शब्द सोन्याचा पिंपळ/साप्ताहिक साधना:पहिली जावक बारनिशी :काही निरीक्षणे


साप्ताहिक साधना : पहिली जावक बारनिशी : काही निरीक्षणे



 साने गुरुजी वस्तुसंग्रहालयाच्या साधन शोध मोहिमेत साधना साप्ताहिकाची पहिली जावक बारनिशी (Outward Register) हाती आली. ती अभ्यासली असता अनेक गोष्टींवर प्रकाश पडतो. ही जावक बारनिशी म्हणजे दुसरी तिसरी काही नसून ती आहे ऐंशी पानी साधी वही. तिला कव्हर नाही. ती आहे आखीव रेघांची वही. माझी पिढी चाळीस पानी, ऐंशी पानी कागदी कव्हर असलेल्या बिनपुठ्ठ्यांच्या वह्या वापरायची. गरीब कागदी कव्हरच्या तर श्रीमंत पुठ्ठ्याच्या कव्हरच्या वह्या वापरत. अशी ती वही. यातून साने गुरुजी साधनेचा संसार कसे काटकसरीने करायचे ते स्पष्ट होते.

 या वहीवर डाव्या कोप-यात साधनेचा पत्ता असलेला शिक्का आहे. तो असा - ‘साधना', आर्थर रोड हॉस्पिटलसमोर, ऑर्थर रोड, मुंबई - ११. साधनेचा पहिला शिक्का व पत्ता म्हणून त्याचे महत्त्व आहे. साधनेची सुरुवात तिथं झाली. तिथं त्या स्मृत्यर्थ एखादे स्मृतिचिन्ह, फलक लावायला हवा. ते स्थान शोधायला हवं. तत्कालीन छायाचित्र हवं.

 आतील पहिल्या पानावर पोस्टेज खरेदीची नोंद आहे. खर्च १ रुपया - कार्ड बत्तीस - १२ आणे, पाकिटे - ८ यावरून त्या वेळच्या टपाल दरांवर प्रकाश पडतो. त्या वेळी १ कार्ड दोन पैशाला, तर पाकीट दीड आण्याला मिळत असे. या बारनिशीत ६ सप्टेंबर १९४८ ते २८ मार्च १९४८ अखेर प्रत्येक टपालाचा खर्च ६ पैसे म्हणजे दीड आणा पडलेला आहे. या दीड आण्याची दोन तत्कालीन तिकिटे हाती लागली आहेत. भारत स्वतंत्र झाल्यानंतर महात्मा गांधींचे प्रकाशित ते पहिले तिकीट होय. त्याचे नाणेशास्त्र व विश्व तिकीट संग्रहात असाधारण महत्त्व आहे. कार्डासाठी

२ पैसे (अर्धा आणा) किमतीचे तिकीट वापरत. भारत स्वतंत्र झाल्यावरही ब्रिटिशकालीन तिकिटे, नाणी काही काळ वापरली जात असत. त्याचा हा पुरावा!

 साधनेचे पहिले दोन अंक प्रकाशित झाल्यानंतर जावक बारनिशी नोंद ६ सप्टेंबर, १९४८ रोजी सुरू झाली. पहिल्या दिवशी १२ टपाले पाठविण्यात आली. ती पाकिटातून धाडली गेली. पहिले पत्र संजीवनी मराटेंना पाठविण्यात आले. त्या वेळी त्या ठळकवाडी, बेळगाव येथे राहात. त्या कवयित्री. त्यांना कविता पाठविण्याविषयी लिहिले होते. त्या वेळी साधनेत कथा, गोष्टी, पत्रे, आठवणी, कीर्तन इत्यादी छापले जात असे. ते पत्रांपुढे नमूद विषयांवरून स्पष्ट होते. अभिनंदन, कृतज्ञता (आभार) पत्रेही जात. त्या वेळी साधनेत राजा नावाचा एक भंगी काम करायचा. त्याची माहिती हरिजन सेवक संघास पाठवल्याची नोंद आढळते. धुळ्याचे काकासाहेब बर्वे त्या वेळी हरिजन सेवक संघाचे कार्य पाहात असत. पहिल्या दिवशी पाठविलेल्या १२ पत्रांपैकी एक, आचार्य विनोबांना पाठविण्यात आले होते. त्यांचा पत्ता असा - भंगी बस्ती, न्यू दिल्ली. तो पुरेसा बोलका आहे. सप्टेंबर १९४८ ते जून १९५0 या बावीस महिन्यांच्या काळात साने गुरुजींनी विनोबांना अनेकदा पत्रे लिहिली. प्रत्येक वेळी विनोबांच्या अगोदर पू. (पूज्य) लिहिल्याचे आढळते. यावरून आचार्य विनोबांविषयीचा त्यांच्या मनातील आदरभाव स्पष्ट होतो. असाच आदरभाव आचार्य जावडेकर, आचार्य भागवत इत्यादींविषयी दिसतो. प्रारंभीच्या पत्रात साधना सुरू केल्याबद्दल ज्यांनी अभिनंदन केले अशांना साने गुरुजींनी कृतज्ञता पत्रे धाडल्याचे दिसते. यावरून सामान्यांची पण सन्मानजनक नोंद घेण्याची गुरुजींची उदारता स्पष्ट होते आणि साधनेची परंपराही!

