शब्द सोन्याचा पिंपळ/राजस्थानचे स्वातंत्र्योत्तर हिंदी साहित्य
भारतीय साहित्याचे प्रांगण हे मराठी, हिंदी, गुजराथी, कन्नड, मल्याळम, तमिळ, तेलुगू, बंगालीसारख्या विविध भाषासाहित्याने फुललेले आहे. या साहित्यात एका भाषेत विविधभाषी लेखकांनी केलेल्या योगदानाचा जर विचार करायचा झाला, तर हिंदी ही एक अशी समृद्ध भाषा आहे की जिच्यात विविध भाषांच्या साहित्य विधांचे प्रवाह येऊन मिसळलेले आहेत. त्यामुळेच आजमितीस तरी भारतीय साहित्य प्रतिनिधित्व हिंदीकडे देण्याशिवाय पर्याय दिसत नाही. त्याचे प्रतीक म्हणूनच आज विदेशात हिंदी भाषेतील साहित्य भारतीय म्हणून ओळखले जाते. भारतात दूरदर्शनसारख्या प्रचार माध्यमाने तर अलीकडे हिंदीस व्यवहाराने राष्ट्रभाषेचा दर्जा दिला आहे. राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळण्यासाठी प्रादेशिक साहित्याचे हिंदी रूपांतर आवश्यक झाले आहे. हिंदी भाषेत विविध प्रादेशिक भाषा साहित्यांचे अनुवाद मोठ्या प्रमाणात होतात. शिवाय हिंदी साहित्यास राष्ट्रीय साहित्याचा दर्जा प्राप्त होणे क्रमप्राप्त आहे. ज्या विविध हिंदी भाषी प्रदेशांनी हिंदीस समृद्ध केले आहे त्यात राजस्थानचे योगदान महत्त्वपूर्ण मानावे लागेल. हिंदी भाषा व साहित्याच्या प्रारंभिक कालापासूनच राजस्थानचा दृढ संबंध आहे. हिंदीची बोली म्हणून राजस्थानी हिंदीचे आगळे महत्त्व होते व आहे. परंतु राजस्थानची साहित्यिक भाषा हिंदीच आहे. आज राजस्थानी साहित्य हे हिंदी साहित्याचे अविभाज्य अंग बनले आहे. स्वातंत्र्योत्तर काळात तर राजस्थानने साहित्य सृजन क्षेत्रात कमालीची आघाडी मिळविली आहे.
१. कविता
स्वातंत्र्योत्तर हिंदी काव्य हे इतिहासाच्या चश्म्यातून पाहावयाचे झाले, तर त्यास उत्तर छायावादी काव्य म्हणून संबोधायला लागेल. हिंदी समीक्षकांनी
या काव्यास प्रयोगवादी काव्य अशी संज्ञा देऊ केली आहे. पुढे नवकाव्य म्हणूनही ते ओळखण्यात येऊ लागले. हिंदी कवितेतील स्वातंत्र्योत्तर युगाचा प्रारंभ हा दुस-या ‘तारसप्तका' (१९५१) पासून मानायला हवा. निसर्गात रमलेल्या व आत्मा परमात्म्याच्या संघर्षात गुंतून राहिलेल्या हिंदी कवितेत व्यक्तिवादी चिंतनाची झळाळी आली. सर्वश्री मुक्तिबोध, अज्ञेय, गिरिजाकुमार माथुर, केदारनाथ, अग्रवाल, नागार्जुन, शमशेर बहाद्दर सिंह, केदारनाथ सिंह, भवानी प्रसाद मिश्र, धर्मवीर भारती, नरेश मेहता, सर्वेश्वर दयाल सक्सेना, कुंवरनारायण सारख्या कवींच्या काव्य प्रतिभेने हे युग प्रभावित झाल्याचे दिसून येते. राजस्थानात स्वातंत्र्योत्तर काळात जे काव्य लिहिले गेले त्यावर उपरोक्त कवींचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. या काळात राजस्थानमध्ये अनेक कवितासंग्रह जसे प्रकाशित झाले, तसेच अनेक नियतकालिके उदयाला आली ती याच काळात. मणि मधुकर लिखित ‘खंड खंड पाखंड पर्व' यासारख्या दीर्घ कवितेपासून ते ओमकार पारीखच्या लघुतम काव्यापर्यंत अनेक आकार, प्रकारच्या कवितांनी स्वातंत्र्योत्तर हिंदी कविता बहरलेली व भारलेली दिसून येते.
