अंगारवाटा...शोध शरद जोशींचा

_ 






अंगारवाटा...
शोध शरद जोशींचा














अंगारवाटा...
शोध शरद जोशींचा




भानू काळे




ऊर्मी प्रकाशन, पुणे
________________

अंगारवाटा... शोध शरद जोशींचा लेखक भानू काळे चलभाष : ९८५०८१००९१ इमेल : bhanukale@gmail.com प्रकाशक ऊर्मी प्रकाशन सी २, गार्डन इस्टेट, नागरस रस्ता, औंध, पुणे ४११ ०६७ स्थिरभाष : (०२०) २५८८३७२६ या पुस्तकाच्या प्रती मागवण्यासाठी कृपया पुढील पत्त्यावर संपर्क साधावा : प्रा. सुरेशचंद्र म्हात्रे शेतकरी संघटना, मध्यवर्ती कार्यालय, अंगारमळा, आंबेठाण, तालुका खेड, जिल्हा पुणे ४१०५०१ चलभाष : ९८२२३००३४८ अथवा श्री. अनंतराव देशपांडे चलभाष : ९४०३५४१८४१, ८६६८३२६९६२ मुद्रक कॉम्प-प्रिंट कल्पना प्रा. लि. अक्षरजुळणी अमोघ आर्ट्स मुखपृष्ठ श्याम देशपांडे सर्व हक्क सुरक्षित © भानू काळे आवृत्ती पहिली : ५ डिसेंबर २०१६ आवृत्ती दुसरी : ३ सप्टेंबर २०१७ किंमत : ६०० रुपये या पुस्तकासाठी प्राज फाउंडेशनकडून आंशिक अर्थसहाय्य मिळाले आहे.






शेतकरी संघटनेच्या वेगवेगळ्या आंदोलनांत

जिवाची बाजी लावून लढलेल्या

असंख्य ज्ञात-अज्ञात कार्यकर्त्यांस कृतज्ञतापूर्वक





 जगातील पहिला व्यवसाय शेती हाच आहे. प्रकृती आणि
मनुष्य एकत्र आल्यानंतर तो निर्माण झाला.
 पंचमहाभूतांच्या लक्षावधी वर्षांच्या साठलेल्या ऊर्जा
माणसाच्या श्रमांचा स्पर्श होताच गुणाकार करीत फळाला येतात.
एका दाण्यातून शंभर दाणे तयार होण्याचा चमत्कार शेतीतच होतो.
 ज्या दिवशी हे लक्षात आले, त्या दिवसापासून शेतीमध्ये तयार
झालेली ही बचत लुटून न्यायला सुरुवात झाली. आजपर्यंतच्या
इतिहासाची खरी प्रेरणा ही शेतीमध्ये होणारा गुणाकार लुटण्याची
आहे.

- शरद जोशी
प्रास्ताविक ११
१. शिक्षणयात्रा १७
सातारा येथे ३ सप्टेंबर १९३५ रोजी जन्म... वडील व त्यांची पोस्टातील नोकरी... आईचे व्यक्तिमत्त्व... बेळगाव, नाशिक, मुंबई... भावंडे... संस्कृतची आवड... सिडनम कॉलेजात प्रवेश... 'हरियाली' सोडून 'पथरीला' रस्ता निवडणे... तेथील प्राध्यापक... एमकॉम उत्तीर्ण... दोन स्वभाववैशिष्ट्ये.
२. व्यावसायिक जगात ४०
कोल्हापूरच्या कॉलेजातील अध्यापन... स्पर्धापरीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी यश... ऑगस्ट १९५८, पोस्टात नोकरी सुरू... २५ जून १९६१, लीला कोनकर यांच्याशी लग्न... श्रेया व गौरी यांचा जन्म... फ्रान्सला जायची शिष्यवृत्ती... सरकारी नोकरीचा राजीनामा... १ मे १९६८, स्वित्झर्लंड येथील नोकरी सुरू.
३. डोंगरकुशीतल्या नंदनवनात ५९
स्वित्झर्लंडमधील ऐश्वर्यपूर्ण जीवन... शेजारी व कार्यालयातील सहकारी टोनी डेर होवसेपियां... तेथील दिनक्रम... युपीयुमधील आठ वर्षांच्या नोकरीतले अनुभव व एकूण असमाधान... युएनच्या कामातील वैयर्थ्य... स्वित्झर्लंडचे संस्कार... भारतात परतायचा निर्धार.
४. मातीत पाय रोवताना ८४
१ मे १९७६. भारतात परत... पुण्यात घर... चाकणजवळ कोरडवाहू शेतीला सुरुवात... अकरा भूमीपुत्र संघटना... काकडीची पहिली शेती... 'उलटी पट्टी'चा अनुभव... सगळी पुंजी पणाला... शेतीमालाला अत्यल्प भाव... लीला जोशींची पोल्ट्री... असंख्य अडचणी... इंडिया विरुद्ध भारत.
५. चाकणचा कांदेबाजार : पहिली ठिणगी १११
बाजारपेठेचा अभ्यास... कांद्याचा भाव कोसळला... चिडलेले शेतकरी... नाफेडतर्फे खरेदी सुरू...८ ऑगस्ट १९७९, शेतकरी संघटना सुरू... वारकरी साप्ताहिक... चाकण ते वांद्रे रस्त्यासाठी २६ जानेवारीचा मोर्चा... पहिले रास्ता रोको... पहिले उपोषण... पहिली अटक... कांदा आंदोलनाचे महत्त्व.
६. उसाचे रणकंदन १४२
आळंदी शिबिर... मोरे-कराड-जोशी, ऊस आंदोलनातील त्रिमूर्ती... १० नोव्हेंबर १९८०, रास्ता रोको सुरू... रेल रोको... पोलिसांचा अघोरी लाठीमार... खेरवाडी गोळीबार... तीनशेचा भाव मंजूर... घुमरेवकिलांचे सहाय्य... एकूण ३१,००० शेतकऱ्यांना अटक... एक ऐतिहासिक विक्रम.
७. धुमसता तंबाखू १६६
निपाणीतील तंबाखू लागवड... व्यापाऱ्यांची दहशत... महिला कामगार... शरद जोशी निपाणीत... बीबीसीची टीम दाखल... रास्ता रोको सुरू...आंदोलननगरी... गुढी पाडवा साजरा... ६ एप्रिल १९८१... पोलिसांचा गोळीबार... मराठी-कानडी शेतकऱ्यांची एकजूट... महाराष्ट्राबाहेर प्रथमच.
८. पांढरे सोने, लाल कापूस १८९
कापसाची विदर्भातील शेती... १९८१मधला विदर्भातील पहिला दौरा... एकाधिकार योजना... राजीवस्त्रविरोधी आंदोलन... सुरेगाव गोळीबार... १२ डिसेंबर १९८६. सेवाग्राम रेल रोको... १४ डिसेंबर १९९५, कापूस झोन बंदीविरुद्ध आंदोलन... शेतकरी आत्महत्या... संघटनेला भरपूर पाठिंबा.
९. शेतकरी संघटना : तत्त्वज्ञान आणि उभारणी २१८
आळंदी, वर्धा व अंबाजोगाई येथील प्रशिक्षण शिबिरे... पूर्वसुरींचे ऋण... शेतीचा इतिहास... रामदेवरायाचे कोडे... औद्योगिक क्रांती... वसाहती स्वतंत्र. पण लूट चालूच... एक-कलमी कार्यक्रम... क्षुद्रवाद नको... प्रतिष्ठेसाठी आंदोलन नाही... भीक नको, हवे घामाचे दाम... भक्कम विचार हा पाया.
१०. अटकेपार २५१
शरद पवारांच्या हस्ते मुंबईतील सत्कार... पंजाबमधील लोकप्रियता... भूपिंदर सिंग मान... हरित क्रांतीच्या मर्यादा... खन्ना येथील बैठक... १२ मार्च १९८४, चंडीगढ़ आंदोलन... हिंदू-शीख ऐक्य...राजभवनला घातलेला वेढा... स्वामिनाथन अय्यर... अटकेपार घेतलेली उडी.
११. किसानांच्या बाया आम्ही २७९
स्त्री-प्रश्नाचा शोध... १९८६ चांदवड अधिवेशन... तीन लाख स्त्रिया हजर... दारूदुकानबंदी आंदोलन... स्थानिक निवडणुकांमध्ये १००% महिला पॅनेल... लक्ष्मीमुक्ती अभियान... सांता मंदिर...दोन लाख महिलांचे नाव सात बाराच्या उताऱ्यावर प्रथमच... विचारवंतांनी फारशी दखल न घेतलेले यश.
१२. राजकारणाच्या पटावर ३१३
राजकारणविरहितता... भूमिकेत हळूहळू फरक... टेहेरे सभा... राजकीय भूमिकेची पाच सूत्रे.... पुणे बैठक... शरद पवार यांना पाठिंबा... पण पुढे ते काँग्रेसमध्ये... दत्ता सामंत... प्रकाश आंबेडकर... व्ही. पी. सिंग यांच्याशी मैत्री... १९९० निवडणुका, पाच उमेदवार विजयी... पराभवाचे विश्लेषण.
१३. राष्ट्रीय मंचावर जाताना ३४६
भारतीय किसान युनियन... महेंद्र सिंग टिकैत. २ ऑक्टोबर १९८९, बोट क्लबवरचा मेळावा... गुजरातमधील काम... शेतकरीनेते एकत्र येण्यातल्या अडचणी... कृषी सल्लागार समिती.... कर्जमुक्ती आंदोलन... कृषी कार्य बलाचे अध्यक्षपद... राज्यसभा सदस्यत्व...जागतिक कृषी मंच.
१४. सहकारी आणि टीकाकार ३७४
चाकण... उस आंदोलन... निपाणी... कापूस आंदोलन... महिला आंदोलन... लीलाताई जोशींचे निधन... शेवटच्या दिवसांतील सहकारी ... टीकाकार... वेगळी मांडणी नाही... वैयक्तिक चारित्र्य अविवाद्य... 'साहेबांनी आम्हाला त्यांचे अर्जुन मानले नाही, पण आम्ही त्यांचे एकलव्य जरूर आहोत.'
१५. अंगाराकडून ज्योतीकडे : शोध नव्या दिशांचा ४०८
जुलै १९९१... डंकेल प्रस्ताव... खुल्या अर्थव्यवस्थेला पाठिंबा... खुंटलेल्या जुन्या वाटा... ठिणगीने काम केले, आता ज्योत हवी... चतुरंग शेती... शेतकरी सॉल्व्हंट... शिवार ॲग्रो... भामा कन्स्ट्रक्शन... ६.११.१९९४ स्वतंत्र भारत पक्ष स्थापन... जाहीरनाम्यातील मूलगामी मांडणी... घरातला राजाजींचा फोटो.
१६. साहित्य आणि विचार ४३२
वाचनाची आवड... स्वतःच्या वेगळेपणाची जाणीव... वाचनाला चिंतनाची जोड... शेतीचे उदात्तीकरण नाही... जग बदलणारी पुस्तके... अंगारमळा... विचारविश्व ... पाच वैशिष्ट्ये... जातिधर्मप्रांतनिरपेक्षता... अर्थवाद, शेती एक व्यवसाय... खुल्या अर्थव्यवस्थेचे समर्थन ... तंत्रज्ञानस्वीकार... स्वाभिमान.
१७. सांजपर्व ४६२
नर्मदा परिक्रमा... या चरित्रात रुची कशामुळे होती... 'संघटक'मध्ये मदतीचे आवाहन... सिंहावलोकन करताना... सत्तेच्या फायद्यांपासून वंचित... 'सलगी दाखवणे मला कधीच जमले नाही.'... श्रेयविहीनतेचे भान... मूलत: विचारवंत... १२ डिसेंबरला २०१५ रोजी निधन... स्वातंत्र्योत्तर भारतातील सर्वाधिक लोकसहभाग लाभलेले आंदोलन... जोशींनी आम्हांला काय दिले?
परिशिष्ट १ : शरद जोशी जीवनपट : शंभर प्रमुख घटना ४९७
परिशिष्ट २ : शेतकरी संघटनेची अधिवेशने व इतर ठळक कार्यक्रम ५०३
परिशिष्ट ३ : शरद जोशी यांची ग्रंथसंपदा ५०५
परिशिष्ट ४ : शेतकरी आंदोलनातील हुतात्मे ५०७
परिशिष्ट ५ : शेतकरी संघटनेची शपथ ५०९
प्रास्ताविक


 शरद जोशी आणि त्यांनी उभारलेली शेतकरी चळवळ हा एक अभूतपूर्व झंझावात होता.
 १९८० सालच्या ऊस आंदोलनात एकट्या नाशिक जिल्ह्यात ३०,००० शेतकरी एका वेळी तुरुंगात होते, तर १९८६ सालच्या कापूस आंदोलनात विदर्भ व मराठवाड्यात मिळून ९०,००० शेतकरी एका वेळी तुरुंगात होते. लोकांचा इतका प्रचंड सहभाग लाभलेली चळवळ स्वातंत्र्योत्तर भारतात दुसरी कुठलीच झालेली नाही.
 असे असूनही ह्या झंझावाताची योग्य ती नोंद बुद्धिजीवींच्या वर्तुळात घेतली गेलेली नाही. जोशींचे समग्र असे जीवनचरित्रही उपलब्ध नाही. ती उणीव भरून काढण्याचा यथाशक्ती प्रयत्न करणे ही ह्या चरित्रामागची पहिली प्रेरणा आहे.
 त्याचबरोबर जोशींनी मांडणी केलेले अनेक प्रश्न आजही आपल्यासमोर उभे आहेत; मग तो प्रश्न शेतीच्या भवितव्याचा प्रश्न असो अथवा समाजातील वाढती विषमता अधोरेखित करणाऱ्या 'इंडिया' विरुद्ध 'भारत' या द्वंद्वाचा असो. जोशींचा वैचारिक वारसा आणि त्यांचा एकूणच जीवनसंघर्ष या प्रश्नांना सामोरे जाताना आपल्याला खूप उपयुक्त ठरू शकेल व म्हणून तो वाचकांपुढे आणणे ही ह्या चरित्रलेखनामागची दुसरी प्रेरणा आहे.

 शरद जोशी व त्यांचे शेतकरी आंदोलन यांच्याशी माझा परिचय तसा उशिरा झाला. आयुष्यातील पहिली ४१ वर्षे माझे वास्तव्य मुंबईत झाले आणि आचार्य अत्रे, जॉर्ज फर्नाडिस किंवा बाळासाहेब ठाकरे हे ज्या अर्थाने मुंबईकरांचे 'हिरो' बनले, त्या अर्थाने कधी मुंबईने जोशींची कदर केली नव्हती. जेव्हा माणूस साप्ताहिकामधून विजय परुळकरांची योद्धा शेतकरी ही मालिका प्रकाशित होत होती, तेव्हा ती आम्ही वाचत असू, नाही असे नाही; पण त्यापूर्वी काही वर्षे वि. ग. कानिटकर यांची नाझी भस्मासुराचा उदयास्त ही मालिका जेव्हा 'माणूस'मधून प्रकाशित होत होती, तेव्हा तिची आम्ही जशी विलक्षण आतुरतेने वाट बघायचो, तसे 'योद्धा शेतकरी'च्या बाबतीत होत नव्हते. जवळच्या जोशींपेक्षा दूरचा हिटलर शहरी मध्यमवर्गाला अधिक रोचक वाटत होता हे दुर्दैवी असले तरी सत्य होते. वृत्तपत्रे वाचून मनावर ठसणारी जोशींची अधीमुर्धी प्रतिमाही ते बड्या शेतकऱ्यांचे, म्हणजेच कुलक या वर्गाचे नेते आहेत अशी व म्हणून बहूंशी नकारात्मकच होती.

 पुढे पुण्यात आल्यावर आणि अंतर्नाद मासिक सुरू केल्यावर आमची पहिली भेट झाली व तेव्हाच ती प्रतिमा हळूहळू बदलू लागली. त्या भेटीचे कारण होते १९९९च्या अंतर्नाद दिवाळी अंकातील बस करा हे समाजसेवेचे ढोंग! हा त्यांचा प्रक्षोभक ठरलेला प्रदीर्घ लेख. पुण्यातल्या सेनापती बापट रोडवरील बिना अपार्टमेंट्स'मध्ये ते तेव्हा राहत होते. तिथेच आमच्या दोन-तीन प्रदीर्घ मुलाखती झाल्या. त्यांच्या आधारे, व त्यांनी दिलेल्या त्यांच्या इतर साहित्याच्या आधारे, मी त्या लेखाचे शब्दांकन केले होते - विचार अर्थातच त्यांचेच होते व लेख छापण्यापूर्वी त्यांनी तो तपासून आणि थोडाफार बदलूनही दिला होता. पुढे फेब्रुवारी २००७च्या अंतर्नादमध्ये 'समाजसेवेची दुकानदारी नको!' या शीर्षकाखाली, त्यांनी केलेल्या आणखी काही बदलांसह व टीका थोडीशी सौम्य करून, तो पुनर्मुद्रितही झाला.
 त्यानंतरही आमच्या भेटी अधूनमधून होत राहिल्या – प्रत्येक भेट पुनर्भेटीची ओढ लावणारी होती. त्यांच्यावर काहीतरी लिहावे असे खूपदा वाटले; पण प्रत्येक वेळी जाणवले, की हा तर एखाद्या कादंबरीचा विषय आहे; लेखात तो कसा हाताळणार? पण एखाद्या जीवित व्यक्तीवर कादंबरी लिहिणे तसे अवघडच! चरित्र लिहावे म्हटले तर त्यासाठी पुरेसा वेळ देऊ शकेन असे वाटत नव्हते. ३ सप्टेंबर २००९ रोजी ते पंच्याहत्तराव्या वर्षात पदार्पण करणार होते व त्याचा उल्लेख त्यांच्या काही सहकाऱ्यांच्या बोलण्यात झाला होता. त्या निमित्ताने मग त्यांच्यावर अंतर्नादचा एखादा विशेषांकच काढावा असे ठरले व मग त्या अंकासाठी मीही एक लेख लिहायचे ठरवले.
 त्या अंकाच्या पूर्वतयारीसाठी म्हणून मुद्दाम आंबेठाण येथील अंगारमळ्यात जाऊन आलो. ते जोशींचे अधिकृत निवासस्थान आणि शेतकरी संघटनेचे मुख्य कार्यालय. तिथे जायचा तो पहिलाच प्रसंग. आंबेठाणला जाण्यासाठी चाकण बसस्टँडवर उतरावे लागते. संघटनेचे पहिले आंदोलन तीस वर्षांपूर्वी इथेच लढवले गेले. त्या दिवशी मात्र त्या क्रांतिकारी आंदोलनाची कुठलीही खूण त्या परिसरात दिसली नाही.
 अंगारमळ्यात पोहोचल्यावर बघितले तर अगदी शुकशुकाट होता – जिथे शूटिंग होणे केव्हाच बंद झाले आहे अशा एखाद्या मुंबईतल्या जुनाट स्टुडिओत असावा तसा. राज्यसभा सदस्य असल्याने जोशींचा मुक्काम तेव्हा बहुतेक वेळ दिल्लीतच असायचा. त्यांचे एक निकटचे सहकारी प्रा. सुरेशचंद्र म्हात्रे तिथेच एका खोलीत राहत होते; आजही तीच परिस्थिती आहे. बबन शेलार हे जोशींचे सारथी-सचिव-सहकारीदेखील तिथेच एका आउटहाउससारख्या जागेत आपल्या कुटुंबीयांसह राहत होते; पण मी गेलो तेव्हा ते तिथे नव्हते. एका नि:शब्द उदासीचे सावट अंगारमळ्यावर जाणवत होते. एकेकाळी इथून सुरू झालेल्या आणि बघता बघता लक्षावधी लोकांना आपल्या कवेत घेणाऱ्या शरद जोशी नामक वादळाचे ते विस्मृतीच्या अथांग पोकळीत विरून जायच्या आत शब्दांकन व्हायला हवे, ही जाणीव त्या क्षणी मला प्रकर्षाने झाली.
 आंदोलनाच्या साऱ्या मंतरलेल्या दिवसांचे म्हात्रे साक्षीदार होते व जोशींची निवासाची खोली, त्यांचा ग्रंथसंग्रह, एकेकाळच्या लीलाताईंच्या पोल्ट्रीत थाटलेली प्रबोधिनीची शिबिरे घ्यायची जागा, भिंतींवरची पोस्टर्स, फोटो वगैरे सगळा इतिहास - खरे तर अवशेष - ते दाखवत होते; भूतकाळ जिवंत करत होते. अंतर्नादसाठी कोणाकोणाकडून लेख मागवावे याचीही नंतर चर्चा झाली. म्हात्रेनी सुचवलेली नावेच नक्की केली. विद्युत भागवत आणि इंद्रजित भालेराव यांनी लगेच होकार दिला व त्यांचे लेखही लौकरच मिळाले. विनय हर्डीकर यांनी मात्र नकार दिला; स्वतःऐवजी राजीव बसर्गेकर यांचे नाव त्यांनी सुचवले व पुढे बसर्गेकरांचा लेख मिळालाही.
 २७ जून २००९ रोजी त्या लेखाला अंतिम रूप देण्यापूर्वी काही शंकांचे निरसन करावे, म्हणून जोशींची एक विशेष भेट घेतली. माझ्याच विनंतीला मान देऊन ते आमच्या घरी आले होते. सकाळी त्यांच्या एका शाळकरी मित्राच्या घरचे लग्नकार्य होते आणि संध्याकाळी डॉक्टरची अपॉइंटमेंट, "आता हे मधले पाच-सहा तास मी अगदी पूर्ण मोकळा आहे. विचारा काय ते," औपचारिक गप्पा संपताच त्यांनी सुरुवात केली. त्या प्रदीर्घ भेटीत आम्ही खरे जवळ आलो. परिणामतः तो राजहंस एक या शीर्षकाचा तो लेख बराच मोठा झाला.
 ऑक्टोबर २००९च्या त्या शरद जोशी विशेषांकाचे प्रकाशन २५ सप्टेंबर रोजी पुण्यातल्या एसेम जोशी हॉलमध्ये पार पडले. सभागृह तुडुंब भरले होते. त्या प्रसंगी रावसाहेब शिंदे यांच्या हस्ते त्यांचा सत्कारही केला गेला. (आमचे शेजारी बद्रीनाथ देवकर म्हणजे रावसाहेब शिंदे यांचे जावई आणि शरद जोशींचे अगदी राम-हनुमान शोभावे इतके परमभक्त - ह्या दोन मोठ्या व्यक्तींशी आम्हांला जोडणारा हा दुवा.) समारंभाच्या शेवटी शेतकरी आंदोलनाचे प्रथमपासून साक्षीदार असलेले व 'साप्ताहिक सकाळ'चे संपादक म्हणून नुकतेच निवृत्त झालेले सदा डुंबरे यांनी त्यांची प्रकट मुलाखतही घेतली. मुलाखतीच्या शेवटी जोशींनी काहीसा दुःखद सूर लावला होता. त्यांचे शेवटचे वाक्य होते – “This is my private hell. But I must tell you, I am so proud of my private hell.” त्या एका प्रसिद्ध अमेरिकन गाण्यातील ओळींत त्यांची त्यावेळची एकूण मनःस्थिती प्रतिबिंबित झाली असावी. मुलाखतीचा तो शेवट मनाला चटका लावून गेला.
 अंतर्नादने काढलेल्या विशेषांकाबद्दल जोशींना समाधान वाटले होते. अंकाबद्दलच्या अनेक चांगल्या प्रतिक्रिया त्यांच्यापाशी येत होत्या. “यामुळे मी चांगल्या वाचकांच्या एका वर्तुळात गेलो. तुमच्यासारख्या राजवाड्यांची आम्ही वाटच पाहत होतो," असे ते मला म्हणाले. ते ऐकून खरे तर मला धक्काच बसला. कारण त्यापूर्वी कधीही त्यांनी माझी किंवा अंतर्नादची एका शब्दानेही स्तुती केली नव्हती; कधीच काही कुतूहलही दाखवले नव्हते. योगायोगाने त्याच वर्षी त्यांच्या अंगारमळा पुस्तकाला राज्यशासनाचा आत्मकथन विभागासाठीचा प्रथम पुरस्कार मिळाला. इतरही काही पुरस्कार लगोलग मिळाले. पुढच्याच वर्षी त्यांना चतुरंग ह्या मुंबईतील प्रख्यात सांस्कृतिक संस्थेचा जीवनगौरव पुरस्कारही मिळाला.
 दरम्यान त्यांचे चरित्र लिहायचा विचार पिच्छा सोडेना. त्यांच्या स्वत:च्या लेखनात त्यांचे अथपासून इतिपर्यंतचे चरित्र असे कुठेच उभे राहत नव्हते; इतरही कोणी तसे चरित्र लिहिलेले नसल्याचे माझ्या लक्षात आले. त्यांनी जे कार्य केले, ते खूप ऐतिहासिक महत्त्वाचे आहे याची एव्हाना खात्री पटली होती, पण तरीही त्यांच्याविषयी पुरेशी माहिती अनेक विचारवंतांना नाही हेही जाणवत होते.  Everybody loves a good drought हे मॅगसेसे पुरस्कारप्राप्त पी. साईनाथ यांचे गाजलेले पुस्तक मुख्यतः भारतीय शेतकऱ्याच्या दुर्दशेबद्दल आहे. पण १९९६ साली प्रकाशित झालेल्या या ४७० पानी पुस्तकात याच क्षेत्रात आपले सर्वस्व ओतून अनेक वर्षे काम करणारे शरद जोशी आणि शेतकरी आंदोलन यांच्याविषयी काहीही नाही. India after Gandhi या रामचंद्र गुहा यांच्या सुप्रसिद्ध पुस्तकातही जोशी व त्यांचे शेतकरी आंदोलन यांची अवघ्या आठ ओळींत बोळवण केलेली आहे व तीही महेंद्रसिंग टिकैत यांच्यासह त्यांना एकत्र गुंफून. ती अगदी अन्यायकारक आहे असे मला वाटले. आपल्या या बहुचर्चित ८९८ पानी ग्रंथात गुहांनी काढलेला निष्कर्ष पुढीलप्रमाणे आहे : जोशी आणि टिकैत या दोघांचाही आपण ग्रामीण जनतेसाठी बोलत आहोत असा दावा होता. वस्तुतः ते दोघेही ट्रॅक्टर आणि विजेचे पंप वापरणाऱ्या मध्यम व सधन शेतकऱ्यांचे प्रतिनिधी होते. गरीब शेतकरी त्यांच्या कक्षेत नव्हतेच. (गांधीनंतरचा भारत, मराठी अनुवाद : शारदा साठे, मॅजेस्टिक प्रकाशन, मार्च २०११, पृष्ठ ६८४) शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या असंख्य शेतकऱ्यांना मी स्वतः भेटलो होतो. त्यांच्यापैकी अगदी क्वचितच कोणी टॅक्टर बाळगणारे होते. गहांच्या पुस्तकातील मजकूर उघड उघड चुकीचा होता. अशाच स्वरूपाच्या उल्लेखांनी, किंवा अनुल्लेखांनी, जर भावी पिढ्यांसाठी इतिहास लिहिला जाणार असेल, तर तो सत्याचा मोठा विपर्यास असणार होता.
 अशा गैरसमजांची कारणे अनेक असणार, पण त्यांतील एक मोठे कारण म्हणजे शरद जोशींच्या जीवनाचे व एकूणच शेतकरी संघटनेच्या इतिहासाचे समग्र व विश्वासार्ह दस्तावेजीकरण करणाऱ्या पुस्तकाचा अभाव. त्यांचे चरित्र जाणून घ्यावे असे ज्यांना वाटेल त्यांच्यासाठी तो पर्याय उपलब्ध व्हायला हवा या भूमिकेतून मी हे चरित्र लिहायला प्रवृत्त झालो.
 यावर चार-पाच वेळा झालेल्या चर्चेत जोशींनी सुचवल्याप्रमाणे मी त्यांना २१ मे २०१२ रोजी चरित्रलेखनाचा एक तीन-पानी प्रस्ताव दिला व त्यावर विस्ताराने चर्चा करण्यासाठी त्यांनी त्यांच्या देवी ऑर्किंडमधल्या फ्लॅटवर प्रमुख सहकाऱ्यांची बैठकही बोलावली. सकाळी अकरा वाजता सुरू झालेली बैठक जेवणानंतर संपली. शैलजा देशपांडे, गुणवंत पाटील हंगरगेकर, अजित नरदे, श्रीकांत अनंत उमरीकर, डॉ. मानवेंद्र काचोळे, अनंत गणेश देशपांडे, संजय सुरेंद्र कोले, वामनराव चटप, रवी देवांग, जगदीश ज. बोंडे, अनिल ज. धनवट, सुरेशचंद्र म्हात्रे, दर्शिनी भट्टजी, बद्रीनाथ देवकर (ज्यांचे नाव पुढे प्रकल्प समन्वयक म्हणून छापले गेले) आणि इतरही काही प्रमुख सहकारी हजर होते. जोशींच्या सांगण्याप्रमाणे प्रत्येकाला प्रस्तावाची प्रत दिली व बैठकीत चर्चाही झाली. ह्या प्रकल्पात त्या सगळ्यांचा सहभाग जोशींना हवा होता. जोशींनी आणखी एक केले. शेतकरी संघटक या संघटनेच्या मुखपत्राच्या पुढच्याच, म्हणजे, ६ जून २०१२च्या अंकात ह्या संकल्पित चरित्राविषयी एक पूर्ण पान निवेदन त्यांनी प्रसिद्ध करवले. त्यात एकूण चरित्रप्रकल्पाची माहिती होती व सर्वांनी त्यात सहकार्य द्यावे असे कार्यकारिणीसदस्यांच्या नावाने एक आवाहनही होते. त्यामुळे उपरोक्त सहकाऱ्यांप्रमाणे जागोजागी विखुरलेल्या त्यांच्या इतरही सहकाऱ्यांचे हार्दिक सहकार्य मिळाले. अनेकांनी त्यानंतर माझ्याशी संपर्क साधला व स्वतःजवळची शक्य ती माहिती पुरवली.
 ह्या चरित्रासाठी जोशींनी खूप वेळदेखील दिला. यापूर्वीच्या धावपळीच्या आयुष्यात ते जमले असते असे वाटत नाही. त्या काळात शेतकरी लढ्यांमध्ये जोशींचा प्रत्यक्ष सहभाग असा फारसा राहिला नव्हता; महत्त्वाच्या सभांना ते हजर राहत, आपले विचार मांडत, मार्गदर्शन करत, एवढेच. बहुधा त्यामुळेच ते चरित्रासाठी पुरेसा वेळ देऊ शकले, न कंटाळता निवांतपणे जुन्या आठवणी सांगू शकले, शक्य तेव्हा मी बरोबर प्रवासात यावे अशी व्यवस्था करू शकले. तसे करताना शेतकरी चळवळीच्या बाहेरचा एक माणूस म्हणून मला खूपदा अवघडल्यासारखे वाटे, कारण आमच्यातील तशा प्रकारच्या जवळीकीमुळे त्यांच्या जुन्या निष्ठावान सहकाऱ्यांना काय वाटू शकेल असा विचार मनात यायचा; पण जोशींचे आमंत्रण आग्रहाचे असे.
 दर शुक्रवारी सकाळी दहा वाजता आम्ही भेटायचो. दोन-तीन तास बोलणे व्हायचे. प्रत्यक्षात काम खूपच लांबत गेले. एक मुख्य कारण म्हणजे त्यांच्याकडे फारशी काही मूळ कागदपत्रे नव्हती आणि पूर्ण शहानिशा करून घेतल्याशिवाय कुठलाही मजकूर मला चरित्रात घ्यायचा नव्हता. 'एकदा उद्वेगाच्या भरात त्यांनी त्यांचे बरेचसे व्यक्तिगत कागदपत्र नष्ट केले,' असे नंतर मला म्हात्रेनी सांगितले. अशा परिस्थितीत चाकणपासून स्वित्झर्लंडपर्यंत आणि निपाणीपासून चंडीगढपर्यंत विखुरलेल्या त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांनी माझे आपल्या घरात आणि भावविश्वात स्वागत केले, आपला किमती वेळ दिला, आपल्याजवळचे कागदपत्र दिले, कडूगोड आठवणी सांगितल्या व या साऱ्या अमूल्य सहकार्यामुळेच पूर्वी कधीच लोकांसमोर न आलेली बरीच माहिती उजेडात आली आणि एकूणच ह्या लेखनाला स्मरणरंजनाच्या पलीकडे जाणाऱ्या दस्तावेजाचे स्वरूप देता आले.

 हे चरित्र लिहिताना ज्यांच्याकडून वेगवेगळी माहिती उपलब्ध झाली, त्यांचा उल्लेख शक्यतो प्रत्यक्ष लेखनात त्या-त्या जागी केलेला आहे; वेगवेगळ्या उद्धृतांचे मूळ स्रोतही नोंदवलेले आहेत. वारकरी, आठवड्याचा ग्यानबा आणि शेतकरी संघटक या अधिकृत मुखपत्रांचे जुने अंक आणि शरद जोशींचे पूर्वप्रकाशित साहित्य हा अर्थातच एक महत्त्वाचा स्रोत होता. पुस्तकात वापरलेली अनेक छायाचित्रे सरोजा परुळकर यांनी पुरवली व स्वतंत्र श्रेय नोंदवलेले नाही ती छायाचित्रे सुरेशचंद्र म्हात्रे यांच्या सौजन्याने प्राप्त झाली. त्यांचे आभार मानतो. जेव्हा जेव्हा मी जोशींना भेटायला त्यांच्याकडे जात असे, तेव्हा तेव्हा ज्यांनी माझा कधीही न कंटाळता मनापासून पाहुणचार केला, त्या दर्शिनी भट्टजी ऊर्फ दीदी यांचे आभार मानतो. सुरेशचंद्र म्हात्रे यांचे सहकार्य तर अगदी शब्दातीत आहे. गेल्या पाच वर्षांत असा एकही आठवडा गेला नसेल, जेव्हा मी काही ना काही माहितीसाठी त्यांना फोन केला नाही वा भेटलो नाही. सर्व लेखन पूर्ण झाल्यानंतर शेतकरी संघटनेच्या वतीने म्हणून त्यांनीच प्रत्येक पान नीट तपासून दिले ह्याबद्दलही त्यांचे आभार मानायला हवेत.

 शरद जोशींनी ज्यांना ह्या चरित्रासाठी प्रकल्प समन्वयक म्हणून नेमले होते त्या बद्रीनाथ देवकर यांचाही उल्लेख इथे करणे अपरिहार्य आहे; त्यांच्याबरोबर इतक्या ठिकाणी फिरलो आणि इतक्या साऱ्या लोकांशी त्यांनी माझी भेट घडवून आणली, की त्या साऱ्यांचा उल्लेख करणेही अवघड आहे. आपली सगळी इतर व्यक्तिगत कामे बाजूला सारून त्यांनी यासाठी वेळ दिला. अनंतराव देशपांडे यांचेही इथे आभार मानायला हवेत; अनेक भेटींचे आयोजन त्यांनी केले होते. महाराष्ट्राबाहेरील सहकाऱ्यांबद्दल लिहायचे तर स्वित्झर्लंड येथील बर्नमधले जोशींचे एकेकाळचे शेजारी आणि कार्यालयातील सहकारी टोनी डेर होवसेपियां, पंजाबातील बटाला येथील शेतकरीनेते व जोशींचे निकटचे स्नेही भूपिंदर सिंग मान, कर्नाटकातल्या निपाणी येथील तंबाखू आंदोलनातील सहकारी प्रा. सुभाष जोशी, कर्नाटक रयत संघाचे बंगलोरस्थित हेमंत कुमार पांचाल आणि सुरतमधील बांधकाम व्यावसायिक, शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते परिमल देसाई यांचा आवर्जून उल्लेख करायला हवा. शरद जोशी यांच्या कॅनडास्थित कन्या सौ. श्रेया शहाणे यांचेही आभार. आमच्या दोन भेटींमध्ये त्यांनी दिलेली माहिती बरीच उपयुक्त होती. पुस्तकासाठी ज्यांनी आर्थिक सहाय्य दिले त्या प्रमोद चौधरी यांचे व त्यांच्या प्राज फाऊंडेशनचे आभार मानतो.
 पुस्तकाची सर्व मुद्रिते, वयपरत्वे येणाऱ्या अडचणींवर मात करून, ज्यांनी खूप आपलकीने तपासन दिली त्या अंतर्नादच्या व्याकरण सल्लागार प्रा. यास्मिन शेख यांनाही मनापासून धन्यवाद. अक्षरजुळणीकार हरिश घाटपांडे, मुखपृष्ठकार श्याम देशपांडे, मुद्रक आनंद लाटकर आणि या साऱ्यांचे कुशल सहकारी यांचेही आभार मानायला हवेत.
 ऋणनिर्देशाची ही यादी खरे तर खूपच लांब होईल. कितीही नावे घेतली तरी काही वगळली जायची शक्यता आहेच. प्रत्यक्ष नामोल्लेख केला नाही तरीही त्या साऱ्यांविषयी मनात कृतज्ञभाव आहेच. त्यांच्याविना हे चरित्र लिहूनच झाले नसते असे म्हटले, तरी त्यात अतिशयोक्ती होणार नाही. वाचकांच्या हाती हे चरित्र देताना लेखकाची मनःस्थिती काहीशी संमिश्र आहे. हे काम व्हावे अशी ज्यांची खूप इच्छा होती, ते चरित्रनायक शरद जोशी आज आपल्यात नाहीत याची बोचरी खंत मनात आहे आणि त्याचबरोबर गेल्या पाच वर्षांतील बहुतेक वेळ ज्या प्रकल्पासाठी दिला त्याला मूर्त रूप लाभले याचे समाधानही आहे.
 शरद जोशींसारखा एक अनन्यसाधारण कृतिशील विचारवंत आपल्यात होऊन गेला. त्यांचा जीवनपट आणि त्यांचा वैचारिक वारसा ह्या चरित्रातून वाचकांपुढे अल्पस्वल्प जरी साकार झाला तरी हे श्रम सार्थकी लागले असे म्हणता येईल. आपल्या टेबलावरचे रोजचे जेवणाचे ताट ज्याच्या श्रमांतून येते त्या शेतकऱ्याचे विश्न, त्याच्या अडचणी, त्याचे संघर्ष, त्याच्या आशा, त्याच्या निराशा ह्यांची थोडीफार ओळख ह्या चरित्रलेखनातून लेखकाला झाली आणि तशीच ती या चरित्रवाचनातून वाचकालाही व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करून थांबतो.

- भानू काळे

शिक्षणयात्रा


 'शेतकऱ्यांचे पंचप्राण' म्हणून ज्यांची पुढे ख्याती झाली त्या शरद अनंत जोशी यांचा जन्म ३ सप्टेंबर १९३५ रोजी झाला. शनिवार पेठ, सातारा येथे. पण एक आश्चर्य म्हणजे त्यांच्या, किंवा त्यांच्याविषयीच्या, प्रकाशित लेखनात ते सातारा येथे जन्मले ह्याची कुठेच नोंद नाही. खूप वर्षांनंतर, ९ जानेवारी २०१० रोजी, त्यांना तेथील रा. ना. गोडबोले चॅरिटेबल ट्रस्टतर्फे साताऱ्यात जन्मलेल्या व लोकोत्तर कार्य केलेल्या एखाद्या व्यक्तीला दिला जाणारा साताराभूषण पुरस्कार मिळाला, तेव्हाच बहुतेकांना कळले, की साताऱ्याशी त्यांचे असे काही जवळचे नाते आहे. याचे एक कारण कदाचित हे असावे, की त्यांचे वडील अनंत नारायण जोशी हे पोस्टात नोकरीला होते व त्यामुळे त्यांच्या बऱ्याच बदल्या होत असत. विशेषतः सुरुवातीच्या काळात. पुढे ह्या बदल्यांची वारंवारिता कमी झाली.
 अनंतरावांचा जन्म १९०५ सालचा. ते चार-पाच वर्षांचे असतानाच त्यांचे आईवडील वारले. घरची आत्यंतिक गरिबी होतीच, त्यात आता आणखी अनाथाचे जिणे नशिबी आले. आधार कोणाचाच नव्हता. माधुकरी मागून आणि घरोघर वारावर जेवूनच त्यांचे शिक्षण झाले. कोल्हापूर येथील एका ख्रिश्चन मिशनरी शाळेत. त्यामुळे त्यांच्या मनावर ख्रिस्ती शिकवणुकीचा बराच प्रभाव पडला होता. पुढे शरद जोशी यांच्या एका कथेवर त्यांनी जी प्रतिक्रिया व्यक्त केली होती, तिच्यावरून त्यांच्या स्वभावावर थोडासा प्रकाश पडतो.
 कॉलेजात शिकत असताना शरद जोशींनी ती कथा लिहिली होती व त्यावेळच्या एका चांगल्या मासिकात ती प्रसिद्धही झाली होती. त्या कथेत मुंबईतला एक तरुण लोकल गाडीखाली सापडून मरतो व त्याचे प्रेत त्याच्या घरी आणले जाते. चाळीतली सर्व मंडळी अवतीभवती गोळा होतात. त्यांच्यात एक विधवा असते. त्या तरुणाच्या शेजारीच राहणारी. प्रेत बघितल्यावर लोकांच्या चेहऱ्यावर काय काय प्रतिक्रिया उमटल्या व विशेषतः त्या विधवेच्या चेहऱ्यावर काय भाव उमटला याचे वर्णन करताना त्यांनी लिहिले होते, की एखाद्या विधवा बाईला दुसऱ्या बाईचा नवरा मेल्यावर जे समाधान वाटेल, तसे समाधान तिच्या चेहऱ्यावर दिसत होते! हे मी माझ्या खवचट स्वभावाने लिहिले होते' असेही त्यांनी नंतर नमूद केले आहे. सॉमरसेट मॉम हा त्यांचा त्यावेळचा आणि नंतरचाही आवडता लेखक. त्यावेळी जोशींनी नुकतीच कथा लिहायला सुरुवात केली होती व मॉमच्या काही कथांचा त्यांनी अनुवादही केला होता. मॉम त्याच्या इतर वैशिष्ट्यांबरोबरच मनुष्यस्वभावातील विसंगतीच्या चित्रणासाठी, चर्च व मिशनऱ्यांच्या थट्टेसाठी आणि एकूणच तुच्छतावादासाठी (सिनिसिझमसाठी) प्रसिद्ध. त्याच्याच प्रभावाखाली लिहिलेले हे वाक्य असावे. वडलांच्या वाचनात ती कथा आली व ते वाक्य त्यांना अजिबात आवडले नाही. त्यांच्या त्या वेळच्या प्रतिक्रियेविषयी जोशींनी बऱ्याच वर्षांनी (अंगारमळा, पृष्ठ ११४) लिहिले आहे,

माझे वडील अगदीच वेगळ्या पठडीतले. राग आला तर दुष्ट, कपटी, अभद्रेश्वर व राक्षस यापलीकडे पाचवी शिवी त्यांना माहीत नव्हती. माझी गोष्ट वाचून ते रागाने म्हणाले, 'मनुष्य जितका दुष्ट आहे, तितकं सगळं कागदावर लिहिण्याची काही आवश्यकता नाही.' मी मोठ्या पंचायतीत सापडलो. जे आहे, जे मला दिसतंय ते लिहायचं नाही, म्हणजे मग काय लिहायचं? मग मी हळूहळू साहित्यापासून दूर जायला लागलो.

 अनंतराव पोस्टात साधे कारकून म्हणूनच लागले होते. 'एकदा माणूस पोस्टात लागला की निवृत्त होईपर्यंत तिथेच चिकटतो' असे गमतीने म्हटले जाई. अनंतरावांच्या बाबतीतही ते खरेच ठरले. ह्या नोकरीत पगार तसा बेताचाच असायचा; शिवाय पदरी चार मुलगे व दोन मुली. त्यामुळे तसा ओढाताणीचाच संसार. वडलांना खास आवडीनिवडी अशा फारशा नव्हत्या. सामाजिक जीवनातही त्यांचा काही सहभाग नसे. त्या काळातील बहुसंख्य सरकारी नोकरांप्रमाणे आपण बरे की आपली नोकरी बरी अशीच एकूण त्यांची वृत्ती असावी.

 जोशींच्या आईचे नाव इंदिरा. त्यांचा जन्म १ जुलै १९११ रोजी झाला. त्या मूळच्या पंढरपूरच्या. माहेरच्या आपटे. वर देशस्थ-वधू कोकणस्थ असा, आज काहीच विशेष नसलेला पण पाऊणशे वर्षांपूर्वीच्या ग्रामीण महाराष्ट्रात पुरोगामी मानला जाणारा त्यांचा विवाह. वडलांना मुले 'काका' म्हणत, तर आईला 'माई'.
 आपल्या वडलांबद्दल जोशींनी फारसे कुठे लिहिलेले नाही, ते वारलेही तसे लौकर; पण आईबद्दल मात्र त्यांनी काही ठिकाणी उत्कटतेने लिहिले आहे. त्या पंढरपूरच्या असूनही त्यांच्या घरची मंडळी वागण्यात फारशी धार्मिक वा कर्मकांड पाळणारी नव्हती. शिवाय, इंदिराबाई कायम तेथील बडव्यांच्या विरोधात असत. ते बडवे अनीतीने वागतात, भाविकांना लुटतात, आणि विशेष म्हणजे गावात येणाऱ्या परित्यक्तांशी गैरवर्तन करतात असे बोलले जाई व त्याचा इंदिराबाईंना खूप राग असायचा. त्यांचे वडील विष्णुपंत विठ्ठल आपटे समाजसुधारक होते. १९१४ साली त्यांनी पंढरपुरात आपटे प्रशाला सुरू केली होती. पुढे उपलब हे पंढरपुरातील प्रसिद्ध उद्योजक कुटुंबही तिच्यात सहभागी झाले व आपटे-उपलब प्रशाला ह्या नावाने आजही ती शाळा चालू आहे.
 आश्चर्य म्हणजे घरची शाळा असूनही इंदिराबाईंचे औपचारिक असे शालेय शिक्षण झाले नव्हते. दोन बालविधवा बहिणी घरात; त्यामुळे घरकाम खूप. घरच्या सुसंस्कृत वातावरणामुळे इंदिराबाईंना लहानपणापासूनच वाचनाचे वेड मात्र होते. अनेक कविता त्यांना पाठ होत्या. संगीताचीही आवड होती व पाठ केलेल्या कविता त्या नेहमी सुरेल आवाजात मोठ्याने म्हणत असत. पेटीही छान वाजवायच्या. त्यांची दृष्टी लहानपणापासून अधू होती; एका डोळ्याने काहीच दिसत नसे व पुढे पुढे तर दुसऱ्या डोळ्यानेही खूप पुसट दिसायला लागले. त्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करावी व त्यामुळे कदाचित अधिक चांगले दिसू लागेल, असे अनेकांनी सुचवूनही त्या तयार झाल्या नाहीत. “शस्त्रक्रिया करायचीच तर लहानपणीच आंधळ्या झालेल्या डोळ्यावर करा. सुधारला तर तो सुधारेल. नाहीतर मी दोन्ही डोळ्यांनी आंधळी होईन," त्या म्हणत.
 हो-नाही करता करता अनेक वर्षे गेली. पुढे वय झाल्यावर मग शेवटी डॉक्टरांचेही मत 'ह्या वयात आता ऑपरेशनचा धोका नकोच' असे झाले. त्यामुळे मग ऑपरेशन टळले, पण जवळजवळ काहीच दिसेनासेही झाले. तशाही परिस्थितीत त्यांची वाचनाची आवड कायम होती. रोजचे वर्तमानपत्र अगदी डोळ्याशी नेऊन वाचायला लागले तरीही त्या वाचत. त्यांनी दोन नाटके आणि काही कथाही लिहिल्या होत्या; वृत्तपत्रांकडे त्या पत्रेही पाठवत.
 अधूनमधून त्यांना कविता स्फुरायच्या व जे कोणी मूल जवळपास असेल त्याला ती कविता सुवाच्य अक्षरात लिहून द्यायचा त्या आग्रह करायच्या. बालसुलभ वृत्तीनुसार मुले ती लिहून घेण्यात टंगळमंगळ करत असत. तरीही त्या मुलांना पुनःपुन्हा विनंती करत, मुलांच्या मागे लागत. त्यांच्या काही कविता कुठे कुठे छापूनही आल्या होत्या. आपल्या कवितांचे पुस्तक निघावे अशी त्यांची इच्छा होती. 'माझं एखादं पुस्तक प्रसिद्ध कर, असा लकडा त्यांनी नंतर जोशींचे एक निकटचे सहकारी प्रा. सुरेशचंद्र म्हात्रे यांच्यामागे लावला होता. आपल्या अखेरच्या दुखण्याच्या वेळी इस्पितळात असतानासुद्धा त्यांनी म्हात्रेंना त्याची आठवण करून दिली होती. पण काही ना काही कारणांनी योग येत नव्हता. त्यांच्या निधनानंतर अनेक वर्षांनी म्हात्रे यांच्या पुढाकारातून ती इच्छा पूर्ण झाली; त्यांच्या कवितांचा एक संग्रह ३ सप्टेंबर २०१५ रोजी, शरद जोशी यांच्या ऐंशीव्या वाढदिवशी, श्रीकांत उमरीकर यांच्या औरंगाबाद येथील जनशक्ती वाचक चळवळीने माईंच्या कविता या नावाने प्रसिद्ध केला. एक वेगळेपण म्हणजे त्या वृत्तबद्ध आहेत व त्यांतील अनेकांना इंदिराबाईंनी त्यावेळच्या प्रसिद्ध गीतांनुसार चालीही लावल्या होत्या.
 १९८२ ते १९९२ या कालावधीत म्हात्रेनी इंदिराबाईंशी शक्य तेवढा संपर्क ठेवला. त्या काळात चळवळीमुळे जोशी बहुतांशी प्रवासात असत, पुण्यात येणे कारणपरत्वेच होई. म्हात्रे अधिक वरचेवर येत. आई, कशाला ग पुनः दुष्ट पावसाळा आला? या शीर्षकाची इंदिराबाईंची एक कविता कित्येक वर्षांपूर्वी साधना साप्ताहिकात प्रकाशित झाली होती. जोराच्या पावसामुळे गरिबाच्या घरात पाणी कसे शिरते, सगळ्यांचे किती हाल होतात, तो प्रश्न विचारणाऱ्या मुलाचे वडीलही अशाच पावसाळ्यात कसे वारलेले असतात वगैरे अनेक आठवणींचे चित्रण करणारी. म्हात्रेनी ती त्याचवेळी वाचली होती व प्रत्यक्ष भेट झाल्यावर त्यांनी एकदा इंदिराबाईंना तिची आठवण करून दिली. इंदिराबाईंना त्याचे फार कौतुक वाटले होते. म्हात्रे पेटीही चांगली वाजवत. दोघांना जोडणारा तो आणखी एक दुवा. म्हात्रेंना त्या आपला मुलगाच मानत. म्हात्रे सांगत होते, "आपल्या शरदला हा सांभाळेल, असा विश्वास बहुधा त्यांना वाटत होता."
 इंदिराबाई खूप कर्तृत्ववान व कामसू होत्या; सतत काही ना काही चालूच असायचे. बागेतला पालापाचोळा गोळा करणे, घरचे केरवारे, भांडी-धुणी, स्वैपाक वगैरे सगळी कामे त्या स्वतःच करायच्या. लहानसहान दुरुस्तीची कामेही. अधूनमधून मोलकरीण मिळायची, पण त्यांच्या कडक शिस्तीला कंटाळून ती लगेचच काम सोडून द्यायची. त्यामुळेही कदाचित त्यांना सर्व कामे स्वतः करायची सवय लागली असेल. शिवाय कुठलेही काम कसे करायचे ह्याची त्यांची एक पद्धत ठरलेली असायची व तीच पद्धत सर्वोत्तम आहे याविषयी त्यांची खात्री असायची. तसे त्या इतरांना पटवूनही द्यायच्या. कुठलेही काम दुसऱ्या कुठल्या पद्धतीने केलेले त्यांना पसंत पडत नसे. साहजिकच त्यांच्याकडे कोणी नोकर टिकत नसत. पुढे जोशींनी लिहिले आहे, "तिच्याकडे कामाला राहिलेल्या बाया, मोलकरणी यांच्याच कथा लिहायच्या म्हटल्या, तरी तो एक वाचनीय ग्रंथ होऊन जाईल."
 त्यांचे आणखी एक वेगळेपण म्हणजे त्या अगदी करारी व स्वतंत्र बाण्याच्या होत्या. "शिकली असती तर माझी आई एखाद्या कंपनीची मॅनेजिंग डायरेक्टरही सहज झाली असती," असे त्यांचे सध्या नाशिकला राहणारे एक चिरंजीव प्रभाकर ऊर्फ येशू प्रस्तुत लेखकाला म्हणाले होते.
 यजमान वारल्यानंतरही कुठल्याच मुलाकडे न जाता त्यांनी स्वतःच्या घरात एकट्याने राहणेच पसंत केले होते. पुण्यात प्रभात रोडवर, आताच्या आयकर कार्यालयाजवळ पतीने बांधलेल्या 'सदिच्छा' ह्या छोट्या बंगल्यात. आपल्या खासगीपणाची (पर्सनल स्पेसची) कटाक्षाने केलेली जपणूक हे एकूणच जोशी कुटुंबीयांचे एक वेगळेपण असल्याचे जाणवते. जोशी जेव्हा स्वित्झर्लंडहून सहकुटुंब भारतात परतले, तेव्हादेखील स्वतःचे वेगळे घर विकत घेईपर्यंतचे सहाएक आठवडे आईकडे न राहता ते सहकुटुंब डेक्कनवर श्रेयस हॉटेलात राहिले होते. थोरल्या भगिनी नमाताई पुढे म्हातारपणी जबलपूरहून महाराष्ट्रात स्थायिक झाल्या, तेव्हा त्यांनीही चाकणला आपले स्वतंत्र बिहाड थाटले; त्या पुण्यात भावाकडे म्हणजे शरदकडे राहायला आल्या नाहीत.
 १९७० साली अनंतराव वारले. वयाच्या पासष्टाव्या वर्षी. त्यावेळी सुट्टी घेऊन जोशी स्वित्झर्लंडहून पुण्याला आले होते. परत गेल्यावर त्यांनी आईला एका पत्रात लिहिले होते : "काका गेले म्हणजे आता उरलेले आयुष्य कसेबसे काढून संपवायचे आहे, असा विचारही मनात आणू नकोस. अशातही जिद्दीने उभे राहून आयुष्याला एक नवा अर्थ दिला पाहिजे." नंतर या संदर्भात लिहिताना “मी तिला असे लिहिण्याची गरज होती असे नाही; मी न लिहिताही तिचा निर्णय असाच झाला असता," असेही जोशींनी लिहिले आहे. परंतु माई मात्र त्या पत्राचा वरचेवर उल्लेख करत. पतिपश्चात आपल्या आयुष्याची घडी त्यांनी पुन्हा एकदा बसवली; पण तरीही पतीमागे तब्बल बावीस वर्षे एकट्याने राहण्याची वेळ येईल अशी त्यांची अपेक्षा नसावी. "मला घेऊन जायचं देव विसरून गेला," त्या कधीकधी म्हणत.  दिवस जात राहिले; त्या ब्याऐंशी वर्षाच्या झाल्या. डॉक्टरकडे त्या अगदी क्वचितच जात. लिंबाचे सरबत किंवा आल्याचे पाचक किंवा एखादे आयुर्वेदातले चूर्ण यावर त्यांचे दुखणे बहुतेकदा बरे होई. पण एक दिवस अगदी गंभीर प्रसंग ओढवला. घरी स्वयंपाक करता करता पदर पेटून भाजल्याने त्यांना पुण्यात जवळच असलेल्या जोशी हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. हॉस्पिटलमध्ये असतानाच माई गेल्या. तो दिवस होता ३ मार्च १९९२.

 शरदचा जन्म पंचांगाप्रमाणे ऋषिपंचमीचा. शरद हे नाव मोठ्या बहिणीने, नमाताईने, ठेवले. शरद इतर भावंडांच्या तुलनेत सावळा पण अंगाने गुटगुटीत होता. 'सुदृढ बालक स्पर्धेत त्याला नक्की बक्षीस मिळालं असतं,' असे आई म्हणायची. घरी सगळे त्याला गबदुलशेठ म्हणत. बोलणे थोडे बोबडे; त्यामुळे बोबडकांदा म्हणूनही चिडवत. साताऱ्यात दोन-तीनदा वडलांनी घरे बदलली व पुढे लवकरच त्यांची बेळगावला बदली झाली.
 बेळगावात ठळकवाडीत लोकूर म्हणून एका डॉक्टरांचा बंगला होता. त्याच्या आउटहाउसमध्ये जोशी परिवार राहू लागला. जवळच एक शाळा होती. 'रजपूत बंधूंची शाळा' असेच तिला म्हणत. इथले माध्यम कन्नड नव्हते, तर मराठीच होते. ह्या खासगी शाळेत महिन्याला एक रुपया फी होती, इतर सरकारी शाळा फुकट होत्या; पण घरच्यांना शिक्षणाचे महत्त्व असल्याने सगळी मुले ह्याच शाळेत जाऊ लागली. 'आपण सरकारी शाळेत नव्हे, तर खासगी शाळेत जातो' ह्याचा आजच्याप्रमाणे त्या काळीही काहीसा अभिमान बाळगला जाई. मास्तरांनी घेतलेल्या प्रवेशपूर्व चाचणीत चांगली उत्तरे दिल्यामुळे धाकट्या शरदला एकदम दुसरीत प्रवेश दिला गेला. लहानपणापासून शरद खूप हुशार. पाठांतर उत्तम. मोठा भाऊ बाळ एक यत्ता पुढे होता, पण त्याच्याबरोबरच वावरत असल्याने ऐकून ऐकून त्याचेही धडे शरदला पाठ असत. त्यामुळे खरेतर शरदला एकदम तिसरीत बसवायलाही रजपूत मास्तर तयार होते. पण 'शरदला माझ्याच वर्गात बसवलं तर मी शाळा सोडून देईन' अशी धमकी बाळने दिल्यामुळे नाइलाजाने शरदला दुसरीतच बसावे लागले. त्याची जीभ थोडीशी जड होती; तरीही कष्टपूर्वक त्याने आपले उच्चार सुधारले. बऱ्याच वर्षांनी बेळगाव येथील एका जाहीर सभेत जोशींनी केलेल्या अस्खलित भाषणाचे रजपूत मास्तरांना त्यामुळे खूपच कौतुक वाटले होते.
 बेळगावचा एक प्रसंग सांगण्यासारखा आहे. पाटकर नावाच्या एका शिक्षकांची शिकवणी आईने बाळला ठेवली व त्याच्याबरोबर तूही बसत जा' असे शरदला सांगितले. शरदला तो अपमान वाटला. शिकवणी लावणे म्हणजे कुठेतरी आपण अभ्यासात कमी आहोत, मठ्ठ आहोत, हे मान्य करणे असे त्याला वाटले. त्याची समजूत घालताना आई म्हणाली,
 “गरीब बिचारे पाटकर मास्तर! महिना एक रुपयात रोज तासभर घरी येऊन शिकवणी घ्यायला तयार आहेत आणि तुम्ही दोघंही बसणार असलात तर ते आपल्यालाही परवडेल. तुला शिकवणीची कदाचित गरज नसेल, पण बाळला तिचा उपयोग होणार आहे. त्याच्याशेजारी नुसतं बसायला तुला काय एवढा त्रास आहे? तेवढंच काही कानावर पडेल. पुढच्या वर्षी तुला कदाचित बाळबरोबर एकदम चौथीतच बसवू. शिवाय ह्या एक रुपयाची पाटकर मास्तरांना मोठी मदत होणार आहे. अरे, तुझ्या वडलांना महिना चाळीस रुपये पगार आहे आणि तरी त्यात भागवताना आपली किती ओढाताण होते तुला ठाऊकच आहे. पाटकर मास्तरांना तर फक्त महिना आठ रुपये पगार आहे! त्यांची किती ओढाताण होत असेल?"
 त्यानंतर शरद शिकवणीला बसायला तयार झाला. कदाचित मोठ्या भावाबरोबर एकदम चौथीत बसायच्या आमिषाने! शिकवणीचा त्याला किती फायदा झाला असेल कोण जाणे, पण आईने ज्या प्रकारे त्याची समजूत काढली, त्याची मात्र त्याला आयुष्यभर आठवण राहिली. आपली परिस्थिती चांगली नसली, तरी आपण आपल्यापेक्षाही दुर्बळ अशा कोणालातरी मदत करू शकतो ही शिकवण फार महत्त्वाची होती. 'लहानपणी आम्ही गरीब असतानाही आमच्याकडे कायम कोणीतरी विद्यार्थी वारकरी म्हणून रोज जेवायला असायचा, याचा उल्लेख त्यांनी एकदा काहीशा अभिमानाने केला होता. गरजू विद्यार्थ्याला वारावर जेवायला घालून मदत करायची, तर गरजू मास्तरांना शिकवणी देऊन मदत करायची, हा इंदिराबाईंचा मनोदय त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बरेच काही सांगणारा आहे.
 बेळगावची जोशींनी सांगितलेली आणखी एक आठवण म्हणजे ते तिथे जिन्यावरून खाली पडले होते ती. ते म्हणाले,
 “मला फ्लॅट फूटचा, सपाट तळपायाचा, थोडा त्रास होता. साहजिकच तोल सांभाळणं इतर सर्वसामान्य मुलांपेक्षा मला किंचित अवघड व्हायचं. अशा मुलांना लष्करात प्रवेश मिळत नसे. साताऱ्याला असताना एकदा मी व बाळ डोंबाऱ्याचा खेळ खेळत होतो व तेव्हाही मी असाच दोरीवरून पडलो होतो आणि पायही मुरगळला होता."
 पुढील आयुष्यात जोशी भरपूर चालत, अगदी गिर्यारोहणही करू लागले. बोबडेपणाप्रमाणे ह्या फ्लॅट फूटवरही त्यांनी मात केली. या सगळ्यामागे, जन्मजात शारीरिक कमतरतेवर मात करण्यामागे, त्यांची जिद्द दिसून येते.
 त्यांची आणखीही एक लहानपणची साताऱ्यातली आठवण ह्या गिर्यारोहणप्रेमाशी असलेला बालपणाचा संबंध सुचवणारी आहे. ते सांगत होते,
 "लहानपणी मला प्लुरसी झाली होती - फुफ्फुसांचा हा एक न्युमोनियासारखा विकार. त्याचा परिणाम म्हणून कदाचित असेल, पण मला बंदिस्त जागेत खूप कोंदटल्यासारखं (claustrophobic) होई. डोंगरावर फिरायला गेलं, की मात्र तिथल्या मोकळ्या हवेमुळे बरं वाटायचं. साताऱ्याला अजिंक्यतारा किल्ल्यामागे खूप डोंगर होते. आमच्या गड्याच्या किंवा कधी वडलांच्या खांद्यावर मी बसलेला असायचो. तिथून लांबवरचं दृश्य दिसायचं. ते बघणं मला खूप आवडायचं. पुढे मला डोंगर चढायची जी आवड लागली, तिचं मूळ कुठेतरी ह्या शारीरिक कमतरतेत असावं."

 १९४२च्या फेब्रुवारीत वडलांची नाशिकला बदली झाली. यावेळी बढतीही मिळाली होती. पोस्टाच्या एका खात्यांतर्गत परीक्षेत पहिला क्रमांक मिळाल्याने त्यांना इन्स्पेक्टर म्हणून नेमले गेले. पगारही थोडा वाढला. गंगापूर रोडवर कुलकर्णी नावाच्या एका गृहस्थांच्या बंगल्यात ते राहू लागले. तिसरी व चौथी यत्ता शरदने इथल्या प्राथमिक विद्यामंदिर ह्या शाळेत काढल्या व नंतर पाचवी ते नववी त्याच शाळेशी संबधित असलेल्या रुंगठा हायस्कूलमध्ये. तेच सध्याचे न्यू हायस्कूल. इथे असताना शरदला वाचनाचे जे वेड लागले ते पुढे आयुष्यभरासाठी. त्या दिवसांविषयी बोलताना जोशी म्हणत होते,
 "मला वाचनाकडे वळवण्यात मोठा सहभाग होता तो तेथील एक शिक्षक अकोलकर ह्यांचा. त्याच सुमारास मी शेजारपाजारच्या इतर मुलांबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेतही जाऊ लागलो. संघात जाण्यामागे फारसं काही वैचारिक कारण होतं असं नाही, पण संध्याकाळचे शाखेतले मैदानी खेळ मला आवडायचे. त्यावेळी टीव्ही वगैरे नव्हते. आमच्या घरासमोरच्या रस्त्यावरून कधी कधी संघाची संचलनं होत. गणवेषातले ते सगळे शिस्तीत चालणारे तरुण बघायला मजा यायची. आम्ही मुलंही मग घरातल्या घरात जमिनीवर चिंचोके मांडून संचलनाचा असा एक खेळ खेळायचो. संघाप्रमाणेच राष्ट्रसेवादलातही आम्ही जायचो. तेही मला आवडायचं. सानेगुरुजी त्यावेळी सेवादलात येत. सुंदर, भावुक गाणी तालासुरात म्हणत व त्यांच्यामागे आम्हालाही मोठ्याने म्हणायला लावत. त्यावेळचे सानेगुरुजी खूप ओजस्वी अशी भाषणंही करत. आमचा ते अगदी आदर्श होते."

 १९४२चा ऑगस्ट महिना. गांधीजींच्या आदेशानुसार चले जाव आंदोलन सुरू झाले. प्रभातफेऱ्या वगैरे सुरू झाल्या होत्या. शरद तेव्हा सात-आठ वर्षांचाच होता, त्यामुळे प्रत्यक्ष आंदोलनात तो सहभागी व्हायचा प्रश्नच नव्हता. पण विशेष म्हणजे सेवादलातील अन्य मुलांना होती त्याप्रमाणे त्याला किंवा घरच्यांना एकूण त्या आंदोलनाबद्दल फारशी सहानुभूतीदेखील नव्हती. ह्याचे कारण सांगताना जोशी म्हणाले,
 “सरकारी नोकरीत असल्याने वडलांना चळवळीत कुठल्याही प्रकारे सहभागी होणं शक्य नव्हतं. दुसरं म्हणजे, गांधीजी जरी अहिंसेचे पाठीराखे होते, तरी प्रत्यक्षातलं आंदोलन अहिंसक नव्हतं. आंदोलक खूपदा जाळपोळदेखील करत. माझे वडील तेव्हा देवळाली पोस्ट ऑफिसात होते. पत्राची एक पेटी आंदोलकांनी जाळली होती. वडलांनी ती कशीबशी उघडली व आतली अर्धवट जळलेली पत्रं ते घरी घेऊन आले. घरीच मग आम्ही सगळ्यांनी त्यांचं सॉर्टिंग केलं व ती योग्य त्या ठिकाणी रवाना केली. त्यातली अनेक पत्रं महत्त्वाची असू शकतील. अहिंसात्मक मानल्या गेलेल्या चळवळीची ही दुसरीही बाजू होती हे त्या लहान वयातही माझ्या लक्षात आलं त्या विशिष्ट दिवशी एक अमेरिकन लष्करी अधिकारी आमच्या घरी आला होता. असे अनेक अमेरिकन तेव्हा इतर इंग्रज अधिकाऱ्यांबरोबर भारतात होते. दुसरं महायुद्ध चालू असल्याने. सॉर्टिंगच्या वेळी आम्हाला सापडलेली काही महत्त्वाची पत्रं ताब्यात घेण्यासाठी तो आला होता. तो गेला तेव्हा आईने सगळं घर पाण्याने धुऊन काढलं होतं. तसं आमच्याकडे कोणीच कसली अस्पृश्यता पाळत नव्हतं, पण ह्या गोऱ्या सोजिरामुळे मात्र आपलं घर बाटलं असं तिला वाटलं असावं; किंवा कदाचित त्याच्या बुटाला माती लागलेली असेल व बुटांबरोबर तीही घरात आली असेल."  'बेचाळीसचे गौडबंगाल' या त्यांनी बऱ्याच वर्षांनी लिहिलेल्या लेखाला (शेतकरी संघटक, २१ नोव्हेंबर १९९३) नाशिकमधील त्यावेळच्या अनुभवाची पार्श्वभूमी आहे. स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस पक्षाने बेचाळीसच्या आंदोलनाचे सर्व श्रेय आवर्जून स्वतःकडे घेतले आहे; पण प्रत्यक्षात जोशीच्या मते त्या आंदोलनात गांधी-नेहरूंचा विरोध असलेला हिंसाचारही खूप झाला होता. टपाल कचेऱ्या जाळणे, विजेच्या व संदेश वाहतुकीच्या तारा तोडणे, रेल्वेचे रूळ उखडणे, सरकारच्या साऱ्या नाड्याच आखडल्या जातील व सेनेच्या हालचालींमध्ये अडचणी येतील असे संप जागोजाग घडवून आणणे; हे सारे झाले होते. 'बेचाळीसच्या चळवळीतील काँग्रेसची जबाबदारी' या विषयावर लंडन येथे एक श्वेतपत्रिका प्रकाशित करण्यात आली होती व या हिंसाचारातील काँग्रेसच्या सहभागाचे अनेक पुरावे त्यात देण्यात आले होते.
 तशी इंग्रज सरकारला बेचाळीसच्या आंदोलनाची फारशी फिकीर नव्हती; त्यांनी ते पोलिसांचे बळ वापरून महिन्याभरातच दाबूनही टाकले होते. त्याचप्रमाणे महायुद्ध चालू असताना व स्वतःचे सगळे सैन्य तिथे गुंतलेले असतानाच भारतात झालेल्या या आंदोलनामुळे ते दबले व म्हणून त्यांनी भारताला स्वातंत्र्य दिले, या म्हणण्यातही जोशींच्या मते काही तथ्य नव्हते; कारण अमेरिका युद्धात उतरल्यावर दुसरे महायुद्ध आपण जिंकणार ह्याविषयी इंग्रजांना कधीच शंका नव्हती; पण जर्मनीवर आपण निर्णायक प्रतिहल्ला करण्यापूर्वी रशियावर स्वारी करून गेलेल्या जर्मन फौजांनी साम्यवादी रशियाचे जास्तीत जास्त नुकसान केले, तर ते त्यांना हवेच होते. म्हणूनच केवळ ते जर्मनीवर घणाघाती हल्ला करणे शक्य तितके लांबणीवर टाकत होते. पण रशियाने हिटलरला अनपेक्षितपणे जबरदस्त प्रतिकार केला व शेवटी जर्मनीला रशियातून काढता पाय घ्यावा लागला; उलट्या रशियन फौजा जर्मनीच्या रोखाने पुढे सरकू लागल्या. आता हिटलरच्या पाडावाचे सारे श्रेय रशियालाच मिळेल अशी धास्ती वाटून, शेवटी इंग्रजांनी ६ जून १९४४ रोजी फ्रान्समधल्या नॉर्मंडी इथे सर्वशक्तीनिशी दोस्तांची मोठी फौज अंतिम हल्ल्यासाठी उतरवली. लेखाच्या शेवटी जोशी या साऱ्या निवेदनाला एक अगदी आगळे असे वळण देतात. ते लिहितात,

१९४४-४५च्या सुमारास भारतातील तरुणांवर जयप्रकाश नारायण, अच्युतराव पटवर्धन यांचा मोठा प्रभाव होता. युद्ध संपले, स्वातंत्र्यदानाची प्रक्रिया सुरू झाली. स्वातंत्र्य जर लवकर आले नाही, तर अहिंसावादी स्वराज्य आंदोलन संपून बेचाळीसच्या जहालांच्या हाती आंदोलनाचे नेतृत्व जाईल, अशी धास्ती नेहरूपटेल यांनासुद्धा पडली होती. घाईत त्यांनी फाळणीदेखील कबूल करून टाकली. त्याचे एक कारण बेचाळीसच्या क्रांतिकारकांबद्दलची काँग्रेसनेतृत्वाची धास्ती, हे उघड आहे.

 काँग्रेसनेत्यांनी फाळणीला शेवटी पाठिंबा का दिला, याची अनेक संभाव्य कारणे पूर्वी वाचनात आली होती; पण चळवळीचे नेतृत्व आपल्या हातून निसटेल व ते जहालांच्या हाती जाईल, आणि पर्यायाने हातातोंडाशी आलेला स्वातंत्र्योत्तर सत्तेचा आपला घासही हिरावला जाईल ही काँग्रेसनेत्यांची भीती हे एक कारण होते, हे मात्र कधी वाचनात आले नव्हते. एखाद्या घटनेचे इतरांपेक्षा अगदी वेगळे असे विश्लेषण जोशी कसे करू शकायचे याचे हे एक चांगले उदाहरण आहे.

 अनंतरावांचे नाशिकनंतरचे पोस्टिंग मुंबई इथे होते. राहायला त्यांनी भाड्याने घर घेतले होते. (६०, लक्ष्मी निवास, अंधेरी पूर्व) त्यावेळी वाजवी भाड्याने मुंबईत सर्वत्र जागा उपलब्ध होत्या. त्यावेळचा पार्ले-अंधेरी परिसर आतासारखा गजबजलेला नव्हता. खूप मोकळी जागा असायची, झाडे मुबलक होती, लोकवस्ती अगदी तुरळक व बरीचशी माणसे एकमेकांना ओळखतही असत. पुढे अनंतरावांची बदली प्रमोशनवर बडोद्याला झाली, पण कुटुंब मात्र त्यांनी याच घरात ठेवले.
 इथे जोशींच्या अन्य भावंडांविषयी लिहायला हवे. एकूण ती सहा भावंडे. सगळ्यात मोठ्या निर्मला ऊर्फ नमाताई. यांचा जन्म १९३०चा. म्हणजे शरदहन पाच वर्षांनी मोठ्या. त्यांचे यजमान चंद्रकांत देशपांडे जबलपूरला सरकारच्या दारूगोळा कारखान्यात होते व आयुष्याची पन्नास वर्षे त्या तिथेच राहिल्या. नंतर सिंधूताई वसंतराव जोशी. मुंबईत गोवंडीला राहायच्या. त्या रसायनशास्त्र विषय घेऊन एम्.एस्सी. झाल्या होत्या व टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये नोकरी करत. त्यांचे यजमान वसंतराव टेक्स्टाइल इंजिनिअर होते. आता दोघेही हयात नाहीत. त्यांचे जवळचे वर्गमित्र गोपाळराव परांजपे यांनी दिलेल्या माहितीनुसार वसंतराव मुंबईच्या व्हीजेटीआयमधून पदवी मिळवणाऱ्या पहिल्याच बॅचचे विद्यार्थी; तत्पूर्वी तिथून फक्त डिप्लोमा मिळायची सोय होती. पुढे ते एका कापडगिरणीत मॅनेजिंग डायरेक्टरही बनले. त्यांच्या व सिंधूताईंच्या लग्नात परांजपेंचा बराच पुढाकार होता. तिसरा क्रमांक मनोहर ऊर्फ बाळासाहेब जोशी यांचा. त्यांनी आधी बी.एस्सी. केले व नंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा घेतला. पुढे त्यांनी दिल्लीजवळ फरीदाबाद येथे इलेक्ट्रिक स्विचेस बनवायचा कारखाना सुरू केला. २०१३ मध्ये ते वारले. चौथे भावंड म्हणजे शरद. पाचवे प्रभाकर ऊर्फ येशू. ते मेकॅनिकल इंजिनिअर होते व पुढे जर्मनीत जाऊन त्यांनी उच्चशिक्षणही घेतले होते. हुबळी, अहमदाबाद, मुंबई, पुणे वगैरे ठिकाणी नोकरी करून शेवटी त्यांनी कर्नाटकात स्वतःचा कारखानाही काढला होता. पुढे वृद्धापकाळी सेवानिवृत्ती घेऊन शेवटची दोन वर्षे ते सपत्नीक नाशिकला राहत होते. १ नोव्हेंबर २०१६ मध्ये ते निवर्तले. सहावे व सर्वांत धाकटे भावंड म्हणजे मधुकर जोशी. त्यांनीही टेक्स्टाइल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा घेतला होता. ते नोकरीसाठी अमेरिकेत गेले व नंतर तिथेच स्थायिक झाले; आता हयात नाहीत. आता फक्त निर्मला ऊर्फ नमाताई हयात आहेत.
 वडलांची नोकरी बदलीची असल्याने या सर्वच सहा भावंडांना मुख्यतः माईंनी वाढवले. आईचे संगीतप्रेम पुढे सर्व सहा मुलांमधेही आले. त्यांच्यातला तो एक समान धागा. शाळेत असतानाच नमा व सिंधू गाणे शिकल्या, तर बाळ तबला शिकला. सर्वांत मोठ्या नमाताई जबलपूरला हार्मोनियम व तबल्याचे क्लासेसदेखील घ्यायच्या, तर त्यानंतरच्या मुंबईत स्थायिक झालेल्या सिंधूताई व्हायोलिन शिकवायच्या. शरद जोशींनी संगीतात प्रावीण्य असे मिळवले नाही; पण त्यांची गाण्यांची आवड कायम राहिली; मोठेपणीही फावल्या वेळात सैगल व मुकेश यांची अनेक गाणी ते गुणगुणत असत. विशेषतः दर्दभरी. प्रवासात गाण्याच्या भेंड्या सुरू झाल्या, तर त्यातही उत्साहाने भाग घेत. त्यांना कविता आवडत आणि त्या मोठ्याने चालीवर म्हणायलाही आवडे. ही आईकडूनच आलेली आवड.

 शाळेची दहावी व अकरावी (त्यावेळचे मॅट्रिक) ही शेवटची दोन वर्षे शरदने जवळच असलेल्या विलेपार्ले पूर्व येथील पार्ले टिळक विद्यालयातून केली. इथे काही विषय इंग्रजी माध्यमातून होते.
 शाळेत शिकत असतानाच मुंबई सरकारतर्फे घेण्यात येणाऱ्या चित्रकलेच्या एलेमेंटरी व इंटरमिजिएट या दोन परीक्षाही शरदने १९४७ व १९४८ साली यशस्वीपणे दिल्या होत्या. महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेच्या हिंदीच्या, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या संस्कृतच्या व महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या मराठीच्या परीक्षाही तो उत्तीर्ण झाला होता.
 शाळेत असताना शरदने 'मौजे अकरावी' नावाचे एक हस्तलिखित काही दिवस चालवले होते. पेंढारकर नावाचे एक कर्तबगार शिक्षक तेव्हा शाळेचे मुख्याध्यापक होते. त्यांच्याशी कशावरून तरी शरदचा एकदा वाद झाला. त्यावेळी ह्या हस्तलिखितातून त्याने शिक्षकांवर टीका केली होती. ह्यावर मुख्याध्यापकांनी त्याला आपल्या कार्यालयात बोलावून घेतले व त्याची चांगलीच हजेरी घेतली. शिवाय, त्या हस्तलिखितावर बंदीही घातली. शरद खूप नाराज झाला, पण त्याचे काही चालले नाही. ह्या सगळ्या घडामोडी होत असताना आपल्या अभ्यासाकडे मात्र शरदने दुर्लक्ष केले नव्हते. ६ जून १९५१ रोजी अकरावीच्या परीक्षेचा निकाल लागला. ८००पैकी ५६२, म्हणजे सत्तर टक्के गुण मिळवून तो उत्तीर्ण झाला. त्याकाळी आजच्याइतकी गुणांची खैरात केली जात नसे.

 शरद जोशी आता सोळा वर्षांचे झाले होते. हा आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा. ह्या टप्प्यावर घ्यायचा सर्वांत मोठा निर्णय म्हणजे अकरावीनंतर काय करायचे. इतर मित्रांप्रमाणे सायन्स वा आर्टसला न जाता जोशींनी मुंबईतील सिडनम (Sydenham, सिडनेहम हा उच्चारही आपल्याकडे रूढ आहे) ह्या वाणिज्य (कॉमर्स) कॉलेजात प्रवेश घेतला.
 त्यामागेही रोचक पार्श्वभूमी आहे. खरे तर जोशी कॉमर्सला जातील असे कोणालाच कधी वाटले नव्हते; त्यांना स्वतःलाही नाही. शाळेत असताना संस्कृत हा त्यांचा आवडता विषय होता. असंख्य श्लोक, स्तोत्रे, सुभाषिते; रघुवंश-मेघदूतसारखी काव्येही त्यांना तोंडपाठ होती. भावी आयुष्यात लिहिलेल्या त्यांच्या अनेक उत्तम लेखांची शीर्षके संस्कृत आहेत. उदाहरणार्थ, इति एकाध्याय, मुहुर्तम् ज्वलितम् श्रेयम् वगैरे. “लहानपणी मला कधी अस्वस्थ वाटू लागलं, की मी गीता म्हणायचो," असे ते एकदा म्हणाले होते. त्या वयात गीतेचा अर्थ कितपत उलगडत होता, हा भाग वेगळा; पण बरीचशी भगवद्गीता त्यांना तोंडपाठ होती हे नक्की. गीताधर्म मंडळ, पुणे, या संस्थेने घेतलेली गीतासार परीक्षा ते डिसेंबर १९४८मध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले होते. सुदैवाने संस्कृतसाठी त्यांना सतत चांगले शिक्षकदेखील लाभले. नाशिकच्या शाळेतील गुरुजी विषय सोपा करून शिकवत. पाठांतराऐवजी प्रत्यक्ष बोलण्यावर त्यांचा भर होता. वर्गात ते सर्वांना संस्कृतातच बोलायला लावत. ही आवड मुंबईला आल्यावर अधिकच वाढली. स्वतः मुख्याध्यापक पेंढारकर संस्कृतच शिकवायचे.
 आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे नारायण अभ्यंकर नावाचे शिक्षक, अभ्यंकर हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. संस्कृत, गणित, संगीत व कुंडली ज्योतिष ह्या चारही विभिन्न क्षेत्रांत त्यांनी असामान्य प्रावीण्य मिळवले होते. लोकमान्य टिळकांच्या प्रभावामुळे इतर उत्तम नोकऱ्या मिळत असूनही त्यांनी शिक्षकाचा पेशा पत्करला होता. गिरगावच्या विल्सन स्कूलमध्ये ते संस्कृत व गणित शिकवत. राहायचे शिवाजी पार्कला. दिसायला ते काहीसे जे. कृष्णमूर्तीसारखे दिसत. मूळचे ते कोल्हापूरचे व म्हणून अनंतरावांच्या लहानपणापासून ओळखीचे. ते भविष्य सांगत व ते बहुतेकदा खरे ठरते, असा त्यांचा लौकिक होता. अनंतराव अनेकदा त्यांच्याकडे पत्रिका दाखवायला, मुहूर्त काढायला वगैरे जात असत. वडलांच्या सांगण्यानुसार जोशी अभ्यंकरांकडे संस्कृतच्या शिकवणीसाठी जाऊ लागले. मोठे बंधू बाळासाहेबदेखील त्यांच्याकडे यायचे; पण ते गणिताच्या शिकवणीसाठी. त्यांच्या घरी जेव्हा जोशी प्रथम गेले. तेव्हा त्यांची जणू परीक्षा घेण्यासाठी अभ्यंकरांनी त्यांना एका इंग्लिश परिच्छेदाचे संस्कृतात भाषांतर करायला सांगितले व ते जरावेळासाठी म्हणून घराबाहेर गेले.ते परत आले तेव्हा जोशींचे भाषांतर पूर्ण झाले होते. विशेष म्हणजे गद्यापेक्षा पद्यातले संस्कृत अधिक गोड वाटते, म्हणून जोशींनी त्या उताऱ्याचा चक्क पद्यात अनुवाद केला होता. अभ्यंकर खूष झाले व जोशींना त्यांनी आपला शिष्य म्हणून स्वीकारले.
 आपल्या शिष्यांच्या जीवनात अभ्यंकर अगदी समरस होऊन जात. एकदा त्यांनी बाळासाहेबांना भूमितीच्या एका पुस्तकातील एक अवघड प्रमेय घातले होते व आश्चर्य म्हणजे ते दोघांनाही तासभर खटपट करूनही सोडवता येईना. दिवसभर अभ्यंकर अगदी बैचेन होते. संध्याकाळी अचानक त्यांना उत्तर सापडले. त्यांना इतका आनंद झाला, की लगेच त्यांनी आपल्या घरून लांब अंधेरीला जोशींच्या घरी धाव घेतली व बाळासाहेबांना ते प्रमेय कसे सोडवायचे ते सांगितले! जोशींना अभ्यंकरांविषयी फार आदर वाटायचा. अभ्यंकरांच्या शिकवणीचा शालेय अभ्यासातही फायदा होतच होता. त्यामुळे जेव्हा 'अकरावीनंतर पुढे काय करायचं?' ह्याची चर्चा मुलांमध्ये सुरू झाली तेव्हा जोशी संस्कृतच घेणार व पुढे संस्कृतचे प्राध्यापक होणार हे साऱ्यांनी गृहीतच धरले होते.
 मित्रांमधल्या त्या चर्चेच्या संदर्भात पुढे जोशींनी लिहिले आहे,

आकंठ जेवून तृप्त झालेल्याला रस्त्याकाठी बसलेल्या माणसाच्या पोटातील भुकेची जाणीव नसावी तसा, काहीशा आढ्यतेने मी मित्रांना म्हणालो, 'यात एवढा विचार

करण्यासारखं काय आहे? कोणताही शिक्षणक्रम घेतला तरी फरक काहीच पडत नाही.' चिंतामणराव देशमुख, त्यावेळचे आमचे दुसरे चरित्रनायक म्हणत, आवडणारी गोष्ट कोणीही करेल; पण करावी लागणारी गोष्ट आवडीने करणे यात पुरुषार्थ आहे. आपल्या लोकोत्तरतेच्या धुंदीत, आपल्या हातानेच आपले आयुष्य कडू करून घेण्यात गोडी मानणारे कितीतरी खांडेकरी नायक डोक्यात बिळे करून बसले होते.
(अंगारमळा, पृष्ठ ५१)

 जोशींना त्यांचा एक जवळचा मित्र म्हणाला, "तुझ्या बाबतीत काही प्रश्नच नाही रे. तू संस्कृत घेणार हे आम्हाला ठाऊकच आहे."
 खरे तर ह्यात जोशींनी नाराज व्हावे असे काहीच नव्हते, कारण शेवटी तो त्यांचा एक जवळचा मित्रच होता; पण कुठल्यातरी एका सर्वसामान्य विद्यार्थ्याने आपण भविष्यात काय करणार हे ठामपणे सांगावे हे त्यांना अजिबात आवडले नाही. काहीशा रागाने व त्याचे म्हणणे खोडून काढत “मी कॉमर्सला जाऊन अर्थशास्त्राचा अभ्यास करणार," असे जोशींनी जाहीर केले.
 घरी आल्यावर जोशींनी आपला निर्णय घरच्यांनाही सांगितला. सगळ्यांना आश्चर्य वाटले. शरदने प्राध्यापक बनावे आणि ते करायचे नसेल, तर इतर सगळ्या भावांप्रमाणे सायन्सला तरी जावे व इंजिनिअर बनावे असे घरच्यांचे म्हणणे पडले. कॉमर्सला जाऊन हा मुलगा पुढे करणार काय, हाच घरच्यांना प्रश्न पडला होता. स्वतः जोशींनाही आपण असे करणे कदाचित चुकीचे ठरेल हे विचारांती जाणवलेदेखील; पण एकदा सगळ्यांसमोर आपला निर्णय जाहीर केल्यानंतर आता तो फिरवणे त्यांना कमीपणाचे वाटले. जिद्दीने त्यांनी कॉमर्सला प्रवेश घेतला. तोही पुन्हा सिडनम कॉलेजात.
 त्याकाळी महाराष्ट्रात अगदी थोडी वाणिज्य महाविद्यालये होती. मुंबईत बोरीबंदरचे सिडनम व माटुंग्याचे पोद्दार होते. बहुतेक मराठी विद्यार्थी पोदार कॉलेजात जात. तिथले एकूण वातावरणही मध्यमवर्गीय होते. ह्याउलट सिडनममध्ये उच्चभ्रू विद्यार्थ्यांचा भरणा होता. पारशी, गुजराती, मारवाडी मुले तिथे बहुसंख्य होती. साहजिकच जोशी पोद्दारमध्ये अधिक सहजगत्या सामावून जाऊ शकले असते. घरापासून ते तुलनेने जवळही होते. मोठे बंधू बाळासाहेबही पोद्दारलगतच असलेल्या रुइयामध्ये सायन्सला होते. पण का कोण जाणे, नेहमी इतरांपेक्षा वेगळे काहीतरी करायचे, त्यांना अवघड वाटणारी वाटच आपण स्वीकारायची असा जणू त्यांनी निश्चयच केला होता!

 १९१३ साली स्थापन झालेले सिडनम हे केवळ मुंबईतच नव्हे तर संपूर्ण भारतात, किंबहुना परदेशातही नामांकित होते. आशिया खंडातील हे सर्वांत पहिले वाणिज्य महाविद्यालय. त्यावर्षी, म्हणजे १९५१ साली, महाविद्यालयाच्या वार्षिकदिनी प्रमुख पाहुणे म्हणून रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर (व नंतरचे केंद्रीय अर्थमंत्री) चिंतामणराव ऊर्फ सी. डी. देशमुख आले होते. आपल्या भाषणात ते म्हणाले होते, “देशात जमा होणाऱ्या एकूण आयकरापैकी २५% आयकर हा सिडनममधील विद्यार्थ्यांच्या पालकांकडून जमा होतो." आपण ज्या कॉलेजात प्रवेश घेतला आहे, ते किती प्रतिष्ठित आहे ह्याची त्या क्षणी जोशींना कल्पना आली. अनेक बड्या उद्योगपतींची मुले इथेच शिकायला येत. कांतीकुमार पोद्दार तर जोशींच्या वर्गातच होते. बिर्ला उद्योग चे कुमारमंगलम बिर्ला, एच.डी.एफ.सी.चे दीपक पारेख, लंडनमधील ऐतिहासिक इस्ट इंडिया कंपनी ज्यांनी मध्यंतरी विकत घेतली ते संजीव मेहता वगैरे उद्योगक्षेत्रातील आजची अनेक बडी मंडळी एकेकाळी ह्याच कॉलेजात शिकलेली आहेत. अनेक मुले स्वतःच्या मोटारीतून कॉलेजात येत. पदवीनंतर पुढे काय हा त्यांच्यापुढे प्रश्नच नसायचा. आजवर ज्या मराठमोळ्या वातावरणात जोशी वाढले होते त्यापेक्षा इथले वातावरण अगदी वेगळे होते. इथे मराठी विद्यार्थ्याला 'घाटी' म्हणून हिणवले जाई. कपडे, बोलणे, वागणे ह्या सर्वच बाबतींत मराठी विद्यार्थी मागासलेला दिसायचा. वर्गात मराठी मुले जेमतेम दहाबारा होती. सुरुवातीला हे सगळे जोशींना जडच गेले, पण हळूहळू या अवघडलेपणावर त्यांनी मात केली.
 इथले प्राध्यापक कॉलेजच्या लौकिकाला शोभेल असेच नावाजलेले होते. त्यातील ग. र. ऊर्फ जी. आर. दीक्षित यांच्याशी जोशींचा पुढेही बराच संबंध आला. पण जोशींवर सर्वाधिक प्रभाव पडला तो कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुमंत ऊर्फ एस. के. मुरंजन यांचा. एक नाणेतज्ज्ञ म्हणून ते विख्यात होते. नुकतेच अमेरिकेहून परतले होते. त्यांनी नाणेव्यवस्थेवर दोन उत्तम पुस्तके लिहिली होती व विशेष म्हणजे दोन्ही मराठीत लिहिली होती. ती इंग्रजीत लिहायला हवी होती असे म्हणणाऱ्या टीकाकारांना उद्देशून ते म्हणत, "ज्याला या विषयाचा खोलात जाऊन अभ्यास करायचा आहे आणि ह्या विषयावर मला काय म्हणायचे आहे हे जाणून घ्यायचे आहे, त्याला त्यासाठी मराठी शिकायला काय हरकत आहे?" ह्यापूर्वी बरीच वर्षे सुप्रसिद्ध इतिहासकार राजवाडे यांनी असेच फक्त मराठीतच लेखन केले होते व त्याच्या समर्थनार्थ असेच काहीसे उत्तर दिले होते. स्वतः जोशींना पुढे एका-दोघांनी 'मराठीत लिहिण्याऐवजी तुम्ही इंग्रजीत लिहा, म्हणजे सगळीकडे पोचाल' अशी सूचना केली होती, तेव्हा त्यांनीही असेच उत्तर दिले होते.
 प्राचार्यांबद्दल जोशी लिहितात,

बस्स! या एकाच उत्तरावर आम्ही लट्टू होतो. त्या एकाच वाक्याने पदोपदी जाणवणारे, टोचणारे मराठी माणसाचे दैन्य धुतले गेल्यासारखे वाटत होते. मुरंजन यांनी आम्हाला बँकिंगमधले काही शिकवल्याचे मला आठवत नाही. पण त्यांनी कान्टशी ओळख करून दिली. “I think, therefore, I am.' या कान्टच्या उक्तीतील सगळा उल्हास आणि आवेग आम्ही मुरंजनांच्या चेहऱ्यावर अनुभवला.

(अंगारमळा, पृष्ठ ५९)

 गंगाधर गाडगीळ यांनी आपल्या एका मुंगीचे महाभारत ह्या आत्मकथनात डॉ. मुरंजन यांचे सुरेख व्यक्तिचित्र रेखाटले आहे. भारताच्या नियोजन मंडळाने नेमलेल्या अर्थशास्त्र्यांच्या सल्लागार मंडळात डॉ. मुरंजन यांचाही समावेश होता. प्राचार्यांनी आपल्याला मदत करण्यासाठी एक रिसर्च ग्रुप स्थापन केला होता व त्यात घेतल्या गेलेल्या दोन विद्यार्थ्यांमधले एक जोशी होते. १९५५-५६ सालात 'बेरोजगारांचा अंदाज' (एस्टिमेट ऑफ अनएम्प्लॉयमेंट) ह्या विषयाच्या नियोजन मंडळासाठी केलेल्या अभ्यासासाठी जोशींनी बरेच संख्याशास्त्रीय काम केले होते व त्याचे प्राचार्यांनी कौतुक केले होते.
 सुप्रसिद्ध कवी व कादंबरीकार पु. शि. रेगे त्यांना वाहतुकीचे अर्थशास्त्र शिकवायचे. मुंबईतील साहित्यिक वर्तुळात त्यावेळी रेगे यांना मानाचे स्थान होते. पण तरीही साहित्याची खूप आवड असलेल्या जोशींनी त्यांच्याविषयी काही लिहिलेले नाही. मराठी साहित्यापासून जोशी त्यावेळी बरेच दूर गेले होते, असा याचा अर्थ लावायचा का? रेगे यांचा जोशींनी निदान नामोल्लेखतरी केला आहे, पण गंगाधर गाडगीळ ह्यांच्या बाबतीत तसा नामोल्लेखही झालेला नाही. गाडगीळ त्यांना अर्थशास्त्र शिकवत असत. ते मराठी नवकथेचे प्रवर्तक म्हणून त्यावेळी ऐन भरात होते. विशेष म्हणजे पुढे जोशी यांच्याचप्रमाणे गाडगीळांनीही मुक्त अर्थव्यवस्थेचा जोरदार पुरस्कार केला होता; त्यांच्यात तो समान असा एक वैचारिक दुवाही होता. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे असे असूनही जोशींच्या लेखनात गाडगीळांचा उल्लेख कुठेच आढळत नाही. किंबहना पुढे एकदा मी त्यांच्यापाशी गाडगीळांबद्दल विचारणा केली असताना त्यांची एकही आठवण जोशी सांगू शकले नाहीत. खरेतर नंतरच्या आयुष्यात एक-दोनदा हे दोघे एकाच व्यासपीठावर वक्ते म्हणून हजरही होते, पण त्यातलेही काही जोशींना त्यावेळीतरी आठवत नव्हते.

 इथल्या विद्यार्थ्यांचे अनुभवविश्व जोशींपेक्षा कसे वेगळे होते त्याची ही एक झलक. केंद्रीय अर्थमंत्री टी. टी. कृष्णम्माचारी यांच्यावर आयुर्विमा महामंडळाचे पैसे एका भ्रष्ट उद्योगात गंतवून स्वतः कमिशन मिळवल्याचा एक गंभीर आरोप त्यावेळी केला गेला होता व त्याची चर्चा एकदा कॉलेजात सुरू होती. त्यावेळी जोशी म्हणाले, "सुदैवाने आपली न्याययंत्रणातरी अजून प्रामाणिक राहिली आहे. त्यामुळे गुन्हेगारांना शासन होऊ शकतं." त्यावर एक उद्योगपतिपुत्र फटकन म्हणाला, “घाटी लोकांची भाषा सोडून दे! कोर्टाचा निर्णय आपल्या बाजूने फिरवायचा असेल, तर कोणाला काय काय पुरवावं लागतं ते मला विचार!" आणि हे बोलताना त्याने असे काही डोळे मिचकावले, की हा करावा लागणारा पुरवठा वस्तूंचा नाही हे उघड व्हावे!
 गर्भश्रीमंत विद्यार्थ्यांप्रमाणे इथे काही अतिशय बुद्धिमान विद्यार्थीदेखील होते. त्यांतील एक म्हणजे जगदीश भगवती. भगवती जोशींच्या एक वर्ष पुढे होते. दोघेही संस्कृतप्रेमी व योगायोगाने दोघेही अभ्यंकरांचे विद्यार्थी. तिथेच त्यांचा प्रथम परिचय झाला होता. अर्थात दोघांमधले साम्य बहुधा इथेच संपत होते. भगवतींचे वडील सुप्रीम कोर्टात एक नामांकित वकील होते. रोज सकाळी चिरंजीवांना कॉलेजात सोडायला एक मोटार येई व संध्याकाळी दुसऱ्या एका मोटारीतून ते घरी परतत. सगळा वेळ कॉलेज आणि ग्रंथालय ह्यातच घालवत. सगळीकडे त्यांचा दबदबा असे. एसएससीला ते संपूर्ण बोर्डात काही लाख विद्यार्थ्यांमध्ये पहिले आले होते. भगवती नंतर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये मास्टर्स करायला गेले. तिथले शिक्षण पूर्ण करून अमेरिकेत गेले. आज ते अर्थशास्त्रासाठी जगप्रसिद्ध अशा कोलंबिया विद्यापीठात शिकवतात. बहुतेक सर्व बड्या आंतरराष्ट्रीय संस्थांचे सल्लागार म्हणून त्यांनी काम केले आहे व भारत सरकारनेही २००० साली पद्मविभूषण हा सन्मान देऊन त्यांचा गौरव केला आहे. आज ना उद्या त्यांना नोबेल पुरस्कारही मिळेल असे म्हटले जाते. त्यांचे एक बंधू प्रफुल्लचंद्र ऊर्फ पी. एन. भगवती हेही वडलांप्रमाणेच नामांकित वकील होते व पुढे भारताचे सरन्यायाधीशही बनले. जनहितयाचिका (Public Interest Litigation) हा प्रकार सुरू करण्याचे श्रेय त्यांचेच. त्यांनाही पद्मविभूषण मिळाले आहे. दोन भावांनी पद्मविभूषण मिळवायचे हे बहुधा एकमेव उदाहरण असावे. जगदीश भगवती हा त्या काळात जोशी यांचा आदर्श होता.
 रोज सकाळी शक्य तितक्या लवकर अंधेरीतील आपल्या घरून जोशी निघत व आगगाडीने मरीन लाइन्सला येत. तिथून पुढे चालत बोरीबंदरला कॉलेजात. एकदा कॉलेजात आले की दिवसभर तिथेच. आधी लेक्चर्स आणि ती संपल्यावर मग ग्रंथालय, सगळा अभ्यास, सगळे वाचन तिथेच. घरी रात्री उशिरा, फक्त झोपायला. नाशिकला असताना त्यांना क्रिकेट खेळायची गोडी लागली होती; पण इथे क्रिकेट अगदी पूर्ण बंद. इतर मित्र असेही त्यांना इथे फारसे नव्हते; त्यावेळी तरी ते बऱ्यापैकी एकांतप्रिय होते. इतर मुलांप्रमाणे त्यांच्याकडे चित्रपट बघायला, हॉटेलात उडवायला पैसेही नसत. घरून जो काही चार-पाच रुपये पॉकेटमनी मिळायचा तो आठवड्याहून जास्त टिकायचा नाही. त्यामुळे सगळा वेळ फक्त अभ्यास एक अभ्यास. त्यांची पहिली चार वर्षे, म्हणजे १९५५ साली ते बी.कॉम. होईपर्यंत, सिडनम कॉलेज बोरीबंदरला व्हीटी स्टेशनसमोर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या आवारातच होते, पण त्यानंतर ते स्वतःच्या आधुनिक इमारतीत, चर्चगेट स्टेशनलगतच्या बी रोडवर गेले. ह्या इमारतीतील सर्वच सोयी अधिक प्रशस्त होत्या. विशेषतः ग्रंथालय, अर्थशास्त्राशी संबंधित जगातील बहुतेक सारी महत्त्वाची पुस्तके कॉलेजच्या ग्रंथालयात होती, जगभरची आर्थिक नियतकालिकेदेखील येत. जमेल तेवढे सगळे जोशी बारकाईने वाचून काढत, टिपणे काढत.

 १९५४मध्ये दि न्यूयॉर्क हेरल्ड ट्रिब्युन या जगप्रसिद्ध अमेरिकन वृत्तपत्राने आयोजित केलेल्या एका देशव्यापी निबंधस्पर्धेत जोशींनी भाग घेतला होता. मुंबई विद्यापीठाकडे आलेल्या सर्व निबंधांत तो सर्वोत्कृष्ट ठरल्याने पुढे तो दिल्लीला शिक्षण मंत्रालयाकडे पाठवला गेला. कारण हेच मंत्रालय स्पर्धेचे व्यवस्थापन करत होते. ही स्पर्धा खूप प्रतिष्ठेची होती व विजेत्याला त्याकाळी अप्रूप असलेल्या अमेरिकेलाही पाठवले जाणार होते. देशभरातील वेगवेगळ्या विद्यापीठांकडून सादर केल्या गेलेल्या निबंधांची छाननी झाल्यावर जोशींचा अंतिम फेरीत समावेश केला गेला. त्यासाठी द्यायच्या एका चाचणीसाठी व प्रत्यक्ष मुलाखतीसाठी त्यांना दिल्लीला यायचे आमंत्रण दिले गेले. जायचे-यायचे इंटर क्लासचे भाडेही मिळणार होते. येताना अमेरिकेला जाण्यासाठी त्याकाळी आवश्यक असलेले वैद्यकीयदृष्ट्या पात्र असल्याचे प्रमाणपत्रही घेऊन यावे असे आमंत्रणपत्रात लिहिले होते. देशभरातील अगदी मूठभर विद्यार्थ्यांनाच ही संधी मिळाली होती. जोशींना खूप आनंद झाला, कारण ह्या निबंधासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली होती. सगळी पूर्वतयारी करून ते उत्साहाने दिल्लीला गेले त्या काळी दिल्लीही खूप दूरची समजली जाई व दिल्लीला जाणारे घरातले ते पहिलेच होते. सगळ्यांनी कौतुकाने त्यांना निरोप दिला. पण दुर्दैवाने तेथील चाचणीत व मुलाखतीत त्यांची पुरेशी छाप पडली नाही. दिल्लीतील सेंट स्टीफन कॉलेजातील एका विद्यार्थ्याची अंतिम फेरीत निवड झाली. जोशी अगदी निराश झाले. आपल्या हातातोंडाशी आलेला यशाचा घास शेवटच्या क्षणी गेला असे त्यांना वाटले; शिवाय, घरच्यांच्या अपेक्षा आपण पूर्ण करू शकलो नाही याचा अपमानही वाटलाच.
 पुढे १९५६ मध्ये मुंबई विद्यापीठाने घेतलेल्या एका महत्त्वाच्या शोधनिबंधस्पर्धेत त्यांनी भाग घेतला. त्यासाठी कसून मेहनत केली व एक बराच मोठा शोधनिबंध लिहिला. शीर्षक होते, River Valley Projects and their Role in the Agricultural Development of India (नदी खोरे प्रकल्प आणि भारतीय शेतीच्या विकासातील त्यांचे योगदान). त्याला मात्र यश मिळाले. होमजी कुरसेटजी डॅडी यांच्या नावे असलेला प्रथम पुरस्कार मिळाला. ह्या पुरस्काराची रक्कम ३०० रुपये होती; त्या काळाच्या मानाने बरीच जास्त. जोशींना खूप आनंद झाला. निबंधलेखनाच्या निमित्ताने वेगवेगळ्या खोरे प्रकल्पांचा देशातील शेतकऱ्यांना प्रत्यक्षात किती आर्थिक लाभ झाला याचा त्यांनी संख्याशास्त्रीय अभ्यास केला. या अभ्यासात खडकवासला वॉटर अँड पॉवर रीसर्च सेंटरचे अच्युतराव आपटे, त्यावेळी पुण्यात असलेले सुपरिटेंडिंग इंजिनिअर एन. एस. जोशी आणि साखरवाडीत इस्टेट मॅनेजर असलेले त्यांच्या मोठ्या बहिणीचे सासरे श्रीधर गोपाळ देशपांडे यांची खूप मदत झाली होती. मोठी धरणे उभारताना धरणक्षेत्रातील पावसाचे जास्तीत जास्त प्रमाण नियोजनासाठी पकडले जाते, दरवर्षी तसा पाऊस पडेल व धरण पूर्ण भरेल असे गृहीत धरून प्रस्तावित बागायती क्षेत्राचे अतिशयोक्त आकडे कागदोपत्री दाखवले जातात; प्रत्यक्षात मात्र ते चुकीचेच ठरतात; ह्या मोठ्या प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांचा फारसा आर्थिक लाभ झालेला नाही; उलट जे शेतकरी त्या पाण्यावर शेती करत राहिले त्यांच्यापेक्षा जे विस्थापित होऊन मुंबईसारख्या मोठ्या शहरात येऊन स्थायिक झाले व अन्य काही व्यवसाय करू लागले त्यांची आर्थिक स्थिती अधिक सुधारली असा त्यांचा निष्कर्ष होता.
 पुढे ज्या शेतीक्षेत्रात त्यांनी मोठे योगदान दिले त्या क्षेत्रातील त्यांचे हे पहिले वैचारिक पदार्पण होते. इतर कुठल्याही शेतीविषयक सुधारणेपेक्षा, शेतीमालाला चांगला भाव मिळणे हे शेतकऱ्यांसाठी अधिक गरजेचे आहे, ह्या त्यांनी भविष्यात केलेल्या मांडणीची सुरुवातही कुठेतरी ह्या अभ्यासात होती असेही म्हणता येईल. व्यक्तिशः जोशींना हा अभ्यास महत्त्वाचा वाटला होता. १ मार्च १९७६ रोजी स्वित्झर्लंडला असताना जोशींनी आपला एक बायोडेटा तयार केला होता व त्यात ह्या निबंधाचा त्यांनी उल्लेख केला आहे.
 या निबंधस्पर्धेतील जोशींच्या यशालाही एक गालबोट लागले होते. विद्यापीठाचे कामकाज कसे चालायचे ह्याचे निदर्शक अशी ह्या स्पर्धेबाबत घडलेली ती घटना इथे नमूद करायला हरकत नाही. पूर्वी जाहीर झालेले पारितोषिकाचे तीनशे रुपये प्रत्यक्षात जोशींच्या हाती पडले नव्हते. नेमकी काय अडचण होती ते कळायला आज काही मार्ग नाही, पण जोशींच्या कागदपत्रांत मुंबई विद्यापीठाच्या रजिस्ट्रारच्या सहीचे एक पत्र म्हात्रे यांना सापडले. त्या पत्रात 'जोशी यांनी पुरस्काराच्या रकमेएवढी, म्हणजे तीनशे रुपयांची, पुस्तके खरेदी करावीत' असे लिहिले आहे. त्यातही तीन अटी आहेत! एक म्हणजे, ही पुस्तके एकाच दुकानातून व एकाच वेळी खरेदी केलेली असावीत; दोन, त्यांच्यावर विद्यापीठाचे नामांकन करण्यासाठी (for stamping the University Coat of Arms in gold') ती सर्व पुस्तके पुस्तकविक्रेत्याने आपल्या बिलासकट विद्यापीठाकडे पाठवावीत; आणि तीन, त्या नामांकनाचा खर्च म्हणून प्रत्येक पुस्तकामागे सहा आणे विद्यापीठ कापेल व तीनशे रुपयांतून ती रक्कम वजा करून उर्वरित रकमेच्या बिलाचे पैसे विद्यापीठाकडून दिले जातील! हा निबंध प्रकाशित करण्यासाठी विद्यापीठाने अनुमती द्यावी अशी विनंती जोशींनी तीन वर्षांपूर्वी विद्यापीठाकडे केली होती. उपरोक्त पत्रातच त्या अर्जाला उद्देशून रजिस्ट्रारसाहेबांनी कळवले आहे की, "तुमची विनंती विद्यापीठाच्या संबंधित अधिकाऱ्यांसमोर विचारार्थ ठेवली जाईल व त्यांचा निर्णय जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला कळवण्यात येईल."
 हे पत्र जोशींना मिळाले तेव्हा ते पोस्टखात्यात नोकरीलाही लागले होते व बडोदा येथे कार्यरत होते! प्रत्यक्षात त्या रकमेची पुस्तके जोशींनी घेतली का, त्यांचे अपेक्षित तेवढे पैसे मिळाले का याची कुठेच नोंद नाही. दुर्दैवाने आज त्या निबंधाचीही प्रत उपलब्ध नाही. सर्वांत आश्चर्यजनक भाग म्हणजे या पत्रावरची तारीख आहे, २३ जानेवारी, १९५९. म्हणजेच निबंधस्पर्धेचा निकाल लागला त्याला तब्बल तीन वर्षे उलटून गेल्यानंतरची! या अविश्वसनीय विलंबाचे कारण काय असू शकेल? नोकरशाहीतील दिरंगाई की आणखी काही?

 जोशींच्या कॉलेजजीवनातील एका वेधक प्रसंगाची माहिती जी. आर. दीक्षित या त्यांच्या प्राध्यापकांनी त्यांना १९ जानेवारी २००२ रोजी लिहिलेल्या एका पत्रात वाचायला मिळाली. प्रा. दीक्षित पुढे स्टेट बँकेत खूप वरच्या पदावर गेले व बँकिंग क्षेत्रातले मोठे तज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध झाले. हे सहा पानी स्वहस्ते लिहिलेले पत्र अतिशय वाचनीय असून जोशींचे कागदपत्र चाळताना ते मिळाले. त्यात प्रा. दीक्षित लिहितात,

सिडनम कॉलेजच्या दिवसांत तुमचं माझं जे काही बोलणं होत असे, त्याचे तुकडे तुकडे मला अजून आठवतात. त्याच्या गोड आठवणी मनात रेंगाळतात. अशीच एक आठवण. तुम्ही आणि मी चायनीज कॉन्स्युलेटमध्ये हो चि मिन्हला भेटायला गेलो होतो त्याची. मुंबईतल्या काही तरुण प्राध्यापकांना भेटायची इच्छा हो चि

मिन्हने प्रदर्शित केली होती. आम्हा सगळ्यांना बोलावणं केलेलं होतं पण प्रा. रणदिवे, प्रा. गाडगीळ वगैरे कोणी आले नाहीत. त्यांना असा सल्ला दिला गेला होता की 'तुम्ही जर हो चि मिन्हला भेटलात, तर सरकारदप्तरी त्याची नोंद होईल व मग तुम्हाला अमेरिका किंवा इंग्लंडला जायची स्कॉलरशिप मिळणं अडचणीचं होईल.' मला अमेरिका किंवा इंग्लंड या देशांच्या वारीचं इतकं कौतुक नव्हतं. मी मनाशी म्हटलं, की हो चि मिन्हसारखा जगविख्यात माणूस आपल्याला भेटू इच्छितो आहे, तेव्हा ही संघी काही आपण सोडायची नाही. त्याची ती मूर्ती व राहणी पाहून मला खूपच बरं वाटलं. बोटीवरच्या वेटरचा ड्रेसच त्याने घातला होता व बोलताना तो म्हणाला, की अशा कपड्यांचाही फक्त एकच जोड त्याच्याकडे आहे. तो असंही म्हणाला, 'आमचा देश गरीब आहे. त्यामुळे आमच्या हातात राजसत्ता जरी असली, तरी आम्ही गरिबीतच राहिलं पाहिजे. तसं राहिलो, तरच आम्ही त्यांच्यातले आहोत असं लोकांना वाटेल.' Acceptance through identification' या मूलतत्त्वाचाच त्याने पुनरुच्चार केला होता. त्यानी गांधी व औरंगझेब यांच्या साधेपणे राहण्याची वाखाणणी केली. उठता उठता तो म्हणाला, माझ्या आयुष्याची सुरुवात मी बोटीवरचा वेटर म्हणून केली व नंतर बरीच वर्षे मी तीच नोकरी केली. त्यामुळे माझी राहण्याची पद्धत ठरून गेली आहे. त्यात बदल करावा असं मला कधी वाटलं नाही. पुढच्या आयुष्यात अनेक नामवंत लोकांना मी भेटलो; पण हो चि मिन्हची ही आठवण माझ्या मनात चिरंतन राहिलेली आहे.

 व्हिएतनामच्या या क्रांतिकारक भाग्यविधात्याला भेटणे, विशेषतः त्या काळात, हा नक्कीच एक रोमांचकारक अनुभव असला पाहिजे. जोशींच्या लेखनात किंवा बोलण्यात या भेटीचा कुठेच कसा उल्लेख झाला नाही, याचे काहीसे नवल वाटते.  हो चि मिन्ह यांचे बलाढ्य अमेरिकेविरुद्ध जिद्दीने उभे ठाकलेले एक कडवे साम्यवादी म्हणून दीक्षित यांना खूप कौतुक वाटले होते, पण वैचारिक पातळीवर दीक्षित कायमच खुल्या अर्थव्यवस्थेचे पुरस्कर्ते होते. याच पत्रात त्यांनी विद्यार्थिदशेत असतानापासूनच जोशींवर अ ॅडम स्मिथ वगैरे अभिजात (क्लासिकल) अर्थशास्त्र्यांचा प्रभाव कसा होता व तेव्हापासूनच जोशीही मुक्त अर्थव्यवस्थेचे समर्थक कसे होते याचाही कौतुकाने उल्लेख केला आहे. जगदीश भगवती व अशोक देसाई यांच्यासारख्या मुक्त अर्थव्यवस्थेचे समर्थक राहिलेल्या त्यांच्या काही इतर विद्यार्थ्यांचाही ते उल्लेख करतात. हा सगळा १९५२ ते १९५८ हा कालखंड आहे; जेव्हा उदारीकरण वगैरे शब्दही भारतात फारसे वापरात नव्हते व सोव्हिएतप्रणीत समाजवादी विचारांचा पगडा सर्वव्यापी होता. पण नवल म्हणजे त्या विद्यार्थिदशेपासूनच जोशी यांच्यावर खुल्या (लिबरल) विचारसरणीचा प्रभाव होता. त्या पत्रात दीक्षित लिहितात,

 "आज जेव्हा मी माझे बहुसंख्य विद्यार्थी लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन व

ग्लोबलायझेशनचा पुरस्कार करताना बघतो, तेव्हा मी जे काही त्या काळात आग्रहाने शिकवलं, त्याचं फळ मिळाल्याचं समाधान मला मिळतं.
 "जास्त काय लिहू? पुन्हा काही लिहायची वेळ येणार नाही. आता माझे डोळे पैलतीरी लागले आहेत. वैतरणा नदीत घोट्याइतक्या पाण्यात उभा आहे, नदी केव्हा पार होते आहे याची मला उत्कंठा लागलेली आहे, घाई लागली आहे."
 असा या आठ-पानी हस्तलिखित पत्राचा शेवट आहे. दीक्षित यांचे हे जणू अखेरचे पत्र असावे असे वाटते व म्हणूनच त्याचे मोल अधिक वाटते.

 १९५२-५३ या वर्षात जोशी कॉलेजातल्या मराठी वाङ्मय मंडळाचे सदस्य होते; १९५३-५४ या वर्षात विकास या कॉलेजात निघणाऱ्या भित्तिपत्रकाचे संपादक होते. १९५४-५५ सालात कॉलेजातील जनरल बँकिंग असोसिएशनचे ते सरचिटणीस होते. मात्र त्या सहा वर्षांत कॉलेजबाहेरच्या जीवनात त्यांनी काय काय केले, कुठल्या उपक्रमांत भाग घेतला, कुठले सिनेमे बघितले, कुठले छंद जोपासले, कोणाशी त्यांची मैत्री झाली वगैरेबद्दलच्या काही आठवणी उपलब्ध नाहीत. ना त्यांनी स्वतः त्याबद्दल काही लिहिले आहे. ना संभाषणात कधी त्यांनी त्याचा उल्लेख केला. अपवाद म्हणजे आपल्या कॉलेजात एकदा त्यांनी दुर्गाबाई भागवत यांना कसे आमंत्रित केले होते याविषयी त्यांनी लिहिले आहे. दुर्गाबाईंविषयी ते बरेच ऐकून होते. फोर्टमधील प्रसिद्ध एशियाटिक लायब्ररीत कधी जाणे झाले तर तिथे आपल्या व्यासंगात कायम गढलेल्या दुर्गाबाई दिसत; पण त्यांच्या समाधीचा भंग करून त्यांच्याशी काही बोलायचा जोशींना धीर होत नसे. एकदा मात्र त्यांनी दुर्गाबाईंना आपल्या कॉलेजात व्याख्यानासाठी बोलावले होते. मध्यप्रदेशच्या एका जिल्ह्यातील आदिवासींचे जीवन, इतिहास, संस्कृती, राहणीमान यांविषयी त्या बोलल्या. बहुसंख्य विद्यार्थ्यांना आदिवासी जीवनाचा काहीच परिचय नव्हता व दुर्गाबाईंच्या भाषणाने एक नवेच जग त्यांना दिसले. सारे सभागृह भारावून गेले होते.
 बऱ्याच वर्षांनी आणीबाणीविरुद्ध ज्या धाडसाने दुर्गाबाईंनी आवाज उठवला त्याचे जोशींनी कौतुक केले होते. पण त्यांना त्याहूनही अधिक कौतुक होते ते आणीबाणीच्या काळात मिळालेल्या तेजोवलयाचा आणि लोकप्रियतेचा हव्यास दुर्गाबाईंनी जराही ठेवला नाही; निवडणुका संपताच त्या साऱ्यातुन निःसंगपणे मोकळ्या झाल्या, आपल्या व्यासंगाच्या विषयाकडे वळल्या आणि अगदी आयुष्याच्या शेवटापर्यंत त्यातच रमल्या; या गोष्टीचे.
 मे १९५५ मध्ये जोशी बीकॉम झाले. १००० पैकी ५२८ गुण मिळवून; म्हणजे द्वितीय वर्गात. कॉमर्समधील गुणांची टक्केवारी त्याकाळी कमीच असे. पुढील दोन वर्षे त्यांना विद्यापीठातर्फे दिली जाणारी महिना रुपये तीसची मेरिट स्कॉलरशिप मिळाली. अॅडव्हॉन्स्ड बँकिंग या विषयात कॉलेजात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला सी. ई. रँडल (Randle) सुवर्णपदक कॉलेजतर्फे दिले जाई. त्यावर्षी ते जोशींना मिळाले.
 त्या सुवर्णपदकाचीही एक गंमत आहे. हे सुवर्णपदक मिळाल्याचे कळवणाऱ्या प्राचार्यांच्या २८ नोव्हेंबर १९५५च्या इंग्रजी पत्रातले शेवटचे वाक्य आहे, “सोन्याचा भाव अतिशय वाढलेला असल्याने ह्या पदकाच्या मूल्याइतकी रक्कम जोशी यांना रोख दिली जाईल." त्याप्रमाणे त्यांना सुवर्णपदकाऐवजी रुपये १०५ रोख दिले गेले!
 १९५७ साली जोशी एमकॉम झाले. पुन्हा द्वितीय वर्गात; ८०० पैकी ४१३ गुण मिळवून. इंटरनॅशनल बँकिंग व स्टॅटिस्टिक्स हे विषय घेऊन. सहा वर्षांपूर्वी अनपेक्षितरीत्या सुरू केलेली व त्यावेळी खूप अवघड वाटलेली कॉमर्स कॉलेजची यात्रा सुफळ संपूर्ण झाली.

 जडणघडणीच्या ह्या कालखंडाकडे आज मागे वळून बघताना जोशी यांच्या व्यक्तिमत्त्वातील दोन वैशिष्ट्ये त्या काळातही प्रकर्षाने जाणवतात.
 एक म्हणजे त्यांची प्रखर बुद्धिनिष्ठा - प्रत्येक गोष्ट आपल्या बुद्धीच्या निकषावर पडताळून पाहायची आणि पटली तरच स्वीकारायची वृत्ती. दुसऱ्याने सांगितले म्हणून त्यांनी ऐकले, मानले असे सहसा कधी होत नसे.
 ते बारा-तेरा वर्षांचे असतानाचा एक प्रसंग. बसल्याबसल्या त्यांच्या मनात एक विचार आला. 'आपण किती नशीबवान आहोत! भारतासारख्या श्रेष्ठ देशात जन्मलो, त्यात पुन्हा शिवरायांच्या आणि ज्ञानेश्वरांच्या महाराष्ट्रात जन्मलो, त्यातही सर्वश्रेष्ठ अशा हिंदू धर्मात आणि त्याहून विशेष म्हणजे ब्राह्मण कुलात जन्मलो! जन्मतःच ह्या साऱ्या दुर्लभ गोष्टी आपल्याला लाभल्या; किती आपण भाग्यवान!'
 पण मग लगेच त्यांनी त्या विचाराचे स्वतःच्याच मनाशी विश्लेषण करायला सुरुवात केली. अनेक प्रश्न मग त्यांच्या मनात निर्माण झाले. 'भारत देश सर्वश्रेष्ठ कसा? जगातील अत्यंत गरीब, दुष्काळाने गांजलेल्या देशांत भारत मोडतो. मग असे राष्ट्र सर्वश्रेष्ठ कसे असेल? महाराष्ट्रात शिवराय आणि ज्ञानेश्वर जन्मले, पण इतर प्रांतांतही अशी नररत्ने जन्मलीच आहेत व त्या-त्या प्रदेशातील लोकांना त्यांच्या-त्यांच्या प्रदेशात जन्मलेल्या नररत्नांचा अभिमान असतोच. आपणही त्या प्रदेशात जन्मलो असतो तर आपल्यालाही त्यांच्याविषयी तेवढाच अभिमान वाटला असता. हिंदू धर्मातही सर्वश्रेष्ठ असे काय आहे? जगात जास्तीत जास्त उपासक असलेले धर्म बुद्ध आणि ख्रिस्त यांचे आहेत. इस्लामही अनेक देशांत पसरला आहे. मग एकाच भूखंडात मर्यादित असलेल्या या हिंदू धर्माला सर्वोत्तम म्हणणे म्हणजे खोट्या अभिमानाचे लक्षण नाही का? आणि ब्राह्मण श्रेष्ठ मानणे तर किती मुर्खपणाचे! ब्राह्मणांत काय सगळे महापुरुषच जन्मले? अपकृत्य करणारे कुणी झालेच नाहीत? आणि इतर जातींत जन्मूनही अलौकिक कृत्ये करणारेही अनेक असतातच!'
 या कठोर उलटतपासणीने ते अगदी हादरून गेले. जन्माच्या अपघाताने मिळालेल्या गोष्टींचा वृथा अभिमान बाळगण्याची आपल्यात प्रवृत्ती आहे आणि ती मोडून काढली पाहिजे, याची त्यांना मोठ्या प्रकर्षाने जाणीव झाली. त्या दिवसापासून त्यांनी एक निश्चय केला. जन्माच्या अपघाताने आपल्याला जे जे मिळाले असेल, ते अती कनिष्ठ आहे, असे समजून विचाराची सुरुवात करायची आणि जेथे सज्जड पुरावा मिळेल, तेथेच आणि त्या पुराव्याने सिद्ध होईल तेवढेच, जन्मसिद्ध गोष्टींचे बरेपण मान्य करायचे. अशी शिस्त त्यांनी आयुष्यभरासाठी बाणवून घेतली.
 रूढ अर्थाने त्यांचे परीक्षेतील गुणांच्या स्वरूपात प्रकट झालेले यश फारसे नेत्रदीपक नसेल; पण त्या चाकोरीच्या पलीकडे जाऊन विचार करताना त्यांची प्रखर बुद्धिमत्ता आणि बुद्धिप्रामाण्य सतत जाणवते. स्वतःच्या वागण्याचे, स्वतःच्या स्वभावाचे ते पुनःपुन्हा विश्लेषण करताना आढळतात. जे ऐकले किंवा बघितले तेही सारे त्यांनी जसेच्या तसे कधीच स्वीकारले नाही, तर प्रत्येक गोष्टीचा स्वतः विचार करून त्यातून काय बोध घ्यायचा तो ते घेत गेले.
 तीव्र आत्मभान हा जोशी ह्यांच्या व्यक्तिमत्त्वातील बालपणापासून ठळकपणे जाणवणारा दुसरा विशेष म्हणता येईल. तसे हे आत्मभान किंवा स्वत्वाची जाणीव प्रत्येकातच असते, पण जोशींमधे त्याची तीव्रता खूप अधिक असल्याचे जाणवते.
 ह्या तीव्र आत्मभानाचे अनेक तरल पदर ह्या कालखंडात आढळतात. इतरांच्या तुलनेतले आपले वेगळेपण (exclusivity) अधोरेखित करण्याची प्रवृत्ती किंवा मानसिक गरज, महत्त्वाकांक्षा, मनस्वीपणा, मानीपणा, अहंकार, आत्मविश्वास, आत्मकेंद्रितता, हेकटपणा, आत्मभानाला धक्का पोहोचल्यास उफाळून येणारी असुरक्षिततेची भावना इत्यादी – पण मूलतः हे त्या आत्मभानाचे विविध आविष्कार असावेत.
 पूर्वी लिहिल्याप्रमाणे काही शारीरिक कमतरतांमुळे न्यूनगंड निर्माण होऊ न देता त्यांच्यावर मात करायची जिद्दही ह्या आत्मभानातूनच आली असावी. शिकवणीला असलेला विरोधही तसाच.
 विलेपार्ल्याला शिकत असताना मोठ्या भावाशी, म्हणजे बाळशी, धाकट्या शरदचे एकदा कशावरून तरी जोरदार भांडण झाले. त्यावेळी माईंना मधे पडावे लागले. चूक शरदची आहे असे बहुधा त्यांना वाटले. शब्दाने शब्द वाढत गेला. रागाच्या भरात त्या शरदला खूप रागावल्या, थोडे मारलेही. आपण काहीच चूक केलेली नाही असे शरदचे म्हणणे; ते काही त्याने शेवटपर्यंत सोडले नाही. तरीही आई आपल्यालाच ओरडली व आपल्याला तिने मारलेही, यात आपला मोठा अपमान झाला असे वाटून शरद रागाने घरातून निघून गेला. कुठे जायचे काहीच नक्की नव्हते. खिशात फारसे पैसे नाहीत, वय अवघे १३-१४. रात्र झाली तरी तो घरी परतला नाही, तशी घरची सगळी मंडळी प्रचंड काळजीत पडली. त्याचे जोशी याच आडनावाचे एक मावसभाऊ पोलीस इन्स्पेक्टर होते, त्यांची यात खूप मदत झाली. त्यांच्याच संपर्कातल्या कोणीतरी तब्बल दहा दिवसांनी शरदला इगतपुरीला बघितले व मग तिथे जाऊन वडलांनी त्याला ताब्यात घेतले. पायीच चालत चालत, इकडे तिकडे भ्रमंती करत तो इतक्या लांबवर पोचला होता.
 त्यांच्या मोठ्या भगिनी सिंधूताई जोशींनी एके ठिकाणी लिहिले आहे, "तो प्रसंग आठवला,को हृदयात अजून कालवाकालव होते." हाही एक जोशीच्या आत्मभानाचा किवा मनस्वीपणाचा नमुना.
 या आत्मभानाचाच एक आविष्कार म्हणजे आपले वेगळेपण अधोरेखित करत राहणे. उपरोक्त लेखातच सिंधूताई लिहितात,

शरदचे एक वैशिष्ट्य असे, की इतरांपेक्षा आपले काही वेगळे असावे असे त्याला वाटते. नमाताई व मी गाणे शिकू लागलो व बाळ तबला शिकू लागला. शरदनेही काही शिकावे अशी आईची इच्छा होती. आईला पेटी वाजवता येई. शरदचा आवाज गोड. म्हणून आईने एकदा पेटी वाजवून 'शुभं करोति' म्हणायचे म्हटले, तर शरदने नकार दिला. तेच शिक्षणाचे. 'सर्वांनी काय सायन्स आणि आर्ट्स करायचे, मी कॉमर्स घेणार' असे म्हणून त्याने एमकॉम केले.
(चतुरंग, दैनंदिनी २०१२, पृष्ठ ७५)

 इतरांना खूप अवघड व भावी करिअरच्या दृष्टीने अनपयुक्त वाटणारा संस्कृत विषय त्यांनी घेतला, ज्यांचा अर्थही सगळ्यांना नीट समजत नाही अशा संस्कृत साहित्यात त्यांनी रस घेतला, या साऱ्या संस्कृतप्रेमामागेही निखळ आवडीपेक्षा इतरांपासून काहीतरी हटके, काहीतरी वेगळे करायची इच्छा असावी. "ती एक धुंदीच होती, मस्ती होती. इतरांना ज्या क्षेत्रात रस नाही, त्या क्षेत्रात आपण आकंठ आनंदात बुडून जात आहोत याचा अहंकारही मोठा असावा, असे त्यांनीही स्वतःच्या संस्कृतप्रेमाच्या संदर्भात लिहिले आहे.
 "तू काय, संस्कृतचा प्राध्यापक बनणार," असे एका जवळच्या मित्राने सुचवल्यानंतरची त्यांची प्रतिक्रिया खूप तीव्र होती. ते लिहितात,

मी? विश्वाच्या निर्मितीतील एक प्रमुख प्रमेय असलेले माझे आयुष्य आणि हा कसेबसे ५४ टक्के मार्क मिळालेला मित्र मला माझी वाट सांगतो आहे? शब्दाशब्दाने वाद वाढला... मी वाणिज्य शाखेत प्रवेश घेण्याचा निश्चय जाहीर केला. केला म्हणजे केला. 'शेंडी तुटो वा पारंबी तुटो', आता माघार घेणे नाही. तोंडातून निघालेला शब्द मागे घेणे भाग पडून, होणाऱ्या अपमानाने मलिन झालेले जीवन जगण्यात तरी काय अर्थ आहे?

 आपण पुढे काय करणार हे त्या मित्राने गृहीत धरावे याचा त्यांना राग आला होता. पुढे मोठेपणीही आपल्याला गृहीत धरले जाणे (being taken for granted) त्यांना मुळीच आवडत नसे.
 दुसरे विशेष नोंद घेण्याजोगे म्हणजे, आपला निर्णय चुकीचा आहे हे जाणवूनसुद्धा त्यांनी आपल्या निवडीचा पुनर्विचार केला नाही. त्यातही पुन्हा पोद्दार कॉलेजसारखे सर्वसामान्य मराठी मुलाने निवडले असते ते कॉलेज न निवडता, त्यांनी सिडनमसारखे उच्चभ्रू व आपल्या घरापासून दुप्पट अंतरावर असलेले कॉलेज निवडले. ह्या साऱ्यातील हेकटपणा हाही त्या आत्मभानाचा किंवा आत्मविश्वासाचा एक आविष्कार वाटतो.
 पुढे कॉमर्स कॉलेजचे वर्ग सुरू झाले आणि, त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर, 'हरियाली' सोडून 'पथरीला' रस्ता स्वीकारणाऱ्याच्या वेदना क्षणाक्षणाला जाणवू लागल्या. पण तरीही ते त्याच वाटेने पुढे जात राहिले. आपण जे करायचे ठरवतो, त्यासाठी वाटेल तेवढे कष्ट उपसायची त्यांची तयारी असायची असेही दिसते. 'की घेतले व्रत न हे अम्ही अंधतेने' ही सावरकरांची ओळ त्यांची आवडती होती. ही कष्ट सहन करण्याची आत्यंतिक क्षमता हीदेखील त्या तीव्र आत्मभानातून किंवा मनस्वीपणातून येत असावी.
बऱ्याच वर्षांनी ह्या निर्णयाबद्दल जोशींनी लिहिले आहे,

प्राणापेक्षा प्रिय असलेल्या सीतेचाही, राजधर्माचे परिपालन करण्याकरिता, त्याग करायला मी मागेपुढे पाहणार नाही, अशा रामचंद्री अभिनिवेशात मी संस्कृत अभ्यासक्रम न घेण्याचा निर्णय जाहीर करून टाकला. वर्षानुवर्षे ज्या आयुष्यक्रमाची तयारी केली, तो क्षणार्धात हेकटपणे लाथाडला. आता पुढे काय? आईवर रागावलेले बाळ हट्ट करून जेवायला नकार देते; त्यामुळे आईचे हृदय पिळवटते आहे, या जाणिवेत त्याला काय आनंद होतो? लव-कुशांनी रामाच्या साऱ्या सैन्याचा पराभव केला, सीतेचे निष्कलंकत्व सिद्ध झाले. तिला कोणी पतिता म्हटले असते, तर लव-कुशांचे पराक्रमसिद्ध धनुष्यबाण आकर्ण ताणून सिद्ध झाले असते. तरीही 'सीतेने पुन्हा एकदा अग्निदिव्य करावे' असा आग्रह धरून रामाने मनातल्या मनात कोणत्या असीम कडूजहर सुखाचा अनुभव घेतला?
(अंगारमळा, पृष्ठ ५१)

 हा परिच्छेद जोशींच्या मनस्वी स्वभावाची व असामान्य भाषाप्रभुत्वाची साक्ष पटवतोच; पण त्यातील अर्थबाहुल्य त्यापलीकडे जाणारे आहे असे जाणवते. 'आईचे हृदय पिळवटते आहे, या जाणीवेत त्याला काय आनंद होतो?' किंवा कोणत्या असीम कडूजहर सुखाचा अनुभव घेतला?' यांसारख्या शब्दरचना काहीशा गूढ वाटतात. 'आपल्या लोकत्तरतेच्या धुंदीत, आपल्या हातानेच आपले आयुष्य कडू करून घेण्यात गोडी मानणारे' हे पृष्ठ २८वर उद्धृत केलेले त्यांचे शब्दही काहीतरी वेगळे सूचित करत आहेत असे जाणवते. पण जोशींनी स्वतः त्याचे नेमके स्पष्टीकरण त्यांच्या लेखनात कुठेच दिलेले नाही.

 प्रखर बुद्धिनिष्ठा आणि तीव्र आत्मभान ही पूर्वायुष्यात जाणवणारी जोशींची दोन व्यक्तिवैशिष्ट्ये व त्यांचे विविधांगी आविष्कार भावी वाटचालीचा मागोवा घेतानाही आपल्याला पुनःपुन्हा जाणवत राहतात.

व्यावसायिक जगात


 संस्कृतकडे पाठ फिरवून शरद जोशी कॉमर्सला गेले व जिद्दीने अभ्यास करून जून १९५७मध्ये चांगल्या प्रकारे एमकॉम झाले. अर्थशास्त्राची त्यांना खूप गोडीही वाटू लागली हे खरे, पण ते शिक्षण चालू असतानाच 'एमकॉमनंतर पुढे काय' हा प्रश्न समोर उभा राहिला होता. कॉलेजात त्यांना दोन वर्षांसाठी मिळालेली महिना तीस रुपयांची स्कॉलरशिप सोडली तर बाकी काहीच कमाई नव्हती. आजवर वडलांनीच राहण्याचा, प्रवासाचा, पुस्तकांचा व शिक्षणाचा सारा खर्च केला होता, त्यासाठी त्यांनी मुलाला अर्धवेळ नोकरी वा शिकवणी करून वा अन्य कुठल्याही प्रकारे घरखर्चाचा भार उचलायला लावले नव्हते हे खरे; पण त्याचबरोबर वडलांच्या व नुकत्याच नोकरीला लागलेल्या मोठ्या भावाच्या पगारात आपले आठ जणांचे कुटुंब कसेबसे गुजराण करत आहे ह्याची जाणीव जोशींना होती. त्यामुळे शिकत असतानाच एकीकडे त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची पूर्वतयारी सुरू केली होती. ज्यांचा तत्कालीन आर्थिक विश्वात खूप दबदबा होता ते डॉ. सी. डी. देशमुखदेखील मूळचे आयसीएस होते. जोशींचे वडील सरकारी नोकरीत असल्याने तशा पदाचे त्यांना, नाही म्हटले तरी, लहानपणापासून थोडेफार आकर्षण होतेच. त्याकाळी ही स्पर्धापरीक्षा देणे, तिचा निकाल जाहीर होणे, त्यानंतर मुलाखत, तिचा निकाल आणि हे सगळे सोपस्कार यशस्वीरीत्या पार पाडल्यानंतर प्रत्यक्ष नेमणूक होणे ह्यात वर्षभराहून अधिक काळ सहज जात असे. दरम्यानच्या या कालावधीत अर्थार्जन करणे आणि निदान स्वतःचा खर्चतरी भागवणे बावीस वर्षांच्या जोशींच्या दृष्टीने अपरिहार्यच होते.
 त्या दृष्टीने त्यांनी मुंबई विद्यापीठाकडे व्याख्यातेपदासाठी अर्ज केला तत्कालीन नियमांनुसार हे अर्ज त्या-त्या विषयासाठी स्वतंत्ररीत्या करावे लागत असत; म्हणून अर्थशास्त्र, संख्याशास्त्र व व्यापार अशा तीन विषयांसाठी तीन स्वतंत्र अर्ज त्यांनी केले होते. पण बरेच दिवस थांबूनही विद्यापीठाकडून काहीच उत्तर आले नाही. दरम्यान त्यांना एक आमंत्रण आले; कोल्हापूरला एका नव्या कॉमर्स कॉलेजमध्ये व्याख्याता म्हणून दाखल व्हायचे.
 त्याकाळी मुंबई आणि पुण्यापलीकडच्या ग्रामीण महाराष्ट्रात उच्चशिक्षणाचे प्रमाण कमीच होते; वाणिज्य शाखेला तसाही वाव कमीच असायचा. त्यामुळे कोल्हापूरसारख्या ठिकाणी एखादे कॉमर्स कॉलेज सुरू करणे ही कल्पनाच जोशींना हास्यास्पद वाटली. पण ज्यांनी हे आमंत्रण दिले होते ते प्रा. भालचंद्र शंकर भणगे स्वतःच पूर्वी सिडनममध्ये शिकवत होते व जोशी त्यांचेच एक विद्यार्थी होते. केवळ हे नवे कॉलेज सुरू करण्यासाठी म्हणून प्रा. भणगे यांनी सिडनममधील मानाची नोकरी सोडली होती. आपल्या ह्या गुरूंबद्दल, त्यांच्या ज्ञानाबद्दल जोशींना बराच आदर होता. आता ह्या नव्या कॉलेजच्या उपक्रमात त्यांना जोशींसारख्या त्यांच्या हुशार विद्यार्थ्यांचा सहभाग हवा होता. त्यांना नकार देणे जोशींना जड झाले. शिवाय, प्रत्यक्ष भेटीत चर्चा करताना भणगे यांनी अगदी गळच घातली. त्यांचा मुद्दा असा होता, की नाहीतरी जोशी काही व्याख्याता म्हणून कायम नोकरी करणार नाहीएत, स्पर्धापरीक्षा व नंतरच्या मुलाखती पार पडेस्तोवरच त्यांना अध्यापन करायचे आहे; तेव्हा ते मुंबईत केले काय किंवा कोल्हापुरात केले काय, काहीच फरक पडणार नाही. याशिवाय, अतिरिक्त आकर्षण म्हणून तीन वर्षांनंतर मिळू शकणारे वेतन भणगे यांनी जोशींना पहिल्या महिन्यापासूनच द्यायचे कबूल केले. त्या दिवसापर्यंत मुंबई विद्यापीठाकडून काहीच उत्तर आलेले नसल्याने व कॉलेज सुरू व्हायची वेळ अगदी जवळ येऊन ठेपल्यामुळे जोशींनाही नोकरीची घाई होती. शेवटी जोशींनी भणगे यांना होकार दिला व लगेचच ते कामावर हजर झाले.

