सार्थ लघुवाक्यवृत्ती/ओव्या १ ते १००

<poem> जय जय स्वामी सद्गुरू । शंकराचार्य करुणाकरू । मोक्षध्वजा परपारू । पाववीं निज दासा ॥१॥ मी अज्ञानसागरीं पडिलों । मायाडोहींच सांपडलों । ममता मगरीनें गिळिलों । येथून कष्टें न सुटें ॥२॥ साधनेंही उदंड केलीं । कर्मंधर्मादि जीं आपुलीं । परि तीं असतीं साह्य जालीं । अविद्येसी ॥३॥ जपतापादि पुरश्चरणें । अथवा व्रते नाना दानें । तीर्थयात्रा संतर्पणें । उद्यापनें शांती ॥४॥ इतुकेंही आदरें करितां । परी उपशम नसेचि चित्ता । मात्र अधिकच वाढे अहंता । म्यां केलें म्हणोनी ॥५॥ मी अमुक एक रविदत्त । माता पिता जें नाम ठेवित । हाचि देह मी असें निभा्रंत । सर्वदा दृढ ॥६॥ परि मी पूर्वीं असें कवण । जन्मलों आतां आलों कोठोन । मरतां कोणे स्थळा जाईन । हें नेणें मी सहसा ॥७॥ परी आपण कोण हे जाणावें । ऐसा हेतु उद्भवला जीवें । येर साधन जितुकें आघवें । तृणतुल्य जालें ॥८॥ यास्तव देवी देव धुंडिले । अति निग्रहें प्रसन्न झाले । तंव ते वर माग म्हणों लागले । देहबुद्धिच बळावया ॥९॥ मग मी सर्वांसी उपेक्षून । गेलों सदाशिवासी शरण । तिहीं स्वप्नामाजीं येऊन । सांगितले मज ॥१०॥ कीं उठीं उठीं गा रविदत्ता । तूं भवभयाची न करी चिंता । सद्गुरूसी शरण जाईं आतां । ममाज्ञेवरूनी ॥११॥ प्रस्तुत मीच जगदोद्धारा । प्रगटलों असें निर्धारा । ऐसिया अज्ञान कली माझारा । श्रीशंकर नामें ॥१२॥ तस्मात् तया शंकरस्वामीसी । शरण जाऊनि या समयासी । उपदेश धरूनियां मानसीं । अज्ञान जिंकीं ॥१३॥ ऐशिया स्वप्नांतीं जागृती । पावोनी विस्मयापन्न जालों चित्तीं । मग धांवोनी आलों सत्वरगती । शरण श्रीचरणा ॥१४॥ आतां सद्गुरूराया मज । अंगीकारावें महाराज । धन्य धन्य हा सुदिन आज । देखिले चरण ॥१५॥ हा देह आणि मन । गुरूचरणीं केलें अर्पण । यांत किमपि जरी घडे प्रतरण । तरी चूर्ण होवो मस्तक ॥१६॥ जरी वाणी हे आणिका स्तवी । तरी ते तत्क्षणीं तुटावी । चित्तें जरी अन्य कांहीं आठवीं । तरी घडावी ब्रह्महत्या या रीतींकरुनी निर्धार । साष्टांग घालित नमस्कार । तारीं तारीं हा निज किंकर । स्वकीय ब्रीद रक्षुनी ॥१८॥ ऐसा अधिकारी पाहुनी । विचारें परीक्षिती अंतःकरणीं । हा चतुष्टय संपन्नत्व पावोनी । शरण आला असे ॥१९॥ सत्य मिथ्या यासि कळलें । म्हणोनि असत्यासी मन विटलें । हेंचि नित्यानित्य विचारिलें । सत्य कळावें इच्छितां ॥२०॥ ब्रह्म जाणावें जें इच्छा होणें । हेंचि मुमुक्षुत्वाचीं लक्षणें । आणि इह पर भोगासि उबगणें । हेचि विरक्ति ॥२१॥ अन्य मनाचे सांडोनि तर्क । आत्मा वोळखून धरावा एक । हाचि शम निश्चयात्मक । इंद्रियनिग्रह तो दम ॥२२॥ सर्वांपासून तो परतला । हाचि असे कीं उपरम झाला । न भी कदां सुखदुःखाला । हेचि तितिक्षा ॥२३॥ सद्गुरुवचनापरतें कांही । यासि दुजेंच उरलें नाहीं । हेहि श्रद्धा निःसंदेही । समाधान एकाग्रता ॥२४॥ तस्मात् साधन चतुष्टयता । अर्थात् आली याचिया हातां । ऐशिया अधिकारिया उपदेशिता । दोष हा कवण प्रज्ञा जरी मंद असे । तरी उपदेशांवें सदभ्यासें । वृत्ति खलितां दृढ विश्र्वासें । अपरोक्षता बाणे ॥