल्हटकर!
- देशपांडे : सही नाहीं शिक्का.
- पंत : सवाई भाऊराव म्हणाना! हा गुण नवीनच कळला!
- तात्या : अहो, झांकलें माणिक आहे माणिक! गाणें आहे; चेहरा आहे; अभिनय आहे; शिवाय कवि आहेत!
- काका : कया सांगतोस!
- तात्या : खरेंच: नाटक लिहिलें आहे त्यांनीं एक! त्याचें नांव वैद्यनाटक!
- बाळा : वः तात्या, वैद्यनाटक नव्हे; नाटयवैद्यक!
- काका : म्हणजे वैद्यकाची भानगड आहे वाटतें त्यांत?
- तात्या : म्हणजे-त्यांचे वडील मोठे प्रसिद्ध वैद्य होते! आणि हे नाटयभक्त; तेव्हां आपल्या वडिलोपार्जित धंद्याचें नांव गाजविण्यासाठीं तोच विषय घेतला नाटकाला! हो, कवीला काय कमी? “जहां न पहूंचे रवि; वहां पहूंचे कवि!” त्यांत नायिकेला कामज्वर भरला होतात तो पांचव्या अंकांत काडेचिराइताचा काढा देऊन ह्टविला असा भाग आहे एकंदर!
- पंत : वाहवा! ऐकायला मिळालें पाहिजे बुवा एकदा!
- काका : बरें, तात्या, आतां अखेरचें एक; म्हणजे खेल खलास!
- तात्या : बाळाभाऊ ‘जाई परतोनि’ आतां! आणि शेवटीं म्हणत म्हणत आंत निघून जायचें!
- [कृष्णाला हरिण कल्पून बाळाभाऊ पद म्हणतातः मधून मधून घसा फोडून रडतात; मंडळी रडण्याचा आविभवि आणितात; तात्या तर ओक्साबोक्शीं रडतात. शेवटीं बाळाभाऊ झटक्यानें निघून खोलींत जातात, टाळ्यांचा गजर.]
- मधु : का हो, गणपतराव, अगदीं हुबेहूब माकडचेष्टा आहेत या !
- गणू : तो मदारी आहेना आमचा तात्या । असें हुरळलेलें तट्टू तात्याच्या तावडींत सांपडलें कीं त्यानें बनविलेंच त्याला! जरा चढविलें कीं झाळें काम!
- वसंत : म्हणजे, ही काय जादू आहे तात्याजवळ!
- गणू : उद्योग काय तात्याला दुसरा! हा बाळाभाऊ अगदीं फटेल ना! पण तात्याच्या अर्घ्या वचनांत अगदीं! तात्याचें वाक्य त्याला प्रमाण!
- मधु : फारच नवल म्हणायचें बुवा!
- गणू : नवल कशाचें! एकटा बाळाभाऊच आहे का असा! मुक्कामाच्या दर गांवाला आमच्या तात्याचीं एक दोन कुळें आहेतच! एरवीं ही मंडळी खूप हुषार; पण एवढया बाबतींत ढिसाळ! चांगलें सात सात यत्ता शिकलेले लोकसुद्धां आहेत तात्याच्या यादींत! [बाळाभाऊ बाहेर येतात.] बाळाभाऊ, हे मधुकर आले आहेत तुमच्याकडे!
- बाळा : [गडबडीनें] कसें काय मधुकर! कुणीकडे आज?
- मधु : तुमच्याकडेच आलों आहे! अप्पांनीं तुम्हांला बोलाबिलें आहे घरीं. तुम्ही वेणूताईला एकदां शास्त्रोक्त पाहून जा म्हणजे बरें पडेल! आज किंवा उद्यां तुमच्या सवडीप्रमाणें येऊन जा.
- बाळा : ठीक आहे! चला! आतां पाहतों कांहीं काम नसलें तर, नाहीं तर उद्यां येईन. चला, बरें आहे, मंडळी, जरा जाऊन येतों.
- [मधु व वसंत नमस्कार वगैरे करितात व बाळाभाऊसह जातात. मंडळींत खूप हंशा होतो.]