 सर्व पत्रांना जावक क्रमांक, तारीख, नाव, पत्ता, विषय, टपाल खर्च नोंदण्याचा प्रघात साने गुरुजींनी ठेवलेला दिसतो. या बावीस महिन्यांच्या काळात ११८0 पत्रे पाठविण्यात आली. पैकी फक्त एकापुढे टपाल खर्च टाकण्यात आलेला नाही ते म्हणजे वसंत कुंभोजकर. त्यांच्या पत्त्यात लिहिले आहे - C/o. भाऊसाहेब खांडेकर, शाहपुरी, कोल्हापूर, वसंत कुंभोजकर म्हणजे किर्लोस्कर, तरुण भारतचे उपसंपादक नाना कुंभोजकर. भाऊसाहेब खांडेकर म्हणजे वि. स. खांडेकर, वसंत कुंभोजकर भाऊंचे पहिले लेखनिक. त्यांच्यापुढे टपाल खर्च नाही. त्याचे कारण पुढे दिले आहे - ‘टपाल होते.' याचा अर्थ उलट टपाली उत्तर पाठविण्यासाठी नाना कुंभोजकरांनी आगाऊ

टपाल तिकीट/पाकीट पाठवले असावे. त्या वेळी तशी पद्धत होती. यातून साने गुरुजींची सार्वजनिक जीवनातील आर्थिक सचोटी व पारदर्शकता स्पष्ट होते. त्यातून आज आपणा सर्वांना भरपूर शिकता येण्यासारखे आहे. या ११८0 वाचकांत नाना कुंभोजकर एकटे काय ते साधनेस तोशीस न देणारे निघाले. त्यांचे अभिनंदन करावे तितके थोडे. ते आज हयात आहेत. सध्या मुक्काम सांगली.

 ही सारी जावक बारनिशी साने गुरुजींच्या हस्ताक्षरातील आहे. त्यावरून साधनेत त्या वेळी लिपिक नसावा हे स्पष्ट होते. संपादक काय करीत नसत? लिहिणे, पत्रव्यवहार करणे, नोंदी ठेवणे, प्रुफे तपासणे, पत्ते लिहिणे, अंकाच्या घड्या घालणे, तिकिटे चिकटवणे, पोस्टात अंक टाकणे, अंक विकणे आदी सारी कामे साने गुरुजी करीत असल्याच्या नोंदी वेगवेगळ्या संदर्भात आढळतात. यातून आजच्या पत्रकार संपादकांना बोध घेता येईल. (अनुकरण अवघड खरे!) या सर्व नोंदी काळ्या शाईत आहेत. अपवाद निळी शाई. यावरून काळ्या शाईची साने गुरुजींची पसंती स्पष्ट होते. दैनंदिनी, हस्तलिखिते, पत्रव्यवहारातून यास दुजोरा मिळतो. प्रारंभिक हस्तलिखिते निळ्या शाईतील आढळतात. साने गुरुजींच्या लेखनात खाडाखोड अपवादाने आढळते. बावीस महिन्यातील ११८0 नोंदींपैकी फक्त एकावर खाट आहे, खाडाखोड मात्र नाही. प्रत्येक काम समरसून करण्याची साने गुरुजींची मनस्विता यात दिसून येते. कोणतेही काम एकात्मतेने करायचे. ते छोटे-मोठे नसते. ते काम ‘कार्य' असते हे आपण समजून घेतले तर साने गुरुजींची ‘कार्य संस्कृती' उमजेल.

 मागील लेखात मी साने गुरुजींचा संपर्क सर्व जाती, धर्मातील लोकांशी व सर्वदूर भारताशी होता हे स्पष्ट केले आहे. या जावक बारनिशीतील पत्त्यांवरून त्यास बळकटी मिळते. या सूचीवरील पत्त्यातील व्यक्तींचे सध्याचे उत्तराधिकारी शोधल्यास ‘साधना' नि साने गुरुजींसंबंधी पत्रव्यवहार, कागदपत्रे, जुने अंक शोधणे शक्य आहे. (अर्थात त्यांनी ते जपून ठेवले असतील तर!) आपणाकडे जुनं ते सोनं' फक्त म्हणीत आहे. सांस्कृतिक संचित जपण्यातील आपल्या अनास्थेने आपला इतिहास, संस्कृती कबाड्यास कवडीमोलात, रद्दीच्या भावात आपण विकून टाकून आपली सांस्कृतिक दिवाळखोरी पुरेशी सिद्ध केली आहे. हे थांबायला हवं. जुनं जपायला हवं.

