कानोसा भारतातील मुस्लिम मनाचा/मुंबईकर मुसलमान

मुंबईकर
मुसलमान


 सन १९४६. सकाळची वेळ. ग्रँट रोडहून पायधुनीकडे जाणाऱ्या १६ नंबरच्या ट्रामच्या रस्त्याने मी एकटा चाललो होतो. ट्रामची मला माहिती नव्हती. मी तेव्हा चौदा वर्षांचा असेन. मी घरातून पळून मुंबईला आलो होतो आणि उपनगरातील एका नातेवाइकाकडून भेंडी बाजारात राहणाऱ्या नातेवाइकाकडे चाललो होतो.
 आदल्या दिवशीच हिंदू-मुसलमानांचा दंगा सुरू झाला होता, परंतु माझ्या ते गावीही नव्हते. घरातून पळून आल्याच्या अपराधी जाणिवेने मी अस्वस्थ होतो. आपल्याच विचारांत गढून गेल्यासारखा रस्त्याने चालत होतो. रस्त्याने तुरळक माणसे चालली होती. मला वाटते, ट्राम बंदच होती. पोलिसांच्या गाड्या फिरत होत्या. रस्त्यावरही पोलीस उभे होते. गोलपिठ्यापाशी रस्त्यावर काचांचा आणि सोडा वॉटरच्या फुटलेल्या बाटल्यांचा खच पडला होता. मी पुढे गेलो आणि गोल देवळापाशी आलो, तेव्हा समोर हजारोंचा (हिंदूंचा) जमाव पाहून थबकून उभा राहिलो. तो जमाव देवळापाशी भेंडी बाजाराच्या दिशेने तोंड करून उभा होता. समोर काही अंतरावर मुसलमानांचा तेवढाच जमाव क्रुद्ध होऊन उभा ठाकला होता. या दोन जमावांच्या मधे रस्त्यावर कुणी चिटपाखरूदेखील वावरत नव्हते. तेवढा रस्त्याचा भाग निर्मनुष्य, ओसाड भासत होता. दंगा म्हणजे काय, हे मला तेव्हा कळले! आपण हजारो हिंदूंच्या जमावात एकटे उभे आहोत, याची कल्पना येताच माझ्या अंगावर भीतीचा काटा उभा राहिला. मी भेदरल्यासारखा काही वेळ तिथेच रेंगाळत उभा राहिलो. एवढ्यात कुठून तरी पोलिसांच्या लॉऱ्या भरभरून आल्या आणि त्यांनी जमावाला पांगवायला सुरुवात केली. मी तिथून मागे वळलो आणि चालत ग्रँट रोडला परतलो.
 आता अठरा-एकोणीस वर्षांचा काळ लोटल्यानंतर हिंदू आणि मुसलमान वस्तीला अलग करणारी गोल देवळाजवळची ती निर्मनुष्य वस्तीची रेषा पुसली गेली आहे. मुंबईत गेली अठरा वर्षे तरी हिंदू-मुसलमानांचा दंगा झालेला नाही. पूर्वी हिंदू स्त्रिया ग्रँट रोडहून क्रॉफर्ड मार्केटकडे जाताना पायधुनीहून जाणाऱ्या १६ नंबरच्या ट्रामला बसत नसत, असे एका जुन्या ट्राम कंडक्टरने मला सांगितले. त्या स्त्रिया १० नंबरच्या ट्रामने जे. जे. इस्पितळापाशी येऊन दुसरी ट्राम पकडत असत. आता भेंडी बाजारच्या रस्त्यांतून त्या बिनदिक्कत वावरताना दिसतात.
 मुंबईतील मुसलमान वस्त्याही आता निर्भेळ मुसलमानांच्या राहिलेल्या नाहीत. पाकिस्तानला गेलेल्या अनेक मुसलमानांची स्थावर मालमत्ता पाकमधून आलेल्या निर्वासितांना दिली गेली. मांडवी पोस्टाकडून महंमदअली रोडने क्रॉफर्ड मार्केटकडे जाऊ लागलो की, काही इमारतींत आता सिंधी (हिंदू) राहताना दिसतात. परंतु यामुळे या मुसलमान वस्तीचा वेगळेपणा नष्ट झालेला नाही. या सिंधी हिंदूला आपण वेगळ्या वस्तीत राहतो आहोत, असे वाटत नाही. महंमदअली रोडवर राहणाऱ्या एका सिंधी हिंदूला मी मुसलमान असल्याचे बरेच दिवस माहीत नव्हते. परंतु, एक दिवस सहज बोलता-बोलता माझ्या मुसलमानत्वाचा पत्ता लागल्याने तो सद्गदित होऊन उद्गारला, “फिर तो तुम हमारे भाईही निकले!" बहुधा या त्यांच्या सर्वसमावेशक वृत्तीनेच या वस्तीचे स्वरूप कायम राहिले आहे.