रामगोपाल (‘आयाम' १९६१), जुगमन्दिर तायल (‘धूप भरी सुबह १९६४), डॉ. रणजीत ('ये सपने ये प्रेत' १९६४), हरीश भदाणी (‘सुलगते पिंड' १९६६), कन्हैयालाल सेठिया (‘खुली खिडकी, चौडे रास्ते' १९६७), त्रिभुवन चतुर्वेदी (हथेलियों में ब्रह्मांड' १९७0), ओमकार पारीख (‘एक पंख आकाश') सारखे कवी या काळात उदयाला आले. त्यांनी लिहिलेल्या कवितांमध्ये निसर्गवर्णनाची नवी दृष्टी आढळते. प्रेमानुभूतीतील नवनवे संदर्भ मानवाच्या समग्र जीवनास स्पर्शणारे आहेत. समाजातील द्वंद्वात्मक संबंधाचे मार्मिक चित्रण हे या कवितांचे ठळक वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल. राजस्थानी मातीचा मोहक गंध या कवितेत आपसूकच दिसून येतो.
राजस्थानात स्वातंत्र्योत्तर काळात नवकवितेस आंदोलनाचे स्वरूप आले असे म्हटले, तर ते वावगे ठरणार नाही. केवळ कवितेस समर्पित असलेली नियतकालिके प्रकाशित करणे हे धाडसाचेच काम असते. पण राजस्थानात मात्र तसे धाडस लीलया घडले आहे. 'लहर', ‘वातायन', 'बिंदू’, ‘अकथ', ‘कविता' ही नियतकालिके या संदर्भात लक्षात घेता येतील.
राजस्थानातील स्वातंत्र्योत्तर हिंदी काव्य हे संख्या आणि गुण दोन्ही कसोट्यांवर सफल दिसून येते. राजस्थानातील कवींनी आधुनिक जीवनबोधाचे सुंदर चित्र उभे केले आहे. त्यात अनुभूती वैचित्र्याबरोबर शैलीची विविधताही
आहे. प्रतीकपद्धतीपासून ते सर्वसाधारण वर्णन पद्धतीपर्यंत शैलीचे सर्व मार्ग या कवितेने चोखाळले आहेत. या कवितेत सामाजिक प्रबोधनाची शक्ती जशी आहे तशीच व्यक्तिगत भावभावनांचे प्रत्ययकारी चित्रण करण्याची आकांक्षाही आहे. समग्रतः स्वातंत्र्योत्तर हिंदी काव्यात राजस्थानी कवितेने मोलाची भर घातली आहे, हे मान्य करायला हवे. प्रादेशिक भाषेचा ठसा व संस्कार घेऊन विकसित झालेल्या या कवितेने हिंदी साहित्येतिहासात राजस्थानी हिंदी कविता असा ठसा जरी उमटविला नसला, तरी या काव्याच्या मूल्यांकनाशिवाय हिंदी काव्याचा इतिहास पूर्ण झाला असे म्हणता येणार नाही.
२. कथा
आधुनिक हिंदी कथा-साहित्याची जन्मभूमी म्हणून राजस्थानचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आधुनिक हिंदी साहित्यात मानाचे स्थान मिळविलेल्या कथा ‘उसने कहा' (चंद्रधर शर्मा गुलेरी'), ‘गदल' (रांगेय राघव) निर्माण झाल्या त्या राजस्थानातच. हिंदी कथेच्या प्रारंभापासूनच राजस्थानने मोलाची भर घातली आहे. ओमकारनाथ 'दिनकर' शंभूदयाल सक्सेना, विष्णू अंबालाल जोशी इत्यादी कथाकारांनी आदर्शवादी कथांची परंपरा विकसित केली, तर मोहनसिंग सेंगर, रांगेय राघव, यादवेंद्र शर्मा ‘चन्द्र' सारख्या कथाकारांनी प्रेमचंद, यशपाल परंपरेच्या यथार्थवादी कथा लिहिल्या. राजस्थानत अज्ञेय, जैनेंद्रांच्या कथांचा वारसा मूळ धरू शकला नाही. पण नवकथेच्या प्रांगणात मात्र मन्नू भंडारी, मणि मधुकर यांसारखे कथाकार चमकल्याचे दिसून येते. राजस्थानातील स्वातंत्र्योत्तर हिंदी कथा साहित्याच्या विकासात दैनिके व नियतकालिकांचा फार मोठा वाटा आहे.
