शब्द सोन्याचा पिंपळ/सुर्वे काव्य :वंचितांचा टाहो
‘ऐसा गा मी ब्रह्म'च्या प्रस्तावनेत कविवर्य कुसुमाग्रज यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे, आजवरचे आमचे साहित्य हे बव्हंशी पांढरपेशा वर्गातील लेखकांनी निर्माण केलेले आहे. सदाशिव पेठी साहित्य ही डॉ. केतकरांनी वापरलेली संज्ञा अद्यापही सार्थ आहे. ही सदाशिव पेठ अर्थात पुणे शहरापुरती मर्यादित नाही. ती सर्व महाराष्ट्रभर पसरलेली आहे. ती विशिष्ट जातीपोटजातींपुरती संकुचित आहे, असेही मानायचे कारण नाही. ती एक प्रवृत्ती आहे आणि ती सामाजिक जीवनाच्या प्रचलित व्यवस्थेतून निर्माण झालेली आहे. जातिभेदाच्या तटबंदीने एकूण समाजजीवनाचे विविध स्वायत्त प्रांत निर्माण करून या प्रवृत्तीला फार मोठा हातभार लावला आहे. अनेक मर्यादांनी ग्रासलेल्या अशा वाङ्मयाला तोचतोपणा यावा, त्याच्या चतुःसीमांचा संकोच व्हावा यात नवल नाही. वाङ्मय निर्मितीच्या मीमांसा कोणत्याही आणि कशाही असोत, त्याचा विस्तार व्हावा, जीवनाच्या साच्या सरहद्दीपर्यंत त्यांचा संचार व्हावा. कुसुमाग्रजांच्या मराठी काव्यासंबंधीच्या अपेक्षांची परिपूर्ती म्हणजे सुर्वे यांची कविता. ती भेदातीत कविता आहे. ती जाणिवांच्या परंपरागत सरहद्दी ओलांडते. ती नवं मनुष्य जीवन चित्रित करते.
सुर्वे यांची कविता क्रांतीची खरी. विद्रोह ही तिची पूर्वअट आहे. पण हिंसा ती अनिवार्य मानत नाही. 'थांब' या कवितेमध्ये ते म्हणतात-
नच जुमानलेस तर खड्ग हाती घेईन
सज्जना! असा प्रसंग मजवर आणू नको.
ती मूलतः शांतीची उपासक आहे. नेहरूंबद्दलच्या प्रेमाचं ती प्रतीक! ती नवसंस्कृतीची समर्थक आहे. जुलुमाला सामोरे जात पणतीनं वीज पेटवायची ताकद असलेली सुर्वेची कविता समाज परिवर्तनाचे एक जाहीर आवाहन म्हणून पुढे येते.
नव संस्कृतीचे व्हा भाट
गीत गर्जत या मुक्तीचे
फुलवीत पंख मेघांचे
दूत होऊ या शांतीचे
नारायण सुर्वे यांची कविता केवळ भावाकुल नाही. ती कलात्मकही आहे. तिच्या कलात्मकतेचं स्वतःचं असं सौंदर्यशास्त्र आहे. त्या कवितेत चंद्र, सूर्य, तारे येतात. पानं, फुलं येतात. पण त्यांची कविता जगण्यातून येत असल्यानं त्यात उपमा म्हणून बॉयलर, लेथ, पेट्रोल, गोचीड अशी सारी
जीवनलक्ष्यी प्रतिमानं येतात अन् त्यांची कविता जगण्याचं अभिन्न अंग बनते. प्रारंभीच्या काळातली ‘बालचंद्र' कविता पाहाल तर तिचं सौंदर्य पारंपरिक चंद्र, आभाळ, तलाव, मेघ यात आढळतं. पोर्टर, शीगवाला, पोस्टरमध्ये तेच सौंदर्य नवं रूप घेऊन माणसाचं जगणं लेवून येतं. त्यातील करुणा आणि क्रौर्याचं द्वंद्व नारायण सुर्वे ज्या सहजतेनं चित्रित करतात, त्यामुळे त्यांची कविता एकाच वेळी कलात्मक होते नि हृदयस्पर्शीही! त्यांची कविता मराठी वाचकांना काही नव्या शब्दकळाही देते. उदा. - झाडझाडोरा, शिटाक, आत्रंग, दुराकणे इत्यादी अशांमुळे त्यांच्या कविता जीवनाचं पोट्रेट होऊन जातात.
