शब्द सोन्याचा पिंपळ/अस्वस्थ करणारं स्त्रीजीवन:‘आमच्या आयुष्यातील काही आठवणी'
श्रीमती रमाबाई रानडे यांनी लिहिलेल्या ‘आमच्या आयुष्यातील काही आठवणी' ही मराठीतील पहिली स्त्री-आत्मकथा मानली जाते. ती सन १९१० साली लिहिली गेली. त्या अर्थाने २०१० हे मराठी स्त्री आत्मकथेचे शताब्दी वर्ष होय. या आत्मकथेस गोपाळ कृष्ण गोखले यांची प्रस्तावना आहे. त्या प्रस्तावनेत गोखले यांनी ‘पत्नीने आपल्या पतीबद्दल अशा त-हेने लिहिलेला हा पहिलाच ग्रंथ हिंदुस्थानात आहे असे वाटते' म्हणून केलेली भलावण लक्षात घेता, या आत्मकथनपर ग्रंथाचे भारतीय साहित्याच्या दृष्टीने राष्ट्रीय व ऐतिहासिक महत्त्व सिद्ध होते.
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या रमाबाई या दुस-या पत्नी होत. न्यायमूर्तीचे पहिले लग्न त्यांच्या वयाच्या बाराव्या वर्षी झाले. ते एकतीस वर्षांचे असताना, त्यांच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला. न्यायमूर्ती पुरोगामी विचारांचे असल्याने, त्यांना दुसरा विवाह करावसाचा नव्हता; पण वडिलांचा शब्द प्रमाण मानून त्यांनी दुसरा विवाह केला. अल्पवयीन कुमारिकेशी विवाह केला, म्हणून त्या वेळी ते टीकेचे लक्ष्यही बनले होते.
या पुस्तकास रूढ अर्थाने स्त्री-आत्मकथन म्हणता येणार नाही. कारण यात रमाबाईंनी स्वतःबद्दल फारसे लिहिलेले नाही. या पुस्तकाचा नायक न्यायमूर्ती रानडे आहेत. नायिकेने त्याची कथा सांगितली आहे. संपूर्ण पुस्तक वाचताना एक गोष्ट लक्षात आल्यावाचून राहात नाही की, यातून ना न्यायमूर्ती रानडे यांचे संपूर्ण चरित्र वा जीवन स्पष्ट होते, ना रमाबाई रानडे यांचे. या उभयतांच्या जीवन प्रवासाची ही आंशिक कौटुंबिक कहाणी आहे. ती रमाबाईंनी आठवणींच्या स्वरूपात स्पष्ट केली आहे. त्या आठवणीसर्वच सांगितल्या आहेत, असे नव्हे. शीर्षकानुसार त्यातील 'काही'च आहेत. त्यामुळे या पुस्तकाची स्वतःची मर्यादा आहे व अपुरेपणही. असे असले तरी शंभर वर्षांपूर्वीचे समाजजीवन, स्त्री-पुरुष संबंध व त्यांचा दर्जा, कुटुंबपद्धती, विवाह-रीती, सामाजिक प्रतिष्ठेच्या कल्पना, सरंजाम, वाहतुकव्यवस्था, प्रशासन-पद्धती, स्त्री-शिक्षण, न्याय-व्यवस्था, भाषा, लेखनपद्धती अशा कितीतरी अंगांनी हे पुस्तक ‘शतकपूर्व समाज-चित्र' जिवंत करते. रमाबाई लग्नानंतर शिकल्या. सारे शिक्षण घरातच झाले. न्यायमूर्ती रानड्यांच्या सुधारक वृत्तीतून रमाबाईंचे जीवन कसे घडले, ते या पुस्तकातून समजते. त्या अर्थाने हे पुस्तक शतकपूर्व समाजजीवनाचा चालताबोलता इतिहास म्हटले, तर वावगे ठरू नये.
