शब्द सोन्याचा पिंपळ/सर्वश्रेष्ठ हिंदी कादंबरी:‘गोदान'
मराठी व हिंदी साहित्य विकासात अंतर असले, तरी एका बाबतीत मात्र साम्य आढळते. ते म्हणजे, कादंबरीतील ग्रामीण चित्रण. दोन्ही भाषांतील साहित्यात ग्रामीण जीवनाचे चित्रण १९२० नंतर सुरू झाले. याच सुमारास महात्मा गांधींनी 'खेड्याकडे चला'चा संदेश दिलेला होता. खरा भारत पाहायचा तर भारतीय खेडे पाहायला हवे, असे गांधीजी आग्रहाने सांगत. त्यांचे राजकीय गुरू असलेल्या गोपाळ कृष्ण गोखल्यांनी दक्षिण आफ्रिकेतून देशसेवेसाठी स्वदेशी आलेल्या गांधींना प्रथम सर्व देश पाहण्याचा सल्ला दिला होता. त्यातून भारताचे खरे चित्र, खरा चेहरा गांधीजींच्या लक्षात आला होता. १९२० च्या दरम्यान लेखन करणारे मराठी हिंदी कादंबरीकार महात्मागांधींच्या विचार व कार्याने प्रभावित झालेले होते. मराठीत श्री. म. माटेंच्या लेखनाने ग्रामीण चित्रणाचा प्रारंभ मानला जातो. ग. ल. ठोकळ, र. वा. दिघे, वि. वा. हडप, सोपानदेव चौधरी, कवी यशवंत, गिरीश ही मंडळी मराठीतील प्रारंभिक ग्रामीण जीवन चित्रमय करणारे साहित्यकार म्हणून सांगता येतील. वि. स. खांडेकरांनी शहरी नि मध्यमवर्गीय जीवनाचे चित्रण करणारे लेख लिहिले असले तरी त्यांचा प्रेरणास्रोत कोकणातील शिरोड्यासारखं खेडंच होतं, हे विसरून कसं चालेल?
‘गोदान' ही प्रेमचंदांची पूर्णत्वाच्या कसोटीवरील शेवटची कादंबरी. ती आधुनिक हिंदी कादंबरीतील शीर्षस्थ नि श्रेष्ठ कलात्मक कृती म्हणून ओळखली जाते, ती तिच्यातील व्यापक ग्रामीण चित्रणाच्या आधारावरच. या कादंबरीचा नायक होरी साध्या भारतीय शेतक-यांचं प्रातिनिधिक चित्र नि वास्तव घेऊन आपणापुढे येतो. 'गोदान' कादंबरी भारतीय ग्रामीण जीवनाचं महाकाव्यच. होरी या कादंबरीचा नायक आहे. चाळिशीतील प्रौढ, कर्जग्रस्त, अंधश्रद्ध शेतमजूर असलेला होरी प्रत्येक भारतीय शेतक-याप्रमाणे स्वप्नं घेऊन जगतो. आपल्या मालकीच्या जमिनीचा तुकडा असावा, छोटं घर असावं, घराच्या अंगणात गाय असावी, घर मुला-बाळांनी भरलेलं असावं, जीवन कर्जमुक्त व्हावं, अशी स्वप्नं घेऊन जगणाच्या होरीला आपलं म्हातारपण कसं निभावेल याची सतत चिंता असायची. धनिया ही त्याची धर्मपत्नी. तिला तीन अपत्यं झालेली. मुलगा गोबर नि सोना व रूपा या मुली. होरीचं कुटुंब एकत्र होतं. शोभा व हिरा हे त्याचे भाऊ एकत्र राहायचे. पुढे त्यांनी आपापल्या चुली वेगळ्या केल्या. खेडी तुटत चालली. कुटुंब विभक्त होत निघाली याची कथा सांगणारी ही कादंबरी. होरी हा रायसाहब या जमीनदाराचा रयत. तो दातादीन ब्राह्मणाचा अंधभक्त. रायसाहब त्याचे अन्नदाता. दुलारी साहुआइन, झिंगुरी सिंह, पटेश्वर, नोखेरायसारख्या सावकार, तलाठींच्या अन्याय, अत्याचार, शोषणातून होरीचं जग हरघडी संघर्ष करत असतं. स्वतःचं घर घडवत तो आपल्या मुलाबाळांचं, भावाचं घर, त्यांचे संसार सांभाळत अकाली म्हातारा होतो. आपण साठी तरी गाठू शकू की नाही, याची त्याला शाश्वती नसते. भावाप्रमाणे मुलगाही विभक्त होतो. कसायला घेतलेल्या शेतीचे तुकडे होत होत होरी तुकड्याला महाग होतो. ब्राह्मणाला गाय दान (गोदान) देऊन जिवंतपणी मोक्षाची स्वप्नं पाहणारा होरी गाईच्या अकाली मृत्यूने हबकून जातो.