 भेंडी बाजार हे मुसलमानांच्या राजकीय चळवळीचे एके काळी केंद्र होते, असे म्हटल्यास अतिशयोक्ती वाटण्याचे कारण नाही. जीनांना मुसलमानांचे एकमुखी नेतृत्व भेंडी बाजारनेच मिळवून दिले. पाकिस्तानची चळवळ इथेच पोसली गेली, वाढली. या वस्तीतील मेमन, खोजा या धनिक, व्यापारी जमातींनी जीनांना पैशांचे पाठबळ पुरवले. हबीब बँक येथेच जन्माला आली आणि पुढे पाकिस्तानच्या निर्मितीनंतर पाकची राष्ट्रीय बँक बनली. इथल्याच केसरबागच्या मैदानावर द्विराष्ट्रवादाचा जीनांचा संदेश मुसलमानांनी ऐकला आणि कायदे आझम जीना जिंदाबाद' व 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणांनी तेथील आसमंत एके काळी दणाणून गेला. पुढे होऊ घातलेल्या पाकिस्तानची भेंडी बाजार ही एक प्रकारे परक्या भूमीवरील (इन् एक्साइल) राजधानी होती!
 अनेक वर्षे राष्ट्रीय चळवळीत घालवलेल्या एका मुसलमान नेत्याने जीनांच्या केसरबागेतील एका सभेच्या वेळी घडलेल्या प्रसंगाची कथा मला सांगितली होती.

 जीनांच्या सभांचा खाक्या नेहमी ठरलेला असे. सभेच्या व्यासपीठावर दोन्ही

मुंबईतील भेंडीबाजार : १९५० चे दशक


बाजूंनी चाँदतारा असलेली लीगची हिरवी निशाणे फडकत असायची. मुस्लिम नॅशनल गार्ड्सचे स्वयंसेवक जीनांना ‘खडी ताजीम' द्यायला सज्ज उभे असत. व्यासपीठानजीक सर्वांत पुढे वृत्तपत्र प्रतिनिधींची बसायची व्यवस्था केलेली असे. त्यांच्या मागे आमंत्रित व नंतर जनसमुदाय असा क्रम ठरलेला असे.
 परंतु, त्या दिवशी या व्यवस्थेत काही तरी चूक झाली. आमंत्रित पुढे बसले आणि वृत्तपत्र प्रतिनिधींची व्यवस्था त्यांच्या मागे करण्यात आली. ही चूक आधी कुणाच्या लक्षात आली नाही. जीना नेहमीप्रमाणे व्यासपीठावर येऊन दाखल झाले आणि त्यांनी खाली दृष्टी टाकली; परंतु त्यांना वृत्तपत्र प्रतिनिधींचे नेहमीचे चेहरे दिसले नाहीत. व्यासपीठावर उपस्थित असलेल्या चुंद्रीगरना त्यांनी संतप्त होऊन विचारले, “मिस्टर चुंद्रीगर, व्हेअर इज द प्रेस? आप क्या समझते है, मैं इन बेवकूफ मुसलमानोंके सामने तकरीर करने आया हूँ? आय वाँट प्रेस!"
 झालेला प्रकार चुंद्रीगर यांच्या तेव्हा लक्षात आला आणि त्यांनी जीनांची कशी तरी समजूत घातली. काही वेळाने जीना शांत झाले. मग आम जनसमुदायापुढे ते 'तकरीर' करावयास उभे राहिले. 'कायदे आझम जीना जिंदाबाद'च्या आरोळ्या हवेत उठल्या. जीना भाषण करू लागले आणि ते पहिलेच वाक्य म्हणाले ते असे, “काँग्रेसवाले कहते है मुसलमान बेवकूफ है।"
 जीनांचे आधीचे संतप्त उद्गार आमंत्रितांतील काही मुसलमानांनी ऐकले; पण जनसमुदायाला काही ते ऐकू आले नाहीत. परंतु माईकवर जीनांनी जोराने ओरडून 'तुम सब मुसलमान बेवकूफ हो!' असे जरी सांगितले असते, तरी मुसलमानांनी ते भाषण शांतपणे ऐकले असते- नव्हे, त्यानंतर कायदे आझम जीना जिंदाबाद'च्या घोषणाही दिल्या असत्या.