सुर्वे यांचे काव्य एकाच वेळी लोकल असतं नि ग्लोबलही. त्या कवितेत लालबाग, परळ, कोकण असतो. तसं आशिया, आफ्रिका, रशियाही. त्यात नेहरू असतात तसे मार्क्स, केनेडी, नासेर, लेनिनही. तिच्यात खेडे, शेत, पीक असतं तसं रणगाडे, गलबतं, रेल्वेही. ती अन्याय-अत्याचाराचा विरोध करते तसा लुंबासाच्या हत्येचाही. यामुळे एक वैश्विकता घेऊन येणारी ही कविता जाणिवांचा परीघ रुंदावत आकांक्षांचं न संपणारं क्षितिज चित्रित करते आणि म्हणून तिची व्यापकता सिद्ध होते. विश्वाचं गोकूळ, विश्वाचा आधार असं सुर्त्यांच्या कवितेचं स्वरूप आहे.
शब्दांच्या हाती फुलांऐवजी खड्ग सोपवणारा हा कवी केवळ कामगार नाही तर तो त्यांच्या जीवनाचा किमयागारही आहे. वंचितांच्या जीवनाचा कायाकल्प हे त्यांच्या कवितेचं ध्येय आहे. कवी नारायण सुर्वे यांची कविता ‘रोटी, कपडा, मकान' या मूलभूत गरजांच्या पलीकडे जाऊन आणखी काही हवे आहे म्हणते तेव्हा तिला भौतिकापलीकडचं मध्यप्रवाहात आणणारं सांस्कृतिक जग हवं असतं. वंचितांना समाजमान्यतेची राजमुद्रा देणं तिचा अजेंडा आहे. त्यासाठी ब्रह्मांडास पाठी घालण्यास, सूर्याची लगोरी टिचविण्यासही हा कवी तयार असतो. वंचितांच्या उत्थानाच्या सुवर्ण काळात आपण असू, नसू ती गोष्ट ते गौण मानतात. पण तो उत्कर्ष काल आलाच पाहिजे याबद्दल ते आग्रही असतात.
- आवडीने रांधलेला भात,
खावयास मी नसेल घरात
- हात उंचावून माझी फुले स्वागतास जातील,
त्या क्षणी मी असेन की नसेल कुणास ठाऊक?
हा कवी मोठा आशावादी. कितीतरी कवितांत त्याचा जीवनविचार,
परिवर्तनावरचा विश्वास, आशावाद उफाळून येतो. त्यातून जीवनाविषयीची सकारात्मकताही व्यक्त होत असते.
- घडीभर अंधार राहील, नंतर पहाटच आहे...
याच वस्तीतून आपला सूर्य येईल...
-थोर भल्या भल्या, क्षणात जिंकीन...
- ज्या हातांनी डागली तोफ त्या पवित्र हातांचे आशिष घेईन...
- तान्यांच्या पुढची दुनिया माझ्या नजरेत आहे...
या कवीचं जग खुराड्यातलं असलं तरी त्याचं तत्त्वज्ञान मानवाधिकारांची पखरण करतं. 'माणसाइतका समर्थ सृजनात्मा मला भेटला नाही', असं निक्षून सांगणारे कवी नारायण सुर्वे म्हणजे माणसांचं मोहोळ होतं. तो जनवादी कवी होता. त्याला व्यक्तिगत काही आकांक्षा नव्हती. ‘होता सकळ विश्व बदलण्याचा ध्यास आणि मग तो शब्दांनाच शस्त्र करतो, ग्रंथ हेच त्याचे विश्व बनतं आणि त्यासह मग तो जीवनास सामोरा जातो. ज्यांना शब्द जागवताही आला नाही त्याला जगताही आलं नाही. त्यांची कीव अशासाठी करतात की ते जीवनभर शब्दसाधक राहिले, शब्दास जागले. साय पांघरलेले शब्द त्यांना रोज भेटायचे ग्रंथाग्रंथातून. पण केवळ ग्रंथ हे त्यांचे जीवन नव्हतं. त्यातून ते चेहरे वाचायचे, माणसं समजून घ्यायचे. शब्दात खराब झालेला हा कवी. मात्र त्याने अनेक शब्दांना अमर केलं. शब्दांतून भविष्य निर्मिणारा हा कवी त्यानं माणुसकीचा मळा कवितेतून फुलवला.
