शब्द सोन्याचा पिंपळ/जागर वाचनाचा
जागर वाचनाचा
वाचन ही मोठी गुंतागुंतीची गोष्ट खरी! माणूस वाचतो म्हणजे नक्की काय करतो? तर तो अक्षर, शब्दात दडलेला आशय, अर्थ, अनुभव, ज्ञान, भाव ग्रहण करतो, त्याचे आकलन करतो, रसग्रहण करतो, वाचलेल्यावर विचारमंथन करतो. वाचन म्हणजे लेखक आणि वाचकातला मूक संवाद
आणि देवाण-घेवाणही! अलीकडच्या काळात वाचनास संस्कृती मानलं जातं. संस्कृती परंपरेतून विकसित होत जाते. वाचन संस्कारातून विकसित होते. या संस्कारात कधी पालक, कधी शिक्षकांचा वाटा असतो तर कधी व्यक्तित आंतरिक प्रेरणेने वाचन ऊर्जा, वृत्ती, सवय निर्माण होते.
आज आपण उगीच हाकाटी पेटवत आहोत की वाचन संस्कृती संपली. नवी पिढी अनेक प्रकारे वाचते आहे. त्याचं ऐकणं, पाहाणं, विचार करणं, वाचनच आहे. अभ्यासच आहे. घरोघरी मुलं टी.व्ही. पाहातात. त्यांना न शिकवता मराठी शिवाय हिंदी, इंग्रजी ऐकता, बोलता, लिहिता येतं ते ऐकण्या, पाहण्यामुळेच. तुम्ही पूर्वी जे गिरवून, घोकून करायचा ते ही मुलं विनासायास करतात. आपण उगीच त्यांना नावं ठेवतो, त्यांची काळजी करतो. नवी पिढी स्वयंशिक्षित आहे. जन्मतःच ती तंत्रकुशल, बहुभाषी बनते आहे ती संसाधन विकासामुळे ई रीडर पिढी पूर्व पिढीपेक्षा अधिक वाचते, विचार करते.
वाचन हे बाळकडूसारखं असतं. ते बालपणीच पाजावं लागतं. म्हणून वाचन व्यासंग व छंद ज्या शिक्षक-पालकांत असतो, त्यांची मुलं, विद्यार्थी वाचन वेडी होण्याची शक्यता असते. बालवयात वाचन भूक व तहान सतत वाढवत, विकसित करत ठेवली तर जीवनभर ती मग पाठलाग करते व आयुष्य समृद्ध होतं. त्यासाठी शिक्षकांत बाल वाङ्मय वाचनाची जाण व सवय असेल तर वाचनाचं बाळकडू चांगलं पाजू, रुजवू शकतो.
चांगलं वाचन असलेला शिक्षक चांगलं शिकवू शकतो. वाचू आनंदे' अशी वृत्ती शिक्षकात असेल तर शिकवण्यात एक प्रकारचा त्यात आत्मविश्वास येतो. तो आपल्या विद्याथ्र्यांना उच्च प्रतीचं ज्ञान देऊ शकतो. तो वर्गात आश्वस्त मनाने शिकवू शकेल तर त्याचं शिकवणं प्रभावी झालंच समजा. वाचनात खोट असेल, ते कमकुवत असेल तर तो शिक्षक स्वास्थ्याने शिकवू शकत नाही. वर्गात शिकवताना त्याच्या मनावर सतत ताण, दडपण राहणार हे उघड आहे. आपल्या व्यवसायाची गरज व गुंतवणुकीचं भान असेल तर वाचन नित्य राहातं, शिवाय चतुरस्रही! मग शिक्षक विद्यार्थ्यांसाठी वाचनाचा मेरूमणी, दीपस्तंभ ठरतो. म्हणून शिक्षक घडत असताना, शिक्षकाच्या प्रशिक्षणात वाचन वेडवाढीची योजना हवी. वेगवेगळ्या उपक्रम, कार्यक्रम, प्रकल्प यातून तो तावून, सुलाखून निघेल तर त्याचं वाचन वैविध्यपूर्ण आणि मन अष्टावधानी झाल्याशिवाय राहणार नाही.
