शब्द सोन्याचा पिंपळ/संत कबीर व अंधश्रद्धा निर्मूलन


संत कबीर व अंधश्रद्धा निर्मूलन




 पंधरावं शतक हे विदेशी आक्रमकांचं शतक मानलं जातं. मुस्लीम शासकांनी भारतात आपले पाय रोवले होते. धर्मप्रसारासाठी तलवारीचा धाक ही नित्याची गोष्ट झालेली. देशी हिंदू शासक आपल्या परीने विदेशी आक्रमकांशी लढत राहिले खरे, पण त्यांना फारसं यश आलं नाही. त्याची अनेक कारणं होती. एक तर देश विभाजित मनोवृत्तीचा बळी ठरलेला. ब्रह्मवादी, कर्मकांडी, शैव, शाक्त, स्मार्त, जैन, बुद्ध, अष्टदर्शनी अशा विभिन्न चिंतनाचे मतप्रवाह एकमेकांचे प्रतिस्पर्धी झाल्यासारखी स्थिती होती. धर्म, जात, पंथ रक्षणाच्या प्रवृत्तीला दुराग्रहाची झालर येऊ लागलेली. सिद्ध, नाथपंथी, हठयोगी यांच्या रूपाने कर्मकांड म्हणजे धर्माचरण असे समीकरण होऊ लागलेले. अशात मध्यममार्गी धर्म चळवळ ही काळाची गरज झाली होती. दक्षिणेत अलवार तर उत्तरेत स्वामी रामानंदांनी या दृष्टीने पारंपरिक धर्मसंबंधी विचार व आचाराला छेद देणाच्या नव्या भक्तिमार्गाचा पुरस्कार करून आंदोलन सुरू केलं. या संतांच्या हयातीत त्यांना फारसं यश आलं नसलं, तरी धर्मसंबंधी नवविचार रुजविण्याचं क्रांतिकारी कार्य त्यांनी केलं. या आंदोलनाला परिणामकारक करण्याचं ऐतिहासिक कार्य संत कबीरांनी केलं. संत कबीरांनी नवा आचारधर्म रुजवला.

 संत कबीर ईश्वरभक्त होते तसे कवी, सुधारक व युगकर्तेही होते. त्यांनी आपल्या काळातील स्थिती हेरून जे त्याज्य आहे त्यावर हल्ला करण्याचं साहस दाखवलं. सामान्य जनता अंधश्रद्ध होती. तिच्या धर्मभोळेपणाचा अवास्तव फायदा घेणारे केवळ हिंद ब्राह्मण, पंडितच होते असे नाही तर मुस्लीम धर्मातील मुल्ला, मौलवी, मुजावरही होते. संत कबीरांनी आपल्या काव्याच्या माध्यमातून जातिगत, धर्मगत, वंशगत,

संस्कारगत, विश्वासगत, रूढीगत, शास्त्रगत, परंपरागत जे जे कालबाह्य, विषम, अंधश्रद्धेस खतपाणी घालणारं होतं त्यावर निकराने हल्ला करून ‘धर्म म्हणजे आचार, विचार शुद्धी' हा नवा विचार मांडला. ईश्वर दगडात नसून प्राणीमात्रांत आहे. ईश्वर प्राप्तीसाठी कर्मकांडापेक्षा सदाचाराची गरज त्यांनी पटवून दिली.

 पंधरावं शतक हे सामान्यजनांच्या दृष्टीने अंधानुकरणाचं शतक होतं. ‘बाबा वाक्यं प्रमाणं' ही आचरण रीत होऊन बसलेली. ‘काला अक्षर भैंस बराबर' असलेल्या निरक्षर, अज्ञानी, जनतेचे डोळे, डोके नि धड म्हणजे त्या वेळचा ब्राह्मण, वैश्य नि क्षत्रिय समाज, सवर्ण समाज. शूद्र त्यांचे वर्चस्व जन्मजातच मानायचे. “जन्मा येणे दैवा हाती' अशी मनःस्थिती धारण केलेल्या या समाजात माणसाचं श्रेष्ठत्व, कनिष्ठत्व हे जन्मावरच ठरायचं. कबीरांनी जन्मजात श्रेष्ठत्व, कनिष्ठत्व ठरविणा-या व्यवस्थेसच सुरुंग लावला. ते विचारत -

 जो तू ब्राह्मन बाह्मन जाया,

 आन बार स्वै क्यों नहीं आया?