निर्माण करणाच्या त्यांच्या कथा वाचकांना अंतर्मुख करतात. ग्रामीण संस्कृतीचे सुंदर चित्रण त्यांच्या अनेक कथांतून दिसून येते. यशपालांच्या साम्यवादी चिंतनाचा वसा घेऊन रांगेय राघवांनी हिंदी कथेत यथार्थवादी चित्रण परंपरेचा विकास केला. याच काळातील श्री. विजयदान देथा यांनी राजस्थानी कथा साहित्यात मोलाची भर घातली आहे. त्यांनी पारंपरिक लोककथांना वेगळे वळण देऊन त्यांच्या माध्यमातून आधुनिकतेचा आविष्कार केला आहे. यादवेन्द्र शर्मा ‘चन्द्र' यांनी ‘राम की हत्या', 'एक देवता की कथा', 'एक इन्सान की मौत’, ‘एक इन्सान का जन्म' इत्यादी कथांतून मानवी संबंधांचे सुंदर चित्रण केले आहे. अशाच प्रकारच्या कथा सुमेरसिंह दईया, विशन सिन्हा यांनी लिहिल्या आहेत. मन्नू भंडारींच्या ‘ऊँचाई’, ‘चश्मे', ‘अकेली', ‘क्षय', 'यही सच है', 'नशा' या कथांनी हिंदी कथेत नवे वळण निर्माण केले आहे.
नव्या पिढीतील कथाकार रामकिशोर जेमिनी यांनी ‘देवालय की ओर', ‘कुहरा छंट गया', 'बीस मील का पत्थर' या आपल्या कथांतून नकारात्मक भूमिका मांडली आहे. या त्यांच्या नकारात्मक विचारांवर प्रेमवंद, यशपालांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. 'एक वृत्त और' , 'जर्सी’ , ‘यादें' या कथांतून प्रेमचंद गोस्वामींनी समस्याप्रधान कथा लेखनांची परंपरा दृढमूल केली. ग्रामीण जीवनाचे चित्रण करणा-यात दयाकृष्ण विजय एक महत्त्वपूर्ण नाव. ‘उलझन' हा त्यांचा कथसंग्रह या संदर्भात लक्षात राहतो. हरिशंकर परसाईंच्या हिंदी कथांतील नरम विनोदी सीताराम महर्षीच्या ‘माफ कीजिएगा'मध्ये दिसून येतो. ‘शाली साहबा की शादी' मनोहर वर्माचा कथासंग्रह श्रीलाल शुक्लांच्या कथांची आठवण करून देतो. सर्वश्री ईश्वरचन्दर, शरद देवडा, रमेश उपाध्याय, मणि मधुकर, स्वयंप्रकाश, राम जैसवाल, अशोक आत्रेय, शचीन्द्र उपाध्याय, परेश, राजानंद, पानू खोलिया, नफिस आफरिदी, आलमशहा खान अशा कितीतरी कथाकारांनी स्वातंत्र्योत्तर हिंदी कथेस पुढे नेऊन राजस्थानी योगदान स्पष्ट केले आहे. मानवी संबंधांच्या विविध दृश्यसंबंधांनी राजस्थानची स्वातंत्र्योत्तर हिंदी कथा समृद्ध झाली आहे.