 इतकी चमत्कारिक कडवी निष्ठा मुसलमानांत कशी निर्माण झाली, याचा विचार करूनही मला उलगडा झालेला नाही आणि तो विचार करणे एका अर्थाने व्यर्थही आहे. हिटलरवर जर्मनांची का निष्ठा होती? हिटरलने जर्मनीचा विनाश केला, असे वाटूनही त्याच्याविषयी आदर बाळगणारे काही जर्मन लोक अजून आहेत. त्याचप्रमाणे पाकिस्तानच्या निर्मितीनंतर आलेल्या एका वैफल्याच्या आणि नैराश्येच्या लाटेतही मुसलमान समाजात जीनांविषयीची निष्ठा अद्यापही कायम आहे. या राजकीय प्रवाहापासून वेगळा राहिलेला माझ्यासारखा मनुष्य जेव्हा भेंडी बाजारातून वावरू लागतो, तेव्हा 'ट्रायल ॲट न्यूरेन्बर्ग' चित्रपटातील अमेरिकन न्यायाधीशाप्रमाणे केसरबागेच्या मैदानात जीनांचा आवाज घुमत असलेला त्याला ऐकू येऊ लागतो. त्या आवाजाला, त्या मार्गदर्शनाला, त्या एकमुखी नेतृत्वाला आपण वंचित झालो असल्याच्या जाणिवेची उदासीनता तेथील मुसलमानांच्या चेहऱ्यावर पसरलेली त्याला दिसू लागते.
 परंतु, काळाच्या गतीने आता तिथे काही बदल होऊ लागले आहेत. औद्योगिकीकरणाच्या एका प्रचंड प्रक्रियेने एकसंच मुसलमान समाजाचे विघटन सुरू झाले आहे. कामगारांचा, नोकरी करणाऱ्या पांढरपेशा सुशिक्षितांचा, श्रीमंत व्यापाऱ्यांचा आणि मुंबईच्या तथाकथित कॉस्मोपॉलिटन संस्कृतीचे वारे लागलेल्यांचा- असे वेगवेगळे सामाजिक वर्ग मुसलमानांत निर्माण झाले आहेत. त्यांतील पाश्चात्त्य शिक्षणाचे वारे लागलेले लोक कुलाब्यापासून मलबार हिलपर्यंत पसरलेल्या सुखवस्तू वस्तीत राहणे पसंत करतात. ते घरात काट्या-चमच्याने जेवतात. आपसांत (घरातून) इंग्रजी बोलतात. त्यांची मुले कॉन्व्हेंटमध्ये शिकतात. हे लोक कुठल्याही मुसलमान वस्तीत राहणे कमीपणाचे समजतात आणि आपण खरोखरीच कॉस्मोपॉलिटन झालो आहोत, असा स्वत:चा समज करून घेतात. कामगार कुठल्याही वस्तीत राहतो आणि तरीही आपल्या चालीरीतींचे जतन करतो. पांढरपेशा वर्गाची मात्र कुचंबणा होत असते. तो आपल्या मुसलमान वस्तीतूनच राहत असतो (इतर वस्तीतून त्याला सहजासहजी जागा मिळतही नाही.) आणि आपल्या मुलांवर शिक्षणाचे, चांगल्या वागणुकीचे संस्कार करावेत, असे त्याला वाटत असते. शिक्षणाचे महत्त्व आपल्याला (म्हणजे मुसलमानांना) कळत नाही, म्हणून तो हळहळत असतो. कधी स्वत:ला, आपल्या मुलांना इतरांपासून अलग ठेवण्याचा तो प्रयत्न करतो.
 परंतु, इतर सर्वसामान्य मुसलमानाला त्याची भीती वाटत नाही. तो मोहरमचा 'ताजा' तितक्याच उत्साहाने काढतो, गौसचे पंजे देहभान विसरून मिरवतो. सणासुदीला घरांना कसला तरी रंग फासतो. पैसे नसले तरी कर्ज काढून मुलांना नवी विजार आणि खमीस शिवतो. ईदच्या दिवशी गळ्यात रंगीबेरंगी रुमाल आणि कानात अत्तराचा फाया लावून आपल्या नातेवाइकांना व मित्रांना भर रस्त्यात 'ईद मुबारक' म्हणून कडकडून मिठी मारतो. धार्मिक सोहळ्याच्या या उत्साहात नागरी रीती-रिवाजांना फारसे महत्त्व द्यायच्या भानगडीत तो पडत नाही!