 शूद्रांचा जन्म जसा होतो तसाच ब्राह्मणांचाही. मग ब्राह्मण उच्च नि शूद्र कनिष्ठ कसे! संत कबीरांचं वाक्य हे अत्यंत तर्कसंगत विवेचन असतं. त्यांच्या तर्कास तोड नसते. अकारण हल्ला करण्याची त्यांची वृत्ती नाही. पण डोळे झाकून एखादी गोष्ट प्रमाण मानणं त्यांना कधी रुचलं नाही, पटलं नाही-

 हमारे कैसे लहू, तुम्हारे कैसे दूध।।

 तुम कैसे ब्राह्मण पाण्डे, हम कैसे सूद (शूद्र)।।।

 या प्रश्नांना त्या काळातही कुणी उत्तर दिलं नाही. जात, जन्म इत्यादीवर आधारित अंधश्रद्धेवर, विषमतेवर प्रहार करून कबीरांनी समतेचा, मनुष्य समानतेचा विचार, आचार रुजवला.

 समग्र ब्राह्मण वर्ग हा सामान्य जनतेवर शास्त्राच्या आधारे वर्चस्व निर्माण करून आपली निरंकुश सत्ता टिकवू पाहात होता. संत कबीरांनी धर्मग्रंथ, पोथ्या, पंचांग हे सर्व थोतांड असून परस्पर सौहार्दपूर्ण आचारधर्म हाच खरा धर्म असल्याचं समजाविलं. 'खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे' म्हणणाच्या आधुनिक संत साने गुरुजींची शिकवण ही कबीरांच्या नवविचारांवर, नवशिक्षणावर आधारलेली होती, हे खालील दोहा वाचला की लक्षात यायला वेळ लागत नाही-

 पोथी पढ़ि पढ़ि जग मुआ, पंडित भया न कोय।

 ढाई अक्षर प्रेम का, पढ़े सो पंडित होय।।

 म्हणणाच्या कबीरांना शिक्षणाचा खरा अर्थ उमगला होता. अडीच अक्षरं असलेला 'प्रेम' शब्द जो शिकतो, आचरणात आणतो तो शहाणा, तो पंडित ‘पुस्तकी पांडित्य म्हणजे शिक्षण' अशी अंधश्रद्धा धारण केलेल्या समाजास त्यांनी आपल्या नवविचारांनी छेदून अभिनव मूल्यसंकल्पना रुजवली.

 धर्म, परलोक, मोक्ष या सर्वांच्या मुळाशी ईश्वर कल्पना घर करून असते. मनुष्य समाजातील अंधश्रद्धेचा उगम ईश्वरीय संकल्पनेतूनच होत असतो. श्रद्धा माणसास भावुक बनवते तर अंधश्रद्धा निष्क्रिय, हे कबीरांनी पुरतं ओळखलेलं होतं. म्हणून त्यांनी दगडाच्या मूर्तीत देव नसून तो मनुष्याच्या हृदयात सामावलेला असल्याचं समजावलं होतं. ज्या गोष्टीचा कार्यकारण भाव सिद्ध होत नाही, त्यावर विश्वास न ठेवण्याची एक वैज्ञानिक विचारपद्धती कबीरांनी रुजवली. वीतभर दगडाच्या पूजेने ब्रह्मांड व्यापणारा परमेश्वर मिळत असेल तर मी पर्वताचीच पूजा करीन म्हणणारे संत कबीर तर्काच्या निकषावर बुद्धीप्रामाण्यवादीच वाटतात-

 पाहन (पाषाण) पूजै हरि मिलै, तो मैं पूजू पहार (पहाड़)।

 ताते यह चक्की भलि, पीस खाय संसार??