 टपाल खर्च एप्रिल १९४९ पासून ६ पैशावरून ९ पैशावर गेलेला आढळतो. याचा अर्थ त्या वेळी टपाल खर्च - पोस्टाचे दर वाढले, हे स्पष्ट होते.

 पत्रव्यवहारात स्त्रियांची नावे अपवाद आहेत. यावरून सन १९४८ ते ५0 दरम्यान स्त्रिया अशिक्षित होत्या, त्यांचे लेखन, वाचन अपवाद होते, हे स्पष्ट होते. या नोंदीत संजीवनी मराठे, दुर्गा भागवत, इंदुमती जगताप, विद्या पाटील, सखुबाई आपटे, सोनुताई मरगुडकर, कमलाबाई होस्पेट, पुष्पलता अमीन, सुधा माने (सुंदर पत्रे!), शरयू गांधी, अनुसया घुर्ये नावे आढळतात. दुर्गा भागवतांचे पहिले लेखन साधनेत प्रकाशित झाले होते. साने गुरुजींच्या आग्रहावरून (त्याची नोंद प्रतिभा रानडे यांनी ‘बापलेकी'मध्ये केली आहे. पाहा पृ. १७). ते लेखन ('वाळूची पावले' हा लेख) मागवणारे पत्र साने गुरुजींची याच दरम्यान लिहिले असावे. सन १९५० मध्ये दुर्गाबाई भागवतांना दोनदा पत्र लिहिल्याची नोंद आढळते.

 साने गुरुजी साधनेसंबंधाने विद्यार्थ्यांशीही पत्रव्यवहार करीत. अगदी इयत्ता सहावीतील विद्यार्थ्यांशी पण. दि. ०१.१२.१९४९ रोजी जळगावच्या इयत्ता सहावी (ब) मध्ये शिकणाच्या कमलाकर नारायण टेंबे या विद्यार्थ्यास लिहिलेल्या पत्राची नोंद या संदर्भात पाहता येते. अशा अनेक नोंदी आहेत. शिक्षक, वकील, डॉक्टर, पत्रकार, संपादक सा-यांशी साधनेचा संपर्क असावा, अशी साने गुरुजींची धडपड असे. आचार्य शांताराम गरुड, साहित्यिक शंकर सारडा, प्रा. चंद्रकांत पाटगावकर, जयानंद मठकर प्रभृतींना साने गुरुजींनी लिहिल्याची नोंद आहे. अन्य मान्यवरांत महाकवी प्रा. द. रा. बेंद्रे (ज्ञानपीठ पुरस्कृत कन्नड साहित्यिक), पु. ग. मावळंकर (पहिले लोकसभा सभापती), कवी वा. रा. कांत, सोपानदेव चौधरी, प्रा. कृ. ब. निकुंब, रावसाहेब पटवर्धन, अच्युतराव पटवर्धन, प्रा. वसंत बापट, यदुनाथ थत्ते, एस. एम. जोशी, मधु दंडवते, ताराबाई मोडक, भाऊसाहेब रानडे, बा. य. परीट, वसंत पळशीकर, बगाराम तुळपुळे, राजा मंगळवेढेकर प्रभृतींचा उल्लेख करता येईल.

 साधनेच्या खपासाठीही साने गुरुजी अनेकांना पत्रे लिहीत. राजा गवांदेंना दि. २८.०९.१९४८ ला लिहिलेले पत्र या संदर्भात नोंद घेण्यासारखे आहे. काही लोक ‘साधना प्रचारक म्हणून कार्य करत. उदा. वसंत पाटील, नंदुरबार त्यांच्याशीही गुरुजी पत्रव्यवहार करत असत, असे या जावक बारनिशीवरून लक्षात येते. साधना अनेक शाळा, महाविद्यालये, शासकीय विभागांना जात असे. त्या वेळचे शिक्षण खाते हे ‘पब्लिक इन्स्ट्रक्शन' नावाने ओळखले जाई. साधना लेबर डिपार्टमेंटमध्येही जात असे.



 पुराभिलेख विद्याच्या दृष्टीने व साधना साप्ताहिकाच्या इतिहासाचे जतन म्हणून या जावक बारनिशीचे असाधारण महत्त्व आहे. हा सामाजिक व ऐतिहासिक ऐवज होय. अशी इतिहास साधने कालौघात मनुष्य विकासाची पावले असतात. ती जपली तर आपणास कुठे होतो नि कुठे आलो याचा आढावा घेता येतो. साधना व साने गुरुजी यांच्या जीवन व कार्यावर प्रकाश टाकणारे साधन म्हणून या जावक बारनिशीकडे पाहता येईल.

▄ ▄