 भेंडी बाजार किंवा मदनपुरा अशांसारख्या वस्तींची तुलना न्यूयॉर्कमधील 'हार्लेम' या निग्रोंच्या वस्तींशी करता येणार नाही. हार्लेम हा अमेरिकेच्या सामाजिक जीवनाला मिळालेला शाप आहे. हार्लेममध्ये निग्रो मान ताठ करून चालतो. 'इथे माझी सत्ता चालेल', असे त्याच्या वागण्यातून प्रतीत होत असते. तोच निग्रो गोऱ्या वस्तीत एक प्रकारच्या न्यूनगंडाने पछाडला जातो. मुसलमान मात्र कुठेही मुसलमान असल्याच्याच भावनेने वागतो आणि भेंडी बाजारात त्याची मान अधिकच ताठ होते! कारण त्याच्या धार्मिक कडवेपणातच त्याचे व्यक्तिमत्त्व सामावलेले असते. अमेरिकेतील 'ब्लॅक मुस्लिम' या जहालवादी निग्रो पंथाच्या उदयाचे मूळ या वस्तुस्थितीतच शोधले पाहिजे.
 मुंबईतच आता एका विशिष्ट विभागांतच मुसलमान राहत नाहीत. मुंबईच्या वाढत्या पसाऱ्यात मुसलमान वस्त्यांची अनेक ठिगळे कानाकोपऱ्यांत निर्माण झाली आहेत. अनेक ठिकाणी उभ्या राहिलेल्या गलिच्छ झोपडपट्ट्यांतील किमान अर्धे रहिवासी मुसलमान आहेत. मुसलमान समाजाच्या आर्थिक अवस्थेचे प्रतिबिंबच या वस्त्यांतून उमटून राहिलेले आहे.
 एके काळी कोकणी मुसलमानांची संख्या (मुसलमानांमध्ये) मुंबईत सर्वांत जास्त होती. भेंडी बाजारचा डोंगरी विभाग किंवा वांद्रयाची नौपाडा वस्ती त्यांच्या आता एके काळच्या वस्त्यांच्या खुणा म्हणूनच शिल्लक उरल्या आहेत. परप्रांतीयांचे लोंढेच्या लोंढे मुंबईत येऊ लागले, त्यांत परप्रांतीय मुसलमानही प्रचंड संख्येने येऊ लागले. बिहार, उत्तर प्रदेश, गुजरात व मलबार येथून आलेल्या मुसलमानांचाच आता मुंबईत गजबजाट झाला आहे आणि कोकणातला अथवा महाराष्ट्रातील मुसलमान शोधूनही सापडणे मुश्कील झाले आहे; आणि जे राहत आहेत, ते स्वत:चा वेगळेपणा गमावून बसले आहेत! त्यांनी स्वत:ची मराठी भाषा सोडून उर्दू आत्मसात केली आहे. उत्तर प्रदेशच्या मुसलमानांचे आचार-विचार, राहणी त्यांनी स्वीकारली आहे. मराठी मुलुखांतील कुणी मुसलमान भेटला, तरी ते त्याच्याशी शक्यतो मराठीतून बोलायचे टाळतात आणि माझ्यासारख्या एखाद्याने मराठीतून बोलायचा आग्रह धरलाच तर, 'अरे भाई, मियाँभाई मिलते है तब आपस में उर्दूमें ही बात करते हैं।' असे सांगून गप्प करण्याचा प्रयत्न करतात. गुजराती मियाँभाई मात्र त्यांच्याशी उर्दूतूनच बोलतो. त्यांच्या घरात गुजराती बोलली जाते, याचाही त्यांना सोइस्कर विसर पडलेला आहे.