वाचन हे समाधी असतं. तुम्ही मनापासून वाचाल तर जग विसरून पुस्तकात आकंठ बुडता. जग विसरायला लावणारी पुस्तकं श्रेष्ठ, शिक्षकानी वाचलीच पाहिजेत अशी कितीतरी पुस्तके आहेत. 'वाचू आनंदे', 'लिह नेटके', 'प्रिय बाई’, ‘जलद आणि प्रभावी वाचन’, ‘शिक्षक आहे पण शिक्षण नाही', 'गुजरातेतील उपक्रमशील शाळा', 'शाळाभेट’, ‘माझीकाटेमुंढरीची शाळा', ‘प्रज्वलित मने' सारखी पुस्तके शिक्षकांनी मग तो कोणत्याही इयत्तेचा, स्तराचा (माध्यमिक, महाविद्यालयीन, विद्यापीठीय) असू दे. त्यानं ही पुस्तकं वाचायलाच हवीत. कारण ती एकतर शिक्षकांनीच लिहिली आहेत, शिवाय ते सारे शिक्षक प्रयोगशील, उपक्रमशील होत. शिक्षक आणि शिक्षण हाच त्यांचा ध्यास असे आणि आहे. शिक्षकाचं आपल्या घरी स्वतंत्र व समृद्ध ग्रंथालय हवं.
शिक्षकाचं वाचन व्यासंगी असेल तर तो गावाचा वाटाड्या, मार्गदर्शक होईल. वर्तमानकाळात त्याच्या डोक्यात ग्रंथसूची हवी तशी वेब सूची ही हवी. तो संगणक साक्षर हवा. वेदापासून वेबपर्यंत असा विशाल वाचन पट लाभलेला शिक्षक एकविसाव्या शतकाची आव्हाने पेलू शकेल व तसे विद्यार्थी घडवू शकेल.
तरुण वाचक आज जीवनोपयोगी पुस्तकं मोठ्या प्रमाणात वाचतात. त्यांच्या स्पर्धा परीक्षांचं वारू भारलेलं आणि भरलेलं आढळतं. देशसेवेच्या ध्यासाने स्पर्धा परीक्षेत उतरणारे विद्यार्थी हवेत. स्पर्धा हवी पण विधायक व परहितवर्धक सिंगापूरसारख्या छोटा देश. त्याच्या पहिल्या पंतप्रधानाचं नाव आहे ली क्वान यू. त्यांचे चरित्र नुकतंच प्रसिद्ध झालं आहे. ते वाचायला हवं. मी तो देश चांगला चार-पाच वेळा पाहिलाय. देश घडवणं काय असतं ते तिथे गेल्यावर उमजतं. सध्या त्यांचा मुलगा तिथं पंतप्रधान आहे. भारतासारखाच बहुभाषी, बहुविध जात, धर्म, वंशांचे लोक तिथं राहतात. पण सर्वांप्रती समभाव. पंतप्रधानास सतत देशाचाच ध्यास. ली क्वान यू यांना असं वाटलं की देश घडणीचं शिक्षण म्हणजे व्यवस्थापन शास्त्राचा विधिवत अभ्यास. ते चक्क सुट्टी घेऊन हार्वर्ड विद्यापीठात गेले व विद्यार्थी झाले. देश घडणीसाठी विद्यार्थी झालेले ते जगातले पहिले पंतप्रधान. देशात काही पिकत नाही. पिण्याचे पाणीही शेजारच्या मलेशिया देशातून थेट पाईप लाइनने आणून जगणारा देश. देश तर कसला. एक गावच आहे. पण जगात शिक्षण, श्रीमंती, उद्योग, भ्रष्टाचार मुक्त, शिस्तप्रिय देश म्हणून जगातल्या पहिल्या पाच देशात गणला जातो. वाचनाने जग बदलते याची ही खूण. त्या देशाचे प्रमुख सल्लागार शिक्षक आहेत. ते चोखंदळ वाचक आहेत. रे व्हर्नार त्यांचं नाव, ते व्यवस्थापक तज्ज्ञ आहेत. शिक्षक पण व्यवस्थापन कुशल असेल तर विद्यार्थीही तसे घडणार.