महात्मा गांधींचे राजकीय व सामाजिक जीवनाचे गुरू म्हणून आपण गोपाळ कृष्ण गोखल्यांकडे पाहतो. पण स्वतः गोखले न्यायमूर्ती रानडे यांना आपले गुरू मानत. आपल्या गुरुपत्नीची विनंती आज्ञा' मानून गोखले यांनी या आत्मपर ग्रंथास प्रस्तावना लिहिली आहे. त्यात त्यांनी न्यायमूर्ती रानडेंची ओळख महाराष्ट्रातील नानाविध चळवळींचे आद्य प्रवर्तक' व ‘अवतार पुरुष' म्हणून केली आहे. श्रीमती रानडे यांचे जीवन न्यायमूर्तीनी घडविले. पतिनिधनानंतर कृतज्ञतेपोटी त्यांनी या आठवणी संगतवार लिहिल्या असल्या, तरी त्यांना समग्र म्हणता येणार नाही. पतिवियोगानंतर अंतःकरणाचे सांत्वन करण्याच्या भावाने हे लेखन झाले आहे. श्रीमती रमाबाई रानडे यांचे जीवन व कार्य पाहाता, त्या केवळ गृहिणी नव्हत्या. पती निधनानंतर त्यांनी स्वतःस स्त्रियांच्या सेवेस वाहून घेतले होते. पंडिता रमाबाईंचा आदर्श त्यांच्यापुढे होता. लेडी डफरीन फंड, सेवासदन, शासकीय पाठ्यपुस्तक मंडळ, आर्य महिला समाज इत्यादींच्या माध्यमातून सदर पुस्तक लिहिण्यापूर्वी दशकभर तरी रमाबाई सक्रिय होत्या. पण त्याबद्दल त्यांनी या पुस्तकात अवाक्षर काढलेले नाही. न्यायमूर्ती रानडे यांनी तीन दशके महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाचे नेतृत्व केले. प्रार्थना समाज, सार्वजनिक सभा, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, दुष्काळ निवारण, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना यात न्यायमूर्ती रानडे यांचा सिंहाचा वाटा. पण श्रीमती रमाबाई रानडे यांनी पतीच्या या सामाजिक व राजकीय कार्याबद्दल मौन पत्करणेच पसंत केले. माझ्या दृष्टीने आत्मश्लाघा, आत्मप्रशंसा टाळण्याचाच तत्कालीन संस्कार यातून स्पष्ट होतो.वरील अंगानेही सदरचे पुस्तक आत्मकथेपेक्षा (Autobiography) आठवणीद्वारे (Reminiscences) आपले व पतीचे वैवाहिक जीवन, कौटुंबिक सौख्य चित्रित करण्याच्या दृष्टीनेच केलेले लेखन असावे असे वाटते. 'सावली'चे रूपांतर ‘स्वयंप्रकाशात होण्याची किमया या आयुष्यकहाणीतून समजते. शंभर वर्षांपूर्वीची स्त्री ही स्त्री-पुरुष समानतेचा विचार करू शकत नसली, तरी पुरुषांबरोबरीने आपण पुढे गेले पाहिजे, हा ध्यास खचितच तिच्या मनी होता. इंग्रजी समाज व साहित्यातून ही इच्छा तिच्या मनात रुजत होती. सोवळ्यातली स्त्री ‘ओवळी' होण्याची धडपड, प्रयत्न या कथेच्या ठायी ठायी आढळतात. त्यामुळे आज वाचतानाही त्या यातनांची जाणीव झाल्यावाचून राहात नाही व हेच लेखिकेच्या लेखनशैलीचे यश होय.
श्रीमती रमाबाई रानडे यांनी या पुस्तकात प्रारंभापासून शेवटपर्यंत कुठेही महादेव गोविंद रानडे यांच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. सर्वत्र त्यांचा उल्लेख ‘स्वतः' असा आहे. नावाचा उच्चार न करण्यातून पतीबद्दलचा व्यक्त होणारा आदर हा त्या वेळच्या स्त्रीमनाची ओळख करून देतो. हा चरित्र प्रपंच त्यांनी मन पवित्र करण्याच्या (मन हलके करण्याच्या) उद्देशाने केल्याचे पुस्तकाच्या प्रारंभीच्या तुकारामांच्या अभंगावरून स्पष्ट होते. पतीच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतची ही कहाणी या कहाणीस आपली साथसंगत कशी होती, हे रमाबाई कथन करतात. पति-जन्म, शिक्षण, संस्कार इत्यादी ऐकीव माहिती आधारे त्या स्पष्ट करतात.
