सौंदर्यरस/जीवनाचे भाष्यकार तात्यासाहेब केळकर






जीवनाचे भाष्यकार
तात्यासाहेब केळकर



 साहित्यात जीवनाच्या भाष्याला फार महत्त्व असते. तो त्याचा प्रधान गुण मानला जातो. काही साहित्यशास्त्रज्ञ 'साहित्य म्हणजे जीवनभाष्य' अशी व्याख्याच करतात.

 प्रत्येक लेखकाचा, साहित्यिकाचा, कवीचा, जीवनाकडे पहाण्याचा एक स्वतंत्र दृष्टिकोण असतो. अनुभव, अवलोकन, वाचन, चिंतन, मनन यांतून जीवनाविषयी, संसाराविषयी, त्यातील धर्म, समाजरचना, नीतिअनीती, विज्ञान, शिक्षण, युद्ध, शांतता, स्त्रीपुरुषसंबंध, स्वातंत्र्य, प्रेम, बंधुभाव इत्यादी घटकांविषयी त्यांची काही मते बनलेली असतात. काही विचार निश्चित झालेले असतात. त्याने जीवनाचे काही तत्वज्ञान मनाशी सिद्ध केलेले असते. आणि कथा, कादंबरी, नाटक, काव्य हे लिहिताना कळत न कळत तो ते मांडीत असतो. तो जगाविषयी किंवा त्यातील घडामोडींविषयी या तत्त्वज्ञानाच्या आधारेच लिहितो. तो घटना कल्पितो, व्यक्ती निर्माण करतो, त्याही या तत्त्वज्ञानाला पोषक अशाच असतात. आणि त्यांच्या द्वाराच तो आपला जगाविषयीचा दृष्टिकोण, अभिप्राय स्पष्ट करतो. हा जो जगाविषयीचा त्यांचा अभिप्राय, हे जे त्याचे विचार, त्याचे जीवनाविषयीचे तत्त्वज्ञान, त्याला जीवनभाष्य म्हणतात. 'इंटरप्रिटेशन ऑफ लाइफ', 'क्रिटिसिझम ऑफ लाइफ', 'फिलॉसफी ऑफ लाइफ' असे शब्द इंग्रजीत रूढ आहेत. त्यावरूनच जीवनभाष्य, संसृतिटीका हे शब्द मराठीत बनवलेले आहेत.
 ललित साहित्यातून जसा लेखकाचा जीवनविषयक दृष्टिकोण प्रगट होतो तसाच तो त्याच्या समीक्षालेखांतूनही प्रगट होतो. साहित्य हे जीवनाचे भाष्य होय आणि टीका किंवा समीक्षा हे त्या भाष्यांचे भाष्य होय. या दुसऱ्या भाष्यकाराला म्हणजे टीकाकारालाही जीवनाविषयी सम्यक् ज्ञान असणे साहित्यिकाइतकेच अवश्य असते. गीतेवर श्रीशंकराचार्यांनी भाष्य लिहिले. आता त्या आचार्याच्या भाष्यावर ज्यांना अनुकूल प्रतिकूल टीका लिहायची असेल, त्यांना मूळ गीतेचे उत्तम ज्ञान असलेच पाहिजे. गीतेविषयीचा त्यांचा दृष्टिकोणही निश्चित असला पाहिजे आणि त्यांच्या टीकेतून तो प्रगट झाला पाहिजे. साहित्य-समीक्षकाचे, टीकाकाराचे तसेच आहे. तो साहित्यावर टीका करतो. पण ते साहित्य ही ज्या संकृतीविषयी, जीवनाविषयी टीका असते ते जीवन त्याला साहित्यिकाइतकेच ज्ञात असले पाहिजे. त्याचा त्या जीवनाविषयीचा दृष्टिकोण त्याच्या टीकेतून आविष्कृत झाला पाहिजे.
 दुसऱ्या एका दृष्टीने पहा. शेती, कारखानदारी, प्रशासन, नोकरी, वकील, डॉक्टर, प्राध्यापक, इंजिनियर यांचे व्यवसाय. खरेदीविक्री, राज्यकारभार, गृहकृत्ये, अपत्यसंगोपन इत्यादी अनेकविध उद्योग जीवनात मनुष्य करीत असतो. त्याचप्रमाणे साहित्य-लेखन हाही एक उद्योग आहे. आणि त्या वरील उद्योगाविषयीचे विचार, त्याविषयीचे तत्त्वज्ञान (म्हणजे साहित्य) हे जसे जीवनभाष्य होते, त्याचप्रमाणे त्या उद्योगासारखाच 'साहित्य' हा जो उद्योग, त्याच्याविषयीची टीका हेही जीवनभाष्यच होईल, हे उघड आहे. म्हणून साहित्यसमीक्षक हाही जीवनाचा भाष्यकार ठरतो, हे मान्य होईल असे वाटते.
 तात्यासाहेब केळकर हे जीवनाचे भाष्यकार होते, हे आज सांगायचे आहे ते त्यांच्या ललितसाहित्याच्या आधारे नव्हे; तर त्यांच्या टीका लेखनाच्या आधारे सांगायचे आहे. आणि त्यासाठीच टीकाकारही साहित्यिका- सारखाच जीवनाचा भाष्यकार असतो हे आधी स्पष्ट केले आहे.
 तात्यासाहेब केळकर यांनीही वाङ्मय व टीका याविषयी लिहिताना टीका शास्त्राविषयी वर विवेचिलेले मत मांडले आहे. ते म्हणतात, "एका बाजूस वाङ्मयाचा व मनुष्यजीवनाचा जो संबंध तोच दुसऱ्या बाजूस टीकाशास्त्राचा व वाङ्मयाचा आहे.' मनुष्यजीवनाचा अर्थ सांगणारे ते वाङ्मय असे म्हटले, तर 'वाङ्मयाचा अर्थ सांगणारे ते टीकाशास्त्र' असे म्हणता येईल."

