शब्द सोन्याचा पिंपळ/वि.स.खांडेकर स्मृती संग्रहालय:एक दृष्टिक्षेप


वि. स. खांडेकर स्मृती संग्रहालय : एक दृष्टिक्षेप


 जो माणूस इंग्लंडला जाऊन येतो त्याला विचारलं जातं की तुम्ही ‘शेक्सपियरचं जन्मस्थळ' पाहिलं का? एखादा रशियास जाऊन आला तर त्याला आवर्जून विचारलं जातं की, तुम्ही यासना पोल्यानाचं ‘टॉलस्टॉय तपोवन' पाहिलंत का? आपल्याकडे जो माणूस कोलकत्त्याला जाऊन येतो तो रवींद्रनाथ टागोरांचं ‘शांतीनिकेतन' हटकून पाहतोच पाहतो. तसं आता तुम्ही कोल्हापूरला जाऊन याल तर लोक विचारतील, “तुम्ही शिवाजी विद्यापीठातील ‘वि. स. खांडेकर स्मृती संग्रहालय' पाहिलंत का?" कोल्हापूरच्या सांस्कृतिक पर्यटनाच्या नकाशावर लवकरच हे संग्रहालय आपली अनिवार्य मोहर उठवेल. अशा शिक्कामोर्तबाला आता ते सज्ज झालंय!

 वि. स. खांडेकरांचं कोल्हापूरशी जसं अद्वैत होतं तसं ते शिवाजी विद्यापीठाशीही होतं. खांडेकर १९३८ मध्ये कोल्हापूरला चित्रपट कथालेखनासाठी आले. मास्टर विनायकांनी आपल्या हंस पिक्चर्ससाठी त्यांना कोल्हापुरात आणलं. रोज फिरायला जायचा खांडेकरांचा शिरस्ता असायचा. शिरोड्यात असताना हा ‘साहित्य अगस्ती' रोज सुरुची बाग, समुद्रकिनारे पालथे घालायचा. तोच क्रम कोल्हापुरात आले तरी त्यांनी चालू ठेवला. जीवनाच्या उत्तरायणात त्यांचा मुक्काम कोल्हापुरातील राजारामपुरी या तत्कालीन नव्या उपनगरात होता. तेव्हा ते रोज टेंबलाई टेकडी, सागरमाळ, काटकर माळ येथे फिरायला जात. या भटकंतीत त्यांना बा. भ. बोरकर, विजया राजाध्यक्ष, ग. दि. माडगूळकर, रणजित देसाई, रा. वा. शेवडे (गुरुजी) प्रभृती साहित्यिकारांची संगत लाभायची.

 शिवाजी विद्यापीठास जागा निवडायचा प्रश्न आला तेव्हा यशवंतराव

चव्हाण प्राचार्य सी. रा. तावडे, डॉ. आप्पासाहेब पवार प्रभृतींनी ज्या माळाची निवड केली त्या मागे तो भाऊंच्या वि. स. खांडेकरांच्या पदस्पर्शाने पावन झाल्याचाही एक भाग होता. आज जिथं कुलगुरूंचा बंगला विसावलाय ती टेकडी हे वि. स. खांडेकरांचं फिरायला गेल्यावर बसायचं ठिकाण. तेथून सारं कोल्हापूर नजरेत भरायचं.

 वि. स. खांडेकरांचे नि शिवाजी विद्यापीठाचे ऋणानुबंध तसे जुनेच. काळाच्या ओघात ते दृढमूल होत गेले. वि. स. खांडेकर स्मृती संग्रहालयाच्या रूपानं आता या संबंधांना अमरत्व प्राप्त होईल. शिवाजी विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर तत्कालीन राज्यपालांनी शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेवर ज्या सन्माननीय सदस्यांची नियुक्ती केली होती त्यात वि. स. खांडेकरांचा समावेश होता. वि. स. खांडेकर शिवाजी विद्यापीठाच्या अनेक समारंभांना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहात होते. साहित्य अकादमीनं वि. स. खांडेकरांना आपलं महदत्तर सदस्यत्व' (फेलोशिप) बहाल केलं. (१९७0) समर्पण समारंभास प्रकृती अस्वास्थ्यामुळे दिल्लीला जाणं खांडेकरांना शक्य नव्हतं. समारंभ कोल्हापूरला करायचा ठरल्यानंतर शिवाजी विद्यापीठानं त्याचं यजमानपद स्वेच्छेने स्वीकारलं.