 हा प्रांतीय अथवा जमातीचा अलगपणा मुसलमान समाजात अद्यापही कायम राहिला आहे. खोजा, मेमन, बोहरी यांच्या मशिदीही वेगळ्या बांधलेल्या आहेत. (बोहऱ्यांच्या मशिदीत दुसरा कुणी नमाज पढत नाही आणि बोहरी दुसऱ्याच्या मशिदीत नमाजेला येणार नाही.) पूर्वीच्या 'इस्लामी' जगताचे प्रतिनिधी म्हणून क्रॉफर्ड मार्केटजवळील सुप्रसिद्ध जुम्मा मशिदीची, माहिमच्या मशिदीची व्यवस्था कोकणी मुसलमानांकडे राहिलेली आहे. ईदच्या दिवशी ते त्या मशिदीकडे नमाजेला वळतात. कारण त्यांच्या मजहबप्रमाणे (शाफी, हनफी इत्यादी) तेथे नमाज पढली जाते.
 खोजा, मेमन आणि बोहरी या धंदेवाईक जमातींनी मुंबईच्या व्यापारी जगतात आपले स्थान निर्माण केले आहे. त्यातील खोजा व्यापाऱ्यांनी दाणाबंदरच्या धान्याच्या व्यापारात आपला जम बसवला आहे; तर बोहऱ्यांनी कागद, ग्लास इत्यादी उद्योगांत एक प्रकारची मक्तेदारी प्रस्थापित केली आहे. फाळणीनंतर आलेल्या सिंधी जमातीने सर्वच प्रकारच्या व्यापारांत आपले बस्तान बसवले, त्याचा परिणाम या जमातीवर झाला आहे. प्रचंड भांडवली उद्योगधंद्यांचे एक नवे क्षेत्रच मुंबईत विकसित होऊ लागल्याने व्यापारातही आता मुसलमान मागे पडत चालला आहे, अशा प्रकारची तक्रार या जमातीकडूनच करण्यात येते. यातील बोहरी जमात राहणीने आणि आचाराने इतरांहून भिन्न तर आहेच, परंतु आपला अलगपणा कायम ठेवण्यसाठी ती सतत धडपडत असते. त्यांच्या स्त्रियांचा वेगळ्या पद्धतीचा बुरखा ही त्या अलगपणाची एक ढळढळीत निशाणी!
 रांगा लावण्याची पद्धत मुंबईत युद्धकाळात अस्तित्वात आली. बसला रांग लावणे, हा मुंबईत एक सर्वमान्य प्रकार होऊन बसला. परंतु नागरी रीती-रिवाजांची फारशी तमा न बाळगणाऱ्या मुसलमान वस्तीत बसकरता रांग लावली जात नाही, याचे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही! क्रॉफर्ड मार्केटपासून जे. जे. इस्पितळाच्या नाक्यापर्यंतच्या कुठल्याही बसस्टॉपवर बसकरता व्यवस्थित रांग लावलेली तुम्हाला दिसून येणार नाही. इथे माणसे बसस्टॉपवर घोळका करून उभी असतात आणि बस येताच आत जाण्याकरता एकच गर्दी करतात! त्या हाणामारीत बुरख्यातील स्त्रियाही तितक्याच जोरकसपणे भाग घेताना दिसतात. या विभागातील ड्युटीला बसचा मुसलमान कंडक्टरदेखील कंटाळलेला असतो. बेशिस्त जमावाला तोंड देताना त्याला दिवसभर नकोसे होऊन जाते. या विभागातील प्रत्येक बसस्टॉपवर पाकिटमारांचे घोळके उभे असल्याचे त्याला माहीत असते. या बेशिस्तीचा फायदा घेऊन हे पाकिटमार मिळेल ती वस्तू मारतात आणि कधी कुणी सावध गि-हाइकाने आरडाओरडा केलाच, तर चट्कन चाकू काढून त्याच्या छातीवर रोखतात!
 'रामपुरी चाकू' नामक प्राणघातक शस्त्राची मुंबईत आयात रामपूरच्या मदनपुरा विभागात राहणाऱ्या मुसलमानांनीच केली!