 या दृष्टीने आता आपल्याला तात्यासाहेबांच्या टीकावाङ्मयाचा परामर्श घ्यावयाचा आहे.

 वाङ्मयात फार मोठे परिवर्तन केव्हा होते ? क्रांती केव्हा होते ? नवे वाङ्मय व वाङ्मयप्रकार केव्हा निर्माण होतात ? 'अर्वाचीन मराठी साहित्य' या ग्रंथाचा उपसंहार त्यांनी लिहिला आहे. त्यात त्यांनी या प्रश्नाची चर्चा केली आहे. ('साहित्य खंड : पृ. १११) टीका म्हणजे काय हे सांगताना, 'त्या त्या कलांची उत्पत्ती स्थिती आणि अपकर्ष किंवा नाश यांच्यासंबंधीचे नियम किंवा सिद्धान्त ज्यात सांगितले आहेत असा वाक्प्रबंध' असे त्यांनी अन्यत्र म्हटले आहे. आणि तीच व्याख्या मनापुढे ठेवून प्रश्नाची चर्चा केली आहे व वाङ्मयाचा 'अर्थ' सांगितला आहे. त्यांच्या मते नवी सृष्टी, नवी दृष्टी व नवी हृष्टी किंवा तुष्टी ही वाङ्मयात नवे युग निर्माण होण्याची तीन कारणे होत. अमेरिका १७७६ साली स्वतंत्र झाली आणि तेथील सृष्टी पालटली. रशियाने १८१२ साली नेपोलियनचा मोठा पराभव केला, व तेथे अगदी नवी सृष्टी निर्माण झाली. महाराष्ट्रात १८१८ साली इंग्रजांचे राज्य प्रस्थापित झाले आणि येथल्या जीवनात तळापासून क्रांती झाली. या तीन घटनांमुळे या तीन देशांतील साहित्यातही अशीच क्रांती घडून आली, हे सर्वश्रुतच आहे.