'ऐसा गा मी ब्रह्म’, ‘सनद', 'जाहीरनामा', 'माझे विद्यापीठ' ही त्यांच्या कवितांची नुसती शीर्षकं न्याहाळली तरी सुर्वे यांच्या कवितेची समूह मानसिकता, जनवादिता स्पष्ट होते. या कवितेत सामान्य माणसावर होणाच्या हर त-हेच्या अन्याय-अत्याचाराचे वळ उठलेले आहेत. ती अत्याचारी माणसांचे पीळ नोंदवते. अत्याचार सहन करून मुक्ती मिळत नाही म्हणून ती बंड, क्रांतीची भाषा करते. तिला जगाच्या उफराट्या अन्यायाबद्दल त्वेष आहे नि चीडही, नफरत मात्र नाही. तीत दुस्वास नाही. असेलच तर एक उजळ मार्ग निर्मिण्याची मनीषा. त्यासाठी उभी हयात जाळण्यास तो तत्पर दिसतो. सात जन्माच्या दारिद्रयाची झीट त्यांच्या सर्व कवितांतून व्यक्त होते, कारण ती त्याला समूळ नष्ट करायची आहे. त्यासाठी तो सर्वच समर्पण करू इच्छितो. तो एक दृढसंकल्प कवी आहे. सुर्वे आपल्या सर्व कवितांतून एका समाज जागल्याची भूमिका उठवताना दिसतात‘अजून जिवंत आहे मी तुमचा कवी, खाली होत राहीन कथा ऐकवित...' माझ्या मुठीत मेघझरा आहे, म्हणणारा हा कवी मोठा आत्मविश्वासी परिवर्तक आहे. त्याला वर्तमानाचं भान आहे आणि जाणही-
साला आपण लोगच पांडू है
इसलिये इंडिया का पॉलिटिक्स गांडू है...
म्हणणारा कवी लेचापेचा, येरागबाळा नाही. त्याची नाळ मातीशी अन् इथल्या मतांशी थेट नि ठोक जोडलेली आहे.
आम्ही पेरीत नसतो युद्ध
आम्ही निर्मित असतो बुद्ध
असे ठणकावून सांगणारे सुर्वे विरोधकांची बोलती बंद करण्यात तितकेच वाकबगार दिसतात. नफ्याचे सरेना लष्कर असा इशारा देणारा कवी जागतिकीकरणाची एका अर्थाने भविष्यवाणीच करतो.
हक्कांनी उठविले वेद
शूद्र झाला इथे स्वेद
हे या कवीचं शल्य आहे. त्याचा राम घामात निथळतो अन् त्याचा घाम कामातच दंग असतो, असे न्यारं जग दाखविणारा हा कवी आपल्याला सोडून गेला तेव्हा योगायोगाने मी त्यांच्याजवळच होतो. ते आणि मी बाळगलेला पोर असल्याच्या नात्याने कवी नारायण सुर्वे माझे वडील बंधू होते. स्थिती, संघर्ष, विचार, व्यवहार सा-या अर्थांनी त्यांचं शव अंत्ययात्रेसाठी लोकवाङ्मयगृहात आणलं तेव्हा कडा पाणावणं एक उपचार होता, पण वारंवार आठवत होत्या काही ओळी...
माझीही अंत्ययात्रा राजपथावरून सरकेल
कुणीतरी अजान देईन, कुणातरी हुंदका फुटेल...
कवी सुर्वे यांना वाचासिद्धी होती म्हणायची... त्यांची अंत्ययात्रा राजपथावरून जावी अशा शासकीय इतमामानेच निघाली होती. फौजफाटा होताच पण कामगारांची फौजही होती.
कॉम्रेड नारायण सुर्वे,
लाल सलामलाल सलाम!
कॉम्रेड सुर्वे, अमर रहे।
असा घोष करणारा जनसमुदाय त्यांनी घराघरात ठेवलेल्या मुठी घेऊन आला होता. त्या मुठी उंचावत त्यांना पोलिसांना एकवीस फैरी झाडून
दादरच्या चैत्यभूमीत जेव्हा अखेरचा निरोप दिला, तेव्हा खरंच अजानही ऐकू येत होता अन् हुंदकेही!
तेच केले त्यांनी संचित
तुम्हा ठेविले वंचित
समजावणारा हा कवी समाजभान देणारा समाजशिक्षक होता खरा! त्याला माझाही प्रणाम! लाल सलाम!▄ ▄