 सन १९७६ ला वि. स. खांडेकरांना ज्ञानपीठ पुरस्कार लाभला. मराठीला हा सन्मान मिळवून देणारे पहिले साहित्यिक म्हणून शिवाजी विद्यापीठाने त्यांना सन्माननीय डी. लिट्. पदवी बहाल करून गौरविलं. पुढे शिवाजी विद्यापीठाने सन १९९८-९९ साली वि. स. खांडेकरांची जन्मशताब्दी मोठ्या उत्साहाने साजरी केली. जन्मशताब्दी वर्षात त्यांचं स्मृति तिकीट प्रकाशित व्हावं म्हणून पुढाकार घेतला नि त्यात यश आलं. नाशिकयेथे कविवर्य कुसुमाग्रह, नाटककार वसंत कानेटकर व खांडेकरांचे अनुवादक मो. ग. तपस्वी यांच्या हस्ते तर कोल्हापूरला कुलगुरू द. ना. धनागरे यांच्या हस्ते तिकीट प्रकाशित झाले. सन २००१ ला वि. स. खांडेकर रजत स्मृती महोत्सव झाला. शिवाजी विद्यापीठाने ‘वि. स. खांडेकर भाषाभवन नामकरण करून भाषाभवन सक्रिय केलं. या भवनाची उभारणी करताना तिथं वि. स. खांडेकर संग्रहालय व्हावं, अशी कुलगुरू द. ना. धनागरे यांची कल्पना होती. उत्तराधिकारी कुलगुरू डॉ. मु. ग. ताकवले यांनी याचा पाठपुरावा केला. प्रकल्प अहवाल तयार करणे, निधी तरतूद व साधन संग्रहास प्रारंभ त्यांच्या कार्यकाळात झाला, तरी प्रत्यक्ष संग्रहालयाची उभारणी व निर्मिती वर्तमान कुलगुरू डॉ. माणिकराव साळुखे यांच्या खांडेकर श्रद्धेमुळेच

झाली. वि. स. खांडेकरांची ज्येष्ठ कन्या श्रीमती मंदाकिनी खांडेकर यांनी संग्रहालयास वि. स. खांडेकरांचे सन्मान देऊ केले आहेत. ‘पद्मभूषण सन्मानपत्र', 'अश्रू' हस्तलिखित इत्यादी वस्तू प्रत्यक्षात प्रदानही केल्यात.

 वि. स. खांडेकर स्मृती संग्रहालयाच्या संकल्पना, संशोधन व संग्रहांचं श्रेय जरी मला दिलं जात असलं, तरी हे सामुहिक प्रयत्नातून साकारलंय हे मला नम्रपणे नोंदवावंसं वाटतं. रचना व देखरेख वास्तुशिल्पी विजय गजबर यांनी केली. संग्रहालयाचा प्रकल्प अहवाल व मांडणी संग्रहालय तज्ज्ञ प. ना. पोतदारांची. संकल्पचित्र साकारलंय तरुण शिल्पकार संजीव संकपाळांनी. अर्धपुतळ्याची पुनर्निर्मिती प्रभाकर डोंगरसानेंची. संग्रहालय निर्मितीचं श्रेय मनोहर सुतारांचं. साधन संग्रहात जया दडकर, शशिकांत किणीकर, अशोक शेवडे, आकाशवाणी पुणे, पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी, शिरोडकर कुटुंबीय, ट्यूटोरियल हायस्कूल, मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे, आर. आर. शेठ आणि कंपनी, अहमदाबाद, सदानंद कदम, जीवन किर्लोस्कर संग्रह, महावीर महाविद्यालय, कोल्हापूर, मुंबई, पुणे-कोल्हापूर महानगरपालिका, मुकुंदराव किर्लोस्कर, दै. पुढारी, वि. वि. चिपळूणकर, प्रा. ग. प्र. प्रधान, दत्ता धर्माधिकारी प्रभृतींचं मोलाचे सहकार्य लाभलं. शिवाजी विद्यापीठाने इमारतीशिवाय दहा लक्ष रुपयांचा निधी दिला.