या तीनही देशांतील साहित्याचा सविस्तर वृत्तान्त देऊन तात्यासाहेबांनी नवी सृष्टी, नवी दृष्टी व नवी तुष्टी यांचा अर्थ विशद केल आहे. आपण येथे महाराष्ट्रापुरताच विचार करू. इंग्रजी राज्य स्थापन झाल्यावर येथे अगदी सर्वस्वी नवी सृष्टी निर्माण झाली, हे आता सर्वांनाच माहीत आहे. राज्यकारभार बदलला, कारखाने, व्यापार, रेल्वे, रस्ते या नव्या गोष्टी आल्या, शाळा, विद्यापीठे स्थापन झाली. शहरे वाढू लागली, घरबांधणी नवी झाली. स्थानिक स्वराज्य आले, कौन्सिले आली, पोस्ट आले, तार खाते आले- सर्व सर्व सृष्टी बदलली. ही नवी सृष्टी आल्यामुळेच नवी दृष्टी लोकांना प्राप्त झाली. म्हणजेच येथली मानसिक सृष्टीही बदलली आणि म्हणून नवे साहित्य जन्माला येऊ शकले. पुष्कळ वेळा नवी सृष्टी येऊनही लोकांना नवी दृष्टी प्राप्त होत नाही. आफ्रिकन राष्ट्र दक्षिण अमेरिकेतील राष्ट्रे यांची स्थिती अशी आहे. जेथे नवी सृष्टी स्वकीय वा परकीय राज्यकर्त्यांनी लादलेली असते आणि त्याबरोबरच लोकांना नवी दृष्टी देण्याचे बुद्धिपुरस्सर टाळलेले असते, तेथे नवे साहित्य निर्माण होत नाही. नवी सृष्टी काही काळ तरी जडरूपातच तेथे रहाते. ती नव्या संस्कृतीला जन्म देत नाही. आणि नवी संस्कृती नाही म्हणजे नवे साहित्य नाही पण भारतात सुदैवाने तसा प्रकार घडला नाही. येथे नवी सृष्टी इंग्रज राज्यकर्त्यांनी आणली हे खरे. त्याबरोबरच त्यांनी पाश्चात्त्य विद्येचाही प्रसार करण्यास प्रारंभ केला, आणि त्यापेक्षाही जास्त म्हणजे येथल्या लोकांनी त्या विद्येचा व तिच्याबरोबर येणाऱ्या संस्कृतीचाही अतिशय आदर केला व समाजाला नवी दृष्टी देण्याचाही आटोकाट प्रयत्न केला. त्यामुळे येथे चाळीस-पन्नास वर्षांतच साहित्यसृष्टीत मोठे परिवर्तन घडून आले.
 तिसरे कारण म्हणजे नवी हृष्टी किंवा तुष्टी हे होय. आज एखादा हरिजन आपल्या शहराचा महापौर झाला तर लोकांना आनंद होतो. ही नवी तुष्टी होय. पन्नास वर्षापूर्वी याचा संताप आला असता. आजही ग्रामीण भागात असा संताप येतो. हरिजन गावचा पाटील झाला तर लोक त्याला यमयातना देतील. त्याने तांब्या पितळेची भांडी वापरलेली सुद्धा त्यांना चालत नाहीत. अशा हरिजनांचा गावचे लोक बहिष्कार घालून सूड घेतात. म्हणजे तेथे नवी तुष्टी आली नाही, असा अर्थ होतो. नवी दृष्टी नाही म्हणूनच नवी तुष्टी नाही, हे उघडच आहे. ग्रामीण भागात नवी जडसृष्टी आली आहे. शेतीची नवी अवजारे आली आहेत, वीज आली आहे, मोटारी, स्कूटर ही वाहतुकीची यंत्रे आली आहेत. तरीही समतेची, स्वातंत्र्याची, बुद्धिप्रामाण्याची, इहवादाची नवी दृष्टी तेथे आलेली नाही. म्हणून तेथून अजून नवे साहित्य जन्माला येत नाही. ग्रामीण जनतेविषयी जे लिहिले जात आहे ते शहरातले नवे लोक लिहीत आहेत. कारण त्यांना नवी दृष्टी व तुष्टी प्राप्त झालेली आहे.