 कबीरांचे काव्य विचार केवळ अंधश्रद्धेवर व्यंग प्रहार करणारे, कोरडे ओढणारे आसूड नसून त्यामागे व्यवहाराची एक दृढ बैठक आहे. उपयोजित आचारधर्म त्यांच्या विचारांचं सूत्र होतं. म्हणून वीतभर दगडाच्या मूर्तीपेक्षा ते पीठ देणाच्या जात्याची पूजा करणे पसंत करतात. जे बोधगम्य नाही ते नाकारायचं धाडस कबीरच करू जाणे. ईश्वरापेक्षाही आपल्या गुरूला झुकतं माप देण्यात कबीरांची ही व्यवहारी दृष्टीच स्पष्ट होते.

 मंदिर, मशिदीत ईश्वर असतो या अंधश्रद्धेपेक्षा जोखडातून जनसामान्यांना मुक्त करण्यासाठी कबीरांनी आपला परमेश्वर हा निर्गुण, निराकार, अनिर्वचनीय असल्याचं सांगितलं होतं. तत्कालीन सर्व धर्मश्रद्धा, कर्मकांड हे ईश्वर, मंदिर, मठ, मशिदीच्या भोवती फिरत असायचे. ईश्वर, मंदिरमशिदीत नसतो. तो माणसाच्या डोळ्यांत, हृदयात सामावलेला असतो, हे सांगण्यामागे प्रस्थापित अंधश्रद्धेला तडा देण्याचीच कबीरांची दृष्टी होती. हृदयात वसलेला परमेश्वर बाहेर शोधणे केवळ मूर्खपणाचे म्हणणारे कबीर आपली वैचारिक स्पष्टताच सिद्ध करतात-

 ज्यू नैनू में पुतली, त्यू खलिक घट माँहि।

 मूरिख लोग न जाणहि, बाहरि ढूंढण जाहि।।

 ‘अमृत घट भरले तुझ्या दारी, का वणवण फिरशी बाजारी,' अशी पृच्छा करणारा भा. रा. तांब्यांसारखा कवीही प्रेम, ईश्वर, मनुष्यता, नातीगोती सारी मनाची गुंफण असल्याचं सांगतात, त्यामागे कबीरांचाच विचार आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवं. कबीर, प्रत्येक सजीव-निर्जीवात ईश्वर सामावल्याचं सांगून तो अंतरीच विराजमान असतो. त्याला शोधण्यासाठी कस्तुरीमृगाची जीवघेणी धडपड ही आत्मनाशासच कारण ठरणारी असते, हे सांगत श्रद्धा डोळसच असली पाहिजे, हे कबीर निक्षून सांगतात. म्हणतात-

 कस्तुरी कुंडली बसै, मृग हँडै बन माहि।

 ऐसे घटि-घटि राम है, दुनिया देखे नाहि।।

 ते खरंही आहे.

 पूजा-पाठ, व्रत-वैकल्ये, तीर्थाटन, बांग देणे, माला जपणे, दाढी वाढवणे, मुंडन करणे, बळी देणे यांसारख्या अघोरी कर्मकांडांचा कबीरांनी केलेला विरोध हा अंधश्रद्धांचा समूळ उच्चाटनाचा कृतयज्ञच होता असं म्हटलं तर ते वावगंही ठरू नये, शिवाय अतिशयोक्तही. हिंदू आणि मुस्लीम या दोन्ही धर्मामधील कर्मकांडांवर त्यांनी समान हल्ला चढवला.

 कंकड पत्थर जोड़ के, मसजित लई बनाय।।

 तापर मुल्ला बांग दे, क्या बहिरा हुआ खुदाय।।।

 आरडून ओरडून धर्मश्रद्धांचं प्रदर्शन करणा-यांना कबीरांनी केलेला प्रश्न की 'खुदा काय बहिरा आहे?' त्यामागे धर्मप्रदर्शनाला विरोध करण्याचीच भावना स्पष्ट दिसते.