२६॥ ऐसा हेत ठेऊनि अंतरीं । उठविती रविदत्ता करीं । नाभी नाभी बोलती उत्तरीं । मनोरथसिद्धि होय ॥२७॥ परी आम्ही उपदेशूं आतां । तें दृढ विश्र्वासें धरी चित्ता । आणि अभ्यासें हें वृत्ति खलितां । अपरोक्ष पावसी ॥२८॥ अपरोक्ष म्हणजे आपण कोण । तें निजरूप आंगेचि होणें । परोक्ष म्हणजे आपण । ओळखावें आपणा ॥२९॥ गुरुवचनीं विश्र्वास । तरी पाविजे परोक्ष ज्ञानास । तस्मात् श्रद्धा असावी चित्तास । तरी आत्मत्व ओळखसी ॥३०॥ मात्र अपरोक्ष ज्ञान व्हावया । विचार पाहिजे शिष्यराया ।तोही अभ्यासें पावेल उदया । निःसंशय आपणाची प्रस्तुत तुज परोक्षज्ञान । उपदेशिजे घे ओळखून । तेंचि विश्र्वासें दृढ करून अभ्यास करी ॥३१॥ तूं हेतु धरोनि जो आलासी । कीं जाणावें आपआपणासी । तो तूं कोण या समयासीं । बोलिजे अवधारी ॥३३॥ चहूं वेदांचीं वाक्यें चार । याचा अर्थ तो एक साचार । कीं जीवनब्रह्मऐक्य निर्धार । हा विषय वेदांतींचा ॥३४॥ त्यांत उपदेश वाक्य तत्त्वमसी । तें विचारून घ्यावें गुरूपाशीं । मग अहंब्रह्मास्मि या वाक्यासी । वृत्तीनें दृढ धरावें ॥३५॥ तरी अवधारीं एकाग्र भावें । तें तूं ब्रह्म अससी स्वभावें । अहंकारादि देहांत आघवें । आपण नव्हें सत्य सत्य ॥३६॥ मी ब्रह्म आत्मा स्वतःसिद्ध । एकरूप असंग अभेद । ओळखून घेईं प्रभाद । देहबुद्धीचा सांडुनी ॥३७॥ हेचि अहंब्रह्मास्मि निश्चिती । वाक्यार्थाची जे अनुभूती । ऐशी वृत्ति ते वाक्यवृत्ति । हा वृत्तीसी अभ्यास ॥३८॥ कायिक वाचिक मानसिक । शास्त्रीय अथवा जी लौकिक । कर्में घडतांहि अनेक । परी अभ्सास सोडूं नये ॥३९॥ अभ्यास म्हणजे मी ब्रह्म आपण । या अर्थाचें अनुसंधान । कदापि न पडावें विस्मरण । अहर्निशीं सदा ॥४०॥ तूं म्हणसी आत्मा ब्रह्मपूर्ण । याचें किमात्मक असें लक्षण । तें यथार्थं ओळखिल्यावांचून । अनुसंधान केवीं घडे ॥४१॥ तरी अवधारावें निश्चित । अहंकारादि जितुकें देहांत । यांत आत्माही झाला मिश्रित । अज्ञान वसे कडोनी ॥४२॥ यासी विवेचन पाहिजे झालें । देहादि मिथ्यात्व जरी त्यागिलें । तरी आत्मत्व जाय निवडिलें । त्रिविधा प्रतीतीनें ॥४३॥ तेंचि विवेचन म्हणसी कैसें । बोलिजेत असे अपैसें । तरी सावधान असावें मानसें । दुश्चित्त न होतां ॥४४॥ जैसा माळेंतून तंतु निवडावा । कीं मणीच तंतूवरील ओढावा । तैसा देहादिकाहून ओळखावा । आत्मा भिन्न ॥४५॥ अथवा देहादिक हे ओळखुनी । भिन्न करावे आत्मयाहूनी । हें सर्व कळेल निरूपणीं । अती सावधान जरी होसी ऐसें बोलतां आचार्य माउली । रविदत्तें वृत्ति सावध केली । शब्दासरशी झेंप घाली । मनें अर्थावरी ॥४७॥ रविदत्त एक उपलक्षण । परी जे जे असती अधिकारी पूर्ण । तेही असावें सावधान । आचार्य गुरुवचनीं ॥४८॥ चातकासाठीं वर्षे घन । परी सर्वांसीच होय जीवन । तेवीं रविदत्ताचे निमित्तें कडोन । सर्वही अवधारा ॥४९॥ परी भूमीचा सांडून चारा । जो घन लक्षी तो चातक खरा । तेवीं देहादि विषय हे अव्हेरा ॥५०॥ तेव्हां वचनरहस्य जोडे तस्मात् जयासी खरें सुटावे । वाटे तेणें विषय हे टाकावे । तरीच कार्य हें साधावें । श्रवण मननें ॥५१॥ आतां सर्वों सावधान । आचार्यं ओळले कृपाघन । वाक्यवृत्तीचें निरूपण । रविदत्ता करिती ॥५२॥ प्रथम घडावें विवेचन । यास्तव देहत्रयाचें कथन । कीजे श्र्लोकार्थीं निरूपण । आदरें ऐकावें ॥५३॥