 कोल्हापूर येथील एक प्रसिद्ध काँग्रेसनेते रत्नाप्पाअण्णा कुंभार यांच्या आधिपत्याखालील लीगल एज्युकेशन सोसायटीने हे महाविद्यालय सुरू केले होते. रत्नाप्पा कुंभार यांनी कॉलेज सुरू करण्याची सर्व व्यावहारिक जबाबदारी प्राचार्य या नात्याने भणगे यांच्यावर सोपवली होती. जो कोणी येईल त्या विद्यार्थ्याला प्रवेश दिला गेला. कारण कॉमर्स कॉलेज हा प्रकारच कोल्हापुरात प्रथम सुरू होत होता. साधारण शे-सव्वाशे विद्यार्थी दाखल झाले होते. त्यातले काही वयाने बरेच मोठे व बारीकसारीक नोकऱ्या करणारे होते. त्या सगळ्यांना सोयीचे व्हावे म्हणून कॉलेजची वेळ सकाळी साडेसात ते साडेदहा अशी ठेवली गेली. कॉलेज प्रत्यक्ष सुरू होईस्तोवर ऑगस्ट महिना उजाडला. कोल्हापुरातील बिंदू चौकात तोफखाना बिल्डिंग नावाची एक जुनाट लांबलचक कौलारू इमारत होती. तिथेच हे कॉलेज भरू लागले. इमारतीच्या आवारातच एक भले मोठे, डेरेदार वडाचे झाड होते व त्याची सावली सगळे कॉलेज कवेत घेणारी होती. त्या भव्य वृक्षामुळे एखाद्या प्राचीन आश्रमाप्रमाणे तेथील वातावरण वाटायचे.
 अशा नव्या कॉलेजसाठी कोल्हापुरात प्राध्यापक मिळणे अवघड होते. कशीबशी भणगे यांनी सगळी जुळवाजुळव केली. एन. व्ही. शिवांगी नावाचे एक बेळगावला व्यवसाय करणारे चार्टर्ड अकौंटंट त्याच कॉलेजात लागले होते. विद्यापीठाच्या नियमानुसार अकाउंटिंग व ऑडिटिंग हा विषय शिकवणारी व्यक्ती स्वतः चार्टर्ड अकौंटंट असणे आवश्यक होते; पण तशी कोणी व्यक्ती कोल्हापुरात उपलब्ध होईना. त्यामुळे मग खास सवलत म्हणून शिवांगी यांना बेळगावहून कोल्हापूरला यायचे-जायचे टॅक्सीभाडे द्यायचे कॉलेजने कबूल केले व त्यानंतरच शिवांगी प्राध्यापक म्हणून रुजू झाले. तेही स्वतः पूर्वी सिडनमचेच विद्यार्थी होते. त्यांनी लिहिलेल्या In the making of a personality या आत्मचरित्रानुसार पहिल्या वर्षी ते स्वतः, प्राचार्य भणगे, शरद जोशी व एम. व्ही. कुलकर्णी असे चारच जण ह्या कॉलेजात शिकवत. शेवटचे दोघे भणगे यांचेच माजी विद्यार्थी होते. त्यातले कुलकर्णी पुढे अलाहाबाद बँकेचे जनरल मॅनेजर बनले. भणगे स्वतः पुढे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू झाले.
 एक निष्णात प्राध्यापक म्हणून भणगेंचा लौकिक मोठा होता आणि म्हणूनच रत्नाप्पाअण्णांनी सगळी भिस्त त्यांच्यावर सोपवली होती. होते ते तसे काहीसे बुटके व स्थूल; पण त्यांचा आत्मविश्वास, त्यांचा ध्येयवाद, टापटीप यांमुळे त्यांची एकदम छाप पडत असे. नेहमी ते सुटाबुटात वावरत. कोल्हापुरात कॉमर्स कॉलेज काढणे म्हणजे मोठे आव्हान आहे ह्याची त्यांना जाणीव होती; किंबहुना म्हणूनच त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली होती. त्यामुळे शिक्षणाचे माध्यम त्याकाळी इंग्रजी असूनही वर्गात ते अधूनमधून मराठीतही बोलत; विद्यार्थ्यांना सगळे नीट समजावे म्हणून. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही ते आपलेसे वाटत. त्यांचा स्वभाव सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा, सहकाऱ्यांना प्रेरित करण्याचा होता. शिवाय, संस्थाप्रमुख रत्नाप्पा कुंभार हेदेखील सदैव त्यांच्या मदतीला तयार असत. कोल्हापुरात कॉमर्स कॉलेज सुरू करणे हा त्यांच्या दृष्टीनेही प्रतिष्ठेचा प्रश्न होता.
 स्वतः जोशींच्या बाबतीत सुरुवातीलाच एक पेच निर्माण झाला. इथले कॉलेज सुरू होऊन जेमतेम तीन दिवस झाले आणि अचानक मुंबई विद्यापीठातील तीनही व्याख्यातेपदांसाठी निवड झाल्याच्या तीन तारा त्यांना एकाच दिवशी मिळाल्या! कुठले पद स्वीकारायचे हा निर्णय विद्यापीठाने त्यांच्यावरच सोपवला होता. जोशी ह्यांची पुन्हा एकदा द्विधा मनःस्थिती झाली. भणगे यांना सोडून जायचा बराच मोह झाला; पण भणगेंनी पन्हा काकुळतीने मनधरणी केली. 'मुंबई विद्यापीठाला तुमच्यासारखे इतर अनेक व्याख्याते मिळतील, पण आम्हाला इथे माणसं मिळवणं खूप अवघड आहे. एकदा तुम्ही इथे यायचं कबूल केल्यावर व त्या भरवश्यावर आम्ही कॉलेज सुरू केल्यावर तुम्ही आम्हाला असं मध्येच सोडून जाणं अन्यायाचं होईल, वगैरे ते सांगू लागले. नैतिकदृष्ट्या त्यांचे म्हणणे बरोबरही होते. शेवटी जोशींनी कोल्हापुरातच राहायचा निर्णय कायम केला. इथे राहूनच ते लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देणार होते.

 कोल्हापूर येथील पद्मा गेस्टहाउसमध्ये जोशी राहू लागले. मुंबईतील कॉलेजात इतर सर्व धनिक मुलांमध्ये त्यांची गणना गरीब विद्यार्थ्यांमध्येच होत होती; इथे मात्र ते एकदम धनवानांत गणले जाऊ लागले. त्याकाळी त्यांचा मासिक पगार प्राचार्यांच्या औदार्यामुळे महिना २१० रुपये होता व त्या परिस्थितीत एकट्या माणसासाठी तो खूप वाटत होता. कोल्हापुरातल्या अगदी सर्वोत्तम लॉजमध्येही महिन्याभराच्या शाकाहारी जेवणाचे फक्त तीस रुपये होत होते; मांसाहारी जेवणाचे पाच रुपये जास्त.
 जोशींचे व्यक्तिमत्त्व रुबाबदार होते. सहा फूट एक इंच उंची, भरदार शरीरयष्टी, चेहऱ्यावर बुद्धीचे तेज आणि मुंबईतील वास्तव्यात अंगी बाणलेला चटपटीतपणा याचे नाही म्हटले तरी ग्रामीण विद्यार्थ्यांवर एक दडपण यायचे. कॉलेजात इंग्रजीतून शिकवताना जोशी एकही मराठी शब्द वापरत नसत. इतर कॉलेजांतील मुलेही केवळ जोशींचे इंग्रजी ऐकण्यासाठी म्हणून वर्गात येऊन बसायची. पण इतक्या अस्खलित इंग्रजीची तिथल्या मुलांना अजिबात सवय नव्हती. ती सगळी मराठी माध्यमातली; अगदी अचंबित होऊन 'अजि म्यां ब्रह्म पाहिले' असा चेहरा करून नुसते ऐकत राहायची. जोशींची एकूण देहबोलीही अशी असायची, की हात वर करून काही शंका विचारायचीदेखील मुलांना भीती वाटायची. कधी कोणी धाडस करून काही विचारलेच तर जोशी 'एवढं कसं कळत नाही तुम्हाला?' असेच जणू सुचवणाऱ्या नजरेने बघायचे. कधी कधी जोशींना वाटायचेदेखील, की मुलांना सगळे समजेल अशा सोप्या भाषेत शिकवावे. पण मग सिडनममधले प्राध्यापक त्यांच्या डोळ्यापुढे येत – मुरंजन, दीक्षित वगैरे. आपण शिकवतो ते सारे विद्यार्थ्यांना समजते आहे की नाही ह्याची काळजी तेही करत नसत. आपल्याच नादात, आपल्याच गतीने ते शिकवत जायचे. जोशींसारख्ने विद्यार्थी जीव मुठीत धरून त्यांच्यामागे धावायचे; पुरती दमछाक व्हायची; पण मग हळूहळू जोशींचा दम वाढत गेला, स्वतःच झेप घ्यायची ताकद आली आणि काही दिवसांनी सगळे प्रयत्नांती समजू लागले. 'मग मीतरी विद्यार्थ्यांच्याच गतीने कशासाठी जायचे? त्यांचे त्यांनाच नाही का हळहळू समजू लागणार?' - जोशी स्वतःला विचारत. त्याचबरोबर आणखीही एक होते; आपल्या इंग्रजीवरील प्रभुत्वाचा व सिडनमसारख्या कॉलेजातील उच्चभ्रू वातावरणात सहा वर्षे काढल्याचा जोशींना, नाही म्हटले तरी, अभिमान होताच. त्यांच्या शिकवण्यातही त्यामुळे थोडासा डामडौल, थोडासा मिरवण्याचा भाग यायचा. त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर, "मोराने आपलाच पिसारा खुलवून नाचावं आणि त्यातच समाधान मानावं तसा हा प्रकार होता."

त्यांचे त्यावेळचे एक विद्यार्थी शरद देशपांडे लिहितात,

जोशीसर अतिशय कमी बोलायचे. एकूण प्रकृती गंभीर. त्यामुळे त्यांच्याविषयी जास्त भीती वाटायची. विद्यार्थ्यांत मिसळणं, त्यांच्याशी गप्पा मारणं वगैरे दूरची बात. एकच वर्ष ते आम्हाला शिकवायला होते. निरोप समारंभात ते म्हणाले, 'माझ्या पहिल्या प्रयोगाचे बेडूक तुम्ही झालात.' आज मी म्हणेन – तुमच्या प्रयोगातून एकतरी बेडूक आज सुखरूप सुटला आहे; तो महासागर तरून गेला आहे. महाविद्यालयीन शिक्षणापेक्षा त्याने फार काही मिळवलंय. तुम्ही शिकवलेल्या विषयातच-सेल्समनशिप आणि पब्लिसिटी. मराठी जाहिराती वाचायच्या असतात हे पुणेकरांना त्याने दाखवून दिलंय. कोल्हापूरच्या तांबड्या मातीत बीज पेरलं, पण पुण्याच्या सुपीक भूमीत ते बीज रुजलंय. (चतुरंग दैनंदिनी २०१२, पृष्ठ ८७-८८)

शरद देशपांडे यांनी पुढे पुण्यात सेतू नावाची एक जाहिरात एजन्सी काढली, ती उत्तमप्रकारे वाढवली व अनेक वर्षांनी शेतकरी संघटनेशी त्यांचा व्यावसायिक पातळीवरही संबंध आला. याच लेखात त्याबद्दल देशपांडे लिहितात,

पहिल्यांदा शरद जोशींना मी पत्र लिहिलं. 'मी नोकरी सोडली आहे. शेतकरी संघटनेच्या जाहिराती प्रसिद्ध करण्याचा पहिला हक्क, तुमचा एक विद्यार्थी म्हणून, माझा आहे. मला तो द्यावा ही आग्रहाची विनंती.' लगेच चार-पाचदा त्यांचा मला फोन आला. फोन दुसरीकडे असल्याने मला निरोप मिळायला उशीर झाला. जेव्हा मिळाला तेव्हा धावतपळत त्यांच्याकडे गेलो. ते म्हणाले, 'अरे, तू मोठा झालास. तीन-चार निरोप पाठवायला लागतात.' मी सत्य परिस्थिती सांगितली. जाहिरातींचं एस्टिमेट दिलं आणि सांगितलं, 'मी नुकतीच एजन्सी सुरू केली आहे, त्यामुळे काही ठिकाणी आधी पैसे द्यावे लागतील.' तेव्हा ते म्हणाले, 'जर आम्ही तुला पैसे दिले नाहीत, तर आम्ही सगळे तुझ्या घरी भांडी घासायला येऊ.' मी म्हणालो, 'पण सर, माझ्या घरी घासायला भांडी असली पाहिजेत ना!' त्यावर ते मंदसं हसले आणि त्यांनी मला आपल्या वैयक्तिक खात्यातून काही रकमेचा चेक दिला. माझ्या डोळ्यात पाणी तरारलं.

सुरुवातीला वर्गात शिकवण्यापलीकडे जोशींनी आपल्या विद्यार्थ्यांच्या जीवनात फारसे कधी डोकावून बघितले नव्हते. दुसऱ्याच्या जीवनात फार दखल घेण्याचा त्यांचा स्वभावही नव्हता. पण नंतरच्या एका अनुभवाने त्यांना एक वेगळी दृष्टी दिली. एकदा गेस्टहाउसवर रात्रीचे जेवताना त्यांना वाढणाऱ्या मुलाने चाचरत चाचरत विचारले. "सर, मला ओळखलंत का?" त्यांनी मुलाकडे नीट मान वर करून बघितले, पण त्यांना काहीच ओळख पटेना. त्यांच्या कोऱ्या चेहऱ्याकडे बघून मुलानेच खुलासा केला. म्हणाला, "सर, मी तुमच्या वर्गातलाच एक विद्यार्थी आहे. खांडेकर माझं नाव." आपल्याच कॉलेजातला एक गरीब विद्यार्थी इथे चक्क वाढप्याचे काम करतो आहे, हे लक्षात येताच जोशी काहीसे हादरलेच. त्यांना एकदम आपल्या वडलांची आठवण झाली. एकेकाळी तेही ह्याच कोल्हापुरात वाढले होते; एक अनाथ विद्यार्थी म्हणून. कसेबसे माधुकरी मागून, वार लावून इकडेतिकडे जेवत. लहानपणी वडलांकडून ऐकलेले ते दिवस अचानक आठवले आणि जेवता जेवता जोशींना गलबलून आले, घासही गिळवेना. आपल्या वर्गातल्या इतर मुलांचे चेहरे त्यांच्या डोळ्यांपुढे उभे राहिले. त्यांचीही परिस्थिती काही फारशी वेगळी असणार नव्हती. ते म्हणतात, “मी, माझी परीक्षा, माझे भविष्य, माझी स्वप्ने यांच्यापलीकडे असलेल्या एका जगाचा पडदा खांडेकरने उघडून दाखवला होता." यानंतर काही दिवसांनी ते कॉलेजच्या वसतिगृहावरच राहू लागले; कारण वसतिगृह सांभाळणे ही अतिरिक्त जबाबदारी त्यांच्यावर सोपवली गेली. त्याकाळी ग्रामीण तरुणांनी शहरातील कॉलेजात शिकायला यायचे प्रमाण तसे कमी होते; पुढे सरकारने सर्वांच्या फीची व्यवस्था केल्यावर व इतरही सवलती उपलब्ध झाल्यावर ते वाढले. त्यावेळी जी मुले शहरात शिकायला येत, त्यांना वसतिगृहात किंवा अशीच कुठेतरी स्वतःची सोय करावी लागे. आता संपूर्ण दिवस जोशी या विद्यार्थ्याबरोबरच घालवू लागले; त्यांचे वागणे-बोलणे, उठणे-बसणे जवळून पाहू लागले. वर्गातील बहुतेक विद्यार्थी छोट्या छोट्या गावांतील शेतकरी कुटुंबातील होते. ते बहुसंख्य विद्यार्थी आणि सुशिक्षित कुटुंबातील मूठभर शहरी विद्यार्थी यांच्यातली दरी अनुल्लंघनीय वाटावी इतकी प्रचंड होती. ग्रामीण विद्यार्थ्यांच्या घरी शिक्षणाची काहीच परंपरा नव्हती, इंग्रजीचा गंधही नव्हता, आर्थिक ऐपतही नव्हती. ते कुपोषित आहेत हे त्यांच्याकडे बघितल्याबरोबरच कळत असे. ग्रामपंचायतीच्या शाळेत शिकून ती मुले आता एकदम कोल्हापूरच्या कॉलेजात दाखल झाली होती. अत्यंत मागासलेले त्यांचे कुठलेतरी आडगाव आणि कोल्हापूरसारखे तुलनेने समृद्ध असलेले शहर यांच्यातील फरकच इतका होता, की हे विद्यार्थी अतिशय बुजरे, न्यूनगंडाने ग्रस्त, आपसातच कोंडाळे करून राहणारे असे बनले होते. इतके दिवस कधी जोशींनी त्यांच्याबद्दल असा बारकाईने विचारच केला नव्हता. पण त्या दिवशी खांडेकरबरोबर भेट झाल्यावर त्यांचे डोळे एकाएकी उघडल्यासारखे झाले. दिवसभरात जेव्हा कधी मोकळा वेळ मिळे, तेव्हा जोशी आपल्या विद्यार्थ्यांशी गप्पागोष्टी करू लागले. शहरात आल्यावर कुठल्या कुठल्या अडचणींशी त्यांना झगडावे लागते, कुठले विचार त्यांच्या मनात घोळत असतात ह्याची जोशींना चांगलीच कल्पना आली. जोशी लिहितात,

त्यावेळी माझ्या लक्षात आले नव्हते, की माझ्याबरोबरचे विद्यार्थी आणि माझे विद्यार्थी यांत महदंतर होते. आर्थिक चणचण असली तरी, सिङनममधला विद्यार्थी जात्याच आणि संस्काराने सर्वांगपरिपूर्ण होता. त्याच्या अवयवांत दोष नव्हता; व्यायाम केल्यास आणि खुराक मिळाल्यास तो बलभीम बनू शकत होता. पण कोल्हापुरात माझ्यासमोर भक्तिभावाने ऐकणारे विद्यार्थी अपंग होते. एका अर्थाने मतिमंद होते. प्राध्यापकाला उड्डाण करताना पाहता पाहता स्वतःही पंख उभारून उडण्याचा प्रयत्न करण्याचेही सामर्थ्य त्यांच्यात नव्हते. पिढ्यान्पिढ्यांची गरिबी आणि निरक्षरता यांनी त्यांना सर्वार्थाने खच्ची केले होते. तसे ते शिक्षणासाठीही आलेले नव्हते. महाविद्यालयाचा परीस अंगाला लागला तर शेतीच्या खातेऱ्यातून सुटू या आशेने ते आलेले होते. महाविद्यालय, शिक्षण, प्राध्यापक ही त्यांच्या दृष्टीने प्रगतीची साधने नव्हती, अपरिहार्यपणे उल्लंघण्याचे अडथळे होते. आणि हे अडथळे ओलांडत खेड्याच्या जीवनातून जिवंत कसे सुटता येईल हे ते घाबऱ्या डोळ्यांनी निरखत होते.

पुढे अनेक वर्षांनंतर जोशींनी लिहिलेल्या 'महाविद्यालयातील विद्यार्थ्यास पत्र' ह्या हृदयस्पर्शी लेखात त्यांचे स्वतःचे त्यावेळचे निरीक्षण व त्यातून स्फुरलेले चिंतन उत्तम प्रतिबिंबित झाले आहे. त्यात जोशी लिहितात :

... एखाद्या पुढाऱ्याची मुलं सोडल्यास वसतिगृहात मुलांना ठेवण्याची शेतकरी आईबापांची परिस्थिती कधीच नसते. बिचारे इकडेतिकडे उसनवार करून आणि अक्षरशः आपलं पोट आवळून घेऊन पोरांना वसतिगृहात ठेवतात; पण त्यांच्या मुलांची वसतिगृहात काही कमी कुचंबणा होत नाही. पुढाऱ्यांच्या आणि शहरातल्या मुलांच्या सामानाचा झगमगाट पाहून त्यांचे डोळे दिपूनच जातात. थंडी वाजू नये म्हणून आईने बळेच दोन गोधड्या दिलेल्या असतात; घरी एक कमी पडत असूनसुद्धा. पण इतर पोरांच्या रंगीबेरंगी फुलांची नक्षी असलेल्या गाद्या, उशा, चादरी पाहिल्या म्हणजे आईची प्रेमाची गोधडीसुद्धा लपवून ठेवावीशी वाटते.

या भाग्यशाली, झुळझुळीत कपड्यांत फिरणाऱ्या, दररोज नवीन घडीच्या रुमालावर सुगंध शिंपडणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबर राहावं, त्यांच्यासारखं वागावं-दिसावं, मित्रमैत्रिणींच्या नजरेतील कौतुकाचा नजराणा गोळा करत फिरावं असं वाटणं अगदी नैसर्गिक आहे. विडी-सिगरेट पिणं, प्रसंगी अपेयपान करणं, सिनेमा, नाटक, तमाशा पाहणं हे सगळं वाईट असं हजारदा मनावर ठसवलेलं असलं, तरी नव्या मित्रांना ह्या भानगडी करताना पाहून राग तर येत नाहीच; पण आजपर्यंतची सर्व मूल्यं आणि कल्पना भुरूभुरू उडून जातात आणि एकदा का होईना त्यांच्यासारखं करावं, मग त्यासाठी लागेल त्या मार्गाने पैसे उभे करावे, आवश्यक तर खऱ्याखोट्या सबबी सांगून आणखी पैसे मागवून घ्यावे असं वाटणं साहजिकच आहे....

महाविद्यालयातील, वर्गातील, वसतिगृहातील विद्यार्थिमित्रांचं वैभव हे मन पोळणारं. याउलट, शहरात बाजारपेठेत फिरताना होणाऱ्या वैभवाच्या दर्शनाने काहीच क्लेश वाटत नाहीत. दुकानांतील वस्तूंची विविधता, आकर्षक मांडणी, ग्राहकांची गर्दी, सुबक डौलदार घरांत राहणारी गोंडस कुटुंबं, आखीव बागबगीचे, त्यात आनंदाने विहरणारे तरुणतरुणी, हे सारं पाहिल्यानंतर खेड्यातून आलेल्या विद्यार्थ्याला आश्चर्य वाटतं. हे सर्व आपल्या डोळ्यांनी पाहायला मिळालं याचा आनंद वाटतो आणि आता गावातील ते भयानक आयुष्य मागे टाकून या नवीन विश्वात सुखी होऊन जाऊ, या कल्पनेने उत्साह उसळू लागतो....

पण या नवीन जगात स्थान मिळवणं सोपं नाही. अपरिमित कष्ट करूनही ते जमेल किंवा नाही, शंकाच आहे. शहरातली पोरं आणि पुढाऱ्यांची पोरं नुसतीच श्रीमंत नाहीत; इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून आली आहेत. एकमेकांतसुद्धा फाडफाड इंग्रजी बोलतात. आपल्याला इंग्रजी बोलणं तर सोडूनच द्या, बोललेलं समजणंसुद्धा कठीण, त्या पोरांना इंग्रजी सिनेमाच्या नायिकासद्धा काय बोलतात ते समजतं. आपल्याला प्राध्यापक काय बोलतात तेसुद्धा कळणं मुश्किल! अभ्यास करायचा कसा? आणि पास व्हायचं तरी कसं?...

हे कठीण आहे. महाकठीण आहे. आज शहराच्या नवलाईच्या दर्शनाने आपण सुखावलो आहोत; आपल्या विद्येकरिता गावाकडे मायबाप काय उस्तवारी करत आहेत, याचासुद्धा विसर पडतो. त्यांची इच्छा एकच – पोराने परीक्षा द्यावी, पास व्हावं, नोकरी धरावा, घरशेता कर्जातून सोडवावा आणि हे पाहून त्यांना सुखानं डोळे मिटावेत. पण शेतकऱ्यांच्या पोरांना शहरातील परीक्षा द्यायला सांगणं म्हणजे हत्तीला दोरीवरच्या उड्या मारायला सांगणं आहे. जमावं कसं?...

लाखात एखाद्याच शेतकऱ्याच्या पोराला मिळणारी विचार करण्याची, अभ्यास करण्याची संधी तुला मिळाली आहे. ती किमान या एका प्रश्नाचं उत्तर शोधून काढण्यासाठी वापर. माझ्या आईबापांनी असं कोणतं पाप केलं होतं, की त्यांना असं चिखलात झिजत राबावं लागतं? त्यांच्या श्रमाचं मोल त्यांना का मिळालं नाही? त्यांच्या घामाचं दाम कोणत्या हरामानं हिरावून नेलं?'...

मोहनदास करमचंद गांधी इंग्लंडच्या ऐश्वर्याला भुलून काही काळ साहेब बनण्याच्या प्रयत्नाला लागले; पण त्यांनी स्वतःला सावरलं आणि स्वातंत्र्याचे प्रणेते, राष्ट्रपिता झाले. ते स्वतः इंग्लंडमधल्या सुखात रममाण झाले नाहीत. तुझ्या मायबापांना लुटणाऱ्यांच्या वैभवात बोटं घालून त्यात धन्यता मानण्याचा मोह पडू देऊ नकोस.... आजची तुझी स्थिती सीतेच्या शोधासाठी गेलेल्या हनुमानासारखी आहे. लंकेचे वैभव, प्रासाद, तलाव, बागबगीचे पाहून हनुमानही विस्मयचकित झाला. पण त्या भिकारड्या रामाची कसली भक्ती करता; या अजिंक्य, महाबलाढ्य रावणाच्या ऐश्वर्याचा उपभोग घेऊ, असा विचार त्याच्या मनाला शिवलाही नाही. अशोकवनातील विरहदुःखी सीतेचा शोध त्याने चालू ठेवला म्हणून रामायण घडले.

आज भूमिकन्या सीता पुन्हा वनवासात आहे. आम्ही भूमिपुत्र तिच्या विमोचनाच्या कामाला लागणार, का लंकेश्वर रावणाच्या वैभवाचे वाटेकरी व्हायला बघणार, हा प्रश्न तुझ्यापुढे ठेवण्यासाठी हा पत्राचा प्रपंच. (प्रचलित अर्थव्यवस्थेवर नवा प्रकाश, भाग-२, प्रथमावृत्ती, डिसेंबर १९८५, पृष्ठ ११४-१२०)

 शेतकरी संघटनेच्या उभारणीच्या दिवसांत ग्रामीण भागातील नव्याने शिकू लागलेला तरुणवर्ग ह्या पत्ररूपी लेखाने अक्षरश: भारावून गेला होता. अनेकांनी आपापल्या खोलीच्या भिंतीवर पत्राची प्रत चिकटवली होती. हे संपूर्ण पत्र वाचल्यानंतर गावोगावी शिकणाऱ्या हजारो शेतकरी कुटुंबातील मुलांच्या डोळ्यात पाणी उभे राहायचे; पण त्याचवेळी त्यांची मनेही आपल्यावर पिढ्यान्पिढ्या होत असलेल्या अन्यायाच्या जाणिवेने पेटून उठायची. पुढे शेतकरी संघटनेचा विचार एखाद्या वणव्याप्रमाणे ग्रामीण तरुणांमध्ये पसरला, ह्याचे थोडेफार श्रेय ह्या काळजाला हात घालणाऱ्या पत्रालाही नक्कीच द्यावे लागेल.

 जसजसे दिवस जात गेले, तसतसा जोशींचा या ग्रामीण विद्यार्थ्यांकडे पाहायचा दृष्टिकोन बदलत गेला. 'पिढ्यान्पिढ्यांची गरिबी आणि निरक्षरता यांनी त्यांना सर्वार्थाने खच्ची केले होते.' किंवा 'शेतकऱ्यांच्या पोरांना शहरातील परीक्षा द्यायला सांगणं म्हणजे हत्तीला दोरीवरच्या उड्या मारायला सांगणं आहे.' यांसारख्या उपरोक्त वाक्यांवरून त्यांची प्रगल्भ झालेली जाण स्पष्ट होते.

 त्यांच्या अध्यापनावरही त्यांच्या या बदललेल्या दृष्टिकोनाचा परिणाम होत गेला. आपण जे शिकवतो आहोत, ते विद्यार्थ्यांना नीट समजेल अशा प्रकारे ते शिकवू लागले. अध्यापनाचा हा अनुभव पुढे त्यांच्या खूप उपयोगी पडणारा होता. क्लिष्ट अशी अर्थशास्त्रीय तत्त्वे ते सर्वसामान्य शेतकऱ्यालाही सहज समजेल अशा भाषेत कशी मांडतात, अगदी निरक्षर ग्रामीण बायकांनाही त्यांचे क्रांतिकारक विचार कसे समजतात, डंकेल प्रस्तावासारख्या विषयावरही संघटनेचा सामान्य कार्यकर्ता मोठ्या मोठ्या अर्थशास्त्र्यांना व पत्रकारांना निरुत्तर कसा करू शकतो, याचे एक रहस्य कोल्हापुरातील अनुभवात दडलेले असावे.

 इथल्या वास्तव्यात वेळात वेळ काढून प्राचार्य भणगे यांच्याबरोबर जोशींनी एका प्रकल्पासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी प्रवास करून एक सर्वेक्षण करायचे कामही केले. 'ग्रामीण विद्युतीकरणाचा कोल्हापूर जिल्ह्यात झालेला परिणाम ह्या विषयावरचा हा अभ्यासप्रकल्प होता. विजेसारख्या वैज्ञानिक शोधांमळे समाजात फार मोठे बदल कसे घडन येतात. हे मनावर ठसवणारा हा अभ्यास होता. विदेशात असताना तयार केलेल्या आपल्या बायोडेटात जोशींनी या प्रकल्पाचा उल्लेख केला आहे.

 ह्या सगळ्या घडामोडींत स्वतःच्या स्पर्धापरीक्षेच्या अभ्यासासाठी मात्र जोशींना अजिबात वेळ मिळेना. त्यातच लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या. लेखी परीक्षेसाठी एकूण पाच पेपर्स होते. सगळ्या परीक्षा मुंबईतच द्यायच्या होत्या. परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी सलग पंधरा-वीस दिवस रजा सोडाच, प्रत्यक्ष परीक्षेसाठीसुद्धा एका दिवसाहून जास्त रजा घेणे शक्य झाले नाही. प्रत्येक पेपराच्या वेळी अतोनात धावपळ झाली. कोल्हापूरला कॉलेज संपल्यावर संध्याकाळची एसटी पकडायची, पुण्याला यायचे, त्याच रात्रीची पुण्याहून मुंबईला जाणारी पॅसेंजर पकडायची, पहाटे कुर्ल्याला उतरायचे, सकाळी सहापर्यंत अंधेरीला त्या काळी मोठा भाऊ राहत असलेल्या घरी जायचे, तिथे अंघोळ वगैरे उरकून दहा वाजेपर्यंत फोर्टमध्ये असलेल्या परीक्षा केंद्रावर जायचे, परीक्षा झाली, की तसेच बोरीबंदर स्टेशनवर जाऊन रात्रीची कोल्हापूरला जाणारी ट्रेन पकडायची, कोल्हापूरला भल्या सकाळी पोचायचे आणि अंघोळ उरकून पुन्हा नेहमीसारखे साडेसातपर्यंत कॉलेजवर शिकवण्यासाठी हजर राहायचे, असा सगळा द्राविडी प्राणायाम करावा लागला. पाचही पेपरांच्या बाबतीत अगदी हाच प्रकार घडला.

 परिणामतः सगळे पेपर्स अगदी भिकार गेले. जोशी खचून गेले. आपले उच्च सनदी नोकर बनण्याचे स्वप्न इथे कोल्हापुरात आल्याने धुळीला मिळाले, ह्या विचाराने खूप घालमेल होऊ लागली. मुंबईतच मिळालेली नोकरी स्वीकारली असती, तर दोन-तीन लेक्चर्स घेतल्यानंतर उरलेला सगळा दिवस अभ्यासासाठी मिळाला असता आणि शिवाय, ऐन परीक्षेच्या वेळची ही सगळी धावपळ टळली असती, पेपर्स उत्तम गेले असते; उगाचच आपण भणगेंच्या विनंतीला बळी पडलो असे त्यांना वाटू लागले. शेवटी त्यांनी ठरवले, की भणगे यांच्या स्नेहापोटी एक वर्ष गेले असे समजायचे, परीक्षा संपल्या, की ही नोकरी सोडायची, पूर्ण वेळ झट्न अभ्यास करायचा आणि पुढच्या वर्षी पुन्हा ही स्पर्धापरीक्षा द्यायची.

 पण प्रत्यक्षात तसे घडायचे नव्हते. जोशींना अगदी कमी गुण मिळाले असले, तरी ते उत्तीर्ण झाले असल्याने नियमानुसार त्यांना तोंडी परीक्षेचे आमंत्रण आले. तोंडी परीक्षेत त्यांना घवघवीत यश मिळाले, पहिल्या तिघांत क्रमांक लागला. शासकीय सेवेत निवड करताना तोंडी व लेखी अशा दोन्ही परीक्षांतील गुणांचा एकत्रित विचार केला जातो. सर्वसामान्यतः प्राधान्याने निवडले जाणारे इंडियन अॅडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस (IAS), इंडियन पोलीस सर्व्हिस (IPS) अथवा इंडियन फॉरिन सर्व्हिस (IFS) हे तीन पर्याय त्यांना उपलब्ध होऊ शकले नाहीत. (IAS झालेले हा त्यांचा खुपदा करून दिला गेलेला परिचय तितकासा बरोबर नव्हता; पण त्या काळी या आयोगाच्या परीक्षेला 'आयएसची परीक्षा' असेच म्हटले जाई.) त्यांना उपलब्ध झालेल्या पर्यायांमधील ऑडिट अँड अकाउंट्स ही त्यांची पहिली पसंती होती; पण ते क्षेत्रही त्यांना मिळाले नाही. तोंडी परीक्षेत ज्याचा पहिला क्रमांक आला होता, त्याला ती जागा मिळाली. शेवटी इंडियन पोस्टल सर्व्हिसमधली (IPOS) जागा जोशींना स्वीकारावी लागली.

 दरम्यान आणखी एक शक्यता निर्माण झाली होती. पुण्यातील सुप्रसिद्ध गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स या संस्थेमध्ये त्यांना संशोधन करण्यासाठी शिष्यवृत्ती मिळत होती. तो पर्याय तसा मोहात पाडणारा होता. अर्थशास्त्राशी संबंधित काही संशोधन करणे त्यांच्या वृत्तीला भावणारे होते. पण त्याबद्दल अधिक चर्चा करताना संस्थाप्रमुख डॉक्टर धनंजयराव गाडगीळ त्यांना म्हणाले, "इथे असं संशोधन करून शेवटी तुम्ही एक प्राध्यापकच बनणार. पण प्राध्यापकापेक्षा उच्च सनदी नोकरीचं महत्त्व अधिक आहे. प्रत्यक्ष धोरणं आखणं, त्यांची अंमलबजावणी करणं हे सारं शेवटी सनदी नोकरांच्याच हातात असतं. शासन हे परिवर्तन घडवून आणण्याचं खूप प्रभावी माध्यम आहे. तुम्ही सनदी नोकर बनून त्या प्रत्यक्ष परिवर्तनात सहभागी व्हा." गाडगीळांचा सल्ला जोशींना पटला; किंवा कदाचित असेही असेल की जोशींना स्वतःलाही विचारान्ती हेच करावेसे वाटले असेल.

 मागे वळून बघताना या संदर्भात काही प्रश्न मनात येतात.

 कॉलेजात शिकवण्यासाठी कोल्हापूरला गेल्याचा पश्चात्ताप होतो, असे जोशी यांनी लिहिले आहे; पण त्या पश्चात्तापाचे नेमके कारण त्यांनी स्पष्ट केलेले नाही. तिथे राहून मुंबईतल्या स्पर्धापरीक्षा दिल्यामुळे अभ्यास नीट झाला नाही एवढे ते लिहितात, पण त्यामुळे आयएएसला आपली निवड झाली नाही, ही त्यांची नेमकी खंत होती का? पोस्टल सर्व्हिससारख्या तुलनेने दुय्यम पर्यायाऐवजी आयएएसमध्ये किंवा आयएफएसमध्ये नोकरी करणे त्यांना अधिक अर्थपूर्ण वाटले असते का? पोस्टाचा पर्याय नाकारून पुढच्या वर्षी पुन्हा एकदा स्पर्धापरीक्षा देण्याचा स्वतःचा आधीचा विचार त्यांनी का अमलात आणला नाही? आईवडलांवर आणखी वर्षभर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःच्या पायावर शक्य तितक्या लौकर उभे राहणे त्यांना व्यक्तिशः प्राधान्याचे वाटत होते का?

 आणखी एक प्रश्न म्हणजे. सरकारी नोकरीत जाण्याऐवजी इंग्लंड-अमेरिकेत जाऊन पीएच.डी. केली असती, तर ते भविष्यात अधिक श्रेयस्कर ठरले असते का? जगदीश भगवतीप्रमाणे? नाही म्हटले तरी, परदेशी विद्यापीठातल्या डॉक्टरेटला भारतीय विद्वानांच्या वर्तुळात कायम सर्वोच्च स्थान होते; जोशींना तर कुठलीच डॉक्टरेट नव्हती. आणि एकदा ते परदेशी उच्चशिक्षण घेतले, तोच प्रबंध इंग्रजी पुस्तकाच्या रूपात प्रसिद्ध केला, की मग आयुष्यभरासाठी तो एक मानबिंदू ठरला असता; व्यावसायिक प्रगतीचे अनेक दरवाजे त्यामुळे उघडले गेले असते. कदाचित भगवतीप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताही मिळाली असती. त्यात त्यांना अधिक सार्थकता वाटली असती का?

 यावर आमची फक्त एकदाच चर्चा होऊ शकली. त्यावेळी जोशी म्हणाले होते,

 "तसं झालं असतं. तर पढे बर्नमधल्या नोकरीत मला जे अनुभवता आलं. त्याला मी मुकलो असतो. शेतीतही पडलो नसतो आणि हा सगळा आंदोलनाचा अविस्मरणीय अनुभवही मिळाला नसता. जर-तरचा विचार आपण आज करू शकतो, पण त्यावेळी जे काही घडायचं होतं ते घडून गेलं. कोठल्या अपघाताने कोणाच्या आयुष्याला कसं वळण लागेल, हे कोणालाही सांगता येणं शक्य नाही. 'माझ्या टर्मसवरच मी जगेन,' असा माझा कायम आग्रह असायचा व तसं जगायचा मी आयुष्यभर प्रयत्नही केला; पण नियती म्हणूनही काही प्रकार आहे हे मला आज पटतं. ज्यावर माझं काहीच कंट्रोल नव्हतं, अशाही काही गोष्टी माझ्या आयुष्यात घडत गेल्या."

 आपल्या पोस्टातील नोकरीबद्दल जोशी सांगतात.

 "पोस्टखात्यातील जागा खरं तर मला स्वीकारायची नव्हती. पण मला तिथे नोकरी मिळाली ह्याचा माझ्या वडलांना इतका आनंद झाला, की विचारायची सोय नाही. साध्या कारकुनापासून सुरुवात करून ते इतक्या वर्षांनी सुपरिंटेंडंट ह्या पदावर पोचले होते व आता नुकताच नोकरीला लागणारा त्यांचा मुलगा एकदम त्याच पदावर रुजू होणार होता. त्यांना होणारा तो आनंद बघून मग शेवटी मी पोस्टखात्यातील पद स्वीकारायचं ठरवलं."

 जोशी यांच्या ज्येष्ठ भगिनी नमाताई यांनीही साधारण अशीच आठवण प्रस्तुत लेखकाला सांगितली आहे. त्या म्हणाल्या,

 "शरद रुजू झाला, त्याच कचेरीत माझ्या वडलांचे मराठे नावाचे एक मित्र काम करत होते. त्यांनी लगेच वडलांना फोन करून 'तुमचा मुलगा आता ह्या खुर्चीत बसतो आहे ही बातमी कौतुकाने सांगितली. वडलांना अत्यानंद झाला. घरी आल्या आल्या त्यांनी ही बातमी आम्हाला दिली. आम्हा सगळ्यांनाच त्यावेळी शरदचा खूप अभिमान वाटला." ही घटना ऑगस्ट १९५८मधली.

 पोस्टाच्या कार्यपद्धतीनुसार पहिली दोन वर्षे ते प्रोबेशनवर होते. ह्या दोन वर्षांत त्यांनी गुजरातेत बडोदे व सुरेंद्रनगर येथे, उत्तर प्रदेशात सहरनपूर येथे आणि महाराष्ट्रात रत्नागिरी व मंबई येथे काम केले. प्रत्येक ठिकाणी साधारण चार-पाच महिने. पत्रांचे वितरण करणे हा पोस्टाच्या कामाचा केवळ एक भाग झाला. पण पोस्टखाते इतरही अनेक गोष्टी सांभाळत असते. मनीऑर्डरद्वारे देशभरात कुठेही पैसे पोचवणे, अल्पबचत विभाग, बचतखाते, खूप मोठा कर्मचारी वर्ग, जागोजागी असलेली प्रॉपर्टी. त्याकाळी तार (टेलेग्राफ) खातेही महत्त्वाचे होते व तेही पोस्टखात्याचाच भाग असायचे. एकूणच पोस्टाचा व्याप अफाट असतो. इथल्या कामाशी त्यांचा तसा साधारण परिचय होताच, पण प्रोबेशनवर असताना अधिक बारकाईने ओळख झाली. विशेष म्हणजे, एकूण देशाचीही व्यापक ओळख झाली.

 प्रोबेशन संपल्यावर जलै १९६० मध्ये त्यांची पहिली नेमणक झाली ती मंबईत डेप्युटी डायरेक्टर, फॉरिन पोस्ट या पदावर. डॉकयार्ड रोड येथे त्यांचे हे पहिले ऑफिस होते. नोकरीत रुबाब खूप होता. मोठे थोरले ऑफिस. पहिल्या नेमणुकीतच हाताखाली ५०० कर्मचारी. बेल दाबली की कोणीतरी लगेच हजर होणार. मर्जी सांभाळण्यासाठी सगळे कनिष्ठ अहमहमिकेने झटणार. आपल्या देशात उच्च शासकीय सत्तेचे एक वलय असतेच; त्या काळात तर ते खूपच अधिक होते. ते वलयांकित अस्तित्व कोणालाही त्या तरुण, उमेदीच्या वयात सुखावणारे होते.

 सर्वसामान्य कुटंबीयांप्रमाणे त्यांच्याही घरी नोकरीपश्चात लग्नाचा विषय आपोआपच निघू लागला. २५ जून १९६१ रोजी त्यांचे लग्न झाले. १९४३मध्ये जन्मलेल्या लीला कोनकर दिसायला देखण्या, सडपातळ, हुशार होत्या. दाखवण्याचा पारंपरिक कार्यक्रम झाला त्याचवेळी जोशींनी त्यांना पसंत केले होते; पण तेव्हा त्यांचे वय अवघे १७ होते. त्यामुळे एक वर्ष थांबायचे ठरले. प्रत्यक्ष लग्नाच्या वेळी त्या ज्युनिअर बीएच्या वर्गात होत्या. पतीपेक्षा आठ वर्षांनी लहान, म्हणजे जेमतेम अठरा वर्षांच्या. मुंबईत शिवाजीपार्क-माहीम येथील लेडी जमशेदजी रोडवरच्या रामबागमध्ये आईवडलांसह राहत होत्या. कॅम्लिन ह्या शाई, रंग व इतर स्टेशनरी बनवणाऱ्या प्रख्यात कंपनीचे मालक दांडेकर ह्यांच्यामुळे प्रसिद्ध असलेली ती इमारत. जोशी म्हणतात, "चारचौघांप्रमाणेच रीतसर दाखवून, ठरवून झालेले हे लग्न. माझ्या निरीश्वरवादामुळे विवाह कोणताही धार्मिक विधी न करता झाला एवढेच काय ते तत्कालीन समाजापेक्षा वेगळेपण."

 दोघांनी मधुचंद्र उत्तर प्रदेशात मसूरी येथे साजरा केला. तिथून जोशी पुण्याला परत आले व कामावर रुजू झाले. मार्च महिन्यातच त्यांची इथे बदली झाली होती. सिनिअर सुपरिटेंडंट ऑफ रेल्वे मेल सर्व्हिस, बी डिव्हिजन, पुणे, या पदावर. ते मसूरीहून परतले आणि लगेचच १२ जुलै १९६१ रोजी, पुण्यात पानशेत धरण फुटून प्रचंड हाहाकार उडाला. पोस्टखातेही त्याला अपवाद नव्हते. अनेक पोस्ट ऑफिसेसमध्ये पाणी घुसले होते, हजारो पत्रे भिजून त्यांचा लगदा झाला होता. बहुतेक ठिकाणी कर्मचारी कामावर यायच्या परिस्थितीतही नव्हते. जोशी आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी अतिशय जिद्दीने सगळ्याला तोंड दिले.

 ही सुरुवातीची आपत्तिग्रस्त परिस्थिती सोडली तर एरव्ही त्यांचे पुण्यातील वास्तव्य सुखकर होते. लग्नानंतरचे हे गुलाबी दिवस. जीपीओच्या निवांत परिसरातील ज्या बंगल्यात दोघांचे वास्तव्य होते, त्या बंगल्याच्या बागेतही २८ प्रकारचे गुलाब फुलले होते.

 पुण्यानंतर नोव्हेंबर १९६१ ते मार्च १९६५ ते मुंबईत होते. आधी सिनिअर सुपरिटेंडंट ऑफ पोस्टल सर्व्हिसेस, बाँबे वेस्ट म्हणून आणि मग सिनिअर सुपरिटेंडंट, बाँबे सॉर्टिंग डिव्हिजन म्हणून.

 मार्च १९६५ मध्ये बढती मिळून जोशींची दिल्लीला बदली झाली; असिस्टंट डायरेक्टर जनरल, पोस्ट अँड टेलिग्राफ डायरेक्टोरेट या पदावर. ही दोन्ही खाती तशी एकाच मंत्रालयात असत. इथे टेलेग्राफ खाते प्रथमच त्यांच्या हाताखाली आले. त्याकाळी बिनतारी संदेशवहन फार महत्त्वाचे मानले जाई. टेलेप्रिंटर, संगणक, सॅटेलाइट वगैरेच्या आधीचे हे दिवस. परदेशात टपाल व बिनतारी संदेशवहन ह्या क्षेत्रात जे जे अभ्यास केले जातात, त्यांचे संकलन करायचे, त्यातील काय काय आपल्या देशासाठी योग्य अस शकेल ह्याची छाननी करायची व त्य अनुषंगाने टिपणे करून वरिष्ठांकडे पाठवायची असे ह्या कामाचे स्वरूप होते.

 लाल बहादूर शास्त्री यांचे ताश्कंद येथील अकल्पित निधन याच काळातले. त्यानंतर इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या. शपथविधीनंतरचा त्यांचा पहिलाच सार्वजनिक कार्यक्रम जोशींचे कार्यालय ज्या इमारतीत होते तिथे झाला. शास्त्रीजींच्या स्मरणार्थ काढलेल्या टपाल तिकिटाचे तेव्हा अनावरण झाले. त्यावेळी इंदिराजींना काहीसे जवळून पाहण्याची संधी मिळाली. पुढे जोशी यांनी लिहिले आहे.

इंदिराबाई माझ्या आदराचा विषय कधीच नव्हत्या. पैतृक वारशाने अंगावर आलेले प्रचंड जबाबदारीचे ओझे सावरण्याची आपली कुवत आहे किंवा नाही याबद्दल त्यांच्या मनात असलेली जबरदस्त शंका आणि त्यातून निघणारी असुरक्षिततेची भावना यांतून देशाला मोठा धोका संभवतो याची जाणीव त्यांच्या त्या वेळच्या भाषणातूनच झाली.

(अन्वयार्थ - २, पृष्ठ ५५)

ह्या कालखंडाविषयी बोलताना जोशी म्हणाले,

 "माझ्या सर्वांत जास्त स्मरणात राहिले आहेत ते म्हणजे श्री. भि. वेलणकर. त्यांच्यासारखा बॉस मला लाभला हे नशीबच म्हणायचं. ते डायरेक्टर, पोस्टल सर्व्हिसेस ह्या वरिष्ठ पदावर होते. देशातील प्रत्येक भागाला एक विशिष्ट पिनकोड द्यायचा खूप मोठा प्रकल्प त्या काळात पोस्टखात्याने राबवला. त्यासाठी प्रत्येक राज्याचं जिल्ह्यानुसार, तालुक्यानुसार वर्गीकरण करायचं होतं. सारखी नावं असलेली अनेक गावं देशात असतात. अशा प्रत्येक गावाला वेगळे वेगळे पिनकोड मिळतील ह्याची दक्षता घ्यायची होती. भावी काळात त्या परिसरात किती पोस्ट ऑफिसेस निघू शकतील, ह्याचाही ह्या प्रकल्पासाठी अंदाज बांधणं आवश्यक होतं. कारण जसा जसा शहरांचा विकास होतो, तसे तसे नवे विभाग विकसित होत जातात व त्यांना नवे पिनकोड द्यावे लागतात; पण त्यांची तजवीज मूळ नियोजनातच करून ठेवावी लागते. प्रत्येक विभागाला किती कर्मचारी लागतील, याचाही अंदाज घ्यायचा असतो. असे मोठे देशव्यापी प्रकल्प कधीच एखाददुसऱ्या व्यक्तीच्या हातात नसतात, त्यामुळे त्यांचं श्रेय कोणाही एका व्यक्तीला देणं चकीचं ठरेल; पण यात वेलणकरांचा नक्कीच मोठा हिस्सा होता व मी त्यांच्या हाताखाली काम करत होतो. माझे ते दिवस आनंदात गेले. त्या काळातलं माझं एक निरीक्षण मला पुढे खूप महत्त्वाचं वाटलं होतं. शहरातील वेगवेगळ्या टपाल पेट्यांमध्ये टाकली जाणारी बहुतेक पत्रं त्या किंवा अन्य मोठ्या शहरातच जायची; जेमतेम १०% पत्रं ग्रामीण भागात जात. अन्य विकसित जगापेक्षा भारताचं हे एक वेगळेपण होतं. ग्रामीण भारताचं तुटलेपण दाखवणारं. वेलणकर एक उत्तम बॉस होते. कामाव्यतिरिक्तही आम्ही दोघं खूप गप्पा मारायचो. ते संस्कृतचे जाणकार होते. माझाही तो आवडीचा विषय. एकूणच आम्हा दोघांचं चांगलं जळायचं. माझ्या नोकरीच्या काळात भेटलेल्या ज्या फार थोड्या व्यक्तींविषयी माझ्या मनात आदर आहे, त्यांच्यापैकी ते एक आहेत."

 दिल्लीतील नेमणुकीचा एक फायदा म्हणजे अनेकदा विदेशप्रवास करायची जोशींना संधी मिळाली. युनिव्हर्सल पोस्टल युनियन (ऊर्फ युपीय) ही युनायटेड नेशन्सची (संयुक्त राष्ट्रसंघाची) एक घटकसंस्था. भारतही अर्थातच युपीयुचा एक सदस्य आहे. युपीयुच्या परिषदांसाठी दोन-तीन वेळा ते परदेशी गेले. इतरही दोन-तीन विदेशफेऱ्या झाल्या. सरकारी अधिकारी म्हणून परदेशी जाणे म्हणजे तशी चैनच असायची. पंचतारांकित हॉटेल्स. मेजवान्या. बड्या लोकांशी ओळखी. हा सगळा भाग म्हणजे अशा नोकरीतील 'पस'. शिवाय हे विदेशभ्रमण वैचारिक क्षितिज रुंदावणारेही होते.

 ह्या पोस्टिंगमध्ये २० ऑगस्ट १९६७ ते ३० मार्च १९६८ अशा सात महिन्यांसाठी त्यांना फ्रान्सला जायची संधी मिळाली. तेथील टपालयंत्रणेचा अभ्यास करण्यासाठी. त्यासाठी फ्रान्स सरकारने त्यांना स्कॉलरशिप दिली होती. ते एकटेच गेले होते की सहकुटुंब गेले होते याची नोंद मात्र उपलब्ध कागदपत्रांत दिसली नाही.

 पहिले चौदा आठवडे फक्त फ्रेंच भाषा शिकण्यासाठी विशी येथील जगप्रसिद्ध फ्रेंच भाषा अध्ययन केंद्रात ते जात होते. त्यांच्या बॅचमध्ये एकूण २१ देशांतील ४२ प्रशिक्षणार्थी होते व सगळ्यांचेच त्या प्रशिक्षणाबद्दल अतिशय चांगले मत झाले. ह्या फ्रेंचचा पुढे त्यांना खूप उपयोग होणार होता. त्यापूर्वी भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयातर्फे दिल्लीत चालवल्या जाणाऱ्या स्कूल ऑफ फॉरिन लँग्वेजेस या संस्थेत जोशी एक वर्ष रोज संध्याकाळी जात होते, पण तिथे वर्षभर जाऊनही त्यांचे फ्रेंचचे ज्ञान अगदीच तकलादू होते. याउलट विशीतल्या संस्थेत मात्र चौदा आठवड्यांत ते उत्तम फ्रेंच बोलू लागले. त्यानंतर आयुष्यात कधीच त्यांना फ्रेंच भाषेत आपले विचार व्यक्त करण्यात अडचण आली नाही. त्यांच्या मते याचे कारण म्हणजे विशी येथे वापरात असलेली प्रशिक्षणाची दृक्-श्राव्य (audio-visual) यंत्रणा. खरे तर ऑलियान्स फ्रान्सेज् या फ्रेंच संस्थेमध्ये दिल्लीतही ती सोय होती, पण भारत सरकार तिचा उपयोग न करता स्वतःचेच धेडगुजरी प्रशिक्षण देत असे. त्यात सरकारचा पैसा व शिकणाऱ्यांचा वेळ अक्षरशः फुकट जात असे, पण कोणालाच त्याची काही पर्वा नव्हती. जेव्हा गरज पडेल, तेव्हा फ्रेंच दुभाषी मागवायची सरकारी सोय होतीच!

 नंतरचे चार महिने जोशींनी प्रत्यक्ष फ्रेंच पोस्टात अभ्यास करण्यासाठी घालवला. अभ्यासासाठी त्यांना पुढील चार क्षेत्रे दिली गेली होती :

  1. टपाल वर्गीकरणाचे यांत्रिकीकरण (Mechanization of sorting)
  2. पोस्ट ऑफिसातील खिडक्यांमधून होणाऱ्या कामाचे यांत्रिकीकरण (Mechanization of Window operations)
  3. टपालाची एका विभागातून दुसऱ्या विभागात देवाणघेवाण होते अशा कार्यालयांचे कामकाज (Working of exchange offices)
  4. संख्याशास्त्रीय सेवा. (Statistical services)

 फ्रेंच पोस्ट खात्यातील ह्या प्रशिक्षणात त्यांची अनेक वैशिष्ट्ये जोशींना जाणवली व भारतात परतल्यावर वरिष्ठांना दिलेल्या आपल्या ३२-पानी अहवालात त्यांनी ती नमूद केली आहेत. उदाहरणार्थ, फ्रान्सची लोकवस्ती भारताच्या एक दशांश असूनही त्यांचे सेवेचे जाळे भारतापेक्षा अधिक विस्तृत आहे. एकूण तीन लाख कर्मचारी तिथे नोकरी करतात. प्रत्येक फ्रेंच नागरिकाला दरवर्षी सरासरी २०० पत्रे पोचवली जातात. हा आकडा भारतापेक्षा खूपच अधिक आहे. फ्रेंच पोस्ट खात्याच्या स्वतःच्या मालकीच्या ५,५०० इमारती असून अतिरिक्त १३,६०० इमारती त्यांनी भाड्याने घेतलेल्या आहेत. टपाल वितरणासाठी सुमारे ३०,००० वाहने व २० विमाने वापरली जातात. सेवेचा दर्जा सतत उच्च राखला जातो. पॅरिस शहरात सकाळी दहा वाजता टाकलेले स्थानिक पत्र संध्याकाळी सहाच्या आत पोचले पाहिजे हे बंधन पाळले जाते. देशात इतरत्र जाणारे पत्र असेल, तर तेही दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सहापर्यंत पोचवणे टपालखात्याला बंधनकारक आहे. एक कर्मचारी एका तासाला २४०० पत्रांचे वर्गीकरण (सॉर्टिंग) करतो. (भारतात हेच प्रमाण एका तासाला सुमारे १००० पत्रे आहे.)

 एके ठिकाणी जोशी नमूद करतात, "त्यांच्या वितरणातील कमालीचा नियमितपणा हा आश्चर्यकारक आहे. एखाद्या विशिष्ट इमारतीत पोस्टमनने जायची वेळ ही ठरलेली असते व ती नेहमीच पाळली जाते. मी पॅरिसमध्ये ज्या हॉटेलात राहत होतो तिथे रोज सकाळी बरोबर आठ वाजायला तीन मिनिटे असताना पोस्टमन प्रवेश करायचा व माझ्या तेथील संपूर्ण चार महिन्यांच्या वास्तव्यात त्याने यायची ही वेळ एकदाही चुकली नाही."

 त्यांनी पॅरिस सोडले त्याच्या पुढच्याच महिन्यात, एप्रिल १९६८ मध्ये, लोकांमधील धुमसत असलेल्या असंतोषाचा स्फोट झाला होता; ज्याला 'पॅरिस स्प्रिंग' म्हटले जाते. विद्यार्थी, कामगार आणि शेतकरी रस्त्यावर उतरले होते. आधीचे काही महिनेही सतत निदर्शने होतच होती. जोशी तिथे होते तो कालखंड त्यामुळे फ्रान्सच्या इतिहासात बराच धामधुमीचा मानला जातो. या सगळ्याचे पडसाद जोशींसारख्या विचारी स्वभावाच्या व्यक्तीवर नक्कीच उमटले असणार, पण त्याची नोंद अशी आपल्याला कुठे सापडत नाही.
 तत्कालीन निदर्शनांचा एक भाग म्हणजे फ्रान्समधील शेतकरी आपल्या मागण्या रेटण्यासाठी वारंवार करत असलेले 'रास्ता रोको' आंदोलन. प्रा. जी. आर. दीक्षित यांच्या एका पत्राचा उल्लेख मागील प्रकरणात झाला आहे. शरद जोशींनी आपल्या आंदोलनात ज्या 'रास्ता रोको' तंत्राचा वापर केला याचा उल्लेख करताना ते लिहितात, “कधी कधी मला असं वाटतं, की तुम्ही शेतकऱ्यांच्या चळवळीचा 'रास्ता रोको' पद्धतीचा जो अनुभव घेतला, तो तुमच्या फ्रान्समधील वास्तव्यात."
 ह्यात थोडेफार तथ्य असावे. कारण अशा प्रकारचे 'रास्ता रोको' हे फ्रान्समधील शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे एक वैशिष्ट्य होते. जोशींच्या भावी आयुष्यातील काही कृत्यांचा धागा फ्रान्समधील त्या वास्तव्यात बघितलेल्या अशा काही प्रसंगांशी जोडलेला असणे अशक्य नाही. किंबहुना, अन्यथा त्यांच्यासारखा एखादा माजी सनदी अधिकारी, विदेशात उच्चपदी राहिलेला विचारवंत, एकाएकी एका छोट्या गावातील, छोट्या आंदोलनात भर रस्त्यावर मांडी ठोकून वाहने अडवायला बसतो हे समजून घेणे तसे अवघडच आहे.
 एक लक्षणीय बाब म्हणजे, त्यांनी पॅरिसमध्ये असताना हिरव्या शाईत लिहिलेली सोळा A4 आकाराची हस्तलिखित पाने उपलब्ध आहेत. डाव्या कोपऱ्यात 'पॅरिस, १९६७, फेब्रुवारी' असे लिहिलेले आहे. म्हणजे ह्या भेटीच्या आधी पॅरिसला दिलेल्या एखाद्या भेटीत हे लेखन केलेले असावे. पहिल्याच पानावरील मजकुरात "Theory of Revolutions' हे शब्द आहेत. म्हणजे बहुधा ह्याच शीर्षकाचे जे एक पुस्तक त्यांना लिहायचे होते व सोळाव्या प्रकरणात ज्या पुस्तकाचा उल्लेख आहे त्याचीच हे लेखन म्हणजे सुरुवात असावी. वाचताना हा मजकूर खूप मूलगामी स्वरूपाचा आहे हे जाणवते. त्यात जोशी लिहितात :

इतिहासात वेगवेगळ्या क्रांत्या झाल्या, अनेक प्रकारे उत्क्रांती होत गेली, अनेक संस्था निर्माण झाल्या. हे सारे बदल कोणा महापुरुषांमुळे घडून आले, की कुठल्यातरी अनाकलनीय अशा वैश्विक प्रेरणांमुळे? विशिष्ट कालखंडात एखादा बुद्ध, एखादा जिझस, एखादा अॅडम स्मिथ, एखादा मार्क्स, एखादा फोर्ड, एखादा गांधी का निर्माण होतो? हे महापुरुषांचे जन्म हा केवळ एक ऐतिहासिक अपघात असतो का? त्यांच्यामुळे परिस्थिती बदलते, का त्यांचा जन्म त्या परिस्थितीत अपरिहार्य असतो? या साऱ्यांना जोडणारे एखादे मूलतत्त्व असेल का? सगळेच मूलतत्त्ववादी (fanatics) म्हणजे फसलेले प्रेषित (prophets) असतात का? आणि सगळेच प्रेषित हे फसलेले मूलतत्त्ववादी असतात का? एखाद्या महात्म्याला समाजमान्यता मिळते आणि एखाद्याला ती मिळत नाही, हे कशामुळे घडते?

पहिला मानव परग्रहावरून आला असेल का?

पिंड आणि ब्रह्मांड यांचे नाते काय आहे? त्यांची रचना इतकी सारखी कशी काय? विचार करण्याचे सामर्थ्य फक्त एकेका व्यक्तीलाच का असते; समूहाला का नसते? जडामध्येसुद्धा चैतन्य असते व चैतन्यालाही जडाचे स्वरूप धारण करावेच लागते. मग त्यातले आधी काय आले? जड आणि चैतन्य यांचे नाते काय आहे? व्यक्तीला जसे संवेदनापटल असते, तसे वैश्विक संवेदनापटल म्हणून काही प्रकार असतो का?'

 या व अशा अनेक गहन प्रश्नांवरील चर्चेची ही सोळा पाने म्हणजे केवळ सुरुवात आहे. पण हे लेखन जोशींनी पुढे केलेले नाही व त्यामुळे त्यातून त्यांना नेमके काय सांगायचे आहे हे कुतूहल शमत नाही.
 ३० मार्च १९६८ रोजी प्रशिक्षण संपवून जोशी भारतात परतले.

 हे सारे घडत असताना एकीकडे वैवाहिक जीवनाची वाटचालही चालूच होती. लग्नानंतरच लीलाताईंनी बीएचे द्वितीय वर्ष पूर्ण केले. मोठी मुलगी श्रेया जन्मली ७ एप्रिल १९६२ रोजी; म्हणजे लग्नानंतर लगेचच. मुंबई येथे. धाकट्या गौरीचा जन्म २३ नोव्हेंबर १९६३ रोजी झाला.
 जोशी म्हणत होते, "गौरीची जन्मतारीख माझ्या चांगली लक्षात आहे, कारण तेव्हाच अमेरिकेचे अध्यक्ष जॉन केनेडी ह्यांची डलास येथे हत्या झाल्याची बातमी मुंबईत आली होती. अर्थात प्रत्यक्ष हत्या अमेरिकन वेळेप्रमाणे २२ नोव्हेंबर रोजी झाली होती. शिवाय त्याच दिवशी भारतीय सेनेचे चार अधिकारी एका दुर्दैवी विमानअपघातात दगावले होते."
 जोशी पुढे सांगत होते, “गौरीचा आपल्या आईवर फार जीव होता; पण तिला झोपवताना मीच लागायचो. मी वेगवेगळ्या कविता तालासुरात म्हणायचो आणि त्या ऐकता ऐकता ती झोपी जायची."
 जोशींच्या कविताप्रेमाचे एक द्योतक म्हणजे मोठ्या मुलीचे श्रेया हे नाव 'जेथे ओढे वनराई, तेथे वृत्ती रमे माझी, कारण काही साक्ष तिथे, मज त्या श्रेयाची पटते' या केशवसुतांच्या ओळींवरून सुचले आहे. धाकट्या मुलीचे नाव 'गौरी' ठेवण्यापूर्वीही त्यांनी बरीच चर्चा केली होती असे त्यांच्या बोलण्यात आले होते, पण ते नेमके कसे सुचले, हे सांगायचे गप्पांच्या ओघात राहूनच गेले होते.
 इथे एक स्पष्ट करायला हवे. आपल्या वैवाहिक जीवनाविषयी, तसेच देशातील व विदेशातील नोकरीविषयी, जोशींनी फारसे काही लिहिलेले नाही. त्यामुळे त्यांच्या जीवनाची १९५८ ते १९६८ ही दहा वर्षे व नंतरची स्वित्झर्लंडमधली आठ वर्षे असा एकूण अठरा वर्षांचा प्रदीर्घ कालखंड हा काहीसा गुलदस्त्यात राहिल्यासारखा झाला आहे. ह्याविषयी त्यांना विचारले असताना सुरुवातीला ते मला म्हणाले,  "आपल्या भूतकाळाचा फारसा कधी कुठे उल्लेख करायचा नाही, असं मी भारतात परतल्यावर जाणीवपूर्वकच ठरवलं होतं. नव्यानेच जगायला आपण आता सुरुवात केली आहे, तेव्हा उगाच त्या जुन्या आयुष्याची आठवण तरी कशाला? नाहीतरी ऋषीचं कूळ आणि नदीचं मूळ पाहू नये असं आपल्याकडे म्हणतातच. मागे परतायचे सगळे दोर आपण कापूनच टाकले आहेत. तेव्हा यापुढे विचार करायचा तो फक्त भविष्याचाच. There is nothing sweeter than the smell of the burnt bridges (जाळून टाकलेल्या पुलांच्या वासापेक्षा अधिक मधुर काहीच नसतं) असं मी अनेकदा म्हणालो आहे व त्या विधानाचा आनंद मी आयुष्यभर उपभोगत आलो आहे!"
 "हे सगळं तसं ऐकायला छान वाटतं, पण तुमचं चरित्र लिहिताना एवढा मोठा कालखंड एखाद्या अंधाऱ्या बोगद्याप्रमाणे सोडून कसा द्यायचा? आयुष्यातील वेगवेगळे टप्पे एकातून दुसरा, दुसऱ्यातून तिसरा असेच उलगडत जातात ना? पूर्णतः कोऱ्या पाटीवरून अशी आपण कधीच सुरुवात करू शकत नाही; एकत्रितरीत्याच व्यक्ती समजून घेता येते," असे त्यावरचे माझे मत काहीशा विस्ताराने मी मांडले.
 त्यांना त्यात थोडेफार तथ्य जाणवले. बऱ्याच गोष्टी तशा विस्मरणात गेल्या होत्या, पण त्यानंतरच्या चार-पाच भेटीत त्यांनी ह्या कालखंडाबद्दल आठवेल तेवढी माहिती दिली आणि तिच्याच आधारे ह्या चरित्रातला संदर्भित भाग लिहिता आला.

 लौकिकदृष्ट्या सगळे काही उत्तम चाललेले असूनही कुठेतरी जोशी पोस्टातल्या नोकरीत खूप असमाधानी होते. 'आहे मनोहर तरी गमते उदास...' अशीच काहीशी त्यांची मनःस्थिती होती.
 व्यावसायिक पातळीवर विचार केला तर पोस्टातील व एकूणच सरकारी कार्यसंस्कृती त्यांनी दहा वर्षांत खूप जवळून बघितली. इथे मनुष्यबळ अतिरिक्त आहे, आपल्याला नोकरीवरून कोणीही काढून टाकू शकणार नाही याची त्यांना पूर्ण कल्पना आहे, परिवर्तनाची तीव्र आस इथे कोणालाच नाही व त्यामुळे तसे परिवर्तन भविष्यात घडून यायची काही शक्यताही नाही असे काहीसे त्यांचे मत बनले होते. १९९६ साली भारतातील पोस्ट कर्मचाऱ्यांचा एक देशव्यापी संप झाला होता. त्यावेळी त्यांनी शेतकरी संघटक'च्या अंकात (२१ डिसेंबर १९९६) लिहिले होते,

 आजच्या तुलनेत फक्त निम्मा नोकरवर्ग घेऊन आणि आजच्या तुलनेने त्यांना निम्मा पगार देऊन मी टपालखाते चालवायला घ्यायला तयार आहे. आज कोणत्याही महत्त्वाच्या शहरामध्ये पाच दिवसांच्या आत टपाल पोहोचत नाही, तेथे चोवीस तासांच्या आत बटवड्याची हमी द्यायला मी तयार आहे. पण असले आव्हान सरकारच्याही कानी पडत नाही आणि नोकरदारांनाही त्याची नोंद घेण्याची गरज वाटत नाही. नोकर मालक बनले, की मूळ धन्याची अवस्था अशीच होणार.

 ह्या उताऱ्यावरूनही त्यांचे एकूण पोस्टाबद्दलचे मत स्पष्ट होते.

 व्यक्तिगत पातळीवर विचार केला तर, या नोकरीत सुरक्षा होती, पगार व सर्व सोयी चांगल्या होत्या, हाती अधिकार होता, समाजात मान होता; पण तरीही अधिकारपदाची नवलाई सुरुवातीच्या तीन-चार वर्षांत ओसरल्यानंतर ह्या नोकरीत त्यांचा जीव रमेनासा झाला होता. एक प्रकारचे साचलेपण जाणव लागले होते. आपल्या हातून काहीतरी भव्यदिव्य व्हावे, ही लहानपणापासूनची तीव्र आस अपुरीच राहिली होती; भविष्यातही ती पूर्ण व्हायची इथे काही शक्यतादेखील दिसत नव्हती. ह्या नोकरीचा राजीनामा द्यावा असा विचार त्यांच्या मनात साधारण १९६४-६५नंतर येऊ लागला; पण समोरचा रस्ता दिसत नव्हता.

 तो रस्ता सात महिन्यांच्या पॅरिसभेटीत दिसू लागला. भारत सोडून परदेशात कुठेतरी नोकरी धरावी, तिथल्या नोकरीत कदाचित आपल्याला काहीतरी आव्हानात्मक जाणवेल, आपल्या कर्तृत्वाला काही नवे धुमारे फुटतील असे वाटू लागले.
 या काळात जगभरच्या पोस्टखात्यांतील इतरही अनेक अधिकारी जोशींना भेटले. त्यांच्यातल्याच एकाकडून त्यांच्या बर्न येथील मुख्य कार्यालयात एक नवीन पोस्ट तयार होते आहे व ती आपल्याला मिळण्यासारखी आहे असे त्यांना कळले. त्यासाठी जोशींनी तिथे असतानाच प्रयत्न केला व ती नोकरी त्यांना मिळेल हे साधारण ठरले.
 हे आयटीच्या खूप आधीचे दिवस होते. परदेशात नोकरी करणे तितकेसे सोपे वा रूढ नव्हते. त्याचबरोबर भारतातली कायमस्वरूपी, दहा वर्षे पूर्ण झालेली, उत्तम सरकारी नोकरी सोडणे धाडसाचेच होते. आत्ता राजीनामा दिला तर फंड व ग्रॅच्युइटी मिळेल, पण पेन्शनवर पाणी सोडावे लागेल, तसेच या सरकारी नोकरीत क्लेमदेखील राहणार नाही, हे त्यांना ठाऊक होते. शिवाय आधी भारतातल्या नोकरीचा राजीनामा दिल्याशिवाय तिथली नोकरी मिळणार नाही हेही त्यांना स्पष्ट सांगण्यात आले होते.
 पण 'बिकट वाट हीच वहिवाट' बनवण्याचे धाडस जोशींनी पूर्वीही आपल्या आयुष्यात केले होतेच, त्यांचे ते पराकोटीचे आत्मभान - मनात येईल ते बिनदिक्कत कुठल्याही अडचणींवर मात करून आपण करू शकतो ही जिद्द, पुन्हा एकदा उसळी खाऊ लागली.
 भारतात ते परतले त्याच आठवड्यात त्यांनी इथल्या सरकारी नोकरीचा तडकाफडकी राजीनामा देऊनही टाकला. सगळी कार्यालयीन औपचारिकता पूर्ण होईस्तोवर महिना गेला. त्यांचा राजीनामा हा तसा धक्कादायकच होता; पण जोशींचा निर्धार पक्का होता.
 ३० एप्रिल १९६८ हा त्यांच्या भारतातील नोकरीचा शेवटचा दिवस. त्याच रात्री युपीयुमधील नोकरी स्वीकारण्यासाठी त्यांनी स्वित्झर्लंडला प्रयाण केले.


डोंगरकुशीतल्या नंदनवनात


 १ मे, १९६८.
 स्वित्झर्लंडच्या जिनिव्हा इंटरनॅशनल विमानतळावर ३३ वर्षांच्या शरद जोशींनी पाऊल ठेवले. तसे ते पूर्वी दोन वेळा ह्या देशात आले होते, पण ते भारतीय पोस्टखात्यातील एक अधिकारी म्हणून - चारआठ दिवसांसाठी आणि अधिकृत कामासाठी. इथेच नोकरी पत्करून सहकुटुंब वास्तव्यासाठी येणे उत्कंठा वाढवणारे होते आणि रोमांचकही. सोबत २५ वर्षांची पत्नी लीला व अनुक्रमे सहा व साडेचार वर्षांच्या श्रेया व गौरी ह्या दोन मुली. लगेचच स्वित्झर्लंडची राजधानी बर्न येथील युनिव्हर्सल पोस्टल युनियन ऊर्फ युपीयुच्या मुख्यालयात ते दाखल झाले.
 आंतरराष्ट्रीय पोस्टव्यवहाराचे नियमन करणारी संस्था म्हणजे युनिव्हर्सल पोस्टल युनियन (युपीयु). १८७४मध्ये ही स्थापन झाली. जगातली ही दुसरी आंतरराष्ट्रीय संस्था. पहिली आंतरराष्ट्रीय संस्था म्हणजे इंटरनॅशनल टेलेग्राफ युनियन. ती १८६५मध्ये स्थापन झाली. परस्परांतील संदेशवहन हा परस्परसंबंधांचा पायाच आहे आणि त्यासाठी आधी पोस्ट व नंतर टेलेग्राफ ही दोनच साधने त्या काळात उपलब्ध होती; साहजिकच त्यांचे महत्त्व खुप होते. सुरुवातीची अनेक वर्षे दोन्ही संस्थांचे मुख्य कार्यालय बर्न हेच होते.
 पुढे १९४७ साली ह्या युनायटेड नेशन्सच्या (संयुक्त राष्ट्रसंघाच्या) घटक संस्था बनल्या. त्यानंतर इंटरनॅशनल टेलेग्राफ युनियनचे नाव बदलून इंटरनॅशनल टेलेकम्युनिकेशन्स युनियन ठेवले गेले व तिचे मुख्यालय बर्नहून जिनिव्हा येथे नेण्यात आले; युपीयु मात्र बर्नमध्येच राहिली.
 युपीयुमध्ये एक संख्याशास्त्राचा विभाग असावा अशी कल्पना मांडण्यात आली होती. जोशी यांची शैक्षणिक पार्श्वभूमी आणि भारतातील दहा वर्षांचा अनुभव ही पात्रता ह्या पदासाठी अगदी योग्य अशीच होती. त्यामुळे पूर्वी ओळख झालेल्या युपीयुच्या एका असिस्टंट डायरेक्टर जनरलने 'ह्या संस्थेत तुम्ही नोकरी स्वीकाराल का?' अशी विचारणा जोशी यांच्याकडे ते प्रशिक्षणार्थ फ्रान्समध्ये गेले असताना केली होती.
 जोशी यांनाही त्यावेळी असा बदल अगदी हवाच होता. त्यांनी लगेच होकार दिला. मागील प्रकरणात हा भाग आलाच आहे.  “Please sit down. Be comfortable. What drink can I offer you?" आपल्या कार्यालयात त्यांचे हस्तांदोलन करून स्वागत करताना असिस्टंट डायरेक्टर जनरलनी आपुलकीने विचारले आणि त्या पहिल्या प्रश्नातच आपण आता एका अगदी नव्या विश्वात प्रवेश केला आहे हे जोशींना जाणवले. भारतीय पोस्टखात्यातील दहा वर्षांच्या नोकरीत कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यांचे असे मित्रत्वाच्या व बरोबरीच्या नात्याने स्वागत केले नव्हते.
 समोरासमोर असलेल्या कोचावर बसून दोघांच्या गप्पा सुरू झाल्या. सुरुवातीला अनौपचारिक पण दोन-चार मिनिटांतच प्रत्यक्ष कामाच्या स्वरूपाविषयी.
 त्याच दिवशी जोशींनी कामाला सुरुवात केली. राहायला घर घेणे, मुलींसाठी शाळेत प्रवेश घेणे वगैरे सर्व सोपस्कारही थोड्याच दिवसांत पार पडले.
 इंटरनॅशनल ब्युरो (आयबी) हा युपीयुचा एक विभाग होता व ह्याच विभागात जोशींची नेमणूक झाली होती. त्यांचे अधिकृत पद होते 'थर्ड सेक्रेटरी'. आपण वापरतो त्या अर्थाने इथे सेक्रेटरी हा शब्द नाही. युपीयुतील अधिकाऱ्यांच्या एकूण सात श्रेणी होत्या - सुरुवातीची श्रेणी 'थर्ड सेक्रेटरी', मग 'सेकंड सेक्रेटरी', त्यानंतर 'सेक्रेटरी', त्यानंतर 'काउन्सेलर', त्यानंतर 'डायरेक्टर' व त्यानंतर 'असिस्टंट डायरेक्टर जनरल'. शेवटी मग अशा वेगवेगळ्या विभागांच्या असिस्टंट डायरेक्टर जनरल्समधून एकाची नेमणूक डायरेक्टर जनरल म्हणून होत असे. एकूण कर्मचाऱ्यांचा विचार केला तर अर्थातच स्विस नागरिक हे तिथे बहुसंख्य होते, पण अधिकारीवर्ग मात्र जगातल्या वेगवेगळ्या देशांतून आलेला असे.

 आल्प्स पर्वतरांगांच्या कुशीत वसलेला स्वित्झर्लंड हा छोटासा देश पृथ्वीतलावरील नंदनवन म्हणूनच जगभर ओळखला जातो. लांबवर पसरत गेलेल्या गगनस्पर्शी बर्फाच्छादित पर्वतरांगा, उंच उंच वृक्ष, हिरवीगार कुरणे, त्यात मनसोक्त चरणाऱ्या धष्टपुष्ट गायी, त्यांच्या गळ्यातील घंटांचा खुळावून टाकणारा मंजूळ नाद, निळेभोर आकाश, स्वच्छ गुळगुळीत रस्ते, प्रत्येक घरासमोर व गॅलरीत बहरलेली रंगीबेरंगी फुले. सगळे अगदी एखाद्या पिक्चर पोस्टकार्डाप्रमाणे!
 पण निसर्गसौंदर्यापलीकडेही ह्या देशात खूप काही आहे. दरडोई उत्पन्नामध्ये ह्या देशाचा क्रमांक सातत्याने जगात जवळजवळ पहिला असतो. ही संपत्तीदेखील हक्काने शोषण करायला उपलब्ध होईल अशी स्वतःची कुठलीही वसाहत नसताना. रोश वा नोव्हार्तिस यांसारख्या जगातील सर्वांत मोठ्या औषधकंपन्या इथल्याच. खते-रसायने बनवणाऱ्या सिन्जेन्टा वा सिबा, घड्याळे बनवणाऱ्या रोलेक्स वा फावर लुबा, कापडगिरण्यांना लागणारी यंत्रे बनवणारी सुलत्झर, एलेव्हेटर बनवणारी शिंडलर, सिमेंट बनवणारी होल्सिम, वीजनिर्मिती व पुरवठा करणारी एबीबी, कच्च्या मालाचा घाऊक व्यापार करणारी ग्लेनकोर, दुग्धपदार्थ वा चॉकलेट बनवणारी नेसले अशा अनेक आघाडीच्या बहराष्ट्रीय कंपन्या स्वीस आहेत. युबीएससारख्या इथल्या बँका आपल्या संपूर्ण सुरक्षित व्यवहारासाठी जगभर विश्वासार्ह म्हणून प्रसिद्ध आहेत; जगभरातून त्यांच्याकडे सोन्याचा व पैशाचा ओघ वाहत असतो.
 पण ह्या उद्योगांपुरती व संपत्तीपुरती ह्या देशाची ख्याती सीमित नाही. गेली सात-आठशे वर्षे ह्या देशात लोकशाही अखंड टिकून आहे. ह्या देशावर त्या प्रदीर्घ कालावधीत अन्य कुठल्याही देशाने राज्य केलेले नाही. इथला सर्वसामान्य नागरिकही कमालीचा लढवय्या व स्वातंत्र्याचा भोक्ता आहे. अठरा वर्षांवरील प्रत्येकाला लष्करी शिक्षण घेणे व किमान दोन वर्षे लष्करात काम करणे सक्तीचे आहे. शिवाय, आवश्यक ती शस्त्रे त्याच्या घरीच असतात व अवघ्या चोवीस तासांच्या अवधीत तो लष्करी कामासाठी सुसज्ज होऊ शकतो. सगळा युरोप पादाक्रांत करणाऱ्या हिटलरलाही ह्या टीचभर देशावर आक्रमण करायची कधी हिंमत झाली नव्हती. स्वित्झर्लंड देश बहुतांशी डोंगराळ. त्यात पुन्हा थंडी कडाक्याची. स्वतःकडे खनिजसंपत्ती अशी जवळजवळ अजिबात नाही. असे असूनही आज हा देश इतका समृद्ध बनला आहे कारण काटक कष्टाळू समाज व प्रगतिपूरक शासकीय धोरणे. विशेष म्हणजे जनता शस्त्रसुसज्ज असूनही या देशाने कधीच अन्य कुठल्या देशावर आक्रमण केलेले नाही.
 आपली अलिप्ततादेखील ह्या देशाने कटाक्षाने जपली आहे. त्यामुळेच युनायटेड नेशन्सच्या रेड क्रॉस, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन वगैरे तब्बल २५ संस्थांची मुख्यालये आज ह्या देशात आहेत. लीग ऑफ नेशन्स ही पहिल्या महायुद्धानंतर स्थापन झालेली संस्था म्हणजे आजच्या युएनचे मूळ रूप: तिचेही मुख्यालय जिनिव्हा हेच होते. जिनिव्हा हे स्वित्झर्लंडमधील सर्वांत आंतरराष्ट्रीय शहर मानले जाते; पण देशाची राजधानी मात्र बर्न ही आहे.
 स्वित्झर्लंडची विभागणी वेगवेगळ्या २६ कँटोन्समध्ये झालेली आहे व प्रत्येक कँटोन बऱ्यापैकी स्वायत्त आहे. देशात ६४ टक्के जर्मनभाषक व सुमारे २३ टक्के फ्रेंचभाषक आहेत. ह्याशिवाय छोट्या प्रमाणात ८ टक्के इटालियन व अगदी छोट्या प्रमाणात रोमांश ह्या दोन भाषाही बोलल्या जातात. जिनिव्हा फ्रेंचभाषक आहे, तर राजधानी बर्नमध्ये जर्मन भाषा बोलली जाते. पण आश्चर्य म्हणजे, सर्व युएन संस्थांमध्ये दैनंदिन व्यवहाराची भाषा फ्रेंच हीच त्यावेळी होती. जोशींना फ्रेंच चांगले येत होते व ही नोकरी त्यांना मिळण्यामागे ती एक जमेची बाजू मानली गेली होती.

 १९६८ ते १९७६ ही आठ वर्षे जोशींनी इथे काढली. पण त्या काळाबद्दल अनेकदा प्रश्न विचारूनही जोशी विशेष काही माहिती पुरवू शकले नव्हते. तो सारा काळ जणू आता त्यांच्या विस्मृतीतच गेला होता. त्याकाळातील तुमचा कोणी सहकारी आज मला भेटू शकेल का?' ह्या प्रश्नालाही त्यांचे उत्तर सुरुवातीला नकारार्थीच होते.
 तेवढ्यात एक अनपेक्षित घटना घडली. त्यांची मोठी मुलगी श्रेया सहकुटुंब स्वित्झर्लंडला जाणार होती व त्या भेटीत ते सर्व जोशी यांच्या तेथील एका जुन्या सहकाऱ्याकडे व शेजाऱ्याकडे राहणार होते. ह्या सहकाऱ्याबरोबर सर्व जोशी कुटुंबीयांचेच एकेकाळी खूप जवळचे संबंध होते, असेही त्यांच्या बोलण्यात आले. “मी त्या सहकाऱ्यांना भेटू शकतो का?" मी विचारले. कारण योगायोगाने एका सामाजिक संस्थेच्या परिषदेसाठी मला त्यानंतर महिन्याभरातच स्वित्झर्लंडमध्ये जायचे होते. जोशींना ती कल्पना आवडली व त्यानुसार त्याच दिवशी जोशींनी आपल्या त्या एकेकाळच्या सहकाऱ्याला इमेलवरून कळवले व चरित्रलेखनासाठी मला शक्य ती माहिती देण्याची विनंती केली.
 नंतर त्यांच्याशी माझा इमेलवर संपर्क झाला व भेटीचे नक्की झाले. ते बर्न येथे राहत होते. आमचे बाझलजवळ राहणारे एक स्नेही डॉ. अविनाश जगताप हेही मी व माझी पत्नी वर्षा यांच्याबरोबर आले. आपल्या सँडोझमधील नोकरीमुळे ते स्वित्झर्लंडमध्येच स्थायिक झाले असले, तरी जगताप मूळचे पुण्याचे. बहुजनसमाजात शिक्षणप्रसाराचे मोठे काम करणारे त्यांचे वडील प्राचार्य बाबुराव जगताप एकेकाळी पुण्याचे महापौरदेखील होते. आम्ही तिघेही एकत्रच बर्नला गेलो. तिथे जोशी यांच्या त्या माजी सहकाऱ्याला भेटणे ह्या लेखनासाठी महत्त्वाचे ठरले. कारण ह्या आठ वर्षांच्या कालखंडाबद्दल त्यांनी भरपूर माहिती दिली व ती त्यांच्याइतकी खात्रीपूर्वक दुसरा कोणीच देऊ शकला नसता. त्यांचे नाव टोनी डेर होवसेपियां (Tony Der Hovesepian). सोयीसाठी म्हणून यापुढे त्यांचा उल्लेख टोनी असा करत आहे.

 गुरुवार, १२ जुलै २०१२. साधारण सकाळची नऊची वेळ.

 बर्न रेल्वेस्टेशनवरून आम्ही ट्राम पकडली व Weltpost ह्या स्टॉपवर उतरलो. ह्या जर्मन शब्दाचा अर्थ जागतिक पोस्टऑफिस. ठरल्याप्रमाणे टोनी आमची तिथे वाटच पाहत होते. पुढला सगळा प्रवास आम्ही त्यांच्याच मोटारीने केला.
 इथेच युपीयुचे प्रचंड मुख्यालय आहे. ते आम्ही आधी बघितले. युपीयुचे व पूर्वी बर्नमध्येच असलेल्या इंटरनॅशनल टेलेकम्युनिकेशन्स युनियनचे प्रतीक म्हणून स्विस सरकारने सुमारे शंभर वर्षांपूर्वी उभारलेली धातूची दोन अप्रतिम शिल्पे बघितली. ही दोन्ही शिल्पे दोन स्वतंत्र चौकांत असून आपल्या मुंबईतील हुतात्मा स्मारकाच्या साधारण चौपट आकाराची आहेत. त्यानंतर आम्ही नॉयेनेग (Neuenegg) ह्या बर्नचे उपनगर म्हणता येईल अशा छोट्या गावात गेलो. इथेच टुल्पेनवेग (Tulpenweg) या रस्त्यावर असलेल्या एका प्रशस्त व सुंदर इमारतीत जोशी आपल्या आठ वर्षांच्या वास्तव्यापैकी सुमारे सात वर्षे राहिले. टोनी यांचा फ्लॅटदेखील त्यांच्या शेजारीच होता. जोशींचा फ्लॅट क्रमांक होता 3C, तर टोनी ह्यांचा 3D तीही जागा आम्ही बघितली.
 टोनी साधारण जोशी यांच्याच वयाचे; कदाचित दोन-चार वर्षांनी लहान असू शकतील. शिडशिडीत आणि उंच. मूळचे आर्मेनिया ह्या युरोप व आशिया यांच्या सीमेवरच्या प्राचीन व पुढे सोविएत संघराज्याचा एक भाग बनलेल्या देशातले. अधिकृत धर्म म्हणून ख्रिस्ती धर्माचा स्वीकार करणारे हे जगातले पहिलेच राष्ट्र. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला, म्हणजे सुमारे शंभर वर्षांपूर्वी, तुर्की आक्रमकांनी, जवळ जवळ १५ लाख आर्मेनिअन लोकांची अत्यंत क्रूरपणे कत्तल केली. बायका-मुलांनाही त्यांनी सोडले नाही. कसाबसा जीव मुठीत धरून टोनी ह्यांचे आई-वडील लेबनॉनला पळाले. तिथेच टोनी ह्यांचा जन्म झाला. तिथून ते कुवेतला गेले व तेथील पोस्टात नोकरीला लागले. कुवेत त्यावेळी ब्रिटिश नियंत्रणाखाली होता व तेथील पोस्टखाते ब्रिटिश पोस्टखात्याशी जोडलेले होते. तिथूनच त्यांना युपीयुमध्ये १९६५ साली नोकरी लागली. शरद जोशी तिथे यायच्या आधी तीन वर्षे. दोघेही 'थर्ड सेक्रेटरी' ह्याच श्रेणीत होते. आपल्या पत्नीसह टोनी आजही त्याच घरात राहतात; जिथे सात वर्षे जोशी त्यांचे शेजारी होते. टोनी म्हणत होते,
 "आम्ही दोघेही पहिल्या-दुसऱ्या दिवसापासूनच एकमेकांना पहिल्या नावाने हाक मारू लागलो. शरद कामावर रुजू झाला तेव्हा त्याची बसायची केबिन व माझी केबिन शेजारीशेजारीच होती. मी ह्या नव्या इमारतीत फ्लॅट घेतल्याचं ऐकल्यावर त्यानेही ह्याच इमारतीत फ्लॅट घ्यायचं ठरवलं. अगदी शेजारचाच फ्लॅट. आम्ही साधारण एकाच वेळी तिथे शिफ्ट झालो.
 "शरद अतिशय हुशार व कर्तबगार होता. सुमार बुद्धिमत्तेची माणसं त्याला आवडत नाहीत असा साधारण समज ऑफिसात रूढ होता. शिष्ट म्हणूनच त्याची ख्याती होती. याचं कारण थोड्या दिवसांतच मला समजलं. युपीयुमधले अनेक कर्मचारी निम्नस्तरीय श्रेणीतून चढत चढत वर आले होते तर, शरद मात्र इंडिअन पोस्टल सर्विस ह्या उच्च श्रेणीतच प्रथमपासून राहिला होता. साहजिकच तो इतर सहकाऱ्यांच्या तुलनेत उठून दिसे. पण सुदैवाने आमचे राहायचे फ्लॅट शेजारी शेजारी व कामावर बसायची जागाही शेजारी म्हटल्यावर साहजिकच आमच्यात चांगली मैत्री झाली. आमचं घर ऑफिसपासून मोटारने जेमतेम पंधरा मिनिटांच्या अंतरावर होतं. ऑफिसात जाता-येताना व दुपारी जेवायला जाता-येताना आम्ही एकत्र जात अस. कधी त्याच्या मोटारीने तर कधी माझ्या मोटारीने.
 "शरद जॉईन झाला त्याच वर्षी आमच्या ऑफिसात एक स्टाफ असोसिएशन सुरू झाली. मी तिचा एक कमिटी मेंबर होतो. बरेच उपक्रम आम्ही राबवत असू. त्या कमिटीत यायची शरदची फार इच्छा होती. पुढल्या वर्षी कमिटीच्या निवडणुकीला तो व मी असे दोन उमेदवार उभे होतो. पडणाऱ्या मतांनुसार पॉइंट्स मोजले जात. एकूण शंभर पॉइंट्स असत. गंमत म्हणजे दोघांनाही सारखी मतं पडली. नियमानुसार पुन्हा एकदा मतदान घेतलं गेलं. त्यावेळी त्याला ५१ व मला ४९ पॉइंट्स मिळाले; कारण माझं स्वतःचं मत मी त्याला दिलं होतं!
 "ऑफिसात आम्ही ब्रेकमध्ये टेबल टेनिस खेळायचो. मला हा गेम खूप आवडायचा व चांगला यायचाही. १९७४च्या सुरुवातीला लोझान येथे युनिव्हर्सल पोस्टल काँग्रेस भरली होती. तिला मोठं चायनीज डेलेगेशन आलं होतं. प्रथमच. त्यांच्यात व आमच्या आयबी खात्यात शरदने एक टेबल टेनिस स्पर्धा आयोजित केली होती. आम्ही ती जिंकावी अशी त्याची फार इच्छा होती. किसिंजरच्या चायनाभेटीतील पिंगपाँग डिप्लोमसीमुळे त्यावेळी टेबल टेनिस खूप लोकप्रिय झालं होतं. आम्ही स्वतःला चांगलं खेळणारे समजत होतो व आम्ही बऱ्यापैकी प्रॅक्टिसही केली होती, पण चायनीज प्रतिनिधींपुढे आमचा अगदी धुव्वा उडाला! शरद खट्ट झाला होता; त्याला हरणं आवडत नसे."  जोशींचे कौटुंबिक जीवन कसे होते, हे विचारल्यावर टोनी सांगू लागले,
 "माझी पत्नी थेरेसा व लीला चांगल्या मैत्रिणी झाल्या. थेरेसा ४८ सालची, म्हणजे दोघींचं वयही साधारण सारखं होतं. थेरेसा एका लहान मुलांच्या शाळेत शिकवायची व पुढे तिने स्वतःच एक शाळा सुरू केला. आजही ती तेच काम करते. मुख्यतः वेगवेगळ्य कॉन्स्युलेट्समध्ये काम करणाऱ्यांची मुलं तिथे येतात. लीला मात्र घरीच असे. दोन मुलींना सांभाळणं हेच तिचं पूर्णवेळचं काम होतं. कधी कधी तिला घरी बसून कंटाळा यायचा हे खरं आहे, पण संस्थेच्या नियमानुसार तिला कुठल्याही प्रकारची नोकरी वा व्यवसाय करण्याची परवानगी नव्हती. माझी पूर्वीची नोकरी ब्रिटिश पोस्टखात्यातली होती व मी मूळचा आर्मेनियाचा; ह्या देशात अधिकृत निर्वासित मानला गेलेला. त्यामुळे आम्हाला स्विस नागरिकत्व लगेचच मिळून गेलं व साहजिकच थेरेसाला अर्थार्जन करायची मुभा मिळाली होती. शरदचं नागरिकत्व मात्र भारतीयच होतं. अर्थात युएन संस्थांमध्ये पगार उत्तम मिळायचे; इतर स्विस कंपन्यांपेक्षा व सरकारपेक्षा आमचा पगार निदान ३० टक्के अधिक होता. शिवाय इतरही फायदे खप मिळत. त्यामळे एकाच्याच पगारात घर चालवणं कठीण नव्हतं.
 "जोशींना दोन मुली होत्या, तर आम्हाला लौकरच आमचा पहिला मुलगा झाला. एप्रिल ६९मध्ये झालेला पॅट्रिक, पुढे जोशींच्या दोन मुली व आमचा मुलगा अशी तिघं एकत्र खेळू लागली, एकत्र शाळेत जाऊ लागली. सगळ्यांची शाळा एकच – तेथील इंटरनॅशनल स्कूल. त्यांना शाळेत सोडायचं कामदेखील आम्ही वाटून घ्यायचो; कधी आम्ही तर कधी ते सोडायचे. फिरायला, नाटक-सिनेमा बघायला आम्ही एकत्रच जायचो.
 "शरद ऑफिसात खूप गंभीर व अबोल असे, पण लहान मुलांशी खेळताना तो अगदी लहान होऊन जाई. ऑक्टोबर ७०मधला एक प्रसंग मला आठवतो. आमचे डायरेक्टर जनरल त्यावेळी एक इजिप्शिअन गृहस्थ होते. त्यांनी एकदा मला व थेरेसाला त्यांच्या घरी जेवायला बोलावलं होतं. शरद व लीलाला मात्र आमंत्रण नव्हतं. कदाचित मी आर्मेनियन असल्याने, म्हणजे त्यांच्या एकेकाळच्या शेजारी देशातील असल्याने, मला इजिप्शिअन जेवण आवडेल असं त्यांना वाटलं असावं. तेव्हा आमचा पॅट्रिक दीड वर्षांचा होता. डिनरपार्टीला त्याला कुठे नेणार, म्हणून आम्ही त्याला जोशींच्या घरी ठेवायचं ठरवलं. अर्थात त्यांच्या संमतीने. आधी तो खूप रडत होता, त्यामुळे जावं की जाऊ नये अशा संभ्रमात थेरेसा होती. पण शरद व लीला 'अगदी खुशाल जा' असं दोन-तीनदा म्हणाल्यामुळे आम्ही त्याला त्यांच्या घरी ठेवून गेलो. तो राहील की नाही ह्याविषयी आम्हाला खूप धास्ती होती; त्याला असं सोडून जायची ही पहिलीच वेळ. रात्री उशिरा घरी परतलो व काहीशा धाकधुकीतच शेजारच्या फ्लॅटची बेल वाजवली. आधी वाटलं होतं, पॅट्रिक झोपला असेल, मग वाटलं तो रडून रडून बेजार झाला असेल आणि शरद-लीलालादेखील त्याने खूप त्रास दिला असेल. पण प्रत्यक्षात लीलाने दार उघडलं, तेव्हा पॅट्रिक चक्क जागा होता व शरद त्याच्याशी अगदी मजेत, हसत हसत खेळत होता. खूप रात्र झाली होती तरी दोघं खेळण्यात इतके दंग झाले होते, पॅट्रिकला त्याने इतका लळा लावला होता, की नंतर आमच्या फ्लॅटमध्ये त्याला परत नेताना तो रडू लागला! शरदचं एक वेगळंच रूप त्या दिवशी मला दिसलं!
 "खूप मजेत गेली ती वर्षं. आमच्या इमारतीतली इतरही बहुतेक सर्व कुटुंबं युएनबरोबरच काम करणारी होती. बऱ्यापैकी समवयस्क होती. आमची छान गट्टी जमली. संध्याकाळी तळमजल्यावरच्या पार्किंग लॉटवर आम्ही एक बॅडमिंटन कोर्ट तयार केलं होतं. टेबलटेनिसचीपण सोय होती. जवळ जवळ रोजच संध्याकाळी जेवल्यानंतर सगळे एकत्र खेळायचो. तिथेच एका कोपऱ्यात बार्बेक्यू होता व दुसऱ्या कोपऱ्यात बार. शरद स्वतः बहुतांशी शाकाहारी होता, पण लीला व मुली मात्र सगळं खात. शरदला ड्रिंक घेणं आवडायचं. खूपदा आम्ही एकत्र जेवायला जायचो, पण त्याला ड्रिंक चढलं आहे असं मात्र इतक्या वर्षांत मी कधीही पाहिलं नाही. तसं त्याचं वागणं अगदी संयमी होतं. पाश्चात्त्य रीतीरिवाज, खाणंपिणं, कपडे हे सारं इथे आल्यावर अगदी थोड्याच दिवसांत जोशी कुटुंबीयांच्या पूर्ण अंगवळणी पडलं होतं. ते सारे उत्तम फ्रेंच बोलत. आमच्या घरापासून जवळच प्रसिद्ध गानटू (Gantu) डोंगराची सुरुवात होती. बहुतेक रविवारी आम्ही डोंगरावर जायचो. स्कीइंग आणि डोंगर चढणं हे आमचे जणू राष्ट्रीय खेळच आहेत. पुढे शरदलाही डोंगरांमधून मनसोक्त भटकणं आवडू लागलं. बाहेर खूप थंडी व पाऊस असेल तर मात्र घरात राहावं लागे.
 "अशावेळी शरदला बुद्धिबळ खेळायला आवडायचं. अर्थात मला स्वतःला बुद्धिबळ फारसं येत नसे. त्यामळे प्रत्येक वेळी तोच जिंकायचा. एकदा दपारी मी त्यांच्या घरी गेलो असताना समोर टेबलावर ठेवलेलं How to play Chess नावाचं एक पुस्तक मला दिसलं. सहज म्हणून मी ते वाचायला लागलो. आवडलं म्हणून घरी घेऊन गेलो व पूर्ण वाचून काढलं. योगायोग म्हणजे त्या रात्री आम्ही बुद्धिबळ खेळायला बसल्यावर सगळे डाव तो हरला! हे मोठंच आश्चर्य होतं. 'टोनीने तुला चेकमेट करणं म्हणजे अगदी नवलच आहे! असं कसं झालं?' लीलाने विचारलं. 'कारण तो माझ्यापेक्षा चांगला खेळला म्हणून' एवढंच त्यावर शरद म्हणाला, मला स्वतःलाही मी कसा जिंकू शकलो ह्याचं नवल वाटलं. कदाचित त्या पुस्तकाचा तो परिणाम असेल! पण त्यानंतर एक गोष्ट घडली, जिचं स्पष्टीकरण मी आजही देऊ शकणार नाही. ती म्हणजे त्या रात्रीनंतर शरदने माझ्याशी बुद्धिबळ खेळणं पूर्ण बंद केलं. दोन-तीनदा 'चल, एक डाव टाकू' असं मी सुचवलं, पण त्याने स्पष्ट नकार दिला. न खेळण्याचं कारणही त्याने काहीच सांगितलं नाही."
   आपले ऑफिसमधील काम सुरुवातीला जोशी यांना खूप आवडत होते. अर्थात त्यात प्रत्यक्ष कामापेक्षा ऑफिसातील अत्याधुनिक सुखसोयी, आंतरराष्ट्रीय वातावरण, कार्यसंस्कृती ह्यांचा वाटा अधिक होता. कामात कसलाही ताण नसे. शनिवार-रविवार सुट्टी असे. त्यामुळे वाचनासाठी भरपूर वेळ उपलब्ध असे. युपीयुचे सुसज्ज ग्रंथालय होते व शिवाय स्वतःच्या कामाला उपयुक्त अशी पुस्तके विकत घेण्याची अधिकाऱ्यांना मुभा होती. कामाच्या निमित्ताने जिनिव्हाला सारखे जावे लागे. तिथे पुस्तकांची मोठी मोठी दुकाने होती. जिनिव्हातले अधिकृत काम आटोपले, की तासन्तास या दुकानांत जोशी रमत. “किंमत किती आहे ह्याचा जराही विचार न करता पुस्तकं विकत घेण्यातला आनंद मी तिथे भरपूर उपभोगला. प्रचंड वाचन केलं," ते एकदा सांगत होते.

  "इतकी वर्षं तुम्ही दोघांनी एकत्र काम केलं; ह्या कालावधीतील ऑफिसमधल्या काही आठवणी तुम्ही सांगू शकाल का?" ह्या प्रश्नाला उत्तर देताना टोनी म्हणाले,
 "आठवायला लागलं तर अशा बऱ्याच आठवणी आहेत. आपल्या कामात शरद खूप हुशार होता. एका परिषदेतील त्याच्या सादरीकरणाने प्रभावित होऊन युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅम (UNDP) ह्या एजन्सीने ती युपीयुच्या टेक्निकल असिस्टन्स प्रोग्रॅमला देत असलेल्या निधीत लगेचच मोठी वाढ केली होती. अनेकांनी शरदची त्यावेळी स्तुती केली, पण तेवढ्यापुरतीच; नंतर सगळे त्याला विसरून गेले! त्याला अपेक्षित होती ती नोकरीतली बढती काही शरदला मिळत नव्हती. एकूणच आपल्याला आपल्या कामाचं उचित श्रेय कधी मिळत नाही असं त्याला नेहमीच वाटत असे व हा त्याच्या कमनशिबाचाच एक भाग आहे असं तो म्हणायचा. मला आठवतं, एकदा एका खात्यात चांगली सिस्टिम लावून देण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली. तिथून त्याची लौकरच दुसऱ्या खात्यात बदली होणार होती हे त्याला ठाऊक होतं, पण तरीसुद्धा त्याने हे परिश्रम घेतले होते. मी त्याला विचारलं, 'तू तर आता इथून जाणार. मग ह्या सगळ्याचा तुला काय फायदा होणार? कशासाठी हे श्रम घेतलेस तू?' त्याचं उत्तर माझ्या आजही लक्षात आहे. तो म्हणाला होता, 'आपण लावलेल्या झाडाची फळं आपल्याला खायला मिळणं हे प्रत्येकाच्या नशिबात नसतं.'
 “मग त्याने मला येशू ख्रिस्ताच्या चौथ्या शिष्याची एक गोष्ट सांगितली होती. ती साधारण अशी होती. बेथलेहेममध्ये ज्या दिवशी ख्रिस्तजन्म झाला त्या दिवशी आकाशात एक खूप तेजस्वी तारा दिसला होता – ज्याचं प्रतीक म्हणून आम्ही ताऱ्याचा आकार असलेले कंदील नाताळच्या दिवशी लावतो. त्यावेळी असे तीन संत होते, ज्यांना तो तारा बघून कळलं, की येशूचा, देवाच्या मुलाचा जन्म होतो आहे व ते तिघे जण येशूचं स्वागत करायला बेथलेहेमकडे निघाले. यथावकाश ते तिथे पोहोचले व त्यांनी लहानग्या येशूचं कोडकौतुक केलं. तीन संतांची ही कथा प्रसिद्ध आहे, पण दुसरा एक भाग त्यात आलेला नाही. तो म्हणजे सामिरतान (समॅरिटन) नावाच्या तशाच एका चौथ्या संताची कथा. पुढे कुठल्यातरी एका इंग्रजी लेखकाने ती लिहिली होती व शरदच्या वाचनात आली होती म्हणे. हा संतदेखील तो तारा पाहन इतर तीन संतांच्या आधीच युरोपातून मध्यपूर्वेत बेथलेहेमला यायला निघाला होता; पण वाटेतल्या एका जंगलात काही लुटारूंनी त्याला पकडलं. त्याचं सगळं सामान लुटलं; अगदी त्याचे कपडेसुद्धा काढून घेतले आणि समुद्रकिनाऱ्यावर एका गुलामांचा व्यापार करणाऱ्याला विकलं. ख्रिस्ताचा पहिला संत बनण्यासाठी जो निघाला होता, तो अशाप्रकारे गुलाम बनला. त्या व्यापाऱ्याने सामिरतानला बोटीत भरलं व आफ्रिकेला नेऊन गुलाम म्हणून विकलं. गुलामगिरीच्या नरकयातना सोसत, चाबकाचे फटके खातखात त्याने अनेक वर्ष कशीबशी काढली. एक दिवस अचानक कशीतरी संधी मिळाली व तो मालकाच्या घरून पळाला. मनात ख्रिस्ताची भक्ती होतीच. पुन्हा त्याने बेथलेहेमची वाट पकडली. ख्रिस्तजन्माच्या वेळी आपण बेथलेहेमला पोचू शकलो नाही, पण आतातरी आपण तिथे जाऊ व त्याचं दर्शन घेऊ, ह्या आशेवर. शेवटी एकदाचा तो बेथलेहेमला पोचला. पण नेमक्या त्याच दिवशी ख्रिस्ताला सुळावर चढवण्यात आलं होतं. ख्रिस्ताचा पहिला शिष्य बनण्याऐवजी सुळी दिलेल्या ख्रिस्ताला सुळावरून उतरवण्याचं काम त्याच्या नशिबी आलं! 'मी ख्रिस्ताच्या त्या चौथ्या शिष्याप्रमाणे आहे, माझ्या कष्टांचं फळ मला कधीच मिळणार नाही आणि लहानपणापासूनच मी हे ओळखून आहे,' असं शरद तेव्हा म्हणाला होता."
 श्रेयविहीनतेची ही जाणीव जोशींच्या भावी आयुष्यातही पुनःपुन्हा डोकावते.

 शरद जोशी यांनी नंतर केलेल्या लेखनात स्वित्झर्लंडबद्दल तुरळक असे काही उल्लेख आहेत. एकूणच तो देश इतका समृद्ध आणि विशेष म्हणजे सुशासित असा आहे, की अडचणी अशा फारशा काहीच येत नाहीत; क्वचित कधी एखादी अडचण आली, तर किती तत्परतेने शासन आपत्तिनियोजन करते हे सांगताना जोशी लिहितात :

एकदा स्वित्झर्लंडमध्ये भर उन्हाळ्यात तीन आठवडे (या मोसमात एरव्ही तिथे पडणारा) पाऊस पडला नाही. लगेच सगळ्या माध्यमांतून धोक्याच्या सूचना खणखणू लागल्या – 'जंगलाजंगलातील गवत सुकेसुके, कोरडे झाले आहे; आगीचा धोका आहे. सिगारेटचे थोटूक प्रवासात इकडेतिकडे टाकू नका. एकदा आल्प्समधील एक शिखर सर करण्यासाठी आठ लोकांची टोळी गेली होती. बर्फाच्या वर्षावामुळे ती अडकून पडली. त्यांना सोडविण्यासाठी अवघ्या तासाभरात helicopters अपघातस्थळी जाऊन पोचली. अडकलेल्या गिर्यारोहकांच्या सुटकेचा तो सारा प्रचंड खटाटोप घरोघर लोकांनी टेलेव्हिजनवर प्रत्यक्ष पाहिला. असेच एकदा लष्करी सुरुंग पेरण्याच्या प्रदेशात एकदा एक छोटेसे कुत्र्याचे पिल्लू चुकून शिरले, तर त्याच्या सुटकेच्या प्रयत्नांवर सगळ्या देशाचे लक्ष वेधले गेले.

(शेतकरी संघटक, २१ ऑक्टोबर १९९३)

 तेथील सरकार किती संवेदनशील व तत्पर आहे हे ह्यातून जाणवते.
 ह्याच लेखात पुढे जोशी यांनी केलेले एका भेटीचे वर्णन वाचनीय आहे. बर्न शहरातील एका नागरी सुरक्षेच्या केंद्रास त्यांनी दिलेली ही भेट होती. सर्वसामान्य प्रवासी अशा गोष्टी सहसा कधी बघू शकणार नाही; पण युनायटेड नेशन्समध्ये काम करताना ज्या सवलती मिळतात, त्याचा बहुधा हा फायदा होता.
 कधीकाळी कोणा शत्रूचे आक्रमण झालेच, तर त्याला रोखण्यासाठी अनेक मार्ग सरकारने तयार ठेवले होते. त्यांतला एक महामार्गांचे पट्टेच्या पट्टे बाजूला काढण्याचा व शत्रूची वाहतकच अशक्य करून सोडायचा होता. महामार्गांचा वापर लष्करी विमानांसाठी धावपट्टीसारखा करण्याचीही एक आपत्कालीन योजना होती. हे सारे ठाऊक असूनही त्या दिवशी जे पाहिले, त्यावर त्यांचा विश्वासही बसेना. बर्नच्या एक लाख लोकवस्तीसाठी हजारो लोकांना पुरेसा असा अवाढव्य सुरक्षा निवारा जमिनीखाली १०० मीटर इतक्या खोलीवर एका प्रचंड बोगद्यात केला होता. एखादा अणुबॉम्ब ह्या बोगद्याच्या डोक्यावरच पडला तर गोष्ट वेगळी; अन्यथा हे आश्रयस्थान अगदी पक्के सुरक्षित राहिले असते. जमिनीच्या इतक्या खोलवरही हवा खेळती राहण्याची व्यवस्था होती. लोकांकरिता झोपण्याची व्यवस्था होती. कोणत्याही संकटकाळी जेमतेम तासाभराच्या सूचनेवरून ही सारी यंत्रणा मदतीसाठी उपलब्ध होऊ शकत होती. मोठे सुसज्ज हॉस्पिटल कायम चकचकीत अवस्थेत तयार असते. कोठे संकट आले, तर सगळी तयारी सुसज्जपणे वाट पाहते आहे.

 इथे लीला जोशी यांनी लिहिलेल्या एका विस्तृत लेखातील थोडा भाग उद्धृत करावासा वाटतो. स्वित्झर्लंडबद्दलची काही मार्मिक निरीक्षणे त्यांनी नोंदलेली आहेत. त्यांनी लिहिलेला व प्रकाशित झालेला हा एकमेव लेख आहे. आधी तो अंबाजोगाई येथून श्रीरंगनाना मोरे प्रसिद्ध करत असलेल्या 'भूमिसेवक' ह्या पाक्षिकात प्रसिद्ध झाला. पुढे तो अलिबागहून अरविंद वामन कुळकर्णी प्रसिद्ध करत असलेल्या 'राष्ट्रतेज' ह्या साप्ताहिकात पुनर्मुद्रित केला गेला. आणि त्यानंतर तो 'शेतकरी संघटक'च्या २१ ऑक्टोबर १९८३च्या अंकात पुनर्मुद्रित केला गेला. लीलाताईंच्या प्रथम स्मृतिदिनी त्यांना श्रद्धांजली म्हणून. पण 'वारकरी' ह्या शेतकरी संघटनेच्या पहिल्या मुखपत्रात मात्र तो प्रकाशित झाला नव्हता; तसेच कुठल्या पुस्तकातही तो समाविष्ट झालेला नाही व त्यामुळे फारशा वाचकांपर्यंत पोचला नसावा. लेखात त्या लिहितात :

 ह्या देशाने जी सधनता प्राप्त करून घेतली त्यामागचे कारण काय? आम्ही स्वित्झर्लंडमध्ये असताना भारतातले एक उद्योगपती आमच्याकडे आले होते. भारतातील उच्चमध्यमवर्गीयाइतके असलेले तेथील सामान्य कामगारांचे राहणीमान पाहून ते म्हणाले – 'त्यांच्याकडे पैसा आहे ना, म्हणून ते एवढं वेतन देऊ शकतात.' हे अनुमान साफ चूक! त्यांनी पैसा निर्माण केला. साठ वर्षांपूर्वी शेतीप्रधान, पस्तीस वर्षांपूर्वीपर्यंत ग्रामोद्योग व शेती आणि आज एक औद्योगिक राष्ट्र अशी ह्या देशाची वाटचाल आहे.

 त्यांना स्वतःला स्वित्झर्लंडमध्ये गेल्यावर सर्वांत पहिली गोष्ट जाणवली, ती म्हणजे तेथील 'अन्नक्रांती'. सुपरमार्केटमध्ये खाण्यापिण्याच्या पदार्थांची लयलूट होती. नुसता दुग्धजन्य पदार्थांचा विभाग बघितला तरी माणूस थक्क होऊन जाई. असंख्य प्रकारचे चीज. विविध कंपन्यांचे, विविध स्वादांचे, चवींचे दही. चक्का, लोणी व त्यांपासून केलेले असंख्य पदार्थ. विशेष म्हणजे खाण्यापिण्याच्या बाबतीत कुठली असमानता नाही; तुम्ही गरीब असा वा श्रीमंत, सर्व लोक सर्व खाद्यपदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेऊ शकतात. असमानता चालू होते ती स्थावर व जंगम मालमत्ता आणि तशा बाबतीत. औद्योगिक मालाकडे पाहिले तरी तेच. कपडे, खेळणी यांपासून ते टीव्ही, फ्रीज, मोटार ह्या सर्व वस्तू सर्वांच्या आवाक्यात येतात; अशा बाबतीत आपल्यासारखी कमालीची विषमता तिथे नाही. अगदी सामान्य शेतकऱ्यालाही या सर्व गोष्टी परवडतात.
 हे कशामुळे घडते याचा त्यांनी अभ्यास केला तेव्हा त्यांच्या लक्षात आले, की याचे कारण म्हणजे शेतकऱ्याला शेतीमालाच्या विक्रीतून चांगले पैसे मिळतात व त्यामुळे तो विकून औद्योगिक माल विकत घेणे त्याला परवडते. पुढे त्यांनी शेतीमाल व औद्योगिक माल यांच्या दोन्ही देशांतील किमतींचा तुलनात्मक आढावा घेतला आहे.
 उदाहरणार्थ, तिथे एक लिटर दुधाची किंमत १ फ्रँक तर एका रेफ्रिजरेटरची किंमत ५०० फ्रँक आहे; याउलट भारतात मात्र एक लिटर दुधाची किंमत २ रुपये तर एका रेफ्रिजरेटरची किंमत मात्र तब्बल ५००० रुपये आहे. ह्याचाच अर्थ, एक रेफ्रिजरेटर विकत घेण्यासाठी स्वित्झर्लंडमध्ये ५०० लिटर दूध विकावे लागते, तर त्यासाठी भारतात मात्र त्यासाठी २५०० लिटर दूध विकावे लागते. याचाच अर्थ भारतात एक रेफ्रिजरेटर विकत घेण्यासाठी स्वित्झर्लंडपेक्षा पाचपट शेतमाल विकावा लागतो. अशीच तुलना पुढे लेखात टीव्ही, मोटार ह्या गोष्टी विकत घेण्यासाठी स्वित्झर्लंडमध्ये व भारतात किती गहू वा तांदूळ विकावा लागेल ह्याबाबत केली आहे.
 शेतीमालाला उत्तम किंमत मिळत असल्यानेच स्विस शेतकरी भारतीय शेतकऱ्यापेक्षा खूप अधिक सहजगत्या औद्योगिक माल घेऊ शकतो हे त्यावरून स्पष्ट होत होते.
 स्वित्झर्लंडचा जास्तीत जास्त भू-प्रदेश शेतीखाली आणायचा म्हटला, तरी केवळ तीन पंचमांश लोकसंख्येला तो स्वतः अन्नधान्य पुरवू शकतो. उरलेले धान्य, तसेच मांस, मासे,अंडी त्यांना आयात करावी लागतात. मुक्त अर्थव्यवस्थेमुळे स्थानिक शेतकऱ्यांना परदेशातील स्वस्त खाद्यपदार्थांशी प्रचंड सामना करावा लागतो. त्याचवेळी डोंगरावरची शेती, लहान जमीनधारणा व छोटे गोठे यांमुळे स्वीस शेतीमालाचा उत्पादनखर्च मात्र जास्त असतो. यावर तेथे तोडगा कसा काढला याविषयी पुढे लीला जोशी यांनी लिहिले आहे,

औद्योगिक प्रसारामुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी व लढाईच्या वेळेस काही अंशाने तरी खाद्यपदार्थांच्या बाबतीत स्वयंपूर्णता असावी म्हणून शेती जगवलीच पाहिजे व शेतीखालील क्षेत्र कमी होता कामा नये असे स्वीस सरकारचे धोरण आहे. त्यामुळे १९३० सालापासूनच स्वीस सरकारने शेतकऱ्यांचा माल उत्पादनखर्चावर आधारित उत्तम किमती देऊन विकत घेण्याचा निर्णय घेतला व तो माल बाजारात आयात केलेल्या खाद्यपदार्थांच्या स्पर्धेत तोंड देईल एवढ्या कमी किमतीत ते विकू लागले. याचे पुढील २५ वर्षांत खालीलप्रमाणे फायदे झाले :

  1. मिळालेल्या नफ्यातून प्रत्येक शेतकऱ्याने शेतीचे यांत्रिकीकरण केले.
  2. भाज्या, फळे व धान्य शक्यतो प्रक्रिया करून व हवाबंद डब्यांतच विकण्यासाठी पाठवले जाऊ लागले.
  3. प्रक्रियायुक्त खाद्यपदार्थांच्या ग्रामोद्योगाचे एक प्रचंड जाळे तयार झाले.

अशा उपायांतून काही वर्षांतच स्विस शेतकरी स्वयंपूर्ण झाले व त्यामुळे गेल्या दोन पिढ्या सरकारी खरेदीची आवश्यकता तेथे राहिलेली नाही. तरीसुद्धा शेतकऱ्यांच्या हिताकडे सरकार डोळ्यांत तेल घालून पाहत असते. भाव खूप पडले व शेतकऱ्याचे नुकसान होईल असे वाटले, तर पुन्हा बाजारात उतरून स्वतः मालाची खरेदी करायचे व मागणी वाढवून भावही वाढवायचे सरकारचे धोरण कायम आहे.

 स्वित्झर्लंडमध्ये असताना तेथील एका मोठ्या सहकारी संस्थेचे जोशी सदस्य बनले होते. त्या निमित्ताने तेथील सहकारी संस्था कशा काम करतात हे त्यांना नीट बघता आले. त्या संस्थेची किरकोळ विक्री करणाऱ्या शेकडो दुकानांची साखळी होती. शेतकऱ्याकडून थेट माल विकत घ्यायचा व ग्राहकाला या साखळीमार्फत विकायचा. अशा अनेक संस्था तिथे आहेत. यांतून शेतकऱ्याचीही सोय व्हायची व ग्राहकाचीही. शिवाय त्या सहकारी संस्थेलाही नफा व्हायचा व एक भागधारक या नात्याने लाभांशाच्या स्वरूपात तो जोशींनाही मिळायचा. अनेक वर्षांनी भारतात आल्यावर 'शिवार अॅग्रो' नावाने अशीच एक साखळी उभारायचा जोशींनी प्रयत्न केला होता; पण तो यशस्वी झाला नाही. त्याबद्दल पंधराव्या प्रकरणात येणारच आहे.

 चाकण परिसरात जेव्हा जोशींनी स्वतःच्या शेतीला प्रारंभ केला, तेव्हा त्यांच्या लक्षात आले, की तिथे भुईमुगाचे पीक भरपूर यायचे; पण त्याला भाव मात्र अगदी कमी मिळायचा. भुईमुगाचा दर्जाही खूप कमी होता व तो सुधारण्याचा फारसा प्रयत्नही कोणी करत नव्हते. जे काही पीक निघेल, ते तेथील तेलाच्या घाणी अगदी स्वस्त दरात विकत घेत व त्याचे तेल काढून ते भरपूर भावाने विकून स्वतः गब्बर होत. उरणारी पेंडदेखील चांगल्या किमतीला जाई. त्याऐवजी शेतकऱ्यांनी शेंगदाण्यापासून स्वतःच तेल काढले किंवा लोणी, खारवलेले दाणे, तळलेले दाणे वा इतर स्नॅक फूड तयार केले, तर त्यात खूप फायदा होता. पण तसा प्रक्रियाउद्योग त्या परिसरात उभारणे बरीच पाहणी करूनही जोशींना जमण्यातले दिसेना.
 दुसरा पर्याय होता, निर्यातीचा. परदेशातही शेंगदाण्याला भरपूर मागणी होती हे जोशींना ठाऊक होते. स्विस मार्केटमध्ये जोशींनी आपल्या ओळखीत एके ठिकाणी चौकशी केली. हा माणूस मदत मागत नाहीये, तर व्यापाराबद्दल बोलतो आहे, हे लक्षात आल्यावर त्यांनीही मनापासून बोलणी करून सहकार्य दिले. त्यांची वार्षिक मागणी तब्बल तीनशे टनांची होती! पण त्यात एक अडचण होती; जगभरच्या भुईमुगाच्या शेतीचा त्यांनी अभ्यास केला होता व चाकण परिसरात होणाऱ्या शेंगदाण्यात अफ्लाटॉक्सिन (Aflatoxin) नावाचा एक विषारी पदार्थ खूप असतो हे त्यांच्या लक्षात आले होते.
 खरे तर, हे अफ्लाटॉक्सिन सर्वच शेंगदाण्यांत असते; ज्याला आपण खवटपणा म्हणतो, तो ह्याच अफ्लाटॉक्सिनमुळे येतो. पण भारतातील त्याचे प्रमाण आंतरराष्ट्रीय मानकापेक्षा पाच ते दहा पट अधिक असते. या विषामुळे यकृताचा व पोटाचा कॅन्सर होतो असे सिद्ध झाले आहे. आपल्या शरीराला कदाचित अशा जंतूंची व विषाची सवय झाली असल्याने आपल्या देशात आपण असल्या बाबींचा फारसा विचार करत नाही, पण तेथे शुद्धतेचे निकष खूप काटेकोरपणे पाळले जातात. म्हणूनच त्यांनी इस्राएल व दक्षिण आफ्रिकेतून हे शेंगदाणे मागवायला सुरुवात केली होती. “पण तुम्ही जर हे (अफ्लाटॉक्सिनचे) प्रमाण आंतरराष्ट्रीय मानकाएवढे कमी केलेत, तर आम्ही तुमच्याकडूनही माल घ्यायचा विचार करू," असे आश्वासन त्यांनी दिले.
 हे प्रमाण कमी करता येईल का, याविषयी जोशींनी खूप शेतकऱ्यांशी व तज्ज्ञांशी चर्चा केली; पण ते जमेना. शेतकऱ्यांनाही पारंपारिक पद्धतीने पीक काढणे व येईल त्या भावात तेलाच्या घाणींना विकून टाकणे, याचीच सवय झाली होती. आपण पिकाची गुणवत्ता सुधारली तर आपले उत्पन्न खूप वाढू शकेल, हा जोशींचा मुद्दा काही स्थानिक मंडळींना फारसा पटला नाही; किंवा पेलला नाही असे म्हणू या. हे अफ्लाटॉक्सिनचे प्रमाण आंतरराष्ट्रीय मानकापेक्षाही खूप कमी असलेल्या भुईमुगाचे बियाणे तयार करण्यात पुढे बऱ्याच वर्षांनी, दोन हजार सालानंतर, कच्छमधील भूज जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यश आले. असो.

 अशा समृद्ध देशात राहत असतानाही भारतात परतायचे की परदेशातच कायम राहायचे ह्याविषयी जोशीची मन:स्थिती सारखी दोलायमान होत असे. सुरुवातीचे वर्षभर ते तिथे रमले तरी केव्हातरी भारतात परत जावे हा विचारही त्यांच्या मनाच्या एका कोपऱ्यात कुठेतरी असायचाच. १९७०मध्ये त्यांचे वडील वारले. त्यावेळी तीन महिन्यांची रजा काढून ते भारतात सहकुटुंब आले होते. भारतात परत जाण्याच्या दृष्टीने थोडी चाचपणी करायचाही त्यांचा उद्देश होता. त्या अनुभवाबद्दल जोशींनी लिहिले आहे. प्रत्यक्ष भेटीतही ते त्याबद्दल बोलले होते. ते म्हणाले,
 "आधी आम्ही साहजिकच पुण्याला गेलो. कारण वडील सेवानिवत्त झाल्यानंतर पुण्यातच सेटल झाले होते आणि तिथेच वारले होते. वडलांचे सगळे दिवसवार वगैरे उरकल्यावर आम्ही प्रवासाला बाहेर पडलो. मुलींना जरा भारत दाखवावा व त्यातून भारताबद्दल त्यांचं चांगलं मत व्हावं, अशी आमची इच्छा होती. कारण कधीतरी भारतात परतायचं अशीच त्यावेळी आमची कल्पना होती. पण मुलींना भारत अजिबात आवडला नाही. दिल्ली, सिमला, आग्रा असा दौरा आम्ही आखला होता. ओळखीच्या एका लष्करी अधिकाऱ्यामळे राहायची उत्तम सोयदेखील करून ठेवली होती. दिल्लीहन सिमल्याला जाताना आम्ही खास डिलक्स बस घेतली होती. पण वाटेत जोराचा पाऊस सुरू झाला व त्या बसचं छत गळू लागलं. वरून अगदी धो धो पाणी पडू लागलं. थेट अंगावर. आम्ही सगळे भिजून चिंब झालो. थंडी जोराची. अगदी काकडून गेलो. चंडीगढची तेव्हा खूप चर्चा होती. नवी वसवलेली राजधानी. तीही कोर्बुसिए ह्या प्रख्यात फ्रेंच-स्विस आर्किटेक्टने. चंडीगढ मुलींना आवडेल अशी आमची कल्पना. पण प्रत्यक्षात त्यांना ते अजिबात आवडलं नाही. एक-दोनदा तेथील बसस्टॉपवरचं टॉयलेट वापरायचा प्रसंग आला. ते इतकं गलिच्छ होतं, की काही बोलून सोय नाही. ते स्वच्छतागृह मुलींनी पाहिलं आणि त्यांचा जीव घाबरा झाल्याचं मला जाणवलं. शक्य असतं, तर त्याच दिवशी विमान पकडून त्या परत बर्नला गेल्या असत्या."

 १९७० साली त्या दौऱ्यावर असताना स्वित्झर्लंडची व भारताची जोशी यांच्या मनात सतत तुलना होत असे, कुटुंबीयांशीदेखील सतत ह्या विषयावर चर्चा होत असे. भारतात परतावे हे जोशींच्या मनात अधिक असे, पत्नी व मुलींचा मात्र त्याला प्रथमपासूनच कडवा विरोध होता. शेवटी सहकुटंब जेव्हा ते बर्नला परतले, तेव्हा यापुढे स्वित्झर्लंडमध्येच राहायचा निर्णय त्यांनी काहीशा नाइलाजाने घेतला.
 बघता बघता आणखी दोन वर्षे गेली. मुली तेथील फ्रेंच शाळेत रमल्या होत्या, नोकरी उत्तम होती, स्वतःचे घर झाले होते; कमी असे काही नव्हतेच. पण तरीही पुन्हा एकदा मनात असमाधान खदखदू लागले.

 ह्या असमाधानामागे काय कारणे होती? त्यांच्या निकटच्या सहकाऱ्यांना त्यांच्या वागण्यात तसे काही जाणवत होते का? ह्याबद्दलची आपली निरीक्षणे मांडताना टोनी म्हणाले -
 "असं नेमकं काही सांगणं अवघड आहे, कारण दुसऱ्याच्या मनात काय चाललं आहे ह्याची कल्पना बाहेरून बघणाऱ्याला कशी येणार? पण एक-दोन गोष्टींचा उल्लेख करायला हरकत नाही.
 “एक म्हणजे, आपल्या नोकरीत शरदची स्थिती काहीशी साचलेल्या पाण्यासारखी झाली होती. आपल्याला प्रमोशन मिळायला हवं, आपली नक्कीच ती पात्रता आहे असं त्याला सतत वाटत होतं आणि ते प्रमोशन काही त्याला मिळत नव्हतं. ह्यावरून एकदा तो माझ्यावरही चिडला होता. आम्ही ऑफिसमधून घरी परतत होतो. ह्यावेळी गाडी त्याची होती. मी शेजारी बसलो होतो. गाडी चालवताना नेहमीप्रमाणे तो गप्पा मारत नव्हता. काहीसा घुश्श्यातच दिसत होता. मी त्याबद्दल काहीतरी बोललो. त्यासरशी माझ्याकडे कटाक्ष टाकत तो म्हणाला, 'लोकांनी तुझ्या घरावर दगड मारायला नको असतील, तर तूही दुसऱ्यांच्या घरावर दगड मारणं थांबव.' नंतरच्या बोलण्यात उलगडलं, की त्याला प्रमोशन मिळू नये म्हणून, मी त्याच्या बॉसपाशी काही कागाळ्या केल्या होत्या, असं त्याला वाटत होतं. हे सगळं त्याच्या मनात कोणी भरवलं होतं कोण जाणे, पण ते अर्थातच खोटं होतं. नंतर मी खुलासा केल्यावर मात्र त्याला तो पटला आणि आमच्यातला तो दुरावा दूर झाला.
 "आपल्याला अपेक्षित ते प्रमोशन मिळत नाही ह्याबद्दलचा शरदचा राग वाढायला आणखी एक कारण घडलं. आमचे डायरेक्टर जनरल त्यावेळी एक इजिप्शियन मुस्लिम गृहस्थ होते व जोशींना डावलून त्यांनी काँगो देशातील दुसऱ्या एका मुस्लिम कर्मचाऱ्याला ते प्रमोशन दिलं. त्यामुळे चिडलेला शरद मला म्हणाला, 'आपल्या या इंटरनॅशनल ब्यूरोत आता कामातल्या हुशारीला काहीच स्थान उरलेलं नाही. पूर्वी बढती देताना ती व्यक्ती कुठल्या खंडातून आलेली आहे याचा विचार व्हायचा. मग देशाचा विचार व्हायचा. मग राष्ट्रीयत्वाचा विचार व्हायचा. मग वर्णाचा विचार व्हायचा. आणि आता आणखी एका गुणाचा विचार होतो - तो म्हणजे त्या व्यक्तीच्या धर्माचा!' ह्याविरुद्ध तक्रार करायचं त्याने ठरवलं.
 "जिनिव्हाला इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनचं एक अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल आहे. युएनच्या कुठल्याही शाखेतील कर्मचाऱ्यावर काही अन्याय होत असेल तर तो तिथे दाद मागू शकतो. आपल्याला पात्रता असूनही प्रमोशनसाठी डावललं जात आहे अशा प्रकारचं निवेदन त्याने ह्या ट्रायब्युनलपाशी दिलं होतं. त्या संदर्भात त्याला ट्रायब्युनलने त्याची बाजू ऐकून घ्यायला बोलावलंही होतं. पण दुर्दैवाने त्याची बाजू ट्रायब्युनलला पटली नाही व ती केस डिसमिस केली गेली.
 "आज मागे वळून बघताना मला वाटतं, की त्याने जर अजून थोडा धीर धरला असता, तर त्याला प्रमोशन नक्की मिळालं असतं; जसं ते रुटीनमध्ये मलाही मिळत गेलं. इथे राहिला असता, तर तो माझ्याही वर, अगदी असिस्टंट डायरेक्टर जनरलच्या लेव्हलपर्यंत गेला असता. पण त्याने नोकरी सोडायचाच निर्णय घेतला.
 "दुसरी एक घटना इथे नमूद करावीशी वाटते. शरद काही खूप चांगला ड्रायव्हर नव्हता; मी म्हणेन तो अॅव्हरेज ड्रायव्हर होता. एकदा गाडी चालवत असताना त्याच्या गाडीला गंभीर अपघात झाला होता. सुदैवाने त्याला स्वतःला काही दुखापत झाली नव्हती, पण त्याच्या मोटारीचं जबरदस्त नुकसान झालं होतं. माझ्या आठवणीप्रमाणे ती दुरुस्त करायचं गराजचं बिल ७००० स्विस फ्रैंक्स की असंच काहीतरी आलं होतं. तेवढे पैसे इन्शुरन्स कंपनी देणं शक्यच नव्हतं. 'माझं सगळं सेव्हिंग ह्यात गेलं' असं तो मला म्हणाल्याचं आठवतं. ह्या अपघातामुळे तो चांगलाच हादरला होता आणि ते तसं स्वाभाविकच होतं.
 “एकूणच युएनच्या कामाबद्दल तो असमाधानी होता. आमचं बरचसं बजेट हे आमचे पगार, सल्लागारांचा मेहेनताना, प्रवास, हॉटेल, भव्य कार्यालय, डामडौल वगैरेवरच खर्च होतं; त्यातून गरीब देशांचं काहीच कल्याण होत नाही, अशी त्याची धारणा बनत चालली होती व त्यात तथ्यही होतंच.
 "तरीही त्याने ही नोकरी सोडून भारतात जाऊ नये, इथेच त्याचा व त्याच्या कुटुंबीयांचाही उत्तम व्यक्तिगत विकास होऊ शकेल असं त्याला मी समजावलं. युएनमधील नोकरीमुळे काळाच्या ओघात त्याला स्वीस नागरिकत्वदेखील मिळू शकलं असतं. पण तसा तो निश्चयाचा पक्का होता व शेवटी त्याच्या मनाप्रमाणेच तो भारतात परत गेला."

 जोशींच्या बर्नमधील कामाचे स्वरूप जुलै १९६९नंतर अधिक व्यापक झाले होते. युपीयुमधील नेहमीचे काम होतेच; पण त्याशिवाय युएनच्या विविध शाखा विकासासाठी जे कार्यक्रम जगभर राबवत होत्या, त्या कार्यक्रमांच्या आखणीसाठी आवश्यक त्या सामाजिक-आर्थिक पाहण्या करणे, त्यांना संख्याशास्त्रीय मदत करणे हाही आता त्यांच्या कामाचा एक भाग होता. त्यासाठी जगभर प्रवासही करावा लागे. हे सारे करताना जे त्यांच्या लक्षात येत होते ते युएनविषयी असलेल्या सर्वसामान्य कल्पनांना मुळापासूनच आव्हान देणारे होते.

 ह्या साऱ्याची थोडी पार्श्वभूमी समजून घेणे जरुरीचे आहे. जगातील वाढत्या विषमतेची खंत पाश्चात्त्य जगातील अनेक नेत्यांना व जनतेलाही वाटत असे. त्यांच्या भावना प्रामाणिक होत्या. वसाहतवादातून आपल्यापैकी अनेक राष्टांनी तिसऱ्या जगातील देशांचे शोषण केले आहे व त्याची काहीतरी भरपाई म्हणून आपण त्यांना मदत केली पाहिजे ही त्यांची धारणा होती. युएनच्या सर्वच संस्थांचा भर त्यावेळी गरीब-श्रीमंत राष्ट्रांमधली अनुल्लंघनीय वाटणारी दरी कशी मिटवता येईल ह्यावर होता. जोशींच्या ऑफिसमध्येही गरीब देशांमधील पोस्टल सेवा कशी सुधारता येईल, त्यासाठी श्रीमंत देश कुठल्या स्वरूपात साहाय्य करू शकतील ह्याची चर्चा सतत होत असे.
 डिसेंबर १९६१मध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या न्यूयॉर्क येथे भरलेल्या अधिवेशनात अमेरिकेचे अध्यक्ष जॉन केनेडी यांनी 'साठचे दशक हे विकासाचे दशक असेल' असे जाहीर केले. जगातील विषमता कमी व्हावी हा त्यामागचा उद्देश. त्याला 'फर्स्ट डेव्हेलपमेंट डिकेड' असे म्हटले गेले. त्या दशकात अविकसित देशांच्या राष्ट्रीय उत्पन्नात दरवर्षी ५ % वाढ व्हावी असे ठरवले गेले. मात्र प्रत्यक्षात ही वाढ अवघी २% एवढीच झाल्याचे १९७०मध्ये लक्षात आले. त्याचवेळी विकसित देशांचे उत्पन्न मात्र ह्याच्यापेक्षा खूपच अधिक वेगाने वाढले होते; म्हणजेच विषमता कमी होण्याऐवजी वाढलेली होती.
 त्यानंतर १९७०मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने आपल्या पंचविसाव्या अधिवेशनात ही विषमता कमी करण्याच्या दृष्टीने सत्तरचे दशक हे 'सेकंड डेव्हलपमेंट डिकेड' म्हणून जाहीर केले. त्या दरम्यान अविकसित देशांचे उत्पन्न पाचऐवजी सहा टक्क्यांनी दरवर्षी वाढावे असे लक्ष्य ठरवण्यात आले. हे शक्य व्हावे, म्हणून सर्व विकसित देशांनी आपल्या उत्पन्नाचा एक टक्का इतका भाग हा अविकसित देशांना मदत म्हणून द्यावा असाही एक ठराव त्याच अधिवेशनात संयुक्त राष्ट्र संघाने संमत केला. गरीब देशच फार मोठ्या बहुसंख्येने असल्याने अधिवेशनातील मतदानात तो संमत होणे अगदी सोपे होते. अर्थात श्रीमंत (म्हणजेच मुख्यतः पाश्चात्त्य) राष्ट्रांचाही त्याला विरोध नव्हता.
 पण तरीही विषमता कमी होण्याऐवजी सतत वाढतच होती. १९७५ साली विकसित देशांचे दरडोई उत्पन्न अविकसित देशांच्या उत्पन्नापेक्षा वीस पट झाले होते!

 ह्या सुमारास जेव्हा 'मदत विरुद्ध व्यापार' ('aid versus trade') ह्याबद्दल जागतिक स्वरूपाची चर्चा सुरू झाली, तेव्हा 'मदत देण्यामागच्या अटी' आणि अविकसित देशांना नुकसान पोचवणाऱ्या व्यापाराच्या अटी' यांमागचे भयानक सत्य प्रकाशात येऊ लागले. जोशींच्या लक्षात आले, की मदत म्हणून जेव्हा काही निधी श्रीमंत राष्ट्रे देत, तेव्हा त्यासोबत अनेक अटीही असत. उदाहरणार्थ, ह्या रकमेतून तुम्ही आम्ही बनवलेला अमुकअमुक इतका माल खरेदी केला पाहिजे. म्हणजे प्रत्यक्षात श्रीमंत राष्ट्रांची बाजारपेठ वाढवण्यासाठीच ह्या तथाकथित मदतीचा उपयोग होत होता. हे काही प्रमाणात अपरिहार्यही होते. कारण मुळात कुठल्याही राष्ट्राला विकास करण्यासाठी ज्या प्रकारच्या इन्फ्रास्ट्रक्चरची गरज होती व नंतर ज्या प्रकारच्या उद्योगांची गरज होती, ते उभारण्यासाठी लागणारी यंत्रसामग्री व तंत्रज्ञान हे श्रीमंत राष्ट्रांकडेच उपलब्ध होते. गरीब देशांतून येणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती कायम कमी व श्रीमंत देशांतून निर्यात होणाऱ्या पक्क्या मालाच्या किमती कायम जास्त हे व्यापारातले वास्तव विदारक होते. 'मदत' या शब्दाला त्यामुळे काही अर्थच उरत नव्हता.
 याचवेळी आपण देत असलेल्या मदतीची रक्कम अविकसित देशांतील अभिजनवर्ग स्वतःच खाऊन टाकतो व खऱ्या गरजू लोकांना काहीच मिळत नाही हे मत त्यावेळी अनेक पाश्चात्त्य वृत्तपत्रांमधून अधोरेखित होत असे. एखाद्या आफ्रिकन देशातील राजा आपल्या अल्सेशिअन कुत्र्याला चिकन भरवतो आहे व त्याचवेळी त्याच्या देशातील हजारो सामान्य लोक उपाशी मरत आहेत अशा प्रकारची व्यंग्यचित्रे वृत्तपत्रांतून प्रसिद्ध होत होती. पाश्चात्त्य समाजात त्यामुळे गरीब देशांना 'मदत' द्यायला विरोध वाढू लागला.