'गोदान'ची कथा खेड्याबरोबरच नागरी भारतही आपल्यापुढे उभा करते. जमीनदार, वकिलांचं खेड्याच्या श्रमावर शहरात विलासी जगणं चित्रित करणारी ही कादंबरी शहरी मध्यमवर्गाचा स्वप्नवाद, ध्येयवाद चित्रित करते. मेहता व मालतीची कथा याचं उदाहरण. शहरात राहून खेड्याची सेवा करण्यातील शहरवासीयांची विसंगती प्रेमचंदांनी 'गोदान'मध्ये मार्मिकपणे चित्रित केली आहे.
पुढे होरी रोजचा संघर्ष, अन्याय, अत्याचार, शोषणापुढे हवालदिलहोतो व एक दिवस शेतात मजुरी करत असतानाच उष्माघाताने मृत्युमुखी पडतो. अशी समग्र भारताचे वास्तव चित्रण करणारी ही कादंबरी.
तिचं श्रेष्ठत्व कशात दडलंय असं विचाराल तर हे सांगायला हवं की, ही कादंबरी विसाव्या शतकातील प्रारंभीचा भारत आपल्यापुढे उभा करते. ती अनेक अंगांनी हिंदीतील श्रेष्ठ कादंबरी ठरते. १९३२ ला प्रेमचंदांनी ही कादंबरी लिहायला घेतली. १९३६ ला तिचं प्रकाशन झालं. प्रेमचंदांनी ‘सेवासदन' (१९१८) नी आपल्या हिंदी कादंबरी लेखनास ख-या अर्थाने सुरुवात केली. गोदान' (१९३६) पर्यंत त्यांनी 'प्रेमाश्रम', 'निर्मला', ‘रंगभूमी’, ‘कायाकल्प', ‘गबन', 'कर्मभूमी', शिवाय 'वरदान', 'प्रतिज्ञा', ‘मंगळसूत्र' (अपूर्ण) कादंब-या लिहिल्या. तत्पूर्वी त्यांनी उर्दूमध्येही कादंबरी लेखन केलं होतं. पूर्व कादंब-यांच्या तुलनेत ‘गोदान' ही तशी उजवी रचना म्हणावी लागेल- शिल्प, शैली, विचार, भाष सर्वच दृष्टीने. प्रेमचंदांचे समकालीन कादंबरीकार जैनेंद्रकुमार यांनी प्रेमचंदांवर एक सुरेख पुस्तक लिहिलंय. प्रेमचंद : एक कृति व्यक्तित्व' असं त्याचं नाव आहे. या पुस्तकाची हिंदीत व्हावी तितकी चर्चा झाली नाही. त्यात कादंबरीकार प्रेमचंद कसे श्रेष्ठ होते, हे जैनेंद्रकुमारांनी स्पष्ट केलंय. त्यात शेवटचं प्रकरण मोठं मनोज्ञ आहे - ‘प्रेमचंद का 'गोदान' यदि मैं लिखता...' या प्रकरणाच्या पहिल्याच वाक्यात जैनेंद्र म्हणतात, “अगर मैं 'गोदान' लिखता? लेकिन निश्चय है, मैं नहीं लिख सकता था, लिखने की सोच नहीं सकता था' यातच प्रेमचंदांचं, ‘गोदान'चं श्रेष्ठत्व सामावलेलं आहे, असं मला वाटतं. त्यात त्यांनी स्पष्ट केलंय की, ‘गोदान'सारखी कादंबरी लिहायची तर अधिक समज असणं गरजेचं. त्यातील पात्रं केवळ प्रेमचंदच पेलू जाणे. प्रेमचंद तर भाषेचे जादूगारच. वाक्प्रचारयुक्त भाषा, भाषेचा खेळ त्यांनाच जमतो. वर्णनशैली अशी की शब्द मला घ्या, मला घ्या म्हणत पुढे येत असावेत...' ही सारी एका अर्थाने ‘गोदान'चीच वैशिष्ट्ये होत. तीच या कादंबरीस कलात्मकदृष्ट्या श्रेष्ठ नि शीर्षस्थ ठरवतात.