प्रवेश चवथा
संपादन[अप्पासाहेब यशोदाबाई]
- अण्णाः काय करावें आतां प्रकृतीला ! अगदीं तील खपेनासा झाला आहे ! आज सकाळीं अग्निमांद्य झालें म्हणून चूर्ण आणिवलें वैद्यबुवांकडून तों लागलीच इतकी क्षुधा प्रदीप्त झाली कीं सार्या मुलखाची खाई सुटली आहे ! काय ही भूक !
- यशोदाः मग खायचें होतें कांहीं थोडेंसें ! देऊं का आणून कांहीं ?
- अण्णाः अग, खायचें काय कयाळ ! मागें त्या रामभाऊला असेंच अग्निमांद्य झालें; पुढें चूर्ण घेटल्याबरोबर अशीच खाई सुटून त्या नादांत खाल्लेंहि त्यानें थोडेंसें ! झालें; सहा महिने खाटेला खिळून पडावें लागलें ! वैद्य तरी आतां कोणता आणावा ?
- यशोदाः खरें तर काय ? इतके वैद्य झाले पण मेल्या एकाच्यासुद्धां हाताला गुण नाहीं. सारे मेले---
- अण्णाः अग, वैद्याला शिव्या देऊं नयेत अशा ! वैद्यांच्या स्वाधीनच्या का या गोष्टी आहेत ? वैद्य काय करणार इथें ? आतांशा हवा पहा ना कशी असते ती ! सकाळीं सारें आमाळ झाकलेलें ! दुपारीं अंगाचीं कारंजीं होतात आणि संध्याकाळीं गार वारा लागतो ! रात्रीं असाच वार्याचा खेळ ! घटकेंत वारा इतका बंद होतो कीं श्वासोच्छ्वास सुद्धां बंद व्हावयाची वेळ येते, तर घटकेंत असा वारा सुटतो कीं घरें सुद्धां उडून जातील असें वाटतें ! घर पडेल म्हणून बहिर यावें म्हटलें तर लागलीच सर्दी व्हावयाची ! काय-करावें काय या वार्याला ?
- यशोदाः असें वार्याशीं भांडून काय होणार ? हें सारें बाहेरचें आहे आणि त्यानेंच इकडे असें वाटतें !
- अण्णाः कसलें आलें आहे कर्माचें बाहेरचें
- यशोदाः नाहीं म्हणून कसें चालेल ? परवां का कालच वाटतें, कोपर्यांत तेलाचा डबा होता आणि सकाळीं बघतें तो डबा आपला आंगणांत !
- अण्णाः अग, उडाला असेल या वार्यानें !
- यशोदाः तसेंच, परवां पहांटे पहांटेस गोठयांत सारखी खडबड आणि सकाळीं कपिलेनें दुधाचा एक थेंब दिला असेल तर शपथ !
- अण्णाः वार्यानें वासराचें दावें तुटलें असेल, नाहीं तर या उन्हानें गाय आटली असेल झालें !
- यशोदाः कांहीं नाहीं, वेणूला पाहिलें तर काल आपली एकदम उचकीच लागली; घटका झाली, दोन घटका झाल्या, उचकी आपली तशीच ! नाना उपाय केल; पण ज्याचें नांव तें ! अखेर अंबाबाईच्या नांवानें अंगारा लावला; म्हटलें चुकलें, कांहीं चूक झाली असेल तर आईनें पदरांत घ्यावी ! झालें घटकेंत उचकी बंद !
- अण्णाः बाकी ती आतांशा फारच झुरणीस लागल्यासारखी दिसते.
- यशोदाः पहावत नाहीं पोरींकडे ! कसली गेंदासारखी पोर, पण फाटल्यासारखी झाली आहे बघतां बघतां ! खाणें नाहीं, पिणें नाहीं ! इकडे पोरीची ही दशा आणि तिकडे लोकांचीं घालून पाडून बोलणीं ! नकोसा झाला आहे जीव ! कुणी म्हणतात पोरीनं लग्नाची धास्ती घेतली आहे तर कुणी म्हणतें तिचें मीठ तोडलें आहे !
- अण्णाः धास्ती कसली आणि मीठ कसलें ? तिला मुळीं पहिल्यापासूनच क्षयाची भावना आहे !