‘आमच्या आयुष्यातील काही आठवणी'तून होणारे समाजदर्शन मोठे विलक्षणच. त्या वेळी मुलींना लग्न ठरल्याखेरीज नुसत्या पाहण्यासाठी पाठवण्याची चाल नव्हती. न्यायमूर्ती रानडे यांची धाकटी बहीण दुर्गा एकवीस वर्षांची होती. तिच्या लग्नाऐवजी वडील आपल्या पुनर्विवाहाबद्दल आग्रही असल्याचं वैषम्य त्यांच्या मनात होतं. व्रतस्थ (अविवाहित) राहण्याचा नियम स्त्री-पुरुष दोघांनाही समान असावा, असे सुधारक रानडे यांना वाटायचे. रंगरूपापेक्षा कुलिनतेवर जास्त लक्ष ठेवले तर तो संबंध अधिक सुखाचा होईल' हे रानड्यांचे म्हणणे आजही अनुकरणीय वाटते. आपण काय म्हणून मुलगी देण्याचा विचार केला आहे?' असा खडा सवाल सास-यास करणारे रानडे सुनावतात की, 'आपण जुन्या घराण्यातील जहागीरदार आहात. मी सुधारक असून पुनर्विवाहाच्या पक्षाचा आहे. तसेच, मी शरीराने धट्टाकट्टा दिसलो, तरी डोळ्यांनी, कानांनी अधू आहे. शिवाय मला विलायतेतूनजाऊन यावयाचे आहे. तेथून आल्यावर मी प्रायश्चित्त घेणार नाही. तेव्हा आपण या सर्व गोष्टींचा विचार करून काय ते ठरवावे. यातून रानडे यांची स्पष्टवादिता दिसते व लग्नाबद्दलची एक प्रकारची नाराजीही.
सन १८७३ ला न्यायमूर्ती रानडे यांचा हा दुसरा विवाह झाला. तो ‘यादी पे शादी' असा. वरात नाही, की व-हाड. लग्नास वडिलांशिवाय मुलीकडचे कोणी नव्हते. लग्नाला रजा घेतली नव्हती. हे वाचून आजही या सुधारकत्र्याचं अप्रूप वाटत राहतं. काळाच्या पुढे जाणारे म्हणून तर ते सुधारक ना! लग्नात त्यांनी लौकिक विधी किंवा उपचार करून घेतले नाही, फक्त वेदोक्त विधी. लग्नाच्या पहिल्या रात्री नववधूस दोन तास शिकवून आपल्यातील सुधारकास त्यांनी सिद्ध केले. न्यायमूर्ती रानडे यांची स्त्रीशिक्षणाची ही तळमळ, बांधिलकी केवळ लोकविलक्षण.
रमाबाई रानड्यांच्या बालपणी माहेरी पारंपरिक वातावरण होते. आठ वर्षांच्या वरील मुलींनी व माहेरवाशिणींनी वडिलांच्यासमोर ओटीवर (ओसरीवर) जायचे नाही. मुलींनी खेळ-गाणी म्हणायची नाही. लिहिण्यावाचण्याचे नाव नव्हते. विधवा शिकली की पापी होते असा समज. त्यामुळे विवाहापर्यंत रमाबाई निरक्षरच होत्या. त्यांच्या ‘आईस वीस अपत्ये झाली. पैकी सातजणेच काय ती वाचली' (पृ.२१) वाक्य आज वाचताना तत्कालीन स्त्रियांच्या नरकयातनांची जाणीव झाल्यावाचून राहात नाही. 'बायकांचा देव व गुरू सर्व काही पती आहे' असा गुरूमंत्र’ ‘वडीलच देत. (पृ.२२) यातूनही तत्कालीन स्त्री-पुरुष मानसिकता स्पष्ट होते. रमाबाईंना आपली आई ‘मैत्रीण' वाटायची. हे वाचून आज आश्चर्य वाटते अशासाठी की, त्या काळाच्या कशा पुढे होत्या. रमाबाईंची आई मुलांचा गोतावळा घेऊन अंगणात गोष्टी सांगत बसायच्या. आत्याबाई त्यांच्या कथाकथनाची चेष्टा करायच्या. म्हणायच्या, ‘एवढाल्या कथा त्यांना काय सांगत बसतेस? मोठ्या माणसांच्यासुद्धा त्या लक्षात राहावयाला कठीण पडतात. तेव्हा आई आत्याबाईंना समजावायची, ‘मला त्या कुत्र्या-मांजराच्या गोष्टी येत नाहीत. मी तरी काय करू? ...' पण मला वाटते की, 'चांगले बी आपले पेरीत असावे. जशी जमीन मिळेल, तसे ते मूळ धरील.' हे या ग्रंथातील लोकशिक्षण आजही तितकेच प्रस्तुत व महत्त्वाचे वाटते. पूर्वीचे लोक ‘शिक्षित नसले, तरी ‘शहाणे' खचितच होते, ही या ग्रंथाची देणगी. ती आपण सर्वांनी जपली, जोपासली पाहिजे.