 महाराष्ट्रात यापूर्वी मालगुंड (जि. रत्नागिरी) इथं केशवसुत स्मारक साकारलंय तर अलीकडे नाशिकमध्ये कुसुमाग्रज प्रतिष्ठानने तात्यासाहेबांच्या स्मृती जपण्याचा प्रयत्न केला आहे. या पार्श्वभूमीवर वि. स. खांडेकर स्मृती संग्रहालय हे देशातलं साहित्यकाराचं श्रेष्ठ स्मृती संग्रहालय असल्याचा निर्वाळा सुविख्यात साहित्यकार व कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांनी नुकताच दिला. हा निर्वाळा निखळ नि निरपेक्ष असल्याचा प्रत्यय आपणास संग्रहालय पाहताना येतो.

 संग्रहालयाच्या प्रथमदर्शनी ‘अक्षरवृक्ष' कोरण्यात आला असून त्याच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेला वि. स. खांडेकरांचा सुबक अर्धपुतळा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतो. मग आपण येतो संग्रहालयाच्या प्रवेशद्वारी. प्रवेशद्वाराची कल्पना मोठी विलोभनीय आहे! हे प्रवेशद्वार म्हणजे पुस्तकांचं फडताळ, (शेल्फ) कपाट आहे.

 ‘उःशाप', 'ययाति', ‘हृदयाची हाक' सारख्या कादंब-यांच्या, पुस्तकांच्या विशाल प्रतिकृतींनी साकारलेल्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही कडेला लावलेल्या आरशांमुळे आपण शेकडो पुस्तकांच्या दालनात प्रवेश करतो आहोत, अशा

अनुभवाने, भासाने प्रेक्षक रोमांचित होतो. मग आपल्यासमोर येतं ते वि. स. खांडेकरांच्या समग्र जीवन व साहित्याचे संकल्पचित्र. अत्यंत आखीव, रेखीव असलेलं हे संकल्पचित्र त्याच्या तांबड्या मातीच्या रंगांनी आपणास कोकणात नेतं. मग हळूहळू उलगडू लागतो वि. स. खांडेकरांचा जीवनपट. मोरपंखी वंशवृक्ष. गणेश आत्माराम खांडेकर' दत्तकाने ‘विष्णू सखाराम खांडेकर' कसे झाले ते समजावितो. खांडेकरांचा जन्म ११ जानेवारी, १८९८ चा. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आजच्यासारखी जन्मदाखल्याची सोय नव्हती. तो काळ जन्मकुंडलीचा होता. वि. स. खांडेकरांची पुरातन जन्मकुंडली आपणास एकोणिसाव्या शतकात घेऊन जाते. मग आपणाला भेटतं ते खांडेकरांचं आजोळ. सांगलीच्या माईणकर आजोबांच्या घरी वि. स. खांडेकरांचा जन्म झाला. ते घर आता बिल्डरच्या घशात गेलंय. आपल्या इतिहास, संस्कृतीच्या अनास्थेने किती स्मृती गडप झाल्या. जन्मघराशेजारील खांडेकरांचे पूर्वज त्यांच्या वेशभूषेमुळे आपणास जुना-पुराणा उबारा देतात.