- यशोदाः आतां बोललें तर येईळ राग ? क्षय नाहीं, खोकला नाहीं; हा सारा बाहेरवा आहे ! म्हणून हे सारे खेळ होताहेत.
- अण्णाः पण बाहेरवा व्हायाला आम्हीं काय कुणाचें खाल्लें आहें ?
- यशोदाः आज सकाळींच मी पिलंभटाचा देव खेळविला, देवानें स्पष्ट सांगितलें, कीं करंजगांवच्या विहिरीवर तुझी मूल तिनीसांजची न्हाऊनमाखून, डोकींत गजरा घालून गेली होती तिथें तिला तिला बाहेरचा पायरव झाला. तसा मागें मी एकदां अंबाबाईला गोंधळ बोललें होतें तो कांहीं अजून घातला नाहीं त्याची ही सारी घरांत नड आहे !
- अण्णाः तुला नाहीं उद्योग आणि त्या पिलंभटालाहि नाहीं उद्योग ! घाला गोंधळ झालें; पण घरांत कुणाचें औषध मात्र बंद करूं नका !
[मधुकर व पिलंभट येतात.]
- मधुः अण्णा, देऊन आलों वसंतरावांची पत्रिका आजोबांजवळ !
- पिलं: हें पनवेलकरांचें क्षिणामृत वेणूताईसाठीं ! या माधवरावाच्या कफपित्तवातनाशक गोळ्या दिल्या आहेत भाऊशास्त्री घाटयांनी ! आणि हीं तुमच्याकाढयांचीं औषधें ! पिंपळीं, हिरडा, बेहडा, कोष्टिकोळिंजन, धमासा, पित्तपापडा, वावडिंग, डिकेमाली.
- अण्णा: भले शाबासा ! पण, पिलंभट, जीर्णज्वर कांहीं हटत नाहीं अजून ! पहा, बरें, आहे का आतां ताप !
- पिलं: (नाडी पाहून) ओ, हो, हो, पुष्कळ ताप आहे अंगांत, काढा बदलला पाहिजे असें वाटतें !
- यशोदाः (अण्णांच्या अंगाला हात लावून) कुठें, आहे कुठें ताप ! उगीच पराचा कावळा करायचा झालें.
- अण्णाः अग, नाही कसा ताप ? कालपासून अंगांत कणकण आहे नी म्हणे ताप नाहीं ! काल रात्रीं आंचवायला बागेंत गेलों आणि जरा बोलत उभा राहिलों जरासा उघडया अंगानें वार्यांत; तेव्हां मन कचरलें ! आणि म्हणे ताप नाहीं !
- यशोदाः मग हाताला लागत नाहीं कुठें माझ्या ?
- पिलं: बाईसाहेव, हाडीज्वर हाताला कसा लागणा ? बोलून चालून चोरटें दुखणें हें, त्यांतला दरदी असेल त्यालाच कळायचें !
- अण्णाः (कण्हत) अहाहा, काय पाठींत कळ आली पाहा.
- पिलं: ही झुळूल आली ही, वार्याची, तिनें !
- मधुः बरें; अण्णा, पत्रिकेचें तसेंच राहिलें ! बसंतरावांची---
- अण्णाः वसंतराव, वसंतराव, माळ का करून घालायची आहे वसंतरावाची ! छप्पन्न वेळा सांगितलें आणि आतां पुन्हां सांगतों एकदां, कीं तो सोन्यानें भरला असला तरी मला त्याला मुलगी द्यायची, नाहीं !
- यशोदाः पण उगीच का जिवाचें पाणी करून घ्यायचें तें ! तिनें ज्याचे तीळतांदूळ खाल्ले असतील तो येऊन आपण होऊन घेऊन जाईल तिला. आपण कशाला उगीच संताप करून घ्यायचा ?
- अण्णाः तसें नव्हे; मीं एकदां सांगितलें कीं मीं वेणू बाळाभाऊला देणार, त्याच्या वडिलांना माझें वचन गेलें आहे तें कांहीं मी मोडणार नाहीं आणि बाळाभाऊनें आपण होऊन नको म्हटलें तर दुसर्या एखाद्या वैद्याच्या घरीं देईन ! पोरीला क्षय आहे, तिला वैद्याच्याच घरीं दिली पाहिजे.