 सन १९२८-३० च्या सुमारास मुंबईत पठाणांची दादागिरी बोकाळली होती. ते सावकारी करत, तसेच दादागिरीही करत. रामपुऱ्यांनी त्यांना आपल्या चाकूचे पाणी दाखवून सळो की पळो करून सोडले. पठाणांनी दादागिरीचा धंदा सोडून फक्त सावकारी धंदा करायला सुरुवात केली आणि त्यांच्या दादागिरीचा वारसा रामपुऱ्यांनी उचलला. तो फार काळ टिकला नाही, परंतु त्यांच्या चाकूने मात्र मुंबईतल्या गुंडजगताला एक सर्वमान्य हत्यार मिळवून दिले. अशा प्रकारच्या दादांचा आणि गुंडांचा एके काळी मदनपुरा हा अड्डा बनला होता. तडीपार केलेले अनेक लोक पूर्वी मदनपुऱ्यात उघड वावरत असत. जवळच्या वेश्या-वस्तीमुळे वेश्यांचे दलाल आणि अफू, गांजा इत्यादी मादक पदार्थांचा धंदा करणारे या विभागात वावरत. आता त्यांचे प्रमाण कमी झाले असले, तरी रात्रीच्या वेळी एखादा फेरफटका मारल्यास गांजा भरलेल्या चिलमीचा फुटपाथवर बसून आस्वाद घेणारे तुम्हाला अद्यापही आढळतील.
 मदनपुरा ही उत्तर प्रदेशच्या मुसलमानांची मुंबईतील वसाहत आहे. त्या वस्तीचे पूर्वीचे स्वरूप आता राहिलेले नाही. उत्तर प्रदेशचे हे मुसलमान वेगवेगळ्या विभागांतून आलेले आहेत. त्यातील अल्प सुशिक्षित तेवढे अस्खलित उर्दू बोलतात; बाकीचे सारे आपापल्या विभागातील पुरभी, उत्तरी, अवधी, मगधी, भोजपुरी इत्यादी हिंदीच्या बोलीतून बोलतात. 'इन्किलाब', 'उर्दू टाइम्स' इत्यादी उर्दू वर्तमानपत्रे ते वाचतात. ते गिरण्यांतून, कारखान्यांतून किंवा जवळच्या कापडाच्या मागांतून काम करत असतात. ट्रेड युनियनचे राजकारण या विभागात चालत असते. ज्या पक्षांच्या कामगार संघटना असतात, त्या पक्षांना त्यांची निष्ठा वाहिलेली असते. उर्दूला मराठीप्रमाणेच राज्यभाषेचा दर्जा मिळाला पाहिजे, याकरिता याच विभागातून एखादा 'जुलूस' निघतो. फेरीवाल्यांच्या संघटनेसारख्या संघटनेचे मोर्चे येथीलच झूला नामक मैदानावरून निघत असतात आणि त्या मोर्चाचे रसभरीत वर्णन वाचण्यासाठी मग कधी कधी ते 'मराठा'सारखे मराठी वृत्तपत्र वाचताना (किंवा वाचून घेताना) आढळतात! उत्तर प्रदेशच्या समाजजीवनातील सारे स्तर या विभागात एकवटले गेले आहेत. त्यांत चर्मकार आहेत, न्हावी आहेत, धोबी आहेत आणि मागावर काम करणारे व कबीराचा वारसा सांगणारे अन्सारही आहेत! मात्र आपल्या या वस्तीत इतरांना (मुसलमानांनाही) ते टिकू देत नाहीत. मदनपुऱ्याला भेंडी बाजार लागून असला तरी त्याच्या या स्वभावाशी तो अजून जुळते घेत नाही. झूला मैदान आणि केसरबाग हे इवलेसे अंतर पार केले की, लागलीच हा बदल जाणवतो. मग 'डॉन', 'अन्जाम'सारखी पाकिस्तानी वृत्तपत्रे भेंडी बाजारच्या नाक्यावरील वृत्तपत्र एजंटकडे लटकलेली आपल्याला दिसून येतात.
 गुमास्ता या विभागात कायदा अस्तित्वात नाही. इथली सलूने, हॉटेले आणि इतर दुकाने रात्री उशिरापर्यंत उघडी असतात. त्यांची सजावट वेगळी, भडक असते. येथील हॉटेले असंख्य आरश्यांनी व ट्यूबलाईटच्या दिव्यांनी रात्रीची झगमगून गेलेली असतात आणि दिवसभर चित्रपट-संगीत कर्णकर्कशपणे आपल्या कानांवर आदळत असते. इराणी हॉटेलवाला या विभागात अभावानेच दिसून येतो. कारण सकाळचा नुसता चहा-पाव खाऊन मुसलमानांचे कधी समाधान होत नाही. त्याला भरपूर नाश्ता हवा असतो म्हणून की काय, येथे चिलियांची हॉटेले आढळतात आणि त्या हॉटेलांमधून मोगलाई पद्धतीचे जेवण सर्रास मिळते. शीग हा भाजलेल्या गोमांसाच प्रकार याच विभागात रस्त्यांवर विक्रीकरता सर्रास ठेवलेला असतो.
