सार्थ लघुवाक्यवृत्ती/ओव्या १०१ ते २००

<poem> सुषुप्तीमाजीही नेणिवेचा । अभिमान घेतला असे साचा । अभाव नव्हेचि कर्तृत्वाचा । लीनत्वें जरी ॥१॥ उस्थान होतांच मी देह स्फुरे । म्यां अमुक केलें करीन सारें । ऐसी अभिमानें जे हुंबरें । तेचि वासना ॥२॥ सुषुप्तींत मात्र गुप्त होती । नेणीव गोचर राहे वृत्ति । तेथील आठव घेऊन येती । स्फूर्ति उत्थान कालीं ॥३॥ तेथें अभाव जरी असतां । तरी उत्थानीं प्राप्त न होतां ।तस्मात् वासनारूपें अहंता । इचा सुषुप्तींत अभाव नाहीं ॥४॥ हे असो सुषुप्तीची कथा । परी मृत्युकाळीं हानी नोहे सर्वथा । सर्वही घेऊन बैसली माथां । अनंत जन्मींचें केले

जेवीं घोकिलें जन्मवरी । न म्हणतां न विसरे तिळभरी । तेवीं वासनेमाजीं सामग्री । अनंत जन्मींची असे ॥६॥

स्वरूपाहून वेगळी पडली । तधींपासून जीं जी कर्में केलीं । तीं तीं माथां घेऊन बसली । तया नांव संचित ॥७॥ जोंवरी ज्ञान नोहे प्राप्त । तों काळ हें न जळे संचित । भोगणेंचि लागे अकस्मात । जें विभागा जे क्षणीं ॥८॥ एका देहीं शत योनींचें । कर्म केलें पापपुण्याचें । तितुकें एकदांचि भोगा नवचे । एकेक भोगावें लागे ॥९॥ शतांतील नव्याण्णव रहाती एक योनीसी एक घेऊन येती । तेथेंही शत योनींची कर्में होतीं| त्यांतीलही एक भोगासी ॥१०॥ ये ऐसें अनंत जन्मींचें सांचलें । भोगा येऊन जें जें उरलें । तितुकें वासनेमाजीं गुप्त राहिलें । तया नांव संचित ॥११॥ देहा येऊन जें जें करी ं तें तें क्रियमाण निर्धारी । प्रस्तुत भोगुनियां सारी । तें प्रारब्ध देहारंभक ॥१२॥ एवं प्रारब्ध संचित क्रियमाण । कर्तेपणें बैसलीसे घेऊन । हेचि वासना बैसली बळाऊन । अनंत कल्पें जरी ॥१३॥ आतां कल्पांतींही अभाव नसतां । या मृत्यु सुप्तींत कायसी वार्ता । एवं ऐसी वासनारूप अहंता । इचेंच नांव ॥१४॥ सूक्ष्म देह ऐसिया लिंगदेहावांचून । स्थूळदेहासी कैचें वर्तन । म्हणोनि वासनायोगें जन्ममरण । प्राणियां होय ॥११५॥ पूर्ववासनेने देह केला । तो प्रारब्ध सरतांचि पुन्हां मेला । पुढें दुसरा देह अवलंबिला । मृत्युकाळीं ॥११६॥ अळिका जेवीं पुढील पाय । धरोनि मागील सोडिती होय । तेवीं पुढील देह धरोनि जाय । हा देह सोडुनी ॥११७॥ ऐसे अनंत जन्म नानायोनी । किती जाले कोण वाखाणी । पुढें होणार तेंही लेखनीं । नये कवणाच्या ॥११८॥ जेधवां आपुले अज्ञान फिटेल । स्वस्वरूप ज्ञान प्राप्त होईल । तेधवांचि हे वासना निमेल । येरवीं न नासे ॥११९॥ कल्पवरी अग्नींत जळेना । पाणिया माजीं विघुरेना । बहुत कासयासी वल्गना । सहस्त्रधा योगेंही न निमे ॥१२०॥ असो ऐसी वासना दृढ । हाचि सूक्ष्म देह वाड । वर्तवित असे स्थूळ जाड । जो जो प्राप्त ज्या क्षणीं ॥२१॥ ऐसिया लिंगदेहाचे प्रकार । सत्रा भिन्न भिन्न साचार । तेचि ऐकावे सविस्तर । बोलिजे असे ॥२२॥ एका वृत्तीचे प्रकार दोन । एक बुद्धि दुजें मन । संकल्प जो होणें । हें मनाचें रूप ॥२३॥ पुढे निश्चय करी ते बुद्धि । ऐसे दोन प्रकार जाले आधीं । यांत जाणतेपणा जो त्रिशुद्धी । आला असे ॥२४॥ याचि नांवे ज्ञानशक्ति । भोक्ता सत्त्वगुणात्मक वृत्ती । याचेही प्रकार पांच होती । व्यापारभेदें ॥२५॥ श्रोत्रेंद्रियासी येऊनी । ऐकूं लागे शब्दालागुनी । तयासी श्रोत्र बोलिजे वचनीं । द्वार निर्गमाचें ॥२६॥ त्वचाद्वारें स्पर्श घेणें । तयासी त्वगिंद्रिय म्हणणें । चक्षुद्वारां जया पहाणें । तोचि चक्षु ॥२७॥ जिव्हेंद्रियें रस घेणें । सुगंध निवडिजे घ्राणें । एवं पांचही बहिःकरणें । मन बुद्धीचीं ॥२८॥ आंतील इंद्रिय अंतःकरण । ज्ञानेंद्रिया नाम बहिःकरण । एवं सातही जालीं लक्षणें । वृत्तिरूप ज्ञानाचीं ॥२९॥ स्फुर्तींत जाणीव जे होती । तिचे प्रकार बोलिले असती । आतां चळणरूप जे जे वावरती । तेचि प्राण ॥१३०॥ जाणीव मन बुद्धीकडे गेली । नुसती जडता जे उरली । ते नाडीद्वारा फिरों लागली । तोचि प्राण ॥३१॥ व्यापारभेदें तोचि प्राण । पंचधा जाल संपूर्ण । व्यान समान उदान प्राण । अपान पांचवा ॥३२॥ अधो वाहे तो अपान । ऊर्ध्व वाहे तोचि प्राण । उभयांची ग्रंथी तो समान । नाभिस्थानीं ॥३३॥ कंठी उदान रहातसे । व्यान सर्वांगीं विलसे । या पंचप्राणांच्या सहवासें । कर्मेंद्रियां चळण ॥३४॥ वाचा पाणी आणि पाद । चवथें उपस्थ पांचवें गुद । एवं हीं कर्मेंद्रियें प्रसिद्ध । क्रियारूप प्राणा ऐसीं ॥३५॥ पाणी पाद उपस्थ गुद । ही चार तों कर्मेंद्रिय प्रसिद्ध । परी वाणीमाजी द्विविध । ज्ञानक्रिया असे ॥३६॥ वैखरी जें शुद्ध बोलणें । हें तों क्रियारूप होणें । मध्यमेमाजीं असती लक्षणें । ज्ञान क्रिया दोन्ही ॥३७॥ परा आणि दुजी पश्यंती । ह्या दोन्ही ज्ञानरूप असती । तेथें क्रियेची समाप्ती । असे सहसा ॥३८॥ एवं मन बुद्धि ज्ञानेंद्रिय । पंचप्राण कर्मेंद्रिय । हा सत्रा तत्त्वांचा समुदाय । लिंगदेह बोलिजे ॥३९॥ इतुकीं सत्रा तत्त्वें बोलिलीं । ही सर्व वासनेचीं विभागलीं । परी ही भूतांपासून जालीं । यास्तव भौतिक ॥१४०॥ भूतांचे जे गुण तीन । तेच द्रव्य शक्ति क्रिया ज्ञान । द्रव्य शक्ति जो तमोगुण । तींच विषय भूतें ॥४१॥ आतां क्रिया ज्ञान दोन्ही शक्ती । भूतांपासून केवीं होती । हेच लिंगदेहाची उत्पत्ती । अपंचीकृत बोलिजे ॥४२॥ गुण भूतें कालवलीं । जे अष्टधा बोलिजे पाहिलीं । तेचि सत्रा तत्त्वें प्रसवली । ईक्षणें ईशाचे ॥४३॥ आकाशाचा सत्त्व गुण । श्रोत्रेंद्रिय जालें निर्माण । त्वगिंद्रिय होय उत्पन्न । वायु सत्त्वांशाचें ॥४४॥ चक्षु तेज सत्त्वांशाचें । जिव्हेंद्रिय तें आप सत्त्वाचें । घ्राण तें पृथ्वी सत्त्वांशाचें । ज्ञानेंद्रियें पांच ऐसीं ॥४५॥ पांचांपासून पांच वेगळाले । जाले तें असाधारण कार्य बोलिलें । आतां साधारण कार्य उभवलें । भूत सत्त्वांशाचें ॥४६॥ पांचांचे येकदांचि काढिलें । सत्त्वांशें जें कां द्रव्य निघालें । तेंचि अंतःकरण विभागलें । दों प्रकारें ॥४७॥ मन बुद्धि प्रकार दोन । व्यापारभेदें अभिधान । एवं ज्ञानशक्तीचें सप्तधा लक्षण । भूत सत्त्वांशाचें ॥४८॥ आतां भूतरजांशाची उत्पत्ती । जाली असे ते बोलिजेती । तेही साधारण असाधारण असती । शक्ति क्रियात्मक ॥४९॥ आकाश रजांशाची वाचा । पाणी वायु रजांशाचा । पाद तो तेज रजाचा । उपस्थ आप रजाचें ॥१५०॥ पृथ्वी रजाचें गुद । एवं पंचकर्मेंद्रियें प्रसिद्ध । हें असाधारण बोलिजे सिद्ध । वेगळालें म्हणोनी ॥५१॥ आतां साधारण रजोभूतांचा । येकदांच काढिला सर्वांचा । तोचि प्राण पंचधा साचा । व्यापारभेदें जाला ॥५२॥ हृदयीं वाहे तो प्राण । तेणें सुख होय जीवालागून । विसर्ग करी तो अपान । अधोगामी ॥५३॥ समान तो संधी हालवी । उदान तो क्षुत्पान करवी । सर्व नाडीद्वारा तृप्ति द्यावी । वावरून ज्यानें ॥५४॥ एवं पंचप्राण कर्मेंद्रिय । हा दशधा भूतरजाचा समुदाय । पहिले सात मिळून अन्वय । सत्रा तत्त्वें ॥५५॥ ऐसें हे भूतांपासून जालें । अपंचीकृत भौतिक पहिलें । पुढें पंचीकृत करून जें निर्मिलें । स्थूळ देहासी ॥५६॥ तया स्थूळदेहा माझारीं । सत्रा येऊन राहिलीं सारीं । मन प्राण हे राहती अंतरीं । गोलकीं दशेंद्रियें ॥५७॥ इतुकीं मिळून एक वासना । विभागली ते बोलिली वचना । व्यापार याचे ते वर्णना । पुढें करणें ॥५८॥ असो वासना तिकडे सत्रा जाती । झोंपेंत तरी गुप्त राहती । जडत्वें प्राण मात्र वावरती । क्रियेवांचून ॥५९॥ जेव्हां प्राण प्रयाणसमय । तेव्हां वासना जो जो धरी काय । ते समयीं हा सर्व समुदाय । जाय तिकडे तिकडे ॥१६०॥ देहांत प्राण जेव्हां प्रगटती । मन बुद्धि तेथें उमटती । आणि इंद्रियें हीं वावरतीं । स्वस्वव्यापारीं ॥६१॥ म्हणोनि ज्ञान कर्मेंद्रियांसहित । प्राण मन बुद्धि विख्यात । हे लिंगदेहग सर्व असत । वासना तिकडे सत्रा ॥६२॥ एवं स्थूळ सूक्ष्म देह दोन । याचें केलें निरूपण । आतां तिसरें याचें कारण । शरीर केवीं तें बोलिजे ॥६३॥