न्यायमूर्ती रानडे यांचा एक निःस्पृह न्यायाधीश म्हणून लौकिक होता. त्यांचे कोल्हापुरात बरेच वर्षे वास्तव्य होते. इथे त्यांचे परिचितही बरेच होते. तिथेच ते न्यायाधीश म्हणून काम करू लागल्यानंतर एका परिचिताचा मामला त्यांच्यासमोर होता. ते गृहस्थ घरी भेटण्यास आले. त्यांच्या वडिलांकडून त्यांनी न्यायमूर्ती रानडेंवर प्रभाव टाकला. वडिलांनीही भीड म्हणून शब्द टाकला. पण आपल्या वडिलांनाही ‘मी येथे कामावर आलो आहे. सर्व कोल्हापूर आपले आहे, जो तो येऊन आपल्या कामाबद्दल भीड घालील, असा प्रकार न झाला तर बरे' म्हणून सुनावणारे न्यायाधीश आज किती? असा प्रश्न मनात निर्माण झाल्याशिवाय राहात नाही.
न्यायमूर्ती रानडे यांनी रमाबाई शिकाव्यात म्हणून हरत-हेचे प्रयत्न केले. स्वतः तर शिकवत राहिलेच, पण वेळ मिळत नाही म्हणून शिक्षिका नेमली. स्वयंपाकात आपली पत्नी तरबेज व्हावी म्हणून सूपशास्त्राचे पुस्तक आणून दिले. बायकोने रोज वर्तमानपत्र वाचावे, म्हणून तिच्याकडून रोज बातम्या ऐकण्याचा रिवाज ठेवला. स्वारी दौ-यावर असायची. प्रत्येक गावी न्यायाधीश म्हणून समारंभाची निमंत्रणे असत. न्यायमूर्ती रानडे आवर्जून आपल्या बायकोस पाहुण्या म्हणून पाठवत. भाषणाची तालीम घेत. पंडिता रमाबाईंसारखं बायकोनं काम करावं, म्हणून त्यांच्या सभेस स्वतः घेऊन गेले. बायकोला गणित, हिशेबशास्त्र यावे, म्हणून घरच्या खर्चाची जबाबदारी सोपवली. पगार सुपूर्द केला. खर्चाचं पूर्ण स्वातंत्र्य दिलं, पण ते करताना पत्नीस हे सांगण्यास विसरले नाहीत की, ‘काटकसर व टापटीप शिकल्याने मनुष्याचे धोरण व चौकसपणा वाढतो.' हे सांगत असताना न्यायमूर्तीना त्या काळातही घसघशीत ८00 रुपये पगार होता. हे पाहिले म्हणजे संपत्तीची आजची उधळपट्टी व ओंगळ प्रदर्शन अस्वस्थ करते. त्या काळात ते खिशात एक छदामही बाळगत नव्हते. कपाटाला कुलूप नव्हते की जानव्याला किल्ली नव्हती हे विशेष.
रमाबाई सभा, समारंभात बोलू लागल्या. समारंभ घडवू लागल्या, पण त्यांनी स्त्री मर्यादा कधी ओलांडली नाही. एका समारंभात व्यासपीठावरील पाहुण्यांना फुले, तुरे घालण्याचा प्रसंग त्यांच्यावर आला. त्यांनी पाहुण्यांना फुले, तुरे दिले, पण हार घातला नाही. यात सभ्यता, मर्यादा दिसून येते. ती आज पुरुषांनी पाळण्याची वेळ येऊन ठेपली असल्याचे अनेक प्रसंगात लक्षात येते. रमाबाई सभा, समारंभात जात. घरच्या बायकांचे टोमणे त्यांना खावे लागत. 'तुम्ही सभेला जाऊन आला आहात, लुगडे बदलले आहे,तरीसुद्धा आमच्या घरात स्वयंपाकात पान वाढावयास घ्यायचे नाही. चटण्याकोशिंबिरीला किंवा तिखट-मीठालादेखील शिवायचे नाही. पुरुषांच्या (नव-याच्या) मांडीला मांडी लावून बसावे म्हणजे छान दिसेल!' असं सारं सहन करत त्या शिकल्या, सवरल्या नि सावरल्याही!