 स्वतः जोशी यांचा अनुभवही या मताला दुजोरा देणारा होता. ते जेव्हा आपल्या कामाचा भाग म्हणून वेगवेगळ्या अविकसित देशांमध्ये जात, त्यावेळी त्यांनीही त्या देशांतील वाढती अंतर्गत विषमता बघितली होती व जागतिक पातळीवरील गरीब व श्रीमंत राष्ट्रांमधील विषमतेपेक्षा ती अधिक भयावह होती. विशेषतः आफ्रिकेतील नायजेर ह्या देशामधील अनुभव त्यांना बराच अंतर्मुख करून गेला. तिथे त्यांनी बघितले, की देशाच्या राजधानीचा थोडासा भाग खूप श्रीमंत दिसतो, तिथे बडी बडी हॉटेल्स आहेत, विदेशी मोटारी, सौंदर्यप्रसाधने, अत्याधुनिक उपकरणे, कपडे हे सर्व काही ठरावीक दुकानांतून उपलब्ध आहे व एकूणच राज्यकर्ता वर्ग व इतर सत्ताधारी ऐषारामात जगत आहेत. अगदी युरोपातील उच्चवर्गीयांप्रमाणेच त्यांची जीवनशैली आहे. पण त्याचवेळी त्या देशातील बहुसंख्य जनता मात्र भीषण दारिद्र्यात सडत आहे.
 जोशींनी हेही बघितले होते, की वेगवेगळ्या अविकसित देशांची मोठी मोठी शिष्टमंडळे युएनच्या परिषदांसाठी वा अन्य कार्यक्रमांसाठी युरोप-अमेरिकेत जातात तेव्हा त्यांचा एकूण दृष्टिकोन हा केवळ सरकारी पैशावर परदेशात मजा मारणे हाच असतो; प्रत्यक्षात संयुक्त राष्ट्रांकडे भीक मागण्याच्या पलीकडे ती काहीच करत नाहीत आणि मुख्य म्हणजे आपल्या देशाचा विकास व्हावा अशी तळमळही ह्या बड्या मंडळींना नसते; ते केवळ स्वतःची चैन आणि स्वार्थ एवढेच पाहत असतात.
 त्यांचे एक निरीक्षण असे होते, की ह्या गरीब देशांतील नेते एखाद्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी न्यूयॉर्कसारख्या ठिकाणी गेले, की नेहमी आलिशान गाड्यांमधूनच फिरायचे व त्याउलट श्रीमंत देशांतील नेते मात्र तुलनेने साध्या गाड्या वापरत. हाच फरक कपडे, खाणेपिणे, दैनंदिन राहणी ह्या सगळ्यातच उघड दिसायचा. म्हणजे बोलताना आपण गरीब देशांच्या जनतेचा आवाज उठवतो आहोत असा आविर्भाव आणायचा, पण स्वतःच्या दैनंदिन जगण्यात मात्र अगदी चैनीत राहायचे! ह्या सर्व ढोंगबाजीची जोशींना घृणा वाटू लागली.
 सुरुवातीला खूप मानाच्या आणि महत्त्वाच्या वाटलेल्या युएनमधील नोकरीत पुढे आपल्याला वैयर्थ्य का जाणवू लागले याची काही कारणे स्वतः जोशी यांनी योद्धा शेतकरी या पुस्तकात उद्धृत केलेल्या संभाषणात व इतरत्रही नमूद केली आहेत. त्यांच्या मते बाहेरून पाहणाऱ्याला असे वाटत असते, की या संयुक्त राष्ट्रसंघात फार महत्त्वाचे असे काही काम चालले आहे. पगारवगैरे उत्तमच असतो. पण संयुक्त राष्ट्रसंघाला प्रत्यक्ष अधिकार असे फारसे नसतात. वेगवेगळ्या देशांचे धोरण शेवटी ते ते देशच ठरवत असतात. संयुक्त राष्ट्रांमध्ये जेव्हा 'सेकंड डेव्हेलपमेंट डिकेड'चे काम सुरू झाले – म्हणजे 'विकासाच्या दुसऱ्या दशकाची' आखणी सुरू झाली – तेव्हा ह्या संघटनेतून बाहेर पडावे, असे विचार त्यांच्या मनात येऊ लागले. 'विकासाचे दुसरे दशक' म्हणजे नेमके काय? विकासाचे पहिले दशक' तरी कुठे नीट पार पडले आहे? मग लगेच हे दुसरे दशक सुरू करायची भाषा कुठून आली? – असे प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाले.
 युएनतर्फे राबवला जाणारा 'विश्वव्यापी तांत्रिक साहाय्य' किंवा 'टेक्निकल असिस्टन्स' नावाचा जो कार्यक्रम आहे. तो म्हणजे एक फार मोठी बनवाबनवी आहे. खोटेपणा आहे हेही त्यांना कळून चुकले. ह्या तांत्रिक' साहाय्यातील फार मोठी रक्कम ह्या सल्लागारांच्या भरमसाट पगारातच जाते, आणि प्रत्यक्षात ज्यांना फायदा व्हावा म्हणून हा निधी उभा केला जातो, त्यांना जे हवे ते कधीच मिळत नाही.
 ह्याशिवाय, आणखीही एक भयानक गोष्ट त्यांच्या लक्षात आली. ती म्हणजे हे सारे वास्तव उघडउघड दिसत असूनही गरीब देशांतले सारे अर्थतज्ज्ञ, राज्यकर्ते, विचारवंत त्याकडे पूर्ण डोळेझाक करतात व जी भूमिका घेण्याने स्वतःचा फायदा होईल, स्वतःला आंतरराष्ट्रीय परिषदांचे आमंत्रण येईल, पुरस्कार मिळतील तीच भूमिका घेतात. स्वार्थापोटी आपली बुद्धी त्यांनी चक्क गहाण टाकलेली असते. आपली सध्याची नोकरी म्हणजेदेखील अप्रत्यक्षरीत्या ह्याच सगळ्या भ्रष्ट यंत्रणेचा एक भाग आहे, असेही त्यांना वाटू लागले.

 एकीकडे त्यांचे वाचन व चिंतन सतत चालूच होते; भारतातील गरिबीचा प्रश्न हा शेतीमालाला मिळणाऱ्या अत्यंत अपुऱ्या किमतीशी निगडित आहे हे त्यांच्या लक्षात आले होते; पण त्यावर युएनमध्ये काहीच चर्चा होत नव्हती. ह्या सगळ्याचा जोशींना अगदी उबग आला. जोशी म्हणतात,
 "दारिद्र्याच्या प्रश्नावर उत्तर शोधण्याचा खराखुरा प्रयत्न कुणी केलेलाच नाही, हेदेखील माझ्या ध्यानात यायला लागलं! मी वेगवेगळे अहवाल आणि ग्रंथ वाचू लागलो, तेव्हा ह्या दारिद्र्याच्या प्रश्नाचं मूळ टाळून development techniques, linear programming equations वगैरे जडजंबाल शब्दांमध्ये जे काही लिहिलं जायचं, वाचायला मिळायचं, ते अगदी खोटं आहे हे प्रकर्षाने जाणवू लागलं. असे अहवाल आणि पुस्तकं लिहिणारे विशेषज्ञ हे दारिद्रयाच्या मढ्यावर चरणारे लोक आहेत, ह्याबद्दल माझ्या मनात काहीही शंका उरली नाही! १९७२च्या सुमारास माझ्या मनात भारतामध्ये परतायचं हा विचार पक्का झाला आणि भारतात जाऊन काय करायचं, तर कोरडवाहू शेती - हेदेखील मी पक्कं ठरवलं! सगळ्या देशातील दारिद्र्याचं मूळ हे ह्या कोरडवाहू शेतीमध्ये आहे, अशी माझ्या मनाची खात्री पटली होती."

 हळूहळू व्यक्तिगत पातळीवरही जोशींच्या मनात बरीच कटुता जमा होत होती. याची काही कल्पना टोनी यांच्या बोलण्यावरून येते. शिवाय जोशींचा युपीयुमधील स्टाफ असोसिएशनचा व एकूण सामाजिक वर्तुळाचा अनुभवही फारसा चांगला नव्हता. ते एकदा म्हणत होते,
 "तिथल्या बहुतेक लोकांच्या मनात भारतीय माणूस म्हटल्यावर एक विशिष्ट प्रतिमा असते. देवभोळा, हिंदू परंपरा पाळणारा वगैरे. किंवा मग भांडवलदारांवर, उद्योगक्षेत्रावर, आधुनिक तंत्रज्ञानावर सतत टीका करणारा वगैरे. मी या दोन्ही प्रकारांत बसणारा कधीच नव्हतो. भारतीय म्हणून एखाद्याने जी भूमिका घ्यावी असं त्यांना वाटायचं, तसं वागणारे, किंवा वरकरणी तशीच भूमिका घेणारे, इतर अनेक उच्चभ्रू भारतीय तिथे यायचे. ह्या उच्चभ्रूचं ते प्रतिमा जपणं मला ढोंगीपणाचं वाटे. मी कधीच तो प्रकार केला नाही. दुसरं म्हणजे, भारतासारख्या मागासलेल्या देशातील माणसाला परदेशी खरी प्रतिष्ठा, खरं बरोबरीचं स्थान हे कधीच मिळत नाही.
 म्हणजे वरकरणी सगळं नॉर्मल असतं, तुमचा अपमान वगैरे कोणी करत नाही, कायदेही सगळे सर्वांना समान असतात; पण त्यांच्या मनात एक दुरावा कायम असतोच. त्यांच्या समाजाचा एक घटक म्हणून ते तुमचा कधीच स्वीकार करत नाहीत. शिवाय तुम्ही व्यक्तिशः कितीही कर्तबगार असला, तरी तुमच्या देशाच्या एकूण मागासलेपणाचं ओझं तुमच्या खांद्यावर असतंच. तुमचं मूल्यमापन करताना तुम्ही शेवटी एक भारतीय आहात, मागासलेल्या देशातले आहात, ह्याचा त्यांना सहसा कधी विसर पडत नाही."
 जोशींसारख्या मानी माणसाला हे सारे सहन होत नसे.
 बांगलादेशातील यादवी युद्ध, भारतात आलेल्या बांगला निर्वासितांच्या छावण्या, भारतातील दुष्काळ, उपासमार, भ्रष्टाचार आणि त्याचवेळी काही जण मात्र श्रीमंत राष्ट्रांतील श्रीमंत वर्गानही हेवा करावा अशा विलासी थाटात मजा मारत आहेत अशी चित्रे त्यावेळी पाश्चात्त्य टीव्हीवरून जवळजवळ रोजच दाखवली जात होती. साधारण त्याच काळात सिक्कीमचे भारतात विलीनीकरण करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. त्या प्रकरणातदेखील भारत सरकार एका छोट्या पण स्वायत्त देशाशी दांडगाई करत आहे असे मानणारा एक मोठा वर्ग पाश्चात्त्य जगात होता. "हे सारं तुमच्या देशात होत असताना तुमच्यासारख्या कर्तृत्ववान भारतीयाने इथे युरोपात राहावं हे तुमच्या सरकारला परवडतं तरी कसं काय?" असा प्रश्न जोशींना एका इंग्रज अधिकाऱ्याने विचारलाही होता.

 प्रश्नाचा गर्भितार्थ अगदी स्पष्ट होता; त्यांना असे म्हणायचे होते की – तुम्ही तुमच्या देशात जाऊन तिथले प्रश्न सोडवायच्याऐवजी इथे युरोपात काय मजा मारत बसला आहात?

 व्यक्तिगत पातळीवरील आणखी एक निरीक्षण त्यांना चीड आणत असे. आपल्या इतर युरोपियन सहकाऱ्यांपेक्षा आपण अधिक कर्तबगार आहोत अशी जोशी यांची खात्री होती. पण त्याचवेळी भारतीय म्हणजे गरीब लोक, हा मागासलेला देश, आपण ह्यांना मदत केली पाहिजे, त्यांचा विकास करायला पाहिजे अशा प्रकारची एक वडिलकीची (patronizing) भावना पाश्चात्त्य समाजात त्यांना खूपदा आढळायची. व्यक्तिशः आपल्याकडे बघण्याची पाश्चात्त्यांची दृष्टीही तशीच अहंगंडातून आलेली आहे असे त्यांना जाणवायचे. ह्या भावनेतून येणारा पाश्चात्त्यांचा दातृत्वाचा आविर्भाव त्यांना चीड आणायचा; त्यांच्यातील प्रखर आत्मभानाला म्हणा किंवा अस्मितेला म्हणा तो कुठेतरी डंख करणारा होता.
 मागे लिहिल्याप्रमाणे आपण कोणीतरी मोठे व्हावे, जगावेगळे काहीतरी करून दाखवावे अशी एक महत्त्वाकांक्षा जोशी ह्यांच्या मनात लहानपणापासून होतीच. भारतातील पोस्टखात्यात उच्चपदी असतानाही ह्या महत्त्वाकांक्षेने त्यांची पाठ सोडली नव्हती. स्वित्झर्लंडमध्ये राहताना बाकी सगळे असूनही ह्या मूलगामी महत्त्वाकांक्षेच्या पूर्ततेच्या दृष्टीने काहीच घडत नव्हते, घडणे शक्यही वाटत नव्हते. शेवटी भारत हीच आपली कर्मभूमी असायला हवी, इथे आपले आयुष्य फुकट चालले आहे, ही जाणीव त्यांच्या मनात त्यावेळी निर्माण झाली असणे सहजशक्य आहे.
 टोनी म्हणाले,
 "एक दिवस आपला मालकीचा फ्लॅट विकून टाकायचा व बर्नमध्ये भाड्याचं घर घेऊन राहायचा निर्णय त्याने घेतला. हे त्याने जेव्हा मला सांगितलं, तेव्हाच भारतात परतायचा त्याचा निर्णय पक्का झाला आहे, हे माझ्या लक्षात आलं. आणि एकदा त्याच्या मनानं एखादी गोष्ट घेतली, की त्याचं मन वळवणं अवघड नव्हे तर अशक्य आहे, हे आठ वर्षांच्या सहवासात मला कळून चुकलं होतं."

 भारतात प्रत्यक्ष परतायच्या काही वर्षे पूर्वीच तसे करायचा सुस्पष्ट विचार जोशी यांच्या मनात आकाराला आला होता हे स्पष्ट करणारी काही कागदपत्रे उपलब्ध आहेत.
 उदाहरणार्थ, मार्च १९७४ मध्ये हैद्राबाद येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिटी डेव्हलपमेंट या संस्थेच्या संचालकांबरोबर झालेला त्यांचा पत्रव्यवहार उपलब्ध आहे. त्यानुसार त्या संस्थेने स्वत:च्या जर्नलच्या वर्गणीचे म्हणून पाठवलेले सहा पौंडांचे बिलही उपलब्ध आहे. आपल्या पत्रात १५ जुलै ते ३१ डिसेंबर १९७४ या कालावधीत संस्थेचा कोर्स करायची इच्छाही जोशींनी व्यक्त केली आहे.
 राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉ. एम. एस. ऊर्फ नानासाहेब पवार यांना जोशींनी लिहिलेले पत्र व त्याला नानासाहेब पवार यांनी दिलेले उत्तरही उपलब्ध आहे. त्या पत्रात भारतातील शेतीचा अभ्यास करायची इच्छा जोशींनी व्यक्त केली आहे व उत्तरात पवार यांनी त्यांना मार्गदर्शनही केलेले आहे. "आमचे एक प्राध्यापक डॉ एस. एस. थोरात पुणे कृषी महाविद्यालयात आहेत व त्यांच्याबरोबर १५ जुलै ते ३१ डिसेंबर या कालावधीत तुम्ही काम करू शकता. ते तुम्हाला पुण्याभोवतीच्या खेड्यांमधून घेऊन जातील, तेथील शेतकऱ्यांमधील आमचे काम तुम्ही पाहू शकाल," असेही त्यात लिहिले आहे.
 त्यानंतर दोन वर्षांनी, २६ मार्च १९७६ रोजी, दिल्लीत प्रधानमंत्री कार्यालयातील सचिवांना जोशींनी बर्नहून एक महत्त्वाचे पत्र लिहिले आहे. त्या पत्रात भारतात परतायचा व शेतीविषयक काम करायचा आपला निर्णय त्यांनी कळवला आहे. सोबत आपल्या मनातील प्रकल्पाचा आराखडाही पाठवला आहे. त्यासाठी शासनाकडून पडीक जमीन उपलब्ध होईल का' अशी विचारणा केली आहे. असेच पत्र आपण महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवांना पाठवले असल्याचा पत्रात उल्लेख आहे. "ही जमीन मी रोख पैसे देऊन विकत घेईन. शासनाकडून कुठल्याही प्रकारच्या साहाय्याची मला अपेक्षा नाही," हेही पत्रात स्पष्ट केलेले आहे हे मुद्दाम नमूद करण्यासारखे आहे.
 प्रस्तुत पत्राला सहसचिव, प्रधानमंत्री सचिवालय, यांनी लिहिलेले ५ एप्रिल १९७६ तारखेचे उत्तर उपलब्ध आहे. त्यात लिहिले आहे,
 "तुमचे पत्र व सोबतचा तुम्ही बनवलेला कमीत कमी भांडवल वापरून शेती करायच्या पायलट प्रोजेक्टचा आराखडा मिळाला. या महत्त्वाच्या विषयात तुम्ही स्वारस्य घेत आहात याचे कौतुक वाटते. आपल्याला हे पटेलच की केवळ कच्च्या आराखड्याच्या आधारावर विस्ताराने काही प्रतिसाद देणे आम्हाला अवघड आहे, पण महाराष्ट्रात परतल्यावर तुम्ही तेथील शासनाशी चर्चा करणार असल्याचे तुम्ही पत्रात लिहिलेच आहे. महाराष्ट्र शासनाकडून तुम्हाला नक्कीच सर्व अपेक्षित उत्तरे मिळतील."
 पत्रासोबत आपल्या योजनेचा कच्चा आराखडा जोडला असल्याचा उल्लेख जोशींनी केला आहे, व तो मिळाल्याचा उल्लेख सहसचिवांच्या उत्तरात आहे, पण दुर्दैवाने त्या आराखड्याची प्रत मात्र जोशी यांच्या कागदपत्रांत उपलब्ध झाली नाही. ती उपलब्ध असती, तर तो एक महत्त्वाचा दस्तावेज ठरला असता.
 या सर्व पत्रव्यवहारावरून एक गोष्ट स्पष्ट होते. ती म्हणजे भारतात प्रत्यक्ष परतायच्या निदान दोन वर्षे आधी भारतात परतायचे व परतल्यावर कोरडवाहू शेतीविषयक प्रयोग करायचे जोशी यांचे ठरले होते व त्यादृष्टीने बरेचसे नियोजनही त्यांनी केले होते.

 १ मे १९७६ रोजी, म्हणजे युपीयुमध्ये दाखल झाल्यानंतर बरोबर आठ वर्षांनी, जोशी भारतात परतले. तिथेच राहिले असते तर २००१पर्यंत त्यांना नोकरी करता आली असती पण त्यांचा निश्चय अविचल होता. टोनी म्हणाले,
 "त्यानंतर त्याचा व माझा काहीच संबंध राहिला नाही. आमच्यात पत्रव्यवहारदेखील कधी झाला नाही. तो भारतात शेतकऱ्यांना वाजवी भाव मिळावा यासाठी काही काम करतो, एवढं फक्त मला कुठूनतरी ऐकून कळलं होतं. अशीच जवळजवळ दोन वर्षं गेली. मग साधारण १९७८च्या सुमारास अचानक त्याचं मला पत्र आलं. त्याला झुरिकजवळ स्प्रायटेनबाख (Spritenbach) नावाच्या गावी असलेली झ्वीबाख (Zwibach) पोटॅटो चिप्स फॅक्टरी नावाची एक वेफर्स बनवायची फॅक्टरी बघायची होती. त्यानुसार तो स्वित्झर्लंडला आला, ठरल्याप्रमाणे बर्नला माझ्याच घरी राहिला. मी त्यापूर्वीच तिथल्या मॅनेजमेंटला फोन करून अपॉइंटमेंट घेऊन ठेवली होती. दुसऱ्या दिवशी मीच त्याला त्या फॅक्टरीत घेऊन गेलो. पूर्ण दिवस आम्ही त्या फॅक्टरांमध्ये घालवला. सगळं बघण्यात आणि चर्चा करण्यात. तिथल्या अधिकाऱ्यांनी आमचं चांगलं स्वागत केलं. विशिष्ट प्रकारचे बटाटे कसे व कुठून मिळवले जातात, ते भरपूर पाण्याने कसे धुतले जातात, नंतर ते कसे सोलले व कापले जातात, कसे तळले जातात, त्यांची चव कशी तपासली जाते, दर्जा कसा कायम राखला जातो. तयार वेफर्सचं पॅकिंग कसं केलं जातं, त्यावरचा मजकूर कसा छापला जातो, तो तयार माल कसा वितरीत केला जातो हे सगळं त्यांनी आम्हाला दाखवलं. शरदला असं काहीतरी भारतात सुरू करायचं होतं. पण प्रत्यक्षात असं काही करणं त्याच्या परिस्थितीत अशक्य आहे असा निष्कर्ष त्याने शेवटी काढला."
 पुढे टोनी म्हणाले,
 "१९७८ सालातील त्याच्या त्या भेटीनंतर पुन्हा पुढली ३४ वर्ष आमचा काहीच संबंध आला नाही. त्याच्या मुली मात्र अधूनमधून आमच्या संपर्कात होत्या. मग गेल्या महिन्यात अगदी अचानक त्याची इमेल आली व तुम्ही त्याचं चरित्र लिहीत आहात व त्या संदर्भात मला भेटू इच्छिता हे त्यानी कळवलं. तुमच्याशी झालेल्या ह्या चर्चेमुळे आज इतक्या वर्षांनी त्या सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. एका उमद्या, बुद्धिमान मित्राबरोबर आठ वर्षं मी काम केलं, त्यांतील सात वर्षंतर त्याचा अगदी जवळचा शेजारी म्हणूनही राहिलो, त्याचा व त्याच्या सगळ्या कुटुंबाचा भरपूर सहवास मिळाला ह्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो."
 ह्या भेटीच्या वेळी व नंतरदेखील टोनी यांनी जे मनःपूर्वक सहकार्य दिले, त्याबद्दल त्यांचे आभार मानावेत तेवढे थोडेच होतील. आमच्या भेटीची मी लिहिलेली टिपणांची १८ पानेदेखील त्यांनी कंटाळा न करता व्यवस्थित तपासून दिली. शरद जोशी यांच्या जीवनातील हे बहुतांशी अज्ञात राहिलेले पर्व त्यांच्यामुळेच माझ्यापुढे साकार झाले.

 आयुष्याच्या ऐन उमेदीत स्वित्झर्लंडसारख्या एखाद्या देशात आठ वर्षे सहकुटुंब राहताना, वरिष्ठपदी काम करताना जोशींच्या संवेदनशील मनावर अनेक संस्कार होणे अगदी स्वाभाविक आहे. असे कुठले वैचारिक संस्कार ह्या कालावधीत त्यांच्यावर झाले असतील, ह्याचा विचार करताना व त्यांचा भावी जीवनातील वाटचालीशी संबंध जोडताना चार मुद्दे सर्वाधिक महत्त्वाचे वाटतात.
 इथल्या वास्तव्यात पटलेला व भावी जीवनावर प्रभाव टाकणारा पहिला मुद्दा म्हणजे आर्थिक समृद्धीचे मानवी जीवनातील सर्वस्पर्शी महत्त्व.
 इथली डोळे दिपवणारी समृद्धी ही केवळ आर्थिक नव्हती; तिचे पडसाद जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत उमटताना दिसत होते. शिस्तबद्ध वाहतूक, लोकांचे एकमेकांशी असलेले समंजस वागणे, कसलाच तुटवडा नसल्याने आणि म्हातारपणाची उत्तम सोय सरकारने केलेली असल्यामुळे वागण्यात सहजतःच आलेले औदार्य, व्यक्तिस्वातंत्र्याची पराकोटीची जपणूक, लोकांचे निसर्गप्रेम, त्यांचे क्रीडाप्रेम, सर्व सोयींनी युक्त अशी मैदाने, प्रशस्त तरणतलाव, घराघरातून फुललेली रंगीबेरंगी फुले, सुदृढ व टवटवीत चेहऱ्यांचे नागरिक हे सारेच खूप आनंददायी होते. इथे आठ वर्षे काढल्यावर आर्थिक समृद्धीचे सर्वंकष महत्त्व त्यांना पूर्ण पटले. उर्वरित आयुष्यात व्यक्तिगत पातळीवर ते बहुतेकदा साधेपणेच राहिले; पण त्यांनी अर्थवादाचे महत्त्व कायम अधोरेखित केले व कधीही दारिद्र्याचे उदात्तीकरण केले नाही.
 मनावर ठसलेला दुसरा मुद्दा म्हणजे देशाच्या या एकूण समृद्धीत समृद्ध शेतीचे असलेले पायाभूत महत्त्व.
 स्वित्झर्लंडच्या समृद्धीमागे अनेक घटक आहेत हे नक्की, पण शेतीतील समृद्धी हा त्यांतील सर्वाधिक महत्त्वाचा घटक आहे. शेतीतील फायद्यातूनच तिथे आधी शेतमालावर प्रक्रिया करणारे छोटे कारखाने उभे राहिले, त्यातून इतर ग्रामोद्योग, विकसित अशी ग्रामीण बाजारपेठ, ग्रामीण समृद्धी व त्यातून मग मोठाले उद्योग असा तेथील विकासाचा क्रम आहे. त्याच्या मुळाशी आजही शेती हीच आहे. ह्याची स्पष्ट कल्पना असल्यामुळेच तेथील सरकार शेतीला सर्व प्रकारे उत्तेजन देते. शेतीत वापरता येतील अशी अत्याधुनिक उपकरणे शेतकऱ्याला उपलब्ध असतात. शेतीमालाची साठवणक करण्यासाठी गदामे, शीतगहे वाहतूक करण्यासाठी वाहने व रस्ते, विक्रीसाठी सुसज्ज बाजारपेठ, भांडवली खर्चासाठी अत्यल्प व्याजदरात कर्जाची उपलब्धता, वीज व पाणी ह्यांचा अनिर्बंध पुरवठा या व अशा इतरही अनेक कारणांमुळे तेथील शेती आजही अतिशय किफायतशीर आहे – विशेषतः दूध शेती (Dairy Farming). या छोट्याशा देशामध्ये, ज्याची लोकवस्ती जेमतेम ८० लाख, म्हणजे आपल्या मुंबईच्या निम्म्याहून कमी आहे अशा देशात, आज २६,००० सहकारी दूध संस्था आहेत व त्यातील बहुतेक सर्व चांगल्या चालतात. इथे गायींना कोणीही गोमाता म्हणून पूजत नाही, पण इथल्या गायी धष्टपुष्ट असतात, उत्तम काळजी घेऊन निरोगी राखल्या जातात आणि रोज सरासरी तीस-चाळीस लिटर दूध देतात. ह्या दुधापासून दही, लोणी, चीज, दूध पावडर वगैरे अनेक उत्पादने मोठ्या प्रमाणावर तयार होतात व त्याला जगभरातून प्रचंड मागणी आहे. ह्या समृद्ध शेतीतूनच पुढे त्यांनी देशाचा औद्योगिक विकासदेखील केला; पण औद्योगिकीकरण करताना त्यांनी शेतीकडे कधीच दर्लक्ष केले नाही. हे सारे जोशी यांना तिथे जवळून बघता आले, अभ्यासता आले.
 तिसरा मुद्दा म्हणजे तंत्रज्ञानाचे मानवी विकासातील पायाभूत महत्त्व.
 इथल्या वास्तव्यात जोशी यांना स्वतःला तंत्रज्ञानाची आवड निर्माण झाली. कदाचित ती उपजतदेखील असू शकेल, पण इथे तिला भरपूर वाव मिळाला असेही म्हणता येईल. टोनी सांगत होते,
 "ऑफिसात कुठलंही नवं उपकरण आलं, की ते कसं वापरायचं हे शिकून घेण्यात तो आघाडीवर असायचा. कॉम्प्युटरचा वापर त्यावेळी बराच मर्यादित होता, पण तरीही जिनिव्हाला जाऊन कॉम्प्युटर व टेलेकम्युनिकेशन्स शिक्षणाचा एक तीन महिन्यांचा कोर्स करायची त्याची इच्छा होती. त्यासाठी बरीच धडपड करून त्याने ऑफिसची परवानगी मिळवली व तो कोर्स पूर्णही केला. हा कोर्स करणारे त्यावेळी आमच्या ऑफिसात अगदी थोडे लोक होते. संध्याकाळी घरी गेल्यावरदेखील तो वेगवेगळे पार्ट्स जोडून इलेक्ट्रॉनिकची ट्रेन तयार करायचा खेळ खेळण्यात रंगन जायचा. त्यासाठी त्याने बरीच महागडी साधनंही खरेदी केली होती."
 जोशींची तंत्रज्ञानाची ही आवड पुढे आयुष्यभर कायम राहिली. म्हातारपणी ज्यावेळी हात कापत असल्यामुळे संगणकावर अक्षरलेखन करणे त्यांना जमेना त्यावेळी नुकतेच बाजारात आलेले Dragon Naturally Speaking या नावाचे एक आवाज ओळखून कळफलक वापरणारे सॉफ्टवेअर त्यांनी कुठूनतरी मिळवले, ते आत्मसात केले व पुढची तीन-चार वर्षे त्याचा वापर करून आपले इंग्रजी लेखन केले. पुढे पुढे मात्र अर्धांगवायूच्या झटक्यानंतर त्यांच्या आवाजात संदिग्धता आली व त्यानंतर मात्र त्यांना इंग्रजी लेखनासाठीही लेखनिकावर अवलंबून राहावे लागले.
 १९७२-७३ या कालावधीत लोझान ह्या मोठ्या स्विस शैक्षणिक शहरात शनिवार-रविवार जाऊन-येऊन त्यांनी एक कोर्सही केला होता – Diploma in Data Processing, Computer Programming and SystemsAnalysis. यानंतर ऑफिसात 'हेड. डेटा प्रोसेसिंग सेंटर' या पदावर त्यांची नेमणूक झाली. नोकरी सोडली, तेव्हा ते ह्याच पदावर होते.
 जिनिव्हा येथे राहणारे मोरेश्वर ऊर्फ बाळ संत नावाचे एक इंजिनिअर मला तिथे भेटले. जोशींना ते चांगले ओळखत होते. इंटरनॅशनल टेलेकम्युनिकेशन्स युनियन ह्या युएनच्या घटकसंस्थेत ते नोकरी करत होते. जोशी यांनी जिनिव्हाला जाऊन जो कोर्स केला होता, तो संत ह्यांच्या संस्थेनेच युएनच्या कर्मचाऱ्यांसाठी म्हणून खास तयार केला होता. जोशी तो कोर्स करण्यात किती रमले होते, बाजारात येणाऱ्या कुठल्याही नव्या संशोधनाबद्दल ते किती उत्साहाने चौकशी करत ह्याबद्दल संतदेखील सांगत होते. "मी पुण्याच्या कॉलेज ऑफ इंजिनियरिंगचा विद्यार्थी, जोशी मात्र अर्थशास्त्राचे विद्यार्थी; पण आमच्या गप्पा नेहेमी तंत्रज्ञानाबद्दल असत," ते म्हणाले. युपीयुच्या कामासाठी जोशी यांना जिनिव्हाला वारंवार यावे लागे व त्यामुळे दोघांच्या भेटीही वरचेवर होत.

 तंत्रज्ञानाचे व्यापक सामाजिक महत्त्व कोणाच्याही सहज लक्षात यावे अशीच स्वित्झर्लंडमधली परिस्थिती होती. उदाहरणार्थ, वर उल्लेख केलेल्या दूधशेतीत तंत्रज्ञानाचा वापर पावलोपावली होत होता. एका प्लॅटफॉर्मवर गाय उभी राहायची, तिच्या आचळांभोवती यांत्रिक दुग्धशोषक (suckers) जोडले जायचे, ठराविक वेळात दूध काढले गेले की ते आपोआप मोकळे व्हायचे, सरकत्या प्लॅटफॉर्मवरून ती गाय पुढे जायची व तिच्या जागी पुढची गाय यायची. पुढे हे दूध पाइपलाइनीतून एकत्र करणे, ह्या दुधावर प्रक्रिया करणे, त्याचे गुणवत्तेनुसार वर्गीकरण करणे, ते साठवणे, त्याचे पॅकिंग, वितरण इत्यादी सर्व प्रक्रियांमध्ये मानवी हस्तस्पर्श अजिबात नाही.

 शेती, तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन यांची उत्तम सांगड स्वित्झर्लंडने कशी घातली आहे ह्याचे तेथील नेसले (Nestle) कंपनी हे उत्तम उदाहरण आहे. शेतकरी भरणा करत असलेल्या दुधाला त्यांनी उत्तम भाव दिला, त्याच्या समृद्धीला हातभार लावला. त्याशिवाय नुसते दूध वा दुधापासून तयार होणारे लोणी, दही वा चीज तुम्ही किती विकू शकता ह्याला मर्यादा आहे, हे ओळखून नेसले कंपनीने बेबीफूड, चॉकोलेट्स व 'मॅगी'सारखे 'फास्ट फूड' बनवायला सुरुवात केली, त्यांची निर्यात सुरू केली आणि आज त्या क्षेत्रांत ती जगातील एक अग्रगण्य कंपनी मानली जाते.
 इतक्या मोठ्या मल्टिनॅशनल कंपनीचे मुख्य कार्यालय जिनिव्हा, झुरिक, बर्न अथवा बाझल यांसारख्या कुठल्याच मोठ्या स्वीस शहरात नाही, तर वेवेसारख्या एका अगदी छोट्या गावात आहे हे आपण लक्षात घेणेही खूप महत्त्वाचे आहे.
 चौथा मुद्दा म्हणजे मानवी जीवनातील स्वातंत्र्य ह्या मूल्याचे पायाभूत महत्त्व.
 स्वीस लोकांनी व्यक्तिस्वातंत्र्याची जपणूक इतर कोणत्याही देशापेक्षा अधिक जागरूकतेने केली आहे. ह्या देशात सार्वजनिक बसेसचा रंग कोणता असावा यावरसुद्धा (referendum) घेतले गेले आहे! खऱ्या अर्थाने लोकशाहीचे जतन केलेला हा देश आहे. आपापला कारभार चालवण्यात प्रत्येक काउंटीला भरपूर स्वातंत्र्य आहे व तेच स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीलाही दिले गेले आहे. ह्या स्वातंत्र्याच्या संकल्पनेभोवतीच ह्या देशाचे अस्तित्व गंफलेले आहे.
 आपल्या सर्व भावी आयुष्यात स्वातंत्र्य हे मूल्य जोशींनी कायम सर्वाधिक महत्त्वाचे मानले. एक गंमत म्हणजे डोंगर चढण्याचा छंद हाही कुठेतरी ह्या स्वातंत्र्यप्रेमाशी जोडलेला असावा. स्वित्झर्लंडमध्ये हे डोंगरांचे प्रेम सार्वत्रिक आहे. हा देश डोंगरांचाच बनलेला आहे; देशात कुठेही जा, डोंगर तुमच्यापासून लांब नसतात. जोशींना लहानपणापासून डोंगरांचे आकर्षण होतेच, पण भारतात डोंगर चढायला फारसा वाव नव्हता; नोकरी मुख्यतः शहरांतच होती. स्वित्झर्लंडमध्ये मात्र ह्या गिर्यारोहणाला भरपूर वाव मिळाला. आपली बरीचशी बंधने ही भूमीशी निगडित असतात व डोंगर चढताना माणस जसजसा वर चढत जातो, तसतसा मानसिक पातळीवरतरी तो ह्या बंधनांपासून दूर होत जातो. 'As we elevate ourselves, we become freer and freer' असे कोणीसे म्हटले आहे. जोशींचे स्वातंत्र्यप्रेम हा आयन रँडसारख्यांचा प्रभाव असेल, इतरही काही संस्कारांचा प्रभाव असेल, पण कुठेतरी स्वित्झर्लंडचाही एक वारसा असू शकेल.

 आर्थिक समृद्धीचे जीवनातील महत्त्व, देशात ती यावी यासाठी शेतीला द्यावयाची प्राथमिकता, तंत्रज्ञानाचा परिपूर्ण वापर आणि स्वातंत्र्याची दुर्दम्य लालसा ह्या चतुःसूत्रीला जोशींच्या भावी जीवनातही बरेच महत्त्व आहे व या चतुःसूत्रीचा पाया बळकट व्हायला स्वित्झर्लंडमधली आठ वर्षे बऱ्यापैकी कारणीभूत झाली असावीत.

 



मातीत पाय रोवताना


 शरद जोशी स्वित्झर्लंड सोडून सहकुटुंब भारतात परतले १ मे १९७६ रोजी.
 ते आणीबाणीचे दिवस होते. २५ जून १९७५मध्ये पुकारलेल्या आणीबाणीला सुरुवातीला झालेला थोडाफार विरोध थोड्याच दिवसांत मावळला होता. काही लोकशाहीप्रेमी सरकारविरुद्ध लढा देत होते, पण तो बहुतांशी छुप्या स्वरूपातला होता; जाहीररीत्या सरकारविरुद्ध कारवाया अशा होत नव्हत्या. 'गाड्या बघा आता कशा अगदी वेळेवर धावतात!' हे कौतुक सारखे कानावर पडायचे.
 योगायोग म्हणजे त्या दिवशी जोशींनी पुण्याला जाण्यासाठी डेक्कन क्वीन पकडली. तेव्हा ती नेमकी अर्धातास उशिरा सुटली होती! आणीबाणीसमर्थकांचा निदान एक दावा तरी चुकीचा होता ह्याचा त्यांना प्रत्यय आला!  आपले बहुतेक घरगुती सामान त्यांनी युरोपातून बोटीने मागवले होते व ते येण्यास अजून काही दिवस लागणार होते. कपडे वगैरे आवश्यक तेवढ्या सामानाच्या चार बॅगा घेऊन, पत्नी लीला आणि गौरी व श्रेया ह्या दोन मुली यांच्यासह ते टॅक्सीने विमानतळावरून दादर स्टेशनवर आले होते व तिथेच त्यांनी व्हीटीहन नेहमी संध्याकाळी पाच दहाला निघणारी डेक्कन क्वीन पकडली होती. प्रथम वर्गाची तिकिटे असल्याने गाडीत जागा तर मिळाली, पण पूर्वीप्रमाणे गाडीत कुठेच कोणाच्या गप्पा रंगल्या नव्हत्या. सगळा शुकशुकाट.
 "कधीच लेट न सुटणारी गाडी आज चक्क अर्धा तास लेट सुटली!" शेजारच्या माणसाला ते सहज काहीतरी गप्पा सुरू करायच्या म्हणून म्हणाले, तशी त्याने व आजूबाजूच्या दोन-तीन जणांनी चमकून त्यांच्याकडे पाहिले. सगळ्यांचेच चेहरे सावध दिसत होते. भारतात सध्या प्रचंड सरकारी दहशत आहे हे त्यांनी स्वित्झर्लंडमध्ये असताना वाचले होते व ते खरेच असावे हे त्या पहिल्याच संध्याकाळी जाणवले. पुढचा प्रवास जोशी कुटुंबीयांनी आपापसातच वरवरच्या गप्पा मारत पार पाडला.
 त्यांच्यासारख्या कमालीच्या स्वातंत्र्यप्रेमी आणि त्यातही पुन्हा स्वित्झर्लंडसारख्या देशात आठ वर्षे राहून परत येणाऱ्या गृहस्थाला ही दहशत बोचणारी होती. पण त्याचवेळी कसाही असला, तरी हाच आपला देश आहे आणि यापुढे आपण इथेच राहायचा निर्णय स्वखुशीने घेतला आहे ह्याची जाणीव त्यांना होती. सगळ्या राजकीय घडामोडींपासून आपण अगदी अलिप्त राहायचे आहे व फक्त शेतीवरच आपले सर्व लक्ष केंद्रित करायचे आहे, ह्याची खूणगाठ त्या पहिल्या संध्याकाळीच त्यांनी मनाशी पक्की बांधली.
 पुण्याला पोचल्यावर रेल्वेस्टेशनवरून ते सहकुटुंब डेक्कनवर श्रेयस हॉटेलात गेले. इथल्या दोन खोल्या त्यांनी पूर्वीच आरक्षित करून ठेवल्या होत्या. आईसमवेत सदिच्छा बंगल्यात न राहता स्वतःचे वेगळे घरच विकत घ्यायचे व ते सापडेस्तोवरदेखील हॉटेलातच राहायचे जोशींनी ठरवले होते. त्यादृष्टीने थोडीफार चौकशी त्यांनी स्वित्झर्लंडमध्ये असतानाच करून ठेवली होती.
 त्याप्रमाणे ते लगेच कामाला लागले. सहाएक आठवड्यांतच एक बंगला त्यांनी खरेदी केला. औंध येथील सिंध सोसायटीत ७०५ क्रमांकाचा. तीन बेडरूम्स असलेला. शिवाय पुढेमागे थोडी बाग होती. परिसर निवांत होता. मालक एक शाळामास्तर होते. त्याकाळी पुण्यापासून लांब समजल्या जाणाऱ्या औंधसारख्या ठिकाणी घरे बऱ्यापैकी स्वस्तात उपलब्ध होती. घराचे नाव त्यांनी मृद्गंध ठेवले. त्या नावाचा विंदा करंदीकर यांचा कवितासंग्रह प्रसिद्ध होता व शिवाय त्या शब्दातच काव्यात्मकता होती. जोशींसारख्या कविताप्रेमीला तो शब्द भावला. त्यांनी बंगला घेतला त्यावेळी पावसाळा नुकताच सुरू झाला होता व औंध परिसरात तेव्हा बऱ्याच शेतजमिनी असल्याने खूपदा हवेत हवाहवासा वाटणारा मृद्गंध दाटून येई, हेदेखील त्यामागचे कदाचित एक कारण असू शकेल.

 पुढच्या काही दिवसांत बोटीने येणारे त्यांचे सामानही येऊन पोचले. ते नीट लावण्यात बराच वेळ गेला. 'बर्नमधल्या माझ्या खोलीत जे सामान आहे, ते सगळंच्या सगळं पुण्यातल्या माझ्या खोलीत असलं, तरच मी पुण्याला येईन, अशी धाकट्या गौरीची अटच होती. नव्या जागी वास्तव्य सुरू करायचे म्हणजे धावपळ तर अपरिहार्यच होती. शहरापासून इतक्या लांब त्यावेळी सार्वजनिक वाहनव्यवस्था नव्हती; दिवसभरात जेमतेम सात-आठ बसेस औंधमार्गे पिंपरी-चिंचवडकडे जायच्या. शिवाय बहुतेक सगळ्या खरेदीकरिता डेक्कनला जावे लागे. त्यामुळे त्यांनी लगेचच स्वतःसाठी एक लॅम्ब्रेटा स्कूटर घेतली व सहकुटुंब कुठे जाता यावे म्हणून काही दिवसांनी एक सेकंडहँड जीप गाडीही खरेदी केली..
 घर शोधत असतानाच मुलींसाठी चांगली शाळा कुठे मिळेल याचाही शोध चालूच होता. कारण ते अगदी शाळा सुरू व्हायचेच दिवस होते. स्वित्झर्लंडमध्ये दोन्ही मुलींना इतर विषयांबरोबरच फ्रेंच, जर्मन व लॅटिन हे तीन विषय होते; इथे पुण्यात मात्र त्याऐवजी इंग्रजी, हिंदी व मराठी हे विषय होते. पाचगणीला एका मुलींच्या प्रख्यात निवासी शाळेत फ्रेंच हा विषय अभ्यासक्रमात आहे असे त्यांनी ऐकले होते व नव्या शाळेतला एकतरी विषय मुलींना चांगला येणारा असावा म्हणून एकदा सगळे पाचगणीला जाऊनही आले. शाळेला मैदान वगैरे उत्तम होते, इमारत प्रशस्त होती, पण निवासव्यवस्था दाटीवाटीची व अस्वच्छ होती – निदान नुकतेच स्वित्झर्लंडहून आलेल्यांच्या दृष्टीनेतरी. 'आम्ही ह्या असल्या डॉर्मिटरीमध्ये चार दिवससुद्धा राहू शकणार नाही' असे दोन्ही मुलींनी स्पष्ट सांगितले. मुळात भारतात परत यायचा वडलांचा निर्णय मुलींना मनापासून मान्य नव्हताच; कशीबशी वडलांच्या आग्रहापुढे त्यांनी मान तुकवली होती. अशा परिस्थितीत त्यांना अमान्य असलेल्या शाळेत घालून अधिक नाराज करणे वडलांना परवडणारे नव्हते. पाचगणीच्या शाळेत मुलींना घालायचा इरादा त्यांना सोडून द्यावा लागला.
 पुण्याला परतल्यावर दुसऱ्याच दिवशी पाषाण भागात असलेली सेंट जोसेफ ही जुनी कॉन्व्हेंट शाळा ते बघायला गेले व ती त्यांना चांगली वाटली. शिक्षणखात्याच्या कार्यालयात तीन चार चकरा टाकल्यावर इथे प्रवेश मिळू शकेल हे तेथील अधिकाऱ्यांकडून कळले. शाळेच्या स्वतःच्या बसेस होत्या व कधी गरज पडली तर घरापासून पायीसुद्धा पंधरा-वीस मिनिटांत जाता येईल इतकी ती जवळ होती. विशेष म्हणजे तिथे फ्रेंच हा विषय होता. त्याच शाळेत मग मुलींचे नाव घातले गेले.

 हे सगळे होत असतानाच एकीकडे त्यांनी शेतीसाठी जमिनीचा शोधही सुरू केला होता. पूर्णतः पावसावर अवलंबून असलेली कोरडवाहू जमीनच घ्यायची हे त्यांनी परदेशात असतानाच नक्की केले होते. त्यांची आई व अन्य भावंडे ह्यांना जोशी करत होते तो कमालीचा विक्षिप्तपणा वाटत होता. मुळात त्यांच्या खानदानात कधी कोणी शेती केलीच नव्हती. पण त्यांनी 'तुला काय योग्य वाटेल ते कर' अशीच भूमिका घेतली. एकदा आपल्या शरदने एखादी गोष्ट ठरवली, की ती केल्याशिवाय तो कधीच राहणार नाही हे घरच्यांना चांगले ठाऊक होते. आश्चर्य म्हणजे, अन्य जवळ जवळ कोणीच त्यांच्या उपक्रमाबद्दल फारसे कुतूहल दाखवलेच नाही! म्हणजे उत्तेजनहीं दिले नाही आणि टीकाही केली नाही. हा शहरी मध्यमवर्गीय अलिप्तपणा म्हणायचा की काय कोण जाणे!
 नात्यागोत्यांतल्या बहुतेकांनी दाखवलेल्या या अलिप्ततेच्या अगदी उलट अनुभव म्हणजे रावसाहेब शेंबेकर यांच्याशी झालेली भेट, तशी त्यांची काहीच पूर्वओळख नव्हती. कोणाकडून तरी त्यांनी जोशीविषयी ऐकले व कुतूहल वाटून ते खास त्यांना भेटायला म्हणून पुण्याला आले. शेंबेकर यांची स्वतःचीही उसाची बरीच शेती होती. ते म्हणाले, "बागायती शेतीतूनही शेवटी शेतकऱ्याच्या पदरी तोटाच येतो. हे मी माझ्या अनुभवातून सांगतोय. नाहीतरी तुम्हाला प्रयोगच करायचा आहे ना? मग त्यासाठी बागायती शेती का नाही घेत? हवं तर मीच माझ्या जमिनीचा एक चांगला तुकडा तुम्हाला प्रयोगासाठी देतो. त्याचे तुम्ही मला काहीही पैसे देऊ नका." खरेतर ह्या भल्या गृहस्थाने आपणहून दिलेला सल्ला अगदी योग्य असाच होता. शिवाय सोबत प्रत्यक्ष मदतीचे अत्यंत दुर्मिळ व ठोस असे आश्वासनहीं होते; पण जोशींनी तो जुमानला नाही; आपला कोरडवाहू शेतीचा आग्रह सोडला नाही. बऱ्याच वर्षांनी, २० जून २००१ रोजी, 'दैनिक लोकमत'मध्ये लिहिलेल्या आपल्या एका लेखात ते म्हणतात,

शक्य तितक्या सौजन्याने मी रावसाहेब शेंबेकरांना काढून लावले. कोरडवाहू कातळात पाणी शोधण्याच्या आणि शेती फुलवण्याच्या कामात गढून गेलो.

शेंबेकरांच्या मनात किती सच्चाई आणि कळकळ होती ते कळायला मला दहा वर्षे लागली. त्यांचा तेवढा एक अपवाद सोडला तर शेतीच्या प्रयोगात मला सल्ला देण्याचा किंवा मी काय करतो आहे ते समजून घेण्याचा उपद्व्याप करणारे इतर कोणीच आले नाहीत.

 आल्याआल्याच जोशींनी किर्लोस्कर कन्सल्टंट्स या प्रसिद्ध कंपनीला सल्लागार म्हणून नेमले होते; योग्य ती शेतजमीन शोधून देण्यासाठी. उगाच इकडच्या तिकडच्या ओळखीवर अवलंबून राहण्यापेक्षा प्रत्येक गोष्ट व्यावसायिक तत्त्वावर करण्याची त्यांची इच्छा होती. कंपनीच्या वतीने एका अधिकाऱ्यावर हे काम सोपवले गेले. पण त्या सल्लागाराचाही फारसा उपयोग होत नव्हता. यवत व उरळीकांचन येथे काही सुपीक विकाऊ जमिनी त्यांनी दाखवल्या; जोशींनी त्यांतली एखादी जमीन खरेदी करावी असा त्यांचा सल्ला होता. अशा भेटींच्या वेळी बहुतेकदा लीलाताईदेखील बरोबर असत. 'उसाच्या शेतीतदेखील हवे ते प्रयोग आपण करू शकू. शिवाय, त्यात धोका कमी आहे. आपल्याला आता केवळ शेतीवरच उदरनिर्वाह करायचा आहे, तेव्हा जिथे चार पैसे सुटायची थोडीतरी शक्यता आहे, तीच जमीन का खरेदी करू नये?' असे त्यांचे म्हणणे. पण जोशी आपल्या निर्णयापासून जराही हटायला तयार नव्हते.
 शेवटी एकदाची हवी होती तशी कोरडवाहू शेतजमीन जोशींना मिळाली. त्या मागेही एक योगायोगच होता. एक निवृत्त पोलीस इन्स्पेक्टर जोशींच्या ओळखीचे झाले होते. त्यांनी त्यांच्या एका मित्राची जोशींबरोबर ओळख करून दिली. पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील चाकण ह्या गावापासून सात किलोमीटरवर आंबेठाण नावाचे एक छोटे खेडे होते. ह्या मित्राची तिथे जमीन होती, पण त्यांनी वेळोवेळी बँकेकडून घेतलेल्या कर्जापोटी ती गहाण पडली होती. खूप तगादा लावूनही त्यांच्याकडून कर्ज फेडले जात नसल्याने शेवटी बँकेने जमिनीचा लिलाव करायचे ठरवले होते. या परिस्थितीत काही मार्ग निघतो का, हे बघायला ते जोशींकडे आले होते.
 जोशींची ती जमीन प्रत्यक्ष बघायची इच्छा होती व त्यानुसार दुसऱ्याच दिवशी दोघे तिथे गेले. वाटेत त्यांच्या बऱ्याच गप्पा होतच होत्या. त्यांचा मोकळाढाकळा स्वभाव जोशींना आवडला व त्याच दिवशी बँकेचे एकूण जितके कर्ज थकले होते. तेवढे पैसे जोशींनी त्यांच्या बँकेत रोख भरले व त्यांची जमीन लिलावापासून वाचवली.
 पण तेवढ्याने त्यांची पैशाची गरज भागणार नव्हती. कारण आता दुसऱ्या काही कामासाठी त्यांना पुन्हा पैशांची गरज होती. पुन्हा एकदा जोशींनी त्यांना रोख पैसे कर्जाऊ दिले. असे दोन-तीनदा झाले. ते शेतकरी बँकेच्या कर्जातून मुक्त झाले, तरी आता जोशींचे बरेच पैसे त्यांच्याकडे थकले होते व ते परत मिळायची काही लक्षणे दिसेनात. जोशींच्या कर्जातून मुक्त होण्यासाठी म्हणून शेवटी त्यांनी आपली ती जमीनच जोशींना विकायचे ठरवले.  प्रत्यक्ष व्यवहार करण्यापूर्वी एकदा ती जमीन नीट पारखून बघावी, ह्या उद्देशाने जोशी पतिपत्नी त्यांच्याबरोबर पुन्हा आंबेठाणला गेले. त्या जमिनीच्या बरोबर समोर तुकाराम महाराजांचा भामचंद्राचा डोंगर होता- जिथे ते चिंतन करायला एकांतात बसत. त्या डोंगराला एक विशिष्ट उंचवटा आहे. योगायोग म्हणजे बर्नमधल्या जोशींच्या घराजवळ जो गानट्र नावाच्या डोंगराचा भाग होता, अगदी तसाच तो उंचवटा दिसत होता. जोशीना एकदम तो जागा आवडली. या डोंगराच्या गानटशी असलेल्या साधामळे इथेच शेती करायचा योग आपल्या आयुष्यात आहे असे काहीतरी त्यांना वाटले. लगेचच त्या शेतकऱ्याने सांगितलेली किंमत जोशींनी चुकती केली व ती शेतजमीन विकत घेतली. १ जानेवारी १९७७ रोजी.
 ही एकूण साडेतेवीस एकर जमीन होती. त्या जागेचे नाव जोशींनी 'अंगारमळा' असे ठेवले. 'क्रांतीचा जयजयकार' ही कुसुमाग्रजांची कविता जोशींच्या खूप आवडीची. त्याच कवितेतील 'एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार, होता पायतळी अंगार' ह्या ओळीवरून हे नाव त्यांना सुचले. पुढील आयुष्यात त्या जागी जोशींची जी वाटचाल झाली त्यातील दाहकता विचारात घेता हे नाव अगदी समर्पक ठरले असेच म्हणावे लागेल.
 सरकारी नियमानुसार जो शेतकरी नाही त्याला शेतजमीन विकत घेता येणे आजच्याप्रमाणे त्याकाळीही अतिशय अवघड होते. पण प्रत्येक कायद्याला काही ना काही पळवाटा असतातच. ५ जुलै २००१ रोजी 'दैनिक लोकमत'मधील आपल्या एका लेखात त्यांनी लिहिले आहे,

मी सरकारी नोकरीत असताना रिझर्व्ह बँकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांशी ओळख झाली होती. त्यांचे चिरंजीव आयएएस पास होऊन प्रांत म्हणून काम बघत होते. त्यांच्या मदतीने मार्ग सापडला.

 कोकणातला रायगड जिल्हा आणि पुणे जिल्हा यांच्या सीमेवरच्या खेड तालुक्यातील चाकण हे गाव. शिवाजी महाराजांनी बारा मावळांपासून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. चाकण हे या मावळ मुलुखाचे प्रवेशद्वार. इथलेच लढवय्ये मावळे त्यांचे जिवाभावाचे सोबती.
 असे ऐतिहासिक महत्त्वाचे गाव असूनही इथला सामान्य शेतकरी मात्र कमालीच गांजलेला होता. दुष्काळातील त्याच्या दुःखाचे हृदयस्पर्शी वर्णन तुकाराम महाराजांनी केलेले आहे; पण दुष्काळ नसतानाही त्याची परिस्थिती फारशी काही वेगळी नसायची.
 इथे सतत लढाया चालू असत. कधी दिल्लीचे मोगल आक्रमण करत तर कधी विजापूरच्या अदिलशहाचे सरदार, कधी सिद्धी जोहरचे सैनिक तर कधी पेंढाऱ्यांचे लहानमोठे हल्ले. प्रत्येक स्वारीत उभी पिके कापली जात, गावे लुटली जात, अगदी बेचिराख केली जात. आक्रमक कोणीही असला तरी शेतकऱ्याचे हाल सर्वाधिक असत. त्याचे घरदार, बैलनांगर, बी-बियाणे, पाण्याची व्यवस्था सारे नष्ट होऊन जाई. पुन्हा त्याला शून्यातून सुरुवात करावी लागे आणि जे नव्याने उभारायचे तेही कधी लुटले जाईल ह्याचा काहीच नेम नसायचा. स्थैर्याच्या पूर्ण अभावामुळे मोठे असे काही उभारायची, भविष्यासाठी बचत करायची, संपत्ती निर्माण करायची सारी प्रेरणाच नाहीशी होऊन जायची. राजेमहाराजांच्या स्वाऱ्या, त्यांच्या आपापसातील लढाया, त्यांचे पराक्रम ह्या सगळ्यांनी भरलेल्या इतिहासात त्या सामान्य शेतकऱ्याची काहीच नोंद होत नव्हती. होणारही नव्हती. माणसाचा स्वतःच्या प्रयत्नावरचा सगळा विश्वास उडून जावा व अपरिहार्यपणे, केवळ जगण्यापुरते तरी बळ मिळावे म्हणून त्याने दैववादी बनावे, ठेविले अनंते तैसेची राहावे' हाच आदर्श समोर ठेवून गेला दिवस तो आपला समजत जगावे, अशीच एकूण परिस्थिती होती. पिढ्यानपिढ्या हे असेच चालत आले होते व त्या संचितातूनच शेतकऱ्याची विशिष्ट मानसिकता घडत गेली होती.
 भामा ही इथली प्रमुख नदी. वांद्रे गावाजवळ ती उगम पावते व पुढे भीमा नदीला मिळते. भामा नदीवर जवळच आसखेड धरण आहे. चाकण हे एक टोक पकडले तर वांद्रे गाव हे दुसरे टोक. वांद्र्याच्या पलीकडे रायगड जिल्हा सुरू होतो. वांद्रे व चाकण या दोन टोकांमधले अंतर ६४ किलोमीटर. ह्या भागाला भामनहरचे (किंवा भामनेरचे) खोरे असे म्हटले जाते व याच रस्त्यावर चाकणपासून सात किलोमीटरवरचे आंबेठाण हे एक छोटेसे गाव. इथला सगळा परिसर डोंगराळ. कांदे, बटाटे, ज्वारी आणि भुईमूग ही मुख्य पिके; खोऱ्याचा वांद्र्याजवळचा जो भाग आहे तिथे पाऊस जास्त पडत असल्याने भाताचे पीक घेतले जायचे.

 रोज सकाळी सहा वाजता औंधमधील आपल्या घरून जोशी स्कूटरवरून निघायचे आणि ४० किलोमीटरवर असलेल्या आंबेठाणला सकाळी सातपर्यंत पोचायचे. कधी कधी लीलाताईदेखील सोबत येत. अशावेळी ते आपली महिंद्रची पांढरी जीप गाडी आणत. संध्याकाळी काळोख पडला की औंधला परतत. दिवसभर शेतीचे काम करता करता जमेल तेव्हा इतर गावकऱ्यांशी संवाद साधत, त्यांची शेती अभ्यासत.
 आधी त्यांनी जमिनीला कंपाऊंड घालायचे काम हाती घेतले. दोन बाजूंना भिंत, तिसऱ्या बाजूला तार व चौथ्या बाजूला घायपात. घायपात म्हणजे निवडुंगासारखी बांधावर लावली जाणारी झाडे, ह्याची पाने शेळ्या-बकऱ्या खात नसल्याने ती दीर्घकाळ टिकतात व त्यांच्यापासून भाजीच्या जुड्या वगैरे बांधायला लागणारा जाडसर धागा मिळतो. हे असले ज्ञान प्रत्यक्ष शेतीत उतरल्यावरच जोशींना मिळाले. इथली बहुतेक जमीन उंचसखल, खडकांनी भरलेली अशी होती; किंबहुना म्हणूनच ती त्यांना स्वस्तात मिळू शकली होती. कित्येक वर्षे तिथे कुठलेच पीक घेतले गेले नव्हते. शेतीसाठी ती सर्वप्रथम नीट सपाट (लेव्हल) करून घेणे आवश्यक होते. पाणी उपलब्ध व्हावे म्हणून त्यांनी दोन विहिरीही खणायला घेतल्या. सुदैवाने पाणी चांगले लागले. पाइपाने पाणी सगळीकडे खेळवायचीही व्यवस्था केली. जमिनीवर दोन खोल्यांचे स्वतःसाठी एक घर बांधले. घराशिवाय एक सामानाची खोली होती, शेतीची अवजारे, खते व तयार शेतमाल ठेवायला मोठी शेड होती. म्हशी पाळायचा त्यांचा विचार होता व त्यासाठी गोठाही बांधायला घेतला. वीज महामंडळाकडे अनेक चकरा टाकून विजेची जोडणी करवली. अडचणीच्या वेळी अत्यावश्यक म्हणून टेलिफोनचीही सोय करून घेतली. त्या परिसरातले ते पहिले टेलिफोन कनेक्शन, शून्यातूनच सगळी सुरुवात करायची म्हटल्यावर एकूण प्रकरण तसे अवघडच होते; विशेषतः यावेळी जोशींची चाळिशी उलटलेली असल्यामुळे. पण ते चिकाटीने एकेक करत कामे मार्गी लावू लागले.
 सुरुंग लावणे, मोठाले खडक उकरून बाहेर काढणे, पिकांसाठी प्लॉट पाडणे, बांध घालणे, पाइप लाइन्स टाकणे, अंतर्गत कच्चे रस्ते तयार करणे, कुंपण घालणे, अशी अगणित कामे होती. सर्वात आधी गरज कामगारांची होती. निदान शे-दीडशे माणसे रोज कामाला लागणार होती. मोठे मोठे खडक उकरून जमीन सारखी करताना आणि विहिरी खणताना त्या खडकांखाली दडलेले लांब लांब, मनगटाएवढे जाड साप चवताळून बाहेर पडत. त्यांच्या पुरातन घरांवरतीच इथे आक्रमण होत होते. साप सापडला नाही असा एक दिवस जात नसे. मजुरांना काम करताना सापांची भीती वाटायची. नाथा भेगडे नावाचा एक माणूस जोशींनी शेतीकामासाठी मुकादम म्हणून नेमला होता. तो रोज फटाफट साप मारत असे.
 शक्यतो पुढच्या चार-पाच महिन्यांत जास्तीत जास्त कामे संपवावीत असे जोशींनी ठरवले होते, कारण नंतर मजुरीला माणसे मिळतीलच अशी खात्री नव्हती. खुद्द आंबेठाणमध्ये भूमिहीन मजूर असे जवळजवळ कोणीच नव्हते; प्रत्येकाची थोडीफार तरी शेती होतीच. पण तरीही स्वतःचे शेतीकाम संपल्यावर अधिकच्या कमाईसाठी सगळेच कुठे ना कुठे मजुरीवर जात. पण आपल्याला गरज असेल तेव्हा ते मजुरीसाठी उपलब्ध असतील याची शाश्वती नव्हती. सुदैवाने रब्बी पिकांचे काम झाल्यावर बहुतेक गावकऱ्यांना फारसे काही काम नसायचेच व त्यामुळे त्या कालावधीत पुरेसे मजूर उपलब्ध झाले. बरेचसे लांब लांब राहणारे कातकरी होते.
 त्यावेळी मुक्काम करता येईल असा शेतावर आडोसा नव्हता. स्वित्झर्लंडहून आणलेली एक स्लिपिंग बॅग जोशींनी इथे आणून ठेवली होती; तशीच वेळ आली तर काहीतरी सोय असावी म्हणून. पण पुण्यातही कामे असायचीच; त्यामुळे जोशी शक्यतो झोपायला औंधला जात. अर्थात रोज न चुकता सकाळी सातच्या आत शेतावर हजर असत. वीजजोडणी, प्लंबिंग, सुतारकाम, गवंडीकाम अशी काही कामे कंत्राटावर दिलेली होती. ती मंडळी आपापले सामान घेऊन येत, आपापले काम करत; पण त्यांच्यावरही लक्ष ठेवावे लागे. बाकी कामे जोशी स्वतःच सांभाळत. एकाच वेळी चारपाच ठिकाणी कामे सुरू असत. जोशी जरा वेळ एका कामावर जायचे, तर जरा वेळाने दुसऱ्या कामावर. प्रत्येक ठिकाणी पाळीपाळीने स्वतः रांगेत उभे राहत, घमेली उचलत, दगडगोटे इकडून तिकडे टाकायचे काम करत. विहीर खणण्याच्या कष्टाच्या कामातही ते हाफ पँट घालून स्वतः खड्ड्यात, चिखलात उतरत. इतरांनाही कामाला हुरूप यावा, ही भावना त्यामागे होतीच; पण आठ वर्षे युरोपात काढल्यावर स्वतःच्या हाताने काम करायची तशी त्यांना सवयही झाली होती. इतर अनेक शहरी सुशिक्षित भारतीयांना वाटते तशी शरीरश्रमांची त्यांना लाज वाटत नसे; आणि शिवाय एकदा एखादे काम स्वतःच्या इच्छेने अंगावर घेतल्यावर सर्व ताकदीनिशी त्याला भिडायचे हा त्यांचा स्वभावच होता. स्वतः मजुरांच्या बरोबरीने काम करण्यात त्यांचा आणखीही एक उद्देश होता. तो म्हणजे त्यांच्याशी गप्पा मारणे व त्यातून गावकऱ्यांचे जगणे अधिक चांगले समजून घेणे.   सुरुवातीला गावकऱ्यांशी जोशींचा जरा वाद झाला. बाहेरून येणाऱ्या या कातकऱ्यांना मजुरी म्हणून किमान वेतन कायद्याप्रमाणे रोजचे तीन रुपये द्यायचे आणि स्त्री व पुरुष दोघांनाही सारखेच पैसे द्यायचे असे जोशींनी ठरवले होते. त्यांना स्वतःला ही मजुरी अगदी नगण्य वाटत होती. परदेशात काही वर्षे राहिलेल्या व तिथल्या किमतीची सवय झालेल्या माणसाला भारतात आल्यावर इथल्या सर्वच किमती, विशेषतः मानवी श्रमांचे इथले मूल्य, अगदीच नगण्य वाटते, तसाच हा प्रकार होता. पण मजुरीच्या ह्या दरामुळे गावकऱ्यांमध्ये मात्र खळबळ माजली, कारण ते स्वतः त्यांच्या शेतीच्या कामासाठी रोजी फक्त दीड रुपया मजुरी देत होते. "तुम्ही लोकांना इतकी मजुरी देऊन लाडावून ठेवलं, तर आम्हाला आमच्या कामासाठी मजूर कसे मिळणार? तुम्हाला ते परवडत असेल; पण आम्हाला नाही ना परवडणार!" असे त्यांचे म्हणणे होते.

  "मी बाहेरून आलेला माणूस आहे. कायद्याने ठरवून दिली आहे त्यापेक्षा कमी मजुरी मी दिली तर तो गुन्हा होईल. मला ते करणं कसं शक्य आहे?" जोशी त्यांना समजावू लागले.

  गावकऱ्यांना ते पटले नाही, पण त्यांनीही मग तो मुद्दा फारसा रेटून धरला नाही. कारण त्यांच्यातले जे जोशींच्या शेतावर मजुरीला जायचे, त्यांना स्वतःलाही ही वाढीव मजुरी मिळतच होती व हवीच होती. जोशींचे काम संपले, की पुन्हा मजुरीचे दर आपोआपच खाली येतील, अशीही त्यांची अटकळ असावी.

  इथे एक मुद्दा स्पष्ट करायला हवा - शेतकरी व शेतमजूर असा काहीच भेद त्या मजुरांमध्ये नव्हता. ते स्वतः शेतकरीही होते व त्याचवेळी अधिकचे चार पैसे हाती पडावेत म्हणून शेतमजुरीही करत होते. जे फक्त मजुरी करत तेही एकेकाळी शेतकरी होतेच; पुढे कधीतरी त्यांच्या जमिनी कर्जापोटी गहाण तरी पडल्या होत्या किंवा विकल्या गेल्या होत्या. आयुष्यात पुढे जेव्हा काही विचारवंत 'तुम्ही फक्त शेतकऱ्यांचा विचार करता, शेतमजुरांचा नाही' असा आरोप करत, तेव्हा आपल्या शेतावरचे हे मजूर त्यांच्या डोळ्यांपुढे उभे राहत व असल्या निव्वळ पुस्तकी आरोपातील स्वानुभवावरून कळलेला फोलपणा त्यांना प्रकर्षाने जाणवे.

  गावकऱ्यांना मजुरीचे इतके कमी असलेले दरही परवडत नव्हते ह्याचे कारणही अर्थातच जोशींना साधारण ठाऊक होते आणि येत्या काही दिवसांत प्रत्यक्ष अनुभवानेही ते अधिक चांगले कळणार होते - ते कारण म्हणजे गावकरी विकत असलेल्या ज्वारीचा त्यांच्या हाती पडणारा दर त्यावेळी क्विटलला (१०० किलोना) फक्त सत्तर रुपये होता आणि कांद्याचा भाव फक्त वीस रुपये होता!

  ह्या मजुरांचे, विशेषतः कातकरी मजुरांचे दारिद्र्य हृदय हेलावून टाकणारे होते. इथल्या आदिवासींत कातकरी व ठाकर असे दोन समाज मुख्य होते. सगळे तसे विस्थापित. वेगवेगळ्या धरणयोजनांमुळे कोकणातून बाहेर पडून वांद्रेमार्गे इथे आलेले. साधारण निम्मे मजूर पुरुष होते तर निम्म्या बायका. सगळ्यांचीच शरीरयष्टी कृश. लहानपणापासून आबाळ

झालेली. पुरेसा पोषक आहार न मिळाल्याने मुळातच अवयवांची नीट वाढ न झालेली. (आदिवासी स्त्रिया व पुरुष यांच्या आकारमानात फारसा फरक का नसतो, हा भविष्यात जोशींच्या एका अभ्यासाचा विषय होता.) अंगारमळ्यात येण्यासाठी यांतल्या अनेकांना पाचपाच, दहा-दहा किलोमीटर चालावे लागे. रणरणत्या उन्हात. काट्याकुट्यांतून, जवळजवळ कोणाच्याही पायात चपला नसायच्या. संध्याकाळी घरी जाताना पुन्हा तोच प्रकार. जोशी लिहितात,

निसर्गाने बुडवलेल्या, चोरांनी लुटलेल्या, सावकारांनी नाडलेल्या, सुलतानांनी पिडलेल्या, धर्मजातींनी गांजलेल्या या मंडळींच्या जवळ जाण्याचा मी प्रयत्न करीत होतो; पण कुणी खुलेपणाने बोलत नव्हते. त्यांच्यात माझ्यात अंतर किती? ते उल्लंघावे कसे? पुढे पुढे मला एक युक्ती कळली - निबंधवार उत्तरे द्यावी लागतील असे प्रश्न विचारायचेच नाहीत. वस्तुनिष्ठ प्रश्न विचारायचे. उत्तरे आपण सुचवायची. उत्तर काय दिले जाते, यापेक्षा उत्तर देतानाची चेहऱ्यावरची मुद्रा बारकाईने न्याहाळायची.

 दुपारी जोशी दोन तास सुट्टी देत. ज्या गावकऱ्यांना घरी जाऊन जेवायचे असेल, इतर काही कामे उरकायची असतील त्यांना पुरेसा वेळ मिळावा म्हणून. लांब राहणारे मजूर अर्थात तिथेच थांबत. पण बरेच गाववासी मजूरही शेतावरच थांबत, सावलीत बसून बरोबर आणलेला भाकरतुकडा खात. "दुपारची आपण भजनं म्हटली तर?" एक दिवस जोशींनी सुचवले. सर्वांनाच ती कल्पना आवडली. भजने म्हणणे हा तिथल्या लोकसंस्कृतीचा अविभाज्य भाग होता.

 ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी मजूर मृदंग-झांजा घेऊन हजर झाले. जेवण उरकल्यावर भजनांना सुरुवात करायचे ठरले होते. जोशींनी भजनाचे सुचवले त्यामागे दोन कारणे होती. एक म्हणजे, मजुरांच्या अधिक जवळ जायचा हा एक मार्ग होता. दुसरे कारण अधिक व्यक्तिगत होते. काही महिने शेतीकामात काढल्यावर जोशी स्वतःही, नाही म्हटले तरी, काहीसे उदास झाले होते. 'परवापरवापर्यंत जिनिव्हा-न्यूयॉर्कमधल्या आलिशान सभागृहांत चर्चा करणारा मी, आज कुठे इथल्या वैराण, ओसाड कातळावर दगडांचे ढीग टाकण्याचे काम करत बसलोय? आपण धरलेला हा रस्ता योग्य आहे ना? आपण स्वतःचीच फसवणूक तर नाही ना करत आहोत?' अशा प्रकारचे विचार अलीकडे त्यांच्या मनात येत असत. विशेषतः दुपारची निवांत वेळ त्यांना अधिक अस्वस्थ करणारी वाटे. एकत्र भजने म्हटल्याने आपल्यालाही थोडेसे उल्हसित वाटेल, असा त्यांनी विचार केला होता.

 गावातली भजने नेहमीच 'केशवा, माधवा, तुझ्या नामात रे गोडवा... ह्या भजनाने सुरू होत. पण त्या दिवशी मजुरांनी सुरुवात केली ते भजन होते, "हरिश्चंद्र राजा, तारामती राणी... डोंबाघरी भरी पाणी, डोंबाघरी पाणी..." जोशी दाम्पत्याची मनःस्थिती त्या मजुरांनी अगदी अचूक ओळखली होती, विशेषतः जोशींच्या मनातील विचार त्यांना नेमके कळले होते व

त्यांना चपखल लागू पडेल, असेच भजन त्यांनी फारशी चर्चा न करताच निवडले होते. जोशी लिहितात,

या निरक्षर अडाण्यांनी, मी त्यांच्या चेहऱ्यावर वाचले नव्हते इतके भाव माझ्या चेहऱ्यावर वाचले होते. मृदंग-झांजांचा कल्लोळ आणि गाणाऱ्यांची सामूहिक बेसूरता ओलांडून भजनाचा अर्थ असा काही भिडला, की गळ्यातला आवंढा गिळवेना.

 या प्रसंगानंतर ह्या गरीब बिचाऱ्या मजुरांसाठी आपण ठोस काहीतरी केलेच पाहिजे असे त्यांनी ठरवले. भोवतालच्या सामाजिक परिस्थितीचा अधिक बारकाईने शोध घ्यायला सुरुवात केली. त्यांची निरीक्षणे अतिशय अस्वस्थ करणारी होती. पुण्यासारख्या महाराष्ट्राच्या तथाकथित सांस्कृतिक राजधानीपासून आणि झपाट्याने वाढत चाललेल्या उद्योगनगरीपासून अवघ्या चाळीस किलोमीटरवर असलेल्या आंबेठाणसारख्या गावात अशी परिस्थिती असावी, देश स्वतंत्र होऊन तीस वर्षे उलटल्यावरही ती तशीच राहिलेली असावी, हे खूप विषण्ण करणारे होते.

 आंबेठाण गावात वीज जवळ जवळ कुठेच नव्हती आणि जिथे होती तिथेही ती वरचेवर खंडित व्हायची. त्यामुळे सूर्यास्तानंतर सगळे व्यवहार ठप्प व्हायचे. घरातही एखाददुसरा मिणमिणता कंदील. करमणूक अशी कुठलीच नाही. शिवाय, वीज नसली की शेतीला पाणी कुठून आणणार? जिथे विहीर असायची तिथे पंप चालवले जात. शेतीला पाणी मिळावे म्हणून. पण डिझेलचाही प्रचंड तुटवडा. खुल्या बाजारात ते कधीच उपलब्ध नसे. मामलेदाराकडे जाऊन खूप खटपट केल्यावर परवाना मिळायचा पण तोही महिन्याला फक्त वीस लिटरचा. म्हणजे रोजचे साधारण ७०० मिलीलिटर. पंप धुवायलाही ते अपुरे पडायचे! मग त्यात रॉकेलची भेसळ करणे आलेच. खरे तर तेही पुरेसे कधीच मिळत नसे; त्यालाही रेशन कार्ड लागायचे. फारच थोड्या जणांकडे ते असायचे. बाकीच्यांना जादा पैसे देऊन ते मिळेल तिथून खरेदी करावे लागे. या भेसळीत इंजिनची नासाडी व्हायची; दुरुस्तीचा खर्च बोकांडी बसायचा. पण पंप चालवला नाही तर कांद्याला पाणी देणे अशक्य आणि मग तयार पीकही जळून जायची भीती.

 गावात एकाच्याही घरी संडास नव्हता: बायाबापड्यांनाही उघड्यावरच बसावे लागे. कुठल्याच घरात नळ नव्हते. पिण्यासाठी साधारण शुद्ध असेही पाणी उपलब्ध नव्हते. कुठूनतरी घमेल्यातून मिळेल ते पाणी आणायचे, तोंडाला पदर लावून तेच प्यायचे; त्यातून गाळले जाईल तेवढे जाईल. त्यामुळे रोगराई प्रचंड. खरे तर बरेचसे रोग हे स्वच्छतेच्या साध्यासुध्या सवयी लावल्या तरी दूर होऊ शकणारे. जेवणापूर्वी हातपाय स्वच्छ धुणे, धुतलेले कपडे घालणे, रोज अंघोळ करणे, भांडीकुंडी नीट घासून घेणे, केरकचरा व्यवस्थित गोळा करून त्याची विल्हेवाट लावणे ह्या सगळ्या, म्हटले तर अगदी साध्या गोष्टी. पण इथे कोणीही यांतले काहीच करत नसे. त्यामुळे गावात बहुतेक सर्वांना खरूज झालेली असे. कॉलरा,

हगवण, नायटा हे रोगही घरोघर. बहुतेक सर्व आजार अशुद्ध पाणी, अपुरा आहार आणि जंतांमुळे होणारे.

 गावात शाळा एकच. चावडीवर भरणारी. शिक्षक हजर असला तर ती भरणार. गळके छप्पर, भेगाळलेल्या भिंती. तुटकी दारे. पावसाळ्यात खूपदा ती बंदच असे. एकूण मुलांचा शाळेत जाण्यापेक्षा न जाण्याकडे कल अधिक. 'शिकन काय करायचं?' ही आईवडलांची भूमिका. ते स्वतःही निरक्षरच. त्यामुळे एकूण अनास्था खूप. शेतावर काम असले तर मुले ते नाखुशीने का होईना पण थोडेफार करायची; नाहीतर दिवसभर अशीच उनाडक्या करत भटकायची.

 ह्या एकूण मागासलेपणाला कंटाळून अनेक तरुण मग शेती सोडून एमआयडीसीसारख्या जागी नोकरी शोधायला जात. असाच एक तरुण एकदा जोशींना भेटायला आला. म्हणाला,


 "साहेब, पूर्वी मी तुमच्या शेतावर मजुरी करायचो. दिवसभर उन्हातान्हात घाम गाळल्यावर मला संध्याकाळी तीन रुपये भेटायचे. आज एका कारखान्यात लागलो आहे. मशिनच्या मागे आरामात उभं राहून विड्या फुकत काम करतो. पण गेल्या महिन्यात मला नऊशे रुपये पगार मिळाला. रोजचे तीस रुपये. शेतीकामात मिळत होते त्याच्या दसपट! तेही भरपूर आरामाचं काम करून!"

 हे सांगताना त्या तरुणाचे डोळे जुन्या श्रमांच्या आठवणीने पाणावले होते. शेतातील श्रम व कारखान्यातील श्रम यांचे बाजारात जे मोल केले जाते, त्यातील ही जबरदस्त तफावत जोशींनाही अस्वस्थ करून गेली. अर्थात कारखान्यात अशी नोकरी मिळायचे भाग्यही शंभरात एखाद्यालाच लाभणार.

 स्वतःची शेती सुरू करता करता जेवढे शक्य होते तेवढे ग्रामविकासाचे प्रयत्न त्या सुरुवातीच्या काळात जोशींनी केले. रोगराई कमी व्हावी म्हणून स्वच्छता मोहिमा काढल्या. गाव हागणदारीमुक्त व्हावे म्हणून चराचे संडास खणले. श्रमदानाने कच्चे का होईना पण रस्ते बांधले. विहिरीत साठलेला गाळ उपसून काढायची योजना राबवली. शाळेचा दर्जा सुधारावा म्हणून ग्रामपंचायतीकडे साकडे घातले. साक्षरता वर्ग चालवले. वेगवेगळ्या सरकारी योजनांची माहिती गावकऱ्यांना व्हावी म्हणून अधिकाऱ्यांना गावात बोलावून आणले. पारंपरिक समाजसेवेच्या सगळ्या वाटा चोखाळून झाल्या; पण असल्या प्रयत्नांच्या मर्यादाही हळूहळू त्यांच्या लक्षात येत गेल्या. मागासलेपणाचे सर्वांत मोठे कारण गरिबी हे आहे. ती जोवर दर होत नाही तोवर इतर कुठल्याच उपायांना अपेक्षित ते यश मिळणार नाही, आणि त्यासाठी शेतीमालाला अधिक भाव मिळायला हवा हे उघड होत गेले.

 जोशी सांगत होते,

 “एक साधं उदाहरण देतो. आंबेठाणमध्ये सुरुवातीच्या काळात साफसफाईचं खूप काम मी केलं, पण तरीही आमच्या आंबेठाणपेक्षा शेजारचं भोसे गाव अधिक स्वच्छ होतं. तिथली जमीन खडकाळ नव्हती व अधिक सुपीक होती, फळं व भाजीपाला तिथे खूप यायचा, हे खरंच आहे. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे त्या गावचा कांदा अधिक चांगल्या दर्ज्याचा होता

व त्याला अधिक चांगला भाव मिळत असे. हाती चार पैसे शिल्लक राहू लागले की माणसाला आपोआपच टापटीपीने राहावं असं वाटू लागतं. आर्थिक प्रगती झाल्यानंतरच इतर प्रगती शक्य होती.”

 गावातील स्थिती सुधारावी म्हणून जोशींनी अगदी सुरुवातीच्या काळात केलेल्या एका गंभीर प्रयत्नाविषयी थोडे विस्ताराने लिहिले पाहिजे. स्वतः जोशींनीही त्याविषयी लिहिले आहे.

 सर्व भूमिहीनांना प्रत्येकी दोन-अडीच एकर जमीन मिळावी अशी एक सरकारी योजना होती. आंबेठाणच्या आजूबाजूलादेखील काही जणांना तशा जमिनी मिळाल्या होत्या. पण त्या नुसत्याच पडून होत्या. म्हाळुगे गावातील शिवळे पाटील यांच्या जमिनीचा बराच भागही कित्येक आदिवासींना वाटला गेला होता. पण त्या जमिनीही तशाच पडून होत्या. कॉलेजात शिकलेल्या पुस्तकांत आणि अनेक पुरोगामी विचारवंतांच्या लेखनात बड्या जमीनदारांकडून अतिरिक्त जमिनी सरकारने ताब्यात घ्यायला हव्यात, भूमिहीनांना त्यांचे वाटप व्हायला हवे, तसे झाले, की मग ते ती जमीन कसायला लागतील, स्वतःचे पोट भरू शकतील आणि त्यातूनच ग्रामीण दारिद्र्याचा प्रश्न मिटेल अशी मांडणी केल्याचे जोशींनी वाचले होते; त्यांचेही मत पूर्वी साधारण तसेच होते.

 पण इथे त्यांच्या डोळ्यांसमोर मात्र वेगळेच काहीतरी घडत होते. जमीन हातात येऊनसुद्धा त्यांच्यापैकी कोणीही हातपाय हलवत नव्हते. प्रत्येकाची काही ना काही अडचण होती; नुसती जमीन मिळून त्यांचे भागणार नव्हते. कोणाला अवजारे हवी होती, कोणाला बैल हवे होते, कोणाला बियाणे हवे होते, खते हवी होती. त्याशिवाय ते काहीच करू शकत नव्हते, किंवा करायला तयार नव्हते.

 खेडमधील प्रांत अधिकाऱ्यांशी एक दिवस जोशींनी विस्तृत चर्चा केली. सामूहिक शेती करण्याबद्दल. तो एक उत्तम तोडगा असल्याचे जाणवत होते. सुदैवाने अधिकारी सज्जन होते, त्यांनी दावडी गावातील काही नवभूधारकांशी गाठ घालून दिली. जमिनीचा जुना मालक थोडा कटकट करत होता. पण सरकारपुढे त्याचे काहीच चालणार नव्हते. शिवाय, आणीबाणीच्या त्या दिवसांत सरकारी अधिकाऱ्यांची खेड्यापाड्यांतून बरीच भीतीदेखील होती. मामलेदार स्वतः दावडीला आले व त्यांनी जमिनीच्या सीमा आखून दिल्या. एकूण अकरा भूमिहीनांना तिथे सलग अशा जमिनी मिळाल्या. शेती सामूहिक करायचे ठरले. नाहीतर ज्याच्या जमिनीच्या तुकड्यात विहीर लागेल तो इतरांना पाणी देणारच नाही! सगळ्यांना ती अट मान्य होती. त्या सामूहिक शेतीला 'अकरा भूमिपुत्र' असे नाव दिले गेले.

 जसजसे दिवस जात गेले तसतशा एकेक गोष्टी जोशींच्या लक्षात यायला लागल्या. एकतर त्यांपैकी खरे भूमिहीन असे फक्त तिघे होते. त्यांच्या घरची माणसे पुण्या-मुंबईत नोकरीला होती व त्यावर त्यांचे घर चालत होते. आपल्या नावावर शेती व्हावी ह्याच्यात त्यांना खचितच आनंद होता, त्यासाठी वेगवेगळ्या पुढाऱ्यांना भेटून त्यांनी थोडाफार पैसाही खर्च केला होता; पण प्रत्यक्ष जमीन कसण्यात मात्र त्यांना जराही उत्साह नव्हता. जोशींसमोर आणि

सरकारी अधिकाऱ्यांसमोर ते उत्साहाचे केवळ नाटक व तेही अगदी अहमहमिकेने करत होते. बँकेकडून कर्ज मिळावे म्हणून स्वतः जोशी यांनीच खेड या तालुक्याच्या गावी अनेक खेटे घातले. त्यांच्याबरोबर अकरापैकी फक्त एकच भूमिपुत्र सोबत म्हणून बँकेत आला; बाकीच्या सगळ्यांनी घरी काही ना काही काम आहे अशी सबब सांगून स्वतः येणे टाळले. पण तरीही जोशींनी मनात कटुता येऊ दिली नाही. 'आपल्यावर त्यांनी विश्वास ठेवावा असे आपण प्रत्यक्षात काय करून दाखवले आहे? त्यांचा निरुत्साह अगदी समजण्यासारखा आहे. जसजसे काम उभे राहील तसतसा त्यांचा विश्वास वाढेल' - असे जोशी स्वतःला समजावत राहिले. त्यांनी लिहिले आहे, एकोणिसाव्या शतकातील मिशनऱ्यांच्या धाटणीवर मी स्वतःलाच धीर देत होतो." (मिशनऱ्यांच्या मनोभूमिकेचे त्यांनी इतके चपखल बसणारे उदाहरण द्यावे हे नवलच आहे. कदाचित त्यांनी केलेल्या सॉमरसेट मॉमच्या वाचनाचा हा प्रभाव असावा.)

 जमीन डोंगरकपारीत उतारावर होती; त्यामुळे बांधबंदिस्तीचे बरेच काम करणे आवश्यक होते. त्यासाठी ह्या भूमिहीनांकडे पैसे नव्हते. ह्या प्रकरणात जोशी घेत असलेल्या पुढाकारामुळे स्थानिक सरकारी अधिकारी बरेच प्रभावित झाले होते. एव्हाना जोशी यांची पार्श्वभूमी त्यांच्याही कानावर आली होती. ते म्हणाले, “सामानाचा सगळा खर्च कुठल्यातरी शासकीय योजनेखाली आम्ही करू. पण आमची एक अट आहे. मजुरीचा बंदोबस्त मात्र नवभूधारकांनी केला पाहिजे."

 जोशी आनंदाने तयार झाले. लगेच दावडीला आले. सगळ्यांना गोळा केले व त्यांच्यापुढे त्यांनी ही योजना मांडली - तीन दिवसांनी सगळ्यांनी शेतीवर राहायलाच जायचे. बांधबंदिस्तीचे काम पूर्ण होईस्तोवर तिथेच राहायचे. प्रत्येक घरातून निदान दोन जण तरी आले पाहिजेत. आपले महत्त्वाचे काम त्यामुळे होऊन जाईल. प्रारंभीची एक मोठी अडचण दूर होईल. शिवाय, विशेष इन्सेंटिव्ह म्हणून, जे हजर राहतील त्यांना सध्याच्या दराप्रमाणे मजुरीही मिळेल. आणि जे गैरहजर राहतील त्यांना मात्र दंड केला जाईल.'

 व्यवस्थापनशास्त्राप्रमाणे ह्यात चांगले काम करणाऱ्याला गाजर आणि कामात हयगय करणाऱ्याला छडी' अशी तजवीज जोशींनी केली होती. सगळ्यांनी होकारार्थी माना डोलावल्या.

 ठरलेल्या दिवशी सकाळी उजाडता उजाडताच जोशी पुण्याहून निघून दावडीला गेले. तिथे एकही व्यक्ती हजर नव्हती! तास-दोन तास बरीच खटपट केल्यावर आणि निरोपानिरोपी केल्यावर चार घरांमधली मिळून एकूण नऊ माणसे हाती लागली. त्यांना आपल्या जीपमध्ये घालून जोशी शेतावर घेऊन गेले. मिळतील तेवढे दगडगोटे गोळा करून रात्रीच्या आडोशासाठी भिंती उभ्या करायला सुरुवात केली. जोशी स्वतःही अंग मोडून कामाला लागले. संध्याकाळी सगळ्यांनी कंदिलाच्या उजेडात भाकऱ्या खाल्ल्या.

 तो सगळाच अनुभव जोशींना विलक्षण रोमांचक वाटत होता. भारतात परतल्यावर प्रथमच आपण थोडेफार अर्थपूर्ण जगतो आहोत असे वाटत होते. जेवण झाल्यावर दोघे जण काहीतरी अडचण सांगून आपल्या घरी निघून गेले. दुसरे दोघे "आम्ही आत्ता गावात जातो,

प्रत्येक घरात फिरतो आणि उद्या सकाळी घरटी दोन जण तरी शंभर टक्के घेऊन येतो' असे वचन देत आपल्या गावी गेले. उरलेले पाच जण आणि जोशी स्वतः अशा सहा जणांनी दगड रचून तयार केलेल्या भिंतींच्या आडोशाला, डोंगरातून वाहणारे भणभणते वारे अंगावर झेलत, कुडकुडत कशीबशी ती रात्र काढली.

 सकाळी उठून जोशी पुन्हा कामाला लागले. या सहा जणांसह. इतर जण येतील तेव्हा येतील, असा विचार करत. पण प्रत्यक्षात दपारपर्यंत एकही नवा माणस आला नाही. गावात कोणीतरी मेल्याची बातमी तेवढ्यात कानावर आली आणि उरलेले पाच भूमिपुत्रही लगबगा गावाला निघून गेले. त्यांच्या त्या सामूहिक शेतावर आता घाम गाळायला एकटे जोशीच उरले!

 असा प्रकार वरचेवर घडू लागला. एक दिवस जोशींनी सगळ्यांना स्पष्टच विचारले,  "तुमची अडचण काय आहे? तुम्हाला शेती करायची आहे की नाही? नसेल करायची तर तसं सरळ सांगून टाका आणि मला याच्यातून मोकळं करा."

 त्यांच्या या स्पष्टोक्तीनंतर सगळे जरा गांगरले. "असं नका हो करू. तुम्ही गेलात तर सगळंच कोसळेल. आमचं नाक कापलं जाईल आणि तो मूळ जमीन मालक आम्हाला जगूही देणार नाही. जरा बेताबेताने घेऊ या." वगैरे म्हणत सारवासारव करू लागले. पण त्यात फारसा काही अर्थ नव्हता हे एव्हाना जोशींना कळून चुकले होते. या प्रकरणात त्यांच्या स्वतःच्या पदरचे दोन हजार रुपये खर्च करून झाले होते. ते बुडीत खाती गेले आहेत हे स्पष्ट होते.

 या अकरा जणांपैकी एकालाही जमीन कसण्याची आणि कष्ट करण्याची इच्छा नव्हती. बिगरशेती उत्पन्नाचे साधन असतानाही भूमिहीन म्हणून नावे नोंदवून त्यांनी जमीन मिळवली होती. जोशींसारख्या शहरी माणसापुढे भूमिहीनतेचे करुण नाटक त्यांनी उत्तम वठवले होते; पण गावकऱ्यांसमोर त्यांचे नाटक चालत नव्हते.

 मुळात त्यांना स्वतः कष्ट करून जमीन कसायचीच नव्हती; पुढेमागे एखादा खरीददार सापडला तर त्या जमिनी विकून दोन पैसे करायचे एवढेच त्यांचे उद्दिष्ट होते. तसे केल्यानंतर पुन्हा नव्याने एखाद्या सरकारी योजनेत जमीन मिळवायला ते मोकळे होणार होते! ह्या कहाणीचा समारोप करताना जोशी लिहितात,

पण ह्यात त्यांचे कुठेच चुकत नव्हते. चुकत माझेच होते. बँकेच्या कर्जाचे प्रकरण करतानाच माझ्या लक्षात आले होते, की विहिरीचा खर्च करून, पाण्याची सोय करून, शेती करायची म्हटले, तर कोणतेही पीक काढले तरी बँकेच्या कर्जाची परतफेड यावज्जन्म शक्य नव्हती. दरवर्षी चांगले पीक येईल असा हिशेब केला, तरी खर्च फिटत नव्हता. ही काय गंमत आहे याचा उलगडा मला त्यावेळी झाला नव्हता. गावकऱ्यांना ते कळले होते, भूमिपुत्रांनाही ते कळले होते; पण ते मला सांगत नव्हते. हे सर्व समाजव्यवस्थेचे गुह्यतम गुह्य आणखां उग्र तपस्येने माझे मलाच शोधावे लागणार होते.

'तुमची सगळ्यांची जमिनीवर राहायला जायची तयारी झाली, म्हणजे मला निरोप द्या,' असे म्हणून मी भूमिपुत्रांचा निरोप घेतला. एक धडा शिकून. यापुढे लोकांचे भले करण्याचे प्रयत्न बंद. भिकेच्या आणि मदतीच्या प्रकल्पांतून गरिबीचा प्रश्न सुटत नाही. वर्षानुवर्षे गावागावातील गरिबी संपवण्याबद्दल जो मार्ग मनात शंकासुद्धा न आणता मी मानला होता, त्याबद्दलच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. पुन्हा एकदा शून्यावर आलो होतो. स्वित्झर्लंडला परत जाण्याचा मोह मी कसा टाळला कुणास ठाऊक!

(अंगारमळा, पृष्ठ १४-५)

 ग्रामविकासाचे हे प्रयत्न चालू असतानाच दुसरीकडे जोशींची शेतीदेखील चालूच होती. भारतातील शेती बव्हंशी कोरडवाहू आहे; पण अशा कोरडवाहू शेतीतही पुरेसा पैसा गुंतवला, उपलब्ध तंत्रज्ञान वापरले, आपल्या शिक्षणाचा उपयोग करून चांगले व्यवस्थापन केले तर ती शेती फायदेशीर होऊ शकते का ह्याचा त्यांना शोध घ्यायचा होता. किंबहुना, शेतीत पडण्यामागे त्यांचा तोच खरा उद्देश होता. त्या दृष्टीने सतत काही ना काही नवे प्रयोग ते करत असत. शेतीतील कामाबद्दल जे काही वाचनात यायचे, कानावर पडायचे त्याचा अवलंब स्वतःच्या शेतीत करून बघत. कधी हे बियाणे वापर, कधी त्या कंपनीचे बियाणे घे; कधी हे खत, कधी ते औषध. कधी असे पाणी द्या, कधी तसे द्या. सारखे काहीतरी नवे करून बघायचे, आपला अनुभव हाच आपला गुरू मानायचा असे त्यांनी ठरवले होते.

 लौकर येणारे आणि रोख पैसे देऊ शकणारे पीक म्हणून खरिपाच्या पहिल्याच हंगामात जोशींनी खीरा जातीच्या काकडीचे पीक घेतले. तीन-एक महिन्यांत पाच-सहा पोती काकडी निघाली, ती अडत्याकडे पाठवून दिली. विक्रीचा खर्च वजा जाता १८३ रुपये मिळाले. शेतीतली ती पहिली कमाई. नाही म्हटले तरी जोशींना आनंद झाला. दुसऱ्या वेळीही असेच काहीतरी दीड-दोनशे रुपये आले. पण तिसऱ्या वेळी त्यांना वेगळाच अनुभव आला. ह्यावेळी त्यांनी लागवडीचे क्षेत्र वाढवले होते. दहा पोती काकडी आली, ती पुण्याला अडत्याकडे पाठवून दिली. तीन-चार दिवसांनी, आता यात निदान तीनशे रुपये तरी फायदा होईल या अपेक्षेने ते पुण्यातील अडत्याच्या (दलालाच्या) ऑफिसात गेले. जरा वेळाने तेथील कारकुनाने त्यांच्या हातात एक लिफाफा कोंबला आणि ३२ रुपयांची मागणी केली. "हे कसले पैसे द्यायचे?" त्यांनी आश्चर्याने विचारले.

 "लिफाफा उघडा म्हणजे कळेल." कारकुनाने उत्तर दिले.

 उभ्याउभ्याच जोशींनी लिफाफा उघडला व आतला कागद बाहेर काढला. त्यावर जो हिशेब खरडला होता, त्याचा सारांश होता : 'वाहतूक, हमाली, दलाली, वजनकाटा, मार्केट कमिटीचा चार्ज आणि मुख्यमंत्री फंडाला द्यायचे पैसे हे पकडून एकूण खर्च इतका इतका; काकडी विकून आलेले पैसे इतके इतके; तुमच्याकडून येणे रुपये ३२.'

 जोशींनी कपाळावर हात मारून घेतला. शेतावर तीन महिने राबून काढलेल्या काकडीचे

बाजारमूल्य, माल तयार झाल्यापासून विकला जाईपर्यंतचा (पोस्ट-हार्वेस्ट) खर्च भरून निघेल इतकेदेखील नव्हते. ती तूट भरून काढायलाच खिशातले ३२ रुपये द्यावे लागणार होते! शेतकऱ्यांच्या परिभाषेत यालाच 'उलटी पट्टी' म्हणतात. बियाणे, मजुरी, खते, औषधे, पाणी वगैरे (प्री-हार्वेस्ट) खर्चाचा यात कुठे समावेशही नव्हता! जमिनीवरील इतर खर्च, बँकेचे व्याज, स्वतःच्या श्रमाचे मूल्य व इतर ओव्हरहेड्स यांची गोष्ट तर दूरच राहिली! या सर्व व्यवहारात बियाणे विकणारा, खते-औषधे विकणारा, टेम्पोवाला, दलाल, वजन करणारा मापारी, हमाल, मार्केट कमिटी आणि अगदी मुख्यमंत्री फंड या इतर सर्व घटकांना आपापला वाटा मिळाला होता; नागवला गेला होता तो फक्त मालाचा प्रत्यक्ष उत्पादक, म्हणजेच शेतकरी.

 सगळीच व्यवस्था (सिस्टिम) शेतकऱ्याच्या विरोधात काम करत होती. कुठल्याही विद्यापीठात न शिकवला जाणारा, किंवा कुठल्याही पुस्तकात न नोंदवलेला हा महत्त्वाचा धडा स्वतःचा घाम शेतात जिरवून जोशी शिकत होते.

 असाच दुसरा अनुभव होता परावलंबित्वाचा; बेभरवशी निसर्गावर शेतकरी किती अवलंबून असतो याचा. तो आला बटाट्याच्या पिकाबाबत. भामनेरच्या खोऱ्यात बटाट्याचे पीक मुबलक येते. बटाट्यासाठी चाकणची बाजारपेठ खप प्रसिद्ध आहे. 'तळेगाव बटाटा या नावाने जो बटाटा बाजारात विकला जातो, तो बराचसा ह्याच परिसरात तयार होतो. जोशींनी लावलेले सुरुवातीचे बटाट्याचे पीक उत्तम आले. सगळीकडे खूप कौतुक झाले. खेड येथील सरकारच्या बटाटा संशोधन केंद्रातील अधिकाऱ्यांनी मुद्दाम येऊन त्या शेतीची पाहणी केली. जोशी खूष झाले. शेतीवर आतापर्यंत गुंतवलेले चार लाख रुपये अशा किती हंगामांत सुटतील याची गणिते मांडू लागले. पुढच्या वेळी हौसेने पुन्हा बटाटा लावला. पण नेमका त्यावर्षी कसलातरी रोग आला आणि बटाट्याचे सगळे पीक नष्ट झाले! ही अस्मानी सुलतानी सर्वसामान्य भारतीय शेतकऱ्याच्या पाचवीलाच पुजलेली असते; पण जोशींना हा अनुभव नवाच होता. बऱ्याच वर्षांनी ह्या अनुभवाकडे वळून पाहताना जोशी म्हणाले,

 "मी बटाटा लावला होता ती जमीन आदली अनेक वर्षे पडीक होती व म्हणूनच केवळ पहिले पीक उत्तम आले होते! त्यात माझ्या प्रयत्नाचा भाग नगण्यच होता. माती, पाऊस अशा वेगवेगळ्या नैसर्गिक घटकांवर आपला शतक घडले असेल हे सांगणे त्यालाही शक्य नसते. हळूहळू माझे शेतीतले सगळेच नियोजन अयशस्वी ठरू लागले."

 पण तरीही जेव्हा इतर शेतकऱ्यांबरोबर ते बाजारपेठेत वा चावडीवर गप्पा मारायला बसत तेव्हा बाकीच्या शेतकऱ्यांना मात्र नफा होतो आहे असे संभाषणात कानावर पडत असे. हे काय गौडबंगाल आहे त्यांना कळेना. एकदा त्यांनी इतर गावकऱ्यांना गप्पा मारता मारता विचारले,

 "मघापासून मी ऐकतोय, कोणी म्हणतात, यंदा ज्वारी चांगली दहा-बारा पोती आली,

कोणी म्हणतात, इतका इतका मूग आला, इतका कांदा आला. म्हणजे सगळ्यांचंच एकूण चांगलं चाललेलं दिसतंय. मग मला हे समजत नाही की मी इतका शिकलेला असूनही आणि सगळा वेळ ह्या शेतीतच राबत असूनही मला का प्रत्येक वेळी तोटा येतोय? माझं नेमकं कुठे चुकतंय?"

 गप्पा संपल्यावर त्यांना बाजूला घेऊन एक म्हातारा सांगू लागला, “साहेब, हे सगळे लोक थापा मारताहेत. हे जर असं काही सगळ्यांसमोर बोलले नाहीत, तर ह्यांच्या घरच्या मुलींची लग्नं होणार कशी? तुमचा अनुभव हाच खरा अनुभव आहे. आपण सगळेच शेतकरी तोट्यातच आहोत."

 शेतकऱ्यांची आत्मवंचना किती भयाण आहे हे त्यादिवशी जोशींच्या लक्षात आले. सरकार शेतकऱ्याकडून लेव्हीची ज्वारी फक्त सत्तर पैसे किलो दराने खरेदी करत असतानाही, हे शेतकरी दीड रुपये किलो दराने खुल्या बाजारातन ज्वारी खरेदी करतात आणि ती बैलगाडीवर लादून सरकारी गोदामात आपली अपुरी भरलेली लेव्ही पूर्ण करायला जातात तेव्हा मात्र बँडबाजा लावून, वाजतगाजत जातात, ह्या मुर्खपणाचे कोडे त्यांना उलगडले. मुळात फारच थोडे शेतकरी आपला नेमका उत्पादनखर्च काढतात, त्यात काय काय पकडायचे ते खूपदा त्यांच्या लक्षातही येत नाही हा एक भाग होताच; पण शिवाय, आपली इभ्रत कायम राहावी म्हणून इतरांपुढे करायचे नाटकही त्यात होते.

 शेतीमालावर प्रक्रिया केल्याशिवाय त्याची बाजारातील किंमत वाढणार नाही हे त्यांच्यातील अर्थतज्ज्ञाला सहज समजण्यासारखे होते. त्या दृष्टीनेही जोशींनी वेगवेगळे प्रयोग करून बघितले. चाकण परिसरात पूर्वी कोणीतरी बटाट्याचे वेफर्स करायचा छोटा कारखाना सुरू केला होता, पण लौकरच तो बंद पडला होता. त्याचे आपण पुनरुज्जीवन करू शकू का, किंवा तसाच एखादा कारखाना आपण उत्तमप्रकारे नव्याने उभारू शकू का, ह्याचा त्यांनी खोलात जाऊन विचार केला होता. बरीच आकडेमोड केली होती. त्यासाठी त्यांनी एकदा स्वित्झर्लंडला भेटही दिली होती. शेंगदाण्यावर आधारित प्रक्रियाउद्योग सुरू करण्याचा आणि चांगल्या दर्थ्यांचे शेंगदाणे पिकवून ते परदेशी निर्यात करायचा प्रयत्नही त्यांनी केला होता. कारण त्या भागात भुईमुगाचे पीक भरपूर यायचे. ह्या दोन्ही पुढाकारांबद्दल मागील प्रकरणात लिहिलेच आहे.

 अशा वेगवेगळ्या प्रयोगांसाठी जोशींनी स्वतःची सारी पुंजी पणाला लावली होती. युपीयुमधील नोकरी सोडून ते भारतात परतले तेव्हा त्यांना पाच-सहा लाख रुपये फंड, ग्रॅच्युइटी वगैरेचे मिळाले होते, ते सर्व घर आणि शेती घेण्यात आणि नंतर ती शेती सुधारण्यात जवळजवळ संपले. त्याशिवाय त्यांनी कर्जही काढले होते. 'इथे शेती करणं म्हणजे वाळूत मुतल्यासारखं आहे. सगळे पैसे संपवून लौकरच हा भिकारी बनणार,' असे एकदोघांनी म्हटले होते, पण त्याकडे दुर्लक्ष करून जोशींनी आपले काम अगदी निष्ठेने चालू ठेवले. जोशी सांगत होते,

"हा एवढा सगळा पैसा शेतीत गुंतवण्यामागे आणखी एक विचार होता – तो म्हणजे शेतीतून बाहेर पडायचा आपल्याला कधीच मोह होऊ नये!"

 हे सारे करत असताना भोवतालच्या इतर स्थानिक मंडळींशी जोशींचे संबंध कसे होते? सुरुवातीला ते अर्थातच अगदी परके होते, पण जसजसे दिवस जात होते, तसतसे त्यांचे स्थानिक परिचितांचे वर्तुळ वाढू लागले.

 ७ ऑगस्ट २०१५ रोजी सुरेशचंद्र म्हात्रे ह्यांच्या सौजन्याने चाकण येथे एक सुखद योग घडून आला. म्हाळुंगे येथील एक हॉटेलमालक श्याम पवार, चाकणमधील एक जुने डॉक्टर अविनाश अरगडे, मांडव कॉट्रॅक्टर गोपालशेठ मारुती जगनाडे (संत तुकारामांच्या अभंगांचे लेखनिक म्हणून ज्यांनी एकेकाळी काम केले होते त्या संताजी महाराजांचे हे वंशज), राष्ट्र सेवा दलाचे शाखाप्रमुख रामराव मिंडे, ऑइल इंजिन दुरुस्ती करणारे मधुकर रघुनाथ शेटे, आप्पासाहेब ऊर्फ प्रल्हाद रंगनाथ देशमुख, मामा शिंदे वगैरे जोशींच्या त्यावेळच्या काही निवडक सहकाऱ्यांबरोबर त्यादिवशी प्रस्तुत लेखकाला मनसोक्त गप्पा मारता आल्या आणि त्यावेळचे जोशींच्या सहकारी वर्तुळाचे चित्र डोळ्यापुढे आपोआपच उभे राहत गेले.

 आप्पासाहेब ऊर्फ प्रल्हाद रंगनाथ देशमुख आणि बाबुभाई शहा यांच्यापासून बहुधा ह्या स्थानिक वर्तुळाची सुरुवात झाली. ह्या दोघांचीही त्याकाळी चाकण परिसरात सायकल दुरुस्त करायची दुकाने होती. ग्रामीण भागात त्यावेळी सायकल हेच वाहतुकीचे प्रमुख साधन होते. दोघांच्याही व्यावसायिक जीवनाची ती सुरुवात होती. अप्पा देशमुखांनी पुढे डिझेल पंपाची निर्मिती व दुरुस्ती करायचे केंद्र काढले. ते स्वतः कुशल फिटर होते व देशमुख फिटर म्हणूनच त्यांना सगळे हाक मारत. जोशींच्या शेतातील विहिरीवर बसवलेला पहिला डिझेल पंप त्यांनी देशमुखांकडूनच खरेदी केला होता. पुढे फॅब्रिकेशनचा व्यवसायदेखील ते उत्तम करू लागले. शेतातील गोबर गॅस प्लांट, शेड हे सारेही त्यांनीच उभारून दिले होते. बाबुभाईंनीतर पुढे आणखी व्यावसायिक प्रगती केली. एक पेट्रोल पंप काढला आणि मोटर गाड्यांचे सर्व्हिसिंग सेंटरही काढले. शेतीमालाच्या साठवणुकीसाठी त्यांनी एक हिमराज कोल्ड स्टोरेजदेखील काढले. पुढे जोशींनी बटाट्याचे पीक काढायला सुरुवात केली तेव्हा आपल्या शेतातले बटाटे विक्री होईस्तोवर ते हिमराज कोल्ड स्टोरेजमध्येच ठेवत असत.

 अशाप्रकारेच पुढे एकेक करत उपरोक्त सगळ्या स्थानिक मंडळींशी जोशींचे संबंध जडले. सुरुवातीला ते व्यावसायिक संबंध होते, पण पुढे त्याचे स्नेहात रूपांतर झाले. ही मंडळी नंतर त्यांच्या शेतकरी आंदोलनातही यथाशक्ति सामील झाली. जगनाडे यांनी पंढरपूर येथील मेळाव्याचा तसेच परभणी अधिवेशनाच्या वेळचा सगळा मांडव अत्यल्प खर्चात उभारून दिला होता. श्याम पवार, डॉ. अविनाश अरगडे वगैरे सगळेही आंदोलनात जमेल तसा सहयोग देत राहिले. त्र्याण्णव वर्षांचे मधुकर शेटे प्रस्तुत लेखकाला सांगत होते,

 "आम्ही तशी आपापला छोटा व्यवसाय करणारी माणसं. चळवळ वगैरे आमचं क्षेत्र कधीच नव्हतं. पण जोशीसाहेबांचा प्रभाव आमच्यावर असा काही पडला, की आम्ही

आपोआपच त्यांच्या आंदोलनात खेचले गेलो. खरं तर पूर्वी आम्हाला शेतकऱ्यांबद्दल काहीच प्रेम वगैरे नव्हतं. आमचं गि-हाईक म्हणूनच आम्ही या शेतकऱ्यांकडे बघायचो; खूपदा त्यांच्याशी भांडायचोही. पण जोशीसाहेबांमुळे आमची त्यांच्याकडे बघायची सगळी दृष्टीच बदलून गेला. त्यांच्यावर किती अन्याय होत आहे याची आम्हाला प्रथमच जाणीव झाली. मी स्वतः तीन वेळा शेतकरी आंदोलनात तुरुंगात गेलो. दोनदा येरवडा तुरुंगात व एकदा औरंगाबाद तुरुंगात."

 बाबुभाई शहा यांनी जोशींची दुसऱ्या एका महत्त्वाच्या व्यक्तीबरोबर ओळख करून दिली. शेतीच्या काही कामासाठी जोशी शहांकडे गेले होते. त्यांच्या चाकणमधील कार्यालयात. काम झाल्यावर ते जाण्यासाठी उठले तशी, "थांबा दोन मिनिटं. तुमची एका भल्या माणसाबरोबर ओळख करून देतो," असे म्हणत शहांनी त्यांना थांबवून घेतले. तेवढ्यातच हे भले गृहस्थ त्या दुकानात आले. कदाचित जोशींबरोबर परिचय करून देण्याच्या उद्देशाने शहांनीच त्यांना तिथे बोलावून घेतले असेल. ते होते दत्तात्रेय भिकोबा ऊर्फ मामा शिंदे. त्यांनी जोशींच्या चाकणमधील सुरुवातीच्या दिवसांत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्याविषयी इथे थोडे विस्ताराने लिहायला हवे.

 दुसरे सानेगुरुजी' म्हणूनच चाकण परिसरात आजही मामा ओळखले जातात. हे साम्य केवळ दिसण्यापुरते नव्हते, तर वृत्तीतही होते. राष्ट्र सेवा दलाचे ते प्रथमपासून निष्ठावान सेवक. १९४७ साली देश स्वतंत्र झाला तेव्हा सर्व पोलीस स्टेशनांनी आपापल्या आवारात झेंडावंदन करावे असे सरकारचे आदेश निघाले. पण चाकण पोलिसांना झेंडावंदन कसे करतात तेच ठाऊक नव्हते. मामा राष्ट्र सेवा दलाची शाखा गावात चालवतात हे मात्र त्यांना ठाऊक होते. त्यांनी मामांनाच पोलीस ठाण्यात पाचारण केले. खांब उभारणे, झेंड्याला दोरी लावून तो वर सरकवणे व मग तो फडकवणे या सगळ्याची रंगीत तालीम केली आणि मग १५ ऑगस्टला त्यांच्याच मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलिसांनी पहिले झेंडावंदन केले.

 बाबुभाई पक्के काँग्रेसवाले असूनही मामांना इतके मानतात याचे जोशींना कौतुक वाटले. विरोधी पक्षातील लोकांनाही आपले मोठेपण मान्य असणे हे आपल्याकडे तसे दुर्मिळच. लौकरच जोशींना कळले, की चाकणमध्ये सर्वच नेत्यांना मामांचे मोठेपण मान्य आहे.

 जोशींनी शेतीला सुरुवात केली त्याच महिन्यात, २३ जानेवारी १९७७ रोजी, दिल्लीत एक अगदी अनपेक्षित घटना घडली. कोणाच्याही ध्यानीमनी नसताना इंदिरा गांधींनी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर केल्या. ठरल्याप्रमाणे २० मार्चच्या संध्याकाळी निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. काँग्रेसचा अभूतपूर्व असा पराभव करून केंद्रात जनता पक्षाचे राज्य आले. काँग्रेसेतर सरकार केंद्रात सत्तेवर यायचा हा देशाच्या इतिहासातील पहिलाच प्रसंग. जोशी तसे प्रत्यक्ष राजकारणापासून दूरच होते, पण भोवताली काय चालले आहे हे बारकाईने पाहत असत. आणीबाणीची दहशत असल्याने लोक तसे शांत आहेत हे

ठाऊक असले, तरी विरोधी पक्षनेत्यांना तुरुंगात डांबणे, त्यांचा छळ करणे, विशेषतः सक्तीची नसबंदी वगैरेबाबत लोकांत खूप असंतोष आहे हे त्यांनी हेरले होते. इंदिराजी हरल्या ह्याचा त्यांनाही इतरांप्रमाणेच आनंद झाला होता. त्या आधीच्या १८ महिन्यांत आणीबाणीमुळे राजकीय मंचावर सारे कसे शांत शांत होते. आता एकदम सगळीकडे राजकारणाची चर्चा सुरू झाली. लोक जणू आपल्या दबलेल्या भावनांना वाट मोकळी करून देत होते.  त्यानंतर पुढल्याच वर्षी, मार्च १९७८मध्ये, महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होणार असल्याचे जाहीर झाले. मामा खेड मतदारसंघातून जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणुका लढवणार व जिंकणार ह्याविषयी सगळ्या चाकणची खात्री होती. पण अचानक कुठेतरी चावी फिरली आणि जनता पक्षाने मामा शिंदे यांना तिकीट नाकारले. त्यांना मानणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे शेवटी त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवायचे ठरवले. त्यांचे चिन्ह होते सायकल.

 आपल्या लढतीची पूर्वतयारी साधारण ७८च्या जानेवारी महिन्यातच मामांनी सुरू केली व त्याचवेळी जोशी आपण होऊन त्यांना म्हणाले, "मामा, ह्या संपूर्ण प्रचारात मी माझ्या डिझेल भरलेल्या जीप गाडीसह तुमच्या सेवेला हजर राहीन. तुम्ही जिथे जिथे जाल, तिथे तिथे मी तुमच्याबरोबर येईन." मामांना ह्या अनपेक्षित ऑफरचे खूप अप्रूप वाटले. गाडी, डिझेल आणि ड्रायव्हर ह्या सगळ्याचीच एकदम सोय झाली होती! शिवाय त्या काळात जोशींच्या भोवतीचे आयएएसचे व स्वित्झर्लंडचे वलय कायम होते. गावात कुठेही गेले तरी ते आपली छाप हमखास पाडत. अशी व्यक्ती दिमतीला असणे ही मामांच्या दृष्टीने मोठीच जमेची बाजू होती.

 जोशी म्हणतात,

 "मामांच्या निवडणूक प्रचाराच्या काळात मी रोज माझी मोडकीतोडकी जीप गाडी घेऊन, त्यात डिझेल भरून, मामांच्या घरासमोर उभा राहत असे. आमची निघण्याची वेळ अगदी पक्की ठरलेली असे. ते निवडून आले, तर त्यांच्या मतदारसंघात काय काय करता येईल याची आखणी आम्ही प्रवासात करत असू."

 अपक्ष असूनही मामांनी चांगलीच लढत दिली. तालुक्यातील प्रत्येक गावात 'ही सायकल कोणाची, गरीब आपल्या मामांची' ही घोषणा दुमदुमत होती. ते निवडून येतील असे जोशींसकट सगळ्यांनाच वाटले होते, पण प्रत्यक्षात त्यांना सुमारे १२.००० मते पडली व आणीबाणीची पार्श्वभूमी असतानाही त्यांच्यापेक्षा दुप्पट म्हणजे २३,००० मते मिळवून काँग्रेसचे राम जनार्दन कांडगे निवडून आले. तसे व्यक्तिशः तेही मामांना गुरुस्थानी मानत. लोकभावना ओळखण्यात आपण कसे चुकतो व प्रत्यक्षात निवडणुकांची गणिते किती वेगळी असतात याची जोशींना ह्या काळात थोडीफार जाणीव झाली.

 अर्थात, जोशींच्या दृष्टीने निवडणुकीतील हारजीत तशी कमी महत्वाची होती. मामांच्या प्रचाराच्या पलीकडे जाऊन काहीतरी साधायचे त्यांचे उद्दिष्ट होते. किंबहुना ते उद्दिष्ट समोर

ठेवूनच ते ह्या प्रचारकार्यात सामील झाले होते. मतदारसंघातील जवळ जवळ प्रत्येक गावात ते गेले. शेतकरी प्रश्न समजून घेण्यासाठी व पुढे सोडवण्याच्या दृष्टीने उपयुक्त असे संपर्क जोशी साधत होते. मामांचे भाषण चालू असताना मागे उभे राहून वा गर्दीत मिसळून ते सगळे निरखून पाहत. शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांचे अनुभव, अपेक्षा व अडचणी ऐकून घेत. 'हा माणूस इतर शहरी सुशिक्षित लोकांपेक्षा वेगळा आहे' असे त्या भागातील शेतकऱ्यांच्या मनावर ठसू लागले. त्यावेळी मामा म्हणत, "आम्ही राजकारणी चाकणहून दिल्लीला जाण्यासाठी धडपडतो आणि शरद जोशी मात्र परदेशातून येतात आणि चाकणहून टोकाच्या वांद्रे गावाला जाण्याचा ध्यास धरतात."
 जोशी म्हणतात, “या त्यांच्या शेऱ्यामध्ये माझ्या पुढच्या सगळ्या शेतकरी चळवळीच्या इतिहासाचे बीज आहे."
 पुढे कांदा आंदोलनात मामा शिंदे सर्व ताकदीनिशी सामील झाले. ते स्वतः आयुष्यभर समाजवादी पक्षाचे काम करत आलेले; त्या पक्षाच्या विचारसरणीला जोशी यांचा अगदी मुलभूत असा विरोध. तरीही दोघे एकत्र काम कसे करू शकतात याचे अनेकांना आश्चर्य वाटे. पण "शरद जोशींचा विचार शेतकऱ्यांच्या हिताचा विचार आहे व आजवर तो तसा कोणीही मांडला नव्हता. अशा वेळी त्यांना साथ देणं हे माझं एक शेतकरी म्हणून कर्तव्य आहे," असे मामा म्हणत. आपल्या पक्षाचे राष्ट्रीय नेते एसेम जोशी व नानासाहेब गोरे यांनी आणि शरद जोशी यांनी व्यापक शेतकरीहित विचारात घेऊन एकत्रितपणे काही कृती करावी अशी त्यांची फार इच्छा होती व त्यादृष्टीने त्यांनी खूपदा प्रयत्नही केले होते. त्यांच्याच प्रयत्नांमुळे शेतकरी संघटनेच्या चाकणमधील एक-दोन सभांना नानासाहेब गोरे व जॉर्ज फर्नांडीस हजर राहिले होते. पण जोशींबरोबर समाजवाद्यांचे, किंवा खरे तर कुठल्याच पक्षाचे, फारसे कधी जुळले नाही.

 प्रचारसभांच्या धामधुमीतून मोकळे झाल्यावर एप्रिल १९७८पासून जोशी पुन्हा एकदा आपल्या शेतीवर लक्ष केंद्रित करू लागले. एकूण परिस्थिती आता खूप गंभीर झाली होती. आर्थिक टंचाई होतीच, काही कौटुंबिक ताणतणावही होते. जोशी आपल्या शेतीतील प्रयोगांत पूर्ण रमले असतानाच लीलाताईंनी गुलाबाची रोपे विकणारी रोपवाटिका सुरू केली होती. मुख्य म्हणजे स्वतःची एक पोल्ट्री सुरू केली होती. काहीतरी स्वतंत्र व्यवसाय उभा करण्याची त्यांची जिद्द होती. त्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण त्यांनी खडकी येथील शासकीय कुक्कुटपालन प्रशिक्षण केंद्रातून घेतले होते. खूप मनापासून त्या हा व्यवसाय करत होत्या. अंड्यांचे आहारातील वाढते महत्त्व म्हणजे मोठीच व्यावसायिक संधी होती. पुणे-तळेगाव हे कुक्कुटपालनाचे एक मोठे केंद्र म्हणून विकसित होत होते. सुरुवात त्यांनी मृद्गंध बंगल्यातूनच केली होती, पण नंतर व्याप वाढू लागल्यावर व त्या निवासी जागेत व्यवसाय वाढवणे शक्य नसल्याने त्यांनी कोंबड्यांचे सगळे पिंजरे अंगारमळ्यात नेले. चाकणच्या अप्पा देशमुखांनीच हे पिंजरे तयार केले होते व ते ठेवण्यासाठी पत्र्याच्या शेडदेखील त्यांनीच उभारून दिल्या होत्या.  पण दुर्दैवाने प्रथमपासूनच पोल्ट्रीच्या या व्यवसायात अनेक अडचणी येत गेल्या. एकदा वीज गेल्यामुळे शीतगृह बंद पडले व त्यात साठवून ठेवलेला माल नष्ट झाला. शीतगृहमालकाने वस्तुरूपात थोडी भरपाई दिली, पण तरीही नुकसान बरेच झाले. एकदा मुंगुसांनी कसातरी पिंजऱ्यात प्रवेश केला आणि दोन-अडीच हजार कोंबड्यांपैकी पाचेकशे खाऊन फस्त केल्या. असे एकापाठोपाठ एक धक्के बसत गेले. दरम्यान कर्जाचा बोजा वाढतच चालला. शेतीतही कर्ज साठत होते आणि पोल्ट्रीतही साठत होते.

 साधारण ह्याच सुमाराची एक घटना. जोशी यांच्या वैचारिक प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा त्यांनी त्या दिवशी गाठला.
 पुण्यातील पाषाण विभाग, आणि विशेषतः आज ज्याला नेकलेस रोड म्हणतात तो त्यातला भाग, त्या काळी आत्तापेक्षाही अधिक निवांत होता. स्वच्छ रस्ते, ओळीनी लावलेले वृक्ष, मागे दिसणाऱ्या डोंगररांगा. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, डीआरडीओ यांसारख्या काही नामांकित संस्थांची भव्य आवारे इथेच आहेत. त्यांच्याआधीच लागते सेंट जोसेफ शाळा. शाळेच्या प्रशस्त आवारात जोशींची गाडी शिरली, तेव्हा दुपारचे साधारण तीन वाजले होते. सोबत लीलाताई आणि श्रेया व गौरीही होत्या. दोघी ह्याच शाळेत शिकत होत्या आणि शाळेच्याच वार्षिक स्नेहसंमेलनासाठी म्हणून जोशी कुटुंब तिथे आले होते. ही शाळा मुलींची. त्याच मिशनची मुलांसाठीची शाळा, लॉयोला हायस्कूल, शेजारीच आहे.
 ख्रिस्ती मिशनऱ्यांनी कोणे एके काळी गरीब विद्यार्थ्यांसाठी म्हणून अनेक देशांत शाळा सुरू केल्या. जगभरातून देणग्या मिळवून उत्कृष्ट इमारती उभारल्या. ग्रंथालये, प्रयोगशाळा, क्रीडांगणे, वसतिगृहे, भरपूर मोकळी जागा यांची तजवीज केली. देशोदेशींच्या मिशनरी स्त्रिया व पुरुष अतिशय कळकळीने व सेवावृत्तीने शिकवण्याचे काम करीत. साहजिकच बघता बघता या शाळांचा खूप दर्जेदार म्हणून सर्वत्र लौकिक पसरला. पण म्हणूनच अहमहमिकेने अभिजनवर्ग आपली मुले इथेच घालू लागला आणि त्यामुळे मूळ गरिबांसाठीच्या या शाळा काळाच्या ओघात उच्चभ्रूच्या शाळा म्हणूनच स्थिरावल्या. विशिष्ट परिस्थितीमुळे संस्थांना मूळ उद्देशापासून अगदी वेगळे स्वरूप कसे प्राप्त होत जाते ह्याचे हे एक ठळक उदाहरण आहे.
 शाळेच्या आवारात पार्किंगसाठी भरपूर जागा असूनही गाड्यांची गचडी झाली होती. इथल्या बहतेक विद्यार्थिनी गाडीवाल्या! त्यात पुन्हा आज खास दिवस. कशीबशी आपली गाडी पार्क करून जोशी कुटुंब सजवलेल्या मांडवात शिरले. सगळीकडे अगदी सणासुदीचे वातावरण होते. सगळ्या मुली फॅशनेबल कपड्यांत आलेल्या. त्यांचे पालक तसेच नटूनथटून आलेले. त्यांनी तसे यावे, हा आग्रह प्रत्येक मुलीचा असायचाच! आपल्या आईवडलांमुळे इतर मुलींसमोर आपली 'पोझिशन डाऊन' होऊ नये यासाठीची ही त्यांची खबरदारी! सगळीकडे पताका, झिरमिळ्या, फुगे. नाच, गाणी, करमणुकीचे कार्यक्रम. बाजूला ओळीने उभारलेले वेगवेगळे खाद्यपदार्थ व इतर वस्तू विकणाऱ्यांचे स्टॉल्स. त्यांच्याभोवती उडालेली मुलींची झुंबड. आपल्याला हवे ते विकत घेण्यासाठी त्या पर्समधून वा खिशातून पन्नास शंभरच्या नोटा अगदी सहज काढत होत्या. त्यांच्या गोंगाटाने आणि हसण्याखिदळण्याने, इकडेतिकडे बागडण्याने तो सगळा परिसर भरून गेला होता. एरव्ही अशा शाळांमधली शिस्त मोठी कडक. पण आज तिथल्या शिक्षकांनी मुलींना पूर्ण स्वातंत्र्य दिलेले. वातावरणात उत्साह, उल्हास दाटलेला. पालकही गप्पांमध्ये रंगलेले.
 जोशी स्वतः त्या सगळ्यापासून अलिप्त होते, नुसतेच आजूबाजूला पाहत होते. तसे सरकारी नोकरीत व परदेशात त्यांनी वैभव भरपूर उपभोगले होते; पैशाचे त्यांना अप्रूप नव्हते. पण आज मात्र त्यांना हे सारे बघताना वैषम्य वाटत होते. वाटले, 'ह्या सगळ्या मंडळींमध्ये बहुधा आपणच सर्वांत गरीब असू. आपल्या मुली म्हणजे श्रीमंत शाळेतल्या गरीब मुली!'
 त्यांना असे वाटण्याचे बरेच प्रसंग गेल्या काही दिवसांत आले होते. नुकतेच मोठ्या श्रेयाला काश्मीरला ट्रीपला जायचे होते, वर्गातल्या सगळ्याच मुली जाणार होत्या. पण त्यासाठी लागणारे पाचशे रुपये त्यावेळी जोशींकडे नव्हते. 'तुला यंदा ट्रीपला पाठवणं नाही झेपणार मला' असे तिला सांगताना त्यांच्या हृदयाला जणू सहस्र इंगळ्या डसल्या होत्या. स्वित्झर्लंडमध्ये असताना असा प्रसंग कधीच आला नव्हता; मुलींची प्रत्येक हौस पुरी करणे तिथल्या पगारात त्यांना सहज शक्य झाले होते.
 वडलांच्या हट्टामुळे मुलींना भारतात यावे लागले होते आणि मग त्यांचे सगळे जीवनच एकदम बदलून गेले होते. इथली शाळा, शिक्षक, मैत्रिणी, शेजारी, हवापाणी, रस्ते, रहदारी, इथले एकूण सामाजिक वातावरण सगळे तिथल्यापेक्षा खूप वेगळे होते. बर्नमध्ये शिकत असताना दोन वर्षांपूर्वीच श्रेयाने कोपर्निकसवर फ्रेंचमध्ये निबंध लिहिला होता; इथल्या शाळेत मात्र तिला गमभन गिरवायला लागले होते! होणाऱ्या खर्चावरून, वाढणाऱ्या कर्जावरून घरी खूपदा भांडणे व्हायची. तशा दोघीही मुली समजूतदार होत्या, आईवडलांची परिस्थिती त्यांना समजत होती. शक्यतो त्या काही मागतच नसत. त्यांच्या चेहऱ्यावर अकालीच उमटलेल्या त्या गांभीर्याच्या छटा जोशींना अधिकच बोचायच्या. घरातल्या प्रत्येकालाच खरे तर वातावरणातला तणाव जाणवत होता. आपला अनेक वर्षे कष्ट घेऊन केलेला स्टॅम्प्सचा संग्रहही त्यांना विकावा लागला होता व ते तर जोशींना खूपच जिव्हारी लागले होते. लीलाताईंची स्थिती काही वेगळी नव्हती. त्याही बदललेल्या प्रापंचिक परिस्थितीशी जुळवून घ्यायचा आटोकाट प्रयत्न करत होत्या. पण सगळे तसे जडच होते. आपल्या तत्कालीन मानसिकतेचे नेमके वर्णन जोशींनी केले आहे. ते लिहितात :

तिच्या मनात खरोखरच काय चाललं होतं कोण जाणे! माझी ही उडी खरं म्हटलं तर तिच्यावरही अन्यायच होता. आयएएस पास झालेल्या, हुशार, कर्तबगार समजल्या जाणाऱ्या नवऱ्याच्या हाती तिने हात दिला, तो सुखासमाधानाच्या चौकोनी कुटुंबाच्या राज्यात चिरकाल राज्य करण्यासाठी. पुढे हे असं काही घडेल याची तिला तरी काय कल्पना होती? ... झोपी जाताना चिंतांची तोटी बंद करून झोपी जायचं, ही माझी फार जुनी कला आहे. झोप लागताना सगळ्या चिंतांचा आणि तणावांचा काही त्रास व्हायचा नाही. रात्री अडीचतीन वाजता मात्र झोप खाडकन खुले. पुढे झोपणंच अशक्य होई. कपाळाला हात लावून मी स्वतःलाच विचारी, 'मी पाहतो आहे ते खरं की स्वप्न?' आसपास शांतपणे झोपलेल्या लीला, श्रेया, गौरीकडे पाहून पोटात गलबलून यायचं. यांचं जीवन उद्ध्वस्त करण्याचा मला काय अधिकार होता? (अंगारमळा, पृष्ठ ८-१०)

  शाळेतील तो कार्यक्रम संपवून घरी परतेस्तोवर रात्र झाली होती. तिथेच इतके सगळे खाणेपिणे झाले होते, की आता घरी गेल्यावर जेवायचा काही प्रश्नच नव्हता. आज कधी नव्हे ती मुलींची बडबड सारखी चालू होती; संध्याकाळच्या आठवणी काढून त्या सारख्या खिदळत होत्या. खूप दिवसांनी त्यांचा असा चिवचिवाट ऐकताना, त्यांचे असे फुललेले चेहरे पाहताना आईवडलांनाही खुप आनंद होत होता. जोशींना तर वाटत होते, ह्यांना इतक्या आनंदात असलेले आपण भारतात परतल्यावर आज प्रथमच पाहतो आहोत! आज इतक्या दिवसांनी प्रथमच त्यांना एक वडील म्हणून इतके समाधान वाटत होते.
  एका तृप्तीतच ते पलंगावर आडवे झाले, शेजारचा बेडलँप मालवला. जरा वेळ त्यांना पेंग आली. पण मग अचानक खडबडन जाग आल्यासारखे झाले. डोळ्यासमोर कालची ती लहान मुलगी उभी राहिली. शेतमजुराची मुलगी. अलीकडे शेतीच्या कामामुळे त्यांना खूपदा आंबेठाणला अंगारमळ्यात रात्रीही मुक्काम करावा लागे. तिथल्या त्या छोट्या तकलादू घरात. घरासमोरच्या पडवीत आपल्या शेतावर काम करणाऱ्या शेतमजुरांच्या मुलांसाठी ते रात्री सगळी कामे उरकल्यावर शिकवणी घेत. त्यांना लिहायला वाचायला शिकवत. खरेतर दिवसभराच्या श्रमांमुळे ते तोवर अगदी गळून गेलेले असत, पण तरीही ह्या मुलांनी शिकले पाहिजे असे त्यांना खूप वाटे. म्हणूनच त्यांची ही धडपड असे. त्या मुलीच्या हातात पाटी व पेन्सील होती. जोशींनी भिंतीवरच्या फळ्यावर काढलेली अक्षरे ती आपल्या पाटीवर अलगद लिहीत होती, पुन्हा पुन्हा गिरवत होती. तिची एकाग्रता, तन्मयता, शिकण्याची हौस ह्या सगळ्याचे प्रतिबिंब तिच्या चेहऱ्यावर उमटले होते. ते पाहून जोशींना अगदी गहिवरून आले. खूप वेळ ते तिच्याकडे रोखून पाहत होते.
  आत्ता पुन्हा एकदा तिचा तो चेहरा त्यांच्या डोळ्यांपुढे उभा राहिला. बघता बघता मनात विचारचक्र फिरू लागले. आंबेठाणमधले ते शेतमजुरांचे जग आणि इथले जग यांची मन तुलना करू लागले.

  इथली गुटगुटीत, गोरीगोमटी, नवेकोरे कपडे घातलेली, बोर्नव्हीटा-हॉर्लिक्सच्या जाहिरातीतल्यासारखी दिसणारी गोंडस मुले आणि तिथली रोगजर्जर, किडकिडीत, खरजेने भरलेली, ढगळ फाटकेतुटके कपडे घातलेली मुले.
  इथली ती सेंट जोसेफसारखी भव्य शाळा आणि तिथली ती अर्धमोडल्या भिंतींची, गळकी, एकमास्तरी चावडीवरची शाळा.  इथल्या शाळेतला तो मोठा थोरला स्विमिंग पूल आणि तिथल्या कोरड्या पडलेल्या विहिरी.
 इथला तो शाळेसमोरचा रस्ता; विद्यापीठ चौकापासून थेट एनडीएपर्यंत गेलेला वीसएक किलोमीटरचा रस्ता. गेल्याच वर्षी केवळ एक दिवसाकरिता राष्ट्रपती येणार होते, म्हणून तो उत्तम असतानाही पुन्हा एकदा डांबर ओतून, काही लाख रुपये खर्चुन अधिक गुळगुळीत करण्यात आला होता. आणि गावातला तो दहा-बारा वर्षांपूर्वी दुष्काळाच्या वेळी श्रमदानाने बांधलेला खडीचा कच्चा रस्ता; ज्याच्यावरून चालताना घोटे बुडतील इतका चिखल प्रत्येक मोठ्या पावसानंतर हमखास साचायचा.
 वाटले, पुणे आणि आंबेठाण म्हणजे जणू दोन वेगवेगळे देश आहेत – एकमेकांपासून इतके वेगळे, की त्यांच्यात काही नातेच नसावे.
 स्वित्झर्लंडसारख्या अत्यंत प्रगत देशात राहून भारतात परतल्यावर आपला देश आणि तो देश यांच्यातील तफावत किती प्रचंड आहे, याची जोशींना कल्पना होतीच, पण आंबेठाणसारख्या ग्रामीण भागात गेले वर्षभर शेती केल्यानंतर, तिथली परिस्थिती प्रत्यक्ष अनुभवल्यानंतर, जोशींच्या लक्षात आले, की पुण्यासारखा शहरी भारत आणि तिथून अवघ्या चाळीस किलोमीटरवरचा आंबेठाणसारखा ग्रामीण भारत यांच्यातील दरी ही स्वित्झर्लंड आणि भारत यांच्यातल्या दरीपेक्षाही कितीतरी जास्त भीषण आहे.
 झेंडा एकच आहे, राष्ट्रपती एकच आहेत, राष्ट्रगीत एकच आहे - वरवरच्या खुणा सगळ्या एकच आहेत; परंतु आर्थिकदृष्ट्या ह्या देशाचे दोन भाग पडले आहेत. एक भाग हा दुसऱ्या भागाच्या शोषणावरच जगतो आहे, आणि सतत जास्तीतजास्त शोषण करत चालला आहे आणि दुसऱ्या भागाचे मात्र शोषणच होत आहे.
 शोषक म्हणजे 'इंडिया' आणि शोषित म्हणजे 'भारत'.