 स्त्रीजीवनाविषयी असेच आहे. स्त्री विद्यासंपन्न होत आहे, सार्वजनिक जीवनात येत आहे. यामुळे सुशिक्षित समाजाला आनंद होत आहे, नवी तुष्टी त्याला लाभत आहे. तो जुन्या बंधनातून मुक्त होत आहे, स्वातंत्र्याचे तेज ती प्रगट करीत आहे, याचाही पुष्कळांना आनंद होत आहे. पण मुस्लिम समाजाला हे नको आहे. कारण त्याला नवी दृष्टी आलेली नाही. तो आज शंभर-दीडशे वर्षे इंग्रजांनी निर्माण केलेल्या नव्या सृष्टीत रहात आहे. पण नव्या विद्येचा हिंदूंनी जसा आदर केला, ती आत्मसात् केली, तशी मुस्लिम समाजाने केली नाही. त्यामुळे त्याला नवी दृष्टी आली नाही. अर्थातच स्त्री अशिक्षित असावी, पडद्यात असावी, तिला समतेची आकांक्षा वाटू नये, यातच त्याला तुष्टी आहे. धर्मपरिवर्तनही मुस्लिम समाजाला मान्य नाही. आपण धर्मविचारात आमूलाग्र क्रांती केली याचा हिंदुसमाजाला अभिमान वाटतो. तसा मुस्लिम समाजाला मुळीच वाटत नाही, उलट 'शरीयत'- मध्ये काडी-मात्र फरक करायचा नाही, असा त्यांचा बाणा आहे. त्यामुळे नव्या सृष्टीत राहूनही तो जुनाच राहिला आहे. परिवर्तनात त्याला आनंद नाही. त्यामुळे त्या समाजात नवे साहित्य निर्माण होत नाही, हे ओघानेच आले.
 साहित्यातील क्रान्तिकारक बदल केव्हा, कसे होतात, याविषयी तात्यासाहेबांनी केलेली मीमांसा कशी अचूक आहे, हे यावरून ध्यानात येईल. ही मीमांसा मुळातच नवी आहे असे नाही. पण 'नवी सृष्टी, नवी दृष्टी व नवी तुष्टी' या स्वरूपात त्यांनी केलेली मांडणी अगदी अभिनव अशी आहे. त्यांचे जीवनाविषयीचे तत्त्वज्ञान त्यावरून अगदी स्पष्ट होते. आपण त्याच दृष्टीने पाहात आहोत. त्यांनी अमेरिकन व रशियन साहित्यातील उदाहरणे दिली आहेत. वर मी त्यांच्यानंतरच्या महाराष्ट्रीय जीवनातून उदाहरणे घेतली आहेत. ती सध्या डोळ्यापुढे असल्यामुळे प्रतिपाद्य विषय जास्त स्पष्ट होईल असे वाटते.

*

 हास्यविनोदाची जी मीमांसा तात्यासाहेबांनी केली आहे तीवरूनही त्यांच्या जीवनविषयक तत्त्वज्ञानाची बरीच कल्पना येते. या विषयावर त्यांनी स्वतंत्र ग्रंथच लिहिला आहे. त्यात त्यांनी एका ठिकाणी म्हटले आहे की, एकंदर जीविताविषयी आपली काय कल्पना आहे, यावर जीवितक्रमामध्ये आपण विनोदाला कोणते स्थान देतो हे अवलंबून असते. आणि याच अनुरोधाने त्यांनी मराठीतील विनोदाच्या इतिहासाचे विवेचन केले आहे.

 पूर्वीच्या काळी मराठी वाङ्मयात आणि समाजातही विनोदाला फारशी प्रतिष्ठा नव्हती. त्यामुळे मराठीत खरा विनोद इंग्रजी साहित्याशी आपला परिचय झाल्यानंतरच अवतरला. याच्या कारणांची कोल्हटकरांनी जी मीमांसा केली आहे तीच तात्यासाहेब केळकरांना मान्य आहे. व्यवहारापेक्षा परमार्थाचे, प्रवृत्तीपेक्षा निवृत्तीचे, व कर्मयोगापेक्षा कर्मसंन्यासाचे वर्चस्व समाजमनावर असले म्हणजे संसार मिथ्या आहे, कामक्रोधादी षड्रिपूंचे दमन करणे हेच मनुष्याचे कर्तव्य, ते केल्यावाचून त्याची जन्म-मरणाच्या फेऱ्यातून मुक्तता होत नाही, याच विचाराचे चोहोकडे साम्राज्य दिसून येते. ऐहिक सुखाविषयी जेथे इतके तीव्र औदासीन्य असते, तेथे विनोदाला फारसा अवसर नसतो. मराठीत प्रारंभीच्या काळचे कवी हे संत- कवी होते. त्यांची बहुतेक काव्यरचना धर्मपर असल्यामुळे हास्यरसावर पूर्वीच्या युगापेक्षाही कडक बहिष्कार पडला. एकनाथ, तुकाराम यांच्या वाङ्मयात काही प्रमाणात विनोद आढळतो. पण ती स्थळे अपवादात्मक होत. लोकगीते व लोककथा यांत मात्र जगातल्या कोणत्याही भाषेप्रमाणे मराठीतही बराच विनोद आढळतो. कारण लोकांचे ऐहिक जीवन हा त्यांचा विषय असतो.

