श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२ ऑक्टोबर

२ ऑक्टोबर

सगुणभक्ति


सर्वांभूती भगवंत आहे याची खात्री पटायच्या आधी, तो माझ्यात आहे हे पटले पाहिजे. सोन्याचा दागिना 'मला सोने भेटवा' असे म्हणत नाही; त्याचप्रमाणे, मला भगवंत बाहेरून कुठून भेटायचा आहे असे नाही समजू. तो आपल्याजवळच आहे. मनुष्य बोलतो तसा जर वागला तर त्याला त्याची प्रचीती आल्याशिवाय राहणार नाही. मी 'कुणाचा' आहे हे जसे जाणले तर मी 'कोण' हे कळायला वेळ लागायला नको. सत्समागम केला म्हणजे मी कोण आहे हे कळते. साक्षीरूपाने नटलेला जो 'मी' त्याला पाहायला जंगलात जायला नको. 'माझेपण' सोडावे म्हणजे 'मी' चा बोध होतो. भगवंत चोहोकडे भरलेला आहे असे आपण नुसते तोंडाने म्हणतो, पण त्याप्रमाणे वागत नाही हे आपले मूळ चुकते. भगवंत माझ्यात आहे तसाच तो दुसर्‍यातही आहे, हे आपण सोयीस्करपणे विसरून जातो. जसा खोलीतला दिवा प्रकाशाने सर्व खोली व्यापून टाकतो, तसे हे सर्व जग भगवंताने व्यापून टाकले आहे. मी कर्ता नसून राम कर्ता आहे हे म्हटले म्हणजे त्यात सर्व आले. पोशाख निरनिराळे केले तरी मनुष्य हा एकच असतो. संन्यास हा मनाचा असतो, पोशाखाचा नसतो. मनावर कशाचाच परिणाम होऊ न देणे हाच संन्यास.

सगुणभक्ती करावी, भक्तीने नाम घ्यावे, नामात भगवंत आहे असे जाणावे, आणि भगवंताचे होऊन राहावे, हाच परमार्थाचा सुलभ मार्ग आहे. साधुसंतांनी अतिशय परिश्रम घेऊन आणि स्वतः अनुभव घेऊन हा मार्ग आपल्याला दाखवून दिला आहे. आपले ज्याच्याशी साम्य आहे त्याच्याशी आपली मैत्री जमते. आपण देही असल्यामुळे आज आपला देवही आपल्यासारखाच, पण त्याच्याही पलीकडे असणारा असा पाहिजे. अशा प्रकारचा देव म्हणजे सगुण मूर्ती होय. लहान मुलगा एखाद्या वस्तूसाठी हट्ट करू लागला की, आपण त्याच्यापुढे त्या वस्तूसारख्या इतर, पण बाधक नसणार्‍या वस्तू टाकतो. त्याचप्रमाणे, सगुणपासनेचा परिणाम होतो. दृश्य वस्तूंवर आपले प्रेम आहे; जे दिसते तेच सुखाचे आहे असे आपल्याला आज वाटते; म्हणून आपणच आपल्या कल्पनेने भगवंताला सगुण बनविला आणि त्याची उपासना केली. आपली बुद्धी निश्चयात्मक होण्यात या उपासनेचा शेवट होईल. आग्रह आणि प्रेम फक्त एका भगवंताच्या ध्येयाबद्दल असावे. इतर ध्येये असावीत, पण त्यांचा आग्रह नसावा. प्रपंचामध्ये व्यवहार होत असताना भगवंतापासून जेव्हा वृत्ती हलत नाही, तेव्हा तिला 'सहजसमाधी' असे म्हणतात. सहजपणाने जगणे, म्हणजे सहजपणातून वेगळे न राहणे, हीच सहजसमाधी होय. 'राम सर्व करतो' आणि 'राम माझा दाता आहे' ही भावना ज्याची स्थिर झाली, त्याच्यावर भगवंताची कृपा झाली असे समजावे. त्याच्या जन्माचे सार्थक झाले हे सांगणे नकोच.


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.