'गोदान'मध्ये ग्रामीण व शहरी भारताची दोन स्वतंत्र चित्रं एकमेकांत विलक्षण कौशल्याने गुंफून प्रेमचंदांनी भारताचं एक समग्र चित्र वाचकांपुढे ठेवण्याचा कलात्मक प्रयत्न केला आहे. हे चित्र एका अर्थाने ‘भारत' विरुद्ध इंडिया' असेच आहे. दोन समांतर कथा एकजीव करण्याचं प्रेमचंदांचं कौशल्य थक्क करणारं आहे. काहींचे याबाबत मतभेद आहेत खरे. हिंदीच्या पूर्वीच्या कादंब-यांत घटना अधिक असायच्या. त्या पात्रांना झाकायच्या,दाबायच्या. पात्रांना कथेत गौण स्थान राहायचं. 'गोदान'मुळे हिंदी कादंबरी पात्रकेंद्री झाली. होरी, धनिया, गोबर ही पात्र अजरामर झाली ती गोदानच्या पात्रप्रधान कथा वैशिष्ट्यामुळेच. 'गोदान' कादंबरीची जवळजवळ सर्वच पात्रं आपल्या गुणवैशिष्ट्यांमुळे व कधी कधी त्यांच्या प्रश्नांमुळे वाचकांच्या हृदयाला भिडतात. ठोकळेबाज पात्राऐवजी व्यक्तिनिष्ठ पात्र रुजवायची परंपरा प्रेमचंदांनी 'गोदान' कादंबरीच्या माध्यमातून सुरू केली व ती रुळून गेली. 'गोदान'ने हिंदीत चरित्र चित्रणाची एक नवी वाट मळली. 'गोदान'मध्ये छोटे संवाद जसे आहेत तसेच भाषणबाजी करणारेसुद्धा आहेत; परंतु 'गोदान'मधील छोटे संवाद अधिक भावतात, भिडतात. वातावरणनिर्मिती ही ‘गोदान' चा सर्वांत मोठा गुण. शहर नि खेडे दोन्ही प्रेमचंदांनी कादंबरीत जिवंत चित्रित केलंय. खेड्यातील लोकमर्यादा, परंपरा, अंधश्रद्धा, राहणीमान, लोकधारणा, नातीगोती, परस्पर सौहार्दता चित्रित कराव्यात प्रेमचंदांनीच. ‘गोदान' म्हणजे मोठ्या कॅनव्हासवर रंगवलेलं गांधींच्या स्वप्नपूर्व भारताचं हबेहब चित्र, विसाव्या शतकाच्या प्रारंभीचं भारतीय सामाजिक, राजनैतिक, आर्थिक, सांस्कृतिक चित्र ज्यांना समजून घ्यायचंय, त्यांनी ‘गोदान'ची पारायण करायलाच हवीत. गोदान'पूर्व हिंदी कादंबरी कल्पना, उपदेश, इतिहास, अवतारवादात अडकलेली होती. तिला वास्तवाचं भान ‘गोदान'नं दिलं. आदर्शाकडे समाज नेण्याचा गांधींचा स्वप्नाळू ध्येयवाद प्रेमचंदांनी जोपासला. भारतीय शेतकरी अंधश्रद्धा, अन्याय, अत्याचार, शोषण, परंपरेतून मुक्त करण्याचा ध्यास ‘गोदान'च्या पानोपानी आढळतो. प्रेमचंदांनी ‘गोदान'च्या माध्यमातून संस्कृतप्रचुर हिंदीस उर्दूप्रचुर बनवलं. पूर्व हिंदी कादंबरीची भाषा अलंकारांच्या चक्रव्यूहात अडकली होती. तिला सहजतेचा साज गोदान'मुळे उमजलं. वाक्प्रचारयुक्त भाषा जीवनस्पर्शी होते. त्यामुळे भाषेत वर्षाचं संचित साठतं याचा प्रत्यय प्रेमचंदांनी 'गोदान'च्या भाषेमुळे आणून दिला. एका नव्या संपृक्त शैलीचा शिलान्यास ‘गोदान'ने केला. या कादंबरीचं शीर्षक तर अधिक कलात्मक नि सार्थ म्हणावं लागेल. विसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या भारतीय अशिक्षित, अंधश्रद्ध, धर्मपरायण, पारंपरिक शेतक-याचं सर्वांत मोठं स्वप्न असायचं, ब्राह्मणाला गायीचं दान (गोदान) देऊन पुण्यप्राप्ती करायची. मोक्षाची शाश्वती मिळवायची. पुनर्जन्मी पुन्हा अधिक संपन्न अशा मनुष्यजीवन लाभाची लालसा यात भरलेली असायची. इतक्या छोट्या शीर्षकात प्रेमचंदांनी भरलेला व्यापक आशय हिंदीतच सांगायचा झाला तर गागर में सागर'च.