 वि. स. खांडेकरांचं आरंभिक शिक्षण सांगली हायस्कूलमध्ये झालं. मॅट्रिकला ते बेळगाव केंद्रातून संयुक्त महाराष्ट्रात आठवे आले होते. त्या वेळच्या मॅट्रिकच्या विद्याथ्र्यांच्या सूचीत ‘गणेश आत्माराम खांडेकर' क्र. ४0३, ‘सांगली'सारखा मजकूर मूळ स्वरूपात पाहणं एक वेगळी अनुभूती - रोमांचित करणारी, प्रेरक, उत्साहवर्धक खरी!

 वि. स. खांडेकर नाणेलीतील (ता. सावंतवाडी) सखारामभट खांडेकरांना दत्तक गेले होते. १९१६ साली दत्तक वडिलांचं मोडीतील हस्ताक्षर, त्यांचं सावकारी पेटुल (पेटी) इथं मूळ स्वरूपात ठेवण्यात आली आहे. पुढे दत्तक वडिलांशी त्यांचा अबोला झाला. ते पुण्यात फर्गुसन कॉलेजात शिकत होते. दत्तकघरची श्रीमंती असूनही रोज भासणाच्या पैशाच्या चणचणीने त्यांचे मन विफल व्हायचं. नाही म्हणायला नाटककार राम गणेश गडक-यांचा सहवास, किर्लोस्कर थिएटरमधील नाटके, पुण्यातील शिक्षक, विद्यार्थीमित्र यांच्या सहवासाने त्यांचं पुण्यातील वर्षभराचं वास्तव्य सुसह्य झालं. अन् त्यांनी शिक्षणाकडे पाठ फिरवून स्वावलंबी व्हायचं ठरवलं ते केवळ नाइलाज म्हणून. 'केशवसुतांची कविता' पुस्तक सोबतीला घेऊन ते शिरोड्यात शिक्षक म्हणून रुजू झाले. तेथील समुद्र, निसर्ग, माणसं, जीवन संघर्षाने त्यांच्यातील साहित्यिक फुलला. हे सारं चित्र क्रमबद्ध पद्धतीनं जिवंत होतं ते तेथील अनेक साधनांच्या मांडणीतून.

 संग्रहालय पाहात आपण जसजसे पुढे जातो तसे हे संग्रहालय आपणास खांडेकरमय केव्हा करून टाकते ते कळतसुद्धा नाही. सन १९२५ ला वि. स. खांडेकर शिरोड्याच्या तत्कालीन ट्यूटोरियल इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक होते. त्यांनी शाळेची इमारत बांधली. पगारापोटी मासिक ५0 रुपये मिळत असताना सन १९२५ साली वि. स. खांडेकरांनी शाळेला दिलेली रु. १000/- ची देणगी त्यांच्याच हस्ताक्षरातील जमाखर्चात वाचणं प्रेक्षकांना - विशेषतः आज गलेलठ्ठ पगार घेणा-या शिक्षक, प्राध्यापकांना, निश्चित अंतर्मुख करतं. हे संग्रहालय केवळ स्मृती संग्रहालय राहिलं नसून ते महाराष्ट्राचं भविष्यातील ‘संस्कारतीर्थ' होईल, हे जाणवल्यावाचून राहात नाही. शिरोड्याचा ऐतिहासिक पिठाचा सत्याग्रह खांडेकरांनी पत्रकार म्हणून टिपला होता. त्या वेळी ते वैनतेयचे नुसते संपादक नव्हते तर बातमीदारही होते, हे ‘वैनतेय' साप्ताहिकातील खांडेकर लिखित विविध मजकूर वाचताना लक्षात येते. हे संग्रहालय केवळ प्रेक्षणीय नाही तर वाचनीय आहे. अभ्यास, संशोधनाच्या कितीतरी पाऊलखुणा इथं आहेत. पाऊलखुणांवरून आठवलं, इथं तुम्हास खांडेकरांची पहिली साहित्यिक सप्तपदी' वाचावयास मिळते ती मूळ प्रकाशित रूपात. खांडेकर प्रारंभी 'कुमार', 'आदर्श', 'एक शिक्षक, ‘परिचित' अशा अनेक टोपणनावांनी लिहायचे, हे मराठी वाचकांना इथे पहिल्यांदा लक्षात येतं. खांडेकरांची साहित्यातली पहिली पावलं पाहाणं रांगणारं बाळ चालताना, एक एक पाऊल पुढे टाकताना अनुभवणं असतं.