- यशोदाः बाळाभाऊचें ठिकाण कांहीं वाईट नाहीं; आज इतके दिवसांचा नाद आहे आणि मुलगाही माहितीचा ! आतां अंमळ मुलगा आहे बसवया बांध्याचा आणि पोरीची जात पडली उफाडयाची. म्हणून वरणभाव व्हायची भीति आहे थोडीशी, पण तेवढयावर कांहीं हातचें स्थळ घालवायला नको !
- मधुः पण जें करायचें तें जरा विचारानें केलें तर बरें नाहीं का ?
- यशोदाः अरे सारें खरें; पोरीला सुख लागलें पाहिजे; मुलगा हाताचा धड पाहिजे,---
- पिलं: नाहीं तर आपली हातातोंडाशीं गांठ.
- यशोदा: हो; सगळें खरें; पण करायचें कसें ! पोरीचें बाशिंगबळ असें कीं आजवर लग्नाचें नांव सुद्धां निघायची पंचाईत. आतां कुठें हातातोंडास गांठ पडते तोंच हीं कुसपटें कशला हवींत ? कुठून तरी पोरीला हळद लागली म्हणजे मिळविली असें झालें आहे. थोरापोरीं बोलबोलून नकोसें केलें आहे मला.
- मधुः पण, आई, लोकांसाठीं का लग्न करायचें आहे ? उगीच एखाचा उडाणट्प्पूला धरला आणि दिली पदाराला गांठ तर तिकडून पुन्हा लोक नांवें ठेवणारच.
- अण्णाः आतांच्या लोकांना भारी समजायला लागलें. आम्ही यांच्या वयाचे होतों पिलंभट, पण वडिलांचे समोर बोलण्याची प्राज्ञा नव्हती कधीं. कांहीं मागणें-सवरणें झालें तर तें सुद्धां चिठ्ठीनें, तोंडांतून म्हणून व्र निघायचा नांव कशाला पाहिजे !
- पिलं: हल्लीं सुद्धां आम्हीं पाहात नाहीं का प्रत्यक्ष ! तात्यासाहेबांच्या तोंडीं लागतांना आपण अण्णासाहेबांना अजून तर कांहीं पाहिलें नाहीं. अगदीं सांभाच्या पिंडीवर हात मारून सांगावें कुणी यांतलें एक अक्षर खोटें असेल तर !
- अण्णाः तात्यांची मजीं निराळी दिसली अंमळ कीं आमचें आपलें माधार घ्यायचें ठरलेलें; पण आमचे चिरंजीव पाहा.
- मधुः अण्णा, तुम्हांला येतो राग, पण कांहीं वेळाच अशा असतात.
- यशोदाः ऐक रे, मधु, भारी तोंड तुला, आपला साधारण कल पाहिला; सोडून दिली गोष्ट, सर घोडया पाणी खोल, उगीच तोंड करायचें कारण काय ?
- मधुः आई, आतां तोंड न केलें तर उद्यां लोक तोंड काढूं देणार नाहींत कुठें. तुला सांगितलें ना नाटकमंडळींत काय चाललें होतें तें, अशा वेडयापिराच्या गळ्यांत पोर बांधली तर लोक काय म्हणतील ?
- अण्णाः अरे, नाटकमंडळींत गेलें आलें एखादे वेळीं म्हणून काय होतें त्यानें ? पोरपण आहे, होतोच असा हूडपणा थोडा माणसाच्या हातून ! आम्ही लहान होतों तेव्हां किर्लोस्कारांचें नाटक नवीनच निघालें होतें; आम्ही खुशाल जात येत होतों. अण्णा मोठा योग्य पुरुष ! लाख मनुष्य ! शरीरानें असा सुद्दढ असें कीं हा एकेक दंड ! कधीं ताप नाहीं, खोकला नाहीं; कांहीं नाहीं.