३. कादंबरी
हिंदी कादंबरीच्या विकासास गेल्या शंभर एक वर्षांची सुदीर्घ परंपरा कारणीभूत आहे. या गेल्या शंभर वर्षांच्या इतिहासाचे विहंगमावलोकन केल्यास असे दिसून येते की, हिंदी कादंबरीच्या प्रारंभापासूनच तिचा राजस्थानच्या मती व मातीशी घनिष्ठ संबंध जडलेला आहे. हिंदीतीलपहिली कादंबरी १८८२च्या सुमारास प्रकाशित झाली. हिंदी कादंबरी समीक्षेतील मान्यवर विज्ञान डॉक्टर गोपाल राय यांनी राजस्थानची पहिली हिंदी कादंबरी ‘आश्चर्य वृत्तांत' (पं. अम्बिकादत्त न्यास) ही सन १८६२ मध्ये लिहिली गेल्याचा दावा केला आहे. हिंदी कादंबरीच्या सुरुवातीच्या काळात ज्या मेहता लज्जाराम शर्माच्या 'स्वतंत्र रमा और परतंत्र लक्ष्मी', ‘हिन्दू गृहस्थ', ‘आदर्श दम्पत्ति' या कादंब-या गाजल्या ते मेहता हे राजस्थानचेच. स्वातंत्र्यपूर्ण काळापर्यंत हिंदी कादंबरीच्या क्षेत्रात सातत्याने लेखन करायची परंपरा राजस्थानी कादंबरीकारांनी टिकवली आहे. तीच गोष्ट स्वातंत्र्योत्तर काळाची. स्वातंत्र्योत्तर काळात राजस्थानी कादंबरीकारांनी सुमारे चारशे कादंब-यांची हिंदीत भर घातली आहे. संख्यात्मक वृद्धीबरोबर गुणात्मक योगदानातही राजस्थानी कादंबरीकार आघाडीवर राहिले आहेत.
स्वातंत्र्योत्तर काळात रांगेय राघव, मणि मधुकर, डॉ. पुरुषोत्तम आसोपा, यादवेन्द्र शर्मा चन्द्र', श्री. गोपाल आचार्य यांसारख्या कादंबरीकारांच्या रचना उल्लेखनीय म्हणून सांगता येतील. 'हजुर', 'मुर्दोका टीला, ‘दायरे', ‘कब तक पुकारू' या आपल्या कादंब-यांतून रांगेय राघवांनी शोषण, साम्राज्यवाद, हुकूमशाही, विषमता इत्यादीबद्दलचा असंतोष व्यक्त केला आहे. मणि मधुकर लिखित ‘पत्तों की बिरादरी’, ‘सफेद मेमने' या कादंब-या राजस्थानी जनजीवन अभिव्यक्त करताना दिसून येतात. ‘पाँव मे आँखवाले' ही यादवेन्द्र शर्मा ‘चन्द्र' ची कादंबरी महानगरी जीवनातील मूल्य संभ्रमण चित्रित करते. ‘साक्षी है क्षिप्रा’, ‘शाह और शिल्पी', 'अमृतपुत्र' सारख्या ज्ञान भरिल्लंच्या कादंब-यांनी ऐतिहासिक कथाविश्व निर्माण केलं आहे.
स्वातंत्र्योत्तर काळात कवितेनंतरची गतिशील साहित्य विधा म्हणून कादंबरीचा उल्लेख करावा लागेल. राजस्थानी कादंबच्यांनी हिंदी कादंब-यांत अनुभव, शैली, जीवन संस्कृती इत्यादींची विविधता आणली. कादंबरीस जीवनाभिमुख करण्यात या कादंब-यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. रांगेय राघवसारखा सशक्त कादंबरीकार हे स्वातंत्र्योत्तर हिंदी साहित्यास लाभलेले वरदानच म्हणावे लागेल. राजस्थानातील गोष्टींचे सूक्ष्म चित्रण झाले आहे. ते वाचकांना अंतर्मुख होण्यास भाग पाडते. साहित्याच्या अन्य प्रांगणांप्रमाणे राजस्थानी कादंबरीनेही हिंदी कादंबरी साहित्यास समृद्ध केले आहे. ही समृद्धी परिमाण व परिणाम या दोन्ही कसोट्यांवर पारखून घेता येईल इतकी स्पष्ट आहे. प्रारंभापासून ते आजपावेतो राजस्थानी कादंबरीने हिंदी साहित्यात मोलाची भर घातली आहे, हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे.