 नंतर तर चक्क आपण त्यांची जीवनातील खरी सप्तपदीच पाहतो. १९२९ साली वि. स. खांडेकरांचा विवाह मनुताई मणेरीकर यांच्याशी झाला. त्याचं आमंत्रण देणारं मोडीतील पत्र आजही निमंत्रण पत्राइतकं हार्दिक! वि. स. खांडेकरांचं बि-हाड शिरोडा, आरवलीतील अनेक घरांत होतं. तिथं त्यांचं प्रारंभीचं साहित्य आकारलं. 'कवी असतो कसा आननि' ही जशी जिज्ञासा असते तशी लेखकाचं घर कसं होतं?' याचंही विलक्षण कुतूहल असतं वाचकांत. मराठीतील सुविख्यात कथाकार जयवंत दळवी यांनी ‘परममित्र' या आपल्या आठवणींच्या साठवणीत ‘भाऊसाहेब व भाऊराव' लेखात खांडेकरांच्या आरवलीतील रेग्यांच्या पडवीचं मनोरम असं वर्णन केलंय - ‘दर्शनी पडवी स्वच्छ सारवलेली असे. त्यावर पसरलेली एक गादी. दोन तक्के भिंतीला टेकवलेले. शेजारी एक कापडाची आरामखुर्ची. खुटीला एक कंदील, कोप-यात पाच-सहा फूट लांबीची बांबूची काठी. गादीच्या बाजूला वीतभर उंचीची तिवई, तिच्यावर कायम एक चिमणी.

 शेजारी दोन वीत लांबी-रुंदीचे उतरते बैठे मेज. ते मेज मांडीवर ओढून भाऊ गादीवर बसून काहीतरी लिहीत किंवा वाचीन बसलेले दिसत." हे सारं मूर्त करणारी संग्रहालयातील पडवी प्रेक्षकांचे सर्वांत मोठं आकर्षण ठरतं. बघताना वाटतं, खांडेकर आत्ताच उठून घरात गेले असावेत... पडवीचा जिवंतपणा ठाव घेणारा!

 वि. स. खांडेकर मराठी कथाकार म्हणून मराठी वाचकांच्या मनात घर करू लागले तो काळ होता गांधीयुगाचा. सारा देश आदर्शवादाने भारावलेला होता. दिग्दर्शक मास्टर विनायक व नटश्रेष्ठ बाबूराव पेंढारकरांना सामाजिक जाणिवांचे चित्रपट काढायचे होते. त्यांनी वि. स. खांडेकरांना साद घातली. ते हंस पिक्चर्सचे कथाकार झाले. १९३६ ते १९६० या कालखंडात वि. स. खांडेकरांनी चोवीस पटकथा लिहिल्या. मराठीत शंभरावर, हिंदीत दहा, तमिळ, तेलगूतही खांडेकरांचे चित्रपट होते, हे संग्रहालय पाहाताना लक्षात येतं नि लोक साश्चर्य पटकथांची छायाचित्रे पाहू लागतात. विसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या काळात सिनेमाचं तिकीट काढलं की त्याबरोबर पटकथा, संवाद, गाणी यांची स्मरणपत्रिका पुस्तिका मिळायची. खांडेकरांच्या चित्रपटांच्या सर्व रंगीत स्मरणपुस्तिका हे या संग्रहालयाचे अढळपद. सिने संग्राहक शशिकांत किणीकरांनी या पुस्तिका मोठ्या मनाने संग्रहालयास दिल्या.