 'इंडिया' आणि 'भारत' यांच्यातील या जमीनअस्मानाच्या फरकाचे मूळ कारणही त्यांच्या लक्षात आले होते. किंबहुना, ते सतत मनात सलतच होते. ते होते त्यांची आणि त्यांच्यासारख्या सर्वच शेतकऱ्यांची नुकसानीतली शेती. महिन्यापूर्वीच त्यांनी स्वतःच्या शेतात पिकवलेला कांदा विकला होता. अवघ्या २० रुपये क्विटल या भावाने. त्यांच्या चारपाच महिन्यांच्या घामाचा बाजारपेठेतला भाव तेवढाच होता-२० पैसे किलो! आणि इथल्या आजच्या समारंभात तर केवळ खाण्यापिण्यावर शंभराची नोट उडाली होती!
 तसे पाहिले तर भारतातल्या आत्यंतिक विषमतेची असली मांडणी त्यांना अपरिचित नव्हती. कम्युनिस्ट विचारवंत ती वर्षानुवर्षे करत आले होते. मुंबईत मलबारहिलवर १९६५च्या सुमारास जेव्हा उषाकिरण ही भारतातील पहिली सव्वीस मजली गगनचुंबी इमारत बांधली गेली, तेव्हा ते मुंबईतच नोकरी करत होते आणि उषाकिरण बिल्डिंग आणि शेजारीच मलबारहिलच्या डोंगरउतारावर असलेल्या झोपड्या ह्यांची एकत्रित छायाचित्रे अनेक ठिकाणी प्रकाशित झालेली त्यांनी पाहिली होती. पण जोशींना त्यावेळी तो केवळ एक 'प्रचार' (प्रपोगंडा) वाटला होता. त्यानंतर कोल्हापूर येथे एक वर्ष शिकवत असताना सिडनममधले आपले सहाध्यायी आणि कोल्हापूरमधले आपले विद्यार्थी यांच्यातील फरकही त्यांनी बघितला होता. पण त्यावेळीही ते द्वंद्व त्यांच्या मनाला तितकेसे भिडले नव्हते; किंबहुना त्यांच्यात काही द्वंद्व आहे हे बुद्धीला तितकेसे पटलेही नव्हते.
 याचे कारण त्यावेळी ते स्वतः त्या 'इंडिया'चाच एक भाग होते आणि जे मत आपल्याला फायदेशीर आहे, तेच मत आपोआपच मनोमन ग्राह्य मानणे आणि जे मत आपल्या हितसंबंधांना बाधा आणणारे आहे, ते दुर्लक्षित करणे हे एकूणच मनुष्यस्वभावाला धरून होते.
 पण आताची परिस्थिती अगदी वेगळी होती. स्वतःच घेतलेल्या निर्णयामुळे ते पूर्वीच्या सुखासीन अशा 'इंडिया'तून दरिद्री 'भारता'त फेकले गेले होते. आपल्या आताच्या दुःखाला दुसरा कोणीतरी 'शोषक' इंडिया जबाबदार आहे, ही जाणीव त्यांच्या हृदयात काट्याप्रमाणे सलत होती. शहरात आहे तो 'त्यांचा इंडिया' आणि गावात आहे तो 'आपला भारत'.
 देशातील एकूण गरिबीचे मूळ शेतकऱ्याला मिळणाऱ्या अत्यल्प भावातच आहे हेही उघडच होते. शहरात झोपड्यांमधून राहणारे ते दुर्दैवी जीव – किंवा त्यांचे पूर्वज - हेही एकेकाळी आपल्यासारखेच शेतकरी असले पाहिजेत आणि शेतीत होणारी उपासमार टाळण्यासाठी त्यांना शहरात स्थलांतर करावे लागले असले पाहिजे हेही स्पष्टच होते.
 'इंडिया विरुद्ध भारत' या त्यांच्या मनात घोळू लागलेल्या द्वंद्वाला आणखीही एक महत्त्वाचा व्यक्तिगत पदर असणे शक्य होते. गेल्या दीड वर्षात पदोपदी त्यांना अगदी किरकोळ लोकांपुढे बाबापुता करावे लागले होते, अगदी क्षुल्लक कारणासाठी तासन्तास रांगेत उभे राहावे लागले होते, समोरच्या माणसाशी अजिजीने बोलावे लागले होते. घर घेणे, जमीन घेणे, त्यासाठी लागणारे असंख्य कागदपत्र मिळवणे, गॅस-टेलिफोनचे कनेक्शन मिळवणे, विजेचे मीटर स्वतःच्या नावावर करून घेणे, मुलींसाठी शाळेत प्रवेश मिळवणे, त्यासाठी तहेत-हेचे दाखले मिळवणे - एक ना दोन, अशा असंख्य प्रसंगी गेल्या दीड वर्षांत त्यांच्या वाट्याला असे अपमान आले होते. आपल्या शेतातले कांदे, बटाटे, काकड्या विकण्यासाठी जेव्हा ते चाकणच्या बाजारसमितीत जात होते, तेव्हा तिथल्या कर्मचाऱ्यांच्याकडून, व्यापाऱ्यांकडून, अगदी हमालांकडूनही त्यांच्या आत्मसन्मानाला प्रत्येक वेळी अशीच ठेच पोचत होती. आपल्या मालाची किंमत किंवा आपल्या श्रमाचे मूल्य हा समोरचा फालतू माणूस ठरवणार आणि ते मुकाटपणे मान्य केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही, ही जाणीव त्यांचे विलक्षण संवेदनशील मन पोळणारी होती.
 त्यांच्यासारख्या उच्च शासकीय सेवेत दहा वर्षे काढलेल्या व्यक्तीला ह्यातला प्रत्येक प्रसंग अगदी जिवावर धोंडा ठेवून निभवावा लागला होता. आत्मसन्मानाची अतिशय प्रखर जाणीव असलेल्या त्यांच्यासारख्या व्यक्तीच्या दृष्टीनेतर यांतल्या प्रत्येक प्रसंगाची दाहकता अधिकच असह्य होती.
 'इंडिया विरुद्ध भारत' या संकल्पनेत त्यांना उमगलेले तत्कालीन सामाजिक परिस्थितीचे प्रतिबिंब तर होतेच, पण त्यांच्या स्वतःच्या तत्कालीन मानसिक संघर्षाचे प्रतिबिंबही त्या संकल्पनेत नेमके उतरले होते. त्यात केवळ वैचारिक पातळीवरचे आकलन नव्हते; भावनांचे उत्कट गहिरेपणही होते. त्यात व्यक्तिशः आपल्या होत असलेल्या अवहेलनेचा दंशही होता; त्या 'इंडिया'वासींमुळे आपल्यासारख्या 'भारत'वासींना सोसाव्या लागणाऱ्या लाचारीविषयीचा संतापही होता.
 म्हणूनच त्यांची नेहमीची हुकमी झोप आज त्यांना सोडून गेली होती. 'इंडिया विरुद्ध भारत'चे वादळ डोक्यात सतत घोंघावू लागले होते.

चाकणचा कांदेबाजार : पहिली ठिणगी


 कांद्याची महती प्राचीन काळापासून माणसाला ज्ञात आहे. कांदेनवमी अनेक ठिकाणी साजरी केली जाते: असे भाग्य अन्य कठल्या भाजीला लाभलेले नाही! कांद्याची भजी लोकप्रिय आहेत. त्याची भाजीही अनेक प्रकारे केली जाते; तो नुसताही चवीने खाल्ला जातो. विशेष म्हणजे अन्य पदार्थांची चवही तो वाढवतो. त्यामुळे देशभर सगळीकडेच रोजच्या जेवणात कांद्याचा समावेश केला जातो. पण कांद्याचे सर्वाधिक उत्पन्न मात्र महाराष्ट्रातच होते. त्यातही पुन्हा पुणे व नाशिक जिल्ह्यांत तो जास्त पिकतो. इथून मग तो देशभर पाठवला जातो.
 कांदा हे बहात्तर रोगांवर औषध आहे असे म्हटले जाते. पण तो पिकवणाऱ्या शेतकऱ्यापुढे 'आता पुढे काय होणार?' हा त्याला रडवणारा प्रश्न कायम 'आ' वासून असतो. का, ते १९७७ साली शरद जोशींनी शेतीला सुरुवात केल्यानंतर लगेचच त्यांच्या लक्षात आले.
 अल्पकाळासाठी लावलेला बटाटा व काकडी सोडली, तर कांदा हेच त्यांचे मुख्य पीक होते. कांद्याचे पीक तयार व्हायला साधारण पाच महिने लागतात. त्या काळातला त्याचा उत्पादनखर्च एका क्विटलला (१०० किलोंना) साधारण ४५ ते ६० रुपये असायचा, पण त्यांना बाजारपेठेत मिळणारा भाव हा कधीच तेवढा नसायचा; खपदा तर तो अगदी १५ रुपये इतका कमी असायचा. मिळणाऱ्या भावातून शेतातला कांदा तोडणे व बाजारात विक्रीसाठी नेणे हेही शक्य होत नसे. एकदा तर ते इतके निराश झाले होते, की त्यांनी 'ज्याला कांदा हवा असेल त्याने माझ्या शेतातून तो फुकट न्यावा' अशी जाहिरातही पुण्यातील एका पेपरात दिली होती! लवकरच कांद्याबद्दलच्या अनेक अडचणी त्यांच्या पूर्ण लक्षात आल्या.

 पहिली मोठी अडचण म्हणजे, कांदा हे नाशवंत पीक आहे. तो शेतावर दीर्घकाळ साठवून ठेवता येत नाही. पैशासाठी सदैव गांजलेल्या शेतकऱ्याला तेवढा धीर धरणेही शक्य नसते. कधी एकदा तो विकला जातो व पैसे हाती येतात असे त्याला होऊन जाते. त्यामुळे येईल त्या भावाला तो कांदा विकून टाकतो.
 दुसरी मोठी अडचण वाहतकीची असायची. टकमध्ये तो पोत्यातन न भरता सटा भरला जाई. कारण एका ट्रकलोडमध्ये समजा आठ टन कांदा जाणार असेल, तर एका पोत्यात ५० किलो ह्या हिशेबाने त्यासाठी १६० पोती लागतील व एका पोत्याला चार रुपये ह्या दराने तोच खर्च ६४० रुपये येणार. तो परवडत नाही म्हणून शेतकरी कांदा सुटाच भरत. त्यात नासाडी बरीच होई. डिझेलच्या भरमसाट दरवाढीमुळे एका ट्रकचे भाडे निदान हजार रुपये होते. (सर्व आकडे १९७८ सालातील.) तोही खर्च न परवडणारा. कसाबसा तो कांदा शेतातून चाकणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत नेला जाई व रस्त्याच्या कडेलाच त्याचे ढांग लावले जात.बाजार समितीचा माणूस किंवा व्यापाऱ्याचा माणूस तिथे येऊन मालाचा दर्जा तपासणार व भाव ठरवणार. हेदेखील लवकर होणे गरजेचे असे. कारण चाकण भागातला कांदा साधारण फेब्रुवारी, मार्च व एप्रिल ह्या तीन महिन्यांत विक्रीला येतो व नेमक्या ह्याच काळात तिथे वळवाचा पाऊस पडतो. दुपारी उन्ह खूप तापले आणि संध्याकाळी पाऊस पडला, असे खूपदा घडते. बाजार समितीत कांदा नेऊन टाकला, की तो खपायला जितका वेळ लागेल तितका वेळ शेतकरी सारखा वर उन्हाकडे बघतो आणि ढगांकडे बघतो. कारण दुपारी कांदा उन्हात तापला आणि संध्याकाळी त्यावर वळवाचा पाऊस पडला, तर सगळ्याच कांद्याचा चिखल व्हायची भीती असते.
 तिसरी मोठी अडचण भावाच्या अनिश्चिततेची. बाजारातील कांद्याच्या भावात प्रचंड चढउतार व्हायचे. ह्यात निरक्षर शेतकऱ्याचे हमखास नुकसान व्हायचे व दलालाचा फायदा. 'शेतकरी संघटक'च्या १३ जुलै १९८४च्या अंकात प्रकाशित झालेले भगवान अहिरे नावाच्या एका बागलाणच्या शेतकऱ्याचे पत्र ह्याचे उत्तम निदर्शक आहे. ते लिहितात,

उन्हाळी कांदे विकण्यासाठी मी ते मनमाड मार्केटवर घेऊन गेलो. माझा एक ट्रक व दोन ट्रॅक्टर भरतील एवढाच माल होता. भाव मिळाला, क्विटलला ४४ रुपये. माल लवकर विकला गेला व मी मोकळा झालो ह्याचा मला आनंद झाला. त्यावेळी उत्पादनखर्च काढणे वगैरे काहीच माहिती नव्हते. पैसे घेऊन जाण्यासाठी दलालाने आठ दिवसांनी बोलावले. त्याप्रमाणे मी आठ दिवसांनी मनमाडला गेलो. त्यावेळी ८५ ते ९० रुपये भाव चालू होता. म्हणजे आठ दिवसांत तो दुप्पट झाला होता! मी अगदी नाराज झालो. वाटले, काय पाप केले होते मी! आठ दिवस थांबलो असतो तर! मला माझे शेतातले कष्ट आठवू लागले. दिवसभर उन्हात उभे राहून पाणी भरणे, ऑइल इंजिनच्या धुराड्यामुळे कपडे, शरीर काळे-पिवळे होणे. माझे कांदे तसेच त्याच्याकडे पडून होते. म्हणजे भाववाढीचा सगळा फायदा त्यालाच मिळणार होता. ४४ रुपयांनी माझ्याकडून घेतलेले तेच कांदे, फक्त आठ दिवसांत, दुप्पट पैसे घेऊन तो विकणार होता. जणू मी त्याच्यासाठीच सगळे कष्ट घेतले होते!

 चौथी मोठी अडचण केंद्र सरकारच्या निर्यात धोरणाची होती. परदेशात, विशेषतः आखाती देशांत, भारतीय कांद्याला प्रचंड मागणी आहे. त्यामुळे जेव्हा निर्यात खुली केली जाते, तेव्हा कांद्याचे भाव एकदम चढतात. त्यात शेतकऱ्याला अधिक भाव मिळू शकतो; पण तसे झाले तर स्थानिक बाजारपेठेतील ग्राहकाला जास्त पैसे मोजावे लागतात. त्याबरोबर तो शहरी ग्राहक खवळून उठतो. विरोधी पक्षांची सर्वांत जास्त आंदोलने शेतीमालाच्या भाववाढीच्या मुद्द्यावरून होतात. टूथपेस्टपासून मोटारीपर्यंत आणि शर्टापासून पेट्रोलपर्यंत बाकी सगळ्या गोष्टी महाग झाल्या तरी कुरकुर न करणाऱ्या शहरी लोकांना शेतीमालाची भाववाढ मात्र अजिबात सहन होत नाही, लगेच त्याविरुद्ध काहूर उठवले जाते. त्यामुळे शेतीमालाची भाववाढ होऊ नये यासाठी सरकार नेहमीच दक्ष असते. म्हणूनच कांदा हे राजकीयदृष्ट्या तसे खुप संवेदनशील पीक आहे. शहरातून आरडाओरड सुरू झाली, पेपरांतून टीका सुरू झाली, की सरकार घाईघाईने निर्यातबंदी करते. त्यामुळे मग भाव एकदम कोसळतात. शेतकऱ्याला उत्पादनखर्च भरून निघेल एवढाही भाव मिळत नाही. तसे पाहिले तर शहरी ग्राहकांची संख्या शेतकऱ्यांपेक्षा कमी असते, पण त्यांचे उपद्रवमूल्य खूप असते. ते सुशिक्षित असल्याने आपला विरोध लगेचच व्यक्त करतात. राज्यकर्ते व नोकरशहा, पत्रकार व विचारवंत वगैरे मंडळीही बहुतांशी शहरातच राहत असतात. त्यांच्यापर्यंत ग्राहकाचा असंतोष तत्काळ पोचतो. दिल्लीसारख्या देशाच्या राजधानीच्या बाबतीत तर हे अधिकच खरे आहे. दिल्लीतल्या बारीकशा घडामोडीचीही दखल शासनाला प्राधान्याने घ्यावी लागते कारण त्या घटनेचे पडसाद देशभर उमटत असतात.
 याउलट शेतकरी सगळा ग्रामीण भागात असतो. सरकारी धोरणामुळे त्याला प्रचंड त्रास झाला तरी जे होईल ते सहन करायची त्याची एक सवयच असते; गैरसोयी त्याच्या अंगवळणीच पडलेल्या असतात. त्यातून त्याने कधी असंतोष व्यक्त केला तरी त्याचा आवाज इतका क्षीण असतो, की राजधानीपर्यंत तो पोचतच नाही! कांद्याच्या बाबतीत जोशींना हे वरचेवर जाणवायचे.
 ह्याबाबतचा एक विदारक आणि हृदयाला हात घालणारा पुढील अनुभव आपल्या भाषणात जोशी सुरुवातीच्या दिवसांत खूपदा सांगत असत.

१९७८ साली पावसाळ्यात दिल्लीच्या भाजी मंडीत प्रथमच कांद्याचा भाव सव्वा रुपया किलो झाला. कांद्यावर लगेचच निर्यातबंदी घालण्यात आली. ताबडतोब चाकणच्या बाजारात कांद्याचा भाव क्विटलला १७ रुपयापर्यंत घसरला. त्यावेळी चाकणच्या बाजारात घडलेलं एक उदाहरण सांगतो.

एका शेतकऱ्याकडे चार गाड्या कांदा निघाला होता. आदल्या वर्षी त्याचं कांद्याचं पीक धुईमुळे संपूर्ण बुडालं होतं. पीक बुडाल्यामुळे त्याला बायकोला लुगडं घेता आलं नव्हतं. तो कांद्याच्या गाड्या घेऊन बाजाराला निघाला, तेव्हा बायकोनं सांगितलं, 'माझ्या लुगड्याच्या पार दशा झाल्या आहेत. तर येताना फार खर्चाचं नको, पण एक धडसं लुगडं आणा. आणि पोराची चड्डी फाटली आहे; त्याला मास्तर वर्गात बसू देत नाही, म्हणून घरी पळून येतो. त्याला एक चड्डी आणा.' शेतकऱ्याने चार बैलगाड्या भरून कांदा बाजारात नेला. पण १७ पैसे किलोने कांदा विकून झाल्यावर व मग कर्ज, हमाली, दलाली वगैरे देऊन झाल्यावर त्याच्या असं लक्षात आलं, की यंदाही काही बायकोला लुगडं घेता यायचं नाही. आणि पोराला चड्डी घेता यायची नाही. तो तसाच घरी गेला. त्याचा चेहरा पाहिल्यावर बायकोच्या लक्षात सगळी परिस्थिती आली. तीच त्याला म्हणाली, 'जाऊन द्या, काही वाईट वाटून घेऊ नका. काढीन एवढ्याच लुगड्यावर आणखी एक वर्ष.' दिल्लीत जी माणसं सात रुपयाचं सिनेमा तिकीट वेळ आल्यास पंचवीस रुपयांनादेखील खरेदी करतात, ती माणसं त्यांच्या जेवण्यातला कांदा सव्वा रुपये झाला, की लगेच आरडाओरडा करतात. आणि त्यांना ती भाववाढ टोचू नये, म्हणून शेतकऱ्याच्या घरी काय परिस्थिती असेल याचा जराही विचार न करता सरकार निर्यातबंदी घालतं. (शेतकरी संघटना : विचार आणि कार्यपद्धती, पृष्ठ ५०-१, पहिली आवृत्ती, नोव्हेंबर १९८२)

 कांद्याचे पीक शेतकऱ्याच्या हाती आले, की निर्यातीवर बंदी घालायची, जेणेकरून शेतकऱ्याला मिळणारा भाव कमीत कमी असेल व व्यापाऱ्यांना तो अगदी स्वस्तात खरेदी करता येईल आणि व्यापाऱ्यांची खरेदी संपली, कांदा त्यांच्या गोदामात गेला, की निर्यातबंदी उठवायची; जेणेकरून तोच कमी भावात घेतलेला कांदा आता व्यापाऱ्यांना वाढीव भावात विकता येईल. १९७८, १९७९, १९८० ह्या तिन्ही वर्षांत हे घडले.
 बऱ्याच वर्षांनंतर, म्हणजे सुमारे २०१४ साली, एका मुलाखतीत जोशींनी ह्या संदर्भात म्हटले होते.
 "कांद्याचा भाव जेव्हा पुण्यात डेक्कन जिमखान्यावर एक रुपया किलो होता, तेव्हा तिथे सिनेमाचे तिकीट एक रुपया होते. आज सिनेमाचे तिकीट किमान शंभर रुपये झाले आहे व तरीही लोक ते तिकीट बिनदिक्कत खरेदी करतातच. मग कांद्याचा भाव १०० रुपये किलो झाला, तर एवढा आरडाओरडा करायचे काय कारण आहे?"

 ह्या सततच्या समस्येचा दोन वर्षे अभ्यास केल्यावर व अनेक कटू अनुभव पदरी जमा झाल्यावर जोशींनी कांद्याला उत्पादनखर्चावर आधारित क्विटलला किमान ४५ ते ६० रुपये भाव मिळालाच पाहिजे असे सर्व शेतकऱ्यांना सांगायला सुरुवात केली. जवळ जवळ रोजच ते चाकणच्या बाजारपेठेत जात. जमेल तेवढ्या शेतकऱ्यांशी संपर्क साधत. त्यांना मानणारे काही व्यावसायिक संबंधित होते, ज्यांच्याबद्दल मागील प्रकरणात लिहिलेच आहे. शेतकऱ्यांशी संपर्क साधण्यात त्या मंडळींचा उपयोग व्हायचाच. पण त्याशिवाय केवळ कांदा आंदोलनामुळे जोडले गेलेले असेही त्यांचे दोन स्थानिक सहकारी होते. एकेकाळी चाकणचे सरपंच राहिलेले व दुकानदारीसह अनेक व्यवसाय केलेले शंकरराव वाघ आणि कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध असलेले व गावात छापखाना चालवणारे बाबूलाल परदेशी.  वाघ, परदेशी आणि जोशी अशा या त्रिकुटाने भामनेर खोऱ्यात असंख्य वेळा एकत्र प्रवास केला. आधी एखादा सहकारी बॅटरीवर चालणाऱ्या लाउडस्पीकरवर निवेदन करायचा, 'जगप्रसिद्ध शेतकरी नेते श्री. शरद जोशी आज आपल्या गावात आले आहेत व शेतीप्रश्नावर बोलणार आहेत. तरी सर्व गावकऱ्यांनी त्यांच्या भाषणाचा फायदा घ्यावा' अशा स्वरूपाचे ते निवेदन असे. गावभर फिरून ते पुन्हा पुन्हा ऐकवले जाई. हळूहळू गर्दी जमू लागे. आधी बाकीचे बोलत व पुरेशी गर्दी जमली, की जोशी बोलायला उभे राहत. हा प्रकार त्यांनी सातत्याने वर्षभर शे-दीडशे ठिकाणी तरी केला. त्यावेळी कांद्याचा भाव पार कोसळला होता; अगदी क्विटलला २०-२५ रुपयांपर्यंत.
 आता आपले काही खरे नाही याची जाणीव सर्वच कांदा शेतकऱ्यांना झाली. चाकण बाजारसमितीसमोर जोशींनी शेतकऱ्यांचा एक मेळावा घेतला व एकूण परिस्थिती सगळ्यांना समजावून सांगितली. कांद्याला क्विटलमागे ४५ ते ६० रुपये भाव मिळालाच पाहिजे हे जोशींचे म्हणणे सगळ्यांनाच पटले व ती मागणी समोर ठेवून त्यांनी चाकणच्या बाजारपेठेत त्वेषाने घोषणा द्यायला सुरुवात केली. हे पहिले कांदा आंदोलन, शनिवार २५ मार्च १९७८ची ही घटना.
 हे भाव त्यावेळी इतके पडले होते, याचे कारण म्हणजे केंद्र सरकारचे धोरण. मोहन धारिया त्यावेळी केंद्रात व्यापारमंत्री होते. कांद्याच्या भाववाढीमुळे असंतोष पसरतो आहे हे लक्षात घेऊन १९७७ साली कामाची सूत्रे हाती घेतल्याघेतल्याच त्यांनी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली व त्यामुळे एकाएकी कांद्याचे भाव कोसळले. शेतकऱ्यांची दैना उडाली. उत्पादनखर्च तर सोडाच, कांदा शेतातून काढणे व बाजारात आणणे यातला मजुरीचा व वाहतुकीचा खर्चही भरून निघेना. 'या भावात कुठल्याही परिस्थितीत कांदा विकायचा नाही' असे आवाहन जोशींनी केले. चिडलेल्या शेतकऱ्यांचा प्रतिसाद उत्स्फूर्त होता. आपला कांदा त्यांनी बाजारात आणलाच नाही. बाजारपेठ ओस पडली. सरकारने ४५ ते ६० रुपये क्विटल हा वाढीव भाव बांधून दिला नाही, तर एक एप्रिलपासून शेतकरी रास्ता रोको करतील' असा इशारा लागोपाठ तीन दिवस भरलेल्या शेतकरी मेळाव्यांत तीन वेळा जोशींनी दिला.
 चाकणला काहीतरी गडबड होणार आहे, ह्याची साधारण पूर्वकल्पना स्थानिक सरकारी अधिकाऱ्यांनी कलेक्टरना दिली होती. चर्चेसाठी २९ मार्च रोजी दुपारी कलेक्टरनी एक तातडीची बैठक बोलावली. आपल्या काही साथीदारांसह जोशी पुण्याला कलेक्टरच्या कार्यालयात गेले. चाकणमधले वेगवेगळे राजकीय पक्षांचे पुढारी व बाजारसमितीचे पदाधिकारी पूर्वीच कार्यालयात येऊन पोचले होते. सगळ्या खुर्ध्या त्यांनीच अडवल्या होत्या. जोशींना बसायलाच कुठली खुर्ची रिकामी नव्हती. सगळ्यांचे म्हणणे मांडून झाल्यावर शंकरराव वाघ यांनी जोशीसाहेबांनी आता बोलावे' अशी जाहीर घोषणा केली. तोपर्यंत जोशी नुसतेच एका कोपऱ्यात उभे राहून सगळे ऐकत होते.
 सगळ्या माना चपापून त्यांच्या दिशने वळल्या. कलेक्टरही काहीसे गडबडल्यासारखे झाले. जोशींच्या पार्श्वभूमीची त्यांना थोडीफार कल्पना होती. जरासे उठल्यासारखे करत जोशींसाठी व त्यांच्या दोन सहकाऱ्यांसाठी त्यांनी खुर्च्या मागवल्या. जोशींनी मग पुढे सर्वांसमोर येऊन उभ्याने बोलायला सुरुवात केली. इतका वेळ ज्यांनी त्यांना अनुल्लेखाने मारले होते ते इतर नेतेही आता कान टवकारून त्यांचे म्हणणे ऐकू लागले. कलेक्टर स्वतःच जोशींना इतके महत्त्व देतो आहे म्हटल्यावर त्यांचाही नाइलाज होता!
 "माल जेव्हा शेतकऱ्याच्या हाती येतो व मालाला मागणी असल्याने शेतकऱ्याला चार पैसे अधिक मिळायची शक्यता असते, तेव्हाच निर्यातबंदी करून भाव पाडायचे, आणि माल व्यापाऱ्याकडे गेला, की मात्र निर्यात खुली करून टाकायची, हे सरकारी धोरण शेतकऱ्याच्या जिवावर उठलं आहे. ते बदललंच पाहिजे," हे जोशींचे मुख्य प्रतिपादन होते. ते त्यांनी अनेक उदाहरणे देऊन उत्तम प्रकारे सिद्ध केले. शेवटी ते म्हणाले, “दुष्काळ पडला, की जे सरकार स्वत:च ठरवलेल्या अत्यल्प भावात शेतकऱ्याकडचा शेतीमाल लेव्हीच्या स्वरूपात जबरदस्तीने काढून घेतं, ते सरकार अशा अडचणीच्या वेळी शेतकऱ्याच्या मदतीला का येत नाही? फायदा बाजूला राहू द्या, पण त्याचा उत्पादनखर्च तरी भरून निघेल एवढा भाव सरकार त्याला का मिळवून देत नाही? शेतकऱ्याने जगावं असं सरकारला वाटत नाही का?"
 काही क्षण कार्यालयात सगळे स्तब्ध होते. आपली भूमिका सरकारपुढे जाहीररीत्या मांडणारे जोशींचे हे आयुष्यातील पहिले प्रतिपादन, स्वतः कलेक्टरनी त्यांचे जवळ जवळ दहा मिनिटांचे भाषण लक्षपूर्वक ऐकले. मग स्वतःच पुढाकार घेऊन कांद्यासाठी वाढीव दराची शिफारस करायचे त्यांनी कबल केले व त्याच दिवशी तसे प्रत्यक्षात केलेही. शेवटी सरकारने नाफेड (National Agricultural Cooperative Marketing Federation of India) या शासकीय संस्थेला ४५ ते ५० रुपये क्विटल या भावाने कांदा खरेदी करायचा तातडीचा आदेश दिला. त्यानंतरच बाजारपेठेत नाफेडकडे आपला कांदा द्यायला शेतकऱ्यांनी सुरुवात केली. अशा प्रकारे 'रास्ता रोको'च्या नुसत्या इशाऱ्याने व जोशी यांनी आपली बाजू कलेक्टरकडे प्रभावीपणे मांडल्याने काम झाले; प्रत्यक्ष संघर्ष असा या वेळी करावा लागला नाही.
 ह्या प्रसंगानंतर राजकीय नेते जोशींना अगदी पाण्यात पाहू लागले. आजवर ह्या आंदोलनापासून ते कटाक्षाने दूर राहिले होते. किंबहुना जोशींची त्यांनी कुचेष्टाच केली होती. कदाचित असले शेतकऱ्यांचे आंदोलन कधीच यशस्वी होणार नाही अशी त्यांची अटकळ होती. शिवाय, ज्यात आपले नेतृत्व नाही, ज्याचे श्रेय आपल्याला मिळणार नाही, अशा आंदोलनात सहभागी होण्यात कुठल्याच राजकारण्याला स्वारस्य नव्हते. त्यांनी आजवर फक्त मतांसाठी व गर्दी जमवण्यासाठी शेतकऱ्यांचा वापर केला होता. जोशींचा विजय हा त्यांना स्वतःचा पराजय वाटला.
 राजकारण्यांप्रमाणेच व्यापाऱ्यांनाही मिळालेला हा मोठाच धक्का होता. त्यापूर्वी कधीच नाफेडने कांदाखरेदी केली नव्हती; कांद्याचा सर्व व्यापार खासगी व्यापाऱ्यांच्याच हातात होता.
 शेतकऱ्यांचे हे यश खूप मोठे होते. आपल्या ताकदीचा त्यांना आलेला हा पहिला प्रत्यय होता. या आंदोलनाचा एक परिणाम म्हणून २५ एप्रिल १९७८ रोजी केंद्र सरकारने निर्यातबंदी रद्द केली. चाकणसारख्या छोट्या गावातील आंदोलनाची थेट दिल्लीने दखल घेतली होती.  एक दुर्दैव म्हणजे, महाराष्ट्रातील वृत्तपत्रांनी मात्र ह्या शेतकरीविजयाला काहीच महत्त्व दिले नाही. बहुतेक ठिकाणी ही बातमीसुद्धा छापून आली नाही.

 प्रत्यक्ष आंदोलन संपल्यावरही आणि नाफेडमार्फत वाढीव दराने कांदा खरेदी करायचे नक्की झाल्यावरही, नेमक्या त्याच दराने खरेदी होते आहे, का त्यापेक्षा कमी दर शेतकऱ्याला दिला जात आहे, हे तपासण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीत रोज हजर असणे आवश्यक होते.
 इथे शहरी वाचकाच्या दृष्टीने कृषी उत्पन्न बाजार समिती ह्या व्यवस्थेबद्दल थोडे लिहायला हवे. बाजारपेठ हा शब्द तसा खूप व्यापक आहे; त्यातील शेतकऱ्याशी सर्वाधिक संबंध येणारा विशिष्ट भाग म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती. शेती हा जगातला सगळ्यांत पहिला व्यवसाय असल्याने शेतीचा व्यापार हाही अगदी पहिल्यापासून सुरू झालेला व्यवहार आहे. शतकानुशतके हा व्यापार खासगी क्षेत्रातच चालू होता. हे व्यापारी अनेक प्रकारे अशिक्षित व गरीब शेतकऱ्यांना फसवत असत. त्या फसवणुकीला आळा बसावा म्हणून पुढे शासनाने कृषी उत्पन्न बाजार समित्या स्थापन केल्या. अशा समित्या देशभर सगळ्याच राज्यांत आहेत. महाराष्ट्रात सुमारे ३०० आहेत. जिल्हापरिषदा, ग्रामपंचायती, वेगवेगळ्या सहकारी संस्था वगैरेंप्रमाणे या बाजार सामित्यांचेही नियंत्रण लोकनियुक्त सदस्य करतात. प्रत्यक्षात मात्र अन्य ठिकाणी होते तेच इथेही होते. सर्व समाजाच्या नावाखाली प्रत्यक्षात काही मूठभर मंडळीच सगळी सूत्रे आपल्या हाती ठेवतात. सरकारी कायद्यानुसार शेतीमालाचा सर्व व्यापार ह्या समित्यांमध्येच होऊ शकतो; आपला माल इतर कुठेही वा कोणालाही विकायचे स्वातंत्र्य शेतकऱ्याला नसते. पुन्हा कुठलाही व्यापारी बाजार समित्यांमध्ये येऊन खरेदी-विक्री करू शकत नाही; त्यासाठी बाजार समितीकडून विशिष्ट परवाना घ्यावा लागतो व परवानाधारक व्यापाऱ्यांनाच इथे प्रवेश करता येतो. म्हणजे शेतकऱ्यांच्या नाड्या या समितीच्या हातात असतात तसेच व्यापाऱ्यांच्या नाड्याही. साहजिकच या समित्यांच्या हाती प्रचंड सत्ता एकवटलेली असते. उद्योगक्षेत्रावरील सरकारी बंधनांची सर्वसामान्य नागरिकालाही बऱ्यापैकी माहिती असते, त्यांतून तयार झालेल्या लायसन्स-परमिट राजवर भरपूर चर्चाही होत असते; पण त्याहूनही कितीतरी अधिक जाचक बंधने शेतीक्षेत्रावर आहेत व यांची काहीच चर्चा शहरी वर्गात होत नाही.
 चांगल्या उद्देशाने सुरू झालेल्या असंख्य सरकारी योजनांप्रमाणे या बाजार समित्यांनाही काळाच्या ओघात शोषणकर्त्यांचे विकृत स्वरूप प्राप्त झाले. आजारापेक्षा औषध अधिक घातक ठरले. सर्व शेतीमालाच्या व्यापारात त्यांची एकाधिकारशाही (मोनोपॉली) असल्याने, कोणाचीच स्पर्धा नसल्याने, आपण काहीही केले तरी शेतकऱ्याला आपल्याकडे येण्याशिवाय काही पर्यायच नाही हे त्यांना ठाऊक होते. इथे होणाऱ्या प्रत्येक खरेदी-विक्रीवर बाजार समिती स्वतःचा कर लावते व त्यातून येणाऱ्या उत्पन्नातून त्यांनी माल ठेवायला मोकळी जागा, तो साठवायला गुदामे, शीतगृहे, पुरेसे वाहनतळ, अचूक वजनकाटे, बसायची-जेवायची सोय, स्वच्छतागृहे, प्रत्यक्ष व्यापारासाठी प्रशस्त जागा, मालाच्या कुठल्या ढिगासाठी कुठल्या व्यापाऱ्याने किती रुपयांची बोली लावली आहे याची नेमकी नोंद ठेवणारी यंत्रणा, संगणक वगैरे सुविधा, विकल्या गेलेल्या मालाचा त्वरित हिशेब होऊन शेतकऱ्याच्या हाती त्याचे पैसे द्यायची व्यवस्था वगैरे सोयी शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्याव्यात अशी मुळात योजना होती.
 प्रत्यक्षात यातले फारसे काही झाले नाही. फक्त सरकारी जमिनीवर, सरकारी पैशाने मोठी मोठी मार्केट यार्ड्स उभी राहिली, तिथे समिती सदस्यांची सुसज्ज कार्यालये तयार झाली आणि शेतकऱ्याचे हित सांभाळले जाण्याऐवजी त्याचे अधिकाधिक शोषण करणारी एक साखळीच तयार झाली. आर्थिक गैरव्यवहार प्रचंड प्रमाणावर होऊ लागला. सगळा मनमानीचा कारभार. समितीसदस्यांशी संगनमत करून व्यापारी आपला स्वार्थ साधू लागले. आलेल्या शेतीमालाचे वजन करणारे मापारी, तो माल इकडून तिकडे हलवणारे हमाल, मालाची गुणवत्ता ठरवणारे निरीक्षक, पैशाचा हिशेब ठेवणारे कर्मचारी हे सगळेच शेतकऱ्याला नाडू लागले. एकाधिकारशाहीमुळे लाचार बनलेल्या शेतकऱ्यापुढे त्यांची मर्जी राखल्याशिवाय दुसरा काही मार्गच नव्हता.
 ह्या परिस्थितीत सुधारणा घडवून आणावी म्हणून बऱ्याच नंतर, म्हणजे २००४ साली, राज्य सरकारने एक तज्ज्ञांची समिती नेमून विस्तृत अहवाल तयार करवला. पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी कधी झालीच नाही. कारण बाजार समिती सदस्यांच्या हितसंबंधांना आळा घालणे व त्यातून त्यांना दुखावणे हे कोणालाच परवडणारे नव्हते. शेवटी सत्तेवरील राजकीय पक्षाला निवडणुका जिंकणे आवश्यक होते व या निवडणुकांवर स्थानिक बाजार समिती सदस्यांची पकड असायची; बहुतेकदा ते सगळे सत्ताधारी पक्षाचेच असत. एकगठ्ठा मते त्यांच्या हाती असत. अगदी कालपरवापर्यंत कुठलेच सरकार त्यामुळे या बाजार समित्यांना धक्का लावू शकले नव्हते. अगदी अलीकडे, म्हणजे २०१६ साली, प्रथमच राज्य सरकारने ह्या बाजार समित्यांची एकाधिकारशाही बंद केली. म्हणजे या समित्या बरखास्त केल्या गेल्या नाहीत, पण इथेच मालाची खरेदी-विक्री झाली पाहिजे ही अट काढून टाकून खासगी क्षेत्रासाठीही आता हा व्यापार खुला करण्यात आला आहे. याचा काय परिणाम होतो ते कळायला अजून काही कालावधी जावा लागेल. असो.

 जोशी व त्यांचे सहकारी रोज सकाळी या बाजार समितीत येत असत. नाफेडच्या खरेदीबरोबरच सर्व बाजारात फिरून एकूण व्यवहारावर लक्ष ठेवत. नाफेडची खरेदी होत असली तरी त्यावेळी इतर व्यापारीदेखील आपापली खरेदी चालूच ठेवत. त्यांचेही अनेक शेतकऱ्यांशी जुने संबंध असत, ते नाते टिकवून ठेवणे शेतकऱ्यांच्यादेखील फायद्याचे असे. कारण हेच व्यापारी वेळप्रसंगी शेतकऱ्याला कर्जदेखील देत असत. प्रत्येक शेतकऱ्याला अशा कर्जाचीदेखील कायम गरज असे. अशा व्यापाऱ्यांकडूनदेखील खरेदी नियत दरातच होणे आवश्यक होते. शिवाय, मालाचा दर्जा नीट तपासला जातो आहे की नाही ह्याकडेही लक्ष ठेवावे लागे. इतर कुठल्याही मालाप्रमाणे कांद्याच्या बाबतीतही गुणवत्तेनुसार दर कमी-जास्त होत असत. कांद्याचे पुरुष-पुरुष उंचीचे ढीग यार्डाच्या बाहेरही रस्त्याकडेला रचलेले असत. त्यांच्यामधून वाट काढत पुढे जावे लागे. एखाद्या वेळी भाव घसरले आणि लिलावात कोणी अधिकची बोली लावायलाच तयार होत नसेल, तर अशावेळी मग एखादा शेतकरी स्वतःच जोशींकडे येई. त्यांची मदत घेई. यातूनच मग एखाद्या कायमस्वरूपी संघटनेची गरज सर्वांना पटू लागली.
 या गरजेपोटीच मग १९७९ सालच्या क्रांतिदिनी, म्हणजे ८ ऑगस्ट रोजी, शेतकरी संघटना स्थापन करण्यात आली. चाकण बाजारपेठेसमोरच एक तकलादू ऑफिस थाटले गेले. बाबूलाल यांच्या छापखान्यातच, जागा अगदी छोटी असली तरी मोक्याच्या जागी होती. दोन टेबले, चार खुर्त्या आणि दोन बाकडी मावत होती. दारावरच शेतकरी संघटना' अशी पाटी लावली होती. त्या नावाने लेटरहेड छापून घेतली.
 बाजारपेठेचे गाव परिसरातील शेतकऱ्याच्या दृष्टीने फार महत्वाचे असते. बहुतेक ठिकाणी 'आठवडी बाजार' भरतो व कुठलाही शेतकरी त्याला येतोच येतो. त्याचवेळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात जाऊन शेतीमालाचे प्रत्यक्षात काय भाव सुरू आहेत हे बघतो. त्याला स्वतःच्या कुटुंबासाठीदेखील अनेक गोष्टींची खरेदी करायची असते. आज इंटरनेट व संगणक आल्यामुळे ही परिस्थिती निदान काही प्रगत शेतकऱ्यांसाठी तरी पालटली आहे; जगभरातले बाजारभाव शेतकरी आपल्या घरी बसल्याबसल्या शोधू शकतो; पण १९७९ सालची परिस्थिती फार वेगळी होती.
 संघटना उभारण्याच्या दृष्टीने शेतकऱ्याशी संपर्क साधायचा असेल तर बाजाराच्या गावी त्याला गाठणे हा एकमेव मार्ग होता. बाजाराच्या दिवशी तिथे येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याने आपले काम संपल्यावर थोडा वेळ तरी संघटनेच्या ऑफिसात डोकवावे, आपल्या गाहाण्यांची चर्चा करावी ही अपेक्षा असायची. फक्त शेतीविषयक चर्चा नाही, तर एकूणच विकासविषयक चर्चा करण्यासाठी. अशा चर्चेतून शेतकऱ्यांशी जवळीक साधणे, आपल्यापुढील समस्यांची त्यांना जाणीव करून देणे, त्या सोडवण्यासाठी त्यांना एकत्र आणणे हा संघटनेमागचा मुख्य उद्देश.
 स्वतः शरद जोशी रोज ऑफिसात येऊन बसत. आपल्या स्वतःच्या शेतीकडे आता ते कमी कमी लक्ष देऊ लागले होते. शेती करणे हा जोशींच्या दृष्टीने एक प्रयोग होता व तो करताना त्यांच्यासमोर काही सुस्पष्ट उद्दिष्टे होती. दोन तृतीयांश भारतीय शेती करतात व साहजिकच भारताच्या दारिद्र्याचे मूळ शेतीत आहे हे त्यांना पटले होते; पण ती शेती किफायतशीर का होत नाही हे त्यांना शोधून काढायचे होते. ती किफायतशीर न व्हायची काही कारणे अनेकांनी वेळोवेळी मांडली होती. उदाहरणार्थ, शेतीचे क्षेत्र कमी असणे. भांडवलाची कमतरता. पुरेसे पाणी उपलब्ध नसणे. चांगल्या अवजारांचा अभाव. खते, औषधे व प्रगत बियाणे यांचा पुरेसा वापर न करणे. आणि मुख्य म्हणजे शेतकरी अशिक्षित असल्याने आधुनिक व्यवस्थापनतंत्रांचा व तंत्रज्ञानाचा त्याला फायदा न मिळणे. स्वतःच्या शेतीत त्यांनी ह्यातील प्रत्येक अडचणीला उत्तर उपलब्ध करून दिले होते. त्यांचे शेतीचे क्षेत्र पुरेसे होते, भांडवल भरपूर गुंतवले होते, विहिरींचे पाणी होते, अवजारे-खते-बियाणे इत्यादी सर्व आधुनिक गोष्टींचा वापर त्यांनी केला होता.
 पण हे सगळे करूनही त्यांची शेती किफायतशीर नव्हती. ह्याचे मुख्य कारण म्हणजे आपण जे-जे काही पिकवतो त्याला बाजारात मिळणारा भाव इतका कमालांचा अपुरा आहे, की त्यातून ही शेती किफायतशीर होणे कधीच शक्य नाही, आणि परिस्थिती अशी आहे हा केवळ एखादा अपघात नसून, देशाने स्वीकारलेल्या अत्यंत चुकीच्या व शेतीला मारक अशा तथाकथित सोव्हिएत धर्तीच्या समाजवादी धोरणाचा तो परिणाम आहे; त्या विकृत व्यवस्थेत देशातील अभिजनवर्गाचे हित गुंतलेले आहे व म्हणूनच ते धोरण चालू राहिले आहे, ह्या निष्कर्षाप्रत आता जोशी आले होते. खंडीभर भले थोरले ग्रंथ वाचून आणि असंख्य परिसंवादांत भाग घेऊन जे सत्य कधीच उमजले नसते, ते आता त्यांना अनुभवांतून नेमके उमजले होते. ही भ्रष्ट यंत्रणा बदलण्यासाठी लढा उभारायचा त्यांनी पक्का निर्धार केला होता. म्हणूनच जवळ जवळ सगळा वेळ संघटना उभारण्यासाठीच द्यायचा असे त्यांनी ठरवले होते.
 परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांकडून कसलाच प्रतिसाद मिळेना. दिवसभर जोशी आणि त्यांचे काही निवडक सहकारी अगदी आतुरतेने इतर कोणी शेतकरी बांधव येतात का, याची वाट पाहत असत. पण फारसे कोणी येतच नसत. त्यातूनही कोणी आलेच तरी ते खूप घाईत असायचे, चाकणमधली आपली इतर कामे करता करता ते केवळ 'शेतकरी संघटना हा प्रकार तरी काय आहे?' एवढे बघण्यापुरतेच डोकावून जायचे; नंतर पुन्हा ते तोंड दाखवत नसत. संघटना बांधणे त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे नसे. कधीकधी तासन्तास तिथे बसून वेळ अगदी फुकट गेला असे जोशींना वाटायचे. शेतकऱ्यांना एकत्र आणणे फारच अवघड आहे; त्यामानाने कामगारांची एकजूट उभारणे तुलनेने सोपे असते, असे कार्ल मार्क्स म्हणाला होता ते जोशींना अशा वेळी आठवू लागे.
 शेवटी मग पर्वत महमदाकडे आला नाही, तर महमदाने पर्वताकडे जावे, ह्या न्यायाने, शेतकरी कार्यालयात यायची वाट न बघता पूर्वीप्रमाणेच पुन्हा एकदा आपणच स्वतः गावोगावी जायचे, त्यांना भेटायचे, आपल्यावरील अन्यायाची त्यांना जाणीव करून द्यायची, त्याच्या निवारणार्थ एकत्र येण्यातले फायदे त्यांना पटवायचे व संघटनेचा प्रसार करायचा असे त्यांनी ठरवले. त्या दृष्टीने सकाळी थोडा वेळ ऑफिस व नंतर दिवसभर भटकंती हा प्रकार सुरू झाला.
 सुरुवातीपासून आंदोलनात असलेले चाकणजवळच्या म्हाळुगे गावचे श्याम पवार म्हणतात,
 "संघटनाबांधणीच्या सुरुवातीच्या त्या काळात जोशी आपल्याजवळचे तीन-चार सहकारी घेऊन भामनेर खोऱ्यातील एखाद्या गावात जात. आमच्यासोबतच झाडाखाली बसून पिठलं, भाकरी, कांदा खात. कधी आम्हाला एखाद्या धाब्यावर घेऊन जात. बिल तेच देत. कधी जीपने येत, पण कधी रस्ता नसला तर बरेच अंतर पायीदेखील जावे लागे. त्यासाठी स्थानिक जत्रा, यात्रा किंवा बाजाराचा दिवस ते पकडत. बरोबरचे सहकारी पारावर किंवा देवळाशेजारी गाणी वा पोवाडे म्हणू लागत. थोडेफार लोक जमले, की जोशी बोलायला सुरुवात करत. शेतकऱ्यांच्या समस्या कुठल्या आहेत, त्यावर काय इलाज करता येईल वगैरे विचार मांडत. एक अनाकलनीय ऊर्जा जणू या कामासाठी त्यांना प्रवृत्त करत असावी. शेतीमालाचा उत्पादनखर्च कसा काढायचा, ह्या पहिल्या धड्यापासून सुरुवात करून आंतरराष्ट्रीय घडामोडींचा शेतकऱ्यावर काय परिणाम राहील इथपर्यंत अनेक मूलभूत मुद्दे ते मांडत. अगदी सोप्या भाषेत बोलत."

 पण अशा फिरण्यालाही अंत होता. अख्खा जन्म जरी असे फिरण्यात घालवला तरी हजारभर शेतकऱ्यांच्या पलीकडे आपण पोचू शकणार नाही हे उघड होते. काय करावे याचा विचार करत असतानाच संघटनेचे एक साप्ताहिक काढावे ही कल्पना पुढे आली. त्याचबरोबर साप्ताहिकाचे नाव काय ठेवायचे, ते रजिस्टर कुठून करून घ्यायचे, साप्ताहिकासाठी कुठून कुठून परवाने घ्यावे लागतात, टपालखात्याची परवानगी कशी मिळवायची, प्रत्यक्ष छपाई कोण करणार, कागद कुठून मिळवायचा, एकूण खर्च किती येतो वगैरे अनेक प्रश्न उभे राहिले. ही साधारण ऑक्टोबर १९७९मधली गोष्ट आहे.
 अशा वेळी बाबूलाल परदेशी मोठ्या धडाडीने पुढे झाले. ते वारकरी पंथाचे होते व कीर्तनेही करायचे. ते म्हणाले,
 "मला स्वतःला भक्तिमार्गाचा प्रचार करण्यासाठी एक साप्ताहिक काढायचं आहे व त्यासाठी मी वारकरी हे नाव दिल्लीहून मंजूर करून घेतलं आहे. तुम्ही म्हणालात तर तेच आपण संघटनेचं मुखपत्र म्हणून सुरू करू शकतो. माझा स्वतःचा छापखाना आहे. मनात आणलं तर दोन-तीन आठवड्यातच आपण ते सुरू करू शकू."
 सुरुवातीला जोशींना ह्या प्रस्तावाबद्दल जरा साशंकता होती. मुख्यतः नावाबद्दल. त्यांच्या मनातील लढाऊ अशा शेतकरी संघटनेचे मुखपत्र म्हणायचे आणि नाव मात्र वारकरी, हे खूप विसंगत वाटत होते. पण दुसरे कुठले नाव मंजूर करून घायचे म्हणजे त्यात पाच-सहा महिने सहज जाणार होते. तेवढा वेळ आता त्यांच्यापाशी नव्हता. भामनेरच्या रस्त्यासाठी एक मोठे आंदोलन उभारायचा गेले काही महिने ते प्रयत्न करत होते. फेब्रुवारी महिन्यात सुरू होणाऱ्या पुढच्या हंगामात कांदाप्रश्नही पुन्हा एकदा भडकणार हे उघड दिसत होते. आता अधिक न थांबता आहे ते वारकरी नाव घेऊनच साप्ताहिक काढणे श्रेयस्कर होते. त्यानुसार मग त्यांनी साप्ताहिकाची कसून तयारी सुरू केली. कुणाचीतरी ओळख काढून पुण्यातील एका दैनिकाकडून कागद मिळवला, मजकूर तयार केला आणि लवकरच वारकरीचा पहिला अंक छापून तयार झाला. तो शनिवार होता व अंकावरची तारीख होती ३ नोव्हेंबर १९७९.
 पहिल्या अंकाच्या पहिल्या पानावर संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांचे चित्र छापले होते. खालच्या भागात संत रामदासांचे चित्रही आहे. कारण या तिघांचे ब्लॉक्स छापखान्यात तयारच होते! 'ओम नमो जी आद्या' या ज्ञानेश्वरीतील पहिल्या ओवीच्या आधाराने जोशींनी पहिले संपादकीय लिहिले. “देश नासला नासला, उठे तोच कुटी, पिके होताची होताची, होते लुटालुटी" ह्या रामदासस्वामींच्या अगदी समर्पक अशा ओळींनी संपादकीय सुरू झाले होते. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापले त्यावेळची परिस्थिती आणि महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती यांचे वर्णन करून दोन्हीमधील साधर्म्य त्यात दाखवले होते.

 शेतकरी संघटनेचा प्रवास कसा सुरू झाला हे वारकरीच्या सुरुवातीच्या अंकांवरून अभ्यासकांना जाणवेल. उदाहरणार्थ, पहिला अंक :
शेतकऱ्यांच्या प्रश्नांची निर्भीड चर्चा करणारे शेतकरी संघटनेचे मुखपत्र' हे पहिल्याच पानावर शीर्षस्थानी ठळक अक्षरांत छापले आहे. शेतकरी संघटनेचा १९७९-१९८०चा दोनकलमी कार्यक्रमही ठळक अक्षरांत पहिल्याच पानावर छापला आहे. तो आहे :
१) चाकण व संबंधित बाजारपेठांत कांदा, बटाटा व भुईमूग यांचे भाव क्विटलमागे रुपये ५०, रुपये १०० व रुपये २५०च्या खाली जाऊ न देणे.
२) गावोगावी संघटना बांधून पुढील लढ्याची तयारी करणे.
दुसऱ्या पानावर शेतकरी संघटनेच्या तीन घोषणा छापल्या आहेत -

  • शेतकरी तितुका एक एक!
  • जय किसान! जय जवान!
  • भारत झिंदाबाद!

 त्याच पानावर आसखेड धरण आणि भामनहर रस्ता यांसाठी संघटनेतर्फे डिसेंबर महिन्यात भरवल्या जाणाऱ्या एका परिषदेची माहिती देणारी चौकट आहे. शेतकऱ्यांनी काय करावे म्हणून 'सहा मार्गदर्शक तत्त्वे ह्याच पानावर आहेत. शेतकरी संघटनेचा मुख्य भर शेतीमालास रास्त भाव मिळवून देण्यावर आहे व म्हणून संघटनेने ठरवून दिलेल्या किमान किमतीच्या खाली आपला शेतीमाल विकू नका हे त्यातील प्रमुख तत्त्व आहे. याच पानावर ते सेवादलाच्या शाखेत जायचे तेव्हापासून ज्यांच्याविषयी जोशींना कायम आदर होता, त्या सानेगुरुजींचे किसानांना उद्देशून लिहिलेले एक चार कडव्यांचे गीत संपूर्ण छापले आहे. 'शेतकरी संघटनेचे गीत' म्हणन स्वीकारण्यात आलेल्या या गीताची सरुवात होती : उठू दे देश, पेटू दे देश; येथून तेथून सारा, पेटू दे देश.
 या गीतातील विचार शेतकरी संघटनेच्या एकूण विचारांशी इतके जुळणारे आहेत, की आज इतक्या वर्षांनी ते वाचताना या साम्याचे खूप आश्चर्य वाटते. विशेषतः ‘घाम गळे तुमचा, हरामाला दाम' ह्या ओळीत 'भीक नको, हवे घामाचे दाम' ह्या शेतकरी संघटनेच्या प्रसिद्ध घोषणेचे बीज दडलेले आहे हे कोणालाही जाणवावे. गीताच्यावर सानेगुरुजींचे छायाचित्र छापलेले आहे व संपूर्ण अंकातील समकालीन व्यक्तीचे असे ते एकमेव छायाचित्र आहे.
 याच पानावर कवितेखाली 'कलावंत शेतकऱ्यांना आवाहन' या मथळ्याखाली एक चौकट आहे व तिच्यात संघटनेला प्रचारासाठी एक शाहीर पथक लगेच तयार करायचे आहे आणि त्यासाठी गायक, वादक, कवी यांची, तसेच नट व चित्रकार यांचीही गरज असल्याचे छापले आहे. संघटनेच्या प्रसारासाठी जोशी यांनी सुरुवातीपासूनच वेगवेगळ्या माध्यमांचा विचार केला होता हे त्यातून जाणवते.
 या पहिल्या अंकाच्या तिसऱ्या पानावर कांद्याचा लढा हा स्वतः शरद जोशींनी लिहिलेला लेख आहे. संपूर्ण अंकातला हा एकमेव मोठा लेख आहे व तो त्यांचा आहे. पुढे 'शेतकरी संघटक' नावाने जे पाक्षिक संघटनेचे मुखपत्र म्हणून बरीच वर्षे चालवले गेले, त्यातही मुख्य लेखन हे बहुतेकदा जोशी यांचेच होते व मुखपत्राचे आणि संघटनेचेही हे एकचालकानुवर्तीय स्वरूप पहिल्यापासूनचेच आहे हेही हा अंक वाचताना लक्षात येते.
 या पहिल्याच चार-पानी अंकाचे चौथे संपूर्ण पान आठ छोट्या जाहिरातींनी भरलेले आहे व ह्या सर्व जाहिराती त्यांच्या संपर्कात आलेल्या चाकणमधील लहान लहान व्यावसायिकांच्या व व्यापाऱ्यांच्या आहेत. त्यांच्या शुभेच्छा त्यावेळी व नंतरही शेतकरी संघटनेला व शरद जोशी यांना होत्या; जोशींनीही कधी उद्योजकतेला विरोध केलेला नाही हे लक्षात येते.
 किरकोळ अंकाची किंमत ३० पैसे, तसेच वार्षिक वर्गणी रुपये १५ ह्याच्याबरोबरच तहहयात वर्गणी रुपये १५० हेदेखील छापलेले आहे. याचाच अर्थ हे केवळ तात्कालिक गरजा भागवणारे साप्ताहिक नसून ते वर्षानुवर्षे चालू राहावे, अशी जोशी यांची त्यावेळी तरी कल्पना होती हे जाणवते. जिथे वितरक व प्रतिनिधी नेमणे आहे अशा दहा गावांची यादीही अंकात आहे. संपादक म्हणून शरद जोशी यांचे तर कार्यकारी संपादक म्हणून बाबूलाल परदेशी यांचे नाव शेवटी छापले आहे. पत्तादेखील परदेशी यांच्या चाकण प्रिंटींग प्रेसचाच आहे.
 “माझ्यासारख्या नास्तिकाला वारकरी हे नाव पसंत नव्हते," असे जोशी यांनी म्हटले आहे. पुढच्याच वर्षी जोशी यांचा ज्या विजय परुळकर यांच्याशी निकटचा संबंध आला, त्यांनी "वारकरी म्हणजे 'वारकरी; अन्याय करणाऱ्यावर वार करणारा" अशी त्याची फोड केली होती व ते जोशींना खूप आवडले होते; मनात काहीशी डाचणारी अप्रस्तुत नावाबद्दलची खंत त्यामुळे दूर झाली!
 अंकाची जुळणी चालू असतानाच एकीकडे प्रकाशन समारंभाची तयारी सुरू झाली. एव्हाना ऑक्टोबरचा शेवटचा आठवडादेखील संपत आला होता. जेमतेम चार दिवस हातात होते. चाकण बाजारात एक लहानसा मांडव घातला गेला. बाबूलालनी आपल्या छापखान्यात घाईघाईने काही पत्रिका छापल्या, वाटल्या, पोस्टर्स छापली. एक अशी कल्पना निघाली, की समारंभात जे सामील होतील त्यांना लावायला एखादा बिल्ला तयार करावा, म्हणजे मग भविष्यात संघटनेचे कार्यकर्ते कोण आहेत हे ओळखणे कोणालाही सुलभ होईल. बिल्ला कसा असावा ह्याविषयी काही कल्पना मनात स्पष्ट होत्या. लाल रंगाचा गोल बिल्ला व त्यावर पांढऱ्या अक्षरात शेतकरी संघटना' ही अक्षरे. (लाल पार्श्वभूमी व त्यावर पांढरा क्रॉस ह्या स्वित्झर्लंडच्या राष्ट्रध्वजाच्या डिझाइनशी असलेले ह्याचे साम्य लक्षणीय आहे.) पण अल्पावधीत असे बिल्ले कोण करून देणार हा प्रश्नच होता. बाबूलाल ह्यांचे डॉ. रमेशचंद्र नावाचे एक पुण्यात राहणारे मित्र होते. समाजवादी पक्षाचे ते स्थानिक संघटक होते. बिल्ले कुठे मिळतील ह्याची चौकशी करायला मंडळी त्यांच्या घरी गेली. दुर्दैवाने ते घरी नव्हते. निराश होऊन जोशी व बाबूलाल बाहेर पडले तेव्हा फाटकातच रमेशचंद्रांचे भाऊ भेटले. 'काय काम होतं?' असे त्यांनी विचारल्यावर जोशींनी आपली गरज त्यांना सांगितली. “माझा प्लास्टिक मोल्डिंगचा एक छोटा कारखाना आहे. मी तुम्हाला चोवीस तासांत तसे प्लास्टिकचे बिल्ले बनवून देतो," ते म्हणाले.
 'चला, प्लास्टिक तर प्लास्टिक, पण आपली आत्ताची गरज तर भागली,' म्हणत जोशींनी सुटकेचा सुस्कारा सोडला. एक अडचण तरी दूर झाली. सांगितल्याप्रमाणे दुसऱ्याच दिवशी त्यांनी बिल्ले दिलेदेखील हे विशेष. पुढे प्लास्टिकचे हे बिल्ले बदलन पत्र्याचे बिल्ले तयार केले गेले, पण डिझाइन तेच राहिले. हा बिल्ला पुढे शेतकरी संघटनेची निशाणी म्हणून देशभर प्रसिद्ध पावला.
 दोन नोव्हेंबरपर्यंत खुर्च्या, टेबल, बॅनर्स, हारतुरे ह्याची व्यवस्था झाली. कार्यक्रमाची रूपरेखा ठरली. ओळखीतून कोणीतरी एक लाउडस्पीकर मिळवला. अध्यक्ष कोणाला बोलवायचे हा प्रश्नच होता. कारण संघटना त्यावेळी अगदी नगण्य होती आणि राजकारण्यांशी फटकूनच राहिली होती. त्यामुळे खासदार, आमदार वगैरे मंडळी सोडाच, साधा ग्रामपंचायतीचा सभापतीदेखील प्रकाशनासाठी यायची शक्यता नव्हती.
 शेवटी भामनेर खोऱ्यातील एका गावाच्या पंचायत समितीचा एक सदस्य अध्यक्ष म्हणून नक्की केला. 'आगामी भामनेर सडकेच्या आंदोलनात तो उपयोगी पडेल' ही जोशींची कल्पना. बाबूलाल अधिक व्यवहारी होते. तो निदान वारकरीचा आजीव सदस्यतर होईल' ही त्यांची कल्पना. प्रत्यक्षात त्याने आजीव सदस्य व्हायचे कबूलदेखील केले; पण दिले मात्र फक्त रुपये ५०! उरलेले १०० राहूनच गेले!

 'वारकरी'चे प्रकाशन झाले आणि योगायोगाने त्याच आठवड्यात आंदोलनाचा परत एक प्रसंग आला. आधीचे काही महिने नाफेडने खरेदी थांबवली होती व सर्व व्यवहार व्यापाऱ्यांच्याच हातात पुन्हा गेला होता. त्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये असंतोष होता. त्यांच्या सभा-निदर्शने सुरू झाली. शेवटी ७ नोव्हेंबरपासून नाफेडने पुन्हा एकदा खरेदी सुरू केली. असे नेहमीच होत असे – नाफेड कधी खरेदी करायचे, मध्येच ती थांबवायचे. ह्यावेळी त्यांनी खरेदी सुरू करताना कांद्याचा भाव क्विटलमागे पूर्वी ४५ ते ६० असा होता, तो कमी करून सरसकट ४०वर आणला.
 त्यामुळे चिडलेल्या शेतकऱ्यांची बाजारसमितीसमोर निदर्शने सुरू झाली. शेवटी १४ नोव्हेंबर रोजी नाफेडतर्फे भाव पूर्ववत केले गेले. संघटनेच्या कार्यालयात ह्या निमिताने अनेक शेतकरी येत गेले व त्यांना वारकरीचे अंकदेखील वाटले गेले. वारकरीची गरज लोकांच्या मनावर ठसवण्यासाठी ह्या आंदोलनाची मदत झाली.
 शेतकऱ्यांना रुची वाटेल अशा बातम्या अंकात असायच्या. उदाहरणार्थ, तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार त्याच सुमारास अरब देशांचा दौरा करून आले होते. त्याविषयीच्या बातमीत म्हटले आहे, पवार यांनी अगदी मुक्त कंठाने चाकणच्या कांद्याची प्रशंसा केली. ते म्हणाले, चाकणच्या कांद्याला दुबई व कुवेत येथील मार्केटमध्ये ७०० रुपये क्विटल भाव मिळत आहे. मी त्यांना ३२ कोटी रुपयाचा कांदा व इतर भाजीपाला पुरवायचा करार केला आहे. तुम्ही भरपूर कांदा पिकवा. तुम्हाला किमान ७० रुपये क्विटल भाव नक्की मिळेल. शेतकऱ्याच्या जीवनातील ह्या महत्त्वाच्या प्रश्नावर शरद पवार योग्य निर्णय घेतील अशी खात्री बाळगू या.

 अरबी मुलुखात क्विटलला ७०० रुपये भाव मिळत असताना चाकणच्या बाजारात इथल्या शेतकऱ्याला मात्र नाफेडतर्फे क्विटलला जेमतेम ४५ ते ६० रुपयेच भाव मिळत होता, व तोही प्रत्येक वेळी संघर्ष करून मिळवावा लागत होता हे लक्षात घेण्यासारखे आहे.
 तिसऱ्या अंकापासूनच 'इंडिया विरुद्ध भारत' ही शब्दरचना अंकाच्या शीर्षस्थानी आली. 'भारत झिंदाबाद, इंडिया मुर्दाबाद' ही घोषणाही लगेचच पहिल्या पानावर आली. पहिल्या अंकात फक्त 'भारत झिंदाबाद' होते, त्याच्याखाली आता 'इंडिया मुर्दाबाद' आले. ह्या वाढत्या संघर्षाचे प्रतिबिंब अंकातील मजकुरावरही पडत गेल्याचे जाणवते. वर्गणीदारांची व आजीव वर्गणीदारांची यादीही अधूनमधून प्रसिद्ध होत होती. हळूहळू वारकरीचा थोडाफार विस्तार होऊ लागला. चौथ्या अंकात पहिल्याच पानावर २२ आजीव सदस्यांची व ४२ वार्षिक वर्गणीदारांची यादी प्रसिद्ध झाली आहे. ही संख्या तशी अत्यल्प वाटते, पण शेतकरीवर्गातून वाचक मिळणे सोपे नव्हते.
 अंकात व्यावसायिक माहितीही असायची. कांद्याचा उत्पादनखर्च कसा काढायचा. पिकांना होणारे वेगवेगळे रोग व त्यावरील उपाय वगैरे माहिती असायची. ग्रामविकासाच्या योजनांची माहितीदेखील असायची. बरीच पत्रे त्याबाबत असत. वाचकपत्रांना अंकात आवर्जुन अर्धाएक पान स्थान दिले जायचे. संपूर्ण भामनेर खोऱ्याच्या पंचवार्षिक विकासाचा एक विस्तृत आराखडाही एका अंकात प्रसिद्ध झाला होता. संघटनेतर्फे तरुण शेतकऱ्यांसाठी व्हॉलीबॉलस्पर्धादेखील आयोजित केल्या गेल्या होत्या व त्याचेही वृत्त अंकात आले होते. शेतकरी एकत्र आणण्यासाठी सर्वच मार्गाचा अवलंब केला जात होता, वावडे असे कशाचेच नव्हते.
 अंकातील एक वेधक वृत्त म्हणजे मुंबईतील 'जेवण डबे वाहतूक मंडळ' यांनी मुंबईला २० डिसेंबर १९८० रोजी केलेल्या सत्काराचे. भामनेर खोऱ्यातील अनेक तरुण मुंबईला डबेवाला म्हणून नोकरी करत. ते फारसे शिकलेले नसत, पण त्यांचे काम वक्तशीरपणा व शिस्त यांसाठी खूप वाखाणले जाई. लांब लांब राहणाऱ्या मुंबईकर कुटुंबांतून सकाळी नऊदहाच्या सुमारास जेवणाचे डबे गोळा करायचे व दुपारी बरोबर बारा-एकच्या आत ते फोर्टसारख्या लांबच्या भागातील ज्याच्या-त्याच्या कार्यालयात पोचवायचे काम ते करत. संध्याकाळी ते डबे घरोघर परतही पोचवत. ह्या कामात कधीही हयगय होत नसे व घरचे सात्त्विक अन्न खायला मिळाल्यामुळे मुंबईकर त्यांच्यावर खूष असत. बड्या व्यवस्थापनतज्ज्ञांनीदेखील या डबेवाल्यांवर पुढे अभ्यासलेख लिहिले आहेत. मंडळाने मुंबईत त्या दिवशी संध्याकाळी सात वाजता सत्यनारायणाची पूजा आयोजित केली होती. बातमीत म्हटले होते,

पूजेपूर्वी शरद जोशी यांची ढोल-ताशे वाजवत मुंबईत मिरवणूक काढली गेली. त्यानंतर पूजेला जोडूनच जाहीर सभाही झाली व त्या सभेत जोशी यांचा जाहीर सत्कार केला गेला. जोशी यांनी सुमारे तासभर भाषण केले. डबेवाहतूक मंडळाशी असलेल्या आपल्या ऋणानुबंधांचा जोशी यांनी कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला व शेतकरी संघटनेबद्दल माहिती दिली. नंतर मंडळाने साप्ताहिक वारकरीला रुपये ५०१ देणगीदाखल दिले. सभेनंतर रात्री भजनी भारुडाचा कार्यक्रम झाला.

(वारकरी, ३ जानेवारी १९८१)

 पुढे पुढे मात्र दर आठवड्याला वारकरी काढायचा जोशींना त्रास होऊ लागला. बाबूलालना ठरलेल्या वेळेत काम करायची फारशी सवय नव्हती. ह्याचे एक कारण म्हणजे गावात त्यांचा छापखाना हा एकमेव छापखाना होता; म्हणजे त्यांची मक्तेदारीच होती. छापखान्यात पत्रिका छापायला उशीर होत आहे, म्हणून लग्नाची तारीख पुढे ढकलली गेल्याचीही उदाहरणे होती! पण साप्ताहिक म्हटले की पोस्टाच्या नियमानुसार ठरलेली तारीख पाळावीच लागे. त्यामुळे शनिवारी दुपारी अंक बाहेर पडणे आवश्यक असायचे. दर बुधवारी रात्री जागून जोशी सगळा मजकूर तयार करायचे, हाताने लिहून काढायचे. गुरुवारी सकाळी सकाळी तो बाबूलालकडे द्यायचे, जेणेकरून त्यांना छपाईसाठी निदान दोन दिवस मिळावेत. पण बाबूलाल यांची आणखी एक सवय म्हणजे रात्री तीन वाजेपर्यंत गावातल्या मारुतीच्या देवळात गप्पा छाटत बसायचे आणि सकाळी पार दहा वाजेपर्यंत ताणन द्यायची. त्यांचा छापखाना व घर जवळजवळ होते. सकाळी जोशी मजकूर घेऊन त्यांच्याकडे जात, तेव्हा ते झोपलेलेच असत. बाबूलाल ह्यांच्या पत्नी सुषमा “अहो, तुमचा सासरा आला आहे बघा!" असे म्हणून गदागदा हलवत पतीला उठवायच्या. मग दुपारपर्यंत जुळारी शोधण्यात वेळ जायचा. कधी तो मिळायचा, कधी नाही. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी पुन्हा हाच प्रकार. शेवटी कसाबसा अंक शनिवारी सकाळी तयार व्हायचा. खूपदा चाकणला अर्धवट तयार झालेला मजकूराचा कंपोझ पुण्याला नेऊन तिथे अंक पुरा करावा लागे. जोशी म्हणतात,

 बाबूलाल घड्याळ काय, पण कॅलेंडरकडेसुद्धा लक्ष देणे म्हणजे, विलायतेतून आलेल्या लोकांचे फॅड समजायचा! साप्ताहिक वारकरीचा प्रत्येक अंक म्हणजे जुळारी, छापखाना, बाबूलाल आणि वेळ ह्यांच्याशी घेतलेली निकराची झुंज व्हायची. छपाईंकामाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रचंड प्रमाणावर राहून जाणारे मुद्रणदोष. मला स्वतःला मीच लिहिलेला मजकूर छापील स्वरूपात तपासता येत नाही. लिहिलेली वाक्ये मनात इतकी पक्की बसलेली असतात, की मुद्रणातल्या चुका लक्षातच येत नाहीत. आणि बाबूलालला कुठल्याच चुका चुका वाटत नाहीत. असा सगळा आनंद! भावी काळातले राजवाडे वारकरीचे अंक घेऊन बसतील, तेव्हा मुद्रणदोष ओलांडत ओलांडत वाचताना त्यांच्या डोक्याला मुंग्या आल्याखेरीज राहणार नाहीत. (वारकरीची जन्मकथा, आठवड्याचा ग्यानबा, १ ते ८ मार्च १९८८, पृष्ठ ९)

 चळवळ वाढत गेली तसतसा जोशींना स्वतःला त्यासाठी पुरेसा वेळ देता येईना. आधी काही अंक नियमित दर आठवड्याला निघाले, मग मात्र ते अनियमित स्वरूपात निघू लागले. सुमारे सव्वा वर्षाने वारकरी बंदच पडले. १७ जानेवारी १९८१चा अंक हा वारकरीचा शेवटचा अंक. पण त्याने त्या मर्यादित काळात महत्त्वाची भूमिका बजावली. भामनेर खोऱ्यात, पुणे जिल्ह्यात आणि खरे तर इतरही अनेक जिल्ह्यांत शेतकरी संघटनेची त्यामुळे तोंडओळखतरी झाली. अनुयायांशी संपर्क साधण्याचे ते एकमेव साधन होते. शरद जोशींचा थेट सहभाग असलेलेही हे एकमेव नियतकालिक. संघटनेची म्हणून त्यानंतर 'आठवड्याचा ग्यानबा' व 'शेतकरी संघटक' ही दोन मुखपत्रे निघाली व त्यांतून जोशींचे लेखन प्रसिद्धही होत गेले, पण त्यांच्या व्यवस्थापनात जोशींचा थेट सहभाग नसायचा.

 लोकांनी जर आपल्याबरोबर यावे असे वाटत असेल, तर त्यांच्या जिव्हाळ्याचे जे विषय आहेत त्यात तुम्हालाही स्वारस्य असावे लागते. म्हणूनच आंबेठाणमध्ये आल्यापासून जोशींनी दोन गोष्टींवर बरेच लक्ष केंद्रित केले होते. पहिली म्हणजे गावातले आरोग्य.

 आरोग्याचा प्रश्न जोशींना फारच गंभीर वाटत होता. मुळातच कुपोषित असलेले गावकरी कुठल्याही रोगाला सहज बळी पडत असत. त्यांची एकूण कार्यक्षमताही कुपोषणामुळे खूप कमी झालेली असायची. भामनेरच्या त्या खोऱ्यात चाकण सोडले तर कुठे एकही डॉक्टर नव्हता. एखादा पोरगा खप आजारी पडला तर शेतकरी नाइलाजाने त्याला बाजाराच्या दिवशी थेट चाकणला घेऊन जायचा. चाकणला सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्र होते. पण तिथे कोणीच डॉक्टर हजर नसतो असे त्यांना स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले होते. गावकऱ्यांच्या मते तिथे औषधेही उपलब्ध नसत. तिथले सरकारी कर्मचारी खेडूतांशी इतक्या मग्रुरीने वागत की पुन्हा त्या दवाखान्याची पायरीही चढू नये असे त्या शेतकऱ्याला वाटायचे. मग खासगी डॉक्टरकडे जाणे हाच एक रस्ता असायचा. तो खासगी डॉक्टर रुग्णाला तपासून काहीतरी औषधे लिहून द्यायचा. पण औषधांच्या दुकानात गेले आणि औषधांची किंमत ऐकली की तो शेतकरी पोराला घेऊन तसाच गावी परत जायचा. कारण तेवढे पैसे खर्च करणे त्याला परवडायचे नाही. हे सारे नेहमीचेच होते.

 डॉ. शाम अष्टेकर यांच्याविषयी आणि डॉ. रत्ना पाटणकर यांच्याविषयी इथे लिहायला हवे. पुढे या दोघांनी विवाह केला पण सुरुवातीला ते एकेकटेच चाकणच्या सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत होते. ऑक्टोबर १९७८मध्ये पुण्याहून एमडी केल्यावर डॉ. अष्टेकर इथे लागले होते. एक दिवस एका रुग्णाला घेऊन जोशी आरोग्य केंद्रात आले व त्यावेळी त्यांचा व अष्टेकरांचा प्रथम परिचय झाला. परिसरातील आरोग्याबद्दल दोघांची खूप चर्चा व्हायची. डॉ. रत्ना पाटणकर यांनी जोशींनी आयोजित केलेल्या एका भव्य मोर्यातही मोलाचे वैद्यकीय साहाय्य दिले होते. पुढे त्याबद्दल येणारच आहे. १९८३पर्यंत डॉ. अष्टेकर या केंद्रात कार्यरत होते. त्यानंतरही ह्या ध्येयवादी जोडप्याने अनेक वर्षे ग्रामीण भागातच रुग्णसेवा केली. आता ते नाशिक येथे स्थायिक झाले आहेत. दोघांनीही शेतकरी संघटनेत अगदी झोकून देऊन काम केले. शरद जोशींच्या प्रत्येक आजारपणात डॉ. अष्टेकर त्यांच्यासोबत असत.

 आंबेठाणला आल्यावर जोशींनी बराच पुढाकार घेतलेली दुसरी सामाजिक समस्या म्हणजे पक्क्या रस्त्याचा अभाव. आपल्या दैनंदिन गरजा पुऱ्या करण्यासाठी, आजारपणात त्वरित उपचार मिळावेत म्हणून, शेतीमाल कमीत कमी वेळात बाजारात पोचवण्यासाठी चांगला रस्ता अत्यावश्यक होता. इथल्या एकूण मागासलेपणाचे रस्ते नसणे हे एक मोठेच कारण होते. आंबेठाणवरून जाणाऱ्या चाकण ते वांद्रे ह्या ६४ किलोमीटर रस्त्यापैकी फक्त चाकण ते आंबेठाण हा सात किलोमीटरचा रस्ता त्यातल्या त्यात नीट असायचा. बऱ्याच वर्षांपूर्वी, आधी १९६७ साली व नंतर १९७३ साली, दुष्काळात शेतकऱ्यांना रोजगार मिळावा म्हणन काढलेल्या कामांचा एक भाग म्हणून तो सरकारने तयार करवला होता. स्थानिक शेतकऱ्यांनी त्यासाठी श्रमदान केले होते. पण नंतरच्या काही वर्षांत त्याची पुरती दुर्दशा झाली होती. खोऱ्यात एकूण २७ गावे होती व त्यांपैकी २४ गावे अशी होती, की एकदा पावसाळा सुरू झाल्यावर पुढचे निदान सहा महिने त्या गावांचा बाहेरच्या जगाशी काहीही संबंध राहायचा नाही; कारण मोडका-तोडका जो रस्ता असायचा, तो पहिल्या दोन-चार पावसांतच वाहून जायचा. गावातली माणसे मग गावातच अडकून पडायची. भाजीपाला वगैरे अक्षरशः कवडीमोलाने विकून टाकावा लागायचा; किंवा कधीकधी चक्क फेकून दिला जायचा. कोणी आजारी पडले तरी चाकणला जायची काही सोय नाही; रुग्णाला डोली करून नेणे हा एकमेव पर्याय असायचा. पण तेही फार अवघड असायचे कारण ह्या भागातील बरेचसे तरुण मुंबईला डबेवाला म्हणून नोकरी करायचे; उरलेली वस्ती मुख्यतः बायका, मुले व वृद्ध यांची. गावातली एखादी बाळंतीण अडली आणि घरच्यांसमोर तडफडून मेली, असे दर पावसाळ्यात एकदातरी घडायचेच. हा रस्ता पक्का व्हावा अशी मागणी समस्त गावकऱ्यांच्या वतीने जोशींनी केली होती. शेतकऱ्यांची संघटना बांधायचे ठरवल्यावर त्यांनी लोकजागृतीसाठी हाती घेतलेला हा पहिला प्रकल्प होता. ह्या आंदोलनाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे जोशींनी आयोजित केलेला मोठा मोर्चा; चीनच्या माओ त्से तुंगच्या शब्दांत सांगायचे तर – लाँग मार्च.

 वांद्रे येथून २४ जानेवारी १९८० रोजी हा मोर्चा सुरू होणार होता व ६४ किलोमीटर चालून २६ जानेवारीला चाकणला पोचणार होता. त्याच्या तयारीसाठी म्हणून आधीचे दोन महिनेतरी जोशींनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी कसून प्रयत्न केले होते. 'घरातल्या जनावरांच्या



(डावीकडून) वसंत बाळकृष्ण जोशी (मेहुणे), सौ सिंधु क्संत जोशी (भगिनी), वडील अनंत नारायण जोशी, आई इंदिराबाई, मागे उभे शरद जोशी, सौ निर्मला चंद्रकांत देशपांडे (भगिनी), मागे प्रभाकर जोशी, चंद्रकांत देशपांडे (मेहणे). स्थळ: अंधेरी पूर्व, मुंबई येथील निवासस्थान. (सौजन्यः सौ. नीता प्रभाकर जोशी)
शरद व लीला जोशी, विवाहप्रसंगी, मुंबई, २५ जून १९६१
पोस्टातील एका प्रशिक्षण वर्गातील सहकारी, पहिल्या रांगेत मध्यभागी जोशी, १९६१

शरद जोशी यांचे स्वित्झर्लंडमधील निवासस्थान. तळमजल्यावरील उजवीकडचा फ्लॅट त्यांचा. शेजारचाच फ्लॅट टोनी डेर होवसेपियां यांचा.
इमारतीतील क्लब हाउसमध्ये टेबलटेनिस खेळताना. "त्याला हरणे आवडत नसे." -टोनी डेर होक्सेपियां
युनिव्हर्सल पोस्टल युनियनच्या मुख्यालयासमोर अविनाश जगताप, टोनी और होवसेपियां व भानू काळे, १२ जुलै २०१२.

________________

युपीयुची टोकियो येथील आंतरराष्ट्रीय परिषद, १९६८) (जोशी पहिल्या रांगेत डावीकडून दुसरे) बन येथील एका स्नेहसंमेलनातील भारतीय संगीताची मैफल. उजवीकडे तानपुरा जुळवताना लीला जोशी श्रेया व गौरी या आपल्या दोन मुलींसमवेत, सदिच्छा बंगला, पुणे, २ सप्टेंबर १९८४ मातोश्री इंदिराबाई यांच्यासमवेत शरद जोशी व सोबत दोन्ही मुली, सदिच्छा बंगला, पुणे २ सप्टेंबर १९८४ ________________

आंबेठाण गाव, १९७७ मध्ये जसे होते अंगारमळा : जोशी यांचे घर, १९८३ ________________

नाशिक येथील ऊस आंदोलन. १० नोव्हेंबर १९८०, आडगाव फाटा, रास्ता रोकोची सुरुवात. (सौजन्य: सरोजा परुळकर) PIMPALNER (80 DEOLA 20 १० नोव्हेंबर १९८०, रेल रोको, खेरवाडी. येथील पोलीस गोळीबारात दोन शेतकरी हुतात्मा झाले. (सौजन्य : सरोजा परुळकर)

ऊस आंदोलनातील त्रिमूर्ती (उजवीकडून) प्रल्हाद कराड पाटील, शरद जोशी व माधवराव मोरे, मागे बसलेल्या लीलाताई जोशी. सटाणा अधिवेशन, २ जानेवारी १९८२.

चाकण येथील अगदी सुरुवातीचे साथीदार. (डावीकडून) श्याम पवार, अप्पा देशमुख, शरद जोशी, मामा शिंदे व गोपाळ जगनाडे. श्याम पवार यांचे म्हाळुगे येथील हॉटेल, ९ नोव्हेंबर २०१४.
जोशींची मुलाखत घेताना इंग्लंडहून निपाणीला आलेली बीबीसी टेलिव्हिजनची टीम, ३० जानेवारी १९८१. (सौजन्य : सरोजा परुळकर)
सुभाष जोशी आंदोलनातील तंबाखू कामगार महिलांना काही सूचना देताना, मार्च-एप्रिल १९८१. शेजारी त्यांच्या पत्नी सुनीता. (सौजन्य : सरोजा परुळकर)

रात्रंदिवस रास्ता रोको करणारे तंबाखू शेतकरी चार घास खाताना (सौजन्य: सरोजा परुळकर)
पोलीस गाड्यांमधून नेले जाणारे

सत्याग्रही, ६ एप्रिल १९८१

(सौजन्य: सरोजा परुळकर)
...आणि

पोलीस गोळीबारानंतर उद्ध्वस्त झालेली

आंदोलननगरी, ६ एप्रिल १९८१



शरद-लीला-श्रेया-गौरी जोशी, मृदगंध, पुणे, २७ ऑक्टोबर १९८२
पुणे, ६ जून १९८६. श्रेया जोशी व सुनील शहाणे यांच्या विवाहप्रसंगी जामात सुनील यांची
प्रमोद महाजन यांच्याबरोबर ओळख करून देताना. मधे प्रकाश जावडेकर.

व आजारी माणसांच्या देखभालीसाठी आवश्यक असतील तेवढ्याच माणसांनी आपापल्या घरात थांबावे व बाकीच्या सर्वांनी मोर्यात सहभागी व्हावे असे आवाहन प्रत्येक गावात जाहीर सभा घेऊन करण्यात आले होते. 'शक्य असूनही जे शेतकरी मोर्ध्यात सहभागी होणार नाहीत, त्यांना आपल्या शेतकरीबांधवांशी द्रोह केल्याचा दोष लागेल, असेही भावपूर्ण आवाहन प्रत्येक सभेत केले गेले होते. २३ जानेवारीलाच स्वत: जोशी व त्यांचे सहकारी वांद्रे येथे जाऊन राहिले.

 रात्री जेवणे झाल्यावर कुतूहलाने काही तरुण गावकरी त्यांना भेटायला आले होते. त्यांच्यात भोसले नावाचा एक जण होता. बोलता बोलता तो म्हणाला, "ज्या समाजाची प्रगती खुंटलेली आहे, त्याची स्थिती साचलेल्या डबक्याप्रमाणे होते." ते ऐकून जोशी एकदम चमकले. कारण संघटनेविषयी ते वारकरीमध्ये लिहीत असलेल्या लेखमालेतील ते वाक्य होते. "हे वाक्य तू कुठं वाचलंस?" जोशींनी विचारले. तो उत्तरला, “साहेब, तुमच्याच लेखातलं आहे हे वाक्य." "तुम्ही वाचता हे लेख?" जोशींचा प्रश्न. त्याचे उत्तर होते,

 "आमच्या गावात तुमच्या लेखांचं आम्ही सार्वजनिक वाचन करतो. माझी तर त्यातली वाक्यंच्या वाक्यं पाठ आहेत," असे म्हणत त्यानी लेखांतली अनेक वाक्ये घडाघडा म्हणून दाखवली. ते ऐकून जोशींना खूप आनंद झाला. कारण त्यापूर्वी आपण इतक्या कष्टाने हे साप्ताहिक चालवत आहोत, पण प्रत्यक्षात ते कोणी वाचत असेल का, ह्याविषयी त्यांना काहीशी शंका होती. जोशी यांनी लिहिले आहे, “इतक्या उपद्व्यापाने फेकलेले बियाणे, मावळातील सगळ्या डोंगरमाथ्यात एका ठिकाणी जरी रुजत असेल, तरी सगळ्या कष्टांचे चीज झाले असे वाटून गेले."

 दुसऱ्या दिवशी सकाळी मोर्च्याला सुरुवात झाली. सुरुवातीला सुमारे शंभर पुरुष व स्त्रिया मोर्च्यात सामील होत्या. पण जसजसा तो पुढे सरकू लागला, तसतशी त्यांची संख्या वाढू लागली. रात्रीच्या मुक्कामासाठी शिवे गावी मोर्चा आला, तेव्हा त्यात दोन हजार माणसे सामील झालेली होती. शिवेकरांनी त्या सर्वांना जेवण घातले. दुपारच्या एकूण तीन जेवणांसाठी प्रत्येकाने आपापल्या भाकऱ्या बांधून आणल्या होत्या व रात्रीच्या जेवणांची वाटेतल्या गावकऱ्यांनी एकत्रित व्यवस्था केली होती. २४ तारखेच्या रात्री संघटनेच्या कलापथकाने कार्यक्रम सादर केला. त्यानंतर बाहेर शिवारातच सगळे झोपले. २५ जानेवारीला सकाळी मोर्चा शिवे गावाहन पुढे सरकला. मोर्च्याचे वाढते स्वरूप पाहन सर्वांनाच उत्साहाचे भरते आले होते. पण तरीही मोर्च्यातली शिस्त विलक्षण होती. त्याचे एक उदाहरण सांगण्यासारखे आहे.

 साधारण दुपारी तीन वाजेपर्यंत मोर्चा भांबोली गावात पोचला. रणरणत्या उन्हात चालून चालून सगळ्यांचे गळे सुकले होते. गावच्या विहिरीवर मामा शिंदे यांनी सगळ्यांसाठी प्यायच्या पाण्याची व्यवस्था केली होती. पण भांडी-लोटे खूप कमी होते. गडबड होऊ नये म्हणून सगळ्या मोर्चेकऱ्यांना रस्त्यावरच बसण्यास सांगण्यात आले. आयोजकांनी घोषणा केली की, “एकेका गावाचे नाव पुकारताच फक्त त्या गावच्या मोर्चेकऱ्यांनी विहिरीपाशी यावे. त्यांचे पाणी पिऊन झाले, की मग पुढील गावाचे नाव पुकारले जाईल. तेव्हा त्यांनी पुढे यावे. अशा प्रकारे सगळ्यांना काहीही गोंधळ न होता पाणी प्यायला मिळेल." हा कार्यक्रम जवळ जवळ तासभर चालला, पण एकही जण आपली रांग सोडून पुढे घुसला नाही. "हा साधासुधा मोर्चा नसून शिस्तबद्ध अशी फौज आहे," असे उद्गार हे अभूतपूर्व दृश्य पाहणारे अनेक लोक काढत होते.

 असेच आणखी एक उदाहरण म्हणजे मोर्चेकऱ्यांसाठी आयोजित केलेल्या वैद्यकसेवेचे. मोर्च्यात अनेक बायकामुलेदेखील सामील होणार, त्यामुळे कोणाचे काही दुखलेखुपले तर लगेच औषधपाणी करता यावे यासाठी संघटनेच्या निकटच्या हितचिंतक डॉ. रत्ना पाटणकर आणि डॉ. दाक्षायणी देशपांडे २३ जानेवारीलाच चाकणहून वांद्र्याला दाखल झाल्या. २४ तारखेपासून मोर्च्याबरोबर त्याही संपूर्ण अंतर पायी चालल्या. वाटेत गावोगावी त्यांनी वैद्यकीय तपासण्या केल्या, औषधपाणी केले. मोर्च्यातील स्त्रियांना त्या इतक्या जवळच्या वाटल्या, की दुपारी जेवणाच्या वेळेला, "पोरींनो, जेवलात की नाही? बसा आमच्याबरोबर," असे आग्रहाने त्यांतल्या अनेक जणी या दोघींना सांगत असत. पुढे २६ जानेवारीला मोर्चा चाकणला पोचला तो दिवस सुट्टीचा होता. गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र बंद होते. पण तरीही ह्या दोघींनी आरोग्यकेंद्रात मुक्काम ठोकला आणि अनेक स्त्रियांवर औषधोपचार केले. या दोघीमुळे सगळ्याच मोर्चेवाल्यांची मोठी सोय झाली.

 संध्याकाळपर्यंत मोर्चा आंबेठाण गावाला पोचला. ग्रामस्थांनी मोर्चेवाल्यांचे प्रेमाने स्वागत केले. रात्रीच्या जेवणासाठी आंबेठाणमध्ये साडेतीन हजार माणसे होती. रात्री पुन्हा भजन व भारुडाचा कार्यक्रम झाला, उशिरापर्यंत रंगला.

 पुढल्या दिवशी २६ जानेवारी रोजी सकाळी आंबेठाणमध्ये झेंडावंदन करून मोर्चा चाकणकडे जाऊ लागला. आता इतर अनेक गावांतून शेतकरी बांधव व भगिनी मोर्च्यात सामील होत होत्या. ढोल, लेझीम, झांजा यांनी वातावरण दुमदुमून गेले होते. प्रत्येक गावाचे मोर्चेकरी एकत्र चालत होते, त्यांच्यापुढे त्यांच्या गावाच्या नावाचे फलक घेतलेले स्वयंसेवक होते, तसेच प्रत्येक गावाचे स्वतंत्र कलापथकही होते. मोर्चा आता इतका लांब झाला होता, की एका टोकापासून मोर्च्याचे दुसरे टोक दिसत नव्हते. प्रत्येकाच्या छातीवर शेतकरी संघटनेचा लाल बिल्ला लावलेला होता. प्रत्येकी दोन रुपये देऊन सगळ्यांनी तो विकत घेतला होता व तीच रक्कम संघटनेची वर्गणी म्हणून जमा करण्यात आली होती; तशी पावतीही प्रत्येकाला दिली जात होती.

 दुपारी बाराच्या सुमारास चाकण बाजारपेठेसमोरच्या मोकळ्या पटांगणात मोर्चा पोचला, तेव्हा तिथे जमलेल्या दोन हजार लोकांनी त्याचे स्वागत केले. 'चाकण-वांद्रे रस्ता झालाच पाहिजे', 'शेतकरी संघटनेचा विजय असो', 'मोर्चा आला पायी पायी, रस्ता करा घाई घाई', 'तुम्ही रस्ता करत नाही, आम्ही सारा भरत नाही' अशा घोषणांनी वातावरण भारून गेले होते. प्रत्यक्ष सभा सुरू झाली तेव्हा आठ हजारांचा जनसमुदाय तिथे हजर होता. एवढा मोठा जनसमुदाय चाकणमध्ये पूर्वी कधीच कुठल्या कार्यक्रमासाठी एकत्र आला नव्हता. ऐतिहासिक अशीच ती घटना होती.

 कार्यक्रमाची सुरुवात शेतकरी संघटनेच्या कलापथकाने सादर केलेल्या 'किसानांच्या बाया, आम्ही शेतकरी बाया' आणि येथून तेथून सारा, पेटू दे देश' या दोन प्रेरणादायी गीतांनी झाली. आपल्या भाषणात जोशींनी 'रस्ता होईस्तोवर शेतकऱ्यांनी सारा भरू नये' असे आवाहन केले. ते म्हणाले,

 "मघाशी आपण ऐकलेले गीत ज्या सानेगुरुजींनी लिहिले, त्यांच्या आत्म्याला आनंद होईल व समाधान लाभेल असाच आजचा हा शेतकरी जागृतीचा क्षण आहे. चाकण ते वांद्रे हा रस्ता बारमाही करण्यासाठी गेली बावीस वर्षं अनेक अर्ज-विनंत्या करण्यात आल्या. अनेक आश्वासनंही देण्यात आली. पण प्रत्यक्षात काहीही प्रगती झाली नाही. पावसाळ्यात सहा-सात महिने रस्ता बंद असल्याने औषधपाणी, शाळा, वाहतूक, बाजारपेठ ह्या साऱ्या मूलभूत सोयींपासून आम्ही वंचित राहतो. माणूस म्हणून आम्हाला जगणंही असह्य झालं आहे."

 यानंतर शेवटी त्यांनी सर्व शेतकऱ्यांना शपथ घातली. आधी जोशी बोलणार आणि मग उपस्थित त्यांचे शब्द मागोमाग पुन्हा उच्चारणार असा प्रकार होता. ती शपथ अशी होती,

 "आमची आणखी एक पिढी अशा हलाखीत पिचू नये म्हणून, मी, श्री भीमाशंकर महाराज यांच्या पायाच्या शपथेने प्रतिज्ञा करतो, की भामानहर रस्ता हा वर्षभर उघडा राहून एसटी बस बारा महिने वांद्रेपर्यंत जाऊ लागेपर्यंत, मी शासनाला एक पैसाही शेतसारा भरणार नाही. त्यासाठी मला जो त्रास होईल, तो मी सहन करीन. कोणत्याही परिस्थितीत इतर शेतकरी बांधवांबरोबर द्रोह करणार नाही." शेवटी सामुदायिकरीत्या घेतली जाणारी अशी शपथ हे पुढे शेतकरी संघटनेच्या प्रत्येक सभेचे एक वैशिष्ट्य बनले व त्याची सुरुवात अशी ह्या मोात झाली होती. अतिशय भावपूर्ण वातावरणात व घोषणांच्या गजरात सभा संपली.

 अनेक वर्षांपूर्वी स्वातंत्र्यआंदोलनात गुजरातेत सरदार वल्लभभाई पटेल यांनी बारडोली येथे असाच एक साराबंदी सत्याग्रह केला होता. त्यामुळेच त्यांना सरदार ही पदवी लोकांनी बहाल केली होती. त्यांची आठवण करून देणारा हा चाकणमधला मोर्चा होता.

 एक लक्षणीय घटना इथे नमूद करायला हवी. आधी निषेधाचा एक मार्ग म्हणून राष्ट्रध्वज जाळायचा काही मोर्चेकऱ्यांचा विचार होता. त्याला विरोध करणारे एक पत्र चाकणच्या मामा शिंदे यांनी लिहिले होते व ते संपूर्ण पत्र वारकरीच्या पहिल्याच पानावर १५ डिसेंबर १९७९ रोजी प्रकाशितही करण्यात आले होते. त्याचा आशय संक्षेपात सांगायचा तर असा होता :

 जो राष्ट्रध्वज अनेक देशभक्तांच्या त्यागातून आणि रक्तातून निर्माण झाला, ज्याच्यासाठी कितीतरी ज्ञात आणि अज्ञात देशभक्तांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्या राष्ट्रध्वजाचे रक्षण करणे हेच आपले ब्रीद आहे. आमच्या सरकारचा राग आम्ही त्या राष्ट्रध्वजावर का काढणार? राष्ट्रध्वज जाळून सत्याग्रह करू नका, अन्य कोणत्याही सत्याग्रही मार्गाचा अवलंब व्हावा. त्यात सर्व जण तुमच्या पाठीशी उभे राहतील.'

 मामा शिंदे स्वतः ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक होते व मागे लिहिल्याप्रमाणे चाकणमधले पहिले झेंडावंदन त्यांच्याच मार्गदर्शनाखाली झाले होते. पत्रातील त्यांची भावना समजण्यासारखी होती. परंतु त्यांच्या पत्राखालीच स्वतः जोशींनी आपली प्रतिक्रिया प्रसिद्ध केली होती. त्यात त्यांनी लिहिले होते,

 इंग्रजांना देशातून काढून लावल्यानंतर ज्यांच्या हाती सत्ता आली, ते भारतीयांच्या सुखदुःखाबद्दल इंग्रजांपेक्षाही अधिक बेपर्वा राहिले. कच्चा माल स्वस्तात स्वस्त विकत घेऊन, कारखानदारी माल महागात महाग विकणे, हे इंग्रजांचेच वसाहतवादी तंत्र नवीन राज्यकर्त्यांनी चाल ठेवले. भारतावरचे इंग्रजांचे राज्य गेले, पण इंडियाची जुलमी राजवट चालू झाली... काँग्रेसच्या स्थापनेनंतरच्या काळात मवाळपक्षीय लोकांना इंग्रज राणीचे राज्य मान्य होते. इंग्रजांच्या युनियन जॅक' झेंड्याला ते भारताचाच ध्वज मानीत. स्वतंत्र भारताची स्वप्ने पाहणाऱ्यांना जहाल, अराजकवादी अशी नावे ठेवत. मामा शिंदे यांची मनःस्थिती त्या काळच्या मवाळांप्रमाणे आहे... सत्याग्रहाच्या तंत्राबद्दल महात्मा गांधींच्या हयातीतही अनेक वादविवाद होते. सत्याग्रहात नेमके काय करता येते आणि काय करता येत नाही हे ठरवणारे कोणतेही धर्मपीठ नाही. मोर्चे, मिरवणुका ही जुनी साधने आज निरुपयोगी झाली आहेत. मामलेदार, कलेक्टर यांच्या कचेरीसमोर दररोज आठदहा मोर्चे येतात, पोलीस त्यांना योग्य वाटेल ती कारवाई करतात, ती झाली की संपली चळवळ, अशा मार्गांनी जनतेचा उत्साहभंग होतो, अवसानघात होतो... राष्ट्रध्वजावर काव्य म्हणणे सोपे आहे, पण ज्यांच्या जीवनात काव्य कधी शिरलेच नाही, त्या शेतकऱ्यांना त्याचे काय हो! दररोज शेकड्यांनी होणाऱ्या तथाकथित सत्याग्रहांतला हा आणखी एक नाही. हा गंभीर कायदेभंग आहे. त्याचे परिणाम भोगण्याची सत्याग्रहींची तयारी आहे. त्यांची वेदनाही तितकीच मोठी आहे.

 कुठल्याही प्रकारचा संघर्ष करायची त्या काळात जोशींची कशी तयारी झाली होती याचे ही प्रतिक्रिया म्हणजे एक द्योतक आहे.

 पुढे नेमके काय झाले ते स्पष्ट नव्हते. अगदी अलीकडेच माझ्या चाकणच्या एका भेटीत याबद्दल मी मामा शिंदे यांच्याकडे चौकशी केली असताना, “सुदैवाने मोर्ध्यात राष्ट्रध्वज जाळण्यात आला नाही. माझ्या प्रखर विरोधामुळे तो बेत बारगळला," असे त्यांनी सांगितले.

 मोर्च्याला मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व होता. 'ह्या बामणाच्या मागे कोण जातंय!' अशीच सुरुवातीची प्रतिक्रिया होती. एक वरिष्ठ पक्षनेते म्हणाले होते, "भामनेर हा माझा भाग आहे. तेथून शेतकरी संघटनेच्या मोर्च्याला दहा लोकसुद्धा जमायचे जाहीत. जमले तर मी राजीनामा देन" देईन." पण प्रत्यक्षात ६,००० लोक मोर्च्यात व २,००० नंतरच्या सभेत सामील झाले! विशेष म्हणजे त्यात १,००० महिलादेखील होत्या. तसे पाहिले तर कांदा शेतकरी ह्या मोर्ध्यात थोडे होते; मुख्यतः भातशेती करणारे व आदिवासी जास्त होते. बहुधा त्यांनाच रस्ता नीट नसल्याची सर्वाधिक झळ पोचत होती. पण एकूण प्रतिसाद थक्क करणारा होता.

 पुढे सरकारने हे काम हाती घेतले व संघटनेनेहा साराबंदा तहकूब केली. शासनाच्या नेहमीच्या कूर्मगतीने केव्हातरी काम पूर्णही झाले. अर्थात आज इतक्या वर्षांनीसुद्धा चाकणवांद्रे ह्या रस्त्याचा दर्जा अगदीच सुमार आहे.

 रूढ अर्थाने विधायक कार्य म्हणता येईल असे जोशींचे हे शेवटचेच काम ठरले. एकूणच प्रचलित स्वरूपाच्या ग्रामविकासाच्या कार्याविषयी त्यांचे मत खूप प्रतिकूल बनत गेले होते. यानंतर त्यांनी शेतकरी आंदोलन हाच आपला एक-कलमी कार्यक्रम ठरवला व आयुष्यभर तो निर्णय कायम ठेवला.

 जानेवारी १९८०पासून निर्यातबंदीमुळे पुन्हा एकदा भाव घसरू लागले. कांद्याला त्याच्या दाप्रमाणे क्विटलमागे रुपये ५० ते ७० असा किमान भाव मिळावा ह्या मागणीला चाकण बाजार समितीतील व्यापाऱ्यांनीसुद्धा पाठिंबा दिला होता. विक्रीसाठी कांद्याचा जेव्हा बाजारात लिलाव केला जाईल, तेव्हा ह्या भावापेक्षा कमी बोली असेल, तर आम्ही स्वतःच ती स्वीकारणार नाही,' असे त्यांनी जाहीर केले. वारकरीच्या ९ फेब्रुवारी १९८०च्या अंकात त्यांनी तसे एक पत्रकच प्रसिद्ध केले होते.

 यावेळी आंदोलनाचे स्वरूप काय असावे ह्याबद्दल जोशींनी बऱ्याच विस्ताराने मांडणी केली होती. सुरुवातीलाच त्यांनी म्हटले होते की सध्या शेतकऱ्यांनी कांदा बाजारात आणूच नये; कारण एकदा तो बाजारात आणला, की मग परत तो आपल्या शेतावर नेता येत नाही, मिळेल त्या भावाला विकावा लागतो. त्याऐवजी आपल्या शेतावरच जिथे सावली असेल किंवा कोरडी जमीन आणि वर छप्पर असेल अशा जागी शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवावा; २०% खाद (कांद्यातील पाण्याचे खताच्या वापरामुळे वाढलेले प्रमाण) असेल तर किमान ५० रुपये क्विटल भाव मिळावा, व अजिबात खाद नसेल, म्हणजेच कांद्याचे ढीग उत्तम असतील, तर किमान ७० रुपये भाव मिळाला पाहिजे. तसा भाव मिळेल, तेव्हाच तो कांदा बाजारात आणावा.

 अनेक शेतकऱ्यांना घेतलेली कर्जे फेडण्याची निकड लागलेली असते आणि त्यामुळे कांदा बाजारात आणण्याची ते घाई करतात. शेतकऱ्यांना कर्जाबद्दल सवलती देण्याच्या अनेक घोषणा झालेल्या आहेत. तेव्हा येत्या दोन-तीन महिन्यांत भांडीकुंडी उचलण्याच्या घटना घडणार नाहीत अशी अपेक्षा आहे. पण जर भांडीकुंडी जप्त करण्याचे वा जमिनीचे लिलाव पुकारण्याचे प्रयत्न झालेच, तर गावातील सर्व शेतकऱ्यांनी तोट्यात कांदा विकणे भाग पाडू नका अशी विनंती त्या अधिकाऱ्यास करावी. एवढे करूनही त्यानी आपला हेका कायमच ठेवला, तर सर्व शेतकऱ्यांनी आलेल्या अधिकाऱ्यास शांतपणे व संपूर्ण अहिंसात्मक मार्गाने 'घेराव' घालावा. अशा त-हेने सत्याग्रह करून शेतकऱ्यांनी आपला निर्धार दाखवला पाहिजे.  निर्यातबंदी हटवावी म्हणून १ मार्च १९८०पासून शेतकऱ्यांनी चाकणमध्ये 'रास्ता रोको' सुरू केले. प्रत्यक्ष रस्ता अडवायचा प्रकार ह्या वेळी आंदोलनात प्रथमच घडला. तसे पाहिले तर ह्यापूर्वी अनेकदा बाजारात सतत पडणारे भाव पाहून जोशी बाजारपेठेसमोर भाषणे करत, कमी भावात कांदा न विकण्याचे शेतकऱ्यांना आवाहन करत. काही जण त्यांचे म्हणणे मानत, काहींना आपल्या गरजेपोटी येईल त्या भावाने कांदा विकणे भाग पडे. आपल्या भाषणांचा काही परिणाम होत नाही हे पुन्हा पुन्हा पाहिल्यावर वैतागलेले जोशी म्हणत, "आपण सगळे चाकणवरून जाणारा पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग अडवून धरू. तसे केले की सगळीकडे खळबळ माजेल व आपल्या मागणीची दखल घेणे सरकारला भाग पडेल. चला, तुम्ही सगळे या माझ्या मागे."

 एवढे बोलून जोशी स्वतः चालू लागत. सुरुवातीला उत्साहाने ६०-७० शेतकरी त्यांच्या मागोमाग बाजारपेठेपासून हमरस्त्यापर्यंत यायला निघत. पण मग एकेक करत ते गळून पडत. कोणाला घरी जायची घाई असायची, कोणाला गावात उरकायचे दुसरे काही काम आठवायचे. खरे म्हणजे बहतेकांना अशा काही आंदोलनाची सवयच नव्हती. ते शासनाबरोबरच्या कुठल्याही प्रकारच्या संघर्षाला घाबरत. त्यापेक्षा आपल्या अडचणी सहन करणे व कसेतरी दिवस रेटून नेणे हेच पिढ्यानुपिढ्या त्यांच्या अंगवळणी पडले होते. जेव्हा महामार्गापर्यंत जोशी पोचत, तेव्हा जेमतेम सात-आठ जण जोशींसोबत उरलेले असत व इतक्या कमी जणांनी रस्ता रोखून धरण्याचा प्रयत्न करणे शक्यच नसायचे.

 असे पूर्वी खूपदा झाले होते व त्यामुळे ह्या वेळेला तरी शेतकरी कितपत प्रतिसाद देतील ह्याविषयी साशंकता होती. पण गेल्या काही महिन्यांत शेतकरी संघटनेने बऱ्यापैकी जागृती केली होती. त्यामुळे त्या १ मार्चला चांगले चार-पाचशे शेतकरी घोषणा देत देत त्यांच्यामागे जाऊ लागले. सगळ्यांनी महामार्गावर येऊन रस्त्यावर बैठक मारली. दोन्ही बाजूंनी जाणारीयेणारी वाहने थांबली. जोरजोरात घोषणा सुरू झाल्या होत्या. वातावरण तंग झाले.

 जवळ मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटा तयारच होता. वरून हुकूम येताच पोलिसांनी भराभर रस्त्यावर बसलेल्या शेतकऱ्यांना ओढत ओढत वाहनांमध्ये कोंबले. जे प्रतिकार करत होते त्यांना लाठ्यांचे तडाखे खावे लागले. पंधरा-वीस मिनिटांत रस्ता मोकळा झाला. एकूण ३६३ शेतकरी पकडले गेले; दुसऱ्या दिवशी त्यांना जामीनावर सोडण्यात आले. अर्थात आंदोलनाची तीव्रता कमी झाली नाही. ५ मार्चच्या आत शासनाने कांदाखरेदीच्या भावाबाबत योग्य तो निर्णय न घेतल्यास ५ मार्चपासून आपण आमरण उपोषण सुरू करू असे जोशींनी जाहीर केले.

 शेवटी ५ मार्चच्या सकाळी सरकारने ५० ते ७० रुपये भावाने कांदा खरेदी करायचे जाहीर केले; पण प्रत्यक्षात मात्र त्या आश्वासनाची पूर्तता केली नाही. नाइलाजाने ८ मार्च रोजी जोशींनी आपले आयुष्यातले पहिले बेमुदत उपोषण सुरू केले.

 लीलाताईंनाही त्यांनी त्याबद्दल काहीच कळवले नव्हते. त्यांना ते उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी पेपरात वाचल्यावर कळले. लीलाताई त्यामुळे खूपच नाराज झाल्या. त्यांनी लगोलग चाकणला धाव घेतली. 'मला न विचारता, न सांगता तुम्ही असं एकदम उपोषण सुरू करताच कसे?' हा त्यांचा स्वाभाविक प्रश्न होता. कशीबशी जोशींनी पत्नीची समजूत काढली. बऱ्याच वर्षांनंतर ह्या घटनेकडे मागे वळून बघताना जोशी म्हणाले,

 "सेनापती स्वतः जेव्हा रणांगणात उतरतो, आपला स्वतःचा जीव पणाला लावतो, तेव्हाच त्याचे सैनिक स्वतः लढायला तयार होतात. त्या वेळी माझ्या पोटातली तिडीकच अशी होती, की तिथे बाजारात बसल्याबसल्याच मी बेमुदत उपोषण करायचं ठरवलं. हा काही खूप साधकबाधक विचार करून घेतलेला निर्णय नव्हता. त्यापूर्वी मी आयुष्यात कधीही उपोषण वगैरे काही केलं नव्हतं. घरातही मी एकदाही उपास वगैरे केलेला नाही. एका तिरीमिरीतच मी तो निर्णय घेतला व लगेच उपोषणाला बसलोसुद्धा. एका अर्थाने माझी ती सत्त्वपरीक्षा होती. स्वतःच्या जिवाची काहीही पर्वा न करता मी ह्या आंदोलनात पडलो आहे, ह्याची त्यामुळे माझ्या कार्यकर्त्यांची खात्री झाली. त्यानंतरही मी स्वतः जो धोका पत्करायला तयार नव्हतो, तो धोका पत्करायला मी माझ्या कार्यकर्त्यांना कधीही भरीस घातलं नाही. त्यांनी जे भोगलं ते सर्व मी स्वतःही त्यांच्याआधी भोगलं. त्यामुळेच हे शेतकरी आंदोलन उभं राहू शकलं."

 जोशी यांचे उपोषण चालू असताना १० मार्च ते १६ मार्च निघोजे गावच्या शेतकऱ्यांनी एक अभिनव प्रकार केला. गावचे सरपंच वसंतराव येळवंडे यांचा त्यात पुढाकार होता. गावातले शंभरएक शेतकरी आपापल्या बैलगाड्या घेऊन छोट्या छोट्या गटांनी निघाले. साधारण दोन-तीन किलोमीटरचा तो रस्ता होता. वाटेत त्यांचे भजन-कीर्तन सारखे चालूच होते. आपण कुठल्यातरी लग्नाला वहाड घेऊन चाललो आहोत, असे त्यांनी इतरांना व पोलिसांना भासवले. रात्रीच्या काळोखात आपापल्या बैलगाड्या त्यांनी पुणे-नाशिक रस्त्यावर आणून उभ्या केल्या, त्या बैलगाड्यांना मारके बैल बांधले व 'रास्ता रोको' सुरू केले. ह्या शेतकऱ्यांचा उत्साह खूप मोठा होता. ह्या वृषभदलापुढे पोलिसांची चांगलीच पंचाईत झाली. त्यांना कसे हटवायचे व रस्ता मोकळा करायचा हे पोलिसांना कळेना. ह्या निघोजेकर मंडळींची आणखी एक भन्नाट कल्पना होती. हजार बैलगाड्या घेऊन असेच भल्या पहाटे पुण्यात शिरायचे आणि पुण्यातला सगळ्यात गर्दीचा असा अख्खा लक्ष्मी रोड बंद करून टाकायचा! त्याप्रमाणे आसपासचे शेतकरी चारेकशे बैलगाड्या घेऊन चाकणला दाखलदेखील झाले होते. पण आंदोलनात आणखी कटकटी निर्माण व्हायला नकोत, म्हणून कुणीतरी निघोजेकरांची कशीबशी समजूत घातली आणि हा अतिप्रसंग टाळला.

 पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग बंद पडल्यामुळे सगळीकडे खळबळ माजली. हजारो ट्रक अडकून पडले होते. आंदोलनाचे पडसाद पार दिल्लीपर्यंत उमटले. १५ मार्च रोजी लोकसभेत शासनातर्फे निवेदन करण्यात आले, की नाफेडला रुपये ४५ ते ७० प्रती क्विटल ह्या दराने कांदा खरेदी करायचे आदेश देण्यात आले आहेत. संघटनेची मागणी बहुतांशी मंजूर झाली आहे म्हणून जोशींनी आंदोलन मागे घेतले. १६ मार्च रोजी अशा प्रकारे रस्ता रोकोची यशस्वी सांगता झाली व त्याचदिवशी जोशींनी आपले आदले आठ दिवस चालू असलेले उपोषण सोडले. ह्या आंदोलनाची वृत्तपत्रांनी बऱ्यापैकी दाखल घेतली; आधीच्या दोन आंदोलनांकडे त्यांनी तसे दुर्लक्षच केले होते. त्यामुळे शेतकरी आंदोलनाची प्रथमच राज्यभर चर्चा सुरू झाली.

 'आम्ही कांदा खरेदी ३० जूनपर्यंत चालू ठेवणार आहोत, त्यामळे शेतकऱ्यांनी आपला कांदा बाजारपेठेत आणण्याची घाई करू नये. आपल्या घरीच तो नीट साठवावा, निवडावा आणि सोयीनुसार बाजारपेठेत आणावा, असे एक निवेदन नाफेडने काढले होते. किंबहुना वारकरीमध्ये अर्धे पान जाहिरात म्हणून ते प्रसिद्धही केले गेले होते. पण प्रत्यक्षात २३ एप्रिल रोजीच नाफेडने कांदाखरेदी बंद केली व त्याविरुद्ध जोशींनी आपले दुसरे बेमुदत उपोषण सुरू केले. ही घटना १ मेची.

३ मे रोजी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवून जोशींना पोलिसांनी पकडले व पुण्याला ससून हॉस्पिटलला हलवले. जोशी यांच्या आठवणीप्रमाणे अजित निंबाळकर हे तेव्हा पुण्याचे कलेक्टर होते व आंदोलनात त्यांनी बरेच लक्ष घातले होते. हॉस्पिटलमध्ये जोशींना चांगली सेवा मिळेल याची त्यांनी तजवीज केली होती. पण वैद्यकीय उपचारांना जोशींनी साफ नकार दिला. “माझे उपोषण म्हणजे आत्महत्येचा प्रयत्न नाही. त्यामुळे ज्या आरोपावरून मला पकडले गेले आहे, तो आरोप मुळातच अगदी चुकीचा आहे," असे त्यांनी कोर्टात सांगितले. त्या मुद्द्यावर पुढे बरेच महिने चर्चा होत राहिली.

 यावेळी बरेच शेतकरी आपापल्या मालासह चाकणच्या बाजारसमितीसमोर ठिय्या देऊन होते, जोशींच्या आदेशाप्रमाणे त्यांनी माल विकला मात्र नव्हता. एक दिवस दुपारी अचानक हवा पावसाळी झाली. पाऊस सुरू झाला तर कांदा भिजेल, त्याचा चिखल होईल व सगळा माल अक्षरशः पाण्यात जाईल अशी भीती साहजिकच काही शेतकऱ्यांना वाटली. आंदोलन फोडायला उत्सुक असलेले काही फितूर होतेच. त्यांनी 'कशाला या जोशींच्या नादी लागता! आत्ताची वेळ येईल त्या भावाला कांदा विकून टाकू, मग पुढच्या वेळेला बघू आंदोलनाचं काय करायचं ते, अशी कुजबुज सुरू केली. बरेच शेतकरी गोंधळात पडले. सच्चे कार्यकर्ते जोशींच्या मागे होते. पण मालाचे नकसान होईल ही भीती त्यांनादेखील होतीच, शेतकरी संघटनेच्या दृष्टीने हा अगदी कसोटीचा क्षण होता.

 अशावेळी लीलाताई आंदोलनाच्या स्थळी आल्या. आल्या-आल्या अनेक शेतकऱ्यांनी त्यांना विनंती केली की, "एवढा आजचा दिवस आम्हाला आमचा कांदा विकून टाकायची परवानगी द्या. पुढच्या वेळेला आम्ही शेवटपर्यंत कळ काढू."

 त्यावेळी चाकण बाजारपेठेत जमलेल्या शेतकऱ्यांसमोर लीलाताईंनी खूप झुंझार भाषण केले. त्या म्हणाल्या,

 "ज्या कोणाला आपला कांदा विकावा असं वाटत असेल, त्याने तो खुशाल विकावा. पण सर्वच्या सर्व शेतकऱ्यांनी जरी हे आंदोलन सोडायचं ठरवलं, तरी ह्या कामासाठी माझ्या नवऱ्याने सुरू केलेलं उपोषण त्याने सोडावं असं मी मुळीच म्हणणार नाही! माझ्या कुंकवाचा बळी पडला तरी चालेल, पण मी आता माघार घेणार नाही. इतकंच नव्हे तर माझा नवरा, मी, आमची गाडी, आमचे दोन बैल, आणि आमचा डॅश कुत्रा ह्या रस्त्यावर बसू आणि आम्ही हे आंदोलन असंच पुढे चालवू.'

 लीलाताई जेव्हा आंदोलनस्थळी आल्या व त्यांनी भाषण करावे अशी काही जणांनी त्यांना विनंती केली, तेव्हा त्या मंडळांची अपेक्षा अशी होती, की त्या साहेबांचा जीव वाचावा म्हणून, तात्पुरती का होईना पण, आंदोलनाला स्थगिती देतील आणि मग आपला कांदा आपण येईल त्या भावाला नेहमीप्रमाणे विकून मोकळे होऊ. पुढचे पुढे. प्रत्यक्षात उलटेच काहीतरी घडले. समोर शेकडो शेतकरी स्त्रियाही उपस्थित होत्या व लीलाताईंच्या भाषणाने त्या अगदी पेटून उठल्या. त्यांतील एक उत्स्फूर्तपणे उभी राहिली व म्हणाली,

 "माझं कुंकू पुसलं गेलं तरी हरकत नाही, पण आता मी माघार घेणार नाही, असं आत्ता साहेबांच्या बाई म्हणाल्या. त्या जर एवढ्या मोठ्या त्यागाला तयार असतील, तर मग मीही आता मागे हटणार नाही. बाकी पुरुष शेतकरी भले पळून जावोत, आम्ही शेतकऱ्यांच्या बाया आता हे रास्ता रोको चालूच ठेवू. ही लढाई आम्ही लढतच राहू. आमचं जे काय व्हायचं असेल ते होऊन जाऊ दे."

 बायकांनी घेतलेला हा अनपेक्षित पुढाकार पाहून मग सगळेच शेतकरी पुन्हा एकदा रास्ता रोको करायला पुढे झाले. सगळेच वातावरण एकदम बदलून गेले. त्वेषाने जोरजोरात घोषणा सरू झाल्या. नाफेडच्या अधिकाऱ्यांना सगळ्यांनी बाजार समितीतल्या त्यांच्या कार्यालयातच कोंडले. आंदोलनाची तीव्रता एकदम वाढली. सरकारी अधिकारी व हजर असलेले पोलीसही गांगरून गेले. शेतकऱ्यांच्या निर्धारापुढे मग सरकारी यंत्रणेला झुकावे लागले.

 लीलाताईंचे ते वीरश्रीपूर्ण भाषण म्हणजे कांदा आंदोलनातील एक नाट्यपूर्ण व निर्णायक क्षण होता. शिवकाळात कोंढाणा किल्ला सर करताना शेलारमामाने जी भूमिका बजावली होती व आपल्या पळून जाणाऱ्या मावळ्यांना चेतवून पुन्हा एकदा लढाईसाठी सज्ज केले होते, तशीच काहीशी भूमिका ह्या वेळी लीलाताईंनी बजावली होती. मामा शिंदे व त्या रोमांचक क्षणाचे साक्षीदार असलेले त्यावेळचे चाकणमधील इतरही काही कार्यकर्ते आजही ही आठवण पाणावलेल्या डोळ्यांनी सांगतात.

 शेवटी नाफेडचे पाटील नावाचे एक अधिकारी चाकणला आले व त्यांनी वाटाघाटी करून क्विटलला ५० ते ६० रुपये हा भाव मान्य केला. हा विजय मोठा होता; कारण त्या वेळी कांद्याचा भाव १५ रुपये क्विटलपर्यंत कोसळला होता. त्यामुळे मग ६ मे रोजी, सहाव्या दिवशी, जोशींनी आपले हे दुसरे उपोषण सोडले.

 निर्यातबंदी घालणे व आंदोलन तीव्र झाले तर ती तेवढ्यापुरती उठवणे हे एक दुष्टचक्रच सुरू झाले होते. ह्याचीच पुनरावृत्ती पंधरा दिवसांनी झाली. २८ मे १९८० रोजी खेड तालुक्यातील विधानसभेची निवडणूक होणार होती. सगळीकडे धामधुमीचे वातावरण होते. पण त्याचवेळी चाकणच्या बाजारपेठेत मात्र शेतकरी खूप काळजीत होते. ह्यावेळी नाफेडने वरकरणी खरेदी चाल ठेवली होती, पण प्रत्यक्षात ते कांदा खरेदी करत नव्हते; काही ना काही कारण दाखवून आलेला कांदा परत पाठवत होते.

 शनिवार, २४ मेची दुपार. मोठ्या संख्येने कांद्याचे ढीग लिलावासाठी बाजारसमितीच्या आवारात पडून होते पण नाफेडतर्फे त्यातले फक्त दहा टक्के ढीग खरेदी केले गेले; बाकीचे 'रिजेक्ट' म्हणून तसेच पाडून ठेवले गेले. त्या 'रिजेक्ट' ढिगांचे काय करायचे ह्या काळजीने शेतकरी हवालदिल झाले होते. दिवसभरात जोशी यांनी नाफेडच्या अधिकाऱ्यांशी वारंवार चर्चा केली, पुण्याला जाऊन ते मुद्दाम कलेक्टरनाही भेटून आले. 'उद्या रविवार असूनही खरेदी चालू ठेवू व उद्या व्यवस्थित व्यवहार होईल' असे आश्वासन त्यांनी मिळवले.

 त्यानुसार रविवारी पुन्हा खरेदी चालू झाली. पण ढीग नाकारण्याचे प्रमाण तेच कायम होते. उदाहरणार्थ, बाजीराव शिंदे या दलालाच्या गाळ्यासमोर कांद्याचे ४२ ढीग होते, पण त्यांपैकी नाफेडने फक्त एक ढीग खरेदी केला. इतर दलालांच्या गाळ्यांसमोरही साधारण हेच प्रमाण होते. शंकरराव वाघ, बाबूलाल परदेशी व जोशी सतत बाजारपेठेत फिरत होते. शेतकरी त्यांच्यापाशी मोठ्या प्रमाणावर तक्रारी घेऊन येऊ लागले. नाकारलेले ढीग का नाकारले गेले याची माहिती व्यवस्थित भरून घेण्यासाठी शेतकरी संघटनेने काही फॉर्म छापून घेतले होते. त्यात ती माहिती भरली जात होती. एकूण २०० अर्ज छापून घेतले होते व ते सर्व भरले गेले. शेवटी कोऱ्या कागदावर ही माहिती भरून घ्यायला संघटनेने सुरुवात केली. तसे कोऱ्या कागदावरचेही ४५० अर्ज भरले गेले, पण तरी तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यांची गर्दी एवढी होती, की त्यांचे आता काय करायचे हा प्रश्नच होता.

 लांबलांबचे शेतकरी इथली कांद्याची बाजारपेठ मोठी, म्हणून मुद्दाम आपला माल इथे घेऊन येत. असेच अहमदनगरमधील पारनेर तालुक्यातील काही शेतकरी २५ दिवसांपूर्वी आले होते, पण अजूनही त्यांचा कांदा विकत घेतला गेला नव्हता. ते शेतकरीही रस्त्यावरच मुक्काम ठेवून होते. एव्हाना त्यांचा धीर पार खचला होता. बाजारसमितीत येऊन ते अक्षरशः रडायलाच लागले. ते म्हणत होते, "आमच्या कांद्याकडे कोणीच ढुंकून पाहत नाही. तीन आठवडे झाले आम्ही इथे बसून आहोत. आम्हाला कोणीच वाली नाही. काहीही करा पण आता आमचा निर्णय लावा."


 पण नाफेडच्या अधिकाऱ्यांवर त्याचा काहीही परिणाम होत नव्हता. 'उद्यापासून व्यवस्थित व्यवहार होईल' हे त्यांचे आश्वासन फक्त तोंडदेखलेच होते. एक ढीग असा होता, की त्याची खरेदी ६० रुपये क्विटल दराने व्हायला हवी होती. पण तो ढीगही नाफेडच्या अधिकाऱ्यांनी नामंजूर केला. जोशी स्वतः त्यावेळी ढिगाजवळ उभे होते व त्यांनी स्वतः तपासून तो ढीग उत्तम असल्याचे सांगितले. पण अधिकारी ऐकेनात. ही म्हणजे जणू उंटाच्या पाठीवरची शेवटची काडी होती. संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी संघटनेच्या बाजूने व नाफेडच्या विरोधात घोषणा द्यायला सुरुवात केली व लिलाव बंद पाडला. शेतकरी तसेच पुणे-नाशिक महामार्गावर आले, मोठ्या प्रमाणावर रस्त्यालगतचे दगड गोळा करून त्यांनी ते रस्त्यात ठेवले व त्यांनी स्वतःही तिथेच बसकण मारली. पुन्हा एकदा रास्ता रोको सुरू झाले.

 आता कुठलेच वाहन आरपार जाणे शक्य नव्हते. एव्हाना आंदोलकांची संख्या चारपाच हजाराच्यावर गेली होती. गंमत म्हणजे अडकलेल्या वाहनांमध्ये एक वाहन होते मुंबईचे झुंजार कामगारनेते व आमदार डॉ. दत्ता सामंत यांचे. एका प्रचारसभेसाठी त्यांना मंचरला जायचे होते, पण त्यांना पुढे जाता येईना. चालत चालत ते आंदोलकांपाशी गेले व तिथला माइक घेऊन त्यांनी "कामगारवर्ग लढणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहील" असे ठणकावून सांगितले. त्यानंतर जोशींच्या सांगण्यावरून त्यांच्या वाहनाला तेवढी वाट मोकळी करून दिली गेली. दोन दिवसांनंतर होणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार घालायचे सभेत ठरले. बघता बघता संध्याकाळचे पाच वाजले.

 महामार्ग बंद पडल्याने वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली होती. दरम्यान बराच मोठा फौजफाटा घेऊन पोलीस घटनास्थळी हजर झाले. आंदोलकांना त्यांनी चारी बाजूंनी वेढले. बाबूलाल परदेशी त्यावेळी भाषण करत होते. एक इन्स्पेक्टर पुढे झाला व त्याने त्यांच्या हातातला माइक हिसकावून घेतला. पण तेवढ्यात जोशींनी तो ओढून आपल्या हातात घेतला व ते बोलायचा प्रयत्न करू लागले. समोर जमलेल्या शेतकऱ्यांना उद्देशून त्यांना काहीतरी आवाहन करायचे होते. पण ते काही बोलायच्या आतच त्या इन्स्पेक्टरने त्यांच्याही हातातला माइक हिसकावून घेतला व सर्व आंदोलकांना अटक करण्यात येत आहे' असे जाहीर केले. 'आम्ही इथून हलणारच नाही, तम्ही काय वाटेल ते करा,' असे म्हणत जोशींनी व इतर कार्यकर्त्यांनी रस्त्यातच बसकण मारली. ते ऐकेनात म्हणून शेवटी एकेक करत त्यांना चार-चार पोलिसांनी उचलले व एका पोलीस गाडीत कोंबले. आंदोलकांना पकडण्यासाठी पोलिसांनी पाच एसटी बसेस व दोन मोठ्या पोलीस गाड्या तयार ठेवल्या होत्या. त्यात सगळ्यांना कोंबण्यात आले व गाड्या तिथून निघाल्या. पोलिसांनी जोशींना व त्यांच्याबरोबर एकूण ३१६ आंदोलनकर्त्यांना अटक केली.

 रात्री दहा वाजता चाकणमध्येच त्यांना मॅजिस्ट्रेटसमोर उभे केले गेले. आधी असे वाटले होते, की त्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून दुसऱ्या दिवशी सोडून दिले जाईल. पण ह्यावेळी शासनाने ताठर भूमिका घेतली होती. १७ फेब्रुवारीपासूनच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली होती. सगळ्यांना १० दिवसांचा रिमांड दिला गेला. जोशींना इतर सात कार्यकर्त्यांसह औरंगाबाद येथील तुरुंगात डांबण्यात आले. इतरांची रवानगी वेगवेगळ्या तुरुंगांत केली गेली. त्या कारावासातील अनुभवावर आधारित 'सजा-ए-औरंगाबाद' नावाची एक रसाळ लेखमाला वारकरीमध्ये (१२ जुलै ते १३ सप्टेंबर १९८०) बाबूलाल परदेशी यांनी लिहिली होती.

 आंदोलकांना ह्यावेळी पोलिसांचा चांगला अनुभव आला. बरेचसे पोलीस म्हणजे स्वतः शेतकऱ्यांची मुले होती. शेतकऱ्यांच्या मागण्या अगदी न्याय्य आहेत, याची त्यांना जाणीव होती. त्यामुळे कदाचित त्यांच्या मनात आंदोलनकर्त्याविषयी काहीशी सहानुभूती होती. सर्वांत चांगला अनुभव आला तो औरंगाबाद जेलच्या प्रमुख जेलरचा. त्यांनी सुरुवातीलाच सगळ्यांना सांगितले,  "तुम्ही शेतकऱ्यांच्या हिताचं काम करत आहात. कैद्यांच्या दृष्टिकोनातून आम्ही तुम्हाला वागवणार नाही. ह्या जेलमध्ये ए किंवा बी दर्ध्याच्या कैद्यांची सोय नाही, त्यामुळे तुम्हाला सर्वसाधारण कैद्यांप्रमाणेच राहावं लागेल. परंतु आमच्याकडून शक्य होतील तितक्या सगळ्या सोयी आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ." त्यानंतर जेलरसाहेब म्हणाले, "माझ्या स्वतःच्या तीन एकर शेतातला कांदा अजून शेतात पडून आहे. कांद्याला असाच कमी भाव मिळत राहिला तर मलाही खरोखरच ही शेती परवडणार नाही."

 जेलरसाहेबही समदःखीच निघाले!

 पण असा अनुभव यायचा हा शेवटचाच प्रकार; त्यानंतर मात्र प्रत्येक आंदोलनाच्या वेळी पोलीस शेतकऱ्यांना खूप क्रूरपणे झोडपून काढत.

 ३ जून रोजी रिमांडचे दहा दिवस पूर्ण होत होते. सगळ्यांना खेड तालुका कोर्टात हजर केले गेले. आंदोलकांच्या वतीने अॅडव्होकेट साहेबराव बुटे व दोन-तीन सहकारी वकिलांनी काम पाहिले. आमदार राम कांडगे हेदेखील काही मदत लागली तर ती करायला तिथे हजर होते. संध्याकाळी पाचच्या सुमारास दहा दिवसांच्या रिमांडमधून सगळ्यांची जामिनावर सुटका झाली. कांदा आंदोलन चालू असताना जोशी नेहमी शिवकाळाचा संदर्भ देत. तीनशे वर्षांपूर्वी जगाच्या दृष्टीने नगण्य असलेल्या मावळ्यांनी चाकणला इतिहास घडवला. स्वराज्याची लढाई झाली नसती तर कित्येक तानाजी, बाजीप्रभू, येसाजी आणि सावळ्या तांडेल जगाला अज्ञात राहिले असते. त्याचप्रमाणे शेतकरी आंदोलन झाले नसते तर इथले बाबूलाल परदेशी किंवा शंकरराव वाघ यांच्यासारखे हिरे समुद्राच्या तळातल्या रत्नांप्रमाणे अज्ञातच राहिले असते. ह्या सर्व कालखंडात हे दोघे जोशींचे जणू दोन हातच बनले होते. पुढेही अनेक वर्षे त्यांनी आंदोलनात अत्यंत इमानी अशी आणि सन्मानाची कुठलीही अपेक्षा न ठेवता जिवाभावाची साथ दिली. या काळात मामा शिंदे यांचीही खूप मदत झाली. बाकीचे तुरुंगात असताना शेतकऱ्यांचे मनोधैर्य टिकवून ठेवायचे मोठे काम त्यांनी केले.

 शेतकरी संघटनेने आंदोलनासाठी प्रथम कांदा हे पीक निवडले हा कदाचित धोरणपूर्वक घेतलेला निर्णय नसेल व त्यामागे मुख्यतः परिस्थितीचाच रेटा असेल, पण ती निवड अगदी अचूक ठरली हे नक्की. सबंध देशामध्ये त्यावेळी कांद्याचे जे पीक येई, त्यापैकी ६० ते ७० टक्के कांदा एकट्या महाराष्ट्रात व्हायचा व त्यापैकी ५० टक्के कांदा हा नाशिक व पुणे जिल्ह्यांच्या फक्त पाच तालुक्यांत व्हायचा. म्हणजे देशातला जवळजवळ एक तृतीयांश कांदा ह्या पाच तालुक्यांत होत होता. एवढ्या सीमित भूभागात इतक्या मोठ्या प्रमाणावर एखाद्या पिकाचे उत्पादन एकवटले आहे, असे एरव्ही दिसत नाही. बाजारपेठेवर नियंत्रण ठेवण्याचे आंदोलकांचे सामर्थ्य उघड होते. कुठल्या शेतीमालाचे आंदोलन कुठे परिणामकारक होऊ शकते ह्याचेही एक भान ह्या आंदोलनाने दिले. जोशींच्या मते विशिष्ट किमतीखाली कांदा विकायचाच नाही हा निर्धार इथल्या शेतकऱ्यांनी केला, तर देशभरच्या ग्राहकांना कांदा अधिक पैसे देऊन खरेदी करावा लागेल, आंदोलनाचे पडसाद देशभर उमटतील; इतरही शेतकरी असेच आंदोलन उभारू शकतील आणि कांद्याचा लढा ही देशभरातील शेतकरी क्रांतीची सुरुवात ठरू शकेल.

 व्यक्तिगत पातळीवर विचार केला तर, आपला शेतीमालाला रास्त दाम' हा एक-कलमी कार्यक्रम शतकानुशतके विस्कळित राहिलेल्या, दबलेल्या, पिचलेल्या शेतकरी समाजाला एकत्र आणू शकतो, त्यांनाही आंदोलनासाठी उभे करू शकतो ह्याचा आत्मविश्वासदेखील जोशींना या कांदा आंदोलनाने दिला. शेतकरी संघटनेचे हे पहिलेच आंदोलन. संघटनेचे सामर्थ्य या आंदोलनात सिद्ध झाले.

 ह्या आंदोलनात प्रथमच जोशी यांनी रास्ता रोको किंवा उपोषण ह्यांसारखी हत्यारे वापरली. अशा प्रकारचे आंदोलन हा त्यांच्यासारख्या एकेकाळच्या वरिष्ठ सनदी नोकराचा पिंडच नव्हता. शिवाय ते एक अभ्यासकही होते व अशा प्रकारचे आंदोलन हा एखाद्या अभ्यासकाचाही पिंड नव्हे. जोशी यांच्या पूर्वायुष्याकडे पाहता असे काही त्यांच्या भावी आयुष्यात घडू शकेल ह्याचा अदमास कुणीच बांधू शकले नसते, इतके हे आंदोलन त्यांच्या व्यक्तित्वाशी विसंगत होते. 'शेतकरी संघटना हा माझ्या आयुष्यातील एक अपघात आहे,' असे स्वतः जोशी पुढे अनेकदा म्हणाले.

 पण हे घडून आले खरे. त्यांच्यासारखा एक गंभीर विचारवंत एक कडवा आंदोलक बनला तो ह्याच काळात. त्यांच्या भावी कार्याची ही नांदी होती. याच पहिल्या ठिणगीतून बघता बघता एक वणवा भडकणार होता.

 स्वातंत्र्योत्तर काळाचा विचार केला तर इतके यशस्वी शेतकरी आंदोलन दुसरे कुठले झाल्याचे दिसत नाही. कांदा आंदोलनाचे हे ऐतिहासिक महत्त्व मोठे आहे.



उसाचे रणकंदन


 “Journey of a thousand miles begins with the first step” (हजार मैलांच्या प्रवासाची सरुवात एका पहिल्या पावलाने होते) हे रशियन क्रांतिकारक लेनिनचे उद्गार प्रसिद्ध आहेत. चाकण येथील कांदा आंदोलन हेदेखील एक मोठ्या प्रवासाचे केवळ पहिले पाऊल आहे ह्याची शरद जोशी यांना हळूहळू जाणीव होत गेली. कारण सगळ्याच शेतकऱ्यांची दुःखे इथूनतिथून सारखीच आहेत हे उघड होत गेले.

 ठिकठिकाणचे शेतकरी 'वारकरी'कडे पाठवत असलेल्या पत्रांवरूनदेखील ही गोष्ट अगदी स्पष्ट होत होती. वेळात वेळ काढून जोशी त्यांतील निवडक पत्रांना उत्तरेही लिहीत असत. त्यासाठी रात्रीची झोप त्यांनी शक्य तितकी कमी केली होती. कारण पत्रव्यवहार सांभाळायला त्यांच्याकडे दुसरा कोणी कर्मचारी नव्हता. कार्यकर्ते होते, पण ते तसे लिखापढी करणारे नव्हते. सगळी पत्रे जोशी स्वतःच लिहीत व तीही हाताने. पण त्यात ते कधी कंटाळा करत नसत, कारण ह्या साध्या साध्या पत्रांतूनच अंगारमळ्यातील अंगार इतर ठिकाणीही जाऊन पोचणार होता याची त्यांना खात्री होती. असेच एक पत्र त्यांनी एका सकाळी पत्रपेटीत टाकले. ते होते, निफाडचे एक तरुण तुकाराम निरगुडे पाटील यांना. त्यांच्या त्याच दिवशी आलेल्या एका पत्राचे उत्तर म्हणून. त्या पत्रामागची उत्कटता कुठेतरी जोशी यांना स्पर्शून गेली होती.

 चाकण परिसरातील कांद्याइतकाच शेजारीच असलेल्या नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत बाजारपेठेतला कांदाही खूप प्रसिद्ध होता. तेथील शेतकरीही मोठ्या प्रमाणावर कांदा पिकवत आणि साहजिकच चाकणच्या आंदोलनाकडे तेही डोळे लावून बसले होते. त्यांच्यापैकीच एक होते निरगुडे. निफाड सहकारी साखर कारखान्यात ते कारकुनी करत. शेतीवाडी गावाला होती. राहायला कारखान्याच्या कॉलनीतच जागा होती. संध्याकाळी खोलीवर आल्यावर मिळतील तेवढे सगळे रोजचे पेपर वाचायचा त्यांचा प्रघात होता. असेच एका संध्याकाळी त्यांनी चाकणच्या कांदा आंदोलनाबद्दलचा एक सविस्तर वृत्तान्त वाचला. वाचून ते अगदी भारावून गेले. 'कसेही करून ह्या शरद जोशींना भेटले पाहिजे, त्यांच्या मनाने घेतले. पण भेटणार कसे? ओळखपाळख काहीच नव्हती. पण भेटायचा विचार पिच्छा सोडेना. झोपही येईना. शेवटी न राहवून रात्री बारानंतर ते उठले. कोणाकडून तरी आंतर्देशीय मिळवून त्यांनी एक पत्र लिहिले – 'मी तुम्हाला भेटायला येऊ इच्छितो.' अंदाजानेच शरद जोशी, शेतकरी संघटना, चाकण' असा पत्ता लिहिला आणि सकाळी ते पत्र टपाल पेटीत टाकले. आश्चर्य म्हणजे लगोलगच उत्तरही आले! 'प्रत्यक्ष येऊन भेटावे व चर्चा करावी.'

 दुसऱ्याच दिवशी निरगुडे बरोबर भाकऱ्या बांधून नाशिकला गेले व पुण्याच्या एसटीत बसले. 'भेट वादळाशी' ह्या शीर्षकाखालील एका लेखात त्यांनी ह्या पहिल्या भेटीचे रसाळ वर्णन केले आहे. (मा. शरद जोशी अमृतमहोत्सव स्मरणिका, २००९, पृष्ठ १२५)

 कारखाना व घर हा परिसर सोडून त्यापूर्वी निरगुडे कुठेच गेले नव्हते; अगदी चाकणलाही नाही. बस कंडक्टरला 'चाकण आले की मला नक्की सांगा' असे सांगून, बस तिथे पोचल्यावरही दोन-चार जणांना विचारून खात्री करून घेत ते उतरले आणि बरीच विचारपूस करत कसेबसे संघटनेच्या कार्यालयात पोचले. आत बाबूलाल परदेशी एकटेच होते. त्यांचे जोशींबरोबर पूर्वीच बोलणे झाले असावे. थोड्याच वेळात जोशी आले. त्यांना पाहताच निरगुडे गांगरले, पण जोशींनी हसतमुखाने त्यांच्याशी बोलून त्यांना आश्वस्त केले. 'चला माझ्याबरोबर,' जरा वेळाने जोशी म्हणाले. कुठे, कशाला काही नाही.