४. नाटक
राजस्थान हा लोकनाट्याची समृद्ध परंपरा असलेला प्रांत म्हणून ओळखला जातो. राजस्थानात राजस्थानी लोकनाट्य परंपरेशिवाय हिंदी समकालीन नाटक परंपरेतील नाटके पण लिहिली गेली आहेत. हिंदी नाटकं शहरी मध्यमवर्गीय प्रेक्षकांपर्यंतच मर्यादित राहिली. याउलट राजस्थानी परंपरेतील नाटकांना मात्र जनमानसात, विशेषतः ग्रामीण प्रेक्षकवर्गात फार मोठी लोकप्रियता मिळाली. कमजोर संहिता व सुमार अभिनय क्षमता या दोन बाबींमुळे हिंदी परंपरेतील नाटके संहिता प्रकाशनापलीकडे फार यश मिळवू शकली नाही असे दिसून येते. एकट्या हमीदुल्लांचा अपवाद सोडला तर रंगमंचाच्या अनिवार्य कसोटीवर फारच थोडी नाटके हाती लागतात. तथापि, सर्वसाधारणपणे सर्वश्री मणि मधुकर, नंदकिशोर आचार्य, रिजवान जहीर उस्मान, राघव प्रकाश, अर्जुनदेवाचारण या नाटककारांनी राजस्थानी हिंदी नाटक परंपरा समृद्ध केली असे दिसून येते.
राजस्थानी लोकनाट्य परंपरेचा प्रभाव घेऊन रचलेल्या नाटकांत मणि मधुकरांची ‘खेला पोलमपुर' व 'दुलारीबाई' उल्लेखनीय होत. ‘खेला पोलमपुर'मध्ये मणि मधुकरांनी राजस्थानातील सामंती परंपरा व प्रथांचे चित्रण केले आहे. या नाटकात अनेक ठिकाणी हे कसं काय शक्य आहे, यासारखे प्रश्न प्रेक्षक व वाचकांच्या मनात निर्माण होतात; पण या संदर्भात एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की हे लोकनाट्यावर बेतलेले नाटक आहे. लोकनाट्यात का, कसे, सारखे प्रश्न गैरलागू ठरत असताना समरू जाट व विधवा जडिया यांच्या जीवनसंबंधांवर हे नाटक रचलेले आहे. सामंती कालात विलासी जीवन, राजमहाल, वाडे इत्यादींमधील प्रथा, संकेत यांचे हुबेहूब चित्रण हे या नाटकाचे वैशिष्ट्य होय. त्यांचे दुसरे नाटक ‘दुलारीबाई'मध्ये पारसी शैली व कुचामणी ख्याल यांचा सुंदर मिलाप पाहायला मिळतो. मणि मधुकरांनी संत कबीरदासांच्या जीवनावर आधारित एक नाटक लिहिलंय ‘इकतारे की आँख'. याच विषयावर हिंदीतील सुप्रसिद्ध कथाकार श्री. भीष्म सहानींनी ‘कबीर खड़ा बाजार में लिहिलंय. मणि मधुकरांच्या तुलनेत भीष्म सहानींचं नाटक उजवं वाटतं. नाटकात शब्दांपेक्षा मूकभाषेस (नाट्यभाषा) महत्त्व असते. अभिनय क्षमता हे नाटकाचं व्यवच्छेदक लक्षण आहे. त्या कसोटीवरच नाटकाची तुलना करायला हवी.