 वि. स. खांडेकर हे विसाव्या शतकाच्या मध्यास महाराष्ट्राच्या साहित्यिक, सांस्कृतिक जीवनाचे अनभिषिक्त सम्राट होते. साहित्य संमेलने, चर्चासत्रे, सत्कार, मानपत्र अशा कोणत्याही समारंभाचं पान खांडेकरांशिवाय हलायचं नाही, हे संग्रहालयातील अनेक दुर्मीळ छायाचित्रांवरून प्रत्ययास येतं. यापैकी अनेक छायाचित्रे खांडेकर संग्रहक व संशोधक जया दडकरांच्या सौजन्यानं उपलब्ध झालीत. या संग्रहालयातील ही छायाचित्रे म्हणजे मराठी साहित्यसृष्टीचा अमोल ठेवाच

 संग्रहालयात वि. स. खांडेकरांच्या समग्र साहित्यकृतींचा पहायला मिळणारा संग्रह म्हणजे साहित्यप्रेमींना लाभणारी अपूर्व पर्वणीच. त्यात अनुवाद कृतींची भर म्हणजे दुधात साखर. खांडेकरांनी सुमारे १५० साहित्यकृतींची निर्मिती केली होती, हे येथील सूचीवरून पहिल्यांदाच लक्षात येतं. अन् ‘खांडेकर हे बहप्रसव लेखक होते' हे पटतं. खांडेकर केवळ मराठीचे नाही तर भारतीय भाषांचे अग्रणी साहित्यकार होते, हे येथील हिंदी, तमिळ, गुजराथी, कन्नड, मल्याळम, सिंधी भाषातील सुमारे शंभर अनुवादांमुळे पटतं. वि. स. खांडेकरांच्या साहित्यांचे इंग्रजी,

 रशियनमधील अनुवाद त्यांना आंतरराष्ट्रीय लेखक सिद्ध करतात.

 संग्रहालयात त्यांना लाभलेल्या सन्मान, पुरस्कार, मानपत्रे यांच्या सुबक नि हुबेहूब प्रतिकृती पाहाताना त्या मूळ स्वरूपात पाहायला मिळाल्या असत्या तर... अशी प्रेक्षकांची चुटपूट जिव्हारी लागते. इथे ज्ञानपीठ, साहित्य अकादमी, मानपत्रे, डी. लिट्. च्या प्रतिकृती रिझवतात ख-या. वि. स. खांडेकरांच्या जन्मशताब्दीनिमित्त प्रकाशित स्मृती तिकीट ‘प्रथम दिवस आवरण', 'पहिले स्वाक्षरीत तिकीट' माहिती पुस्तिका, प्रतिकृती इत्यादी रूपात मांडून संग्रहालयानं मोठं औचित्य साधलंय. शेवटी संग्रहालय काळजाचा ठाव घेतं. ठोकाही चुकवतं ते मृत्यू दर्शनाने! काय दैवदुर्विलास पहा... खांडेकरांची शेवटची रूपककथाही होती ‘मृत्यू'. ती प्रदर्शित करून संग्रहालयानं मोठं औचित्य साधलंय!

 वि. स. खांडेकरांचं वाचन, चिंतन नि लेखन समजाविणारे अभिलेख, कागदपत्रे, पुरावे, कात्रणे, टिपण, वह्या, पत्रे इ. दस्तऐवज म्हणजे मराठी सारस्वताचा अनमोल नजराणा! मराठी लेखक सर्वांगाने जिवंत करण्याचा या संग्रहालयाचा प्रयत्न आहे. इथे खांडेकरांची भाषणे त्यांच्याच आवाजात ऐकण्यास मिळतील. पुणे आकाशवाणीनं त्यांच्या एतिहासिक व दुर्मीळ भाषणांच्या ध्वनिफिती संग्रहालयास उपलब्ध करून दिल्यात. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय खांडेकरांचे चित्रपट, पोस्टर्स, स्लाइडस् उपलब्ध करून देणार आहे. होम थिएटरवर ते सर्व प्रेक्षकांना पाहायला मिळतील. अशा प्रकारे दृक्श्राव्य माध्यमातून लेखक वाचकांपर्यंत जिवंत पोहोचवण्याचा शिवाजी विद्यापीठाचा हा उपक्रम देशातील पहिलाच ठरेल.

▄ ▄