अज्ञानं कारणं साक्षी बोधस्तेषां विभासकः ।बोधाभासो बुद्धिगतः कर्तास्यात्पुण्यपापयोः ॥२॥

अज्ञान हेंचि कारण शरीर । यासी आत्मा साक्षी भास्कर । बुद्धि प्रतिबिंबरूप विकार । तो बोधाभास जीव ॥६४॥ तोचि पुण्यपापाचा कर्ता । सुखदुःख भोगी तत्त्वतां । एक माथां घेऊन अहंता । देहबुद्धीची ॥६५॥ देहद्वय जालें जें निर्माण । कांहीं निमित्तास्तव होय दर्शन । तेंचि कारण शरीर अज्ञान । कल्पावें लागें ॥६६॥ जेवीं अंधारीं सर्प दिसे । हा कासयानें जाला असे । तया कल्पावें लागे अपैसें । दोरीचें न कळणें ॥६७॥ सर्पावरून न कळणें भावावें । परी तयासी रूप नोव्हे । तेवींच अज्ञान आहेसें कल्पावें । देहद्वय दिसतां ॥६८॥ अज्ञान म्हणजे न कळणें । निजरूपाचें विस्मरणें । हें आधीं जालियाविणें देहद्वय भासतीना ॥६९॥ हे अज्ञान म्हणसी कोणा । तरी नव्हे आत्मया आपणा । जेवीं दोरीचिये अज्ञाना । दोरिसी नाहीं ॥१७०॥ दोरीहून दोरीस पाहणार । जयासी होय मदांधकार । न कळणियाचा विकार । तयासी जाला ॥७१॥ तेवीं स्वस्वरूप जें असंग । पहिलें स्वतःसिद्ध अभंग । तेथें स्फूर्ति हें माया सोंग । न होऊन जालें ॥७२॥ जालें ते जरी सत्य असतें । तरी मायानामें कां उच्चारितें । तस्मात् जालेंच नसतां तयातें । जालेंसें कल्पिलें ॥७३॥ स्फूर्ति म्हणजे अहंब्रह्म-स्फुरण । उगीच आपआपली आठवण । जेवीं वायूची झुळूक उत्पन्न । गगना नातळतां उठे ॥७४॥ तेवीं स्वरूपाची स्फूर्ति । उठे परी स्वरूपा आरती । असो तया स्फुरणीं असती । ज्ञानाज्ञानें ॥७५॥ स्फूर्तीत स्फूर्तीचें कळणें । तयासी नाम ठेविलें ज्ञान । येर स्वरूप चिद्घन । विस्मरण जें तया ॥७६॥ त्या विस्मरणा अज्ञान नांव । तस्मात् स्फुरणासि आली नेणीव । आणि ज्ञानही तेथेंचि आठव । रूप जालें असे ॥७७॥ स्वरूपीं वृत्तीच असेना । विस्मरण कैचें जें आठवीना । यास्तव अर्तीत तें ज्ञानाज्ञाना । असे तैसें आहे ॥७८॥ स्फुरण होतांच तेथें उठलें । ज्ञानाज्ञान उत्पन्न जालें । तें ज्ञान परि न जाय कल्पिलें । चिद्रुपासम ॥७९॥ पाणियामाजी सूर्य बिंबला । तेथें प्रकाशही दिसों लागला । परी तो सूर्याचा नोव्हे भास जाला । मिथ्या उपाधीस्तव ॥