- पिलं: अण्णाची गोष्ट कशाला ! हजारों माणसांचा पोशिंदा तो ! अत्तराचे दिवे जाळलेत त्यानें ! भटाभिक्षुकाला मुठीनें पैसे द्यावे त्यानें. आल्यागेल्याला, गोब्राह्मणाला खेळ पहायची सदर परवानगी ! आतांचे नाटकवाले कसले भुकेबंगातल ! कुणाला फुकट सोडतील का नाटकाला ? नांव कशाला ? अण्णाची गोष्ट कशाला ?
- अण्णा: त्यांचा आमचा मोठा घरोबा ! पण म्हणून माणसांतून का उठून गेलों होतों ? त्यांतलेंच बाळाभाऊचें काम ! आस्ते आस्ते संसाराचें ओझें पडूं लागलें कीं तितकें राहात नाहीं तें वारें. बरें, हा वसंतराव तरी काय असा लागून गेला आहे मोठा ? त्याचे तरी काय हात लगले आहेत आकाशाला ?
- मधु: काय वाईट आहे वसंतराव? आपल्या दादासारखी त्याची सुद्धां वकिलीची परीक्षा झाली आहे !
- यशोदा : मग यांनीं काय दिवे लावले एवढें शिकून, तर त्यानें लावायचे राहिले आहेत ? शिवाय आमच्या मुलीला मोहरकरांचें वळणच निराळें ! देव नाहीं, धर्म नाहीं; शिवण नाहीं टिपण नाहीं ! त्या मुलाचे गुण तर काहीं विचारूंच नका ! तुम्ही पाहिलेच असतील आपल्या मधूच्या लग्नांत, पिलंभट !
- पिलं: हो, न पाहायला डोल्यावर भात का बांधला होता माझ्या ? बाई, शिकलेले लोक ना हे !
- यशोदा: अहो, शिकलेले झाले म्हणून काय झालें ! आमचीं मुलें नाहींत का शिकलेलीं ? पण शिकण्याशिकण्याच्या परी आहेत ना ?
- पिलं: आमच्या मुलांची गोष्ट कशाला पाहिजे ? मधु-माधवांच्या एवढाल्या परीक्षा झाल्या पण कधीं बुवा फयरीला पाय लावतील ? जीभ कापून देईन मी आपली हवी तर ! लौकिक केवढा, अगत्य काय माणसाचें ! केव्हांही पानतंबाखूला चार सहा आणे मागा; नाहीं म्हणून नाहींच निघायचें एकाच्या तोंडांतून ! तेंच याच्या जवळ कधीं मागितलें-मागतो कोण आधीं. आपण तर त्यानें एकदां नाहीं म्हटल्यापासूनच कानाला खडा लावला आहे ! पण एकदां म्हटलें संकल्य सांगतों, उद्क सोडा; म्हणे, आम्हांला संकल्य नको; म्हटलें तशीच दक्षणा द्या. धर्माला पाठ देऊं नये अशी ! म्हणे, धर्म आंधळ्यापांगळ्यांना करावा. तात्पर्य काय, अखेर दक्षणा दिली नाहीं, साफ नाहीं म्हटलें !
- यशोदाः तें असो; पण मधूच्या लग्नांत वसंतराव करीत होता विडे आणि चुना होता थोडासा कोरडा. या मुलानें पाणी घेतलें हातीं तेव्हां म्हटलें मामाच्या भाच्यानें चुन्यांत पाणी घालूं नये; तर म्हणतो त्यानें काय व्हायचें आहे ? खुशाल त्यानें पाणी टाकलें चुन्यांत ! झालें, म्हटलें तर, शनवारीं आदरून दूध घ्यायचें, भरल्या घरांत दिवे लावतांना जोवायला बसायचें, असें नाहीं तें करायचें.
- पिलं: तसेंच वरातीच्या वेळीं माझा देव खेळविला ना तुम्ही आणि देवानं मधुकरावरून उतरलेला नारळ, यानें घेतला तो हातीं, म्हटलें हा उतरलेला नारळ हाती घेऊं नये, द्या इकडे, मी करतो त्याची व्यवस्था. त्यानें तिथल्या तिथें फोडला नारळ आणि हंसत हंसत खाऊन टाकला.
- यशोदा: छे ग बाई, मी नाहीं द्यायची माझ्या पोरीला असल्या मुलाला ! साराच मेला भ्रष्टाकार !!