अलीकडच्या काळात ‘वाचन संस्कृती', ‘कार्य संस्कृती' सारखे शब्द परवलीचे झाले आहेत. आजच्या माध्यम प्रभावी काळात वृत्तपत्र वाचन वमाध्यम दर्शन (पाहणं) वाढलं आहे. ही चांगली गोष्ट आहे. म्हणून वृत्तपत्र व माध्यमे सध्या मत मार्गदर्शक झाली आहेत. त्यामुळे त्यांची जबाबदारी मोठी आहे. लंडनसारख्या शहरातून प्रसिद्ध होणारी वृत्तपत्रं आहेत. - ‘द गार्डियन', 'ऑब्झर्व्हर' ती आपल्या वर्तमानपत्रातून 'टीचर नेटवर्क' चालवतात. शिक्षकांना मार्गदर्शक होईल अशा बातम्या, चर्चा, सल्ला, सूचना ही वर्तमानपत्रे रोज देत असतात. हे मी लंडनला असताना पाहिलं, वाचलं आहे.
आयुष्यभर वाचन व्यासंग जपणारी माणसं खरे देशप्रेमी. स्वतःच्या मिळकतीतल्या काही वाटा जे सतत वृत्तपत्र, नियतकालिक, ग्रंथ, ई-बुक्स, सीडीज्, खरेदीवर खर्च करतात, ते वाचतात, पाहतात, ऐकतात ते एकपरीने आयुष्यात ज्ञान, अनुभवाची शिदोरी पेरत आपलं जीवन समृद्ध करत असतात. पाहणं हे वचन जसं, तसं तो एक प्रकारचा आश्वासक अनुभवच असतो. वाचनापेक्षा पाहणं प्रभावी पण त्यासाठी दृष्टी हवी. काय पाहायचं याचं भान, आकलन, जाण महत्त्वाची. देशाटन, पर्यटन पण समृद्ध वाचन अनुभवच. पण तुम्ही नुसती तीर्थयात्रा, तीर्थाटन कराल तर तीर्थच हाती येणार हाती आलं पाहिजे ज्ञान. ते दृष्टीने येतं. मंदिराचा इतिहास, शिल्पकला, त्याचं समाजकार्य पहाल तर मंदिरात जाणं गैर नाही. पण ते होत नाही. निसर्ग पर्यटनाचंही तसंच आहे. पर्यावरण पाहायचं नाही, जपायचा संस्कार महत्त्वाचा. किती नद्या, पर्वत, दया, किल्ले, घाट, किनारे, जंगले आपण विद्रुप, विकृत करून टाकलीत. वाचनाने जग बदलते' म्हणतात. आपल्या वाचनाने ‘भारत निर्माण झाला असे म्हणणे धाडसाचे ठरावे. असे का व्हावे? तर आपल्या शिक्षण, शिक्षकात खोट राहिली आहे. आपल्या अभ्यासक्रमात वाचन संस्कार, स्पर्धा, पुरस्कार नाही.