 पूजा-अर्चा करताना सोवळे-ओवळे, स्नान, तिलक, छापा आदी ब्राह्माचारही अंधश्रद्धेचाच भाग असल्याने कबीरांना ते अमान्य होतं. बाह्याचारांच्या अंधानुकरणापेक्षा अंतर्विवेक जागा ठेवणं, तो जोपासणं कबीरांना अधिक महत्त्वाचं वाटायचं. विवेक ही माणसात नीर-क्षीर न्याय जागवणारी क्षमता होय. तिचा विकासच माणसास अंधश्रद्धेतून मुक्ती देईन, मोक्ष देईल असं कबीरांना वाटायचं, म्हणून ते एकदा वैष्णवांना विचारते झाले होते की-

 वैष्णव भया तो का भया, उपजा नहीं विवेक।

 छापा, तिलक बनाय कै, दग्ध्या (जल गये) लोग अनेक।।

 अंधश्रद्धेत आजवर कित्येक दग्ध झाल्याची कबीरांची व्यथा समाजास अंधश्रद्धा मुक्त करू इच्छित होती.

 याच भावनेतून कबीरांनी पूजन, अर्चन, तीर्थाटन आदी कर्मकांडास विरोध केला. समाजातील अंधश्रद्धेचं निर्मूलन ख-या अर्थाने थांबायचं असेल, तर 'भातुकलीचे बाळखेळ थांबायलाच हवेत यावर कबीरांचं एकमत होतं. ते आपल्या मतावर दृढ होते. ईश्वर हा बोधगम्य नाही- दिसत नाही, आकार नाही मग पूजन-अर्चनास अर्थच काय? ज्या साच्या व्यवहाराची इमारत संशय, आशंकांवर उभी आहे ते नाकारायला हवं, ठोकरलंच पाहिजे याबाबत कबीरांचं दुमत नव्हतं म्हणून तर ते म्हणाले होते की-

 पूजा-सा वह नेम वृत, गुडिया-का-सा खेल।

 जब लग प्रिय दरसै नहि, तब लग संशय मेल।।

 निःसंशय समाज निर्मिती ही कबीरांच्या साच्या धडपडीमागचं ध्येय होतं. कबीर अंधश्रद्धमुक्त माणसांचं स्वराज्य निर्मू इच्छित होते. याच विचारांनी कबीरांनी मालाजपासारख्या कर्मकांडाचाही विरोध केला होता. बाह्याचाराच्या प्रदर्शनापेक्षा अंतर्भुद्धीस कबीर अधिक महत्त्व द्यायचे. रामनाम जपातील ‘र' कार, ‘म'कारापेक्षा कबीर मनःशुद्धीस श्रेष्ठ मानायचे. 'मन चंगा तो कठौती में गंगा' सारख्या विचारांवर त्यांची अटळ श्रद्धा होती. प्रकट नामस्मरणापेक्षा अंतर्भुद्धी महत्त्वाची कशी ते समजावत ते म्हणाले होते-

 कर में तो माला फिरे, जिभ फिरे मुख माहि।  मनुआ तो चहुदिसी फिरे, यह तो सुमीरन नाहि।।

 ‘देह देवळात चित्त खेटरात' अशी अंतर्बाह्य विसंगत धर्मपद्धती केवळ अंधश्रद्धेची परिणती होय यावर कबीर ठाम होते. धर्माच्या नावावर निष्पाप प्राण्यांचा बळी देण्यामागील धर्मपंडितांचा स्वार्थ कबीर ओळखून होते. म्हणून त्यांनी अशा बळी प्रथेचा प्राणपणाने विरोध केला. 'साई के सब जीव है, कीरी कुंजर दोय' अशी धारणा असलेले कबीर पशु-पक्षी, कीटक या सर्वांठायी ईश्वर मानणारे संत होते. धर्माच्या नावावर पशुहत्या जोपासणाच्या मनुष्यास त्यांनी बेभरवशाचा प्राणी मानलं होतं त्यामुळेच-

 बकरी पाती खात है, ताकी काढी खाल।।

 जो नर बकरी खात है, तिनके कौन हवाल।।

 गवत खाऊन जगणाच्या शाकाहारी शेळीचा शुद्ध आचार- त्या पाश्र्वभूमीवर निष्पाप प्राण्याचा धर्माच्या नावावर बळी देण्याचा मनुष्याचा अघोरी व्यवहार कबीर कसे मान्य करतील?