- अण्णा: आणी शरीरानें तरी काय आहे ? बरगडीन् बरगडी मोजून घ्यावी मुलाची ! मला वाटतें त्याला क्षयाची बाघा असावी !
- पिलं: हो, हो, आहेच ना १ कालच मीं त्याला खोकतांना पाहिला. खोकला म्हणजे क्षयाचें मूळ आहे. येरव्ही यायचाच नाहीं. (अप्पासाहेब खोकतात.) नाहीं तर हें खणखणीत खोकणें पाहा. खोकण्याखोकण्याच्या तरी परी आहेत. त्या पोराचें शरीर काय आणि खोकणें काय ?
- अण्णाः छे, हो, अगदींच पाप्याचें पितर. पोरीला काय डोळे झांकून विहिरींत का लोटावयाची आहे ?
- मधु: (स्व.) बिचार्या वसंतरावाचे ग्रह कांहीं ठीक दिसत नाहींत ! (पाहून) झालें, हे तात्या आलेच ! यांचे कांहीं निराळेंच असेल आणखी.
[तात्यासाहेब व माधव पत्रिकांनीं भेंडोळीं घेऊन येतात.]
- माधव: हं, घ्या पित्रिकांचीं बिंडाळीं सारीं. (खालीं टाकतो.)
- तात्याः अरे, अरे, माधवू, पत्रिका ना त्या वेडया ! अशा टाकूं नयेत त्या !
- पिलं: हो, जन्मजन्माचा संबंध त्यांत. एखाद्या पत्रिकेंतला एखादा ग्रह या घरांतला या घरांत लवंडला तर फटू म्हणतां ब्रहाहत्या व्यायची.
- तात्या: वः पिलंभट, वसंतरावाची पत्रिका घेऊन मी तुमची वाट पाहात बसलों. म्हटलें आतां याल, मग याल अखेर कंटाळून मीच आलों माधवाबरोबर पत्रिका घेऊन इकडे.
- पिलं: मी गेलों अण्णासाहेबांचीं औषधें आणायला ! त्यांचा जीर्णज्वर आज जरा बळावला आहे !
- तात्याः आतां काय सांगावें या लोकांना ? अरे, औषधें घेऊन काय होणार कपाळ ? जीर्णज्वर नाहीं आणि विषमज्वर नाहीं; ही सारी ग्रहांची पीडा आहे ! यंदा आण्णाला मुळीं शनीची महादशा आहे !
- पिलं: हो, हो, तरीच शरीर काळें ठिक्कर पडत चाललें आहे ! शनीखेरीज काळसरपणा नाहीं. जपजाप्य करायला हवें उद्यांपासून.
- मधुः बरें, तात्या, त्या टिपणांचें काय झालें ?
- तात्याः आज इतके दिवस घालविले तेव्हां अखेर दोन टिपणें वेणूच्या टिपणाशीं जमतातशीं आढळलीं. अगदीं झाडून जुन्यापान्या सार्या कुंडल्या पालथ्या घातल्या ! ही विक्रमाची; ही काशीकर गागाभट्टाची ! ही थोडीबहुत जमते. पण त्याला मरून झालीं अडीचशें वर्षें ! आतां ही हिंदुस्थान देशाची आणि ही बाळाभाऊची कुंडली. या दोन्ही मात्र जमतात.
- पिलं: तेव्हां त्यांत बाळाभाऊच बरे. हो, हिंदुस्थान देशाशीं तर लग्न नाहीं लावतां येत.
- मधु: पण ती वसंतरावाची नाहीं जमत कुंडली ?
- तात्याः मुळींच नाहीं. ती तर अगदींच जमत नाहीं. फारच भयंकर योगायोग !
- मधुः साधारण जमत असेल तर पाहा. अगदींच फार बारकाईनें
- तात्या: छत् , वेडया नांव सुद्धां काढूं नकोस त्या मुलाचें ! त्याच्या लग्नीं राहू, केंद्रांत मंगळ, त्रिकांत शनि असे सारे ग्रह अनिष्ट पडले आहेत. काय सांगूं तुला, अरे, त्याच्या गळ्यांत लग्नाची माळ पडल्याबरोबर त्याला मृत्यु येणार. अगदीं मृत्यु ठेवलेला.