 लगेच निरगुडे उठले. बरोबर बांधून आणलेली भाकऱ्यांची पुरचुंडीदेखील घाईघाईत ते बसलेल्या बाकड्याखालीच विसरले! जोशींनी झटक्यासरशी आपली बुलेट सुरू केली. निरगुडे मागे बसले. त्या काळात जोशी खूप वेगात गाडी हाकत. बघताबघता गाडी हायवेला लागली. निरगुडे लिहितात, "माझ्या आयुष्यात इतक्या वेगाने मोटार सायकल चालवणारा अद्यापतरी कोणी भेटलेला नाही.”

 दोघे सरळ पुण्याला जोशींच्या औंधमधील घरी गेले. गप्पा सुरू झाल्या. आपल्या आंदोलनात ह्या पोरसवदा तरुणाचा उपयोग होऊ शकेल, ह्याच्यात काहीतरी वेगळी चमक आहे, हे जोशींना बहुधा जाणवले होते. किंबहुना म्हणूनच त्यांनी तत्परतेने पत्रोत्तर पाठवून निरगुडेंना बोलवून घेतले होते. त्या दृष्टीने त्यांची जुळणी सुरू होती. ते नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांची नेमकी माहिती काढू पाहत होते. निरगुडे त्या रात्री जोशी परिवाराबरोबरच जेवले व राहिलेही. ते लिहितात,

सर्व कुटुंबासह आणि डायनिंग टेबलावर असा मी आयुष्यात प्रथमच जेवत होतो. आग्रह होत होता. मी नको नको म्हणत कसबसा घाबरतच जेवत होतो...त्या रात्री झोप येणं शक्य नव्हतं. मनात विचार चालू होते. ही मोठी माणसं, त्यांच्या सहवासात आपण चुकून आलो. त्यांचं जग वेगळं, आपलं वेगळं. उद्या सकाळी उठून चहा न घेताच इथून एकदाचं पलायन करायचं.

 पण प्रत्यक्षात पुढले तीन दिवस जोशींनी त्यांना स्वतःबरोबरच आपल्या प्रवासात सतत ठेवून घेतले. संघटनेच्या आळंदी येथील सभेला निरगुडे त्यांच्याबरोबरच हजर राहिले. किंबहुना त्यांनी स्टेजवर बसावे असा जोशी यांचा आग्रह होता; पण संकोचाने निरगुडेंनी तो मानला नाही. जोशी यांच्या तेथील भाषणाविषयी निरगुडे लिहितात,

मी समोर प्रेक्षकांत बसून एकाग्रतेने तल्लीन होऊन ऐकत होतो. त्यांनी शेतकरी महिलांवर बोलायला सुरुवात केली. मी भान विसरून ऐकत होतो. मला एकाएकी भरून आलं. इतकंच नाही तर अक्षरशः दुःखाश्रू आवरेनासे झाले. कारण साहेब माझ्या आईच्या भोगाचं दुःखच सांगत असल्याचा मला भास होत होता. माझ्या आईने पाठीशी पोर बांधून, डोक्यावर पाटी घेऊन, शेतामातीत व चुलीजवळ कष्टाचे जे कढ सोसले तेच साहेब सांगत होते. जगात सुख काय असतं हे माहीत न होताच आई देवाघरी गेली होती. त्या भाषणाने मी व्याकूळ झालो.

 निरगुडेंनी पाहिलेली संघटनेची ही पहिलीच सभा होती. दुसऱ्या दिवशी नारायणगाव येथे व तिसऱ्या दिवशी मंचर येथे झालेल्या संघटनेच्या सभांनाही जोशी त्यांना बरोबर घेऊन गेले. संघटनेचे काम म्हणजे नेमके काय आहे हे निरगुडेंच्या आता पूर्ण लक्षात आले होते. त्या तीन रात्री त्यांचा मुक्काम चाकणजवळील शंकरराव वाघांच्या मळ्यातील घरी होता. जोशींना फक्त एकदा थोड्या वेळासाठी भेटावे ह्या माफक अपेक्षेने, राहण्याचे काहीही सामान बरोबर न घेता आलेले निरगुडे शेवटी चौथ्या दिवशी निफाडला परतले! त्यांना निरोप द्यायला शंकरराव व जोशी स्वतः एसटी स्टँडवर आले होते. ह्या तीन दिवसांत नाशिकला संघटनेचा कार्यक्रम घेण्याविषयी जोशी त्यांच्याशी चर्चा करत होते. त्याविषयी निरगुडे स्वतः खूपच साशंक होते. कारण आपण खूप छोटे आहोत, आपले कोण ऐकणार, असे त्यांना वाटत होते. तरीही त्यांनी 'आपण नक्की नाशिकला कार्यक्रम करू' असे आश्वासन दिले.

 जोशी यांचे आडाखे अचूक होते; त्यांची पेरणी फुकट गेली नाही. पुढे निरगुडेंनी आंदोलनात महत्त्वाचे योगदान दिले. ते काम करत होते त्या निफाड साखर कारखान्याचे चेअरमन माधवराव बोरास्ते ह्यांची. तसेच. पढे शेतकरी संघटनेत खप प्रभावी नेतत्व दिलेले माधवराव खंडेराव मोरे ह्यांची जोशींबरोबरची पहिली भेट त्यांनीच घडवून आणली. एका अर्थाने ऊस आंदोलनात ते संप्रेरक (catalyst) ठरले. त्यांच्यात एक कलावंतही दडलेला होता. जोशींवर चित्रपट काढायची त्यांची योजना होती व त्यासाठी पटकथाही त्यांनी लिहिली होती. शेतकरी संघटनेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले.

 पण हा सारा नंतरचा भाग झाला; जोशी यांनी सुरुवातीच्या काळात चाकण परिसरापलीकडे जाऊन माणसे कशी जोडली, त्यासाठी किती कष्ट घेतले, किती विचारपूर्वक नियोजन केले ह्याचे हे एक उदाहरण.

 संघटनेच्या आळंदी येथील शिबिराविषयी इथे लिहायला हवे. कारण शेतकरी संघटनेचे हे पहिलेच शिबिर असल्याने त्याला एक ऐतिहासिक महत्त्व आहे. रविवार, ६ एप्रिल १९८० रोजी सकाळी सुरू झालेले हे शिबिर सोमवार, ७ एप्रिलच्या रात्री संपले. नंतरच्या संघटनेच्या शिबिरांमध्ये बाहेरच्या तज्ज्ञांना फारसे स्थान कधी मिळू शकले नाही; पण हे पहिले शिबिर मात्र त्या बाबतीत वेगळे होते.  पहिल्या सकाळी आपल्या प्रास्ताविक भाषणात जोशींनी शेतकरी संघटनेचा पुढील अष्टसूत्री कार्यक्रम स्पष्ट केला :

  1. देशातील दारिद्र्य हे सर्वप्रथम ग्रामीण भागातील शेतकऱ्याचे दारिद्र्य आहे. शहरातील गरिबी हा केवळ ग्रामीण दारिद्र्याचा एक परिणाम आहे.
  2. शेतकऱ्याचे दारिद्र्य हे सर्वस्वी कोरडवाह शेतकऱ्याचे दारिद्र्य आहे. ३. कोरडवाहू शेतकऱ्याचे दारिद्र्य सतत वाढत आहे. १९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यापासून त्याची परिस्थिती खपच खालावली आहे.
  3. ह्या दारिद्र्याचे कारण हे, की शेतीमालाला नेहमीच अपुरा भाव मिळतो व शेतकऱ्याचा उत्पादनखर्चसुद्धा भरून निघत नाही.
  4. कोरडवाह शेतीचा खर्च पावसाच्या अनिश्चिततेमळे फार वाढतो. उलटपक्षी हंगामी पावसावर काढलेली सर्व पिके एकदम बाजारात येतात आणि सुगीनंतर सर्व शेतीमालाचे भाव कोसळतात.
  5. या परिस्थितीचा फायदा घेऊन इंग्रजांनी देशाचे शोषण केले. 'कच्चा माल स्वस्तात

स्वस्त, पक्का माल महागात महाग' हे त्यांचे वसाहतवादी सूत्र. स्वातंत्र्यानंतरच्या काळात राज्यकत्यांना हीच पद्धत चालू ठेवली. भारतावर इंडियाने अंमल बसवला. शेतीमालाचे विविधीकरण, त्याच्या साठवणाची व्यवस्था, शेतीमालावरच्या प्रक्रियेचे उद्योगधंदे, शेतीमालाच्या किमान भावाची हमी अशा कार्यक्रमांऐवजी शहरी नोकरशाहीचा लाभ करून देणारे कार्यक्रम सरकारने राबवले.

  1. दीन शेतकऱ्याची आज तथाकथित विधायक मार्गाने जाण्याची ताकद नाही. त्याला तेवढा अवसरही नाही. संघटित लढा हा एकच मार्ग आज त्याला उघडा आहे.

 जोशीनंतर सुप्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ वि. मा. कुलकर्णी बोलले. पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागात ते 'विकास पत्रकारिता' हा विषय शिकवत. मूळचे ते चाकण परिसरातील कडूस ह्या गावचे. त्यांनी पायवाट नावाचे एक साप्ताहिक सुरू केले होते व अतिशय निष्ठेने जवळजवळ एकहाती ते चालवले होते. ग्रामीण भागाकडे कायम होणारे दुर्लक्ष व ग्रामीण अर्थव्यवस्थेची हेळसांड ह्यावर त्यांचा भर होता.

 डॉ. मो. वि. भाटवडेकर हे आंतरराष्टीय कीर्तीचे अर्थतज्ज्ञ स्वतःहन अगत्याने शिबिराला हजर राहिले होते. कुलकर्णी यांच्यानंतर ते बोलले. 'अर्थविकास आणि जागृती' हा विषय त्यांनी घेतला होता. उत्पादन वाढले म्हणजे शेतकऱ्याची स्थिती सुधारते का, ग्रामीण भारताची हेळसांड हेतूतः झाली की अजाणतेपणी आणि विकास आधी की जागृती आधी ह्या तीन प्रश्नांचा त्यांनी ऊहापोह केला. हे तिन्ही मुद्दे तसे नावीन्यपूर्ण होते व त्यांवर भाषणानंतर बरीच चर्चा रंगली.

 दुपारी शेतकरी संघटनेने चालवलेल्या सध्याच्या लढ्याविषयी व संघटना उभारण्याविषयी चर्चा झाली. प्रत्यक्ष व्यवहारातील बाबींवर त्यात भर होता. रात्री जेवण झाल्यानंतर राष्ट्रीय समता मंचाच्या कार्यकर्त्यांनी गाण्याचा रसाळ कार्यक्रम सादर केला व तो सर्वांचीच दाद मिळवून गेला.

 दुसऱ्या दिवशी विषय होता – सरकारी कामाचा शेतकऱ्यांना येणारा अनुभव. सर्वांचा बोलण्याचा सूर एकच होता - सरकारी कामात भ्रष्टाचार फार आणि कार्यक्षमता शून्य. अपेक्षेप्रमाणे ह्या चर्चेत बऱ्याचशा शिबिरार्थीनी आपले अनुभव सांगितले. शेतकऱ्यांच्या साचलेल्या कर्जाविषयीही ह्या सत्रात सखोल चर्चा झाली.

 जेवणानंतरच्या सत्रात ख्यातकीर्त अर्थतज्ज्ञ वि. म. दांडेकर यांनी 'शेतीमालाचे भाव' ह्या विषयावर भाषण केले. शेतीमालाची मागणी व त्याचा पुरवठा ह्यांत सुसूत्रता आणणे आणि पक्क्या मालाची मागणी व त्याचा पुरवठा ह्यांतही सुसूत्रता आणणे कसे गरजेचे आहे ह्यावर ते बोलले. संघटित कामगारवर्ग व शेतकरी यांच्यात एकजूट निर्माण करायची असेल, तर त्यासाठी संघटित कामगारांनी आपली स्वार्थी वृत्ती कमी केली पाहिजे असे ते म्हणाले.

 शेवटचे सत्र १९८०-८१ साली संघटनेचा कार्यक्रम काय असावा ह्यावर होते. काही महत्त्वाच्या शेतमालाचे किमान भाव ठरवून मागावेत हा मुख्य कार्यक्रम ठरला. पण त्याखेरीज दारिद्र्य हटवण्यासाठी गावातील दारूवरील खर्च तसेच वेगवेगळे उरूस-सण ह्यांवरील खर्च ह्यांनाही आळा घालायची गरज अनेकांनी व्यक्त केली. शिबिराच्या शेवटी आळंदीच्या ग्रामस्थांची एक सभा झाली व त्यात ग्रामस्थांना संघटनेच्या कार्याची माहिती दिली गेली.

 शिबिराला एकूण शंभरावर शेतकरी हजर होते. आळंदी येथील डबेवाला धर्मशाळा येथे सर्वांची राहायची-जेवायची व सभांची व्यवस्था केली होती. चाकणच्या काही प्रथमपासूनच्या सहकाऱ्यांनी शिबिराची सर्व व्यवस्था चोख ठेवली होती.

 संघटनेच्या भावी शिबिरांसाठी दैनंदिन कार्यक्रमाचा व एकूण व्यवस्थापनाचा एक ढाचा ह्या शिबिराने घालून दिला.

 पाच धरणांचे पाणी मिळणारा नाशिक जिल्ह्यातील निफाड हा खुप सुपीक तालुका. पिंपळगाव बसवंत ही येथील एक प्रमुख बाजारपेठ. ऊस व कांदा ह्यांचे इथे उत्तम पीक येई. देशात जेव्हा कृषी संशोधन केंद्रे स्थापन करायला सरकारने सुरुवात केली, तेव्हा अगदी सुरुवातीच्या टप्प्यात इथे एक केंद्र स्थापन झाले होते. चाकण आंदोलनाचे पडसाद इथेही उमटले होतेच. फेब्रुवारी १९८०मध्ये कांद्याच्या भावाची घसरगुंडी सुरू झाली व ती थांबण्याचे काहीही चिन्ह दिसेना. त्यामुळे शेतकरी खूप चिडलेले होते. ज्या गाड्या व ट्रेलर्समधून शेतकऱ्यांनी विक्रीसाठी कांदा आणला होता, त्या त्यांनी रस्त्यावर वेड्यावाकड्या सोडून दिल्या व मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग रोखला. ही घटना १९ मार्च १९८०ची. त्यावेळी जोशींचे ह्या भागात आगमन झाले नव्हते; आंदोलनाचे नेतृत्व पिंपळगाव येथील माधवराव खंडेराव मोरे करत होते.

 महामार्ग मोकळा करण्यासाठी आंदोलकांशी कोणताही विचारविनिमय न करता शासनाने कडक कारवाई करायचे ठरवले. वायरलेसवरून एसआरपीच्या एका गटाला तातडीचा हुकूम गेला. हे जवान खरेतर दुसऱ्याच कुठल्यातरी मोहिमेवर चालले होते, पण त्यांना अचानक मुंबई-आग्रा महामार्गावर पाठवले गेले. त्यांनी शिरवाडे (कुसुमाग्रज ऊर्फ वि. वा. शिरवाडकर यांचे गाव) येथे रस्ता रोखून धरलेल्या शेतकऱ्यांवर जबरदस्त लाठीमार केला. एवढेच नव्हे तर दुपारी पावणेदोन वाजता गोळीबारदेखील केला. दोन शेतकरी ठार झाले. माधवराव मोरे यांच्यासह आठ आंदोलक जबर जखमी झाले. शेतकरी संघटनेने ह्या घटनेचा तीव्र निषेध केला व जोशी स्वतः तातडीने पिंपळगाव येथे परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गेले.

 ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर शरद जोशी यांचे निफाडमध्ये आगमन झाले. १५ एप्रिल १९८० रोजी निफाड सहकारी साखर कारखान्याच्या आवारात असलेल्या के. के. वाघ विद्याभवनात दुपारी दोन वाजता जोशी यांची सभा आयोजित करण्यात आली. ह्या सभेत जोशींनी दीड तास भाषण केले. नाशिक जिल्ह्यातील त्यांची ही पहिली सभा. एका अर्थाने शेतकरी संघटनेचे हे नाशिक जिल्ह्यातील बीजारोपण म्हणता येईल.

 त्यानंतर झालेल्या चर्चेत १५ ऑगस्ट रोजी निफाडला मोठी सभा घ्यायचे ठरले. त्यासाठी जोशी आणि मोरे यांची एकत्र भेट घडवन आणायचे निरगडेंनी ठरवले व १२ ऑगस्टला तशी भेट घडवूनही आणली. "माधवराव, ह्या मुलांनी उद्या तुमच्या तालुक्यात माझा दौरा आखला आहे. तुम्हीही आमच्याबरोबर यावं अशी माझी इच्छा आहे," भेटीत जोशी म्हणाले. मोरे यांचा प्रतिसाद उत्स्फूर्त होता. ते म्हणाले, “साहेब! तुम्ही आमच्या तालुक्यात येऊन आम्हालाच कार्यक्रमाला यायचं आमंत्रण देता? हे पाहा, उद्यापासून मी तुमच्या गाडीचा ड्रायव्हर. आपण हुकूम करायचा."

 यापूर्वी या दोघांनी एकमेकांविषयी ऐकले होते, वाचले होते, मात्र प्रत्यक्ष भेट प्रथमच होत होती. पण अवघ्या दहा मिनिटांच्या चर्चेतच दोघांची मने जुळली. कारखान्याचे व्हाइस चेअरमन प्रल्हाद कराड पाटील हेही लौकरच त्यांना येऊन मिळाले. यावेळच्या आंदोलनातच नव्हे तर त्यानंतरही शेतकरी संघटनेच्या वाटचालीत ही त्रिमूर्ती अनेक वर्षे अग्रस्थानी राहिली.

 चाकण आंदोलनात जोशी यांना शंकरराव वाघ, बाबूलाल परदेशी यांच्यासारखे जे जिवाभावाचे सहकारी लाभले, त्यांच्यापेक्षा हे दोन सहकारी अनेकदृष्ट्या वेगळे होते. दोघेही आपापल्या परीने समाजात नामांकित होते. दोघांचीही स्वतःची मोठी शेती होती. दोघांमध्येही स्वतःचे असे नेतृत्वगुण आंदोलनात येण्यापूर्वीही होते. दोघांनीही जोशी ह्यांचे प्रथम स्थान निर्विवादपणे मान्य केले होते यात शंका नाही, पण त्यांच्यापासूनही जोशी यांना काही ना काही शिकायला मिळत होते. उदाहरणार्थ, उसाची शेती बरीच फायदेशीर असते असे जोशींना वाटायचे, ते खूप चुकीचे होते हे या दोघांनी दाखवून दिले. ऊसशेतीतल्या अडचणी, खतांच्या आणि औषधांच्या भडकलेल्या किमती, कारखान्यांमधील भ्रष्टाचाराच्या नाना तहा, साखरनिर्मितीच्या प्रत्येक पावलावर असलेले सरकारचे व पर्यायाने राजकारण्यांचे जाचक नियंत्रण वगैरे अनेक गोष्टी या दोघांमुळे जोशींच्या लक्षात आल्या.

 असे असूनही ऊस शेतकरी रुबाबात कसे काय राहू शकतात, ह्याचे उत्तर देताना प्रल्हाद कराड पाटील प्रांजळपणे म्हणाले,
 "आमच्या ह्या बाह्य रूपावर जाऊ नका. हे सारं फसवं आहे. सगळे कर्जात डुबलेले आहेत. आम्हा शेतकऱ्याचं धोतर एका बँकेचं असतं, सदरा दुसऱ्या बँकेचा असतो, तर टोपी तिसऱ्या बँकेची असते!"
 हे त्यांचे उद्गार जोशींच्या स्मरणात कोरले गेले होते व पुढे अनेक ठिकाणी त्यांनी ते उद्धृत केले.
  पुढील काही दिवस ह्या त्रिमूर्तीने केवळ निफाड तालुका नव्हे तर संपूर्ण नाशिक जिल्हा पालथा घातला. धुळे आणि नगर जिल्ह्यांतही सभा घेतल्या. आंदोलनाचे लोण गावागावातून पोचवले. एकेका दिवसात आठ-आठ, दहा-दहा सभा होत. याच दरम्यान बागलाणचे एक शेतकरी रामचंद्रबापू पाटील त्यांना येऊन मिळाले. इतरही साथी मिळत गेले. मुख्य म्हणजे निफाड साखर कारखान्याचे चेअरमन माधवराव बोरास्ते हेदेखील त्यांच्या बाजूने उभे राहिले. खरे तर त्यांनी सुरुवातीला संघटनेला खूप विरोध केला होता, जोशींना निफाडमध्ये आणल्याबद्दल निरगुडेंना बराच दमदेखील भरला होता. पण पुढे मोरे यांनी त्यांचे मन वळवले; १५ एप्रिल रोजी जोशी यांच्याशी झालेल्या प्रत्यक्ष भेटीचाही बराच परिणाम झाला. जोशींनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी ऊस पिकवण्याचा व पुढे कारखान्यात त्याची साखर बनेस्तोवरचा सगळा खर्च काळजीपूर्वक काढला व जोशी यांची मागणी अगदी न्याय्य आहे ह्याविषयी त्यांची खात्री पटली. त्यांच्याच पाठबळाने भरलेली निफाडची १५ ऑगस्ट १९८०ची सभा महत्त्वाची ठरली.
  'शंभरखाली कांदा नाही, तीनशेखाली ऊस नाही' ह्या घोषणेने सभेची सांगता झाली. कांद्याला दुसऱ्या एका शेतीमालाची इथे प्रथमच जोड मिळाली.
 माधवराव बोरास्ते यांनीही जाहीररीत्या या मागणीला पूर्ण पाठिंबा दिला. ती मान्य होईस्तोवर निफाड तालुक्यातील शेतकरी येत्या गळीत हंगामात साखर कारखान्यात ऊस देणार नाहीत असेही त्यांनी जाहीर केले व लगोलग ९ ऑक्टोबर १९८० रोजी भरलेल्या आपल्या कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत ५,५०० भागधारक शेतकऱ्यांसमोर तसा ठराव मांडला, त्याच्या समर्थनार्थ स्वतः मोठे भाषण केले व तो ठराव एकमताने संमतही झाला.
 साखर कारखान्याने स्वतः असा ठराव करणे ही एक ऐतिहासिक घटना होती. बोरास्ते यांचा पुढाकार साखर कारखानदारांच्या वर्तळात मोठीच खळबळ माजवणारा होता. कारण महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे बोरास्ते अध्यक्ष होते. या धाडसाबद्दल बोरास्ते यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच होईल, कारण ते करताना त्यांनी केवळ आपली व्यक्तिगत प्रतिष्ठाच नव्हे, तर सहकारक्षेत्रातील सारे भविष्यच पणाला लावले होते. सहकारक्षेत्र हा महाराष्ट्रातील काँग्रेसनेत्यांचा बालेकिल्ला होता व त्या सर्व नेत्यांचा रोष आता बोरास्तेंनी ओढवून घेतला होता. याची मोठी किंमत त्यांना चुकवावी लागली; प्रचंड मानसिक तणावाला तोंड द्यावे लागले. पुढे त्यांचे अकालीच ओढवलेले मरण हा ऊस आंदोलकांना मिळालेला मोठाच धक्का होता. तीनशे रुपये भावाची मागणी न्याय्य आहे व तो भाव मिळालाच पाहिजे असे त्यांनी जाहीररीत्या मान्य केल्यावर तो भाव नाकारणे इतर कारखान्यांना आता अशक्य होऊन बसले.

 टनाला तीनशे रुपयांच्या मागणीमागची थोडी पार्श्वभूमी इथे लक्षात घ्यायला हवी. उसाला त्यावेळी सरासरी फक्त १४५ रुपये भाव कारखाने देत होते (आकडेवारी १९८० सालची) व त्यातून शेतकऱ्याचा किमान २९० रुपये हा उत्पादनखर्चही भरून निघणारा नव्हता. शिवाय शेतकऱ्याला इतका कमी भाव देऊनही ग्राहकाला मात्र ती साखर खुल्या बाजारात दहा रुपये किलो भावाने विकली जात होती. आता शेतकरी ३०० रुपये भाव मागत होते. पण तो भाव देऊनही ग्राहकाला सध्या इतक्याच भावाने साखर मिळणे सहज शक्य होते असे शेतकरी संघटनेचे म्हणणे होते. यासाठी संघटनेने आपले हिशेब जाहीरपणे मांडलेही होते.
 साखरेचा उत्पादनखर्च काढणे हे तसे किचकट काम आहे, कारण उसाचा दर्जा, कारखान्याची क्षमता वगैरे अनेक घटकांवर हा खर्च अवलंबून असतो. पण सामान्य वाचकाच्या दृष्टीने एक टन उसात साधारण १०० किलो साखर होते असे गृहीत धरता येईल. उसापासून साखर बनवायच्या प्रक्रियेचा खर्च टनामागे साधारण सव्वाशे रुपये धरता येईल. म्हणजेच एक टन उसामागे शेतकऱ्याला ३०० रुपये भाव दिल्यावरही १०० किलो साखरेचा उत्पादनखर्च ३०० + १२५ म्हणजे सुमारे ४२५ रुपये असाच येणार होता; म्हणजेच एका किलोला सव्वा चार रुपये. कारखान्याची कार्यक्षमता वाढवली व उसाचा दर्जा वाढवला तर हा खर्च अर्थातच याहूनही कमी करता आला असता, पण तो भाग नंतरचा. म्हणजेच ही साखर सध्याच्या परिस्थितीतही दहा रुपये किलो भावानेच ग्राहकाला विकणे, शेतकऱ्याला वाढीव भाव दिल्यावरही, सहज शक्य होते. शेतकऱ्याला कमी भाव देऊन साखर कारखाने किती अतिरिक्त नफा मिळवत होते व त्यामुळे साखर कारखान्यांकडून किती मोठ्या प्रमाणावर पैसा राजकारणासाठी उपलब्ध होत होता ह्याचा अंदाज आपण यावरून बांधू शकतो.
 एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणातील सहकारी साखर कारखानदारीचे स्थान समजून घेतले तर जोशींच्या या ऊस आंदोलनाचे नेमके महत्त्व लक्षात येते. महाराष्ट्रात प्रवरानगरचा वा माळीनगरचा कारखाना हे खूप पूर्वीच उत्तम प्रकारे उभे राहिले होते. धनंजयराव गाडगीळ व वैकुंठलाल मेहता यांनी सहकारी कारखानदारीला भक्कम तात्त्विक पाया घालून दिला होता. महाराष्ट्रातील सहकारी चळवळीची चर्चा देशभर होत होती. स्वतः पंडित नेहरूंसारख्यांनीही तिचे कौतुक केले होते. साहजिकच ग्रामीण भागात समृद्धी यावी म्हणून, आपल्या कार्यकर्त्यांना स्थानिक पातळीवर छोटी-मोठी सत्तास्थाने देता यावी व त्यातून आपली सत्ता अधिक बळकट व्हावी म्हणून आणि इतरही अनेक कारणांनी सहकारी कारखानदारीला महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर काँग्रेस सरकारने खूप प्राधान्य दिले. शेतकऱ्यांनी जेमतेम दहा टक्के भाग भांडवल उभे केल्यावर सरकार उरलेले ९० टक्के भांडवल पुरवत होते. दैनंदिन कामकाजासाठी पैसा उभा राहावा म्हणून सरकार बँकांना स्वतः हमी देत होते. एखादा कारखाना डबघाईला आला तर त्याला मदत करायलाही सरकार पुढे येत होते. साहजिकच जागोजागी सहकारी साखर कारखाने उभे राहू लागले. बघता बघता त्यांची संख्या दोनशेवर पोचली.
 हे कारखाने तत्त्वशः सहकारी मालकीचे असले तरी प्रत्यक्षात स्थानिक पुढाऱ्यांचीच सत्ता तिथे चालत होती. साखर कारखान्याच्या जोडीने दूधसंघ, सूत गिरण्या, सहकारी बँका, पतपेढ्या, कृषी उत्पन्न बाजार समित्या व पुढे पुढे शिक्षणसंस्थाही उभ्या राहिल्या. प्रत्येक सहकारी साखर कारखाना म्हणजे त्या परिसरातील सर्वांत मोठे सत्ताकेंद्रही बनले. कमिशन घेऊन मजूर पुरवायची वा वाहतुकीची कंत्राटे देणे, मालमत्ता खरेदी करणे वा विकणे, आपल्या मर्जीतल्या व्यक्तींना रोजगार देणे अशा अनेक मार्गांतून प्रचंड पैसा हाती येऊ लागला व सत्ताकेंद्राप्रमाणे हे कारखाने आर्थिक केंद्रेही बनली. ह्याच वर्गाकडे राज्याचे राजकीय नेतृत्वही होते. शासनाचा बराचसा विकासनिधीही ह्यांच्यामार्फतच वापरला जाई. ग्रामीण राजकारणावर, अर्थकारणावर आणि समाजकारणावर या सहकारी साखर कारखान्यांची इतकी पकड का होती व प्रत्येक राजकीय नेत्याला स्वतःच्या नियंत्रणाखाली एखादा साखर कारखानातरी असावा असे का वाटत होते, व आजही का वाटते, हे यावरून स्पष्ट होते.
 नेमक्या याच सत्ताकेंद्राला शेतकरी संघटनेने आव्हान दिले होते. तेही सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आंदोलनातूनच. जो शेतकरी वर्ग सत्ताधाऱ्यांचा पारंपरिक आधार होता, तो आता जोशींकडे वळ लागला होता. सत्ताधाऱ्यांनी इतकी वर्षे शेतकऱ्यांना कशा प्रकारे लटले हे शेतकरी संघटनेच्या सतत होणाऱ्या सभांमधून शेतकऱ्यांपुढे येत होते, अगदी त्यांना सहज समजेल अशा भाषेत येत होते. त्यांच्या असंतोषाचा आज जो स्फोट होत होता त्यामागे हीच आपल्यावर वर्षानुवर्षे होत गेलेल्या अन्यायाची काळीजभेदी जाणीव होती. म्हणूनच सत्ताधारी राजकारणी जोशींच्या इतक्या विरोधात होते.

 निफाडपाठोपाठ इतरही ठिकाणच्या शेतकऱ्यांनी तीनशेपेक्षा कमी भावात कारखान्यांना ऊस द्यायचा नाही असा निर्धार केला. ११ सप्टेंबर १९८० रोजी पिंपळगाव बसवंत येथे शेतकऱ्यांचा एक मोठा निर्धार मेळावा भरला होता. आजवरचा सर्वांत मोठा. पन्नास हजार शेतकरी ह्या मेळाव्याला हजर होते. शेतकऱ्यांचा हा भव्य प्रतिसाद खुद्द त्रिमूर्तीलाही थक्क करणारा होता. १० नोव्हेंबरपर्यंत जर शासनाने उसाला ३०० रुपये भाव मंजूर केला नाही, तर शेतकरी रास्ता रोको करतील व रेल रोकोदेखील करतील असे जाहीर करण्यात आले.

 मोरे यांनी आपल्या भाषणात एक महत्त्वाचा मुद्दा मांडला होता. 'या बामनाचं काय ऐकता! त्याला काय कळतं शेतीतलं?' अशी टीका जोशींवर खूपदा होत असे. जोशींच्या ब्राह्मण्याचा कुचेष्टेने उल्लेख केला जाई. त्यांचे ब्राह्मण्य अधोरेखित करून शेतकऱ्यांना त्यांच्यापासून तोडायचा हा डाव होता. त्याचा संदर्भ देत मोरे म्हणाले,
 "आम्हाला असं बनवायचे दिवस आता गेले! हे जोशी बामण आहेत आणि ह्या बामणाचं काय ऐकता, असलं काही आता आम्हाला शिकवू नका. हे असलं ऐकून घेण्याइतके आता शेतकरी मूर्ख राहिलेले नाहीत."
 शेतकऱ्यांच्या भावनांकडे पूर्ण दुर्लक्ष करत शासनाने '२३ ऑक्टोबरपासून सर्व साखर कारखान्यांनी उसाचे गळीत सुरू करावे' असा आदेश काढला. गळिताचा आरंभ हा सहकारी साखर कारखान्यांच्या दृष्टीने एक महत्त्वाचा सोहळा असतो. कोणातरी मंत्र्याच्या वा अन्य बड्या नेत्याच्या हस्ते बॉयलर पेटवून मोठ्या थाटामाटात तो पार पडतो. जनसंपर्काची ती मोठी संधी असते. पण ह्यावेळेला तो शासननियुक्त दिवस उलटून गेला तरीही बहुतेक कारखाने थंड होते. अर्थात ज्यांना राजकीय महत्त्वाकांक्षा असते ते अशा वेळी आपले महत्त्व श्रेष्ठींपुढे दाखवण्याचा प्रयत्न करतातच; पण सामान्य शेतकऱ्यांनी ह्या स्थानिक 'ताकदवान' मंडळींना अजिबात दाद दिली नाही.
 उदाहरणार्थ, नाशिक जिल्ह्यातील दाभाडी येथे असलेल्या गिरणा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने काहीही करून २३ ऑक्टोबरला कारखाना सरू करायचाच असे ठरवले होते. पण ते कळताच त्या भागातील दोनशे तरुणांनी प्रतिज्ञा केली, की शेतकऱ्यांचा विश्वासघात करून जर संचालकांनी कारखाना सुरू करायचा प्रयत्न केला, तर गव्हाणीत उसाच्या मोळीच्या आधी आम्ही उड्या घेऊ. ह्या प्रतिज्ञेने संचालक मंडळी घाबरून गेली आणि त्यांचा कारखाना सुरू करायचा बेत बारगळला. श्रीगोंदा येथे एक दुदैवी घटना घडली. २७ ऑक्टोबर रोजी संचालकांनी कारखाना सुरू करायचा प्रयत्न करताच तिथे आजूबाजूचे शेतकरी मोठ्या प्रमाणावर गोळा झाले व त्यांनी निदर्शने सुरू केली. संचालकांनी पोलीस बोलावले. पण निदर्शक पांगले नाहीत. शेवटी पोलिसांनी तिथे गोळीबार केला व त्यात नाना दगडू चौधरी हा शिरसगाव बोडके (तालुका श्रीगोंदा) येथील एक साठ वर्षांचा शेतकरी बळी पडला. ऊस आंदोलनातील नगर जिल्ह्यातला हा पहिला हुतात्मा.
 अब्दुल रेहमान अंतुले हे त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री होते. राज्यातील शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पुरोगामी लोकशाही दलाचे सरकार केंद्र सरकारने १७ फेब्रुवारी १९८० रोजी बरखास्त केले होते व त्यानंतर सुमारे चार महिने राज्यात राष्ट्रपती राजवट होती. ९ जून १९८० रोजी अंतुले मुख्यमंत्री बनले. त्यांनी आंदोलकांना जराही महत्त्व द्यायचे नाही अशी भूमिका घेतली. शासनाने आपली भूमिका अधिकच ताठर केली. ऊस शेतकऱ्यांना नमवण्यासाठी अनेक ठिकाणी उसाचे पाणी बंद केले गेले किंवा ते पुरवण्यासाठी आवश्यक असलेला वीजपुरवठा खंडित केला गेला.
 वर्ष-सव्वा वर्ष पोटच्या पोराप्रमाणे शेतावर जपलेला ऊस अगदी अखेरच्या क्षणी असा पाण्याविना वाळून जाताना पाहून शेतकऱ्याचा जीव तुटू लागला; पण त्याचवेळी तीनशेच्या खाली ऊस द्यायचा नाही हा निर्धार कायम होता. इतके दिवस बांधावर बसून असलेला शेतकरी शेवटी नाइलाजाने रस्त्यावर उतरला. जागोजागी मोर्चे निदर्शने सुरू झाली. सगळ्यांचे डोळे आता १० नोव्हेंबरकडे लागले होते. रेल रोको आणि रास्ता रोको त्या दिवशी सुरू होणार होते.  इथे प्रतिभावान पत्रकार व लेखक विजय परुळकर यांच्याविषयी लिहायला हवे. पाच वर्षे जर्मन टेलिव्हिजनबरोबर आणि दहा वर्षे संयुक्त राष्ट्रसंघाच्या युएनडीपी या संस्थेचे एशिया खंडासाठीचे प्रसारप्रमुख म्हणून व्हिएतनाम, कंबोडिया वगैरे ठिकाणी नोकरी केल्यानंतर, स्वेच्छेने ती सोडून परुळकर व त्यांच्या पत्नी सरोजा सप्टेंबर १९७७मध्ये भारतात परतले व पुण्यात प्रभात रोडवर स्थायिक झाले. अनेक स्वयंसेवी संस्थांच्या प्रचारार्थ यांनी आपले लेखणीचे व छायाचित्रणाचे कौशल्य वापरले. 'माणूस' साप्ताहिकाचे श्री. ग. ऊर्फ श्रीभाऊ माजगावकर यांच्या संपर्कात ते आले व 'माणूस'मधून लिहीत गेले. वेगवेगळ्या विकासयोजनांचा अभ्यास करत महाराष्ट्रभर भटकत असताना त्यांची सप्टेंबर १९८०मध्ये शरद जोशींशी गाठ पडली. जोशींचे कार्य आणि विचार यांनी ते अगदी भारावून गेले. हातातील सर्व व्यावसायिक कामे बाजूला सारून विजय व सरोजा परुळकर सप्टेंबर १९८० ते मे १९८१ असे सलग नऊ महिने जोशी यांच्याबरोबर फिरले. स्वतःच्या खर्चाने, त्या काळात त्यांनी जे पाहिले, ऐकले, अनुभवले त्यावर आधारित 'योद्धा शेतकरी' ही लेखमाला त्यांनी 'माणूस'मध्ये लिहिली. तिचा पहिला प्रदीर्घ भाग 'माणूस'च्या १९८० सालच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला. ही लेखमाला त्यांनी खूप ओघवत्या शैलीत लिहिली होती आणि तिला मोठा वाचकवर्ग लाभला. पुढे ती 'राजहंस प्रकाशन'तर्फे १० जून १९८१ रोजी पुस्तकरूपातही प्रसिद्ध झाली.
 जोशी अनेक भाषणांत 'शेतकरी संघटनेचा विचार पसरवण्याचे निम्मे काम योद्धा शेतकरीने केले आहे' असे सांगत असत. पुस्तकाची दुसरी आवृत्ती पुण्यातील न्यू सुप्रीम कॅलेंडर्सच्या नाना आठवले यांनी मुख्यतः शेतकरी संघटनेचे एक नेते पाशा पटेल ह्यांच्या आग्रहापोटी प्रकाशित केली. या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत परुळकरांनी लिहिलेली पहिली दोन वाक्ये अशी आहेत :

प्रस्तावना 'अर्पण' करण्याची पद्धत नाही, तरीपण मी हे दोन शब्द श्री. माधवराव खंडेराव मोरे ह्या बहाद्दर शेतकऱ्याला अर्पण करू इच्छितो. शेतकरी संघटनेच्या चळवळीतून 'पुढारी'पण मिळवलेल्या मंडळींना माधवराव खंडेराव मोरेंची जरी विस्मृती झाली असली, तरी त्यांनी संघटना उभी करण्यासाठी जे अथक परिश्रम घेतले आणि जो प्रचंड त्याग केला त्याचे मी आणि सरोजा साक्षीदार आहोत.

 शरद आणि लीला जोशी यांच्याप्रमाणेच विजय आणि सरोजा परुळकर यांनाही दोन मुली. दोन्ही कुटुंबे काही वर्षे परदेशात राहून नंतर पुण्यात स्थिरावलेली. साहजिकच त्यांच्यात बरीच कौटुंबिक जवळीक निर्माण झाली. पुढे काळाच्या ओघात व्यक्तिशः जोशी व परुळकर यांच्यात पूर्वीसारखा संपर्क राहिला नाही; काहीसा दुरावा निर्माण झाला असेही म्हणता येईल. लीलाताई ३१ ऑक्टोबर १९८२ रोजी गेल्या. परुळकर ३ जून २००० रोजी गेले. पण जोशी यांच्या मुली मात्र परदेशात स्थायिक झाल्यावरही परुळकर दांपत्याशी व नंतर सरोजा परुळकरांशी जवळचा संपर्क ठेवून होत्या. ह्या चरित्राच्या संदर्भात सरोजाताईंनी प्रस्तुत लेखकाला भरपूर वेळ दिला व दुर्मिळ अशी माहिती पुरवली, जी शरद जोशी यांना एक व्यक्ती म्हणून समजून घेताना उपयुक्त वाटली; पुस्तकासाठी अनेक छायाचित्रेही त्यांनी दिली.

 ज्याची सगळ्यांना प्रतीक्षा होती तो दिवस एकदाचा उजाडला. दहा नोव्हेंबरच्या सकाळीच हजारो शेतकऱ्यांच्या मोर्च्याने आंदोलनाला सुरुवात झाली. निफाड-नाशिक रस्त्यावरच्या आडगावजवळ मोर्चा येताच पोलिसांनी तो अडवला व जोशी, मोरे आणि बोरास्ते यांना अटक केली. प्रल्हाद पाटील त्यांच्या हाती लागले नाहीत, नियोजनपूर्वक भूमिगत राहून त्यांनी आंदोलनाचे यज्ञकुंड धगधगते ठेवले.
 प्रमुख नेते तुरुंगात गेल्यामुळे आंदोलन आपोआपच नि यकी बनेल व बारगळेल असा शासनाचा कयास होता. पण सर्वसामान्य शेतकरीदेखील आता इतका पेटून उठला होता, की त्याच्या अंतःप्रेरणेनेच तो रस्त्यावर उतरला. 'दामाशिवाय घाम नाही, तीनशेशिवाय ऊस नाही' अशा जोरदार घोषणा देत गावोगावी शेतकरी रस्त्यावर येत होते आणि स्वतःला अटक करवून घेत होते. पहिल्याच दिवशी पंचवीस हजार शेतकरी मुंबई-आग्रा रस्त्यावर उतरले. नाशिकच्या आडगावपासून ते मालेगावपुढील झोडगे गावापर्यंत आग्रा रोड बंद पडला. पिंपळगाव, मंगरूळफाटा, सौंदाणे वगैरे अनेक गावांमधील शेतकरी आपापल्या बैलगाड्यांसह अंथरूणपांघरूण व भाकऱ्या घेऊन महामार्गावर ठिय्या देऊन बसले व त्यांनी महामार्ग अडवून धरला. पुढल्या तीन-चार दिवसांतच त्यांची संख्या दीड-दोन लाखांवर पोचली. पुढले सलग १९ दिवस ही गर्दी कायम होती. सुमारे शंभर ते सव्वाशे किलोमीटरचा रस्ता आंदोलकांनी अडवून धरला होता.
 ही अगदी अकल्पित अशीच घटना होती. मुंबई-आग्रा महामार्ग १० ते १४ नोव्हेंबर असे सलग चार दिवस व पुढेही ठिकठिकाणी २९ नोव्हेंबरपर्यंत बंद राहिला. ह्या महामार्गाला इतकी विश्रांती तो बनला तेव्हापासून कधीच मिळाली नव्हती! आंदोलनाची तीव्रता सर्वांत जास्त बागलाण तालुक्यात होती. त्याच्याच जोडीने कोपरगाव, सिन्नर, नाशिक, निफाड, कळवण, चांदवड, मालेगाव व साक्री इथले आंदोलन विशेष तीव्र होते. आंदोलनात एकूण ३१,००० शेतकरी तुरुंगात गेले. इतक्या मोठ्या प्रमाणावर आजवर ह्या देशात कुठेच शेतकरी आंदोलन झाले नव्हते.
 हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी पोलिसांनी बळाचा अतिरेकी वापर केला. तो उघड करणारे एक दृश्य चितारताना 'योद्धा शेतकरी'मध्ये (पृष्ठ १३२-३) परुळकर लिहितात,

पहाटे सहा वाजता मी शरद जोशींच्याबरोबर पिंपळगाव बसवंतहून निघालो. सोनसमार्गे आम्ही मंगरूळफाट्याच्या दिशेने चाललो होतो. फाट्याच्या अर्धापाऊण किलोमीटर अलीकडेच एक भयानक दृश्य नजरेस पडलं. एसआरपींकडून काठ्यांनी झोडपले गेलेले, बुटांनी तुडवले गेलेले चार-पाच हजार शेतकरी गुरांप्रमाणे ओरडत रानोमाळ धावत सुटले होते. मी युद्धाचे अनेक प्रसंग पाहिले आहेत; पण असा अमानुष प्रकार कधीच पाहिलेला नाही. हा तर उघड उघड अत्याचार होता. युद्धामध्ये दोन्ही बाजूंच्या सैनिकांच्या हाती शस्त्र असतं. इथे तर सगळा एकतर्फी मामला होता. निःशस्त्र किसान विरुद्ध शस्त्रधारी पोलीस! मुकाट्याने मार खाणं आणि असह्य झालं को गुराढोरांप्रमाणे ओरडत जाव घेऊन सैरावैरा पळणं ह्यापलीकडे शेतकरी दुसरं काय करणार?

सोग्रसच्या बाजूनं आमची जीप येताना पाहून रानोमाळ धावणारे शेतकरी क्षणभर थांबले. जीपमधून शरद जोशी उतरताच, त्यांची निळी पँट आणि पांढरा बुशशर्ट हा ओळखीचा पोशाख नजरेस पडताच, क्षणार्धात सर्व शेतकऱ्यांच्यात नवचैतन्य पसरलं. ह्या एकतर्फी चालू असलेल्या निघृण हल्ल्याच्या समरप्रसंगी एकाएकी आपल्या सेनापतीला पाहून सारा किसान वेदना विसरून गर्जून उठला!

शरद जोशी जीपच्या बॉनेटवर चढून उभे राहिले. पाहता पाहता माळरानावर पाच हजार शेतकरी घोषणा देत जमले. शरद जोशींनी त्यांना शांत राहण्याची सूचना दिली. सारा समुदाय एकदम सावधान झाला आणि कानात प्राण ओतून आपल्या नेत्याचे शब्द ऐकू लागला. लाठ्याकाठ्यांनी बडवली गेलेली, काही क्षणांपूर्वीच गुराढोरांप्रमाणे ओरडणारी, नेत्याला पाहून भान हरपून घोषणा देणारी, पाच हजार माणसं क्षणार्धात शांत झालेली पाहन मी विस्मयचकित झालो. असं विलक्षण नाट्य मी ह्यापूर्वी कधीच पाहिलं नव्हतं किंवा अनुभवलं नव्हतं.

 आंदोलनाच्या काळात शरद जोशींची शेतकऱ्यांवर किती जबरदस्त पकड होती हेही ह्या प्रसंगावरून दिसते.

 आंदोलन चिरडण्यासाठी मारझोड करणे हा तसा पोलिसांचा नेहमीचाच मार्ग, पण ह्यावेळी पोलिसांनी एक वेगळाच मार्गही वापरला. आधी पोलिसांनी नाशिक जिल्ह्यात जिथे जिथे शक्य होते, तिथे तिथे लाठीमार करून सत्याग्रहींना हटवले व रस्त्याचा थोडा थोडा भाग मोकळा केला. त्यासाठी रस्त्यावर झोपलेल्या शेतकऱ्यांवरही त्यांनी जबरी लाठीमार केला. रस्ता बंद असल्यामुळे नाशिक जिल्ह्याच्या बाहेर महामार्गावर वेगवेगळ्या ठिकाणी हजाराहजारांनी गाड्या अडकून पडल्या होत्या. त्या गाड्या पोलिसांनी नाशिक जिल्ह्यात मोकळ्या केलेल्या महामार्गाच्या पट्ट्यांवर आणून उभ्या केल्या. पण पुढे मंगरूळफाट्यावर चाळीस हजार शेतकरी रस्त्यावर बसून होते. इतक्या मोठ्या जमावावर लाठीमार करणे पोलिसांना शक्य नव्हते. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात आणून उभ्या केलेल्या गाड्या तिथेच अडकून पडल्या; त्यांना पुढे जाता येईना.
 अशा प्रकारे अडकून पडलेल्या ट्रक्सच्या ड्रायव्हर्सना पोलिसांनी बाजूला नेऊन चिथवले की 'तुमच्या ह्या गाड्या समोर रस्ता अडवून बसलेल्या शेतकऱ्यांमुळे अडल्या आहेत. त्यांच्यामुळे तुमचं हे नुकसान होतंय.' चिडलेल्या काही ट्रकड्रायव्हर्सनी आजूबाजूच्या गावांत काही ठिकाणी आगी लावल्या. अनेकांनी बैलांच्या शेपट्या कापल्या, डोळे फोडले. गवताच्या गंज्यांना आग लावून त्यांना भाजण्याचे प्रकार घडले. ट्रकवरचे बहुतेक ड्रायव्हर्स हे पंजाबी शीख होते. अशा प्रकारांनी महाराष्ट्र व पंजाब ह्यांच्यात वैमनस्य निर्माण होईल, ह्याचीही तमा कोणी बाळगली नाही.  सुदैवाने एक अगदी अनपेक्षित असे घडले. जेव्हा हे संतापलेले ड्रायव्हर्स प्रत्यक्ष शेतकऱ्यांना भेटले व त्यांच्यात थोडेफार बोलणे झाले तेव्हा ह्या ड्रायव्हर्सना कळले, की हे आंदोलन नेमके कशासाठी आहे. त्यांच्यापैकी बहुतेक सगळे शेतकरी कुटुंबातीलच होते व अनेकांनी तर आपापल्या गावी ऊसही लावलेला होता. शेतीमालाला कमी भाव मिळत असल्याने शेतकरी किती हवालदिल झाले आहेत ह्याची त्यांना चांगलीच कल्पना होती. उसाला तीनशे रुपये भाव मागणे हे अगदी योग्यच आहे असे त्यांचेही मत होतेच. त्यामुळे ह्या रस्ता अडवणाऱ्या शेतकऱ्यांविषयी पंजाबी ट्रक ड्रायव्हर्सना शेवटी सहानुभूतीच वाटू लागली!  एक उंचेपुरे ट्रक ड्रायव्हर त्यातल्या त्यात सुशिक्षित व नेत्यांमध्ये गणना होईल असे दिसत होते. त्यांचे नाव सरदार जगजितसिंग. पंजाबातील किसान संघटनेचे ते पूर्वी सेक्रेटरीही होते. अन्य ड्रायव्हर्सना समजावण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. दहिवेल येथील शाळेच्या पटांगणात ट्रक ड्रायव्हर्स व शेतकरी यांची एक संयुक्त सभाही आयोजित केली गेली व त्या सभेत जोशींनी हिंदीतून भाषणही केले. ड्रायव्हर्सच्या वतीने जगजितसिंग यांनी समारोप केला. ते म्हणाले,  "खतं, बियाणं, डिझेल, औषधं यांच्या अफाट किमतींनी आम्हीही अगदी हैराण झालो आहोत. आम्हालाही शेतीत काहीच सुटत नाही. तुमचं दुखणं आणि आमचं दुखणं एकच आहे. तुम्ही पंजाबातदेखील या आणि उसाप्रमाणे गव्हाच्या किमतीसाठीदेखील असंच आंदोलन आपण एकत्र लढवू या."  पुढे शेतकरी संघटना पंजाबात गेलीदेखील, पण त्यापूर्वीच ह्या ड्रायव्हर्सनी शरद जोशींचे विचार आपापल्या मुलखात पोचवले होते. हा या आंदोलनाचा अगदी अनपेक्षित असा मोठा फायदा.

 रास्ता रोकोच्या जोडीनेच रेल रोकोही सुरू झाले होते. नाशिक ते मनमाड हा रेल्वे मार्ग सर्वांत आधी बंद पडला. नाशिक रोड स्टेशनवर नागपूर एक्स्प्रेस आठ तास अडकून पडली होती; इतरही अनेक गाड्या अशाच रखडल्या होत्या. अडकलेल्या प्रवाशांना शेतकऱ्यांनी भाजी-भाकरी व दूध आवर्जून पुरवले. खरेतर रेल्वे अधिकाऱ्यांना ह्या आंदोलनाची पूर्वकल्पना दिली होती, पण ते बेपर्वा राहिले. ज्या आंदोलनामागे एकही राजकीय नेता नाही, त्या आंदोलनाला इतका प्रतिसाद मिळेल असे मुळात कुठल्याच सरकारी अधिकाऱ्यांना वाटले नव्हते. पहिल्याच दिवशी एक दुर्दैवी घटना घडली. निफाड तालुक्यातील खेरवाडी येथील रेल्वे स्टेशनवर काही हजार शेतकरी रुळांवर बसून होते, शांतपणे भजने म्हणत होते. एसआरपी पोलिसांची एक मोठी पलटण तिथे आली व त्यांनी शेतकऱ्यांना हुसकावून लावायचा प्रयत्न केला. शेतकरी अर्थातच हलले नाहीत. ते हाताची घडी घालून बसले होते. 'कुठल्याही परिस्थितीत कायदा हाती घ्यायचा नाही. संयम सोडायचा नाही. हात उचलायचा नाही. आंदोलनात मुडदा पडला, तरी तो हाताची घडी घातलेल्या अवस्थेतच सापडला पाहिजे.' असा जोशींनी स्पष्ट आदेश दिला होता. रूळ अडवून बसलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी आधी लाठीमार केला, मग अश्रुधूर सोडला आणि तरीही शेतकरी तिथून हलेनात हे बघितल्यावर त्यांनी गोळीबार केला. त्यात खेरवाडी येथे राहणारे ३५ वर्षांचे बाबुराव पांडुरंग रत्ने आणि म्हाळसा कोरे येथे राहणारे १९ वर्षांचे भास्कर धोंडीराम जाधव हे दोन आंदोलक मारले गेले.

 पोलीस कस्टडीत बंद असलेल्या जोशींनी १३ नोव्हेंबरला ४८ तासांकरिता आंदोलन स्थगित केले. साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू करण्यासही संघटनेने परवानगी दिली. तरीही वातावरण अतिशय तंग होते. आंदोलनामुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यासाठी जे. एफ. ऊर्फ ज्युलिओ रिबेरो ह्या कर्तबगार अधिकाऱ्याची शासनाने खास नियुक्ती केली होती. बऱ्याच वर्षांनंतर हेच रिबेरो पंजाबमध्ये राज्यपालांचे खास सल्लागार म्हणून नियुक्त केले गेले व तेथील अतिरेकींचा बंदोबस्त करण्यात त्यांनी मोठे योगदान दिले. परिस्थिती निवळावी म्हणून जोशींची मदत घ्यायचा निर्णय त्यांनी घेतला. जोशींनीही पूर्ण सहकार्य दिले. महामार्गावर तुंबलेला ट्रॅफिक मोकळा करून देण्यासाठी त्यांनी पोलिसांबरोबर महामार्गावर एक फेरीही मारली. त्यावेळी तसे ते अटकेतच होते. पण पढे-मागे पोलिसांच्या गाड्या ठेवन त्यांना ही फेरी मारता यावी अशी व्यवस्था पोलिसांनी केली. ह्याला 'गुडविल मिशन' असे नाव पोलिसांनी दिले होते.
 आंदोलन असेच चिघळत राहिले तर खूप गंभीर प्रश्न उभा राहील ह्याची जोशींना पूर्ण कल्पना होती. खेरवाडी गोळीबार ही घटना त्यांनादेखील काळजीत टाकणारी होती. परिस्थिती हाताबाहेर गेली, तर अतिशय क्रूरपणे शासन हे आंदोलन चिरडून टाकू शकेल व त्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे प्राण जाऊ शकतात हे त्यांना ठाऊक होते. तुटेस्तोवर ताणण्यात फारसे काही हाती लागणार नव्हते. अनेक धंदेवाईक राजकारणी आंदोलन असेच चालू राहावे ह्या मताचे होते; पण जोशींना मात्र शेतकऱ्यांच्या भल्याची काळजी जास्त होती. स्वतःची प्रतिष्ठा जपण्यापेक्षा संघटना उभारणे, शेतकऱ्याला भावी लढ्यासाठी तयार ठेवणे त्यांना अधिक महत्त्वाचे वाटले.  पण आंदोलन स्थगित करूनही आणि अशाप्रकारे सहकार्य देऊनही शासनाची दडपशाही चालूच राहिली; उलट वाढत गेली.
 १६ नोव्हेंबरला कस्टडीची मुदत संपल्यामुळे जोशी, मोरे व बोरास्ते यांना नाशिक कोर्टात उभे केले गेले, पण तिथे पोलिसांच्या आग्रहामुळे त्यांची कस्टडी २४ नोव्हेंबरपर्यंत वाढवली गेली व त्यांना पुन्हा नाशिक कारागृहात पाठवले गेले.
 शांततामय शेतकरी आंदोलन जबरदस्तीने दडपण्याच्या सरकारी प्रयत्नांचा निषेध म्हणून त्याच दिवसापासून कारागृहात जोशींनी बेमुदत उपोषण सुरू केले व शेतकऱ्यांना आपले आंदोलन शांततेने पण नेटाने पुढे चालू ठेवण्याचा आदेश दिला. उपोषण करताना ते फक्त लिंबूपाणी पीत असत हेही नमूद करायला हवे. मागे चाकणच्या कांदा आंदोलनात जोशींनी तीन वेळा उपोषण केले होते व त्याचा परिणाम होऊन त्यांची एक किडनी खराब झाली होती. 'आणखी तीन वर्षे तरी तुम्ही अशा कुठल्या उपोषणाच्या फंदात पडू नका' असा स्पष्ट सल्ला डॉक्टरांनी दिला होता. पण त्याकडे दुर्लक्ष करून जोशींनी आपले हे नाशिकचे उपोषण सुरू केले होते. साहजिकच त्यांची तब्येत १७ नोव्हेंबरनंतर झपाट्याने खालावू लागली. पण जोशी मरणाला घाबरत नव्हते. 'बाहेर माझे सारे शेतकरी बांधव पोलिसी अत्याचार सहन करत आहेत, त्यांच्या दुःखात मलाही थोडेफार सहभागी व्हायला पाहिजे, हाच विचार त्यांच्या मनात होता. 'या उपोषणात माझे प्राण गेले. तर मरणोत्तर नेत्रदान करायची माझी इच्छा आहे' असेही त्यांनी बोलन दाखवले होते.
 २२ नोव्हेंबरला, उपोषणाच्या सातव्या दिवशी, त्यांचे वजन चार किलोंनी घटले, नाडीचे ठोके ६४वर आले, पण कठलेही औषध घ्यायला त्यांनी स्पष्ट नकार दिला: ठरल्याप्रमाणे ह्या वेळच्या कस्टडीची मुदत संपल्यामुळे २४ नोव्हेंबरला तिघा नेत्यांना पुन्हा कोर्टात हजर केले गेले. त्यावेळी पोलिसांच्या मागणीनुसार पुन्हा त्यांचा रिमांड एकदम २७ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आला. त्याचवेळी बाहेर राहून आंदोलनाला मार्गदर्शन करणारे प्रल्हाद कराड पाटील यांनाही मंगरूळपीर फाट्यावर अटक केली गेली होती व त्यांनाही नाशिक कोर्टात उभे केले गेले होते. त्यांनाही इतर नेत्यांप्रमाणे २७ डिसेंबरपर्यंतचा रिमांड दिला गेला.
 जोशी व मोरे यांची रवानगी ठाणे येथील तुरुंगात व बोरास्ते व कराड पाटील यांची रवानगी येरवडा येथील तुरुंगात करण्याचा आदेश दिला गेला. त्याचवेळी त्यांना नाशिकहून हलवण्यापूर्वी सक्तीने आहार दिला जावा, असाही आदेश न्यायालयाने काढला. तुरुंगाधिकाऱ्यांनी ताबडतोब त्यांना सलाइन लावायची आणि तिच्यातून ग्लुकोज द्यायची व्यवस्था केली. अशा परिस्थितीत उपोषण करण्यात अर्थ नाही, हे प्रामाणिकपणे मान्य करून जोशींनी उपोषण सोडायचा निर्णय घेतला आणि २४ नोव्हेंबर १९८० रोजी मुरलीधर ढिकले या वयोवृद्ध शेतकऱ्यांच्या हस्ते मोसंब्याचा रस घेतला. नऊ दिवस चाललेल्या ह्या उपोषणाची अशी सांगता झाली. त्यानंतर त्यांची ठाणे तरुंगात रवानगी झाली.

 राजकीय पुढाऱ्यांचा ह्या आंदोलनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा होता? त्यांच्या अस्तित्वालाच आव्हान देणारा हा विचार मूलतःच त्यांना पेलणारा नव्हता. सुरुवातीला कांदा आंदोलनाप्रमाणेच ऊस आंदोलनाकडेही त्यांनी दुर्लक्षच केले. कारण इतक्या मोठ्या प्रमाणावर शेतकरी जोशींच्या मागे उभे राहतील याची त्यांनी कधी कल्पनाच केली नव्हती. पण जेव्हा लाखोंच्या संख्येने शेतकरी ह्या माणसाच्या मागे उभे राहत आहेत हे त्यांच्या लक्षात आले, तेव्हा मात्र त्यांचे धाबे दणाणले. जोशी आपल्या प्रत्येक भाषणात राजकारण्यांनी शेतकऱ्यांना इतकी वर्षे कसे फसवले, स्वार्थासाठी शेतकऱ्यांचा कसा वापर केला व प्रत्यक्षात त्यांची लूटच कशी केली आणि मुख्य म्हणजे पक्ष कोणताही असो, सगळ्या पक्षांचे धोरण हेच असते असे सांगत असत.
 राष्ट्रीय नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष (अध्यक्ष हे पंतप्रधान स्वतःच होते) व्ही. टी. कृष्णमाचारी यांनी २८ एप्रिल १९५६ साली तयार केलेल्या एका मसुद्यात 'शेतीमालाचे उत्पादन ४० टक्क्यांनी वाढवावे व शेतीमालाची किंमत २० टक्क्यांनी कमी करावी' असे एक मार्गदर्शक तत्त्व नमूद केले आहे. चौथ्या पंचवार्षिक योजनेच्या मसुद्यातच 'सारा उत्पादनखर्च लक्षात घेऊन शेतीमालाचा भाव ठरवला जाऊ नये असे एक मार्गदर्शक तत्त्व असल्याचेही जोशी प्रत्येक सभेत सांगत. १९६५ साली पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी स्थापन केलेला कृषिमूल्य आयोग (Agriculture Prices Commission) शेतीमालाचे भाव ठरवतो; त्याच्या १९७१ सालच्या एका अहवालात नमूद केलेले पुढील धोरण जोशी नेहमी उदधृत करत -

शेतकऱ्यांना त्यांचा संपूर्ण उत्पादनखर्च भरून निघेल अशा किमती देणे अव्यवहार्य होईल. घरच्या माणसांनी केलेल्या कामाच्या मजुरीचा किमान वेतन दराप्रमाणे हिशेब केल्यास शेतीमालाच्या किमती अवास्तव वाढतील. त्यामुळे कारखान्यांना लागणारा कच्चा माल महाग होईल आणि त्याशिवाय कामगारांनाही त्यामुळे त्यांचा रोजगार वाढवून द्यावा लागेल.

 यातून शेतकऱ्याला त्याचा सर्व उत्पादनखर्च भरून निघेल असा भाव द्यायचा नाही हे सरकारचे धोरणच आहे, हा मुद्दा उघड होई. विशेष म्हणजे त्यांचे हे म्हणणे सरकारच्या कुठल्याही अधिकाऱ्याने तेव्हा किंवा त्यानंतरही कधी खोडून काढलेले नाही.
 जोशींना टाळणे आता सत्तारूढ व विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही अशक्य झाले. लोकदलचे जॉर्ज फर्नाडिस, जनता पार्टीचे हरिभाऊ महाले, अर्स काँग्रेसचे सूर्यभान गडाख, शेतकरी कामकरी पक्षाचे विठ्ठलराव हांडे ह्यांसारखे विरोधी पक्षांचे नेते आणि सत्तारूढ पक्षाचे तत्कालीन शिक्षणमंत्री बळीराम हिरे ह्यांसारखे नेते आपणहून जोशींशी संपर्क साधू लागले. जोशींचा प्रभाव असाच वाढू दिला तर लवकरच एक दिवस ते आपल्या डोक्यावर मिऱ्या वाटतील अशी भीती सर्वच राजकीय नेत्यांना वाटत होती; विशेषतः काँग्रेस नेत्यांना. म्हणूनच एकीकडे जोशींना फार महत्त्व द्यायला ते तयार नव्हते, पण त्याचबरोबर शेतकरी विलक्षण भक्तिभावाने जोशींच्या मागे आहेत हेही त्यांना उघड दिसत होते. त्यामुळे संघटनेबरोबर कसे धोरण ठेवावे हेच त्यांना कळेनासे झाले होते.
 उसासाठी टनाला तीनशे रुपये भाव मागणे हास्यास्पद आहे' असे कालपरवापर्यंत म्हणणाऱ्या आणि तसा भाव मागणाऱ्या जोशींची कुचेष्टा करणाऱ्या महसूलमंत्री शालिनीताई पाटील ह्यांच्यासारख्या नेत्या स्वत:च पुढे उसाला तीनशेचा भाव मिळालाच पाहिजे असे म्हणू लागल्या. नरेन्द्र तिडके, रामकृष्ण मोरे यांसारखे इंदिरा काँग्रेसचे नेते उघड उघड शेतकऱ्यांची बाजू घेऊ लागले. शंकरराव कोल्हे, यशवंतराव मोहिते यांसारखे स्वतः कारखान्यांशी संबंधित असलेले नेते तीनशेची मागणी अगदी योग्य आहे असेच म्हणत होते. मोहिते यांनी जाहीर सभेत सांगितले की “तीनशे रुपये भाव मागणाऱ्यांना तुरुंगात घालू असे कोणी म्हणत असेल, तर सर्वांत आधी मी तुरुंगात जायला तयार आहे. मी तर म्हणेन, की शेतकरी तीनशे रुपये मागतात हेच मुळात कमी आहे. उसाचा उत्पादनखर्च ४४८ रुपये आहे व शेतकऱ्यांनी तेवढा भाव मागायला हवा." इतरांपेक्षा ह्या प्रश्नाबाबतचे त्यांचे ज्ञान अधिक होते. इंदिरा काँग्रेसचे सरचिटणीस वसंतदादा पाटील तर इंदिरा काँग्रेसच्या २५ खासदारांसह केंद्रीय शेतीमंत्री राव बिरेंद्र सिंग यांना दिल्लीत जाऊन भेटले व त्यांनी संघटनेने केलेल्या मागण्याच स्वतःच्या म्हणून सादर केल्या. 'उसाला तीनशे रुपये भाव दिला तर सगळे साखर कारखाने मोडीत काढावे लागतील' असे अवघ्या दोन महिन्यांपूर्वी म्हणणारे व त्यावेळी विरोधी पक्षात असलेले शरद पवार नोव्हेंबरमध्ये संघटनेला मिळणारा पाठिंबा बघून 'उसाला तीनशेच काय, साडेतीनशे रुपये भाव मिळायला हवा' असे म्हणू लागले व त्यासाठी त्यांनी नागपूरला शेतकऱ्यांची एक दिंडीही काढली.
 अगदी अल्प काळात झालेल्या ह्या मतपरिवर्तनामागचे कारण उघड होते. प्रत्येकाला आपापला मतदारसंघ जपायचा होता व त्यासाठी शेतकऱ्यांची ही एकमुखी मागणी उचलून धरणे त्यांना भाग होते. शिवाय, एवीतेवी शेतकऱ्यांची ही मागणी सरकारला मंजूर करावीच लागणार आहे, तेव्हा आपल्या प्रयत्नामुळेच हा भाव मंजूर झाला असे सगळ्यांना दाखवायचे, त्याचे श्रेय स्वतःच लाटायचे हा विचारही त्यामागे होता. अर्थात जोशींना आता शेतकऱ्यांच्या हृदयात असे काही स्थान प्राप्त झाले होते, की तिथून त्यांना हटवणे आता केवळ अशक्य होते.
 राजकीय मंचावर घडणाऱ्या अशा सगळ्या हालचालींचा परिणाम सरकारवर होणे स्वाभाविक होते. शेतकऱ्यांच्या मागण्या न्याय्य आहेत असे बहतेक नेत्यांचे म्हणणे होते व ते मुख्यमंत्रांच्या कानावर सारखे जातच होते. दिल्लीहूनही सतत हा लढा लवकर मिटवावा असा दबाव येत होता. कारण इतर राज्यांमधील शेतकरीही ह्या आंदोलनाकडे डोळे लावून बसले होते. अंतुले हे केंद्र सरकारच्या मर्जीतले मुख्यमंत्री होते. केंद्राकडून येणारा दबाव त्यांनाही अस्वस्थ करत होता. 'कुठल्याही परिस्थितीत आम्ही संघटनेच्या मागण्या मान्य करणार नाही, त्यांचे हे आंदोलन कठोर पावले उचलून आम्ही मोडून काढू' असे पुन्हा पुन्हा म्हणणाऱ्या अंतुलेंना शेवटी ह्या मागण्या मान्य कराव्याच लागल्या. २६ नोव्हेंबर रोजी अंतुले यांनी कुलाबा जिल्ह्याचे 'रायगड' असे नामांतर केले व त्यानंतर दोनच दिवसांनी, म्हणजे २८ नोव्हेंबर रोजी, ते शिवाजी महाराजांची भवानी तलवार परत मिळवून आणण्यासाठी लंडनला रवाना झाले. पण मधल्या एका दिवसात, २७ नोव्हेंबर रोजी, वेळात वेळ काढून त्यांनी उसाला प्रती टन ३०० रुपये आणि कांद्याला प्रती क्विटल ५५ ते ७० रुपये भाव देण्याचे घोषित केले. सर्व नेत्यांची व शेतकऱ्यांची तुरुंगातून सुटका करायचेही आदेश दिले. त्यानुसार २८ डिसेंबरपर्यंत तुरुंगात राहायची तयारी केलेल्या जोशींचीही २८ नोव्हेंबरला मुक्तता झाली. अर्थात त्यांच्यावरील व इतर सर्वांवरील खटले मात्र पुढे प्रदीर्घ काळ चालूच राहिले.
 हे न्याय्य भाव आधीच दिले असते तर शेतकऱ्यांना ना तुरुंगात जावे लागले असते. ना लाठ्या-गोळ्या झेलाव्या लागल्या असत्या. मग अंतुलेंनी हा निर्णय पूर्वीच का नाही घेतला? खरे तर ह्याचे कारण एकच होते – शेतकरी आंदोलनापुढे आपण झुकलो असे चित्र त्यांना निर्माण होऊ द्यायचे नव्हते. हा केवळ त्यांचा अहंकार होता. शिवाय शेतकऱ्यांचे एकमेव नेते म्हणून जोशींनी समाजात उभे राहावे हे त्यांना किंवा अन्य कुठल्याच राजकीय नेत्याला कधीच परवडणारे नव्हते!

 नाशिकचे प्रसिद्ध वकील अॅडव्होकेट दौलतराव घुमरे ह्यांच्याविषयी इथे आवर्जून लिहायला हवे. एकेकाळचे हे साम्यवादी. अडीच वर्षे तुरुंगवास भोगलेले. इगतपुरी भागात भात पिकवणाऱ्या गोरगरीब शेतकऱ्यांची संघटना उभारण्यात त्यांचा मोठा सहभाग होता. कॉम्रेड गोदावरी आणि कॉम्रेड श्यामराव परुळेकर ह्यांच्याबरोबर आदिवासींसाठी त्यांनी लढा दिला होता. पुढे त्यांनी मराठा विद्या प्रसारक संघात अनेक वर्षे काम केले. अशी पार्श्वभूमी असलेली व्यक्ती शेतकरी आंदोलनाकडे आकर्षित झाली नसती तरच नवल.
 अर्थात जोशींना त्यांच्या पार्श्वभूमीची काहीच पूर्वकल्पना नव्हती; दोघांचा संबंध आला तो केवळ एक वकील आणि एक अशील म्हणून, नाशिक कोर्टात जोशींना त्यांच्या सहकाऱ्यांसह हजर केले गेले तेव्हा. पुढे त्यांची चांगली मैत्री झाली. स्वतंत्र भारत पक्षाचे उमेदवार म्हणून त्यांनी १९९६ साली नाशिक मतदारसंघातून लोकसभेची निवडणूकही लढवली. आपल्या Lawyer ह्या इंग्रजी आत्मचरित्रात त्यांनी जोशी ह्यांच्याविषयी व संघटनेविषयी बरेच लिहिले आहे. त्या आत्मचरित्राला शरद जोशी यांची प्रस्तावना आहे व त्याचे प्रकाशन ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी ह्यांच्या हस्ते झाले होते. आत्मचरित्राचा मराठी अनुवादही मे २००६ मध्ये प्रसिद्ध झाला आहे.
 १० नोव्हेंबर रोजी जोशी यांना अटक झाल्यानंतर ती रात्र त्यांनी पोलीस कोठडीतच काढली होती. त्यानंतर ११ तारखेला त्यांना नाशिक कोर्टात हजर केले गेले. आदल्या दिवशी नाशिक जिल्ह्यातल्या सुमारे ३१,००० शेतकऱ्यांना अटक झाली होती. त्याशिवाय, रोज नवे नवे शेतकरी पकडून कोर्टात हजर केले जात होते. ह्या सर्वांची बाजू कोर्टापुढे मांडणे हे एक अशक्यप्राय काम समोर उभे ठाकले होते. अटक झालेल्या काही पुढाऱ्यांकडे थोडेफार पैसे होते, पण शेतकरी संघटनेकडे काहीच पैसे नव्हते; स्वतः जोशींकडे जेमतेम शंभर रुपये होते. फाटक्या तुटक्या कपड्यात असलेल्या बहुसंख्य शेतकऱ्यांकडे पाच-दहा रुपयेदेखील नव्हते. नुसत्या कोर्ट फीची रक्कमच प्रचंड होत होती. अशा प्रसंगी घुमरे यांनी सगळी जबाबदारी स्वतःच्या अंगावर घेतली. ते अतिशय उत्साहाने कामाला लागले. त्यांच्याच प्रयत्नांमुळे कुठल्याही वकिलाने ह्या केसेस लढवायचा एक पैसाही घेतला नाही. उलट, कोर्ट फीदेखील त्यांनीच भरली व इतर सर्व खर्चही स्वतःच केला. आपल्या उपरोक्त आत्मचरित्रात अॅड. घुमरेंनी याविषयी विस्ताराने लिहिले आहे (पृष्ठ १४६-७) :

आम्ही नाशिकच्या बार असोसिएशनची बैठक घेऊन शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्याचा व न्यायालयीन कामात शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करायचा ठराव एकमताने मंजूर केला. मला सांगायला अभिमान वाटतो, की सर्व वकिलांनी शेतकऱ्यांच्या साहाय्यासाठी सक्रिय भाग घेतला. न्यायालयीन कर्मचारीवर्गानेही सर्व मदत केली. न्यायाधीश मंडळींनीसुद्धा पूर्ण सहकार्य देऊ केले. सहीसुद्धा करू न शकणाऱ्या असंख्य शेतकऱ्यांनी वकीलपत्रावर स्वतःचा अंगठा उमटवला. अटक झालेल्या शेतकऱ्यांच्या संख्येमुळे न्यायालयातील जागा अपुरी पडू लागली, म्हणून मी माझ्या वकीलमित्रांना सल्ला दिला, की त्यांनी न्यायाधीशांना तुरुंगात नेऊन तिथेच न्यायालयाचे कामकाज करावे. बऱ्याच न्यायाधीशांनी तसे केले. मी स्वतः नाशिक रोड मध्यवर्ती तुरुंगात जाऊन काही प्रकरणे हाताळली. जाधव नासिक रोडचे पोलीस अभियोक्ते होते. त्यांनी कर्तव्याचा भाग म्हणून शेतकऱ्यांविरुद्ध कामकाज पाहिले. त्यांची पत्नी खेडेगावातून आलेली असल्याने, तिने जामिनावर सुटका झालेल्या शेतकऱ्यांना भोजन देण्याच्या कार्यात सहभाग घेतला. तिचा कामातला उत्साह पाहून मीही आश्चर्यचकित झालो. एरव्ही त्या महिलेला घराबाहेर पडलेले कोणी पाहिले नव्हते. एका अर्थाने खेडेगावातील महिलांमध्ये एक प्रकारचे स्थित्यंतर घडून आले होते.

 अॅड. घुमरे यांनी व एकूणच नाशिकमधील वकिलांनी जे सहकार्य शेतकरी आंदोलकांना दिले, ते भारतातील सामाजिक चळवळीच्या इतिहासात खूप उल्लेखनीय मानले जाईल.

 १४ डिसेंबर १९८० रोजी आंदोलन यशस्वी झाल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी पिंपळगाव बसवंत येथे शेतकऱ्यांचा प्रचंड मेळावा झाला. एक लाखाहून अधिक शेतकरी मेळाव्याला हजर होते.
 पहिले वक्ते होते माधवराव मोरे. ते म्हणाले,
 “जी किंमत मोजून तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथे जमलात, त्याला हिशेब नाही. पण एवढ्यानं भागणार नाही हे ध्यानात ठेवा. आपल्या रामायणातील राम आत्ता कुठं नुसता अयोध्येच्या बाहेर पडला आहे. त्याचा वनवास इथून पुढं सुरू व्हायचा आहे. म्हणून सांगतो, हुरळून जाऊ नका, सावध राहा!"
 नंतर प्रल्हाद कराड पाटील म्हणाले.
 "स्वातंत्र्यानंतर आज प्रथमच शेतकऱ्यांना पक्षविरहित आणि सत्तेची अभिलाषा न बाळगणारं, संपूर्णपणे प्रामाणिक आणि निःस्वार्थी असं नेतृत्व शरद जोशींच्या रूपानं मिळालं आहे. सारा शेतकरी समाज आज त्याच्यामागे उभा आहे, ह्याचं राजकारण्यांना फार मोठं दुःख होऊन राहिलंय! आपलं आंदोलन सुरू झालं तेव्हापासून हे राजकारणी आपली कुचेष्टा करत आहेत. आपण त्यांच्या बडबडीकडे लक्ष देत नाही, ह्याचादेखील त्यांना राग येतो! आपले चालू मुख्यमंत्री विचारतात – हा शरद जोशी कोण? आम्ही त्याच्याशी काय म्हणून बोलणी करायची? ह्या सरकारला आम्ही सांगू इच्छितो, की शरद जोशी आम्हा शेतकऱ्यांचा नेता आहे आणि त्याच्याशीच तुम्हाला बोलणी करावी लागतील!... आणि शेवटी माझं भाषण संपवण्याअगोदर मी अत्यंत आनंदानं एक सांगू इच्छितो. ह्या सभेच्या एकच तास अगोदर सरकारची मुंबईहून तार आली आहे – शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी ह्यांच्याशी बोलणी करायला मंत्रिमंडळ तयार आहे!"
 ह्यानंतर 'शरद जोशी झिंदाबाद'च्या घोषणांनी पिंपळगाव बसवंतचं ते मैदान थरारून उठले. टाळ्यांचा प्रचंड गजर सुरू झाला. त्या जयघोषातच जोशी उठले. माइकपाशी गेले. नेहमीप्रमाणे हात जोडून त्यांनी सगळ्यांना नमस्कार केला. क्षणार्धात सभेत गंभीर शांतता पसरली आणि तितक्याच गंभीर आणि शांत आवाजात जोशी बोलू लागले :
 "माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो! शेतकऱ्यांचा हा जो प्रचंड मेळावा भरला आहे, त्या मेळाव्यानं सर्व टीकाकारांना उत्तर दिलं आहे. जे टीकाकार म्हणत होते, की आंदोलन एकदा बंद केलं, की पुन्हा चालू करता येत नाही, त्यांना तुम्ही सर्वांनी आपोआपच उत्तर दिलं आहे."
 आंदोलन ऐन भरात असताना जोशींनी ते ४८ तासांकरिता स्थगित केले, ह्याबद्दल अनेकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. वेळोवेळी जोशींनी त्यांना समर्पक उत्तरही दिले होते - आमच्या आंदोलनाची गाडी अशी नाही, की जी धक्का दिल्याशिवाय सुरूच होत नाही आणि एकदा सुरू झाली की थांबवताच येत नाही! किल्ली फिरवली, की आमचे इंजिन सुरू होते व गाडी पळू लागते, पुन्हा किल्ली फिरवली, की आम्ही इंजिन थांबवूही शकतो व गाडीही थांबवता येते! पण ह्या सभेत त्यांनी ह्या आंदोलनस्थगितीचे आणखीही एक व्यावहारिक स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले,
 "शेतकरी ज्याची आतुरतेने वाट पाहत होते. तो पाऊस १२ नोव्हेंबरच्या सुमारास झाला. पेरणीसाठी शेतकऱ्यांना त्यावेळी आंदोलनातून मोकळं करणं जरुरीचं होतं ह्याची जाणीव किती राजकीय पुढाऱ्यांना होती? एक डिसेंबरपर्यंत गव्हाची पेरणी झाली नाही, तर नाशिक आणि इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची काय स्थिती होते. ह्याची जाणीव किती राजकीय पुढाऱ्यांना आहे? म्हणूनच ही मंडळी जेव्हा तापलेलं आंदोलन आम्ही स्थगित केलं, म्हणून आमच्यावर वेडीवाकडी टीका करतात, तेव्हा त्यांना काय उत्तर द्यावं हेच आम्हाला कळत नाही.

 "हे आंदोलन आता केवळ नाशिक किंवा अहमदनगर-धुळे जिल्ह्यांपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. आजच्या ह्या मेळाव्याला महाराष्ट्रातील बहुतेक सर्व जिल्ह्यांमधील शेतकरी प्रतिनिधी हजर आहेत. नाशिक जिल्ह्यात सत्याग्रह करणाऱ्या शेतकऱ्यांना आता इतर जिल्ह्यांतील तुरुंगांत पाठवणं सरकारला शक्य होणार नाही. कारण प्रत्येक जिल्ह्यातील तुरुंग त्या त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीच भरलेले असतील!"

 जोशींच्या ह्या विधानाचे सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट करून स्वागत केले.
 नाशिक, धुळे, पुणे व नगर ह्या जिल्ह्यांव्यतिरिक्त इतर जिल्ह्यांमधील शेतकरीही ह्या मेळाव्यात आपणहून सहभागी झाले होते. विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा तसेच पार कर्नाटकाहूनही शेतकरी आवर्जून आले होते. आंदोलनाची माहिती किती झपाट्याने पसरत होती ह्याचे हे द्योतक होते.

 आंदोलनाबाबतचा जोशींचा एक अनुभव इथे नमूद करायला हवा.
 या ऊस आंदोलनाला मिळालेला एकूण प्रतिसाद कोणाच्याही अपेक्षेपेक्षा खूपच अधिक होता यात शंकाच नाही; परंतु प्रत्यक्ष तो दिवस उजाडेपर्यंत जोशी यांनाही प्रतिसादाविषयी मनातन शंका होती. बऱ्याचनंतर, म्हणजे १० डिसेंबर २००५ रोजी. परभणी येथे भरलेल्या शेतकरी संघटनेच्या रौप्यमहोत्सव मेळाव्यातील भाषणात आपल्या त्या वेळच्या मनःस्थितीचे वर्णन जोशींनी केले आहे. ते म्हणाले होते,

१० नोव्हेंबर १९८०ला नाशिकचं उसाचं आंदोलन बांधावरून रस्त्यावर आणि रेल्वे रुळांवर आणायचं ठरलं. त्याआधी जवळजवळ पंधरा दिवस संपूर्ण नाशिक जिल्हा आम्ही पिंजून काढला होता. पण तरीही, ९ नोव्हेंबरला दुसऱ्या दिवसापासूनच्या रेल रोको'ची घोषणा केल्या केल्या मनात धाकधूक सुरू झाली. आपण इतकं सर्वस्व पणाला लावून हा जुगार खेळलो आहोत; पण ही माणसं आपलं ऐकतील की नाही कुणास ठाऊक. माझ्या पोटात मोठा गोळा आला, की घरातल्या सगळ्या लोकांना - बायकोला, मुलींना - दुखवून मी घराबाहेर पडलो आहे; अशा परिस्थितीत उद्या शेतकऱ्यांनी खरंच साथ दिली नाही, तर आयुष्याला काय अर्थ राहणार आहे? रेल्वेच्या गाड्या थांबवण्याकरिता जर शेतकरी आले नाहीत, तर त्याच गाडीच्या पुढे पडून मला आयुष्य संपवावं लागेल. या विचाराने झोप येईना. शेवटी रात्री तीन वाजता एक फोन आला. आमच्या एका मोठ्या सहकाऱ्यांचा फोन होता. ते म्हणाले, 'आम्ही पंचवीस बैलगाड्या घेऊन रेल्वे रुळांच्या बाजूला येऊन थांबलेलो आहोत; आत्ताच बसायची परवानगी दिलीत तर आम्ही आताही रुळांवर बसायला तयार आहोत.' हा फोन आला आणि मी निश्चित झोपी गेलो.
(माझ्या शेतकरी भावांनो, मायबहिणींनो..., पृष्ठ २१४)

 ऊस आंदोलनाची तीव्रता बागलाण परिसरात सर्वाधिक होती व त्यामुळे रामचंद्रबापू पाटील यांचा उल्लेख इथे करायला हवा. या तालुक्यातील मुळाणे हे बापूंचे गाव. तेथून पाच किलोमीटरवर सटाणा. तसे बापू दिसायला सौम्य, समंजस; घरचे खाऊन-पिऊन सुखी. पण लढण्याचा क्षण आला की तेवढेच खंबीर. बापू नावाचे वादळ हे त्यांच्यावरती शरद जोशीनी लिहिलेल्या लेखाचे शीर्षक होते. लहानपणापासूनच सामाजिक कार्याची आवड. लौकरच ते काँग्रेसवासी झाले; पण सक्रिय राजकारणापासून दूरच राहिले. १९७२ सालीच त्यांनी बागलाण तालुका शेतकरी संघटना स्थापन केली होती. सटाणा, कळवण, मालेगाव, साक्री, टेहेरे हे यांचे कार्यक्षेत्र आणि हाच पुढे ऊस आंदोलनाचा बालेकिल्ला ठरला. इथे त्यांच्यात आणि अंबाजोगाईजवळच्या मोरेवाडीचे श्रीरंगनाना मोरे यांच्यात बरेच साम्य आढळते. दोघेही शरद जोशीच्या पूर्वीपासूनच शेतकऱ्यांसाठी स्वतंत्ररीत्या काम करत होते आणि दोघांनाही पुढे अत्यंत निरलस भावनेने आपापले काम शरद जोशी यांनी सुरू केलेल्या शेतकरी संघटनेच्या कामात विसर्जित केले. हा त्याग फार मोठा होता. ६ नोव्हेंबर १९८० रोजी बापूंची जोशींबरोबर प्रथम भेट झाली आणि त्या दिवसापासून त्यांनी स्वतःला ह्या कामासाठी वाहूनच घेतले. सटाणा येथे भरलेल्या शेतकरी संघटनेच्या पहिल्या अधिवेशनाचे ते स्वागताध्यक्ष होते, तर १९८४ सालच्या परभणी येथील दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते.

 अनेकदृष्ट्या उसाचे हे आंदोलन खूप महत्त्वाचे ठरले.
 मुंबई-आग्रा हा देशातील एक प्रमुख महामार्ग आहे व तो निदान चार दिवस पूर्ण बंद पडल्यामळे साहजिकच ह्या आंदोलनाची बातमी वाऱ्यासारखी देशभर पसरली. महाराष्ट्र विधानसभेप्रमाणे लोकसभेतही ऊस आंदोलनावर चर्चा झाली.
 या आंदोलनाची सर्वच राजकीय पक्षांना दखल घ्यावी लागली. शेतकरी आंदोलनामुळे नाशिकमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीचा अभ्यास करून अहवाल सादर करण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने आपल्या पॉलिट ब्युरोचे एक सदस्य कॉग्रेड झेड. ए. अहमद यांना पाठवले होते. घुमरे यांनी त्यांची व शरद जोशींची भेटही घालून दिली होती. अर्थात अहमद यांनी शेवटी पक्षाकडे काय अहवाल पाठवला हे मात्र ज्ञात नाही.
शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर करण्यासाठी जॉर्ज फर्नाडिस नाशिकला आले होते. काही समाजवादी तरुणांना बरोबर घेऊन त्यांनी कलेक्टर कचेरीवर मोर्चा काढला होता. तिथे त्यांना अटक होऊन त्यांच्यावर खटलाही भरला गेला होता. त्यावेळी जामीन नाकारून त्यांनी कोठडीत जाणे पसंत केले होते. पण त्यांना ह्या खेपेला जनतेकडून फारसा पाठिंबा मिळाला नाही. आपल्या आंदोलनाचा स्वतःची राजकीय प्रतिमा अधिक उजळ करण्यासाठी ते वापर करून घेत आहेत ह्या भावनेने आणि राजकीय नेत्यांपासून आपण दूरच राहायचे ह्या आपल्या धोरणामुळे शेतकरी संघटनेनेदेखील त्यांची फारशी दखल घेतली नाही.
 विशेष म्हणजे जगातील अनेक देशांत ह्या आंदोलनाची बातमी पोचली. कारण अशा प्रकारचे व ह्या प्रमाणावरचे एखादे अर्थवादी शेतकरी आंदोलन भारतात प्रथमच होत होते. अॅड. दौलतराव घुमरे यांनी आपल्या उपरोक्त आत्मचरित्रात (पृष्ठ १५१) लिहिले आहे,
 "नाशिकचे कॉम्रेड एल. एम. पाटील त्यावेळी रशियात होते. मॉस्कोत ही बातमी धडकल्यावर तिथल्या पुढाऱ्यांत त्याविषयी चर्चा झाल्याचे त्यांनी मला नंतर सांगितले."
 चाकणच्या कांदा आंदोलनापेक्षा हे ऊस आंदोलन अधिक व्यापक होते. कांदा आंदोलनात तुरुंगात गेलेल्यांची संख्या तीनशे-साडेतीनशे होती, ऊस आंदोलनात तुरुंगात गेलेल्यांची संख्या ३१,०००हन अधिक, म्हणजे कांदा आंदोलनापेक्षा सुमारे शंभरपट अधिक होती. ही आकडेवारी तशी बोलकी आहे.
 महाराष्ट्राचे तर सारे राजकारण त्यावेळी तरी साखरेभोवती व म्हणून उसाभोवती फिरत होते. देशभरातील उसाचे प्रभावक्षेत्रही खूप मोठे होते.
 उसातील आर्थिक उलाढाल कांद्यातील आर्थिक उलाढालीपेक्षा कित्येक पट अधिक होती.
 ह्या आंदोलनाचे पडसाद पंजाबपर्यंत कसे पोचले ते लिहिलेच आहे.
 ह्या आंदोलनातून नव्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची एक मोठी फौजच तयार झाली.
 आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, सर्वसामान्य शेतकरी ह्या आंदोलनानंतर खूपच अधिक धीट झाला. आपण पोलिसांच्या लाठ्या खाऊ शकतो, तुरुंगात जाऊ शकतो आणि अंतिमतः आपल्या मागण्या मान्य करून घेऊ शकतो, हा आत्मविश्वास त्याच्या मनात आता जागा झाला. 'घाला आम्हाला तुरुंगात. तुमचे सगळे तुरुंगही त्यासाठी अपुरे पडतील. आमच्यानंतर आमची बायका-मुलेही तुरुंगात जायला तयार आहेत. एवढे करून नाही भागले, तर आमची शेतीची गुरेढोरेही आम्ही सत्याग्रहासाठी रस्त्यावर आणू' अशी भावना शेतकऱ्यांच्या बोलण्यात व्यक्त होत होती, त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. 'दम है कितना दामन में तेरे, देख लिया है, देखेंगे' असेच जणू आता तो शेतकरी सरकारच्या डोळ्याला डोळा भिडवून म्हणत होता.
 अर्थात, ऊस आंदोलन हे काही सर्वस्व नव्हे, आपला खरा लढा खूप लांबच्या पल्ल्याचा आहे, ही केवळ सुरुवात आहे, ह्याची शरद जोशींना एव्हाना स्पष्ट कल्पना आली होती.

धुमसता तंबाखू


 तंबाखू हे कुठल्याही अर्थाने जीवनावश्यक पीक नाही; चैन म्हणून केवळ त्याचा वापर होतो. एकदा तंबाखूची चटक लागली. की ती सुटणे अवघड: निकोटिनचे सगळे दुष्परिणाम ठाऊक असूनही. दरवर्षी सरकार सिगरेटवर अधिकाधिक कर लादत असते आणि तरीही सिगरेटचा खप काही कमी होत नाही. सिगरेट हे मजेचे, ऐष करण्याचे, तसेच मर्दानगीचे एक प्रतीक म्हणून जगभरच्या जाहिराततज्ज्ञांनी समाजमनात वर्षानुवर्षे स्थिर केले आहे. 'Live Life King Size' यासारख्या जाहिराती वर्षानुवर्षे बड्या नटांना घेऊन जगभरच्या नामांकित नियतकालिकांतून झळकत असत; आता सरकारने बंदी घातल्यामुळे त्या थांबल्या आहेत एवढेच; पण बंदी आहे म्हणून, किंवा सिगरेट ओढल्याने कॅन्सर होतो हे सिद्ध झाले आहे म्हणून सिगरेटसेवनाचे प्रमाण कमी झाले आहे असे नव्हे. अशा सिगरेट्स बनवणाऱ्या कंपन्या चित्रप्रदर्शनापासून नाट्यमहोत्सवापर्यंत अनेक सांस्कृतिक उपक्रमांच्या बड्या प्रायोजक असतात हा एक मोठाच विरोधाभास म्हणायचा.
 तंबाखूसेवनाचा सिगरेट हा एकमेव प्रकार नव्हे. भारतात सिगरेटपेक्षा विडी पिणाऱ्यांचे प्रमाण अधिकच असेल आणि गुटखा-जर्दा खाणाऱ्यांचे प्रमाणही तेवढेच किंवा कदाचित त्याहून जास्तही असू शकेल. तपकीर ह्या स्वरूपात किंवा नुसताच तंबाखू खाणाऱ्यांची संख्याही भरपूर आहे. सुमारे तीन-चारशे वर्षांपूर्वी युरोपियन व्यापाऱ्यांनी लॅटिन अमेरिकेतून हे पीक भारतात आणले असे म्हणतात. आज तंबाखूच्या उत्पादनात भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो. सुमारे चाळीस लाख शेतकरी कुटुंबांचे पोट आजही ह्या पिकावर अवलंबून आहे; त्यांमध्ये विड्या वळण्याचे काम करणाऱ्यांची संख्या बरीच मोठी आहे.
 पूर्वीच्या काळी तर विडी उद्योगाचे महत्त्व खूपच होते. जिथे शेती पूर्णतः पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहे त्या भागात पाऊस कमी झाला, तर शेतकऱ्यांची अगदी अन्नान्नदशा होते. अशा वेळी विडी उद्योग हाच त्यांचा आधार असायचा; ग्रामीण भागात इतर उद्योगधंदे जवळजवळ नव्हतेच. विड्या वळण्याचे काम कोणालाही, कुठेही करता येते, अगदी घरीही. त्यासाठी शिक्षणाची काही पूर्वअट नाही. महिलाही हे काम करू शकतात; किंबहुना, विडीकामगार बव्हंशी महिलाच असतात. ह्या उद्योगाची रोजगारक्षमता खूप असल्याने त्याची वाढही देशात अनेक ठिकाणी झाली. 'गरिबाचे व्यसन' म्हणून विड्यांचा प्रसारही खूप झाला. अनेक समाजांत महिलाही विडी ओढत असत; हे प्रमाण पूर्वी तर अधिकच होते. ग्रामीण भागात जेव्हा साम्यवाद्यांनी कामगार संघटना उभारायला सुरुवात केली, तेव्हा बहुतेकदा ही सुरुवात विडीकामगारांपासूनच होत असे.
 मुख्यतः गुजरात, कर्नाटक व महाराष्ट्रात तंबाखूचे पीक निघते. कर्नाटकातील तंबाखू सर्वोत्तम मानला जातो. बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी, हुक्केरी आणि गोकाक हे तीन तालुके म्हणजे या दर्जेदार तंबाखूचे आगर. कर्नाटकात होणाऱ्या एकूण तंबाखूपैकी सुमारे ८० टक्के ह्याच तीन तालुक्यांत होतो. निपाणी शहर चिकोडी तालुक्यात आहे. हे इथले व्यापाराचे मुख्य केंद्र. देशभरातले व्यापारी निपाणीला हजेरी लावतात.


 निपाणी परिसरातील जमीन खूप सुपीक आहे. कोणतेही पीक इथे उत्तम येऊ शकते. पण ऊस व तंबाखू हीच दोन पिके इथे प्रमुख आहेत. त्यातही उसापेक्षा तंबाखूच अधिक. ऑगस्ट ते फेब्रुवारी ह्या कालावधीत साधारण पाच महिन्यांत हे पीक येते.
 निपाणीत पूर्वी ज्वारी, हरभरा, उडीद, भुईमूग ही पिके घेतली जात. पुढे सरकारनेच स्वतःला कराच्या स्वरूपात अधिक प्राप्ती व्हावी म्हणून तंबाखूसारख्या व्यापारी पिकाची लागवड करायला उत्तेजन दिले. आश्चर्य म्हणजे महाराष्ट्रातदेखील उसाच्या बाबतीत हाच प्रकार घडला होता. आज जरी अपुऱ्या पाण्यामुळे 'साखर की भाकर' असा प्रश्न अनेक विचारवंत उपस्थित करत असले, तरी एकेकाळी नाशिक-नगर भागात भंडारदरा धरणाचे पाणी वापरले जावे व पाणीपट्टीतून धरणाचा खर्च थोडाफार तरी भरून निघावा, ह्या उद्देशाने तत्कालीन ब्रिटिश सरकारनेच अधिक पाणी लागणाऱ्या उसाची लागवड करायला तेथील शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले होते! निपाणी येथेही असाच प्रकार झालेला दिसतो. सरकारी प्रोत्साहनाने सुमारे १८९०च्या आसपास इथे तंबाखूची लागवड सुरू झाली.
 निपाणीपुरता विचार केला. तर देवचंद शहा यांचे पूर्वज इथले तंबाखूचे पहिले व्यापारी. सर्वांत मोठे आणि प्रतिष्ठित. मूळचे अकोळ गावचे. १९८०च्या सुमारास 'टोबॅको किंग' म्हणूनच देवचंद शेट ओळखले जात. अनेक घरांमधून त्यांच्या फोटोची पूजाही होत असे; आपले अन्नदाता म्हणूनच सामान्य शेतकरी ह्या कुटुंबाकडे पाहत असे.
 व्यापारी देतील तेवढे पैसे गुपचूप घ्यायचे आणि त्यातच भागवायचे हे शेतकऱ्याच्या अगदी अंगवळणी पडले होते. व्यापारी सांगतील त्या कागदावर, कधी कधी तर कोऱ्या कागदावरही, आपला अंगठा उमटवायचा हे इथे सर्रास व्हायचे. व्यापाऱ्यांची दहशत प्रचंड असे. इतकी, की व्यापाऱ्यांच्या पेढ्यांसमोरून वा बंगल्यांसमोरून जाताना शेतकरी आपल्या चपला उचलून डोक्यावर घेत व मग पुढे चालू लागत.
 शेतकरी जेव्हा तंबाखू विकायला बाजारपेठेत घेऊन यायचा, तेव्हा तंबाखूच्या एकूण वजनातून अनेक प्रकारची घट (जिला इथे 'सूट' म्हटले जाई) वजा करून उरलेल्या वजनाचेच पैसे शेतकऱ्याला दिले जात.
 तंबाखूत पानांचे देठ, बारीक काड्या, शेतातील माती आलेली आहे असे कारण सांगून काडीमाती सूट घेतली जाई. ही पहिली सूट. हवेचा तंबाखूच्या वजनावर परिणाम होतो, असे सांगून हवा सूट घेतली जाई. तंबाखू पोत्यांत भरून आणला जाई. त्या पोत्याला बोद म्हणत. एका बोदामध्ये साधारण साठ किलो तंबाखू असायचा. ह्या पोत्याचे वजन एकूण वजनातून वजा केले जाई. त्याला बारदान सूट म्हणत. खूपदा वजन करायचा काटा नीट नाही, म्हणून काटा सूट घेतली जाई. सूट म्हणून नेमके किती वजन कमी पकडायचे ह्याचे काही गणित नव्हते - व्यापारी ठरवेल, तोच आकडा स्वीकारण्यावाचन शेतकऱ्याला गत्यंतरच नसे. सरासरी एक बोद तंबाखूमागे सुमारे दहा किलो सूट म्हणून वजनातून कमी केले जात. म्हणजे शेतकऱ्याचे साधारण एक षष्ठांश किवा १६% नुकसान हे या पहिल्या पायरीतच व्हायचे.
 विक्रीचा कागदोपत्री काहीच पुरावा शेतकऱ्याकडे नसे, व्यापारी आपल्या वहीत लिहन ठेवत तोच हिशेब गृहीत धरला जाई. विक्रीचे पैसेही शेतकऱ्याला लगेच कधी मिळत नसत; त्यासाठी निदान सहा महिने थांबावे लागे आणि चार-पाच चकरा माराव्या लागत. त्याआधी जर शेतकऱ्याला पैसे हवे असतील, तर ते त्याचेच पैसे व्यापारी त्याला व्याजावर देई; म्हणजे शेतकऱ्याला देय असलेल्या व मुळातच खूप तुटपुंज्या असलेल्या रकमेवरही त्यालाच व्याज द्यावे लागे! अर्थात सगळेच व्यापारी तसे होते असे म्हणणे गैर ठरेल; काही व्यापारी सरळ मार्गाने व्यवहार करणारेही असत.
 तंबाखूच्या व्यापाऱ्यांच्या वखारी असत. तंबाखू नीट जमा करून घेणे, तो साठवणे, नंतर ठरलेल्या जागी रवाना करणे वगैरे कामांसाठी ह्या वखारी असत. तिथे मुख्यतः महिला काम करत. तंबाखवर प्रक्रिया करून जर्दा बनवण्याचे कामही महिला कामगारच करत. त्यांची परिस्थिती अतिशय वाईट होती. कोंदट, अपुरी, अस्वच्छ जागा, कामासाठी बसायचीदेखील गैरसोय, तरीही एकाच जागी तासन्तास बसायची सक्ती, सर्वत्र दरवळणारा तंबाखूचा वास, अंगावर अगदी नखशिखान्त जाऊन बसणारा बारीक तंबाखूचा थर. मग्रूर मालक, सकाळी नऊ वाजता महिला कामाला आल्या, की वखारीचा दरवाजा बंद केला जाई. दुपारी दोन वाजता त्यांना अर्धा तास जेवणाची सुट्टी असायची. त्यानंतर पुन्हा कामाला सुरुवात, ते अगदी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत. त्या दरम्यान अगदी देहविधीसाठीदेखील बाहेर पडायची परवानगी नसायची. त्यातून मजुरी अत्यंत कमी. कोणी फार आवाज उठवला तर त्याला सरळ करायला वखारमालकांनी पोसलेले गंडही सज्ज असत.
 निपाणी व आसपासच्या भागात अशा पंधरा-वीस हजार तरी महिला तंबाखू कामगार होत्या. त्याशिवाय प्रत्यक्ष विडी बनवणारे कारखाने असत. आश्चर्य म्हणजे इतकी मोठी कामगारसंख्या असूनही निपाणीत सरकारी लेबर ऑफिस नव्हते. कुठलीही तक्रार करायची म्हटली तर चिकोडी ह्या तालुक्याच्या गावी जावे लागे. तिथे जायचे म्हणजे कामगारांचा त्या दिवसाचा रोजगार बुडायचा. शिवाय, गेल्यावरदेखील तो विशिष्ट ऑफिसर भेटेलच अशी खात्री नसायची. तो नसला तर दुसरे कोणीही कामगारांचे काम करत नसे. त्यामुळे अन्यायाविरुद्ध दाद मागायची तरी कशी आणि कोणापुढे?
 सुभाष जोशी हे निपाणीच्या तंबाखू आंदोलनातील एक प्रमुख व्यक्तिमत्त्व. मध्यम बांधा, शांत चेहरा, विचारी वृत्ती आणि तरीही कृतिशील असलेले जोशी व्यवसायाने प्राध्यापक होते, पण अध्यापनाच्या जोडीनेच सामाजिक कार्यात त्यांचा खूप सहभाग असे. आपल्या समाजकार्यामुळे एकदा त्यांना नोकरीही गमवावी लागली होती, पण संघर्ष करून त्यांनी ती परत मिळवला. १९७३-७४च्या सुमारास त्यांना अकोळ युवक संघ नावाची स्थानिक तरुणांची एक संघटना उभी केली व तिच्यामार्फत वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवायला सुरुवात केली. पत्नी सुनीताअक्का याही सर्व कामात पतीला पुरेपूर साथ देणाऱ्या होत्या. 'सहते चरामि' हे व्रत खऱ्या अर्थाने जपणाऱ्या. घर हेच जोशींचे कार्यालयदेखील असल्याने माणसांचा राबता सतत असे. कधी कधी वीस-वीस लोकांचे जेवणखाणही सुनीताअक्कांना करावे लागे; पण त्यांची कधीही तक्रार नसे. त्यांच्याप्रमाणेच संध्या व शमा या त्यांच्या दोन धाकट्या बहिणीदेखील सुभाष जोशींना त्यांच्या कामात जास्तीत जास्त मदत करत.
 २४ ऑक्टोबर २०१२ रोजी निपाणीतील त्यांच्या घरी प्रस्तुत लेखकाची व त्यांची प्रथम भेट झाली. सोबत बद्रीनाथ देवकर हेही होते. आमच्या भेटीपूर्वी काही वर्षे त्यांचा शरद जोशींशी व शेतकरी संघटनेशी फारसा संबंध राहिला नव्हता; पण तरीही संयत शब्दांत, जराही आवाज चढू न देता, त्यांनी सर्व कहाणी ऐकवली.
 पूर्वी सुभाष जोशी समाजवादी पक्षात होते. पण त्या पक्षाच्या अनेक मोठ्या नेत्यांच्या प्रत्यक्ष संपर्कात आल्यानंतर नाव मोठे आणि लक्षण खोटे असाच अनुभव त्यांना आला. 'एक गाव, एक पाणवठा' आंदोलनाच्या वेळी कोकणात मालवण येथे भरलेल्या एका अधिवेशनाला ते मुद्दाम रजा काढून हजर राहिले होते. त्या अधिवेशनातील भाषणात एका वरिष्ठ नेत्यांनी जाहीर केले की, 'एक गाव, एक पाणवठा कार्यक्रमाला आपण संपूर्ण एक वर्ष वाहून घेणार.' पण प्रत्यक्षात त्यानंतर ते ह्या आंदोलनात कुठेच दिसेनात, म्हणून जोशींनी त्यांना पत्र लिहिले की, 'अधिवेशन संपून सहा महिने झाले, पण तुम्ही आश्वासन पूर्ण केलेले दिसत नाही. तुम्ही एकाही पाणवठ्यावर गेल्याचं ऐकिवात नाही.' अपेक्षेप्रमाणे पत्राला काहीच उत्तर आले नाही!
 इतरही अनेक मोठ्या समाजवादी नेत्यांच्या बाबतीत हाच अनुभव आला. भाषणे मोठी मोठी करायची, पण प्रत्यक्ष कृती शून्य. इतर लोहियावादी, मार्क्सवादी नेत्यांचाही असाच अनुभव त्यांना आला. मोहन धारियांचे बंधू गोपीनाथ धारिया ऊर्फ भाई हेही सुभाष जोशींच्या नियमित संपर्कात होते. त्यांची स्वतःची निपाणीजवळ मोठी वडिलोपार्जित शेती होती. १९७७ साली केंद्रातील जनता पक्षाच्या राजवटीत मोहन धारिया व्यापारमंत्री बनले. पण इथल्या तंबाखू कामगारांचे प्रश्न सोडवण्यात त्यांची काहीच मदत झाली नाही. ज्यांना आपण 'आपले' समजतो तेही सत्तेवर आल्यावर मात्र 'आपले' राहत नाहीत हा पुन्हा पुन्हा येणारा अनुभव कुठल्याही ध्येयवादी कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास होईल असाच होता. मग त्यांनी ठरवले, कुठल्याच मोठ्या नावाला भुलायचे नाही; आंधळेपणे कोणाच्या पाठीमागे जायचे नाही.

 निपाणीतील तंबाखू कामगार स्त्रिया कुठल्या नरकयातना भोगत असतात, कशा परिस्थितीत काम करत असतात ह्याची पूर्ण कल्पना असल्याने सुभाष जोशींनी लौकरच या तंबाखू कामगार स्त्रियांना संघटित करायला सुरुवात केली. सुरुवातीला ते मदतीसाठी मुंबईपुण्याहून काही लेखकांना, पत्रकारांना, पुढाऱ्यांना आवर्जून आमंत्रित करत असत. त्यांना या महिलांची केविलवाणी परिस्थिती दाखवत. त्यांच्या भेटीगाठी, आसपासच्या खेड्यांतील दौरे वगैरे आयोजित करत. काहींनी तिथल्या प्रश्नांबद्दल लेखन वगैरे केले, भाषणे दिली. त्यामुळे बड्या शहरांतील सुशिक्षितांच्या वर्तुळात निपाणीतील महिला तंबाखू कामगारांचे शोषण हा काही दिवस चर्चेचा विषय झालाही; पण त्यामुळे प्रत्यक्षात निपाणीतील शोषणावर काहीही परिणाम झाला नाही.
 पुण्याच्या एक समाजकार्यकर्त्या बाई निपाणीत आल्या होत्या. त्यांना देवदासींची एक सभा तिथे घ्यायची होती. त्यांच्या विनंतीवरून सुभाष जोशींनी सभा आयोजित केली; पण 'मला सभेत बोलायचा आग्रह करू नका' असे त्यांनी ह्या विदषीना वारंवार बजावले होते. बाईंना मात्र ते भाषण करत आहेत आणि अध्यक्षस्थानी त्या स्वतः आहेत असा फोटो काढून घ्यायची फार हौस होती. त्यासाठी त्यांनी एक फोटोग्राफरदेखील मुक्रर केला होता. जोशी तसे स्पष्टवक्ते होते. आपल्या भाषणात ते म्हणाले,
 "वर्षाकाठी एक-दोनदा इथे येऊन आणि मग मुंबई-पुण्यात भाषणं देऊन देवदासींची मुक्ती होणार नाही, देवदासींचा कुठलाच प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी इथे येऊन दीर्घकाळासाठी काम करावं लागेल. यल्लम्माच्या यात्रेला एकदातरी स्वतः जावं लागेल, पाच घरी जोगवा मागत फिरावं लागेल, स्वतः जोगतीण बनून त्यांच्या वाट्याला काय येतं ते अनुभवावं लागेल. तरच त्यांना हा प्रश्न किमान समजेल तरी."
 पण ह्या सगळ्या स्पष्टवक्तेपणाचा त्या बाईंवर काहीही परिणाम झाला नाही! आपल्या अध्यक्षीय भाषणात त्या म्हणाल्या, “मी आता पुण्याला जाऊन एक पत्रकार परिषद घेते, मुंबईला जाऊनहीं एक पत्रकार परिषद घेते, बंगलोरलाही मी जाणार आहे," वगैरे वगैरे. अशा बोलघेवड्या आणि प्रत्यक्ष कामापेक्षा स्वतःच्या प्रसिद्धीतच रस असलेल्या विद्वानांचाही सुभाष जोशींना राजकारण्यांइतकाच तिटकारा होता. हे त्यांचे शरद जोशींबरोबर असलेले एक साम्य म्हणता येईल.

 सुभाष जोशी व त्यांचे तरुण सहकारी सायकलवरून सर्व खेड्यांमधून हिंडत, शेतकऱ्यांना मार्गदर्शक अशी पत्रके वाटत, लहान लहान सभा घेऊन शेतकऱ्यांना एकत्र आणायचा प्रयत्न करत; पण त्या साऱ्या प्रयत्नांना म्हणावे तसे यश येत नव्हते. तंबाखू शेतकऱ्यांच्या मनातील व्यापाऱ्यांची दहशत कमी होत नव्हती. तशातच राजकारणी मंडळी वरचेवर कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्न उपस्थित करून व कानडी-मराठी वाद निर्माण करून आपापले नेतृत्व कायम ठेवण्याचा प्रयत्न करत व त्यामुळे तंबाखूचा प्रश्न मात्र प्रत्येक वेळी मागे पडत असे. या साऱ्या परिस्थितीवर मात करून चालू असलेल्या सुभाष जोशी यांच्या अविरत प्रयत्नांमुळे निपाणीत एका अर्थाने जमीन नांगरून तयार होती, पण लढ्याचे बीज मात्र अजून पडले नव्हते.

तो क्षणही लौकरच आला. नाशिकच्या ऊस आंदोलनावर योद्धा शेतकरी' लिहिणारे विजय परुळकर हे त्यासाठी निमित्त ठरले.
 एका स्वयंसेवी संस्थेच्या विनंतीवरून निपाणीत देवदासींच्या मुलींसाठी एखादे वसतिगृह उभारता येईल का याची पाहणी करण्यासाठी परुळकर इथे आले होते. देवदासींचे हे माहेरघरच. तंबाख कामगार स्त्रियांमध्येही अनेक देवदासी असतात. यल्लम्मा देवीच्या यात्रेला हजारो देवदासी व काही इतर महिलाही इथे देशभरातून येत. वसतिगृह स्थापन करण्यासाठीची आवश्यक ती माहिती त्यांनी तीन-चार दिवसांत मिळवलीदेखील. त्याचदरम्यान सुभाष जोशी त्यांना भेटले व तंबाखूप्रश्नाशी परुळकरांचा परिचय झाला. दोघांमध्ये नाशिकच्या ऊस आंदोलनाबद्दलही बरीच चर्चा झाली. भाई धारियाही तिथे हजर होते. शरद जोशींची कीर्ती त्यांच्यापर्यंत पूर्वीच पोचली होती. त्यांचे नेतृत्व इथल्या मरगळलेल्या शेतकऱ्याला एक नवे चैतन्य देईल हे जाणवले होते, पण शरद जोशींशी त्यांनी पूर्वी कधी थेट असा संपर्कही साधला नव्हता. परुळकरांमुळे आता त्यांना तो मार्ग उपलब्ध झाला. 'निपाणीला या' हे एका जोशींचे आमंत्रण परुळकरांनीच दुसऱ्या जोशींपर्यंत पोचवले.
 त्यानंतर अनेकदा परुळकर निपाणीला आले व इथल्या आंदोलनावर 'रक्तसूट' ह्या नावाने त्यांनी 'माणूस' साप्ताहिकात मे-जून-जुलै १९८१मध्ये एक उत्कृष्ट लेखमाला लिहिली. पण का कोण जाणे, 'योद्धा शेतकरी इतकी ही लेखमाला गाजली नाही आणि पुढे पुस्तकरूपात प्रकाशितही झाली नाही.
 परुळकरांनी आपले काम चोख बजावले. पुण्याला परतताच त्यांनी शरद जोशींची भेट घेतली. सुभाष जोशी आणि गोपीनाथ धारिया ह्यांचे आमंत्रण त्यांच्यापर्यंत पोचवले. तंबाखू कामगार व शेतकरी ह्यांच्या एकूण परिस्थितीबद्दल सगळी माहिती दिली. निपाणीत घेतलेल्या काही मुलाखतींच्या टेप्स ऐकवल्या. परिणामस्वरूप शरद जोशी विजय व सरोजा परुळकर ह्यांच्यासह ३० जानेवारी १९८१ रोजी पुण्याहून निपाणीला आले. लीलाताईंचे काही नातेवाईक बेळगावात राहात, पण यापूर्वी कधी शरद जोशी निपाणीला आले नव्हते.
 आल्या आल्या सगळे सुभाष जोशी ह्यांच्याच घरी गेले. कार्यकर्त्यांची मोठीच गर्दी तिथे उसळली होती. निपाणीत शरद जोशी दाखल झाल्यामुळे सर्वांनाच एकदम नवा उत्साह आला होता. रात्री उशिरापर्यंत सर्वांची चर्चा झाली, काय काय करता येईल याची प्राथमिक आखणीही झाली.
 निपाणीत शरद जोशींची प्रतिमा उजळवणारी एक घटना योगायोगाने त्याच दिवशी घडली. शेतकरी संघटनेच्या नाशिक येथील आंदोलनाला इंग्लंडच्या बीबीसी टेलेव्हिजनने बरेच कव्हरेज दिले होते व शरद जोशींची प्रत्यक्ष मुलाखत घ्यायची त्यांची इच्छा होती. भारतीय शेतकऱ्यांचा अन्यायाविरुद्ध उठाव ही त्यांच्या दृष्टीने खूप मोठी घटना होती. त्या दृष्टीने त्यांनी जोशींशी पुण्यात संपर्कदेखील साधला होता. त्यावेळी बीबीसी टेलेव्हिजनची तीन-चार इंग्रज छायाचित्रणकारांची व पत्रकारांची टीम दिल्लीत आली होती; राजीव गांधी ह्यांची मुलाखत घेण्यासाठी. ती संपवून ही टीम पुण्याला येणार होती. पण जोशी निपाणीत असणार म्हटल्यावर तेही इथे आले होते. जोशी आणि परुळकरांच्या पाठोपाठ दोन-तीन तासांतच बीबीसी टेलेव्हिजनची व्हॅन तिथे पोचली. जोशींनी फोनवर सांगितल्यानुसार सरळ सुभाष जोशींच्या घरी ती इंग्रज टीम आली. शरद जोशींच्या पाठोपाठ हा परदेशी टेलेव्हिजनवाल्यांचा ताफा आलेला पाहून निपाणीतील प्रतिष्ठित मंडळी चांगलीच अवाक् झाली होती! त्यांच्या नजरेत शरद जोशींचा भाव त्यामुळे वधारला होता! या टीमने शरद जोशींची तिथेच मुलाखत घेतली व नंतर तिचा समावेश असलेला एक माहितीपटही बीबीसी टेलेव्हिजनवर दाखवला गेला.

 दुसऱ्याच दिवशी, म्हणजे १ फेब्रुवारी १९८१ रोजी, निपाणीतल्या नेहरू चौकात शरद जोशींची निपाणीमधली पहिली जाहीर सभा झाली. तुडुंब गर्दी झाली होती. आठ-दहा हजार विडी व तंबाखू कामगार स्त्रिया हजर होत्या व सुमारे दोन हजार तंबाखू शेतकरीदेखील.
 आपल्या निपाणीतल्या त्या पहिल्या भाषणात शरद जोशी म्हणाले :
 "शेतकरी आंदोलनाचं किंवा तुमच्या येथील तंबाखू उत्पादक शेतकऱ्यांचं मी नेतृत्व करावं असा माझा अट्टहास मुळीच नाही. ह्याउलट मी तुम्हाला असं सांगू इच्छितो, की कुणी जर अशा प्रकारे नेतृत्व करतो म्हणू लागला, तर सर्वप्रथम त्याला नीट तपासून खात्री करून घ्या व ती पटल्यावर मगच त्याच्यावर विश्वास ठेवा."
 ह्यानंतर नेहमीप्रमाणे गरिबीचे मूळ शेतीमालाच्या अपुऱ्या किमतीत कसे आहे, शेतीमालाला योग्य किंमत मिळाली की बाकीचे प्रश्न कसे सुटतील, उत्पादनखर्च कसा काढायचा, इंडिया विरुद्ध भारत, दारिद्र्यामुळे त्याच्या आयुष्यात येणारी लाचारी वगैरे आपले मुद्दे त्यांनी मांडले. सगळे श्रोते अगदी मंत्रमुग्ध होऊन त्यांचा शब्दन्शब्द कानात साठवत होते. टाळ्यांच्या प्रचंड गजराने श्रोत्यांनी त्यांना अभिवादन केले व एकप्रकारे त्यांच्या नेतृत्वावर ह्या पहिल्या सभेतच शिक्कामोर्तब झाले.
 सुभाष जोशींना निपाणीत किती आदराचे स्थान आहे हे निपाणीत पाऊल टाकल्यापासूनच शरद जोशींना जाणवले होते. म्हणूनच आपण सुभाष जोशींना त्यांच्या स्थानावरून दूर करून शेतकऱ्यांचे नेतृत्व स्वतःकडे घेत आहोत, ती आपली महत्त्वाकांक्षा आहे हे चित्र त्यांना निर्माण होऊ द्यायचे नव्हते. त्यामुळेच त्यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच नेतृत्वाचा मुद्दा विस्ताराने स्पष्ट केला होता.
 पण तरीही ह्या पहिल्या सभेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद शरद जोशींना सुखावून गेला व मुख्य म्हणजे स्वतः सुभाष जोशींनीसुद्धा त्यांचा वडील भाऊ म्हणूनच जणू स्वीकार केला. अनौपचारिक गप्पांमध्ये दोघांना एकमेकांची अधिक जवळून ओळख पटत गेली, कौटुंबिक पातळीवरचा परिचयही दृढ होत गेला.

 नंतरचे काही दिवस शरद जोशींचा मुक्काम सुभाष जोशींच्या घरीच होता. दोघांनी एकत्रित सगळ्या परिसरात दौरे केले. चिकोडी तालुक्यातील ५१ खेड्यांमध्ये तसेच हुक्केरी व गोकाक ह्या तालुक्यांमध्ये, आणि बेळगाव व कोल्हापूर ह्या शहरांमध्येही त्यांनी शेतकरी व शेतमजूर यांचे अनेक मेळावे घेतले.


 ह्या सगळ्यामागे शरद जोशींचा हेतू अगदी स्वच्छ होता आपल्या नेहमीच्या पद्धतीनुसार प्रत्यक्ष आंदोलन सुरू करण्यापूर्वी ह्या पिकाचा त्यांना शास्त्रशुद्ध अभ्यास करायचा होता. तंबाखूवर ब्रिटिश काळापासून, म्हणजे साधारण १९४३ सालापासून, अबकारी कर (एक्साइज) लागू आहे व त्यामुळे तंबाखू पिकाची विस्तृत नोंद अबकारी खाते करत असते. एकूण किती जमिनीवर तंबाखू लावला आहे व विशिष्ट शेतात एकूण किती तंबाखूची झाडे आहेत, ह्याची नेमकी नोंद तलाठ्याकडे करावी लागते. एकूण किती किलो तंबाखू पिकला ह्याचीही नोंद होते. इतर पिके शेतकरी कितीही काळ स्वतःकडे ठेवू शकतो, पण तंबाखूचे पीक ठराविक काळापेक्षा अधिक तो स्वतःकडे ठेवू शकत नाही, ते बाजारात आणून विकावेच लागते. एकूण किती तंबाखू विकला ह्याचीही नोंद होई. अबकारी खात्याकडील व तलाठ्यांकडील या नोंदींचाही जोशींना उपयोग झाला. त्यांच्या अभ्यासानुसार चिकोडी तालुक्यातील सुमारे साठ हजार एकर जमीन तंबाखूखाली होती व तेथील ९५ टक्क्यांहून अधिक भूधारक पाच एकरांहून कमी जमिनीचे मालक होते. म्हणजेच अनेकांना वाटायचे त्याप्रमाणे तंबाखूचा शेतकरी हा बडा शेतकरी आहे हा भ्रमच होता, प्रत्यक्षात ९५ टक्के शेतकरी हे अल्पभूधारकच होते.
 जोशींनी प्रथम शेतीवरील खर्चाचा व्यवस्थित हिशेब काढला. एका एकरात सरासरी २७० किलो तंबाखू निघत होता व त्यावर एकूण सरासरी खर्च रुपये ३०८० इतका होता. म्हणजेच किलोमागे उत्पादनखर्च होता अकरा रुपये चाळीस पैसे. त्याच्या विक्रीचे मात्र सध्या किलोमागे सरासरी साडेसहा रुपये ह्या दराने जेमतेम रुपये १७५५ मिळत होते. म्हणजेच त्याला प्रत्येक किलोच्या विक्रीमागे चार रुपये नव्वद पैसे किंवा एका एकरामागे रुपये १३२५ नुकसान होत होते. तो कायमच कर्जबाजारी असण्याचे तेच प्रमुख कारण होते. पण उत्पादनखर्च कसा काढायचा ह्याची त्या शेतकऱ्याला कल्पनाच नसल्याने आपण प्रत्यक्षात ह्या सौद्यात किती नुकसानीत जातो आहोत ह्याची त्याला जाणीवच नव्हती. जोशी यांनी उत्पादनखर्च कसा काढायचा हे आधी शेतकऱ्यांना दाखवून दिले.
 याहूनही अधिक भाव देणे व्यापाऱ्यांना अगदी सहज परवडण्यासारखे होते हेही त्यांच्या लक्षात आले होते. एक किलो तंबाखूपासून ५००० विड्या तयार होत होत्या व दर एक हजार विड्यांमागे एक रुपया अबकारी कर होता. म्हणजेच एक किलो तंबाखूपासून सरकारला पाच रुपये अबकारी कर म्हणून मिळत, तर शेतकऱ्याला मात्र ह्या एक किलो तंबाखूच्या विक्रीतून फक्त साडेसहा रुपये मिळत. पुढे तर सरकारने विडीवरचा अबकारी कर दुप्पट केला, म्हणजेच एक हजार विड्यांमागे दोन रुपये एवढा केला. त्यामुळे सरकारला दर किलो तंबाखूमागे हा रुपये मिळू लागले! शेतकऱ्याला मिळणारा तंबाखूचा भाव मात्र तेवढाच, म्हणजे किलोला साडेसहा रुपये, राहिला! म्हणजेच तंबाखू शेतीचा खरा फायदा राबणाऱ्या शेतकऱ्यांपेक्षा अबकारी कर गोळा करणाऱ्या सरकारलाच होत होता!
 केंद्र सरकारला १९७९-८० या सालात एक्साइज ड्युटी म्हणून ह्या भागातून २१ कोटी रुपये उत्पन्न प्राप्त झाले होते व शेतकऱ्यांना मात्र उत्पादनखर्चापेक्षाही खूप कमी भाव मिळत

धुमसता तंबाखू ■ १७३


असल्याने त्यांचे त्या वर्षी बारा कोटी रुपये नुकसान झाले होते.
 जोशींनी केलेले एकूण हिशेब हे इतके शास्त्रशुद्ध होते, की व्यापाऱ्यांनी व सरकारी अधिकाऱ्यांनी वा अन्य कोणीही त्याला आंदोलनापूर्वी वा नंतरही कधी आक्षेप घेतला नव्हता. आपली वैचारिक बैठक अशा प्रकारे पक्की झाल्यानंतर २४ फेब्रुवारी रोजी निपाणीला तंबाखू शेतकरी व कामगार यांचा एक मोठा संयुक्त मेळावा शरद जोशींनी घेतला. त्याच्या पूर्वतयारीसाठी म्हणून २१, २२ व २३ फेब्रुवारी ह्या तीन दिवसांत त्यांनी बेळगाव व कोल्हापूर ह्या जिल्ह्यांचाही दौरा केला होता; एकूण १५ सभा घेतल्या होत्या. त्यात एका स्थानिक कृतिसमितीची स्थापना केली गेली. कृतिसमितीचे अध्यक्ष होते कर्नाटकचे वरिष्ठ गांधीवादी नेते अण्णू गुरुजी. इतर सदस्य होते कोल्हापूरचे एस. के. पाटील, संकेश्वरचे बसगौंडा पाटील, अकोळचे आय. एन. बेग आणि सातप्पा शेटके, गळतग्याचे एस. टी. चौगुले, एकसंब्याचे दत्ता पांगम, कापशीचे शामराव देसाई, निपाणीचे गोपीनाथ धारिया ऊर्फ भाई आणि आयेशा दिवाण ऊर्फ चाची.
 जोशींनी सर्वांच्या वतीने शासनाला पुढील मागण्या सादर केल्या :

 १. तंबाखूला सध्या दिला जाणारा किलोमागे सहा ते सात रुपये हा दर अत्यंत कमी असून त्यात शेतकऱ्याचे वर्षानुवर्षे प्रचंड नुकसान होत आले आहे. तंबाखूच्या दानुसार एका कलोमाग किमान १० रुपये, १२ रुपये किंवा १५ रुपये एवढा उत्पादनखर्चावर आधारित असा भाव मिळायलाच हवा. हा भावदेखील खूप कमीच आहे, पण त्यामुळे फायदा नाही झाला तरी निदान त्याचा उत्पादनखर्चतरी बढेशी भरून निघेल. तो भाव द्यायलाही जर व्यापारी तयार झाले नाहीत, तर सरकारने तंबाखूची खरेदी करावी व एवढा भाव तरी शेतकऱ्याला मिळवून द्यावा.
 २. सूट म्हणून वेगवेगळ्या प्रकारांनी वजनात कपात न करता एक बोद (म्हणजे ६० किलो) तंबाखूमागे फक्त दोन किलो सूट पकडावी.
 ३. मार्केट सेस व एन्ट्री फी मार्केट अॅक्टनुसार व्यापाऱ्यांनीच भरायची असते. पण सध्या शेतकऱ्याकडून ती जुलमाने वसूल केली जाते. तसे न करता यापुढे तो कर व्यापाऱ्यांनीच भरावा.
 ४. वाहतुकीचा खर्च शेतकऱ्याकडून वसूल केला जाऊ नये. साखर कारखाने ज्याप्रमाणे उसाच्या वाहतुकीचा खर्च स्वतः उचलतात, त्याचप्रमाणे इथेही वाहतुकीचा खर्च तंबाखू विकत घेणाऱ्या विडीकारखानदारांनी उचलावा.
 ५. खरेदी-विक्रीचा करार लेखी व्हावा व त्याची एक प्रत शेतकऱ्यालाही दिली जावी.
 ६. माल बाजारात आणल्यानंतर सात दिवसांच्या आत त्याचे वजन केले जावे.
 ७. झालेल्या हिशेबाचे पैसे वजन केल्यानंतर लगेचच शेतकऱ्याला दिले जावेत व ते शक्य नसेल तर निदान पुढील सात दिवसांच्या आत ते हमखास दिले जावेत.

१७४ - अंगारवाटा... शोध शरद जोशींचा


 या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर तीन आठवड्यांनी, म्हणजे १४ मार्चपासून, पुणेबंगलोर हा महामार्ग रोखून धरायचा निर्धारही या सभेत जाहीर केला गेला.
 सभेत एकमताने मंजूर झालेल्या ह्या मागणीपत्राची प्रत त्याच दिवशी पंतप्रधान इंदिरा गांधी, अन्नमंत्री राव बिरेंद्र सिंग, व्यापारमंत्री प्रणवकुमार मुखर्जी, कर्नाटकचे मुख्यमंत्री गुंडू राव व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अब्दुल रेहमान अंतुले यांना रजिस्टर्ड पोस्टाने रवाना केली गेली. खरे तर ह्यांतील कुठलीच मागणी अवास्तव अशी नव्हती, पण तरीही सरकारी यंत्रणा इतकी मुर्दाड बनली होती, की १४ मार्चपर्यंत ह्यांपैकी एकाकडूनही त्या पत्राची साधी पोचसुद्धा आली नाही; काही कृती करणे तर दूरच राहिले.
 सरकारकडून ठोस असे काहीच घडत नाहीए हे बघितल्यावर शेवटी ठरल्याप्रमाणे १४ मार्च १९८१ रोजी दुपारी तीन वाजता रास्ता रोकोला सुरुवात झाली. पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग चारवर निपाणीला वळसा घालून जाणारा बायपास आणि निपाणी गावात जाणारा रस्ता ह्यांच्या नाक्यावर शेतकरी ठिय्या देऊन बसले. हे स्थळ निपाणीपासून साधारण तीन किलोमीटर अंतरावर होते.
 'शेतकरी संघटनेचा विजय असो', 'शरद जोशी झिंदाबाद' अशा घोषणा तारस्वरात दिल्या जात होत्या. हळूहळू चिकोडी तालुक्यातील ५१ छोट्यामोठ्या खेड्यांतील शेतकरी वेगवेगळ्या मिरवणुकांनी रास्ता रोको चालू होते तिथे येऊ लागले. त्यांच्यासोबत सातशे बैलगाड्यादेखील होत्या. हुक्केरी व गोकाक तालुक्यांतील गावांमधील शेतकरी, तसेच निपाणीतील तंबाखू कामगार व विडी कामगार हेदेखील रास्ता रोकोत सामील झाले. त्यांची एकूण संख्या पहिल्याच दिवशी पंधरा हजारावर गेली. महामार्गावर या साऱ्यांनी आपापल्या राहुट्या उभारल्या. तिथे कदाचित अनेक दिवस राहावे लागेल ह्या बेताने आपापले सामानसुमान घेऊनच हे सगळे आले होते. त्याशिवाय, दिवसभर आंदोलनात सहभागी होणारे, पण रात्री झोपायला तेवढे आपापल्या घरी जाणारे, असेही अनेक लोक तिथे येऊन दाखल होऊ लागले.
 ही सर्व मंडळी आपापली शेतीची कामे सोडून इथे आली होती. त्यात जे शेतमजूर होते ते आपली रोजची पाच रुपयांची मजुरी बुडवून आंदोलनात सामील झाले होते. पैसे देऊन एखाद्या आंदोलनासाठी माणसे गोळा करायची प्रथा त्यावेळीही होतीच; स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन लोक आंदोलनात येत आहेत हे दृश्य खूप दुर्मिळच होते.
 त्याच दिवशी रात्री कृतिसमितीचे अध्यक्ष अण्णू गुरुजी ह्यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ बंगलोरला मुख्यमंत्री गुंडू राव यांच्याशी वाटाघाटी करण्यासाठी रवाना झाले. दुसऱ्या दिवशी गुंडू राव त्यांना भेटले. "तुम्ही अतिशय शांतपणे हे आंदोलन सुरू केले आहे ही फार चांगली गोष्ट आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. मी ह्याबद्दल केंद्र सरकारशी बोलतो, कारण ह्याबाबतचे निर्णय शेवटी केंद्र सरकारच घेऊ शकते," असे मुख्यमंत्री शिष्टमंडळाला म्हणाले. पण प्रत्यक्षात मात्र त्यांनी तसे काहीच केले नाही.

धुमसता तंबाखू - १७५


 इकडे 'रास्ता रोको'तील वातावरण तापत गेले होते. पुढल्या तीन-चार दिवसांत दिवसभरच्या आंदोलनात सामील होणाऱ्यांची संख्या चाळीस हजारांवर जाऊन पोचली. ह्या परिसराला 'आंदोलन नगरी' असेच सार्थ नाव पडले होते. काही शेतकरीतर अगदी वाजत गाजत आणि हत्तनि मिरवणूक काढून आंदोलन नगरीत येऊन पोचले होते.शेतकरी आंदोलनात हत्तींचा सहभाग हा प्रकार इथे प्रथमच बघायला मिळाला! महामार्गाचा दोन-तीन किलोमीटर लांबीचा पट्टा या जनसमुदायाने व्यापला होता.
 शरद जोशींचा रात्री झोपण्यापुरता मुक्काम तसा निपाणीत सुभाष जोशी यांच्या घरी होता, पण प्रत्यक्षात जवळजवळ सगळा दिवस ते ह्याच महामार्गावर स्वतःसाठी उभारलेल्या एक छोट्या झोपडीतच राहत होते; कधी कधी रात्रीही त्यांचा मुक्काम ह्या झोपडीतच असे. आपला नेता आपल्याबरोबरच राहतो आहे हे दृश्य शेतकऱ्यांच्या दृष्टीने अगदी अपरिचित व मनोधैर्य वाढवणारे होते. अधूनमधून सभांसाठी इतर गावांमध्ये जोशी जात, पण एरव्ही मात्र ते आंदोलनाचे पुढले सर्व तेवीस दिवस इथेच होते. रोज सकाळ-संध्याकाळ ते महामार्गावर फेऱ्या मारत. अधिकाधिक शेतकऱ्यांशी स्वतः बोलत. त्यांना धीर देत.
 सकाळी लौकर उठून आंदोलक प्रातर्विधी उरकत. त्यासाठी बऱ्यापैकी सोय महामार्गाच्या दुतर्फा केली होती. आंघोळीचीही सोय होती. शेतकऱ्यांनी स्वतःच अंतराअंतरावर आडोसे उभे करून शौचकप व न्हाणीघरांची तात्पुरती सोय केली होती. रस्त्यात कठेही खरकट्या पत्रावळ्यांचे ढीग, कागदाचे बोळे वा माणसांची विष्ठा दिसत नव्हती; कुठेही माशा घोंघावत नव्हत्या. ही स्वच्छता म्हणजे मोठे नवलच होते; एरव्ही आपापल्या घरांतही कदाचित ते गरीब शेतकरी इतकी स्वच्छता पाळू शकत नसतील.
 जरा उजाडले की आसपासच्या गावांतील लोकही आंदोलनात सामील होण्यासाठी तिथे दाखल होत. आपल्याबरोबर ते महामार्गावरील राहुट्यांत राहणाऱ्या अन्य आंदोलकांसाठी भाकऱ्या-चटणी-कांदा-पिठले वगैरे पदार्थ गाड्या भरभरून घेऊन येत. शिवाय पिंपेच्या पिंपे भरून आंबील आणली जाई. ज्वारी अथवा नाचणीच्या पिठात ठेचलेली लसूण घालून बनवलेले हे पेय ह्या भागात खूप लोकप्रिय. आंदोलननगरीत पाण्याचे काही नळही आले होते व काही ठिकाणी विजेची कनेक्शन्सदेखील मिळवली गेली होती; त्यामुळे काही ठिकाणी झाडांना ट्यूब लाइट्स लटकत होत्या.
 सुरुवातीला आंदोलकांना वाटले होते, की आपली एकजूट बघून दोन-तीन दिवसांत सरकार नरम येईल व आपल्या मागण्या मान्य करेल; तशाही त्या अगदी न्याय्य व साध्याच आहेत. पण प्रत्यक्षात सरकार इतके कोडगे बनले होते, की त्याच्याकडून काहीच हालचाल होत नव्हती. महात्मा गांधी सत्याग्रह हे अस्त्र प्रभावीपणे ब्रिटिश सरकारविरुद्ध वापरू शकले, कारण ते सरकार अधिक जनताभिमुख होते व जनतेतील असंतोषाची लगेच दखल घेण्याइतके संवेदनशील होते. पण इथले सरकार मुळातच जनताभिमुख व संवेदनशील नसल्याने सत्याग्रहाचे तेच हत्यार इथे मात्र अगदीच बोथट ठरत होते; किंबहुना गेंड्याच्या कातडीच्या सरकारवर त्या अस्त्राचा काहीच परिणाम होताना दिसत नव्हता.