हमीदुल्लांना राजस्थानचे लक्ष्मीनारायण लाल मानलं जातं. हिंदीत लक्ष्मीनारायण लाल यांनी विविध प्रयोग केले तसेच राजस्थानी नाट्यसाहित्यात
हमीदुल्लांनीही केले. 'जैमती भोजा', 'एक और युद्ध’, ‘समय संदर्भ', ‘ख्याल भारमली', 'हर बार’, ‘उलझी आकृतियाँ' ही त्यांची नाटके खूप गाजली. ‘जमैती भोजा' हे अगदी अलीकडे प्रकाशित झालेलं नाटक राजस्थानातील बगडावत देव नारायण महागाथेवर आधारित आहे. वृत्तपत्रातील कात्रणांप्रमाणे तुटक प्रसंगांवर ‘एक और युद्ध' रचलं गेलं आहे. प्रयोगाच्या दृष्टीने या नाटकाचे आगळे महत्त्व आहे. चेक नाटककार कारेल चापेक यांच्या ‘आर. यू. आर.' चा प्रभाव ‘समय संदर्भ'वर स्पष्टपणे दिसून येतो. ‘हर बार' व ‘उलझी आकृतियाँ' ही दोन्ही नाटकं भ्रष्टाचाराचे चित्रण करतात. हिंदीतील प्रख्यात विनोदी लेखक हरिशंकर परसाई यांनी आपल्या ‘सदाचार का तावीज' कथेत भ्रष्टाचारास देव मानले आहे. ईश्वराप्रमाणे तो सर्वव्यापी, आकारहीन असून न दिसणारा, प्रचिती देणारा आहे म्हणून त्यांनी भ्रष्टाचारास ‘मायक्रोस्कोपिक एलिमेंट' मानले आहे. हमीदुल्लांनी कार्यालयापासून घरापर्यंत पसरलेल्या भ्रष्टाचाराचे चित्रण उपरोक्त नाटकांत केले आहे.
रिजवान जहीर उस्मानांची ‘लोमडियाँ', 'सुन लडकी दबे पाँव आते है। मौसम' ही नाटके रंगमंचावर आली व गाजलीही. डॉ. राजानंद यांची ‘गुंफा', 'बोल मेरी मछली कितना पानी', 'बाढके बाद', 'ग्राण्ड फादर उर्फ दादाजी' ही नाटकेही याच परंपरेतील म्हणून सांगता येतील. मराठी नाटकांचे हिंदी अनुवाद हिंदी नाट्यसृष्टीचे एक आकर्षणकेंद्र बनली आहे. राजस्थानी हिंदी रंगमंचावर जयवंत दळवी, विजय तेंडुलकर, वसंत कानेटकर यांनी अनेक नाटके हिंदी रूपांतरात सादर झाली आहेत.
कविता, कथा, कादंबरी, नाटक या प्रमुख साहित्या विधानांप्रमाणेच निबंध, एकांकिका, शब्दचित्र, समीक्षा, पत्रकारिता, प्रवासवर्णन इत्यादी प्रांतात राजस्थानी लेखकांनी मोलाची भर घातली आहे. राजस्थानचे स्वातंत्र्योत्तर हिंदी साहित्य हे हिंदीच्या राष्ट्रीय प्रवाहानुरूप लिहिले गेले आहे. वर सांगितल्याप्रमाणे राजस्थानी मातीचा स्पर्श असलेले हे साहित्य सांस्कृतिक संदर्भात वेगळे वाटत असले, तरी ते हिंदी साहित्य प्रवाहाचे अभिन्न अंग म्हणूनच पुढे येते. या साहित्यास स्वतंत्रपणे ‘राजस्थानी साहित्य अशी उपाधी देता येणार नाही. लोकजीवन व लोकसंस्कृतीचा विलक्षण प्रभाव राजस्थानच्या स्वातंत्र्योत्तर हिंदी साहित्यावर आढळतो. सामंती प्रथेपासून मुक्त होऊन आधुनिक भारतीय जनजीवनाच्या प्रवाहात येऊन मिसळण्याची तीव्र इच्छा या साहित्यात व्यक्त होते. राजस्थानी लेखक हा प्रांतवादातगुरफटत राहिला नाही. या साहित्यात दिसून येणारी उदारमतवादी वृत्ती अनुकरणीय व अभिनंदनीय आहे. भारतीय लोकजीवनाचे प्रत्यंतर देणारे राजस्थानी हिंदी साहित्य हे स्वातंत्र्योत्तर काळास लाभलेले वरदान आहे. शेजारच्या पंजाबसारख्या प्रांतास राजस्थानी साहित्यातून बरेच घेण्यासारखे आहे.
▄ ▄