न्यायालयीन सेवेत असताना असिस्टंट स्पेशल जज्ज म्हणून त्यांची नाशिक, धुळे आदी ठिकाणी नियुक्ती होत राहिली. या पदासाठी फिरती स्वारी घेऊन दौरा काढावा लागे. त्याचा मोठा सरंजाम असे. त्याचे मनोज्ञ वर्णन पुस्तकात अनेक ठिकाणी सापडते. त्यातून त्या वेळची प्रशासन पद्धती, सरंजामी, मानमरातब, लवाजमा इत्यादींवर प्रकाश पडतो. रमाबाईंची लेखनशैली सूक्ष्म निरीक्षणातून चित्र जिवंत करण्याची आहे, हे कळते. स्वारी (दौरा) च्या वर्णनात त्या एके ठिकाणी लिहितात, “आदले दिवशी मुक्काम नेमला असेल तेथे सकाळी आठ-नऊ वाजता जाऊन उतरायचे. घोड्याच्या गाडीत आम्ही उभयता, एक शिपाई व कोचमन आणि त्या गाडीत सामान म्हटलं म्हणजे गादी, तक्क्या, दोन दफ्तरे, दऊत, फराळाचा डबा व पाण्याची सुरई इतके नेहमी बरोबर असे. मुक्कामाच्या जागी उतरल्याबरोबर, शिपायाचे काम म्हटले म्हणजे जवळपास झाडांची गर्द छाया असेल, तेथे गादी, तक्क्या , दऊत, दफ्तर मांडून ठेवायचे व ‘बसायची जागा तयार आहे' अशी येऊन वर्दी द्यायची. तोपर्यंत स्वतः (न्यायमूर्ती) गाडीतून उतरल्याबरोबर मुखमार्जनादी प्रातर्विधी करून उतरलेले ठिकाण आजूबाजूने मोकळे व कोरडे आहे, पिण्याचे पाणी वाहते व स्वच्छ आहे, असे स्वतः पाहून मग इकडे येऊन कामाला सुरुवात होई. बैलगाड्या आधीच थोडा वेळ आलेल्या असत किंवा त्यांची मुक्कामावर गाठ पडे. मी गाडीतून उतरल्याबरोबर बैलगाडीतील भांड्यांचे व साहित्याचे पेटारे काढवून जेथे स्वयंपाक करावयाचा असेल ती जागा बाईकडून झाडून घेऊन व सडा घालवून स्वच्छ करवी. मग भांडी व साहित्य काढून मोकळी झाल्यावर सांजा व तोंडी लावणे करून जिकडे बसणे झाले असेल तिकडे घेऊन जाई." (पृ - ८७, ८८)' ... या वेळी आमचेबरोबर पाच-सात शिपाई, पाच-सात कारकून, शिरस्तेदार, दोघे स्वयंपाकी, एक घरकामाचा ब्राह्मण, एक माझी बाई, गडी, हमाल, गाडीवाले मिळून पस्तीस-चाळीस माणसे होती. शिवाय सात बैलगाड्या, दोन तंबू, एक घोड्याची गाडी इतके खटले (लवाजमा) असे.' (पृ - ८७) अशी स्वारी पाहून लोक विचारत, कोणत्या राजाची स्वारी आहे? काळाचं भान देण्याचे विलक्षण सामर्थ्य रमाबाईंच्यालेखणीत आहे. या चित्र शैलीमुळे हे आत्मकथन आपणास त्या काळात केव्हा घेऊन जातं, कळत नाही.