१७६ . अंगारवाटा... शोध शरद जोशींचा


अशा स्थितीत आंदोलनकर्त्यांचा उत्साह कायम टिकवणे हे नेत्यांपुढचे एक मोठे आव्हान होते. त्यासाठी रोज काही ना काही उपक्रम राबवले जात. उदाहरणार्थ, १८ मार्च रोजी आंदोलन नगरीत ३००० शेतकऱ्यांनी एक दिवसाचे सांघिक उपोषण केले. इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेले उपोषण ह्यापूर्वी कधी कोणी बघितले नसेल. शेतकऱ्यांचा आत्मविश्वास खूप वाढवणारी ही घटना होती.
 त्याशिवाय नेत्यांची, मुख्यतः शरद जोशींची, रोज संध्याकाळी होणारी भाषणे हेही एक मोठे आकर्षण असे. एका ट्रेलरवर पाण्याची रिकामी टाकी ठेवून स्टेज बनवले जाई. त्या टाकीवर उभे राहून, हातात माइक घेऊन जोशी भाषण करत. निपाणीतील एक व्यापारी म्हणाले होते, “या जोश्यांचे भाषण रोज ऐकावेसे वाटते. कधी कंटाळा म्हणून येत नाही." रोज संध्याकाळी पाचच्या सुमारास ते आपले दुकान बंद करत व स्वतःतर भाषणाला येऊन बसतच, पण शिवाय आपल्या सर्व नोकरांनाही भाषण ऐकायला पाठवत. निपाणीतील अनेक दुकानदारांच्या बाबतीत हे खरे होते.
 बहुसंख्य आंदोलक हे कानडीभाषक होते, पण अल्पसंख्य असलेल्या मराठी शेतकऱ्यांबरोबर ते अतिशय खेळीमेळीने वागत होते. आंदोलकांमध्ये स्त्रियांचे प्रमाणही भरपूर होते. रात्री जेवणानंतर तर एखाद्या जत्रेसारखे आनंदाचे वातावरण तिथे तयार होई. सुरुवातीला एखादा वक्ता आज संध्याकाळी भाषणांत कोण काय बोलले ते थोडक्यात कानडीत सांगे. त्यानंतर सगळे आंदोलक रात्री उशिरापर्यंत चांदण्यांच्या उजेडात तालासुरात भजने म्हणत. गौळणी व भारुडेही म्हणत. आपापली वाद्ये त्यांच्याकडे होती. अशी भजने म्हणण्याची परंपरा उत्तर कर्नाटकात पूर्वापार चालत आलेली आहे. अर्थात मराठी भजनेही होत. कानडी शेतकरीदेखील उत्साहाने मराठी भजने म्हणत व मराठी शेतकरीही तितक्याच उत्साहाने कानडी भजने म्हणत. भाषेची अडचण जराही जाणवत नसे. सर्व शेतकऱ्यांच्या छातीवरील बिल्ले, तसेच राहुट्यांवरील फलक हे मराठीतच होते व शरद जोशींची आंदोलन नगरीत रोज संध्याकाळी होणारी भाषणेही मराठीतच होत होती. पण त्याला कोणाही कानडी बोलणाऱ्याचा विरोध नव्हता.
 आपल्या एका जाहीर भाषणात जोशी म्हणाले, "आमच्या शेतीमालाला योग्य भाव द्यायला जर गुंड्र राव तयार असतील, तर अख्खा महाराष्ट्र कर्नाटकात घालायला शेतकऱ्यांच्या वतीने मी तयार आहे आणि तसा भाव जर अंतुले देणार असतील, तर अख्खा कर्नाटक महाराष्ट्रात घालायलाही मी तयार आहे." हे उद्गार त्यांनी निपाणीतल्याच नव्हे, तर हसन येथील भाषणातही काढले होते व सर्व उपस्थित शेतकऱ्यांनी त्यांचे टाळ्यांच्या गजरात हार्दिक स्वागत केले होते. राजकारण्यांनी ज्याचे वर्षानुवर्षे इतके भांडवल केले होते, तो महाराष्ट्रकर्नाटक सीमावाद किंवा मराठी-कन्नड भाषावाद ह्यांचा ह्या आंदोलनात मागमूसही नव्हता.
 आंदोलननगरीत एक सामुदायिक उपाहारगृह चालवले जात होते व नाममात्र किमतीत तिथे खाद्यपदार्थ उपलब्ध होते. त्याशिवाय निपाणीतील असंख्य फेरीवालेही तिथे लोकांच्या गरजा

धुमसता तंबाखू - १७७


भागवायला हजर झाले होते. निपाणीतील छोट्या छोट्या दुकानदारांनीही आपापले स्टॉल्स तिथे उभारले होते. प्रत्येक गोष्ट स्वस्तात उपलब्ध होती. निपाणीत एक कप चहाला पंचवीस पैसे पडत, तर इथे वीस पैसे. कलिंगडाची फोड निपाणीत तीस पैसे, तर इथे दहा पैसे. सगळे स्टॉल्स स्वच्छ होते, मालातही भेसळ अजिबात नव्हती. चोरीमारीचा तर एकही प्रकार संपूर्ण आंदोलनकाळात एकदाही घडला नाही. किसान मेळावे हा प्रकार आता देशात नवीन राहिलेला नाही. खूपदा राजकीय पक्ष आपल्या शक्तिप्रदर्शनासाठी असे मेळावे भरवत असतात. त्यासाठी पैसे देऊन ट्रक भरभरून शेतकरी आणले जातात. दिल्ली हे तर अशा किसान मेळाव्यांचे प्रथम पसंतीचे शहर असते. शेतकरी आणि खाद्यपदार्थ विकणारे स्थानिक फेरीवाले यांच्यात अशा सर्वच किसान मेळाव्यांत नेहमीच हाणामाऱ्या होत असतात. किसान मेळावा कोणत्याही पक्षाचा असो, स्टॉल्स हमखास लुटले जातात. रेल्वे प्लॅटफॉर्मवरच्या विक्रेत्यांना तर हा अनुभव नेहमीच येतो. म्हणूनच किसान मेळावा म्हटले की फेरीवाले तिथे फिरकतच नाहीत. पण इथला अनुभव मात्र अगदी वेगळा होता. इथे जवळ जवळ दीडशे स्टॉल्स होते व सर्व उत्तम चालले होते.
 १८ मार्चला सांघिक उपोषणाच्या आदल्या रात्री सगळे फेरीवाले म्हणाले, "उद्या तुमचे उपोषण असल्याने आमचे काहीच पदार्थ विकले जाणार नाहीत. तेव्हा आमचे स्टॉल्स आम्ही उद्या बंद ठेवतो व मालही इथेच ठेवून आम्ही निपाणीला जातो. कारण तो निपाणीला परत नेणे ह्या गर्दीत अशक्य आहे." त्यावर आंदोलक म्हणाले, “पण मालाची जबाबदारी आम्ही कशी घेणार?" ह्यावर फेरीवाल्यांचे म्हणणे होते, "आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे." आणि त्याप्रमाणे सगळे स्टॉल्स १८ मार्चला बंद होते; त्यांच्यातील माल तिथेच होता, फेरीवाले मात्र सगळे तसेच ठेवून एक दिवसासाठी निपाणीला गेले होते.
 आश्चर्य म्हणजे दसऱ्या दिवशी फेरीवाले परत आले. तेव्हा एकाही फेरीवाल्याचा स्टॉल लुटला गेला नव्हता, कोणाच्याही मालाला शेतकऱ्यांनी हातसुद्धा लावला नव्हता! आंदोलन नगरीत हे जे घडले, ते कुठल्याही गावात घडणे अशक्य होते. परुळकरांना एक फेरीवाला म्हणाला,
  “यल्लमाच्या जत्रेत आम्ही जेव्हा दुकान उघडतो, तेव्हा देवीच्या दर्शनाला आलेली अनेक माणसे आमचे पैसे बुडवतात, माल पळवतात. पण इथे तंबाखूदेवीच्या यात्रेला जमलेल्या ह्या शेतकऱ्यांनी आमची एक पैसुद्धा बुडवली नाही."
 चाकणच्या कांदा आंदोलनाप्रमाणे इथेही जोशींनी आंदोलकांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली होती. निपाणीच्या डॉक्टरांनी एक खास तंबू उभारला होता व तिथे ते औषधोपचार करत असत. भोज ह्या गावचे तरुण सरपंच डॉ. अद्गौंडा पाटील आपला गावात जोरात चालणारा दवाखाना सोडून इथे १४ मार्चपासून संपूर्ण वेळ हजर होते. त्याच गावचे डॉ. माने व डॉ. सदलगे यांचीही त्यांना मदत होत होती. डॉ. ध्रुव मंकड हा मुंबईतील एक उमदा तरुण डॉक्टर संपूर्ण आंदोलनकाळात तिथेच तळ ठोकून होता. दुर्गम व कुठलाच डॉक्टर नसलेल्या खेड्यांत राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही विनामूल्य वैद्यकसेवा म्हणजे एक पर्वणीच होती.

१७८  अंगारवाटा... शोध शरद जोशींचा 


गुरुवार, दोन एप्रिलला आंदोलन नगरीपासून निपाणी शहरापर्यंत, तिथून शहराची मुख्य बाजारपेठ व इतर महत्त्वाचा भाग, आणि तिथून मग परत आंदोलन नगरीत असा एक भव्य मोर्चा शेतकऱ्यांनी काढला. मोर्यात सुमारे ४०,००० शेतकरी हजर होते; पण सगळा मोर्चा इतका शिस्तबद्ध होता, की आपल्या लाठ्या हलवत रस्त्याच्या कडेला उभे राहण्यापलीकडे पोलिसांना काहीच काम नव्हते. एरव्ही मोर्चा म्हणजे काही ना काही गडबड व्हायचीच, पण हा मोर्चा इतका मोठा असूनही इतका सुनियोजित व शांत कसा, ह्याचे पोलिसांनाच नव्हे तर सगळ्या निपाणी गावालाच खूप आश्चर्य वाटले होते. ज्याच्यात्याच्या तोंडी त्यादिवशी तोच एक विषय होता.
 वयोवृद्ध गोपीनाथ धारिया ऊर्फ भाई हेही ह्या मोऱ्यांत आवर्जून सामील झाले होते. चालताना एकदा ठेच लागून ते पडले. हातापायाला जबर मार लागला, डोके दगडावर आपटून रक्त येऊ लागले. 'भाई, तुम्ही एखाद्या खुर्चीत बाजूला बसून राहिलात तरी चालेल, असे सांगत अनेक नेत्यांनी त्यांना थोडा आराम घ्यायचा सल्ला दिला. पण भाईंचा उत्साह कायम होता. तशाही परिस्थितीत ते शेवटपर्यंत त्या सुमारे आठ किलोमीटरच्या मोर्ध्यात कडक उन्हाची पर्वा न करता चालत होते. खरेतर ते एक बडे बागाइतदार होते, प्रतिष्ठित कुटुंबातले होते; पण एखाद्या सामान्य कार्यकर्त्याप्रमाणेच वावरत होते. स्वतःसाठी कुठलीही खास सवलत त्यांना नको होती.
 पुण्याच्या माणूस साप्ताहिकाचे संपादक श्रीभाऊ माजगावकर त्या दिवशी निपाणीत हजर झाले. नाशिक आंदोलनाच्या वेळीही ते हजर होते. त्यांच्याच आग्रहावरून परुळकरांनी 'योद्धा शेतकरी' व पुढे 'रक्तसूट' या लेखमाला लिहिल्या. मोर्चा पाहून ते अतिशय प्रभावित झाले होते. म्हणाले, "हा विराट मोर्चा म्हणजे सत्याग्रही शेतकऱ्यांचा अजस्त्र आणि पवित्र असा जणू गंगौघ. नुसत्या दर्शनानेदेखील पावन व्हावे अशी ही आगळी गंगा!"
 योगायोग म्हणजे 'सोबत'कार ग. वा. बेहेरे हेही त्या दिवशी निपाणीला येऊन आंदोलनाची पाहणी करून गेले.

 शुक्रवार, तीन एप्रिलला निपाणी गावात मूठभर व्यापारी आणि त्यांच्या चेल्यांनी एक मोर्चा काढला होता. आदल्या दिवशीच्या शेतकऱ्यांच्या मोर्ध्याला उत्तर म्हणून. निपाणीतील गावकऱ्यांचा ह्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा नाहीए हे दाखवणे हा त्यामागचा उद्देश. मोर्ध्यात तशी दीड-दोनशेच माणसे होती, पण त्यांनी जाता जाता सुभाष जोशी यांच्या गावातील घरावर दगडफेक केली, घरासमोर उभ्या असलेल्या त्यांच्या मोटार सायकलची व रस्त्यात उभ्या केलेल्या इतरही अनेक मोटार सायकलींची नासधूस केली. शेतकरीनेत्यांच्याविरुद्ध नालस्ती करणाऱ्या घोषणा दिल्या. अनेक घरांवर दगडफेक केली. गोपीनाथभाईंच्या घराच्या तर सगळ्याच खिडक्या दगडफेक करून फोडल्या गेल्या. नंतर गावात मोर्ध्याचे रूपांतर एका सभेत झाले. सभेत मात्र काही स्थानिक नेत्यांनी अनपेक्षितपणे शेतकरी आंदोलनाला आपला

धुमसता तंबाखू - १७९


पाठिंबा जाहीर केला. व्यापाऱ्यांची तशी थोडीशी फजितीच झाली.
 दगडफेकीची व मोटार सायकलींची नासधूस केल्याची बातमी आंदोलननगरीत पोचताच अकोळ व निपाणीमधले दीड-दोन हजार चिडलेले तरुण शेतकरी लगेच प्रतिमोर्चा घेऊन निपाणीत जायला निघाले. प्रत्येकाच्या हातात झेंडे लावलेल्या लाठ्या होत्या. व्यापाऱ्यांच्या चेल्यांना चांगला धडा शिकवायचा त्यांचा निर्धार होता. काही स्थानिक नेत्यांनी उत्साहाच्या भरात त्यांना तसे करायला प्रोत्साहनही दिले, पण जोशींनी आपल्या भाषणात त्यांना थोपवले. 'कुठल्याही प्रकारे आपण दुसऱ्यांवर हात उगारायचा नाही. एकही काठी आंदोलनात दिसता कामा नये. समोरचा कसाही वागो, आपण मात्र संयम, शिस्त आणि शांतता पाळायची.' असा जोशींचा आदेश होता. त्याचबरोबर आजच्या निपाणीतील हिंसक मोाला जबाबदार असलेल्या वीस व्यापाऱ्यांची व त्यांच्या सहकाऱ्यांची एक यादीही त्यांनी आपल्या भाषणात दोन वेळा वाचून दाखवली व सहा एप्रिलपर्यंत त्यांना पोलिसांनी अटक केली नाही, तर त्यानंतर ५०,००० शेतकरी सत्याग्रहासाठी निपाणी गावात प्रवेश करतील असेही त्यांनी जाहीर केले.
  'सहा एप्रिलच्या दुपारपर्यंत सगळ्या आंदोलकांना आम्ही इथून हुसकावून लावणार आहोत,' असे आश्वासन एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने व्यापाऱ्यांना दिल्याची बातमी शेतकरीनेत्यांच्या कानावर आली होती, पण त्यांनी त्याची फारशा गांभीर्याने दखल घेतली नाही.
 अलिबागचे एक प्राध्यापक व समीक्षक अरविंद वामन कुळकर्णी यांच्याविषयी इथे लिहायला हवे. साहित्यक्षेत्रातील ज्या फार थोड्या व्यक्तींनी त्या काळात शरद जोशींच्या आंदोलनाची आस्थेने दखल घेतली त्यांच्यातले हे एक. त्याआधी पाच महिने, गेल्या नोव्हेंबरमध्ये, त्यांनी ऊस आंदोलन जवळून पाहण्यासाठी नाशिकचा दौराही केला होता; पण त्यावेळी जोशी तुरुंगात असल्याने दोघांची गाठ पडली नव्हती. पुढे कुळकर्णीनी शेतकरी आंदोलनासंबंधात लिहिलेला एक लेख निपाणीत आंदोलन सुरू असताना शरद जोशींच्या वाचनात आला. तो त्यांना आवडला आणि ते म्हणून गेले की, 'या माणसाला भेटायला पाहिजे.' आंदोलकांच्या गर्दीत उभे असलेले विश्वासराव भोजकर ओरडले, 'अहो, तो माझा लाडका पुतण्या आहे. त्यावर शरद जोशी म्हणाले, 'तार करून बोलवा त्यांना.' विश्वासरावांनी त्वरित अलिबागला तार करून कळवले की, 'शरद जोशी तुला भेटू इच्छितात, लगेच ये.' त्यानुसार नाशिकप्रमाणेच ते सुरेशचंद्र म्हात्रे ह्या आपल्या प्राध्यापक स्नेह्यांसोबत त्यांच्याच याझदी मोटरसायकलवरून ३ एप्रिल १९८१ रोजी सकाळी आठ वाजता अलिबागहून निघाले. साधारण बारा तासांचा प्रवास करून रात्री आठच्या सुमारास निपाणीला पोचले.
 त्याच रात्री उशिरा त्यांची शरद जोशींबरोबर गाठ पडली. जोशींना प्रत्यक्ष भेटण्याचा त्यांचा तो पहिलाच प्रसंग. "मुख्यमंत्र्यांच्या गावचे तुम्ही! आम्हाला वाटलं हेलिकॉप्टरनेच याल!" असे म्हणत, थट्टामस्करी करतच जोशींनी दोघांचे स्वागत केले. प्रत्यक्ष रास्ता रोको जिथे चालू होते तिथेच एका छोट्या झोपडीत स्वतः जोशी यांनीही त्या रात्री मुक्काम केला
१८० अंगारवाटा... शोध शरद जोशींचा


होता. हे अगदी अनपेक्षित होते. बहुतेकदा नेते मंडळी दूर कुठेतरी सरकारी डाक बंगल्यात किंवा एखाद्या चांगल्या हॉटेलात मुक्काम करत असत. जोशींचा साधेपणा सर्वांनाच भावणारा होता. ज्या अनौपचारिकपणे जोशी सगळ्या कार्यकर्त्यांबरोबर मिळूनमिसळून वागत होते त्याचेही दोघांना खूप आश्चर्य वाटले.
 आपली मोटरसायकल ह्या दोघांनी शरद जोशींच्या झोपडीच्या बाहेर ठेवली होती व पुढले जवळजवळ चार तास गप्पांच्या ओघात ते तिथे फिरकलेही नाहीत. मोटरसायकलवर आपल्या दोघांचे सामान ठेवलेले आहे हे ते पार विसरूनही गेले होते. पण त्यांनी ठेवलेले त्यांचे सर्व सामान तसेच्या तसे सुरक्षित राहिले होते, ही गोष्ट कुळकर्णी यांनी नंतर आपल्या लेखात आवर्जून नमूद केली होती. रात्री अकरा वाजता सगळ्यांचे एकत्रच जेवण झाले. पिठले, भाकरी, चटणी, आंबील व शेवटी दहीबुत्ती. हजारो आंदोलक शेतकऱ्यांसोबत उघड्यावरती एकत्र जेवणे हा खूप रोमांचक अनुभव होता. जेवताना दिवसभर काय घडले व उद्या काय करायचे आहे ह्याचीच चर्चा सुरू होती.
 ह्या आंदोलनात कुळकर्णी व म्हात्रे यांना जोशी यांचे व शेतकरी संघटनेचे जे दर्शन घडले त्यामुळे दोघेही अतिशय प्रभावित झाले. दोघांनीही पुढे आंदोलनात सक्रिय भाग घेतला. आंदोलनाविषयी कुळकर्णीनी सोबत साप्ताहिकात व इतरत्रही बरेच लेखन केले. म्हात्रे यांनीतर त्यानंतर आपले सगळे जीवनच शेतकरी संघटनेला अर्पण केले.
 दोन आणि तीन एप्रिलच्या सभा विशेष महत्त्वाच्या होत्या. कारण निपाणीतील शेतकऱ्यांनी काढलेल्या व नंतरच्या व्यापाऱ्यांनी प्रायोजित केलेल्या प्रतिमोामुळे वातावरण बरेच तंग झाले होते. इतके दिवस रास्ता रोको करून शेतकरीही आता काहीसे इरेस पेटले होते. संयम कमी होत चालला होता. ह्या सभांमधून वेगवेगळ्या नेत्यांनी मांडलेले काही विचार इथे संक्षेपाने मांडणे उपयुक्त ठरेल. परुळकर यांनी आपल्या लेखमालेत उद्धृत केलेल्या भाषणांमधील हे अंश आहेत.
 तंबाखू कामगार महिलांच्या नेत्या अक्काताई कांबळे म्हणाल्या :
 "माझ्या शेतकरी बांधवांनो, डीएसपी काय, पण त्याचा बाप आला तरी तुम्ही रस्त्यावरून उठू नका! ज्यावेळेला हे दलाल शेतकऱ्यांच्या पाया पडतील, तेव्हाच हे आंदोलन संपणार, त्याआधी नाही. आमच्या तंबाखूला योग्य भाव मिळाल्याशिवाय आम्ही हलणार नाही, आम्हाला खुशाल अटक कर, असं डीएसपीला सांगायचं.... तुमच्यासाठी आम्ही आमच्या रोजगाराची, मुला-बाळांचीसुद्धा फिकीर करायची नाही असं ठरवलंय. वखारीतील आमचं काम बंद पडलं तर आम्ही दगड फोडून पोट भरू, पण आता ह्या दलालांना सोडणार नाही. आम्ही आमच्या नवऱ्यांनापण सांगितलंय, की जरी आम्ही तुमच्या लग्नाच्या बायका असलो, तरी आंदोलन चालू आहे तोपर्यंत आम्ही तुमच्या कोणी नव्हेत. आम्ही फक्त आंदोलनातल्या सत्याग्रही आहोत!"

धुमस्वता तंबाखू - १८१



 अकोळ युवक संघाचे नेते आय. एन. बेग म्हणाले :
 "सगळ्या तंबाखू शेतकऱ्यांच्या वतीने आमच्या ह्या वाघिणींना, ह्या कामगारभगिनींना मी सर्वांत प्रथम लवून मानाचा मुजरा करतो. शेतकऱ्यांना त्यांनी जो अभूतपूर्व पाठिंबा दिला आहे, त्याला इतिहासात तोड नाही.... काल संध्याकाळपासून निपाणांमध्ये जाणूनबुजून दहशतीचं वातावरण निर्माण करण्यात येत आहे. तंबाखू व्यापाऱ्यांनी व त्यांच्या पैशावर निवडून आलेल्या आमच्या आमदार मंडळींनी इथून पुढं सत्याग्रही शेतकऱ्यांना निपाणीत पाय ठेवू द्यायचा नाही असा चंग बांधला होता. पण त्यांचा हा प्रयत्न कामगार स्त्रियांनी उधळून लावला... आमच्या निपाणीमध्ये मुसलमानांचे पाच मोहल्ले आहेत; त्यांतील बागवानांचा मोहल्ला व्यापाऱ्यांच्या बाजूला आणि इतर चार मोहल्ले सर्वसामान्य जनतेच्या बाजुला, असं चित्र आहे. ह्या बागवान मुसलमानांच्यातील काही व्यापारी आहेत, काहींचा ट्रकचा व्यवसाय आहे. माझ्या ह्या बागवान बांधवांना मी एक इशारा देऊ इच्छितो- त्यांनी वेळीच सावध होऊन व्यापाऱ्यांचा नाद सोडावा आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहावं. ... आज सकाळपासून निपाणीत 'शरद जोशी ब्राह्मण आहेत, सुभाष जोशी ब्राह्मण आहेत, ह्या ब्राह्मणांच्या नेतत्वाखाली जनसंघाचे एजंट घसले आहेत' वगैरे अतिशय खालच्या पातळीवरचा प्रचार व्यापाऱ्यांच्या चमच्यांनी सुरू केला आहे. शेतकऱ्यांच्या वतीने मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो, की हा लढा कणा ब्राह्मणासाठी, हरिजनासाठी, मराठ्यासाठी, लिंगायतासाठी किंवा मुसलमानासाठी चाललेला नाही. इथं जातीचा, धर्माचा, भाषेचा कुठलाच प्रश्न निर्माण होऊ शकत नाही. मी स्वतः मुसलमान आहे. ह्या भागातील मुसलमान शेतकऱ्यांच्या वतीनं मी सांगतो, की शरद जोशी हे आम्हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने किसानांच्या क्रांतीचे पैगंबर आहेत!"
 ह्यानंतर सुभाष जोशी ह्यांचेही भाषण झाले. आंदोलन काळातील त्यांचे हे एकमेव भाषण. स्वतः प्रसिद्धीपासून दूर राहून शांतपणे आंदोलनाचे सूत्रसंचालन करणारे हे हाडाचे कार्यकर्ते भाषणबाजीसाठी कधीच प्रसिद्ध नव्हते. पण त्यांची कळकळ त्यांच्या देहबोलीतूनच व्यक्त व्हायची. आज सगळ्यांनी खुपच आग्रह धरला म्हणून केवळ ते भाषणासाठी उभे राहिले. ते उभे राहताच सर्व शेतकऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट करून आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले:
 "शेतकऱ्यांनी मोर्चा काढला, तेव्हा निपाणीतील घराघरातील भगिनींनी बाहेर येऊन शरद जोशींच्या पायावर घागरीने पाणी घातलं. याउलट आज व्यापाऱ्यांचा मोर्चा घरावरून जाताना ह्याच भगिनींनी दारंखिडक्या बंद करून घेतल्या! शेतकऱ्यांचा मोर्चा आणि व्यापाऱ्यांचा मोर्चा ह्याला निपाणीच्या नागरिकांनी दिलेला हा वेगवेगळा प्रतिसाद फार अर्थपूर्ण आहे. आज ह्या व्यापाऱ्यांनी एक डाव रचला होता. त्यांना वाटलं होतं, की धारियांच्या आणि माझ्या घरावर दगडफेक केली, की आंदोलन नगरीतले शेतकरी चिडून गावात घुसतील; त्यांची आणि भाडोत्री गुंडांची मारामारी सुरू होईल. तसं झालं की पोलीस त्याचं निमित्त करून बळाचा वापर करतील व आंदोलन नगरी उधळून रस्ता खुला करतील. पण सत्याग्रही शेतकऱ्यांनी संयम पाळला. व्यापाऱ्यांच्या ह्या कारस्थानाला ते बळी पडले नाहीत... इथं आलेला प्रत्येक शेतकरी घरातून
१८२ - अंगारवाटा... शोध शरद जोशींचा ________________

येताना बायकोचा आणि मुलाबाळांचा निरोप घेऊन आला आहे. प्राण गेला तरी बेहत्तर, तुरुंगात जावं लागलं तरी हरकत नाही; पण दर मिळाल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही अशी प्रत्येक शेतकऱ्यानं शपथ घेतली आहे."
 ह्या सर्वच भाषणांना जोरदार प्रतिसाद मिळत होता. आंदोलकांमधील जिगर इतके दिवस थांबूनही कायम होती. सरकारला वाटले होते, आपण दुर्लक्ष करत राहिलो तर एक दिवस सगळे शेतकरी थकून जातील, आपापली घरची व शेतावरची तुंबलेली कामे करायला आपापल्या गावी परत जातील. पण प्रत्यक्षात तसे घडले नव्हते.
 शनिवार, चार एप्रिलला वातावरण बरेच तापू लागल्याचे जाणवत होते. त्या दिवशी शरद जोशींच्या आदेशानुसार निपाणीतील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. सोमवार, सहा एप्रिलपासून निपाणीतील सर्व बँका बंद ठेवायचा आदेश शरद जोशींनी दिला होता. त्यामुळे सामान्य माणसाचीही काही गैरसोय नक्कीच होणार होती, पण खरी गैरसोय होणार होती ती रोज लाखोंचे व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांची व तोच आंदोलकांचा उद्देश होता.
 सोमवारपासून आंदोलननगरीला समांतर असलेल्या एका पर्यायी मार्गावरही रास्ता रोको करायचा निर्णय शरद जोशींनी शनिवारीच जाहीर केला होता. चिकोडीमार्गे जाणारा हा रस्ता महामार्गाला पर्याय म्हणून वाहने वापरत असत व ते आवश्यकही होते. कारण अन्यथा सगळा पुणे-बंगलोर महामार्गच ठप्प झाला असता. सगळ्यांचीच फार गैरसोय होऊ नये म्हणून हेतुतःच जोशींनी हा पर्यायी रस्ता चालू ठेवला होता. पण आता तीन आठवडे शांततापूर्ण सत्याग्रह करूनही सरकार अजिबात दाद देत नाहीए, हे बघितल्यावर नाइलाजाने सोमवारपासून तो पर्यायी रस्ताही बंद ठेवायचे ठरले होते. बहुधा त्यामुळेच त्या रात्री पोलिसांच्या हालचाली एकाएकी खूप वाढल्याचे दिसत होते. संकेश्वर, बेळगाव, चिकोडी इथून बऱ्याच एसटी बसेस मागवल्या गेल्या होत्या. एसआरपींच्या अनेक पलटणीदेखील आंदोलन नगरीच्या आसपास येऊन दाखल झाल्या होत्या. स्वतः डीएसपी निपाणीच्या डाकबंगल्यात मुक्काम ठोकून होते.
 रविवार, पाच एप्रिलचा दिवस उजाडला.
 त्या दिवशी गुढी पाडव्याचा सण होता. आंदोलन नगरी उत्साहाने वाहून निघाली होती. गुढी पाडवा म्हणजे हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. तसा कर्नाटकच्या ग्रामीण भागात सणांचा प्रभाव जास्तच असतो; आंदोलनाच्या ह्या वातावरणात तो अधिकच होता. खूप लौकर उठून सर्वांनी मोठ्या हौसेने आपापल्या राहुट्या झाडून काढल्या. भोवताली पाण्याचा शिडकावा केला. दारावर आंब्याच्या पानांची तोरणे लटकवली. स्वच्छ धुतलेल्या काठीवर आकर्षक अशा इरकली किंवा धारवाडी खणाची कुंची चढवून लख्ख धुतलेला पितळी गडू त्यावर उलटा ठेवला. सकाळच्या कोवळ्या उन्हात त्या सगळ्या ओळीने उभारलेल्या गुढ्या मोठ्या सुरेख दिसत होत्या, सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होत्या. सगळे शेतकरी आणि त्यांच्या बायका

धुमसता तंबाखू - १८३



अंघोळी उरकून, ठेवणीतले कपडे घालून इकडेतिकडे वावरत होते. आंदोलनाचा उन्माद आणि सणासुदीचा उल्हास ह्यांचे हे मिश्रण अगदी वेधक दिसत होते. तो सगळा दिवस आंदोलन नगरीत चैतन्य अगदी ओसंडून वाहत होते.
 त्या दिवशी सकाळी शरद जोशी यांनी कृश शरीराचे पण लढवय्ये म्हणून प्रख्यात असलेले दत्ता पांगम व इतर शेतकरीनेते यांच्यासमवेत पर्यायी रस्ता जिथून जायचा त्या परिसराची पाहणी केली. विजय आणि सरोजा परुळकर हेही त्यांच्यासोबत होते. त्यांना असे दिसले, की ह्या रास्ता रोकोला तेथील स्थानिक मंडळी फारशी तयार नाहीत. तेथील कार्यकर्त्यांमध्ये ह्या प्रश्नावर बरेच मतभेद होते व एक प्रकारची भीतीही होती. अशा परिस्थितीत पर्यायी रस्ता बंद करणे अशक्य होते. आपला निर्णय स्थानिक लोकांवर बळजबरीने लादायची शरद जोशींची मुळीच इच्छा नव्हती. दुपारी तीनच्या सुमारास ही मंडळी आंदोलन नगरीत परतली. त्यानंतर संध्याकाळच्या सभेत त्यांनी उद्यापासून पर्यायी रस्ता बंद करायचा बेत स्थगित केल्याचे जाहीर केले. आंदोलकांचा काहीसा अपेक्षाभंग झाला, पण आपले नेते आपल्या हिताचाच निर्णय घेतील ह्यावर सगळ्यांची श्रद्धा होती. त्यामुळे सगळे पुन्हा आपापल्या जागी बसायला गेले. महामार्गावरचा हा सत्याग्रह चालूच राहणार होता. पुन्हा एकदा घोषणा सुरू झाल्या. दुसऱ्याच दिवशी काय भयानक प्रकार घडणार आहे याची कुठल्याच आंदोलकाला त्यावेळी काही कल्पना नव्हती.
 पुढला दिवस उजाडला. सोमवार, सहा एप्रिल.
 भल्या सकाळी साधारण सहाच्या सुमारास, अगदी अनपेक्षितपणे पोलिसांच्या धडाकेबंद कारवाईला सुरुवात झाली. मोठ्या संख्येने पोलीस आंदोलन नगरीत घुसले. रस्त्यावर उभारलेल्या राहुट्या त्यांनी धडाधड पाडून टाकायला सुरुवात केली. सुरुवातीला आंदोलकांना धक्काच बसला. त्यांची स्वाभाविक भावना पोलिसांना प्रतिकार करायची होती; पण शरद जोशींनी त्यांना तत्काळ थोपवले. त्यांच्या आदेशानुसार मग आंदोलकांनी पोलिसांना विरोध केला नाही. कसलाही वावगा प्रकार होऊ देऊ नका, असे जोशींचे निक्षून सांगणे होते. "आधी बाकी साऱ्यांना अटक करा व नंतर अर्थात मलाही अटक करा, पण मी बाहेर असलो तर आंदोलकांना नक्की शांत ठेवेन," असे त्यांनी पोलिसांना सांगितले.
 पण त्यांचा कुठलाही सल्ला ऐकायच्या मनःस्थितीत पोलीस नव्हते. त्यांनी सर्वप्रथम शरद जोशी, सुभाष जोशी, रमेश शिपुरकर व शुभा शिपुरकर ह्या चौघांना अटक केली आणि त्यांना तत्काळ जीपमध्ये बसवून आंदोलनस्थळापासून दूर नेले. आधी खडकलाट येथील पाऊणशे वर्षांच्या मामी दिवाण, शिर्ष्याची वाडी येथील मालतीबाई शिंदे, निपाणीच्या अक्काताई कांबळे वगैरे महिलानेत्यांनी व त्यांच्यापाठोपाठ लगेचच सुमारे दोन-अडीचशे स्त्रियांनी स्वतःला अटक करवून घेतली. साडेसातपर्यंत सत्तरएक बसगाड्या भरून आंदोलक तेथून दूरवर कुठेतरी रवाना झाले होते. पण त्याच्या अनेक पट आंदोलक अटकेची वाट पाहत शांतपणे रस्त्यावर बसून होते.


१८४ = अंगारवाटा... शोध शरद जोशींचा  दहा वाजेपर्यंत अटक झालेल्यांच्या दीडशे गाड्या तिथून रवाना झाल्या होत्या. डॉक्टर ध्रुव मंकड स्टेथोस्कोप व पांढरा अ‍ॅप्रन बाजूला ठेवून टेलिफोन सांभाळत होते, ठिकठिकाणचे निरोप घेत होते. आंदोलन नगरीत सतत घोषणा चालूच होत्या व त्याचवेळी एकेक बस येत होती, आंदोलकांना घेऊन दूर कुठेतरी रवाना होत होती. मॅजिस्ट्रेट सर्वांना सरसकट १४ दिवसांची कस्टडी देत होते, पण त्यामुळे आंदोलकांचे मनोधैर्य कणभरही कमी झाले नव्हते. पुरुषांना बेल्लारी व गुलबर्गा येथील तुरुंगात व स्त्रियांना विजापूर येथील तुरुंगात रवाना केले जात असल्याची बातमीही नंतर आली.
 दहा-साडेदहाच्या सुमारास रोजच्याप्रमाणे आजूबाजूच्या खेड्यांतून पिठले-भाकऱ्याआंबील भरलेल्या बैलगाड्या घेऊन आसपासचे शेतकरी आंदोलन नगरीत येऊ लागले. एकूण परिस्थिती पाहून तेही लगोलग ह्या सत्याग्रहात सामील होऊ लागले.
  आंदोलक दबत नाही आहेत हे बघून मग शेवटी पोलिसांनी पूर्वीच ठरवलेले आपले अस्त्र बाहेर काढले. अनुचित असे एकही कृत्य शेतकऱ्यांनी केले नसताना व साधी बोलाचालीही कुठे झाली नसताना पोलिसांनी एकदम आक्रमक भूमिका घेतली. सर्व शेतकरी अटक करण्यासाठी येणाऱ्या बसेसची वाट पाहत रांगेत उभे असताना काही पोलीस पुढे झाले आणि त्यांनी त्या शेतकऱ्यांना लाठ्यांनी मारायला सुरुवात केली. 'बस खाली, बस खाली, असे ते मारताना कानडीत म्हणत होते. त्यामुळे बावरलेले शेतकरी खाली बसू लागले. पण खाली बसलेल्या शेतकऱ्यांनाही पुन्हा मारायला पोलिसांनी सुरुवात केली. मारताना 'गप बस, गप बस' असे पोलीस म्हणत होते. काही शेतकऱ्यांनी उभे राहून पोलिसांना 'आम्ही तुमच्याच आदेशांचे पालन करत आहोत' असे सांगायचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांच्या तोंडावरच पोलिसी लाठ्यांचे तडाखे बसू लागले. हा लाठीमार इतका जोरदार होता, की अनेक शेतकरी अक्षरशः रक्तबंबाळ झाले. त्यातलेच एक होते मालतीबाई शिंदे ह्यांचे वृद्ध पती. तिथेच हजर असलेल्या एका सेवाभावी डॉक्टरांनी तातडीचे उपचार करून रक्तस्त्राव तात्पुरता थांबवला, पण कवटीला टाके घालणे अत्यावश्यक होते व त्यासाठी निपाणीतल्या एखाद्या हॉस्पिटलमध्ये त्यांना नेण्यासाठी धावपळ सुरू झाली.
 हे सगळे काय चालले आहे, एकाएकी पोलीस आपल्यावर असे तुटून का पडले आहेत आणि आपला गुन्हा तरी काय आहे हेच शेतकऱ्यांना कळेना. इतका वेळ पोलिसांचा बराच मार निमुटपणे खाल्लेले काही तरुण शेतकरी आता मात्र खुपच चिडले व काहीतरी प्रतिकार करण्याची स्वाभाविक प्रेरणा म्हणून त्यांच्यातील काही जणांनी रस्त्याकडेला पडलेले काही दगड पोलिसांवर फेकून मारले.
 नेमक्या ह्याच क्षणाची जणू पोलीस वाट पाहत होते. 'जमाव हाताबाहेर चालला आहे' असे जाहीर करत त्यांनी अश्रुधुराची नळकांडी फोडायला सुरुवात केली. पण वारा जोराचा असल्याने शेतकरी तो अश्रुधूर सहन करू शकले. आजूबाजूच्या शेतात पडणाऱ्या नळकांड्यांवर खेड्यांतल्या बायकांनी ओंजळीने माती टाकायला सुरुवात केली व ती नळकांडी त्यांनी निष्प्रभ करून टाकली. हे तंत्रही त्यांचे त्यांनीच, कोणीही न शिकवता,


धुमसता तंबाखू - १८५



शोधले. मग तीनएकशे पोलिसांच्या नव्या तुकडीने पुन्हा एकदा जोरदार लाठीमार करायला सुरुवात केली. जमावातील काही जणांनी चिडून त्यांच्यावर दगडफेक केली. काही पोलिसांना ते दगड लागले. त्याबरोबर पोलिसांची ती तुकडी मागे हटली व बंदूकधारी पोलिसांची एक तुकडी पुढे झाली. त्यांनी सरळ गोळीबारच सुरू केला. फटाफट अनेक शेतकरी घायाळ होऊन जमिनीवर कोसळू लागले.
 आता मात्र शेतकऱ्यांचा धीर सुटला. जीव वाचवण्यासाठी ते दुतर्फा असलेल्या शेतांमधून पळू लागले. लाठीधारी पोलिसांनी त्या निःशस्त्र शेतकऱ्यांचा पाठलाग सुरू केला व एकेक करत शेतकऱ्याला पकडून झोडपायला सुरुवात केली! आंदोलन नगरीच्या परिसरात चार-पाच मैलांपर्यंत असा पाठलाग व लाठीमार सुरू होता.
 बाहेरून आलेल्या काही सत्याग्रहींनी चिडून गावाबाहेर असलेली एक वखार पेटवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडे कोणाकडेच आग लावायची काही साधने नव्हती; हे काही धंदेवाईक आंदोलक नव्हतेच. बहुतेकांच्या आयुष्यातील अशा प्रकारच्या आंदोलनाचा हा पहिलाच प्रसंग होता. साध्या काडीपेटीचा वापर करून त्यांनी जमा केलेला थोडासा कडबा पेटवला आणि तो त्या वखारीवर टाकला. झाले! पोलिसांना जणू आणखी एक निमित्तच मिळाले! खरेतर वखारीचे नुकसान काहीच झाले नव्हते, कारण घमेलेभर कडबा घेऊन फारशी आग भडकणे शक्यही नव्हते. पण त्याचा फायदा घेऊन पोलिसांनी जीव वाचवण्यासाठी पळणाऱ्या शेतकऱ्यांवरही सरळ गोळीबार सुरू केला व त्यात दोन शेतकऱ्यांचा जीव गेला. अनेक जण गोळ्या लागून जखमीही झाले. आंदोलकांपैकी स्त्रियांनाही जबरदस्त लाठीमार झेलावा लागला.
 थोड्याच वेळात संपूर्ण आंदोलन नगरी उद्ध्वस्त झाली. सोमवार, सहा एप्रिलच्या त्या गोळीबारात एकूण बारा शेतकरी हुतात्मा झाले होते. जखमींची संख्या तर खूपच जास्त होती.
 निपाणीत ह्या सगळ्या बातम्या पोचत होत्या व गावामध्ये एकच हलकल्लोळ माजला होता. निपाणीतील सर्वसामान्य नागरिकांची सहानुभूती उघडउघड आंदोलकांना होती; कारण आंदोलकांच्या मागण्या अगदी न्याय्य आहेत आणि सरकारने केवळ दुष्टपणे त्यांच्याकडे दर्लक्ष केले आहे. सरकार त्यांचा अगदी अंतच पाहत आहे आणि गरीब शेतकऱ्यांना असे क्रूरपणे वागवणे कुठल्याच लोकशाही शासनाला शोभणारे नाही असेच नागरिकांचे मत होते. स्वतः व्यापारीदेखील पोलीस कारवाईने स्तंभित झाले होते; ती इतकी कठोर असेल अशी त्यांना कल्पना नव्हती.
 अटक केलेल्या सत्याग्रहींना पुढचे बारा दिवस तुरुंगात डांबून ठेवले गेले. स्वतः शरद जोशी बेल्लारी येथील तुरुंगात होते. तिथे डांबलेल्या इतर शेतकऱ्यांपुढे रोज जोशी प्रबोधनपर भाषणे करत. एका अर्थाने त्यांना मिळणारी ही सक्तीची विश्रांतीच होती व तिचा त्यांनी आंदोलनाच्या दृष्टीने पूर्ण उपयोग करून घेतला. आधी त्यांचे भाषण व मग त्यावर उपस्थितांमध्ये चर्चा असे काहीसे प्रशिक्षणात्मक स्वरूप ह्या सभांना लाभले. इथल्याच एका सभेत 'भीक नको, हवे घामाचे दाम' ह्या शेतकरी संघटनेच्या सुप्रसिद्ध घोषणेचा जन्म झाला.
 बारा दिवसांच्या कारावासानंतर शेतकऱ्यांना सोडून देण्यात आले, पण सर्व नेत्यांना मात्र


१८६ - अंगारवाटा... शोध शरद जोशींचा

आणखी सात दिवस हिंडलगा येथील तुरुंगात डांबण्यात आले. शेवटी २५ एप्रिल रोजी शरद जोशींची व इतर नेत्यांची सुटका झाली.
 या आंदोलनाचे फलित म्हणजे २० एप्रिल १९८१ रोजी कर्नाटक शासनाने तंबाखूच्या खरेदी-विक्रीसाठी एक सहकारी संस्था स्थापन करायची घोषणा केली. तंबाखू व्यापाऱ्यांचे महत्त्व त्यामुळे अगदी नाहीसे झाले असे म्हणता येणार नाही, पण शेतकऱ्यांच्या जीवनावरची त्यांची घट्ट व जाचक अशी पकड त्यामुळे थोडीफार सैल झाली.
 यानंतरचा एक प्रसंग नोंदवण्याजोगा आहे. १ मे हा विजयदिन म्हणून साजरा करायचे सर्व स्थानिक शेतकऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी ठरवले. शरद जोशींची उपस्थिती साहजिकच अपरिहार्य होती, पण इथेच शासनाने खोडा घातला; शरद जोशींनी तालुक्यात येण्यावरच सरकारने बंदी घातली. विजयसभा घ्यायची तरी कुठे, असा आता प्रश्न उभा राहिला. बराच खल केल्यावर त्यावर एक तोडगा काढला गेला. निपाणीच्या अर्जुन नगर भागात एक कॉलेज होते व ते नेमके महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर होते. कॉलेजची इमारत महाराष्ट्रात तर कंपाउंडची भिंत कर्नाटकात! त्याच जागी एका शेतात मग ही विजयसभा झाली! कर्नाटकच्या हद्दीत प्रचंड पोलीस बंदोबस्त होता, पण शरद जोशी भाषण करत होते ते व्यासपीठ महाराष्ट्रात असल्याने कर्नाटक पोलीस त्यांना अटक करू शकले नाहीत! शरद जोशी महाराष्ट्रात तर श्रोते कर्नाटकात! प्रसंग म्हटले तर गमतीदार आणि म्हटले तर राज्या-राज्यांतील सीमा किती तकलादू आहेत हेही दाखवणारा.
 केवळ शेतकरी संघटनेच्याच नव्हे तर एकूणच भारतातील सामाजिक चळवळीच्या इतिहासात निपाणीच्या ह्या तंबाखू आंदोलनाचे खूप महत्त्व आहे. तेवीस दिवस शेतकरी शांततापूर्वक एका जागी बसून सत्याग्रह करू शकतात ही घटनाच अगदी आगळी होती.
 या आंदोलनातील दोन हजाराहून अधिक तंबाखू कामगार स्त्रियांचा रोजचा सहभाग खूप उल्लेखनीय होता. त्यांची पूर्वीची अगतिक आणि लाचार अशी अवस्था ज्यांनी पहिली होती, त्यांच्या दृष्टीने तर ह्या स्त्रियांनी असे धीटपणे पुढे येणे, आंदोलनात सहभागी होणे हा एक चमत्कारच होता.
 शेतकरी आणि कामगार इथे एकत्र लढा देत होते हेही एक अनोखेपण होते.
  शेतकरी आंदोलन हे बड्या बागाइतदारांचे आंदोलन नक्की नाही हेही इथे पुन्हा एकदा अधोरेखित झाले होते; कारण ९५ टक्के तंबाखू शेतकरी हे अल्पभूधारकच होते.
 प्रांतवाद, सीमावाद हे सगळे राजकीय नेत्यांनी स्वतःच्या प्रतिमानिर्मितिसाठी निर्माण केलेले क्षुद्रवाद आहेत; खरा प्रश्न हा आर्थिक आहे, शेतकऱ्याच्या व म्हणून एकूण देशाच्या दारिद्र्याचा आहे; सामान्य माणसाच्या मनात हे भेदभाव नसतात, ते हेतुतः निर्माण केले जातात हे शरद जोशींचे मत इथे पुन्हा एकदा सिद्ध झाले होते.
 एक शेतकरी सांगत होते, “पूर्वी आम्ही निपाणीला एखाद्या हॉटेलात किंवा सलूनमध्ये किंवा दुकानात गेलो, तर मालक आमच्याकडे ढुंकूनसुद्धा बघत नसे. पण आता लाल बिल्ला


धुमसता तंबाखू - १८७

लावलेला कोणी शेतकरी आला तर मालक लगेच अदबीने त्याचं स्वागत करतो, त्याला काय हवं-नको ते विचारतो."
 'तंबाखूला भाव मिळो वा न मिळो, निदान शेतकऱ्याला तरी ह्या आंदोलनामुळे भाव मिळायला लागला' ही एक सार्वत्रिक प्रतिक्रिया होती. शेतकऱ्यांचा आत्मसन्मान जागवणे हे ह्या आंदोलनाचे एक महत्त्वाचे फलित होते.
 आंतरराष्ट्रीय पातळीवर ऊस व कांदा आंदोलनापेक्षा या आंदोलनाला अधिक प्रसिद्धी मिळाली होती. बीबीसीचा उल्लेख मागे केलेलाच आहे. शरद जोशी यांनी नंतर निपाणीत पोलिसांनी केलेल्या अत्याचाराची माहिती देणारे एक पत्र आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस संघटनेलादेखील लिहिले होते.
 त्या मानाने भारतीय वृत्तपत्रांनी मात्र ह्या अभूतपूर्व आंदोलनाची फारशी दखल घेतली नाही; मुंबईच्या झुंजार पत्रकार ओल्गा टेलिस ह्या एक सम्माननीय अपवाद. त्यांनी निपाणीला येऊन मुक्कामच केला होता व आंदोलनाविषयी लिहिलेही.
 शरद जोशींचा आत्मविश्वास ह्या आंदोलनानंतर बराच वाढला. कांदा व ऊस पिकवणाऱ्या शेतकऱ्याप्रमाणे तंबाखू पिकवणारा शेतकरीदेखील पिढ्यानपिढ्यांची लाचारी दूर करून अन्यायाविरुद्ध उभा राहू शकतो, पोलिसांना न घाबरता आंदोलन करू शकतो हे आता सिद्ध झाले होते. तेवीस दिवस आंदोलनाची तीव्रता कायम ठेवणे सोपे नव्हते.
 शिवाय या खेपेला महाराष्ट्राच्या सीमेबाहेर प्रथमच त्यांनी आंदोलन केले होते. चाकण व नाशिक ह्यांच्यापुढची ही पायरी होती. आंदोलनाने घेतलेली ही एक मोठीच झेप होती.


१८८ - अंगारवाटा... शोध शरद जोशींचा 

पांढरे सोने, लाल कापूस

काही जागतिक घटनांचे अगदी अनपेक्षित आणि दूरगामी असे परिणाम समाजावर होत असतात. अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध ही अशीच एक घटना. तसे भारतातील हातांनी विणलेले कापड ऐतिहासिक काळापासून जगभर जात होते; एखाद्या अंगठीतून संपूर्ण धोतर बाहेर काढता येईल इतकी तलम अशी बंगालची मलमल युरोपातील उच्चभ्रू वर्गात खूप लोकप्रिय होती. पण पुढे इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती घडून आली व तिथे यंत्रमागावर प्रचंड प्रमाणावर कापडाचे उत्पादन होऊ लागले. भारतातून त्यांच्याकडे कापड जाण्याऐवजी त्यांनीच बनवलेले कापड भारतात येऊ लागले. त्या कापडाच्या उत्पादनासाठी इंग्लंडला लागणारा कापूस त्यांच्या देशात अजिबात पिकत नव्हता; सुमारे २० टक्के कापूस ते भारतातून व ८० टक्के कापूस अमेरिकेतून घेत होते. १८६१ ते १८६५ ह्या चार वर्षांतील अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धात अमेरिकेतून होणारा पुरवठा एकाएकी पूर्ण थांबला; त्यादरम्यान ९० टक्के कापूस ते भारतातूनच घेऊ लागले. हा सर्व कापूस मुंबई बंदरातून रवाना होई. साहजिकच भारतातील व मुख्यतः मुंबईतील कापूस व्यापाराला त्यामुळे प्रचंड चालना मिळाली. वाट्टेल तेवढा भाव देऊन इंग्लंडमधील कापडगिरण्या मुंबईहून कापूस खरेदी करू लागल्या. मुंबईतील व्यापाऱ्यांनी अभूतपूर्व असा फायदा मिळवला. कापूस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत त्यातील किती पैसा पोचला ठाऊक नाही; पण कापसाचे मुंबईतील सर्वांत मोठे व्यापारी प्रेमचंद रायचंद ह्यांनी त्याच नफ्यातून बॅकबे रेक्लमेशन उभारले व बाँबे स्टॉक एक्सचेंज सुरू केले आणि दानशूरपणे मुंबई विद्यापीठाचा राजाबाई टॉवर विनामूल्य बांधून दिला. 'एक गाडी कापूस विकायचा आणि एक तोळा सोने घ्यायचे' असे म्हटले जाई. कापसाला 'पांढरे सोने' म्हणायला सुरुवात झाली ती ह्याच काळात. या कापसाचे क्षेत्र महाराष्ट्रात बरेच मोठे आहे; मुख्यतः विदर्भात व त्या खालोखाल मराठवाड्यात. तसे पाहिले तर विदर्भ हा एकेकाळी खूप समूद्ध इलाखा म्हणून प्रसिद्ध होता. विदर्भात मलगी दिली म्हणजे ती चांगल्या घरात पडली असे मानले जाई. विदर्भात निसर्गसंपत्ती भरपूर. कोळसा, मँगनीज, लोखंड यांच्या खाणी. मोठी मोठी वीजनिर्मिती केंद्रे. घनदाट जंगले. लाकडाचा व म्हणून पेपराचा मोठा व्यवसाय. इथले शेतकरीही अन्य महाराष्ट्राच्या तुलनेत पांढरे सोने, लाल कापूस - १८९ 

संपन्न गणले जात. एकेकाळी पाच-पाचशे एकर शेती असणारे अनेक शेतकरी इथे होते. अशा मोठ्या शेतकऱ्यांसाठी विदर्भातला यवतमाळ जिल्हा विशेष प्रसिद्ध होता. (हाच जिल्हा आज मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसाठी प्रसिद्ध आहे.) तिथला कापूस प्रसिद्ध. ब्रिटिशांनी त्या काळात इथल्या कापसाच्या वाहतुकीसाठी स्वतंत्र मीटर गेज रेल्वे मार्गाचे, वळणावळणाने जाणारे, सगळा जिल्हा व्यापणारे जाळे उभारले होते. स्वातंत्र्योत्तर काळात मात्र विदर्भाची आर्थिक स्थिती खालावत गेली. इथल्या शेतीतही तसेच स्खलन झाले.
 भारतातील कापसाच्या एकूण क्षेत्रापैकी ३६ टक्के क्षेत्र महाराष्ट्रात आहे, परंतु कापसाच्या एकूण उत्पादनात मात्र महाराष्ट्राचा वाटा फक्त १७ टक्के आहे. याचे मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्रात कापसाखाली असलेल्या एकूण जमिनीपैकी फक्त ४ टक्के जमीन बागायती आहे उर्वरित ९६ टक्के पूर्णतः कोरडवाहू आहे. पावसाने दगा दिला, की कापूस उत्पादन कोसळते. महाराष्ट्रातील कापसाचे दर एकरी उत्पादनही अन्य राज्यांच्या तुलनेत खूप कमी आहे. महाराष्ट्रात एका एकरात एक क्विटलपेक्षा कमी कापूस निघतो, तर देशातील कापसाचे सरासरी एकरी उत्पादन दोन क्विटल आहे: महाराष्ट्राच्या दुप्पट.
 कापसाचे एकूण क्षेत्र अधिक असल्यामुळे साहजिकच कापसावर अवलंबून असलेल्यांची संख्याही महाराष्ट्रात बरीच मोठी आहे. परंपरेने हा शेतकरी कापूस लावत आला आहे व त्याला अन्य कुठल्या कोरडवाहू पिकांकडे वळवणे, सोयाबीनसारखा अपवाद वगळता, आजवर तरी फारसे जमलेले नाही. दरवर्षी साधारण ऑक्टोबर महिन्यात विदर्भातील कापसाचे पीक बाहेर पडते आणि दरवर्षी हा शेतकरी कर्जाच्या गाळात अधिकाधिक रुतत जातो.
 कांदा, ऊस, तंबाखू यांच्यानंतर शेतकरी संघटनेने उभारलेले महत्त्वाचे आंदोलन म्हणजे कापूस आंदोलन. ऊस आंदोलनानंतर लगेचच, १९८०-८१च्या सुमारास, शरद जोशींनी विदर्भाचा दहा दिवसांचा दौरा केला होता. पुण्यातील एक पत्रकार सतीश कामत हे त्यावेळी त्यांच्यासोबत होते. विदर्भात जायचा जोशींचा हा पहिलाच प्रसंग होता. कामत यांनी प्रस्तुत लेखकाला दिलेल्या माहितीनुसार विजय जावंधिया आणि रवी काशीकर यांनी या दौऱ्याचे आयोजन केले होते. जावंधिया जोशींच्या आधीपासूनच शेतकऱ्यांच्या चळवळीत होते; अगदी आणीबाणीच्या काळातही त्यांनी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्याविरुद्ध कापसाच्या भावावरून निदर्शने केली होती. काशीकरही सामाजिक कामात सहभाग घेणारे होते; शरद पवार यांच्याशी त्यांची व्यक्तिगत मैत्रीही होती. या दोघांनी विदर्भात दहा दिवसांत दहा जिल्ह्यांमध्ये जोशींसाठी जाहीर सभा आयोजित केल्या होत्या. कामत म्हणतात,
  “या सर्वच सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आम्ही सगळीकडे मोटारीतून फिरलो. वाटेत ठिकठिकाणी बैठका होत असत. जोशींचे विचार पारंपरिक नेत्यांपेक्षा अतिशय वेगळे होते व सर्वांना अगदी भारावून टाकत असत. या पहिल्याच दौऱ्यात जोशींनी अनेक माणसे विदर्भात जोडली व पुढे पश्चिम महाराष्ट्र किंवा मराठवाडा या भागांपेक्षा विदर्भातील कार्यकर्त्यांनीच जोशींना सर्वाधिक साथ दिली."


१९० = अंगारवाटा... शोध शरद जोशींचा 

 पश्चिम महाराष्ट्रात जे स्थान उसाला आहे तेच विदर्भात कापसाला आहे आणि उसाच्या संदर्भात सहकारी साखर कारखान्यांचे जे महत्त्व आहे तेच कापसाच्या संदर्भात एकाधिकार कापूस खरेदीला आहे. ऐंशीच्या दशकात शेतकरी संघटनेने कापूस आंदोलन सुरू केले त्यावेळी महाराष्ट्रातील कापूस उत्पादकांची परिस्थिती काय होती व त्यांच्यापुढील प्रश्नांचे नेमके स्वरूप काय होते हे समजून घेताना एकाधिकार कापूस खरेदी हा प्रकार समजून घेणे आवश्यक आहे. आज ती खरेदी बंद झाली आहे, पण त्या काळात कापूस शेतकऱ्यापुढे तो एकमेव पर्याय होता.
 एकाधिकारात मुख्यतः तीन कामे अंतर्भूत होती : कापसाची खरेदी, कापसातील सरकी काढून टाकून तो सारखा करण्याची (जिला इंग्रजीत जिनिंग म्हणतात ती) प्रक्रिया आणि अशा प्रकारे साफ केलेल्या कापसाची, म्हणजेच रुईची विक्री. खासगी व्यापाऱ्यांच्या नफेखोरीने शेतकऱ्यांचा बळी घेऊ नये अशा उदात्त उद्देशाने साधारण १९७१च्या सुमारास ही एकाधिकार खरेदी पद्धत सुरू झाली. तेव्हा बँकांचे राष्ट्रीयीकरण पूर्ण झाले होते, देश समाजवादी असल्याचे सतत जाहीर केले जात होते. ज्या काळात समाजवादाचा देशाच्या प्रत्येक धोरणावर जबरदस्त पगडा होता, त्या काळाचे हे अपत्य आहे. व्यापारी शोषण करतात, सरकार मात्र जनतेचे असल्याने ते शेतकऱ्यांचे खरेखुरे हित पाहील, ही विचारसरणी एकाधिकार खरेदी पद्धतीच्या उगमाशी होती.
  पूर्वी कापूस खरेदी महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन करत असे; पुढे त्यासाठी हे स्वतंत्र महामंडळ तयार करण्यात आले. महामंडळाची रचना सहकारी तत्त्वावर आधारित होती. महामंडळाकडे शेतकऱ्याने कापूस दिला, की काहीएक रक्कम पहिला हप्ता म्हणून शेतकऱ्याला दिली जाई. साखर कारखाने शेतकऱ्याला ऊस खरेदी केला की देत असत त्याप्रमाणे. वर्षाच्या शेवटी जो नफा होई तो शेतकऱ्यांना वाटून दिला जाई. त्याशिवाय शेअर भांडवल म्हणून, शेतकऱ्याला देय असलेल्या रकमेच्या तीन टक्के रक्कम एक स्वतंत्र भांडवल निधी म्हणून कापून घेतली जाई. कापसाच्या भावात चढउतार होतात व त्यामुळे होणाऱ्या संभाव्य तोट्यासाठी तरतूद म्हणून स्वतंत्र चढउतार निधी गोळा केला जाई. शेतकऱ्याला कापसापोटी प्रत्यक्ष द्यायची अंतिम किंमत (जी जास्त असणार ही अपेक्षा) व सरकारने पूर्वीच ठरवलेली कापसाची हमी किंमत (जी कमी असणार ही अपेक्षा) यांच्यातील तफावतीचा, म्हणजेच फायद्याचा, २५ टक्के हिस्सा हा चढउतार निधी म्हणून महामंडळ वेगळा राखून ठेवी. हा सर्व भाग सहकारी तत्त्वांशी मिळताजुळता होता.
 विदर्भातील अनेक नेते या यंत्रणेवर खूष होते, कारण ह्या महामंडळावर आता त्यांची थेट सत्ता चालणार होती. खरे तर अशा एखाद्या एकाधिकार योजनेची त्यांची प्रथमपासूनची मागणी होती. पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांना शेतकऱ्यांवर सत्ता गाजवायला व स्वतःची तुंबडी भरायला साखर कारखान्यासारखे हत्यार आहे, आपल्या हाती मात्र असे कुठलेच हत्यार नाही याची खंत त्यांना वर्षानुवर्षे सतावत होती. 'त्यांच्याप्रमाणे आमच्याही वरकमाईची काहीतरी सोय करा,' हीच त्यांची खरी मागणी होती. महामंडळामुळे ती पूर्ण झाली.


पांढरे सोने, लाल कापूस = १९१ 

विदर्भातील काही नेत्यांनी एकाधिकारशाहीचा असा काही उदोउदो केला, की तिच्या विरोधात बोलणे म्हणजे जणू काही देशद्रोहच होता! पश्चिम महाराष्ट्रातील पुढाऱ्यांना त्यांच्या सहकारी साखर कारखान्यांचा जसा अभिमान आहे, तसाच विदर्भातील पुढाऱ्यांना कापूस एकाधिकार खरेदीबद्दल असे. विदर्भाची 'अस्मिता'देखील ह्या एकाधिकार पद्धतीशी जोडून ह्या पुढाऱ्यांनी दहशतीचे वातावरण तयार केले होते.
 शरद जोशींचा ह्या योजनेच्या गाभ्याशी असलेल्या तथाकथित समाजवादी विचारसरणीला तत्त्वशःच विरोध होता. पण त्यांची भूमिका कुठच्याही इझमपेक्षा शेतकरीहिताला प्राधान्य देणारी होती. १९८०-८१च्या सुमारास, म्हणजे कापूस आंदोलन प्रत्यक्ष सुरू व्हायच्या आधीच, ते म्हणाले होते,
 "खरेदीव्यवस्था कोणतीही असो; सरकारी असो, सहकारी असो, की व्यापाऱ्यांची असो, परमेश्वराची असो की सैतानाची असो, शेतकऱ्याला उत्पादनखर्चावर आधारित रास्त भाव मिळणे हे सर्वांत महत्त्वाचे."
 १९७०च्या दशकात चीनचे सर्वेसर्वा डेंग झियाओ पिंग ह्यांनी जेव्हा साम्यवादी विचारसरणीचा त्याग करत मुक्त अर्थव्यवस्थेचा अंगीकार केला आणि विकासाच्या मार्गाने आपल्या देशाची घोडदौड सुरू केली, त्यावेळी त्यांचे एक वाक्य खूप चर्चेत आले होते. आपल्या विचारवंतांनी त्याची काहीच दखल घेतली नव्हती, कारण त्यात त्यांच्या पारंपरिक पोथीनिष्ठेला अगदी मुळावर घाव घालणारे आव्हान होते; पण पाश्चात्त्य जगात मात्र ते विधान निर्णायक महत्त्वाचे व दिशादर्शक मानले गेले होते. डेंग म्हणाले होते,
 "It does not matter whether a cat is black or white, so long as it catches mice!" ("मांजर काळे आहे की पांढरे, ह्याला काही महत्त्व नाही, ते उंदीर पकडते आहे की नाही हेच महत्त्वाचे!")
 एखादे धोरण साम्यवादी चौकटीत बसते की नाही ह्याचा विचार करत न बसता, ज्यातून देशाचा विकास होईल ते धोरण स्वीकारायचे, हा त्याचा प्रत्यक्षातील अर्थ होताः त्यामुळेच त्यांना राजकीय पटावर स्वतःच्या हाती सगळी सत्ता देणारा साम्यवाद कायम ठेवून आर्थिक पटावर मात्र संपत्तीचे सर्वाधिक निर्माण करणारी मुक्त अर्थव्यवस्था आणता आली. जोशी यांचे उपरोक्त विधानदेखील साधारण ह्याच धाटणीचे आहे.
 पुढे कापूस आंदोलन सुरू केल्यावर त्यांनी हे विधान अनेक ठिकाणी पुनःपुन्हा केले; त्यांची ती अगदी प्रामाणिक अशीच भूमिका होती. पण तसे त्यांनी म्हटल्याबरोबर विदर्भात चारी बाजूंनी त्यांच्याविरुद्ध आरडाओरडा सुरू झाला. शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार राबवत असलेल्या योजनेच्या ते विरोधात आहेत असे मानले जाऊ लागले.
 ह्या एकाधिकार योजनेबद्दलची जोशींची, त्या काळात त्यांनी वेळोवेळी मांडलेली भूमिका साधारण अशी होती:
 प्रत्यक्षात ही योजना सपशेल फसलेली आहे. विदर्भातील कापूस उत्पादकासाठी अधिक


१९२ = अंगारवाटा... शोध शरद जोशींचा 

भाव मिळवून देणे तिला कधीच जमलेले नाही. उलट ती शेतकऱ्यांचे नुकसानच करत राहिली. शेजारच्या मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश वा गुजरात यांसारख्या ज्या राज्यांमध्ये अशी काही योजना नव्हती व जिथे कापसाचा व्यापार खासगी क्षेत्रातच होता, तिथे शेतकऱ्याला कापसाचा नेहमीच अधिक भाव मिळत होता.
  आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्याला अधिक भाव देऊनही ते व्यापारी स्वतःसाठी गडगंज नफा कमवू शकत होते; याउलट शेतकऱ्याला कमी भाव देणाऱ्या महाराष्ट्रातील या योजनेला सतत प्रचंड तोटाच होत होता.
 भांडवल निधी म्हणून जी तीन टक्के कपात वर्षानुवर्षे केली गेली, त्या निधीतून कुठल्याही सूत गिरण्या काढल्या गेल्या नाहीत किंवा इतरही काही भांडवली खर्च करण्यात आला नाही. ह्या निधीचे प्रत्यक्षात काय झाले हे एक गूढच आहे. त्या निधीवरचे व्याजही अनेक वर्षे शेतकऱ्याला दिले गेले नाही.
  ही योजना महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली व ही भौगोलिक मर्यादा हेही ह्या योजनेच्या अपयशाचे एक मोठे कारण होते. शेतीमालाच्या व्यापारावर केंद्राने घातलेल्या झोनबंदीमुळे अन्य राज्यांत होत असलेल्या कापसाच्या भावातील वाढीचा ह्या योजनेला काहीच फायदा झाला नाही; तिथे जाऊन ते आपला कापूस विकूच शकत नव्हते.
 १९८५मध्ये एकाधिकार योजनेला मुदतवाढ देताना केंद्र सरकारने एक अट घातली - या योजनेतील कापसाची हमी किंमत केंद्र सरकारने ठरवलेल्या आधारभूत किमतीपेक्षा अधिक असता कामा नये. म्हणजेच उत्पादनखर्च काहीही असला, तरी केंद्राने ठरवलेल्या किमतीपेक्षा अधिक किंमत एकाधिकार योजनेत कधीच देता येणार नाही. या कलमामुळे केंद्र सरकारने चढउतार निधीलाही सुरुंग लावला. शेतकऱ्याला एकाधिकारात दिली जाणारी हमी किंमत ही केंद्र सरकारने ठरवलेल्या आधारभूत किंमतीपेक्षा जास्त असूच शकत नाही असे केंद्राने ठरवल्यावर ह्या चढउतार निधीला काही अर्थच उरला नाही.
 या अन्याय्य अटीविरुद्ध शेतकरी संघटनेने सतत चार वर्षे आंदोलन केले; ह्या बाबतीत महाराष्ट्र शासन संघटनेशी सहमतही होते. पण दुर्दैव म्हणजे महाराष्टातील एकाही मुख्यमंत्र्याने ह्याबाबत कधी केंद्र सरकारपाशी आग्रह धरला नाही किंवा आपला निषेध व्यक्त केला नाही. सगळेच मुख्यमंत्री केंद्रापुढे शेपूट घालणारे निघाले. ह्या बाबतीत महाराष्ट्र सरकारने कधी संघटनेलाही उघडपणे पाठबळ दिले नाही; कारण तसे केले, तर संघटना शिरजोर होईल व आपली किंमत कमी होईल अशी भीती सरकारला वाटत असावी! कापसाची निर्यात केव्हा करायची, किती करायची याचेही निर्णय नेहमी केंद्र सरकारच घेत असे व ते शेतकरीहित विचारात घेऊन कधीच घेतले जात नसत. त्यांत गिरणी मालकांचा फायदा मुख्यतः विचारात घेतला जाई.
 जोशी यांच्या मते ह्या योजनेच्या अपयशाचे एक कारण केंद्र सरकारचे वस्त्रोद्योग धोरण हे नक्कीच होते; पण एकाधिकारातील अकार्यक्षमता आणि भ्रष्टाचार हीदेखील तेवढीच मोठी कारणे होती.


पांढरे सोने, लाल कापूस = १९३ 

 एकाधिकारातले पहिले पाऊल म्हणजे कापसाची खरेदी. तेथूनच भ्रष्टाचाराला सुरुवात होई. शेतकऱ्याने आणलेल्या कापसाचे वजन कागदोपत्री जास्त दाखवायचे व जास्तीच्या पेमेंटमधील पैसे वाटून खायचे. स्टॉक-टेकिंग करताना कागदोपत्री दाखवलेला कापूस व प्रत्यक्षात जमा झालेला कापूस यांत त्यामुळे फरक पडायचा; काहीतरी कारण दाखवून हा फरक मिटवून टाकणे भाग पडायचे. स्थानिक शेतकरी चेष्टेने असे म्हणत, की दरवर्षी प्रत्येक विभागात एकतरी आग लागल्याशिवाय कापूस खरेदीचा हिशेब पुरा होऊच शकत नाही!
 एकाधिकारातले दुसरे पाऊल होते प्रक्रिया - कापूस साफ करणे. शेतातून गोळा केलेल्या कापसापासून साफ केलेला कापूस, म्हणजेच रुई बनवणे. हे काम वेगवेगळ्या जिनिंग कंपन्यांकडून करून घेतले जाई. त्याचे कंत्राट देताना सर्रास पैसे खाल्ले जात. ही रुई बनेपर्यंत खासगी व्यापारात साधारण दीड टक्का वजनातील नैसर्गिक घट होते. एकाधिकार खरेदीत शेतकऱ्याने जमा केलेल्या कापसाचे वजन (वजन करून घेणाऱ्या अधिकाऱ्याशी संगनमत करून तो शेतकरी अधिकाऱ्यांना लाच द्यायला तयार असला तर) मुळातच जास्त दाखवले जाई व मग त्याचा हिशेब शेवटी नीट लागत नसे, तेव्हा ही वजनातील नैसर्गिक' घट फुगवून सर्रास आठ ते नऊ टक्के धरली जाई व कसाबसा ताळेबंद मांडला जाई. खासगी व्यापारी जेवढी घट पकडत त्यापेक्षा ही घट सहापट अधिक असे!
 ह्या रुई बनवून घ्यायच्या प्रक्रियेत आस्थापनेचा व व्यवस्थापनाचा मोठा भाग असे. सर्व सरकारी उपक्रमांप्रमाणे इथेही नोकरदारांची मजाच असे. कापूस खरेदीचे काम खरे तर हंगामी; पण खरेदीसाठी कापूस येवो वा न येवो, इतर सरकारी खात्यांप्रमाणे अधिकाऱ्यांची फौज, त्यांचे सेवक, त्यांचे पगार, त्यांच्या गाड्या हे सगळे बारा महिने कायमच असायचे. सगळे बसून पगार खाऊ शकत होते. मुळात ह्या नोकरदारांची संख्या प्रचंड; त्यांतले बहुतेक कुठल्या ना कुठल्या नेत्याच्या शिफारशीवरून लागलेले. वर्षातले सहा महिने काम व बाकी वेळ आराम असेच त्यांच्या कामाचे स्वरूप. तत्कालीन अकार्यक्षम यंत्रणा तशीच चालू राहण्यात त्यांचा फायदाच होता. स्वतःच्या कामाचे स्वरूप बदलायला वा आपली संख्या कमी करून घ्यायला त्यांचा विरोध असणार हे उघडच होते. तरीही त्यांना सांभाळून घ्यावेच लागे. त्या सगळ्याचा खर्च अफाट असायचा व अंतिमतः तो शेतकऱ्याला कापसापोटी कमी किंमत देऊनच वसूल केला जाई. खासगी व्यापारात एक क्विटल रुईमागे हा व्यवस्थापन व आस्थापना खर्च सुमारे ७० ते ८० रुपये असे, तर एकाधिकार खरेदीत हाच खर्च एक क्विटल रुईमागे सरासरी १५० रुपये, म्हणजे दुप्पट, असे.
 एकाधिकारातले तिसरे आणि शेवटचे पाऊल म्हणजे रुईची विक्री. इथे खरा फायदा व्हायचा तो कापड गिरण्यांचा. पूर्वी गिरणीमालक दोन-तीन महिन्यांचा साफ केलेला कापूस आपला स्टॉक म्हणून ठेवत असत. कारण रुईचा पुरवठा खंडित झाला, तर पुढे धागा बनवायचे व कापड विणायचे त्यांचे काम खंडित व्हायची भीती असे. एकाधिकार पद्धतीत त्याची गरजच राहिली नाही. कधीही जावे आणि महामंडळाकडच्या तयार साठ्यातून हवा तेवढा कापूस उचलावा. इन्व्हेंटरीचा खर्च शुन्य! शिवाय बाजारपेठेतील मुरब्बी व्यापाऱ्यांपेक्षा सरकारी


१९४ = अंगारवाटा... शोध शरद जोशींचा 

बाबूंकडून गिरणी मालक तो कापूस एका खंडीमागे चाळीस ते पन्नास रुपये कमी भावात मिळवत; अर्थात त्यासाठी आवश्यक तिथे हात ओले करून.
 अशा प्रकारे आपल्या नियत कामाच्या तिन्ही पायऱ्यांवर नुकसानीत चालणारी ही यंत्रणा शेतकऱ्यांच्या भल्याची असूच शकणार नव्हती. हट्टाने ती चालू ठेवण्यात सरकारचे दरसाल कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत होते. त्यात फायदा झाला तो केवळ पुढाऱ्यांचा, नोकरदारांचा व गिरणी मालकांचा.
 काळाच्या ओघात पुढे महाराष्ट्र शासनाच्या कापूस एकाधिकार खरेदीचा अंत झाला. इतर राज्यांप्रमाणे कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियामार्फतच सर्व कापूस व्यवहार होऊ लागले. तिचे स्वरूपही पूर्वी मक्तेदारीचेच होते, पण खुली अर्थव्यवस्था जसजसी लागू होत गेली, तसतशी ही मक्तेदारी कमी होऊन खासगी व्यापाराचा वाटा वाढत गेला.
 पण संघटनेचे कापूस आंदोलन ज्या काळात झाले त्या काळाचा विचार करताना ह्या एकाधिकार खरेदीमुळे चाळीस वर्षे शेतकऱ्यांचे जे प्रचंड नुकसान झाले त्या नुकसानीचा विचार व्हायलाच हवा. शेतकऱ्याच्या आजच्या कर्जबाजारीपणात ह्या अत्यंत चुकीच्या पण सरकारने दुराग्रहाने राबवलेल्या योजनेचा मोठा वाटा आहे; पण त्या नुकसानीचे उत्तरदायित्व कोणीच घेत नाही वा त्याची कोणी चर्चाही करत नाही.
 ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी नाशिक जिल्ह्यातील टेहेरे येथे शेतकरी संघटनेने एक विराट सभा आयोजित केली होती. तिच्याविषयी पुढे येणारच आहे. त्या सभेच्या पूर्वतयारीसाठी काढलेल्या प्रचारयात्रेच्या दरम्यान जे वेगवेगळे कार्यक्रम घेतले गेले त्यातलाच एक म्हणजे १८ ऑक्टोबर ८४ रोजी विदर्भात हिंगणघाट येथे भरलेले पहिले कपास किसान संमेलन. कापूस उत्पादकांपुढे काय काय अडचणी आहेत ह्याचा विस्तृत विचार त्या संमेलनात झाला. एकाधिकार खरेदी योजनेमुळे शेतकऱ्यांचे होत असलेले प्रचंड नुकसान, झोनबंदी व निर्यातबंदी यांसारखी जुलमी सरकारी धोरणे यांचा ऊहापोह ह्या संमेलनात झाला. त्याशिवाय, जगभर कृत्रिम बनावटीचे कापड अधिकाधिक लोक वापरत आहेत व त्यामुळे कापूस उत्पादकांवर काय संकटे येऊ घातली आहेत याचीही चर्चा ह्या संमेलनात झाली. दुर्दैवाने टेहेरे सभेच्या वेळीच झालेल्या इंदिराहत्येमुळे संकल्पित आंदोलन जोशी जाहीर करू शकले नव्हते.
 नंतर सत्तेवर आलेल्या पंतप्रधान राजीव गांधी यांनी ६ जून १९८५ रोजी नवे वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले. हे धोरण कृत्रिम वस्त्रांना प्रोत्साहन देणारे, पण त्याचवेळी देशातील कापूसउत्पादक शेतकऱ्यांवर मात्र अन्याय करणारे आहे, असे जोशी यांनी जाहीर केले व त्या धोरणाविरुद्ध त्यांनी २ ऑक्टोबर १९८५ पासून आंदोलन पुकारले. ही कापूस आंदोलनाची औपचारिक सुरुवात मानता येईल.
 राजीवस्त्रविरोधी आंदोलन' असे त्या आंदोलनाचे नामकरण केले गेले. एका अनौपचारिक बैठकीत पुण्याचे राम डिंबळे यांनी हा शब्द सुचवला व तो सर्वांना आवडला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रेगन यांच्या आर्थिक धोरणाला जसे रेगनॉमिक्स' हे नाव दिले गेले,


पांढरे सोने, लाल कापूस = १९५ 

तसाच काहीसा 'राजीवस्त्र' हा गमतीदार शब्द तयार झाला होता.
  या आंदोलनासाठी जोशी यांनी व्यक्तिशः प्रयत्नांची पराकाष्ठा केली. गावागावात प्रचार केला. कृत्रिम बनावटीच्या कापडावर म्हणजेच राजीवस्त्रांवर बहिष्कार टाकायचा व त्याची ठिकठिकाणी होळी करायची असे त्या आंदोलनाचे स्वरूप ठरले. ती कल्पना त्यांचीच होती. जोशी स्वतः नेहमीच कॉटनचे कपडे वापरत. आंदोलनाचा प्रचार करण्यासाठी त-हेत-हेची पोस्टर्स तयार करणे, घोषणा तयार करणे, वेगवेगळ्या संघटनाशी चर्चा करून त्यांनीही सहभागी व्हावे म्हणून प्रयत्न करणे ह्यासाठी ते तासनतास, दिवसेंदिवस स्वतः खपत होते. आताच्या परिस्थितीत राजीव गांधी यांच्याविरोधात काही भूमिका घेणे म्हणजे प्रवाहाविरुद्ध पोहणे आहे याची त्यांना पूर्ण कल्पना होती. आपल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ त्यांनी म्हटले होते,

आपल्या देशाच्या स्वातंत्र्यचळवळीच्या इतिहासात कापड उद्योगाला मोठे स्थान आहे. ब्रिटिशांची आर्थिक नीती स्पष्ट करताना कापूस स्वस्तात स्वस्त विकत घेऊन कापड महागात महाग विकणे हे उदाहरण सांगितले गेले; स्वदेशी कापडाचा वापर, परदेशी कापडावर बहिष्कार हे कार्यक्रम राबवले गेले. चरखा हे स्वातंत्र्यचळवळीचे चिन्हच झाले. राजीव गांधींचे कापड धोरण म्हणजे महात्मा गांधींच्या कल्पनेतील स्वतंत्र भारताच्या चित्राच्या विरुद्धचे टोक आहे. महात्मा गांधींचे अपुरे राहिलेले स्वातंत्र्यआंदोलन शेतकरी संघटनाच पुढे चालवत आहे असे मी म्हणतो, त्याचे आगामी आंदोलन हे सर्वस्पष्ट उदाहरण आहे. पूर्वी बनावट धाग्यांवर बंधने होती, गिरण्यांनी ८० टक्के धागे कापसाचेच वापरावेत हे बंधन होते. तरीही कापसाला भाव मिळत नव्हता. जेवढ्या काळात कापडाच्या किमतीत ३०० टक्के वाढ झाली, तेवढ्याच काळात कापसाच्या भावात मात्र फक्त ६० टक्के वाढ झाली. आणि आता तर गिरण्यांनी कापूस वापरला नाही तरी चालणार आहे. मग कापसाला योग्य भाव कसे मिळतील?

(शेतकरी संघटक, २० सप्टेंबर १९८५)


  आंदोलनाचा प्रारंभ साहजिकच कापसाचे मोठे पीक जिथे निघते त्या विदर्भात केला गेला; त्यातही पुन्हा तो वर्धा येथे केला गेला. जेथील सेवाग्राममध्ये गांधीजींचे बराच काळ वास्तव्य होते. दिवस होता २ ऑक्टोबर, म्हणजे गांधी जयंतीचा.

 ह्या सगळ्याच आयोजनात एक कल्पकता दिसून येते व आंदोलनाची तयारी किती विचारपूर्वक केली होती हे जाणवते. त्या दिवशी सकाळी जोशींच्या उपस्थितीत बाराशे बैलगाड्यांची एक मिरवणूक काढली गेली व त्यानंतर ४०,००० शेतकऱ्यांचा तिथे मेळावा भरवण्यात आला. मेळाव्यात राजीवस्त्रांची भली मोठी होळी करण्यात आली. त्या दिवशी महाराष्ट्रभर एकूण अडीचशे ठिकाणी अशा होळ्या पेटवण्यात आल्या. आंदोलनाची चर्चा त्यामुळे सर्वतोमुखी झाली.


१९६ = अंगारवाटा... शोध शरद जोशींचा 

 रविवार, ६ ऑक्टोबरला नगर जिल्ह्यात राहुरी येथे ऊसउत्पादकांची एक परिषद आयोजित केली होती. संघटनेने सर्व राजकीय पक्षांना परिषदेचे आमंत्रण दिले होते. सत्तारूढ काँग्रेस पक्षाचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी आधी यायचे कबूल केले होते; पण मग त्यांनी ते रहित केले. तुमच्या रस्ता रोको ह्या प्रकाराला माझा विरोध आहे असे म्हणत. आपली भूमिका त्यांना समजावून सांगण्यासाठी मुंबईला त्यांच्या घरी जाऊन स्वतः शरद जोशी त्यांना भेटले, पण वसंतदादा तयार झाले नाहीत. बहुधा दिल्लीहून त्यांना ताकीद मिळाली असावी. इतर सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी मात्र परिषदेला हजर होते.
 याही कार्यक्रमात सुरुवातीला राजीवस्त्रांची होळी करण्यात आली. त्यानंतर दुपारी सभा सुरू असताना अचानक पावसाला सुरुवात झाली. अगदी धो धो पाऊस पडू लागला. शेतकरी संघटनेच्या नेत्यांप्रमाणेच शरद पवार, प्रमोद महाजन व माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग हे नेतेही व्यासपीठावर हजर होते. पावसामुळे सभा आटोपती घ्यावी लागते की काय, अशी भीती काही जणांनी व्यक्त केली. अशा वेळी शरद जोशी माइकपाशी गेले. "सभा चालू राहणार आहे, कोणीही उठू नये," असे त्यांनी जाहीर केले. आश्चर्य म्हणजे समोर बसलेल्या जवळपास दोन लाख श्रोत्यांपैकी एकही जण उठला नाही! मुसळधार पावसातच ती सभा उत्तम पार पडली. शेतकऱ्यांवरील जोशीची पकड किती अभेद्य होती ह्याचे एक प्रात्यक्षिकच सर्वांना पाहायला मिळाले. "हम ने काफी सारी मीटिंग्स देखी है, मगर ऐसा जबरदस्त माहोल कभी नहीं देखा था" असे उद्गार ह्या सभेनंतर चरणसिंगांनी काढले होते.
 ह्या सभेत एक आगळा उपक्रम जाहीर केला गेला. पारंपरिक 'रास्ता रोको' करण्याऐवजी १० नोव्हेंबरला सर्वांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहावे, प्रत्येक वाहन थांबवून चालकाला एखादे फूल व पान द्यावे आणि त्याचवेळी शेतकरी संघटनेचे आंदोलन कशासाठी आहे हे सांगणारे एक पत्रक द्यावे; त्यातून वाहतूक हळू झाली तरी 'रास्ता रोको' होणार नाही, व शिवाय लोकांचे आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले जाईल अशी त्यामागची भूमिका होती. 'फूल-पान आंदोलन' असे ह्या आगळ्या आंदोलनाला नाव देण्यात आले व पुढे त्याला चांगला प्रतिसादही मिळाला. माहितीपत्रकाबरोबरच नामवंत व्यंग्यचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी चितारलेल्या चार खास व्यंग्यचित्रांचे एक पत्रकही वाहनचालकांना दिले गेले. त्या पत्रकाच्या दहा लाख प्रती संघटनेने छापून घेतल्या होत्या.
 कापूस आंदोलनाच्या दरम्यान असाच एक वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम ७ ऑक्टोबरला पुण्यात आयोजित करण्यात आला. बरोबर ८० वर्षांपूर्वी, म्हणजे ७ ऑक्टोबर १९०५ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पुण्यात लकडी पुलाजवळ नदीकाठी विदेशी कपड्यांची एक होळी लोकमान्य टिळकांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली होती. पतितपावन ही संघटना दरवर्षी त्याच जागी सावरकरांचे स्मरण म्हणून तशीच एक होळी साजरी करत असे. या वर्षी त्या संस्थेसोबत शेतकरी संघटनादेखील ह्या कार्यक्रमात सामील झाली. दुसऱ्या एखाद्या संस्थेबरोबर अशा कार्यक्रमात शेतकरी संघटनेने सामील व्हायचा हा पहिलाच प्रसंग. ज्येष्ठ

समाजवादी नेते नानासाहेब गोरे ह्याच्या हस्ते ही होळी लावली जाणार होती. पण पतितपावन संघटनेला (ती जातीयवादी आहे या भूमिकेतून) असलेल्या विरोधामुळे ते आले नाहीत. दिल्लीतील वेठबिगार मुक्तिमोर्चा संस्थेचे नेते स्वामी अग्निवेश यांनी शेवटी ही होळी पेटवली. त्यानंतर झालेल्या सभेत पतितपावन संघटनेचे अध्यक्ष सोपानराव देशमुख, स्वामी अग्निवेश, विजय जावंधिया व शरद जोशी यांची भाषणे झाली. एकूणच पुणे शहरात शेतकरी संघटनेचे जाहीर कार्यक्रम असे फारच थोडे झाले; त्यांतला हा एक.
 १२ डिसेंबर हा हुतात्मा बाबू गेनू सैद ह्याचा स्मृतिदिन. याच दिवशी, १९२९ साली, मुंबईतील मुळजी जेठा ह्या कापडाच्या मोठ्या घाऊक मार्केटसमोर, विदेशी कापडांवर बहिष्कार टाकण्याच्या महात्मा गांधी यांनी दिलेल्या आदेशानुसार कामगारांची जोरदार निदर्शने चालू होती. बाबू गेनू हा त्यांच्यातला एक. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील महाळुगे पडवळ ह्या गावच्या एका शेतकऱ्याचा मुलगा. मुंबईतील एका कापड गिरणीत काम करणारा. विदेशी कापडांनी भरलेला एक ट्रक मार्केटमधून बाहेर पडला व रस्त्यावर आला. तो रोखून धरण्यासाठी बाबू गेनू त्या ट्रकसमोर सरळ आडवा पडला. ट्रक ड्रायव्हरने ट्रक थांबवला. शेजारीच बसलेल्या एका गोऱ्या सोजिराने ट्रक तसाच सरळ पुढे रेटून नेण्याचा आदेश दिला. पण त्या देशी ड्रायव्हरने तसे करायला नकार दिला. चिडलेल्या सोजिराने त्याला खाली उतरवले व स्वतःच ट्रक सुरू करून त्याने सरळ बाबू गेनूच्या अंगावरून ट्रक नेला. स्वातंत्र्यआंदोलनातील हा मुंबईतला पहिला हुतात्मा. १९८५मध्ये त्याच्या स्मृतिदिनी शेतकरी संघटनेने मुंबईतील शिवाजी पार्कवर एक विशाल शेतकरी-कामगार मेळावा आयोजित केला. ह्या ऐतिहासिक मैदानावरचा संघटनेचा हा पहिला मेळावा. डॉ दत्ता सामंत ह्यांच्या कामगार आघाडीसमवेत हा मेळावा आयोजित केला गेला होता.
 या मेळाव्यात शिवसेनेनेही सामील व्हावे अशी जोशींची फार इच्छा होती व त्यासाठी त्यांनी स्वतः बाळासाहेब ठाकरे यांच्या घरी जाऊन त्यांना आमंत्रण दिले होते. पण 'ज्या व्यासपीठावर दत्ता सामंत असतील, त्या व्यासपीठावर मी येणार नाही' असे म्हणत ठाकरे यांनी नकार दिला. शिवसेना आणि दत्ता सामंत यांची कामगार आघाडी यांच्यात त्यावेळी वेगवेगळ्या कारखान्यांतील कामगारांचे नेतृत्व कोणी करायचे या मुद्द्यावरून सतत मारामाऱ्या होत असत. त्यावेळी मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता होती व छगन भुजबळ महापौर होते. ठाकरे येणार नाहीत म्हटल्यावर त्यांचीही यायची आधी तयारी नव्हती; पण शेतकरीनेत्यांनी ‘एवढे सगळे शेतकरी मुंबईत येणार व मुंबईचे पहिले नागरिक म्हणून त्यांचे स्वागत करणे हे तुमचे कर्तव्य आहे' असे म्हणत त्यांची मनधरणी केली. त्यामुळे ते यायला तयार झाले. मैदान पूर्ण भरले होते व त्यात शेतकऱ्यांची संख्याच खूप अधिक होती. पण सामंतांनी आपल्या चार-पाचशे महिला कामगार व्यासपीठाच्या समोरच आणून बसवल्या होत्या. या महिलांनी सतत शिवसेनाविरोधात जोरदार घोषणा द्यायला सुरुवात केली. इतर सर्व शेतकरी श्रोत्यांना शिवसेना व कामगार आघाडी ह्यांच्यातील ह्या वैराची काही माहितीही नव्हती


१९८ ◼ अंगारवाटा... शोध शरद जोशींचा

व हे काय घडते आहे याची त्यांना काहीच कल्पना येईना. संघटनेच्या सर्व सभा नेहमी विलक्षण शिस्तीत पार पडत. महिला कामगारांनी या घोषणा थांबवाव्यात अशी सूचना जोशींनी सामंत यांना अनेकदा केली, सामंत यांनी वरवर आपल्या कार्यकर्त्यांना दटावण्याचे नाटकही केले, पण प्रत्यक्षात ह्या घोषणा चालूच राहिल्या.
 मुळात भुजबळ यांना बोलवायलाच सामंत यांचा विरोध होता, पण जोशींनी आग्रह धरल्यामुळे त्यांनी नाराजीने होकार दिला होता. त्याकाळी भुजबळ यांची शिवसेनेत घुसमट व्हायला सुरुवात झाली होती; पण अधिकृतरीत्या ते शिवसेनेतच होते. कदाचित बाळासाहेबांच्या मनाविरुद्ध ह्या मेळाव्याला हजर राहून त्यांना आपली नाराजी व स्वतंत्र बाणा बाळासाहेबांना दाखवायचा होता.
 त्यांच्या येण्यामुळे एक फायदा नक्की झाला - शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याला हार घालण्यासाठी जी शिडी लागायची, ती त्यावेळी फक्त मंबई महानगरपालिकेकडे होती व तिचे एका दिवसाचे भाडे तीस हजार रुपये होते. भुजबळ आल्यामुळे ती फुकटात मिळाली! त्या मेळाव्याचा इतर सर्व खर्च संघटनेने फक्त तीस हजार रुपयांतच बसवला होता! 'मुर्दाबाद'च्या घोषणांनी वैतागलेल्या भुजबळांनी आपले स्वागतपर भाषण झाल्यावर ताबडतोब व्यासपीठ सोडले, पुढील भाषणांसाठी ते थांबले नाहीत.
  या मेळाव्याच्या आदल्या दिवशी हुतात्मा बाबू गेनूच्या महाळुगे-पडवळ या गावापासून एक स्मृतिज्योत यात्रा मुंबईत आणली गेली होती. त्या यात्रेत इतरांबरोबर बाबू गेनूच्या थोरल्या वहिनी श्रीमती कासाबाई कुशाबा सैद यांचाही समावेश होता. त्यांच्याच हस्ते या मेळाव्यात त्यांनी बरोबर आणलेल्या स्मृतिज्योतीने राजीवस्त्रांची होळी पेटवण्यात आली होती. अशा वेगवेगळ्या कल्पक कृती हे शेतकरी संघटनेच्या सगळ्याच कार्यक्रमांचे एक वैशिष्ट्य होते.
 भुजबळ निघून गेल्यावर या सभेत प्रकाश आंबेडकर, दत्ता सामंत व शरद जोशी यांची भाषणे झाली. शरद जोशी यांची मुंबईतील ती पहिली मोठी सभा. नंतरही कधी त्यांच्या मुंबईत अशा मोठ्या सभा झाल्या नाहीत. त्यावेळचे जोशी यांचे एक खंदे सहकारी धुळ्याचे अनिल गोटे यांचा ह्या आंदोलनात मोलाचा वाटा होता. या मेळाव्यातील त्यांच्या संदर्भातील एक गमतीदार आठवण जोशींनी नोंदवली आहे. ते लिहितात :

स्टेज उभारायचे आणि लाऊड स्पीकरचे काम कामगार आघाडीच्या कुणी चारपाच लाख किंवा अशाच काही रकमेला ठरवले होते. गोटेंनी तीस हजारात हे काम करायचा प्रस्ताव आणला, तेव्हा डॉक्टरसाहेब (दत्ता सामंत) त्यांच्या सहकाऱ्यांवर एकदम घसरले. डॉक्टरसाहेबांना राग आला म्हणजे त्यांच्या तोंडी शिव्यांच्या फैरीच्या फैरींची खैरात चाले. 'एवढे समोरासमोर XXXX मला गंडवता? या गोटेमुळे समजलं. गेली इतकी वर्षं तुम्ही कितीला लुटलं कुणास ठाऊक!' डॉक्टर सामंतांचा अनिल गोटेंवर मोठा लोभ जडला. 'एवढा तुमचा कार्यकर्ता आम्हांला देऊन टाका', असा त्यांचा आग्रह कायम असे. माझ्याशी भेटणे, बोलणे त्यांना



अवघड वाटे; गोटेंचे त्यांचे चांगले जमे. एका कोणा कामगारनेत्याने काहीतरी सूचना आणली आणि वर पुरवणी जोडली, 'शरद जोशींच्या लक्षातसुद्धा यायचे नाही. तो आपला साधा सरळ माणूस!' डॉक्टर कडाडले, 'तुम्हांला काही अकला आहेत का रे? गोटेसारखी माणसं जो जवळ बाळगतो, तो काय असला साधा माणूस असणार?' गुंडगिरीच्या मोजमापात माझा भाव फुकटमफाकटच वधारून गेला!

(एका कामगार चळवळीचा अस्त, अंगारमळा, पृष्ठ १०१)

 पुढच्या वर्षी, म्हणजे १९८६ साली, राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी एकाधिकार योजनेंतर्गत कापसाचा भाव एकदम क्विटलमागे ६१४ वरून ५४० वर आणला. त्यामुळे कापूस उत्पादकांमधे प्रचंड असंतोष पसरला. एकूण परिस्थितीचा विचार करण्यासाठी अकोला येथे २ ऑक्टोबर १९८६ रोजी कपास किसान संमेलन भरवण्यात आले. महाराष्ट्रातील जवळजवळ दीड लाख कापूस शेतकरी ह्या मेळाव्याला हजर होते. त्याशिवाय गुजरात, मध्यप्रदेश, आंध्र व हरयाणा येथील कापूस उत्पादकांचे प्रतिनिधीही हजर होते. नवीन वस्त्रोद्योग धोरणामुळे कापसाचा कमी कमी होत जाणारा वापर, आधारभूत किंमत शेतकऱ्याच्या हाती पडावी ह्यासाठी असलेली अगदी अपुरी यंत्रणा, महाराष्ट्रातील एकाधिकार कापस खरेदी योजनेमध्ये कमी करण्यात आलेले कापसाचे भाव आणि निर्यातीवर अथवा अन्य प्रांतांत कापूस पाठवण्यावर घातलेले जाचक निर्बंध हे चार मुख्य मुद्दे ह्या सभेत पुढे आले. त्यातील कापसाच्या भावाचा मुद्दा त्यावेळी अगदी ऐरणीवर आला होता. कापूस शेतकऱ्यांमधे संतापाचा आगडोंब उसळला होता. कापूस आंदोलनाचे सेनापती म्हणून आमदार मोरेश्वर टेमुर्डे यांची नियुक्ती करण्यात आली.
 ६ डिसेंबरनंतर राजीवस्त्रविरोधी आंदोलन अधिक प्रखर करण्याच्या दृष्टीने बाबू गेनू स्मृती सप्ताह साजरा करायचा, त्याची सुरुवात २३ नोव्हेंबरला एक दिवसाचा रास्ता रोको करून करायची, नंतर ६ डिसेंबरपासून राजीवस्त्र घालणाऱ्यांना रास्ता रोको करायचा, नंतर १२ डिसेंबरला सेवाग्रामला रेल रोको करायचा व शेवटी १२ डिसेंबरनंतर पुढाऱ्यांना गावबंदी करायची असे ठरले. त्यानुसार अनेक ठिकाणी चक्का जाम (रास्ता रोको) केला गेला.
 तशा पहिल्याच प्रसंगी, ६ डिसेंबरलाच, प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पोलिसांनी गावोगावी प्रमुख कार्यकर्त्यांना अटक केली. स्वतः शरद जोशी यांना व त्यांच्याबरोबरच्या विजय जावंधिया वगैरे बारा शेतकरी कार्यकर्त्यांना त्याच दिवशी हिंगणघाटवरून वर्धा येथे येत असताना अटक केली गेली.
  भाऊसाहेब बोबडे यांच्यासारखे नामांकित वकील याप्रसंगी जोशींच्या मदतीसाठी उभे राहिले. सध्या सुप्रीम कोर्टात न्यायाधीश असलेल्या शरद बोबडे यांचे हे वडील. त्यांनी हायकोर्टात अर्ज दाखल करून दोन दिवसांतच जोशी यांची सुटका करवली. पण मग सरकारने लगेच त्यांना पुन्हा पकडले. तेही स्मगलर्स व समाजकंटक यांच्यासाठी वापरल्या जाणाऱ्या राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली!


२०० ◼ अंगारवाटा... शोध शरद जोशींचा 

 १० डिसेंबर १९८६ला, त्यावेळी परभणी जिल्ह्यात असलेल्या, हिंगोलीजवळच्या सुरेगाव येथे गोळीबार होऊन त्यात तीन शेतकरी हुतात्मा झाले.
 सुरेगाव येथे प्रस्तुत लेखक गेला असताना त्याला शेतकरी संघटनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार सकाळी नऊच्या सुमारास रास्ता रोको करण्यासाठी सत्याग्रही रस्त्यावर जमा होऊ लागले होते. शासनाने कापसाला निदान गेल्या वर्षीइतका तरी भाव द्यावा ही त्यांची मुख्य मागणी होती. त्या परिसरात कापसाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते व साहजिकच हा विषय सर्वांच्या जिव्हाळ्याचा होता. सुरुवातीला कार्यकर्त्यांनी एकदोन गाणी म्हटली. नंतर स्थानिक शेतकरी कार्यकर्त्या अंजली पातुरकर यांनी भाषण केले. त्यानंतरचे वक्ते बळीरामजी क-हाळे बोलायला उभे राहिले, तोच पोलिसांनी त्यांच्या हातातला माइक हिसकावून घेतला व त्यांना धक्के मारत अटक केलेल्या सत्याग्रहींना तुरुंगात नेण्यासाठी रस्त्याच्या कडेलाच उभ्या केलेल्या एका बसकडे न्यायला सुरुवात केली. प्रत्यक्ष सत्याग्रह त्यावेळी सुरूही झाला नव्हता. लोक त्यामुळे संतापले व पोलीसही ऐकेनात. त्यातून मग धक्काबुक्की सुरू झाली. त्यातूनच पुढे गोळीबार झाला.

 ह्या आंदोलनात प्रत्यक्ष सामील झालेल्या दोन महिलांची निवेदने महत्त्वाची आहेत. (पूर्वप्रसिद्धी : शेतकरी संघटक, अमरावती महिला अधिवेशन विशेषांक, १० नोव्हेंबर १९८९. पृष्ठ ५०-१, ५५-६, संपादित अंश.)
  हिंगोली तालुक्यातील माथा या गावी राहणाऱ्या गोदाबाई शंकरराव पोले म्हणतात :

सुरेगावच्या आंदोलनाला आम्ही पंचवीस बाया गेलो होतो. तिथे पातुरकरबाईंनी भाषण केलं. खूप बायका, माणसं, पोरं जमली होती. सगळी मुकाट्यानं बसली होती. आणखी माणसंही चारी बाजूंनी येत होती. पोलिसांची मात्र चुळबुळ सुरू होती. ते अटक करू लागले. काही माणसांना धक्के देऊन त्यांनी जुलमानेच गाडीत नेऊन बसवलं. आता मात्र काही सोय नव्हती. वाट फुटेल तिथे सगळे गडी अन् बाया पळू लागले. पोलीस माणसांना ढोरासारखे बडवत होते. आमच्या अंगाचं पाणी होत होतं. अंग थरथर कापत होतं. कुठे जावं कळत नव्हतं. गोळीबार सुरू झाला होता. कोणाच्या पायावर, कोणाच्या मानेत गोळ्या लागत होत्या. धडाधड माणसं भुईवर पडत होती. मोठ्या कष्टानं मी चालत होते. मागे कसलातरी आवाज व्हायला लागला म्हणून मी वळून पाहिले, तो काही पोलीस एका शेतकऱ्याला मारपीट करताना दिसले. घाबरून मी पुढे सरकले. एवढ्यात माझ्या पाठीत एका पोलिसाने झाडलेली एक गोळी लागली. मी चक्कर येऊन खाली बसले. अंधारी येत होती. पुढं काहीच दिसत नव्हतं. बसत उठत, बसत उठत मी पुढं गेले.
काही माणसं मला भेटली व म्हणाली, 'गोदाबाई, तू सरकारी दवाखान्यात जा. डॉक्टर तुझ्या पाठीतली गोळी काढतील अन् औषधपाणी देतील.' त्यांच्या सांगण्याप्रमाणे मी सरकारी दवाखान्यात गेले. तिथे डॉक्टर नव्हता. मी तशीच



बसले. तिथे असणारा एक कंपाउंडर मला म्हणाला, 'बाई, तुम्ही जा, इथे बसू नका. आम्ही काही तुमचे नोकर नाही गोळी काढायला.' तो असं म्हणाल्यावर मी उठले. गावच्या माणसांना म्हणाले, 'डॉक्टर गोळी काढायला तयार नाही, मी काय करू?' ती माणसं म्हणाली, 'गोदाबाई, गावाकडं जाऊ. एखाद्या खासगी डॉक्टरला बोलावून आणू अन् गोळी काढू.' मग मी त्यांच्याबरोबर पायी अडीच कोस चालत आले. घरी आल्यावर दम वर निघून जात होता. मग गावातल्याच डॉक्टरनं गोळी काढली. आजही त्या दिवसाची आठवण झाली, की गिरकी आल्यासारखं होतं अन् अंग आपोआपच थरथरायला होतं.

दुसरे निवेदन आहे हिंगोली गावच्या अंजली अरुण पातुरकर यांचे. त्या म्हणतात :

२३ नोव्हेंबर, ७ डिसेंबर आणि १० डिसेंबर १९८६ रोजी सुरेगाव येथे कापूस आंदोलने झाली. ह्या तिन्ही आंदोलनांत मी भाग घेतला होता. २३ नोव्हेंबर आणि ७ डिसेंबरच्या आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने स्त्रिया रस्त्यावर आल्या होत्या. छोट्या पोराबाळांनासुद्धा घेऊन, एका घरात एक बाई असेल, तर त्या घरातील नवरा, बायको व मुले हे सर्वच रस्त्यावर आले होते. ज्या घरात सासू व सुना किंवा मुली आहेत, अशा घरातील किमान दोन स्त्रिया तरी रस्त्यावर आल्या होत्या. त्यांचा उत्साह दांडगा. त्या म्हणाल्या, की दहा तारखेला घराला कुलूप लावून घरातील सर्व व्यक्ती रस्त्यावर येऊ.

अशा उत्साही वातावरणात दहा तारखेला सकाळी नऊ वाजता आम्ही रस्त्यावर आलो. सर्व शेतकरी जमायला बारा वाजले असते, कारण खेड्यापाड्यातून तिथे शेतकरी जमणार होते. दहा वाजेपर्यंत पाचशेच्या आसपास स्त्रिया व पुरुष तिथे जमले. पोलीस फार मोठ्या संख्येने तिथे जमले होते. लोक जमेपर्यंत काय करायचे, म्हणून श्रीयुत मिसाळ यांनी शेतकरी संघटनेचे एक गाणे म्हटले. तेथील सर्व स्त्रियांनी मला बोलावयास लावले. मी पाच मिनिटेच बोलले. माझ्यानंतर बळीरामजी क-हाळे यांनी बोलावयास सुरुवात केली. परंतु तोपर्यंत पोलिसांत काहीतरी कुजबुज झाली आणि त्यांनी लगेचच शेतकऱ्यांची धरपकड करून लाठ्या मारण्यास सुरुवात केली. शेतकरी घाबरून इकडेतिकडे पळू लागले, तर त्यांनी गोळीबार सुरू केला. सर्व आंदोलन चिरडून टाकले. त्या आंदोलनात तीन शेतकऱ्यांना हौतात्म्य पत्करावे लागले. पोलिसांनी अगदी धुमाकूळ घातला. महिलांनासुद्धा गोळ्या लागल्या. मला दहा-पंधरा लाठ्यांचा प्रसाद मिळाला.

  विधानसभेच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात सुरेगाव येथील पोलिसांच्या अत्याचाराबद्दल दोन तास बरीच चर्चा झाली. शेवटी तिच्यात हस्तक्षेप करून मुख्यमंत्र्यांना न्यायालयीन चौकशी जाहीर करावी लागली. मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती मालवणकर यांनी


२०२ ◼ अंगारवाटा... शोध शरद जोशींचा 

ती चौकशी केली. पण त्या चौकशीतून शेतकरीनेत्यांना समाधानकारक वाटावे असे फारसे काहीच निष्पन्न झाले नाही.
 या घटनेपूर्वी ७ डिसेंबर १९८६ रोजी तुरुंगातूनच जोशींनी जाहीर केले होते, की ह्या सप्ताहाचा शेवट रेल रोकोने करायचे आपले पूर्वीच ठरले आहे व त्यानुसार १२ डिसेंबर रोजी सेवाग्राम येथे तीन तासांचे रेल रोको होईल. वर्ध्याजवळचे सेवाग्राम हे स्टेशन तसे देशाच्या मध्यावर आहे व अनेक महत्त्वाच्या गाड्या ह्याच मार्गावरून जातात.
 पोलिसांनी जागोजागी नाकाबंदी करून शेतकऱ्यांना अटक करायचा कसोशीने प्रयत्न केला, पण तरीही आपला गनिमी कावा लढवून, इतर प्रमुख नेते तुरुंगात असूनही वीस-पंचवीस हजार शेतकरी वेगवेगळ्या छुप्या मार्गांनी रेल रोकोसाठी निवडलेल्या वेगवेगळ्या जागी हजर झाले व त्यांनी तीन तास रेल्वे अडवून धरली. पोलीस बंदोबस्त प्रचंड होता. एक गट पोलिसांनी ताब्यात घेतला व पोलीस गाडीत वा बसमध्ये बसवून तुरुंगाकडे रवाना केला, की लगेच दुसरा गट कुठूनतरी रेल्वे रुळांवर उगवत होता व पोलीस लगेच त्या गटामागे धावत होते. सत्याग्रहींनी भरलेल्या बसेसच्या रांगाच्या रांगा अशा उभ्या होत्या. शेतांत लपून, छुप्या वाटा शोधत हे शेतकरी आंदोलनस्थळी कसे दाखल झाले याचे खुद्द पोलिसांना अतिशय आश्चर्य वाटले. 'भुईतन उगवावेत तसे हे शेतकऱ्यांचे लोंढेच्या लोंढे आंदोलनस्थळी प्रकट होत होते' असे वर्णन खुद्द पोलिसांनी कोर्टासमोर केले आहे.
 वर्ध्यापासून जेमतेम आठ किलोमीटरवर सेवाग्राम आहे. गांधीजींच्या आश्रमामुळे जगप्रसिद्ध झालेले. १९३० साली अहमदाबादच्या साबरमती आश्रमातून गांधीजींनी दांडीयात्रा सुरू केली. 'भारत स्वतंत्र झाल्याशिवाय आता मी पुन्हा साबरमतीला येणार नाही' अशी प्रतिज्ञा करून. नंतरची दोन वर्षे ते तुरुंगातच होते. बाहेर आल्यावर मध्य भारतात कुठेतरी आपण कायमचे वास्तव्य करावे असे त्यांनी ठरवले. १९३६ साली सुप्रसिद्ध उद्योगपती आणि ज्यांना गांधीजी आपला पाचवा पुत्र मानत, त्या जमनालाल बजाज यांनी गांधीजींना वर्धा येथील आपल्या बजाजवाडी ह्या निवासस्थानी यायचे आमंत्रण दिले. हे स्थळ भारताच्या जवळजवळ मध्यावर आहे हे गांधीजींच्या लक्षात आले. त्यावेळी गांधीजी ६७ वर्षांचे होते. इथेच आपला एक नवा आश्रम सुरू करायचे त्यांनी ठरवले. सेवाग्राम या नावाने. कस्तुरबाही त्यांच्यासमवेत होत्या. इतरही अनेक कार्यकर्ते होते. या सर्वांना तिथे नीट राहता यावे म्हणून जमनालाल यांनी गांधीजींना आपली ३०० एकर जमीन दिली. ती ज्या गावी होती त्याचे नाव होते सेगाव. त्याच्याशी नामसादृश्य असलेले शेगाव हे तीर्थक्षेत्र विदर्भात अतिशय प्रसिद्ध आहे. श्री गजानन महाराज यांच्या वास्तव्याने पावन झालेले. गांधीजींना 'सेगाव'च्या पत्त्यावर देशभरातून येणारी असंख्य पत्रे चुकून 'शेगावला जात. म्हणून मग १९४० साली 'सेगावचे नाव बदलून 'सेवाग्राम' हेच ठेवले गेले. १९३६ ते १९४८ साली निधन होईस्तोवर गांधीजींचे कायमस्वरूपी 'घर' हेच होते. पुढे विनोबा यांचेही वास्तव्य इथे झाले. १९५१ साली त्यांची भूदान यात्रा इथूनच सुरू झाली. नंतर विनोबांनी पवनार येथेही काही वर्षे वास्तव्य केले.
________________

सेगावच्या रेल्वे स्टेशनला पूर्वी वर्धा (पूर्व) असे म्हणत. त्याचेही नाव पुढे सेवाग्राम ठेवले गेले. वर्धा ते सेवाग्राम ह्या टप्प्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे भारतीय रेल्वेवरील सर्वांत अधिक अवघड वळणे (sharpest turns) ह्या आठ किलोमीटरच्या टप्प्यात आहेत.
 रेल्वे लाइनीच्या दोन्ही बाजूंना मुख्यतः कापसाची शेते आहेत, पूर्वीही होती. १२ डिसेंबरला रास्ता रोको होणार, पण त्याच्या आदल्याच आठवड्यात हजारो शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. खुद्द वर्ध्यात जिल्हा कचेरीच्या बाजूला असलेल्या विस्तीर्ण पटांगणात बांबूचे कठडे उभारून एक खुला तुरुंग केला गेला होता व ह्या आंदोलकांना जनावरांप्रमाणे त्यात नुसते सोडून देण्यात येत होते. त्यांचा नाव-पत्ता नोंदवून घेऊन.
 सेवाग्राम येथे हे जे रेल रोको आंदोलन झाले ती जागा प्रत्यक्ष बघण्याचा योग प्रस्तुत लेखकाला २८ मार्च २०१६ रोजी आला. प्रत्यक्ष रेल रोकोत भाग घेतलेल्या काही जणांशी त्यासंदर्भात त्यावेळी चर्चाही करता आली. रेल रोको जिथे झाले तिथून अगदी जवळच ज्यांचे शेत व राहण्याचे घर आहे आणि ज्यांचा आंदोलनात उत्साही सहभाग होता त्या सुमनताई अगरवाल यांनाही भेटता आले.
 सुमनताई अगरवाल ह्या मूळ कर्नाटकच्या. विनोबाजींच्या ब्रह्मविद्या आश्रमातील राधेश्यामजी यांच्याशी त्यांनी लग्न केले. दोघेही आश्रमातच राहू लागले. पुढे दोघांनी आश्रमाबाहेर स्वत:च्या घरात राहायचा निर्णय घेतला आणि १९७३च्या मार्चमध्ये स्वतःची शेती करायला सुरुवात केली. खूप खर्च केला. दोघेही खूप मेहनत घ्यायचे. पण काहीच पैसा सुटत नसे. आपले अनुभव सांगताना त्या लिहितात,

शेतीत आपण कठे कमी पडतो तेच कळायचं नाही. त्यावरून आमच्यात भांडणंही व्हायची. पावलापावलावर टंचाई. घरातील शांती बिघडत चालली होती. दोघांमध्ये शाब्दिक संघर्षाला सुरुवात झाली होती. शरीर एवढं थकायचं, की जेवण झाल्यावर आवराआवर करणंसुद्धा नकोसं व्हायचं.१९८४च्या सुमारास शेतकरी संघटनेच्या परभणी अधिवेशनासाठी वर्ध्याहून एक बस जाणार होती. बसमध्ये एक जागा रिकामी आहे, तुम्ही येता का?' असं विचारायला शेजारचा शेतकरी घरी आला. संत्र्याचा ट्रक भरण्याच्या कामासाठी राधेश्यामजी घरीच होते. ते तर जाऊ शकत नव्हते. 'तू जाऊन ये' असं ते मला म्हणाले. मी गेले. तोवर मला संघटनेविषयी काहीच माहिती नव्हती.

परभणीतील शेतकरी नेत्यांची भाषणं मला आवडली. पुढे चांदवडच्या महिला अधिवेशनाच्या पूर्वतयारीसाठी आंबेठाणला भरलेल्या एक आठवड्याच्या महिला शिबिरालाही मी हजर होते. संघटनेने मांडलेले विचार मला नवीनच होते. आम्ही शेतीमध्ये मूर्खासारखं काम करत होतो, आज ना उद्या चांगलं होईल अशी आशा वाटत होती; पण ज्या सरकारवर आम्ही विसंबून होतो, ते शेतकऱ्यांना केवढा मोठा


२०४ ◼ अंगारवाटा... शोध शरद जोशींचा 

धोका देत होतं! घरात नवऱ्याबरोबर बाचाबाची करण्यात काही अर्थ नव्हता; आम्ही दोघंही फसलो होतो. आम्हीच काय, सर्व शेतकरी फसले होते.

मला कळलेलं हे सत्य गावागावात शेतकऱ्यांपर्यंत पोचवलं पाहिजे, म्हणून बरोबर दोन बायांना घेऊन विदर्भातील चार जिल्ह्यांची पदयात्रा काढली. त्यावेळी मी ग्रामीण दारिद्र्य जवळून पाहिलं. त्यानंतर मी घरी बसूच शकले नाही. अनेक गावी पायी फिरले. त्या अनुभवांची शिदोरी आयुष्यभर पुरेल.

(चतुरंग प्रतिष्ठान, दैनंदिनी २०१२, पृष्ठ १३५-६-७)


  आश्रमवासी असल्याने सुमनताई स्वतः राजीवस्त्र वापरतच नव्हत्या; खादीचेच कपडे घालायच्या. आमच्याबरोबर आंदोलनस्थळ दाखवायला त्या आल्या. रेल्वे लाइन एका लांबलचक उंचवट्यावरून जाते. तिथवर जायची वाट त्यांच्याच शेतातून जाते. त्या दिवसाच्या आठवणी सांगताना त्या म्हणाल्या,

 "सगळीकडे पोलीस पहारा जबरदस्त होता, कोणालाही रेल्वे लाइनपर्यंत सोडत नव्हते. जरा जवळ जायचा प्रयत्न केला की पकडून नेत होते. आधीही अनेक आंदोलनांत भाग घेतलेला असल्याने मला पोलिसांची भीती अशी फारशी नव्हती. रेल रोकोच्या आदल्याच आठवड्यात मलाही पोलिसांनी पकडलं होतं. त्यांच्या व्हॅनमध्ये बसवलं. मला बाहेर पडायचं होतं.पण पोलीस दार उघडेनात. शेवटी जोरजोरात लाथा मारून मी स्वतःच ते दार तोडलं व बाहेर आले. बघते तो काय, समोर एका कार्यकर्त्याला पोलीस लाठ्यांनी बेदम मारत होते. मला ते बघवेना. त्याला सोडवायला मी मध्ये पडले, तर मलाही दोन लाठ्या खाव्या लागल्या. आमच्या रेल रोको आंदोलनात पोलिसांनी केलेला बेछूट लाठीमार आठवला, की आजही माझ्या अंगावर शहारे उठतात.
 "पोलिसांच्या तावडीतून निसटून मी धूम पळाले. कारण आमच्यापैकी काही जणींनी तरी बाहेर राहणे आवश्यक होते. त्याशिवाय बाहेरगावाहून येणाऱ्या आंदोलकांना आम्ही कुठल्या कुठल्या जागी जमायचं व रेल्वे अडवायची ह्याचे निरोप देऊ शकलो नसतो. मोबाइल नसतानाचे हे दिवस होते. आमच्या बऱ्याच महिला कार्यकर्त्या चलाख होत्या. थोडे थोडे पुढे सरकत त्या रेल्वे लाइनच्या अगदी जवळ जाऊन पोचल्या. मध्ये दोन-तीनदा पोलिसांनी हटकलं तेव्हा, 'आम्ही कापूस वेचायला आलो आहोत' असं म्हणत त्यांनी शेतातला कापूस वेचण्याचं नाटक सुरू केलं.
 “एका शेतकऱ्याचं पाच-सहा एकराचं कोबीचं शेत रेल्वे रूळ व रस्ता ह्याच्यामध्ये होतं. शेताला वळसा घालून गेलं, तर पोलिसांना दिसणार आणि ते नक्की पकडणार हे उघड होतं. अशावेळी तो शेतकरी आपणहूनच पुढे आला आणि त्या उभ्या शेतातूनच रेल्वेपर्यंत जायची त्याने आंदोलकांना परवानगी दिली. असं करण्यात त्याच्या कोबीचं नुकसान होणार होतं, पण त्याला त्याची पर्वा नव्हती. सर्वच शेतकऱ्यांची आणि गावकऱ्यांची सगळी सहानुभूती आम्हालाच होती. त्यामुळेच गनिमी काव्याने हालचाली करणं आम्हाला शक्य होतं.

 "अशा प्रकारे आंदोलक पुढे पुढे जायचे आणि मग सरळ रेल्वे लाइनवर जाऊन आडवे पडायचे. ती सगळी बॅच पोलिसांनी पकडली, की रेल्वे ट्रॅकवर आणखी कुठेतरी कुठूनतरी दुसरी बॅच आडवी पडायची. आश्रमात माझ्याबरोबर राहणाऱ्या अनेक जणांनी मला नंतर सांगितलं, की गांधीजींच्या वेळेलाही इतक्या मोठ्या प्रमाणावर लोक आंदोलनात सामील झाले नव्हते."
 "तुमच्यासारख्या घरंदाज कुटुंबातील व विशेषतः ग्रामीण भागातील स्त्रियांनी असं रस्त्यावर उतरणं खूपच अवघड व दुर्मिळ आहे. ह्यावेळी तुम्ही सगळे असे इतके पेटून कसे उठलात? गांधीजींच्या त्या आंदोलनात आणि ह्या आंदोलनात असा काय फरक होता?" असा प्रश्न मी सुमनताईंना विचारला.
 त्याचे त्यावेळी त्यांनी काही उत्तर दिले नाही, पण दुसऱ्या दिवशी मी नागपूरला परत जात असताना त्यांचा फोन आला. त्या म्हणाल्या,
  “एक फार मोठा फरक म्हणजे त्यावेळी लोक देशसेवा म्हणून आंदोलनात सामील होत असत. पुढे जेपी आंदोलनातदेखील आम्ही सामील होतो व तेव्हाही आमची प्रेरणा देशसेवा हीच होती. किंवा समाजसेवा म्हणा हवं तर. पण ह्या शेतकरी आंदोलनात आम्ही दुसऱ्या कोणाची सेवा करायची म्हणून रस्त्यावर उतरलो नव्हतो. इथे प्रश्न होता तो आमच्या स्वतःचाच. आम्ही स्वतः जे शेतीत कष्ट घेत होतो, त्याचं फळ आम्हाला मिळत नव्हतं व ते मिळावं म्हणून आमचं आंदोलन होतं. ह्यावेळी प्रश्न आमच्या स्वतःचा होता, स्वहिताचा होता. त्यामुळे आम्ही जिवाची पर्वा न करता इतके पेटून उठलो."
  त्यांचे हे उत्तर माणसाला कार्यप्रवण करणारी मूलभूत प्रेरणा कोणती हे स्पष्ट करणारे होते व म्हणूनच विचार करायला भाग पाडणारे होते.
 ह्या रेल रोकोत थेट व महत्त्वाचा सहभाग असलेल्या सरोजताई काशीकर याही या वर्धाभेटीत आमच्याबरोबर होत्या. शरद जोशी व शेतकरी आंदोलन यांच्याशी त्यांचा व त्यांच्या सर्व कुटुंबाचाच खुप जिव्हाळ्याचा संबंध राहिला आहे.
 सरोज काशीकर मूळच्या मध्यप्रदेशातल्या. पुढे त्यांचे घराणे नागपुरात स्थायिक झाले. त्यांचे आजोबा गौरीशंकर शुक्ला संतपुरुष म्हणून प्रसिद्ध होते. सरोजताई अर्थशास्त्राच्या पदवीधर. माहेरचा विरोध पत्करूनही वर्ध्याच्या रवी काशीकर यांच्याशी त्यांनी विवाह केला. १९८१ साली जोशी प्रथम वर्ध्याला आले होते. त्यांच्यासोबत पत्नी लीलाताईदेखील होत्या. त्यांची मुक्कामाची सोय कुठे करायची, यावर स्थानिक कार्यकर्त्यांत चर्चा झाली व सर्वानुमते त्यांना काशीकरांच्या घरी ठेवायचे ठरले. त्यावेळी घर तसे साधे होते. त्यात एकत्र कुटुंबपद्धती. घरात माणसे बरीच. तरीही शेवटी वरच्या पत्र्याचे छप्पर असलेल्या खोलीत पाहुण्यांची सोय केली गेली.
 जोशींच्या साध्या सवयी लौकरच सरोजताईंच्या लक्षात आल्या आणि त्यांना घरी ठेवायचे म्हटल्यावर आधी आलेला तणाव कुठच्या कुठे पळून गेला. त्यानंतर अनेक वेळा


२०६ ◼ अंगारवाटा... शोध शरद जोशींचा

जोशींनी या घरात मुक्काम केला, पण ते अगदी कुटुंबाचा एक हिस्सा असल्यासारखेच राहिले. सरोजताईंच्या म्हणण्यानुसार सकाळी नास्त्याचा त्यांचा आवडता प्रकार म्हणजे शिपोतु - शिळ्या पोळीचे तुकडे! तिखटमीठ लावून तेलाची फोडणी दिलेले! घरच्या सगळ्यांशी जोशी खेळीमेळीने वागायचे. सरोजताईंच्या सासूबाई, म्हणजे अक्का, जोशींना आपला मोठा मुलगाच मानू लागल्या.
 पुढे सरोजताई शेतकरी संघटनेच्या तिकिटावर काँग्रेसच्या प्रभा राव यांच्यासारख्या मातब्बर उमेदवाराचा पराभव करून विधानसभेवर निवडूनही गेल्या. महिलांचा व शेतकऱ्यांचा आवाज विधानसभेत उठवण्याची एकही संधी त्यांनी तिथे सोडली नाही. संघटनेच्या त्या पहिल्या महिला अध्यक्ष.
 त्यांचे यजमान रवी काशीकर गरिबीतून वर आलेले. स्वतः शेती पदवीधर. घरची शेतीही होतीच, पण हे इतर मित्रांच्या भागीदारीत बियाणांच्या व्यवसायात पडले. व्यवसायाची घडी चांगली बसत होती, त्याचवेळी ते शेतकरी आंदोलनाच्या संपर्कात आले व आपल्या व्यवसायातून वेळ काढत त्यांनी संघटनेचे काम केले. त्यांचे व्यवसायातील सहकारी माधव शेंबेकर हेदेखील प्रत्यक्ष आंदोलनात सहभाग नसला, तरी संघटनेच्या कामाचे महत्त्व जाणणारे. अंकुर सीड्स ही त्यांची कंपनी बीजनिर्मिती व वितरणाच्या क्षेत्रात एक आघाडीची कंपनी मानली जाते. शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते या घराला खूपदा 'आमचं वर्ध्यातील राजभवन' असे म्हणतात. तीस-चाळीस कार्यकर्त्यांच्या पंगती ह्या घराला नवख्या नाहीत.
 “माझ्या जाऊबाई - शालूताई - घरची सगळी जबाबदारी घेत होत्या, म्हणूनच मला संघटनेचं इतकं काम करता आलं. त्यामुळे त्यांचंही योगदान माझ्याइतकंच आहे. मी कुठेही दौऱ्यावर गेले, तुरुंगात गेले तरी मला कधी माझ्या मुलांची, घराची काळजी करावी लागली नाही." - इति सरोजताई.
 ह्या शालूताईंचा भाऊ अरुण ह्याच्याबरोबर, मागे ज्यांचा उल्लेख झाला आहे त्या, सुरेगावच्या अंजली पातुरकर यांचे लग्न झाले आहे.
 आपल्या ह्या रेल रोकोतील अनुभवाबद्दल सरोजताई म्हणाल्या,
 "हे रेल रोको म्हणजे एका मोठ्या कापूस आंदोलनाचाच एक भाग होता. ते आंदोलन त्यापूर्वीच सुरू झालं होतं. १९८६ साली कापसाचा भाव कमी न करता निदान मागील वर्षाएवढा तरी ठेवावा या मागणीसाठी जिल्ह्याजिल्ह्यात कलेक्टरच्या कार्यालयावर मोर्चे काढायचं ठरलं. आमचा वर्धा जिल्हा म्हणजे शेतकरी संघटनेचा बालेकिल्ला. महिला आघाडीचं कामही इथे भरपूर झालं होतं. त्यामुळे इथला मोर्चा हा फक्त महिलांचा असावा व तो बैलगाड्यांतून निघावा असं ठरलं. पुर्वी असं कधीच घडलं नव्हतं.
  "आम्ही मोर्च्यांचा भरपूर प्रचार केला. तिगाव, आमला, रोठा, दहेगाव, म्हसाला अशा आठ-दहा किलोमीटर अंतरावरील गावांतूनही लोक यायला तयार झाले. एका पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने प्रश्न विचारला, 'महिलांचा मोर्चा म्हणता व तो बैलगाडीतून निघणार म्हणता. पण मग बायका बैलगाडीत मागे बसणार आणि बैलगाड्या हाकणारे पुरुषच असणार, असं 

ना? मग हा मोर्चा महिलांचा कसा म्हणता येईल?'
 "आम्हाला हा प्रश्न म्हणजे एक आव्हान वाटलं. आम्ही त्याच क्षणी जाहीर केलं, की महिलाच ह्या बैलगाड्या चालवतील. २७ ऑक्टोबर १९८६ हा मोर्च्याचा दिवस होता. आदल्या दिवशी ही घटना घडलेली. मी इतर महिलांना जेव्हा हे सांगितलं, तेव्हा त्या सगळ्या काळजीत पडल्या. कारण बैलगाडी हाकणं तसं अवघड होतं. त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून मी म्हटलं, 'पहिली बैलगाडी माझी असेल व ती मीच हाकणार आहे.'
 "माझा निश्चय बघून पाचतरी महिला बैलगाड्या हाकत येतील असं मला वाटलं. प्रत्यक्षात दुसऱ्या दिवशी २५० बैलगाड्या मोर्च्यात आल्या! हाकणाऱ्या सगळ्या महिलाच होत्या. कलेक्टर कचेरीसमोरचा सगळा रस्ता जाम झाला. तासभर तरी आम्ही तिथे होतो. सगळं गाव आश्चर्यचकित होऊन ते दृश्य पाहत राहिलं. त्यात ते पत्रकार बंधूही होते! हातात बैलांचे कासरे धरून सगळ्या बायका जोरजोरात घोषणा देत होत्या!
 "ह्या सगळ्यातून आंदोलनाला पूरक अशी जागृती होत होती. पुढचा सगळा पंधरवडा आम्ही रेल रोकोचा प्रचार करण्यात व कोणकोण कुठुनकुठुन येणार याचं नियोजन करण्यात घालवला. आम्हाला पकडायला पोलीस टपलेच होते आणि आम्ही गनिमी काव्याने त्यांची नजर चुकवून प्रचार करत फिरत होतो. आंदोलक आणि पोलीस ह्यांच्यात जणू पाठशिवणीचा खेळच सुरू होता. १० आणि ११ डिसेंबर ह्या शेवटच्या दोन दिवसांत आम्ही निदान १५ गावांमधून फिरलो.
 "शेवटी एकदाची बारा तारखेची सकाळ उगवली. सकाळी सहा वाजल्यापासूनच बाहेरगावाहून शेतकऱ्यांचे लोंढेच्या लोंढे वर्ध्यात शिरत होते. एवढी गर्दी वर्ध्याने कधीच पहिली नव्हती. जास्तीत जास्त लोकांना पोलीस पकडत होते; पण बाहेरून येणाऱ्या माणसांची संख्याच एवढी मोठी होती, की कितीही जणांना पकडलं तरी नवे नवे आंदोलक रेल्वे लाइनीच्या दिशेने पुढे सरकतच होते. रेल्वे रोकोची वेळ दुपारी ११ ते २ अशी ठरली होती. त्यानुसार ते तीन तास आम्ही ती सगळी रेल्वे लाइन अडवून धरली होती.
  "दोननंतर मात्र साहेबांनी पूर्वीच देऊन ठेवलेल्या आदेशानुसार रेल रोको थांबलं. संध्याकाळी पाचनंतर पकडलेल्या सगळ्यांना पोलिसांनीही सोडून दिलं. एवढ्या सगळ्या पंधरा-वीस हजार आंदोलकांना अटकेत ठेवण्याची काहीच सोय वर्ध्यात नव्हती. आमच्या मागण्यांकडे समाजाचं व सरकारचं लक्ष वेधून घेणं हा अशा कुठल्याही आंदोलनामागचा मुख्य हेतू असतो व तो ह्यावेळेपर्यंत सफळ झाला होता. रेल रोकोची ती यशस्वी सांगता होती."
 बहुतेक सारे कार्यकर्ते त्यावेळी तुरुंगात असल्याने ह्या रेल रोकोची बरीचशी जबाबदारी महिला कार्यकर्त्यांवर पडली. आदल्याच महिन्यात चांदवड येथे संघटनेचे ऐतिहासिक असे महिला अधिवेशन झाले होते. त्यावेळी असंख्य शेतकरी महिला पेटून उठल्या होत्या व पुरुषांच्या बरोबरीने आंदोलनात सहभागी होण्याचा निश्चय त्यांनी केला होता. हे रेल रोको म्हणजे त्या निश्चयाची एक कसोटीच होती आणि त्या कसोटीत ह्या शेतकरी भगिनी पूर्ण यशस्वी झाल्या.

२०८ ◼ अंगारवाटा... शोध शरद जोशींचा 

 १२ डिसेंबर १९८६चे हे रेल रोको म्हणजे शेतकरी आंदोलनातील एक महत्त्वाचा मानबिंदू आहे. ६ ते १२ डिसेंबर ह्या बाबू गेनू स्मृती सप्ताहातल्या राजीवस्त्रविरोधी आंदोलनात जवळजवळ सहा लाख शेतकरी स्त्री-पुरुष वेगवेगळ्या ठिकाणी रस्त्यावर आले. त्या सगळ्यांचीच पोलिसांकडून अटक करून घ्यायची तयारी होती, पण तेवढ्या साऱ्यांना अटक करायची काहीच यंत्रणा नव्हती. तरीही विदर्भात सुमारे साठ हजार शेतकऱ्यांना अटक झाली. शाळा-कॉलेजेसना सुट्टी देऊन त्या आवारांत 'खुले तुरुंग' तयार केले गेले. पूर्वी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष असलेले व नंतर राष्ट्रवादी पक्षात गेल्यावर आमदार झालेले शंकरअण्णा धोंडगे नांदेड येथे भेटले असताना प्रस्तुत लेखकाला म्हणाले होते,
 "आमच्या मराठवाड्यातही ६ ते १२ डिसेंबर ह्या काळात तीस हजार शेतकरी तुरुंगात होते. खरं तर तुरुंग सगळे पूर्ण भरलेलेच होते व तरीही उरलेल्या मोठमोठ्या शेतकरी समुदायांना वेगवेगळ्या मैदानांत डांबून ठेवलं होतं. कागदोपत्री त्यांची अटक पोलिसांनी दाखवलीच नव्हती, पण प्रत्यक्षात ती अटकच होती."
 नव्वद हजार आंदोलकांना एकाच आठवड्यात अटक होणे ही स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एक अभूतपूर्व घटना मानावी लागेल. आजवरच्या इतर कुठल्याही आंदोलनात एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकांना अटक झाल्याचे ऐकिवात नाही.
 पुढे २६ डिसेंबर रोजी नागपूर हायकोर्टाने जोशी व त्यांच्या सहकाऱ्यांची जामिनावर सुटका केली व नंतर चाललेल्या खटल्यात राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली करण्यात आलेली ही अटक बेकायदेशीरही ठरवली गेली. ह्याप्रसंगी मुंबईचे राम जेठमलानी व नागपूरचे बोबडे पितापुत्र हे जोशींच्या बाजूने हायकोर्टात उभे राहिले. रासुकाखाली अटक झालेल्यांना जामीन मिळणे हे अतिदुर्मिळ होते, पण बिनतोड वकिली युक्तिवादामुळे ते शक्य झाले. शिवाय, तसे पाहिले तर हा कायदा जोशींसारख्या तत्त्वनिष्ठ आंदोलकाला लावणे हा मूर्खपणाच होता. “We refuse to accept that Sharad Joshi is a threat to national security." ("शरद जोशी म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेला धोका आहे हे म्हणणे आम्हाला मान्य नाही") असे कोर्टानही पुढे नमूद केले. पण जास्तीत जास्त कठोर कायद्याखाली शेतकरीनेत्यांना डांबून ठेवायचे आणि कायदेशीर अडचणींशी झुंजण्यात त्यांचा शक्तिपात करून टाकायचा हे शेतकरी संघटनेच्या बाबतीत सरकारचे धोरणच होते.
 पण आपली लढाई कोर्टातदेखील लढवावी लागेल याची पूर्ण जाणीव जोशींना नाशिक आंदोलनापासूनच होती व त्यामुळे सरकारवर दबाव आणण्यासाठी तेही अनेक प्रकरणांत न्यायालयाचा दरवाजा ठोठावत. कोर्टाचे निर्णय कधी कधी आंदोलनाला मदत करणारेदेखील असत. या संदर्भात एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे "शेतकऱ्यांना एकाधिकार योजनेत प्रत्यक्षात दिली जाणारी कापूस खरेदीची किंमत जर हमी भावापेक्षा कमी असेल आणि त्यातून शेतकऱ्याचा उत्पादनखर्चसुद्धा भरून निघणार नसेल, तर एकाधिकार योजनेलाच कापूस विकायची सक्ती शेतकऱ्यांवर कशी करता येईल?" असा एक प्रश्न संघटनेने दाखल केलेल्या 

एका खटल्यात कोर्टाने उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना, “उत्पादनखर्चावर आधारित किफायतशीर भाव देणे हा एकाधिकार योजनेचा हेतू नाही' अशी कबुली सरकारी पक्षातर्फे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दिलेली होती.
 कापूस आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर बेमुदत ठिय्या मारून बसायचे असा कार्यक्रम निश्चित झाला. त्यानुसार महाराष्ट्रभरातून लाखावर शेतकरी मुंबईकडे निघाले. पण त्यांनी मुंबईपर्यंत पोचूच नये म्हणून पोलिसांनी आटोकाट प्रयत्न केले. नागपूर, वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, मनमाड, औरंगाबाद, नांदेड या रेल्वे स्टेशनांवर शेतकऱ्यांना गाडीतून उतरवले तरी जात होते किंवा चढू तरी दिले जात नव्हते. तरीही ठरलेल्या दिवशी, म्हणजे १५ फेब्रुवारी १९८७ रोजी, वीस ते पंचवीस हजार शेतकरी मुंबईत गिरगाव चौपाटीवर पोचले. त्याच दुपारी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी महसूल राज्यमंत्री रोहिदास पाटील यांना आपले खास दूत म्हणून चौपाटीवर पाठवले व शेतकरीनेत्यांना आपल्या वर्षा बंगल्यावर वाटाघाटींसाठी बोलावून घेतले. शरद जोशी, भास्करराव बोरावके, अनिल गोटे व रामचंद्रबापू पाटील यांचे शिष्टमंडळ त्यासाठी गेले. रात्री उशिरापर्यंत वाटाघाटी चालल्या. त्यानुसार कापसाची अंतिम किंमत मागील वर्षापेक्षा अधिक ठेवणे, राज्यशासन व शेतकरी संघटना यांनी निर्यातवाढीसाठी व इतर बाबीसाठी केंद्र शासनाकडे संयुक्त प्रयत्न करणे आणि एकाधिकार खरेदी योजनेच्या विक्री व्यवस्थेवर संघटनेचे प्रतिनिधी देखरेख करण्यासाठी घेणे या तीन मुद्द्यांवर संघटना व राज्यशासन यांच्यात करार झाला व त्या रात्रीच ठिय्या आंदोलनाची व १८ ऑक्टोबर १९८४पासून सुरू असलेल्या कापूस आंदोलनाची तात्पुरती सांगता झाली.
 अर्थात शेतकरी आंदोलनाचे कुठलेच पर्व कधीच तसे संपत नसते, कारण सतत नवे नवे प्रश्न किंवा जुन्याच प्रश्नांच्या नव्या नव्या बाजू पुढे येतच असतात.
 पुढल्याच वर्षी राजीवस्त्रविरोधी आंदोलनाचा एक भाग म्हणून शेतकरी संघटनेने रायगड जिल्ह्यातील, पण मुंबईपासून फार दूर नसलेल्या, पाताळगंगा येथे १२ डिसेंबर १९८८ रोजी, म्हणजे हुतात्मा बाबू गेनू यांच्या स्मृतिदिनी, एक सत्याग्रह केला जाईल असे जाहीर केले. पाताळगंगा परिसरात दहाहून अधिक कारखाने कृत्रिम कापड धंद्याशी संलग्न आहेत; त्यात धीरूभाई अंबानी यांची रिलायन्स व नसली वाडिया यांची बाँबे डाइंग या दोन कंपन्या प्रमुख आहेत. त्या परिसराला शेतकरी सत्याग्रही वेढा घालतील व आत तयार झालेला माल बाहेर पडू देणार नाहीत असे ठरले होते. पण आयत्यावेळी हे आंदोलन मागे घेण्यात आले. या प्रकरणावरून जोशींवर संशय व्यक्त करणारी काही उलटसुलट चर्चा एक-दोन वृत्तपत्रांमधून झाली होती. त्यावेळी नेमके काय घडले होते याविषयी खुलासा करताना जोशी म्हणाले,
 "अंबानींचं नाव असलं म्हणजे काहीतरी काळंबेरं नक्की असणार असं उगाचच काही लोकांना वाटतं! आणि सुतावरून स्वर्ग गाठण्यात हे लोक हुशार असतात. प्रत्यक्षात इथे कुठलाही गैरव्यवहार झाला नव्हता. शेतकरी संघटनेच्या संपूर्ण इतिहासात कोणाकडून आम्ही


२१० ◼ अंगारवाटा... शोध शरद जोशींचा 

पैसे खाल्ले व त्या कारणामुळे आंदोलन सुरू केलं किंवा मागे घेतलं, असं एकदाही घडलेलं नाही. आम्हाला जवळून ओळखणाऱ्या एकानेही असा आरोपही पूर्वी कधी केलेला नाही. शेवटी एखाददुसऱ्या माणसाने अशी काही कुजबुज केलीच, तर आपण काही त्याचं तोंड धरू शकत नाही. पण आमचा एकही शेतकरी अशा कुठल्या आरोपावर क्षणभरही विश्वास ठेवणं शक्य नाही. एवढा मला आमच्या शेतकऱ्यांबद्दल नक्की विश्वास आहे. वस्तुस्थिती अशी होती, की कापूस शेतकऱ्यांच्या दृष्टीने आंदोलनाची वेळ गैरसोयीची ठरली; आमच्या एकदोन सहकाऱ्यांनी हे आंदोलन ठरवण्यात थोडीशी घाई व थोडीशी चूकच केली. मुळात पाताळगंगा परिसरात शेतकरी संघटनेचा फारसा जोर नव्हता; बाहेरून शेतकरी निदर्शक मोठ्या प्रमाणावर सत्याग्रहासाठी येऊ शकतील अशी खात्री नव्हती. अशा परिस्थितीत आंदोलन हमखास अयशस्वी ठरलं असतं. दुसरं एक कारण म्हणजे त्याच वेळी कापसाची किंमत सरकारने वाढवून दिली होती. त्यामुळे खोट्या प्रतिष्ठेला बळी न पडता मी सत्याग्रह रद्द केला. आंदोलनात असं कधी कधी होतं."
 पण कुठेतरी आपल्या जाहीर स्पष्टीकरणात या संदर्भात जोशी कमी पडले असावेत व काहीच कारण नसताना त्यांच्या विरोधात एका छोट्या वर्तुळात तरी गैरसमज प्रसृत झाले होते.
 यानंतर सात वर्षांनी, म्हणजे १४ डिसेंबर १९९५पासून जोशींनी कापसाच्या झोनबंदीविरुद्ध आंदोलन छेडले. उसाप्रमाणेच कापूसविक्रीवरही झोनबंदीचे बंधन होते. सरकारच्या कापूस धोरणातील हा एक अतिशय जाचक भाग होता. ठरवून दिलेल्या हद्दीबाहेर जाऊन आपला कापूस विकण्याचे स्वातंत्र्य शेतकऱ्याला नव्हते. प्रत्यक्षात ही झोनबंदी सगळे शेतकरी पाळत असत असे नाही. दोन राज्यांतील सीमेवर जे पोलीस तैनात केलेले असत त्यांना कापसाच्या प्रत्येक ट्रकमागे ठरलेली रक्कम लाच म्हणून दिली, की ते तो ट्रक खुशाल पलीकडे सोडत असत. हा त्यांच्या कमाईचा एक मोठाच मार्ग बनला होता व त्यातील हिस्सा अगदी वरपर्यंत पोचत होता हेही उघड होते. पण अशा प्रकारच्या भ्रष्टाचारात शेतकरी संघटनेचे पाईक सहसा कधी सामील होत नसत. भ्रष्टाचाराला विरोध हे संघटनेचे नेहमीच एक वैशिष्ट्य राहिले आहे. सरळमार्गी शेतकऱ्यासाठी त्यामुळे ही झोनबंदी खूप क्लेशदायक होती. मध्यप्रदेशातील ब-हाणपुरच्या बाजारात जेव्हा कापसाला अडीच हजार रुपये क्विटल भाव मिळत होता, तेव्हा महाराष्ट्रात मात्र त्याला फक्त ९६० रुपये भावाने कापूस विकावा लागत होता. आपण इतक्या कष्टाने कापूस पिकवला आहे, त्याला हद्दीपलीकडे इतका भाव मिळतो आहे, पण आपल्याला मात्र तो इथेच इतक्या स्वस्तात विकायला लागतो आहे, ही वस्तुस्थिती शेतकऱ्याच्या काळजाला डागण्या देणारी होती.