स्थूलोमांसमयोदेहःसूक्ष्मःस्याद्वासनामय ।ज्ञानकर्मेंद्रियैः साधर्ंधीः प्राणौतच्छरीरगौ ॥१॥

स्थूलदेह मांसमयाचा । सूक्ष्म तोचि वासनात्मक साचा । तेथें प्रकार असे सत्रा तत्त्वांचा । इंद्रिये प्राणें मन बुद्धी ॥५४॥ स्थूलदेह मांसमय कैसा । विस्तार बोलिजे अल्पसा । पंचीकृत भूतांचा सहसा । जो का उभारला ॥५५॥ भूतांपासोनियां जालें । जें का अपंचीकृत पाहिलें । तेंचि एकमेकांसी वांटिलें । हेंचि पंचीकृत ॥५६॥ अंतःकरण व्यान श्रवण । वाचा शब्द हें आकाश पूर्ण । ययाचे भाग केले दोन । ईक्षणमात्रें ईशें ॥५७॥ मुख्य अंतःकरण अर्धभाग । तो आकाशींच ठेवून मग । उरल्या अर्धभागाचे विभाग । चतुर्धा केले ॥५८॥ व्यान श्रोत्र वाचा शब्द । हे चहूंसी दिधले प्रसिद्ध । व्यान वायुसी दिधला स्तब्ध । श्रोत्र तेजास ॥५९॥ वाचा दिधली आपासी । शब्द दिधला पृथ्वीसी । एवं आकाश विभागिलें पांचांसीं । आतां वायु ऐकें ॥६०॥ मन समान त्वचा पाणी । स्पर्श विषय पांचवा मिळुनी । वायूच बोलिजे चंचलपणीं । हाही द्विधा केला ॥६१॥ एक भाग अर्धा तो समान । हा वायुंत मौनेंचि ठेवून । उरला अर्ध भाग तो विभागून । चतुर्धा केला ॥६२॥ मन दिधलें आकाशासी । त्वचा दिधली तेजासी । पाणी दिधला आपासी । पृथ्वीसी स्पर्श ॥६३॥ बुद्धि उदान चक्षु पाद । रूप विषय मिळून पंचविध । तेजच बोलिजे तें विषद । हेंही द्विभाग केलें ॥६४॥ एक भागाचा चक्षु तो तेजीं । तेजींचा ठेविला सहजीं ।अन्य भूतांलागीं विभाजी । उरला अर्ध ॥६५॥ बुद्धि आकाशासी देत । उदान वायूसी समर्पित । पाद आपासी अर्पित । पृथ्वीसी रूप ॥६६॥ चित्त प्राण जिव्हा उपस्थ रस । हें पंचविध आप सुरस । हें द्विविध करूनि ईश । वांटिता हे ॥६७॥ एक भाग उपस्थ आपाचें । आपामध्येंच ठेविलें साचें । येर चार उरल्या भागाचें । वांटी येर चहूंसी ॥६८॥ चित्त आकाशा दिधलें । प्राणासी वायूंत ठेविलें । तेजासी जिव्हेसी समर्पिलें । पृथ्वीसी रस ॥६९॥ अहंकार अपान घ्राण । गुद गंध हे पांच मिळोन । पृथ्वीचीं असतीं लक्षणें । हेंही द्विविधा केलें ॥७०॥ गंध भाग जो कां असे एक । तो पृथ्वींत ठेवी निश्चयात्मक । उरला अर्धभाग जो आणिक । येर चहूंसी वांटी ॥७१॥ आकाशा दिधला अहंकार । अपान वायूंत ठेवी निर्धार । घ्राण तेजा दिधलें साचार । आपासी गुद ॥७२॥ एवं एक एक भूत द्विधा केलें । ज्याचे त्यांत एकेक भाग ठेविले । येर एकाचे चार चार केले । ते ते दिधले येरां ॥७३॥ भूतां ऐसा भूतकर्दम हा करोनी । स्थूळ देहाची केली उभवणी । तेच कैसी अल्पवचनी । बोलिजेत आहे ॥७४॥ शब्द स्पर्श रूप रस गंध । हे पांचाचे अंश पंचविध । पृथ्वींत मिळतां पृथ्वी प्रसिद्ध । स्पष्ट जालीं असे ॥७५॥ हे पांच पृथ्वीसी जेव्हां मिळाले । तेव्हां जडत्वें हे पांच प्रगटले । अस्थि मांस त्वचा नाडी रोम जाले । स्थूळाचें साहित्य वाचा पाणी पाद उपस्थ गुद । हे आपीं मिळतां पांचाचे प्रसिद्ध । आप स्पष्ट होऊन सिद्ध । पांच जाले द्रवत्वें ॥७७॥ शुक्र शोणित लाळ मूत्र स्वेद । हे आपाचे गुण पंचविध । प्रगटले असती प्रसिद्ध । पातळपणीं ॥७८॥ श्रोत्र त्वचा चक्षु जिव्हा घ्राण । हे पांचापासून पांच होऊन । तेजामाजीं मिळतां भासकपण । पांच प्रकार जाले ॥७९॥ क्षुधा तृषा आळस निद्रा मैथुन । हे तेजाचे पांच अंश पूर्ण । स्थूळीं उमटलें येऊन । पंचीकरण होतां ॥८०॥ व्यान समानोदान प्राणापान । हे पांचांपासून पांच होऊन । ते वायूंत राहिले असतां येऊन । तेणें वायु स्पष्ट जाला ॥८१॥ तेणें पांच प्रकार चळण वळण । प्रसरण आकुंचन निरोधन । हे उत्पन्न होती वायूपासून । स्थूळ चळावया ॥८२॥ अंतःकरण मन बुद्धि चित्त । अहंकार हे आकाशीं रहात । परी हे पांचांपासून पांच होत । अपंचीकृत पहिलें ॥८३॥ हे पांच आकाशी मिळतां क्षणीं । या पांचांची जाली उभवणी । काम क्रोध लोभ मोहपणीं । पांचवें भय ॥८४॥ असो ऐसें पंचीकृत होतां । स्थूलाची उभवणी जाली समस्तां । हेंचि माया देवीनें व्यवस्था । ईशसत्ते केली ॥८५॥ अस्थिमांसादि पांच मिळोनी । शुक्लितादि मेळविलें पाणी । कालवोनि सांदोसांदीं बांधोनी । उभविला गर्भीं ॥८६॥ प्राण संचारे चळण वळण । होतां पूर्ण होऊन पावे जनन । पुढें क्षृधातृषादिकें येणें । पोषण होय ॥८७॥ कामक्रोधादि जेव्हां उमटले । तेव्हां देहाचें रक्षण जालें । येणेंपरी स्थूल उभविलें । पंचीकृत भूतांचें ॥८८॥ भूतांपासोनि जालें म्हणोनी । भौतिकत्व नाम या लागोनी । परी निर्मित जनक जननी । पासाव पुढें ॥८९॥ रक्त रेत मिळतां जठरीं । अवयवें हीं होतीं सारीं । उभयांची सप्तविध जाली परी । सप्तकोशीक देहा ॥९०॥ अस्थि नाडी मज्जा नख । हे पित्याचे साडेतीन सुरेख । मांस त्वचा रक्त केश अशेख । मातेच्या रक्ताचे ॥९१॥ या रीतीं हा मांसमय । अन्नापासोनियां होय । अन्नेंकडून वांचे उपाय । दुजा असेना ॥९२॥ आणि लय जो होय याचा । तो अन्नरूप पृथ्वींत साचा । म्हणोनि कोश बोलिजे वाचा । अन्नमय शब्दें ॥९३॥ असो स्थूलदेह जो ऐसा । आत्मा हाचि होईल कैसा । पुढें होईल याचिया निरासा । प्रस्तुत जड सांगितला ॥९४॥ जया वासनेनें स्थूल निर्मिला । कीटकें कवडा जेवीं केला । तया वासनारूप वृद्धीला । लिंगदेह बोलिजे ॥९५॥ या लिंगदेहीं कोश तीन । प्राण मन आणि विज्ञान । या सत्रा तत्त्वांचें निरूपण । पुढें कीजे ॥९६॥ प्रस्तुत वासनेचें रूप । प्रांजळ कीजताहे अल्प । श्रोतीं सावधान साक्षेप । असिलें पाहिजे ॥९७॥ आकाशीं जेवीं वायु चळे । तेवीं ब्रह्मीं स्फूर्ति चंचळे । समाष्टितादात्म्यें तयेशीं निवळे । माया नाम ॥९८॥ तेचि व्यष्टींत विभागली । एका पिंडीं तादात्म्य पावली । अभिमान माथां घेऊन बैसली । तिहीं अवस्थांचा ॥९९॥ दों अवस्थेंत कर्में घडतीं । ते म्यां केलीं असतीं निश्चितीं । तेचि भोगीन पुढता पुढती । तेचि वासना ॥१००॥


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.