शब्द सोन्याचा पिंपळ/पुस्तकांचे महत्त्व
मानवी जीवनात पुस्तकांचे महत्त्व वादातीत आहे. एकविसाव्या शतकाकडे झेपावणाच्या जगात ते वेगळे सांगायची आवश्यकता नाही हे खरे आहे. पण झपाट्याने समृद्ध होत चाललेल्या जगात व्यक्तिगत जीवनात पुस्तकांची उपेक्षा आणि अवहेलना होते आहे, हे आपण निखळपणे मान्य करायला हवे. पुस्तके महागडी असतात अशी तक्रार करणा-या मंडळींच्या घरी मी जेव्हा सोफा, टी.व्ही., फ्रीज, टेलिफोन इत्यादी सुविधा पाहतो तेव्हा मला ‘महागाई' शब्दाचे कोडेच उमजेनासे होते. पाच-पंचवीस हजारांच्या वस्तू लीलया खरीदणाच्या मंडळींना पंचवीस रुपयांचे पुस्तक महाग वाटते हे एक न उलगडणारे कोडे आहे. माझ्या आसपास राहणा-या शेजारी, मित्र, सहका-यांच्या घरी चाळायला एखादे पुस्तक मिळाले नाही की गुदमरल्यासारखे होते. पुस्तके आपला श्वास आहेत, हे अजून आपण लक्षात घेतलेले नाही.
जमीन-जुमला, सोनं-नाणं इत्यादींची गुंतवणूक करणाच्या प्रत्येकाने हा विचार करायला हवा की, मी माझ्या भावी पिढीच्या भौतिक समृद्धीबरोबर मानसिक, बौद्धिक नि आध्यात्मिक गुंतवणूक करणार आहे की नाही ? भौतिक गुंतवणूक भावी पिढीस आळशी व विकृत बनवत असते. भावी पिढी समृद्ध करण्याच्या ध्यासानेच आपल्या पूर्वजांनी ज्ञानाचा हा अनमोल ठेवा आपणास दिला आहे.
पूर्वी गुरूमुख हे ज्ञान प्रसाराचे एकमेव साधन होते. ऋषीमुनी, गुरूपदेशाच्या रूपाने आपले अनुभव आणि विचार शिष्यांपुढे ठेवत. शिष्य ते मुखोद्गत करीत व पुढील पिढीस सांगत. पुढे लेखनाची कला व साधने विकसित झाली. आज उपलब्ध असलेला सर्वात प्राचीन ग्रंथ तीन हजार वर्षांपूर्वीचा आहे. दगड, विटा, बांबूच्या चिरफाळ्या, झाडांच्या साली, पाने, पपायरसचे पापुद्रे, धातूचे पत्रे, कातडी ही आपली लेखन सामग्री होती. छिन्नी, दाभण, बोरू, पक्ष्यांची पिसे, टाक इत्यादी लेखन साहित्यांचा लिखाणासाठी वापर होत असे. काजळ वा अन्य पदार्थांचा शाई म्हणून वापर व्हायचा. लेखनकला, लिपी, लेखन सामग्री, लेखनसाधने इत्यादींचा हळूहळू विकास झाला. मुद्रणकला मानवाने हस्तगत केली व मग पुस्तक तयार झाले. पुस्तकांचा विकास हा एक प्रकारे मानवी संस्कृतीचाच विकास होय. अशा अनेक दिव्यातून साकारलेले पुस्तक आज आपणाला लीलया उपलब्ध होते, म्हणून आपणाला त्याची किंमत राहिली नाही.
पुस्तकांचा संग्रह केवळ ग्रंथालयात असतो, अशी भाबडी समजूत आहे. आपल्या देशातील अनेक ग्रंथालये ही व्यक्तींच्या व्यक्तिगत संग्रहातून साकारली आहेत. यदुनाथ सरकार, सुरेंद्रनाथ सेन, बॅ. तेजबहादूर सपू, बॅ. जयकर, डॉ.भांडारकर, सूचिकार दाते, अ. का. प्रियोळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इत्यादींच्या घरी इतकी ग्रंथसंपदा होती की, त्याच्या जपणुकीच्या ध्यासातून एक एक ग्रंथालय उभे राहिले. पुस्तकांचे वेड माणसाला शहाणे करते असे म्हणतात. हे या व्यक्तींकडे पाहिले की खरे वाटायला लागते. ‘ज्ञान हा तिसरा डोळा आहे,', 'चर्मचक्षूपेक्षा प्रज्ञाचक्षु श्रेष्ठ असतात', 'ग्रंथ हे मानवाचे आद्य गुरू होत' अशी सुभाषिते सांगणाच्या शिक्षक/प्राध्यापकांच्या घरीसुद्धा जेव्हा पुस्तके आढळत नाहीत तेव्हा मात्र त्यांच्या शिक्षकत्वाबद्दल प्रामाणिक शंका वाटायला लागते. शिक्षकांची व्यक्तिगत ग्रंथालये समृद्ध करण्यासाठी विद्यापीठाची एक साहाय्य योजना असते. तिचा वापर अपवादात्मक अध्यापकच करतात हे पाहिले की मन विषण्ण होते. पैशाच्या
बँकेचा ध्यास लागलेल्या शिक्षित नि सुजाण मंडळींनी एकविसाव्या शतकाचे देणे म्हणून बुक बँकेचा ध्यास आता घ्यायला हवा. ‘प्रसंगी अखंडित वाचित जावे' या श्लोकातील सातत्य टिकविण्यासाठी, आपलं घर नि जीवन ख-या अर्थाने समृद्ध करण्यासाठी पुस्तके विकत घेऊन वाचायची आपण सवय लावायला हवी. ग्रंथ जत्रा, ग्रंथ मोहळ, लक्ष वाचक संघ, लेखक तुमच्या घरात यांसारख्या योजनांद्वारे ज्ञानगंगा आज आपल्या अंगणी वाहते आहे, तिच्यात हात धुऊन घ्यायची तत्परता आपण नको का दाखवायला?
▄ ▄