 पण ऐहिक जीवनाचा लोभ जसा विनोदाला अवश्य असतो, तशीच भौतिकविद्येची प्रगती हीही अवश्य असते. त्या विद्येने संपन्न असा बुद्धिजीवी मध्यमवर्ग पाश्चात्त्यांच्या वर्चस्वामुळे जेव्हा भारतात उदयास आला, तेव्हाच येथे खरा श्रेष्ठ प्रतीचा विनोद निर्माण झाला. विनोद ही वस्तुस्थितीवर, जीवनावर, संसारावर केलेली टीका असते. जग आहे कसे आणि असावे कसे, यांविषयी अभिप्राय त्यात प्रगट केलेला विचारात जितका मुरलेला असेल तितकी त्याच्या विनोदाला म्हणजे टीकेला अधिक किंमत येईल. त्यातही अशा तत्त्ववेत्त्याला मनुष्यमात्राविषयी प्रेम असले तर त्याचा विनोद जास्त वरच्या पातळीवरचा होतो. तात्यासाहेबांच्या मते मनुष्यजातीविषयी प्रेम असल्यावाचून चांगला विनोद होणे शक्यच नाही.
 चित्रकला ही विनोदाच्या कशी उपयोगी पडते ते सांगताना तात्यासाहेबांनी व्यंगचित्राचा निर्देश केला आहे. तेव्हा सध्याचे प्रसिद्ध व्यंगचित्रकार जे लक्ष्मण त्याचीच काही उदाहरणे देऊन त्यांचे वरील विचार स्पष्ट करतो.
 रस्त्याच्या कडेला बसणारा ज्योतिषी एका लहान मुलाचा एक हात पाहून त्याला भविष्य सांगत आहे. तो म्हणतो, 'तू मोठा झाल्यावर तुला खूप पैसा मिळेल. तू बंगला बांधशील. तुला बायको सुरेख मिळेल. मोटारही तू घेशील. पण आजच मोटारीसाठी नाव नोंदवून ठेव.'
 सरकारी अधिकाऱ्याचे भाषण चालले आहे. त्याला त्याचा कारकून मागून हळूच सांगतो, 'सर, पंचवार्षिक प्लॅन म्हणण्याऐवजी आपण पंचवार्षिक प्लॉट म्हणत आहात.' विनोद म्हणजे वस्तुस्थितीवर टीका याचे यापेक्षा चांगले उदाहरण कोठे सापडणार ?
 विनोदबुद्धीचे महत्त्व सांगताना तात्यासाहेब म्हणतात, 'ज्याला विनोदबुद्धी नाही तो एक मुक्त किंवा पशू असला पाहिजे, हे म्हणणे पुष्कळ अंशी खरे आहे. या दोन टोकांच्या मधे किती तरी जागा आहे. ती व्यापणाऱ्यांच्या अंगी हास्यविनोद- पात्रता असते, आणि या मोठ्या समुदायातूनच समाजोपयोगी कामे करणारी माणसे निघतात. हास्यविनोदाच्या बाबतीत पुष्कळ वेळा इसापनीतीतील कोल्हा आणि द्राक्षे ही गोष्ट लागू पडण्यासारखी आहे. म्हणजे असे की, हास्यविनोदास नावे ठेवणारे लोक त्याची निंदा करून किंवा त्याला नाके मुरडून फक्त आपली तद्विषयक अपात्रता किंवा असामर्थ्य झाकू पहातात. जी गोष्ट आपल्याला येत नाही तिची महती होईल तितकी कमी करू पहाणे हा मनुष्यस्वभावाचा निसर्गसिद्धच दोष आहे.'