वाचन शास्त्र आहे. वाचनाचा पट असतो. म्हणजे वाचकाच्या दृष्टिक्षेपात किती शब्द, ओळी येतात ते महत्त्वाचे. हा पट विस्तारता येतो. शिवाय वाचनाची गती असते. ती मोजता येते, वाढवता येते हे किती। शिक्षक जाणतात. ‘जलद व प्रभावी वाचन' या विषयावर प्रशिक्षण महत्त्वाचं. वाचन हे भाषिक कौशल्य आहे. ते विकसित करता येतं. माध्यमं त्यात मोलाची भूमिका बजावू शकतात. जलद वाचनाचे फायदे असतात तसे तोटेही ते जाणून घ्यायला हवेत. वाचन वेग व गती महत्त्वाची. वाचलेलं रिचवणं, रूजवणं सर्वाधिक महत्त्वाचं. त्याचं भान जाण महत्त्वाची. वाचनाचे दोषपण असतात. ते माहीत हवेत. मग ते दूरही करता येतात हे लक्षात येतं.वाचनाचे अनेक प्रकार असतात. मूक वाचन, प्रकट वाचन, आकलन, चिंतन, मनन ही सारी वाचनाचीच अंगे, उपांगे होत. वाचनात डोळे व डोके ठिकाणावर हवे. 'देह देवळात, चित्त खेटरात' राहील तर काहीच हाती येणार नाही. डोळ्यांच्या हालचालीवर व डोक्याच्या (चित्त) थाच्यावर असण्यावरच वाचन प्रभावी होतं. स्मरणात राहातं. ते चिरस्थायी, चिरंतन होतं, जर चित्त निरंतर शुद्ध व शुद्धीवर असेल तर म्हणून वाचन संस्कार, संस्कृती, समाधी होय. वाचन मनस्वी, मनःपूत होईल तर वाया नाही जाणार. वाचन सराव हा बौद्धिक व्यायामच. संदर्भ हा खुराक हो सकस हवा. ज्ञान म्हणजे शक्तीवर्धक ते बहविध हवे. सर्व जीवनसत्त्वाचं आपलं असं महत्त्व, प्रमाण तसं ज्ञानाचंही. तर्क म्हणजे अनुभव संपन्नता ती चिंतन, मनन, व्यासंगाची परिणामी, वाचनाचं आकलन होणं व आकलनाचा वापर, उपयोजन महत्त्वाचं. प्रगतीचा मार्ग त्यातूनच विकसित होतो. वाचनानं माणसाचं व्यक्तिमत्त्व समतोल होतं.
शिक्षक अजेय योद्धा बनून शिकवेल तरच शिक्षण समृद्ध होणार. ते संशोधनाधारित व्हायचं तर वाचन हाच त्याचा एकमेव आधार. प्रज्ज्वलित मनाचे विद्यार्थी घडवायचे तर शिक्षक ऊर्जावान व वाचन समृद्ध, वाचन संस्कारी हवा. मुलांशी संवाद व सहवास साधणारे शिक्षक आयुष्यभर हृदयस्थ राहातात. शिक्षकांचे संवाद कौशल्य हे हृदयीचे, ते हृदयी' हवे. मग तो विद्यार्थ्यांच्या अंतर्मनाचा अवकाश जाणून ती पोकळी कशाने भरायची हे ठरवू शकतो. शिक्षकाचं शिकवणं परंपरेस छेद देणारं, नवध्यासी असेल तर विद्यार्थी महत्त्वाकांक्षी निपजणार. विद्यार्थ्यांना सतत चेतवणारा, जागवणारा शिक्षक वाचनातूनच साकारतो. शिक्षकाच्या प्रेरणा विधायकच हव्यात. त्यात विखार असता कामा नये. शिक्षक संयमी, दूरदर्शी, सर्व समावेशक हवा. असं संतुलन बहुमुखी वाचनातूनच शक्य आहे. शाळेच्या शिक्षणाच्या व शिकवायच्या परिवर्तनाचा ध्यास लागलेला शिक्षक सतत अस्वस्थ असतो. कारण त्याची वाचनाची तहान, भूक हरवलेली असते. अशा वाचनाची तहान, भूक हरवलेली असते. अशा वाचकाची झोपही मग हरवते. जागे वाचक, शिक्षक, नागरिकच देश जागा करतात, ठेवतात.▄ ▄