या झोनबंदीविरुद्धच्या आंदोलनाची सुरुवात करताना त्यांनी लिहिले आहे,
  १२ डिसेंबर रोजी नागपूर जिल्ह्यातील नरखेड येथे महाराष्ट्रातील लक्षावधी कापूसउत्पादक शेतकरी मोर्च्याने जमणार आहेत. तेथून मध्यप्रदेशची सरहद्द ओलांडून



पांढुर्णा येथील बाजारपेठेत ते पिशवी-पिशवी कापूस घेऊन जाणार आहेत. त्यांची मागणी कापसाला अधिक भाव मिळावा अशी नाही. उलट, सध्याच्या महाराष्ट्र शासनाने जुन्या सत्ताधाऱ्यांची दुष्ट नीती सोडून, महाराष्ट्रातील कापसास आधारभूत किमतीच्या तुलनेत वाढीव भाव देऊ केला आहे. याबद्दल महाराष्ट्र शासनाचे मी कौतुकही केले आहे. पण एकाधिकार योजनेस एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आणि ती योजना पुढे चालू ठेवण्याचा याही सरकारचा इरादा आहे. गेली पंचवीस वर्षे एकाधिकार या गोंडस नावाखाली पुढारी, अधिकारी आणि गिरणी मालक यांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांना अब्जावधी रुपयांना बुडवले. आणि असेच बुडवत राहण्याचा त्यांचा इरादा आहे. या एकाधिकाराला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांचा हा स्वातंत्र्यमोर्चा आहे. विरोध सरकारी खरेदीला नाही; सरकारी मक्तेदारीला आहे. कास्तकारांनी पिकवलेला कापूस त्यांना मर्जीप्रमाणे कोणत्याही देशी किवा विदेशी बाजारपेठेत विकण्याचे, त्यावर प्रक्रिया करण्याचे किंवा त्याची वासलात लावण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे, ही स्वातंत्र्यमोर्च्यांमागची धारणा आहे.

(शेतकरी संघटक, ६ डिसेंबर १९९५)


  प्रदीर्घ काळ चाललेल्या या कापूस आंदोलनात अशी आंदोलने वेळोवेळी होतच राहिली.

 शेतकऱ्यांसमोरील प्रश्नांचे स्वरूप किती गुंतागुंतीचे आहे व म्हणूनच कुठल्याही आंदोलनानंतर तो विशिष्ट प्रश्न मिटला असे होत नाही हे स्पष्ट करण्यासाठी जोशी यांनी अलीकडे लिहिलेला (लोकसत्ता, बुधवार, ९ जानेवारी २०१३ अंकातील) एक लेख वाचण्यासारखा आहे. बाजारपेठेतील व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याचा माल विकला गेल्याबद्दल त्याला पैसे मिळण्याऐवजी, त्याच्याकडेच उलट पैसे मागणारे पत्र आले, की त्याला शेतकरी 'उलटी पट्टी' म्हणत. सरकारनेदेखील शेतकऱ्यांना अनुदान, कर्जमाफी वगैरे स्वरूपात जी रक्कम आजवर दिली, त्याच्या अनेकपट रक्कम शेतकऱ्याकडून सरकारने त्याच्या शेतीमालाला सातत्याने उत्पादनखर्चापेक्षा कमी किंमत देऊन लुबाडली, असे जोशी सतत म्हणत आले. सरकारकडून शेतकऱ्याला मिळणारी ही 'उलटी पट्टीच' आहे असे ते म्हणत. त्यावेळी ते कोणालाच पटत नसे; पण अनेक वर्षांनी त्यातील सत्याची साक्ष पटवणारा एक प्रसंग ह्या मजकुरात त्यांनी नोंदवला आहे. तो असा :
 १९८९ साली एक रोचक दस्तावेज जोशींच्या हाती पडला. शेतकरी नेते भूपिंदरसिंग मान राज्यसभेचे सदस्य होते. राज्यसभेसमोर ठेवला गेलेला, ज्यातील आकडेमोड समजणे कठीण होते, असा एक तक्ता, त्यांनी जोशींकडे अभ्यासाकरिता पाठवून दिला. त्या तक्त्यामध्ये सध्याचे राष्ट्रपती आणि त्यावेळचे व्यापारमंत्री डॉ. प्रणव मुखर्जी यांनी आकड्यांत आणि शब्दांत स्पष्ट केले होते, की शेतकऱ्यांना त्यांचा उत्पादनखर्च भरून निघावा इतकाही भाव भारतात मिळत नाही. त्या तक्त्यात दिलेल्या सगळ्या मालाच्या किमती प्रत्यक्ष उत्पादनखर्चापेक्षा १० ते ९० टक्क्यांनी कमीच होत्या; केवळ उसाला मात्र


२१२ ◼ अंगारवाटा... शोध शरद जोशींचा 

उत्पादनखर्चाएवढा भाव मिळतो अशी नोंद होती. याउलट कापसाला जागतिक बाजारपेठेमध्ये जर २१० रुपये भाव असेल, तर त्या वेळी देशात कापूस खरेदी महासंघ (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) शेतकऱ्याला १०० रुपये भाव देऊ करतो.
 थोडक्यात, सरासरीने भारतात कापसाला ११० रुपयांची उलटी पट्टी आहे, हा निष्कर्ष निघाला. महाराष्ट्रातील विदर्भासारख्या प्रदेशात तर एकाधिकाराखाली शेतकऱ्याना प्रती क्विटल ६० रुपयेसुद्धा मिळत नाहीत असेही त्या तक्त्यात स्पष्ट म्हटले होते. पुढे एकदा ह्या निगेटिव्ह सबसिडीची, म्हणजे उलट्या पट्टीची, दाहकता जोशींनी एका कार्यक्रमात भेट झाली असताना, मुखर्जीसाहेबांच्या लक्षात आणून दिली. ते हसत हसत म्हणाले, “आणि तरीही आमचे विरोधी पक्ष म्हणतात, की जागतिक व्यापार संस्थेच्या दबावाखाली आमच्याकडील शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सबसिड्या सरकार कमी करेल!"
 म्हणजेच, जागतिक दडपणाखाली शेतकऱ्यांच्या सबसिड्या कमी करू नका, अशी जेव्हा काही नेते व विचारवंत मागणी करत होते, तेव्हा प्रत्यक्षात अशा कुठल्या सबसिड्या नव्हत्याच, तो केवळ एक आभास होता, याचीही जाणीव त्या मंडळींना नव्हती. प्रत्यक्षात सरकार शेतकऱ्यांकडूनच पैसे ओरबाडून घेत आले आहे, हे आमच्या विरोधी पक्षांच्यासुद्धा कधी लक्षात आले नव्हते!
 कापूस आंदोलनाविषयी लिहिताना शेतकऱ्यांच्या आत्महत्यांविषयी लिहिणे आवश्यक वाटते, कारण या आत्महत्यांचे प्रमाण कापूस शेतकऱ्यांमध्ये सर्वाधिक आहे. खरेतर हा एखाद्या स्वतंत्र ग्रंथाचा विषय आहे आणि त्यावर इथे थोडक्यात काही लिहिणे विषयाला न्याय देणारे असणार नाही. तरीही शेतकरी आत्महत्या हा अलीकडे वरचेवर चर्चेत येणारा विषय असल्याने शरद जोशी ह्या विषयाकडे कसे पाहत होते, याचे कुतूहल वाचकाला वाटणे स्वाभाविक आहे.
 अनेक शहरी वाचकांत शेतकरी आत्महत्यांबद्दल बरेच गैरसमज प्रचलित असतात. उदाहरणार्थ, 'सरकारकडून लाख-दोन लाख रुपये नुकसानभरपाई मिळावी म्हणून काही जण मुद्दाम आत्महत्या करतात.' किंवा 'आता आपल्या कुटुंबाला मदत म्हणून आपण काहीच करू शकत नाही; तेव्हा निदान आत्महत्या करून तरी त्यांना चार पैसे मिळवून द्यावे असाही विचार ह्या आत्महत्यांमागे आहे' असे काही जणांना वाटते. हे म्हणणे सत्याचा विपर्यास करणारे आहेच, पण ते अतिशय क्रूरदेखील आहे.
 आत्महत्या करणाऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत म्हणून जी रक्कम जाहीर होते तिच्यातले किती पैसे प्रत्यक्षात त्या कुटुंबीयांपर्यंत पोचतात व किती पैसे मधल्यामध्ये हितसंबंधी हडप करतात हा एक संशोधनाचाच विषय आहे. पण अधिक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जगण्याची प्रेरणा ही माणसाची सर्वांत प्रबळ प्रेरणा आहे व कोणी कितीही पैसे दिले म्हणून एखादा माणूस आत्महत्या करेल हे अशक्य कोटीतले वाटते. मुळात आत्महत्या करणे एवढे सोपेही नाही.


जोशींनी ह्या आत्महत्यांचा खूप खोलात जाऊन विचार केला होता व ह्या समस्येची काही कारणे आणि काही मूलगामी उपाय त्यांनी सुचवले आहेत. (बळीचे राज्य येणार आहे., पृष्ठ ३५४ ते ३७४)
 शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसंबंधी जोशींनी केलेली मीमांसा थोडक्यात पुढीलप्रमाणे होती :

१) देशभरात आजवर घडलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांत सर्वाधिक आत्महत्या कापूस

उत्पादक शेतकऱ्यांनी केलेल्या आहेत. शेजारच्या आंध्रातील शेतकरी आत्महत्या नकली कीटकनाशके अथवा बियाणे यांच्यामुळे झालेल्या नुकसानीतून प्रेरित झाल्या होत्या. पण महाराष्ट्रात अशा भेसळीचे प्रमाण नगण्य आहे व म्हणून ते महाराष्ट्रातील आत्महत्यांमागचे प्रमुख कारण मानता येणार नाही. इथले प्रमुख कारण हे कापूस उत्पादनात वर्षानुवर्षे येत

गेलेल्या तोट्यात आहे.

२) आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांपैकी बहुतेक सर्वजण जमीनमालक शेतकरी आहेत; भूमिहीनमजूर नाहीत. तेव्हा 'आम आदमी'च्या नावाखाली 'जमीन सुधारणांचा अभाव' वगैरे 'पुरोगामी' कारणे देऊन बरेच विद्वान करतात तशी या आत्महत्यांची कारणमीमांसा करणे बाष्कळपणाचे होईल.

३) बहुतेक आत्महत्याग्रस्त शेतकरी सहकारी बँकांच्या पठाणी वसुलीने त्रस्त झालेले होते.आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याने बहुतेकदा सहकारी सोसायट्यांकडून कर्ज घेतलेले असते व त्याच सर्वाधिक क्रूरपणे कर्जवसुली करतात. ग्रामीण भागात व्यापारी बँका कर्जवसुलीसाठी फारशी दांडगाई करत नाहीत; लोकांचा फार रोष ओढवून घेण्याची त्यांची मानसिकताही नसते. खासगी सावकारदेखील फारशी पठाणी वसुली करण्याची हिंमत करत नाहीत; त्यांना गावात राहायचे असते आणि पाण्यात राहून माशांशी वैर घेण्याची त्यांची हिंमत होत नाही. त्यामुळे खासगी सावकारीच्या विरोधात पुनःपुन्हा आळवले जाणारे आणि आता खूप जुने गुळगुळीत झालेले समाजवादी अवडंबर निरर्थक आहे. किंबहुना, 'सावकारांची सालटी काढू' अशी भाषा महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी केल्यामुळे अनेक गावांमधून कर्ज द्यायचा व्यवसाय करणाऱ्या सावकारांनी शेतकऱ्यांना कुठलेही कर्ज देणे बंद केले; एवढेच नव्हे, तर अशा गावांतून दुकानदारदेखील शेतकऱ्यांना उधारीवर माल देईनासे झाले. ह्यात सर्वाधिक हाल गरजू शेतकऱ्याचेच होत असतात. कर्जवसुलीकरिता मालमत्तेवर जप्ती आणणे, शेतकऱ्याला धमकावणे अशी दांडगाई प्रत्यक्षात फक्त सहकारी संस्थांच्या वसुली अधिकाऱ्यांकडून होते. आपल्या मागे राजसत्ता उभी आहे अशा खात्रीने ही सहकारी संस्थांची पदाधिकारी मंडळी कर्ज थकलेल्या शेतकऱ्यावर अनन्वित जुलूम करतात. शेतकऱ्याला सर्वाधिक जाच ह्या मंडळींकडून होत असतो.

४) कर्जबाजारी झालेला शेतकरी वर्षानुवर्षे निसर्गाशी आणि शासनाशी झगडा देत हरल्यानंतर


२१४ ◼ अंगारवाटा... शोध शरद जोशींचा 

हताश होतो. वर्षानुवर्षे साठलेले कर्ज आणि त्यावरील व्याज यांच्या वसुलीकरिता सावकारी पद्धतीने सहकारी बँकांचे अधिकारी आले म्हणजे सर्वदूर अप्रतिष्ठा होते; हे पाहण्यापेक्षा डोळे मिटलेले बरे, या भावनेने शेतकरी शेवटी जवळच्या विषाच्या कुपीकडे वळतो. गावात होणारी स्वतःची बदनामी शेतकरी सहन करू शकत नाही.

५) कुठलाही अडचणीत सापडलेला मनुष्य त्या अडचणीतून बाहेर कसे पडता येईल याचा विचार करतो. त्याच्या मनात मरणालाच कवटाळावे असा विचार एकदम कधी येत नाही. परंतु आसपासच्या प्रदेशात समांतर परिस्थितीत सापडलेल्या कोणीतरी आपली जीवनयात्रा संपविण्याचा निर्णय घेतला असे दिसले, की मग त्यानंतर तशा परिस्थितीत सापडलेल्या सर्वांच्या मनात, निराशेच्या टोकाला गेल्यानंतर, आत्महत्येचा विचार येतो. म्हणूनच सामान्यतः आत्महत्या एकट्यादुकट्या होत नाहीत; आत्महत्यांची त्या परिसरात जणू एक साथ असते. विदर्भातील शेतकऱ्यांमध्ये ही आत्महत्येची अशीच साथ सध्या पसरलेली दिसते.

६) सर्वच शेतीमालाच्या बाबतीत उणे सबसिडी हा प्रकार आढळतो; पण कापसाच्याबाबतीत तो सर्वाधिक जाचक होता व आजही आहे. विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्याची परिस्थिती इतकी गंभीर झाली ती महाराष्ट्र शासनाने १९७१पासून राबवलेल्या एकाधिकार कापूस खरेदी योजनेमुळे. या योजनेखाली शेतकऱ्यांना मिळालेल्या किमती शेजारील मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश व गुजरात या राज्यांतील कापसाच्या किमतीपेक्षा कितीतरी कमी होत्या. त्यामुळे विदर्भातील कापूस उत्पादक दरवर्षी कर्जात अधिकाधिक बुडत गेला. या योजनेच्या काळात महाराष्ट्रातील कापूस शेतकऱ्यांचे नुकसान किती झाले याचा एक अंदाज रुपये तीस हजार कोटी रुपये इतका जातो. या योजनेने जखमी झालेल्या शेतकऱ्यांची जखम चाळीस वर्षे सडत आहे; तिथे गँगरिन झाले आहे. या आत्महत्यांचे कारण तात्कालिक संकट हे नाही; एक-दोन वर्षे पाऊस पडला नाही किंवा पीकबूड झाली म्हणून आत्महत्या करण्याइतका विदर्भातील शेतकरी घायकुता नाही. अशा संकटांची त्याला सवयच असते. सध्याच्या आत्महत्यांची लाट प्रामुख्याने कापूस एकाधिकार खरेदी योजनेने शेतकऱ्यांवर वर्षानुवर्षे घातलेले घाव चिघळल्याने आली आहे. महाराष्ट्रातील कापूस उत्पादकांच्या आत्महत्यांना कारणीभूत म्हणून एकच खलनायक शोधायचा असेल, तर महाराष्ट्र राज्य एकाधिकार कापूस खरेदी योजनेकडेच बोट दाखवावे लागेल.

 ह्या परिस्थितीवर काही दीर्घकालीन व काही अगदी तातडीच्या अशा उपाययोजनादेखील जोशी सुचवतात. थोडक्यात त्यांचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे :

१) शेतकऱ्यांची सर्व थकित कर्जे बेकायदेशीर आणि अनैतिक आहेत, कारण ती मुख्यतः त्याच्या मालाला जाणूनबुजून कमी भाव दिल्यामुळे थकलेली आहेत. त्यांच्या वसुलीसाठी त्याची जमीन जप्त करणे, त्याची शेतीकामाची अवजारे, दुभती जनावरे व



मालमत्ता जप्त करणे हे सर्वथा गैर आहे. तशी कर्जवसुली बेकायदेशीर ठरवली जावी. चक्रवाढ दराने व्याज आकारणे हाही दखलपात्र गुन्हा ठरवण्यात यावा. खरे तर या सर्वजुन्या कर्जापासून त्याला मुक्त करायला हवे.

२) ज्याला शेतीव्यवसाय सोडायचा आहे त्याला आपली शेतजमीन विकता येईल आणि ज्याला शेतीव्यवसाय नव्याने सुरू करण्याची इच्छा व आर्थिक कुवत आहे त्याला तशी शेतजमीन विकत घेता येईल, अशी व्यवस्था करायला हवी. कोणीही शहरी उद्योजक एक व्यवसाय म्हणून आज शेतीकडे वळणार नाही. त्यासाठी काही कायदेही बदलावे लागतील. आज शेतजमिनीची विक्री वा खरेदी खुप किचकट बनली आहे. केवळ वाडवडलांपासून चालत आलेली घरची शेती आहे म्हणून नाइलाजाने शेती करणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. अन्य व्यवसायांप्रमाणे शेतीतही बाहेर पडायचा मार्ग (Exit Route) ठेवला तर शेतकरी आजच्याइतका अगतिक राहणार नाही. प्रचंड वाढलेला औषधोपचारांचा खर्च किंवा मुलांच्या शिक्षणाचा खर्च किंवा मुलांना टेम्पो वा रिक्क्षा टाकणे यांसारखा एखादा पर्यायी व्यवसाय करता यावा किंवा नोकरी करता यावी, यासाठी करायचा खर्च वगैरेंचे आकडे आज फार मोठे आहेत. मुख्यतः त्यासाठी कर्ज काढावे लागते आणि ते फेडणे अशक्य होऊन बसते. त्याच्या अगतिकपणाच्या भावनेतूनच आत्महत्येचा पर्याय पुढे येतो. ती अगतिकता दूर करायची असेल, तर त्याच्यापुढे अर्थार्जनाचे शक्य कोटीतले व त्याला झेपणारे पर्यायही उपलब्ध व्हायला हवेत. आज शेतकऱ्यांपुढे ते पर्याय आढळत नाहीत. या नरकातून आपण सुटूच शकत नाही' या भावनेने तो अधिकच खचून जातो.

३) मरणाच्या सीमेवर पोचलेल्या शेतकऱ्याचा आक्रोश ऐकला जाण्याची काहीतरी व्यवस्था केली पाहिजे. उदाहरणार्थ, प्रत्येक तालुक्यात हेल्पलाइन सुरू करावी. वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी आत्महत्या ह्या प्रकाराचा भरपूर अभ्यास केला आहे. त्यांनी काढलेला एक निष्कर्ष असा आहे, की आत्महत्या करण्याची ऊर्मी ही क्षणिक असते. माणसाला क्षणभर आलेल्या विफलतेच्या भरात तो काय वाटेल ते करून जातो. पण तो विशिष्ट क्षण जर का कोणत्याही कारणाने आणि कोणत्याही पद्धतीने टाळता आला, तर आत्महत्या टळू शकते.

४) शेतकऱ्याचा आत्मसम्मान जागृत करणे हा आत्महत्या थांबवण्याचा सर्वांत महत्वाचा उपाय आहे. त्यासाठी त्याला सबसिडीच्या बेड्यांत जखडून टाकणे हा उपाय नाही; त्याच्या मालाला वाजवी भाव मिळेल अशी यंत्रणा उभी करणे हे सर्वांत महत्त्वाचे आहे. तो शेतीत खचत गेला ह्याला इतर कोणत्याही कारणापेक्षा सातत्याने दिला गेलेला कमी भाव व त्याद्वारे पिढ्यानपिढ्या झालेली सरकारी पिळवणूक हे सर्वाधिक मोठे कारण आहे. ती पिळवणूक थांबवावी म्हणून लढा उभारण्यासाठी त्याचे आत्मबळ वाढवायला हवे. सगळ्या शेतकऱ्यांनी मिळून जर अशी प्रतिज्ञा केली की, 'आम्ही बुडालो ते


२१६ ◼ अंगारवाटा... शोध शरद जोशींचा 

आमच्या चुकीमुळे नव्हे आणि या आक्रमणाला आम्ही सर्व मिळून एकत्र तोंड देऊ, खचून जाणार नाही तर शेतकऱ्यांना याही प्रसंगातून तगून जाण्याकरिता जे सामर्थ्य हवे ते मिळू शकेल असे मला वाटते.

 जोशींच्या मते तसे सगळ्याच शेतीमालाचे शोषण होते, पण कापसाचे शोषण त्या सर्वांत विशेष क्रूर आहे. मनुष्याच्या अन्नपाण्याची एकदा सोय लागली, की त्याची सर्वांत मोठी गरज अंगभर वस्त्राची असते. साहजिकच पहिली कारखानदारी उभी राहिली ती कापड गिरण्यांची आणि सर्वांत जास्त शोषण झाले ते कापूस पिकवणाऱ्या शेतकऱ्याचे. इंग्रजांच्या साम्राज्याचे मूळ उद्दिष्ट कापसाच्या शोषणाचे होते. गांधीजींनी त्याविरुद्ध लढा उभा केला तो चरख्याची निशाणी घेऊन आणि खादीचा कार्यक्रम घेऊन. या एकाच गोष्टीत सगळे कापसाचे राजकारण आणि तत्त्वज्ञान सामावलेले आहे. १९४७ साली गोरा इंग्रज गेला, पण त्या जागी काळा इंग्रज आला; शेतकऱ्यांचे शोषण चालूच राहिले.
  कापसाचा भाव बुडवण्यासाठी सरकारने काय काय नाही केले? निर्यातीवर जवळजवळ कायम बंदी ठेवली. जरा काही शेतकऱ्यांना बरा भाव मिळेल असे दिसले, की बाहेरून कापूस आणायची मात्र तत्परतेने व्यवस्था केली व देशांतर्गत कापसाचे भाव पाडले; शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवला. हे सगळे करताना त्यांनी आपण हातमागधारकांचे हितरक्षण करतो आहोत असा आव आणला. हातमागधारकांची एकूण सगळी गरजच मुळी केवळ चार लाख गाठींची होती. त्यांना तेवढा कापूस स्वस्त मिळावा, याकरिता कितीतरी अधिक सुटसुटीत व्यवस्था करता आली असती; पण त्यांना त्यांची चार लाख गाठी रुई स्वस्त द्यायचा बहाणा करत, त्याच्या पंचवीसपट असलेला १०० लाख गाठींचा बाजार शासनाने वर्षानुवर्षे उद्ध्वस्त केला.<
 जोशी म्हणतात, "जखमांमधून वाहणारे रक्त थांबावे म्हणून कापूस लावला जातो, पण शेतीच्या कापसातून वर्षानुवर्षे रक्त वाहतच राहिले आहे."
 शेतकरी संघटनेचे काम सर्व महाराष्ट्रभर पसरले ते कापूस आंदोलनामुळे. कांदा, ऊस, तंबाखू ही त्यामानाने छोटी पिके; कापसाचे क्षेत्र मात्र खूप विशाल. जवळ जवळ सगळा विदर्भ आणि बराचसा मराठवाडा व्यापणारे. कापसावर अवलंबून असणाऱ्या शेतकरी कुटुंबांची संख्याही खूप मोठी. शेतकरी संघटनेच्या सभांना होणारी सर्वाधिक गर्दी कापूस शेतकऱ्यांची असे आणि संघटनेचे सर्वाधिक कार्यकर्तेदेखील कापूसक्षेत्रातून आले. शरद जोशींच्या आयुष्यातील आंदोलनपर्वाचा मोठा हिस्सा कापसाने व्यापलेला आहे.

 


शेतकरी संघटना – तत्त्वज्ञान आणि उभारणी


 चाकणचे कांदा आंदोलन व नंतर नाशिकचे ऊस आंदोलन यांचा अनुभव गाठीशी आल्यानंतर शेतकरी संघटना बळकट पायावर उभी करण्याची गरज जोशींना भासू लागली. त्या दृष्टीने निपाणीच्या तंबाखू आंदोलनापूर्वीच त्यांनी आपल्या निवडक कार्यकर्त्यांची तीन शिबिरे घेतली होती. पहिले शिबिर एप्रिल १९८० मध्ये आळंदीला झाले होते. ऊस आंदोलनाबद्दल लिहिताना मागे त्याचा उल्लेख झालाच आहे.
 दुसरे शिबिर वर्धा येथे १ जानेवारी १९८१ रोजी झाले. त्याला १०० कार्यकर्ते हजर होते. ते शिबिर भरवण्यात विदर्भातील संघटनेचे नेते विजय जावंधिया आणि रवी काशीकर यांचा विशेष पुढाकार होता. अर्थशास्त्र, संघटना आणि आंदोलन ह्या तीन विषयांची इथे चर्चा झाली. चर्चेचे ध्वनिमुद्रण केले गेले होते व या कॅसेट्स सावकाश ऐकत त्यांचे शब्दांकन करायचे क्लिष्ट काम लीलाताई जोशी यांनी स्वतः सुरू केले होते. दर्दैवाने ते पूर्ण होण्यापूर्वीच लीलाताई हे जग अकालीच सोडून गेल्या होत्या. पुढे अलिबागचे प्रा. सुरेश घाटे (अ. वा. कुळकर्णी आणि सुरेशचंद्र म्हात्रे यांचे एक सहकारी) यांनी ते पूर्ण केले व भारतीय शेतीची पराधीनता या शीर्षकाखालील एका ४०-पानी पुस्तिकेच्या स्वरूपात त्याचे मुद्रणही केले. ती पुस्तिका घाटे यांनी लीलाताईंच्या स्मृतीलाच अर्पण केली होती. या शिबिरातील चर्चा शिबिरार्थांना खूप उपयुक्त वाटली होती, पण त्याचवेळी काहीशी अपुरीही वाटली होती. मुख्य म्हणजे शिबिरासाठी एकूण वेळ खूप कमी पडला होता.
 त्यामुळे मग निवडक ५० कार्यकर्त्यांसाठी तिसरे शिबिर बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे २६ व २७ फेब्रुवारी १९८१ रोजी घेतले गेले. विषयाची अधिक बारकाईने चर्चा करणे व त्यातून कार्यकर्त्यांची बौद्धिक पूर्वपीठिका तयार करणे हा त्यामागचा उद्देश होता. मोरेवाडीचे श्रीरंगनाना मोरे ह्यांच्या साहाय्याने हे तिसरे शिबीर घेतले गेले. श्रीरंगनाना हे शेतकरी चळवळीत खरेतर शरद जोशी यांच्या आगमनापूर्वीच सक्रिय होते. शेतकऱ्यांसाठी ते भूमिसेवक नावाचे एक पाक्षिकही चालवत असत. त्यांनीच ह्या शिबिरासाठी सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या. ह्या शिबिरातील सर्व चर्चेचेदेखील ध्वनिमुद्रण केले गेले होते, पण ते शब्दबद्ध करायचे काम मात्र कोणी केले नव्हते; त्या कॅसेट्स तशाच पडून होत्या.
 २० सप्टेंबर १९८१ रोजी पिंपळगाव बसवंत येथे भरलेल्या विराट विजय मेळाव्यात


२१८ ◼ अंगारवाटा... शोध शरद जोशींचा 

जोशी म्हणाले होते,
  "तुमची शेतकरी संघटनेवरील भक्ती, मी तुम्हाला सांगेन ती युक्ती आणि मागच्या आंदोलनात प्रत्ययाला आलेली शेतकऱ्यांची शक्ती यांचा समन्वय येत्या तीन वर्षांत होऊ द्या आणि मग चमत्कार पाहा - भक्ती-युक्ती-शक्ती आणि तीन वर्षांत मुक्ती!"
 या मेळाव्याचा पाठपुरावा म्हणून १० नोव्हेंबर १९८१ रोजी एक महाराष्ट्रव्यापी आंदोलन आयोजित केले गेले. त्याच सुमारास कृषी योगक्षेम संशोधन न्यास' स्थापन केला गेला. शरद जोशी, माधवराव खंडेराव मोरे व प्रल्हाद कराड पाटील ही नाशिक आंदोलनातील त्रिमूर्तीच ह्या न्यासाची विश्वस्त होती. त्यातून आपल्या कार्यकर्त्यांना दरमहा निदान ३०० रुपये मानधन द्यायचे ठरले. (प्रत्यक्षात ते अगदी थोड्या कार्यकर्त्यांना व तेही थोडेच महिने देता आले.)
 १, २ व ३ जानेवारी १९८२ रोजी सटाणा इथे शेतकरी संघटनेचे पहिले अधिवेशन भरले होते. पिंपळगाव मेळाव्यातच अशा अधिवेशनाची घोषणा झाली होती व ते बागलाण तालुक्यातील मांगी तुंगी येथे २१-२२-२३ ऑक्टोबर १९८१ रोजी भरणार होते; पण नोव्हेंबरमधील आंदोलनाला वेळ मिळावा म्हणून अधिवेशन थोडे पुढे ढकलले गेले व जागाही मांगी तुंगीऐवजी अधिक सोयीची अशी सटाणा ही ठरली. या अधिवेशनाला प्रत्येकी पंधरा रुपये प्रतिनिधिशुल्क भरून साऱ्या महाराष्ट्रातून ३०,००० शेतकरी स्वतःच्या खर्चाने व आपापली शिदोरी बांधून आणून सामील झाले होते. मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, आंध्र प्रदेश, हरयाणा व पंजाब येथूनही काही वेगवेगळ्या शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी हजर होते. १ जानेवारीला सकाळी दहा वाजता सुरू झालेले हे अधिवेशन तीन तारखेला दुपारी एक वाजता संपले. शेवटच्या सत्रानंतर त्याच जागी खुले अधिवेशन झाले व त्याला तीन लाख शेतकरी स्त्री-पुरुष हजर होते.
 ऊस आंदोलनातील यशामुळे ऊस शेतकऱ्यांना एका टनाला ३०० रुपये हा वाढीव भाव मिळाला होता. इतकी वर्षे मिळत असलेल्या भावाच्या हा दुप्पट होता. त्यामुळे बाजारपेठेतील उलाढाल एकदम खूप वाढली होती. बँकांची-सोसायट्यांची कर्जे फिटायला लागली होती, व्यापाऱ्यांनीही बुडीत खाती टाकलेली देणी शेतकऱ्यांनी आपणहून जाऊन फेडली. शेतमजुरांचे वेतनही जवळपास दुप्पट झाले होते. साहजिकच सगळे खूप आनंदात होते. एकजुटीचे महत्त्व त्यांना पटले होते. आपले भाग्य आपण आंदोलनातून पालटू शकतो हा आत्मविश्वास त्यांच्या ठायी प्रथमच निर्माण झाला होता. आंदोलनाला थोडेफार संघटनात्मक स्वरूप प्राप्त करून द्यायची गरज ह्या सटाणा अधिवेशनात प्रकर्षाने जाणवली.
 वर्धा येथील प्रशिक्षण शिबिरात जोशी म्हणाले होते, "आपलं आंदोलन नवीन आहे, नव्या पिढीने ते समजून घेतलं पाहिजे. प्रत्येक वेळी नवं आंदोलन सुरू झालं, की जुने सरदार, मनसबदार हे बाजूला पडतात. त्यांचा उपयोग राहत नाही. पहिल्या बाजीरावाच्या वेळी त्याला शिंदे-होळकर नवीन तयार करावे लागले. शिवाजीलाही जुन्या मनसबदार-देशमुखांनी मदत केली नाही; नवे सरदारच त्याला तयार करावे लागले. हे प्रत्येक वेळी घडतं आणि आज 

आपले नवे सरदार सगळे या नव्या पिढीतून येणार आहेत.'
 प्रशिक्षण शिबिरातील भाषणांच्या शब्दांकनाचे एखादे पुस्तक व्हावे असे म्हात्रे यांचे म्हणणे होते व 'आंदोलनासाठी नवे सरदार' घडवण्याच्या संदर्भात हे प्रस्तावित पुस्तक महत्त्वाचे ठरू शकेल हेही जोशांना जाणवले. फेब्रुवारी १९८२मध्ये, जोशी यांनी रायगड जिल्ह्यातील पेण व अलिबाग तालुक्यांचा दौरा केला त्यावेळी, अंबाजोगाईच्या त्या कॅसेट्स नकलून काढण्यासाठी त्यांनी एकदाच्या म्हात्रेकडे दिल्या. पुढे म्हात्रेनी निगुतीने पूर्णत्वाला नेलेले त्याचे मुद्रित रूप म्हणजेच शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती हे पुस्तक.
 संघटनेमागचा विचार, तिचे उद्दिष्ट, तिचे स्वरूप, तिचा प्रसार, तिच्या उभारणीतील अडचणी व त्यावरील मार्ग, तिची आंदोलने, तिचे टीकाकार, काळाच्या संदर्भातील तिचे महत्त्व, तिच्या मर्यादा वगैरे अनेक महत्त्वाच्या पैलूंवरील शरद जोशींच्या विचारांचे हे शब्दरूप आहे. ह्या विचारांची समग्रतेने मांडणी करणारे दुसरे कुठलेही पुस्तक त्याकाळात उपलब्ध नव्हते व आजही नाही. ह्या पुस्तकात घालून दिलेली विचारांची बैठक आजही बहुतांशी कायम आहे. 'शेतकरी संघटनेची गीता' असेच ह्या पुस्तकाबद्दल म्हणता येईल.
 पुस्तकात लिहिल्याप्रमाणे शिबिराच्या सुरुवातीलाच जोशी आपल्या पूर्वसुरींचे ऋण मनमोकळेपणे मान्य करतात. पहिल्या घावाने वृक्ष कोसळताना दिसत नाही, शंभराव्या घावाने तो कोसळतो; पण प्रत्यक्षात शंभरावा घाव जितका मारतो तितकाच पहिला घावही मारतो,' ह्या विनोबांच्या मताशी जोशी सहमत आहेत असे दिसते. कार्यकर्त्यांना ते सांगतात :
 "महाराष्ट्रातलं जुन्यातलं जुनं शेतकरी आंदोलन म्हणजे तंट्या भिल्लाचं आंदोलन. त्याकाळी कुळांवरील अन्याय फार असह्य झाले होते. सावकारी पाश भयानक झाले होते. रयतेला काय करावं सुचेनासं झालं होतं. त्यावेळी खूप चिडलेल्या तंट्या भिल्लाने सावकार व व्यापारी यांच्या घरांवर दरोडे घालायला सुरुवात केली. शेतकऱ्यांच्या पिळवणुकीचा प्रश्न अशा त-हेने मांडणारा हा दरोडेखोर जेव्हा हैद्राबाद राज्यात पकडला गेला, तेव्हा त्याला इतर दरोडेखोरांप्रमाणे फाशी दिलं गेलं नाही; एका खड्ड्यात चुन्याची कळी घालून, त्यात तंट्याला ठेवून, वरून पाणी ओतलं गेलं. कारण राज्यकर्त्यांनी ओळखलं होतं, की हा साधासुधा दरोडेखोर नसून शेतकऱ्यांच्या दारिद्र्याचा प्रश्न तो मांडतो आहे.
 "१८५७च्या स्वातंत्र्यसमरानंतर चारपाच वर्षांत शेतकऱ्यांचं एक महत्त्वाचं आंदोलन इथे महाराष्ट्रात झालं. १८६१ साली, म्हणजे जवळजवळ सव्वाशे वर्षांपूर्वी, तीन हजार शेतकऱ्यांना अटक झाली होती. वासुदेव बळवंत फडके, जोतीबा फुले यांनीही शेतकऱ्यांच्या दारिद्र्यावर विचार मांडले. आपण तेच विचार नव्या भाषेत मांडत आहोत. स्वातंत्र्याआधी व नंतर कूळकायदे झाले त्याची चळवळ, स्वातंत्र्यानंतरची सहकारी चळवळ या सर्व चळवळींनी आपलं एकेक पाउल पुढे टाकलं. लहान मूल जसं सुरुवातीला पडतपडत चालायला शिकतं, तसंच शेतकऱ्यांनी जो आधार सापडला तो पकडत पकडत पुढे जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्हीच काय ते जागती करणारे अशा त-हेचा अहंकार कार्यकर्त्यांनी बाळगू नये."


२२० ◼ अंगारवाटा... शोध शरद जोशींचा 

 डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर व डॉक्टर नरेन्द्र दाभोलकर यांचे मोठे बंधू चारुदत्त दाभोळकर ह्यांचा इथे आवर्जून उल्लेख करायला हवा. भारतात शेतीविषयात पदवी घेतल्यावर ते पशुसंवर्धन ह्या विषयाच्या उच्चशिक्षणासाठी इंग्लंडला गेले. तिथे शिकत असताना १९५४ साली, म्हणजे वयाच्या अवघ्या चोविसाव्या वर्षी, त्यांनी 'महाराष्ट्रातील दुष्काळ व त्यावरील उपाययोजना' हे पुस्तक लिहिले व वाईच्या प्राज्ञ पाठशाळेने ते सात वर्षांनंतर, म्हणजे १९६१ मध्ये प्रकाशित केले. महाराष्ट्राचे तत्कालीन अन्नमंत्री पी. के. सावंत यांची त्याला प्रस्तावना आहे. 'महाराष्ट्रातील शेतीत उतरत्या नफ्याचा नियम (Law of diminishing returns) थैमान घालतोय, इथला शेतकरी फक्त जिवंत राहाण्यापुरतीच शेती (survival farming) करतो, जास्त पीक काढले तर आपलाच तोटा अधिक वाढतो हे त्याच्या लक्षात आले आहे, पूर्वापार हेच चालत आल्याने ते त्याच्या अंगवळणी पडले आहे, शेतीमालाला उत्पादनखर्चावर आधारित रास्त भाव दिला तर तो नक्कीच अधिक धान्य पिकवेल आणि तसे झाले तर महाराष्ट्रातील दुष्काळ लगेच संपेल; मुळात दुष्काळाचा प्रश्न हा तांत्रिक नसून आर्थिक आहे,' हे त्यांनी पुस्तकात साधार दाखवून दिले आहे. जोशींनी हे पुस्तक पूर्वी वाचले नव्हते; दत्तप्रसाद दाभोळकरांनी ते त्यांच्याकडे पाठवले. ते वाचल्यावर भरलेल्या वर्ध्याच्या शिबिरात जोशींनी ह्या पुस्तकाचे कौतुकही केले होते. खूप नंतर, २००५ साली, जोशींनी दत्तप्रसाद दाभोळकरांना पत्र लिहून कळवले,

शेतीमालाला रास्त भाव मिळायला हवा व तेच आपल्या दारिद्र्यावर एकमेव उत्तर आहे असे शेतकरी संघटना मानते. पण माझ्या आधी पंचवीस वर्षे तुमच्या भावाने हाच मुद्दा ह्या पुस्तकात अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने मांडलेला आहे.

 आपले कांदा आणि उसाचे आंदोलन यशस्वी झाले ह्यामागे आपल्या संघटनेच्या कर्तृत्वाप्रमाणेच आंदोलनाची सध्याची वेळ हेही एक महत्वाचे कारण आहे, ह्याची स्पष्ट जाणीव जोशींना आहे. ते म्हणतात,
  "आपण १९८० साली आपलं आंदोलन चालू केलं हे भाग्य! कारण ८०ऐवजी ७५ साली आपण आंदोलन सुरू केलं असतं, तर इतकं यश मिळालं नसतं. ऐंशी साल दोन प्रमुख दृष्टींनी महत्त्वाचं आहे. एक म्हणजे १९७७ सालापर्यंत देशात सर्व धान्यं, कडधान्यं आणि इतर शेतीमाल यांचा तुटवडा होता. त्यावेळी जास्त पीक आलं, की जास्त पैसा हाती लागत असे. पण ७७ सालापर्यंत हरित क्रांतीची फळं लोकांपर्यंत पोचली होती. शेतकरी अधिक उत्पादन काढू लागले होते. त्यामुळे शेतीमालाची मुबलकता निर्माण झाली. मालाचा उठाव होईना. विकण्याची चिंता शेतकऱ्यांना भेडसावू लागली. भाव गडगडले. जास्त पीक आलं, तर पदरी तोटा अशी परिस्थिती ८० साली प्रथमच निर्माण झाली.
 "आंदोलन इतकं यशस्वी व्हायचं दुसरं कारण म्हणजे राजकीय परिस्थिती. ७५ सालातील आणीबाणी, ७७ सालात निवडणुका, त्यानंतर पुन्हा निवडणुका, यामुळे एक पक्ष सत्तेवरून जाऊन दुसरा येणं आणि अल्पावधीत पुन्हा पहिलाच पक्ष सत्तेवर येणं, त्याचबरोबर 

पुढाऱ्यांच्या पक्षोपपक्षातील कोलांट्या उड्या यामुळे सामान्य जनतेच्या मनात सर्व राजकीय पक्षांविषयी निराशा निर्माण झाली, घृणा निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर आज आपण 'स्वातंत्र्यानंतरची गेली ३३ वर्षं शासन शेतकऱ्यांना फसवत आलं आहे' हा आपला विचार ताठ मानेने, जोरजोराने शेतकऱ्यांपुढे मांडतो. ते ऐकतात आणि टाळ्या वाजवतात. पण ७५ साली अशी निराशा नव्हती. तेव्हा जर आपण असं बोललो असतो, तर कदाचित लोकांनी ऐकून घेतलं नसतं."
 शेकडो पुस्तके वाचून जे कधीच समजले नसते ते जोशींना अनुभव शिकवत गेला. शेती करता करता आणि येत असलेल्या अनुभवांची त्याचवेळी आपल्या मनात छाननी करता करता हळूहळू जोशींची खात्री पटली, की सरकारने विकासासाठी जे रशियन धाटणीचे समाजवादी प्रतिमान समोर ठेवले आहे त्या प्रतिमानात जाणूनबुजून शेतीमालाची किंमत अतिशय कमी ठेवली आहे; बियाणे-खते-औषधे-वीज-पाणी-वाहतूक-मजुरी असे अगणित आणि सतत वाढणारे खर्च भागवता भागवता शेतकरी कायम तोट्यातच राहतो: शेतीमालाच्या अपुऱ्या किमती हेच आपले खरे दुखणे आहे; शेतकऱ्याला त्याच्या श्रमांचे उचित दाम मिळाले तर त्याला अन्य कुठल्याही धर्मादायाची वा अनुदानाची भविष्यात गरज राहणार नाही; त्याचे आजचे लाचारीचे जिणे संपेल. त्यातूनच 'शेतीमालाला रास्त भाव' हा एक-कलमी कार्यक्रम त्यांच्या मनात तयार झाला.
 ह्या कार्यक्रमाच्या समर्थनार्थ व्यापक वैचारिक अधिष्ठान तयार करता करता जोशींनी एकूणच मानवी इतिहासाची एक आगळी अशी मांडणी केली. ही मांडणी शेतकरी आंदोलनाच्या काळात पूर्णत्वाला गेली असली, तरी बीजरूपाने ती त्यांच्या मनात खूप पूर्वीपासूनच – अगदी कोल्हापूरमधल्या प्राध्यापकी दिवसांपासूनच – रुजली असावी. मुख्यतः त्यांच्याच शब्दांत ती साधारण पुढीलप्रमाणे आहे :
 शेतीचा शोध ही एक फार मोठी क्रांती होती. पंचमहाभूतांच्या लक्षावधी वर्षांच्या साठलेल्या ऊर्जा माणसाच्या श्रमांचा स्पर्श होताच गुणाकार करीत फळाला येतात. एका दाण्यातून शंभर दाणे तयार होण्याचा चमत्कार शेतीतच होतो. उपभोग्य वस्तूंचा गुणाकार करणारा हा एकमेव व्यवसाय. व्यापार, वाहतूक, कारखानदारी यांसारख्या अन्य कुठल्याही व्यवसायात हे घडत नाही. तिथे फक्त वस्तूंची देवाणघेवाण होते, देवघेवीच्या मूल्याची (exchange valueची) वृद्धी होते. ज्या दिवशी हा गुणाकार माणसाच्या लक्षात आला, त्या दिवसापासून संस्कृतीची रुजवात व्हायला सरुवात झाली.
 जगातील पहिला व्यवसाय शेती हाच आहे. प्रकृती आणि माणूस एकत्र आल्यानंतर केव्हातरी दहा-बारा हजार वर्षांपूर्वी तो निर्माण झाला. हळूहळू अन्न शिजवायचा शोध लागला. खाण्यापिण्याची रेलचेल झाली. बायबलमध्ये वर्णन केलेल्या इडन गार्डनप्रमाणे स्वर्गसदृश परिस्थिती तयार झाली. मानवी समाजाला प्रथमतः स्थैर्य प्राप्त झाले; शिकार करण्यासाठी वा


२२२ ◼ अंगारवाटा... शोध शरद जोशींचा 

झाडांवरची फळे गोळा करण्यासाठी रानोमाळ भटकण्याची त्याची गरज संपुष्टात आली. काही जण इतरही उद्योग करू शकतात हे हळूहळू जाणवू लागले. वेगवेगळी साधने निर्माण करण्यासाठी, त्यांचा वापर करून आपले राहणीमान सुधारण्यासाठी त्याला वेळ मिळू लागला. त्यातून अन्नाव्यतिरिक्त असलेल्या घर, वस्त्रे वगैरे गरजा भागतील असे संशोधन सुरू झाले, त्यातही यश येऊ लागले. अग्नीचा, चाकाचा शोध लागला, हत्यारे तयार होऊ लागली, लाकूडकाम व धातूकाम अवगत झाले.
 एका जागी घर बांधून राहणे, जमिनीच्या विशिष्ट तुकड्याविषयी मनात आपलेपणा निर्माण होणे ह्या स्वाभाविक अशा पुढच्या पायऱ्या होत्या. निखळ आनंद मिळवण्यासाठीही अनेक गोष्टी करता येतात याची जाणीव झाली. निसर्गाचे निरीक्षण करणे, जीवनविषयक चिंतन करणे यांसाठीही निवांतपणा मिळू लागला. त्यातूनच पुढे कुटुंबव्यवस्था उदयाला आली. त्यातूनच पुढे साहित्य, संगीत, नृत्य, स्थापत्य, चित्रकला, निसर्गभान, कालगणना, विज्ञान, तंत्रज्ञान यांचा विकास होत गेला. आपल्या मेंदूचा अधिकाधिक उपयोग करून आपले जीवन अधिकाधिक विकसित करण्याचा तो प्रयास करू लागला.
 आपले एकमेकांशी असलेले नाते, परस्परप्रेमाची भावना, सहकार्याचे लाभ वगैरेंचे त्याचे भान अधिकाधिक सजग होत गेले. त्याचा मानसिक विकासही होत गेला. हा विकास फक्त ऐहिक वा भावनिक बाबतीत घडला असे नव्हते. हे जग कसे बनले असेल, त्यामागे ईश्वरासारखी कोणी शक्ती असेल का, ह्या ईश्वराचे स्वरूप काय असेल, मृत्यू म्हणजे काय, माणूस मेल्यानंतर काय होते वगैरे असंख्य आध्यात्मिक विषयांचे चिंतनही करणे त्याला शेतीतून मिळालेल्या तुलनात्मक स्वास्थ्यानंतरच शक्य झाले. थोडक्यात म्हणजे, तो सुसंस्कृत बनायला सुरुवात झाली. विकासाचे एक स्वयंप्रेरित चक्र फिरू लागले. हा निसर्गक्रम असाच सुरू राहिला असता, तर सगळीकडे आबादीआबाद झाली असती.
 दुर्दैवाने मनुष्यस्वभाव विचित्र आहे. स्वतः कष्ट करून शेती करण्यापेक्षा, दुसऱ्या कोणी कष्ट करून पिकवलेले धान्य दांडगाई करून पळवून नेणे अधिक सोपे आहे असा विचार काही जण करू लागले. शेतीतली लूट सुरू झाली. सुरुवातीला ही लूट करणारे म्हणजे भुरटे चोर होते. हळूहळू तेही आपल्या चोरीच्या कामात पारंगत होत गेले; भुरट्या चोरीपासून सशस्त्र दरोड्यापर्यंत त्यांनी प्रगती केली. धान्य पिकवणारे बैल वापरत होते, तर धान्य लुटणाऱ्यानी अधिक सक्षम असा घोडा वापरायला सुरुवात केली. मग तर काय, लुटारूंची चंगळच झाली. लांब लांब जाऊन लूट करणे शक्य झाले.
 ही लूट करणाऱ्यांनी कधी धनुष्यबाण वापरले तर कधी तलवार, कधी बंदुका तर कधी तोफा. कधी ते घोड्यावरून आले तर कधी रणगाड्यातून. कधी जिरेटोप घालून आले, कधी मुकुट वा हॅट घालून तर कधी गांधी टोपी घालून. पण आले ते शेतकऱ्याला लुटण्याकरिताच.
 काळाच्या ओघात या लुटणाऱ्यांच्या टोळ्या बनत गेल्या, त्या अधिकाधिक मोठ्या व ताकदवान होत गेल्या. त्यांतूनच काही टोळ्यांचे नायक सरदार बनले, काही त्याहून मोठे होत राजे बनले, काही त्याहूनही मोठे होत सम्राट बनले.


 स्वतःच्या लूटमारीचे समर्थन करणारे तत्त्वज्ञान तयार होऊ लागले. सत्ताधाऱ्यांची सोय होईल अशी तात्त्विक मांडणी करणारे काही बुद्धिमान त्याकाळीही होतेच. त्यातूनच मग लूट केल्याने पाप लागत नाही, उलट देव खूष होतो, अशी मांडणी करणारी दर्शनेही तयार होत गेली. इतिहासात आपण वेगवेगळ्या मोहिमांविषयी वाचतो, सीमोल्लंघन करणे वगैरे शब्दप्रयोग करतो; पण प्रत्यक्षात त्या साऱ्याचा अर्थ लुटीसाठी बाहेर पडणे हाच असायचा.
 पुढे मग सगळाच्या सगळा शेतीमाल लुटून नेण्याऐवजी खंडणी म्हणून काही रक्कम वसूल करायला सुरुवात झाली; आज जसे काही गुंड आपापल्या विभागातून हप्ते गोळा करतात त्याप्रमाणे!
 पुढे लोकसंख्या वाढत गेली; इतक्या मोठ्या समुदायाकडून खंडणी गोळा करणे अवघड होत गेले. म्हणून मग शेतकऱ्यांनी स्वतःहून सत्ताधाऱ्यांकडे शेतसारा भरणे हा प्रकार सुरू झाला. सगळी वसुली स्वतः करणे अशक्य होते, म्हणून मग सम्राटांनी आपल्या मांडलिक राजांना आणि त्यांनी छोट्या-मोठ्या सरदारांना आपापल्या छोट्या-मोठ्या इलाख्यात सारावसुलीची मक्तेदारी दिली. 'लुटीचा आमचा ठरावीक हिस्सा आम्हांला पोचता करा; बाकी तुमच्याकडे ठेवा. त्या बदल्यात इतर कोणी तुमच्यावर आक्रमण केले, तर आम्ही तुमचे रक्षण करू,' हा प्रकार सुरू झाला! हाही एक प्रकारचा 'प्रोटेक्शन मनी' होता! त्या शेतसाऱ्यालाच मग सार्वत्रिक करआकारणीचे स्वरूप आले. अधिकाधिक खिशांतून अधिकाधिक पैसा सत्ताधाऱ्यांकडे जमा होऊ लागला.
 लुटीचे मार्गही हळूहळू बदलत गेले. पूर्वीप्रमाणे रक्तपात करून लूट करायची आता गरज राहिली नाही: रक्तपातात स्वतःचेही नुकसान होतच असे; त्याऐवजी व्यापारातून लूट करायचे तंत्र निर्माण झाले – मान पिरगळून कोंबडी मारून टाकण्यापेक्षा रोजचे अंडे मिळवायचे. या तंत्रात कमीत कमी श्रमांत जास्तीत जास्त लूट करण्याची सोय होती. सत्ताधारी वर्गाला सर्वांत जास्त लूट करायची संधी होती. सत्तेवर आल्यामुळे त्यांच्या लुटीला सातत्य मिळाले. त्यातूनच राज्यसंस्था अधिकाधिक बळकट होत गेली.
 अशाप्रकारे जोशींच्या मते आजपर्यंतच्या इतिहासाची खरी प्रेरणा ही शेतीमध्ये होणारा गुणाकार लुटण्याची आहे. वेगवेगळ्या कालखंडांत लुटण्याची वेगवेगळी साधने वापरली केली - दरोडेखोरी, सैन्याने केलेली लूट, राजेरजवाडे वसूल करत असलेला महसूल, गुलामगिरी, वेठबिगारी, वसाहतवाद, उद्योगक्षेत्र करत असलेले कच्च्या मालाचे शोषण इत्यादी; पण मुळात ती लूटच होती. सर्व समाजाचा इतिहास हा शेतीला लुटण्याच्या अशा साधनांचा इतिहास आहे.
 भारतीय इतिहासाचीही एक अभिनव अशी, आपल्या उपरोक्त आकलनाला पुष्टी देणारी अशी, मांडणी जोशींनी केली. जनमानसात स्थिरावलेल्या अनेक कल्पनांना हादरवून सोडेल, अशीच ही मांडणी आहे. जोशी लिहितात :


२२४ ◼ अंगारवाटा... शोध शरद जोशींचा 

एक फार मोठे कोडे इतिहास वाचताना मला पडते. देवगिरीचे एवढे बलाढ्य राज्य, पण मुसलमान फौजा अगदी बिनधास्त गडाच्या पायथ्यापर्यंत येऊन पोचल्या कशा? महाराष्ट्राच्या मध्यकेंद्रापर्यंत पोचण्याच्या आधी या परकी सैन्याला वाटेवरच्या शेतकऱ्यांनी, जनसामान्यांनी काहीच विरोध केला नाही? बरे, शत्रूच्या फौजा किल्ल्यापाशी येऊन पोहोचल्यानंतरही वेढ्याच्या बाहेरच्या लोकांनी वेढ्याची कुतरओढ का केली नाही?

इतिहासात जागोजागी वाचावे लागते, की रजपूत व मराठा सैन्य शिकस्तीने लढले, पण अखेरीस शत्रूच्या प्रचंड संख्याबळापुढे त्यांचे काही चालले नाही. मोगल हजारो मैलांवरून इथे आलेले; त्यांची संख्येची ताकद स्थानिक राजांच्या त्यांच्या स्वतःच्या प्रदेशातील ताकदीपेक्षा जास्त कशी राहिली?

हे कोडे अनेकांनी मांडले आहे, अगदी १८५३ साली मार्क्सने एंगल्सला लिहिलेल्या पत्रांतही ते मांडले आहे. भारतातील गावगाड्याबद्दल मार्क्स लिहितो, 'खेड्यात राहणाऱ्यांना राज्ये फुटली-मोडली याचे काहीच सुखदुःख नाही. खेड्याला धक्का लागला नाही, तर राज्य कोणत्या राजाकडे जाते, कोणत्या सुलतानाची त्याच्यावर सत्ता चालते, याची त्यांना काहीच चिंता नसते; गावगाडा अबाधित चालत राहतो.'

शूद्रातिशूद्रांचा राणा जोतीबा फुले यांनी मुसलमानी आक्रमणाला सरळ 'विमोचन' असा शब्द वापरून गावातील सर्वसामान्यांची भावना व्यक्त केली आहे. इंग्रजांची राजवट आल्यानंतरही, सामाजिक प्रगतीला नि क्रांतीला प्रतिकूल ठरलेल्या ब्राह्मणी राज्यापेक्षा इंग्रज राज्य परवडले. नानासाहेब पेशवे यशस्वी झाले असते, तर ब्राह्मणांचे जातिश्रेष्ठत्व मानणारे, अन्यायी नि प्रतिगामी ब्राह्मणी राज्य पुन्हा महाराष्ट्रात आले असते,' अशी त्यांना भीती वाटत होती.

जोतीबांची भावना हीच देवगिरीच्या आसपासच्या कुणब्या-शूद्रांची भावना असली पाहिजे. हीच भावना सर्वसाधारण प्रजेची त्यांच्या जवळच्या गढीत किंवा किल्ल्यावर राहणाऱ्या तथाकथित देशबांधव स्वधर्मीय सरदार-राजांबद्दल असली पाहिजे. रामदेवराय आणि अल्लाउद्दीन यांत फरक एवढाच, की पहिला दरवर्षी उभी पिके हक्काने काढून नेई, तर दुसरा कधी तरी एकदा येणार. रामदेवरायाच्या पराभवात प्रजेला थोडेतरी सुडाचे समाधान मिळत असले पाहिजे. रामदेवरायाकडून लुटले जायचे का अल्लाउद्दीनकडून, एवढाच विकल्प रयतेपुढे असेल, तर परकीय लुटारूच्या रूपाने मोचकच आला, अशी प्रजेची भावना का होऊ नये? शिवाय, दोन लटारूंच्या लढाईत स्वतः मरण्यात तिला का स्वारस्य वाटावे? बंदा बहादराच्या व त्यानंतरच्या पंजाबमधील लढायांसंबंधी खुशवंतसिंग म्हणतात, की



शिखांकडून किंवा मराठ्यांकडून लुटून घ्यायचे का अब्दालीकडून, एवढाच पर्याय पंजाबी शेतकऱ्यांसमोर असे आणि त्यांना त्यातल्यात्यात मुसलमानांकडून लुटले जाणे हा सौम्य पर्याय वाटे.

(शेतकरी संघटक, १५ सप्टेंबर १९८५)

 सोळाव्या शतकामध्ये औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली. प्रथमतः इंग्लंडमध्ये कारखाने निघाले. त्यावेळीसुद्धा शेतीच्या वरकड उत्पादनातूनच त्या कारखानदारीसाठी अत्यावश्यक असे 'प्राथमिक भांडवल' (primitive capital accumulation) तयार झाले.
 कच्च्या मालाचे हे शोषण कशा प्रकारे होत आले? प्रथमतः त्या देशात जो कच्चा माल उपलब्ध होता, तो वापरायचा प्रयत्न झाला. पण तो देश एवढासा आहे, त्यातल्या मालावर असे कितीसे कारखाने चालणार? तेव्हा बाहेरून माल मिळवण्याची आवश्यकता निर्माण झाली. त्यासाठी इंग्लंडने वेगवेगळ्या दूरदूरच्या देशांत जाऊन तेथून कच्चा माल मिळवायला सुरुवात केली. (अर्थात हे सारे इतरही अनेक युरोपियन देशांच्या बाबतीत खरे आहे.) पण तिथेही अडचणी येऊ लागल्या. शिवाय ह्या देशांत स्थानिक प्रशासन खूप दुबळे आहे, दुहीने पोखरलेले आहे हेही त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे मग तिथे जाऊन आपलेच राज्य प्रस्थापित करायचे, आणि राजकीय सत्तेच्या आधाराने मक्तेदारी पद्धतीने तिथला कच्चा माल स्वस्तात स्वस्त घेऊन, मायदेशातील आपल्या कारखान्यांना आणून द्यायचा, अशा प्रकारची वसाहतवादी पद्धत सुरू झाली. त्याच्याच जोडीने विज्ञानाचा व तंत्रज्ञानाचा विकासही होतच होता व ही सारी परिस्थिती परस्परपूरकच होती. त्यातून इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणावर कारखाने सुरू झाले. त्यातून जो पक्का माल तयार होऊ लागला, तो एकट्या इंग्लंडमध्ये खपणे शक्य नसल्यामुळे तो त्याच गुलाम देशांत खपवला जाऊ लागला - अर्थातच भरमसाट नफा घेऊन. म्हणजे हिंदुस्तानसारख्या देशाचा उपयोग दोन पद्धतींनी झाला - कच्चा माल स्वस्त मिळू लागला आणि पक्का माल जास्त भावाने विकण्यासाठी नवीन बाजारपेठ मिळाली. मुख्यतः अशा त-हेच्या वसाहतवादी व्यवस्थेतून तेथील कारखानदारीची भरभराट झाली.
 गांधीजींसारख्या द्रष्ट्या नेत्याने सामान्य माणसाला समजेल अशा शब्दांत हे सांगताना म्हटले होते,
 "इंग्रज आपल्या देशातील कापूस स्वस्तात त्यांच्या देशात घेऊन जातात, त्याचे कापड बनवतात आणि त्याच्याच धोतरजोड्या आमच्याच देशात आणून आमच्याच शेतकऱ्यांना खूप नफा घेऊन विकतात. ह्या शोषणामुळे आपण गरीब होत जातो व ते श्रीमंत होत जातात."
 जोशी म्हणतात,
 "म्हणूनच त्यांनी आपल्या चळवळीसाठी चरखा हे प्रतीक निवडलं. नाहीतर अशोकचक्र, कमळ अशा सुंदर गोष्टी त्यांना दिसल्या नसतील असं नाही! पारतंत्र्यात होणारं शोषण दूर करण्यासाठी प्रतीकात्मक साधन म्हणून ते चरख्याकडे बघत होते."
 परंतु पुढे दुसऱ्या महायुद्धानंतर भारत स्वतंत्र झाला. 'चले जाव' आंदोलनामुळे, काँग्रेस


२२६ ◼ अंगारवाटा... शोध शरद जोशींचा 

पक्षामुळे वा अन्य कुठल्याही तत्सम कारणांमुळे हे स्वातंत्र्य मिळाले असे शरद जोशी मानत नाहीत. जिथे स्वातंत्र्यसंग्राम झालाच नव्हता, अशाही अनेक देशांना स्वातंत्र्य मिळून गेले व केवळ इंग्लंडनेच नव्हे, तर फ्रान्स, हॉलंड, स्पेन, पोर्तुगाल अशा इतरही वसाहतवादी देशांनी आपापल्या वसाहती सोडून दिल्या. इंग्लंडसारख्या देशांना त्यांच्या महायुद्धात झालेल्या अपरिमित हानीमुळे, स्वतःच्या सैन्यबळावर आपले साम्राज्य टिकवणे अशक्य झाले व म्हणून त्यांनी सर्व वसाहती मोकळ्या केल्या.
 तरीसुद्धा निघता निघता या मंडळींनी अशी एक व्यवस्था या देशात तयार केली, की जरी राज्यसत्ता गेली तरीसुद्धा व्यापारात जो फायदा होता, तो जास्तीत जास्त प्रमाणात चालू राहावा. कारण त्यांचा इथे येण्याचा मुख्य हेतू व्यापारीच होता, राजकीय नव्हता. जोशींच्या मते एव्हाना पाश्चात्त्य राष्ट्रांतील कारखानदारांनाही प्राथमिक स्वरूपाच्या उद्योगधंद्यांत स्वारस्य राहिलेलेच नव्हते. कारखान्यांना लागणारा माल तयार करणाऱ्या जड व उच्च तंत्रज्ञानावर आधारलेल्या (हायटेक अशा) अधिक फायदेशीर उद्योगधंद्यांकडे ते वळले होते. तेव्हा जुन्या वसाहतींतील किरकोळ कारखानदारीला त्यांचा विरोध नव्हताच; उलट, त्यांच्या जड व अधिक फायदेशीर उद्योगधंद्यांच्या भरभराटीसाठी गरीब देशांतील छोट्या-मोठ्या कारखानदारीचा त्यांना गिहाईक म्हणून उपयोगच होता!
 आपले कापड जास्त खपवून फायदा कमावण्यासाठी इंग्रजांनी एकेकाळी बंगालमधल्या वीणकरांचे अंगठे कापले होते; आज तो प्रकार करायची गरजच राहिलेली नाही. इथल्या कारखानदारीला लागणारे हायटेक तंत्रज्ञान विकून ते आज अधिक फायदा मिळवतात.
 अधिक मोठे दुर्दैव म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर जे हे शोषण चालत होते, तो प्रकार स्वातंत्र्यानंतर देशांतर्गतही होऊ लागला. कारखान्याला जो कच्चा माल लागतो. तो स्वस्तात स्वस्त मिळवला पाहिजे व कारखान्यात तयार होणारा पक्का माल महागात महाग विकता आला पाहिजे; म्हणजेच कच्च्या मालाचे शोषण केले पाहिजे – राज्यकर्त्यांचे धोरण हे कायम असेच राहिले आहे. स्वातंत्र्यानंतर देशातील गोऱ्या साहेबाची जागा काळ्या साहेबाने घेतली, एवढाच काय तो फरक झाला; एकूण व्यवस्था (सिस्टिम) तीच राहिली.
 मुळात शेतीतूनच निर्माण झालेल्या भांडवलावर आधारित उद्योगक्षेत्र निर्माण व्हायची प्रक्रिया पाश्चात्त्य देशांत दोन-तीनशे वर्षांच्या दीर्घ कालावधीत झाली व काही प्रमाणात सहजसुलभ अशी झाली. त्यामुळे साम्यवादी राज्यक्रांती ह्या पाश्चात्त्य देशांत कधीच झाली नाही. स्वतः कार्ल मार्क्सने आपल्या (नंतरच्या) वैचारिक मांडणीत कामगारवर्ग हाच साम्यवादी क्रांतीचा केंद्रबिंदू मानला. ज्या लंडन शहरात राहून त्याने आपला कॅपिटल हा ग्रंथ लिहिला, त्या परिसरात त्याला उद्योगक्षेत्राचे जे तत्कालीन रूप दिसले, त्यावरच त्याची मांडणी आधारलेली होती; ते उद्योगक्षेत्र पुढे आमूलाग्र बदलेल ह्याची त्याला बहुधा कल्पनाही नव्हती.
 शिवाय, भांडवलदार व कामगार हे दोघेही प्रत्यक्षात एकमेकांचे शत्रू न राहता दोघांचेही हितसंबंध एकत्र जोडले जातील व दोघे मिळून आधी शेतीचे, मग वसाहतींचे व मग 

स्वतःच्याच देशातील दुर्बल घटकांचे शोषण चालू ठेवतील याचा अंदाज त्याला आला नाही. ज्या पाश्चात्त्य समाजात औद्योगिक क्रांती खूप पूर्वीच सुरू झाली होती, तिथे हा कामगारवर्ग मोठा होता व तो शहरांत राहणारा होता. उलट शेतकरीवर्ग हा ग्रामीण भागात राहणारा होता. त्यातून 'शहर विरुद्ध गाव' (Town versus County') हा वाद काही काळ तिथे निर्माण झाला, पण सुदैवाने पुढे तेथील उद्योगक्षेत्राचे स्वरूप खुपच सुधारत गेले व त्यामुळे त्या वादातून तिथे रक्तरंजित राज्यक्रांती कधी झाली नाही.
 साम्यवादी राज्यक्रांती झाली ती मुख्यतः रशियात - जिथे उद्योगक्षेत्र अजून विकसितच झाले नव्हते व साहजिकच हा कामगारवर्ग अत्यल्प होता; सगळा समाज मुख्यतः शेतीप्रधानच होता. खरे तर रशियात जो सत्ताबदल १९१७ साली झाला, तो साम्यवादावर वा मार्क्सवादावर आधारित होता, हे जोशींना अजिबात मान्य नव्हते. पहिल्या महायुद्धात पराभूत होऊन रशियात परतणारे सैनिक, बंड करून उठलेल्या रशियन स्त्रिया व एकूण देशातील असंतोष यांमुळे झारशाही कोलमडून पडली व त्याचा फायदा घेऊन साम्यवादी सत्तेवर आले, असे ते मानत. त्यांच्या मते ह्या साऱ्या सत्तापालटाला काहीतरी तात्त्विक बैठक द्यायची म्हणून केवळ साम्यवादी तत्त्वज्ञानाचे अधिष्ठान पुरवले गेले; प्रत्यक्षात रशियात जे घडले त्याचा साम्यवादाशी तेवढाच संबंध होता, जेवढा एखाद्या गावातील सुभाष केशकर्तनालयाचा नेताजी सुभाषचंद्र बोसांशी संबंध असतो!
 रशियात औद्योगिकीकरण हे सरकारी धोरणातून घडवून आणले गेले; शेतीप्रधान देशाचे एक-दोन पिढ्यांमध्ये औद्योगिक देशात परिवर्तन करण्यासाठी, शेतीतील भांडवल उद्योगक्षेत्रासाठी वळवण्यासाठी शेतीमालाला कमीत कमी भाव देणे क्रमप्राप्त ठरले. तो अधिकृत शासकीय धोरणाचाच भाग बनला. स्टालिनच्या राजवटीत तर शेतकऱ्यांना चिरडूनच टाकले गेले. 'आज हे शेतकरी गव्हाला वाढीव भाव मागताहेत, तो त्यांना दिला, तर उद्या ते सोन्याची घड्याळे मागू लागतील, हे त्याचे उद्गार प्रसिद्ध आहेत. त्याने शेतीवरची स्वतंत्र मालकी काढून टाकली व त्या जागी सामुदायिक शेती देशभर राबवली. त्यात व्यक्तिगत लाभ काहीच होणार नसल्याने अधिक मेहनत करायला व अधिक धान्य पिकवायला तिथे शेतकऱ्याला काही उत्तेजनच राहिले नाही. जोशी म्हणतात,
  "ह्या अत्यंत चुकीच्या धोरणामुळे एकेकाळी अन्नधान्य निर्यात करत असलेल्या रशियावर परदेशाहून अन्नधान्य आयात करायची वेळ आली आणि इतक्या वर्षांनंतर आजसुद्धा रशिया अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होऊ शकलेला नाही. किंबहुना अन्नधान्याचा आत्यंतिक तुटवडा व त्यामुळे जनसामान्यांत खदखदत असलेला असंतोष हे पुढे नव्वदच्या दशकात रशियातील साम्यवादी राजवट कोसळून पडली ह्याचे एक मोठे कारण होते."
  परंतु हेही खरे आहे, की रशियाने एक-दोन पिढ्यांमध्ये मोठे औद्योगिकीकरण घडवून आणले व त्यामुळे दुसऱ्या महायुद्धानंतर स्वतंत्र झालेल्या जवळजवळ सर्वच देशांनी आपल्या विकासासाठी, म्हणजे मुख्यतः शेतीप्रधान अर्थव्यवस्थेचे रूपांतर उद्योगप्रधान अर्थव्यवस्थेत करण्यासाठी, रशियन प्रतिमान स्वीकारले. स्वतंत्र भारतातील सरकारनेही समाजवादी


२२८ ◼ अंगारवाटा... शोध शरद जोशींचा

विचारसरणीनुसार शेतीपेक्षा उद्योगक्षेत्रावर भर दिला. त्याची परिणती म्हणून शेतकऱ्याचे शोषण चालूच राहिले; किंबहुना, अधिकच वाढले. कदाचित तो त्या काळाचा युगधर्म होता; त्या साऱ्या चर्चेत जाण्याचे हे स्थळ नव्हे.
 जोशींच्या म्हणण्यानुसार शेतीच्या हितासाठी म्हणून सरकारने काढलेल्या बहुतेक योजनांचा कागदोपत्री दाखवलेला उद्देश काहीही असला, तरी त्यांमुळे होणारा फायदा हा मुख्यतः शेतकऱ्यांपेक्षा कारखानदारांचाच होतो. ट्रॅक्टर्स, डिझेल इंजिने, विजेच्या मोटारी, पंप वगैरेंच्या खरेदीसाठी कर्ज वा अनुदान देण्याच्या ज्या योजना आहेत, त्यातून मुख्यतः तो पक्का माल बनवणाऱ्या कारखानदारांचाच फायदा होतो. शेतकऱ्याचा फायदा होईल अशा योजना शासनाने अमलात आणल्याच नाहीत. ह्याचे उदाहरण म्हणून जोशी प्लास्टिक पाइप्सचा उल्लेख करतात. ते म्हणतात, ज्या कच्च्या मालापासून नायलॉनचे धागे तयार होतात त्याच कच्च्या मालापासून ठिबक सिंचनासाठी लागणारे प्लास्टिकचे पाइप्सही तयार होतात. आपल्यासारख्या देशात, जिथे बहतेक सगळी शेती कोरडवाहू आहे तिथे, ही ठिबक सिंचन पद्धत म्हणजे अगदी वरदान आहे. इस्राएलने ही ठिबक सिंचन पद्धत मोठ्या प्रमाणावर राबवली. त्यासाठी त्यांनी आवश्यक ती उपकरणे - मुख्यतः प्लास्टिकचे पाइप्स - जवळ जवळ फुकट वाटले. परिणामतः आज वाळवंटात वसलेले असूनही इस्राएल अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण तर आहेच, पण जगातल्या अनेक देशांना ते आपला उच्च दर्ज्याचा शेतीमाल पाठवते. हे आपल्याकडेही घडू शकले असते, पण त्यासाठी सरकारने काहीच उत्साह दाखवला नाही.
 जोशी असेही म्हणतात, की अनुदानाच्या योजनांतून प्रत्यक्षात शेतकऱ्याला फारसे काही मिळतच नाही. त्याच्याकडे योजनांचा फायदा मिळवण्यासाठी लागणारा वशिला नसतो, अधिकाऱ्यांना खूष करण्यासाठी लाच देण्याची ताकद नसते, कुठलीही चांगली योजना आपल्या शेतीत राबवण्यासाठी कुशल असे व्यवस्थापन नसते, आहे ती शेती कशीबशी करण्यातच तो मेटाकुटीला आलेला असतो. त्यामुळे प्रत्यक्षात या सर्व योजनांचा फायदाही ज्यांच्या हाती राजकीय सत्ता वा ग्रामीण भागातील अर्थसत्ता आहे, असेच मूठभर शेतकरी घेऊ शकतात.
 शासकीय योजनांचा बहुतेक सगळा मलिदा नोकरशाहीच खाते. दिल्लीपासून गल्लीपर्यंत एखादी योजना येईपर्यंत पगार, महागाई भत्ता, प्रवास-निवासभत्ता, जीपगाड्या, खादाडी आणि मुख्य म्हणजे लाभार्थीना पैसा देण्यापूर्वीच होत असलेला त-हेत-हेचा भ्रष्टाचार यांतच त्या योजनेची बहुतेक रक्कम संपून जाते. गरिबांसाठी सरकार खर्च करत असलेल्या दर एक रुपयापैकी जेमतेम पंधरा पैसे खऱ्या गरजूंपर्यंत पोचतात असे राजीव गांधी यांचेही ते पंतप्रधानपदी असतानाचे निरीक्षण होते. अनुदानाची कोणतीही योजना म्हणजे मुख्यतः नोकरशाहीला पैसे कमवायची पर्वणी!
 ह्या सनदी नोकरांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी काहीच आस्था नसते ह्याचे एक उदाहरण अंबाजोगाईच्या प्रशिक्षण शिबिरात जोशींनी दिले होते. ते म्हणाले,

 "जेव्हा बाजारपेठेत १३२ रुपये क्विटल ह्या दराने ज्वारी खरीदण्यासाठी महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशनची माणसं आली नाहीत, आणि त्यामुळे शेतकऱ्याला आपली ज्वारी ६५ ते ७५ रुपये दराने विकावी लागली, त्या वेळेस मी मुंबईला फेडरेशनच्या गोपालकृष्णन ह्यांना भेटायला गेलो. मी त्यांच्यासमोर बसलेलो असतानाच ते टेलिफोनवरून मोठमोठ्या मंडळींना व अधिकाऱ्यांना आमंत्रण देत होते की, 'मुंबईच्या ओबेरॉय शेरेटन हॉटेलमध्ये आम्ही मेजवानी ठेवली आहे, तिथे या. ज्वारीच्या खरेदीच्या प्रश्नाची चर्चा तिथे होणार आहे.' इकडे शेतकरी ज्वारीच्या खरेदीकरिता अडकून पडला आहे, कुणी ज्वारी ६५ रुपयांनी विकून राहिलाय आणि या ज्वारी खरेदीवाल्या अधिकारी मंडळींची चर्चा ओबेरॉय शेरेटनसारख्या शाही हॉटेलमध्ये होणार! त्यांची ह्याबाबत वृत्ती काय आहे हे आपल्याला ह्यावरून कळून येते."
 शेतकरी संघटनेच्या तत्त्वज्ञानानुसार या देशातील एकूण सगळी यंत्रणाच ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष करून शहरांना झुकते माप देणारी आहे. प्रसारमाध्यमे बहुतांशी बड्या शहरांमध्येच एकवटलेली आहेत. शहरात चार तास वीज गेली, चार गाड्या रद्द झाल्या किंवा एक दिवस पाणी आले नाही, की लोक आंदोलन करतात. त्यावेळी ग्रामीण भागात मात्र नेहमीच दिवसाचे बारा-बारा तास वीज नसते, एक एसटी बस चुकली तर गावात पुढचे सहा तास कुठचीच एसटी नसते आणि तिथे चार-चार दिवसांतून एकदाच पाण्याचा पुरवठा होतो हे कोणाच्या गावीही नसते. शहरातले कामगार सातत्याने पगारवाढीसाठी आंदोलने करतात. पगार चांगला असेल तर बोनससाठी आणि बोनस मिळत असेल तर अधिक रजा, अधिक सुखसोयी ह्यासाठी त्यांची आंदोलने असतात. त्यांच्या संघटना बळकट असतात व सरकारवर त्या दबाव आणू शकतात. उदाहरणार्थ, मुंबई महापालिकेचे सफाई कामगार त्यांना उत्तम पगार व सर्व सुखसोयी मिळत असूनही दर वर्षी साधारण ७ जूनपासून काही ना काही मागणी पुढे करून बेमुदत संपावर जातात. त्यांना ठाऊक असते, की ह्या सुमारास मुंबईत पाऊस सुरू होतो व आपल्या संपामुळे गटारे तुंबून राहिली तर शहरवासीयांची प्रचंड गैरसोय होते, दुर्गंधी पसरते, रोगराईचा धोका निर्माण होतो. म्हणून मुद्दामच ते ही वेळ निवडतात. त्यांनी संपाची नुसती नोटीस दिली, तरी लगेच शासन चर्चेसाठी पुढे येते व बहतेक वेळा त्यांच्या मागण्या मान्य करते.
 रिक्षावाल्यांची युनियन असते, हमालांची युनियन असते व त्या एकजुटीच्या बळावर आपल्या श्रमाचे पुरेपूर दाम वसूल करणे त्यांना शक्य होते. विमाने चालवणारे पायलट प्रचंड पगार घेतात, पण त्यांचीही युनियन असते व तेही अधूनमधून अधिक चांगल्या सुखसोयींसाठी संप करतच असतात. त्यांचेही सगळे लाड सरकार पुरवते. पण तेच सरकार शेतकऱ्यांच्या अगदी जुजबी अशा मागण्यांचीही दखल घेत नाही; त्यांच्याकडे ढुंकूनही बघत नाही. कारण शेतकऱ्यांची एकजूट नसते. ते एकत्रित उभे राह शकत नाहीत, त्यांना उपद्रवमूल्य नसते.
  शहरवासीयांच्या लांगूनचालनाच्या संदर्भात जोशींनी वैद्यकीय सेवेचाही विस्तृत उल्लेख केला होता. त्यांच्या मते देशातल्या नव्वद टक्के लोकांना हगवण, खरूज असे साधे रोग होत असतात, पण त्यांवर आपण प्रभावी उपाययोजना करत नाही. ह्या रोगांवर उपचार करणारी गावोगावी पुरेशी माणसेही नाहीत आणि औषधेही उपलब्ध होत नाहीत. उलट शहरांमध्ये


२३० ◼ अंगारवाटा... शोध शरद जोशींचा  मोठमोठे दवाखाने बांधले जातात आणि तिथे सरकारतर्फे प्रचंड खर्च करून अशी यंत्रसामग्री आणली जाते, जिचा उपयोग फारतर लाखात एखाद्याला होणारा आजार बरा करण्यासाठी होऊ शकेल. गावातील लोकांकरिता मात्र काहीच रक्कम उपलब्ध होत नाही.
 या सगळ्या परिस्थितीतच जोशींच्या 'इंडिया विरुद्ध भारत' या मांडणीचा उगम आहे. या चरित्रात तो भाग पूर्वी आलेलाच आहे.
 ह्या समाजात 'इंडिया विरुद्ध भारत' ही एकमेव विभाजन रेषा नव्हती ह्याचे भान जोशी यांना अर्थातच होते. एका इंडियात अनेक परस्परविरोधी घटक असतात व एका 'भारतातही अनेक परस्परविरोधी घटक असतात – जात, धर्म, भाषा, प्रांत, वेगवेगळे राजकीय पक्ष, सुशिक्षित-अशिक्षित, कामगार-मालक, वेगवेगळे आर्थिक स्तर ह्या सर्व भेदांनुसार समाजाचे विभाजन करता येईल ह्याची त्यांना कल्पना होती. ही रेषा भौगोलिक नव्हती; विषमता शहरात आहे व गावातही आहे हेही त्यांना ठाऊक होते. 'इंडिया'मधेही 'भारत' आहे, आणि 'भारता'मधेही 'इंडिया' आहे, असे ते म्हणतच. पण कुठेतरी सुरुवात करायची म्हणून त्यांनी इंडिया विरुद्ध भारत' ही विभाजन-रेषा पकडली. 'शोषित समाजाला ते 'भारत' म्हणतात तर 'शोषक समाजाला ते 'इंडिया' म्हणतात, एवढे लक्षात घेतले, तर या संकल्पनेबद्दल काहीच वाद उरत नाही.
 'इंडिया विरुद्ध भारत' ही संकल्पना मांडताना आपला लढा शहरातील गोरगरिबांविरुद्ध नाही ही गोष्टही जोशी आपल्या अनुयायांपुढे वरचेवर स्पष्ट करतात. ते म्हणतात,
  "ह्या पिढीत किंवा मागच्या पिढीत ही सर्व शहरातली गरीब माणसं कोरडवाहू शेतकरीच होती. त्या कोरडवाहू शेतीत पोट भरता येईना म्हणून त्यांनी एक दिवस जी काय किंमत येईल त्या किमतीला जमीन फुंकून टाकलेली असते, बैल विकून टाकलेले असतात आणि जी काय गाडगी-मडकी उरतील ती घेऊन शहरात ती पोटाकरिता येऊन राहिलेली असतात."
 त्यामुळेच शहरातील दारिद्र्यावरचा खरा उपाय गावातील दारिद्र्य दूर करणे, म्हणजेच कोरडवाहू शेतीत चांगला पैसा मिळेल अशी व्यवस्था करणे हा आहे, असे त्यांचे प्रतिपादन आहे.
 शासन व एकूणच अभिजनवर्ग कशा प्रकारे शेतकऱ्यांचे शोषण करत आहे हे सारांशरूपात मांडताना जोशींनी ह्या शिबिरांत 'शोषणाचे पंचशील' असा शब्दप्रयोग केला आहे. त्या पंचशीलातील पाच तत्त्वे पुढीलप्रमाणे :

१. शेतकऱ्याचा खरा उत्पादनखर्च भरून निघेल असा भाव त्याच्या शेतीमालाला द्यायचा नाही.

२. भाव न मिळाल्याने अधिकाधिक दरिद्री होत जाणाऱ्या शेतकऱ्याने चिडून उठू नये म्हणून त्याला काहीतरी खोट्या आशेची गाजरे दाखवायची किंवा त्याचे 'मन रमवण्यासाठी किंवा दुसरीकडे वळवण्यासाठी वापरायचा खुळखुळा' असे ज्याचे वर्णन करता येईल 

अशा खोट्या फसव्या विकासयोजना आखायच्या. उदाहरणार्थ, शेतीमालासाठी बाजारसमित्या स्थापन करणे. त्यातून शेतकऱ्याचे शोषण किंवा अगतिकता जराही कमी झाली नाही, कारण व्यापारी जितका त्रास द्यायचे, तितकाच त्रास ह्या बाजारसमित्यांतील अधिकारीही देऊ लागले.
३. शेतकऱ्यांमध्ये एकी होऊ द्यायची नाही. छोटे शेतकरी विरुद्ध मोठे शेतकरी, शेतकरी विरुद्ध शेतमजूर, मराठी विरुद्ध कानडी असे वाद जागते ठेवून 'फोडा-झोडा' नीतीचा अवलंब करायचा.
४. शेतकऱ्याविरुद्ध प्रचार करून त्याची बदनामी होईल असे चित्र तयार करायचे; तो आळशी, बेजबाबदार, अंधश्रद्धाळू कसा आहे व त्यामुळेच तो गरीब आहे हेच सारखे मांडत राहायचे. शेतकऱ्याचे हे अभिजनवर्गातील चित्रण अतिशय विकृत आहे. 'पागोटेवाला आला की इंजेक्शनचे पाचऐवजी दहा रुपये घ्यायचे' ही भावना परदेशातून पुण्यात आल्यावर तेथील डॉक्टरांमध्ये जोशींना दिसायची ती त्यामुळेच.
५. तरीही जेव्हा जेव्हा शेतकरी आंदोलन करत उभे राहतील, तेव्हा तेव्हा कोणत्याही परिणामांची क्षिती न बाळगता ते आंदोलन क्रूरपणे चिरडून टाकायचे – जसे पोलिसांनी नाशिकला व निपाणीला केले.
 शेतीकडे शेतकरीधर्म, भूमिपुत्राचे कर्तव्य, काळ्या आईची सेवा, बळीराजाची सेवा वगैरे भावुक दृष्टींनी न बघता, शेती हा इतर कुठल्याही व्यवसायांप्रमाणे एक व्यवसाय आहे व पूर्णतः व्यावसायिक तत्त्वांवरच तो करायला हवा, असे जोशी ठासून सांगत आणि त्या दृष्टीने त्यांनी शेतीचे अर्थशास्त्र मांडले. बहुसंख्य शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा अगदी नवा विचार होता; शेतीकडे ह्या भूमिकेतून त्यांनी पूर्वी कधीच पाहिले नव्हते.
 शेतीमालाचा उत्पादनखर्च कसा काढायचा ही ह्या अर्थशास्त्राची पहिली पायरी होती. त्याविषयी बऱ्याच तपशिलात जाऊन जोशींनी ऊहापोह केला.
 सुरुवात जमिनीपासून व्हायची. बापजाद्यांपासून वारसाहक्काने मिळत आलेली जमीन हाही खर्चाचा एक घटक मानला गेला पाहिजे, ही गोष्ट बहुसंख्य शेतकऱ्यांच्या गावीही नसायची. जोशी सांगत, जमिनीची आजची जी किंमत असेल त्याच्या १० टक्के रक्कम आपण दरसाल खर्च म्हणून पकडली पाहिजे. कारण आपण जर ती जमीन आज विकली, व ते पैसे बँकेत ठेवले, तर त्यावर आपल्याला १० टक्के व्याज सहज मिळेल. आपण शेती करतो, म्हणजेच त्या व्याजावर पाणी सोडतो. तेव्हा ती रक्कम शेतीखर्चातच पकडली पाहिजे. कारखानदार आपल्या जागेचा विशिष्ट घसारा (डेप्रिसिएशन) खर्चात पकडतो व मगच त्याचा नफा काढला जातो. ही सवलत शेतकऱ्याला मात्र दिली जात नाही.
 आपण शेतीची नांगर-खुरपणीपासून ते पहार-विळ्यापर्यंत असंख्य अवजारे, तसेच


२३२ ◼ अंगारवाटा... शोध शरद जोशींचा 

विहीर, चर, बैल, गोठा, मांडव, कुंपण, मोट, इंजिन, मोटार, पंप, स्टार्टर, पाइप्स इत्यादीवर जो खर्च केला असेल, तो भांडवली खर्च पकडून, त्याच्या १० टक्के रक्कम ही वार्षिक खर्चापोटी धरली पाहिजे. ह्यातील काही गोष्टी पाच वर्षे टिकतात, काही वर्षभर टिकतात तर काही दर हंगामात घ्याव्या लागतात. त्यांच्या देखभालीवर व पुनःखरेदीवर होणारा खर्चही त्या-त्या प्रमाणात वार्षिक खर्चात धरला पाहिजे.
 शेतावर मजूर नेमताना जी मजुरी दिली जाते तो खर्च तर धरलाच पाहिजे, पण शिवाय आपल्या घरची जी माणसे शेतावर राबतात त्यांचीही मजुरी खर्चात धरली पाहिजे. ही मजुरी पकडताना मुलांचे शिक्षण, औषधपाणी, लग्नकार्य वगैरेंवर होणारा खर्चही विचारात घेतला पाहिजे. नाहीतर वरकरणी शेती नफ्यात दिसली, तरीही लग्नकार्य करताना प्रत्येक वेळी जमीन गहाण ठेवावी लागेल!

शेती चार महिने चालते; पण त्या उत्पन्नावर बारा महिने आपल्याला जगायचे असते; म्हणून संपूर्ण बारा महिन्यांचा सर्व कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा खर्च शेतीखर्चातच पकडला पाहिजे.
 खते, बियाणे, औषधे, फवारणी, वीज, पाणी, वाहतूक यांचाही खर्च हिशेबात धरला पाहिजे. त्याचबरोबर आपल्या देशातील भ्रष्ट यंत्रणेमुळे शासनाकडचे प्रत्येक काम करून घेताना शेतकऱ्याला प्रचंड त्रास होत असतो. तलाठ्याकडून सात बाराचे उतारे आणणे, गाव नमुना क्रमांक आठचे उतारे आणणे, भावाचा अंदाज घेण्यासाठी बाजारसमितीत जात राहणे, चालू असलेल्या अनेक खटल्यांत कोर्टात हजेरी लावणे आणि संध्याकाळी निराश मनाने पुढची तारीख घेऊन परत येणे, कर्जासाठी सोसायटीकडे वा बँकेत चकरा मारणे, इतके सारे करूनही जेव्हा कर्ज फेडता येत नाही, व्याजही भरता येत नाही आणि घराची जप्ती होणार अशी नोटीस येते, तेव्हा काहीतरी पळवाट काढण्यासाठी थोरामोठ्यांचे पाय धरायला धावाधाव करणे ह्या साऱ्यात शेतकऱ्याचा पैसा व वेळ जातोच, पण शिवाय जीव अक्षरशः मेटाकुटीला येत असतो. भविष्यात अधिक शेती घ्यायची असेल, घर बांधायचे असेल, इतर काही मोठा खर्च करायचा असेल, तर त्याची तजवीजही करून ठेवायला हवी. ह्या साऱ्यासाठी लागणारा पैसा हा शेतीमालाच्या विक्रीतूनच येणार असल्याने त्याचाही हिशेब शेतीमालाचा रास्त भाव काढताना करायला हवा असे जोशी सांगत.
 कारखानदार आपला उत्पादनखर्च कसा काढतात हे जोशी समजावून सांगत. केवळ कामगारांचा पगार वा कच्च्या मालाची किंमत खर्चात धरणे पुरेसे नाही. इमारती, वीज, पाणी, सरकारी कर, सुपरवायझर, हिशेबनीस, सुरक्षा व्यवस्था, इतर व्यवस्थापन, कामगारकल्याण, स्टेशनरी, गोदामे, जाहिराती, विक्रेते, त्यांनी विक्रीसाठी केलेले दौरे, प्रदर्शने, प्रवासखर्च, विक्री वाढावी म्हणून दिलेल्या मेजवान्या, अधिकाऱ्यांना द्यावी लागणारी लाच, भांडवलावरील व्याज, कर्ज मिळवण्यासाठी करावा लागणारा खर्च, वकील व इतर मदतनिसांचा खर्च, इमारतींचा घसारा, विम्याचे हप्ते, काही टक्के उत्पादन रिजेक्ट होणार हे गृहीत धरून त्याचा पकडलेला खर्च, बाजारपेठेतील चढउतारांमुळे तोटा आला, तर तो सहन करण्यासाठी जी 

तरतूद करावी लागते तो खर्च, सल्लागार, तंत्रज्ञान खरेदी करण्यासाठी व भावी वाढीसाठी गंतवणूक, नव्या मशिनरीचा खर्च, देखभालीचा खर्च, समाजात आपल्याविषयी गुडविल' (सद्भावना) राहावी म्हणून केल्या जाणाऱ्या दानधर्माचा खर्च इत्यादी असंख्य बाबी कारखानदार आपला उत्पादनखर्च काढताना पकडत असतो. कधी कधी तोटा आला, तर तो भरून काढता यावा, एका प्रकारचे उत्पादन बंद करून दुसऱ्याच प्रकारचे उत्पादन सुरू करायचे असेल तर त्यासाठीची तजवीज वगैरे सगळे घटकही कारखानदार विचारात घेत असतो.
 मग त्यावर स्वतःचा नफा किती ते धरून कारखानदार आपल्या मालाच्या विक्रीची किंमत ठरवत असतो. जगातले सर्वच उत्पादक आपल्या उत्पादनाची किंमत आपण ठरवतात; आपण शेतकऱ्यांनीदेखील हेच केले पाहिजे असे जोशी म्हणत.
 कृषिमूल्य आयोग शेतीमालाचा भाव निश्चित करत असे व त्याच्या कार्यपद्धतीत जोशींनी अनेक त्रुटी दाखवन दिल्या. उदाहरणार्थ, शेतकऱ्याला आपला माल बाजारपेठेत नेण्यासाठी जो खर्च करावा लागतो, तो आयोगाने सुरुवातीची पंधरा वर्षे विचारातच घेतला नव्हता व जेव्हा जोशींनी त्यांच्याशी चर्चा करताना ही त्रुटी निदर्शनास आणली, तेव्हाच त्यांनी ती चूक कबल केली होती. हाच प्रकार औत-अवजारांच्या दुरुस्तीखर्चाच्या बाबतीत घडला होता. तीही चूक नंतर त्यांनी कबूल केली होती.
 खर्च काढताना देशातले सहाएक हजार शेतकरी निवडून, त्यांच्या खर्चाची सरासरी काढण्याची पद्धत कृषिमूल्य आयोग वापरतो. त्या पद्धतीत साडेपाच हजार शेतकरी अतिशय लहान असतात व औषधफवारणीसाठी त्यांचा खर्चही जवळपास काही नसतो. त्यामुळे कृषिमूल्य आयोगाने काढलेला औषधफवारणीचा सरासरी खर्च हा एका हेक्टरला फक्त रुपये १०.७३ असतो! प्रत्यक्षात तेवढ्या पैशात पाणीफवारणीदेखील करता येत नाही! शिवाय, दुर्दैवाने जे बहुसंख्य शेतकरी अत्यंत दरिद्री आहेत, त्यांचेच खर्चाचे आकडे सरासरी खर्च काढताना व त्यावर आधारित भाव ठरवताना अधिक प्रमाणात आधारभूत धरले गेले, तर त्या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती भविष्यातदेखील कधी सुधारण्याची काहीही शक्यता राहत नाही. कारण त्यांना मिळणारे भाव अत्यंत अपुरे असतात.
 सामान्य शेतकरी जास्त खर्च करत नाही म्हणून त्याला जास्त भाव मिळत नाही, व त्याला जास्त भाव मिळत नाही म्हणून तो जास्त खर्च करू शकत नाही, अशा दुष्टचक्रात शेतकरी सापडला आहे.
 हे दोष टाळण्यासाठी उत्पादनखर्च काढताना एक शास्त्रीय उपाययोजना जोशींनी मांडली होती. त्यांच्यातील संख्याशास्त्रज्ञ व अर्थशास्त्री ह्या कामात दिसून आला होता. शेतीमालाचा उत्पादनखर्च कृत्रिम नमुना पद्धतीने (Synthetic Model Method) काढला पाहिजे असा त्यांचा प्रस्ताव होता. तो नेहमीच्या सरासरी काढण्याच्या पद्धतीने कधीच काढता येणार नाही असे ते म्हणत. ती पद्धत संख्याशास्त्रीयदृष्ट्या किती चुकीची आहे हे जोशींनी दाखवून दिले.


२३४ ◼ अंगारवाटा... शोध शरद जोशींचा 

उदाहरणार्थ, "मध्यावर वीस फूट खोल असलेल्या नदीची सरासरी खोली जरी फक्त चार फूट असली, तरी ती नदी घोड्यावर बसून कशी पार करता येईल?" असाही प्रश्न जोशी विचारत!
  शेतीच्या तांत्रिक तसेच, व्यवस्थापकीय कार्यक्षमतेची एक पातळी गृहीत धरावी लागेल. खरे तर दर वर्षी ही पातळी थोडी थोडी उंचावत जायला हवी. गृहीत धरलेल्या ह्या कार्यक्षमतेच्या पातळीवर कृत्रिम नमुना पद्धतीने शेतीचा उत्पादनखर्च काढला पाहिजे व त्यावर आधारित दर नक्की केले पाहिजेत. या पातळीच्या वर कार्यक्षमता असलेल्या शेतकऱ्यांना अधिक फायदा मिळेल व तिच्यापेक्षा कमी कार्यक्षमता असलेल्या शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागेल. त्यामुळे आपापली कार्यक्षमता वाढवायलाही अधिक उत्तेजन मिळत राहील व त्यातून एकूणच शेतीचा विकास होत राहील.
 जोशींनी शेतीमालाच्या रास्त किमतीचा मुद्दा अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडला. त्यासाठी त्यांनी प्रचंड पूर्वतयारी केली होती, आकडेवारी गोळा केली होती. त्यांच्या प्रतिपादनानुसार १९७९ साली भुईमुगाचा उत्पादनखर्च किलोला चार रुपये तीस पैसे होता, तर बाजारातील सरासरी भाव फक्त दोन रुपये साठ पैसे होता. उसाचा उत्पादनखर्च एका टनाला २८८ रुपये होता, तर कारखान्यांकडून मिळणारा सरासरी भाव १४२ रुपये होता. कांद्याचा उत्पादनखर्च एका क्विटलला ५० रुपये होता, तर मिळणारा भाव सरासरी फक्त २० रुपये होता. भाताचा उत्पादनखर्च किलोला सव्वा तीन रुपये होता, तर मिळणारा बाजारभाव फक्त सव्वा रुपया होता. दुधाचा उत्पादनखर्च लिटरला तीन रुपये ऐंशी पैसे होता, तर मिळणारा भाव दोन रुपये दहा पैसे होता. कपाशीचा उत्पादनखर्च क्विटलला ६८७ रुपये होता, तर सरकारी खरेदी फक्त क्विटलला ५०० रुपये दराने होत होती. (हे आकडे १९७९ सालचे आहेत.) ही सर्व आकडेवारी शेतकऱ्यांचे डोळे उघडणारी होती.
 उत्पादनखर्चापेक्षा कमी भाव जर शेतीमालाला मिळतो, तर मग तरीही शेतकरी जगतो कसा?
 याचे उत्तर आहे, शेतकरी स्वतःचे भांडवल खाऊनच जगत असतो. आपली जमीन, आपली कार्यशक्ती. आपली जनावरे तो कणाकणाने खात असतो. गोठा पडला,बैल मेला, घरात कोणी आजारी पडले, लग्नकार्य निघाले, की त्याला कर्ज काढण्याशिवाय दुसरा काही पर्यायच नसतो व शेतीत उत्पादनखर्चच भरून निघत नसल्याने काही फायदा व्हायची व त्यातून ते कर्ज फिटायची काही शक्यताच नसते; ते वाढतच जाते. शेतकरी कर्जातच जगतो व कर्जातच मरतो. त्याची गरिबी ही अंगात मुरत गेलेल्या तापाप्रमाणे असते; असा ताप रोग्याला एकदम मारत नाही, पण कणाकणाने तो रोगी मरतच असतो. शेतकऱ्याच्या गरिबीचे असेच आहे.
 एकदा उत्पादनखर्च नेमका काढला, की तो भरून निघेल एवढ्या किमान भावाची मागणी करणे ही स्वाभाविक अशी दुसरी पायरी होती. ह्या मागणीला अभ्यासाचा पूर्ण आधार असल्याने ती पूर्ण आत्मविश्वासाने करणे शक्य होते. म्हणूनच त्यांनी 'शेतीमालाला उत्पादनखर्चावर आधारित रास्त भाव' हा आपला एक-कलमी कार्यक्रम निश्चित केला. आपण


शेतकरी संघटना : तत्त्वज्ञान आणि उभारणी ◼ २३५
 

जो भाव आज कांदा, ऊस, तंबाखू, भुईमूग, कपाशी अशा पिकांना मागितला आहे व आपल्या आंदोलनामुळे जो सध्या तरी मिळालेला आहे, तोही खरेतर वाजवी भाव नाही, तो खूप अपुराच आहे; पण आपल्या आंदोलनापूर्वी मिळणारा भाव हा इतका कमी होता, की त्यात थोडीफार तरी सुधारणा आता पदरात पडून घेऊ व नंतर पुढच्या वेळी अधिक उचित दाम मागू, हेही जोशी यांनी सर्व कार्यकर्त्यांना सांगितले होते.
 शेतकऱ्याचा उत्पादनखर्च कसा भरून निघेल याची चर्चा करण्यासाठी संघटनेने पुढे १६ नोव्हेंबर १९८३ रोजी पंढरपूर येथे एक विशेष मेळावा भरवला होता. शेतीमालाला रास्त भाव मिळावा यासाठी 'विठोबाला साकडे घातले होते. या अभिनव उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला. लाखाहून अधिक शेतकरी पंढरपुरात जमा झाले. नेहमी इथे वारीसाठी जमणाऱ्या समुदायापेक्षा हा मेळावा अगदी वेगळा होता. त्याचे स्वरूप जराही धार्मिक असे नव्हते. 'भीक नको, हवे घामाचे दाम' या घोषणेने अवघे पंढरपूर दुमदुमून गेले. याच मेळाव्यात 'कृषिमूल्य आयोग बरखास्त करा' ही मागणी केली केली. पुढे राजीव गांधी यांनी त्याची थोडीफार दखल घेतली असे म्हणता येईल; 'कृषिउत्पादनखर्च व मूल्य आयोग' (Commission for Agricultural Costs & Prices) असे त्यांनी ह्या आयोगाचे नामकरण केले.
 या पंढरपुर मेळाव्याच्या संदर्भात एक लक्षणीय बाब नोंदवायला हवी. शेतकरी संघटनेच्या कामाला जिथे सुरुवात झाली व जिथे शरद जोशींची शेती होती तो चाकण परिसर हे वारकऱ्यांचे सर्वांत मोठे प्रभावक्षेत्र होते. असे असूनही जोशींनी त्या सुरुवातीच्या काळात वारकऱ्यांवर बरीच टीका केली होती. त्यामागे अर्थातच त्यांचा स्वतःचा अनुभव होता. ते लिहितात,

मी शेती चालू केली, तेव्हा पहिल्यांदा बटाटे लावले. खूप तण झालं होतं; डोंगराच्या उताराचा भाग असल्यामुळे. तण काढायला माणसं लावायला पाहिजेत, नाहीतर बटाट्याचं पीक जाणार अशी परिस्थिती उभी राहिली. माणसं शोधायला गेलो तर गावातल्या लोकांनी सांगितलं, की आता तण काढायला कुणी मजूर मिळणार नाहीत; बाया नाहीत आणि पुरुषही नाहीत. का? तर म्हणे, आषाढी एकादशी जवळ आली होती आणि लोक मोठ्या संख्येने पंढरपूरच्या वारीला चालले आहेत. मला मोठं आश्चर्य वाटलं. ज्या काळात शेतकऱ्याच्या शेतामध्ये प्रचंड कामं असतात, अशा वेळेला लाखो लोकांना उठवून पंढरपूरला घेऊन जाणारी ही भक्तिमार्गाची परंपरा टिकलीच कशी? केवळ विठोबाच्या दर्शनाकरिता ही मंडळी जातात, हे काही मला पटेना. मग मी सरळ देहूला गेलो, यात्रेमध्ये सामील झालो आणि एक भयानक विदारक सत्य माझ्यासमोर आलं. आमच्या कोरडवाहू भागातील शेतकरी, बियाण्यासाठी कशीबशी बाजूला ठेवलेली ज्वारी शेतामध्ये कुंकून टाकली, की घरी खायलासुद्धा काही राहत नाही म्हणून


२३६ ◼ अंगारवाटा... शोध शरद जोशींचा 

वारीमध्ये जातो आणि वारीच्या पहिल्या दिवसापासून कुठे फुटाणे वाटताहेत, कुठे चुरमुरे वाटताहेत, कुठे केळी वाटताहेत त्याच्या आशेवर पुढे पुढे जात राहतो. देहूपासून पंढरपूरपर्यंत जाणाऱ्या या यात्रेचा भक्तिसंप्रदायाशी काहीही संबंध नाही. कोरडवाहू भागातल्या उपाशी शेतकऱ्यांची पंढरपूरपर्यंतच्या रस्त्यावरील, पाण्याची य असलेल्या भागातून जाणारी ती भीकदिंडी असते.


(अंगारमळा, पृष्ठ १२०)


  शेतकरी संघटनेच्या अनेक शिबिरांत जोशी ही भूमिका मांडत असत व शेतकऱ्यांना ती पटतही असे. अर्थात यामागे शेतीतले दारिद्र्य अधोरेखित करणे व त्यासाठी काय उपाययोजना करायची त्याकडे लक्ष वेधणे हाच प्रमुख हेतू असायचा. पुढे जोशींनी वारीकडे अगदी वेगळ्या दृष्टीने बघितले व त्याबद्दल त्यांनी लिहिलेही आहे. पुढे सोळाव्या प्रकरणात ते येणार आहे.

 शेतकऱ्यांच्या समोरील अडचणींचे दोन भाग जोशी करतात - अस्मानी संकट आणि सुलतानी शोषण.
 पहिले अस्मानी संकट म्हणजे अनियमित पाऊस.
 एखाद्या वेळी पडला तर तो प्रचंड पडतो आणि नाही म्हणजे अजिबात पडत नाही. कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ. दोन्हींमुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान होते. भारतातील पावसाचा दुसरा तोटा म्हणजे त्याचा हंगामीपणा. पावसाळ्याच्या चार महिन्यांतच वर्षभराचा सगळा पाऊस पडून जाणार. कोरडवाहू शेतीत त्या चार महिन्यांच्या आसपासच सर्वांची पेरणी आणि कापणी होते. त्यामुळे मग सगळ्यांची पिके एकाच हंगामात विक्रीला येतात. मालाचा पुरवठा वाढला, की भाव पडणार हा अर्थशास्त्राचा नियमच आहे. त्यामुळे मग शेतकऱ्याला अत्यल्प भाव मिळतो. ह्यावर उपाय म्हणजे मालाच्या साठवणीची व प्रक्रियाउद्योगाची मोठ्या प्रमाणावर उभारणी. पण सध्यातरी ते केवळ एक स्वप्नच आहे.
 याशिवाय रोगराई, कीड, टोळधाडी, वादळे, खराब बियाणे वगैरे अनेक अडचणी निसर्ग त्याच्यापुढे निर्माण करत असतो. ह्याबाबतीत एक अगदी अनपेक्षित असे उदाहरण सांगण्यासारखे आहे - मोरांसारख्या पक्ष्यांमुळे होणारे नुकसान. मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी. त्याच्या सौंदर्याचे सर्वांना कोण कौतुक! पण तेच मोर रात्रीच्या वेळी शेतात घुसतात आणि सगळे पीक फस्त करून टाकतात! त्यावर काही इलाजही शेतकरी करू शकत नाही. सश्यापासून डुकरापर्यंत इतरही अनेक प्राण्यांच्या बाबतीत हे तेवढेच खरे आहे. कायद्याने ह्या वन्य जीवांची हत्या करणे अवैध आहे; वनखात्याची परवानगी असल्याशिवाय शेतकरी तशी हत्या करूच शकत नाही. पुन्हा तालुक्याच्या अथवा जिल्ह्याच्या ठिकाणी जायचे, योग्य त्या अधिकाऱ्याला गाठायचे, त्याच्याकडे विनंती अर्ज द्यायचा आणि मग पाठपुरावा करून ती परवानगी मिळवायची हेही अतिशय वेळकाढू व किचकट काम असते. सर्वसामान्य शेतकरी ते सगळे उपदव्याप करू शकत नाही. शिवाय, तोपर्यंत हे वन्य जीव त्याच्या शेताची पुरती


शेतकरी संघटना : तत्त्वज्ञान आणि उभारणी ◼ २३७



नासाडी करून दुसऱ्या कुठल्यातरी शेतात गेलेले असतात! परवानगी मिळवण्यासाठीची शेतकऱ्याची सारी मेहनत पाण्यात जाणार असते. निसर्गाचे, वन्य प्राण्यांचे संवर्धन करायला हवे, ह्याबद्दल वाद नाही, पण त्यात शेतकऱ्याला काय काय अडचणी येतात ह्याचाही कायदे करणाऱ्या शासनाने विचार करायला हवा. हाच प्रकार गोवंशहत्याबंदीच्या संदर्भातही होतो. पण शेतकऱ्यांची दःखे राजधानीत पोचतच नाहीत व त्यामळे त्याच्या हिताचा विचार होतच नाही.
 सुलतानी संकट म्हणजे शासनाची धोरणे व त्यातून येणाऱ्या अडचणी.
 जेव्हा शेतीमालाचा तुटवडा असतो, तेव्हा नागरिकांना अन्नधान्य पुरवता यावे म्हणून सरकार शेतकऱ्यांकडून लेव्ही वसूल करते – म्हणजेच अतिशय कमी दरात धान्य ताब्यात घेते. औरंगझेबाने जिझिया कर वसूल करावा तसाच हा क्रूर प्रकार. सरकारने ठरवलेली लेव्ही प्रत्येक शेतकऱ्याने घालायची आणि तीही सरकारने ठरवलेल्या भावात!
 हा मुद्दा स्पष्ट करताना जोशी ज्वारीचे उदाहरण देतात. १९७५ साली ज्वारीची खुल्या बाजारातील किंमत एक रुपया पन्नास पैसे किलो होती. पण चाकणला शेतकऱ्याकडून सरकार फक्त ८३ पैसे किलो दराने, म्हणजेच बाजारभावापेक्षा ६७ पैसे कमी दराने, लेव्ही वसूल करत होते. असेही खुपदा झालेले आहे, की पुरेशी लेव्ही शेतात पिकली नाही, तर त्या शेतकऱ्याला खुल्या बाजारातून, म्हणजेच १ रु. ५० पैसे किलो दराने, लेव्हीसाठी कमी पडणारी ज्वारी खरेदी करावी लागे. त्यासाठी भुईमूग, मिरची वा इतर कुठले उत्पादन येईल त्या भावाने विकावे लागे, प्रसंगी घरातला एखाददुसरा दागदागिनाही विकावा लागे; पण कुठल्याही परिस्थितीत त्याला लेव्ही भरावीच लागे. नाहीतर सरळ त्याच्या घरावर जप्ती येत असे.
 साखरेचे उदाहरणही जोशींनी दिले होते. उसाचा उत्पादनखर्च एका टनाला २८८ रुपये असताना शेतकऱ्याला सहकारी साखर कारखाने फक्त १४२ रुपये भाव देत होते. पण पुन्हा बहुसंख्य सहकारी साखर कारखानेदेखील अडचणीतच होते. कारण साखरेचा उत्पादनखर्च एका किलोला चार रुपये असूनही सरकार मात्र त्यांच्याकडून लेव्हीच्या स्वरूपात ६५ टक्के साखर फक्त किलोला दोन रुपये बारा पैसे या दराने खरेदी करत असे.
 हे सगळे का? तर गरिबांना साखर स्वस्तात मिळावी म्हणून. पण जोशींच्या मते या देशात जे खरे गरीब आहेत ते स्वस्तात मिळत असली तरी साखर खात नाहीत – खाऊच शकत नाहीत. आठवड्यातून एखाद दिवशी कुठे गूळ दिसला तर नशीब! मग गरीब कोण, की ज्यांच्याकरिता सरकारला साखर लागते? शहरातले झोपडपट्टीत राहणारे गरीबसुद्धा साखरेचा भाव १५-१६ रुपये किलो झाला तेव्हा खूष होते; कारण रेशनकार्डावर त्यांना २ रुपये ८८ पैसे दराने मिळालेली साखर घेऊन ते ती खुल्या बाजारात बारा रुपये किलो भावाने विकू शकत होते व मधल्यामध्ये स्वतःसाठी किलोमागे आठ-नऊ रुपये फायदाही मिळवू शकत होते. विशेष म्हणजे, गिहाइकालासुद्धा ती खुल्या बाजारापेक्षा ३-४ रुपये कमी दरातच मिळत


२३८ = अंगारवाटा... शोध शरद जोशींचा 

होती. त्यामुळे तोही अशी स्वस्तात साखर मिळाली तर खूष असायचा! नुकसान व्हायचे ते अंतिमतः शेतकऱ्याचे; कारण स्वतःलाही सरकारकडून पुरेसा भाव मिळत नाही, असे सांगून कारखाने शेतकऱ्याला त्याचा उत्पादनखर्च भरून निघेल इतकाही भाव देत नसत. जोशी विचारतात,
  "मग सरकार नेमक्या कुठल्या गरिबांकरिता ही स्वस्तातली साखर लेव्ही म्हणून वसूल करते?"
 यामागे शहरातील लोकांना खूष ठेवायचे आणि शेतकऱ्याचे मात्र नुकसान करायचे, हेच सरकारी धोरण आहे असे जोशी म्हणतात. हा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी ते औषधांचे उदाहरण देतात. ते म्हणतात,
 "गरिबांना साखर स्वस्त मिळावी म्हणून तुम्ही जर साखर कारखान्यांवर लेव्ही लावता. तर औषधांच्या कारखान्यांवर लेव्ही का लावत नाही? औषधांपेक्षा साखर अधिक जरुरीची गोष्ट आहे काय? साखर खायला मिळाली नाही म्हणून कोणी मेल्याचं उदाहरण नाही. पण ज्या औषधांमुळे जीव वाचतो, अशा औषधांवरसुद्धा लेव्ही नाही. पण साखरेवर लेव्ही आहे!"
  शेतीमालाची तूट असते तेव्हाचा हा प्रकार. आणि जेव्हा शेतीमाल मुबलक तयार होतो, तेव्हा मात्र सरकार बांधीव दराने खरेदी करत नाही, तर बाजारातल्या लिलावात जो भाव ठरेल त्याच भावाने खरेदी करते. उदाहरणार्थ, ऐंशी साली ज्वारीचे पीक मुबलक आले व भाव पडले. पण त्यावेळी मात्र सरकारने जुन्या, स्वतःच ठरवून दिलेल्या लेव्हीच्या ६८ पैसे किलो भावाने ज्वारी खरेदी केली नाही, तर बाजारात त्यावेळी जो ६५ पैसे किलो भाव होता, त्याच कमी भावाने ही लेव्हीची ज्वारीही खरेदी केली.
 साखरेच्या बाबतीतही हेच घडले. १९७९ साली साखरेचे उत्पादन मुबलक झाले आणि ताबडतोब सरकारने लेव्हीच्या (रुपये २.१६ किलोला) दराने साखर खरेदी करणे थांबवले आणि कोसळलेल्या बाजारभावातच साखर खरेदी केली. त्यामुळे सरकारने साखरेचे भाव किलोला एक रुपया साठ पैशांवर आणून ठेवले. अनेक शेतकऱ्यांना ऊस चक्क जाळावा लागला. कारण तो तोडून कारखान्यात भरण्याची मजुरीही त्यांना परवडणार नव्हती.
 'तूट असेल तर लूट आणि मुबलकता असेल तर लिलाव' ह्या सरकारी धोरणाचे प्रत्यंतर निर्यातधोरण ठरवताना हमखास यायचे. उदाहरणार्थ, भुईमुगाचा भारतातील भाव किलोला रुपये २.६० असताना युरोपात त्याला रुपये आठने गि-हाइके होती. किंवा भारतात ज्वारीचा भाव रुपये १.१३ असताना मध्यपूर्वेत ती रुपये २.३०ला जाऊ शकत होती. कांद्याच्या बाबतीत तर हे फारच होते. चाकणला २० पैसे किलो भाव असताना परदेशात तो नऊपट भावाने, म्हणजे किलोला रुपये १.८० भावाने जाऊ शकत होता. पण ह्या बाबतीत सरकारी धोरण अतिशय लहरी व मुख्यतः शहरी ग्राहकाची सोय पाहूनच ठरायचे.
 अर्थात ह्याचे मूळ कारण शेतकऱ्याला उचित दाम मिळू नये हाच शासकीय धोरणाचा


शेतकरी संघटना : तत्त्वज्ञान आणि उभारणी - २३९



अधिकृत भाग होता हेही नंतर जोशींनी दाखवून दिले. ऊस आंदोलनाविषयी लिहिताना तो सारा भाग विस्ताराने आलाच आहे.
 म्हणूनच शेतकरी गरीब आहे ह्याबद्दल जोशी मुख्यतः चुकीच्या सरकारी धोरणांना जबाबदार धरतात; गावोगावच्या सावकारांना वा जमीनदारांना ते त्याबद्दल दोषी धरत नाहीत. जोशींच्या मते त्यांच्याविरुद्ध द्वेष पसरवण्याचे काम अनेक विचारवंतांनी व विशेषतः साम्यवादी नेत्यांनी वर्षानुवर्षे केले आहे. जणू काही त्यांच्या शोषणामुळेच शेतकरी दरिद्री राहिला आहे! काही आंदोलनांत त्यांचे प्राणही घेतले गेले. जोशी म्हणतात,
 "शेतकऱ्यांच्या दुःखाचं खरं मूळ दीडदमडीच्या सावकार, जमीनदारांत नाही. वाघाने शिकार मारल्यानंतर त्यावर हात मारणाऱ्या खोकडांपलीकडे त्यांना काही महत्त्व नाही. पण आजवर शेतकरी आंदोलनांना आर्थिक विचार, ऐतिहासिक तत्त्वज्ञान नसल्यामुळे त्यांची दिशा चुकली. कुत्र्याला कोणी दगड फेकून मारला, की ते कुत्रं धावत जाऊन चेवाचेवाने दगडालाच चावतं, तसं ह्या शेतकरी आंदोलनांचं झालं.जेव्हा जेव्हा ग्रामीण भागात उद्रेक उभे राहू लागले, तेव्हा तेव्हा ते ग्रामीण भागातीलच एखाद्या घटकाविरुद्ध - सावकार, जमीनदार, एखादी जात, एखादी पात, एखादा धर्म यांच्याविरुद्ध वळवून देण्यात आले. प्रचंड ताकदीच्या पहिलवानास लहान पोराने जणू चलाखीने फसवलं!"
 शेतकरी तितुका एक एक' हे जोशींचे एक महत्त्वाचे सूत्र होते. आपल्या कार्यकर्त्यांच्या मनावर ते पक्के बिंबवायचा जोशींनी प्रयत्न केला. धर्म, जात, भाषा, राज्य ह्यांवर उभे राहणारे कुठलेही तत्त्वज्ञान हा क्षुद्रवाद आहे; आपले आंदोलन हे पूर्णतः अर्थवादी आहे; साचलेल्या पाण्यात किडे साठतात, तसे विकास खुंटलेल्या समाजात हे सगळे क्षुद्रवाद निर्माण होतात; आपण त्यांपासून नेहमीच दूर राहायचे, असे ते म्हणत.
 छोटा शेतकरी-मोठा शेतकरी हा भेदही त्यांना अमान्य होता. त्यांच्यामते एखाद्याची शेती ६० एकर असली व त्याला तीन मुले असतील तर प्रत्येकाच्या वाट्याला २० एकरच उरतात आणि त्यांना पुन्हा प्रत्येकी दोन मुले झाली, की प्रत्येकाचा वाटा फक्त १० एकराचा उरतो, पुढच्या पिढीत तोही कमीच होतो. आजोबा बागाइतदार, बाप मोठा शेतकरी, मुलगा छोटा शेतकरी आणि नातू शेतमजूर असाच (जर ह्यापैकी कुणी शेतीतून बाहेर पडून दुसरा काही व्यवसाय करू लागले नाही तर) बहुतेकदा प्रकार असतो. त्यामुळे जवळ जवळ सगळे भारतीय शेतकरी हे अल्पभूधारकच आहेत असे ते म्हणतात.
 शेतकरी व शेतमजूर हा भेदही ते स्वानुभवाच्या आधारावर अमान्य करतात. मुळात छोटा शेतकरी हाच केव्हातरी आपली शेती गमावून बसतो व शेतमजूर बनतो; त्यामुळे त्यांच्यात मूलगामी असा काही भेद नसतोच. शेतकरी व शेतमजूर ह्यांच्यात त्यामुळेच सामंजस्याचे नाते असते, स्वतः शेतकरी व त्याचे कुटुंबही ह्या शेतमजुराबरोबर शेतावर राबत असते, बांधावर बसून सगळे एकत्रच भाकरी खात असतात. आंबेठाणच्या शेतीत त्यांनी हे अनुभवलेच होते. स्वतःच्या फायद्यासाठी काही विचारवंत हा कृत्रिम भेद निर्माण करतात. जोशी म्हणतात,


२४० = अंगारवाटा... शोध शरद जोशींचा

 "शेतकरी विरुद्ध शेतमजूर हा भेद निर्माण करायचा आणि आपण शेतमजुराच्या बाजूला आहोत असं दाखवायचं, हा विचारवंतांचा भंपकपणाच असतो. त्या तथाकथित शेतमजुराविषयीदेखील त्यांना खरंतर काहीच जिव्हाळा नसतो. स्वतःच्या घरात हेच विचारवंत आपल्या मोलकरणीशी कसं वागतात ते एकदा बघा! तिला चहा देतानादेखील ते तो कुठल्यातरी जुन्या, कानतुटक्या कपातून देतात आणि जिन्याखालच्या एखाद्या कोपऱ्यात बसून प्यायला लावतात! अशा लोकांनी उगाच शेतकरी विरुद्ध शेतमजूर असा खोटा वाद पेटवू नये!"
 'शेतकरी तितुका एक एक' असे म्हणताना आपले आंदोलन ग्राहकविरोधी नाही हेही जोशी ठासून सांगतात. शेतीमालाचे भाव वाढले म्हणजे पर्यायाने महागाई वाढत जाईल, असे शहरी मध्यमवर्गीयांना वाटत असते. शेतकरी आणि ग्राहक यांच्यात भांडणे लावून द्यायचा प्रयत्न काही राजकारण्यांकडून वरचेवर होत असतो. अशा वेळी उत्पादक शेतकरी हाही एक ग्राहकच आहे, आपल्या शेतात काढलेली दोन-चार पिके सोडली तर बाकी सगळ्या गोष्टी तोही इतर सर्वांप्रमाणे बाजारातूनच खरेदी करत असतो ह्या मुद्द्यावर ते भर देतात.
 या संदर्भात आणखी एका गोष्टीकडे जोशी लक्ष वेधून घेतात. ती म्हणजे बहुतेक ग्राहकोपयोगी वस्तूंच्या एकूण विक्रीमूल्यात कच्च्या मालाचा खर्च हा अगदी नगण्य घटक असतो. उदाहरणार्थ, दीडशे रुपयांच्या कपड्यामागे कापसावरचा खर्च फक्त पंधरा रुपये असतो अथवा एकशे दहा रुपयांच्या विड्यांमागे तंबाखूवरचा खर्च फक्त पाच रुपये असतो. त्यामुळे कच्च्या मालाची किंमत वाढली तरी एकूण तयार वस्तूंच्या किमतीत फारशी वाढ व्हायचे काहीच कारण नाही. मुळातच ह्या तयार वस्तूंची विक्रीची किंमत इतकी भरमसाट आहे, की कच्चा माल खरीदण्यासाठी थोडे अधिक पैसे मोजावे लागले, तरी एकूण विक्रीच्या किमतीत अगदी नगण्य फरक पडेल.
 शेतीमालाला रास्त दाम हवा ही आपली मागणी चलनवाढीला (व पर्यायाने भाववाढीला) कारणीभूत ठरेल हे काही अर्थशास्त्र्यांचे म्हणणे जोशी खोडून काढतात. त्यांच्या मते ही चलनवाढ फक्त शेतीमालाचे भाव वाढल्यामुळे होते असे नसून, कर्मचाऱ्यांचे व कामगारांचे पगार सतत वाढत असल्यामुळेही ती होत असते. शिवाय त्यांना महागाईनुसार वाढणाऱ्या महागाईभत्त्याचे कवच असते, जे शेतकऱ्यांना नसते. ते म्हणतात,
  "चलनवाढीच्या पुराचे पाणी वाढतच आहे. शेतकरी सोडून बाकी सगळे पाण्याच्या पातळीबरोबर तरंगत वर चढू शकतात. शेतकऱ्याचे पाय मात्र खाली बांधून ठेवले आहेत. त्याच्या खांद्यावर उभे राहून इतर सर्व आपली डोकी पाण्याच्या वर ठेवत आहेत आणि तोही वर आला तर आपण बुडू, म्हणून ओरडा करत आहेत."
 ह्या शिबिरांत आपल्या आंदोलनतंत्राची विस्तृत चर्चा जोशींनी केली. सरकारची शक्ती किती प्रचंड आहे ह्याची पूर्ण कल्पना त्यांना होती. ते म्हणतात,


शेतकरी संघटना : तत्त्वज्ञान आणि उभारणी. २४१



 "दोन लाख माणसं रस्त्यातून काढणं पोलिसांना अजिबात कठीण नाही. त्यांना त्याचं शिक्षण मिळालेलं असतं. ११ नोव्हेंबरच्या रात्री पोलिसांनी आग्रा रोडवरची दोन लाख माणसं अत्यंत कार्यक्षमतेनं रस्त्यातून बाजूला केली. त्यांनी दहा गाड्या हमालांच्या आणि दहा एसआरपींच्या रस्त्यातून फिरवल्या. दहा गाड्यांतून अडीचशे हमाल उतरायचे आणि रस्त्यावरचे दगड, झाडं जे काय असेल ते भराभर बाजूला करायचे. दुसऱ्या दहा गाड्यांतून तितकीच एसआरपींची माणसं खाली उतरायची आणि सत्याग्रहींच्यामधून फिरत, त्यांच्या डोक्यात काठी घालून त्यांना बाजूला करत. त्यांनी झोपलेल्या सत्याग्रहींनाही झोडपलं. सायकलींची, मोटारसायकलींची त्यांच्यावर मोठमोठे दगड घालून मोडतोड केली. अशा पद्धतीने ते सबंध रस्त्यात झोडपत झोडपत गेले. तेव्हा आपण रस्ता कायमचा अडवून ठेवू शकू ही कल्पना चुकीची आहे."
  म्हणूनच कुठल्याही प्रकारच्या हिंसेच्याविरुद्ध ते आपल्या कार्यकर्त्यांना सतत सावध करतात. ते म्हणतात,
 "चौरीचौराचं आंदोलन महात्मा गांधींनी मागे घेतलं होतं ते ह्याच भूमिकेतून. आपल्याला रजपूत राजांसारखं 'जय एकलिंगजी' म्हणत सगळं सैन्य खलास करायचं नाही, तर आपली ताकद सांभाळत गनिमी काव्याने लढायचं आहे. लोकांना उगाच भडकवून द्यायचं, दगड फेकायचे आणि त्याला आंदोलन म्हणायचं यावर माझा विश्वास नाही. सतत कुठल्या ना कुठल्या मुद्दयावर आंदोलन चालूच ठेवायचे, यालाही काही अर्थ नाही. आमचं आंदोलन म्हणजे काही सर्कस नाही, की दररोज चार वाजता तिचा खेळ झालाच पाहिजे!
 "आंदोलनात प्रत्येक वेळी अगदी जीव ओवाळून टाकायची आवश्यकता नसते. आंदोलन हे आपलं उद्दिष्ट नाही, ते आपलं साधन आहे. त्यामुळे आंदोलन चालू करण्यापूर्वी वाटाघाटी करण्याच्या सर्व शक्यता अजमावून पाहिल्या पाहिजेत. आपल्या आंदोलनतंत्राबद्दल स्वतः शेतकऱ्याची काहीच तक्रार नाही; पण त्या आंदोलनाचा फायदा घेऊन आग भडकवायला व तिच्यावर स्वतःची पोळी भाजून घ्यायला जे टपलेले असतात, त्यांचाच थयथयाट चालू असतो! आपलं आंदोलन हे आर्थिक आंदोलन आहे. ते पोटाच्या खळीतून निर्माण झालेलं आंदोलन आहे. आंदोलनात बळी पडलेल्या माणसांच्या घरी जाण्याचा ज्यांच्यावर प्रसंग आला आहे, त्यांच्यापैकी कुणीही कधीच म्हणणं शक्य नाही, की काय वाटेल ते झालं तरी चालेल, पण आंदोलन चालूच राहिलं पाहिजे. असं म्हणणं बेजबाबदारपणाचं होईल."
  म्हणूनच योग्य वेळी आंदोलन स्थगित करायला जोशींनी कधीच मागेपुढे पाहिले नाही. उदाहरणार्थ, २८ जून १९८२ रोजी सुरू झालेले दूध आंदोलन. नाशिक, पुणे, सातारा, सांगली, धुळे, जळगाव या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. निदान पन्नास टक्के शेतकऱ्यांनी सोसायट्यांना दूध घातले नाही. गावातच लोकांनी दुधाचा वापर केला; खवा, तूप वगैरे पदार्थ बनवले. मुंबईत जेव्हा दूध पुरवठा कमी पडू लागला, तेव्हा शासनाने परदेशातून मागवलेली दूध भुकटी आणि फॅट वापरून ती तूट भरून काढली.


२४२ = अंगारवाटा... शोध शरद जोशींचा गुजरातमधूनही जास्त दूध मागवले गेले. शेवटी आपला पराभव मान्य करून संघटनेने चौथ्या दिवशी दूध आंदोलन मागे घेतले. दूध-भात आंदोलनही असेच मागे घ्यावे लागले होते. स्वतःच्या प्रतिष्ठेपोटी शेतकऱ्यांना अडचणीत टाकण्याचा प्रकार जोशींनी कधीही केला नाही.

 शेतकरी संघटना उभी राहिली हा खरे तर एक चमत्कारच होता. कामगारांची संघटना उभारणे तुलनेने सोपे असते. कंपनीच्या मेन गेटवर उभे राहिले की सगळ्यांशीच संपर्क साधता येतो. सगळ्यांच्या यायच्या आणि जायच्या वेळा ठरलेल्या. कामाची जागा एकत्र, परस्परसंपर्क कायमच, कामाचे स्वरूपच असे की एकत्र येणे, संघटित होणे सोपे. सर्वांचा शत्रू समान - तो म्हणजे मालक आणि त्याचे व्यवस्थापन. शिक्षणाचे व समृद्धीचे प्रमाणही अधिक. कामगार संघटनांना इतिहासही मोठा, परंपराही रुळलेल्या.
 यांतला कुठलाच घटक शेतकऱ्यांना लागू पडणारा नव्हता. सगळेच अल्पशिक्षित, गरीब, विखुरलेले, एकमेकांपासून स्वभावतःच दुरावलेले. कुठल्याही गावात जा – हद्दीवरून दोन शेजाऱ्यांमध्ये भांडण नाही असे गाव सापडणे अवघड. जमिनीवरून अगदी सख्खे भाऊही एकमेकांच्या जिवावर उठलेले. सगळ्यांच्याच कोर्टात तारखा पडलेल्या. गावात अनेक गट, तट. जाती-धर्म यांचे भेद पूर्वापार चालत आलेले. कामाचे स्वरूपही एकत्र यायला पूरक नाही. प्रत्येक जण स्वतंत्र काम करणारा, स्वतंत्र शेती करणारा. अशा शेतकऱ्यांची कधी इतकी व्यापक अशी संघटना उभारता येईल हे कोणालाच शक्य कोटीतले वाटले नव्हते. एकवेळ कुत्र्याचे शेपूट सरळ होईल किंवा तळहातावर केस उगवतील, पण शेतकरी एकत्र येणार नाहीत असे अनेक राजकीय नेते व विचारवंत म्हणत. 'शेतकरी म्हणजे बटाट्याचे पोते – कितीही एकत्र आणले तरी जरा भोक पडताच सगळे बटाटे इकडेतिकडे विखरून जाणार,' हे कार्ल मार्क्सचे उद्गार अनुभवसिद्धच होते. अशाही परिस्थितीत एका विचारावर जोशींनी लाखो शेतकरी एकत्र आणले हे यश अभूतपूर्व आहे.
 आपल्या प्रयोगाच्या अनन्यसाधारणत्वाची जोशींनाही जाणीव होती आणि म्हणूनच कदाचित त्यांनी शेतकरी संघटनेला बांधीव असे घटनाबद्ध रूप द्यायचा कधी प्रयत्न केला नाही. संघटनेची पहिली कार्यकारिणीदेखील नाशिक येथे २७ मे १९८४ रोजी तयार झाली - म्हणजे संघटना स्थापन झाल्यावर पाच वर्षांनी. "खिशात हात घालील तो खजिनदार, लाठी खाईल तो कार्यकर्ता' हीच संघटनेची भूमिका होती. संघटनेची अधिवेशनेदेखील दर वर्षी भरत नसत; आंदोलनाच्या गरजेनुसार ती भरत. कुठल्याही प्रकारच्या घटनात्मक औपचारिकतेत जोशींना अडकून पडायचे नव्हते.
 संघटनेचे एकूण स्वरूप हे असे कायमच लवचीक होते. आपला हा विचार कालातीत नाही, उद्या शेतकरी स्वतःच्या पायावर उभे राहिले तर शेतकरी संघटनेची गरजही उरणार नाही असेही जोशी म्हणत. संघटनेची काहीही मालमत्ता कधीही नव्हती – इमारती नव्हत्या, मोटारी नव्हत्या, पगारी कर्मचारी नव्हते. आंबेठाणचा अंगारमळा आणि पुण्यातील जोशींचे राहते घर इथूनच संघटनेचा सगळा कारभार चालायचा. कुठल्याही कार्यक्रमाचा खर्च कमीत कमी कसा राहील ह्याची दक्षता घेतली जायची. अगदी लाखालाखाची सभा असली, तरी व्यासपीठ म्हणून एखादा उंचवटा बघायचा व त्यावर तात्पुरते स्टेज उभारायचे; बाकी शामियाना, सुसज्ज मांडव वगैरे प्रकार फारसा नसायचा. शेतकरी नेहमीच आपली भाकरी स्वतः बांधून आणायचे किंवा ज्या ठिकाणी कार्यक्रम असायचा तिथले स्थानिक लोक ती जबाबदारी घ्यायचे. त्यातूनही जो काही थोडाफार खर्च व्हायचा, तो कार्यकर्ते त्या-त्या वेळी आपापसांत पैसे गोळा करून भागवायचे.
 नेता बनण्यासाठी जोशींनी कधी पारंपरिक उपायांचाही अवलंब केला नाही. अन्य नेत्यांप्रमाणे त्यांनी कधीच खादीचा कुर्ता-पायजमा घातला नाही; आपली जीन आणि पांढरा मनिला किंवा टी-शर्ट हाच पोशाख कायम ठेवला. आपण खूप कार्यमग्न आहोत असा आभास निर्माण केला नाही; प्रतिमानिर्मिती केली नाही. त्यांच्या अवतीभवती पीए, शिपाई वगैरेंचे जाळे कधीच नसे. सर्व पत्रव्यवहार ते स्वहस्तेच करत; फोन स्वतःच करत व कोणाचा आला तरी स्वतःच रिसिव्हर उचलत. कुठल्याही कार्यकर्त्याला अगदी सहज भेटत. त्यामागे कुठचाही नाटकी आविर्भाव नसे. एवढेच नव्हे तर आपल्या कार्यकर्त्यांच्या घरच्या कार्याला वा मयताला आवर्जून हजर राहावे असा अट्टहासही त्यांनी कधी ठेवला नाही. अगदी आंदोलनात जखमी झालेल्या एखाद्या कार्यकर्त्यालाही बघायला ते ताबडतोब जातीलच असे नसायचे. म्हणजे शक्य तेव्हा ते जायचे, नाही असे नाही, पण इतर काही महत्त्वाचे काम निघाले, तर आज जनसंपर्कासाठी अत्यावश्यक मानल्या गेलेल्या असल्या औपचारिकतेला त्यांनी खूपदा फाटाही दिला. पण त्यांची शेतकरीहिताची कळकळ इतकी उघड असे, की त्यांच्याविषयी कोणाही कार्यकर्त्यांचे गैरसमज होत नसत.
 त्यांचे भाषणही कृत्रिम चढउतारांनी, घोषणाबाजीने रंगवलेले नसे. ते उगाचच ग्रामीण ढंग बोलण्यात आणत नसत; प्रमाणभाषाच वापरत. संथ, गंभीर आवाजात बोलत. ते नेहमीच उत्स्फूर्त बोलत. मुद्दे लिहिलेल्या कागदाचा किंवा अन्य कुठला आधार घेऊन त्यांनी कधीही भाषण केले नाही. पण त्यांचे बोलणे इतके मनापासूनचे असे, की ते शेतकऱ्यांच्या अंतःकरणाला थेट भिडत असे. विचारच इतके स्पष्ट, प्रभावी असत, की अन्य सजावटीची वा वक्तृत्वतंत्राची गरज भासत नसे. त्यांच्यावर जितके प्रेम शेतकऱ्यांनी केले तितके क्वचितच कधी कोणाला लाभले असेल.

 इथे एक गोष्ट स्पष्ट करायला हवी. शेतकऱ्याच्या व पर्यायाने एकूणच भारताच्या दारिद्र्याचे मूळ हे कोरडवाहू शेतीत आहे ह्याची जाणीव खरे तर स्वित्झर्लंडमध्ये असतानाच जोशींना झाली होती. मग भारतात येऊन तीन वर्षे प्रत्यक्ष शेती केल्यामुळे नेमके काय साध्य झाले?
 त्यातून बहुधा दोन महत्त्वाच्या गोष्टी साध्य झाल्या असाव्यात -
 पहिली म्हणजे, शेतीत भरपूर भांडवल गुंतवले, खते-औषधे वापरली, जिवापाड मेहनत घेतली तरीही भारतातली शेती किफायतशीर होत नाही हे त्यांना कळून चुकले. वैचारिक
पातळीवर त्यांना जे आकलन झाले होते, ते त्यांच्या स्वतःच्या मनात स्वानुभवातून अधिक खात्रीपूर्वक सिद्ध झाले. आपल्या विचारांवरची त्यांची निष्ठा त्यामुळे कमालीची दृढ झाली. कुठलाही विचारवंत, कुठलीही अन्य मांडणी आता त्यांच्या ह्या वैचारिक निष्ठेला धक्का पोचवू शकणार नव्हता. पुढील आयुष्यात त्यांना भेटणाऱ्या अनेकांना त्यांचा हा विचारांचा ठामपणा - जो काही जणांना अहंकार वाटत असे तो - प्रकर्षाने जाणवत असे.
 दुसरी गोष्ट म्हणजे, प्रत्यक्ष शेतकऱ्याशी आता ते पूर्णतः समरस होऊ शकत होते; कारण अनुभवाच्या ह्या समान धाग्याने आता त्यांना शेतकऱ्यांशी जोडले होते. अन्य अर्थतज्ज्ञ आणि शरद जोशी ह्यांच्यातील हा एक फार महत्त्वाचा फरक होता. त्यांचे आकलन आता केवळ मेंदूच्या पातळीवर नव्हते; शेतात स्वतः गाळलेला घाम, चिखलात स्वतः बरबटून घेतलेले हात, आकाशाकडे डोळे लावून स्वतः केलेली पावसाची प्रतीक्षा, बाजारपेठेत आपल्या मालाला किती भाव मिळेल ह्याची रात्रंदिवस स्वतः वाहिलेली काळजी ह्या सगळ्याची आता ह्या आकलनाला जोड मिळाली होती. शेतकऱ्याबरोबर साधलेल्या ह्या भावनिक ऐक्यामुळेच हा ऐषारामात जगलेला विचारवंत एकाएकी तापलेल्या रस्त्यावर बसून रस्ता रोको करू शकला, शेतकऱ्यांना अधिक भाव मिळावा म्हणून उपोषण करू शकला, असंख्य अडचणी सहन करत खेडोपाडी भाषणे देत फिरू शकला, मानसन्मान, प्रसिद्धी, कीर्ती, पैसा लाभेल की नाही ह्या सगळ्याचा विचारही त्या रणरणत्या उन्हात पायपीट करताना, रस्त्यावर मांडी ठोकून बसताना त्यांच्या मनाला शिवला नाही. त्यामुळेच जन्माने ब्राह्मण असलेला, शिक्षणाने अर्थतज्ज्ञ असलेला, कर्माने उच्च नोकरशहा असलेला, वृत्तीने विचारवंत असलेला आणि घराण्यात शेतीची काहीही पार्श्वभूमी नसलेला हा माणूस लक्षावधी शेतकऱ्यांचे पंचप्राण बनू शकला.