*

 'भौतिक ज्ञानाची जशी वाढ होते, तसतसा काव्याचा ऱ्हास होतो' या मेकॉलेच्या मतावर टीका करताना तात्यासाहेबांनी मानवी संसाराविषयी एक महत्त्वाचा सिद्धान्त सांगितला आहे. ते म्हणतात, 'वाङ्मयाचा जन्म भौतिक शास्त्रांच्या आधीचा असून सर्व शास्त्रांना पुरून अखेरही तेच उरणार आहे. ज्ञानेंद्रियापेक्षा मन हे श्रेष्ठ आहे, या मनातच भावना निर्माण होतात. या भावनांनी मानवाचा संसार चालतो. तो शास्त्रांचे साहाय्य घेईल; पण त्यावाचून त्याचे अडणार नाही. वाङ्मयाचे तसेच आहे. ज्या वेळी भौतिक शास्त्रे जन्माला आली नव्हती त्या वेळी कवी काव्ये लिहीतच होते. पुढे शास्त्रे जन्माला आली म्हणून काव्ये थांबली नाहीत. उलट शास्त्रांची मदत घेऊन काव्य वाढीसच लागले.'
 मेकॉलेच्या मताचे खंडन करताना केळकरांनी आणखी एक असाच महत्त्वाचा सिद्धान्त सांगितला आहे. अज्ञान आणि प्रतिभा ही समानार्थक नव्हेत, एकरूप नव्हेत, हा तो सिद्धान्त होय. ती समानार्थक किंवा एकरूप आहेत, असे गृहीत धरूनच मेकॉलेने आपले मत मांडले असले पाहिजे, असे ते म्हणतात. भौतिक ज्ञान वाढले म्हणजे काव्य ऱ्हास पावते, या म्हणण्याचा अर्थच असा की, ज्ञानामुळे प्रतिभा क्षीण होते. अज्ञानाच्या काळात ती प्रबळ असते, म्हणूनच त्या काळात उत्तम काव्ये निर्माण होतात, असा मेकॉलेचा भावार्थ. पण हे गृहीतच चूक आहे. कवी कल्पना करतो ती अज्ञानामुळे नव्हे उलट दोन्ही वस्तूंचे उत्तम ज्ञान त्याला असते, म्हणूनच त्यातील सादृश्य तो आकळू शकतो. कालिदासाने सर्व शास्त्रांतील उपमाने निवडून आपल्या कामास लावली आहेत, प्रणव, प्राक्तन, स्वाहा, श्रुतिस्मृती, शब्दशक्ती, धर्मगती, उत्सर्ग अशा सर्व शास्त्रांतून त्याने उपमा घेऊन आपली काव्ये सजवली आहेत.

 मध्यभारतीय कविसंमेलनात भाषण करताना केळकरांनी हा विषय आणखी स्पष्ट केला आहे. ते म्हणतात, 'शास्त्रीय सत्य व काव्य ही दोन नाहीत. शास्त्रीय सत्याचे तेज, त्याला काव्याचे तेज मिळाल्यामुळे, अधिकच चमकू लागते. शास्त्रीय ज्ञानाच्या दुधात काव्यबुद्धीची भर ही सारखेप्रमाणे आहे. यामुळे सहृदय भौतिक शास्त्रज्ञदेखील काव्यदृष्टीची अपेक्षा करतात व तिची मदत घेतात. उलट खोल बुद्धीचे विशाल शक्तीचे कवी हेदेखील शास्त्रीय ज्ञानाचा अव्हेर करीत नाहीत. किंबहुना ते कवी नसते तर तत्त्वज्ञानी झाले असते.'

 बडोद्याच्या साहित्यसंमेलनात तात्यासाहेबांनी आपली वाङ्मयाची सुप्रसिद्ध व्याख्या मांडली होती. 'खरी सविकल्प समाधी उत्पन्न करू शकते ते वाङ्मय' ही ती व्याख्या होय. या व्याख्येमागेही मानवी मनासंबंधीचा त्यांचा एक महत्त्वाचा सिद्धान्त आहे. मानवी आत्म्याला परमात्म्याशी एकरूप व्हावे, अशी सदैव तळमळ असते. ती त्याची इच्छा ललित साहित्याच्या वाचनाने बरीचशी तृप्त होते. म्हणूनच मनुष्याला कथा-कादंबरीच्या वाचनाने काव्यश्रवणाने आनंद होतो. काव्यवाचनापासून आनंद का होतो याचीही मीमांसा अशा रीतीने या व्याख्येत येऊन जाते.
 साहित्याच्या वाचनाने आत्म्याची परमात्म्याशी एकरूप होण्याची इच्छा कशी तृप्त होते ? काव्य वाचीत असताना त्यात ज्या व्यक्तिरेखा पुढे येतात त्यांच्याशी आपण तादात्म्य पावत असतो. शकुंतला सासरी जाऊ लागली तर कण्वाला दुःख व्हावे हे ठीक. पण आपल्याला का दुःख व्हावे ? त्याचे कारण असे की, आपण कण्वाशी तादात्म्य पावतो म्हणून आपल्याला दुःख होते. याचा अर्थ असा की, देह, इंद्रिये यांची बंधने क्षणभर उल्लंघून आपला आत्मा जास्त व्यापक रूप घेतो.
 हीच विचारसरणी पुढे नेऊन पहा. 'तुझे आहे तुजपाशी' या नाटकात एकाच वेळी रंगभूमीवर आचार्य, गीता, सतीश, काकाजी, श्याम, उषा इत्यादी व्यक्ती उभ्या असतात आणि त्यांचा संवाद चालू असतो. अशा वेळी क्षणभर या व्यक्तींशी तर क्षणभर त्या व्यक्तीशी आणि मधूनमधून सर्व व्यक्तींशी आपण एकरूप होत असतो. तसे झाल्यावाचून त्यांच्या सुखःदुखांचा सहानुभव आपल्याला येणारच नाही. आता एकदम इतक्या व्यक्तींशी तादात्म्य पावल्याने आत्म्याची व्यापक रूप धारण करण्याची इच्छा जरा जास्त प्रमाणात तृप्त होणार हे उघडच आहे. हे सर्व साहित्यातील रसामुळे होते. याच्या जोडीला अलंकार आले की जड वस्तूंशीसुद्धा आपल्याला एकरूप होता येते. द्रौपदी ही वीज होती, सिंधू गरीब गाय होती, सुभद्रा कमलासारखी होती, तानाजी सिंह होता, तात्यासाहेब वटवृक्षासारखे होते- अशा अनेक उपमा व रूपके साहित्यात येतात. रूपकात तर दोन वस्तूंचे तादात्म्यच असते. आपण प्रथम तानाजीशी एकरूप होतो, आणि मग त्याच्याबरोबर सिंहाशी आणि मग त्याच पद्धतीने कमलाशी, विजेशी, वटवृक्षाशी- म्हणजे एकंदर चराचर सृष्टीशी तादात्म्य पावतो. साहित्यातील रस व अलंकार यामुळे हे साधते. चराचर सृष्टीशी तादात्म्य पावणे म्हणजेच परमात्म्याशी- बव्हंशी तरी- तादात्म्य पावणेच होय. यालाच समाधी म्हणतात. पण या समाधीत 'आपण कोण आहो' याची जाणीव सतत जागृत असते. म्हणून ही 'सविकल्प समाधी' होय. योग्यांची, समाधी ती निर्विकल्प समाधी, त्या समाधीत 'मी' ही जाणीवही नसते.
 आपल्याला येथे या व्याख्येची चर्चा करायची नाही. मानवी मनाला आनंद कशामुळे होतो, याविषयीचा जो तात्यासाहेबांचा सिद्धान्त, तोच फक्त येथे लक्षणीय आहे. त्यांचे जीवनाचे भाष्य ते यातच सापडते. परमात्म्याशी एकरूप होण्याने मनाला खरा आनंद होत असतो. ती आत्म्याची आकांक्षा ज्या थोडयाफार प्रमाणात पुरी होते त्या प्रमाणात मनुष्याला आनंद मिळतो. साहित्याच्या वाचनाने आनंद होण्याचे कारण हेच की, त्यामुळे ती इच्छा बऱ्याच अंशी तृप्त होते.