 अशा प्रकारे अनेक धर्माचारांचा कबीर विरोध करतात कारण त्यांच्या मुळाशी असलेली अंधश्रद्धेची, अंधानुकरण प्रवृत्ती ‘मुंड मुंडाये हरि मिले, तो सब कोई लेय मुंडाय' म्हणणारे कबीर कर्मकांडातील वैयर्थच समजावितात. केवळ केशवपनाने मोक्ष मिळायचा तर माणसाआधी तो बकरीला मिळायला हवा. दाढी वाढवून मोक्ष मिळायचा तर तो आधी बोकडालाच मिळेल, अशी खात्री देणारे कबीर माणसाच्या ‘तन जोगी' वृत्तीवर प्रहार करून 'मन जोगी' होण्याचं समर्थन करतात-

 तन को जोगी सब करै, मन को बिरला कोई।

 सब बिधि सहजै पाइए, जे मन जोगी होइ।।

 सर्व प्रकारच्या विसंगत व्यवहारावर कबीरांचा प्रत्येक आघात म्हणजे नवधर्माचे अनुकरणीय आदर्शच रुजविण्यासाठी केलेली धडपड होय. कर्म, धर्मसंबंधी हिंसा, गुलामी यांना अशासाठी अमान्य होती की, त्याला तर्काचा काही आधार नसायचा. एकादशी दुप्पट खाशी'सारखी लोकोक्ती समाजात रूढ होती ती विसंगत व्यवहारामुळे. रोजा पाळायचा नि गोमांस भक्षण करायचे यासारखे विसंगत, दुटप्पी वर्तन ते कोणते?

 दिन को रोजा रखत है, रात हनत है गाय।

 यह खून, वह बंदगी, कह क्यों खुसी खुदाय।।।

 संत कबीर हे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे जनक होते, असे म्हटले तरी वावगे ठरू नये. संत कबीर हे पुरोगमी विचाराचे समर्थक संत होते. तर्कास आधार असायला हवा. आधार बोधगम्य हवा. प्रत्येक विचार, आचार हा कार्य, कारण कसोटीवर पारखून घेता आला पाहिजे. जे सारयुक्त आहे तेच स्वीकारायचं. जे फेकण्याच्या योग्यतेचं ते फेकायलाच हवं असं ते बजावायचे. ‘सार सार को कहि रहे, थोथा देई उड़ाय' म्हणताना कबीर त्यासच साधू मानत तो सारग्रही असतो. कबीर स्वतः असे सारग्रही संत होते. कोणत्याही प्रकारचे प्रदर्शन, बाह्याचार त्यांना अमान्य होता. आज मंदिर-मशिदीच्या वादावरून राजकारण करणा-यांना कबीराचं काव्य अंजन ठरेल. पण गांधारीसारखी पट्टी बांधून ज्यांनी स्वार्थ हाच धर्म मानला आहे, अशा संकीर्ण जनांना बाबरी, बॉम्ब, बॉम्बे, गोध्रा अशा कितीतरी व्हाया प्रवासात आपण परत एकदा अंधश्रद्धेसच खतपाणी घालतो, हे कसं लक्षात येत नाही याचं आश्चर्य वाटतं. एकविसाच्या शतकातही कबीरांचे अंधश्रद्धा निर्मूलनपूरक विचार प्रस्तुत, सार्थकी वाटतात ते त्यातील मनुष्य कल्याणकारी वृत्तीमुळेच.

▄ ▄