स्त्री आत्मकथनाचा शतकभराचा प्रवास पाहता स्त्री शिक्षण, स्त्रीचे व्यक्तिमत्त्व, स्त्रियांचे समाजातील स्थान, स्त्री-पुरुष समानता, स्त्रीचं आर्थिक स्वातंत्र्य, स्त्रीची विकासातील भूमिका, स्त्रियांसंबंधीच्या मानसिकतेतील बदल अशा अनेक अंगांनी मराठी, हिंदी, इंग्रजी स्त्री आत्मकथनातून प्रतिबिंबित होणारं स्त्री जीवन आशेचे किरण देणारं असलं, तरी ते उमेद वाढवणारं खचितच नाही. स्वातंत्र्य, अस्तित्व, वा अस्मितांसारखी मूल्ये कधी कुणी देऊन मिळत नसतात. ती सततच्या संघर्षातूनच हाती येतात, हा जगाचा इतिहास पाहता स्त्रीस अजून किती चालावं लागणार? या विचारांनी मन विषण्ण होतं. अलीकडेच चंद सतरें और’ आणि ‘सतरें और सतरें' या हिंदीतील विख्यात नाटककार मोहन राकेश यांची पत्नी (तिसरी पत्नी ही लक्षात घेण्यासारखी की ठेवण्यासारखी गोष्ट!) अनिता राकेश यांनी लिहिलेल्या आत्मकथेचा मराठी अनुवाद ‘मी अनिता राकेश सांगतेय' या नावाने प्रकाशित झाला असून तो मी नुकताच वाचला. प्रा. रजनी भागवत यांनी तो विलक्षण स्त्री मानसिकतेनं चपखलपणे केला आहे. तो वाचताना किंवा ‘मला उद्ध्वस्त व्हायचंय', ‘नाच गं घुमा', ‘भोगले जे दुःख त्याला वाचत असताना प्रश्न पुन्हा फेर धरून उभे राहतात. गेल्या शंभर वर्षांतील स्त्री जीवनाचा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, कौटुंबिक आलेख वरचढ असला, तरी तो फसवा आहे. स्त्रीला विचार, आचार, निर्णयस्वातंत्र्य जोवर मिळणार नाही, तोवर तिचा विकास हा तकलुपी, वरवरचा, फसवाच राहणार. स्त्री-पुरुष समतेच्या विचाराचा मार्ग हा समानलक्षी बदलाच्या पुरुषी मानसिकतेतून जोवर प्रशस्त होणार नाही, तोवर खरी स्त्री-समानता अवतरणार नाही, हे आपण लक्षात घ्यायला हवं.
प्रश्न आरक्षणातून सुटत नसतात. आरक्षण ही तात्पुरती व्यवस्था असते. सामाजिक न्यायाचा तो खुश्कीचा मार्ग आहे. पण खरी समानता आपणास आत्मभानातून व आत्मनिर्भरतेतूनच मिळवावी लागते. समानता व स्वातंत्र्य मूल्ये याचना, दया, सहानुभूतीतून मिळतील, तर ती अंतिमतः तुम्हास नव्या गुलामगिरीकडे नेतील. स्वभान, संघर्षातून येणारं स्वामित्व हेच खरं स्वातंत्र्य, याची जाणीव ज्या दिवशी होईल, तो स्त्रियांचा खरा स्वातंत्र्यदिन असेल. त्यासाठी स्त्री विकासाचा भविष्यलक्ष्यी आराखडा स्त्रीस स्वप्रज्ञेने तयार करावा लागेल. रमाबाई रानडेंपासून ते आशा अपराधांपर्यंतची मराठीस्त्री आत्मकथनं, हिंदीतील अनिता राकेश, अमृता प्रीतम यांची आत्मकथनं आणि जागतिक वाङ्मयातील ‘ब्रिक लेन’, ‘माय फ्युडल लॉर्ड’, ‘ब्लासफेमी' सारखी पुस्तकं असो, सारी वाचताना वरील प्रश्न नि विचार घोंघावत राहतात. आजवरच्या स्त्री आत्मकथनात घुसमट जरूर आहे. गरज आहे हुंकाराची. अमृता प्रीतम, महाश्वेता देवी, तस्लीमा नसरीन यांच्या लेखनातील आत्मस्वर जोवर स्त्री लेखनाचा परवलीचा हंकार होणार नाही, तोवर खरं स्त्रीजीवन हे आढळात येणं कठीण. त्यासाठी समाजजीवन, स्त्री-पुरुष संवाद, सहवास, सहअस्तित्व, समभाव, समानत्व इत्यादी अंगांनी विकसित होण्याची गरज आहे. स्त्रीस 'माणूस' समजण्याची, तसे वागण्याची व तसा विकास घडवणारी समाजव्यवस्था, शिक्षण पद्धती, मानसिक व्यवहार दिनक्रम, परिपाठ म्हणून येईल, तो सुदिन होय. हे लिहीत असताना दुष्यंतकुमारच्या या ओळी उगीचच आठवत राहतात-
पक गई हैं आदतें, बातों से सर होंगी नहीं,
कोई हंगामा करो, ऐसे गुजर होगी नहीं।।
(साये में धूप)▄ ▄