 हॉटेलमधून गोमांस सर्रास विकले जाते आणि घराघरांतून गोमांसाची विक्री करणारे लोक याच विभागात वावरत असतात. 'बडेका गोश सस्ता मिलता है' हे उत्तर तुम्ही थोडीशी चौकशी केल्यानंतर तुम्हाला देण्यात येते. गाई-म्हशींची बेकायदा कत्तल करून त्यांचे मांस विकणाऱ्या टोळ्या याच भेंडी बाजार-मदनपुरा विभागांत अस्तित्वात आहेत. हिंदूंच्या भावना दुखवाव्यात, म्हणून ते हा धंदा करीत नाहीत. एखाद्या ख्रिश्चनाने जितक्या सहजपणे हातभट्टीचा व्यवसाय करावा तितक्या सहजपणे त्यांनी हा व्यवसाय उचलला आहे आणि बोरिवली, घाटकोपरपासून कुलाब्यापर्यंत कुठेही त्यांनी आपल्या कार्याचा पसारा व्यापला आहे. अत्यंत कठोरतेने ते आपला उद्योग पार पाडतात. भटकणारी गुरे हे त्यांचे भक्ष्य. त्यांची 'मोडस ऑपरेंडी' वाखाणण्यासारखी असते. दहा मिनिटांत ते एका गाईचा (अथवा म्हशीचा) सोक्षमोक्ष लावतात. शस्त्रक्रिया करणाऱ्या शस्त्रवैद्यालाही हेवा वाटावा एवढ्या कुशलतेने गुरे फाडतात, मांस अलग करतात आणि उरलेला भाग फेकून देतात. आपल्या बरोबर बहुधा जीपसारखे एखादे वाहन बाळगतात. तिच्यात 'माल' टाकून ते क्षणार्धात नाहीसे होतात.
 पाकिस्तानच्या निर्मितीनंतर सावकारी करणारे पठाण मुंबईतून काही काळ अदृश्य झाले होते; परंतु कालांतराने ते पुन्हा उगवले आणि आता मुंबईतील नाक्या-नाक्यावर त्यांचे अस्तित्व जाणवू लागले आहे. पठाणांकडून कर्ज घेणाऱ्या लोकांत या पठाणी सावकारीला ‘पठाण बँक' असे विनोदाने संबोधले जाते. हे सारेच पठाण पुश्तु नाहीत. त्यांच्यात अफगाण पठाणांचाही प्रचंड भरणा आहे. शिवडीसारख्या ठिकाणी त्यांनी आपला अड्डा बनवला आहे. ते नमाज पढणे, रोजा पाळणे इत्यादी इस्लामी तत्त्वे काटेकोरपणे पाळतात; परंतु त्याचबरोबर निषिद्ध मानल्या गेलेल्या व्याजाच्या धंद्यावरच आपली उपजीविका करत असतात. अशा प्रकारचे धंदा करणारे सुमारे पाच हजार परदेशी पठाण मुंबईत विखुरलेले आहेत आणि त्यातील निम्मे-अधिक गुप्तपणे किंवा बेकायदा इथे राहिलेले आहेत.
 मुसलमानांची वस्ती मुंबईत सर्वत्र विखुरली गेली आहे; त्याप्रमाणे मुसलमानांचे एकमुखी सामाजिक, राजकीय आणि धार्मिक जीवन भंग पावले आहे. पूर्वी 'झटका' पद्धतीने बकरे मारावे की नाही, यावर (मुसलमानांत) वाद उद्भवत नसे. मुसलमान त्या प्रकाराविरुद्ध एकवटलेले आढळत, परंतु आता त्यावर वाद होतो. द्विभार्या-प्रतिबंधक कायदा, बुरख्याची पद्धत या बाबतीत आपसांत कडाक्याची चर्चा होते. पाकिस्तानी प्रवृत्तीचे समर्थक आणि विरोधक कडाक्याने राजकीय चर्चा करतात; इतकेच नव्हे, तर इस्लामच्या धार्मिक दृष्टिकोनातून त्या प्रवृत्तींचे पृथक्करण करू पाहतात. दाऊदी बोहऱ्यांच्या बड्या मुल्लांविरुद्ध प्रागतिक मंडळासारखी संस्था या मुंबईतच चळवळ उभारते.