*

 तात्यासाहेबांनी वाङ्मयविषयक जी व्याख्याने दिली, लेख लिहिले, ते बहुतेक सर्व १९३४-३५ च्या सुमाराचे किंवा त्याआधीचे आहेत. त्या सुमारास महाराष्ट्रात नवमतवाद सुरू झाला होता. त्यामुळे त्याचा परामर्श घेऊन 'उद्याचे मराठी वाङ्मय' कसे होईल याविषयी त्यांनी काही अंदाज बांधले होते. हे नवमतवादी वाङ्मय बव्हंशी इंग्रजी वाङ्मयाच्या अनुकरणानें लिहिले जात होते. त्या इंग्रजी वाङ्मयाच्या मागे मानवी जीवनाविषयी जी विचारसरणी होती, तीच हळूहळू महाराष्ट्रात स्वीकारली जाईल आणि त्या विचारसरणीतून निर्माण झालेले इंग्रजी वाङ्मय ज्या स्वरूपाचे होते तसेच आता मराठी वाङ्मय होत जाणार, असे त्यांनी भविष्य वर्तविले होते. जीवनाविषयीची विचारसरणी जशी बदलते, तसे वाङ्मयही बदलते, हा त्यांचा सिद्धान्त वर सांगितला आहेच.
 नवमतवादावर विशेष प्रभाव होता तो नव्या मानसशास्त्राचा. हे नवे मानसशास्त्र म्हणजे फ्रॉइडचे मानसशास्त्र होय. मनुष्याच्या विचारस्वातंत्र्याला या मानसशास्त्राने फार मोठा धक्का दिला होता. मनुष्यप्राणी जे जे करतो ते ते त्याच्या पूर्ववासनांच्या जोराने, पराधीनतेने करतो, स्वाधीनतेने करीत नाही, असे फ्रॉइडने सांगितले होते, हे प्रसिद्धच आहे. साहजिकच मनुष्य पराधीन म्हटला म्हणजे मग त्याला सद्गुणी म्हणण्यात तरी काय स्वारस्य ? कारण सद्गुण हा ऐच्छिक व जाणता असला तरच त्याची महती. याचा परिणाम असा झाला की, भावनेत स्वारस्य नाही व सद्गुण म्हणजे थोतांड आहे, अशी विचारसरणी लेखकांत रूढ झाली आणि तीच वाङ्मयात दिसू लागली.
 या मानसशास्त्राचे साहित्यावर प्रत्यक्ष परिणाम काय होऊ लागले, हे तात्यासाहेबांनी त्या वेळच्या 'नवमत' नावाच्या मासिक पुस्तकातला एक उतारा उद्धृत करून सांगितले आहे : लैंगिक स्वातंत्र्य म्हणजेच नवमतवाद अशी समजूत करून घेऊन काही अर्ध्याकच्च्या गुरूंच्या चेल्यांनी समाजाचा बुद्धिभेद चालवला आहे. नवमतवाद म्हणजे स्वैरसंचार असाच नवमतवादाचा प्रांजळ अर्थ सर्रास रूढ होत असल्याने बऱ्याच विचारवंतांचा नवमतवाद म्हणजे प्लेगचा उंदीर अशी भीती वाटल्यास त्यात त्यांचा दोष काय ? शेजेची राणी सोडून शेजारणीवर डोळा ठेवण्यात काही चूक नाही, असे नवमतवाद मानतो आणि पितृत्व हे केवळ तर्कसिद्ध आहे, असे म्हणून प्रत्यक्ष आईचाही संशय घ्यायला हरकत नाही, असेही त्याला वाटते.'
 आणखी इतर लेखकांचेही नवमतवादाचे स्वरूप स्पष्ट करून त्याचा निषेध करणारे उतारे तात्यासाहेबांनी दिले आहेत. लैंगिक विषयावरील क्रान्तिकारक मते प्रतिपादन करीत असताना, लिंगविषयक अज्ञानामुळे किंवा लैंगिक कोंडमाऱ्यामुळे मानवी सुधारणेची पीछेहाट होते, म्हणून तशा विषयावर निर्लज्जपणे काहीही लिहिले बोलले की, मानवी स्वभावात चावटपणाची जी अधम आवड आहे, ती जागृत होऊन लोकांना धक्के बसतात व मजा पहायला मिळते, या हेतूने हे लोक नवमताचा पुरस्कार करतात. जगावेगळे काही तरी केले की, लोक आश्चर्य चकित होऊन टाळया पिटतात. म्हणूनच हे लेखक आधुनिकतेचा पुरस्कार करतात. पण हा वर्ग म्हणजे केवळ आधुनिकातले विदूषक होत.'
 तात्यासाहेव स्वतः असे तीव्र व जळजळीत लिहीत नसत. पण नवमतवादातील अपप्रवृत्तीविषयी लिहिताना त्यांनी उतारे मात्र तसे दिले आहेत, व त्यांतूनच आपला अभिप्राय व्यक्त केला आहे.
 नव्या मानसशास्त्रामुळे आणखी एक परिणाम त्यांच्या मते होतो तो असा की, त्यामुळे वाङ्मय दुर्बोध होते. ते म्हणतात, 'अलीकडे सामुदायिक अनुभवापेक्षा व्यक्तिगत, फुटकळ अनुभवाला चित्ताकर्षकता येऊ लागली आहे. त्याचा एक परिणाम असा होतो की, अशा प्रकारचे नवे वाङ्मय सर्वांना सारखेच समजत नाही. संकीर्ण सामुदायिक अनुभव हा कळतो, समजतो, तसा विशेष व्यक्तिगत व कदाचित् अपवादात्मक ठरणारा अनुभव कळत नाही. यामुळे नवीन वाङ्मयाचा चेहरा व मोहरा ही दोन्ही सहजच बदलतात.'
 नवमतवादी लेखकांना समाजाला धक्का देण्यात भूषण वाटते. त्याविषयी लिहिताना तात्यासाहेब म्हणतात, 'विजेने दिलेला लहानसा धक्का दुःखदायक न वाटता आनंदकारकच वाटतो. त्याने काही रोगही बरे होतात. पण तापलेल्या पदार्थाने दिलेला डाग हा कितीही लहान असला तरीही दुःखदच होणार. तीच गोष्ट नवमत प्रगट करण्याच्या पद्धतीची समजावी. एकाच शब्दात सांगायचे तर नवमतवादी लेखकांनी सदभिरुची संभाळली पाहिजे.'
 इंग्लंडमध्ये त्या काळी सदभिरुचीचे उपासक तेथल्या नवमतवादी वाङ्मयाच्या हीन अभिरुचीवर टीका करू लागले होते. त्याची कल्पना यावी म्हणून तात्यासाहेबांनी फिलिप हेंडरसन याचा उतारा दिला आहे. तो म्हणतो, 'हल्ली नाटक म्हणजे हिडिस लैंगिक अनाचार पहाण्याची एक संधी, असाच अर्थ झाला आहे. पुन्हा पुन्हा तोच तो व्यभिचार हा एकसुरी विषय त्यात असतो.'
 तात्यासाहेबांनी हे लिहिल्याला आता तीस-पस्तीस वर्षे होऊन गेली आहेत. तेवढ्या अवधीत सर्व मराठी वाङ्मय असे नवमतवादी झाले आहे असे नाही. पण एक-दोन गट महाराष्ट्रात तसे निश्चित आहेत. त्यांना ओंगळ अश्लील व दुर्बोध साहित्य प्रसविण्यात व प्रकाशिण्यात भूषणच वाटते. आणि साधारणपणे प्रतिष्ठित समजले जाणारे सर्व टीकाकार त्याचाच उदोउदो करताना दिसतात.
 तात्यासाहेबांचा जीवनविषयक दृष्टिकोण काय होता याची सम्यक् कल्पना वरील विवेचनावरून येईल असे वाटते. साहित्यात मोठे परिवर्तन किंवा क्रांती कशामुळे घडते, साहित्यापासून आनंद होण्याचे खरे कारण काय, विज्ञानाची प्रगती व प्रतिभा यांचे संबंध कसे असतात, विनोदाला समाजात केव्हा प्रतिष्ठा लाभते इत्यादी प्रश्नांची त्यांनी जी मीमांसा केली आहे, तीवरून- म्हणजे त्यांच्या बहुविध साहित्यसमीक्षाविषयक लेखांच्या आधारे- त्यांचे जीवनविषयक तत्त्वज्ञान समजून घेण्याचा हा प्रयत्न केला आहे. तात्यासाहेबांच्या साहित्याच्या अभ्यासकांना तो यथार्थ वाटेल अशी आशा वाटते.