 शेतकरी संघटनेने आपला कार्यक्रम फक्त एक-कलमी ठेवला - शेतीमालाला उत्पादनखर्च भरून निघेल असा रास्त भाव मिळवणे. शासनाकडे ते रास्त भावाची मागणी करतात तीदेखील आज तो शेतकरी अगदी खचला आहे, शक्तिहीन झाला आहे, पराधीन बनला आहे म्हणून; आणि मुख्य म्हणजे त्याचा सर्व शेतीव्यवसाय सरकारच्याच नियंत्रणाखाली आहे म्हणून. मरणोन्मुख रुग्णाला सलाइनवर ठेवावे तसाच हमीभाव हा तात्पुरता उपाय आहे. अंतिमत: त्यांना हवे आहे ते घामाचे रास्त दाम. अनुदान, करुणा यांवर त्यांचा विश्वास नाही. त्यांची खात्री आहे की एकदा हा शेतकरी स्वतःच्या पायावर उभा राहिला, की मग त्याला कुठल्याही कुबड्यांची गरज पडणार नाही. आपला हा मुद्दा जोशींनी अनेकदा मांडला आहे.
 समाजापुढे तसे असंख्य प्रश्न असतात – बेरोजगारी, प्रदूषण, निरक्षरता, अंधश्रद्धा, भ्रष्टाचार इत्यादी; पण आपण सध्या ह्या एकाच मुद्द्यावर लक्ष केंद्रित करायला हवे, कारण एकदा आपण तो भाव मिळवला, की मग त्यातून येणाऱ्या समृद्धीमुळे आपले अनेक इतर प्रश्न सुटणार आहेत, असे त्यांचे स्पष्ट मत आहे. ते म्हणतात,  "हे शेतीतले दारिद्र्य जोपर्यंत हटत नाही, तोपर्यंत इतर समस्यांबद्दल तुम्ही ओरडत राहिलात, तर तुम्ही तुमची ताकद फुकट दवडता. देशाच्या शरीरातलं सगळं रक्त बिघडलं आहे. त्यामुळे अंगभर फोड आलेत. एकेका फोडाला मलमपट्टी करत बसून उपयोग नाही. त्यानं जरा बरं वाटेल, पण एक फोड बरा होतो असं वाटतं, तोवर नवीन पाच फोड निर्माण होतात. तेव्हा तात्पुरत्या मलमपट्यांऐवजी रक्तदोषान्तकच घ्यायला हवं. त्याचप्रमाणे अन्याय, दुःख यांचं निवारण करायचं असेल, तर त्याचं मूळ कारण दारिद्र्य आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि ते हटवायचं असेल, तर इतर कोणतेतरी उपाय योजण्याऐवजी शेतीमालाचा उत्पादनखर्च शास्त्रशुद्ध पद्धतीने काढून त्याप्रमाणे शेतीमालाला रास्त भाव दिले गेले पाहिजेत."
 शेतीमालाला उचित दाम मिळाला, की शेतकऱ्याचे दारिद्र्य दूर होईल व देशातील ७० टक्के जनता शेतीवर अवलंबून असल्याने, त्याचे दारिद्र्य दूर होणे म्हणजेच एकूण देशाचे दारिद्र्य दूर होणे, हा त्यांचा ठाम विश्वास आहे. हा मुद्दा त्यांनी वेळोवेळी विस्ताराने मांडला आहे.
 शेतकऱ्याच्या हातात थोडाफार पैसा येऊ लागला, की तो आपली शेती सुधारू शकेल, विहीर खणू शकेल, बांधबंदिस्ती सुधारू शकेल. अधिक चांगले बियाणे वापरून अधिक विक्रीयोग्य उत्पन्न काढू शकेल. ट्रॅक्टर, ड्रिप, जर्सी गाई, अधिक मोठी शेती खरेदी करू शकेल. अतिरिक्त पैसे भांडवल म्हणून गुंतवून त्याला किंवा त्याच्या मुलाला शेतीव्यतिरिक्त असा काही ना काही उद्योग सुरू करता येईल. कोणी पिठाची गिरणी काढेल, कोणी खारवलेले शेंगदाणे बनवेल, कोणी मिरच्यांची भुकटी करून विकेल; एक ना दोन, अक्षरशः हजारो छोटे छोटे उद्योग सुरू होऊ शकतील. त्यातून ग्रामीण भागात रोजगार निर्माण होतील, दुकानदारी वाढेल. शहरांवरचे ताण कमी होतील, कारण पोटासाठी स्थलांतर करायची तितकी आवश्यकता राहणार नाही. शेतकऱ्यांना ऐपत आली, की आपोआपच गावातही चांगल्या शाळा, चांगले दवाखाने, चांगली करमणुकीची साधने निघतील. ग्रामपंचायतींचे उत्पन्न वाढले, तर गावातले रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज वगैरे सगळे सुधारता येईल.
 ग्रामीण भागात वाढती क्रयशक्ती आली, की एकूण बाजारपेठेचा विस्तार झाल्याने कारखान्यांत बनलेल्या मालाचा खपही वाढेल. 'इकॉनॉमी ऑफ स्केल'मुळे वस्तूंची किंमतही आपोआप कमी होईल. देशातील सध्याच्या दुय्यम प्रतीच्या हाय-कॉस्ट अर्थव्यवस्थऐवजी उच्च प्रतीची लो-कॉस्ट अर्थव्यवस्था आकाराला येईल. आपली स्पर्धात्मकता वाढल्याने आपला आंतरराष्ट्रीय व्यापारही वाढेल. एकूणच साऱ्या ग्राहकांना कमी दरात अधिक चांगला व अधिक नावीन्यपूर्ण, वैविध्यपूर्ण माल मिळू शकेल.

 स्वित्झर्लंडमध्ये असताना ग्रामीण उद्योगधंदे कसे उभे राहिले आणि त्यातून एकूण देशाच्या विकासाला कशी चालना मिळाली, हे त्यांनी बघितले होते. जपानसारख्या अनेक देशांतही हे घडल्याचे त्यांना ठाऊक होते. म्हणूनच हे भारतातही होऊ शकते ह्याची त्यांना खात्री होती.

 मुख्य म्हणजे शेतीतील समृद्धीतून शेतकऱ्याच्या श्रमाला मोल प्राप्त होईल. जोशी म्हणतात,
 "आज शेतकऱ्याचा सहा वर्षांचा मुलगा सकाळी उठून शेण गोळा करायला जातो, पण त्याच्या श्रमाचे काही मूल्य धरले जात नाही. शेतकऱ्याच्या घरातील पोक आलेली सत्तरऐंशी वर्षांची म्हातारी खुरपे घेऊन शेतात काम करते. कारण तिच्या मनामध्ये धाक आहे, की आपला पोरगा इतका काही परिस्थितीने गांजून गेलाय, की कदाचित चिडून एक दिवस म्हणायचा, 'म्हातारे, तू मरतसुद्धा नाहीस – फुकट खात्येस!' पण तिच्या शेतातल्या त्या कष्टाला आज काहीच मोबदला नाही."
 ही सारी परिस्थिती शेतीमालाला उचित भाव मिळू लागला की पालटेल. शेतकऱ्याच्या श्रमाला किंमत व प्रतिष्ठा प्राप्त होईल. येणारी समृद्धी म्हणजे एक प्रचंड आर्थिक व सामाजिक क्रांतीच असेल.
 शेतकरी संघटनेचे तत्त्वज्ञान म्हणजे इतर बहुसंख्य संघटनांप्रमाणे इकडून तिकडून गोळा केलेल्या विविध मुद्द्यांची गोळाबेरीज नव्हती, अनेक चिंध्या एकत्र करून बांधलेले ते गाठोडे नव्हते. हा विचार म्हणजे एका धाम्याने विणलेले एकजिनसी महावस्त्र आहे, असे जोशी म्हणत. तो एक धागा होता 'शेतीमालाला रास्त भाव' हा एक-कलमी कार्यक्रम. अंतिमतः हा कार्यक्रम सर्वच जीवनक्षेत्रांना व्यापणारा आहे ह्याची पूर्ण खात्री असल्यामुळेच जोशी त्या काळात अन्य कुठल्याच उपक्रमात इच्छा असूनही सहभागी झाले नाहीत. अंधश्रद्धर्निर्मूलन व विज्ञानप्रसार यांसाठी एक यात्रा महाराष्ट्रात काढली गेली होती व त्यात जोशींनी सामील व्हावे अशी विनंती त्यांना भोसरी तेथील विज्ञान यात्रा समितीने केली होती. त्यांना नकार कळवणाऱ्या आपल्या १ ऑक्टोबर १९८२च्या पत्रात ती भूमिका नेमकी प्रकट झाली आहे. त्यात जोशी लिहितात-

शेतकऱ्यांविषयी बोलायचे झाले, तर त्यांच्या सर्व श्रद्धा शेतीच्या परिस्थितीवर अवलंबून आहेत. पावसाच्या अनिश्चिततेमुळे विज्ञाननिष्ठा अंगी बाणूच शकत नाही. शेतातील पीक आणि परिणामी कच्च्याबच्च्यांचे जीवन पावसाच्या पडण्या न पडण्यावर अवलंबून आहे, या जाणिवेने शेतीचा जुगार सतत खेळणारा शेतकरी विज्ञाननिष्ठा बुद्धीला पटली, तरी मनाला पटू देणार नाही. आधुनिक औषधोपचार जवळपास उपलब्ध नाही, असला तरी परवडत नाही. म्हणून जवळ असेल त्या वैदूभोंदूंचे औषधपाणी करावे लागते. आपल्या प्रियजनांना उत्तमातील उत्तम औषधपाणी करणे आपल्याला जमले नाही, ही मनाला घरे पाडणारी जाणीव विसरण्यासाठी वैदूभोंदूंच्या प्रभावाच्या कथा रचाव्या लागतात आणि स्वतःही त्यावर विश्वास ठेवाव लागतो. निसर्गाच्या लहरीपणामुळे होणाऱ्या पीकबुडीपासून शेतकऱ्याला संरक्षण मिळेल, म्हणजे वास्तविक उत्पादनखर्च भरून निघण्याची शाश्वती मिळेल, त्या दिवशी या प्रचंड ताकदीला विज्ञाननिष्ठा शिकण्याची गरजच राहणार नाही. लोकभ्रम, अंधश्रद्धा, वैदू-भोंदू तर दूर होतीलच; पण आजच्या सुशिक्षितांच्या शहरी मनाला प्रिय

असलेले योग, कुंडलिनी, साक्षात्कार, गीता, अनेक नामवंत तत्त्वज्ञ आणि संत यांनाही त्याचा झटका बसल्याशिवाय राहणार नाही.

 देशापुढील समस्या मूलतः नैतिक आहेत, असेही जोशींना अजिबात वाटत नाही. किंबहुना, तशा भूमिकेचा त्यांनी प्रथमपासून उपहासच केला आहे. सामाजिक क्षेत्रातील अन्य व्यक्तींपेक्षा जोशींचे ते एक वेगळेपण आहे. शेतकरी संघटनेच्या तत्त्वज्ञानामध्ये 'शेतकरी संघटनेचे नैतिक दर्शन' यावर सुरुवातीपासूनच जोशींनी भर दिला आहे. अन्य कुठल्या संघटनेने नैतिकतेच्या मुद्द्यावर इतका भर दिल्याचे व मुख्य म्हणजे त्याचवेळी नैतिकतेचे महत्त्व कमी लेखल्याचे सहसा आढळणार नाही. ह्यात एक मोठाच अंतर्विरोध आहे हेही जाणवते. जोशींची भूमिका साधारण पुढीलप्रमाणे आहे :

स्वार्थाचा त्याग करून दुसऱ्याचे भले करण्यात काही एक मोठेपण आहे असे बहुतेक काळात मानले गेले आहे. स्वार्थ ही सहजप्रवृत्ती आहे, तर स्वार्थ सोडून देण्याकडे सर्व महापुरुषांची शिकवण. जे दुर्लभ त्याची किंमत जास्त, या मागणी- पुरवठ्याच्या अर्थशास्त्रीय सिद्धांतानुसार परहितरत वर्तणुकीला अलोट महत्त्व मिळाले असावे.

एकेकाळी मुंबईतील माणसे बसच्या रांगेची शिस्त कटाक्षाने पाळत. एका बसमध्ये जागा मिळाली नाही तर शांतपणे दुसरी बस येण्याची वाट पाहत थांबत. त्या काळी दिल्लीकर बस पकडताना पराकोटीची बेशिस्त आणि हुल्लड दाखवत असे. याचा अर्थ दिल्लीवाले कमी नीतिमान आहेत असा नाही. मुंबईच्या व्यवस्थेत एक बस गेली तरी दुसरी, ती नाही तरी त्या पुढची बस मिळण्याची जवळजवळ खात्री वाटत असे. दिल्लीत तर तशी आशाही नसे. यामुळे दोघांच्या वर्तणुकीत फरक पडतो.

प्रचंड दुःख आणि यातना सोसून केवळ दुसऱ्याच्या भल्याकरिता मी हे दिव्य करीत आहे असे कोणी म्हटले, की माझ्या मनात भीतीच्या घंटा वाजू लागतात. असे वाटते, की या बोकेसंन्याशाच्या मनात काही क्षुद्र स्वार्थ आहे, ते तो धूर्तपणे लपवत आहे. मी हे माझ्या आनंदाकरिता करतो आहे, स्वार्थाकरिता करतो आहे, हे सांगण्यात कोणाला शरम का वाटावी? परार्थाची साखर पेरणारा क्षुद्र स्वार्थ साधतो. त्यापेक्षा स्वार्थी बना. जितक्या व्यापक अर्थांनी, जितक्या मार्गांनी आयुष्य परिपूर्ण करता येईल तितके करा. दुसऱ्याचे हक्क लाथाडू नका, परार्थ म्हणून नव्हे, निव्वळ स्वतःच्या आयुष्याची परिपूर्णता कमी होऊ नये म्हणून, अशी शिकवण ठीक. हीच खरीखुरी नैतिकता होईल.

शेतकरी संघटना भविष्यातील आदर्श समाजाचे काहीच स्वप्न देत नाही; स्वातंत्र्याच्या कक्षा रुंदावणे हा मार्ग सांगते, पण या कक्षा रुंदावत पोचायचे कुठे हेही सांगत नाही. नैतिकता ही कोणत्याही एका विवक्षित व्यवस्थेत नाही, ती

मार्गक्रमणात आहे, असे मानल्यानंतर आदर्शभूत समाज ही कल्पनाच अर्थहीनहोते. प्रत्येक छायाचित्राचा एक केंद्रबिंदू असतो. त्या बिंदूत प्रतिमा स्वच्छ आणि स्पष्ट असते. त्या बिंदूपासून जितके दूर जावे, तितकी प्रतिमेची गुणवत्ता कमी होत जाते. प्रत्येक छोट्या-मोठ्या विचारवंताच्या विचारपद्धतीचेही असेच असते. काही केंद्रबिंदूत त्यांना त्यांच्या काळाला व परिस्थितीला अनुरूप असा साक्षात्कार होतो. बुद्धिनिष्ठ सचोटी राखन आपला विचार तेवढ्यापुरताच मर्यादित ठेवावा हे आजपर्यंत थोराथोरांना जमलेले नाही. आपल्याला गवसलेल्या सत्यकणांच्या आधारे विश्वव्यापी पसाऱ्याला गवसणी घालण्याच्या मोहाला मोठे-मोठे बळी पडले आहेत. विश्वाला गवसणी घालण्याच्या प्रयत्नात त्यांनी स्वतःच्या पराभवाचा पाया घातला.

शेतकरी संघटनेची विचारपद्धती ही बुद्धिवादी, तर्ककठोर आहे. औद्योगिक व्यवस्थेच्या आर्थिक, सामाजिक समस्यांमुळे विकासाच्या, स्वातंत्र्याच्या कक्षा रुंदावण्याचा मार्ग कुंठित झाला किंवा कसे, आता पुन्हा एकदा तोंड फिरवून उलटी वाटचाल करणे अपरिहार्य आहे किंवा कसे, या चिंतेने त्रासलेल्या मनुष्यजातीला निदान आर्थिक अडथळ्यातून सोडवण्याचा मार्ग संघटनेने दाखवला आहे. ऊर्जा, नैसर्गिक साधनसंपत्ती यांच्या तटवड्याचे प्रश्न मनुष्य आपल्या दुर्दम्य बुद्धिसामर्थ्यावर यथावकाश सोडवेल. अगदी सूर्य कोसळायला आला तर त्याच्या जागी मनुष्यनिर्मित सूर्य ठेवण्याचीही त्याची झेप आहे.

(प्रचलित अर्थव्यवस्थेवर नवा प्रकाश – भाग दुसरा, पृष्ठ ४१-८)

ह्याच विचारसरणीत जोशींचा सामाजिक कार्याला असलेला विरोधही बीजरूपात दिसतो. त्यामुळेच सामाजिक कार्यावर त्यांनी प्रखर टीका केली आहे. ते लिहितात-

आजवरच्या सामाजिक इतिहासाचा आढावा घेतला तर आपल्या लक्षात येईल, की ज्या प्रकारचा विकास या कार्यातुन घडायला हवा, त्या प्रकारचा विकास या कार्यातून कधीही साधला जाणे शक्य नाही. विकासामागच्या प्रेरणा या अगदी वेगळ्या असतात. या देशातील जे स्वयंस्फर्त कार्य गेल्या वीस-पंचवीस वर्षांत मी बघितले, त्यावरून माझे अशा कार्याविषयीचे मत प्रतिकूल बनले आहे. कार्यकर्त्यांचा छुपा पण प्रखर अहंकार, त्यांची ढोंगबाजी, त्यांची नाटके, सेवेच्या बुरख्याखाली स्वतःची सोय पाहत राहणे, त्यांच्यातील हेवेदावे, त्यांच्यातील व्यासंगाचा अभाव, मूळ प्रश्न टाळून उगाचच काहीतरी छोटेसे पॅचवर्क स्वरूपाचे काम करीत राहण्याची आत्ममग्न प्रवृत्ती. हे सगळे विचारात घेता अशा स्वरूपाच्या कामाची समाजाला काहीही आवश्यकता नाही, असे माझे स्पष्ट मत आहे. मी एक पराकोटीचा व्यक्तिवादी, individualistic माणूस आहे. व्यक्ती हेच विचाराचे

केंद्र आहे. समाजाचे केंद्र आहे. निर्मितीचे केंद्र आहे. व्यक्तीची काळजी घेतली तर समाजाची काळजी घ्यायची काहीही आवश्यकता नाही.

(समाजसेवेची दुकानदारी नको!, अंतर्नाद, फेब्रुवारी २००७)

 'भीक नको, हवे घामाचे दाम' हा संदेश जोशी आपल्या कार्यकर्त्यांना देतात. त्यांना विचार कसा करायचा ते शिकवतात. हिंसक बनू नका म्हणतानाच निर्भय बनायला सांगतात. स्वातंत्र्य हेच आपले अंतिम उद्दिष्ट आहे व दारिद्र्य दूर करायचे आहे, ते ह्या दारिद्र्यामुळे स्वातंत्र्याचा अतिशय संकोच होतो म्हणून, ह्याविषयी त्यांच्या मनात जराही संदेह नाही. स्वाभिमान, स्वातंत्र्य, बुद्धिनिष्ठा हे त्यांचे परवलीचे शब्द आहेत. हे त्यांचे विचार शेतकऱ्यांना सहजगत्या समजले, त्याच्या अंतःकरणाला भिडले. दबलेला, पिचलेला शेतकरी ताठ मानेने उभा राहिला तो त्यामुळेच.
 निपाणीला एका तंबाखू शेतकऱ्यांच्या सभेत ते म्हणाले होते,
 "तुमची भाकरीची अडचण आम्ही कुठूनही ज्वारी आणून भागवू शकतो; पण एक गोष्ट आम्ही देऊ शकत नाही. ती म्हणजे हिंमत. ती तुमची तुम्हालाच कमवायला पाहिजे. हिंमत असल्याखेरीज तुम्हाला किंमत मिळणार नाही. तंबाखूचं पीक काढताना त्याबरोबर एकेक हिमतीचं झाड लावता येत नाही. ती आपली आपणच तयार करायला हवी."
 आपल्या कार्यकर्त्यांमध्ये असे हिमतीचे झाड लावणारी शिबिरे वर्धा आणि अंबाजोगाईनंतरही अनेक ठिकाणी शेतकरी संघटनेने घेतली. आंबेठाण येथे ज्या जागी पूर्वी लीलाताईंची पोल्ट्री होती. त्याच जागी पुढे ही प्रशिक्षण शिबिरे भरू लागली. खरे म्हणजे, आंदोलने करताकरताच कार्यकर्ते शिकतही होते; शेतकरी संघटना हे जणू एक विद्यापीठच होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांनी अगदी सुरुवातीला केलेली वैचारिक मांडणी इतकी मूलगामी होती, की पुढली अनेक वर्षे तिच्यात फारसा काही बदल करायची आवश्यकताच जाणवली नाही. आपले विचार कालातीत नाहीत, असे जोशी म्हणाले असले, तरीही ते विचार काळाच्या कसोटीवर प्रदीर्घ काळासाठी महत्त्वाचे ठरले. त्यातून पक्की झालेली कार्यकर्त्यांची मूलभूत वैचारिक बैठक हे संघटनेचे मोठे सामर्थ्य बनले.
 काळाच्या ओघात अनेक कार्यकर्ते वेगवेगळ्या व्यक्तिगत कारणांसाठी जोशींची साथ सोडून अन्यत्र कुठे-कुठे गेले, पण तरीही ती मूळची वैचारिक बैठक सोडायची आवश्यकता त्यांना कधी भासली नाही. त्या काळातील किंवा नंतरच्या इतर अनेक आंदोलनांत सामील झालेल्या कार्यकर्त्यांना अशी दीर्घ काळासाठीची वैचारिक बैठक लाभली नाही.
 आंदोलनात उतरणारे लक्षावधी शेतकरी हे शेतकरी संघटनेचे दृश्य वैभव होते; भक्कम विचार हा तिचा पाया होता.




१०



अटकेपार


 २५ नोव्हेंबर २०१४. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व भारताचे पाचवे उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांची तिसावी पुण्यतिथी. संध्याकाळी सहाची वेळ.
 मुंबईतल्या नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानाचे सभागृह श्रोत्यांनी तुडुंब भरले होते. त्या समारंभात शरद जोशी यांना शरद पवार यांच्या हस्ते मानाचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार दिला गेला. श्री. पवार मे २००४ ते मे २०१४ अशी सलग दहा वर्षे केंद्रात कृषिमंत्री होते. त्या पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतरची एक आठवण सांगताना ते म्हणाले,

कृषिमंत्री म्हणून पंजाबमध्ये गेल्यानंतर ठिकठिकाणी माझं स्वागत व्हायचं. आणि मला आठवतंय, की अनेक ठिकाणी शेतकरी मेळाव्यात गेल्यानंतर स्वागत करणारा वक्ता 'आज के मेहमान शरद जोशी' असं म्हणूनच माझं स्वागत करायचा! नंतर स्वतःची चूक त्याच्या लक्षात आल्यानंतर, 'नही, नही, शरद पवार' असं तो म्हणायचा! याचा अर्थ पंजाबमधल्या त्या कष्टकरी शेतकऱ्यांमध्ये ज्यांनी महत्त्वाची कामगिरी केली, त्या शरद जोशींचं नाव तिथल्या घराघरामध्ये पोचलं होतं. हे मी पंजाबात अनेकदा पाहिलंय.

(राष्ट्रवादी, डिसेंबर २०१४, पृष्ठ ५३)

 त्या कार्यक्रमात प्रस्तुत लेखक मंचावर हजर होता व पवार यांचे हे उद्गार ऐकल्यावर सर्व श्रोत्यांप्रमाणे जोशी यांच्याही चेहऱ्यावर विलसणारे हास्य आणि आनंद यांचे मिश्रण बघताना 'आज इतक्या वर्षांनी का होईना, पण जोशींच्या पंजाबमधील महत्त्वाच्या कार्याची महाराष्ट्रात दखल घेतली जात आहे हे जाणवून डोळे पाणावत होते. अर्थात जोशींचा हा जवळजवळ शेवटचाच मोठा असा जाहीर कार्यक्रम असेल याची त्यावेळी कोणालाच कल्पनाही नव्हती.

 अखंड पंजाबचे भारतातील ऐतिहासिक स्थान एकमेवाद्वितीय असेच आहे. सीमेवरचा प्रांत असल्याने परकीयांची आक्रमणे पंजाबने सततच झेलली आहेत. 'मार्शल रेस' म्हणता येईल तसे इथले लोक. शरीराने भरभक्कम आणि वृत्तीनेही आक्रमक. बहुतेक शीख कुटुंबांत एक मुलगा शेतीत तर दुसरा लष्करात ही परंपरा. 'जय जवान, जय किसान' घोषणा देताना
तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री ह्यांच्या डोळ्यांपुढे कदाचित पंजाबच असू शकेल. इथली माणसे कष्टाळू, स्वतःच्या पायावर उभी राहणारी. गुरुबाणी ऐकण्याइतकीच भांगडा करण्यातही रमणारी. 'माझ्या रक्ताने ही सगळी भूमी न्हाऊन निघू दे' असा आशय व्यक्त करणारे 'मेरा रंग दे बसंती चोला' हे भगतसिंगांचे गीत इथले सर्वाधिक लोकप्रिय गीत.
 आपल्या महाराष्ट्राशी शिखांचे नाते विशेष सौहार्दाचे आहे. त्यांचे दहावे व शेवटचे गुरू गोबिंदसिंग ह्यांच्या समाधीमुळे नांदेडला शीख तीर्थक्षेत्रच मानतात. अमृतसरहून येणारी सचखंड एक्स्प्रेस नांदेडला पोचते किंवा तिथून सुटते, तेव्हा गाडीतील व प्लॅटफॉर्मवरील सगळ्यांनाच रुचकर असा तुपाळ मुगाच्या हलव्याचा प्रसाद आवर्जून दिला जातो; कधीकधी संपूर्ण जेवणही दिले जाते.
 इथली शेतीही खूप महत्त्वाची. दुथडी भरून वाहणाऱ्या झेलम, सतलज, रावी, चिनाब आणि बियास ह्या पाच नद्यांवरून ह्या प्रांताला पंजाब हे नाव पडले. त्यांच्या वर्षानुवर्षे वाहून आलेल्या गाळामुळे सुपीक बनलेली इथली भूमी. हवामान अनुकूल, पाणीही भरपूर. डोंगराळ भाग जवळपास नाहीच, सगळी भूमी सपाट व शेतीयोग्य. ट्रॅक्टरसारख्या अनेक आधुनिक अवजारांचा शेतीत सर्रास वापर. त्यामुळे सुजल सुफल बनलेला हा प्रदेश. भारताचे धान्याचे कोठार' हा लौकिक सार्थ ठरवणारी इथली शेती.
 दुर्दैवाने फाळणी झाली त्यावेळी बहुतेक कालवे पश्चिम पंजाबात होते व ते पाकिस्तानात समाविष्ट झाले. त्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळात इथे बरीचशी शेती पाण्याअभावी उजाड झाली होती. पण पुढे भाक्रा-नांगल धरणाने इथली शेती पुन्हा एकदा बहरली. जमिनीत झिरपणाऱ्या मुबलक पाण्यामुळे कूपनलिका कोपऱ्याकोपऱ्यात खणल्या गेल्या. सत्तर टक्के शेतजमीन पाण्याखाली आली. इथल्या शेतकऱ्याने नवे तंत्रज्ञान अहमहमिकेने स्वीकारले. गव्हाप्रमाणे इथला बासमती तांदूळही जगभर जाऊन पोचला. सर्वच शेतकरी वर्षातून दोन पिके घेत - एक गव्हाचे, दुसरे भाताचे. साठ व सत्तरच्या दशकात झालेल्या हरितक्रांतीची फळे देशात सर्वाधिक इथेच पाहायला मिळत. आजदेखील संपूर्ण देशातून केंद्र सरकारच्या कोठारात जेवढा गहू जमा होतो, त्यापैकी सत्तर टक्के गहू हा एकट्या पंजाबातून जमा होतो. शेतीतील समृद्धीतूनच जालंदर, लुधियाना यांसारख्या शहरांत असंख्य छोटे-मोठे उद्योगधंदे उभे राहिले. बघता बघता पंजाब पुन्हा एकदा समृद्ध बनला. ज्याला शेतीच्या संदर्भात भारतात काही काम करायचे आहे, तो पंजाबकडे दुर्लक्ष करूच शकणार नाही.
 पण पंजाब अखंड होता त्या काळापासूनच इथल्या शेतकऱ्यांना नेहमीच कर्ज काढावे लागे; पिके चांगली आली तरीही. अशी विचित्र परिस्थिती नेमकी कशामुळे येते त्याची शास्त्रशुद्ध कारणमीमांसा त्यावेळी फारशी कोणाला करता आली नाही तरी तिची झळ मात्र सर्वच शेतकऱ्यांना पोचत असे.
 शेतकऱ्यांची स्थिती सुधारली पाहिजे, ह्याची मागील शतकात पहिली जाणीव अखंड पंजाब प्रांतातील सर छोटूराम ह्या जाट नेत्यांना झाली. ते स्वतः मोठे शेतकरी होते. शासनदरबारी त्यांना फार मान होता. 'अजगर' ह्या काहीशा विचित्र नावाची एक संघटना त्यांनी
स्थापन केली. अहिर, जाट, गुजर आणि रजपूत ह्या शेती करणाऱ्या तत्कालीन अखंड पंजाबातील चार जमाती त्यांच्या डोळ्यांपुढे होत्या व त्यांची आद्याक्षरे एकत्र करून 'अजगर' नाव बनले होते. त्या मूळ संघटनेचा अधिक विस्तार करत पुढे त्यांनी 'जमीनदारा खेतीबाडी युनियन' स्थापन केली. ही घटना साधारण १९२५ सालची. शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा थोडा सुसह्य व्हावा म्हणून छोटूरामनी त्यावेळी पंजाब विधिमंडळात एक बिल आणले होते. ते असे होते, 'शेती उत्तम पिकत असूनही शेतकरी कर्जात बुडतो आहे. त्यामुळे सावकार जप्ती आणून त्यांच्या जमिनी काढून घेत आहेत. अशा प्रकारे सावकारांनी जमिनीवर जप्ती आणू नये म्हणून त्याविरुद्ध सरकारने कायदा करावा.' तत्कालीन काँग्रेस सरकारने ह्या बिलाला कडाडून विरोध केला होता. काँग्रेसचे म्हणणे असे होते, की 'सावकारांनी जमिनी जप्त केल्या नाहीत, तर त्यांना धंदा बंद करावा लागेल व तसे झाले तर अडचणीच्या वेळी शेतकऱ्यांना कर्ज कसे मिळणार?' गव्हाला अधिक भाव मिळावा म्हणूनही छोटूराम सतत प्रयत्न करत असत. 'इतकाइतका भाव दिल्याशिवाय आम्ही गहू विकणार नाही असे त्यांनी एकदा ब्रिटिश गव्हर्नरलादेखील सुनावले होते. हिंदू, मुसलमान व शीख ह्या तिन्ही धर्मांचे शेतकरी छोटूरामना अगदी देवासमान मानत. सर छोटूराम १९४६ साली वारले; पण त्यांची युनियन इतकी ताकदवान होती, की १९४६ सालापर्यंत मुस्लिम लीगचे प्रमुख महमद अली जिनांना त्या प्रांतात पाऊलसद्धा ठेवता आले नाही. धार्मिक भेदांच्या पलीकडे जाऊन निखळ आर्थिक प्रश्नावर शेतकऱ्यांना एका राजकारणविरहित झेंड्याखाली एकत्र आणणारा नेता म्हणून सर छोटूराम ह्यांच्याविषयी जोशींना खूप आदर होता.

 शरद जोशी यांचे पंजाबमधील सर्वांत जवळचे सहकारी सरदार भूपिंदर सिंग मान यांच्याविषयी इथे लिहायला हवे. भारती किसान युनियन (बीकेयु) या पंजाबातील सर्वांत मोठ्या शेतकरी संघटनेचे १९८० सालापासून ते सदस्यांनी निवडून दिलेले अध्यक्ष आहेत. यातील 'भारती' शब्द पंजाबी नावात आहे; अन्यत्र बऱ्याचदा त्याऐवजी 'भारतीय' हा शब्द वापरला आहे. मान यांची व प्रस्तुत लेखकाची पहिली भेट ३० जुलै २०१२ रोजी बुंदेलखंडातील बांदा ह्या गावी किसान को-ऑर्डिनेशन कमिटी (केसीसी)च्या एका बैठकीच्या वेळी झाली होती. जोशींच्या आमंत्रणावरून तिथे त्यांच्याबरोबर गेलो होतो. त्यावेळी मान यांच्याबरोबर थोड्याफार गप्पा झाल्या होत्या, पण त्या पुरेशा नव्हत्या. तो योग आमच्या पुढील भेटीत आला. ८ मार्च २०१६ रोजी चंडीगढ येथील त्यांच्या घरात. शरद जोशींच्या चळवळीतील पंजाबपर्व समजून घेण्यासाठी तिथे गेलो असताना. पुढे त्यांच्याबरोबर केलेल्या मुक्कामात व बटाला, अमृतसर, वाघा इथे त्यांच्यासमवेत केलेल्या प्रवासात.
मान यांचा जन्म १५ सप्टेंबर १९३९चा. उंच शिडशिडीत शरीरयष्टी व झपाझप चालणे यामुळे त्यांच्या वयाचा पटकन अंदाज येत नाही. ते सांगत होते,  "माझं जन्मगाव आता पाकिस्तानात आहे. घरची खूप मोठी शेतीवाडी होती, संपन्न घरदार होतं. वडील अकालीच वारले. मी एकुलता एक मुलगा. दोन बहिणी. फाळणीनंतर आम्ही निर्वासित म्हणून इथे आलो. अगदी नेसत्या कपड्यानिशी. तेव्हाच्या जखमा भरून निघायला बरीच वर्षं लागली."
 पंजाबातील शेतकरी चळवळीच्या पार्श्वभूमीबद्दल पुढे मान म्हणाले,
 "छोटूराम ह्यांची जमीनदारा युनियन हेच आमच्या आजच्या बीकेयुचे मूळ रूप आहे. पंजाबात शेतकरी छोटा असला तरी त्याला 'जमीनदार' (म्हणजे जमीन असणारा) म्हणत. पुढे काळाच्या ओघात जमीनदार' ह्या शब्दाला एक वेगळा, तिरस्करणीय असा अर्थ प्राप्त झाला व संघटनेच्या नावातील 'जमीनदार' शब्द गळून १९७२ साली 'खेतीबाडी युनियन' अस्तित्वात आली."
 आणीबाणीच्या काळात कित्येक महिने मान व त्यांचे अनेक शेतकरी कार्यकर्ते तुरुंगात होते. पण तेव्हा आणि नंतरची अनेक वर्षे ते तसे कुठल्याही राजकीय पक्षाशी जोडलेले नव्हते. अकाली दल हा खरे तर पंजाबातील शेतकऱ्यांचा व म्हणून बहुसंख्य शिखांचा पारंपरिक पक्ष, पण मान ह्यांच्या मते तो खूप भ्रष्ट आहे व म्हणून २००२पासून त्यांनी अधिकृतरीत्या काँग्रेसला पाठिंबा द्यायला सुरुवात केली. पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री व पतियाळाचे माजी महाराज कॅप्टन अमरिंदर सिंग ह्यांनाही अनेक शेतकरी आंदोलनांत त्यांनी सामील करून घेतले. त्यांचे चिरंजीव गुरपरतापसिंग मान उच्चशिक्षित इंजिनिअर व एमबीए आहेत. Punjab Infrastructure Development Limited ह्या महत्त्वाच्या शासकीय आस्थापनेचे ते प्रमुख होते. पण विशिष्ट कंत्राटदारांनाच कामे दिली जावीत ह्यासाठी सत्तेवर असलेल्या अकाली नेत्यांकडून जो दबाव येत होता, त्याला वैतागून त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिला. सध्या ते पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी आहेत. ते सहकुटुंब चंडीगढमध्ये राहतात. त्यांच्या पत्नी दंतवैद्य (dentist) असून पुण्यातील दंत महाविद्यालयात शिकलेल्या आहेत.
 "सगळ्या देशाला तुम्ही धान्य पुरवता; मग तुमच्या शेतकऱ्यांसमोर अडचण कसली असू शकते?" असा प्रश्न मी मान यांचे चिरंजीव गुरपरतापसिंग यांना आमच्या चंडीगढमधील पहिल्याच जेवणाच्या वेळी विचारला.
 "तीच तर खरी अडचण आहे! सगळ्या देशाला आम्ही धान्य पुरवतो हेच आमच्या समस्येचं मूळ आहे!" काहीशा कोड्यात बोलल्याप्रमाणे ते म्हणाले. मग पुढल्या अर्ध्या-एक तासात त्यांनी त्यांचा मुद्दा स्पष्ट केला. "शेती ही तोट्यातच असल्यामुळे जेवढी शेती अधिक, तेवढा तोटा अधिक, असं हे साधं गणित आहे. जास्त उत्पादन म्हणजेच जास्त तोटा. आमचं उत्पादन अधिक, म्हणून आमचा कर्जबाजारीपणाही अधिक," ते म्हणाले.
 हरितक्रांती झाली त्यावेळी मुख्यतः सुधारित बियाणे व खतांचा भरपूर वापर ह्यांमुळे भरघोस पिके निघू लागली. सुरुवातीला सगळे खूश होते. पण नंतर इतके पीक काढूनही आपले कर्जबाजारीपण कमी होत नाही, ही गोष्ट पंजाबातील सर्वच शेतकऱ्यांच्या लक्षात येऊ लागली. बियाणे, खते, डिझेल, वीज, शेतमजुरी वगैरे सर्व खर्च सतत वाढत गेले व त्याप्रमाणात शेतीमालाच्या किमती मात्र फारशा वाढल्या नाहीत. वर्षानुवर्षे त्या किमती केंद्र सरकारच ठरवत आले आहे. परिणामतः खर्च आणि आमदनी ह्याचा मेळ बसेना. खतांच्या अतिरिक्त वापरामुळे झालेली जमिनीची हानी, कूपनलिका अधिकाधिक खोल जात राहिल्याने खालचे क्षार वर यायचे प्रचंड प्रमाण, पाण्याचा अनिर्बंध वापर व ह्या सगळ्यातून होणारी एकूणच पर्यावरणाची हानी हाही प्रकार लोकांच्या लक्षात येत गेला. शेतकऱ्यांमधला असंतोष वाढतच गेला. ह्या असंतोषातूनच पुढे खलिस्तानवाद्यांना उत्तेजन मिळत गेले. शीख शेतकरी तो ग्रामीण, हिंदू व्यापारी तो शहरी; शीख तो शोषित, हिंदू तो शोषक अशा प्रकारे एकूण आर्थिक वास्तवाचे विकृत असे सुलभीकरण केले गेले. मतांच्या राजकारणासाठी काही नेत्यांनी आगीत तेल ओतायचे काम केले. शेती किफायतशीर राहिली नाही, ह्या मूळ आर्थिक प्रश्नाला हिंदू-शीख धार्मिक तेढीचे स्वरूप प्राप्त झाले.
 १९९० ते १९९६ भूपिंदरसिंग मान राज्यसभेचे सदस्य होते. तिथे मान यांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव यांनी एक महत्त्वाची कबुली दिली होती. पंतप्रधान म्हणाले होते, "भारतातील शेतकऱ्याला शेतीमालाचा भाव देताना ७२% उणे सबसिडी दिली जाते." म्हणजेच त्याला सरकारतर्फे अनुदान स्वरूपात खरेतर काहीच दिले जात नाही, उलट त्याचे उत्पन्न १०० रुपये असले, तर सरकारने त्याच्याकडून शेतीमालाच्या वाजवी भावापेक्षा कमी भाव देऊन ७२ रुपये मिळवलेले असतात.
 सरकार शेतकऱ्यांच्या विकासाला कशी बाधा घालते ह्याचे एक उदाहरण मान यांनी दिले. भात भरडून तांदूळ करण्याचे एक छोटेसे मशीन (हलर) परदेशात जेमतेम तीन-चार हजार रुपयांत उपलब्ध होते. ते भारतात आणायचे व तशीच यंत्रे इथे बनवून ती विकायची योजना एका कल्पक शीख तरुणाने मांडली. मान म्हणाले, "पण लायसन्स-परमिटराजच्या त्या जमान्यात सरकारने त्याला परवानगी नाकारली. खूप इच्छा असूनही शेवटी ती योजना त्याला गुंडाळून ठेवावी लागली. पावलोपावली होणारा सरकारी हस्तक्षेप शेतकरीहिताची कायमच अशी गळचेपी करतो. शेतकऱ्यांना स्वातंत्र्य दिलं असतं तर इतर देशांत घडलं ते इथेही घडलं असतं; शेतकऱ्यांनी स्वतःच कितीतरी उपयुक्त यंत्रं शोधून काढली असती. कारण पंजाबी शेतकरी तसा खूप हिकमती आहे, टेक-सॅव्ही म्हणतात तसा आहे."

 सुदैवाने आज मान यांची सांपत्तिक स्थिती चांगली आहे, दोन्ही मुले सुस्थित आहेत. एक अमेरिकेत, दुसरा चंडीगढला. तरीही सकाळपासून रात्रीपर्यंत मान सतत कामात असतात. शेतीचे बरेचसे काम त्यांच्या पत्नी – ज्यांना सगळे भाभीजी म्हणतात – सांभाळतात. त्यामुळे आपल्या सामाजिक कामासाठी मान यांना पुरेसा वेळ मिळतो. देशभरच्या शेतकरी नेत्यांच्या ते संपर्कात असतात; खूप प्रवास करतात. महाराष्ट्रातही ते पंधरा-वीस वेळा सहज आले असतील. शेतकऱ्यांच्या अखिल भारतीय किसान समन्वय समितीचे ते तीन वेळा अध्यक्ष होते. त्यांचा व्यासंगही दांडगा आहे. शेतकरी आंदोलनाबाबतची सर्व कात्रणे त्यांनी आपल्या बटाला येथील घरातील कार्यालयात, चार गोदरेजच्या कपाटांत व्यवस्थित विभागणी करून, फायलींमध्ये लावून ठेवली आहेत.

मान यांच्याशी मैत्री व्हायच्या पूर्वीच जोशी मनानेतरी पंजाबशी जोडले गेले होते. नाशिक येथील १९८० सालच्या ऊस आंदोलनाच्या वेळीच. 'एक दिवस तुम्ही पंजाबातदेखील या, कारण असाच अन्याय आमच्यावरही होतोय' असे अनेक शीख ड्रायव्हर्स त्यावेळी म्हणाले होते. तो भाग पूर्वी आलेलाच आहे. साधारण दोन वर्षांनी तोही योग आला.
 २३ एप्रिल १९८२ रोजी धुळे येथे शेतकरी संघटनेने दूध उत्पादक मेळावा घेतला. त्याला इतरही राज्यांतले काही शेतकरी नेते आवर्जून उपस्थित होते. त्यांच्यापैकीच एक होते बलबीरसिंग राजेवाल. मेळाव्यात त्यांनी जोशींना सांगितले,
 "पंजाबमधील खन्ना ह्या गावी आम्ही २८, २९ व ३० मे १९८२ रोजी एक बैठक आयोजित केली आहे. अखिल भारतीय किसान युनियनची लिखित घटना निश्चित करण्यासाठी. त्या बैठकीला तुम्ही व तुमच्या काही निकटच्या सहकाऱ्यांनी अवश्य यायला हवं. बैठकीनंतर पंजाबात इतर चार ठिकाणी शेतकरी मेळावेही आयोजित केले आहेत. ३१ मेला मानसा (जिल्हा भटिंडा), १ जूनला नवा शहर (जिल्हा जालंदर), २ जूनला फिरोजपूर व ३ जूनला गोविंदबालसाहिबा (जिल्हा लुधियाना) इथे. ह्या सर्व मेळाव्यांनाही तुम्ही आमचे पाहुणे म्हणून हजर राहावं."
 जोशींना ती कल्पना खूप आवडली. एकतर निपाणीनंतर इतरही राज्यांत प्रवेश करण्याची ही एक सुवर्णसंधी होती. सर्व आयोजन पंजाबचे शेतकरीनेते करणार होते व तो काहीच त्रास नव्हता. शिवाय सर्व मेळावे ग्रामीण भागात भरणार असल्याने आपोआपच पंजाबातील शेतकऱ्यांशी अगदी थेट असा परिचय होणार होता. लगेचच त्यांनी आमंत्रणाचा स्वीकार केला. त्यानुसार २६ मे रोजी झेलम एक्स्प्रेसने जोशींनी पुण्याहून प्रस्थान केले. भास्करराव बोरावके हे सहकारी पुढे मनमाडला त्यांच्याच डब्यात चढले. विजय जावंधिया आणि श्रीकांत तराळ हे दोन सहकारी आदल्याच दिवशी नागपूरहून दिल्लीला जाऊन पोचले होते.

 अलिबागचे प्रा. अरविंद वामन कुळकर्णी हे मात्र पुण्यापासूनच जोशींबरोबर होते. नाशिक आंदोलनावर त्यांनी 'सोबत'मध्ये लिहिलेला लेख जोशींना आवडला होता व त्यानंतर त्यांनी आपणहूनच कुळकर्णीशी तारेने संपर्क साधला होता. पुढे निपाणीला दोघांची पहिली भेट झाली होती व त्यानंतर निपाणी आंदोलनावर त्यांनी 'सोबत'मध्ये लिहिलेले चार लेखही जोशींनी वाचले होते. शेतकरी संघटनेने प्रकाशन विभाग सुरू करावा असे कुळकर्णीचे मत होते व त्याबद्दल जोशींशी चर्चा करण्यासाठी ते व त्यांचे प्राध्यापक सहकारी सुरेशचंद्र म्हात्रे पुण्याला २१ मे रोजी आले होते. जोशींना त्यांची योजना पटली व आंदोलनाच्या धामधुमीत जमेल तसे काम यथावकाश सुरूही झाले. 'आता आलाच आहात तर माझ्याबरोबर पंजाबातही चला,' असा जोशींचा खूप आग्रह होता. कुळकर्णी तयार नव्हते, कारण तसा हा दहा दिवसांचा लांबचा प्रवास होता आणि त्यांनी ना घरी काही त्याबद्दल कळवले होते ना त्यांच्याकडे पुरेसे सामान होते. 'सामानाची वगैरे काही काळजी करू नका, अगदी नेसत्या कपड्यांनिशी चला,' जोशी सांगत होते. शेवटी जोशींच्या या अगदी अनपेक्षित आग्रहापुढे त्यांनी मान तुकवली.

________________

सेलू (जिल्हा वर्धा) येथून चंडीगढ़ येथे सायकलवरून गेलेला उत्साही 'परभणी पागल' तरुणांचा चमू, १२ मार्च १९८४ विकिसानदानयन जिन्दाबाद चंडीगढ़ येथे राजभवनाला वेढा घालण्यासाठी तिथे मोर्चा नेताना शरद जोशी. शेजारी भूपिंदर सिंग मान व अन्य शेतकरी नेते, १२ मार्च १९८४ शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी जेल भरो': चंडीगढ राजभवनजवळ अटक करून घेणारे वेगवेगळ्या राज्यांतून आलेले शेतकरी, १५ मे १९९१ ________________

चांदवड येथील पहिले शेतकरी महिला अधिवेशन : तीन लाख स्त्रियांचा विराट मेळावा, १० नोव्हेंबर १९८६ "आता घरात बसून चालायचं न्हाई." बैलगाडीतन सभेसाठी जाणाऱ्या शेतकरी महिला. सुरेगाव, जिल्हा परभणी. जानेवारी १९८७. ________________

प्रमाणपत्र शेतकरी संघटनेच्या सभेतील महिलांचा अभूतपूर्व सहभाग, चंद्रपूर अधिवेशन, २०१३. महिलाआघाडी श्री. गाव. ---------- यांनी आपल्या घरची लक्ष्मी सौ....------- हिच्या कष्टांची आणि त्यागाची जाणीव ठेवून तिला स्वखुषीने मालमत्तेच्या - मिळकतीच्या मालकीत सहभागी करून घेतले. लक्ष्मीमुक्ती अभियान, प्रमाणपत्र नमुना संघटना رواي 3 ________________

राजीवस्त्रविरोधी आंदोलन : हुतात्मा बाबू गेनू यांच्या महाळुगे-पडवळ ह्या पुणे जिल्ह्यातील जन्मगावी भावजय कासाबाई सैद मुंबईला मिरवणुकीने नेण्यासाठी क्रांती ज्योती प्रज्वलित करताना, सोबत शंकरराव वाघ. डावीकडे घोषणा देणारे भास्करराव बोरावके व उजवीकडे स्वेटर घातलेले बाबूलाल परदेशी. १२ डिसेंबर १९८५. (सौजन्य : सरोजा परुळकर) शिवाजी पार्क, मुंबई, येथील सभेत कामगारनेते दत्ता सामंत यांच्या सोबत. १२ डिसेंबर १९८५. (सौजन्य : सरोजा परुळकर) ________________

राहुरी ऊस परिषद, ६ ऑक्टोबर १९८५. माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग, प्रमोद महाजन, शरद पवार इत्यादी नेत्यांनी ह्या सभेत भाषण केले. 'न्याय नही, हिसाब दो' अशी घोषणा देत दिल्ली येथे बोट क्लबवर शेतकऱ्यांनी काढलेला विराट आर्थिक मुक्ती मोर्चा. ३१ मार्च १९९३. मागे इंडिया गेट दिसत आहे. ________________

कल्पक व लक्षवेधी पोस्टर्स... ॥ जाऊ भीमातीरी पंढरी विठू आमुना कैवारी॥ कर्जाचातराज दौड-दांडीचा m CRIMAUKARA शेतकन्यांची दरवषीं कट10000 कोटी Emms OmanoranimanaKenarwasna MMANISResta शेतकयाचे विठोबालासाकडे तिक कार्तिकी एकादशी. | दुपारी १वाजता संघटता १६नोव्हेंबर८३ पंढरपूर "भीक नको,डवे घामाचे दाम शरद जोशी शतजन्याय एण C000 कोटी न्याय कसला? हिशोब द्या! Ce कर्जमुक्ती आंदोलन हक संघटना व २१व२२ जानेवारी ८५ अधिवेशनउरे आगामी आंदोलनाची दिशा येत्या विधानसभा निवडणुकीत संघटनेची भूमिका यासाठी अत्यंत तातडीचे खुले अधिवेशन २२जानेवारी१८८५दुपारी २वा. கோ शहड हायस्कूलचे मैदान साक्री रोडधुळे स् अनि गो 9gesकोले Con:खेडकीसाठा ________________

... संघटनेचे एक कायम वैशिष्ट्य होते MINIT महिला अधिवेशन चांदवड (जिल्हा नाशिक) ९/१० नोव्हेम्बर ८६ खुले अधिवेशन' १० नोव्हे. दुपारी १ "सी-शक्तीच्या जागरणात स्त्री-पुरुष मूकी" A झोनबंदी सारख्या बेड्या तोडण्यासाठी मा. शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली स्वराज्य मिळवायचे हातोडामोर्चा दिनांक १५ नोव्हेंबर ९५, दुपारी 9 वाजता स्थळः अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना तक संघटना प्रकाशकः नारायण पांडे, जिल्हा अध्यक्ष, शेतकरी संघटना, जि. बीड चलो दिल्ली. चलो दिल्ली चलो दिल्ली! - सदियों की गुलामी और गरीबी से छुटकारा पाने के लिये H मंडी की और विज्ञान की आजादी हेतु । किसान कुम्भ अप्रैल 2001 दोपहर 1 बजे जवाहरलाल नेहरू स्टेडियम, । नई दिल्ली ________________

वीजदरवाढीविरुद्ध आंदोलन, गुजरात, १४ ऑगस्ट २००३ पोलिसांचा अघोरी लाठीमार २००२मधील तीन महिन्यांची नर्मदा परिक्रमा : ओळखून येणारे दाढी वाढवलेले शरद जोशी तहानलेल्याला पाणी देणे हा गुन्हा असेल तर...' नर्मदा जनआंदोलन, केवाडिया कॉलोनी येथे सरदार सरोवर धरणापाशी. डोक्यावर कळशीभर पाणी घेतलेले शरद जोशी. शेजारी चालणारे बद्रीनाथ देवकर,  कुळकर्णीसारखे विचारवंत आपल्यात असावेत असे जोशींना वाटत असावे. २६ मे ते ५ जून १९८२ या कालावधीतील ह्या दौऱ्यात आलेल्या अनुभवांवर कुलकर्णी यांनी पुढे लौकरच 'शरद जोशींबरोबर... पंजाबात' ह्या शीर्षकाखाली माणूस साप्ताहिकात एक लेखमालाही लिहिली व पुढे एप्रिल १९८३मध्ये शेतकरी प्रकाशन', अलिबाग, यांच्यातर्फे ती पुस्तकरूपाने प्रकाशितही झाली. एक गमतीचा भाग म्हणजे पंजाबात पोचल्यावर प्रत्येक प्रसंगी जोशी त्यांची ओळख 'प्राध्यापक म्हणून करून देत व तेव्हा सर्वच उपस्थित पंजाबी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर मोठे आश्चर्य उमटायचे. नंतर केव्हातरी त्याचा खुलासा झाला - पंजाबीत 'प्राध्यापक' हा शब्द 'कुंभार' ह्या अर्थाने वापरला जातो!
 'माणूस'चे संपादक श्री. ग. माजगावकर यांनी या पुस्तकाच्या प्रस्तावनेत लिहिले होते,

एक महाराष्ट्रीय नेता परप्रांतात जाऊन, आपल्या विचारांचा, चळवळीचा तेथे प्रसार करतो, ही घटनाच नवीन होती. आज सगळी क्षितिजे लहान होत आहेत, संकुचितपणा वाढतो आहे. जो तो आपल्या प्रांतापुरता, पक्षापुरता होतो आहे. शरद जोशींची कृती नेमकी ह्याविरुद्ध होती. क्षितिजे विस्तारण्यासाठी ते पंजाबला चालले होते.

 खन्ना गावाला पंजाबातील शेतीजीवनात महत्त्वाचे स्थान आहे व खरेदी-विक्री संघाच्या आवारात पाऊल टाकताच त्याचे कारणही स्पष्ट होत होते. पंजाबातील हा सर्वांत मोठा खरेदीविक्री संघ. प्रत्यक्ष बाजारपेठ एका मोठ्या एक मजली इमारतीत आहे व तिच्या चारी बाजूंना मोकळे मैदान आहे. मैदानाच्या त्या प्रचंड आवारात नजर पोचेल तिथपर्यंत शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या गव्हाच्या पोत्यांचे अवाढव्य ढीगच्या ढीग पसरले होते. सगळीकडे असंख्य ट्रॅक्टर्स उभे होते व तेही गव्हाच्या पोत्यांनी शिगोशीग भरलेले होते. पंजाबात खरेदी होणाऱ्या एकूण गव्हापैकी एक तृतीयांश गहू ह्या एकाच मंडीत खरेदी केला जातो. ह्याच जागी अखिल भारतीय किसान युनियनची बैठक बोलावण्यात मोठेच औचित्य होते.
 बैठकीत सर्वांत जास्त उपस्थिती साहजिकच पंजाबमधील शेतकरीनेत्यांची होती. त्याशिवाय हरयाणा, दिल्ली, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि बिहार येथून प्रतिनिधी आले होते. युनियनच्या घटनेचा लिखित मसुदा तयार करणे हा बैठकीचा मुख्य अजेंडा होता. त्यानंतरचा वेळ युनियनचे नाव, झेंडा, वर्गणी, निधिसंचय, पदाधिकारी, अंतर्गत निवडणुका वगैरे संघटनात्मक बाबींवरील चर्चेत आणि शासनाकडे कुठल्या मागण्या मागायच्या ते निश्चित करण्यात जाणार होता, हे पहिल्याच सत्रात स्पष्ट झाले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी युनियनच्या हरयाणा शाखेचे अध्यक्ष मांगीराम मलिक हे होते. युनियनचे अखिल भारतीय सरचिटणीस राजेवाल यांनी सर्वांचे स्वागत केले, तर पंजाब शाखेचे अध्यक्ष भूपिंदरसिंग मान यांनी युनियनची जन्मकथा सांगणारे प्रास्ताविक केले.
 पहिल्या सत्रात हरयाणाचे अॅडव्होकेट करमसिंग, पंजाबचे अजमेरसिंग लोखोवाल, उत्तरप्रदेशातील मीरतचे सुखबीरसिंग आर्य, झाशीचे गांधीवादी प्राध्यापक डॉक्टर रामनाथन कृष्ण गांधी व मध्यप्रदेशचे विनयचंद्र मुनीमजी यांची भाषणे झाली. महाराष्ट्रातर्फे विजय जावंधिया बोलले. नागपूरचे असल्याने त्यांचे हिंदी उत्तम होते. स्वतः जोशी मात्र ह्या पहिल्या सत्रात काहीच बोलले नाहीत. बैठकीतील इतरांच्या मनात, बैठकीचा मुख्य विषय असलेल्या घटनानिश्चितीविषयी जोशींची भूमिका काय असेल ह्याविषयी बरीच शंका होती. जोशींचे नाव जरी सर्वांनी ऐकले असले, तरी उपस्थितांपैकी एक राजेवाल सोडले तर इतर कोणीही जोशींना पूर्वी कधीच भेटलेलेही नव्हते. स्वतः जोशींनाही ह्या बैठकीत इतरांपेक्षा आपण वेगळे पडत चाललो आहोत ह्याची पहिल्याच सत्रात कल्पना आली होती. कदाचित त्यामुळेच तेही तसे गप्पगप्पच होते.
 हैदराबाद येथे १९८० मध्ये अखिल भारतीय किसान युनियनची स्थापना झाली, त्याच वेळी 'पुढच्या बैठकीत घटना निश्चित करायची' असे ठरले होते. पण अनेक कारणांनी ही पुढली बैठक मधली दीड-दोन वर्षे होऊ शकली नव्हती. शेवटी खन्ना येथे त्या बैठकीचा योग आला होता व घटनानिश्चिती हा तिचा अजेंडा पूर्वीच ठरला होता. दुसऱ्या सत्रात सर्वांनी घटनेची मुख्य कलमे काय असावी ह्यावर मते मांडली. त्याचबरोबर शासनाकडे सादर करण्यासाठी आपापल्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा मागण्या मांडल्या गेल्या. मेडिकल व इंजिनिअरिंग कॉलेजांत शेतकऱ्यांच्या मुलांसाठी राखीव जागा ठेवाव्यात इथपासून ते सरकारने कीटकनाशकांचा पुरवठा स्वस्त दरात करावा इथपर्यंत अनेक मागण्या पुढे आल्या. सगळ्यांचे बोलणे बराच वेळ शांतपणे ऐकून घेतल्यानंतर जोशी बोलण्यासाठी उभे राहिले. अतिशय नम्रपणे त्यांनी भाषणाला सुरुवात केली.
 "घटनेचा मसुदा निश्चित करण्यासाठी बोलावलेली ही बैठक आहे व तिला आम्ही आपले अतिथी म्हणून हजर राहिलो आहोत. अशावेळी आम्ही काही मूलभूत मुद्दे उपस्थित करणं गैर वाटेल. लग्नाला आलेल्या पाहुण्यांनी वधूवर बदलायची सूचना करावी असंच काहीसं ते वाटेल! पण अशा अखिल भारतीय युनियनची उद्दिष्टं नक्की करताना अधिक मूलगामी विचार व्हायला हवा व तो झाल्यावर मगच घटनेचा मुद्दा विचारात घेता येईल. आधी उद्दिष्टं स्पष्ट असावीत व मग ती साध्य करण्यासाठी कुठली घटना उपयुक्त ठरेल, ते बघता येईल. त्या दृष्टीने माझे विचार मांडण्यासाठी मला जरा अधिक वेळ लागेल व तो अध्यक्षांनी द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो."
 तसा वेळ सुदैवाने अध्यक्षांनी दिला व त्यानंतर स्वतःची पार्श्वभूमी, शेतकरी प्रश्नाची ऐतिहासिक मीमांसा, शेतीमालाच्या जाणीवपूर्वक कमी राखलेल्या किंमती, गोऱ्या इंग्रजाचेच धोरण चालू ठेवणारे काळे इंग्रज, स्वतःचे आंबेठाणमधील शेतीचे अनुभव हे सारे जोशींनी विस्ताराने मांडले. “शेतीमालाला रास्त भाव हाच एक-कलमी कार्यक्रम आपण समोर ठेवावा व तसा भाव मिळाला, तर अन्य कुठल्याही अनुदानाची वा सवलतीची आपल्याला गरजच राहणार नाही; त्या एका मागणीमागे देशभरातील शेतकरी उभा करता येईल, त्यासाठी लिखित घटना वगैरे बाबींची गरज नाही; अगदी अत्यावश्यक असेल तेवढेच बांधीव रूप आपण स्वीकारावे व बाकी बाबतीत लवचीक धोरण ठेवावे," असे ते म्हणाले.
 त्यांच्या ह्या विस्तृत भाषणानंतर चमत्कार घडावा, तसे बैठकीतील वातावरण बदलले. 'स्वतः जोशींच्या तोंडून हे सारं ऐकणं हा एक अविस्मरणीय असा अनुभव होता, असे मत नंतर बोलणाऱ्या जवळजवळ प्रत्येकाने व्यक्त केले. 'साधी जीन्स आणि बुशशर्ट घालणारा, शेतकरी अजिबात न दिसणारा हा माणूस जे म्हणाला, ते आम्हाला पूर्वी कधीच कोणी सांगितलं नव्हतं', 'तुम्ही महाराष्ट्रातले शेतकरी भाग्यवान आहात, म्हणून तुम्हाला असा नेता मिळाला', 'अनेक शेतकरी नेते आजवर बघितले, पण इतका अभ्यासू नेता नव्हता बघितला' अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात होत्या.
 पुढील सर्वच सत्रांवर आता जोशींची निर्विवाद पकड बसली. युनियनचे आता जणू ते अलिखित अध्यक्षच बनले. बैठकीच्या तिसऱ्या दिवशी, म्हणजे रविवार ३० मे रोजी, संमत झालेल्या ठरावांवरही जोशींच्या अर्थमूलक विचारसरणीची छाप उघड होती. 'शेतकऱ्याला रास्त भाव न देण्याच्या शासनाच्या धोरणाचा ही युनियन निषेध करते' हा पहिलाच ठराव होता. आणखीही एक महत्त्वाचा ठराव होता, 'शेतीमालाचा साठा, प्रक्रिया, व्यापार व निर्यात यांसंबंधीचे सर्व निबंध शासनाने दूर करावेत. यांसंबंधी परदेशात झालेल्या तांत्रिक सुधारणांच्या स्वीकाराबद्दल शेतकऱ्यावर कुठलीही बंधने असू नयेत. त्यासाठी आवश्यक अशी यंत्रसामग्री परदेशातून आयात करण्याची शेतकऱ्याला मुक्त परवानगी असावी.'
 बैठकीच्या औपचारिक सांगतेनंतर किसान युनियनने खन्ना गावातून एक मोठी शोभायात्रा काढली. आर्य हायस्कूलच्या मैदानावर भरलेल्या एका मोठ्या सभेत शोभायात्रेचे स्वागत केले गेले. साधारण तीसेक हजार शेतकरी हजर होते. जोशी व्यासपीठावर पोचताच त्यावेळी चालू असलेले भाषण थांबवून जोशींचे आगमन माइकवरून जाहीर केले गेले व 'किसान युनियन झिंदाबाद'च्या घोषणांनी सगळा परिसर दुमदुमून गेला. जाहीर सभेतील आपले पहिले हिंदी भाषण जोशींनी याच खन्नातील सभेत केले. सुरुवातीलाच जोशींनी शहीद भगतसिंगांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. ते म्हणाले, “माझी शेती जिथे आहे तिथून जवळच राजगुरूनगर आहे. ह्याच राजगुरूने क्रांतिकार्यात भगतसिंगाला मृत्यूच्या घटकेपर्यंत साथ दिली होती. तेव्हा पंजाब आम्हाला किंवा आम्ही पंजाबला नवखे नाही. आमचा रिश्ता पुराना आहे व त्याला उजाळा देण्यासाठीच आम्ही इथे आलो आहोत. पंजाब म्हणजे आमचा वडील बंधू आहे." आपल्या पस्तीस मिनिटांच्या भाषणाच्या या भावस्पर्शी सुरुवातीपासूनच जोशींनी सभेतील प्रत्येकाला भारावून टाकले.

 यानंतरच्या मानसा, नवा शहर, फिरोजपूर व गोविंदबालसाहिबा येथील चार सभाही अशाच गाजल्या. स्थानिक पंजाबी वृत्तपत्रांतील बातम्यांमध्येही जोशींनाच सर्वाधिक प्राधान्य दिले गेले. मानसा आणि नवा शहर ह्यांच्या दरम्यान लुधियाना शहराजवळ सुप्रसिद्ध पंजाब कृषी विद्यापीठ आहे. संपूर्ण आशिया खंडात ते नामांकित आहे; विशेषतः तेथील ग्रंथालय.

तिथे जायची जोशींची खूप जुनी इच्छा ह्या दौऱ्यात पूर्ण झाली. योगायोग म्हणजे, ते ह्या ग्रंथालयात असतानाच त्या दिवशीचा 'इंडियन एक्स्प्रेस'चा अंक (चंडीगढ आवृत्ती) कोणीतरी त्यांना आणून दाखवला व त्यात पहिल्याच पानावर त्यांचा मोठा फोटो व खन्ना येथील भाषणाची बातमी छापली होती. महाराष्ट्रातील त्यांच्या कुठल्याच भाषणाला अशी प्रसिद्धी पूर्वी मिळाली नव्हती.
 दुसऱ्या दिवशी इंडियन एक्स्प्रेसचे चंडीगढ येथील प्रमुख वार्ताहर विनोद मिश्रा यांनी जोशींची विस्तृत मुलाखत घेतली व ती पुढल्या दिवशी पेपरात छापूनही आली. मिश्रा हे जेमतेम तिशीतले, परदेशात शिकून आलेले, खूप हुशार असे पत्रकार होते व त्यांचे प्रश्न मोठे मार्मिक होते. “शहरातील दारिद्र्य हाही नुकसानीतील शेतीचाच एक परिणाम आहे व ग्रामीण भागातील भांडवलसंचय हाच देशातील दारिद्र्यावरचा एकमेव उपाय आहे," असे जोशी यांनी मुलाखतीत म्हणताच, "पण उद्या हाच शेतकरी इतरांचे शोषण करू लागला तर?" असा प्रतिप्रश्न मिश्रांनी विचारला. उत्तरादाखल जोशी म्हणाले, “तर मग शेतकऱ्यांशीही लढावं लागेल आणि संघटना तशी मोर्चेबंदी करायला कचरणार नाही. कारण मुळात हा लढा शेतकऱ्यांसाठी नसून दारिद्र्याविरुद्ध व शोषणाविरुद्ध आहे."
 उपरोक्त पुस्तकातील कुळकर्णी यांची अनेक निरीक्षणे वेधक आहेत. अगदी सुरुवातीला पुणे स्टेशनात गाडी लागली, तेव्हा दोन हातांत दोन बॅगा घेऊन, धक्काबुक्की करत, कसेबसे डब्यात शिरणारे शरद जोशी पाहूनच कुळकर्णी काहीसे चमकले. नेता म्हटल्यावर तो नेहमी झोकातच राहतो, आपल्या व्यक्तिगत सुखसोयींकडे कधीच दुर्लक्ष होऊ देत नाही, ह्या रूढ अनुभवाला छेद देणारे ते दृश्य होते. कुळकर्णी म्हणतात, "ज्याची प्रतिमा महाराष्ट्रात 'श्रीमंत शेतकऱ्यांचा कैवारी' म्हणून जाणीवपूर्वक मलिन केली जात होती, असा हा शरद जोशी दोन्ही हात सामानात गुंतवून, रेल्वे स्टेशनचे दादर चढून-उतरून, दुसऱ्या वर्गाच्या डब्यात शिरत होता!"
 शेतकरीनेता म्हणून जोशींनी केलेला हा पंजाबचा पहिलाच दौरा. पंजाबबरोबर तेव्हा जडलेले नाते पुढे काळाच्या ओघात अधिकाधिक दृढ होत गेले.

 १९८२ मधील ह्या दौऱ्यानंतर १७,१८ व १९ फेब्रुवारी १९८४ रोजी मराठवाड्यात परभणी येथे भरलेल्या शेतकरी संघटनेच्या दुसऱ्या अधिवेशनात पुन्हा एकदा पंजाबचा विषय निघाला. तिथे पंजाबातून आलेले प्रतिनिधीही होते. त्यांनी चंडीगढ येथे पुढील महिन्यात ते वीजमंडळाविरुद्ध करणार असलेल्या आंदोलनाविषयी माहिती दिली. जोशींनी त्यांना लगेचच जोरदार पाठिंबा दिला. 'शेतकरी तितुका एक एक' ही घोषणा मूर्त स्वरूपात आणण्यासाठी 'पंजाबमधील शेतकऱ्यांच्या ह्या आंदोलनात महाराष्ट्रातील शेतकरी बांधवदेखील त्यांना साथ देतील व त्यासाठी महाराष्ट्रातील निदान १००० शेतकरी चंडीगढला जातील' असे जोशींनी जाहीर केले.

'जाना है, जाना है, चंडीगढ जाना है' अशा घोषणाही तेव्हा दिल्या गेल्या. कार्ल मार्क्सने ज्याप्रमाणे 'जगातल्या कामगारांनो, एक व्हा' असा नारा दिला होता व त्याद्वारे वर्गजाणीव (class consciousness) निर्माण करायचा प्रयत्न केला होता, तसाच काहीसा हा जोशींचा प्रयास होता. शेतकरी, मग तो महाराष्ट्रातील असो की पंजाबातील, हा शेवटी एकाच आर्थिकसामाजिक वर्गातला आहे, आपली सुखदुःखे परस्परांशी जोडली गेलेली आहेत, ही जाणीव संघटनेच्या कार्यकर्त्यांत निर्माण होणे गरजेचे होते. त्यातून त्यांचे स्वतःचे क्षितिज खूप रुंदावणार होते.


 १२ मार्च १९८४पासून चंडीगढ येथे सुरू झालेले हे आंदोलन म्हणजे केवळ पंजाबमधील शेती आंदोलनातीलच नव्हे, तर एकूणच शेतकरी संघटनेच्या आंदोलनातील एक मानबिंदू आहे. पुढचे सलग सहा दिवस चंडीगढ येथील पंजाबच्या राजभवनला जवळजवळ एक लाख शेतकऱ्यांनी घेराव घातला होता. त्यात हिंदू आणि शीख आपले सगळे मतभेद विसरून सामील झाले होते. त्यावेळी पंजाबात उफाळलेल्या धार्मिक हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ह्या आंदोलनाचे अनन्यसाधारणत्व अधिकच उठून दिसते.
 मुख्यतः हे आंदोलन विजेच्या दरवाढीविरुद्ध होते. अर्थात विजेव्यतिरिक्त इतरही मागण्या होत्याच. शेतीमालाला उत्पादनखर्चावर आधारित भाव मिळावा, शेतीमालाच्या विक्रीवरची झोनबंदीसारखी बंधने उठवावीत, आपल्या विकासाला योग्य असे आधुनिक बियाणे, यंत्रे, तंत्रज्ञान वापरण्याचे किंवा आयात करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य शेतकऱ्याला असावे वगैरे.
 पंजाबी शेतकऱ्याच्या दृष्टीने वीजपुरवठा ही एक कायमची डोकेदुखी बनून राहिली होती. शेतीतील कूपनलिका, पंप, मोटारी, थ्रेशरसारखी इतर उपकरणे यांचा वापर तिथे भरपूर. त्यासाठी वीज ही अत्यावश्यक. पण वीजपुरवठा मात्र कमालीचा अनियमित. त्यातून ग्रामीण भागातील वीज ही बहुतेकदा रात्री पुरवली जायची. कधीही ती खंडित व्हायची. काळोखात शेतात काम करणे अशक्य होई. साप, अन्य जीवाणू चावायची भीती असे. याउलट शहरी भागात वीज दिवसा पुरवली जाई; ते शहरवासीयांना व मुख्यतः कारखान्यांना सोयीचे असे. पण त्यांची सोय पाहणारे सरकार ग्रामीण भागात राहणाऱ्या शेतकऱ्यांची सोय मात्र पाहत नाही याचाही राग शेतकऱ्यांच्या मनात होता. विजेचे दरही कमी करावेत म्हणून आदले दीड वर्ष शेतकरी मागणी करत होते, पण पंजाब शासन दाद देत नव्हते; उलट सरकारने ते दर वाढवायचा निर्णय घेतला होता. त्या विरोधात शेवटी राजभवनला घेराव घालायचे ठरले होते.

 पंजाबात ह्या घडामोडी चालू असताना इकडे महाराष्ट्रात परभणीतील आवाहनाला साद म्हणून झपाट्याने शेतकरी पुढे येऊ लागले. 'पंजाबात सगळीकडे आग पेटली आहे, तिथे जाऊन उगाच कशाला जीव धोक्यात घालता?' असा सल्ला देणारेही बरेच होते, पण त्यांना न जुमानता, स्वखर्चाने, जाणाऱ्यांची संख्या बघता बघता अकराशेवर जाऊन पोचली.

 शेवटी एकदाचा दीर्घकाळ प्रतीक्षा असलेला १२ मार्चचा दिवस उजाडला. सकाळी नऊच्या सुमारास सारे मराठी शेतकरी चंडीगढला परेड ग्राउंडवर जाऊन पोचले. तोवर इतरही शेतकरी मोठ्या प्रमाणावर येऊन पोचले होते. सकाळी सहा वाजल्यापासूनच तिथे शेतकऱ्यांचे लोंढेच्या लोंढे दाखल होऊ लागले होते.
 चंडीगढला पोचल्यावर मराठी शेतकऱ्यांना संगरूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या गटात समाविष्ट केले गेले. ह्या गटाचे नेतृत्व महाराष्ट्राशी बऱ्यापैकी परिचित असलेले बलबीरसिंग राजेवाल ह्यांच्याकडे होते. त्यांच्यासोबत भास्करराव बोरावके, रामचंद्रबापू पाटील, शेषराव मोहिते, नरेंद्र अहिरे, भाऊसाहेब इंगळे, बद्रीनाथ देवकर, चंद्रकांत वानखेडे व विजय जावंधिया हे होते. त्याशिवाय ताराबाई तानाजी पवार (पिंपळगाव दबडे), पार्वतीबाई यादव नाईकवाडे (येवला) व प्रभावतीबाई महादेव केळकर (पाथर्डी) या महिला कार्यकर्त्याही होत्या. विशेष म्हणजे सतत १३ दिवस सायकलने प्रवास करीत वर्धा जिल्ह्यातील नऊ तरुणही ह्या आंदोलनासाठी जवळपास दीड हजार किलोमीटर्सचा प्रवास करून आले होते. जमलेल्या सर्वच आंदोलकांनी त्यांचे भरपूर कौतुक केले. 'पंजाब का बुलावा है, महाराष्ट्र आज आया है' असे लिहिलेले स्वागतपर फलक रस्त्यावर जागोजागी लावले होते. महाराष्ट्रातून आलेल्या जवळजवळ सर्वच शेतकऱ्यांचा पंजाबात यायचा, किंबहुना महाराष्ट्राबाहेर पाय ठेवायचा हा पहिलाच प्रसंग होता. साहजिकच सगळ्यांचा उत्साह दांडगा होता. चंडीगढच्या दर्शनाने सगळे अगदी भारावून गेले होते.
 चंडीगढ आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग असलेले शेतकरी संघटनेचे विदर्भातील एक नेते चंद्रकांत वानखडे यांनी शेतकरी संघटक(६ एप्रिल १९८४)मध्ये चक्षुर्वैसत्यम हकीकत नोंदवलेली आहे. त्यानुसार राजभवनापर्यंत शेतकऱ्यांना पोचताच येऊ नये म्हणून लांबलांबून येणाऱ्या शेतकऱ्यांना चंडीगढच्या वेशीवरच रोखण्याचा पोलिसांनी आधी प्रयत्न केला. पण शेतकऱ्यांची संख्या प्रचंड होती, त्यांच्या लाटाच्या लाटा चंडीगढमध्ये शिरत होत्या व एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या शेतकऱ्यांना अडवणे अशक्य आहे हे लक्षात आल्यावर पोलिसांनी तो प्रयत्न सोडून दिला. वेगवेगळ्या मोरर्च्यांनी शेतकरी राजभवनसमोरच सेक्टर सतरामध्ये असलेल्या विशाल परेड ग्राउंडवर जमू लागले. त्यांची संख्या दुपारी दोनपर्यंत जवळपास एक लाखावर गेली होती. बहुसंख्य शेतकरी अर्थातच पंजाबमधील होते; पण हरयाणा, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान येथील शेतकऱ्यांची संख्याही लक्षणीय होती. त्यांच्यासोबत आलेले जवळजवळ दोन हजार ट्रॅक्टर्स व ट्रेलर्स परेड ग्राउंडच्या भोवताली पसरले होते. अधूनमधून माइकवरून पंजाबी गीते सादर केली जात होती. काही जण रेडियो ऐकत होते. काहींजवळ टेपरेकॉर्डर होते; त्यांवरून गुरुबाणी ऐकवली जात होती. खाण्यासाठी आंदोलकांनी बरोबर कायकाय आणले होते! त्याचाही समाचार घेणे सुरू होते. वेगवेगळे गटनेते आपापल्या अनुयायांसमोर छोटी-छोटी भाषणेही करत होते.
 १० ऑक्टोबर १९८३ ते २९ सप्टेंबर १९८५ या कालावधीत पंजाबात अस्थिरतेमुळे राष्ट्रपतींची राजवट होती. राज्यपाल बी. डी. पांडे हेच सर्व निर्णय घेत होते. त्या दिवशी दुपारी तीनच्या सुमारास ते फिल्लूरमधील आपला पूर्वनियोजित कार्यक्रम आटोपून खास विमानाने चंडीगढमध्ये दाखल झाले व मोटारने थेट राजभवनमध्ये जाऊन पोचले. एकूण परिस्थिती त्यांच्या लक्षात आली होती. काही उच्च अधिकाऱ्यांची तातडीची बैठकही त्यांनी लगेचच बोलावली. नंतर मान व जोशींसह प्रमुख शेतकरीनेत्यांनाही त्या बैठकीत बोलावले व वाटाघाटींनी प्रश्न मिटवण्याचा प्रयत्न स्वतःच्या पुढाकारातून केला. पण आंदोलन मागे घ्यायला शेतकरीनेत्यांनी नकार दिला. संध्याकाळपासून राजभवनाला वेढा पडणार हे आता नक्की झाले. 'वेढ्याच्या कालावधीत आपण राजभवन सोडून कुठेही बाहेर जाणार नाही' असे आश्वासन राज्यपालांनी त्यावेळी शेतकरीनेत्यांना दिले.
 सगळे नेते घाईघाईने पुन्हा परेड ग्राउंडवर आले. शेतकऱ्यांच्या घोषणांनी सगळा परिसर दुमदुमून गेला होता. लोकांचा उत्साह आता अगदी शिगेला पोचला होता. इतक्या लोकांना दीर्घकाळ शांत ठेवणे अवघड होते; काही ना काही घडत राहणे आवश्यक होते. काही मिनिटांतच सभेला सुरुवात झाली. सभेत पंजाबमधील नेते अजमेरसिंग लोखोवाल, बलबिरसिंग राजेवाल, भूपेंद्रसिंग मान, हरयाणाचे नेते मांगीराम मलिक, मध्यप्रदेशचे विनयचंद्र मुनीमजी, उत्तरप्रदेशचे डॉ. रघुवंशमणि पांडे व समन्वय समितीचे संयोजक विजय जावंधिया यांची भाषणे आधी झाली. सर्वात शेवटी जोशी बोलले. "आम्ही आपल्या मदतीसाठी आलेलो नाही. लहान भाऊ मोठ्या भावाला काय मदत करणार? पण आपल्या सुखदःखाच्या गोष्टी करायला आम्ही इथे आलो आहोत. ज्यांच्या हाती सेनेकडे असलेल्या हत्यारांपेक्षाही प्रभावी असं गव्हासारखं हत्यार आहे, त्यांना कोणाच्याही मदतीची गरज नाही." त्यांचा शब्दन्शब्द सगळे श्रोते विलक्षण शांततेत ऐकत होते. प्रत्येकाच्या काळजाला भिडणारे ते भाषण होते.

 परेड मैदानावरची सभा संपल्यावर साधारण सहाच्या सुमारास सर्व शेतकरी सहा वेगवेगळ्या गटांत विभागले गेले व शिस्तबद्ध रांगा करून अर्ध्या किलोमीटरवर असलेल्या राजभवनकडे घोषणा देत चालू लागले. पूर्वी ठरल्याप्रमाणे राजभवनकडे जाणाऱ्या सहाही रस्त्यांवर जाऊन नियोजित जागी त्यांनी धरणे धरले. पहिला गट सेक्टर सात आणि आठ यांच्यामधून राजभवनवर गेला. सगळ्यात मोठा गट गोल्फ क्लबच्या समोरून राजभवनवर गेला. ह्या गटात जोशी व मान होते. शेवटचा गट लेक क्लबच्या समोरून राजभवनवर गेला, चारी बाजूंनी आता राजभवनाला शेतकऱ्यांचा वेढा पडला होता. तोवर संध्याकाळचे सात वाजले होते. तसे हे सहाही रस्ते सकाळी नऊपासुनच पंजाब पोलिसांनी लोखंडी खांब जाळ्या लावून बंद केले होते. त्या अडथळ्यांच्या अलीकडे शेतकऱ्यांनी रस्त्यांवरच मांडी ठोकली होती आणि अडथळ्यांच्या पलीकडे, राजभवनाच्या भिंतीपर्यंत हजारोंच्या संख्येने पोलीस हजर होते. चंडीगढ़ प्रशासनाने पंजाब व हरयाणा सरकारव्यतिरिक्त केंद्राकडूनही सुरक्षारक्षकांची कुमक मागवली होती. सुमारे १५,००० पोलीस, एसआरपी व बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचे जवान राजभवन परिसरात सुसज्ज उभे होते. चंडीगढ ही पंजाब व हरयाणा ह्या दोन्ही राज्यांची राजधानी. ती केंद्रशासित आहे. दोन्ही राज्यांची स्वतंत्र राजभवने आहेत. हा वेढा पंजाबच्या राजभवनला होता.

 तेरा मार्च, वेढ्याचा दुसरा दिवस. राजभवनासमोरच एक मोक्याची जागा शोधून दुपारी तिथे सभा झाली व त्या सभेत महाराष्ट्रातून आलेल्या शेतकऱ्यांना निरोप देण्यात आला. त्यांना पुन्हा लांबचा प्रवास करून आपापल्या घरी परतायचे असल्याने दुसऱ्या दिवशी त्यांना परतायची परवानगी द्यायची हे पूर्वीच ठरले होते. काही कार्यकर्ते मात्र तिथेच राहणार होते. ह्या लढ्यातला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सहभाग खूप वाखाणला गेला. मुळात त्यांचा सहभाग हाच पंजाबच्या शेतकऱ्यांना फार मोठा आधार वाटला. 'देशातील शेतकरी सारे एक आहेत' ही भावना त्यातून अधोरेखित होत होती व तेच त्यांच्या सहभागाचे मुख्य कारण होते. 'महाराष्ट्रात जेव्हा असे आंदोलन होईल, तेव्हा आम्हीही तुमच्यामागे असेच उभे राहू' असे आश्वासन जवळजवळ प्रत्येक वक्त्याने मंचावरून दिले.
 चौदा मार्च. वेढ्याचा तिसरा दिवस. वातावरणातील चुळबुळ आता वाढली होती. पण पंजाब शासन दाद देईना; शेतकरीनेत्यांशी बोलणी करण्यासाठी पुढे येईना. सरकारला कदाचित वाटले असावे, की आपण दोन-तीन दिवस दुर्लक्ष केले, तर कंटाळून शेतकरी आपोआपच वेढा उठवून आपापल्या गावी परततील. पण मागण्या मान्य झाल्याखेरीज वेढा उठवायचा नाही हा शेतकऱ्यांचा निर्धार कायम होता. त्या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरू झाली. आसपासच्या गावांतून शिदोरी जमवायला सुरुवात झाली. दूध येऊ लागले. फळे येऊ लागली. ट्रॅक्टर्स भरभरून खाद्यपदार्थ येऊ लागले. शेतकऱ्यांनी मिळतील त्या लाकडी फळकुटांचा व कार्डबोडींचा वापर करत आपापल्या कच्च्या झोपड्या उभ्या केल्या. एक किसाननगरच तिथे उभे राहिले.
 पंधरा मार्च. वेढ्याचा चौथा दिवस. आज सकाळपासूनच वातावरण एकदम तंग झाले. वेढ्याच्या कालावधीत राजभवन न सोडण्याचे आश्वासन राज्यपालांनी पाळले नाही. त्या पहाटे अचानक ते गुपचूप बाहेर पडले. लुधियानामधील एका कार्यक्रमासाठी ते गेले होते. रेडियोवरील बातम्या ऐकताना ही बातमी आंदोलकांना कळली. ते खूपच चिडले. तीन-चार तासांनी राज्यपाल परत आले. त्या दोन्ही वेळी राज्यपालांच्या अनुपस्थितीत राजभवनावरील ध्वज उतरवून ठेवणे, त्यांच्या मोटारीवर राष्ट्रध्वज व लाल दिवा लावणे, पुढ्यात सायरन वाजवत जाणारी गाडी असणे, राजभवनाच्या मुख्य प्रवेशदारावर राज्यपाल आत नाहीत हे सूचित करणारी नेहमीची पाटी लावणे वगैरे सोपस्कार पाळले गेले नव्हते. दरम्यानच्या काळातील तणाव तोवर खूप वाढला होता. पण जोशी व इतर नेत्यांनी शेतकऱ्यांची समजूत काढली. आपल्या भाषणात जोशी म्हणाले,
 “राज्यपाल उंदरासारखे बिळातून बाहेर आले असले आणि परत बिळात घुसले असले तरी आपण काही मांजर नाही. आपल्याला उंदीर-मांजराचा खेळ खेळायचा नाही, त्यांचा पाठलाग करायचा नाही. आपले आश्वासन त्यांनी पाळले नाही, उंदरासारख्ने पळून गेले, तरी आपण आपली पायरी सोडायची नाही. शेवटी राज्यपाल हा थेट राष्ट्रपतींचा प्रतिनिधी आहे ह्याची जाणीव ठेवून आपण संयम पाळू या."

 अतिशय कौशल्याने जोशींनी ती परिस्थिती हाताळली व शांतता कायम राखली.

सोळा मार्च. वेढ्याचा पाचवा दिवस. आता रोज आसपासच्या गावांतून नवे नवे शेतकरी मोर्च्याने येऊन वेढ्यात सामील होऊ लागले. स्त्रियाही मोठ्या संख्येने येऊ लागल्या. शेजारच्या हरयाणातील पंधरा-वीस हजार शेतकरी लवकरच तिथे येऊन दाखल होत आहेत अशीही बातमी होता. सरकारचे हेलिकॉप्टर रोज सकाळी किसाननगराची हवाई पाहणी करायचे. त्यांनीही शेतकऱ्यांचा उत्साह वाढता आहे हे सरकारपर्यंत पोचवले असणार. वृत्तपत्रे तर रोजच पानभर बातम्या छापत होती.

 ही सारी परिस्थिती विचारात घेऊन शेवटी पंजाब सरकारने सतरा तारखेला, म्हणजे सहाव्या दिवशी, शेतकरीनेत्यांशी बोलणी सुरू केली. उभय बाजूंच्या संमतीने लुधियाना येथील सुप्रसिद्ध पंजाब कृषी विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉ. एस. एस. जोल ह्यांच्या अध्यक्षतेखाली पुढील पंधरा दिवसांत एक तज्ज्ञ समिती नेमायचा निर्णय सरकारने घेतला. डॉ. जोल हे आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेले एक कृषिशास्त्रज्ञ होते. पुढे त्यांना पद्मभूषण पुरस्कारही दिला गेला. त्यांना मदत करण्यासाठी म्हणन समितीचे इतरही तीन सदस्य असणार होते; ते तिघे वरिष्ठ सरकारी अधिकारी होते. समितीने आपला अहवाल तीन महिन्यांत द्यायचा असेही ठरले. या तज्ज्ञ समितीने वीजदर ठरवताना वीज उत्पादनाचा खर्च विचारात घ्यायचा, पण त्याचबरोबर शेतीमालाची किंमत ठरवतानाही तोच वाढीव वीजदर विचारात घ्यायचा व त्या आधारावर शेतीमालाची किंमत ठरवायची असे ठरले. शेतीमालाची किंमत ठरवण्याची ही पद्धत अधिक शास्त्रशुद्ध होती व तीच देशभर सर्वत्र लागू झाली तर शेतकऱ्यांचा फार मोठा फायदा त्यात होणार होता. किंबहुना, शेतीमालाची रास्त किंमत ठरवण्याची योग्य यंत्रणा उभारणे ह्या मागणीवर जोशींचा प्रथमपासूनच खूप भर होता व त्या दिशेनेच टाकलेले हे पाऊल होते. आधी आंदोलनाकडे पूर्ण दुर्लक्ष करणाऱ्या सरकारने एवढी तयारी दर्शवली हाही मोठा विजय होता.
 त्यानंतर शेतकऱ्यांनी वेढा उठवायचे ठरवले. ज्या परेड ग्राउंडवरून आंदोलनाला सुरुवात झाली त्याच परेड ग्राउंडवर १८ मार्चला प्रचंड जल्लोषात विजयोत्सव साजरा झाला.

 ह्या सहा दिवसांत जे कार्यकर्ते तिथे प्रत्यक्ष हजर होते, त्यांच्या दृष्टीने हा आयुष्यातील एक अविस्मरणीय असा अनुभव होता. त्यांच्या निरीक्षणांतुन व आठवणींतुन आंदोलनाच्या वेगवेगळ्या पैलूंवर प्रकाश पडतो. किसाननगरमध्ये पहिल्या दोन दिवसांतच शेतकऱ्यांनी आपापल्या कामचलाऊ झोपड्या उभारल्या याचा उल्लेख मागे झालाच आहे. त्या घटनेला चंद्रकांत वानखडे यांनी आपल्या उपरोक्त लेखात लिहिल्याप्रमाणे विनोदाची झालरही होती. प्रत्येक झोपडीसमोर एक पुठ्याचा बोर्ड लटकत होता. त्यावर त्या झोपडीचे नाव, घर क्रमांक व टेलिफोन क्रमांक गुरुमुखीत लिहिलेले असायचे. वर एक शोभेचा टीव्ही अँटेनादेखील लटकत होता! चंडीगढमधील इतर उच्चभ्रू बंगल्यांची ही नक्कल होती! 'हा टेलिफोन नंबर कुठला? इथे तर टेलीफोनच नाहीये,' असे विचारले, तर उत्तर यायचे, 'टेलिफोनसाठी अर्ज केला आहे, नंबरदेखील मिळाला आहे. टेलिफोन मात्र अजून मिळालेला नाही. सरकारी कामांना किती उशीर लागतो हे माहिती आहे ना तुम्हाला!'
 सत्याग्रहींमध्ये सहभागी असलेले कोपरगावचे भास्करराव बोरावके म्हणतात,
 "त्या काळात खलिस्तानचा प्रश्न अगदी पेटून उठलेला. पण या आंदोलनात तथाकथित हिंदू-शीख वैर किती फसवं आहे, धर्मभेद हा खोटा वाद कसा आहे, हे कोणालाही दिसेल इतकं स्पष्ट झालं. आणखी एक गोष्ट – जोशीसाहेबांनी कधीही शिखांचं लांगूलचालन केलं नाही. तिथल्या शिखांमध्ये दारू प्यायचं प्रमाण प्रचंड. पहिल्याच दिवशी बरेच शीख बांधव दारू पिऊन आले होते. साहेबांनी त्यांना अगदी स्पष्ट शब्दांत त्याच दिवशी व्यासपीठावरून जाहीर तंबी दिली. म्हणाले, 'ज्यांना दारू प्यायची असेल, त्यांनी इथून ताबडतोब चालतं व्हावं.' आश्चर्याची गोष्ट म्हणजे दुसऱ्या दिवसापासून एकही शीख बांधव घेराओत दारू पिऊन आला नाही! इतका स्पष्टवक्तेपणा दाखवूनही लोकांवर इतका जबरदस्त होल्ड असलेला दुसरा कोणीही नेता आम्ही आजपर्यंत कधी पाहिलेला नाही."
 कोपरगावचेच दुसरे एक शेतकरी बद्रीनाथ देवकर जोशींच्या खास विश्वासातले, त्यांचा भरपूर व्यक्तिगत सहवास लाभलेले. तरुणपणापासूनच संघटनेचे पूर्णवेळ काम करू लागलेले. ते म्हणतात,
 "किसाननगरातून फेरफटका मारताना मला जाणवत होतं, की पंजाबी शेतकरी किती हरहुन्नरी आहे. त्याने तीन दगड गोळा करून त्यांची चूल बनवली. शेजारच्या झाडाझुडपांतून वाळलेला लाकूडफाटा गोळा केला. काही पन्हाळी पत्र्यांचे तुकडे मिळवले, ते दगडांनी ठेचून सरळ केले आणि त्यांचे तवे आणि पोळपाट बनवले. मोठ्या बाटल्यांचं केलं लाटणं! कुठेही हा शेतकरी अडला नाही. शिवाय आल्यागेल्याला अगदी आग्रहाने बोलावून जेवायला द्यायचे. तिसऱ्या दिवसापासून जवळच्या खेड्यांमधून इतके ट्रॅक्टर यायला लागले की मोजणं मुश्किल! प्रत्येक ट्रॅक्टरवर एक चालक पुरुष व बाकी सर्व स्त्रिया. त्यांनी वेढ्यात बसलेल्या सर्व पुरुषांना सांगितलं, 'तुम्ही घराची चिंता करू नका. आंदोलनात राहा. आम्ही सर्व पुरवठ्याची जबाबदारी घेतो.' दुधाचे कॅन, भाजीपाला, पीठ, फळफळावळ, खाण्याचे तयार पदार्थ ट्रॅक्टर भरभरून आले व दररोज येतच राहिले. खाण्याची अगदी रेलचेल झाली. आंदोलन संपल्यावर हे आलेलं धान्य.पीठ,शिधा वगैरे मोठ्या प्रमाणावर उरलं होतं. ते सगळं मंडईत नेऊन त्याचा लिलाव केला गेला व त्याचे लाख, दीड लाख रुपये जमा झाले!"
 चंडीगढच्या प्रशासनाचेही शेतकरीनेत्यांनी जाहीर कौतुक केले. खरेतर शेतकऱ्यांचे भांडण हे पंजाब सरकारशी होते, चंडीगढ़ प्रशासनाशी नव्हे. चंडीगढ़ प्रशासनाच्या दृष्टीने तो केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा होता. आवश्यकता भासल्यास पोलिसांचे बळ वापरून वेढा उधळून टाकायची प्रशासनाची तयारी होती; पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांचे आंदोलन अगदी शांततापूर्ण चालले आहे हे लक्षात आल्यावर प्रशासनानेही बळाचा वापर टाळला. शेतकरीनेत्यांबरोबर चर्चा करून शेतकरी कुठल्या कुठल्या रस्त्यांवर धरणे धरतील हे निश्चित केले. त्या ठिकाणी स्वच्छता, दिवे, पाणीपुरवठा यांचीही चांगली व्यवस्था केली. सरकारशी बोलणी सुरू व्हावी म्हणूनही पुढाकार घेतला. शेतकऱ्यांनी शांतता पाळली आणि प्रशासनानेही संयम राखला. आंदोलन कसे हाताळावे ह्याचा हा एक आदर्शच होता.


 चंडीगढमधून प्रसिद्ध होणाऱ्या सर्वच इंग्रजी, हिंदी व पंजाबी वृत्तपत्रांनी ह्या आंदोलनाला भरपूर प्रसिद्धी दिली. जवळजवळ रोजच पहिल्या पानावर सचित्र बातमी येत होती. शरद जोशींचा सभेत भाषण करतानाचा तीन कॉलमी फोटो पहिल्याच दिवशी सगळ्या वृत्तपत्रांनी छापला होता. सगळ्यांनी संपादकीय लिहूनही आंदोलनाची दखल घेतली. ह्या पत्रकारांकडून त्यावेळी अनेक महत्त्वाचे मुद्दे पुढे आले; त्यांतले काहीतर असे होते, की जे स्वतः शेतकरीनेत्यांनीही नोंदवलेले नव्हते किंवा 'शेतकरी संघटक'सारख्या संघटनेच्या मुखपत्रातही कुठे लिहिले गेलेले नाहीत.
 उदाहरणार्थ, १३ मार्च १९८४च्या 'दि ट्रिब्यून'मधील एक बातमी. राजभवनसमोरचा गोल्फ क्लब हा पंजाबातील सर्वांत उच्चभ्रू क्लब. एरव्ही तिथे पाय ठेवायला मिळणेही सर्वसामान्यांना अवघड. पण ह्या आंदोलनात असंख्य शेतकऱ्यांनी रात्री झोपताना आपापल्या पथारी खुशाल तिथल्या खास राखलेल्या विस्तीर्ण हिरवळीवर पसरून दिल्या होत्या. सुखना लेकमध्ये बोटिंग करणे किंवा सेक्टर १७मधील श्रीमंती शॉपिंग सेंटरमध्ये भटकणे हाही अप्राप्य असा आनंद शेतकऱ्यांनी घेतला. चंडीगढमधील राजेशाही हवेल्याही अनेक शेतकरी बाहेरून न्याहाळत असत. ग्रामीण भागातून आलेल्या शेतकऱ्यांना शहरी चंडीगढमध्ये आल्यावर काय काय वाटत असेल ह्याची ह्यावरून काहीशी कल्पना येते. 'दि ट्रिब्यून'ने याची आवर्जून नोंद केली आहे.
 ह्याच पेपराचे १५ मार्चचे 'The March on Chandigarh' हे संपादकीय या आंदोलनाचा 'unprecedented in numbers and also qualitatively different from other demonstrations' ('संख्येचा विचार करता अभूतपूर्व आणि शिवाय इतर निदर्शनांपेक्षा वेगळ्याच गुणवत्तेचे') म्हणून गौरव करते व शेवटी म्हटते,

Half a century ago Sir Chhotu Ram aroused the farmers of the Punjab of that time to a sense of wrong at the hands of the moneylender and the consumer of agricultural products. This resulted in a major revolution in thought and a re-evaluation of roles. Mr. Sharad Joshi is using a much bigger platform to propagate his philosophy of social equality and economic justice. His campaign could well become an important well become an important determining factor in shaping the country's political scenario, especially on the eve of the general elections for Parliament and several State Assemblies.

(अर्धशतकापूर्वी सर छोटू राम यांनी तत्कालीन पंजाबातील शेतकऱ्यांना त्यांच्यावर सावकार व शेतीमालाच्या ग्राहकाकडून होत असलेल्या अन्यायाविरुद्ध जागृत केले. त्याचा परिणाम म्हणून एक मोठी वैचारिक क्रांती घडून आली व आपापल्या भूमिकांचे पुनर्मूल्यांकन केले गेले. सामाजिक समता व आर्थिक न्याय यांबाबतच्या आपल्या तत्त्वज्ञानाचा प्रसार करण्यासाठी आज श्री शरद जोशी त्यापेक्षा अधिक मोठे व्यासपीठ वापरत आहेत. त्यांचे हे आंदोलन देशातील राजकीय परिस्थितीला आकार देण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा निर्णायक घटक ठरू शकेल - विशेषतः लोकसभेच्या व अनेक राज्यांतील आगामी निवडणुकांच्या पूर्वसंध्येला.)

आपल्या २० मार्चच्या अंकात या आंदोलनाचे राजकीय महत्त्व विशद करताना 'इंडियन एक्स्प्रेस'चे एक पत्रकार देविंदर शर्मा यांनी आपल्या लेखात म्हटले,
That the Bharatiya Kisan Union has emerged as a major force to reckon with in Punjab becomes evident from the manner in which the Akali Dal felt perturbed over the massive show of strength. Since the BKU had politely turned down Akali Dal's offer of support, the Dal had to issue a statement supporting the farmers' movement 'unilaterally'. Whether the farmers' movement has eroded the Akali rural base is still not clear but it is certain that the state's peasantry is more concerned about their own economic problems than the political and religious demands. The farmers' leaders, unlike politicians, stayed along with the farmers during the picketing of Raj Bhavan. This itself is enough to seek mass support from the ruralites. Most of those who camped at Chandigarh were young farmers and not the old generation which participated in the Akali morcha. "The Akalis are fighting a dharam yudh and we are waging a karam yudh,' said a young farmer aptly summing up the difference in approach

(भारतीय किसान युनियन ही पंजाबमधील एक मोठी दखलपात्र शक्ती म्हणून उदयाला आली आहे. युनियनने केलेल्या शक्तिप्रदर्शनामुळे ज्याप्रकारे अकाली दल पक्ष अस्वस्थ झाल्याचे दिसते, त्यावरून ही बाब अगदी स्पष्ट आहे. अकाली दलाने देऊ केलेला पाठिंबा बीकेयुने नम्रपणे नाकारला होता व त्यामुळे अकाली दलाला आंदोलनासाठी आपला 'एकतर्फी' पाठिंबा जाहीर करावा लागला. शेतकरी आंदोलनामुळे अकाली दलाचा ग्रामीण भागातील पाया पोखरला गेला आहे का, हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, राज्यातील शेतकऱ्यांना धार्मिक अथवा राजकीय मागण्यांपेक्षा स्वतःचे आर्थिक प्रश्न अधिक जवळचे वाटतात हे नक्की झाले आहे. राजभवनवरील निदर्शनांच्या वेळी शेतकरीनेते स्वतःही शेतकऱ्यांबरोबरच मुक्काम

ठोकून होते; जे राजकीय नेते कधीच करत नाहीत. ग्रामीण जनतेचा पाठिंबा मिळवण्यासाठी ही एक कृतीदेखील पुरेशी आहे. चंडीगढ आंदोलनात भाग घेणारे बहुसंख्य हे तरुण शेतकरी होते; अकालींच्या मोर्च्यात सामील झालेल्या शेतकऱ्यांप्रमाणे वृद्ध नव्हते. एका तरुण शेतकऱ्याने मार्मिक शब्दांत म्हटल्याप्रमाणे, "अकाली हे धर्मयुद्ध लढत आहेत, तर आम्ही कर्मयुद्ध लढत आहोत.' अकाली दल व शेतकरीनेते यांच्या भूमिकांतील फरक यातून स्पष्ट होतो.)

हे आंदोलन किती शांतिपूर्ण होते, हिंसेचा एकही प्रकार कसा घडला नाही याचेही याच लेखात शेवटी शर्मा यांनी खूप कौतुक केले आहे. ते म्हणतात,

नेत्यांची इच्छा असेल तर लोक शांतता पाळतात हे यातून सिद्ध होते. अनेकांनी चिथावणी देऊनही शेतकऱ्यांनी कायम संयम पाळला. किंबहुना शेतकरी संघटनेच्या स्वयंसेवकांनी – जे स्वतःला किसान रिझर्व्ह पोलीस (KRP) म्हणवतात त्यांनी - स्वतःच जवळजवळ शंभरएक गुंडांना पोलिसांच्या ताब्यात दिले.

 इथे एक मुद्दा नमूद करायला हवा. इतर शेतकरीनेत्यांचे मत कदाचित वेगळे असू शकेल, पण व्यक्तिशः जोशींचा वीजदर वाढवायला काहीच विरोध नव्हता; सरकारने तोट्यात वीज विकावी हे त्यांना अमान्यच होते. त्यांचे म्हणणे एवढेच होते, की विजेचा जो काही खर्च प्रत्यक्षात येतो तेवढा सगळा खर्च तुम्ही शेतीमालाची किंमत काढतानाही हिशेबात धरा; म्हणजे मग तो वाढीव वीजदर शेतकरी आनंदाने देईल. कुठल्याही प्रकारची सवलत (सबसिडी) त्यांना तत्त्वशः अमान्य होती. पण प्रत्यक्षात विजेचा खर्च हेक्टरी १५३ रुपये येत असताना सरकार मात्र धान्याची किंमत ठरवताना तो वीजखर्च फक्त हेक्टरी ७८ रुपये पकडत असे. इतरही सर्व इनपुट्स असेच खुप कमी खर्चाचे दाखवले जात व त्यामुळे शेतीमालाचा उत्पादनखर्च आपोआपच कमी धरला जाई व पर्यायाने शेतीमालाची किंमतही कमीच पकडली जाई. नेमका हाच अन्याय जोशी दूर करू पाहत होते.


 सोमवार, १६ एप्रिल, १९८४च्या 'इंडियन एक्स्प्रेस'मध्ये स्वामिनाथन एस. अय्यर यांचा “Harvesting Hindu-Sikh amity' ह्या शीर्षकाचा एक विस्तृत लेख संपादकीयालगतच प्रसिद्ध झाला आहे. तोही काही वेगळे विचार मांडणारा आहे. साररूपाने त्यांचे विचार असे आहेत :
 पंजाबमधील शीख असंतोषाचा विचार करताना शिखांनीही काही तथ्ये विचारात घ्यायला हवीत. पंजाबमधील दोन तृतीयांश शेतकरी हे शीख आहेत व ते भरपूर पिके काढतात हे खरे असले, तरी त्यामागे बिहारसारख्या राज्यातून येणाऱ्या लक्षावधी हिंदू शेतमजुरांचाही मोठा वाटा आहे. किंबहुना ह्या शेतमजुरांशिवाय पंजाबातील शेती होऊच शकणार नाही. इतरही  अनेक बाबतीत शिखांना इतर राज्यांवर अवलंबून राहावे लागते. पंजाबमधील नद्या आणि कालवे यांतील पाणी मुख्यतः हिमाचल प्रदेशातून येते व तिथल्या विजेसाठी लागणारा कोळसा मध्यप्रदेशातून येतो. बाहेरून येणाऱ्या या वीज व पाण्याअभावी पंजाबची अर्थव्यवस्था कोसळून पडेल. जवळजवळ २० लाख शीख पंजाबबाहेर राहतात व त्यांनाही आपापल्या व्यवसायासाठी तेथील बव्हंशी हिंदूंवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे शीख व हिंदू ह्यांच्यातील ऐक्यातच पंजाबचे व तेथील शिखांचे कल्याण सामावलेले आहे. दुर्दैवाने भावनेच्या भरात शीख हे परस्परावलंबित्व विसरतात. हिंदू-शीख ऐक्य वाढवण्याची म्हणूनच आज सर्वाधिक गरज आहे.

हाच धागा घेऊन चंडीगढ आंदोलनाच्या संदर्भात अय्यर पुढे लिहितात,

There is reason to be optimistic on this score because of the close co-operation between Sikhs and Hindus in the recent farmers' agitation in Punjab. The president of the Kisan Union, Mr. Bhupinder Singh Mann, and many other office-bearers are Sikhs. But they speak for Hindu as well as Sikh farmers and inducted the services of Mr. Sharad Joshi, a Hindu from Maharashtra, for pressing their demands. They gheraoed Raj Bhavan in Chandigarh and given the trouble in Punjab, the predominantly Hindu population of Chandigarh was initially alarmed by the invasion of the city by farmers, who pitched camps on public places. But it rapidly became clear that the farmers were a highly disciplined lot who took great precaution to ensure that the agitation was non-violent, thanks in part to Mr. Sharad Joshi's organizational abilities. They were soon playing with the children of the Hindu parents and there were warm hugs and embraces between members of the two communities. It was an education for both sides to chat and leam of each other's problems. Not even Holi revelry with all its unpredictability, affected the show of comraderie. The farmers, used to informal ways of dropping in on neighbours, soon won the hearts of Chandigarh urbanites.

(पंजाबमधील अलीकडच्या शेतकरी आंदोलनात हिंदू व शीख ह्यांच्यात जे निकटचे सहकार्य दिसले, त्यामुळे ह्या आघाडीवर आशावादी राहणे सयुक्तिक ठरेल. किसान युनियनचे अध्यक्ष श्री. भूपिंदरसिंग मान व इतर अनेक पदाधिकारी शीख आहेत. पण ते शिखांप्रमाणेच हिंदूंच्याही वतीने बोलत आहेत व आपल्या मागण्या पुढे रेटण्यासाठी त्यांनी श्री. शरद जोशी यांच्यासारख्या महाराष्ट्रातील एका हिंदूचे सहकार्यही घेतले आहे. त्यांनी चंडीगढमधील राजभवनला घेराव घातला, तेथील

मोकळ्या सार्वजनिक जागांवर आपले तंबू ठोकले, त्यावेळी चंडीगढमधील बव्हंशी हिंदू नागरिक आपल्या शहरावर झालेल्या ह्या शेतकऱ्यांच्या आक्रमणाने सुरुवातीला घाबरून गेले. पंजाबमधील सध्याची परिस्थिती पाहता हे स्वाभाविकच होते. पण हे शेतकरी अतिशय शिस्तबद्ध आहेत व आपले आंदोलन त्यांनी अतिशय दक्षतापूर्वक अहिंसक ठेवले आहे ही गोष्ट लौकरच स्पष्ट झाली. ह्याचे काही श्रेय शरद जोशी यांच्या संघटनकौशल्याला द्यायला हवे. लौकरच हे शेतकरी हिंदू आईबापांच्या मुलांशी खेळू लागले आणि दोन्ही समाजाच्या लोकांनी लौकरच एकमेकांची गळाभेट घ्यायला सुरुवात केली. एकमेकांशी गप्पा मारणे आणि त्यातून एकमेकांच्या अडचणी समजून घेणे हे दोन्ही समुदायांसाठी एक प्रबोधनच होते. होळीचा सण जल्लोषाने साजरा करताना खूपदा अवचित काहीतरी घडू शकते, पण इथल्या परस्परप्रेमाच्या त्या वातावरणात होळीमुळेही काही बाधा आली नाही. शेजाऱ्यांच्या घरात अगदी सहज, अनौपचारिकपणे जायची सवय असलेल्या ह्या शेतकऱ्यांनी लौकरच शहरी चंडीगढवासीयांची अंतःकरणे काबीज केली.)

 हा ग्रामीण शीख शेतकरी व शहरी पांढरपेशा हिंदू यांच्यातील फरक बद्रीनाथ देवकर यांच्या निरीक्षणातही आला होता. ते म्हणतात,
 “सुरुवातीला जेव्हा शेतकऱ्यांचे हे लोंढेच्या लोंढे चंडीगढमध्ये येऊ लागले, तेव्हा स्थानिक नागरिक काहीसे घाबरूनच गेले. हे शेतकरी मुख्यतः शीख होते, बऱ्यापैकी राकट होते व चंडीगढसारख्या पॉश शहरातील सोफिस्टिकेटेड लोकांपेक्षा ते अगदी वेगळे आहेत हे लगेचच कळत होतं. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी सर्व शहरवासीयांनी आपापल्या बायकामुलांना आत घेऊन घरांची दारं-खिडक्या घट्ट लावूनच घेतली. काहीशा भेदरलेल्या नजरेनेच ते ह्या शेतकऱ्यांकडे बघत होते. अगदी पाणी मागण्यासाठी कोणी शेतकऱ्याने दार ठोठावलं तरी दार उघडत नव्हते. न जाणो, हे कोणी अतिरेकी असले तर, अशी भीती त्यांना वाटत होती. पंजाबातील त्यावेळची परिस्थितीच तशी होती. पण हळूहळू त्यांची भीड चेपली. दुपारी ह्या शेतकऱ्यांनी बरोबर बांधून आणलेल्या भाकऱ्या खाल्ल्या व नंतर ती सगळी जागा पुन्हा व्यवस्थित साफ केली हे शहरी माणसांनी बघितलं. त्यानंतर मात्र त्यांनी ह्या शेतकऱ्यांना पाणी द्यायला सुरुवात केली. रात्री शेतकऱ्यांनी आपापल्या घोळक्यात करमणुकीचे कार्यक्रम करायला सुरुवात केली. तेव्हातर बंगल्यातली मंडळी बिनधास्त बाहेर येऊन त्या कार्यक्रमात. नाच-गाण्यात भाग घेऊ लागली. हे कोणी अतिरेकी वगैरे नसून ही आपल्यासारखीच सरळमार्गी माणसं आहेत, हा विश्वास त्यांना वाटू लागला. पुढल्या पाच-सहा दिवसांत तर ह्या शेतकऱ्यांची व शहरी मंडळींची चांगलीच दोस्ती झाली."
 ऐतिहासिक अशा या चंडीगढ वेढ्यानंतर जे घडत गेले ते मात्र शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडणारेच होते. पंजाब शासनाने स्थापन केलेल्या जोल समितीने आपला अहवाल ठरलेल्या तीन महिन्यांपूर्वीच सादर केला, पण शासनाने तो स्वीकारला नाही. वाढीव वीजदर देणे शेतकऱ्यांना परवडावे म्हणून १९० रुपये प्रती क्विटल असा भाव गव्हासाठी द्यावा असे समितीने सांगितल्याचे कानावर आले, पण प्रत्यक्षात शासनाने तो अहवाल जाहीरच केला नाही. खरेतर भारतीय किसान युनियन ही संघर्षातील एक संबंधित घटकसंस्था होती व तिला त्या अहवालाची प्रत देणे शासनाचे कर्तव्य होते, पण शासनाने ते केले नाही. उलट वीजबिलांची थकबाकी धाकदपटशा दाखवून वसूल करायला सुरुवात केली, अनेकांचे वीजप्रवाह खंडितही केले.
 त्यामुळे आंदोलनाची पुढची पायरी म्हणून शेतकऱ्यांनी १ मे ८४पासून आपापला गहू विक्रीसाठी बाजारात आणायचाच नाही असे ठरवले. चंडीगढमधील आपल्या भाषणात जोशी म्हणाले होते, "देशात विक्रीसाठी येणाऱ्या गव्हाच्या एकूण पिकापैकी ७० टक्के गहू एकट्या पंजाबात पिकतो. गव्हाच्या त्या प्रचंड ढिगावर तुम्ही बसून आहात. एखाद्या अॅटमबॉम्बपेक्षा अधिक प्रभावी असे ते शस्त्र आहे. तुम्ही ते वापरायचे ठरवले, आपला गहू बाजारात आणायचाच नाही असे ठरवले, तर कुठल्याही सरकारला तुमच्या मागण्या मान्य कराव्याच लागतील."
 त्याचाच आधार घेऊन पंजाबी शेतकऱ्यांनी ते 'कनकबंद आंदोलन' जाहीर केले. सलग एक आठवडा, म्हणजे ८ मेपर्यंत, गव्हाचा एक दाणाही बाजारात विक्रीसाठी आला नाही. नेहमी गव्हाने ओसंडून वाहणाऱ्या खन्नासारख्या बाजारपेठा अक्षरशः ओस पडल्या. दुर्दैवाने त्यानंतर मात्र शेतकऱ्यांचा धीर सुटला; त्याहून जास्त थांबायची त्यांच्यात क्षमताच नव्हती. त्यामुळे मग ते आंदोलन मागे घ्यावे लागले.

 अर्थात शेतकऱ्यांच्या मनात संताप धुमसतच राहिला. त्याचाच एक आविष्कार म्हणजे, २० जुलैला चंडीगढला एक मोठा शेतकरी मेळावा भरवायचे ठरले. याही वेळी महाराष्ट्रातून काही जणांनी जावे असे ठरले. पण ह्या वेळेला संख्या मर्यादित, फक्त दहा, ठेवायची होती. मागच्या राजभवनच्या घेरावसारखाच प्रकार ह्या वेळेलाही होईल, त्यामुळे शेतकरी संघटनेला अधिकच प्रसिद्धी मिळेल अशी बहुधा पंजाब सरकारला भीती होती. अराजकीय अशा शेतकरी संघटनेची ताकद वाढणे म्हणजे राजकीय पक्षांची ताकद कमी होण्यासारखेच होते. त्यामुळे ह्यावेळी सरकारने असा मेळावा होऊच द्यायचा नाही असा निश्चय केला होता. शक्यतो आंदोलकांनी चंडीगढला पोचूच नये ह्या दृष्टीने बहुतेक गाड्या दिल्लीलाच अडवण्यात येत होत्या. जोशींची गाडीही दिल्लीतच थांबवली गेली. बसने कशीतरी मजल दरमजल करत जोशी व त्यांचे सहकारी चंडीगढला पोचले. तोही प्रवास त्यांना तीन-चार गटांमध्ये व लपतछपतच करावा लागला होता. सरकारच्या असल्या दडपशाहीमुळे ह्या होऊ घातलेल्या मेळाव्याला अतोनात प्रसिद्धी मात्र आपोआपच मिळत गेली! जे घडू द्यायचे नाही असा चंग पंजाब सरकारने बांधला होता, तेच नेमके घडत गेले! चंडीगढमधील पंचायतभवनपासून शेतकऱ्यांचा मोर्चा सुरू झाला. भूपिंदरसिंग मान, विजय जावंधिया, शरद जोशी हे मोर्च्याच्या अग्रभागी होते. पण राजभवनपर्यंत पोचायच्या आतच पोलिसांनी त्यांना पकडले व सरळ कोर्टात हजर केले. न्यायाधीशांनी एकदम १६ दिवसांचा रिमांड दिला.
 जोशींबरोबर महाराष्ट्रातून गेलेल्या दहा जणांमध्ये परभणीचे एक प्रसिद्ध वकील अनंत उमरीकर हेही होते. शेतकरी संघटनेचे ते हितचिंतक होते, शिवाय सामाजिक व सांस्कृतिक कार्यात रमणारे होते. अशा एखाद्या आंदोलनात सामील व्हायचा त्यांचा हा पहिलाच अनुभव होता. पंजाबभेटीतील आपल्या या अनुभवांवर त्यांनी 'आंदोलन' नावाचे एक ८८ पानांचे पुस्तकच लिहिले आहे. परभणीच्या रेणुका प्रकाशनाने ऑगस्ट १९९२ मध्ये ते प्रकाशित केले आहे. 'वेडेपीर' या आपल्या २२३ पानांच्या पुस्तकात त्यांनी शेतकरी संघटनेच्या चौदा कार्यकर्त्यांची रसाळ अशी व्यक्तिचित्रेही रेखाटली आहेत. इतरही बरीच पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.
 दुर्दैवाने त्या कारावासात असतानाच एक ऑगस्ट रोजी शरद जोशी यांच्या छातीत एकाएकी जोरात दुखायला लागले. तुरुंगात एकच धावपळ सुरू झाली. त्यांना रुग्णालयात हलवावे लागले. तो अंजायनाचा त्रास होता असे निदान झाले. सुदैवाने वेळीच चांगली वैद्यकसेवा मिळाली म्हणून बरे झाले; नाहीतर गंभीर प्रसंग ओढवू शकला असता. हृदयविकाराचा जोशींना झालेला तो आयुष्यातील पहिलाच त्रास. उर्वरित आयुष्यात ह्या दुखण्याने त्यांचा बराच पाठपुरावा केला.


 एक व्यक्तिगत आठवण इथे नमूद करायला हवी. बटाला इथे मान यांच्या घरी गेलो असताना त्यांच्या पत्नी, भाभीजी, यांनी ती सांगितली. ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी शीख सुरक्षारक्षकांकडून इंदिराहत्या झाली त्यावेळी त्यांचे यजमान व इतरही काही शीख शेतकरीनेते महाराष्ट्रात होते; टेहेरे येथे त्याचवेळी चालू असलेल्या शेतकरी संघटनेच्या विशाल सभेत हजर होते. देशभर शीखविरोधी भयानक दंगली सुरू झाल्या होत्या; तशा बातम्या कानावर येत होत्या. त्या दिवसांचे वर्णन करताना भाभीजी गहिवरलेल्या आवाजात म्हणाल्या,
 "बद्रीनाथ देवकर आणि भास्करराव बोरावके अशा वेळी मोठ्या धाडसाने पुढे झाले व शीख बांधवांच्या सुरक्षिततेची सगळी जबाबदारी त्यांनी घेतली. माझे पती त्यांच्यातच होते. सर्व शिखांना तीन-चार मोटारींमध्ये बसवून ते कोपरगावला स्वतःच्या घरी घेऊन गेले. तिथे त्यांनी शिखांना लपवून ठेवलं. आजूबाजूच्या काही विघ्नसंतोषी लोकांना ह्याची कुणकुण लागली असावी. ते सारखे दाराशी येऊन 'इथे कोणी शीख लपलेले आहेत का, ते बघत होते. पण बद्रींनी व भाऊंनी कोणाला दाद लागू दिली नाही. देशभर शिखांची हत्या सुरू होती व अशा वातावरणात ट्रेनने पंजाबात परत जाणं अशक्यच होतं. दहाबारा दिवस सगळ्यांनी तिथेच लपून काढले. मग वातावरण जरा निवळलं असं बघून त्यांनी शिख बांधवांना परत पंजाबात पाठवलं. सगळे आपापल्या घरी सुरक्षित पोचले, तेव्हाच त्यांनी व आम्हीही सुटकेचा नि:श्वास टाकला. त्याप्रसंगी खरोखरच ह्या दोन कुटुंबांनी आमचे प्राण वाचवले. नाहीतर काय झालं असतं ह्या विचारानेही अंगावर काटा उभा राहतो. पुढे सगळं शांत झाल्यावर मी व माझे यजमान मुद्दाम कोपरगावला जाऊन बद्रीनाथ व भाऊ बोरावके यांच्या घरच्यांना भेटलो व त्यांचे आभार मानले. त्यांच्याविषयीची कृतज्ञता आजही आमच्या मनात कायम आहे. शेवटी त्यांनीच तर माझ्या पतीला दुसरी जिंदगी दिली."
 पंजाबातील शेतकऱ्यांच्या हृदयात जोशींना एक खास जिव्हाळ्याचे असे स्थान प्राप्त झाले ह्याचे एक कारण त्यांचे हृदयाला हात घालणारे वक्तृत्व हेही आहे. उदाहरणार्थ, भारत-पाक सीमेलगत असलेल्या भगतसिंग, सुखदेव व राजगुरू ह्यांच्या स्मारकापाशी झालेली एक सभा. नेहमी गुन्हेगारांना सूर्योदयाच्या वेळी फाशी द्यायची पद्धत. पण आदले काही दिवस लाहोरमध्ये धुमसत असलेला असंतोष विचारात घेऊन इंग्रज शासनाने फाशीसाठी सूर्यास्ताची वेळ निवडली होती. त्यावेळी घडलेल्या एका प्रसंगाच्या ऐकीव माहितीचा उपयोग करत जोशी सभेत म्हणाले होते,
 "हे तिघेही क्रांतिकारक फाशीच्या क्षणाची वाट पाहत, टाचा उंचावलेल्या व हात मागे बांधलेल्या अवस्थेत उभे होते. भगतसिंग त्या तिघांत उंच. त्यांना राजगुरूंनी विचारलं, 'समोर तुला काय दिसतं आहे?' भगतसिंग उत्तरले, 'मला ब्रिटिश साम्राज्यावरचा सूर्य अस्ताला जाताना दिसतो आहे!' ज्या साम्राज्यावरचा सूर्य कधीही मावळत नाही अशी ख्याती होती, त्या साम्राज्यावरचा सूर्य अस्ताला जाताना त्या द्रष्ट्या क्रांतिकारकाला दिसत होता. मलासुद्धा आज इथे 'भारता'वरील 'इंडिया'चा सूर्य अस्ताला जाताना दिसत आहे!"
 ह्यावर समोरच्या विराट सभेतील हजारो श्रोत्यांची मने उचंबळून आली नसती तरच नवल. खरेतर जोशींचे हिंदी फारसे चांगले नव्हते; पण तरीही पंजाबात त्यांची हिंदी भाषणे अधिकाधिक उत्तम होत गेली. विचार सुस्पष्ट असले व बोलणे अंतःकरणपूर्वक असले, तर भाषा आड येत नाही ह्याचे ते ज्वलंत उदाहरण होते.
 जोशींप्रमाणे इतर सर्वच कार्यकर्ते पंजाबात रमले. इथले आदरातिथ्य खूपदा महाराष्ट्रातील पाहुण्यांना काहीसे लाजवणारे असे. 'आप हमारे मेहमान है,' म्हणत इथले यजमान महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना कधीही खिशात हात घालू देत नसत. इथला नाश्ता म्हणजे अगदी जेवणाच्या वरताण! भरपूर मख्खन चोपडलेले परोठे, दाट लस्सी वगैरे! त्यात पुन्हा आग्रह करकरून खाऊ घालणे. साधी सकाळची अंघोळ, पण तीही इथल्या अंगणामध्ये संस्मरणीय असे. अंघोळीपूर्वी शरीराला रगडून मोहरीच्या तेलाचे मालिश करून देणारा कोणीतरी असायचा. बटन दाबले, की तीन इंच व्यासाच्या लोखंडी पाइपातून पाण्याचा भलामोठा लोट अंगावर कोसळू लागे! 'पाच हॉर्सपॉवरची अंघोळ' हा शब्दप्रयोग महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय झाला होता. पंजाबातील भारतीय किसान युनियन एक बळकट संघटना होती. तिचे नोंदणीकृत असे लाखाच्यावर सदस्य होते व साहजिकच सर्व कार्यक्रम उत्तमप्रकारे पार पाडण्यासाठी आवश्यक ते आर्थिक व कार्यकर्त्यांचे बळ युनियनकडे होते. शरद जोशींसारखा एकही मोठा नेता त्यांच्याकडे नव्हता, पण सामूहिक नेतृत्वाचा एक आदर्श यांनी प्रस्थापित केला होता. ह्या संदर्भात परभणी अधिवेशनातला एक प्रसंग बोलका होता.
 'शरद जोशी झिंदाबाद' ह्या अधूनमधून दिल्या जाणाऱ्या घोषणेला पंजाबहून आलेले बलबीरसिंग राजेवाल ह्यांनी विरोध केला होता. स्वतः शरद जोशी यांनी 'माझ्या नावाच्या घोषणा देऊ नयेत' असे व्यासपीठावरून सांगितले. पण तरीही कार्यकर्त्यांना ते पटले नाही व त्या घोषणा चालूच राहिल्या. 'हा कदाचित तुमच्या आमच्या धर्मातला फरक आहे. तुमच्याकडे कुठल्याच एका देवाची पूजा अशी होत नाही. तुमच्याकडे मूर्तीपूजाही नाही. गुरूही दहा आहेत व त्यानंतर तुम्ही कोणाला गुरू म्हणून स्वीकारलेच नाही. आमच्याकडे मात्र असंख्य देव आहेत व असंख्य संतपुरुषही आहेत, ज्यांना देवासारखा मान दिला जातो. त्यामुळे एखाद्या व्यक्तीचा जयजयकार हा आम्हाला खटकत नाही, उलट आवश्यक वाटतो. कारण मूर्ती जसे देवाचे प्रतीक बनते तशीच ती व्यक्ती एक विचारांचे प्रतीक बनते व इतरांना एकत्र यायला कारणीभूत ठरते.' - असे स्पष्टीकरण त्यावेळी महाराष्ट्रातील काही शेतकरीनेत्यांनी राजेवाल ह्यांना दिले होते. राजेवाल ह्यांना काही ते पटले नव्हते, पण मग त्याकडे त्यांनी शेतकरी एकजुटीचे व्यापक महत्त्व विचारात घेऊन दुर्लक्ष केले.

 हिंदू-शीख तेढ हा एक महत्त्वाचा मुद्दा पंजाबच्या संदर्भात नेहमी पुढे येतो; निदान त्या काळात तरी यायचा. साताऱ्याचे डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांनी लिहिलेल्या एका लेखात ह्या संदर्भात काही महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली आहेत. देशान्तरवास या आपल्या एका लेखात ते लिहितात,

सरदारांचा प्रश्न उग्र होणार हे १९८२ साली एशियाड झाले त्याच वेळी नक्की झाले होते. एशियाडच्या वेळी मी खूप भटकलो होतो. प्रचंड किंमत मोजून जगमोहन यांनी एशियाड फत्ते करून दाखवले. त्यावेळी अतिरेकी नव्हते असे नाही, सरदार आपल्यावर अन्याय होतो म्हणून चिडलेले नव्हते असेही नव्हे; पण काट्याचा नायटा झालेला नव्हता. जगमोहन यांनी ते सहजपणे करून दाखवले. सरदार मुळातच खेळप्रेमी आणि उत्सवप्रेमी. ट्रॅक्स आणि बसेस भरभरून खेळ पाहण्यासाठी खेड्यापाड्यांतून सरदार येत होते आणि हरियाणाच्या सीमेवरून, ते फक्त सरदार आहेत म्हणून, त्यांना परत पाठवले जात होते. प्रत्येक स्टेडीयमवर कडक तपासणी होत होती. चुकूनसुद्धा एकही सरदार ह्या तपासणीतून सुटत नव्हता. तो केवळ सरदार आहे म्हणून पागोट्यापासून सारे काही सोडून तपासले जात होते!प्रत्येक सरदार फक्त सरदार आहे म्हणून स्वतःच्या देशात गुन्हेगार ठरत होता! पूर्वी गावात रामोशी ठरत असत, तसा! सरदारांना ह्यावेळी काय यातना झाल्या असतील, हे दलितांनासुद्धा समजणार नाही. दलित आपल्या तोंडावर आपण दलित आहोत,

असा शिक्का मारून फिरत नाहीत. मी महाराष्ट्रीयन आहे; पण मी बसमधून हिंडताना मी मराठी आहे, हे काही बाकीच्यांना ओळखता येत नाही. समजा, उद्या शिवसेनेने मुंबईत काही गडबड केली आणि दिल्लीत मराठी माणसांवर लोक चिडले, तरी मी मराठीच आहे ह्याची जाहिरात नेहमी माझ्याबरोबर नसते. मी दिल्लीमधून त्यावेळीसुद्धा निर्धास्तपणे हिंडू शकतो. शिखांबाबत हे संभवत नाही. बाकी समाजाच्या नजरा आपणाकडे संशयाने पाहताहेत असे त्यांना दरक्षणी जाणवत राहते. अधिक अगतिक आणि म्हणून अधिक अतिरेकी बनत ते इतरांच्यापासून दूरदूर जातात आणि एकमेकांच्या अधिक जवळ येतात. सरदारांचे आजचे आक्रस्ताळी, आततायी वागणे हे असहायतेतून, अगतिकतेतून निर्माण झालेले आहे.

खेड्यापाड्यांतून सारे शीख संतापलेले आहेत हे तर खरेच. पण त्यांचे प्रश्न साधे आहेत. हा मुख्यत्वेकरून शेतीचा प्रश्न आहे. पाण्याचा प्रश्न आहे. त्यांना लागणाऱ्या विजेचा प्रश्न आहे. शेतीमालाला मिळणाऱ्या कमी किंमतीचा प्रश्न आहे. शहरातील माणूस कमी कष्टांत अधिक आरामात राहतो हे त्यांना दरक्षणी जाणवते. त्यातून त्यांच्या ज्या मागण्या आहेत, त्यांत शहरातील माणसांना, म्हणजे पर्यायाने हिंदूंना, फारसा रस नसल्याने पंजाबमधील आणि भारतातील सारे हिंदू त्यांच्या पिळवणूकीत सामील आहेत असे त्यांना वाटते.

हा प्रश्न या देशातील साध्या-भोळ्या, पिळवणूक होणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. त्यामुळेच पंजाबमध्ये आग पेटलेली असताना, मानाचे मुजरे घेत शरद जोशी आणि त्यांचे साथीदार पंजाबमधून हिंडलेत. शेतकरी आंदोलनाच्या नेत्यांविरुद्ध काही करायची हिंमत अकाली दलाचीच काय, पण भिंद्रनवालेचीसुद्धा नव्हती!

(माणूस दिवाळी अंक १९८४)


 शरद जोशी यांनी मांडलेला 'इंडिया विरुद्ध भारत' हा सिद्धांत पंजाबच्या संदर्भात लागू करून पाहिले, तर ह्या तेढीचे स्वरूप बऱ्यापैकी स्पष्ट होते. पंजाबी म्हटले, की बहुतेकदा आपल्यापुढे शीख उभे राहतात, पण पंजाबात शिखांचे प्रमाण सुमारे ६० टक्के आहे तर हिंदू व इतर मिळून ४० टक्के असतील. शीख हे मुख्यतः शेतकरी आहेत, तर हिंदू समाज व्यापारउदीम करणारा व नोकरीपेशातला आहे. एकूण शेतकऱ्यांमध्ये ७० टक्के शीख आहेत व ते ग्रामीण भागात राहतात. ते सामान्यतः राकट, अल्पशिक्षित समजले जातात. आपल्याला वाटते त्याप्रमाणे सगळेच शीख श्रीमंत नसतात. हिंदू बव्हंशी शहरांमधून राहतात. कायम नुकसानीत राहिलेल्या शेतीमुळे 'भारत'वासी शीख शेतकरी गरीब राहिले, तर 'इंडिया'वासी हिंदू नागर समाज तुलनेने समृद्ध झाला. मुळात चंडीगढ हे एक खूप आधुनिक शहर. रस्ते, फुटपाथ, चौक, उद्याने, दुकाने, घरे सगळेच अगदी चकाचक. पुण्या-मुंबईसारख्या शहरांतून आलेलाही इथे काहीसा दबून जातो, मग ग्रामीण पंजाबातून आलेल्या शेतकऱ्याला हे शहर म्हणजे परदेशासारखेच वाटले तर नवल नाही. चंडीगढमध्ये आंदोलक शेतकरी आल्यावर ही तेढ लगेचच त्यांच्या नजरेत ठसठसू लागली होत

 पंजाबमधील परिस्थिती इतकी स्फोटक बनली ह्याबद्दल अनेक जण इंदिरा गांधींना दोषी ठरवतात. त्यांनीच अकाली दलात फूट पडावी म्हणून जर्नेलसिंग भिंद्रनवालेसारख्या अतिरेक्यांना उभे केले; असेही म्हटले जायचे. जोशी हे अमान्य करतात. ते म्हणतात,

 या म्हणण्याइतके सत्यापासून ढळणारे काही असू शकत नाही. मलातर पंतप्रधानांच्या जागी, स्वतंत्र व्यक्तिमत्व नसलेल्या निर्बुद्धांच्या गराड्यात सापडलेली, आपल्या नेतृत्वाखालील देश भयानक वेगाने विनाशाकडे वाहत आहे हे पाहणारी आणि ते थांबवण्यास आपण असमर्थ आहोत या जाणिवेने भयग्रस्त झालेली एक एकाकी, असहाय स्त्री दिसते. इतका उत्पात घडवण्याइतकी अफाट शक्ती एका व्यक्तीच्या हाती बहाल करून सर्व दोष पंतप्रधानांच्या माथी मारणे म्हणजे केवळ राजकीय डावपेच आहे.

परीकथा ऐकण्यात रमणाऱ्या बालकाप्रमाणेच कोणत्याही प्रश्नामागे एखादे खलनायकी व्यक्तिमत्त्व कारणीभूत आहे असा विश्वास ठेवणे आपल्याला पसंत पडते – मग तो खलनायक कधी एखादा रावण, कंस, जीना, इंदिरा, झैलसिंग तर कधी भिंद्रनवाले यांच्या रूपाने जन्मलेला असतो! गोष्टीत खलनायक दूर झाला, की तो प्रश्न दूर होऊन सगळीकडे आनंदीआनंद होतो. किती सुटसुटीत आणि सोयीस्कर! मग किचकट आर्थिक व सामाजिक कारणांचा विचार करण्याची गरजच उरत नाही.
नोव्हेंबर ८२पर्यंत पंजाबमध्ये कुठेही जातीय स्वरूपात ध्रुवीकरण झालेले नव्हते हे मी अनुभवले आहे. हे मी ठामपणे म्हणू शकतो. तेथे जातीजातीत अजिबात अर्धवट शीख शेतकऱ्यांना उपकार केल्यासारखे वागवीत आणि शीख शेतकऱ्यांनाही या शहरी व्यापाऱ्यांच्या खोटेपणाबद्दल व कपटीपणाबद्दल स्वाभाविक तिरस्कार होता. हरियानातील जाट-लाला संबंध किंवा महाराष्ट्रातील मराठे-ब्राह्मण संबंध यासारखेच पंजाबमधील शीख-हिंदू संबंधांचे स्वरूप होते. संपूर्ण देशभर ग्रामीण शेतकरी आणि शहरी नागरिक यांचे संबंध याच प्रकारचे राहिले आहेत. त्यांचे परस्पर आर्थिक हितसंबंध तत्त्वतः संघर्षात्मकच राहिले आहेत.
उद्योगधंद्यासाठी लागणारे भांडवल जमा करण्यासाठी मुख्यत्वे शेतीमालाच्या किमती कमी ठेवून वरकड उत्पन्न निर्माण करणारे शासनाचे जे धोरण आहे, तेच

पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२९४ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२९५ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२९६ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२९७ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२९८ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/२९९ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३०० मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३०१ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३०२ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३०३ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३०४ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३०५ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३०६ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३०७ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३०८ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३०९ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३१० मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३११ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३१२ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३१३ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३१४ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३१५ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३१६ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३१७ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३१८ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३१९ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३२० मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३२१ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३२२ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३२३ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३२४ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३२५ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३२६ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३२७ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३२८ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३२९ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३३० मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३३१ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३३२ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३३३ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३३४ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३३५ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३३६ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३३७ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३३८ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३३९ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३४० मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३४१ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३४२ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३४३ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३४४ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३४५ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३४६ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३४७ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३४८ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३४९ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३५० मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३५१ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३५२ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३५३ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३५४ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३५५ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३५६ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३५७ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३५८ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३५९ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३६० मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३६१ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३६२ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३६३ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३६४ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३६५ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३६६ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३६७ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३६८ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३६९ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३७० मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३७१ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३७२ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३७३ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३७४ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३७५ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३७६ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३७७ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३७८ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३७९ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३८० मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३८१ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३८२ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३८३ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३८४ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३८५ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३८६ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३८७ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३८८ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३८९ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३९० मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३९१ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३९२ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३९३ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३९४ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३९५ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३९६ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३९७ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३९८ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/३९९ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४०० मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४०१ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४०२ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४०३ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४०४ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४०५ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४०६ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४०७ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४०८ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४०९ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४१० मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४११ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४१२ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४१३ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४१४ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४१५ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४१६ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४१७ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४१८ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४१९ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४२० मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४२१ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४२२ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४२३ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४२४ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४२५ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४२६ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४२७ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४२८ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४२९ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४३० मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४३१ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४३२ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४३३ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४३४ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४३५ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४३६ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४३७ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४३८ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४३९ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४४० मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४४१ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४४२ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४४३ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४४४ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४४५ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४४६ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४४७ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४४८ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४४९ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४५० मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४५१ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४५२ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४५३ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४५४ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४५५ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४५६ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४५७ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४५८ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४५९ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४६० मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४६१ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४६२ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४६३ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४६४ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४६५ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४६६ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४६७ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४६८ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४६९ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४७० मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४७१ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४७२ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४७३ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४७४ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४७५ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४७६ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४७७ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४७८ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४७९ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४८० मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४८१ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४८२ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४८३ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४८४ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४८५ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४८६ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४८७ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४८८ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४८९ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४९० मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४९१ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४९२ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४९३ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४९४ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४९५ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४९६ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४९७ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४९८ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/४९९ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/५०० मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/५०१ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/५०२ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/५०३ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/५०४ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/५०५ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/५०६ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/५०७ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/५०८ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/५०९ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/५१० मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/५११ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/५१२ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/५१३ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/५१४ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/५१५ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/५१६ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/५१७ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/५१८ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/५१९ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/५२० मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/५२१ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/५२२ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/५२३ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/५२४ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/५२५ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/५२६ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/५२७ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/५२८ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/५२९ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/५३० मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/५३१ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/५३२ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/५३३ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/५३४ मिडियाविकी:Proofreadpage pagenum templateपान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/५३५