८०॥ तेवींच चिद्रूपता अनंताची । स्फुरणीं प्रति भासली मिथ्याची । ते मानिजेना स्वस्वरूपाची । कवणेंही काळीं ॥८१॥ तस्मात् ज्ञानही असेना जेथें । तरी केवीं कल्पावें अज्ञान तेथें । हें विचारवंते जाणावें समर्थंे । व्यर्थचि येरां ॥८२॥ असो स्फुरणीं जें ज्ञानाज्ञान । तीच विद्या अविद्या ह्या दोन । आवरणशक्ति अविद्या म्हणून । विक्षेपशक्ति विद्या ॥८३॥ दोरीचें जें आवरक । तें आवरण शक्तीचें रूपक । सर्पाचें जें उत्पादक । ते विक्षेपशक्ति ॥८४॥ तेवींच स्वस्वरूपाचें आच्छादन । तें आवरण शक्तीचें लक्षण । जगाचें जें उत्पादन । ते विक्षेपशक्ती ॥८५॥ असो विद्येंत जें प्रतिबिंबत । चिता ऐसा भास दिसत । तो ईश्र्वर कर्ता सर्व जगांत । नाम ठेविलें ॥८६॥ अविद्या प्रतिबिंबित जीव । चिदाभास उमटला स्वभाव । हाचि भोक्ता जाला सर्व । सुखदुःखाचा ॥८७॥ परी हा देहद्वय न होतां । अज्ञानगर्भीं जाला राहाता । गुप्त असून जगा समस्ता । उपादान-कारण असे ॥८८॥ प्रतिबिंबयुक्त अविद्या माया । उपादान कारण जगा यया । तेवींच निमित्तकारण शिष्यराया । विद्यासह ईश ॥८९॥ नेणिवेचा जो जडपणा । आणि विद्यारूप विक्षेप जाणा । या उभयांस्तव जाली रचना । चंचळ जडाची ॥१९०॥ तेंचि ऐकावें कैसें कैसें । उत्पन्न जालें असे जैसें । मुळीं स्फुरण तों एकचि असे । ज्ञानाज्ञान रूप ॥९१॥ ज्ञानाचा जाला सत्त्वगुण । अज्ञानाचा तमोगुण । उभयात्मकें रजोगुण । जाला असे ॥९२॥ स्फुरणींच जें छिद्र पडिलें । म्हणजे चिद्घन असतां स्फुरण जालें । तया अवकाशा नाम ठेविलें । आकाश ऐसें ॥९३॥ स्फुरणाचा जो चंचलपणा । तो वायूचे पावला अभिधाना । भासलें स्फुरण तें वचना । तेज बोलिजे ॥९४॥ मुदु स्फुरण तेंचि आप । कठिण अज्ञान पृथ्वीचें रूप । एवं हे अष्टधा सूक्ष्मत्वें अल्प । स्फुरणींच असे ॥९५॥ पुढें तमोगुणापासून । स्पष्टत्वा आलीं भूतें संपूर्ण । एकेक भूत भिन्न भिन्न । दिसूं लागलें ॥९६॥ शब्दामुळें आकाश जालें । कीं आवकाशीं शब्दा स्फुरणस्व आलें । तेंचि आकाश नाम पावलें । शब्द विषय तन्मात्रा ॥९७॥ स्पर्शामुळें वायु जाला । वायुमुळें स्पर्श उठिला । यास्तव वायु हा नाम पावला । स्पर्श विषय तन्मात्रा ॥९८॥ रूपामुळें जालें आप । आपास्तव रसासी रूप । तस्मात् आप हा तयासी जल्प । रस विषय तन्मात्रा ॥९९॥ रसामुळें जालें आप । अपास्तव रसासी रूप । तस्मात् आप हा तयासी जल्प । रस विषय तन्मात्रा ॥२००॥


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.