- पिलं: मी म्हणतों निदान अपमृत्यु, अपमृत्युला तर मरण नाहीं ना ?
- अण्णा: आणि हीं पाप्याचीं पितरें अपमृत्यूनें सुद्धां मरायचीं !
- पिलं: तर काय ? यांना मरायला मृत्यूच कशाला हवा ! खरें कीं नाहीं माधवराव ?
- माधवरावः कशाचा मृत्यु आणि कशाचा जन्म. हे सारे या स्थूल देहाचे विकार आहेत. अंतवंतं इमे देहा नित्यस्योक्ता: शरीरिण:॥ आत्म्याला या उपाधि मुळींच नाहींत. आत्मा अविनाशी, अविकारी अनंत असा आहे. त्याला नाश नाहीं. नैनं छिंदंति शस्त्राणि नैनं दहति पावक: । न चैनं क्लेदयंत्यापो न शोषयपि मारुत:॥ पंचवीस तत्त्वांचा मेळ म्हणजे देह. मात्र, वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि ॥ तशांतला आत्मसंक्रमणाचा प्रकार. मायाभ्रमानें मूढ जीव त्याला मरण म्हणतात. वाकी खरें पाहतां, आत्मा अमर आहे. ‘नायं इंति न हन्यते !’
- यशोदा: माधव हें रे काय बडबडणें ? एकुलत्या एक बहिणीच्या लग्नाचें घाटतें आहे आणि
- माधव: बहीण, भाऊ, आई, बाप सर्व भ्रम आहे हा. का तव कांता कस्ते पुत्र: संसारोयमतीव विचित्र: । कस्य त्वं त्वा कुत आयात: । मी कोण याचा विचार केला पाहिजे ! संसार मृगजलवत् आहे. गेल्या जन्मींचीं बहीणभावंडें कुठें गेलीं; पुढल्या जन्मींचीं आतां कुठें आहेत; हा सारा मोय्वा खेळ आहे. ‘ अहं ब्रह्मास्मि’ मी ब्रह्म, तूं ब्रह्म, तात्या ब्रह्म, आण्णा ब्रह्म
- पिलं: मीही ब्रह्म आहें; पत्रिका ब्रह्म आहेत; पैसा ब्रह्म आहे.
- माधव: एकं सद्विप्रा तद्वहुधा वदन्ति ! तें शोधून काढलें पाहिजे ! ब्रह्म हविर्ब्रंह्म भोक्ता ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम् !
- मधुः दादा, जरा थांब, मुख्य कामाचा ब्रह्मघोटाळा होतो आहे सारा. तात्या, पत्रिकेवर इतका भरंवसा ठेवून कसें चालेल ? वेळ थोडी चुकली तर लागलीच जमीनअस्मानाचें अंतर पडतें भविष्यांत.
- पिलं : हो, सरासरी आणि शतमान.
- मधु: म्हणून म्हणतों कीं पत्रिकेकडे थोडें दुर्लक्ष केलें तर नाहीं का चालणार ? मुलगा चांगला आहे.
तात्याः भलतेंच कांहीं तरी. मुलगा चांगला आहे; पण लाभला पाहिजे ना ? विषाची परांक्षा पहायची कीं काय ? खुळा नाहीं तर. आजन्म मुका राहीन माझें बोलणें खोटें झालें तर !
- पिलं: भलतेंच ! होप्यमाण कुठें चुकतें काय ?
- यशोदा: शिवाय परतवेल होईल तें निराळेंच.
- मधुः मग काय हा नाद सोडून द्यायचा ? दैव पौरीचें; दुसरें काय ?
- अण्णाः चला: मधु, जा आणि बाळाभाऊला आतांच घेऊन ये.
- मधुः जातो. काय करायचें ? मर्जी प्रभूची !
- माधव: मधु, वेडया, असा हताश काय होतोस ? काय करायचें तें केलें पाहिजे ! परिणाम कांहीं हा होईना ?
कर्मण्येबाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ॥
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि ॥
[पडदा पडतो.] अंक पहिला समाप्त.
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. |