 अशा या मतामतांच्या गलबल्यातच राष्ट्रीय चळवळीत सारे जीवन घालवलेली आणि म्हणून मुस्लिम सामाजिक जगतापासून अलग पडलेली हॅरिस, फकी यांच्यासारखी माणसे एखाद्या अफाट महासागरात जेमतेम तग धरून राहिलेल्या इवल्याशा बेटाप्रमाणे वावरत असतात. इस्लामच्या पुनरुत्थानाच्या कार्याशी त्यांनी केलेला 'द्रोह' मुसलमान समाज अद्यापही विसरलेला नाही.
 शौकतुल्ला नावाचा उत्तर प्रदेशाचा एक वृद्ध मला नेहमी भेटत असतो. हाही या राष्ट्रीय परंपरेतील माणसांच्या मालिकेतला. आता तो थकला आहे. काही वेळ झाल्यानंतर दम घेण्यासाठी तो रस्त्यातच थांबतो. गांधीजींच्या असहकारितेच्या चळवळीत त्याने उडी ठोकली, तेव्हापासून मांसाहार वर्ज्य केला. या साऱ्या गडबडीत त्याला लग्न करायचीही शुद्ध राहिली नाही! मुसलमान समाजापासून बहिष्कृत झालेला हा माणूस एखाद्या प्रचंड प्रवाहात धारेला लागल्याप्रमाणे कुठे तरी वाहत राहिला...
 परंतु आता जराजर्जर झाला असला, तरी घालवलेल्या आयुष्याबद्दल त्याला कधी खेद वाटत असलेला मला दिसून आलेला नाही. कधी खेद वाटत असलेला मला दिसून आला नाही.त्याच्या डोळ्यांत ते पूर्वीचे दुर्दम्य निष्ठेचे पाणी अद्यापही चमकताना मला दिसते. गांधीजींच्या 'हरिजन' पत्राच्या प्रती विकणे, हा त्याचा एक आवडता उद्योग होता. 'हरिजन' बंद पडले, तेव्हा तो ढसाढसा रडला आणि मग काही वेळाने शांत झाला. तेव्हा मुसलमान समाजातील जातीयतेचा धिक्कार करताना उद्वेगाने समोरच्या टेबलावर जोराने हात आपटून म्हणाला, “कंबख्त बदलते नहीं। अभी तक बदलते नहीं!" एका सबंध समाजाचे प्रसंगी अतिरेकी वागणे हे कडव्या धर्मनिष्ठेचे प्रतीक असले, तर त्या समाजाविरुद्ध उभ्या ठाकणाऱ्या शौकतुल्लांसारख्यांच्या निष्ठेचे मूळ ह्या कडव्या धर्मप्रवृत्तींतच असले पाहिजे!
 -आणि या मतामतांतल्या गलबल्यात भेंडी बाजारसारख्या मुसलमान वस्तीचे बेबंद जीवन सुरळीतपणे व्यतीत होते आहे. नव्या बदलाच्या खुणा जणू ते विसरण्याचा प्रयत्न करीत आहे. भेंडी बाजारचे हे प्रचलित स्वरूप आपल्या राष्ट्रीयत्वातील उणिवांचेच प्रतीक आहे, आपल्या राष्ट्रीयत्वाला गेलेल्या तड्याचे ते दुश्चिन्ह आहे.
 नेहरूंनी एकदा मुसलमानांशी जनतासंपर्क जोडण्याची घोषणा केली होती. नेहरूंच्या अनेक घोषणांप्रमाणे तीहीहवेत विरून गेली आणि मुसलमान इतर समाजापासून अलिप्तच राहिले. मुंबईच्या सर्व वस्त्यांत आता विखुरल्या गेलेल्या या समाजाचे अलिप्त जीवन आता हळूहळू संपुष्टात येत आहे. ते संपूर्णपणे नष्ट होईल आणि मुसलमान भारतीय जीवनात संपूर्णपणे सामावले जातील, तेव्हा राष्ट्रीय एकात्मतेचे भारताचे स्वप्न पुरे होईल. तोपर्यंत मात्र भेंडी बाजारसारखी मुसलमानांची वस्ती आपल्या राष्ट्रीयतेला गेलेल्या तड्याचीच जाणीव सतत देत राहणार आहे!

किर्लोस्कर मासिक :
 
जुलै १९६५
(मुंबई विशेषांक)