*

 आता साहित्याचा शिल्पकार कोणत्याही समाजात मध्यम, बुद्धिजीवी वर्ग हाच असतो, या तात्यासाहेबांच्या सिद्धान्ताचा परामर्ष घेऊन हे विवेचन पुरे करू.
 'साहित्य आणि जीवन' या आपल्या लेखात ('सह्याद्रि खंड' : पृ. २७०) तात्यासाहेबांनी वरील सिद्धान्त मांडला आहे. प्रथम त्यांनी साहित्य व इतर कला यांची तुलना करून 'साहित्यकला ही श्रेष्ठ होय.' असा अभिप्राय दिला आहे. त्याचे त्यांच्या मते कारण असे की, 'स्वतला क्षणभर विसरून जाणे हे आनंदाचे गमक मानले तर तो आनंद सर्व कला सारख्याच प्राप्त करून देतील, पण कर्तृत्वाच्या दृष्टीने व कार्यव्यापाच्या दृष्टीने पहाता वाङ्मयकला ही अधिक पराक्रमी ठरते. जीवनाचे अगणित गुण व अगणित प्रकार यांचे प्रतिबिंब दाखवणे, हे अगणित वर्णसमूहरूप वाणीला व लेखनाला जसे साधेल तसे मर्यादित व्याप्तीच्या चित्रांना, गीतांना, मूर्तींना वा शिल्पकृतींना साधणार नाही.'
 यावरून असे दिसते की, मानवी जीवनाचा जास्तीत जास्त आविष्कार करण्याचे सामर्थ्य हेच त्यांच्या मते कलेच्या श्रेष्ठतेचे लक्षण होय साहित्यात ते सामर्थ्य असते म्हणून ते सर्व कलांत श्रेष्ठ होय.
 अशा या साहित्य कलेचा खरा आधार कोणता ? तिचा खरा उपासक कोण ? तात्यासाहेब म्हणतात, मानवजातीच्या इतिहासाकडे पाहिले तर या दृष्टीने मध्यमवर्ग हाच महत्त्वाचा ठरतो. याचे कारण असे की, समाज जिवंत रहाण्याला ज्या (वैचारिक, तात्त्विक) हालचाली, जी परिवर्तने व ज्या क्रांत्या अवश्य असतात, त्या सर्व या मध्यमवर्गाच्या मनातून निर्माण होतात. एकीकडे श्रीमान वर्ग आपल्याच ऐश्वर्योपभोगात मग्न असतो. दुसऱ्या बाजूला प्रचंड असा गरीबांचा वर्ग. तो साक्षरही नसतो. मग तो बिचारा वाङ्मयनिर्मिती काय करणार? यामुळे समाजजीवनाच्या अथांग समुद्रावर जी वादळे आजपर्यंत झाली आहेत, ती सर्व या मध्यमवर्गाच्या केंद्रभूमीतच झाली आहेत हे काम एका टोकाच्या श्रीमंतांनी व दुसऱ्या टोकाच्या दरिद्री लोकांनी कधीही केलेले नाहीं. मनुष्याला विश्रांतीचा, फुरसतीचा असा काळ थोडा तरी मिळणे यावरच जगाची प्रगती अबलंबून असते. ('कामगारांचे नेतृत्व कोण करू शकेल.' हा प्रश्न सोव्हिएट क्रान्तीचा नेता लेनिन याच्यापुढे होता. तेव्हा बुद्धिजीवी वर्गच नेतृत्व करण्यास समर्थ आहे, असा त्याने निर्णय दिला होता. नेतृत्वासाठी इतिहास, तत्त्वज्ञान, अर्थशास्त्र, विज्ञान, धर्मशास्त्र, समाजशास्त्र यांचा अभ्यास अवश्य असतो. कामगारांना असा अभ्यास करण्यास रिकाम वेळ मिळत नाही म्हणून कामगार चळवळीचे नेतृत्व ते करू शणकार नाहीत. असे कारण त्याने सांगितले होते.)
 तात्यासाहेबांनी बट्रांड रसेल या पंडिताचे असेच मत असल्याचे सांगून 'इन् प्रेज ऑफ आयडल्नेस' या त्याच्या लेखातला उतारा दिला आहे. तो म्हणतो, 'थोडे रिकामपण, थोडा विश्राम, सुलभ असलेला हा जो लहानसा वर्ग त्यानेच सर्व संस्कृती निर्माण केली आहे. याच वर्गाने कला जोपासल्या आणि विज्ञानाचे संशोधन केले. त्यानेच ग्रंथ लिहिले, तत्त्वज्ञाने उभारली, श्रेष्ठ समाजसंबंध प्रस्थापित केले. दलितसमाजाच्या स्वातंत्र्याच्या, मुक्तीच्या चळवळींना प्रारंभ यानेच केला आहे. या विश्रामसंपन्न वर्गाच्या अभावी मानवजात वन्य अवस्थेतून वर आलीच नसती.'
 जीवनाच्या एका थोर भाष्यकाराने बुद्धिजीवी मध्यमवर्गाचे मानवी जीवनात, मानवी इतिहासात स्थान काय, ते सांगून त्याची अशी महती गाईली आहे. विद्या, तत्त्वज्ञान हे त्याचे धन आहे व साहित्य हे त्याचे शस्त्र आहे. यांनी सन्नद्ध असल्यामुळे नवी सृष्टी, नवी दृष्टी व नवी तुष्टी समाजात निर्माण करण्याचे सामर्थ्य त्याच्या ठायी निश्चित आहे. आज अनेक कारणांमुळे या आत्मज्ञानाचा त्याच्या ठायी लोप झालेला आढळतो. साहित्याने जे समाजाचे प्रबोधन करायचे, ते त्याच्या हातून होत नाही असे दिसून येत आहे. अशा वेळी साहित्यातील क्रांती, साहित्याचे कार्य, साहित्यापासून होणारा आनंद व साहित्य आणि जीवन यांचा घनिष्ठ संबंध, यांविषयी तात्यासाहेबांनी केलेले भाष्य त्याने अभ्यासले, तर सध्याच्या विपत्तीतून त्याला मार्ग सापडेल असा विश्वास वाटतो.