'गोदान' केवळ कलात्मकदृष्ट्या श्रेष्ठ रचना नव्हे. विचारगर्भ कादंबरी म्हणूनही तिचं सामाजिक नि साहित्यिक मूल्य आहे. या कादंबरीद्वारे प्रेमचंदांनी कर्जमुक्त शेतक-याचं स्वप्न पुढे ठेवलं नि रामराज्याचं समर्थन केलं. स्वातंत्र्याचं सुराज्य करायचं तर उद्याचा भारत सावकारी पाशातून मुक्त व्हायला हवा. जमीनदारांच्या कचाट्यातून मुक्त झाल्याशिवाय शेतकरी आणि त्याचे कुटुंबिय सुखाचे दोन घास खाऊ शकणार नाही याची जाण ‘गोदान'ने निर्माण केली. शिक्षण प्रसाराशिवाय खेड्यातील जनता देवा-ब्राह्मणांच्या दुष्टचक्रातून मुक्त होऊ शकणार नाही, हे प्रेमचंदांनी 'गोदान'च्या माध्यमातून प्रभावीपणे बिंबवलं. जीवनाचं उघडं-नागडं वास्तव रंगवणं, हे प्रेमचंदांना मान्य नव्हतं. जोवर आपण नवदिशा दिग्दर्शन करणार नाही, तोवर केवळ नग्न यथार्थ काय कामाचा, अशी ते पृच्छा करत. गोदान'च्या माध्यमातून त्यांनी नवभारताचे भविष्य रंगवले, सुचवले. भांडवलदारी व्यवस्थेचा निःपातच समाजातील तळागाळातील जनतेच्या सामाजिक न्यायाचा मार्ग असल्याचं भान ‘गोदान' कादंबरी प्रभावीपणे देते. साम्यवाद नि गांधीवादाचा समन्वय करणारा प्रगतीवाद, प्रगतीमार्ग ‘गोदान'च्या माध्यमातून प्रेमचंदांनी स्पष्ट केला. ‘इन्कलाब' सर्व प्रश्नांचे उत्तर असू शकत नाही, हे प्रेमचंदांनी पूर्णपणे ओळखलं होतं. म्हणून त्यांनी ‘गोदान'मधून समन्वयवादी वृत्तीचं समर्थन केलं. मध्यमवर्गीयांना त्यांनी नवबदलाचे, परिवर्तनाचे अग्रणी चित्रित करून ‘गोदान'मधून समाजबदल गतिशील केला. मानवतेचे उपासक असलेले प्रेमचंद गोदानद्वारे भूतदयाही रुजवताना दिसतात. प्रेमचंद भाववादी लेखक होत. निव्वळ बुद्धिवादाने वाद होतात. संवाद व्हायचा तर बुद्धिवादास भाववादाची जोड मिळायला हवी, हे 'गोदान' कादंबरी मार्मिकपणे समजावते. अहिंसा, शांती, समन्वय, हृदयपरिवर्तनासारखी महात्मा गांधींची विचार चतुःसूत्री हे 'गोदान'चं पाथेय होय. प्रेमचंदांनी गोदान ही कादंबरी हिंदीत कलात्मक, सामाजिक, वैचारिक दिशांतर सुचविणारी कादंबरी म्हणून शीर्षस्थ मानावी लागते. स्त्रीजीवनाबद्दल आस्था, दलितांबद्दल कणव, दःखितांबद्दल सहानुभूती जागवणारी 'गोदान' कादंबरी समाजाच्या वंचित नि उपेक्षितांचं अधिराज्य, स्वराज्य निर्माण करू इच्छिते म्हणूनही पथदर्शक,
▄ ▄